श्रीमद् भागवत पुराण
स्कन्द दहावा
अध्याय ऐंशीवा

सुदामोपाख्यानम् – पत्‍नीप्रेरणया सुदाम्नो भगवत् समीपे गमनं; भगवता तस्य सत्कारश्च -

सुदाम्याचे श्रीकृष्णांकडून स्वागत -


संहिता - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीराजोवाच -
( अनुष्टुप् )
भगवन् यानि चान्यानि मुकुन्दस्य महात्मनः ।
वीर्याण्यनन्तवीर्यस्य श्रोतुमिच्छामि हे प्रभो ॥ १ ॥
राजा परीक्षिताने विचारले -
( अनुष्टुप् )
मुक्तिदाता असा कृष्ण लीला त्याच्या अनंतची ।
आता सांगा कथा ऐशा ज्या ना माहीत त्या अम्हा ॥ १ ॥

प्रभो भगवन् - हे समर्थ शुकाचार्या अनन्तवीर्यस्य महात्मनः मुकुन्दस्य - अगणित पराक्रम करणार्‍या महात्म्या श्रीकृष्णाची यानि च अन्यानि वीर्याणि (सन्ति) - आणखी जी दुसरी पराक्रमाची कृत्ये आहेत (तानि) श्रोतुम् इच्छामहे - ती मी श्रवण करू इच्छितो. ॥१॥
परीक्षित म्हणाला - गुरुवर्य ! अनंत शक्ती असणार्‍या भगवान श्रीकृष्णांच्या ज्या दुसर्‍या लीला आहेत, त्यांचे वर्णन आम्ही ऐकू इच्छितो. (१ )


को नु श्रुत्वासकृद् ब्रह्मन् उत्तमःश्लोकसत्कथाः ।
विरमेत विशेषज्ञो विषण्णः काममार्गणैः ॥ २ ॥
सुखाला शोधिती जीव परी दुःखास पावती ।
अशा या समयी कोण पवित्र रस सोडितो ॥ २ ॥

ब्रह्मन् - हे मुने कः नु विशेषज्ञः - कोणता बरे तत्त्व जाणणारा पुरुष काममार्गणैः विषण्णः - कामबाणांनी दुःखी झालेला असा सकृत् उत्तमश्लोकसत्कथाः श्रुत्वा - एक वार भगवंताच्या कथा ऐकिल्यानंतर (ताभ्यः) विरमेत - त्यापासून परावृत्त होईल ? ॥२॥
हे ब्रह्मन ! विषयबाणांनी दु:खी झालेला व वारंवार पवित्रकीर्ती श्रीकृष्णांच्या मंगलमय लीलांचे श्रवण करणारा कोणता ज्ञानी मनुष्य त्यांपासून विन्मुख होईल ? ( २)


( मिश्र )
सा वाग् यया तस्य गुणान् गृणीते
     करौ च तत्कर्मकरौ मनश्च ।
स्मरेद्‌ वसन्तं स्थिरजङ्‌गमेषु
     श्रृणोति तत्पुण्यकथाः स कर्णः ॥ ३ ॥
( इंद्रवज्रा )
जी कीर्ति गाते खरि तीच वाणी
     जे सेविती हातचि तेचि सत्य ।
ते सत्य चित्तो हरिसी स्मरे जे
     नी कान तेची हरि कीर्ति ऐके ॥ ३ ॥

यया तस्य गुणान् गृणीते सा (एव) वाक् - जिने त्या भगवंताचे गुणानुवाद मनुष्ये वर्णितो तीच खरी वाणी होय (यौ) च तत्कर्मकरौ (तौ एव) करौ - आणि जे भगवद्विषयक कर्म करणारे तेच हात होत (यत्) च स्थिरजङ्‌गमेषु वसन्तं (भगवन्तम्) स्मरेत् - आणि जे स्थावरजंगमामध्ये वास करणार्‍या भगवंताचे स्मरण करील (तत् एव) मनः - तेच खरे मन (यः) तत्पुण्यकथाः शृणोति सः (एव) कर्णः - जो भगवंताच्या पुण्यकारक कथा ऐकतो तोच कान. ॥३॥
जी भगवंतांचे गुणगान करते, तीच खरी वाणी. जे त्यांची सेवा करतात, तेच खरे हात. जे चराचरांत निवास करणार्‍या त्यांचे स्मरण करते, तेच खरे मन. आणि जे भगवंतांच्या पुण्यमय कथांचे श्रवण करतात, तेच खरे कान. ( ३)


शिरस्तु तस्योभयलिङ्‌गमानं
     एत्तदेव यत्पश्यति तद्धि चक्षुः ।
अङ्‌गानि विष्णोरथ तज्जनानां
     पादोदकं यानि भजन्ति नित्यम् ॥ ४ ॥
ते सत्य डोके नमि जे हरिसी
     नी नेत्र तेची बघती तयाला ।
नी तेचि अंगो पदतीर्थ घेई
     संतांचिये नी हरिचे तसेचि ॥ ४ ॥

(यत्) तस्य उभयलिङगं तु आनमेत् तत् एव शिरः - जे भगवंताच्या स्थावरजंगमात्मक मूर्तीला नमन करील तेच मस्तक होय यत् पश्यति तत् हि चक्षुः - जो पहातो तोच नेत्र होय अथ - त्याचप्रमाणे घानि विष्णोः पादोदकं नित्यं भजन्ति - जे भगवंताच्या पादोदकाला नित्य भजतात तत् जनानां अङगानि - तेच लोकांचे खरे अवयव होत. ॥४॥
जे चराचर जगताला त्यांची प्रतिमा समजून नमस्कार करते, तेच मस्तक आणि जे सगळीकडे त्यांच्या स्वरूपाचेच दर्शन करतात, तेच खरे नेत्र होत. शरीराचे जे अवयव भगवंत आणि त्यांच्या भक्तांच्या चरणोदकांचे नित्य सेवन करतात, तेच खरे अवयव. (४)


सूत उवाच -
( अनुष्टुप् )
विष्णुरातेन सम्पृष्टो भगवान् बादरायणिः ।
वासुदेवे भगवति निमग्नहृदयोऽब्रवीत् ॥ ५ ॥
सूतजी सांगतात -
( अनुष्टुप् )
परीक्षिते असा प्रश्न पुसता शुकदेव ते ।
तल्लीन जाहले चित्ती वदले त्या परीक्षिता ॥ ५ ॥

विष्णुरातेन संपृष्टः बादरायणिः भगवान् - परीक्षिताने प्रश्न केलेला व्यासपुत्र शुक वासुदेवे भगवति निमग्नहृदयः अब्रवीत् - भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाणी आसक्त झाले आहे चित्त ज्याचे असा बोलू लागला. ॥५॥
सूत म्हणतात- परीक्षिताने जेव्हा असा प्रश्न केला, तेव्हा श्रीशुकदेवांचे हृदय भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी तल्लीन झाले व ते परीक्षिताला म्हणाले. (५)


श्रीशुक उवाच -
कृष्णस्यासीत् सखा कश्चिद् ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः ।
विरक्त इन्द्रियार्थेषु प्रशान्तात्मा जितेन्द्रियः ॥ ६ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
परीक्षित् ! द्विज तो एक कृष्णाचा मित्र जो असे ।
विरक्त ब्रह्मज्ञानी तो शांत जैसा जितेंद्रिय ॥ ६ ॥

ब्रह्मवित्तमः कश्चित् ब्राह्मणः - ब्रह्मवेत्त्यांमध्ये श्रेष्ठ असा कोणी एक ब्राह्मण कृष्णस्य सखा आसीत् - कृष्णाचा बालमित्र होता इन्द्रियार्थेषु विरक्तः - विषयांच्या ठिकाणी वैराग्य धारण केलेला प्रशान्तात्मा जितेन्द्रियः (च आसीत्) - शांत आहे चित्त ज्याचे व जिंकिली आहेत इंद्रिये ज्याने असा होता. ॥६॥
श्रीशुक म्हणाले- एक ब्राह्मण श्रीकृष्णांचा मित्र होता. तो मोठा ब्रह्मज्ञानी, विषयांपासून विरक्त, शांतचित्त आणि जितेंद्रिय होता. (६)


यदृच्छयोपपन्नेन वर्तमानो गृहाश्रमी ।
तस्य भार्या कुचैलस्य क्षुत्क्षामा च तथाविधा ॥ ७ ॥
संसारी असुनी राही मिळेल त्यात तोषुनी ।
जीर्ण नी फाटके वस्त्र क्षुधिता पत्‍निही तशी ॥ ७ ॥

गृहाश्रमी (सः) - गृहस्थाश्रमी असा तो यदृच्छया उपपन्नेन वर्तमानः - आपोआप जे मिळेल तेवढयावरच निर्वाह करणारा कुचैलस्य तस्य भार्या च - व जीर्ण वस्त्रे धारण करणार्‍या त्या ब्राह्मणाची स्त्री तथाविधा क्षुत्क्षामा - त्याच्या प्रमाणेच क्षुधेने कृश झाली होती. ॥७॥
गृहस्थाश्रमात असूनही तो प्रारब्धानुसार जे काही मिळे त्यातच संतुष्ट असे. त्याची वस्त्रे सामान्यच होती. परंतु त्याची पत्‍नीही तशीच होती. तीसुद्धा अर्धपोटी राहून कृश झाली होती. ( ७)


पतिव्रता पतिं प्राह म्लायता वदनेन सा ।
दरिद्रं सीदमाना वै वेपमानाभिगम्य च ॥ ८ ॥
दारिद्यमूर्ति ती पत्‍नी भुकेली जी पतिव्रता ।
कांपता पतिदेवासी विनम्रे वदली असे ॥ ८ ॥

दरिद्रा सीदमाना वेपमाना च - दारिद्र्यात दिवस कंठणारी व दुःखित झालेली आणि जिचे शरीर कापत आहे अशी सा पतिव्रता - ती साध्वी स्त्री पतिम् अभिगम्य - पतीजवळ जाऊन म्लायता वदनेन प्राह - म्लान मुखाने बोलू लागली. ॥८॥
दारिद्र्याने ग्रासलेली ती दु:खी पतिव्रता एके दिवशी भुकेने व्याकूळ होऊन कापत कापत पतीजवळ गेली आणि खिन्न चेहर्‍याने म्हणाली. (८)


ननु ब्रह्मन् भगवतः सखा साक्षाच्छ्रियः पतिः ।
ब्रह्मण्यश्च शरण्यश्च भगवान् सात्वतर्षभः ॥ ९ ॥
तुमचा मित्र तो कृष्ण साक्षात् जो कमलापती ।
वत्सला शरणार्थ्यांचा द्विजांचा भक्तही तसा ॥ ९ ॥

ब्रह्मन् - हे ब्रह्मवित् पते साक्षात् श्रियः पतिः - प्रत्यक्ष लक्ष्मीचा पति ब्रह्मण्यः शरण्यः च - ब्राह्मणांचे व शरणागतांचे कल्याण करणारा सात्वतर्षभः च भगवान् - आणि यादवश्रेष्ठ असा भगवान श्रीकृष्ण भगवतः (तव) ननु सखा - ज्ञानसंपन्न अशा तुमचा खरोखर मित्र आहे. ॥९॥
पतिदेवा ! साक्षात लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्ण आपले मित्र आहेत. ते भक्तांची इच्छा पूर्ण करणारे, शरणागतवत्सल आणि ब्राह्मणांचे भक्त आहेत. (९)


तमुपैहि महाभाग साधूनां च परायणम् ।
दास्यति द्रविणं भूरि सीदते ते कुटुम्बिने ॥ १० ॥
संताचे एक तो छत्र जावे त्याच्याकडे तुम्ही ।
पाहता स्थिति ती ऐशी देईल द्रव्य तो बहू ॥ १० ॥

महाभाग - हे भाग्यवंता साधूनां च परायणं तम् उपेहि - साधूंचा मोठा आश्रय अशा श्रीकृष्णाजवळ जा ते सीदते कुटुंबिने (सः) भूरि द्रविणं दास्यति - दुःखी व कुटुंबवत्सल अशा आपणाला तो पुष्कळ द्रव्य देईल. ॥१०॥
हे महाभाग ! साधूंचा आश्रय असणार्‍या त्यांच्याकडे आपण जा. आपण कुटुंबवत्सल असून दरिद्री आहात, हे कळल्यावर ते आपल्याला पुष्कळ धन देतील. (१०)


आस्तेऽधुना द्वारवत्यां भोजवृष्ण्यन्धकेश्वरः ।
स्मरतः पादकमलं आत्मानमपि यच्छति ।
किं न्वर्थकामान् भजतो नात्यभीष्टान्जगद्‌गुरुः ॥ ११ ॥
द्वारकीं राहतो सध्या भोज वृष्णंधकेश्वर ।
भजताचि पदा त्याच्या स्वयंही दान जातसे ।
प्रपंचा धन तो देई यात ते नवलो नसे ॥ ११ ॥

भोजवृष्ण्यंधकेश्वरः (सः) - भोज, वृष्णि आणि अंधक यांचा अधिपति असा तो श्रीकृष्ण अधुना - सांप्रत द्वारवत्यां आस्ते - द्वारकेत रहात आहे (आत्मनः) पादकमलं स्मरतः भजतः (च) - आपल्या चरणकमलाचे स्मरण करणार्‍या व सेवन करणार्‍या पुरुषाला (सः जगद्‌गुरुः) आत्मानम् अपि यच्छति - तो जगद्‌गुरु श्रीकृष्ण आत्मस्वरूपहि देतो नात्यभीष्टान् अर्थकामान् किम् नु (यच्छति) - मग फारसे प्रिय नव्हेत असे जे अर्थ व काम ते का बरे देणार नाही ? ॥११॥
भोज, वृष्णी, अंधक इत्यादी यादवांचे अधिपती असे ते सध्या द्वारकेत आहेत. जे त्यांच्या चरणकमलांचे स्मरण करतात, त्यांना ते स्वत:चे सुद्धा दान करतात. तर मग ते जगद्‍गुरु आपल्या भक्तांना, जे फारसे इच्छा करण्यासारखे नाही, ते धन आणि ईप्सित विषय देतील, यात आश्चर्य ते कोणते? (११)


स एवं भार्यया विप्रो बहुशः प्रार्थितो मृदु ।
अयं हि परमो लाभ उत्तमःश्लोकदर्शनम् ॥ १२ ॥
या परी द्विजपत्‍नीने प्रार्थिता ते पुनः पुन्हा ।
धनाची गोष्ट ना मोठी दर्शनीं लाभ तो खरा ॥ १२ ॥

एवं भार्यया बहुशः मृदु प्रार्थितः सः विप्रः - याप्रमाणे पत्‍नीने पुष्कळ प्रकाराने सौ‌म्यपणाने प्रार्थिलेला तो ब्राह्मण उत्तमश्‍लोकदर्शनं अयं हि परमः लाभः - श्रीकृष्णाचे दर्शन हा खरोखर मोठा लाभ होय. ॥१२॥
त्या ब्राह्मणाला पत्‍नीने जेव्हा अशा प्रकारे पुष्कळ वेळा नम्रतेने विनंती केली, तेव्हा त्याने विचार केला की, " या निमित्ताने श्रीकृष्णांचे दर्शन होईल. हा आपला मोठाच लाभ आहे. " (१२)


इति सञ्चिन्त्य मनसा गमनाय मतिं दधे ।
अप्यस्त्युपायनं किञ्चिद् गृहे कल्याणि दीयताम् ॥ १३ ॥
विचार करुनी ऐसा वदला पत्‍निसी द्विज ।
कल्याणी भेट वस्तू दे असेल जर कांहि ती ॥ १३ ॥

इति मनसा संचिन्त्य - असा मनात विचार करून गमनाय मतिं दधे - जाण्याच्या उद्योगाला लागला कल्याणि - हे स्त्रिये अपि किञ्चित् उपायनं गृहे अस्ति - काही तरी भेट नेण्यासारखा पदार्थ घरात आहे काय (अस्ति चेत्) दीयतां - असेल तर दे. ॥१३॥
असा विचार करून त्याने जाण्याचा निश्चय केला आणि पत्‍नीला म्हटले, " हे कल्याणी ! घरात काही त्यांना भेट देण्याजोगी वस्तू असेल तर दे ! " (१३)


याचित्वा चतुरो मुष्टीन् विप्रान् पृथुकतण्डुलान् ।
चैलखण्डेन तान् बद्ध्वा भर्त्रे प्रादादुपायनम् ॥ १४ ॥
शेजार्‍यां घरि ती गेली पोहे मागोनि चौ मुठी ।
दिधले पतिदेवाला कृष्णा भेट करावया ॥ १४ ॥

चतुरः मुष्टीन् पृथुकतण्डुलान् विप्रान् याचित्वा - चार मुठी पोहे ब्राह्मणांजवळून याचना करून आणून तान् चैलखण्डेन बध्वा - ते जीर्णवस्त्राच्या एका चिंधीत बांधून उपायनम् (इति) भर्त्रे प्रादात् - भेट देण्याचा पदार्थ म्हणून पतीच्या हातात देती झाली. ॥१४॥
तेव्हा तिने शेजार-पाजारच्या ब्राह्मणांच्या घरातूंन चार मुठी पोहे मागून आणले आणि एका कपड्यात बांधून भगवंतांना भेट देण्यासाठी आपल्या पतीकडे दिले. (१४)


स तानादाय विप्राग्र्यः प्रययौ द्वारकां किल ।
कृष्णसन्दर्शनं मह्यं कथं स्यादिति चिन्तयन् ॥ १५ ॥
पोहे घेवोनि तो गेला कृष्णाच्या द्वारकापुरीं ।
मनात चिंति की कैसे कृष्णदर्शन हो मला ॥ १५ ॥

सः विप्राग्र्यः - तो श्रेष्ठ ब्राह्मण तान् आदाय - पोहे घेऊन मह्यं कृष्णसंदर्शनं कथं स्यात् - मला श्रीकृष्णाचे दर्शन कसे होईल इति चिन्तयन् द्वारकां किल प्रययौ - असा विचार करीत द्वारकेला खरोखर जाऊन पोचला. ॥१५॥
तो श्रेष्ठ ब्राह्मण ते पोहे घेऊन द्वारकेकडे जाण्यास निघाला. वाटेत तो विचार करीत होता की, " श्रीकृष्णांचे दर्शन आपल्याला कसे होईल, बरे ? " (१५)


त्रीणि गुल्मान्यतीयाय तिस्रः कक्षाश्च सद्विजः ।
विप्रोऽगम्यान्धकवृष्णीनां गृहेष्वच्युतधर्मिणाम् ॥ १६ ॥
द्विज तो पातला तेथे अन्य विप्रांसवे पुढे ।
पहारे तीन ओलांडी जिथे जाणे कठीण त्यां ।
अंधक् वंशीय वीरांच्या महाला पोचला असे ॥ १६ ॥

सद्विजः (सः) विप्रः - दुसर्‍या द्विजासह तो ब्राह्मण त्रीणि गुल्मानि तिस्रः च कक्षाः अतीताय - तीन सैन्याची ठाणी व तीन चौक उल्लंघून पुढे गेला अच्युतधर्मिणां अगम्यांधकवृष्णीनां गृहेषु - श्रीकृष्ण हाच आहे धर्म ज्यांचा अशा व जिंकण्यास अशक्य अशा अंधक व वृष्णि यांच्या घरांमधील. ॥१६॥
द्वारकेला पोहोचल्यावर तो ब्राह्मण अन्य ब्राह्मणांबरोबर सैनिकांच्या तीन चौक्या आणि तीन चौक पार करून, जेथे जाणे अत्यंत अवघड , अशा भगवद्धर्माचे पालन करणार्‍या यादवांच्या निवासस्थानात जाऊन पोहोचला. (१६)


गृहं द्‌व्यष्टसहस्राणां महिषीणां हरेर्द्विजः ।
विवेशैकतमं श्रीमद् ब्रह्मानन्दं गतो यथा ॥ १७ ॥
सोळा हजार राण्यांचे मधोमध महाल ते ।
एका महालि त्या आला ब्रह्मानंदात डुंबला ॥ १७ ॥

हरेः द्‌व्यष्टसहस्राणां महिषीणां एकतमं श्रीमत् गृहम् - श्रीकृष्णाच्या सोळा हजार स्त्रियांच्या घरांतील एका सुंदर घरात (सः) द्विजः - तो ब्राह्मण यथा ब्रह्मानन्दं गतः (तथा) - जसा ब्रह्मानंदी निमग्न झालेला पुरुष तसा विवेश - शिरला. ॥१७॥
तेथेच श्रीकृष्णांच्या सोळा हजार राण्यांचे प्रासाद होते. त्यांपैकी वैभवसंपन्न अशा एकामध्ये ब्राह्मणाने प्रवेश केला. त्यात प्रवेश करताच त्याला वाटले की, आपण जणू ब्रह्मानंदाच्या समुद्रातच डुंबत आहोत. (१७)


तं विलोक्याच्युतो दूरात् प्रियापर्यङ्कमास्थितः ।
सहसोत्थाय चाभ्येत्य दोर्भ्यां पर्यग्रहीन्मुदा ॥ १८ ॥
पलंगी बैसला कृष्ण तेथे सौ. रुक्मिणी सवे ।
द्विजां पाहोनिया कृष्ण धावला मारिही मिठी ॥ १८ ॥

प्रियापर्यंकम् आस्थितः अच्युतः - पत्‍नीच्या पलंगावर बसलेला श्रीकृष्ण दूरात् तं विलोक्य - दुरूनच त्या ब्राह्मणाला पाहून सहसा उत्थाय - एकाएकी उठून अभ्येत्य च - आणि जवळ येऊन मुदा दोर्भ्यां पर्यग्रहीत् - आनंदाने दोन बाहूंनी आलिंगिता झाला. ॥१८॥
श्रीकृष्ण त्यावेळी रुक्मिणीच्या पलंगावर बसले होते. ब्राह्मण येत असल्याचे लांबून पाहाताच ते ताबडतोब उठून उभे राहिले आणि त्याच्याजवळ येऊन त्यांनी मोठ्या आनंदाने त्याला मिठी मारली. (१८)


सख्युः प्रियस्य विप्रर्षेः अङ्‌गसङ्‌गातिनिर्वृतः ।
प्रीतो व्यमुञ्चदब्बिन्दून् नेत्राभ्यां पुष्करेक्षणः ॥ १९ ॥
मित्राच्या अंगस्पर्शाने कृष्णां आनंद जाहला ।
कमलापरि त्या नेत्रीं प्रेमाश्रु वाहु लागले ॥ १९ ॥

प्रीतः पुष्करेक्षणः - प्रसन्न झालेला कमलनेत्र श्रीकृष्ण प्रियस्य सख्युः विप्रर्षेः अंगसंगातिनिर्वृतः - प्रिय मित्र अशा ब्राह्मणाच्या आलिंगनाने सुखी झालेला नेत्राभ्यां अब्बिन्दून् व्यमुञ्चत् - नेत्रांतून अश्रुबिंदु सोडिता झाला. ॥१९॥
प्रिय मित्र असलेल्या श्रेष्ठ ब्राह्मणाच्या अंगस्पर्शाने कमलनयन भगवान अत्यंत आनंदित झाले. तेव्हा त्यांच्या नेत्रांतून प्रेमाश्रू वाहू लागले. (१९)


अथोपवेश्य पर्यङ्के स्वयं सख्युः समर्हणम् ।
उपहृत्यावनिज्यास्य पादौ पादावनेजनीः ॥ २० ॥
अग्रहीच्छिरसा राजन् भगवान् लोकपावनः ।
व्यलिम्पद् दिव्यगन्धेन चन्दनागुरुकुङ्कमैः ॥ २१ ॥
समयी कृष्ण तो नेई द्विजा मंचकी बैसवी ।
सामग्री घेउनी सर्व स्वयेची पूजिले द्विजा ॥ २० ॥
धुतले पाय नी तीर्थ शिरासी घेतले असे ।
चंदनो अर्गजा दिव्य केशरी गंध लेपिले ॥ २१ ॥

राजन् - हे परीक्षित राजा अथ - मग लोकपावनः भगवान् - त्रैलोक्याला पवित्र करणारा श्रीकृष्ण (तं) पर्यङ्‌के उपवेश्य - त्या ब्राह्मणाला पलंगावर बसवून स्वयं समर्हणं उपहृत्य - स्वतः पूजासाहित्य आणून अस्य सख्युः पादौ अवनिज्य - त्या मित्राचे दोन्ही पाय धुवून पादावनेजनीः (आपः) शिरसा अग्रहीत् - पादोदक मस्तकावर धारण करिता झाला दिव्यगन्धेन चन्दनागुरुकुंकुमैः (च तं) व्यलिम्पत् - आणि स्वर्गीय सुगंधी पदार्थ व चंदन, कृष्णागरु व केशर यांची त्या ब्राह्मणाला उटी लाविता झाला. ॥२०-२१॥
परीक्षिता ! नंतर त्याला श्रीकृष्णांनी पलंगावर बसवून स्वत: पूजेचे साहित्य आणून मित्राची पूजा केली. तसेच सर्वांना पवित्र करणार्‍या त्यांनी आपल्या हातांनी ब्राह्मणाचे पाय धुऊन ते चरणोदक आपल्या मस्तकी धारण केले आणि त्याच्या शरीराला चंदन, केशर इत्यादी दिव्य गंधांची उटी लावली. (२०-२१)


धूपैः सुरभिभिर्मित्रं प्रदीपावलिभिर्मुदा ।
अर्चित्वाऽऽवेद्य ताम्बूलं गां च स्वागतमब्रवीत् ॥ २२ ॥
आनंदे गंध धूपाने ओवाळी आरती तशी ।
दूध तांबूल देवोनी स्वागतम् कृष्ण तो वदे ॥ २२ ॥

सुरभिभिः धूपैः - सुगंधी धूपांनी प्रदीपावलिभिः - दिव्यांच्या रांगांनी मुदा मित्रं अर्चित्वा - मोठया आनंदाने मित्राची पूजा करून ताम्बूलं गां च आवेद्य - विडा व गाय देऊन स्वागतं अब्रवीत् - कुशल प्रश्न विचारता झाला. ॥२२॥
नंतर त्यांनी मोठ्या आनंदाने सुगंधित धूप आणि दीपाने आपल्या मित्राला आरती ओवाळली. अशा प्रकारे पूजा करून तांबूल आणि गाय देऊन " तुझे स्वागत असो" असे म्हणून त्याचे स्वागत केले. (२२)


कुचैलं मलिनं क्षामं द्‌विजं धमनिसंततम् ।
देवी पर्यचरत् साक्षात् चामरव्यजनेन वै ॥ २३ ॥
फाटके मळके वस्त्र कृश दुर्बलही तसा ।
रुक्मिणीदेवि ती वारा चौर्‍यांनी घालु लागली ॥ २३ ॥

साक्षात् देवी - प्रत्यक्ष लक्ष्मी रुक्मिणी चामरव्यजनेन - चवरीच्या पंख्याने कुचैलं मलिनं क्षामं धमनिसंततं द्विजं - जीर्णवस्त्र नेसलेल्या, मलीन, कृश व नुसत्या शिरांनी व्यापिलेल्या त्या ब्राह्मणाची वै पर्यचरत् - खरोखर शुश्रूषा करिती झाली. ॥२३॥
जीर्ण वस्त्रे नेसलेल्या मळकट शरीर असलेल्या त्या कृश ब्राह्मणाच्या शरीरावरील शिरा स्पष्ट दिसत होत्या. अशा त्याची स्वत: रुक्मिणी चवर्‍या ढाळून सेवा करू लागली. (२३)


अन्तःपुरजनो दृष्ट्वा कृष्णेनामलकीर्तिना ।
विस्मितोऽभूदतिप्रीत्या अवधूतं सभाजितम् ॥ २४ ॥
विस्मये पाहती दास्या पवित्रकीर्ति कृष्ण तो ।
पूजितो प्रेमभावाने द्विजाला मळक्या अशा ॥ २४ ॥

अमलकीर्तिना कृष्णेन - निर्मल कीर्तीच्या श्रीकृष्णाने अतिप्रीत्या सभाजितं अवधूतं दृष्टवा - अत्यंत प्रेमाने पूजिलेल्या त्या विरक्त ब्राह्मणाला पाहून अंतःपुरजनः - अंतपुरातील स्त्रिया विस्मितः अभूत् - विस्मित झाल्या. ॥२४॥
पवित्रकीर्ती श्रीकृष्ण अतिशय प्रेमाने त्या मलिन अंगांच्या ब्राह्मणाची पूजा करीत आहेत, हे पाहून अंत:पुरातील स्त्रिया अत्यंत आश्चर्यचकित झाल्या. (२४)


किमनेन कृतं पुण्यं अवधूतेन भिक्षुणा ।
श्रिया हीनेन लोकेऽस्मिन् गर्हितेनाधमेन च ॥ २५ ॥
योऽसौ त्रिलोकगुरुणा श्रीनिवासेन सम्भृतः ।
पर्यङ्कस्थां श्रियं हित्वा परिष्वक्तोऽग्रजो यथा ॥ २६ ॥
वदती उघडा निंद्य दरिद्री हा भिकारडा ।
कोणते पुण्य ते याचे पूजितो त्या जगद्‌गुरु ॥ २५ ॥
पहा हो मंचकी कृष्णे रुक्मिणी त्यागिली असे ।
रामाच्या परि हा विप्रा हृदयी धरि की पहा ॥ २६ ॥

श्रिया हीनेन - लक्ष्मीरहित अस्मिन् लोके गर्हितेन च - व ह्या लोकी निंदिल्या गेलेल्या अवधूतेन - निष्पाप अशा अनेन अधमेन भिक्षुणा - ह्या हीनवृत्ति ब्राह्मणाने किं पुण्यं कृतं - कोणते पुण्य केले होते. ॥२५॥ यः असौ - जो हा ब्राह्मण त्रिलोकगुरुणा श्रीनिवासेन - त्रैलोक्याचा गुरु अशा श्रीकृष्णाकडून संभृतः - सत्कारिला गेला यथा अग्रजः - जसा वडील बंधु तसा पर्यङ्‌कस्थां श्रियं हित्वा परिष्वक्तः - पलंगावर बसलेल्या साक्षात लक्ष्मीला सोडून आलिंगिला गेला. ॥२६॥
त्या म्हणू लागल्या, " या निर्धन, निंदनीय, अंगावर धड वस्त्रे नसलेल्या य:कश्चित भिकार्‍याने असे कोणते पुण्य केले असावे की, ज्यामुळे त्रैलोक्याचे गुरु असणार्‍या श्रीकृष्णांनी स्वत: त्याचा आदर-सत्कार केला ! इतकेच नव्हे तर, आपल्या पलंगावर असलेल्या रुक्मिणीला सोडून या ब्राह्मणाला थोरल्या भावासारखी मिठी मारली ! (२५-२६)


कथयां चक्रतुर्गाथाः पूर्वा गुरुकुले सतोः ।
आत्मनोर्ललिता राजन् करौ गृह्य परस्परम् ॥ २७ ॥
परीक्षित् ! द्विज नी कृष्ण हात हातात देउनी ।
स्मरती गुरुकूलीच्या घटना वर्णिती तशा ॥ २७ ॥

राजन् - हे परीक्षित राजा गुरुकुले सतोः (तयोः) - गुरुगृही असतानाच्या त्यांच्या आत्मनः ललिताः गाथाः - स्वतःला प्रिय अशा गोष्टी करौ गृह्य (तौ) परस्परं कथयाञ्चक्रतुः - हातात हात घालून ते परस्परांस सांगते झाले. ॥२७॥
परीक्षिता ! नंतर श्रीकृष्ण आणि तो ब्राह्मण एकमेकांचे हात हातात घेऊन पूर्वी गुरुकुलात राहात असतानाच्या आनंददायक गोष्टी बोलू लागले. (२७)


श्रीभगवानुवाच -
अपि ब्रह्मन्गुरुकुलाद्‌ भवता लब्धदक्षिणात् ।
समावृत्तेन धर्मज्ञ भार्योढा सदृशी न वा ॥ २८ ॥
भगवान् श्रीकृष्ण म्हणाले -
धर्म मर्मज्ञ हे देवा देवोनी गुरुदक्षिणा ।
अनुरूप अशी पत्‍नी तुम्ही हो वरिलीत ना ? ॥ २८ ॥

धर्मज्ञ ब्रह्मन् - हे धर्म जाणणार्‍या ब्राह्मणा लब्धदक्षिणात् गुरुकुलात् समावृत्तेन भवता - मिळाली आहे दक्षिणा ज्याला अशा गुरूच्या घराहून परत घरी आलेल्या तुझ्याकडून अपि सदृशी भार्या ऊढा न वा - योग्य अशी स्त्री वरिली गेली किंवा नाही. ॥२८॥
श्रीकृष्ण म्हणाले- धर्म जाणणार्‍या हे ब्राह्मणा ! गुरुदक्षिणा देऊन गुरुकुलातून परत आल्यावर समावर्तन करून तू अनुरूप अशा स्त्रीबरोबर विवाह केलास की नाही ? (२८)


प्रायो गृहेषु ते चित्तं अकामविहितं तथा ।
नैवातिप्रीयसे विद्वन् धनेषु विदितं हि मे ॥ २९ ॥
संसारी राहुनी तुम्ही विरक्त राहिले असा ।
माहीत मज ते सारे धन ते नावडे तुम्हा ॥ २९ ॥

विद्वन् - हे विद्वान ब्राह्मणा ते चित्तं - तुझे अंतःकरण प्रायः गृहेषु अकामविहतम् - बहुधा घरांतील विषयांमध्ये आसक्त नाही तथा - त्याचप्रमाणे धनेषु न एव अतिप्रीयसे - द्रव्यांच्या ठिकाणीहि तू मोठी प्रीती करीत नाहीस (इति) हि मे विदितं - असे मला कळले आहे. ॥२९॥
मला माहित आहे की, तुझे चित्त गृहस्थाश्रमात असूनही विषयभोगात आसक्त नाही. हे विद्वाना ! मला हे पण माहित आहे की, धनाविषयीसुद्धा तुला मुळीच प्रेम नाही. (२९)


केचित् कुर्वन्ति कर्माणि कामैरहतचेतसः ।
त्यजन्तः प्रकृतीर्दैवीः यथाहं लोकसङ्‌ग्रहम् ॥ ३० ॥
विरळे जगती लोक वासना सर्व त्यागुनी ।
कर्म ते करिती सारे लोकांना शिकवावया ॥ ३० ॥

दैवीः प्रकृतीः त्यजन्तः केचित् - देवमायेचा त्याग करणारे कित्येक यथा अहं लोकसंग्रहम् (करोमि) - जसा मी लोकांचे कल्याण करतो कामैः अहतचेतसः - विषयांनी ज्यांच्या अन्तःकरणाला त्रस्त केले नाही असे कर्माणि कुर्वन्ति - कर्मे करीत असतात. ॥३०॥
जगात फारच थोडे लोक भगवंतांच्या मायेने निर्माण केलेल्या विषयवासनांचा त्याग करतात आणि चित्तामध्ये विषयांची वासना नसतानाही माझ्यासारखी फक्त लोकशिक्षणासाठी कर्मे करीत असतात. (३०)


कच्चिद्‌ गुरुकुले वासं ब्रह्मन् स्मरसि नौ यतः ।
द्‌विजो विज्ञाय विज्ञेयं तमसः पारमश्नुते ॥ ३१ ॥
आठवे का निवासो तो ज्ञातव्य वस्तुज्ञान ते ।
आश्रमी होतसे सत्य जेणे अज्ञान नष्टते ॥ ३१ ॥

ब्रह्मन् - हे ब्राह्मणा नौ गुरुकुले वासः स्मरसि काच्चित् - आपण उभयतां गुरुगृही राहिलो होतो ह्याची तुला आठवण आहे काय यतः विज्ञेयं विज्ञाय - गुरूपासून ज्ञान प्राप्त करून घेऊन द्विजः तमसः पारं अश्रुते - ब्राह्मण अज्ञानरूप संसाराचे पैलतीर गाठतो. ॥३१॥
हे ब्रह्मन ! आपण दोघे गुरुकुलत राहात होतो, त्याची तुला आठवण आहे का? गुरुकुलातच खरोखर द्विजांना आत्मज्ञान होते व त्यामुळे ते अज्ञानांधकार पार करून जातात. (३१)


स वै सत्कर्मणां साक्षाद् द्विजातेरिह सम्भवः ।
आद्योऽङ्‌ग यत्राश्रमिणां यथाहं ज्ञानदो गुरुः ॥ ३२ ॥
मित्रा या जगता मध्ये पिता हा पहिला गुरू ।
संस्कारी दुसरा तो तो माझ्याच परि पूज्य जो ।
ज्ञानगुरुहि माझेच रूप तो गुरु हे तिन्हि ॥ ३२ ॥

अंग - हे मित्रा इह - या संसारात यत्र संभवः (भवति) - ज्यापासून जन्म प्राप्त होतो सः वै आद्यः गुरुः - तो खरोखर पहिला गुरु होय (यत्र) द्विजातेः सत्कर्मणां (संभवः भवति) - ज्यापासून द्विजत्व येऊन सत्कर्मे करण्याचा अधिकार प्राप्त होतो (यः) साक्षात् आश्रमिणां ज्ञानदः - जो प्रत्यक्ष चारी आश्रमांतील पुरुषांना ज्ञान देणारा यथा अहम् - जसा मी आहे. ॥३२॥
हे मित्रा ! या जगामध्ये जन्मदाता पिता हा प्रथम गुरु होय. त्यानंतर उपनयन (मुंज) संस्कार करून सत्कर्मांचे शिक्षण देणारा हा दुसरा गुरु होय. तो माझ्यासारखाच पूज्य आहे. त्यानंतर ज्ञनोपदेश करून परम्यात्म्याची प्राप्ती करून देणारा गुरु हा तर माझेच स्वरूप होय. वर्णाश्रमियांचे हे तीन गुरु असतात. (३२)


नन्वर्थकोविदा ब्रह्मन् वर्णाश्रमवतामिह ।
ये मया गुरुणा वाचा तरन्त्यञ्जो भवार्णवम् ॥ ३३ ॥
गुरु तो मम रूपोची तारितो भवसागरी ।
स्वार्थ नी परमार्थाचे जाणते तेचि की खरे ॥ ३३ ॥

ब्रह्मन् - हे ब्राह्मणा इह - या संसारात ये - जे मया गुरुणा - मी जो गुरु त्याच्या सहाय्याने वाचा - उपदेशाच्या योगाने अंजसा भवार्णवं तरंति - सहजगत्या संसारसमुद्र तरून जातात ननु वर्णाश्रमवताम् अर्थकोविदाः (सन्ति) - चारी वर्ण व चारी आश्रम यांतील पुरुषांमध्ये खरोखर पुरुषार्थ जाणणारे होत. ॥३३॥
हे ब्राह्मणा ! या मनुष्यजन्मात वर्णाश्रमींमध्ये जे लोक मत्स्वरूप गुरुंच्या उपदेशानुसार वागून अनायसे हा भवसागर पार करून जातात, तेच स्वार्थ आणि परमार्थाचे खरे जाणकार होत. (३३)


नाहमिज्याप्रजातिभ्यां तपसोपशमेन वा ।
तुष्येयं सर्वभूतात्मा गुरुशुश्रूषया यथा ॥ ३४ ॥
आत्मा मी सर्व जीवात चारी आश्रमि मीच तो ।
संन्याशा जो मिळे मोद त्याहुनी गुरु पूजिता ॥ ३४ ॥

सर्वभूतात्मा अहं - सर्व प्राण्यांच्या ठिकाणी आत्मरूपाने रहाणारा मी यथा गुरुशुश्रूषया (तुष्यामि) - जसा गुरूच्या सेवेने संतुष्ट होतो इज्याप्रजातिभ्यां तपसा उपशमेन वा न तुष्येयं - यज्ञाने, उत्तम जन्माने, तपश्चर्येने किंवा शमाच्या योगे संतुष्ट होणार नाही. ॥३४॥
प्रिय मित्रा ! सर्वांचा आत्मा असणारा मी जितका गुरुदेवांच्या सेवेने संतुष्ट होतो, तितका मी गृहस्थाचे धर्म पंचमहायज्ञ इत्यादींनी, ब्रह्मचार्‍याचे धर्म उपनयन, वेदाध्ययन इत्यादींनी, वानप्रस्थाचे धर्म तपश्चर्या इत्यादींनी किंवा संन्याशाच्या सर्वस्वत्यागरूप धर्मानेही संतुष्ट होत नाही. (३४)


अपि नः स्मर्यते ब्रह्मन् वृत्तं निवसतां गुरौ ।
गुरुदारैश्चोदितानां इन्धनानयने क्वचित् ॥ ३५ ॥
आश्रमी राहिलो तेंव्हा तुला नी मजला जधी ।
धाडिले गुरुपत्‍नीने इंधना त्या वनात ती ॥ ३५ ॥

ब्रह्मन् - हे ब्राह्मणा क्वचित् - एका प्रसंगी गुरौ निवसतां - गुरुगृही रहात असताना गुरुदारैः इन्धनानयने चोदितानां नः वृत्तम् - गुरूपत्‍नीने लाकडे आणण्याकरिता पाठविलेल्या आपले वृत्त स्मर्यते अपि - आठवते काय ? ॥३५॥
हे ब्रह्मन ! ज्यावेळी आम्ही गुरुकुलात निवास करीत होतो, त्यावेळची ही गोष्ट तुझ्या लक्षात आहे काय की जेव्हा आम्हा दोघांना एके दिवशी आपल्या गुरुपत्‍नींकडे लाकडे आणण्यासाठी जंगलात पाठविले होते ते ? (३५)


प्रविष्टानां महारण्यं अपर्तौ सुमहद् द्विज ।
वातवर्षं अभूत्तीव्रं निष्ठुराः स्तनयित्‍नवः ॥ ३६ ॥
अकाली पडली वर्षा वादळो ते भयानक ।
आकाशात विजा तैशा कडाडे पातल्या कशा ॥ ३६ ॥

द्विज - हे ब्राह्मणा महारण्यं प्रविष्टानां (नः) - मोठया अरण्यात आपण गेलो असता अपर्तौ - अकाली सुमहत् तीव्रं वातवर्षम् अभूत् - मोठे भयंकर वादळ होऊन पाऊस पडला निष्ठुराः स्तनयित्‍नवः (च अभवन्) - व भयंकर मेघांचा गडगडाट झाला. ॥३६॥
त्यावेळी आपण एका घोर जंगलात गेलो होतो आणि पावसाळ्याचे दिवस नसतानाही भयंकर वादळी पाऊस आला होता. विजांचा कडकडाटही होत होता. (३६)


सूर्यश्चास्तं गतस्तावत् तमसा चावृता दिशः ।
निम्नं कूलं जलमयं न प्राज्ञायत किञ्चन ॥ ३७ ॥
अस्तमान जधी झाला दाटला तम घोर तै ।
झाले पाणीच पाणी ते खड्डा रस्ताहि ना कळे ॥ ३७ ॥

तावत् सूर्यः अस्तं गतः - तितक्यात सूर्य मावळला दिशः च तमसा आवृताः - व दिशा अंधकाराने व्यापिल्या गेल्या निम्नं कूलं च जलमयं (अभवत्) - सखल व उंच असे सर्व प्रदेश पाण्याने भरून गेले किंचन न प्राज्ञायत - काहीएक ओळखू येत नाहीसे झाले. ॥३७॥
मग सूर्यास्त झाला. सगळीकडे अंधार पसरला. जमिनीवर इतके पाणी झाले की, उंचसखल भागाचा पत्ताच लागत नव्हता. (३७)


( वंशस्था )
वयं भृशम्तत्र महानिलाम्बुभिः
     निहन्यमाना महुरम्बुसम्प्लवे ।
दिशोऽविदन्तोऽथ परस्परं वने
     गृहीतहस्ताः परिबभ्रिमातुराः ॥ ३८ ॥
( इंद्रवज्रा )
ती काल वर्षा प्रलयो दुजाची
     त्रासूनि गेलो चुकलेहि रस्ता ।
चिंतीत झालो अन हात हाते
     दुजां धरोनी फिरलो वनात ॥ ३८ ॥

अथ - नंतर अम्बुसंप्लवे तत्र वने - पाण्याच्या पूर असलेल्या त्या अरण्यात महानिलाम्बुभिः मुहुः भृशं निहन्यमानाः वयं - मोठा वारा व पाऊस यांनी वारंवार अत्यंत पीडिलेले आम्ही दिशं अविदन्तः - दिशा न ओळखणारे असे आतुराः - भ्यालेले परस्परं गृहीतहस्ताः परिबभ्रिम - एकमेकांचे हात धरून जिकडे तिकडे भटकत होतो. ॥३८॥
त्या पुरात वादळाने आणि पावसाने आम्ही अतिशय झोडपले जात होतो. दिशा कळत नव्हत्या. आम्ही भांबावून एकमेकांचे हात धरून जंगलात इकडे तिकडे भटकत राहिलो. (३८)


( अनुष्टुप् )
एतद्‌ विदित्वा उदिते रवौ सान्दीपनिर्गुरुः ।
अन्वेषमाणो नः शिष्यान् आचार्योऽपश्यदातुरान् ॥ ३९ ॥
( अनुष्टुप् )
सांदीपनी गुरूला हे कळता त्या सकाळिची ।
धाडिले शिष्य ते सर्व आपणा शोधण्यास की ॥ ३९ ॥

आचार्यः - आम्हाला विद्या शिकविणारा सांदीपनिः गुरुः - सांदिपनी गुरु एतत् विदित्वा - हे जाणून रवौ उदिते - सूर्य उगवला असता अन्वेषमाणः (सन्) - शोधणारा होत्साता शिष्यान् नः आतुरान् अपश्यत् - आम्हा शिष्यांना भ्यालेले असे पहाता झाला. ॥३९॥
गुरुदेव सांदीपनी मुनींना जेव्हा ही गोष्ट समजली, तेव्हा सूर्योदय झाल्यावर, आपले शिष्य असलेल्या आम्हांला शोधीत ते जंगलात पोहोचले. तेव्हा आम्हांला अतिशय त्रास झाल्याचे त्यांनी पाहिले. (३९)


अहो हे पुत्रका यूयं अस्मदर्थेऽतिदुःखिताः ।
आत्मा वै प्राणिनां प्रेष्ठः तं अनादृत्य मत्पराः ॥ ४० ॥
वदलो नवलो कैसे मुलांनो आमुच्या मुळे ।
तुम्हाला पडला त्रास देहाची ना तमा तुम्हा ॥ ४० ॥

हे पुत्रकाः - अहो मुलांनो अहो यूयं अस्मदर्थे अतिदुःखिताः - कितीहो तुम्ही आमच्यासाठी मोठे क्लेश सोशिले प्राणिनां वै आत्मा प्रेष्ठः - प्राण्यांना खरोखर स्वतःचा जीव फारच प्रिय असतो तं अनादृत्य मत्पराः (जाताः) - त्या जीवाचा अनादर करून तुम्ही माझ्या ठिकाणी आसक्त झालात. ॥४०॥
ते म्हणाले- बाळांनो ! तुम्ही आमच्यासाठी खूप कष्ट घेतलेत. सर्व प्राण्यांना आपले शरीर सर्वाधिक प्रिय असते. परंतु तुम्ही त्याचीही पर्वा न करता आमच्या सेवेत मग्न राहिलात. (४०)


एतदेव हि सच्छिष्यैः कर्तव्यं गुरुनिष्कृतम् ।
यद्‌ वै विशुद्धभावेन सर्वार्थात्मार्पणं गुरौ ॥ ४१ ॥
गुरुचे ऋण ते थोर शिष्याने फेडिणे असे ।
विशुद्ध भाव ठेवोनी सर्वची अर्पिणे तयां ॥ ४१ ॥

यत् वै - जे खरोखर विशुद्धभावेन गुरौ सर्वार्थात्मार्पणं - शुद्ध भक्तीने गुरूच्या ठिकाणी सर्व पुरुषार्थरूपी देहाचे अर्पण करणे एतत् एव हि - हेच खरोखर सच्छिष्यैः गुरुनिष्कृतं कर्तव्यम् - सदाचारी शिष्यांनी गुरूच्या उपकारांची फेड करणे होय. ॥४१॥
गुरूंच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी चांगल्या शिष्यांचे एवढेच कर्तव्य असते की, त्यांनी विशुद्ध भावनेने आपले सर्वस्व, एवढेच काय पण शरीरसुद्धा गुरुदेवांच्या सेवेसाठी समर्पित करावे. (४१)


तुष्टोऽहं भो द्विजश्रेष्ठाः सत्याः सन्तु मनोरथाः ।
छन्दांस्ययातयामानि भवन्त्विह परत्र च ॥ ४२ ॥
द्विजा ! प्रसन्न मी झालो कामना होय पूर्ण ती ।
कंठस्थ राहिही वेद नच निष्फळ हो कदा ॥ ४२ ॥

भो द्विजश्रेष्ठाः - अहो श्रेष्ठ ब्राह्मण हो अहं तुष्टः - मी संतुष्ट झालो आहे (युष्माकं) मनोरथाः सत्याः सन्तु - तुमच्या इच्छा पूर्ण होवोत इह परत्र च - ह्या लोकी व परलोकी छंदांसि अयातयामानि भवन्तु - वेद उज्वलित राहोत. ॥४२॥
हे श्रेष्ठ द्विजांनो ! मी तुम्हांवर संतुष्ट आहे. तुमचे सगळे मनोरथ पूर्ण होवोत आणि तुम्ही माझ्याकडून जे वेदाध्ययन केले, ते या आणि परलोकीसुद्धा निष्फळ न होवो ! (४२)


इत्थंविधान्यनेकानि वसतां गुरुवेश्मसु ।
गुरोरनुग्रहेणैव पुमान् पूर्णः प्रशान्तये ॥ ४३ ॥
आश्रमी राहिलो तेंव्हा गोष्टी कित्येक जाहल्या ।
गुरुंकृपे मिळे शांती पूर्णत्व लाभते तसे ॥ ४३ ॥

गुरुवेश्‍मसु वसतां (नः) - गुरुगृही रहाणार्‍या आमची एवंविधानि अनेकानि (कर्माणि अभवन्) - अशा प्रकारची अनेक कर्मे झाली गुरोः अनुग्रहेण एव - गुरूच्या कृपेनेच पुमान् पूर्णः (भूत्वा) प्रशान्तये (कल्पते) - पुरुष पूर्ण मनोरथ होऊन शांती मिळविण्यास समर्थ होतो. ॥४३॥
प्रिय मित्रा ! आम्ही गुरुकुलात निवास करीत असताना अशा अनेक घटना घडल्या होत्या. गुरुदेवांच्या कृपेमुळेच मनुष्य शांती आणि पूर्णतेला प्राप्त करून घेतो. (४३)


श्रीब्राह्मण उवाच -
किमस्माभिरनिर्वृत्तं देवदेव जगद्‌गुरो ।
भवता सत्यकामेन येषां वासो गुरावभूत् ॥ ४४ ॥
ब्राह्मणदेवता म्हणाले -
देवा ! जगद्‌गुरो कृष्णा काय शिल्लक राहिले ।
आश्रमी परमात्म्याच्या सवे मी राहिलो असे ॥ ४४ ॥

देवदेव जगद्‌‍गुरो - हे देवाधिदेवा जगन्नाथा श्रीकृष्णा अस्माभिः किं अनिर्वृत्तं - आम्ही केले नाही असे काय आहे येषां गुरौ वासः - ज्यांचा गुरुगृही निवास सत्यकामेन भवता (सह) अभूत् - सत्य आहेत इच्छा ज्याच्या अशा तुझ्यासह झाला तैः अस्माभिः किम् अनिर्वृत्तम् - त्या आम्हाकडून करावयाचे राहिले असे काय आहे. ॥४४॥
ब्राह्मण म्हणाला- हे देवा, जगद्‌गुरो ! आता आम्हांला मिळवायचे काय शिल्लक आहे ? कारण, सत्यसंकल्प परमात्मा असलेल्या आपल्याबरोबर आम्हांला गुरुकुलात राहाण्याचे भाग्य प्राप्त झाले ! (४४)


यस्य च्छन्दोमयं ब्रह्म देह आवपनं विभो ।
श्रेयसां तस्य गुरुषु वासोऽत्यन्तविडम्बनम् ॥ ४५ ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां दशमस्कन्धे उत्तरार्धे
श्रीदामचरिते अशीतितमोऽध्यायः ॥ ८० ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
वेद ते पुरुषार्थाचे मूळ स्रोत असेचि की ।
नी ते अंग तुझे देवा शिकशी गुरुपाशि ही ।
माणसा परि तू लीला करिशी सगळ्याच या ॥ ४५ ॥
॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ॥।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर ऐंशिवा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

विभो - हे सर्वव्यापी परमेश्‍वरा श्रेयसां आवपनं छंदोमयं ब्रह्म - कल्याणाचे माहेरघर असे वेदस्वरूपी ब्रह्म यस्य देहः (अस्ति) - ज्याचे शरीर आहे तस्य (तव) गुरुषु वासः - त्या तुझा गुरुगृही निवास हा अत्यन्तविडम्बनम् (अस्ति) - मोठी विटम्बनाच होय. ॥४५॥ ऐंशीवा अध्याय समाप्त
हे प्रभो ! छंदोबद्ध वेद आणि सर्व कल्याणे यांचे उत्पत्तिस्थान आहे तुमचे शरीर ! तेच आपण गुरुकुलात राहिलात , हा केवळ मनुष्यासारखा अभिनय नव्हे तर काय ? (४५)


अध्याय ऐंशिवा समाप्त

GO TOP