|
श्रीमद् भागवत पुराण शाल्वस्य यदुभिः सह युद्धम् - शाल्वाबरोबर यादवांचे युद्ध - संहिता - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् ) अथान्यदपि कृष्णस्य श्रृणु कर्माद्भुतं नृप । क्रीडानरशरीरस्य यथा सौभपतिर्हतः ॥ १ ॥
श्रीशुकदेव सांगतात - ( अनुष्टुप् ) अद्भूत एक लीला ती कृष्णाची ऐकणे नृपा । सौभनाम विमानाचा स्वामी तो मारिला कसा ॥ १ ॥
नृप - हे राजा अथ - आता यथा सौभपतिः हतः (तथा) - ज्याप्रकारे सौभाधिपति शाल्वराजा मारिला गेला त्याप्रकारचे अन्यत् अपि - आणखी एक क्रीडानरशरीरस्य कृष्णस्य अद्भुतं कर्म - क्रीडार्थ मनुष्य शरीर धारण करणार्या श्रीकृष्णाचे आश्चर्यजनक कर्म शृणु - ऐक. ॥१॥
श्रीशुक म्हणतात- परीक्षिता ! मनुष्यासारखी लीला करणार्या भगवान श्रीकृष्णांचे आता आणखी एक अद्भूत चरित्र ऐक. त्यांनी शाल्वाला कसे मारले, ते सांगतो. (१)
शिशुपालसखः शाल्वो रुक्मिण्युद्वाह आगतः ।
यदुभिर्निर्जितः सङ्ख्ये जरासन्धादयस्तथा ॥ २ ॥
मित्र हा शिशुपालाचा रुक्मिणीहरणातही । जरासंधादिच्या मध्ये यदुंनी हरिले यया ॥ २ ॥
यदुभिः - यादवांनी रुक्मिण्युद्वाह आगतः शिशुपालसखः शाल्वः - रुक्मिणीच्या विवाहप्रसंगी आलेला शिशुपालाचा मित्र शाल्वराजा संख्ये निर्जितः - युद्धात जिंकिला तथा जरासन्धादयः (जिताः) - त्याचप्रकारे जरासंध आदिकरून राजे जिंकले. ॥२॥
शाल्व हा शिशुपालाचा मित्र होता आणि रुक्मिणीच्या विवाहाच्या वेळी तो आलेला होता. त्यावेळी यादवांनी युद्धामध्ये जरासंध इत्यादींच्याबरोबर शाल्वालाही जिंकले होते. (२)
शाल्वः प्रतिज्ञामकरोत् श्रृण्वतां सर्वभूभुजाम् ।
अयादवां क्ष्मां करिष्ये पौरुषं मम पश्यत ॥ ३ ॥
त्या वेळी वदला शाल्व नष्टील यदुवंश तो । पाहतील तदा सारे माझे ते बल पौरुष ॥ ३ ॥
शाल्वः - शाल्वराजा सर्वभूभुजां शृण्वतां - सर्व राजे श्रवण करीत असता अयादवीं क्ष्मां करिष्ये - मी यादवरहित पृथ्वी करीन मम पौरुषं पश्यत - माझा पराक्रम पहा (इति) प्रतिज्ञां अकरोत् - अशी प्रतिज्ञा करिता झाला. ॥३॥
सर्व राजांच्या समक्ष त्या दिवशी शाल्वाने प्रतिज्ञा केली होती की, " मी पृथ्वीवरून यादवांचे नाव पुसून टाकीन. पाहाच माझे सामर्थ्य ! (३)
इति मूढः प्रतिज्ञाय देवं पशुपतिं प्रभुम् ।
आराधयामास नृपः पांसुमुष्टिं सकृद् ग्रसन् ॥ ४ ॥
प्रतिज्ञा करुनी ऐशी शिवाच्या ध्यानि लागला । मूठभर तदा भक्षी राखची रोज फक्त ती ॥ ४ ॥
नृप - हे राजा इति प्रतिज्ञाय - अशा रीतीने प्रतिज्ञा करून मूढः (सः) - मूर्ख असा तो शाल्व सकृत् पांसुमुष्टिं ग्रसन् - एकदाच मूठभर पीठ खाणारा प्रभुं देवं पशुपतिं - समर्थ अशा भगवान शंकराला आराधयामास - आराधिता झाला. ॥४॥
परीक्षिता ! अशी प्रतिज्ञा करून मूर्ख शाल्वाने देवाधिदेव पशुपतींची आराधना सुरू केली. त्याकाळी तो दिवसभरात फक्त एक वेळ मूठभर धूळ खात असे. (४)
संवत्सरान्ते भगवान् आशुतोष उमापतिः ।
वरेण च्छन्दयामास शाल्वं शरणमागतम् ॥ ५ ॥
शाल्वसंकल्प जाणोनी वर्षाने शिव पावले । शरणागत त्या शाल्वा वदले वर माग तू ॥ ५ ॥
आशुतोषः भगवान् उमापतिः - लवकर संतुष्ट होणारा भगवान शंकर संवत्सरान्ते - एका वर्षाच्या शेवटी शरणं आगतं शाल्वं - शरण आलेल्या शाल्वाला वरेण छंदयामास - वराने संतुष्ट करिता झाला. ॥५॥
भगवान शंकर लवकर प्रसन्न होणारे असल्याने त्यांनी एक वर्षानंतर प्रसन्न होऊन शरण आलेल्या शाल्वाला वर मागण्यास सांगितले. (५)
देवासुरमनुष्याणां गन्धर्वोरगरक्षसाम् ।
अभेद्यं कामगं वव्रे स यानं वृष्णिभीषणम् ॥ ६ ॥
ऐकता वदला द्यावे विमान घोर ते असे । अभेद्य देव गंधर्वा यदुंना जे भयंकर ॥ ६ ॥
सः - तो शाल्वराजा देवासुरमनुष्याणां गन्धर्वोरगरक्षसां (च) अभेद्यं - देव, दैत्य, मनुष्य, गंधर्व, सर्प व राक्षस ह्यांना विदारण करिता न येणारे वृष्णिभीषणम् - यादवांना भीति उत्पन्न करणारे कामगं यानं वव्रे - इच्छेनुसार चालणारे विमान मागता झाला. ॥६॥
त्यावेळी शाल्वाने असा वर मागितला की, "मला आपण एक असे विमान द्या की जे देव, असुर, मनुष्य, गंधर्व, नाग आणि राक्षस यांना नष्ट करता येणार नाही. इच्छा असेल तिकडे जाईल आणि यदुवंशीयांसाठी अत्यंत भयानक असेल." (६)
तथेति गिरिशादिष्टो मयः परपुरंजयः ।
पुरं निर्माय शाल्वाय प्रादात् सौभमयस्मयम् ॥ ७ ॥
तथास्तु बोलले शंभू मयाच्या कडुनी तया । विमान करुनी तैसे शाल्वाला दिधले असे ॥ ७ ॥
तथा इति - बरे आहे असे म्हणून गिरिशादिष्टः - शंकराने आज्ञा दिलेला परपुरंजयः मयः - शत्रूंच्या नगरांना जिंकणारा मयासुर अयस्मयं सौभं पुरं निर्माय - लोखंडाचे सौभ नावाचे एक विमान निर्माण करून शाल्वाय प्रादात् - शाल्वराजाला देता झाला. ॥७॥
भगवान शंकर म्हणाले, ’तथास्तु’. त्यानंतर त्यांच्या आज्ञेनुसार पराक्रमी मय दानवाने लोखंडाचे सौभ नावाचे विमान तयार केले आणि ते शाल्वाला दिले. (७)
स लब्ध्वा कामगं यानं तमोधाम दुरासदम् ।
ययस्द्वारवतीं शाल्वो वैरं वृष्णिकृतं स्मरन् ॥ ८ ॥
विमान न पुरोची जै अंधारमय पाहण्या । इच्छिल्या स्थळि ते जाय यादवा लक्ष्यजे करी ॥ ८ ॥
सः शाल्वः - तो शाल्वराजा तमोधाम दुरासदं कामगं यानं लब्ध्वा - काळोखाचे आश्रयस्थान, जिंकण्यास कठीण आणि इच्छेनुरूप गमन करणारे असे सौभ नामक विमान मिळवून वृष्णिकृतं वैरं स्मरन् - यादवांनी केलेल्या वैराचे स्मरण करीत द्वारवतीं ययौ - द्वारकेला गेला. ॥८॥
ते विमान म्हणजे एक नगरच होते. ते इतके अंधकारमय होते की, त्याला पाहाणे किंवा पकडणे अतिशय अवघड होते. शाल्वाची इच्छा असेल, तेथे ते जात असे. यादवांनी केलेला पराभव आठवून शाल्वाने ते विमान घेऊन द्वारकेवर चढाई केली. (८)
निरुध्य सेनया शाल्वो महत्या भरतर्षभ ।
पुरीं बभञ्जोपवनान् उद्यानानि च सर्वशः ॥ ९ ॥ सगोपुराणि द्वाराणि प्रासादाट्टालतोलिकाः । विहारान् स विमानाग्र्यान् निपेतुः शस्त्रवृष्टयः ॥ १० ॥ शिला द्रुमाश्चाशनयः सर्पा आसारशर्कराः । प्रचण्डश्चक्रवातोऽभूत् रजसाच्छादिता दिशः ॥ ११ ॥
द्वारका घेरिली तेणे उद्याने नाशिली तशी । नष्टिली तट वेशी नी शस्त्रांची झड लाविली ॥ ९ ॥ नष्टिली कुंजस्थाने ती महाल फाटके तशी । जिनेही नष्टिले सर्व विमानाच्या मधोनिया ॥ १० ॥ शिळावृक्ष तसे सर्प ययांची वृष्टि तो करी । वादळे उठली तैशी धूळची धूळ जाहली ॥ ११ ॥
भरतर्षभ - हे भरतश्रेष्ठा परीक्षित राजा शाल्वः महत्या सेनया - शाल्व आपल्या मोठया सेनेने पुरीं - द्वारकेला निरुद्ध्य - वेढा घालून उपवनानि उद्यानानि च - उद्याने व क्रीडास्थाने यांना सर्वशः बभञ्ज - सर्व प्रकारे मोडून टाकिता झाला. ॥९॥ सगोपुराणि द्वाराणि - वेशींसह दरवाजे प्रासादाटटालतोलिकाः - राजवाडयांच्या माडया व भिंति विहारान् (च) - आणि क्रीडास्थाने सः (बभञ्ज) - तो मोडिता झाला विमानाग्र्यांत् शस्त्रवृष्टयः - त्या मोठया विमानातून शस्त्राचे वर्षाव शिलाः द्रुमाः अशनयः - पाषाण, वृक्ष विजांचा कडकडाट सर्पाः आसारशर्कराः निपेतुः - साप व पावसासारख्या गारा पडू लागल्या प्रचण्डः चक्रवातः च - आणि भयंकर वावटळ अभूत् - उत्पन्न झाली दिशः रजसा आच्छादिताः (अभवन्) - दिशा धुळीने झाकून गेल्या. ॥१०-११॥
शाल्वाने आपल्या अवाढव्य सेनेद्वारा द्वारकेला चारी बाजूंनी घेरले आणि नंतर तेथील फळा फुलांनी लहडलेली उपवने, उद्याने, तो उध्वस्त करू लागला. तसेच नगरातील गोपुरे, दारे, राजवाडे, गच्च्या, भिंती व नागरिकांची मनोरंजनस्थळे नष्ट करू लागला. त्या श्रेष्ठ विमानातून शस्त्रांचा वर्षाव होऊ लागला. (९-१०) शिलाखंड, झाडे, विजा, साप आणि गारा पडू लागल्या. अत्यंत तुफान वादळ सुरू झाले. धुळीने दिशा दिसेनाशा झाल्या. (११)
इत्यर्द्यमाना सौभेन कृष्णस्य नगरी भृशम् ।
नाभ्यपद्यत शं राजन् त्रिपुरेण यथा मही ॥ १२ ॥
त्रिपुरापरि हा शाल्व उच्छेद करु लागला । क्षणीची भंगली शांती नर नारी भिले तदा ॥ १२ ॥
राजन् - हे राजा इति सौभेन भृशं अर्द्यमाना कृष्णस्य नगरी - याप्रमाणे सौभ विमानाने अत्यंत पीडिलेली अशी श्रीकृष्णाची नगरी द्वारका यथा त्रिपुरेण मही - जशी त्रिपुरासुराने पीडिलेली पृथ्वी (तथा) शं न अभ्यपद्यत - त्याप्रमाणे सुखाला मिळविती झाली नाही. ॥१२॥
पूर्वी ज्याप्रमाणे त्रिपुरासुराने पृथ्वीला त्रस्त करून सोडले होते, त्याचप्रमाणे शाल्वाच्या विमानाने द्वारकापुरीला अतिशय त्रस्त केले. तेथील लोकांची सुखशांती नष्ट झाली. (१२)
प्रद्युम्नो भगवान् वीक्ष्य बाध्यमाना निजाः प्रजाः ।
म भैष्टेत्यभ्यधाद् वीरो रथारूढो महायशाः ॥ १३ ॥
यशस्वी वीर प्रद्युम्ने पाहिले त्रासिली प्रजा । बैसला रथि तो धैर्ये न भ्यावे वदला असे ॥ १३ ॥
महायशाः वीरः भगवान् प्रद्युम्नः - यशस्वी असा पराक्रमी भगवान प्रद्युम्न रथारूढः - रथात बसलेला बाध्यमानाः निजाः प्रजाः वीक्ष्य - पीडिलेल्या आपल्या प्रजा पाहून मा भैष्ट इति अभ्यधात् भिऊ नका असे म्हणाला. ॥१३॥
आपल्या प्रजेला अतिशय कष्ट होत आहेत, असे जेव्हा परमयशस्वी वीर प्रद्युम्नाने पाहिले, तेव्हा तो रथावर आरूढ होऊन सर्वांना धीर देत म्हणाला, "भिऊ नका." (१३)
सात्यकिश्चारुदेष्णश्च साम्बोऽक्रूरः सहानुजः ।
हार्दिक्यो भानुविन्दश्च गदश्च शुकसारणौ ॥ १४ ॥ अपरे च महेष्वासा रथयूथपयूथपाः । निर्ययुर्दंशिता गुप्ता रथेभाश्वपदातिभिः ॥ १५ ॥
पाठीसी सात्यकी सांब चारुदेष्णादि बंधु नी । अक्रूर कृतवर्मा नी भानुविंद गदो शुक ॥ १४ ॥ सारणादि असे वीर सशस्र पातले तदा । रथाश्व हत्ति नी सैन्य सवेचि चालले पहा ॥ १५ ॥
सात्यकिः चारुदेष्णः - सात्यकि, चारुदेष्ण साम्बः अक्रूरः सहानुजः हार्दिक्यः च - सांब, अक्रूर, व भावांसह हार्दिक्य भानुविन्दः च गदः च शुकसारणौ (च) - भानुविन्द आणि गद व शुक आणि सारण महेष्वासाः रथयूथपयूथपाः अपरे च - आणि मोठमोठे धनुर्धारी व रथी महारथी ह्यांच्या अधिपतींचे सेनापति असे दुसरे कित्येक रथेभाश्वपदातिभिः गुप्ताः - रथ, हत्ती, घोडे व पायदळ ह्या चतुरंग सेनेने रक्षिलेले दंशिताः निर्ययुः - कवचे घालून बाहेर पडले. ॥१४-१५॥
त्यांच्या पाठोपाठ सात्यकी, चारुदेष्ण, सांब, भावांसह अक्रूर, कृतवर्मा, भानुविंद, गद, शुक, सारण इत्यादी अनेक वीर मोठमोठी धनुष्ये हातात घेऊन निघाले. ते सर्वजण महारथी होते. सर्वांनी कवचे घातली होती आणि सर्वांचे रक्षण करण्यासाठी रथ, हत्ती, घोडे तसेच पायदळ सेना बरोबरीने चालत होती. (१४-१५)
ततः प्रववृते युद्धं शाल्वानां यदुभिः सह ।
यथासुराणां विबुधैः तुमुलं लोमहर्षणम् ॥ १६ ॥
देवतासुर जै युद्ध धडाडें पूर्वि जाहले । तैचि शाल्व यदुंचे हे जाहले रोमहर्षक ॥ १६ ॥
ततः - नंतर शाल्वानां यदुभिः सह - शाल्वांचे यादवांसह यथा असुराणां विबुधैः - जसे दैत्यांचे देवांशी तसे तुमुलं लोमहर्षणं युद्धं प्रववृते - घनघोर व अंगावर शहारे आणणारे युद्ध चालू झाले. ॥१६॥
यानंतर, पूर्वी जसे देवांबरोबर असुरांचे घनघोर युद्ध झाले होते, त्याचप्रमाणे शाल्वाचे सैनिक आणि यादव यांचे युद्ध होऊ लागले. ते बघून लोकांच्या अंगावर शहारे येत. (१६)
ताश्च सौभपतेर्माया दिव्यास्त्रै रुक्मिणीसुतः ।
क्षणेन नाशयामास नैशं तम इवोष्णगुः ॥ १७ ॥
प्रद्युम्ने दिव्य शस्त्रांनी शाल्वमायेस नष्टिले । सूर्याच्या उदयाने जै रात्रीचा तम नष्टतो ॥ १७ ॥
रुक्मिणीसुतः - रुक्मिणीचा पुत्र प्रद्युम्न दिव्याक्षैः - तेजस्वी अस्त्रांनी ताः सौभपतेः मायाः - त्या शाल्वाच्या मायांना उष्णगुः नैशं तमः इव - सूर्य जसा रात्रीच्या अंधकाराला त्याप्रमाणे क्षणेन नाशयामास - क्षणामध्ये नष्ट करिता झाला. ॥१७॥
ज्याप्रमाणे सूर्य आपल्या प्रखर किरणांनी रात्रीचा अंधार नाहीसा करतो, त्याचप्रमाणे प्रदुम्नाने आपल्या दिव्य अस्त्रांनी क्षणातच सौभपती शाल्वाच्या सर्व माया नष्ट केल्या. (१७)
विव्याध पञ्चविंशत्या स्वर्णपुङ्खैरयोमुखैः ।
शाल्वस्य ध्वजिनीपालं शरैः सन्नतपर्वभिः ॥ १८ ॥
सुवर्णपंख ते बाणा न कळे कधि वेध घे । पंचेविस अशा बाणे शाल्व सेनापतीस त्या । प्रद्युम्ने तीव्र बाणांनी केले घायाळ ते तसे ॥ १८ ॥
स्वर्णपुङ्खैः - सुवर्णाचे पृष्ठभाग असलेल्या अयोमुखैः - लोखंडी टोकांच्या सन्नतपर्वभिः पञ्चविंशत्या शरैः - ज्यांच्या पाठी सपाट केल्या आहेत अशा पंचवीस बाणांनी शाल्वस्य ध्वजिनीपालं विव्याध - शाल्वाच्या सेनापतीला ताडिता झाला. ॥१८॥
प्रद्युम्नाच्या बाणांना सोन्याचे पंख व लोखंडी फाळ लावलेले होते. त्यांच्या गाठी दिसत नव्हत्या. अशा पंचवीस बाणांनी त्याने शाल्वाच्या सेनापतीला घायाळ केले. (१८)
शतेनाताडयच्छाल्वं एकैकेनास्य सैनिकान् ।
दशभिर्दशभिर्नेतॄन् वाहनानि त्रिभिस्त्रिभिः ॥ १९ ॥
शाल्वाला शत ते बाण एक प्रत्येक सैनिका । सारथ्यासी दहा तैसे वाहना तीन तीन ते ॥ १९ ॥
शतेन शाल्वं - शंभर बाणांनी शाल्वाला एकैकेन अस्य सैनिकान् - एकेका बाणाने शाल्वाच्या सैनिकांना दशभिः दशभिः नेतृन् - दहा दहा बाणांनी सारथ्यांना त्रिभिः त्रिभिः वाहनानि - तीन तीन बाणांनी वाहनांना अताडयत् - ताडिता झाला. ॥१९॥
तसेच शाल्वालासुद्धा शंभर बाण मारले. नंतर प्रत्येक सैनिकाला एक एक, सारथ्यांना प्रत्येकी दहा आणि वाहनांना तीन तीन बाण मारले. (१९)
तदद्भुतं महत् कर्म प्रद्युम्नस्य महात्मनः ।
दृष्ट्वा तं पूजयामासुः सर्वे स्वपरसैनिकाः ॥ २० ॥
प्रद्युम्नाचे असे कर्म अद्भूत पाहता तदा । सैन्य ते सर्वच्या सर्व वाहवा करु लागले ॥ २० ॥
सर्वे स्वपरसैनिकाः - स्वतःच्या व दुसर्याच्या सेनेतील असे सर्व लोक महात्मनः प्रद्युम्नस्य - महात्म्या प्रद्युम्नाचे अद्भुतं तत् महत् कर्म दृष्टवा - आश्चर्यजनक असा तो मोठा पराक्रम पाहून तं पूजयामासुः - त्याला प्रशंसिते झाले. ॥२०॥
महावीर प्रद्युम्नाचे हे अद्भूत आणि महान कृत्य पाहून त्याचे आणि शत्रूपक्षाचेही सैनिक त्याची प्रशंसा करू लागले. (२०)
बहुरूपैकरूपं तद् दृश्यते न च दृश्यते ।
मायामयं मयकृतं दुर्विभाव्यं परैरभूत् ॥ २१ ॥
मायामय विमानो ते दिसे नी नच ही दिसे । अनेक रूप वा एक यदुंना नच ते कळे ॥ २१ ॥
तत् (सौभम्) बहुरूपैकरूपं (क्वचित्) दृश्यते (क्वचित्) च न दृश्यते - ते सौभ विमान केव्हा अनेक रूपांचे दिसे, कधी एकरूपाचे दिसे, केव्हा केव्हा दिसे तर केव्हा मुळीच दिसत नसे मयकृतं मायामयं (तत्) - मयाने निर्मिलेले अति कौशल्याचे असे ते परैः दुर्विभाव्यं अभूत् - शत्रूंना न समजण्यासारखे होते. ॥२१॥
मय दानवाने तयार केलेले शाल्वाचे ते विमान मायावी होते. ते इतके विचित्र होते की, कधी ते अनेक रूपांत दिसे, तर कधी एकाच रूपात. कधी दिसत असे तर कधी अदृश्य होत असे. शत्रूंना त्याचा पताही लागत नसे. (२१)
क्वचिद्भूमौ क्वचिद् व्योम्नि गिरिमूर्ध्नि जले क्वचित् ।
अलातचक्रवद् भ्राम्यत् सौभं तद् दुरवस्थितम् ॥ २२ ॥
कधी येई धरेशी नी आकाशी उडते कधी । पर्वतांशिखरी भासे कधी पाण्यावरी तसे । जाळीत चालले सारे न थांबे क्षण एक ते ॥ २२ ॥
क्वचित् भूमौ - एखादे वेळी भूमीवर क्वचित् व्योम्नि - एखादे वेळी आकाशात क्वचित् गिरिमूर्ध्नि जले (वा) - एखादे वेळी पर्वताच्या शिखरावर किंवा पाण्यात (एवं) अलातचक्रवत् भ्राम्यत् - याप्रमाणे गरगर फिरविल्या जाणार्या जळक्या कोलिताप्रमाणे फिरणारे तत् सौभं - ते सौभ विमान दुरवस्थितं (अभूत्) - अगदी अस्थिर असे होते. ॥२२॥
ते कधी जमिनीवर दिसे, तर कधी आकाशत उडत असे. कधी पर्वताच्या शिखरावर चढत असे, तर कधी पाण्यावर तरंगू लागे. ते कोलिताप्रमाणे फिरत राही. ते कोठेच स्थिर राहात नसे. (२२)
यत्र यत्रोपलक्ष्येत ससौभः सहसैनिकः ।
शाल्वः ततस्ततोऽमुञ्चन् शरान् सात्वतयूथपाः ॥ २३ ॥
विमानासह तो शाल्व कुठेही दिसला तदा । जेथ तेथ दिसोनीया बाणांची वृष्टिची करी ॥ २३ ॥
यत्र यत्र - ज्या ज्या ठिकाणी ससौभः सहसैनिकः शाल्वः उपलक्ष्येत - सौभ व सेना ह्यांसह शाल्व दिसे ततः ततः - त्या त्या ठिकाणी सात्वतयूथपाः - यादवसेनाधिपति शरान् अमुञ्चन् - बाण सोडिते झाले. ॥२३॥
आपले विमान आणि सैनिक यांच्यासह जेथे जेथे शाल्व त्यांच्या दृष्टीस पडत असे, तेथे तेथे यादव सेनापती बाणांचा वर्षाव करीत होते. (२३)
शरैरग्न्यर्कसंस्पर्शैः आशीविषदुरासदैः ।
पीड्यमानपुरानीकः शाल्वोऽमुह्यत् परेरितैः ॥ २४ ॥
सूर्याग्निसम ते बाण विषारी सापची जसे । प्रद्युम्ने सोडिले तेंव्हा शाल्व मूर्च्छित जाहला ॥ २४ ॥
पीडयमानपुरानीकः - पीडिले आहे सौभ विमान व सैन्य ज्याचे असा शाल्वः - शाल्व परेरितैः - शत्रूंनी फेकिलेल्या अग्न्यर्कसंस्पर्शैः - अग्नि व सूर्य यांसारख्या कडक आघाताच्या आशीविषदुरासदैः - सर्पाप्रमाणे दुःसह अशा शरैः अमुह्यत् - बाणांनी मूर्च्छित झाला. ॥२४॥
सूर्य आणि अग्नीप्रमाणे जळत जाणारे त्यांचे बाण विषारी सापांप्रमाणे असह्य होत होते. शाल्वाचे नगराकार विमान आणि सेना त्यामुळे अत्यंत व्याकुळ झाली. शाल्वही मूर्च्छा येऊन पडला. (२४)
शाल्वानीकपशस्त्रौघैः वृष्णिवीरा भृशार्दिताः ।
न तत्यजू रणं स्वं स्वं लोकद्वयजिगीषवः ॥ २५ ॥
शाल्व सेनापतीनेही तसेच बाण सोडिले । यदुही लढती तैसे जिंकू वा मरु या मने ॥ २५ ॥
शाल्वानीकपशस्रौघैः भृशार्दिताः - शाल्वाच्या सेनापतींनी फेकिलेल्या शस्त्रसमूहांनी अत्यंत पीडिलेले लोकद्वयजिगीषवः - दोन्ही लोक जिंकू इच्छिणारे वृष्णिवीराः - यादव वीर स्वं स्वं रणं न तत्यजुः - आपापली युद्धभूमी सोडून गेले नाहीत. ॥२५॥
शाल्वाच्या सेनापतींनीसुद्धा यादवांवर पुष्कळ शस्त्रांचा वर्षाव केला होता. त्यामुळे त्यांना अतिशय क्लेश होत होते. परंतु त्यांनी रणांगण सोडले नाही. कारण ते विचार करीत होते की, मरण आले तर स्वर्ग मिळेल आणि जिवंत राहिलो तर विजय मिळेल. (२५)
शाल्वामात्यो द्युमान् नाम प्रद्युम्नं प्राक् प्रपीडितः ।
आसाद्य गदया मौर्व्या व्याहत्य व्यनदद् बली ॥ २६ ॥
द्युमान शाल्वचा मंत्री पंचेवीस तिरा तसे । गदा पोलादि मारोनी मेला प्रद्युम्न तो म्हणे ॥ २६ ॥
द्युमान् नाम बली शाल्वामात्यः - द्युमान नावाचा शाल्वाचा बलिष्ठ प्रधान प्राक्पीडितः - पूर्वी शत्रूकडून पीडिला गेलेला प्रद्युम्नं आसाद्य - प्रद्युम्नाला गाठून मौर्व्यगदया व्याहत्य - लोखंडाच्या गदेने ताडून व्यनदत् - शब्द करिता झाला. ॥२६॥
ज्याला आधी प्रद्युम्नाने पंचवीस बाण मारले होते, त्या शाल्वाच्या द्युमान नावाच्या बलवान मंत्र्याने झेप घेऊन प्रद्युम्नावर पोलादी गदेचा जोराने प्रहार केला आणि "मारले ! मारले !" म्हणून तो मोठ्याने ओरडला. (२६)
प्रद्युम्नं गदया शीर्ण वक्षःस्थलमरिंदमम् ।
अपोवाह रणात् सूतो धर्मविद् दारुकात्मजः ॥ २७ ॥
प्रद्युम्ना वक्षस्थानासी गदा ती लागली तदा । दारुक् पुत्रे रणातून रथ तो काढिला असे ॥ २७ ॥
धर्मवित् दारुकात्मजः (तस्य) सूतः - धर्म जाणणारा दारुकाचा पुत्र असा प्रद्युम्नाचा सारथी गदया - गदेने शीर्णवक्षःस्थलं - ज्यांचे वक्षस्थल छिन्नविच्छिन्न झाले आहे अशा अरिन्दमं प्रद्युम्नं - शत्रूंना दमविणार्या प्रद्युम्नाला रणात् अपोवाह - युद्धभूमीतून दूर नेता झाला. ॥२७॥
शत्रूंचे दमन करणार्या प्रद्युम्नाने वक्ष:स्थळ गदेच्या आघाताने जखमी झाले. दारुकाचा पुत्र त्याचा सारथी होता. सारथिधर्मानुसर त्याने त्याला रणभूमीवरून बाजूला नेले. (२७)
लब्धसंज्ञो मुहूर्तेन कार्ष्णिः सारथिमब्रवीत् ।
अहो असाध्विदं सूत यद् रणान्मेऽपसर्पणम् ॥ २८ ॥
प्रद्युम्न संपता मूर्च्छा सारथ्या वदला अरे । हटवोनी रणातून न केले युक्त तू असे ॥ २८ ॥
मुहूर्तेन लब्धसंज्ञः कार्ष्णिः - दोन घटकांनी सावध झालेला कृष्णपुत्र प्रद्युम्न सारथिं अब्रवीत् - सारथ्याला म्हणाला अहो सूत - हे सूता यत् रणात् मे अपसर्पणं (कृतं) - जे तू मला युद्धभूमीतून दूर नेले (तत्) इदं असाधु (कृतं) - ते हे कृत्य फारच वाईट केले. ॥२८॥
दोन घटकांनंतर प्रद्युम्न शुद्धीवर आला. तेव्हा तो सारथ्याला म्हणाला, "हे सूता ! तू मला रणभूमीवरून बाजूला आणलेस, हे अगदी वाईट केलेस." (२८)
न यदूनां कुले जातः श्रूयते रणविच्युतः ।
विना मत्क्लीबचित्तेन सूतेन प्राप्तकिल्बिषात् ॥ २९ ॥
न कोणी वंशिचा वीर हटला त्या रणातुनी । कलंक मजला लागे वाटते तू नपूंसक ॥ २९ ॥
क्लीबचित्तेन सूतेन - नपुंसकाप्रमाणे क्षुद्र अंतःकरणाच्या सारथ्याकडून प्राप्तकिल्बिषात् मद्विना - दोषाला प्राप्त झालेल्या माझ्या शिवाय यदूनां कुले जातः (सन्) रणविच्युतः - यदुकुळात उत्पन्न झालेला असताहि युद्धभूमीतून पळून जाणारा (कः अपि अपरः) न श्रूयते - दुसरा कोणताहि पुरुष ऐकण्यात नाही. ॥२९॥
आमच्या वंशातील कोणताही वीर रणभूमी सोडून निघून गेला, असे आम्ही कधी ऐकले नाही. हा कलंक फक्त माझ्या माथ्यावरच लागला आहे. हे सूता ! खरोखर तू षंढ आहेस. (२९)
किं नु वक्ष्येऽभिसङ्गम्य पितरौ रामकेशवौ ।
युद्धात् सम्यगपक्रान्तः पृष्टस्तत्रात्मनः क्षमम् ॥ ३० ॥
सांग मी पितरां काय बोलू ते राम केशवा । पुसतील मला तेंव्हा काय उत्तर ते असे ॥ ३० ॥
युद्धात् सम्यक् अपक्रान्तः - रणभूमीतून सुखरूप बाहेर पडलेला मी पितरौ रामकेशवौ अभिसंगम्य - वडील जे बलराम व श्रीकृष्ण त्यांजवळ गेल्यावर पृष्टः - विचारला गेलेला असा तत्र - तेथे आत्मनः क्षमं किं नु वक्ष्ये - स्वतःला साजेसे काय बरे सांगू ? ॥३०॥
आता मी माझे चुलते बलराम आणि वडिल श्रीकृष्ण यांच्यासमोर जाऊन काय सांगू ? मी युद्धातून पळून आलो, असेच आता सर्वजण म्हणतील. त्यांनी विचारल्यावर मी त्यांना योग्य असे काय उत्तर देऊ ? (३०)
व्यक्तं मे कथयिष्यन्ति हसन्त्यो भ्रातृजामयः ।
क्लैब्यं कथं कथं वीर तवान्यैः कथ्यतां मृधे ॥ ३१ ॥
हासतील मला सार्या भ्रातृजाया नि त्या पुन्हा । नपुंसक कसे झाले वदतील मला पहा । अक्षम्य सारथ्या तू हा केलास अपराध की ॥ ३१ ॥
वीर - हे पराक्रमी प्रद्युम्ना मृधे - रणांगणावर अन्यैः (युध्यमानस्य) तव कथं कथं (भूतम्) - शत्रूंशी लढणार्या तुझे कसे कसे झाले कथ्यतां - सांग पाहू (इति) हसन्त्यः भ्रातृजामयः - असे म्हणून हसणार्या भावांच्या स्त्रिया मे क्लैब्यं व्यक्तं कथयिष्यन्ति - माझा मोठा भ्याडपणा स्पष्ट रीतीने वर्णितील. ॥३१॥
माझ्या भावजया माझी खिल्ली उडवीत मला स्पष्टपणे विचारतील की, "सांग ना ! हे वीरपुरुषा ! तू षंढ कसा निपजलास ? युद्धात तुझे शत्रूंशी युद्ध कसे झाले ?" (३१)
सारथिरुवाच -
धर्मं विजानताऽऽयुष्मन् कृतमेतन्मया विभो । सूतः कृच्छ्रगतं रक्षेद् रथिनं सारथिं रथी ॥ ३२ ॥
सारथी म्हणाला - आयुष्मन् ! सारथी धर्मे केले मी जाणुनी तसे । संकटी रथिला आम्ही आम्हाला रथि रक्षितो ॥ ३२ ॥
आयुष्मन् विभो - हे दीर्घायुषी समर्थ प्रद्युम्ना धर्मं विजानता मया - धर्म जाणणार्या माझ्याकडून एतत् कृतं - हे केले गेले सूतः कृच्छ्रगतं रथिनं (रक्षेत्) - सारथ्याने संकटांत सापडलेल्या रथातील वीराचे रक्षण करावे रथी (च) सारथिं रक्षेत् - आणि रथातील वीरपुरुषाने सारथ्याचे रक्षण करावे. ॥३२॥
सारथी म्हणाला- कुमार ! मी जे काही केले ते सारथ्याचा धर्म जाणूनच केले. हे स्वामी ! संकट आल्यावर सारथ्याने रथात बसलेल्याचे रक्षण करावे आणि रथीने सारथ्याचे, हाच धर्म होय. (३२)
एतद् विदित्वा तु भवान् मयापोवाहितो रणात् ।
उपसृष्टः परेणेति मूर्च्छितो गदया हतः ॥ ३३ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे उत्तरार्धे शाल्वयुद्धे षट्सप्ततितमोऽध्यायः ॥ ७६ ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
धर्म हा पाळिला मी तो शत्रूने मारिता गदा । मूर्च्छीत जाहले तुम्ही संकटी वागलो तसे ॥ ३३ ॥ ॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर शहाहत्तरावा अध्याय हा ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
एतत् विदित्वा - हे जाणून तु - तर परेण उपसृष्टः - शत्रूने पीडिलेला गदया (च) हतः भवान् - आणि गदेने ताडिलेला असा तू मया रणात् अपोवाहितः - माझ्याकडून रणांगणावरून दूर नेला गेलास. ॥३३॥ शहात्तरावा अध्याय समाप्त
हे जाणूनच मी आपल्याला रणभूमीवरून दूर नेले. शत्रूने आपल्यावर गदेचा प्रहार केल्यामुळे आपण बेशुद्ध झाला होतात. (३३)
अध्याय शहात्तरावा समाप्त |