|
श्रीमद् भागवत पुराण दन्तवक्रविदूरथवधः; बलरामद्वारा सूतशिरश्छेदश्च - दंतवक्त्र आणि विदूरथाचा उद्धार व तीर्थयात्रेमध्ये बलरामांच्या हातून सूताचा वध - संहिता - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् ) शिशुपालस्य शाल्वस्य पौण्ड्रकस्यापि दुर्मतिः । परलोकगतानां च कुर्वन् पारोक्ष्यसौहृदम् ॥ १ ॥ एकः पदातिः संक्रुद्धो गदापाणिः प्रकम्पयन् । पद्भ्यामिमां महाराज महासत्त्वो व्यदृश्यत ॥ २ ॥
श्रीशुकदेव सांगतात - ( अनुष्टुप् ) शिशूपाल नि तो शाल्व पौंड्रक मेल्यावरी तदा । मित्रऋण स्मरोनीया एकटा दंतवक्त्र तो ॥ १ ॥ आला क्रोधोनि पायाने हाती एकचि ती गदा । शक्तिवंत असा की तो चालता भूमिकंप हो ॥ २ ॥
दुर्मतिः - दुर्बुद्धि दन्तवक्र परलोकगतानां शिशुपालस्य शाल्वस्य पौंड्रकस्य च अपि - मृत झालेले जे शिशुपाल, शाल्व व पौंड्रक त्त्यांचे पारोक्ष्य सौहृदं कुर्वन् (आसीत्) - परलोकसंबंधी मित्राला उचित असे कृत्य करणारा झाला महाराज - हे परीक्षित राजा एकः - एकटा पद्भ्यां इमां प्रकम्पयन् - पायांनी ह्या पृथ्वीला कांपविणारा संक्रुद्धः - रागावलेला महासत्त्वः - मोठा बलाढय पदातिः गदापाणिः व्यदृश्यत - पायाने चालणारा असा हातात गदा घेऊन रणांगणावर प्रकट झाला. ॥१-२॥
श्रीशुक म्हणतात- महाराज ! शिशुपाल, शाल्व आणि पौंड्रक मारले गेल्यानंतर त्यांच्याशी असलेल्या मैत्रीचे ऋण फेडण्यासाठी संतापलेला दुष्ट दंतवक्त्र हातात गदा घेऊन एकटाच, पायी-पायीच, युद्धभूमीवर येऊन थडकला. तो इतका शक्तिमान होता की, त्याच्या चालण्याने जमीन हादरत होती. (१-२)
तं तथाऽऽयान्तमालोक्य गदामादाय सत्वरः ।
अवप्लुत्य रथात् कृष्णः सिन्धुं वेलेव प्रत्यधात् ॥ ३ ॥
कृष्णाने पाहिले त्याला झपाटे पातला असा । समुद्रा तट जै रोधी कृष्णाने रोधिला तसा ॥ ३ ॥
कृष्णः - श्रीकृष्ण तथा आयान्तं तं आलोक्य - तशा रीतीने येणार्या त्या दंतववक्राला पाहून गदां आदाय - गदा घेऊन सत्वरः रथात् अवप्लुत्य - त्वरेने रथातून खाली उडी मारून वेला सिन्धुम् इव प्रत्यधात् - किनारा जसा समुद्राला रोधितो त्याप्रमाणे रोधिता झाला. ॥३॥
श्रीकृष्णांनी त्याला अशाप्रकारे येताना पाहून ताबडतोब हातात गदा घेऊन रथातून खाली उडी मारली आणि किनार्याने समुद्राला अडवावे, तसे त्याला अडविले. (३)
गदामुद्यम्य कारूषो मुकुन्दं प्राह दुर्मदः ।
दिष्ट्या दिष्ट्या भवानद्य मम दृष्टिपथं गतः ॥ ४ ॥
घमेंडी कारुषो तेंव्हा कृष्णा ओरडुनी म्हणे । भाग्यची गोष्ट की आज दिसशी मजला पुढे ॥ ४ ॥
दुर्मदः कारूषः - मदोन्मत्त दन्तवक्र गदाम् उद्यम्य मुकुन्दं प्राह - गदा उचलून श्रीकृष्णाला म्हणाला अद्य - आज दिष्टया दिष्टया - मोठया सुदैवाने भवान् मम दृष्टिपथं गतः - तू माझ्या दृष्टीस पडलास. ॥४॥
उन्मत्त दंतवक्त्राने गदा उगारून श्रीकृष्णांना म्हटले- " तू आज माझ्या दृष्टीसमोर आलास, हे फार चांगले झाले ! " (४)
त्वं मातुलेयो नः कृष्ण मित्रध्रुङ्मां जिघांससि ।
अतस्त्वां गदया मन्द हनिष्ये वज्रकल्पया ॥ ५ ॥
मामेभाऊ म्हणोनिया मारण्या नच इच्छि मी । मारिले मम ते मित्र म्हणोनी ठेचितो तुला ॥ ५ ॥
मंद कृष्ण - हे मंदबुद्धे श्रीकृष्णा त्वं नः मातुलेयः - तू आमचा मामेभाऊ (च) मित्रध्रुक् - आणि मित्रांशी वैर करणारा असा मां जिघांससि - मला मारण्यास इच्छित आहेस अतः - म्हणून वज्रकल्पया गदया त्वां हनिष्ये - वज्रासारख्या गदेने तुला मारून टाकीन. ॥५॥
हे कृष्णा ! तू माझा मामेभाऊ असलास , तरी तू माझ्या मित्रांना मारले असून मलासुद्धा मारू इच्छितोस. म्हणून मूर्खा ! आज मी तुला या वज्रासारख्या गदेने ठार करीन. (५)
तर्ह्यानृण्यमुपैम्यज्ञ मित्राणां मित्रवत्सलः ।
बन्धुरूपमरिं हत्वा व्याधिं देहचरं यथा ॥ ६ ॥
मूर्खा तू आप्त नी शत्रू शरीरा रोगची जसा । मित्रांचे ऋण मी आता फेडितो तुज मारुनी ॥ ६ ॥
तर्हि - ह्यासाठी अज्ञ - हे मूर्खा श्रीकृष्णा मित्रवत्सलः - मित्रांवर प्रेम करणारा मी यथा देहचरं व्याधिं (तथा) - ज्याप्रमाणे शरीरातील रोगाला मारावे त्याप्रमाणे बंधुरूपं (त्वां) अरिं हत्वा - बंधूच्या स्वरूपाने आलेल्या शत्रु अशा तुला मारून मित्राणां आनृण्यं उपैमि - मित्रांच्या ऋणापासून मुक्त होईन. ॥६॥
अरे मूर्खा ! तू माझा भाऊ असलास तरी शत्रूही आहेस. मी माझ्या मित्रांवरील प्रेमामुळे. शरीरातील रोग नाहीसा करावा, तसा तुला मारूनच त्यांच्या ऋणातून मुक्त होईन. (६)
एवं रूक्षैस्तुदन् वाक्यैः कृष्णं तोत्त्रैरिव द्विपम् ।
गदया ताडयन् मूर्ध्नि सिंहवद् व्यनदच्च सः ॥ ७ ॥
अंकुशो हत्तिसी जैसा माहूत टोचितो तसा । कृष्णाला बोलता मारी गदेचा तो प्रहार की ॥ ७ ॥
सः - तो दंतवक्र तोत्रैः द्विपम् इव - अंकुशांनी जसे हत्तीला त्याप्रमाणे एवं रूक्षैः वाक्यैः कृष्णं तुदन् - अशा रीतीच्या कठोर भाषणांनी श्रीकृष्णाला पीडा देऊन गदया मूर्ध्नि अताडयत् - गदेने मस्तकावर प्रहार करिता झाला सिंहवत् च व्यनदत् - व सिंहाप्रमाणे गर्जना करिता झाला. ॥७॥
माहुत जसा अकुंशाने हत्तीला टोचतो, त्याप्रमाणे दंतवक्त्राने आपल्या कडवट शब्दांनी श्रीकृष्णांना टोचत त्यांच्या डोक्यावर गदा मारून सिंहाप्रमाणे गर्जना केली. (७)
गदयाभिहतोऽप्याजौ न चचाल यदूद्वहः ।
कृष्णोऽपि तमहन् गुर्व्या कौमोदक्या स्तनान्तरे ॥ ८ ॥
गदेचा लागता घाव कृष्ण तो जसच्या तसा । उचली स्वगदा नी त्या दैत्याच्या वक्षि मारिता ॥ ८ ॥
यदूद्वहः - यदुकुलभूषण श्रीकृष्ण आजौ - रणांगणावर गदया अभिहतः अपि - गदेने ताडिला गेला असताहि न चचाल - हलला नाही कृष्णः अपि - श्रीकृष्ण सुद्धा गुर्व्या कौमोदक्या - जड अशा कौमोदकी नावाच्या गदेने तं स्तनान्तरे अहन् - त्या दंतवक्राला दोन स्तनांच्या मध्यभागी ताडिता झाला. ॥८॥
रणभूमीवर गदेचा प्रहार झाला, तरी यदुश्रेष्ठ जागेवरून जराही हालले नाहीत. त्यांनी आपल्या प्रचंड अशा कौमोदकी गदेने दंतवक्त्राच्या छातीवर प्रहार केला. (८)
गदानिर्भिन्नहृदय उद्वमन् रुधिरं मुखात् ।
प्रसार्य केशबाह्वङ्घ्रीन् धरण्यां न्यपतद् व्यसुः ॥ ९ ॥
दैत्याची फाटली छाती रक्तची ओकला तदा । पसरी हात पायांना निष्प्राण पडला तसा ॥ ९ ॥
गदानिर्भिन्नहृदयः (सः) - गदेने ज्याचे वक्षस्थळ फुटुन गेले आहे असा तो दंतवक्र मुखात् रुधिरं उद्वमन् - तोंडातून रक्त ओकत केशबाह्वङ्घ्रीन् धरण्यां प्रसार्य - केस, बाहु व पाय भूमीवर पसरून व्यसुः न्यपतत् - मृत होऊन पडला. ॥९॥
गदेच्या प्रहाराने दंतवक्त्राची छाती फुटून तो तोंडातून रक्त ओकू लागला. त्याचे केस विखुरले, हात-पाय पसरले गेले आणि तो निष्प्राण होऊन जमिनीवर कोसळला. (९)
ततः सूक्ष्मतरं ज्योतिः कृष्णमाविशदद्भुतम् ।
पश्यतां सर्वभूतानां यथा चैद्यवधे नृप ॥ १० ॥
शिशुपाल मरे तेंव्हा निघाली प्राणज्योत जै । दंतवक्त्र मरे तेंव्हा तै मिळे कृष्णरुपिची ॥ १० ॥
नृप - हे राजा परीक्षिता यथा चैद्यवधे (तथा) - जसे शिशुपालाच्या वधावेळी त्याचप्रमाणे सर्वभूतानां पश्यतां - सर्व लोक पहात असताना ततः सूक्ष्मतरं अद्भुतं ज्योतिः - त्या दंतवक्राच्या शरीरातून निघालेले अत्यंत बारीक असे अद्भुत तेज कृष्णं आविशत् - श्रीकृष्णाच्या शरीरात शिरले. ॥१०॥
परीक्षिता ! शिशुपालाच्या मृत्यूच्या वेळी जसे झाले होते तसेच, सर्वांच्या देखतच दंतवक्त्राच्या मृत शरीरातून एक अत्यंत सूक्ष्म आश्चर्यकारक ज्योत बाहेर पडून श्रीकृष्णांमध्ये सामावून गेली. (१०)
विदूरथस्तु तद्भ्राता भ्रातृशोकपरिप्लुतः ।
आगच्छद् असिचर्मभ्यां उच्छ्वसन् तज्जिघांसया ॥ ११ ॥
विदुरथ तया बंधू झाला शोक तया तसा। क्रोधाने जाहला लाल आला कृष्णा वधावया ॥ ११ ॥
तद्भ्राता विदूरथः तु भ्रातृशोकपरिप्लुतः - त्या दंतवक्राचा भाऊ विदूरथ तर भावाच्या मरणाने झालेल्या शोकाने युक्त होऊन तज्जिघांसया - त्या श्रीकृष्णाला मारण्याच्या इच्छेने असिचर्मभ्यां उच्छ्वसन् - तरवार व ढाल घेऊन दुःखाने श्वासोच्छ्वास टाकीत (तत्र) आगच्छत् - तेथे आला. ॥११॥
त्याचा भाऊ विदूरथ भावाच्या मृत्यूने शोकाकुल झाला. तो क्रोधाने सुस्कारे टाकीत, हातात ढाल-तलवार घेऊन श्रीकृष्णांना मारण्यासाठी आला. (११)
तस्य चापततः कृष्णः चक्रेण क्षुरनेमिना ।
शिरो जहार राजेन्द्र सकिरीटं सकुण्डलम् ॥ १२ ॥
राजेंद्रा ! पाहिले कृष्णे आता हा मारु इच्छितो । तदा चक्रे करोनीया तयाचे शीर तोडिले ॥ १२ ॥
राजेन्द्र - हे राजा कृष्णः - श्रीकृष्ण क्षुरनेमिना चक्रेण - वस्तर्याप्रमाणे तीक्ष्ण धारेच्या सुदर्शन चक्राने आपततः तस्य - चाल करून येणार्या त्या विदूरथाचे सकिरीटं सकुण्डलं च शिरः जहार - मुकुट व कुंडले यांसह मस्तक हरण करिता झाला. ॥१२॥
राजेंद्रा ! तो चाल करून येत असलेला पाहून श्रीकृष्णांनी तीक्ष्ण धार असलेल्या चक्राने किरीट-कुंडले असलेले त्याचे डोके उडाविले. (१२)
एवं सौभं च शाल्वं च दन्तवक्रं सहानुजम् ।
हत्वा दुर्विषहानन्यैः ईडितः सुरमानवैः ॥ १३ ॥ मुनिभिः सिद्धगन्धर्वैः विद्याधरमहोरगैः । अप्सरोभिः पितृगणैः यक्षैः किन्नरचारणैः ॥ १४ ॥ उपगीयमानविजयः कुसुमैरभिवर्षितः । वृतश्च वृष्णिप्रवरैः विवेशालङ्कृतां पुरीम् ॥ १५ ॥
या परी भगवान् कृष्ण शाल्व नी दंतवक्त्र नी । विदुरथा वधोनीया गेलासे द्वारकापुरी ॥ १३ ॥ देवांनी माणसांनीही कृष्णाची स्तुति गायिली । मुनी नी सिद्ध गंधर्व विद्याधर नि वासुकी ॥ १४ ॥ अप्सरा पितरे यक्ष गावोनी नाचले तदा । सजली द्वारका सारी वीर ते सर्व चालले ॥ १५ ॥
एवं सौभं शाल्वं च सहानुजं दंतवक्रं च हत्वा - याप्रमाणे सौभ, शाल्व आणि भावांसह दंतवक्र यांना मारून (तथा अन्यान् अपि) दुर्विषहान् (हत्वा) - त्याप्रमाणे दुसर्याहि दुःसह दुष्ट राजांना मारून अन्यैः सुरमानवैः ईडितः - इतर देव व मनुष्ये यांनी स्तविलेला. ॥१३॥ मुनिभिः सिद्धगन्धर्वैः विद्याधरमहोरगैः - ऋषि, सिद्ध, गंधर्व, विद्याधर व मोठमोठे नाग यांनी अप्सरोभिः पितृगणैः यक्षैः किन्नरचारणैः - अप्सरा, पितर, यक्ष, किन्नर व चारण यांनी. ॥१४॥ उपगीयमानविजयः - गायिला जात आहे विजय ज्याचा असा कुसुमैः अभिवर्षितः - ज्याच्यावर फुलांची वृष्टि केलेला वृष्णिप्रवरैः वृतः च (कृष्णः) - व मोठमोठया यादवांनी वेष्टिलेला श्रीकृष्ण अलंकृतां पुरीं विवेश - भूषविलेल्या द्वारका नगरीत शिरला. ॥१५॥
अशा प्रकारे ज्यांना मारणे दुसर्या कोणालाही अशक्य होते, त्या शाल्व, त्याचे सौभ नावाचे विमान, दंतवक्त्र आणि विदूरथ यांना मारून श्रीकृष्णांनी सुशोभित द्वारकेत प्रवेश केला. त्यावेळी देव, माणसे, मुनी, सिद्ध, गंधर्व, विद्याधर, महानग व पितर त्यांची स्तुती करीत होते. तसेच अप्सरा, यक्ष, किन्नर, चारण त्यांच्यावर पुष्पवर्षाव करीत त्यांच्या विजयाचे गायन करीत होते. यावेळी वृष्णिवंशी यादव वीर त्यांच्यबरोबर चालले होते. (१३-१५)
एवं योगेश्वरः कृष्णो भगवान् जगदीश्वरः ।
ईयते पशुदृष्टीनां निर्जितो जयतीति सः ॥ १६ ॥
असा योगेश्वरो कृष्ण भगवान् जगदीश्वर । वाटतो हारला अज्ञां परी तो विजयी सदा ॥ १६ ॥
एवं - याप्रमाणे योगेश्वरः जगदीश्वरः भगवान् सः कृष्णः जयति - योगांचा अधिपति व जगाचा नाथ असा तो भगवान श्रीकृष्ण विजय मिळवितो (सः शत्रुभिः कदाचित्) निर्जितः इति पशुदृष्टीनां ईयते - शत्रूकडून तो केव्हा केव्हा जिंकिला गेला असा पशुतुल्य मूढ प्राण्यांना भासतो. ॥१६॥
योगेश्वर जगदीश्वर भगवान श्रीकृष्ण अशा लीला करीत असता सदोदित विजयी होत असले तरी अविवेकी लोकांना पराजित झाल्यासारखे वाटतात. (१६)
श्रुत्वा युद्धोद्यमं रामः कुरूणां सह पाण्डवैः ।
तीर्थाभिषेकव्याजेन मध्यस्थः प्रययौ किल ॥ १७ ॥
ऐके युद्ध तयारीत कुरुंच्या सह पांडव । राम मध्यस्थ ते होते पक्ष घेणे न आवडे । म्हणोनी तीर्थ स्नानाच्या मिसे गेलेहि दूर ते ॥ १७ ॥
रामः - बलराम पाण्डवैः सह कुरूणां युद्धोद्यमं श्रुत्वा - पाण्डवांबरोबर युद्ध करण्याचा कौरवांचा उद्योग चालला आहे असे ऐकून मध्यस्थः - कोणताहि पक्ष न स्वीकारता तीर्थाभिषेकव्याजेन प्रययौ किल - तीर्थयात्रा करण्याच्या निमित्ताने निघून गेला असे म्हणतात. ॥१७॥
बलरामांनी जेव्हा ऐकले की, कौरव, पांडवांशी युद्ध करण्याची तयारी करीत आहेत, तेव्हा तटस्थ राहाण्याच्या इच्छेने तीर्थयात्रेचा बहाणा करून ते द्वारकेतून बाहेर पडले. (१७)
स्नात्वा प्रभासे सन्तर्प्य देवर्षिपितृमानवान् ।
सरस्वतीं प्रतिस्रोतं ययौ ब्राह्मणसंवृतः ॥ १८ ॥
प्रभासी घेतले स्नान तर्पणे भोजने दिली । द्विजांना घेउनी गेले जिथे वाहे सरस्वती ॥ १८ ॥
प्रभासे स्नात्वा - प्रभास तीर्थामध्ये स्नान करून देवर्षिपितृमानवान् संतर्प्य - देव, ऋषि, पितर आणि मनुष्ये ह्यांना तृप्त करून ब्राह्मणसंवृतः (सः) - ब्राह्मणांनी वेष्टिलेला तो बलराम सरस्वतीं प्रतिस्रोतं ययौ - सरस्वती नदीच्या उलट दिशेने गेला. ॥१८॥
तेथून बाहेर पडून त्यांनी प्रभास क्षेत्रामध्ये स्नान केले आणि तेथे तर्पणाने देव, ऋषी, पितर यांना आणि भोजन घालून माणसांना तृप्त केले. नंतर काही ब्राह्मणांसह ते सरस्वती नदीच्या उगमाच्या दिशेने निघाले. (१८)
पृथूदकं बिन्दुसरः त्रितकूपं सुदर्शनम् ।
विशालं ब्रह्मतीर्थं च चक्रं प्राचीं सरस्वतीम् ॥ १९ ॥
बिंदुसर पृथदक त्रितकूप सुदर्शन । चक्रतीर्थी क्रमे गेले पूर्ववाही सरस्वती ॥ १९ ॥
पृथूदकं बिन्दुसरः त्रितकूपं सुदर्शनं - पृथूदक, बिंदुसरोवर, त्रितकूप व सुदर्शन तीर्थ विशालं ब्रह्मतीर्थं च चक्रं प्राचीं सरस्वतीम् - विशाल ब्रह्मतीर्थ, चक्रतीर्थ व प्राची सरस्वती. ॥१९॥
ते अनुक्रमे पृथूदक, बिंदुसर, त्रितकूप, सुदर्शनतीर्थ, विशालतीर्थ, ब्रह्मतीर्थ, चक्रतीर्थ आणि पूर्ववाहिनी सरस्वती नदी इत्यादी तीर्थक्षेत्रांवर गेले. (१९)
यमुनामनु यान्येव गङ्गामनु च भारत ।
जगाम नैमिषं यत्र ऋषयः सत्रमासते ॥ २० ॥
गंगा नी यमुनाकाठी श्रेष्ठ क्षेत्रासि तेथल्या । एकदा नैमिषारण्यी सत्संग चालला महान् ॥ २० ॥
भारत - हे परीक्षित राजा यमुनां अनु गंगां च अनु यानि एव (तीर्थानि आसन् तानि) - यमुनेच्या व गंगेच्या काठी जितकी म्हणून तीर्थे होती त्या सर्व तीर्थांच्या ठिकाणी जाऊन यत्र ऋषयः सत्रं आसते - जेथे ऋषि यज्ञ करीत बसले होते नैमिषं जगाम - नैमिषारण्यात गेला. ॥२०॥
परीक्षिता ! त्यानंतर यमुना तटावरील आणि गंगातटावरील तीर्थे करीत ते त्या दिवसात जेथे ऋषी ज्ञानयज्ञ करीत होते, त्या नैमिष्यारण्यात गेले. (२०)
तं आगतमभिप्रेत्य मुनयो दीर्घसत्रिणः ।
अभिनन्द्य यथान्यायं प्रणम्योत्थाय चार्चयन् ॥ २१ ॥
दीर्घ सत्संग तो होता बैसले ऋषि थोर तै । उठले राम ते येता पूजिले युक्त त्या परी ॥ २१ ॥
दीर्घसत्त्रिणः मुनयः - पुष्कळ वर्षांच्या अवधीचे यज्ञ करणारे ऋषि तम् आगतं अभिप्रेत्य - त्या बलरामाला आलेला जाणून यथान्यायं अभिनन्द्य - यथाविधि त्याचे अभिनंदन करून प्रणम्य उत्थाय च - नमस्कार करून व उठून उभे राहून अर्चयन् - पूजिते झाले. ॥२१॥
दीर्घकाल यज्ञ करणारे ऋषी बलराम आलेले पाहताच आसनावरून उठले आणि त्यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच योग्यतेनुसार नमस्कार करून व आशीर्वाद देऊन त्यांचा सन्मान केला. (२१)
सोऽर्चितः सपरीवारः कृतासनपरिग्रहः ।
रोमहर्षणमासीनं महर्षेः शिष्यमैक्षत ॥ २२ ॥
आसनी बैसता पूजा संपता पाहतात तो । रोमहर्षण हा शिष्य व्यासपीठास बैसला ॥ २२ ॥
सपरीवारः कृतासनपरिग्रहः - परिवारासह केला आहे आसनाचा स्वीकार ज्याने असा अर्चितः - पूजिला गेलेला सः - तो बलराम आसीनं महर्षेः शिष्यं रोमहर्षणं ऐक्षत - आसनावर बसलेल्या व्यासशिष्य रोमहर्षणाला पाहता झाला. ॥२२॥
ते आपल्या बरोबरच्या ब्राह्मणांसह आसनावर बसले. नंतर त्यांची पूजा केली. तेव्हा त्यांना दिसले की, व्यासांचा शिष्य रोमहर्षण व्यासपीठावर बसलेलाच आहे. (२२)
अप्रत्युत्थायिनं सूतं अकृतप्रह्वणाञ्जलिम् ।
अध्यासीनं च तान् विप्रांन् चुकोपोद्वीक्ष्य माधवः ॥ २३ ॥
जन्मे सूत असोनीया श्रेष्ठ विप्रासनी असा । बैसला, उठला ना तो न नमी, क्रोधले बळी ॥ २३ ॥
माधवः - बलराम अप्रत्युत्थायिनं - उठून सत्कार न करणार्या अकृतप्रह्वणाञ्जलिम् - हात जोडून नमस्कार न करणार्या तान् विप्रान् अध्यासीनं च रोमहर्षणम् सूतं उद्वीक्ष्य - आणि त्या ब्राह्मणांच्याहून उंच अशा आसनावरच बसलेल्या रोमहर्षण नामक सूताला पाहून चुकोप - रागावला. ॥२३॥
सूतकुळात जन्मलेला असूनही हा रोमहर्षण त्या ब्राह्मणांपेक्षाही उच्च आसनावर बसला आहे. शिवाय आपण ब्राह्मणांसह आलो असता त्याने उठून आपले स्वागत केले नाही की हात जोडून प्रणामही केला नाही. यामुळे बलरामांना क्रोध आला. (२३)
यस्मादसाविमान् विप्रान् अध्यास्ते प्रतिलोमजः ।
धर्मपालान् तथैवास्मान् वधमर्हति दुर्मतिः ॥ २४ ॥
वदले प्रतिलोमा तू धर्मरक्षक क्षत्रिय । श्रेष्ठ विप्रांपुढे बैसे मृत्यु दंडास पात्र की ॥ २४ ॥
प्रतिलोमजः दुर्मतिः असौ - प्रतिलोम विवाहापासून उत्पन्न झालेला दुर्बुद्धि असा हा सूत यस्मात् - ज्या अर्थी इमान् विप्रान् - ह्या ब्राह्मणांना तथैव धर्मपालान् अस्मान् - त्याप्रमाणे धर्मसंरक्षक अशा आम्हाला अध्यास्ते - हीन करून उच्चस्थानी बसला आहे (तस्मात्) वधम् अर्हति - त्या अर्थी हा वधाला योग्य आहे. ॥२४॥
ते म्हणाले की, "हा रोमहर्षण प्रतिलोम (क्षत्रियापासून ब्राह्मणस्त्रीला झालेला) असूनही या श्रेष्ठ ब्राह्मणांपेक्षा तसेच धर्माचे रक्षक असलेल्या आमच्यापेक्षाही उच्च आसनावर बसला असल्याकारणाने, हा अविवेकी मृत्यूदंडास पात्र आहे." (२४)
ऋषेर्भगवतो भूत्वा शिष्योऽधीत्य बहूनि च ।
सेतिहासपुराणानि धर्मशास्त्राणि सर्वशः ॥ २५ ॥ अदान्तस्याविनीतस्य वृथा पण्डितमानिनः । न गुणाय भवन्ति स्म नटस्येवाजितात्मनः ॥ २६ ॥
व्यासशिष्य असोनीया पुराण धर्म शास्त्र नी । वाचशी इतिहासाते परी संयम तो नसे ॥ २५ ॥ उदंड जाहला ऐसा संत पंडित मानिती । सोंग हे दाविशी सारे नकटीच्या परी असे ॥ २६ ॥
भगवतः ऋषेः शिष्यः भूत्वा - भगवान महर्षि व्यासाचा शिष्य होऊन बहूनि च सेतिहासपुराणानि धर्मशास्राणि सर्वशः अधीत्य - आणि पुष्कळ इतिहास व पुराणे यांसह धर्मशास्त्रांचे सर्व बाजूंनी अध्ययन करून अदान्तस्य अविनीतस्य - उन्मत्त व अडाणी राहिलेल्या अशा वृथापण्डितमानिनः - व्यर्थ स्वतःला पंडित म्हणवून घेणार्या अजितात्मनः (अस्य) - इंद्रियनिग्रह न केलेल्या ह्या रोमहर्षणाच्या एतानि धर्मशास्त्राध्ययनादीनि - धर्मशास्त्राचे अध्ययन आदिकरून गोष्टी नटस्य इव - नाटकी पुरुषा प्रमाणे न गुणाय भवन्ति स्म - उपयोगाच्या झालेल्या नाहीत. ॥२५-२६॥
भगवान व्यासमहर्षींचा शिष्य असून याने इतिहास, पुराणे, धर्मशास्त्रे इत्यादी पुष्कळशा शास्त्रांचे अध्ययनसुद्धा केले आहे. परंतु अजून याचा आपल्या मनावर संयम नाही. हा उद्दाम आहे. या गर्विष्ठाने स्वत:ला व्यर्थ पंडित मानले आहे. नटाप्रमाणे याचे अध्ययन हे केवळ सोंग आहे. याच्यापासून याला स्वत:लाही लाभ नाही की दुसर्यालाही नाही. (२५-२६)
एतदर्थो हि लोकेऽस्मिन् अवतारो मया कृतः ।
वध्या मे धर्मध्वजिनः ते हि पातकिनोऽधिकाः ॥ २७ ॥
धर्माचे दावि जो सोंग पापी श्रेष्ठचि तो असे । सोंग हे मोडण्यासाठी जन्मे मी मृत्युभूमिसी ॥ २७ ॥
अस्मिन् लोके मया एतदर्थः अवतारः कृतः - ह्या लोकी मी ह्यासाठीच अवतार घेतला आहे धर्मध्वजिनः मे वध्याः - धार्मिकपणाचा आव आणणारे माझ्याकडून वधले जाण्यास योग्य आहेत हि - कारण ते अधिकाः पातकिनः - ते फार मोठे पातकी होत. ॥२७॥
जे लोक धार्मिकतेचे ढोंग करून धर्माचे पालन करीत नाहीत, ते अधिक पापी होत. त्यांना शासन करण्यासाठीच मी या जगात अवतात घेतला आहे. (२७)
एतावदुक्त्वा भगवान् निवृत्तोऽसद्वधादपि ।
भावित्वात् तं कुशाग्रेण करस्थेनाहनत् प्रभुः ॥ २८ ॥
निवृत्त जाहले यात्रीं दुष्टांही नच मारिती । सहजी फेकिता दर्भ मेले दैवे सुतो तदा ॥ २८ ॥
भगवान् प्रभुः - भगवान बलराम एतावत् उक्त्वा - याप्रमाणे बोलून असद्वधात् निवृत्तः अपि - दुर्जनाचा वध करण्यापासून मागे वळला असूनहि भावित्वात् - तसे घडणारेच असल्यामुळे करस्थेन कुशाग्रेण - हातांतील दर्भाच्या टोकाने तं अहनत् - त्या रोमहर्षण सूताला ताडिता झाला. ॥२८॥
तीर्थयात्रा करीत असल्याकारणाने जरी भगवान बलराम दुष्टांचा वध करण्यापासून परावृत्त झाले होते, तरीसुद्धा त्यांनी आपल्या हातातील दर्भाच्या टोकाने त्याच्यावर प्रहार केला व तो मरण पावला. कारण हे असेच व्हायचे होते. (२८)
हाहेतिवादिनः सर्वे मुनयः खिन्नमानसाः ।
ऊचुः सङ्कर्षणं देवं अधर्मस्ते कृतः प्रभो ॥ २९ ॥
सूत मेले तदा सर्व ऋषि ते हाय बोलले । रामाला वदले सर्व अधर्म घडला बहू ॥ २९ ॥
हाहा इति वादिनः - हाहाकार करणारे खिन्नमानसाः - खिन्न अन्तःकरण झालेले सर्वे मुनयः - सर्व ऋषि प्रभो - हे बलरामा ते अधर्मः कृतः - तू अधर्म केला (इति) संकर्षणं देवं ऊचुः - असे बलरामाला म्हणाले. ॥२९॥
सूत मरण पावताच सर्व ऋषी हळहळले. देव बलरामांना ते म्हणाले, प्रभो ! हा आपण मोठा अधर्म केलात. (२९)
अस्य ब्रह्मासनं दत्तं अस्माभिर्यदुनन्दन ।
आयुश्चात्माक्लमं तावद् यावत् सत्रं समाप्यते ॥ ३० ॥ अजानतैवाचरितः त्वया ब्रह्मवधो यथा । योगेश्वरस्य भवतो नाम्नायोऽपि नियामकः ॥ ३१ ॥ यद्येतद् ब्रह्महत्यायाः पावनं लोकपावन । चरिष्यति भवांल्लोक सङ्ग्रहोऽनन्यचोदितः ॥ ३२ ॥
आम्ही द्विजासनी त्यांना स्थापिले सत्र होइ तो । आरोग्यपूर्ण ती आयू सूता आम्हीच ती दिली ॥ ३० ॥ अजाणता तुम्ही केले ब्रह्महत्त्याच ही दुजी । योगेश्वर तुम्ही ऐसे न शासी वेद ही तुम्हा ॥ ३१ ॥ स्वयं इच्छा असे ती तो ब्रह्महत्त्या म्हणोनिया । लोकांना शिकवायाते प्रायश्चित्तास सेविणे ॥ ३२ ॥
यदुनंदन - हे बलरामा अस्माभिः अस्य ब्रह्मासनं दत्तं - आम्ही याला ब्रह्मासन दिले आहे यावत् च सत्रं समाप्यते - व जोपर्यंत यज्ञ समाप्त होतो आहे तावत् आत्माक्लमं आयुः (दत्तं) - तितक्या अवधीत आम्ही शरीराला ज्यात क्लेश होणार नाहीत असे साधन व आयुष्य दिले यथा अजानता - जसा अजाणत्या पुरुषाने (तथा) एव - तसाच त्वया ब्रह्मवधः आचरितः - तू ब्राह्मणाचा वध केला आहे आम्नायः योगेश्वरस्य अपि भवतः न नियामकः - श्रुति योगाधिपति अशा तुम्हाला बंधनकारक नाहीत काय ? ॥३०-३१॥ लोकपावन - हे लोकांना पवित्र करणार्या बलरामा ब्रह्महत्यायाः एतत् पावनं - ब्रह्महत्येचे हे प्रायश्चित्त यदि भवान् अनन्यचोदितः चरिष्यति - जर तू दुसर्याने न सांगताच आचरिशील (तर्हि) लोकसंग्रहः (स्यात्) - तर लोकांचे कल्याण केल्यासारखे होईल. ॥३२॥
हे यदुनंदना ! आम्हीच त्यांना ब्रह्मासन दिले होते आणि जोपर्यंत हे सत्र समाप्त होत नाही, तोपर्यंत शारीरिक कष्टरहित आयुष्यही दिले होते. (३०) आपण अजाणतेपणाने का असेना, केलेली ही ब्रह्महत्याच आहे. आपण योगेश्वर आहात, त्यामुळे वेदसुद्धा आपल्याला आज्ञा करू शकत नाहीत. तरीसुद्धा आपला अवतार लोकांना पवित्र करण्यासाठी झाला असल्यामुळे आपण कोणाच्याशी प्रेरणेशिवाय स्वत:च आपल्या इच्छेने या ब्रह्महत्येचे प्रायश्चित्त घ्यावे. त्यामुळे लोकांना धडा मिळेल. (३१-३२)
श्रीभगवानुवाच -
चरिष्ये वधनिर्वेशं लोकानुग्रहकाम्यया । नियमः प्रथमे कल्पे यावान् स तु विधीयताम् ॥ ३३ ॥
भगवान् बलराम म्हणाले - लोकांना बोधिण्या धर्म करितो मी अवश्य ते । प्रायश्चित्त जसे श्रेष्ठ विधान करणे तसे ॥ ३३ ॥
लोकानुग्रहकाम्यया - लोकांचे कल्याण करण्याच्या इच्छेने वधनिर्वेशं करिष्ये - ब्रह्महत्येचे प्रायश्चित्त करीन प्रथमे कल्पे यावान् नियमः (अस्ति) - पहिल्या प्रतीचा जो नियम असेल सः तु विधीयतां - तो तर सांगावा. ॥३३॥
श्रीबलराम म्हणाले- लोकांपुढे आदर्श ठेवण्याची कृपा करण्यासाठी या ब्रह्महत्येसाठी मी प्रायश्चित्त घेईन. म्हणून यासाठी प्रथम श्रेणीचे प्रायश्चित्त आपण मला सांगावे. (३३)
दीर्घमायुर्बतैतस्य सत्त्वमिन्द्रियमेव च ।
आशासितं यत्तद् ब्रूत साधये योगमायया ॥ ३४ ॥
बल आयु नी शक्ती ती वदाल सर्व ते सुतां । योगाने सर्व ते देतो सांगा काय हवे तसे ॥ ३४ ॥
बत - खरोखर एतस्य - ह्याचे दीर्घं आयुः - जे मोठे आयुष्य सत्त्वं इंद्रियम् च एव - बळ आणि इंद्रियसामर्थ्य सुद्धा (इति) यत् आशासितं (स्यात्) - असे जे इच्छिलेले असेल तत् ब्रूत - ते सांगा (तत्) योगमायया साधये - ते योगमायेच्या योगे मी पूर्ण करीन. ॥३४॥
या सूताला आपण दीर्घायुष्य, बळ, इंद्रियांची शक्ती इत्यादी जे काही देऊ इच्छिता, ते मला सांगा. मी आपल्या योगमायेने सर्व काही साध्य करून देईन. (३४)
ऋषय ऊचुः -
अस्त्रस्य तव वीर्यस्य मृत्योरस्माकमेव च । यथा भवेद् वचः सत्यं तथा राम विधीयताम् ॥ ३५ ॥
ऋषि म्हणाले - रामा ते तुमचे शस्त्र तसे यांचाहि मृत्यु तो । आमुचे वरदानोही सत्य हो करणे असे ॥ ३५ ॥
राम - हे बलरामा तव अस्रस्य - तुझ्या अस्त्राचे वीर्यस्य - पराक्रमाचे मृत्योः - मृत्यूचे अस्माकम् वचः च एव - आणि आमचे भाषणहि यथा सत्यं भवेत् - ज्या योगे खरे होईल तथा विधीयतां - तसे करावे. ॥३५॥
ऋषी म्हणाले- हे बलरामा ! आपण असे करा की, ज्यायोगे आपले शस्त्र, पराक्रम आणि याचा मृत्यूसुद्धा व्यर्थ होणार नाही. शिवाय आमचेही वरदान खरे ठरेल. (३५)
श्रीभगवानुवाच -
आत्मा वै पुत्र उत्पन्न इति वेदानुशासनम् । तस्मादस्य भवेद् वक्ता आयुः इन्द्रियसत्त्ववान् ॥ ३६ ॥
भगवान् बलराम म्हणाले - ऋषिंनो श्रुति ती सांगे आत्माचि आत्मजो असे । पुराण सांगणे पुत्रे दीर्घायू देइ मी तया ॥ ३६ ॥
आत्मा वै पुत्रः उत्पन्नः - पुरुष आपणच खरोखर पुत्ररूपाने उत्पन्न झालेला असतो इति वेदानुशासनम् - असे वेदाचे वचन आहे तस्मात् अस्य (पुत्रः) - म्हणून ह्याचा पुत्र आयुरिंद्रियसत्त्ववान् - आयुष्य इंद्रिय व बल यांनी युक्त असा वक्ता भवेत् - मोठा बोलका होईल. ॥३६॥
श्रीबलराम म्हणाले- ऋषींनो ! वेदवचन असे आहे की, आत्माच पुत्राच्या रूपाने जन्म घेतो. म्हणून रोमहर्षणाच्या जागी त्याचा पुत्र आपल्याला कथा सांगेल. तसेच त्याला दीर्घायुष्य, इंद्रियांची शक्ती आणि बल प्राप्त होईल. (३६)
किं वः कामो मुनिश्रेष्ठा ब्रूताहं करवाण्यथ ।
अजानतस्त्वपचितिं यथा मे चिन्त्यतां बुधाः ॥ ३७ ॥
आणखी सांगणे इच्छा पूर्ण ती मी करीन की । प्रायश्चित्त मला सांगा ज्ञाते या विषयी तुम्ही ॥ ३७ ॥
अथ - ह्या नंतर मुनिश्रेष्ठाः - श्रेष्ठ ऋषि हो वः किं कामः - तुमची काय इच्छा आहे ब्रूत - सांगा अहं करवाणि - मी पूर्ण करीन बुधाः - ज्ञानी ऋषि हो अपचितिं तु अजानतः मे - उपकाराची फेड कशी करावी हे न जाणणार्या माझी यथा (सा स्यात् तथा) चिन्त्यताम् - जेणेकरून ती फेड होईल असे विचार करून सांगावे. ॥३७॥
ऋषींनो ! याखेरीज आपण जे काही इच्छित असाल, ते मला सांगा. मी आपली इच्छा पूर्ण करीन, अजाणतेपणाने माझ्या हातून जो अपराध घडला आहे, त्याचे प्रायश्चित्त आपण विचार करून मला सांगावे. कारण आपण ज्ञानी आहात. (३७)
ऋषय ऊचुः -
इल्वलस्य सुतो घोरो बल्वलो नाम दानवः । स दूषयति नः सत्रं एत्य पर्वणि पर्वणि ॥ ३८ ॥
ऋषि म्हणाले - इल्वाचा बल्वलो पुत्र दुष्ट दानव तो असे । त्रासितो दूषितो पर्वा आमुच्या येथ येउनी ॥ ३८ ॥
इल्वलस्य सुतः - इल्वलाचा पुत्र बल्वलः नाम घोरः दानवः (अस्ति) - बल्वल नामक भयंकर दानव आहे सः पर्वणि पर्वणि एत्य - तो प्रत्येक पर्वणीला येऊन नः सत्त्रं दूषयति - आमचा यज्ञ दूषित करतो. ॥३८॥
ऋषी म्हणाले- बल्वल नावाचा इल्वलाचा पुत्र एक भयंकर दानव आहे. तो प्रत्येक पर्वकाळी येथे येऊन आमचे सत्र दूषित करतो. (३८)
तं पापं जहि दाशार्ह तन्नः शुश्रूषणं परम् ।
पूयशोणितविण्मूत्र सुरामांसाभिवर्षिणम् ॥ ३९ ॥
पूव रक्त तशी विष्ठा मूत्र मद्य नि मास ते । फेकितो, मारणे त्याला सेवा श्रेष्ठचि ही घडे ॥ ३९ ॥
दाशार्ह - हे बलरामा पूयशोणितविण्मूत्रसुरामांसाभिवर्षिणम् - पू, रक्त, विष्ठा, मूत्र, मद्य व मांस यांचा पाऊस पाडणार्या तं पापं - त्या पापी दानवाला जहि - मार तत् नः परं शुश्रूषणं (स्यात्) - ती आमची मोठी सेवा होईल. ॥३९॥
हे यदुनंदना ! तो येथे येऊन पू, रक्त, विष्ठा, मूत्र, दारू आणि मांस टाकू लागतो. त्या पाप्याला आपण मारा. ही आमची तुमच्याकडून फार मोठी सेवा होईल. (३९)
ततश्च भारतं वर्षं परीत्य सुसमाहितः ।
चरित्वा द्वादश मासान् तीर्थस्नायी विशुध्यसि ॥ ४० ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे उत्तरार्धे बल्वलवधो नाम अष्टसप्ततितमोऽध्यायः ॥ ७८ ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
एकचित्ते पुन्हा स्नान करोनी भारतात या । फिरावे तीर्थ यात्रेसी तेणे शुद्धीच होतसे ॥ ४० ॥ ॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर अष्ट्याहत्तरावा अध्याय हा ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
ततः च - आणि त्यानंतर सुसमाहितः - पवित्र अन्तःकरणाने युक्त असा भारतं वर्षं परीत्य - भरतखंडाला प्रदक्षिणा करून द्वादश मासान् (कृच्छ्रं) चरित्वा - बारा महिने प्रायश्चित्त करून तीर्थस्नायी (भव) - तीर्थात स्नान करणारा हो इति विशुध्यसे - अशा रीतीने तू शुद्ध होशील. ॥४०॥ अठठयाहत्तरावा अध्याय समाप्त
त्यानंतर आपण एकाग्र चित्ताने तीर्थांमध्ये स्नान करीत एक वर्षपर्यंत भारतवर्षाची प्रदक्षिणा करा. त्यामुळे आपण शुद्ध व्हाल. (४०)
अध्याय अठठयाहत्तरावा समाप्त |