|
श्रीमद् भागवत पुराण राजसूयान्तेऽवभृथस्नानमहोत्सवः; मयनिर्मितायां युधिष्ठिरसभायां दुर्योधनस्यावमाननं च - राजसूय यज्ञाची पूर्तता आणि दुर्योधानाचा अपमान - संहिता - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीराजोवाच -
( अनुष्टुप् ) अजातशत्रोस्तं दृष्ट्वा राजसूयमहोदयम् । सर्वे मुमुदिरे ब्रह्मन् नृदेवा ये समागताः ॥ १ ॥ दुर्योधनं वर्जयित्वा राजानः सर्षयः सुराः । इति श्रुतं नो भगवन् तत्र कारणमुच्यताम् ॥ २ ॥
श्रीशुकदेव सांगतात - ( अनुष्टुप् ) अजातशत्रु धर्माच्या यज्ञा पाहोनि देवता । माणसे नृपती संत सर्व हर्षित् जाहले ॥ १ ॥ दुर्योधना परी दुःख जाहले वदले तुम्ही । भगवन् ! सांगणे त्याचे काय कारण जाहले ॥ २ ॥
ब्रह्मन् - हे शुकाचार्य ये नृदेवाः (तत्र) समागताः - जे राजे त्या यज्ञामध्ये आले होते (ते) सर्वे - ते सर्व अजातशत्रोः तं राजसूयमहोदयं दृष्टवा - धर्मराजाचे ते राजसूयरूपी मोठे वैभव पाहून मुमुदिरे - आनंदित झाले. ॥१॥ भगवन् - हे शुकाचार्य दुर्योधनं वर्जयित्वा - दुर्योधनाशिवाय सर्षयः राजानः सुराः (च) - ऋषींसह राजे व देव इति नः श्रुतं - असे आम्ही ऐकिले तत्र कारणम् उच्यताम् - असे होण्याचे कारण सांगा. ॥२॥
परीक्षिताने विचारले- मुनिवर्य ! अजातशत्रू धर्मराजाचा राजसूय यज्ञमहोत्सव पाहून जे राजे, ऋषी, मुनी, देव इत्यादी आले होते, ते सर्वजण आनंदित झाले; पण दुर्योधन मात्र नाही. ही गोष्ट मी आपल्या तोंडून ऐकली. भगवन ! आपण याचे कारण सांगावे. (१-२)
श्रीबादरायणिरुवाच -
पितामहस्य ते यज्ञे राजसूये महात्मनः । बान्धवाः परिचर्यायां तस्यासन् प्रेमबंधनाः ॥ ३ ॥
परीक्षिता ! तुझा आजा महात्मा धर्म तो असे । प्रेमात राहुनी त्याच्या बंधू सर्वचि वागले ॥ ३ ॥
ते महात्मनः पितामहस्य - तुझा महात्मा आजोबा जो धर्मराजा त्याच्या राजसूये यज्ञे - राजसूय यज्ञामध्ये प्रेमबन्धनाः बांधवाः - प्रेमाने बद्ध झालेले बांधव तस्य परिचर्यायां आसन् - त्या धर्मराजाच्या सेवेत तत्पर होते. ॥३॥
श्रीशुक म्हणाले- परीक्षिता ! तुझे थोर आजोबा युधिष्ठिर यांच्यावरील प्रेमामुळे त्यांच्या बांधवांनी राजसूय यज्ञामध्ये वेगवेगळी सेवाकार्ये स्वीकारली होती. (३)
भीमो महानसाध्यक्षो धनाध्यक्षः सुयोधनः ।
सहदेवस्तु पूजायां नकुलो द्रव्यसाधने ॥ ४ ॥
भोजनालयि तो भीम कोषाध्यक्ष सुयोधन । स्वागता सहदेवो नी सामग्रीसी नकूल तो ॥ ४ ॥
भीमः महासनाध्यक्षः - भीम स्वयंपाकगृहाचा अध्यक्ष होता सुयोधनः धनाध्यक्ष - दुर्योधन भांडारगृहाचा अध्यक्ष होता सहदेवः तु पूजायां - सहदेव पूजेच्या कामी योजिलेला होता नकुलः द्रव्यसाधने - नकुल हा यज्ञासाठी लागणार्या वस्तु आणून देण्याच्या कामावर नेमिला होता. ॥४॥
भीमसेन भोजनप्रमुख होता. दुर्योधन खजिनदार होता. सत्काराचे काम सहदेवाकडे होते आणि वेगवेगळ्या प्रकारची सामग्री गोळा करण्याचे काम नकुल पाहात होता. (४)
गुरुशुश्रूषणे जिष्णुः कृष्णः पादावनेजने ।
परिवेषणे द्रुपदजा कर्णो दाने महामनाः ॥ ५ ॥
गुरु सेवेत तो पार्थ कृष्ण तो पाय ते धुण्या । द्रौपदी वाढपाला नी कर्ण दानास बैसला ॥ ५ ॥
गुरुशुश्रूषणे जिष्णुः - वडील लोकांचे आदरातिथ्य करण्याच्या कामावर अर्जुन योजिला होता कृष्णः पादावनेजने - कृष्ण पाय धुण्याच्या कामावर नेमिला होता द्रुपदजा परिवेषणे - द्रौपदी वाढण्याच्या कामावर होती महामनाः कर्णः दाने - उदार मनाचा कर्ण दानधर्म करण्यावर नेमिला होता. ॥५॥
अर्जुन गुरुजनांची सेवा करीत होता आणि श्रीकृष्ण अतिथींचे पाय धुण्याचे काम करीत होते. भोजन वाढण्याचे काम द्रौपदी करीत होती आणि उदार कर्ण दाने देत होता. (५)
युयुधानो विकर्णश्च हार्दिक्यो विदुरादयः ।
बाह्लीकपुत्रा भूर्याद्या ये च सन्तर्दनादयः ॥ ६ ॥ निरूपिता महायज्ञे नानाकर्मसु ते तदा । प्रवर्तन्ते स्म राजेन्द्र राज्ञः प्रियचिकीर्षवः ॥ ७ ॥
या परी सात्यकी आणि हार्दिक्य नि विकर्ण तो । भूरिश्रवा नि विदुरो संतर्दन विभिन्न त्या ॥ ६ ॥ कार्यासी नेमिले सर्व आपुले कार्य ते असे । करिती प्रियभावाने राजाचे हित ज्यात हो ॥ ७ ॥
युयुधानः विकर्णः हार्दिक्यः विदुरादयः च - सात्यकि, विकर्ण, हार्दिक्य आणि विदुर आदिकरून भूर्याद्याः ये बाह्लिकपुत्राः (ते) - भूरिसेनादि बाल्हीकाचे जे मुलगे ते (तथा) च संतर्दनादयः - तसेच संतर्दन आदिकरून. ॥६॥ ते - ते तदा - त्या यज्ञाच्या वेळी महायज्ञे नानाकर्मसु निरूपिताः - राजसूय यज्ञातील अनेक कामांवर नियोजिलेले असे राज्ञः प्रियचिकीर्षवः प्रवर्तन्ते स्म - राजा युधिष्ठिराचे प्रिय करण्याची इच्छा करणारे असे आपापल्या कामी प्रवृत्त झाले. ॥७॥
परीक्षिता ! याचप्रमाणे सात्यकी, विकर्ण, हार्दिक्य, विदुर इत्यादी तसेच भूरिश्रवा इत्यादी बाल्हीकाचे पुत्र आणि संतर्दन इत्यादींना राजसूय यज्ञामध्ये निरनिराळ्या कामांवर नियुक्त केले होते. ते सर्वजण राजाला आवडेल अशा प्रकारे कामे करीत होते. (६-७)
( वसंततिलका )
ऋत्विक् सदस्यबहुवित्सु सुहृत्तमेषु स्विष्टेषु सूनृतसमर्हणदक्षिणाभिः । चैद्ये च सात्वतपतेश्चरणं प्रविष्टे चक्रुस्ततस्त्ववभृथ स्नपनं द्युनद्याम् ॥ ८ ॥
( वसंततिलका ) ऋत्विज् सदस्य बहुज्ञानि पुरूष तैसे ते इष्ट मित्र सगळे मधु बोलती नी । सत्कार सर्व, शिशुपालहि कृष्ण झाला । यज्ञांत स्नान करण्या नृप पातला तो ॥ ८ ॥
सूनृतसमर्हणदक्षिणाभिः - चांगले भाषण, अहेर आणि दक्षिणा ह्यांनी ऋत्विक्सदस्यबहुवित्सु सुहृत्तमेषु (च) स्विष्टेषु - पुरोहित सभासद, विद्वान पुरुष व अत्यंत जिव्हाळ्याचे स्नेही यांचा सत्कार केला असता चैद्ये च सात्वतपतेः चरणं प्रविष्टे - आणि शिशुपाल श्रीकृष्णाच्या चरणाशी प्रविष्ट झाला असता ततः तु - नंतर द्युनद्यां - गंगेमध्ये अवभृथस्नपनं चक्रुः - अवभृथ स्नान करिते झाले. ॥८॥
ऋत्विज, सदस्य, ज्ञानी पुरुष, इष्ट-मित्र व बांधव यांचा, गोड वाणी, पूजा आणि दक्षिणा इत्यादींनी उत्तम प्रकारे सत्कार झाला, तसेच शिशुपाल भक्तवत्सल भगवंतांच्या चरणी विलीन झाला. त्यानंतर सर्वांनी गंगेत अवभृथस्नान केले. (८)
( अनुष्टुप् )
मृदङ्गशङ्खपणव धुन्धुर्यानकगोमुखाः । वादित्राणि विचित्राणि नेदुरावभृथोत्सवे ॥ ९ ॥
( अनुष्टुप् ) अवभृत् स्नान ते चाले मृदंग ढोल शंख ते । वाजती कैक वाद्ये ती दुंदुभी नरसिंगि ही ॥ ९ ॥
आवभृथोत्सवे - अवभृथ स्नानाचा समारंभ चालू असताना मृदंगशंखपणवधुन्धुर्यानकगोमुखाः - मृदंग, शंख, ढोल, नगारे, तुतार्या, शिंगे व गोमुख अशी विचित्राणि वादित्राणि नेदुः - चित्रविचित्र वाद्ये वाजत होती. ॥९॥
या स्नानाच्या सोहळ्याच्या वेळी मृदंग, शंख, ढोल, नौबती, नगारे, शिंगे इत्यादी निरनिराळी वाद्ये वाजू लागली. (९)
नर्तक्यो ननृतुर्हृष्टा गायका यूथशो जगुः ।
वीणावेणुतलोन्नादः तेषां स दिवमस्पृशत् ॥ १० ॥
थैय्थया नाचती नाच्या मेळ्याने गात गायक । वीणा बासुरि नी झांज तुमुले गर्जले नभ ॥ १० ॥
हृष्टाः नर्तक्यः ननृतुः - आनंदित झालेल्या नाचणार्या स्त्रिया नाचू लागल्या गायकाः यूथशः जगुः - गवई गटागटाने गाऊ लागले तेषां सः वीणावेणुतलोन्नादः - त्यांचा तो वीणेचा मुरलीचा व टाळ्यांचा शब्द दिवं अस्पृशत् - स्वर्गाला जाऊन भिडला. ॥१०॥
नर्तकी आनंदाने नाचू लागल्या. गवयी गटागटांनी गाऊ लागले. वीणा, बासर्या, टाळ-झांजा वाजू लागल्या. यांचा तुंबळ आवाज सगळ्या आकाशात दुमदुमू लागला. (१०)
चित्रध्वजपताकाग्रैः इभेन्द्रस्यन्दनार्वभिः ।
स्वलङ्कृतैर्भटैर्भूपा निर्ययू रुक्ममालिनः ॥ ११ ॥ यदुसृञ्जयकाम्बोज कुरुकेकयकोशलाः । कम्पयन्तो भुवं सैन्यैः यजनपुरःसराः ॥ १२ ॥
सोन्याचे हार लेवोनी यदु सृंजय केकय । कोसली करु कंबोज सवे रंगीत त्या ध्वजा ॥ ११ ॥ सजले रथ नी हत्ती अश्व नी वीर ही तसे । मागे युधिष्ठिराच्या ते धमाम चालले असे ॥ १२ ॥
रुक्ममालिनः भूपाः - सुवर्णाच्या माळा धारण केलेले राजे चित्रध्वजपताकाग्रैः - चित्रविचित्र आहेत ध्वज व पताका ह्यांची टोके ज्यांवर अशा इभेंद्रस्यंदनार्वभिः (सह) - मोठमोठे हत्ती, रथ व घोडे ह्यांसह स्वलंकृतैः भटैः च (सह) - व अलंकार घातलेले योद्धे यांसह निर्ययुः - निघाले. ॥११॥ यजमानपुरःसराः - यजमान आहे अग्रेसर ज्यांचा असे यदुसृंजयकाम्बोजकुरुकैकयकोसलाः - यदु, सृंजय, कांबोज, कुरु, कैकय व कोसल ह्या देशांचे राजे सैन्यैः भुवं कम्पयन्तः - सैन्यांनी पृथ्वीला कापवीत. ॥१२॥
सोन्याचे हार गळ्यात घातलेले यदू, सृंजय, कांबोज, कुरु, केकय आणि कोसल देशाचे राजे युधिष्ठिर महाराजांना पुढे करून रंगी-बेरंगी ध्वजपताकांनी युक्त आणि खूप सजविलेल्या अशा हत्ती, रथ, घोडे व सैनिक अशा वतुरंग सेनेसह पृथ्वीचा थरकाप करीत चालले होते. (११-१२)
सदस्यर्त्विग्द्विजश्रेष्ठा ब्रह्मघोषेण भूयसा ।
देवर्षिपितृगन्धर्वाः तुष्टुवुः पुष्पवर्षिणः ॥ १३ ॥
मोठ्याने वेदमंत्राते गावोनी विप्र चालले । आकाशा मधुनी देवे फुले वर्षिलि ती पहा ॥ १३ ॥
सदस्यर्त्विग्द्विजश्रेष्ठाः - सभासद, ऋत्विज व मोठमोठे ब्राह्मण भूयसा ब्रह्मघोषेण - मोठया वेदघोषाने पुष्पवर्षिणः देवर्षिपितृगन्धर्वाः (च) - आणि पुष्पवृष्टि करणारे नारदादि देवर्षि, पितर व गंधर्व हे तुष्टुवुः - स्तुति करिते झाले. ॥१३॥
यज्ञाचे सदस्य, ऋत्विज आणि पुष्कळसे विद्वान ब्राह्मण वेदमंत्रांचे उच्च स्वराने पठन करीत चालले होते. त्यावेळी देव, ऋषी, पितर, गंधर्व आकाशातून फुलांचा वर्षाव करीत त्यांची स्तुती करीत होते. (१३)
स्वलंकृता नरा नार्यो गन्धस्रग् भूषणाम्बरैः ।
विलिंपन्त्यो अभिसिंच विजह्रुर्विविधै रसैः ॥ १४ ॥
सजले नर नारी ते गंध वस्त्रांदिके तदा । लोणी दूध तसे पाणी अन्यांच्या वरि शिंपिती ॥ १४ ॥
गन्धस्नग्भूषणाम्बरैः स्वलंकृताः नराः नार्यः (च) - सुगंधी पदार्थ, माळा, अलंकार व वस्त्रे यांनी शोभणारे पुरूष व स्त्रिया विविधैः रसैः विलिम्पन्त्यः अभिषेचन्त्यः - अनेक प्रकारच्या रसांचा शरीरावर लेप करून स्नान करणार्या अशा विजह्नुः - विहार करित्या झाल्या. ॥१४॥
यावेळी स्त्री-पुरुष सुगंधी द्रव्ये, फुलांचे हार, रंगी-बेरंगी वस्त्रे आणि बहुमुल्य अलंकारांनी नटून-थटून एकमेकांवर पाणी, तेल, दूध, लोणी इत्यादी टाकून त्यांना भिजवीत, ते एकमेकांच्या अंगाला लावीत खेळ करीत होते. (१४)
तैलगोरसगन्धोद हरिद्रासान्द्रकुंकुमैः ।
पुम्भिर्लिप्ताः प्रलिंपन्त्यो विजह्रुर्वारयोषितः ॥ १५ ॥
सुगंधी जल नी तैल हळ्दि केशर गोरस । पुरुषा नर्तकी लावी नर्तिक्यांशी पुरूष ते ॥ १५ ॥
पुंभिः - पुरुषांनी तैलगोरसगंधोदहरिद्रासान्द्रकुंकुमैः - तेल, गाईचे दूध, सुगंधी उटी, हळद व घटट केलेले केशराचे पाणी ह्यांनी लिप्ताः - लेपिलेल्या वारयोषितः - वारांगना (तान्) प्रलिंपन्त्यः विजह्नुः - त्या पुरूषांनाहि त्या पदार्थांचा लेप करित्या झाल्या. ॥१५॥
वारांगना पुरुषांना तेल, दूध, सुगंधित पाणी, हळद आणि दाट केशर लावीत आणि पुरुषासुद्धा त्यांना त्याच वस्तूंनी चिंब भिजवीत. (१५)
( वसंततिलका )
गुप्ता नृभिर्निरगमन्नुपलब्धुमेतद् देव्यो यथा दिवि विमानवरैर्नृदेव्यः । ता मातुलेयसखिभिः परिषिच्यमानाः सव्रीडहासविकसद् वदना विरेजुः ॥ १६ ॥
( वसंततिलका ) देव्या विमानि बसुनी बघतात शोभा नी पालख्यात बसल्या किति एक राण्या । श्रीरंग रंग उधळी ललनात तेंव्हा लाजोनी हासति तदा ललना तशा त्या ॥ १६ ॥
नृभिः गुप्ताः नृदेव्यः - मनुष्यांनी रक्षिलेल्या राजस्त्रिया यथा देव्यः दिवि विमानवरैः (तथा) - ज्याप्रमाणे देवस्त्रिया आकाशात उत्तम विमानामध्ये त्याप्रमाणे एतत् उपलब्धुं निरगमन् - हा उत्सव पहाण्यासाठी बाहेर पडल्या ताः - त्या स्त्रिया मातुलेयसखिभिः परिषिच्यमानाः - मामेभाऊ व मित्र यांनी शिंपिल्या जाणार्या सव्रीडहासविकसद्वदनाः विरेजुः - लज्जायुक्त हास्याने ज्यांची मुखे प्रफुल्लित झाली अशा शोभल्या. ॥१६॥
तो उत्सव पाहाण्यासाठी त्यावेळी ज्याप्रमाणे उत्तमोत्तम विमानात बसून आकाशामध्ये पुष्कळशा देवी आल्या होत्या, त्याचप्रमाणे रक्षणासाठी बरोबर असलेल्या सैनिकांसह राण्या निरनिराळ्या वाहनांत बसून आल्या होत्या. पांडवांचे मामेभाऊ श्रीकृष्ण आणि त्यांचे मित्र त्या राण्यांवर निरनिराळ्या प्रकारचे रंग टाकीत होते. यामुळे त्या राण्यांचे लाजेने चूर झालेले चेहरे स्मित हास्याने खुलून दिसत होते. (१६)
ता देवरानुत सखीन् सिन्सिषिचुर्दृतीभिः
क्लिन्नाम्बरा विवृतगात्रकुचोरुमध्याः । औत्सुक्यमुक्त कवरा च्च्यवमानमाल्याः क्षोभं दधुर्मलधियां रुचिरैर्विहारैः ॥ १७ ॥
रंगे भिजोनि वसने रमण्या शरीरी वक्षस्थलादि दिसता कटिभाग कांही । त्याही तशाच भरुनी पिचकारि रंगी दीरांवरी नि पतिच्या भिजवीति वस्त्रा । ओत्सुक्य प्रेम भरुनी सुटले हि केस तो खेळ शुद्ध असुनी मनि काम दाटे ॥ १७ ॥
क्लिन्नाम्बराः - ज्यांची वस्त्रे भिजली आहेत अशा विवृतगात्रकुचोरुमध्याः - ज्यांचे अवयव, स्तन, मांडया व मध्यभाग स्पष्ट दिसत आहेत अशा औत्सुक्यमुक्तकबरात् च्यवमानमाल्याः - उत्सुकतेमुळे सुटलेल्या वेणीतून खाली गळत आहेत फुलांचे गजरे ज्यांच्या अशा ताः - त्या स्त्रिया देवरान् उत सखीन् - दीर व मित्र ह्यांना दृतीभिः सिषिचुः - शिंपण्याच्या भांडयांनी शिंपित्या झाल्या (च) रुचिरैः विहारैः - आणि सुंदर जलक्रीडादिकांनी मलधियां क्षोभं दधुः - कामी पुरुषांना क्षुब्ध करित्या झाल्या. ॥१७॥
त्या राण्यांची वस्त्रे भिजल्यामुळे त्यांच्या शरीराचे वक्ष:स्थळ, मांड्या, कंबर इत्यादी अवयव दिसू लागले होते. त्यासुद्धा पिचकार्यांनी आपले दीर आणि त्यांच्या मित्रांवर रंग उडवीत होत्या. या धावपळीमुळे त्यांच्या वेण्या सुटून त्यांमध्ये माळलेली फुले ओघळून पडत होती. त्यांचा हा मनोहर विहार पाहून कामी पुरुषांचे चित्त चंचल होत होते. (१७)
( अनुष्टुप् )
स सम्राड् रथमारुढः सदश्वं रुक्ममालिनम् । व्यरोचत स्वपत्नीभिः क्रियाभिः क्रतुराडिव ॥ १८ ॥
( अनुष्टुप् ) द्रौपदी आदि राण्यांच्या युक्त त्या रथि धर्म तो । राजसूय स्वये याग मूर्तिमान् भासला असे ॥ १८ ॥
सदश्वं रुक्ममालिनं रथं आरूढः सः सम्राट् - चांगले घोडे जुंपिलेल्या व सुवर्णाने शोभणार्या रथात बसलेला सार्वभौम धर्मराज स्वपत्नीभिः - आपल्या स्त्रियांच्या योगाने क्रतुराट् क्रियाभिः इव - राजसूय जसा अंगभूत क्रियांच्या योगे शोभतो त्याप्रमाणे व्यरोचत - शोभला. ॥१८॥
चक्रवर्ती राजा युधिष्ठिर द्रौपदी इत्यादी राण्यांसह सुंदर घोडे जुंपलेल्या व सोन्याच्या हारांनी सजविलेल्या रथात बसला होता. त्यावेळी तो प्रयाजादी क्रियांनी युक्त असा मूर्तिमंत राजसूय यज्ञ वाटत होता. (१८)
पत्नीसंयाजावभृथ्यैः चरित्वा ते तमृत्विजः ।
आचान्तं स्नापयां चक्रुः गंगायां सह कृष्णया ॥ १९ ॥
ऋत्विजे पत्निसंजाय यज्ञांत स्नान घातले । नृपे आचम्य ते केले गंगास्नान पुन्हा तसे ॥ १९ ॥
ते ऋत्विजः - ते ऋत्विज पत्नीसंयाजाभृथ्यैः - पत्नीसंयाज नामक याग व अवभृथ स्नानाचाही विधि यांच्या योगे चरित्वा - यज्ञ पुरा करून कृष्णया सह - द्रौपदीसह आचान्तं तं गंगायां स्नापयांचक्रुः - आचमनविधि केलेल्या त्या युधिष्ठिराला स्नान घालिते झाले. ॥१९॥
ऋत्विजांनी पत्नीसंयाज नावाचा याग व यज्ञान्त-स्नानासंबंधी कर्म करवून द्रौपदीसह युधिष्ठिराकडून आचमन व संकल्प करवून गंगास्नान करविले. (१९)
देवदुन्दुभयो नेदुः नरदुंदुभिभिः समम् ।
मुमुचुः पुष्पवर्षाणि देवर्षिपितृमानवाः ॥ २० ॥ सस्नुस्तत्र ततः सर्वे वर्णाश्रमयुता नराः । महापातक्यपि यतः सद्यो मुच्येत किल्बिषात् ॥ २१ ॥
दुंदुभी वाजल्या तेंव्हा आकाशी धरणीशि ही । श्रेष्ठदेव ऋषी पित्रे फुले अर्पिति ते तदा ॥ २० ॥ नृपाचे स्नान हे होता चारी वर्णाश्रमी तदा । करिती स्नान गंगेचे जेणे पापचि नष्टते ॥ २१ ॥
नरदुंदुभिभिः सह देवदुंदुभयः नेदुः - मनुष्यांच्या चौघडयांसह देवांचे चौघडे वाजू लागले देवर्षिपितृमानवाः पुष्पवर्षाणि मुमुचुः - देव, ऋषि, पितर व मनुष्य पुष्पवृष्टि करिते झाले ततः - नंतर तत्र - तेथे वर्णाश्रमयुताः सर्वे नराः - ब्राह्मणादि वर्ण व ब्रह्मचर्यादि आश्रम ह्यांनी युक्त असे सर्वजण सस्नुः - स्नान करिते झाले यतः महापातकी अपि - जेथे स्नान केले असता महापातकी सुद्धा सद्यः किल्बिषात् मुच्येत - तत्काळ पातकांपासून मुक्त होतो. ॥२०-२१॥
त्यावेळी माणसे आणि देवतासुद्धा दुंदुभी वाजवू लागल्या. तसेच देव, ऋषी, पितर आणि लोक फुलांचा वर्षाव करू लागले. (२०) युधिष्ठिराने स्नान केल्यानंतर सर्व वर्णांच्या आणि आश्रमांच्या लोकांनी गंगेमध्ये स्नान केले. कारण या स्नानामुळे महापापी-सुद्धा पापराशीतून ताबडतोब मुक्त होतात. (२१)
अथ राजाहते क्षौमे परिधाय स्वलङ्कृतः ।
ऋत्विक् सदस्य विप्रादीन् आनर्चाभरणाम्बरैः ॥ २२ ॥
रेशमी धोति नी पंचा ल्याले आभूषणे नृप । सदस्या ऋत्विजा विप्रा दिधले वस्त्र भूषणे ॥ २२ ॥
अथ - नंतर स्वलंकृतः राजा - अलंकार घातलेला धर्मराजा अहते क्षौमे परिधाय - नवी वस्त्रे परिधान करून आभरणांबरैः - अलंकार व वस्त्रे यांनी ऋत्विक्सदस्यविप्रादीन् आनर्च - ऋत्विज, सभासद व ब्राह्मण इत्यादिकांची पूजा करिता झाला. ॥२२॥
त्यानंतर धर्मराजाने नवी रेशमी वस्त्रे परिधान केली व बहुमोल अलंकार घातले. नंतर ऋत्विज, सदस्य, ब्राह्मण इत्यादींना वस्त्रे, अलंकार व दक्षिणा देऊन त्यांचे पूजन केले. (२२)
बन्धूञ्ज्ञातीन् नृपान् मित्र सुहृदोऽन्यांश्च सर्वशः ।
अभीक्ष्णं पूजयामास नारायणपरो नृपः ॥ २३ ॥
हरिभक्त असे राजे सर्वांत कृष्ण पाहती । म्हणोनी भावकी मित्रां सर्वांना नित्य पूजिती ॥ २३ ॥
नारायणपरः नृपः - श्रीकृष्णालाच श्रेष्ठ मानणारा धर्मराजा बन्धुज्ञातिनृपान् - बांधव, संबंधी राजे ह्यांना मित्रसुहृदः अन्यान् च - मित्र, प्रेमळ मनाचे लोक, तसेच दुसरेहि कित्येक ह्यांना अभीक्ष्णं पूजयामास - वारंवार पूजिता झाला. ॥२३॥
भगवत्सपरायण राजाने बांधव, कुटुंबीय, राजे, इष्ट-मित्र, हितचिंतक आणि इतरही लोक यांचा वारंवार सत्कार केला. (२३)
( वसंततिलका )
सर्वे जनाः सुररुचो मणिकुण्डलस्रग् उष्णीषकञ्चुक दुकूलमहार्घ्यहाराः । नार्यश्च कुण्डलयुगालकवृन्दजुष्ट वक्त्रश्रियः कनकमेखलया विरेजुः ॥ २४ ॥
( वसंततिलका ) माला सपुष्प पगड्या अन कुंडले ती प्रावर्ण रत्न मणिहार जनां गळ्यात । कानी सुवर्ण फुल कर्धनि त्या स्त्रियांच्या देवी नि देव जमले जणु उत्सवात ॥ २४ ॥
सुररुचः - देवांप्रमाणे कांती असणारे सर्वे जनाः - सर्व पुरुष मणिकुण्डलस्र गुष्णीष कंचुकदुकूलमहार्घ्यहाराः - रत्नांची कुंडले, मोत्यांच्या माळा, शिरस्त्राणे, चिलखते, रेशमी वस्त्रे व मोठे मूल्यवान हार यांनी विरेजुः - शोभले नार्यः च - आणि स्त्रिया कुण्डलयुगालकवृंदजुष्टवक्त्रश्रियः - दोन कुंडलांनी व केशपाशांनी आली आहे मुखाला विशिष्ट शोभा ज्यांच्या अशा कनकमेखलया (विरेजुः) - सुवर्णाच्या कंबरपटटयाच्या योगे शोभल्या. ॥२४॥
त्यावेळी सर्व लोकांनी रत्नजडित कुंडले, फुलांचे हार, पगड्या, लांब अंगरखे, रेशमी वस्त्रे व रत्नांचे बहुमोल हार घातल्याने ते देवतांसारखे शोभून दिसत होते. कानांमधील कुंडले आणि कुरळे केस यांमुळे ज्यांची मुखकमले शोभून दिसत होती, अशा स्त्रिया कमरपट्ट्यांमुळे विशेष सुंदर दिसत होत्या. (२४)
( अनुष्टुप् )
अथ ऋत्विजो महाशीलाः सदस्या ब्रह्मवादिनः । ब्रह्मक्षत्रियविट्शुद्रा राजानो ये समागताः ॥ २५ ॥ देवर्षिपितृभूतानि लोकपालाः सहानुगाः । पूजितास्तं अनुज्ञाप्य स्वधामानि ययुर्नृप ॥ २६ ॥
( अनुष्टुप् ) परीक्षित् ! यज्ञि जे आले ऋषी द्विज नि क्षत्रिय । मुनी नी पितरे देव वैश्य शूद्र नि भूपती ॥ २५ ॥ अनुयायी असे सारे पूजिता धर्मराजने । स्वस्थाना सर्व ते गेले घेवोनी परवानगी ॥ २६ ॥
नृप - हे राजा अथ महाशीलाः ऋत्विजः - नंतर उत्तम शीलवान ऋत्विज ब्रह्मवादिनः सदस्याः - ब्रह्मवेत्ते सभासद (तत्र) समागताः ये राजानः ब्रह्मक्षत्रियविट्शूद्राः (च) - तेथे आलेले जे राजे आणि ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र हे ॥२५॥ (तथा) देवर्षिपितृभूतानि - तसेच देव, ऋषि, पितर व भूतगण सहानुगाः लोकपालाः (च) - व अनुचरांसह इंद्रादि लोकपाल पूजिताः - पूजिलेले असे तं अनुज्ञाप्य - त्या धर्मराजाची आज्ञा घेऊन स्वधामानि ययुः - आपापल्या स्थानाला निघून गेले. ॥२६॥
परीक्षिता ! राजसूय यज्ञामध्ये चारित्र्यसंपन्न ऋत्विज, वेदवेत्ते सदस्य, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, राजे, देव, ऋषी, पितर, अनुयायांसह लोकपाल इत्यादी जे आले होते, त्या सर्वांचा युधिष्ठिराने सत्कार केला. त्यानंतर ते सर्वजण धर्मराजांचा निरोप घेऊन आपापल्या निवासस्थानाकडे गेले. (२५-२६)
हरिदासस्य राजर्षे राजसूयमहोदयम् ।
नैवातृप्यन् प्रशंसन्तः पिबन् मर्त्योऽमृतं यथा ॥ २७ ॥
प्रशंसा करिती लोक न तृप्त पावती पहा । प्राशिता अमृता जैशी न तृप्ति कधि होतसे ॥ २७ ॥
(जनाः) हरिदासस्य राजर्षेः राजसूयमहोदयं प्रशंसन्तः - लोक भगवद्भक्त धर्मराजाच्या राजसूय यज्ञातील मोठया उत्सवाची प्रशंसा करीत यथा मर्त्यः अमृतं पिबन् (न तृप्यति) - जसा मनुष्य अमृत पिताना तृप्त होत नाही न एव अतृप्यन् - तृप्त झालेच नाहीत. ॥२७॥
अमृतपान करीत असताना माणूस जसा कधीच तृप्त होत नाही, त्याप्रमाणे सर्व लोक भगवद्भक्त राजर्षी युधिष्ठिराच्या राजसूय महायज्ञाची कितीही प्रशंसा करून तृप्त होत नव्हते. (२७)
ततो युधिष्ठिरो राजा सुहृत् संबंन्धि बान्धवान् ।
प्रेम्णा निवारयामास कृष्णं च त्यागकातरः ॥ २८ ॥
सुहृद् हितैषि संबंधी कृष्णदेव ययास ते । धर्माने रोधिले जाण्या वियोगा नच इच्छि तो ॥ २८ ॥
ततः - नंतर त्यागकातरः युधिष्ठिरः राजा - वियोगाला भ्यालेला धर्मराजा सुहृत्संबंन्धिबान्धवान् कृष्णं च - मित्र, संबंधी व बांधव ह्यांना आणि श्रीकृष्णाला प्रेम्णा निवासयामास - प्रेमाने रहावून घेता झाला. ॥२८॥
यानंतर धर्मराजाने मोठ्या प्रेमाने आपले आप्तेष्ट, संबंधी, बांधव आणि भगवान श्रीकृष्ण यांना थांबवून ठेवले. कारण त्यांच्या विरहाच्या कल्पनेनेच त्याला दु:ख होत होते. (२८)
भगवानपि तत्राङ्ग न्यवात्सीत् तत्प्रियंकरः ।
प्रस्थाप्य यदुवीरांश्च साम्बादींश्च कुशस्थलीम् ॥ २९ ॥
सांबादी यदुवीरांना कृष्णाने धाडिले असे । आनंद धर्मराजाला देण्याते स्वय थांबला ॥ २९ ॥
अंग - हे परीक्षित राजा तत्प्रियंकरः भगवान् अपि - त्या धर्मराजांचे प्रिय करणारा श्रीकृष्णसुद्धा सांबादीन् च यदुवीरान् च - सांबादिकांना व पराक्रमी यादवांनाहि कुशस्थलीं प्रस्थाप्य - द्वारकेस पाठवून (स्वयं) तत्र न्यवात्सीत् - स्वतः तेथे राहिला. ॥२९॥
परीक्षिता ! भगवान श्रीकृष्णांनी सांब इत्यादी यादववीरांना द्वारकापुरीला पाठविले आणि स्वत: युधिष्ठिराला आनंद देण्यासाठी ते तेथेच राहिले. (२९)
इत्थं राजा धर्मसुतो मनोरथमहार्णवम् ।
सुदुस्तरं समुत्तीर्य कृष्णेनासीद् गतज्वरः ॥ ३० ॥
मनोरथसमुद्रात कृपेने हरिच्या असा । धर्म-युधिष्ठिरो राजा सहजी पार जाहला ॥ ३० ॥
धर्मसुतः राजा - यमधर्माचा पुत्र असा धर्मराजा इत्थं - याप्रमाणे सुदुस्तरं मनोरथमहार्णवं समुत्तीर्य - तरून जाण्यास कठीण अशा मनोरथरूपी महासागराला ओलांडून कृष्णेन गतज्वरः आसीत् - श्रीकृष्णाच्या साहाय्याने निश्चिंत झाला. ॥३०॥
अशाप्रकारे पार करण्यास अत्यंत कठीण असा राजसूय यज्ञाच्या मनोरथाचा महासागर धर्मनंदन राजाने श्रीकृष्णांच्या कृपेने सहजपणे पार केला आणि त्याची सर्व काळजी मिटली. (३०)
एकदान्तःपुरे तस्य वीक्ष्य दुर्योधनः श्रियम् ।
अतप्यद् राजसूयस्य महित्वं चाच्युतात्मनः ॥ ३१ ॥
संपत्ती सर्व ती ऐशी यज्ञाची कीर्तिही तशी । पाहोनी जळतो चित्ती तो दुर्योधन एकदा ॥ ३१ ॥
एकदा दुर्योधनः - एके दिवशी दुर्योधन अच्युतात्मनः तस्य - श्रीकृष्णाच्या ठिकाणी आसक्त झाले आहे मन ज्याचे अशा धर्मराजाच्या अन्तःपुरे श्रियं - अंतःपुरातील ऐश्वर्य राजसूयस्य च महित्वं वीक्ष्य - आणि राजसूय यज्ञाचे महत्त्व पाहून अतप्यत् - संतप्त झाला. ॥३१॥
एके दिवशी भगवंतांचा भक्त असलेल्या युधिष्ठिराच्या अंत:पुरातील संपत्ती व राजसूय यज्ञ केल्यामुळे त्याला प्राप्त झालेले महत्त्व पाहून दुर्योधनाला मत्सर वाटू लागला. (३१)
( वसंततिलका )
यस्मिन् नरेन्द्रदितिजेन्द्र सुरेन्द्रलक्ष्मीः नाना विभान्ति किल विश्वसृजोपकॢप्ताः । ताभिः पतीन्द्रुपदराजसुतोपतस्थे यस्यां विषक्तहृदयः कुरुराडतप्यत् ॥ ३२ ॥ यस्मिन् तदा मधुपतेर्महिषीसहस्रं श्रोणीभरेण शनकैः क्वणदङ्घ्रिशोभम् । मध्ये सुचारु कुचकुङ्कुमशोणहारं श्रीमन्मुखं प्रचलकुण्डलकुन्तलाढ्यम् ॥ ३३ ॥
( वसंततिलका ) जेंव्हा सभेत बसले नृपती विभूती धर्मास सेवि द्रुपदी सभि त्या विशेष । मोठे नितंब म्हणुनी हळु पाय टाकी झंकारतात नुपुरे पसरे रवो तो ॥ ३२ ॥ तो मोहवी कटिस्तरो अन वक्षभागी मौक्तीकमाळ भरली उटिं केशराच्या । काळा तसाच कुरुळा बहु केशभार पाहोनि सुंदरि अशी सुधनो जळे तो ॥ ३३ ॥
यस्मिन् - ज्या अंतःपुरात विश्वसृजा उपक्लृप्ताः - विश्वकर्म्या मयाने संपादिलेल्या नाना नरेन्द्रदितिजेन्द्रलक्ष्मीः किल विभान्ति (स्म) - अनेक प्रकारच्या राजांची, दैत्याधिपतींची व इंद्राची वैभवे लखलखत होती ताभिः - त्या राजवैभवांच्या सहाय्याने द्रुपदराजसुता - द्रौपदी पतीन् उपतस्थे - आपल्या पतींची सेवा करिती झाली यस्यां विषक्तहृदयः कुरुराट् - जिच्याविषयी आसक्त झाले आहे अंतःकरण ज्याचे असा दुर्योधन अतप्यत् - दुःखी झाला. ॥३२॥ यस्मिन् - ज्या अंतःपुरात तदा - त्यावेळी श्रोणीभरेण शनकैः (गच्छन्) कणदङ्घ्रिशोभं - नितंबांच्या भारामुळे हळूहळू चालणार्या व पैंजणांच्या योगे मंजुळ शब्द करणार्या पायांनी शोभणार्या मध्येसुचारुः - कंबरेच्या भागी सुंदर अशा कुचकुङ्कुमशोणहारं - स्तनांवरील केशराच्या उटीने रक्तवर्ण झाले आहेत हार ज्यांचे अशा श्रीमन्मुखं - शोभायुक्त आहेत मुखे ज्यांची अशा प्रचलकुण्डलकुन्तलाढयं - हलणारी आहेत कुंडले ज्यांची अशा व कुरळ्या केसांनी युक्त अशा मधुपतेः महिषीसहस्रं - श्रीकृष्णाच्या हजारो स्त्रिया. ॥३३॥
परीक्षिता ! मय नावाच्या दानवाने पांडवांसाठी जे प्रासाद बनविले होते, त्यांमध्ये राजे, दैत्यराजे आणि सुरेन्द्र या सर्वांजवळ असणारे नाना प्रकारचे ऐश्वर्य एकवटले होते. त्या सर्वांच्याद्वारा द्रौपदी तेथे आपल्या पतींची सेवा करीत होती. त्यावेळी त्या राजभवनांत श्रीकृष्णांच्या हजारो राण्या राहात होत्या. त्या जेव्हा राजभवनात नितंबांच्या भारामुळे हळूहळू चालत, तेव्हा त्यांच्या नूपुरांचा आवाज सगळीकडे पसरत असे. त्यांचे कटिप्रदेश अत्यंत सुंदर होते. तसेच त्यांच्या वक्ष:स्थळावर लावलेया केशराच्या लालिम्याने मोत्यांचे शुभ्र हार लालसर वाटत होते. कुंडले घातलेली व कुरळे केस भुरभुरत असलेली त्यांची मुखकमले विशेषच शोभून दिसत होती. हे सर्व पाहून द्रौपदीच्या ठिकाणी आसक्त असलेल्या दुर्योधनाच्या अंत:करणात जळफळाट होऊ लागला. (३२-३३)
( अनुष्टुप् )
सभायां मयकॢप्तायां क्वापि धर्मसुतोऽधिराट् । वृतोऽनुगैर्बन्धुभिश्च कृष्णेनापि स्वचक्षुषा ॥ ३४ ॥ आसीनः काञ्चने साक्षात् आसने मघवानिव । पारमेष्ठ्यश्रीया जुष्टः स्तूयमानश्च वन्दिभिः ॥ ३५ ॥
( अनुष्टुप् ) एकदा त्या सभे माजी सुवर्णासनि धर्म नी । हितैषी भगवान् कृष्ण देवेंद्रापरि बैसले ॥ ३४ ॥ ब्रह्माजी परि ते तेथे संपन्न भोग सर्व ची । राजलक्ष्मी तशी शोभे स्तविती वंदिलोकही ॥ ३५ ॥
क्वापि - एका प्रसंगी अधिराट् धर्मसुतः - सार्वभौम धर्मराजा मयक्लृप्तायां सभायां - मयासुराने निर्मिलेल्या सभेत अनुजैः बंधुभिः च - धाकटया भावांनी व इतर संबंधितांनी वृतः - वेष्टिलेला कृष्णेन अपि - आणि श्रीकृष्णाने स्वचक्षुषा (दृष्टः) - चांगले वाईट सुचविणार्या आपल्या नेत्राने पाहिला गेलेला असा. ॥३४॥ काञ्चने आसने - सुवर्णाच्या आसनावर साक्षात् मघवान् इव आसीनः - प्रत्यक्ष इंद्राप्रमाणे बसलेला पारमेष्ठयश्रिया जुष्टः - सार्वभौम ऐश्वर्याने युक्त असा बन्दिभिः च स्तूयमानः - आणि स्तुतिपाठक भाटांनी स्तविलेला. ॥३५॥
राजाधिराज युधिष्ठिर एके दिवशी आपले बंधू. संबंधी आणि आपला नेत्रच असे श्रीकृष्ण यांच्यासह मय दानवाने बनविलेल्या सभेत सुवर्णसिंहासनावर इंद्राप्रमाणे विराजमान झाला होता. त्याचे ऐश्वर्य ब्रह्मदेवाच्या ऐश्वर्यासारखे होते. भाट त्याची स्तुती करीत होते. (३४-३५)
तत्र दुर्योधनो मानी परीतो भ्रातृभिर्नृप ।
किरीटमाली न्यविशद् असिहस्तः क्षिपन् रुषा ॥ ३६ ॥
तेंव्हा सुयोधनो मानी किरीट माळ लेवुनी । हातात खड्ग घेवोनी द्वारपालसा तुच्छितो ॥ ३६ ॥
नृप - हे परीक्षित राजा तत्र - त्या सभेत भ्रातृभिः परीतः - दुःशासनादि भावांनी वेष्टिलेला मानी - अभिमानी किरीटमाली असिहस्तः दुर्योधनः - मुकुटाने शोभणारा व हातात तलवार घेतलेला दुर्योधन रुषा क्षिपन् - रागाने लोकांची निंदा करीत न्यविशत् - प्रविष्ट झाला. ॥३६॥
त्याच वेळी अभिमानी दुर्योधन आपल्या भावांसह तेथे आला. त्याच्या डोयावर मुकुट, गळ्यामध्ये हार आणि हातत तलवार होती. परीक्षिता ! तो हार रागाने तेथील सेवकांना दरडावीत होता. (३६)
स्थलेऽभ्यगृह्णाद् वस्त्रान्तं जलं मत्वा स्थलेऽपतत् ।
जले च स्थलवद् भ्रान्त्या मयमायाविमोहितः ॥ ३७ ॥
भूमीसी जळ ते भासे जळासी भूमि त्या सभी । सुयोधन पडे त्यात भिजले वस्त्रही तसे ॥ ३७ ॥
मयमायाविमोहितः - मयासुराच्या मायेने मोहिलेला (सः) स्थले जलं मत्वा - तो दुर्योधन भूमीच्या ठिकाणी उदक मानून वस्त्रान्तं अभ्यगृह्णात् - वस्त्रांची टोके वर उचलून धरिता झाला स्थले च अपतत् - व त्यामुळे भूमीवर पडला स्थलवद्भ्रांत्या (च) जले (अपतत्) - आणि पाण्याच्या ठिकाणी जमीन आहे अशी कल्पना झाल्यामुळे पाण्यात पडला. ॥३७॥
मय दानवाने त्या सभेत अशी किमया केली होती की, दुर्योधन मोहित होऊन जमिनीला पाणी समजून त्याने आपली वस्त्रे वर केली आणि पाण्याला जमीन समजून तो तेथे आपटला. (३७)
जहास भीमस्तं दृष्ट्वा स्त्रियो नृपतयोऽपरे ।
निवार्यमाणा अप्यङ्ग राज्ञा कृष्णानुमोदिताः ॥ ३८ ॥
पडता हासला भीम राण्या नी नृपती पहा । धर्म रोधी परी कृष्णे हासण्या अनुमोदिले ॥ ३८ ॥
अंग - हे परीक्षित राजा भीमः तं दृष्टवा जहास - भीम या दुर्योधनाला पाहून हसला अपरे नृपतयः स्त्रियः (च) - दुसरे राजे व स्त्रिया ही राज्ञा निवार्यमाणाः अपि - राजाकडून निषेधिली जात असताहि कृष्णानुमोदिताः (जहसुः) - श्रीकृष्णाकडून संमति मिळालेली अशी हसली. ॥३८॥
तो पडल्याचे पाहून भीमसेन, राण्या आणि अन्य राजे हसू लागले. त्यावेळी युधिष्ठिर जरी त्यांना मनाई करीत होता, तरी श्रीकृष्णांची त्यांना संमती होती. (३८)
( मिश्र )
स व्रीडितोऽवाग्वदनो रुषा ज्वलन् निष्क्रम्य तूष्णीं प्रययौ गजाह्वयम् । हाहेति शब्दः सुमहानभूत् सतां अजातशत्रुर्विमना इवाभवत् । बभूव तूष्णीं भगवान्भुवो भरं समुज्जिहीर्षुर्भ्रमति स्म यद् दृशा ॥ ३९ ॥
( इंद्रवज्रा ) सुयोधनो लज्जित तेथ झाला नी क्रोधलासे बहुही मनात । नी चूप आला स्वपुरात तेंव्हा तै सज्जानांना बहु दुःख झाले । तो धर्मराजा बहु खिन्न झाला श्रीकृष्ण होते चुपचाप तैसे । मनात इच्छी हरण्यास भार तेणे तसा तो भ्रम त्यास झाला ॥ ३९ ॥
व्रीडितः अवाग्वदनः सः - लज्जित होऊन खाली मुख केलेला तो दुर्योधन रुषा ज्वलन् - रागाने जळफळत तूष्णीं निष्क्रम्य - मुकाटयाने निघून गजाह्वयं प्रययौ - हस्तिनापुराला गेला सतां सुमहान् हाहा इति शब्दः अभूत् - सज्जनांचा हा हा असा मोठा शब्द झाला अजातशत्रुः विमनाः इव अभवत् - धर्मराजा दुःखित झाल्याप्रमाणे दिसू लागला यदृशा भ्रमति स्म - ज्याच्या दृष्टीच्या योगे दुर्योधन भ्रम पावला भुवः भारं समुज्जिहीर्षुः - पृथ्वीचा भार दूर करण्याची इच्छा करणारा भगवान् - श्रीकृष्ण तूष्णीं बभूव - स्तब्ध राहिला. ॥३९॥
या घटनेमुळे दुर्योधन लज्जित झाला. तो क्रोधाने जळू लागला. आता तो मान खाली घालून गुपचुपपणे सभाभवनातून बाहेर पडून हस्तिनापुरला गेला. ही घटना पाहून सत्पुरुषांमध्ये हाहाकार माजला आणि धर्मराज काहीसा खिन्न झाला. भगवान श्रीकृष्ण मात्र गप्प बसले होते. कारण कोणत्याही प्रकारे का होईना, पृथ्वीचा भार त्यांना कमी करायचा होता. खरे तर त्यांनी पाहिल्यामुळेच दुर्योधनाला तो भ्रम झाला होता. (३९)
( अनुष्टुप् )
एतत्तेऽभिहितं राजन् यत्पृष्टोऽहमिह त्वया । सुयोधनस्य दौरात्म्यं राजसूये महाक्रतौ ॥ ४० ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे उत्तरार्धे दुर्योधनमानभंगो नाम पञ्चसप्ततितमोऽध्यायः ॥ ७५ ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
( अनुष्टुप् ) राजसूय महायज्ञीं क्रोधला कां सुयोधन । नृपा तू पुसले, सारी कथा मी वदलो तुला ॥ ४० ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर पंचाहत्तरावा अध्याय हा ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
राजन् - हे राजा राजसूये महाक्रतौ - राजसूय नामक मोठया यज्ञामध्ये यत् सुयोधनस्य दौरात्म्यं - जे दुर्योधनाचे दुराचरण त्वया अहं पृष्टः - तू मला विचारलेस (तत्) एतत् ते इह अभिहितं - ते हे आता मी तुला सांगितले. ॥४०॥ पंचाहत्तरावा अध्याय समाप्त
परीक्षिता ! त्या महान राजसूय यज्ञामध्ये दुर्योधनाचा जळफळाट का झाला, हे तू मला विचारले होतेस. ते सर्व मी तुला सांगितले. (४०)
अध्याय पंचाहत्तरावा समाप्त |