|
श्रीमद् भागवत पुराण सुदामः स्वपुरीं प्रत्यागमनं, तत्र भगवद् दत्तं ऐश्वर्यं उपलभ्य भगवद् वात्सल्य गुणगानम् - सुदाम्याला ऐश्वर्याची प्राप्ती - संहिता - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् ) स इत्थं द्विजमुख्येन सह सङ्कथयन् हरिः । सर्वभूतमनोऽभिज्ञः स्मयमान उवाच तम् ॥ १ ॥ ब्रह्मण्यो ब्राह्मणं कृष्णो भगवान् प्रहसन् प्रियम् । प्रेम्णा निरीक्षणेनैव प्रेक्षन् खलु सतां गतिः ॥ २ ॥
श्रीशुकदेव सांगतात - ( अनुष्टुप् ) मनाचा जाणता कृष्ण द्विजभक्त असाचि तो । द्विजांचे क्लेश तो नष्टी संतांचा एक आश्रय ॥ १ ॥ पूर्वोक्त ते असेे खूप विनोदे बोलला हरी । प्रेममय अशा नेत्रे द्विजदेवास तो बघे ॥ २ ॥
द्विजमुख्येन सह - त्या श्रेष्ठ ब्राह्मणासह इत्थं संकथयन् - याप्रमाणे गोष्टी सांगत सर्वभूतमनोभिज्ञः - सर्व प्राण्यांच्या मनातील अभिप्राय जाणणारा सः हरिः - तो श्रीकृष्ण स्मयमानः - किंचित हास्य करीत तम् उवाच - त्याला म्हणाला ॥१॥ ब्रह्मण्यः - ब्राह्मणांचे हित करणारा सतां गतिः - साधूंचा आश्रय असा श्रीकृष्ण प्रेम्णा निरीक्षणेन एव खलु प्रेक्षन् - प्रेमपूर्वक निरीक्षणानेच खरोखर पहात भगवान कृष्णः - भगवान श्रीकृष्ण प्रहसन् प्रियं (ब्राह्मणं आह) - हसत हसत त्या प्रिय ब्राह्मणाला म्हणाला ॥२॥
श्रीशुक म्हणतात- सर्वांच्या मनातील जाणणारे ब्राह्मणांचे भक्त, संतांचे एकमेव आश्रयस्थान असे श्रीहरी अशा रीतीने त्या ब्राह्मणाबरोबर पुष्कळ वेळपर्यंत गप्पगोष्टी करीत राहिले. नंतर ते आपला प्रिय मित्र जो ब्राह्मण त्याच्याकडे प्रेमपूर्ण दृष्टीने पाहात स्मित हास्य करून थट्टेने त्याला म्हणाले. (१-२)
श्रीभगवानुवाच -
किमुपायनमानीतं ब्रह्मन्मे भवता गृहात् । अण्वप्युपाहृतं भक्तैः प्रेम्णा भुर्येव मे भवेत् । भूर्यप्यभक्तोपहृतं न मे तोषाय कल्पते ॥ ३ ॥
भगवान् श्रीकृष्ण म्हणाले - ब्रह्मन् तुम्ही मला काय भेट ती आणली असे । भक्त जे अर्पिती अल्प होते ते खूपची मला । अभक्त अर्पिती खूप तेणे संतोष ना कधी ॥ ३ ॥
ब्रह्मन् - हे ब्राह्मणा भवता गृहात् मे किम् उपायनं आनीतं - तू घराहून माझ्यासाठी काय भेट आणिली आहेस भक्तः प्रेम्णा उपाहृतं अणु अपि - भक्तांनी प्रेमाने आणिलेले थोडेही मे भूरि एव भवेत् - मला पुष्कळ होते अभक्तोपाहृतं भूरि अपि मे तोषाय न कल्पते - जो माझा भक्त नाही त्याने आणिलेले पुष्कळहि मला संतोष देत नाही ॥३॥
श्रीकृष्ण म्हणाले "हे ब्रह्मन ! तू आपल्या घरून माझ्यासाठी भेट म्हणून काय आणले आहेस ? माझे प्रेमळ भक्त जेव्हा प्रेमाने मला लहानशीसुद्धा वस्तू अर्पण करतात, तेव्हा ती मला फार मोठी वाटते. परंतु अभक्तांनी मला पुष्कळ जरी काही दिले तरी त्यामुळे मी संतुष्ट होत नाही." (३)
पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति ।
तदहं भक्त्युपहृतं अश्नामि प्रयतात्मनः ॥ ४ ॥
प्रेमाने फळ वा फूल पान वा जळ अर्पिती । न घेतो फक्त प्रेमाने त्वरीत भक्षितो पहा ॥ ४ ॥
यः - जो कोणी भक्त्या - भक्तीने पत्रं पुष्पं फलं तोयं - पानं, फूल, फळ किंवा पाणी मे प्रयच्छति - मला देतो अहं प्रयतात्मनः भक्त्युपहृतं तत् अश्नामि - मी पवित्रान्तःकरणाच्या त्या भक्ताचे भक्तीने आणिलेले ते सेवितो. ॥४॥
जो मनुष्य भक्तीने पान, फूल, फळ किंवा पाणी मला अर्पण करतो, त्या शुद्धचित्त भक्ताने भक्तीने दिलेले ते मी स्वीकारतो. (४)
इत्युक्तोऽपि द्विजस्तस्मै व्रीडितः पतये श्रियः ।
पृथुकप्रसृतिं राजन् न प्रायच्छदवाङ्मुखः ॥ ५ ॥
परीक्षित् ! वदता कृष्ण लाजोनी त्या द्विजे तदा । लक्षुमीपतिला चार मुठी पोहे न ते दिले ॥ ५ ॥
राजन् - हे राजा इति उक्तः द्विजः अपि - असे बोललेला तो ब्राह्मणहि व्रीडितः अवाङ्मुखः (सन्) - लज्जेने खाली मुख करून श्रियः पतये तस्मै - लक्ष्मीपती अशा त्या श्रीकृष्णाला पृथुकप्रसृतिं न प्रायच्छत् - पोह्यांचा पसा देता झाला नाही. ॥५॥
राजा ! असे म्हटल्यावरसुद्धा त्या ब्राह्मणाने संकोचाने त्या लक्ष्मीपतीला ते पसाभर पोहे दिले नाहीत. लज्जेने त्याने मान खाली घातली. (५)
सर्वभूतात्मदृक् साक्षात् तस्यागमनकारणम् ।
विज्ञायाचिन्तयन्नायं श्रीकामो माभजत्पुरा ॥ ६ ॥
लाजोनि पाही तो खाली कृष्णाने सर्व जाणिले । प्रियभक्त सखा माझा हा ना हेते कधी भजे ॥ ६ ॥
सर्वभूतात्मदृक् - सर्व प्राण्यांच्या मनातील अभिप्राय जाणणारा तस्य आगमनकारणं साक्षात् विज्ञाय - त्याच्या येण्याचे कारण प्रत्यक्ष जाणून पुरा अयं श्रीकामः मा न अभजत् - पूर्वी हा द्रव्यप्राप्तीच्या इच्छेने मला भजला नाही (इति) अचिंतयन् - असे मनात आणिता झाला. ॥६॥
श्रीकृष्ण सर्व प्राण्यांच्या मनातील जाणतात. त्यांनी ब्राह्मणाच्या येण्याचे कारण जाणूनही विचार केला की, " याने यापूर्वी कधीही धनाच्या इच्छेने माझे भजन केलेले नाही." (६)
पत्न्याः पतिव्रतायास्तु सखा प्रियचिकीर्षया ।
प्राप्तो मामस्य दास्यामि सम्पदोऽमर्त्यदुर्लभाः ॥ ७ ॥
आग्रहे धर्मपत्नीच्या येथे तो पातला असे । संपत्ती याजला देतो जी त्या देवांस दुर्लभ ॥ ७ ॥
तु - पण पतिव्रतायाः पत्न्याः प्रियचिकीर्षया - पतिव्रता अशा पत्नीचे प्रिय करण्याच्या इच्छेने सखा - माझा मित्र मां प्राप्तः - माझ्याकडे आला आहे अस्य मर्त्यदुर्लभाः संपदः दास्यामि - ह्याला मी मनुष्यांना मिळण्यास कठीण अशी संपत्ती देईन. ॥७॥
यावेळी हा आपला मित्र पतिव्रता पत्नीला बरे वाटावे म्हणून तिच्याच आग्रहावरून येथे आला आहे. म्हणून देवांनासुद्धा दुर्लभ अशी संपत्ती मी याला देईन. (७)
इत्थं विचिन्त्य वसनात् चीरबद्धान् द्विजन्मनः ।
स्वयं जहार किमिदं इति पृथुकतण्डुलान् ॥ ८ ॥
विचार करि हा कृष्ण पोटळी पाहता वदे । काय या पोटळी मध्ये आणि घेई हिरावुनी ॥ ८ ॥
इत्थं विचिन्त्य - असा विचार करून द्विजन्मनः चीरबद्धान् पृथुकतण्डुलान् - ब्राह्मणाच्या जीर्ण वस्त्रात बांधलेले पोहे किम् इदम् इति (उक्त्वा) - हे काय आहे असे म्हणून वसनात् - वस्त्रातून स्वयं जहार - स्वतः घेता झाला. ॥८॥
भगवान श्रीकृष्णांनी असा विचार करून त्याच्या वस्त्रातून एका फडक्यात बांधलेले पोहे " हे काय आहे? " असे म्हणून, स्वत:च ओढून घेतले. (८)
नन्वेतदुपनीतं मे परमप्रीणनं सखे ।
तर्पयन्त्यङ्ग मां विश्वं एते पृथुकतण्डुलाः ॥ ९ ॥
आदरे वदला मित्रा प्रिय ही भेट आणली । अरे ना मीच तो फक्त तृप्तेल जग यात की ॥ ९ ॥
सखे - हे मित्रा ननु - खरोखर एतत् उपनीतं - ही भेट मे परमप्रीणनं - मला फार आनंद देणारी आहे अंग - हे मित्रा एते पृथुकतण्डुलाः - हे पोहे विश्वं मां तर्पयन्ति - विश्वस्वरूपी मला तृप्त करीत आहेत. ॥९॥
आणि म्हणाले, " प्रिय मित्रा ! ही तर माझ्या अत्यंत आवडीची भेट तू माझ्यासाठी आणलीस. हे पोहे केवळ मलाच नव्हे, तर सगळ्या जगाला तृप्त करतील. " (९)
इति मुष्टिं सकृज्जग्ध्वा द्वितीयां जग्धुमाददे ।
तावच्छ्रीर्जगृहे हस्तं तत्परा परमेष्ठिनः ॥ १० ॥
वदता मूठ तो खाई दुसरी भरली तदा । रुक्मिणीरूपि लक्ष्मी ती कृष्णाचा हात तो धरी ॥ १० ॥
एते सकृत् मुष्टिं जग्ध्वा - असे म्हणून एकदा पोह्यांची एक मूठ भक्षण करून द्वितीयां जग्धुं आददे - दुसरी मूठ खाण्याकरिता घेता झाला तावत् - इतक्यात तत्पराः श्रीः - भगवान आहे परम दैवत जीचे अशी रुक्मिणी देवी परमेष्ठिनः हस्तं जगृहे - श्रीकृष्णाचा हात धरती झाली. ॥१०॥
असे म्हणून त्यांनी त्यातून एक मूठभर पोहे खाल्ले आणि दुसरी मूठ भरून घेतले, तोच पतिपरायण रुक्मिणीने श्रीकृष्णांचा हात धरला. (१०)
एतावतालं विश्वात्मन् सर्वसम्पत्समृद्धये ।
अस्मिन्लोके अथवामुष्मिन् पुंसस्त्वत्तोषकारणम् ॥ ११ ॥
वदते थांबवी देवा पोहे हे एवढे पहा । पृथ्वी नी स्वर्गिची सर्व संपत्ती देउ ते शके । अधीक भक्षिता विप्रा देण्यास काय ते असे ॥ ११ ॥
विश्वात्मन् - हे जगद्रूपा श्रीकृष्णा पुंसः - पुरुषाला अस्मिन् अथवा अमुष्मिन् लोके - ह्या किंवा दुसर्या लोकांमध्ये एतावता - एवढे सर्वसंपत्समृद्धये त्वत्तोषकारणं अलं - सर्व संपत्ती मिळविण्यासाठी तुला संतुष्ट करण्यास पुरेसे आहे. ॥११॥
रुक्मिणी म्हणाली, " हे विश्वात्मन ! माणसाला या लोकी किंवा परलोकातसुद्धा आपल्याला संतुष्ट करून सर्व प्रकारच्या संपत्तीची समृद्धी प्राप्त करण्यासाठी हे एक मूठभर पोहेसुद्धा पुरेसे आहेत. " (११)
ब्राह्मणस्तां तु रजनीं उषित्वाच्युतमन्दिरे ।
भुक्त्वा पीत्वा सुखं मेने आत्मानं स्वर्गतं यथा ॥ १२ ॥
त्या दिनी द्विजदेवो ते राहिले कृष्णमंदिरी । जेवले पाहिले सर्व जणू वैकुंठधाम ते ॥ १२ ॥
ब्राह्मणः तु - ब्राह्मण तर अच्युतमन्दिरे - श्रीकृष्णाच्या मंदिरात तां रजनी उषित्वा - ती रात्र राहून भुक्त्वा पीत्वा - खाऊन पिऊन यथा स्वर्गतं (तथा) आत्मानं सुखं मेने - जसे स्वर्गात सुखी असावे तसे आपण सुखी आहो असे मानिता झाला. ॥१२॥
ब्राह्मण त्या रात्री श्रीकृष्णांच्या महालात राहिला. तेथे खाऊन-पिऊन तो इतका खूष झाल की, आपण स्वर्गात असल्यासारखे त्याला वाटले. (१२)
श्वोभूते विश्वभावेन स्वसुखेनाभिवन्दितः ।
जगाम स्वालयं तात पथ्यनुव्रज्य नन्दितः ॥ १३ ॥
परीक्षित् ! ब्राह्मणा तेंव्हा प्रत्यक्ष कांहि ना मिळे । तरी कृष्णास कांहीही न मागे विप्र तो मुळी ॥ १३ ॥
तात - बा परीक्षिता श्वोभूते - दुसर्या दिवशी विश्वभावेन स्वसुखेन अभिवन्दितः - जगाचे कल्याण करणार्या व आत्मस्वरूपात रममाण होणार्या श्रीकृष्णाने वंदिलेला पथि अनुव्रज्य - मार्गात त्याच्या मागोमाग जाऊन (मधुरोक्तिभिः) नंदितः - गोड शब्दांनी आनंद दिलेला (सः) स्वालयं जगाम - तो ब्राह्मण आपल्या घरी जाण्यास निघाला. ॥१३॥
हे राजा ! दुसर्या दिवशी विश्वनिर्मात्या व भक्तांना आनंद देणार्या श्रीकृष्णांनी त्याला वंदन केले व त्याच्या मागोमाग काही अंतर जाऊन त्याला निरोप दिला. नंतर तो आपल्या गावी निघाला. (१३)
स चालब्ध्वा धनं कृष्णान् न तु याचितवान् स्वयम् ।
स्वगृहान् व्रीडितोऽगच्छन् महद्दर्शननिर्वृतः ॥ १४ ॥
चित्ताचा खेळ जाणोनी लज्जीत जाहला तसा । कृष्णदर्शन आनंदे निघाला आपुल्या घरा ॥ १४ ॥
तु - पण महद्दर्शननिर्वृतः सः - थोर अशा श्रीकृष्णाच्या दर्शनाने सुखी झालेला तो ब्राह्मण कृष्णात् धनं अलब्ध्वा - श्रीकृष्णाकडून द्रव्य न मिळविताहि स्वयं न याचितवान् - स्वतः मागता झाला नाही व्रीडितः (च) स्वगृहान् अगच्छत् - आणि लज्जित होऊन आपल्या घरी गेला. ॥१४॥
ब्राह्मणाला श्रीकृष्णांकडून धन मिळाले नाही. तरीसुद्धा त्याने स्वत: काही मागितले नाही. उलट या देवदेवेश्वरासाठी आपण य:कश्चित पोहे ते काय आणले, या विचाराने तो लज्जित झाला, परंतु श्रीकृष्णांच्या दर्शनामुळे आनंदितही होऊन तो आपल्या घराकडे परतला. (१४)
अहो ब्रह्मण्यदेवस्य दृष्टा ब्रह्मण्यता मया ।
यद् दरिद्रतमो लक्ष्मीं आश्लिष्टो बिभ्रतोरसि ॥ १५ ॥
विचार करि तो विप्र आनंद नवलाव हा । कृष्णाची द्विजभक्ती मी नेत्राने आज पाहिली । श्रीचिन्ह वक्षिं त्या कृष्णे दरिद्र्यां धरिले असे ॥ १५ ॥
अहो - कितीहो मया - मला ब्रह्मण्यदेवस्य ब्रह्मण्यता दृष्टा - ब्राह्मणांचे हित करणार्या श्रीकृष्णाची ब्राह्मणावरील प्रीति दिसून आली यत् - की लक्ष्मी उरसि बिभ्रता (तेन) - लक्ष्मीला वक्षस्थलावर धारण करणार्या त्या श्रीकृष्णाने दरिद्रतमः (अहं) आश्लिष्टः - अत्यंत दरिद्री असा मी आलिंगिला गेलो. ॥१५॥
जाताना तो मनात विचार करू लागला - अहो ! ब्राह्मणांना देव मानणार्या श्रीकृष्णांची ब्राह्मणभक्ती आज मी पाहिली. धन्य झालो ! ज्यांच्या वक्ष:स्थळावर लक्ष्मी विराजमान असते, त्यांनी सर्वांत दरिद्री अशा मला आपल्या हृदयाशी कवटाळले. (१५)
क्वाहं दरिद्रः पापीयान् क्व कृष्णः श्रीनिकेतनः ।
ब्रह्मबन्धुरिति स्माहं बाहुभ्यां परिरम्भितः ॥ १६ ॥
दरिद्री मी कुठी पापी कुठे श्रीमंत तो हरी । विप्र मी म्हणूनी त्याने हृदयी धारिले असे ॥ १६ ॥
दरिद्रः पापीयन् अहं क्व - दरिद्री व पापी असा मी कोठे श्रीनिकेतनः कृष्णः (च) क्व - व लक्ष्मीचे निवासस्थान असा श्रीकृष्ण कोठे अहं ब्रह्मबंधुः इति - मी ब्राह्मण मित्र असे म्हणून बाहुभ्यां परिरम्भितः स्म - दोन बाहूंनी आलिंगिला गेलो. ॥१६॥
कुठे मी अत्यंत पापी, दरिद्री आणि कुठे लक्ष्मीचे आश्रयस्थान भगवान श्रीकृष्ण ! परंतु त्यांनी ’मी केवळ ब्राह्मण’ म्हणून मला आपल्या बाहूंनी हृदयाशी घट्ट धरले. (१६)
निवासितः प्रियाजुष्टे पर्यङ्के भ्रातरो यथा ।
महिष्या वीजितः श्रान्तो बालव्यजनहस्तया ॥ १७ ॥
मंचकी झोपवी जैसा तयाचा बंधु मी असे । थकता पट्टराणीने चवर्या ढाळिल्या मला ॥ १७ ॥
यथा भ्रातरः - जसे भाऊ तथा - तसा श्रान्तः अहं - थकलेला असा मी प्रिया जुष्टे पर्यंके - पत्नीने सेविलेल्या पलंगावर निवासितः - बसविला गेलो वालव्यजनहस्तया महिष्या वीजितः - चवरीचा पंखा आहे हातात जीच्या अशा त्याच्या पटटराणीकडून वारा घातला गेलो. ॥१७॥
एवढेच नव्हे, तर ज्या पलंगावर त्यांची प्राणप्रिया रुक्मिणी शयन करते, त्या पलंगावर त्यांनी मला भाऊ मानून बसविले. मी थकलेलो होतो, म्हणून स्वत: त्यांच्या पट्टराणीने आपल्या हातांनी चवर्या ढाळून मला वारा घातला. (१७)
शुश्रूषया परमया पादसंवाहनादिभिः ।
पूजितो देवदेवेन विप्रदेवेन देववत् ॥ १८ ॥
देवाधिदेव त्या कृष्णे इष्टदेव द्विजास या । मानुनी दाबिले पाय दैवतापरि पूजिले ॥ १८ ॥
देवदेवेन विप्रदेवेन - देवांचाहि देव व ब्राह्मण ज्याला देव आहेत अशा श्रीकृष्णाने पादसंवाहनादिभिः परमया शुश्रूषया - पाय चेपणे इत्यादि उत्तम सेवेच्या योगे देववत् पूजितः - देवाप्रमाणे पूजिला गेलो. ॥१८॥
ब्राह्मणांना देव मानणार्या देवाधिदेवांनी पाय चेपणे इत्यादी रीतीने माझी चांगली सेवा करून देवाप्रमाणे माझी पूजा केली. (१८)
स्वर्गापवर्गयोः पुंसां रसायां भुवि सम्पदाम् ।
सर्वासामपि सिद्धीनां मूलं तच्चरणार्चनम् ॥ १९ ॥
स्वर्ग मोक्ष तशी पृथ्वी योग सिद्धी रसातळी । संपत्ती प्राप्तिचे मूळ हरिपूजाच ती असे ॥ १९ ॥
रसायां भुवि (च) - पाताळात व भूलोकी तच्चरणार्चनं - त्या श्रीकृष्णाच्या पायांचे पूजन पुंसां - पुरुषास स्वर्गापवर्गयोः - स्वर्ग व मोक्ष यांच्या प्राप्तीचे संपदां (च) - व संपत्तीचे सर्वासां सिद्धीनाम् (च) अपि - आणि सर्व अणिमादी सिद्धींचेहि मूलम् (अस्ति) - मूळ कारण होय. ॥१९॥
त्यांच्या चरणांची पूजाच स्वर्ग, मोक्ष, पृथ्वी आणि रसातळातील संपत्ती व सर्व सिद्धींच्या प्राप्तीचे कारण होय. (१९)
अधनोऽयं धनं प्राप्य माद्यात् उच्चैः न मां स्मरेत् ।
इति कारुणिको नूनं धनं मेऽभूरि नाददात् ॥ २० ॥
माजेल धन हा घेता मिळाले अल्प ते जरी । विसरेल मला ऐशा विचारे धन ना दिले ॥ २० ॥
अधनः अयं - दरिद्री असा हा ब्राह्मण धनं प्राप्य - द्रव्य मिळाल्यावर उच्चैः माद्यात् - अत्यंत उन्मत्त होईल मां (च) न स्मरेत् - आणि मला स्मरणार नाही इति (विचार्य) कारुणिकः (सः) - असा विचार करून दयाळू असा श्रीकृष्ण नूनं - खरोखर मे अभूरि (अपि) धनं न अददात् - मला थोडेहि द्रव्य देता झाला नाही. ॥२०॥
तरीसुद्धा ’हा दरिद्री धन मिळाल्यावर उन्मत्त होईल आणि माझे याला विस्मरण होईल, ’ असा विचार करूनच दयाळू श्रीकृष्णांनी मला थोडेसुद्धा धन दिले नाही. (२०)
इति तच्चिन्तयन् अन्तः प्राप्तो नियगृहान्तिकम् ।
सूर्यानलेन्दुसङ्काशैः विमानैः सर्वतो वृतम् ॥ २१ ॥ विचित्रोपवनोद्यानैः कूजद्द्विजकुलाकुलैः । प्रोत्फुल्लकमुदाम्भोज कह्लारोत्पलवारिभिः ॥ २२ ॥ जुष्टं स्वलङ्कृतैः पुम्भिः स्त्रीभिश्च हरिणाक्षिभिः । किमिदं कस्य वा स्थानं कथं तदिदमित्यभूत् ॥ २३ ॥
विचार करिता ऐसा ग्रामासी विप्र पातला । तिथे तो सूर्य अग्नी नी चंद्राच्या सम रत्न ते ॥ २१ ॥ घरासी जडवीलेले ठाई ठाईस बाग ते । रंगीत पक्षि तै गाती तळ्यात कंज शोभले ॥ २२ ॥ सजले नरनारी ते द्विजांनी पाहिले असे । वाटले पातलो कोठे कसे हे जाहले असे ॥ २३ ॥
इति तत् अन्तः चिन्तयन् - अशा प्रकारचा मनात विचार करीत सूर्यानलेन्दुसंकाशैः विमानैः सर्वतः वृतं - सूर्य, अग्नि व चंद्र ह्यांसारख्या तेजस्वी विमानांनी सर्व बाजूंनी वेष्ठिलेल्या निजगृहान्तिकं प्राप्तः - आपल्या घराच्या जवळ आला. ॥२१॥ कूजद्द्विजकुलाकुलैः - शब्द करणार्या पक्षिसंघांनी गजबजून गेलेल्या प्रोत्फुल्लकुमुदा म्भोजकह्लारोत्पलवारिभिः - फुललेली आहेत कुमुदे, अंभोजे, कल्हारे व उत्पले उदकात ज्यांच्या अशा विचित्रोपवनोद्यानैः - आश्चर्यकारक बागांनी व क्रीडास्थानांनी. ॥२२॥ च - आणि स्वलङ्कृतैः पुम्भिः - अलंकार घातलेल्या पुरुषांनी हरिणाक्षिभिः स्त्रीभिः (च) - आणि हरिणाप्रमाणे चंचल नेत्र असणार्या स्त्रियांनी जुष्टं - सेविलेले इदं स्थानं - हे स्थान किम् कस्य वा - काय आहे व कोणाचे आहे तत् इदं (मम स्थानं) - तेच हे माझे स्थान इति कथम् अभूत् - असे कसे झाले ? ॥२३॥
मनात असा विचार करीतच ब्राह्मण आपल्या घराजवळ येऊन पोहोचला. ते ठिकाण, सूर्य, अग्नी आणि चंद्र यांच्या तेजाप्रमाणे तेजस्वी प्रासादांनी वेढलेले होते. ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची उपवने आणि उद्याने तयार केलेली होती. आणि त्यांमध्ये पक्ष्यांचे थवे चिवचिवाट करीत होते. सरोवरांमध्ये कुमुदे, पांढरी, तांबडी, निळी अशी सुगंधी कमळे उमलली होती. उत्तम वस्त्रालंकार घातलेल्या सुंदर स्त्रिया तेथे वावरत होत्या. ते पाहून ब्राह्मण विचार करू लागला , " हे मी काय पाहात आहे ? हे कोणाचे ठिकाण आहे ? जेथे मी राहात होतो, ते हे ठिकाण असे कसे झाले ? " (२१-२३)
एवं मीमांसमानं तं नरा नार्योऽमरप्रभाः ।
प्रत्यगृह्णन् महाभागं गीतवाद्येन भूयसा ॥ २४ ॥
विचार करिता ऐसा तेजस्वी नर नारि तै । द्विजाच्या स्वागता आले वाद्येही वाजती तदा ॥ २४ ॥
अमरप्रभाः नराः नार्यः (च) - देवासारख्या कांतीचे पुरुष व स्त्रिया भूयसा गीतवाद्येन - मोठया गायन वादनाने एवं मीमांसमानं तं महाभागं - याप्रमाणे विचार करीत असलेल्या त्या भाग्यवानाला प्रत्यगृह्णन - आदरिते झाले. ॥२४॥
तो असा विचार करीत होता, तेवढ्यात देवदूतांसारखे सुंदर स्त्री-पुरुष वाजत-गाजत, मंगल गीते गात, त्या भाग्यवान ब्राह्मणाच्या स्वागतासाठी आले. (कारण भगवंतांनी स्वर्गातून त्यांना येथे आणले होते.) (२४)
पतिमागतमाकर्ण्य पत्न्युद्धर्षातिसम्भ्रमा ।
निश्चक्राम गृहात्तूर्णं रूपिणी श्रीरिवालयात् ॥ २५ ॥
परीआगमने विप्रा आनंदे पातली असे । लक्ष्मी जै पातली तेथे कमळाच्या वनातुनी ॥ २५ ॥
आलयात् रूपिणी श्रीः इव पत्नी - कमलवनातून मूर्तिमंत लक्ष्मीप्रमाणे ती ब्राह्मणपत्नी पतिम् आगतं आकर्ण्य - पति आलेला ऐकून उद्धर्षा अतिसंभ्रमा - उचंबळला आहे आनंद जीचा व फारच झाली आहे धांदल जीची अशी गृहात् तूर्णं निश्चक्राम - घरातून तत्काळ बाहेर पडली. ॥२५॥
पती आल्याचे ऐकून त्याच्या पत्नीला अतिशय आनंद झाला आणि ती गडबडीत ताबडतोब घराच्या बाहेर आली. त्यावेळी ती अशी दिसत होती की, जणू कमलवनातून आलेली लक्ष्मीच. (२५)
पतिव्रता पतिं दृष्ट्वा प्रेमोत्कण्ठाश्रुलोचना ।
मीलिताक्ष्यनमद् बुद्ध्या मनसा परिषस्वजे ॥ २६ ॥
पतीसी पाहता नेत्रीं आसवे पातली तिच्या । प्रेमभावे द्विजां तेंव्हा पतीला नमिते पहा ॥ २६ ॥
(सा) पतिव्रता - ती पतिव्रता पतिं दृष्टवा - पतीला पाहून प्रेमोत्कण्ठाश्रुलोचना - प्रेम व औत्सुक्य यांमुळे अश्रूंनी भरले आहेत नेत्र जीचे अशी मीलिताक्षी - मिटले आहेत डोळे जीने अशी बुद्ध्या (तं) अनमत् - विचारपूर्वक त्याला नमस्कार करिती झाली मनसा (च) परिषस्वजे - आणि मनाने आलिंगिती झाली. ॥२६॥
पतीला पाहाताच त्या पतिव्रता पत्नीच्या डोळ्यांत अत्युत्कट प्रेमामुळे अश्रू तरळू लागले. (ते जमिनीवर पडू नयेत म्हणून) तिने आपले डोळे बंद केले. यांना वंदनच केले पाहिले, असे ठरवून त्यांना नमस्कार केला आणि मनोमन आलिंगनही दिले. (२६)
पत्नीं वीक्ष्य विस्फुरन्तीं देवीं वैमानिकीमिव ।
दासीनां निष्ककण्ठीनां मध्ये भान्तीं स विस्मितः ॥ २७ ॥
अलंकृता अशी विप्रा दासिंच्या मेळि दीपली । देवांगनापरी पत्नी पाहता विस्मयो द्विजा ॥ २७ ॥
निष्ककण्ठीनां दासीनां मध्ये भान्तीं - सुवर्णाचे अलंकार कंठात घातलेल्या दासीच्या मध्यभागी शोभणार्या वैमानिकीम् इव विस्फुरन्तीं - स्वर्गीय अप्सरेप्रमाणे चमकणार्या देवी पत्नीं वीक्ष्य - तेजस्वी पत्नीला पाहून सः विस्मितः (अभवत्) - तो ब्राह्मण आश्चर्यचकित झाला. ॥२७॥
सुवर्णालंकार घातलेल्या दासींच्या समुदायात देवांगनेप्रमाणे अत्यंत शोभणार्या पत्नीला पाहून तो आश्चर्यचकित झाला. (२७)
प्रीतः स्वयं तया युक्तः प्रविष्टो निजमन्दिरम् ।
मणिस्तम्भशतोपेतं महेन्द्रभवनं यथा ॥ २८ ॥
पत्नीच्या सह ते प्रेमे महाली पातले तदा । इंद्रस्थाना परी शोभे स्थान ते मणिस्तंभ जै ॥ २८ ॥
प्रीतः - प्रसन्न झालेला तो तया युक्तः - त्या पत्नीसहित स्वयं - स्वतः यथा महेन्द्रभवनं - जसे इंद्राचे गृह मणिस्तंभशतोपेतं - रत्नांच्या शंभर खांबांनी युक्त अशा निजमन्दिरं प्रविष्टः - आपल्या वाडयात शिरला. ॥२८॥
तिच्यासह त्याने मोठ्या आनंदाने आपल्या प्रासादात प्रवेश केला. तो प्रासाद इंद्राच्या प्रासादासारख्या शेकडो रत्नजडित खांबांचा होता. (२८)
पयःफेननिभाः शय्या दान्ता रुक्मपरिच्छदाः ।
पर्यङ्का हेमदण्डानि चामरव्यजनानि च ॥ २९ ॥
मंचको हस्तिदंताचा सुवर्णे मढिला असे । शूभ्र शय्या तशी नी तै चवर्या स्वर्णदांडि त्या ॥ २९ ॥
पयःफेननिभाः शय्याः - दुधाच्या फेसाप्रमाणे शुभ्र अशा शय्या दान्ताः - हस्तिदंती रुक्मपरिच्छदाः - सुवर्णाने भूषविलेले पर्यंकाः - पलंग हेमदंडानि चामरव्यजनानि च - आणि सोन्याचे दांडे असलेले पंखे व चवर्या. ॥२९॥
हत्तींच्या दातांपासून बनविलेल्या आणि सोन्याच्या पत्र्यांनी मढविलेल्या पलंगावर दुधाच्या फेसाप्रमाणे पांढर्या शुभ्र आणि कोमल गाद्या अंथरल्या होत्या. सोन्याच्या दांड्यांच्या चवर्या आणि पंखे तेथे ठेवलेले होते. (२९)
आसनानि च हैमानि मृदूपस्तरणानि च ।
मुक्तादामविलम्बीनि वितानानि द्युमन्ति च ॥ ३० ॥ स्वच्छस्फटिककुड्येषु महामारकतेषु च । रत्नदीपा भ्राजमानान् ललना रत्नसंयुताः ॥ ३१ ॥
सोन्याची आसने त्यात मऊ गाद्याहि घातल्या । मोत्यांच्या झालरी ज्यांनी चांदवे शोभले तिथे ॥ ३० ॥ भिंती त्या स्फटिकाच्या नी त्यात माणिक ठोकले । रत्नधरा अशा मूर्ती दीप ते उजळीत की ॥ ३१ ॥
मृदूपस्तरणानि हैमानि आसनानि - मऊ आच्छादने घातलेली सोन्याची आसने मुक्तादामविलम्बीनि द्युमन्ति वितानानि च - आणि मोत्यांच्या माळा ज्यांवर टांगल्या आहेत अशी चकाकणारी छते च - आणि महामारकतेषु स्वच्छस्फटिककुडयेषु - मोठे पाचूचे मणि जडविले आहेत ज्यांत अशा निर्मळ स्फटिकांच्या भिंतीवर ललनारत्नसंयुतान् भ्राजमानान् रत्नदीपान् - सुंदर बाहुल्यांच्या हातांत लटकाविलेले तेजस्वी रत्नांचे दिवे. ॥३०-३१॥
सोन्याची सिंहासने होती. त्यांच्यावर मऊमऊ गाद्या अंथरल्या होत्या. तेथे मोत्यांच्या लडी लावलेले तेजस्वी चांदवे लावले होते. (३०) स्फटिकांच्या शुभ्र भिंतींवर पाचूची नक्षी होती. आणि रत्ननिर्मित स्त्रियांच्या हातात रत्नांचे दिवे झगमगत होते. (३१)
विलोक्य ब्राह्मणस्तत्र समृद्धीः सर्वसम्पदाम् ।
तर्कयामास निर्व्यग्रः स्वसमृद्धिमहैतुकीम् ॥ ३२ ॥
समृद्धी पाहता ऐशी प्रत्यक्ष जाणण्यास ते । मनासी बोलले विप्र संपत्ती पातली कशी ॥ ३२ ॥
तत्र - तेथे सर्वसंपदां समृद्धीः विलोक्य - सर्व संपत्तीची विपुलता पाहून ब्राह्मणः निर्व्यग्र - ब्राह्मण अव्यग्रपणे अहैतुकीं स्वसमृद्धिं तर्कयामास - कारणाशिवाय मिळालेल्या आपल्या वैभवाविषयी विचार करू लागला. ॥३२॥
अशा प्रकारे सर्व प्रकारच्या संपत्तीची अकारण समृद्धी पाहून ब्राह्मण त्याविषयी शांतपणे विचार करू लागला. (३२)
( मिश्र )
नूनं बतैतन्मम दुर्भगस्य शश्वद् दरिद्रस्य समृद्धिहेतुः । महाविभूतेरवलोकतोऽन्यो नैवोपपद्येत यदूत्तमस्य ॥ ३३ ॥
( इंद्रवज्रा ) मी जन्मताची मुळि तो दरिद्री संपत्ती आली कुठुनी अशीही । श्रीकृष्ण पाही नयने मला नी त्याचीच झाली बहुही कृपा की ॥ ३३ ॥
बत - अहो नूनं - खरोखर शश्वद्दरिद्रस्य दुर्भगस्य एतन्मम - नित्य दरिद्री व दुर्दैवी अशा या मला समृद्धिहेतुः - ऐश्वर्य प्राप्त होण्याचे कारण महाविभूतेः यदूत्तमस्य अवलोकतः अन्यः न एव उपपद्येत - मोठया प्रभावाच्या यदुश्रेष्ठ श्रीकृष्णाच्या दर्शनावाचून दुसरे असूच शकणार नाही. ॥३३॥
तेव्हा त्याच्या लक्षात आले की, मी तर जन्मत:च भाग्यहीन आणि दरिद्री. त्याअर्थी या संपत्तीचे कारण परमऐपश्वर्यशाली यदुश्रेष्ठ भगवान श्रीकृष्णांच्या कृपाकटाक्षाशिवाय दुसरे असूच शकत नाही. (३३)
नन्वब्रुवाणो दिशते समक्षं
याचिष्णवे भूर्यपि भूरिभोजः । पर्जन्यवत्तत् स्वयमीक्षमाणो दाशार्हकाणामृषभः सखा मे ॥ ३४ ॥
तो पूर्णकामो अन भोग युक्त तो भाव जाणी अन देई सारे । उदार मेघापरि तो सखा की कितीहि पावे तरि अल्प भासे ॥ ३४ ॥
ननु - खरोखर दाशार्हकाणां ऋषभः मे सखा - यादवांमध्ये श्रेष्ठ असा तो माझा मित्र कृष्ण भूरिभोजः (सन्) - मोठा दाता असल्यामुळे भूरि अपि (देयं) - ते पुष्कळ असेही आपले दान स्वयं पर्जन्यवत् (अल्पं) ईक्षमाणः - स्वतः पावसाप्रमाणे थोडे मानणारा तत् - ते याचिष्णवे समक्षं अब्रुवाणः दिशते - याचकाला समक्ष न सांगता देतो. ॥३४॥
ज्यांच्याकडे अनंत भोगसामग्री आहे, असे माझे मित्र दशार्हाधिपती भगवान, याचक भक्ताच्या मनातील भाव ओळखून समोर काही न बोलता त्याला पुष्कळ काही देतात. ज्याच्याजवळ समुद्र भरून टाकण्याचे सामर्थ्य आहे, तो मेघ शेतकर्याच्या शेतात त्याला नकळत पुष्कळ वर्षाव करूनही थोडाच केला, असे समजतो, तसे माझ्या मित्राचे आहे. (३४)
किञ्चित्करोत्युर्वपि यत् स्वदत्तं
सुहृत्कृतं फल्ग्वपि भूरिकारी । मयोपणीतं पृथुकैकमुष्टिं प्रत्यग्रहीत् प्रीतियुतो महात्मा ॥ ३५ ॥
भक्तास देता म्हणतोचि अल्प नी अल्प घेता म्हणतो बहू हे । पोहे हरीला मुठिने दिले मी प्रेमेचि तेणे करि घेतले की ॥ ३५ ॥
यत् स्वदत्तं (तत्) उरु अपि - जे स्वतः दिलेले ते पुष्कळ असताहि किंचित् करोती - थोडे मानितो सुहृत्कृतं फल्गु अपि भूरिकारी - मित्रांनी थोडेहि केले असले तरी पुष्कळ मानितो (सः) प्रीतियुतः महात्मा - प्रेमाने युक्त असा तो महात्मा श्रीकृष्ण मया उपनीतं पृथुकैकमुष्टिं प्रत्यग्रहीत् - मी भेट म्हणून नेलेल्या पोह्यांची एकच एक अशी मूठ स्वीकारिता झाला. ॥३५॥
ते पुष्कळ देतात, परंतु थोडेच दिले असे समजतात. त्यांच्या भक्ताने थोडेसे काहीही करू दे, ते त्यांना फार वाटते. पहा ना ! मी त्यांना फक्त एक मूठभर पोहे भेटीदाखल दिले, पण त्या महात्म्याने किती प्रेमाने त्यांचा स्वीकार केला बरे ! (३५)
तस्यैव मे सौहृदसख्यमैत्री
दास्यं पुनर्जन्मनि जन्मनि स्यात् । महानुभावेन गुणालयेन विषज्जतः तत्पुरुषप्रसङ्गः ॥ ३६ ॥
त्याची मिळो मैत्रि ती जन्म जन्मी न इच्छि मी तो धन संपतीला । वाढो मनी प्रेम पदासि त्याच्या सत्संग व्हावा नित प्रेमभक्ता ॥ ३६ ॥
जन्मनि जन्मनि - प्रत्येक जन्मामध्ये तस्य एव - त्या श्रीकृष्णाचेच मे - मला सौहृदसख्यमैत्री दास्यं (च) - प्रेम, सख्य, मैत्री, मित्रता व दास्य स्यात् - प्राप्त होवो पुनः - आणखी गुणालयेन महानुभावेन विषज्जतः (मे) - गुणांचे निवासस्थान अशा मोठया पराक्रमी श्रीकृष्णाशी आसक्ती ठेवणार्या मला तत्पुरुषप्रसंगः (स्यात्) - त्याच्या भक्तांची संगति प्राप्त होवो. ॥३६॥
मला जन्मोजन्मी त्यांचेच प्रेम, त्यांचेच सख्य, त्यांचीच मैत्री आणि त्यांचीच सेवा करावयास मिळो. मला संपत्ती नको, तर गुणांचे एकमेव निवासस्थान असलेल्या त्या महानुभावांच्या चरणी माझे मन जडून राहो आणि त्यांच्याच भक्तांचा सत्संग मला प्राप्त होवो. (३६)
( इंद्रवंशा )
भक्ताय चित्रा भगवान् हि सम्पदो राज्यं विभूतीर्न समर्थयत्यजः । अदीर्घबोधाय विचक्षणः स्वयं पश्यन् निपातं धनिनां मदोद्भवम् ॥ ३७ ॥
संपत्तिचा तो हरि दोष जाणी धनीक गर्वे पतनास जाती । मागोनि ना दे धन भक्तराजा कृपा तयाचि बहु तीच आहे ॥ ३७ ॥
हि - कारण विचक्षणः भगवान् अजः - सूज्ञ असा भगवान परमेश्वर स्वयं - स्वतः धनिनां मदोद्भवं निपातं पश्यन् - श्रीमंताना द्रव्यमदाने होणारी अधोगति पाहून चित्राः संपदः - आश्चर्यजनक संपत्ति राज्यं विभूतीः (च) - राज्य व ऐश्वर्ये भक्ताय न समर्थयति - भक्ताला देत नाही अदीर्घबोधाय - अविवेकी अशा पुरुषाला. ॥३७॥
संपत्तीचे दोष जाणणारे अजन्मा भगवान श्रीकृष्ण धनाढ्य लोकांचा ऐश्वर्याच्या मदाने अध:पात होतो, हे पाहून आपल्या पूर्ण ज्ञान न झालेल्या भक्ताला , निरनिराळ्या प्रकारची संपत्ती, राज्य किंवा इतर वैभव देत नाहीत. (३७)
( अनुष्टुप् )
इत्थं व्यवसितो बुद्ध्या भक्तोऽतीव जनार्दने । विषयान्जायया त्यक्ष्यन् बुभुजे नातिलम्पटः ॥ ३८ ॥
( अनुष्टुप् ) निश्चये बुद्धिची ऐशी आसक्ती सोडिली द्विजे । प्रसाद मानुनी चित्ती भगवत्प्रेम वाढवी ॥ ३८ ॥
इत्थं बुद्ध्या व्यवसितः - असे विचारपूर्वक ठरवून जनार्दने अतीव भक्तः (सः) - भगवंताची अत्यंत भक्ति करणारा तो ब्राह्मण नातिलंपटः (सन्) - अत्यंत विषयलोलुप न होता विषयान् त्यक्ष्यन् - हळूहळू विषयत्याग करीत जायया (तान्) बुभुजे - स्त्रीसह ते विषय सेवू लागला. ॥३८॥
आपल्या बुद्धीने असा निश्चय करून तो ब्राह्मण त्यागपूर्वक, अनासक्त भावाने आपल्या पत्नीसह प्रापंचिक विषय उपभोगू लागला. करण भगवंतांचा तो परम भक्त होता. (३८)
तस्य वै देवदेवस्य हरेर्यज्ञपतेः प्रभोः ।
ब्राह्मणाः प्रभवो दैवं न तेभ्यो विद्यते परम् ॥ ३९ ॥
असा तो देव देवांचा हरि यज्ञपती प्रभू । इष्टदेव द्विजां मानी म्हणोनी श्रेष्ठ ते द्विज ॥ ३९ ॥
ब्राह्मणाः - ब्राह्मण तस्य वै देवदेवस्य यज्ञपतेः प्रभोः हरेः - त्याच देवाधिदेव यज्ञाधिपति व सर्वसमर्थ अशा श्रीकृष्णाचे प्रभवः (सन्ति) - दैवत होत तेभ्यः परं (तस्य) दैवतं न विद्यते - त्या ब्राह्मणाहून दुसरे त्याचे दैवत नाही. ॥३९॥
देवाधिदेव यज्ञपती भगवान श्रीहरी ब्राह्मणांना आपले प्रभू, आपले दैवत मानतात. म्हणून त्यांच्या दृष्टीने ब्राह्मणांपेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. (२३९
एवं स विप्रो भगवत्सुहृत्तदा
दृष्ट्वा स्वभृत्यैरजितं पराजितम् । तद्ध्यानवेगोद्ग्रथितात्मबन्धनः तद्धाम लेभेऽचिरतः सतां गतिम् ॥ ४० ॥
( इंद्रवज्रा ) अजेय ऐसा हरि पाहि विप्र अधीन भक्ता हरि तोच होतो । लावी हरीला नित ध्यान विप्र संतास एको हरि आश्रयो तो ॥ ४० ॥
एवं भगवत्सुहृत् सः विप्रः - याप्रमाणे भगवंताचा मित्र असा तो ब्राह्मण तदा - त्यावेळी अजितं स्वभृत्यैः पराजितं दृष्टवा - अजिंक्य अशा श्रीकृष्णाला भगवद्भक्तांनी जिंकिलेला पाहुन तद्ध्यानवेगोद्ग्रथितात्मबन्धनः - भगवंताच्या तीव्र ध्यानाने तुटली आहेत आत्म्याची बंधने ज्याच्या असा सतां गतिं तद्धाम अचिरतः लेभे - सज्जनांचा आश्रय असे भगवंताचे स्थान लवकर मिळविता झाला. ॥४०॥
अशा प्रकारे भगवंतांचा प्रिय मित्र असलेल्या त्या ब्राह्मणाने जाणले की, भगवान जरी अजिंक्य असले, तरी त्यांचे भक्त त्यांना जिंकतात. (४०)
एतद् ब्रह्मण्यदेवस्य श्रुत्वा ब्रह्मण्यतां नरः ।
लब्धभावो भगवति कर्मबन्धाद् विमुच्यते ॥ ४१ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे उत्तरार्धे पृथुकोपाख्यानं नाम एकशीतितमोऽध्यायः ॥ ८१ ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
( अनुष्टुप् ) कृष्णाची द्विजभक्ती जो ऐकतो सांगतो दुज्यां । तयासी लाभते भक्ती कर्मी मुक्तीहि होतसे ॥ ४१ ॥ ॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर एक्क्याऐंशिवा अध्याय हा ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
नरः - मनुष्य एतत् (आख्यानम्) ब्रह्मण्यदेवस्य ब्रह्मण्यतां श्रुत्वा - हे आख्यान म्हणजे ब्राह्मणरक्षक अशा श्रीकृष्णाचे ब्राह्मणांवरील प्रेम वर्णन करणारे कथानक ऐकून भगवति लब्धभावः - भगवंताच्या ठिकाणी उत्पन्न झाली आहे भक्ति ज्याला असा कर्मबन्धात् विमुच्यते - कर्मबंधापासून मुक्त होतो. ॥४१॥ एक्याऐंशीवा अध्याय समाप्त
हे जाणून तो त्यांच्या ध्यानात तन्मय झाला. ध्यानाच्या उत्कटतेमुळे त्याची अविद्येची गाठ तुटली आणि त्याने लवकरच भक्तांचा आश्रय असलेल्या भगवंतांचे स्थान प्राप्त करून घेतले. ब्राह्मणांना आपले देव मानणार्या भगवान श्रीकृष्णांची ही ब्राह्मणभक्ती जो श्रवण करतो, त्याला भगवंतांच्या चरणांविषयी प्रेमभाव निर्माण होतो आणि तो कर्मबंधनातून मुक्त होतो. (४१)
अध्याय एक्याऐंशीवा समाप्त |