श्रीमद् भागवत पुराण
स्कन्द दहावा
अध्याय चौर्‍याहत्तरावा

राजसूये भगवतोऽग्रपूजनं ततो रुष्टस्य दुर्वदत्तः शिशुपालस्य भगवता वधश्च -

भगवंतांची अग्रपूजा आणि शिशुपालाचा उद्धार -


संहिता - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् )
एवं युधिष्ठिरो राजा जरासन्धवधं विभोः ।
कृष्णस्य चानुभावं तं श्रुत्वा प्रीतस्तमब्रवीत् ॥ १ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
( अनुष्टुप् )
जरासंध वधाचीही अशी अद्‌भुत ती लिला ।
कृष्णाची ऐकता धर्म प्रसन्न वदले असे ॥ १ ॥

एवं जरासन्धवधं - याप्रमाणे जरासंधाचा वध विभोः कृष्णस्य तं अनुभावं च श्रुत्वा - आणि समर्थ अशा श्रीकृष्णाचा तो पराक्रम श्रवण करून प्रीतः युधिष्ठिरः राजा - प्रसन्न झालेला धर्मराज तम् अब्रवीत् - त्या श्रीकृष्णाला म्हणाला. ॥१॥
श्रीशुक म्हणतात- जरासंधाच वध आणि सर्वशक्तिमान श्रीकृष्णांचा तो महिमा ऐकून राजा युधिष्ठिर प्रसन्न होऊन म्हणाला. (१)


श्रीयुधिष्ठिर उवाच -
ये स्युस्त्रैलोक्यगुरवः सर्वे लोकमहेश्वराः ।
वहन्ति दुर्लभं लब्ध्वा शिरसैवानुशासनम् ॥ २ ॥
राजा युधिष्ठिर म्हणाला -
सच्चिदानंद कृष्णारे ब्रह्मादि देवही तुझी ।
आज्ञेची पाहती वाट मिळता धारिती शिरी ॥ २ ॥

ये त्रैलोक्यगुरवः लोकमहेश्वराः सर्वे - जे त्रैलोक्यश्रेष्ठ असे सर्व मोठमोठे लोकपाल स्युः - आहेत (ते) दुर्लभं (तव) अनुशासनं लब्ध्वा - ते दुर्लभ अशा तुझ्या उपदेशाला मिळवून शिरसा एव वहन्ति - मस्तकानेच त्याला धारण करितात. ॥२॥
युधिष्ठिर म्हणाला- ब्रह्मदेवादी त्रैलोक्याचे स्वामी आणि इंद्रादी लोकपाल आपली दुर्मिळ आज्ञा मिळताच ती शिरोधार्य मानून तिचे पालन करतात. (२)


स भवान् अरविन्दाक्षो दीनानां ईशमानिनाम् ।
धत्तेऽनुशासनं भूमन् तदत्यन्तविडम्बनम् ॥ ३ ॥
अनंता आम्हि तो दीन परी मानोत भूपती ।
दंडपात्र असे आम्ही तरी तू ऐकशी अम्हा ॥ ३ ॥

भूमन् - हे सर्वश्रेष्ठ श्रीकृष्णा सः अरविन्दाक्षः भवान् - तो कमळनेत्र असा तू ईशमानिनां दीनानां (नः) अनुशासनं धत्ते - आपण राजे आहो हा अभिमान बाळगणार्‍या परंतु दीन अशा आमची आज्ञा धारण करितोस तत् अत्यंतविडम्बनम् - हे तुझे करणे फार अयोग्य आहे. ॥३॥
हे अनंता ! तेच कमलनयन आपण स्वत:ला राजे समजणार्‍या क्षुद्र अशा आमची आज्ञा पाळता ! खरे तर, ही आपल्याला न शोभणारीच लीला होय ! (३)


न ह्येकस्याद्वितीयस्य ब्रह्मणः परमात्मनः ।
कर्मभिर्वर्धते तेजो ह्रसते च यथा रवेः ॥ ४ ॥
उदयास्ती जसा भानू तेजें ना होय तो कमी ।
उल्हास तवही तैसा न होय कधिही कमी ।
तुला ना अपुले कोणी परके ही तसे नसे ॥ ४ ॥

एकस्य अद्वितीयस्य ब्रह्मणः परमात्मनः तेजः - एक, अद्वितीय व ब्रह्मस्वरूपी परमेश्वराचे तेज यथा रवेः - जसे सूर्याचे तसे कर्मभिः न वर्धते - कर्मांनी वाढत नाही न च हि ह्लसते - व कमीही होत नाही. ॥४॥
ज्याप्रमाणे उदय किंवा अस्तामुळे सूर्याचे तेज अधिक किंवा कमी होत नाही, त्याचप्रमाणे कोणत्याही कर्मांमुळे आपला प्रभाव कमी-जास्त होत नाही; कारण आपण एकमेवाद्वितीय परब्रह्म परमात्मा आहात. (४)


न वै तेऽजित भक्तानां ममाहमिति माधव ।
त्वं तवेति च नानाधीः पशूनामिव वैकृती ॥ ५ ॥
माझे तुझे असा भाव पशूच्या चित्ति तो वसे ।
भक्तांना नच ती बुद्धी तुजला ती मुळी नसे ॥ ५ ॥

अजित माधव - हे अजिंक्य लक्ष्मीपते श्रीकृष्णा ते भक्तानां - तुझ्या भक्तांना अहं मम इति त्वं तव इति च - मी माझे आणि तू तुझे अशा प्रकारची वैकृता नानाधीः - विकार उत्पन्न करणारी द्वैतबुद्धि पशूनाम् इव - पशूंप्रमाणे न वै (अस्ति) - खरोखर असत नाही. ॥५॥
हे अजिंक्य माधवा ! "मी-माझे किंवा तू-तुझे" या प्रकारची पशूंप्रमाणे विकृत भेदबुद्धी आपल्या भक्तांच्या चित्तामध्ये कधीही असत नाही. (५)


श्रीशुक उवाच -
इत्युक्त्वा यज्ञिये काले वव्रे युक्तान् स ऋत्विजः ।
कृष्णानुमोदितः पार्थो ब्राह्मणान् ब्रह्मवादिनः ॥ ६ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
या परी वदता धर्मे यज्ञाची वेळ पातता ।
वेदवादी द्विज तज्ञ आचार्या वर्णिले असे ॥ ६ ॥

इति उक्त्वा - असे म्हणून कृष्णानुमोदितः सः पार्थः - श्रीकृष्णाचे अनुमोदन घेतलेला तो कुंतीपुत्र धर्मराज यज्ञिये काले - यज्ञाला योग्य अशा वसंतऋतूमध्ये युक्तान् ब्रह्मवादिनः ऋत्विजः ब्राह्मणान् - योग्य ब्रह्मवेत्त्या ऋत्विज ब्राह्मणांना वव्रे - आमंत्रण देता झाला. ॥६॥
श्रीशुक म्हणतात- असे म्हणून युधिष्ठिराने श्रीकृष्णांच्या अनुमतीने, यज्ञासाठी योग्य मुहूर्तावर वेदज्ञ ब्राह्मणांना ऋत्विज म्हणून वरले. (६)


द्वैपायनो भरद्वाजः सुमन्तुर्गोतमोऽसितः ।
वसिष्ठश्च्यवनः कण्वो मैत्रेयः कवषस्त्रितः ॥ ७ ॥
विश्वामित्रो वामदेवः सुमतिर्जैमिनिः क्रतुः ।
पैलः पराशरो गर्गो वैशम्पायन एव च ॥ ८ ॥
अथर्वा कश्यपो धौम्यो रामो भार्गव आसुरिः ।
वीतिहोत्रो मधुच्छन्दा वीरसेनोऽकृतव्रणः ॥ ९ ॥
द्वैपायनो भरद्वाज सुमंत गौतमो असित् ।
वसिष्ठ च्यवनो कण्व मैत्रेय कवषो त्रित ॥ ७ ॥
विश्वामित्र वामदेव सुमती जैमिनी क्रतु ।
पैल पराशरो गर्ग वैशंपायनही तसे ॥ ८ ॥
अथर्वा कश्यपो धौम्य राम भार्गव आसुरी ।
वीतहोत्र मधुच्छंदा वीरसेनोऽकृतव्रण ॥ ९ ॥

द्वैपायनः भरद्वाजः सुमंतुः गौतमः असितः - व्यास, भरद्वाज, सुमंतु, गौतम व असित वसिष्ठः च्यवनः कण्वः मैत्रेयः कवषः त्रितः - वसिष्ठ, च्यवन, कण्व, मैत्रेय, कवष व त्रित. ॥७॥ विश्वामित्रः वामदेवः सुमतिः जैमिनिः क्रतुः - विश्वामित्र, वामदेव, सुमति, जैमिनि, व क्रतु पैलः पराशरः गर्गः वैशंपायनः च एव - पैल, पराशर, गर्ग आणि वैशंपायनहि. ॥८॥ अथर्वा कश्यपः धौ‌म्यः रामः भार्गवः आसुरिः - अथर्वा, कश्यप, धौ‌म्य, परशुराम, भार्गव, आसुरि वीतिहोत्रः मधुच्छंदः वीरसेनः अकृतव्रणः - वीतिहोत्र, मधुच्छंद, वीरसेन, अकृतव्रण ॥९॥
व्यास, भरद्वाज, सुमंतू, गौतम, असित, वसिष्ठ, च्यवन, कण्व, मैत्रेय, कवष, त्रित, विश्वामित्र, वामदेव, सुमती, जैमिनी, क्रतू, पैल, पराशर, गर्ग, वैशंपायन,अथर्वा, कश्यप, धौ‍म्य, परशुराम, शुक्राचार्य, आसुरी, वीतिहोत्र, मधुच्छंदा, वीरसेन आणि अकृतवर्ण अशी त्यांची नावे होती. (७-९)


उपहूतास्तथा चान्ये द्रोणभीष्मकृपादयः ।
धृतराष्ट्रः सहसुतो विदुरश्च महामतिः ॥ १० ॥
उपस्थित असे अन्य द्रोण भीष्म कृपा तसे ।
सपुत्र धृतराष्ट्रो नी विदुर ते महामती ॥ १० ॥

तथा - त्याप्रमाणे सहसुतः धृतराष्ट्रः - पुत्रांसह धृतराष्ट्र च महामतिः विदुरः - आणि मोठा बुद्धिमान विदुर तथा च द्रोणभीष्मकृपादयः अन्ये - त्याचप्रमाणे आणखी द्रोण, भीष्म, कृप इत्यादि दुसरेहि उपहूताः - बोलविले गेले. ॥१०॥
तसेच द्रोणाचार्य, भीष्म, कृपाचार्य, धृतराष्ट्र व त्याचे पुत्र आणि बुद्धीमान विदुर यांनाही आमंत्रित केले. (१०)


ब्राह्मणाः क्षत्रिया वैश्याः शूद्रा यज्ञदिदृक्षवः ।
तत्रेयुः सर्वराजानो राज्ञां प्रकृतयो नृप ॥ ११ ॥
यज्ञ पहावया विप्र क्षत्रियो वैश्य शूद्र ही ।
पातले सर्वची राजे मंत्री त्याचे नि सेवक ॥ ११ ॥

नृप - हे परीक्षित राजा तत्र - तेथे यज्ञदिदृक्षवः - यज्ञ पहाण्यास इच्छिणारे ब्राह्मणाः क्षत्रियाः वैश्याः शूद्राः - ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र सर्वराजानः राज्ञां प्रकृतयः च - सर्व राजे व राजांच्या प्रजा ईयुः - आल्या. ॥११॥
राजन ! राजसूय यज्ञ पाहाण्यासाठी सर्व देशांतील राजे, त्यांचे मंत्री व सेवक, तसेच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे सर्व वर्णांचे लोकही तेथे आले. (११)


ततस्ते देवयजनं ब्राह्मणाः स्वर्णलाङ्‌गलैः ।
कृष्ट्वा तत्र यथाम्नायं दीक्षयां चक्रिरे नृपम् ॥ १२ ॥
सुवर्णनांगरे विप्रे भूमि नांगरुनी पुन्हा ।
यज्ञदीक्षा दिली धर्मा शास्त्रानुसार ती तशी ॥ १२ ॥

ततः ते ब्राह्मणाः - नंतर ते ब्राह्मण स्वर्णलाङगलैः देवयजनं कृष्टवा - सुवर्णाच्या नांगरांनी यज्ञभूमि नांगरून तत्र - तेथे नृपं यथाम्नायं दीक्षयांचक्रिरे - धर्मराजाला वैदिक नियमाप्रमाणे यज्ञदीक्षा देते झाले. ॥१२॥
यानंतर ऋत्विजांनी सोन्याच्या यज्ञभूमी नांगरून युधिष्ठिराला शास्त्रानुसार यज्ञाची दीक्षा दिली. (१२)


हैमाः किलोपकरणा वरुणस्य यथा पुरा ।
इन्द्रादयो लोकपाला विरिञ्चिभवसंयुताः ॥ १३ ॥
सगणाः सिद्धगन्धर्वा विद्याधरमहोरगाः ।
मुनयो यक्षरक्षांसि खगकिन्नरचारणाः ॥ १४ ॥
राजानश्च समाहूता राजपत्‍न्यश्च सर्वशः ।
राजसूयं समीयुः स्म राज्ञः पाण्डुसुतस्य वै ॥ १५ ॥
सोन्याची सर्व ती पात्रे वरुणापरि आणिली ।
प्राचीन काळि जै त्यान यज्ञात मेळिशी तशी ॥ १३ ॥
आवाहिताचि ते ब्रह्मा इंद्रादी लोकपाल ते ।
सिद्ध विद्याधरो यक्ष तसे गंधर्व नाग नी ॥ १४ ॥
राक्षसो मुनि नी तैसे खग किन्नर चारण ।
सपत्‍न सर्व ते आले पहाया यज्ञ तो असा ॥ १५ ॥

किल - असे ऐकण्यात आहे की यथा - ज्याप्रमाणे पुरा - पूर्वी वरुणस्य (राजसूये) - वरुणाच्या राजसूयाच्या वेळी हैमाः उपकरणाः - सोन्याची पात्रे विरिञ्चभवसंयुताः इन्द्रादयः लोकपालाः - ब्रह्मदेव व शंकर ह्यांच्यासह इंद्रादि लोकपाल. ॥१३॥ सगणाः सिद्धगन्धर्वाः - गणांसह सिद्ध व गंधर्व विद्याधरमहोरगाः - विद्याधर व मोठमोठे नाग मुनयः यक्षरक्षांसी - ऋषी, यक्ष व राक्षस खगकिन्नरचारणाः - पक्षी, किन्नर व चारण. ॥१४॥ सर्वशः समाहूताः - सर्व ठिकांणाहून बोलाविलेले राजानः च राजपत्‍न्यः च - राजे व राजस्त्रियाहि पांडुसुतस्य राज्ञः वै राजसूयं - पांडुपुत्र धर्मराजाच्याहि राजसूय यज्ञाला समीयुः स्म - आली होती अविस्मिताः - आश्चर्यचकित न झालेले असे कृष्णभक्तस्य (राजसूयं) सूपपन्नम् मेनिरे - भगवद्‌भक्त धर्मराजाचा राजसूय सर्व साहित्याने पूर्ण मानिते झाले. ॥१५॥
प्राचीन काळी वरुणदेवाच्या यज्ञामध्ये ज्याप्रमाणे यज्ञपात्रे सोन्याची होती, त्याचप्रमाणे युधिष्ठिराच्या यज्ञामध्येसुद्धा होती. पांडुनंदन युधिष्ठिराच्या निमंत्रणानुसार ब्रह्मदेव, शंकर, इंद्रादी लोकपाल, आपल्या गणांसह सिद्ध आणि गंधर्व, विद्याधर, नाग, मुनी, यक्ष, राक्षस, पक्षी, किन्नर, चारण, राजे, राण्या वगैरे निरनिराळ्या ठिकाणांहून तेथे आले. (१३-१५)


मेनिरे कृष्णभक्तस्य सूपपन्नमविस्मिताः ।
अयाजयन् महाराजं याजका देववर्चसः ।
राजसूयेन विधिवत् प्रचेतसमिवामराः ॥ १६ ॥
राजसूय असा यज्ञ करण्या पात्र हा नृप ।
मानिले सर्व त्या लोके भक्ताला काय ते उणे ।
वरुणा परि तो केला धर्मे यज्ञ विधि जसा ॥ १६ ॥

देववर्चसः याजकाः - देवांप्रमाणे आहे तेज ज्यांचे असे पुरोहित अमराः प्राचेतसम् इव - देव जसे वरुणाच्या यज्ञाला त्याप्रमाणे महाराजं राजसूयेन विधिवत् अयाजयन् - धर्मराजाकडून राजसूय यज्ञाचे अनुष्ठान यथाविधि करविते झाले. ॥१६॥
कृष्णभक्ताने राजसूय यज्ञ करणे हे योग्यच आहे, असेच सर्वांना वाटले. त्यात त्यांना आश्चर्य वाटले नाही. जसा पूर्वी देवांनी वरुणाकडून यज्ञ करविला होता, त्याप्रमाणे यावेळी देवांसारख्या तेजस्वी ऋत्विजांनी युधिष्ठिराकडून विधिपूर्वक राजसूय यज्ञ करविला. (१६)


सूत्येऽहन्यवनीपालो याजकान् सदसस्पतीन् ।
अपूजयन् महाभागान् यथावत् सुसमाहितः ॥ १७ ॥
सोमरसदिनी धर्मे पुजिले तज्ञ लोक ते ।
निरीक्षिती चुका जे की कोठेही तृटि ना असो ॥ १७ ॥

सुसमाहितः अवनीपालः - स्वस्थ अंतःकरणाचा धर्मराज सौत्ये अहनि - सोमरस काढण्याच्या दिवशी महाभागान् याजकान् सदसस्पतीन् (च) - मोठया भाग्यवान ऋत्विजांना व सभाध्यक्षांना यथावत् अपूजयत् - यथाशास्त्र पूजिता झाला. ॥१७॥
सोमरस काढण्याच्या दिवशी युधिष्ठिराचे पूज्य याजक आणि सदसस्पतींचे मनापासून विधिपूर्वक पूजन केले.(१७)


सदस्याग्र्यार्हणार्हं वै विमृशन्तः सभासदः ।
नाध्यगच्छन् नन्ननैकान्त्यात् सहदेवस्तदाब्रवीत् ॥ १८ ॥
सदस्य करिती चर्चा अग्रपूजार्थ कोण हो ।
न होय मत ते एक वदला सहदेव तो ॥ १८ ॥

सदस्याग्यार्हणार्हं विमृशन्तः - सभासदांतील कोण अग्रपूजेला योग्य आहे असा विचार करणारे सभासदः - सभेतील शिष्ट लोक अनैकान्त्यात् - अनेक योग्य पुरुष असल्यामुळे न वै अध्यगच्छन् - खरोखर ठरवू शकले नाहीत तदा सहदेवः अब्रवीत् - त्यावेळी सहदेव म्हणाला. ॥१८॥
त्या यज्ञात कोणत्या सर्वश्रेष्ठ सदस्याची अग्रपूजा करावी यावर सभासद विचार-विनिमय करू लागले. जितक्या मती, तितकी मते ! म्हणून काहीच निर्णय होऊ शकला नाही. तेव्हा सहदेव म्हणाला. (१८)


अर्हति ह्यच्युतः श्रैष्ठ्यं भगवान्सात्वतां पतिः ।
एष वै देवताः सर्वा देशकालधनादयः ॥ १९ ॥
अग्रपूजार्थ तो पात्र भक्तवत्सल कृष्णची ।
सर्वरूपी असा तोचि देवतारूप तोच की ॥ १९ ॥

सात्वतांपतिः भगवान् अच्युतः - यादवाधिपति भगवान श्रीकृष्ण श्रैष्ठयं अर्हति हि - अग्रपूजेचा श्रेष्ठ मान घेण्याला खरोखर योग्य आहे एषः वै - हा कृष्ण खरोखर सर्वाः देवताः - सर्व देवतास्वरूपी देशकालधनादयः - देश, काल, धन इत्यादि. ॥१९॥
यदुश्रेष्ठ भगवान श्रीकृष्णच सर्व सदस्यांमध्ये श्रेष्ठ आहेत. कारण तेच देव, देश, काल, धन इत्यादी सर्व काही आहेत. (१९)


यस् आत्मकमिदं विश्वं क्रतवश्च यदात्मकाः ।
अग्निराहुतयो मंत्राः साङ्ख्यं योगश्च यत्परः ॥ २० ॥
कृष्णरूप असे विश्व यज्ञही कृष्णरूपची ।
आहुती अग्नि नी मंत्र कृष्णरूपचि सर्व ते ।
ज्ञान कर्म द्वया हेतू मेळिणे कृष्ण एक तो ॥ २० ॥

इदं विश्वं यदात्मकं - हे जग ज्या कृष्णाचे स्वरूप आहे क्रतवः च यदात्मकाः - आणि यज्ञ ज्याचे स्वरूप आहेत अग्निः आहुतयः मन्त्राः साङ्ख्यं योगः च - अग्नि, आहुति, मंत्र, सांख्य आणि योग यत्परः - ज्याला श्रेष्ठ मानणारे आहेत. ॥२०॥
हे सर्व विश्व ज्यांचे रूप आहे, सर्व यज्ञसुद्धा ज्यांची रूपे आहेत, तसेच अग्नी, आहुती, मंत्र हीही ज्यांची रूपे आहेत, ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्ग हे दोन्हीही ज्यांच्या प्राप्तीसाठीच आहेत, असे हे एकटेच आहेत. (२०)


एक एवाद्‌वितीयोऽसौ अवैतदात्म्यमिदं जगत् ।
आत्मनात्माश्रयः सभ्याः सृजत्यवति हन्त्यजः ॥ २१ ॥
अद्वितीय असे ब्रह्म न विकार न भेद त्यां ।
संकल्पे निर्मि तो सृष्टी पोषितो मारितो तसा ॥ २१ ॥

सभ्याः - अहो सभासद हो असौ एकः एव अद्वितीयः (अस्ति) - हा एकच द्वैतरहित असा आहे इदं जगत् वा एतदात्म्यं - आणि हे जग त्याचेच स्वरूप आहे आत्मना आत्माश्रयः अजः - आत्म्याच्या योगे स्वतःचा आश्रय घेणारा श्रीकृष्ण सृजति अवति हन्ति - उत्पन्न करितो, रक्षण करितो व संहार करितो. ॥२१॥
सभासदांनो ! हेच एक अद्वितीय ब्रह्म आहेत. हे संपूर्ण जगत यांचेच स्वरूप आहे. ते अजन्मा असून स्वत:मध्येच स्वत:च विश्वाची उत्पत्ती पालन आणि संहार करतात. (२१)


विविधानीह कर्माणि जनयन् यदवेक्षया ।
ईहते यदयं सर्वः श्रेयो धर्मादिलक्षणम् ॥ २२ ॥
अनुग्रहे तयाच्याची जग हे कर्म ते करी ।
धर्मार्थ काम मोक्षाते मेळिण्या झटती पहा ॥ २२ ॥

इह - ह्या जगामध्ये अयं सर्वः - हा सर्व जनसमूह यदवेक्षया - ज्या श्रीकृष्णाच्या कृपावलोकनाने विविधानि कर्माणि जनयन् - अनेक प्रकारची कर्मे करीत यत् - ज्या कारणास्तव धर्मादिलक्षणं श्रेयः ईहते - धर्म, अर्थ, काम व मोक्ष ह्या चार लक्षणांनी युक्त अशा कल्याणाला इच्छितो. ॥२२॥
सगळे जग ज्यांच्या कृपेने अनेक प्रकारच्या कर्मांचे अनुष्ठान करून चारही पुरुषार्थांचे फळ प्राप्त करून घेते. (२२)


तस्मात् कृष्णाय महते दीयतां परमार्हणम् ।
एवं चेत्सर्वभूतानां आत्मनश्चार्हणं भवेत् ॥ २३ ॥
म्हणोनी भगवान् कृष्ण अग्रपूजार्थ पात्र तो ।
त्याच्या पूजेत सर्वांची आपुली घडते पुजा ॥ २३ ॥

तस्मात् - म्हणून महते कृष्णाय - श्रेष्ठ अशा श्रीकृष्णाला परमार्हणं दीयताम् - अग्रपूजेचा मान द्यावा एवं चेत् - असे केले असता सर्वभूतानां आत्मनः च अर्हणं भवेत् - सर्व प्राणिमात्रांचे व आत्म्याचेहि पूजन केल्यासारखे होईल. ॥२३॥
म्हणून त्याच या सर्वांमध्ये श्रेष्ठ अशा भगवान श्रीकृष्णांचीच अग्रपूजा करा. त्यांची पूजा करण्याने चराचराच्या आत्म्याचीच पूजा होणार आहे. (२३)


सर्वभूतात्मभूताय कृष्णायानन्यदर्शिने ।
देयं शान्ताय पूर्णाय दत्तस्यानन्त्यमिच्छता ॥ २४ ॥
अनंत भाव ठेवोनी दान धर्मास इच्छि जो ।
शांत पूर्ण असा कृष्ण भगवान् पूजिणे तये ॥ २४ ॥

दत्तस्य आनन्त्यम् इच्छता - दिलेल्याच्या अनंतपटीने अधिक फलाची इच्छा करणार्‍या पुरुषाने सर्वभूतात्मभूताय - सर्व प्राण्यांच्या ठिकाणी आत्मरूपाने रहाणार्‍या अनन्य दर्शिने शान्ताय पूर्णाय कृष्णाय - समबुद्धीने पहाणार्‍या, शांत व पूर्ण अशा श्रीकृष्णाला देयं - द्यावे. ॥२४॥
आपण दिलेले अनन्त व्हावे, असे वाटत असेल, तर चराचराचा अंतरात्मा, भेदरहित, विकाररहित तसेच परिपूर्ण अशा भगवान श्रीकृष्णांची अग्रपूजा करावी. (२४)


इत्युक्त्वा सहदेवोऽभूत् तूष्णीं कृष्णानुभाववित् ।
तच्छ्रुत्वा तुष्टुवुः सर्वे साधु साध्विति सत्तमाः ॥ २५ ॥
कृष्णाचा महिमा पूर्ण जाणी तो सहदेव नी ।
बोलणे थांबता सर्वे केले त्याचे समर्थन ॥ २५ ॥

कृष्णानुभाववित् सहदेवः - श्रीकृष्णाचा पराक्रम जाणणारा सहदेव इति उक्त्वा तूष्णीं अभूत् - असे बोलून स्वस्थ बसला तत् श्रुत्वा - ते ऐकून सर्वे सत्तमाः - मोठमोठे सर्व साधु सभासद साधु साधु इति तुष्टुवुः - चांगले चांगले असे म्हणून स्तुती करू लागले. ॥२५॥
भगवंतांचा महिमा जाणणारा सहदेव एवढे बोलून गप्प बसला. ते ऐकून सर्व महात्म्यांनी "अगदी योग्य ! अगदी योग्य !" असे म्हणून सहदेवाच्या म्हणण्याचे समर्थन केले. (२५)


श्रुत्वा द्‌विजेरितं राजा ज्ञात्वा हार्दं सभासदाम् ।
समर्हयद्‌धृषीकेशं प्रीतः प्रणयविह्वलः ॥ २६ ॥
अभिप्राय द्विजांचाही जाणिला श्री युधिष्ठिरे ।
प्रेमाने पूजिले त्याने श्रीकृष्णां पुरुषोत्तमा ॥ २६ ॥

प्रणयविह्वलः राजा - प्रेमाने विव्हल झालेला धर्मराज द्विजेरितं श्रुत्वा प्रीतः - ब्राह्मणांचे भाषण ऐकून प्रसन्न झालेला सभासदां हार्दं ज्ञात्वा - सभेतील लोकांचे हृद्‌गत जाणून हृषीकेशं समर्हयत् - श्रीकृष्णाची पूजा करिता झाला. ॥२६॥
सर्वांचा हा पाठिंबा ऐकून व सभासदांचे मनोगत जाणून युधिष्ठिराने मोठ्या आनंदाने व प्रेमभराने श्रीकृष्णांची यथासांग पूजा केली. (२६)


तत्पादाववनिज्यापः शिरसा लोकपावनीः ।
सभार्यः सानुजामात्यः सकुटुम्बो वहन्मुदा ॥ २७ ॥
पत्‍नी बंधू नि मंत्र्यांच्या सह श्रीधर्मराजने ।
कृष्णाचे धुतले पाय तीर्थ ते घेतले शिरीं ॥ २७ ॥

सभार्यः सानुजामात्यः सकुटुंबः (सः) - भार्येसह व भाऊ व प्रधान ह्यांसह व परिवारासह तो धर्मराज तत्पादौ अवनिज्य - त्या श्रीकृष्णाचे पाय धुऊन मुदा - आनंदाने लोकपावनीः अपः शिरसा अवहत् - लोकांना पवित्र करणारे उदक मस्तकाने धारण करिता झाला. ॥२७॥
प्रथम त्याने भगवंतांचे चरण प्रक्षालन केले आणि ते त्रिभुवनाला पावन करणारे चरणतीर्थ पत्‍नी, भाऊ, मंत्री आणि कुटुंबियांसह अतिशय आनंदाने आपल्या मस्तकावर धारण केले. (२७)


वासोभिः पीतकौषेयैः भूषणैश्च महाधनैः ।
अर्हयित्वाश्रुपूर्णाक्षो नाशकत् समवेक्षितुम् ॥ २८ ॥
पिवळी रेशमी वस्त्रे अलंकारहि अर्पिले ।
आनंदे पातले अश्रू न पाहू शकती तया ॥ २८ ॥

अश्रुपूर्णाक्षः (सः) - ज्याच्या नेत्रांतून आनंदाश्रु वहात आहेत असा तो धर्मराज पीतकौशेयैः वासोभिः - पिवळ्या रेशमी वस्त्रांनी महाधनैः भूषणैः च - आणि अमूल्य अलंकारांनी अर्हयित्वा - पूजून समवेक्षितुं न अशकत् - पहाण्यास समर्थ झाला नाही. ॥२८॥
त्याने भगवंतांना पीतांबर आणि मौल्यवान अलंकार अर्पण केले. त्यावेळी त्याचे डोळे आनंदाश्रूंनी इतके भरून आले होते की, तो भगवंतांना नीट पाहूही शकत नव्हता. (२८)


इत्थं सभाजितं वीक्ष्य सर्वे प्राञ्जलयो जनाः ।
नमो जयेति नेमुस्तं निपेतुः पुष्पवृष्टयः ॥ २९ ॥
पाहता कृष्णपूजाही सर्वांनी हात जोडिले ।
वंदिता जय् जयकारे फुलांची वृष्टी जाहली ॥ २९ ॥

सर्वे जनाः - सर्व लोक इत्थं सभाजितं (तं) वीक्ष्य - याप्रमाणे पूजिलेल्या त्या श्रीकृष्णाला पाहून प्राञ्जलयः - हात जोडून जय - तुझा जय असो (ते) नमः (अस्तु) - तुला नमस्कार असो इति - असे म्हणून तं नेमुः - त्या श्रीकृष्णाला नमस्कार करिते झाले (तदा) पुष्पवृष्टयः निपेतुः - त्या वेळी पुष्पवृष्टि झाली. ॥२९॥
भगवान श्रीकृष्णांची अशा प्रकारे केलेली पूजा पाहून सर्व लोक हात जोडून " नमो नम: ! जय जय ! " असा त्यांचा जयजयकार करून त्यांना नमस्कार करू लागले. त्याचवेळी आकाशातून आपोआप पुष्पवृष्टी होऊ लागली. (२९)


( वसंततिलका )
इत्थं निशम्य दमघोषसुतः स्वपीठाद्
     उत्थाय कृष्णगुणवर्णनजातमन्युः ।
उत्क्षिप्य बाहुमिदमाह सदस्यमर्षी
     संश्रावयन् भगवते परुषाण्यभीतः ॥ ३० ॥
( वसंततिलका )
बैसोनि पाहि शिशुपाल गुणास ऐके
     क्रोधे भरोनि मग तो उठला सभेत ।
निष्ठूर शब्द वदला करि हातवारे
     नी हीन शब्द हरिशी करिही तसेची ॥ ३० ॥

इत्थं निशम्य - याप्रमाणे ऐकून कृष्णगुणवर्णनजातमन्युः - श्रीकृष्णाच्या गुणवर्णनांनी ज्याला क्रोध आला आहे असा दमघोषसुतः - दमघोष राजाचा पुत्र शिशुपाल स्वपीठात् उत्थाय - आपल्या आसनावरून उठून अमर्षी - रागावलेला असा बाहुं उत्क्षिप्य - बाहु वर करून अभीतः - भीति न बाळगता सदसि भगवते परुषाणि संश्रावयन् - सभेत श्रीकृष्णाला कठोर भाषणे ऐकवीत इदम् आह - याप्रमाणे बोलला. ॥३०॥
शिशुपालाने हे सर्व पाहिले. श्रीकृष्णांचे गुण ऐकून त्याला अतिशय राग आला आणि तो आसनावरून उठून उभा राहिला आणि भर सभेत हात उंचावून, मोठ्या क्रोधाने कोणाची भीड न ठेवता, भगवंतांना अर्वाच्य शब्द बोलू लागला. (३०)


( अनुष्टुप् )
ईशो दुरत्ययः काल इति सत्यवती स्रुतिः ।
वृद्धानामपि यद् बुद्धिः बालवाक्यैर्विभिद्यते ॥ ३१ ॥
( अनुष्टुप् )
कालची ईश तो सत्य श्रुतिवाक्य असे तसे ।
तेणेचि मूर्खवाक्याने वृद्धांची बुद्धि ती भ्रमे ॥ ३१ ॥

दुरत्ययः कालः ईशः (अस्ति) - अविनाशी काळ हा सर्व काही करण्यास समर्थ आहे इति श्रुतिः सत्यवती - असे जे वैदिक वाक्य ते खरे आहे यत् - कारण बालवाक्यैः - पोरांच्या भाषणांनी वृद्धानाम् अपि बुद्धिः - वृद्धांचीहि बुद्धि विभिद्यते - भेद पावते. ॥३१॥
सभासदांनो ! अटळ काळच ईश्वर आहे, हे वेदांचे म्हणणे अक्षरश: खरे आहे, त्यामुळेच येथे बालबुद्धी व्यक्तीच्या बोलण्याने ज्ञानवृद्धांची बुद्धीसुद्धा चक्रावून गेली आहे. (३१)


यूयं पात्रविदां श्रेष्ठा मा मन्ध्वं बालभाषीतम् ।
सदसस्पतयः सर्वे कृष्णो यत् सम्मतोऽर्हणे ॥ ३२ ॥
सदस्यांनो तुम्ही श्रेष्ठ न माना सहदेवचे ।
योग्य व्यक्ती दुजा कोणी निवडा अग्रपूजनी ॥ ३२ ॥

सदसस्पतयः - अहो सभासद हो पात्रविदां श्रेष्ठाः यूयं सर्वे - पात्रापात्रविचार करणार्‍यांमध्ये श्रेष्ठ असे तुम्ही सर्व बालभाषितं मा मन्ध्वं - त्या बालाचे भाषण मानू नका यत् - ज्या भाषणावरून कृष्णः - श्रीकृष्ण अर्हणे - अग्रपूजेविषयी (युष्माभिः) संमतः - तुम्हाकडून योग्य मानिला गेला. ॥३२॥
अग्रपूजेसाठी कोण योग्य आहे, याचा निर्णय करण्यास आपण समर्थ आहात. म्हणून हे सदसस्पतींनो ! ’कृष्ण अग्रपूजेसाठी योग्य आहे’ हे अजाण सहदेवाचे बोलणे तुम्ही मान्य करू नका. (३२)


तपोविद्याव्रतधरान् ज्ञानविध्वस्तकल्मषान् ।
परमऋषीन् ब्रह्मनिष्ठान् लोकपालैश्च पूजितान् ॥ ३३ ॥
सदस्पतीन् अतिक्रम्य गोपालः कुलपांसनः ।
यथा काकः पुरोडाशं सपर्यां कथमर्हति ॥ ३४ ॥
तपस्वी ज्ञानिही तुम्ही ताप शांत करीतसा ।
ब्रह्मनिष्ठ असे तुम्ही पूजिती लोकपालही ॥ ३३ ॥
निरीक्षक असा तुम्ही गवळी पूजिता कसा ।
कावळा अधिकारी हा यज्ञभागास होतसे ॥ ३४ ॥

तपोविद्याव्रतधरान् - तपश्‍चर्या, विद्या व व्रते धारण करणार्‍या ज्ञानविध्वस्तकल्मषान् - ज्ञानाने नष्ट झाली आहेत पातके ज्यांची अशा लोकपालैः पूजितान् - लोकपालांनी पूजिलेल्या च - आणि ब्रह्मनिष्ठान् सदस्पतीन् परमर्षीन् - ब्रह्मनिष्ठ व सभापति अशा मोठमोठया ऋषींना अतिक्रम्य - वगळून कुलपांसनः गोपालः - कुळाला बटटा लावणारा गवळी श्रीकृष्ण यथा काकःपुरोडाशं (तथा) - जसा कावळा हविर्भागाला तसा सपर्यां कथम् अर्हति - पूजेला कसा योग्य होतो ? ॥३३-३४॥
येथे तपस्वी, विद्वान, व्रते धारण करणारे, ज्ञानाने पाप नाहीसे केलेले, लोकपालांनीही पूजिलेले ब्रह्मनिष्ठ श्रेष्ठ ऋषी आहेत. (३३) सभेतील श्रेष्ठांना सोडून हा कुलाला कलंक असलेला गोपाळ अग्रपूजेचा अधिकारी कसा होऊ शकेल बरे ? कावळा कधी यज्ञाच्या पुरोडाशाचा अधिकारी होऊ शकतो काय ? (३४)


वर्णाश्रमकुलापेतः सर्वधर्मबहिष्कृतः ।
स्वैरवर्ती गुणैर्हीनः सपर्यां कथमर्हति ॥ ३५ ॥
धर्मबाह्य असा हा तो वर्ण आश्रम ना कुल ।
उल्लंघी धर्ममर्यादा पूजा ही करिता कशी ॥ ३५ ॥

वर्णाश्रमकुलापेतः - वर्ण, आश्रम आणि कुल ह्यांनी रहित सर्वधर्मबहिष्कृतः - सर्व धर्मांनी ज्याला बाहेर टाकिले आहे असा स्वैरवर्ती - स्वच्छंदाने वागणारा गुणैर्हीनः - एकहि गुण ज्याच्याजवळ नाही असा सपर्यां कथं अर्हति - पूजेला कसा योग्य होतो ? ॥३५॥
याला कोणताही वर्ण नाही की आश्रम नाही. हा उच्च कुळातही जन्मलेला नाही. हा सर्व धर्मांच्या बाहेर आहे. हा स्वैर वर्तन करणारा आहे. याच्या अंगी कोणतेही गुण नाहीत. अशा स्थितीत हा अग्रपूजेला कसा पात्र होऊ शकतो ? (३५)


ययातिनैषां हि कुलं शप्तं सद्‌भिर्बहिष्कृतम् ।
वृथापानरतं शश्वत् सपर्यां कथमर्हति ॥ ३६ ॥
ययातीने यया वंशा शापिले संत मानिती ।
आसक्त मधुपानाचा पूजा मान्य कशी असे ॥ ३६ ॥

एषां कुलं हि ययातिना शप्तं - खरोखर ह्यांच्या कुळाला ययातीने शाप दिला आहे सद्‌भिः बहिष्कृतं - साधूंनी ते बहिष्कृत केले आहे शश्वत् वृथापानरतं (तत्) - वारंवार निष्कारण मद्य प्राशन करण्यात आसक्त झालेले ते कुळ सपर्यां कथम् अर्हति - अग्रपूजेच्या मानास कसे योग्य आहे ? ॥३६॥
ययातीने याच्या वंशाला शाप दिलेला आहे, म्हणूनच सत्पुरुषांनी याच्या वंशालाच बहिष्कृत केले आहे. हा नेहमी धर्मबाह्य मधुपानात आसक्त असतो. तर मग हा अग्रपूजेला कसा पात्र असू शकेल ? (३६)


ब्रह्मर्षिसेवितान् देशान् हित्वैतेऽब्रह्मवर्चसम् ।
समुद्रं दुर्गमाश्रित्य बाधन्ते दस्यवः प्रजाः ॥ ३७ ॥
मथुरा संतभूमी ही निषिद्ध द्वारकीं वसे ।
येता बाहेर तेथोनी डाकूच्या परि त्रासि हा ॥ ३७ ॥

एते दस्यवः - हे चोर ब्रह्मर्षिसेवितान् देशान् हित्वा - ब्रह्मर्षींनी सेविलेले देश टाकून अब्रह्मवर्चसं समुद्रं दुर्गं आश्रित्य - ब्रह्मतेजाचा जेथे अभाव आहे अशा समुद्रातील दुर्गम स्थानाचा आश्रय घेऊन प्रजाः बाधन्ते - प्रजांना पीडा देत आहेत. ॥३७॥
या सर्वांनी ब्रह्मर्षी राहात असलेल्या देशांचा त्याग केला आणि वेदचर्चा नसलेल्या समुद्रात किल्ला बांधून हे राहू लागले. तेथे राहून हे चोर सर्व प्रजेला त्रास देतात. (३७)


एवं आदीन्यभद्राणि बभाषे नष्टमङ्‌गलः ।
नोवाच किञ्चिद् भगवान् यथा सिंहः शिवारुतम् ॥ ३८ ॥
परीक्षित् ! शिशुपालाचे संपले पुण्य सर्व ते ।
कृष्ण ध्यान ना देई सिंह कोल्ह्यास लक्षि जै ॥ ३८ ॥

नष्टमंगलः - ज्याचे मंगल नाश पावले आहे असा तो शिशुपाल एवमादिनि अभद्राणि बभाषे - अशा प्रकारची वाईट भाषणे बोलला यथा सिंहः शिवारुतं (न प्रतिवदति) - जसा कोल्हीच्या ओरडण्याला सिंह उत्तर देत नाही त्याप्रमाणे भगवान् किंचित् न उवाच - श्रीकृष्ण काहीहि उत्तर देता झाला नाही. ॥३८॥
शिशुपालाचे सर्व पुण्य संपले होते; म्हणूनच तो यासारखे अर्वाच्य बोल श्रीकृष्णांना उद्देशून बोलत होता. परंतु सिंह जसा कोल्ह्याच्या कोल्हेकुईकडे लक्ष देत नाही, त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण त्यावर काहीच बोलले नाहीत. (३८)


भगवन् निन्दनं श्रुत्वा दुःसहं तत्सभासदः ।
कर्णौ पिधाय निर्जग्मुः शपन्तश्चेदिपं रुषा ॥ ३९ ॥
कान बंद करोनीया शिव्या देवोनिया तसे ।
सदस्य उठुनी गेले निंदा ती न सहे तदा ॥ ३९ ॥

सभासदः - सभेतील लोक तत् दुःसहं भगवन्निन्दनं श्रुत्वा - सहन करण्यास कठीण अशी ती भगवंताची निंदा ऐकून रुषा चेदिपं शपन्तः - क्रोधाने शिशुपालाला शाप देत कर्णौ पिधाय निर्जग्मुः - कान झाकून बाहेर गेले. ॥३९॥
परंतु भगवंतांची निंदा ऐकणे सभासदांना असह्य झाले. त्यांपैकी काहीजण कानांवर हात ठेवून क्रोधाने शिशुपालाला शिव्या-शाप देत बाहेर निघून गेले. (३९)


निन्दां भगवतः श्रृण्वन् तत्परस्य जनस्य वा ।
ततो नापैति यः सोऽपि यात्यधः सुकृताच्च्युतः ॥ ४० ॥
संपते पुण्य ते सारे ऐकता हीन वाक्य ते ।
संतांची ऐकता निंदा मिळते ती अधोगती ॥ ४० ॥

यः - जो भगवतः - भगवान श्रीकृष्णाची वा तत्परस्य जनस्य - किंवा भगवान श्रीकृष्णाची सेवा करणार्‍या पुरुषाची निंदां शृण्वन् - निंदा ऐकत ततः न अपैति - तेथून दूर जात नाही सः अपि - तो सुद्धा सुकृतात् च्युतः - पुण्यापासून भ्रष्ट झालेला असा अधः याति - अधोगतीला जातो. ॥४०॥
कारण भगवंतांची किंवा भक्तांची निंदा ऐकून जो तेथून निघून जात नाही, त्याचे पुण्य नाहीसे होऊन तो अधोगतीला जातो. (४०)


ततः पाण्डुसुताः क्रुद्धा मत्स्यकैकयसृञ्जयाः ।
उदायुधाः समुत्तस्थुः शिशुपालजिघांसवः ॥ ४१ ॥
माराया शिशुपालाते मत्स्य कैकय पांडव ।
सृंजयी वंशिचे राजे उठले शस्त्र घेउनी ॥ ४१ ॥

ततः - नंतर पांडुसुताः - पांडूचे धर्मराजादि पुत्र मत्स्यकैकयसृञ्जयाः (च) - आणि मत्स्य, कैकय व सृंजय राजे क्रुद्धाः - रागावलेले असे उदायुधाः च - व उचलली आहेत आयुधे ज्यांनी असे शिशुपालजिघांसवः समुत्तस्थुः - शिशुपालाला मारण्याच्या इच्छेने उभे राहिले. ॥४१॥
त्यावेळी शिशुपालाला मारण्यासाठी पांडव, मत्स्य, कैकय आणि सृंजयवंशी राजे संतापून हातात शस्त्रे घेऊन एकदम उभे राहिले. (४१)


ततश्चैद्यस्त्वसंभ्रान्तो जगृहे खड्गचर्मणी ।
भर्त्सयन् कृष्णपक्षीयान् राज्ञः सदसि भारत ॥ ४२ ॥
न घाबरे तदा शत्रू हाती घेवोनि खड्ग तो ।
कृष्णपक्षाचिया लोका ओरडे ललकारुनी ॥ ४२ ॥

भारत - हे परीक्षित राजा ततः असंभ्रान्तः चैद्यः तु - नंतर न डगमगणारा स्वस्थान्तःकरणाचा शिशुपाल तर सदसि कृष्णपक्षीयान् राज्ञः भर्त्सयन् - सभेमध्ये श्रीकृष्णाच्या पक्षाच्या राजांची निंदा करून खड्‌गचर्मणी जगृहे - तलवार व ढाल घेता झाला. ॥४२॥
हे राजा ! परंतु शिशुपाल बिलकुल घाबरला नाही. त्याने मागचा-पुढचा विचार न करता आपली ढाल- तलवार उचलली आणि भर सभेत श्रीकृष्णांची बाजू घेणार्‍या राजांची तो निंदा करू लागला. (४२)


तावदुत्थाय भगवान् स्वान् निवार्य स्वयं रुषा ।
शिरः क्षुरान्तचक्रेण जहार पततो रिपोः ॥ ४३ ॥
भांडणे पाहता कृष्णे स्वपक्षी नृप शांत ते ।
करोनी क्रोधता चक्रे पाप्याचे शिर कापिले ॥ ४३ ॥

भगवान् - श्रीकृष्ण तावत् उत्थाय - तितक्यात उठून स्वयं रुषा स्वान् निवार्य - स्वतः क्रोधाने स्वकीयांचे निवारण करून क्षुरान्तचक्रेन - वस्तर्‍याप्रमाणे धार आहे ज्याची अशा सुदर्शन चक्राने आपततः रिपोः शिरः जहार - चाल करून येणार्‍या शत्रु अशा शिशुपालाचे मस्तक हरण करिता झाला. ॥४३॥
तेवढ्यात भगवान श्रीकृष्ण उभे राहिले. त्यांनी आपली बाजू घेणार्‍या राजांना थांबवले आणि स्वत: क्रोधाने आपल्यावर चालून येणार्‍या शिशुपालाचे मस्तक आपल्या तीक्ष्ण धारेच्या चक्राने तोडले. (४३)


शब्दः कोलाहलोऽथासीन् शिशुपाले हते महान् ।
तस्यानुयायिनो भूपा दुद्रुवुर्जीवितैषिणः ॥ ४४ ॥
वधता शिशुपालाला कोलाहलचि जाहला ।
तयाचे पक्षपाती ते पळाले भय घेउनी ॥ ४४ ॥

शिशुपाले हते - शिशुपाल मारिला गेला असता महान् कोलाहलः शब्दः अपि आसीत् - मोठा कलकल शब्दहि उत्पन्न झाला जीवतैषिणः तस्य अनुयायिनः - जगण्याची इच्छा करणारे त्या शिशुपालाचे अनुयायी असे भूपाः - राजे दुद्रुवुः - पळून गेले. ॥४४॥
शिशुपाल मारला गेल्यानंतर तेथे अतिशय गोंधळ माजला. त्याचे अनुयायी असलेले राजे आपपले प्राण वाचविण्यासाठी तेथून पळून जाऊ लागले. (४४)


चैद्यदेहोत्थितं ज्योतिः वासुदेवमुपाविशत् ।
पश्यतां सर्वभूतानां उल्केव भुवि खाच्च्युता ॥ ४५ ॥
उल्का जै पडते खाली आकाशा मधुनी तशी ।
प्रेताच्या मधली प्राण ज्योत कृष्णास ती मिळे ॥ ४५ ॥

चैद्यदेहोत्थितं ज्योतिः - शिशुपालाच्या शरीरापासून उत्पन्न झालेले तेज सर्वभूतानां पश्यतां - सर्व लोक पहात असता खात् भुवि च्युता उल्का इव - आकाशांतून जमिनीवर पडलेल्या तेजाच्या गोळ्याप्रमाणे वासुदेवम् उपविशत् - श्रीकृष्णामध्ये प्रविष्ट झाले. ॥४५॥
आकाशातून निखळून पडलेली उल्का ज्याप्रमाणे जमिनीत शिरते, त्याप्रमाणे सगळ्यांच्या देखतच शिशुपालाच्या शरीरातून एक ज्योत बाहेर पडून ती श्रीकृष्णांमध्ये प्रविष्ट झाली. (४५)


जन्मत्रयानुगुणित वैरसंरब्धया धिया ।
ध्यायन् तन्मयतां यातो भावो हि भवकारणम् ॥ ४६ ॥
परीक्षित् ! शिशुपालाने जन्मता वैर बांधुनी ।
कृष्णासी लाविले चित्त तेणे पार्षद जाहला ॥ ४६ ॥

जन्मत्रयानुगुणितवैरसंरब्धया धिया - तीन जन्मांतील वाढलेल्या वैराने पूर्ण भरलेल्या बुद्धीने (तं) ध्यायन् तन्मयतां यातः - ईश्वराचे ध्यान करीत असल्यामुळे ईश्वरस्वरूपाला प्राप्त झाला भावः हि भवकारणम् - कारण भावना हेच उत्पत्तीचे कारण होय. ॥४६॥
शिशुपालाच्या अंत:करणामध्ये सलग तीन जन्मांपासून वैरभाव वाढत गेला होता आणि अशा वैरभावयुक्त बुद्धीने भगवंतांचेच चिंतन करीत करीत तो भगवद्‌रूप झाला. कारण नव्या जन्माला भावच कारणीभूत असतो. (४६)


ऋत्विग्भ्यः ससदस्येभ्यो दक्षिनां विपुलामदात् ।
सर्वान् संपूज्य विधिवत् चक्रेऽवभृथमेकराट् ॥ ४७ ॥
मिळता सद्‌गती त्याला धर्मराये तदा द्विजा ।
दिधली दक्षिणा खूप अवभृत् स्नान घेतले ॥ ४७ ॥

एकराट् - सार्वभौ‌म धर्मराजा सर्वान् संपूज्य - सर्वांचे पूजन करून ससदस्येभ्यः ऋत्विग्भ्यः - सभासदांसह ऋत्विजांना विपुलां दक्षिणां अदात् - पुष्कळ दक्षिणा देता झाला विधिवत् च अवभृथं चक्रे - आणि यथाशास्त्र अवभृथ स्नान करिता झाला. ॥४७॥
नंतर चक्रवर्ती राजाने सदस्य आणि ऋत्विजांना पुष्कळ दक्षिणा दिली. तसेच सर्वांचा सत्कार करून विधिपूर्वक यज्ञाच्या शेवटी करावयाचे अवभृथस्नान केले. (४७)


साधयित्वा क्रतुः राज्ञः कृष्णो योगेश्वरेश्वरः ।
उवास कतिचिन् मासान् सुहृद्‌भिः अभियाचितः ॥ ४८ ॥
साधिला या परी यज्ञ कृष्ण योगेश्वरे तदा ।
प्रार्थिता आप्त ते सारे कितेक दिन राहिले ॥ ४८ ॥

योगेश्वरेश्वरः कृष्णः - मोठमोठया योग्यांचा अधिपति श्रीकृष्ण राज्ञः क्रतुं साधयित्वा - धर्मराजाचा यज्ञ सिद्धीस नेल्यावर सुहृद्‌भिः अभियाचितः - मित्रांनी याचिलेला असा कतिचित् मासान् उवास - कित्येक महिने राहिला. ॥४८॥
योगेश्वरेश्वर भगवान श्रीकृष्णांनी अशा प्रकारे राजाचा यज्ञ पूर्ण केला आणि बांधवांच्या विनंतीवरून काही महिने ते तेथेच राहिले. (४८)


ततोऽनुज्ञाप्य राजानं अनिच्छन्तमपीश्वरः ।
ययौ सभार्यः सामात्यः स्वपुरं देवकीसुतः ॥ ४९ ॥
धर्माची नसुनी इच्छा घेवोनी संमती पुन्हा ।
मंत्री राण्यां सवे कृष्ण पातले द्वारकापुरीं ॥ ४९ ॥

ततः - नंतर सभार्यः सामात्यः देवकीसुतः ईश्वरः - स्त्रिया व प्रधान यांसह देवकीपुत्र श्रीकृष्ण अनिच्छन्तम् अपि राजानं अनुज्ञाप्य - इच्छा नसलेल्याहि धर्मराजाची अनुज्ञा घेऊन स्वपुरं - द्वारकेला ययौ - गेला. ॥४९॥
त्यानंतर युधिष्ठिराची इच्छा नसतानाही भगवान श्रीकृष्णांनी त्यांचा निरोप घेऊन आपल्या राण्या व मंत्रांसह द्वारकेकडे प्रयाण केले. (४९)


वर्णितं तदुपाख्यानं मया ते बहुविस्तरम् ।
वैकुण्ठवासिनोर्जन्म विप्रशापात् पुनः पुनः ॥ ५० ॥
परीक्षित् ! सातव्या स्कंधी विस्तारे बोललोच की ।
जय नी विजया शाप संताचा मिळला असे ॥ ५० ॥

मया - माझ्याकडून ते - तुला तत् उपाख्यानम् - ते कथानक विप्रशापात् वैकुण्ठवासिनोः पुनःपुनः जन्म - ब्राह्मणाच्या शापामुळे वैकुंठात रहाणार्‍या जयविजयांचा वारंवार झालेला जन्म बहुविस्तरं वर्णितं - अत्यंत विस्तृत रीतीने वर्णिला गेला आहे. ॥५०॥
वैकुंठवासी जय आणि विजय यांना सनदकादी ऋषींच्या शापामुळे वारंवार जन्म घ्यावा लागला, हे आख्यान मी तुला अतिशय विस्तारपूर्वक सांगितले. (५०)


राजसूयावभृथ्येन स्नातो राजा युधिष्ठिरः ।
ब्रह्मक्षत्रसभामध्ये शुशुभे सुरराडिव ॥ ५१ ॥
यज्ञांतस्नान घेवोनी महाराज युधिष्ठिर ।
सभेत बसले तेंव्हा इंद्राच्या परि शोभले ॥ ५१ ॥

राजसूयावभृथ्येन स्नातः - राजसूय यज्ञातील अवभृथविधीने स्नान केलेला युधिष्ठिरः - धर्मराजा ब्रह्मक्षत्रसभामध्ये - ब्राह्मण व क्षत्रिय यांच्या सभेत सुरराट् इव शुशुभे - देवराज इंद्राप्रमाणे शोभला. ॥५१॥
अवभृथ स्नान करून महाराज युधिष्ठिर ब्राह्मण आणि क्षत्रियांच्या सभेमध्ये देवराज इंद्राप्रमाणे शोभून दिसू लागले. (५१)


राज्ञा सभाजिताः सर्वे सुरमानवखेचराः ।
कृष्णं क्रतुं च शंसन्तः स्वधामानि ययुर्मुदा ॥ ५२ ॥
दुर्योधनमृते पापं कलिं कुरुकुलामयम् ।
यो न सेहे श्रीयं स्फीतां दृष्ट्वा पाण्डुसुतस्य ताम् ॥ ५३ ॥
राजा युधिष्ठिरे तेंव्हा देवता नृप सर्व ते ।
सत्कारिले तदा मोदे स्वस्थाना पर्व पातले ॥ ५२ ॥
जाहले सर्व ते सौख्य परी उत्कर्ष हा असा ।
दुर्योधन न साही तो पापी नी कुलनाशक ॥ ५३ ॥

राज्ञा सभाजिताः - धर्मराजाने सत्कारिलेले सर्वे सुरमानवखेचराः - सर्व देव, मनुष्ये आणि प्रमथादि गण यः - जो पाण्डुसुतस्य स्फीतां तां श्रियं दृष्टवा - पांडवांच्या वाढलेल्या त्या संपत्तीला पाहून न सेहे - सहन करिता झाला नाही (तं) पापं कलिं कुरुकुलामयं दुर्योधनं ऋते - अशा त्या पापी, कलह उत्पन्न करणार्‍या व कुरुकुलाचा रोगच अशा दुर्योधनाशिवाय कृष्णं च क्रतुं शंसन्तः - श्रीकृष्णाची व राजसूय यज्ञाची प्रशंसा करीत मुदा स्वधामानि ययुः - आनंदाने आपआपल्या स्थानाला निघून गेले. ॥५२-५३॥
राजाने देव, मनुष्य आणि गंधर्वादिकांचा यथायोग्य सत्कार केला. नंतर ते सर्वजण भगवान श्रीकृष्ण व राजसूय यज्ञाची प्रशंसा करीत आनंदाने आपापल्या लोकी निघून गेले. (५२) ज्याला पांडवांच्या या उज्ज्वल राज्यलक्ष्मीचा उत्कर्ष सहन झाला नाही, तो पापी, कलहप्रेमी आणि कुरुकुलाचा रोग असलेला दुर्योधन मात्र दु:खी झाला. (५३)


य इदं कीर्तयेद् विष्णोः कर्म चैद्य वधादिकम् ।
राजमोक्षं वितानं च सर्वपापैः प्रमुच्यते ॥ ५४ ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां दशमस्कन्धे उत्तरार्धे
शिशुपालवधो नाम चतुःसप्ततितमोऽध्यायः ॥ ७४ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
परीक्षित् ! विष्णुकीर्ती ही शिशुपाल वधाचिया ।
कीर्तनी वदता नित्य न राही पाप ते मुळी ॥ ५४ ॥
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर चौर्‍याहत्तरावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

यः - जो कोणी चैद्यवधादिकं - शिशुपालाला मारणे इत्यादि राजमोक्षं वितानं च - राजांची मुक्तता आणि राजसूय यज्ञ इदं विष्णोः कर्म - हे श्रीकृष्णाचे कृत्य कीर्तयेत् - गाईल (सः) सर्वपापैः प्रमुच्यते - तो सर्व पापांपासून मुक्त होईल. ॥५४॥ चौर्‍याहत्तरावा अध्याय समाप्त
जो कोणी शिशुपालवध, जरासंधवध, कैदी राजांची मुक्तता आणि यज्ञ या श्रीकृष्णांच्या लीलांचे कीर्तन करील, त्याची सर्व पापांपासून सुटका होईल. (५४)


अध्याय चौर्‍याहत्तरावा समाप्त

GO TOP