श्रीमद् भागवत पुराण
स्कन्द दहावा
अध्याय एकोण‍ऐंशीवा

बल्वलवधः, सूतहत्यामार्जनाय बलभद्रस्य तीर्थेषु भ्रमणं च -

बल्वलाचा उद्धार आणि बलरामांची तीर्थयात्रा -


संहिता - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् )
ततः पर्वण्युपावृत्ते प्रचण्डः पांशुवर्षणः ।
भीमो वायुरभूद् राजन् पूयगन्धस्तु सर्वशः ॥ १ ॥
श्री शुकदेव सांगतात -
( अनुष्टुप् )
एका त्या पर्वकाळासी महावादळ जाहले ।
धूळ वर्षावली सर्व पूवाचा वास जाहला ॥ १ ॥

राजन् - हे परीक्षित राजा ततः पर्वणि उपावृत्ते - नंतर पर्वणी प्राप्त झाली असता पांसुवर्षणः - धुळीचा पाऊस पाडणारा प्रचण्डः - तीव्र पूयगन्धः - दुर्गंधयुक्त भीमः वायुः तु - भयंकर वायु तर सर्वशः अभूत् - सर्व बाजूंनी उत्पन्न झाला. ॥१॥
श्रीशुक म्हणतात- परीक्षिता ! पर्वकाळ सुरू झाल्यावर मोठा झंझावर सुरू झाला. धुळीचा वर्षाव होऊ लागला आणि सगळीकडे पुवाची दुर्गंधी येऊ लागली. (१)


ततोऽमेध्यमयं वर्षं बल्वलेन विनिर्मितम् ।
अभवद् यज्ञशालायां सोऽन्वदृश्यत शूलधृक् ॥ २ ॥
बल्बले यज्ञशाळेसी मल मूत्रादि टाकिले ।
पुन्हा तो दिसला हाती शूळ घेवोनिया तिथे ॥ २ ॥

ततः - नंतर बल्वलेन विनिर्मितं - बल्वल दानवाने निर्मिलेला अमेध्यमयं वर्षं - अपवित्र वस्तूंचा पाऊस यज्ञशालायां अभवत् - यज्ञशाळेत पडू लागला शूलधृक् सः (च) अन्वदृश्यत - व शूल धारण करणारा तो बल्वल दिसू लागला. ॥२॥
त्यानंतर यज्ञशाळेमध्ये बल्वल दानवाने मल-मूत्र इत्यादी अपवित्र वस्तू टाकल्या. एवढे झाल्यावर हातात शूळ घेतलेला तो स्वत: दिसला. (२)


तं विलोक्य बृहत्कायं भिन्नाञ्जनचयोपमम् ।
तप्तताम्रशिखाश्मश्रुं दंष्ट्रोग्रभ्रुकुटीमुखम् ॥ ३ ॥
सस्मार मूसलं रामः परसैन्यविदारणम् ।
हलं च दैत्यदमनं ते तूर्णमुपतस्थतुः ॥ ४ ॥
काजळीपर्वता ऐसा प्रचंड दिसला असे ।
दाढी नी भुवया लाल तप्त तांब्यापरी पहा ॥ ३ ॥
शत्रूचा करण्या ठेचा बलाने मुसळा हला ।
स्मरता शस्त्र ते आले त्वरीत बळिच्या करीं ॥ ४ ॥

बृहत्कायं - प्रचंड शरीराच्या भिन्नाञ्जनचयोपमं - विस्कळीत झालेल्या काजळाच्या ढिगासारख्या तप्तताम्रशिखाश्मश्रुं - तापलेल्या तांब्याप्रमाणे ज्याची शेंडी व दाढी आहे अशा दंष्ट्रोग्रभ्रुकुटीमुखं - दाढा व भयंकर वक्र भुवई यांनी युक्त ज्याचे मुख आहे अशा तं विलोक्य - त्या बल्वल दानवाला पाहून रामः - बलराम परसैन्यविदारणं मुसलं - शत्रूच्या सैन्याचा नाश करणार्‍या मुसळाला दैत्यदमनं च हलं - आणि दैत्यांना मारणार्‍या नांगराला सस्मार - स्मरता झाला ते तूर्णं उपतस्थतुः - मुसळ व नांगर ही शस्त्रे तत्काळ तेथे आली. ॥३-४॥
काजळाच्या ढिगासारखे त्याचे प्रचंड काळेकुट्ट शरीर होते. त्याची शेंडी आणि दाढी-मिशा तापलेल्या तांब्याप्रमाणे लालबुंद होत्या. उग्र दाढी आणि भुवयांच्यामुळे त्याचा चेहरा अतिशय भयानक दिसत होता. त्याला पाहून बलरामांनी शत्रूसेनेचा संंहार करणारे मुसळ आणि दैत्यांचा नाश करणार्‍या नांगराचे स्मरण केले. तत्काळ ती दोन्ही शस्त्रे तेथे आली. (३-४)


तमाकृष्य हलाग्रेण बल्वलं गगनेचरम् ।
मूसलेनाहनत् क्रुद्धो मूर्ध्नि ब्रह्मद्रुहं बलः ॥ ५ ॥
सोऽपतद्‌ भुवि निर्भिन्न ललाटोऽसृक् समुत्सृजन् ।
मुञ्चन् आर्तस्वरं शैलो यथा वज्रहतोऽरुणः ॥ ६ ॥
संस्तुत्य मुनयो रामं प्रयुज्यावितथाशिषः ।
अभ्यषिञ्चन् महाभागा वृत्रघ्नं विबुधा यथा ॥ ७ ॥
बळीने नांगरे दैत्य ओढोनी घेतला असे ।
कपाळ फाटले त्याचे रक्तही वाहू लागले ॥ ५ ॥
ओरडे आर्त आवाजे पडला धरणिसिहि ।
वज्रघाते गिरी जैसा गेरूचा पडला असे ॥ ६ ॥
नैमिष्यारण्यिच्या संते बळीची स्तुती गायिली ।
इंद्राला देवता जैशा तसेचि अभिषेकिले ॥ ७ ॥

क्रुद्धः - रागावलेला बलः - बलराम हलाग्रेण - नांगराच्या टोकाने ब्रह्मद्रुहं - ब्राह्मणांशी वैर करणार्‍या अशा गगनेचरं तं बल्वलं आकृष्य - आकाशात संचार करणार्‍या त्या बल्वलाला ओढून मुसलेन मूर्ध्नि अहनत् - मुसळाने मस्तकावर प्रहार करिता झाला. ॥५॥ निर्भिन्नललाटः अरुणः सः - ज्याचे कपाळ छिन्नभिन्न झाले आहे असा व रक्ताने माखल्यामुळे लालवर्ण झालेला तो बल्वल असृक् समुत्सृजन् - रक्त ओकत यथा वज्रहतः शैलः - जसा वज्राने ताडिलेला पर्वत तसा आर्तस्वरं मुञ्चन् - पीडेमुळे मोठी गर्जना करीत भुवि अपतत् - पृथ्वीवर पडला महाभागाः मुनयः - मोठे भाग्यवान ऋषि रामं संस्तुत्य - बलरामाची स्तुति करून अवितथाशिषः प्रयुज्य - फलद्रूप होणारे आशीर्वाद देऊन यथा विबुधाः वृत्रघ्नं - जसे देव इंद्राला त्याप्रमाणे अभ्यषिञ्चन् - अभिषेक करिते झाले. ॥६-७॥
आकाशात संचार करणार्‍या बल्वलाला बलरामांनी आपल्या नांगराच्या टोकाने ओढून घेऊन, त्या ब्रह्मद्रोहीच्या डोक्यावर अत्यंत क्रोधाने मुसळाचा घाव घातला. त्यामुळे वज्राच्या प्रहाराने कावेने लाल झालेला एखादा पहाड पडावा, त्याप्रमाणे कपाळ फुटून रक्ताच्या धारा वाहात असलेला तो आर्त किंकाळी फोडीत जमिनीवर कोसळला. (५-६) नंतर त्या भाग्यवान मुनींनी बलरामांची स्तुती केली, कधीही व्यर्थ न होणारे आशीर्वाद दिले आणि देवांनी वृत्रासुराला मारणार्‍या इंद्राला अभिषेक करावा, त्याप्रमाणे त्यांना अभिषेक केला. (७)


वैजयन्तीं ददुर्मालां श्रीधामाम्लानपङ्कजाम् ।
रामाय वाससी दिव्ये दिव्यान्याभरणानि च ॥ ८ ॥
भूषणे द्रव्य वस्त्रे ती ऋषींनी अर्पिली बलां ।
वैजयंती दिली माला अक्षयी कुंजमाळही ॥ ८ ॥

श्रीधामाम्लानपङकजां - लक्ष्मीचे निवासस्थान अशा न कोमेजणार्‍या फुलांची वैजयंतीं मालां रामाय ददुः - वैजयंती माळ बलरामाला देते झाले दिव्ये वाससी दिव्यानि आभरणानि च - नवी सुंदर वस्त्रे आणि चकचकीत अलंकार ॥८॥
त्यावेळी ऋषींनी बलरामांणा दिव्य वस्त्रे आणि दिव्य अलंकार अर्पण केले. तसेच कधीही न कोमेजणार्‍या कमळांची वैजयंती माळा अर्पण केली. (८)


अथ तैरभ्यनुज्ञातः कौशिकीमेत्य ब्राह्मणैः ।
स्नात्वा सरोवरमगाद् यतः सरयूरास्रवत् ॥ ९ ॥
ऋषि निरोपिता तेथे सविप्र कौशिकी नदी ।
पातले घेतले स्नान निघाले शरयूस त्या ॥ ९ ॥

अथ तैः ब्राह्मणैः अभ्यनुज्ञातः (सः) - नंतर त्या ब्राह्मणांनी निरोप दिलेला तो बलराम कौशिकीम् एत्य - विश्वमित्री नदीवर येऊन स्नात्वा - स्नान करून यतः सरयुः आस्रवत् (तत्) सरोवरं अगात् - जेथून सरयू वहात येते त्या सरोवराजवळ गेला. ॥९॥
त्यानंतर ऋषींचा निरोप घेऊन बलराम ब्राह्मणांसह कौशिकी नदीवर आले व तेथे स्नान करून, जेथून शरयू नदी उगम पावते, त्या सरोवरावर गेले. (९)


अनुस्रोतेन सरयूं प्रयागमुपगम्य सः ।
स्नात्वा सन्तर्प्य देवादीन् जगाम पुलहाश्रमम् ॥ १० ॥
शरयू चालता गेले प्रयागीं स्नान घेतले ।
तर्पिले ऋषि नी पित्रां पुलहाश्रमि पातले ॥ १० ॥

सः - तो बलराम सरयूं अनुस्रोतेन - सरयूच्या प्रवाहाच्या अनुरोधाने प्रयागं उपगम्य - प्रयागाला जाऊन स्नात्वा - स्नान करून देवादीन् संतर्प्य - देवादिकांना तृप्त करून पुलहाश्रमं जगाम - पुलह ऋषीच्या आश्रमाला गेला. ॥१०॥
तेथून शरयू नदीच्या काठाने जात जात प्रयागावर आले. तेथे स्नान व देवादिकांचे तर्पण करून तेथून पुलहाश्रमाला गेले. (१०)


गोमतीं गण्डकीं स्नात्वा विपाशां शोण आप्लुतः ।
गयां गत्वा पितॄनिष्ट्वा गंगागासागरसंगमे ॥ ११ ॥
उपस्पृश्य महेन्द्राद्रौ रामं दृष्ट्वाभिवाद्य च ।
सप्तगोदावरीं वेणां पंपां भीमरथीं ततः ॥ १२ ॥
स्कन्दं दृष्ट्वा ययौ रामः श्रीशैलं गिरिशालयम् ।
द्रविडेषु महापुण्यं दृष्ट्वाद्रिं वेङ्कटं प्रभुः ॥ १३ ॥
कामकोष्णीं पुरीं काञ्चीं कावेरीं च सरिद्वराम् ।
श्रीरंगाख्यं महापुण्यं यत्र सन्निहितो हरिः ॥ १४ ॥
गंडकी गोमती तैसे विपाशीं स्नान घेउनी ।
सोमनदा मधोनीया गयेस् पातले पुन्हा ।
आज्ञेने वसुदेवाच्या यज्ञिय पूजिले असे ॥ ११ ॥
गंगासागरी येवोनी यात्रा ती संपवीयली ।
महेंद्रपर्वती आले नमिले पर्शुरामला ।
सप्तगोदावरि नी वेणा पंपा भागिरथीसही ॥ १२ ॥
करोनी स्नान ते गेले श्रीशैल पर्वतासही ।
व्यंकटाचलिही आले घेतले दर्शनो तिथे ॥ १३ ॥
कामाक्षी शिवकांची नी विष्णुकांची करोनिया ।
कावेरी स्नान घेवोनी श्रीरंगपुरि पातले ।
क्षेत्रीं त्या भगवान् विष्णु राजती ते सदैव की ॥ १४ ॥

रामः - बलराम गोमतीं गण्डकीं विपाशां - गोमती, गण्डकी व विपाशा ह्या नद्यांमध्ये स्नात्वा - स्नान करून शोणे (च) आप्लुतः - व शोण नदीमध्ये स्नान करून गयां गत्वा - गयेला जाऊन पितृन् इष्टवा - पितरांची पूजा करून गंगासागरसंगमे उपस्पृश्य - गंगा व समुद्र यांचा जेथे संगम झाला आहे तेथे स्नान करून महेन्द्राद्रौ रामं दृष्ट्वा अभिवाद्य च - महेंद्र पर्वतावर परशुरामाचे दर्शन घेऊन व त्याला नमस्कार करून ततः - नंतर सप्तगोदावरीं वेणां पंपां भीमरथीं (च) स्कन्दं दृष्ट्वा - सात नद्या जेथे एकत्र मिळाल्या आहेत अशा त्या गोदावरी नदीच्या पवित्र स्थानाचे, तसेच वेणा नदी, पंपा, भीमरथी आणि स्कंद यांचे दर्शन घेऊन गिरिशालयं श्रीशैलं ययौ - शंकराचे निवासस्थान अशा श्रीशैल पर्वतावर गेला द्रविडेषु महापुण्यं वेंकटं अद्रिं दृष्ट्वा - द्रविड देशातील महापुण्यकारक वेंकटगिरिचे दर्शन घेऊन प्रभुः - बलराम कामकोष्णीं कांचीं पुरीं सरिद्वरां कावेरीं च (दृष्ट्वा) - कामकोष्णी, कांचीपुरी आणि श्रेष्ठ नदी कावेरी यांचे दर्शन घेऊन यत्र हरिः सन्निहितः तं महापुण्यं श्रीरंगाख्यं (क्षेत्रं जगाम) - जेथे परमेश्वर नित्य रहातो अशा त्या मोठया पुण्यकारक श्रीरंग नावाच्या क्षेत्राला गेला. ॥११-१४॥
तेथून गंडकी, गोमती व विपाशा या नद्यांमध्ये स्नान करून नंतर शोणनदात स्नान केले. यानंतर गयेला जाऊन पितृतर्पण केले. तेथून गंगासागर संगमावर जाऊन तेथेही स्नान केले. नंतर महेंद्र पर्वतावर जाऊन तेथे परशुरामांचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले. त्यानंतर सप्त गोदावरी, वेणा, पंपा आणि भीमारथी इत्यादी नद्यांमध्ये स्नान करीत कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी ते गेले. तसेच तेथून महादेवांचे निवासस्थान असलेल्या श्रीशैल पर्वतावर जाऊन पोहोचले. यानंतर द्रविड देशातील परम पुण्यमय अशा वेंकटाचलावर जाऊन श्रीव्यंकटेशाचे दर्शन घेतले आणि तेथून ते कामाक्षी, शिवकांची, विष्णुकांची करीत कावेरी नावाच्या श्रेष्ठ नदीत स्नान करून श्रीहरींचा निवास असलेल्या पुण्यमय अशा श्रीरंगक्षेत्री जाऊन पोहोचले. (११-१४)


ऋषभाद्रिं हरेः क्षेत्रं दक्षिणां मथुरां तथा ।
सामुद्रं सेतुमगमत् महापातकनाशनम् ॥ १५ ॥
तेथोनी विष्णुक्षेत्रासी ऋषभगिरिं पातले ।
दक्षीण मथुरा क्षेत्रीं सेतुबंधासही तसे ॥ १५ ॥

ततः सः - तेथून तो हरेः क्षेत्रं ऋषभाद्रिं - विष्णुक्षेत्र ऋषभपर्वतावर तथा दक्षिणां मथुरां - तसेच दक्षिण दिशेकडील मथुरा असे ज्या क्षेत्राला म्हणतात तेथे (ततः) महापातकनाशनं सामुद्रं सेतुम् अगमत् - नंतर मोठया पातकांचा नाश करणार्‍या समुद्रावर बांधिलेल्या सेतूकडे गेला. ॥१५॥
तेथून पुढे त्यांनी श्री विष्णूंचे क्षेत्र असलेला ऋषभ पर्वत, दक्षिण मथुरा आणि महापापे नष्ट करणार्‍या सेतुबंधची यात्रा केली. (१५)


तत्रायुतमदाद् धेनूः ब्राह्मणेभ्यो हलायुधः ।
कृतमालां ताम्रपर्णीं मलयं च कुलाचलम् ॥ १६ ॥
गाई दहा हजारो त्या द्विजांना दानही दिल्या ।
ताम्रपर्णी कृतमाला स्नानीने मलयास त्या ।
पातले सप्तकूलाच्या पर्वता माजि एक जो ॥ १६ ॥

हलायुधः - बलराम तत्र - तेथे अयुतं धेनूः ब्राह्मणेभ्यः अदात् - दहा हजार गाई ब्राह्मणांना देता झाला कृतमालां ताम्रपर्णीं मलयं कुलाचलं च - कृतमाला, ताम्रपर्णी ह्या दोन नद्या आणि मलय नावाचा कुल पर्वत ह्या ठिकाणी. ॥१६॥
बलरामांनी तेथे ब्राह्मणांना दहा हजार गाई दान दिल्या. नंतर तेथून कृतमाला आणि ताम्रपर्णी नद्यांमध्ये स्नान करून सात कुलपर्वतांपैकी एक अशा मलयपर्वतावर ते गेले. (१६)


तत्रागस्त्यं समासीनं नमस्कृत्याभिवाद्य च ।
योजितस्तेन चाशीर्भिः अनुज्ञातो गतोऽर्णवम् ।
दक्षिणं तत्र कन्याख्यां दुर्गां देवीं ददर्श सः ॥ १७ ॥
अगस्ति नमिले तेथे आले दक्षिण सागरीं ।
दुर्गा कन्याकुमारी या रूपात नमिली असे ॥ १७ ॥

सः - तो बलराम तत्र समासीनं अगस्त्यं नमस्कृत्य अभिवाद्य च - तेथे असलेल्या अगस्त्य ऋषीला नमस्कार करून व सत्कारून तेन आशीर्भिः योजितः - त्या अगस्तीने आशीर्वाद दिलेला (तेन) च अनुज्ञातः - आणि त्याने अनुज्ञा दिलेला दक्षिणं अर्णवं गतः - दक्षिण समुद्राला गेला तत्र कन्याख्यां दुर्गां देवीं ददर्श - तेथे कन्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या दुर्गा देवीचे दर्शन घेता झाला. ॥१७॥
तेथे असलेल्या अगस्त्य मुनींना त्यांनी नमस्कार आणि अभिवादन केले. त्यांचा आशीर्वाद व निरोप घेऊन बलराम दक्षिण समुद्रावर गेले. तेथे त्यांनी कन्याकुमारीचे दर्शन घेतले. (१७)


ततः फाल्गुनमासाद्य पञ्चाप्सरसमुत्तमम् ।
विष्णुः सन्निहितो यत्र स्नात्वास्पर्शद् गवायुतम् ॥ १८ ॥
फाल्गूनतीर्थि ही गेले अनंतशयनासही ।
सान्निध्य विष्णुचे तेथे गाई दान दिल्या तिथे ॥ १६ ॥

ततः फाल्गुनं आसाद्य - नंतर फाल्गुन तीर्थाला जाऊन उत्तमं पंचाप्सरसं (जगाम) - तेथून श्रेष्ठ अशा पंचाप्सर नावाच्या तीर्थाला गेला यत्र विष्णुः सन्निहितः - तेथे विष्णु नित्य राहिला आहे यत्र स्नात्वा (सः) गवायुतं अस्पर्शत् - जेथे स्नान करून बलराम दहा हजार गाई दान देता झाला. ॥१८॥
यानंतर श्रीविष्णूंचे स्थान असलेल्या अनंतशयनम्-क्षेत्री गेले आणि तेथील श्रेष्ठ अशा पंचाप्सरस तीर्थामध्ये स्नान केले. तेथे त्यांनी दहा हजार गाई दान केल्या. (१८)


ततोऽभिव्रज्य भगवान् केरलांस्तु त्रिगर्तकान् ।
गोकर्णाख्यं शिवक्षेत्रं सान्निध्यं यत्र धूर्जटेः ॥ १९ ॥
आर्यां द्‌वैपायनीं दृष्ट्वा शूर्पारकमगाद् बलः ।
तापीं पयोष्णीं निर्विन्ध्यां उपस्पृश्याथ दण्डकम् ॥ २० ॥
त्रिगर्त केरळी आले गोकर्णक्षेत्र पाहिले ।
जिथे सदाशिवो राही सदाचा मूर्तिमान् असा ॥ १९ ॥
आर्यादेवी द्विपाची नी शूर्पारकिहि पातले ।
पयोष्णी तापि निर्विंध्या करोनी वनि दंडकी ॥ २० ॥

ततः तु भगवान् बलः - नंतर भगवान बलराम केरलान् त्रिगर्तकान् - केरल देश तसेच त्रिगर्त देश यत्र धूर्जटेः सान्निध्यं - जेथे शंकराचे सामीप्य आहे अशा गोकर्णाख्यं शिवक्षेत्रं अभिव्रज्य - गोकर्ण नामक शिवक्षेत्राला जाऊन आर्यां द्वैपायनीं शूर्पारकं (च) दृष्ट्वा - द्वीपात रहाणार्‍या आर्या देवीचे आणि शूर्पारक क्षेत्राचे दर्शन घेऊन तापीं पयोष्णीं निर्विध्यां अगात् - तापी, पयोष्णी व निर्विध्या ह्या नद्यांच्या काठी गेला (तत्र) उपस्पृश्य (च) - आणि तेथे स्नान करून दण्डकं (जगाम) - दंडकारण्याला गेला. ॥१९-२०॥
भगवान बलराम तेथून निघून केरळ आणि त्रिगर्त देशांना जाऊअ तेथून शंकरांचे क्षेत्र असलेल्या गोकर्णाला आले. तेथे भगवान शंकर नेहमी विराजमान असतात. (१९) तेथून त्यांनी द्वीपामध्ये निवास करणार्‍या आर्यादेवीचे दर्शन घेतले आणि तेथून शूर्पारक क्षेत्रात ते गेले. यानंतर तापी, पयोष्णी आणि निर्विन्ध्या नदीमध्ये स्नान करून ते दंडकारण्यात गेले. (२०)


प्रविश्य रेवामगमद् यत्र माहिष्मती पुरी ।
मनुतीर्थमुपस्पृश्य प्रभासं पुनरागमत् ॥ २१ ॥
आले ते नर्मदाकाठी माहिष्मतिपुरास त्या ।
मनुतीर्थास स्नानोनी प्रभासक्षेत्रि पातले ॥ २१ ॥

रेवां प्रविश्य - नर्मदा नदीच्या तीरावरील क्षेत्रात प्रविष्ट होऊन यत्र माहिष्मती पुरी तत्र अगमत् - जेथे माहिष्मती नामक नगरी आहे तेथे गेला मनुतीर्थं उपस्पृश्य - मनुतीर्थांत उदकाने स्नान करून पुनः प्रभासं आगमत् - पुनः प्रभासाला आला. ॥२१॥
तेथे माहिष्मती नगराजवळ असणार्‍या नर्मदेवर गेले. तेथे मनुतीर्थात स्नान करून ते पुन्हा प्रभासक्षेत्री परतले. (२१)


श्रुत्वा द्विविजैः कथ्यमानं कुरुपाण्डवसंयुगे ।
सर्वराजन्यनिधनं भारं मेने हृतं भुवः ॥ २२ ॥
द्विज ते वदले तेथे कुरुपांडव संगरी ।
मेले क्षत्रीय ते कैक स्मरले भार हारला ॥ २२ ॥

कुरुपाण्डवसंयुगे सर्वराजन्यनिधनं - कौरव व पांडव यांच्या युद्धात सर्व क्षत्रिय राजांचा झालेला नाश द्विजैः कथ्यमानं श्रुत्वा - ब्राह्मणांनी सांगितलेला ऐकून भुवः भारं ह्लतं मेने - पृथ्वीचा भार दूर झाला असे मानिता झाला. ॥२२॥
तेथेच ब्राह्मणांकडून, कौरव-पांडवांच्या युद्धामध्ये पुष्कळशा क्षत्रियांचा संहार झाला आहे, हे ऐकून पृथ्वीवरील बराचसा भार कमी झाला, असे त्यांना वाटले. (२२)


स भीमदुर्योधनयोः गदाभ्यां युध्यतोर्मृधे ।
वारयिष्यन् विनशनं जगाम यदुनन्दनः ॥ २३ ॥
भीम दुर्योधनाचे जै गदा युद्ध सरु तदा ।
थांबवाया कुरुक्षेत्री पातले बलरामजी ॥ २३ ॥

सः यदुनन्दनः - तो बलराम मृधे - युद्धात गदाभ्यां युध्यतोः भीमदुर्योधनयोः - गदांनी युद्ध करणार्‍या भीम-दुर्योधनांना वारयिष्यन् - परावृत्त करण्यासाठी विनशनं जगाम - कुरुक्षेत्राला गेला. ॥२३॥
रणभूमीवर ज्या दिवशी भीमसेन आणि दुर्योधन यांचे गदायुद्ध चालू होते, त्याच दिवशी त्यांना थांबविण्यासाठी बलराम कुरुक्षेत्रात जाऊन पोहोचले. (२३)


युधिष्ठिरस्तु तं दृष्ट्वा यमौ कृष्णार्जुनावपि ।
अभिवाद्याभवन् तूष्णीं किं विवक्षुरिहागतः ॥ २४ ॥
धर्म कृष्णार्जुने त्यांना केलासे प्रणिपात तो ।
राहिले सर्व ते चूप भितीने बळिच्या तसे ॥ २४ ॥

तु - परंतु युधिष्ठिरः यमौ कृष्णार्जुनौ अपि - धर्मराज, नकुल, सहदेव, कृष्ण व अर्जुन हे सर्वही तं दृष्टवा - त्या बलरामाला पाहून किं विवक्षुः इह आगतः (इति विचिन्तयन्तः) - हा येथे काय सांगायला आला आहे असा विचार करीत अभिवाद्य तूष्णीं अभवन् - त्याला वंदन करून स्वस्थ बसले. ॥२४॥
परंतु युधिष्ठिर, नकुल, सहदेव, श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी ते आल्याचे पाहून त्यांना वंदन केले व ते गप्प राहिले. हे काय सांगण्यासाठी येथे आले आहेत, हे त्यांच्या लक्षात येईना ! (२४)


गदापाणी उभौ दृष्ट्वा संरब्धौ विजयैषिणौ ।
मण्डलानि विचित्राणि चरन्तौ इदमब्रवीत् ॥ २५ ॥
गदा घेवोनिया हाती भीम दुर्योधनो तदा ।
क्रोधोनी डाव ते घेती पाहता राम बोलले ॥ २५ ॥

उभौ - दोघे भीम व दुर्योधन गदापाणी - हातांत गदा घेतलेले संरब्धौ विजयैषिणौ - क्रुद्ध झालेले व जय मिळविण्याची इच्छा करणारे विचित्राणि मण्डलानि चरन्तौ दृष्टवा - चित्रविचित्र अशा गिरक्या मारीत असलेले पाहून इदम् अब्रवीत् - हे म्हणाला. ॥२५॥
भीमसेन आणि दुर्योधन असे दोघेही त्यावेळी हातात गदा घेऊन एकमेकांवर विजय मिळविण्यासाठी म्हणून क्रोधाने निरनिराळे पवित्रे घेत होते. त्यांना पाहून बलराम म्हणाले. (२५)


युवां तुल्यबलौ वीरौ हे राजन् हे वृकोदर ।
एकं प्राणाधिकं मन्ये उतैकं शिक्षयाधिकम् ॥ २६ ॥
राजा दुर्योधना भीमा दोघे वीर तुम्ही असा ।
समाल बल तेजाने कौशल्य शक्तिही तशी ॥ २६ ॥

हे राजन् हे वृकोदर - हे दुर्योधना, हे भीमा युवां वीरौ तुल्यबलौ - तुम्ही दोघे वीर सारख्या बळाचे आहा एकं प्राणाधिकं उत एकं शिक्षयाधिकं - एक शक्तीने अधिक आणि दुसरा शिक्षणाने अधिक (इति) मन्ये - असे मी मानितो. ॥२६॥
हे राजा दुर्योधना ! हे भीमसेना ! तुम्ही दोघे तुल्यबळ वीर आहात. त्यांपैकी भीमसेनामध्ये ताकद अधिक आहे, आणि दुर्योधनामध्ये गदायुद्धाचे कौशल्य अधिक आहे, असे मी समजतो. (२६)


तस्मादेकतरस्येह युवयोः समवीर्ययोः ।
न लक्ष्यते जयोऽन्यो वा विरमत्वफलो रणः ॥ २७ ॥
तुम्हा ना जय नी तैसा पराजयहि तो कधी ।
कासया लढता व्यर्थ थांबवा युद्ध हे अता ॥ २७ ॥

तस्मात् - म्हणून इह - या रणांगणात समवीर्ययोः युवयोः - सारखा पराक्रम असणार्‍या तुम्हा दोघांमध्ये एकतरस्य - कोणातरी एकाचा जयः अन्यः वा - जय किंवा पराजय न लक्ष्यते - होईलसे दिसत नाही (अतः) अफलः रणः विरमतु - ह्यासाठी निष्फळ होणारे युद्ध थांबावे. ॥२७॥
म्हणून सारखेच बळ असणार्‍या तुमच्यांपैकी एकाचा जय व दुसर्‍याचा पराजय होईल, असे मला वाटत नाही. म्हणून हे व्यर्थ युद्ध तुम्ही थांबवा. (२७)


न तद्‌वाक्यं जगृहतुः बद्धवैरौ नृपार्थवत् ।
अनुस्मरन्तौ अन्योन्यं दुरुक्तं दुष्कृतानि च ॥ २८ ॥
परीक्षित् ! बळिचे शब्दी दोघांना हितकारक ।
परी ना मानिती वैरे क्रोधाने लढती तसे ॥ २८ ॥

नृप - हे राजा बद्धवैरौ - दृढ आहे शत्रुत्व ज्यांचे असे ते भीम व दुर्योधन अन्योन्यं दुरुक्तं दुष्कृतानि च अनुस्मरन्तौ - एकमेकांना उद्देशून बोललेली दुष्ट भाषणे व केलेली वाईट कृत्ये ह्यांचे स्मरण करणारे असे तत् (बलस्य) अर्थवत् वाक्यं न जगृहतुः - ते बलरामाचे अर्थाने पूर्ण असे भाषण स्वीकारिते झाले नाहीत. ॥२८॥
परीक्षिता ! बलरामांचे म्हणणे बरोबर होते; परंतु त्या दोघांमधील वैर इतके वाढले होते की, त्यांनी ते ऐकले नाही. कारण एकमेकांना पूर्वी केलेली दुरुत्तरे आणि एकमेकांशी केलेले दुर्व्यवहार यांचीच त्यांना एकसारखी आठवण येत होती. (२८)


दिष्टं तदनुमन्वानो रामो द्‌वारवतीं ययौ ।
उग्रसेनादिभिः प्रीतैः ज्ञातिभिः समुपागतः ॥ २९ ॥
प्रारब्ध मानिले रामे द्वारकापुरि पातले ।
तिथे स्वागत ते केले उग्रसेन गुरुंनिही ॥ २९ ॥

तत् दिष्टं इति अनुमन्वानः रामः - ह्यांचे कृत्य दैवानेच घडून आले आहे असे मानणारा बलराम द्वारवतीं ययौ - द्वारकेला गेला प्रीतैः उग्रसेनादिभिः ज्ञातिभिः समुपागतः (च) - व प्रसन्न झालेल्या उग्रसेनप्रमुख नातलग मंडळीमध्ये जाऊन मिसळला. ॥२९॥
त्यांचे प्रारब्धच तसे आहे, असे म्हणून त्यांना विशेष आग्रह न करता ते द्वारकेला परतले. तेथे उग्रसेन वगैरे प्रियजनांना ते भेटले. (२९)


तं पुनर्नैमिषं प्राप्तं ऋषयोऽयाजयन् मुदा ।
क्रत्वङ्‌गं क्रतुभिः सर्वैः निवृत्ताखिलविग्रहम् ॥ ३० ॥
तेभ्यो विशुद्धविज्ञानं भगवान् व्यतरद्‌ विभुः ।
येनैवात्मन्यदो विश्वं आत्मानं विश्वगं विदुः ॥ ३१ ॥
नैमिष्यारण्यि ते आले पुन्हा निवृत्त हौनी ।
केले रामे तिथे यज्ञ फक्त त्या लोकसंग्रहा ॥ ३० ॥
ऋषिंना शुद्ध तत्त्वाचे रामाने ज्ञान ते दिले ।
जेणे ते आपणामाजी पाहती विश्व सर्व ते ॥ ३१ ॥

ऋषयः - ऋषि पुनः नैमिषं प्राप्तं - पुनः नैमिषारण्यात गेलेल्या निवृत्ताखिलविग्रहं - कलहादि अनेक दुष्कृत्यांपासून परावृत्त झालेल्या क्रत्वंगं तं - यज्ञमूर्ति अशा त्या बलरामाला सर्वैः क्रतुभिः - सर्व यज्ञांनी मुदा अयाजयन् - आनंदाने पूजिते झाले विभुः भगवान् - सर्वव्यापी बलराम तेभ्यः विशुद्धविज्ञानं व्यतरत् - त्या ऋषींना अत्यंत निर्मळ ज्ञान उपदेशिता झाला येन एव - ज्या ज्ञानामुळेच अदः विश्वं आत्मनि - हे जग आत्म्याच्या ठिकाणी आत्मानं (च) विश्वगं विदुः - आणि आत्म्याला सर्वव्यापी असे ज्ञानी लोक समजतात. ॥३०-३१॥
तेथून बलराम पुन्हा नैमिष्यारण्यात गेले. तेथील ऋषींनी, वैर, युद्ध इत्यादींचा त्याग केलेल्या बलरामांकडून आनंदाने सर्व प्रकारचे यज्ञ करविले. वास्तविक यज्ञ हे बलरामांचे अंगच होते. (३०) सर्वसमर्थ भगवान बलरामांनी त्या ऋषींना विशुद्ध तत्त्वज्ञानाचा उपदेश केला. त्यामुळे ते सर्वजण, या संपूर्ण विश्वाला स्वत:मध्ये आणि स्वत:ला सगळ्या विश्वामध्ये असल्याचा अनुभव घेऊ लागले. (३१)


स्वपत्यावभृथस्नातो ज्ञातिबन्धुसुहृद्‌वृतः ।
रेजे स्वज्योत्स्नयेवेन्दुः सुवासाः सुष्ठ्वलङ्कृतः ॥ ३२ ॥
रेवती सह तै रामे यज्ञांतस्नान घेतले ।
वस्त्रालंकार लेवोनी सजले चंद्रची जसा ॥ ३२ ॥

स्वपत्‍न्या अवभृथस्नातः - रेवती पत्‍नीसह अवभृथस्नान केलेला ज्ञातिबन्धुसुहृद्‌वृतः - जातभाई, बांधव व मित्र ह्यांनी वेष्टिलेला इंदुः स्वज्योत्स्नया इव - चंद्र जसा आपल्या प्रकाशाने तसा सुवासाः सुष्ठ्‌वलंकृतः रेजे - सुंदर वस्त्र नेसलेला व सुंदर अलंकार घातलेला असा शोभला. ॥३२॥
नंतर नातलग व इष्टमित्रांसमवेत बलरामांनी पत्‍नीसह यज्ञन्त स्नान करून सुंदर वस्त्रालंकार धारण केले. त्यावेळी चंद्र चांदण्यामुळे शोभून दिसावा, त्याप्रमाणे ते शोभू लागले. (३२)


ईदृग्विधान्यसङ्ख्यानि बलस्य बलशालिनः ।
अनन्तस्याप्रमेयस्य मायामर्त्यस्य सन्ति हि ॥ ३३ ॥
अनंत अपरा रामो लीलेने जन्मले स्वये ।
बळी त्या बलरामाची कीर्ति ना वर्णिता सरे ॥ ३३ ॥

बलशालिनः - बलाने शोभणार्‍या अनन्तस्य अप्रमेयस्य मायामर्त्यस्य बलस्य - अविनाशी, निरुपम व मायेने मनुष्यावतार घेतलेल्या बलरामाची ईदृग्विधानि असङ्‌ख्यानि (कर्माणि) सन्ति हि - अशा प्रकारची अगणित कर्मे खरोखर आहेत. ॥३३॥
भगवान बलराम अनंत असून त्यांचे स्वरूप, मनालाही न कळणारे आहे. त्यांनी मायेने मनुष्यासारखे शरीर धारण केले आहे. त्या बलशाली बलरामांच्या अशा चरित्रकथांची गणतीच करणॆ कठीण. (३३)


योऽनुस्मरेत रामस्य कर्माण्यद्‌भुतकर्मणः ।
सायं प्रातरनन्तस्य विष्णोः स दयितो भवेत् ॥ ३४ ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां दशमस्कन्धे उत्तरार्धे
तीर्थयात्रानिरूपणं नाम एकोनाशीतितमोऽध्यायः ॥ ७९ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
अद्‌भूत कर्म रामाचे सकाळी स्मरता असे ।
अत्यंत भगवत्‌ प्रीय मनुष्य होतसे पहा ॥ ३४ ॥
॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ॥
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर एकोणऐंशिवा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

यः - जो अद्‌भुतकर्मणः अनंतस्य रामस्य कर्माणि - आश्चर्यकारक कर्मे करणार्‍या व शेषाचा अवतार अशा बलरामाची कृत्ये सायं प्रातः अनुस्मरेत - सकाळ, संध्याकाळ स्मरण करील सः विष्णोः दयितः भवेत् - तो विष्णूला प्रिय होईल. ॥३४॥ एकूण‌‍ऐंशिवा अध्याय समाप्त
जो मनुष्य अनंत व अद्भुत कर्मे करणार्‍या भगवान बलरामांच्या चरित्रकथांचे सायंकाळी आणि प्रात:काळी स्मरण करतो, तो भगवंतांणा प्रिय होतो. (३४)


अध्याय एकूण‌‍ऐंशिवा समाप्त

GO TOP