|
श्रीमद् भागवत पुराण जरासन्धरुद्धानां राज्ञां कारागृहान् मोचनम् - जरासंधाच्या कारागृहातून सुटलेल्या राजांना निरोप आणि भगवंतांचे इंद्रप्रस्थाला परतणे - संहिता - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् ) अयुते द्वे शतान्यष्टौ निरुद्धा युधि निर्जिताः । ते निर्गता गिरिद्रोण्यां मलिना मलवाससः ॥ १ ॥
श्रीशुकदेव सांगतात - ( अनुष्टुप् ) सहजी जिंकिता दैत्य सहस्र वीर आठशे । नृप बद्ध करोनीया किल्ल्यात ठेविले तसे । कृष्णाने सोडिले तेंव्हा मळक्या तनु वस्त्रही ॥ १ ॥
लीलया युधि निर्जिताः - लीलेने युद्धात जिंकलेले मलिः मलवाससः - मळकट शरीरे झालेले, मळकट आहेत वस्त्रे ज्यांची असे गिरिद्रोण्यां (निरुद्धाः) - पर्वताच्या खोर्यांत अटकावून ठेविलेले ते द्वे अयुते अष्टौ शतानि (राजानः) - ते दोन हजार आठशे राजे निर्गताः - बाहेर आले. ॥१॥
श्रीशुक म्हणतात- जरासंधाने अगदी सहजपणे वीस हजार आठशे राजांना जिंकून डोंगराच्या दरीत ठेवले होते. ते जेव्हा तेथून बाहेर आले, तेव्हा त्यांची शरीरे मळकट आणि वस्त्रे गलिच्छ दिसत होती. (१)
क्षुत्क्षामाः शुष्कवदनाः संरोधपरिकर्शिताः ।
ददृशुस्ते घनश्यामं पीतकौशेयवाससम् ॥ २ ॥
भुकेने थकले सारे बद्धी ढिल्लेचि जाहले । निघती तेथुनी त्यांनी पाहिला कृष्ण तो उभा ॥ २ ॥
क्षुत्क्षामाः - भुकेने क्षीण झालेले शुष्कवदनाः - सुकून गेली आहेत तोंडे ज्यांची असे संरोधपरिकर्शिताः - अटकावून ठेविल्यामुळे कृश झालेले ते - ते राजे पीतकौशेयवाससं घनश्यामं ददृशुः - पिवळे रेशमी वस्त्र धारण केलेल्या व मेघांप्रमाणे कृष्णवर्णाच्या श्रीकृष्णाला पहाते झाले. ॥२॥
भुकेमुळे ते दुर्बळ झाले होते आणि त्यांची तोंडे वाळून गेली होती. कैदखान्यात बंद राहिल्यामुळे ते खंगले होते. तेथून बाहेर पडताच त्यांनी पावसाळ्यातील ढगाप्रमाणे सावळ्या, पीतांबरधारी भगवंतांचे दर्शन घेतले. (२)
श्रीवत्साङ्कं चतुर्बाहुं पद्मगर्भारुणेक्षणम् ।
चारुप्रसन्नवदनं स्फुरन्मकरकुण्डलम् ॥ ३ ॥ पद्महस्तं गदाशङ्ख रथाङ्गैरुपलक्षितम् । किरीटहारकटक कटिसूत्राङ्गदाञ्चितम् ॥ ४ ॥ भ्राजद्वरमणिग्रीवं निवीतं वनमालया । पिबन्त इव चक्षुर्भ्यां लिहन्त इव जिह्वया ॥ ५ ॥
शंख चक्र गदा पद्म चारी हातात शोभले । श्रीवत्स चिन्ह वक्षासी प्रसन्न वदनो असा ॥ ३ ॥ कुंडले मकराकार मुकूट तळपे तसा । मोत्यांचे ते गळा हार कर्धनी विलसे तशी ॥ ४ ॥ कौस्तुभो शोभला कंठी वनमाला तशाच त्या । पाहता भगवंताला नेत्रेचि पीति ते जणू । जिभेने चाखिती आणि नाकाने सुंगिती जसे ॥ ५ ॥
श्रीवत्साङ्कं चतुर्बाहुं - श्रीवत्सलांछन धारण करणार्या व चार भुजा असलेल्या पद्मगर्भारुणेक्षणं - कमळांतील गाभ्याप्रमाणे आरक्त नेत्रांच्या चारुप्रसन्नवदनं - सुंदर व प्रसन्न मुखाच्या स्फुरन्मकरकुण्डलं - चकाकत आहेत मकराकार कुंडले ज्याची अशा पद्महस्तं - हातात कमळे धरणार्या गदाशङ्खरथाङ्गैः उपलक्षितम् - गदा, शंख, व चक्र यांनी युक्त अशा किरीटहारकेयूरकटिसूत्राङ्गदाचितं - मुकुट, हार, बाहूभूषणे, करगोटा व पोची यांनी भूषविलेल्या भ्राजद्वरमणिग्रीवम् - शोभत आहे उत्तम मणी कंठात ज्याच्या अशा वनमालया निवीतं - वनमाळेने युक्त अशा श्रीकृष्णाला चक्षुर्भ्यां पिबन्तः इव - नेत्रांनी पीतच आहेत की काय असे जिह्वया लिहन्तः इव - जिभेने चाटीतच आहेत की काय असे ॥३-५॥
त्यांच्या चार हातांमध्ये गदा, शंख, चक्र आणि कमळ शोभून दिसत होते. वक्ष:स्थळावर श्रीवत्सचिन्ह आणि कमळाच्या गाभ्याप्रमाणे त्यांचे डोळे लालसर होते. त्यांचे सुंदर मुखकमल प्रसन्न असून कानांमध्ये मकराकृती कुंडले चमकत होती. त्यांच्या श्रीविग्रहावर सुंदर मुगुट, मोत्यांचा हार, हातामध्ये कडे, करदोटा आणि बाजूबंद शोभून दिसत होते. (३-४)
जिघ्रन्त इव नासाभ्यां रम्भन्त इव बाहुभिः ।
प्रणेमुर्हतपाप्मानो मूर्धभिः पादयोर्हरेः ॥ ६ ॥
आलिंगितीहि बाहुंनी दर्शने पाप नष्टले । ठेवोनी शिर ते पायी वंदिती सर्व ते नृप ॥ ६ ॥
नासाभ्यां जिघ्रन्तः इव - नाकपुडयांनी हुंगीतच आहेत की काय असे बाहुभिः रम्भन्तः इव - बाहूंनी आलिंगन देत आहेत की काय असे हतपाप्मानः (ते) - पापरहित झालेले ते राजे हरेः पादयोः मूर्धभिः प्रणेमुः - श्रीकृष्णाच्या पायावर मस्तकांनी नमस्कार करिते झाले. ॥६॥
गळ्यामध्ये कौस्तुभमणी झगमगत होता आणि तेथे वनमाला शोभत होती. त्यांना पाहाताच त्या राजांची अशी स्थिती झाली की ते जणू डोळ्यांनी त्यांना पीत आहेत, जिभेने चाटीत आहेत, नाकाने हुंगत आहेत आणि बाहूंनी आलिंगन देत आहेत. त्यामुळे त्यांची सारी पापे धुतली गेली. त्यांनी त्यांच्या चरणांवर डोकी टेकवून त्यांना प्रणाम केला. (५-६)
कृष्णसन्दर्शनाह्लाद ध्वस्तसंरोधनक्लमाः ।
प्रशशंसुर्हृषीकेशं गीर्भिः प्राञ्जलयो नृपाः ॥ ७ ॥
दर्शने हर्षले सारे क्लेशही मिटले तदा । विनये हात जोडोनी कृष्णाला नृप प्रार्थिता ॥ ७ ॥
कृष्णसंदर्शनाह्लादध्वस्तसंरोधनक्लमाः - श्रीकृष्णाच्या दर्शनामुळे उत्पन्न झालेल्या आनंदाने नष्ट झाले आहेत बंदिवासाचे क्लेश ज्यांचे असे प्राञ्जलयः नृपाः - हात जोडलेले राजे गीर्भिः हृषीकेशं प्रशशंसुः - शब्दांनी श्रीकृष्णाची स्तुति करिते झाले. ॥७॥
श्रीकृष्णांच्या दर्शनाने त्या राजांना इतका आनंद झाला की कैदेत राहिल्याचे त्यांचे दु:ख एकदम नाहीसे झाले. हात जोडून ते श्रीकृष्णांची स्तुती करू लागले.(७)
राजान ऊचुः -
नमस्ते देवदेवेश प्रपन्नार्तिहराव्यय । प्रपन्ना पाहि नः कृष्ण निर्विण्णान् घोरसंसृतेः ॥ ८ ॥
राजेलोक म्हणाले - नमस्ते देवदेवेशा सच्चिदानंदरूप तू । आम्हास मुक्त तू केले आता रक्षी तसाच की ॥ ८ ॥
देवदेवेश प्रपन्नार्तिहर अव्यय - देवांच्या देवांचा अधिपति व शरणागतांची पीडा दूर करणार्या अविनाशी अशा हे श्रीकृष्णा ते नमः (अस्तु) - तुला नमस्कार असो कृष्ण - हे कृष्णा घोरसंसृतेः निर्विण्णान् - भयंकर संसारापासून खेद पावलेल्या प्रपन्नान् नः पाहि - शरण आलेल्या आमचे रक्षण कर. ॥८॥
राजे म्हणाले, शरणागतांचे सगळे दु:ख नाहीसे करणार्या हे देवदेवेश्वरा ! हे अविनाशी श्रीकृष्णा ! आम्ही आपणांस नमस्कार करीत आहोत. या घोर संसाराला कंटाळून आपल्याला शरण आलेल्या आमचे रक्षण करा. (८)
नैनं नाथानुसूयामो मागधं मधुसूदन ।
अनुग्रहो यद् भवतो राज्ञां राज्यच्युतिर्विभो ॥ ९ ॥
मागाध दोष ना देतो श्रीकृष्णा मधुसूदना । अनुग्रह अम्हा झाला गर्व संपत्ति संपली ॥ ९ ॥
मधुसूदन विभो - मधु दैत्याला मारणार्या हे कृष्णा नाथ - हे स्वामिन् एनं मागधं न अन्वसूयामः - आम्ही ह्या जरासंधाला मुळीच दोष देत नाही यत् - कारण राज्ञां राज्यच्युतिः - राजांचे राज्यापासून भ्रष्ट होणे (अयम् एव) भवतः अनुग्रहः - हाच तुझा आमच्यावर मोठा अनुग्रह होय. ॥९॥
हे मधुसूदना ! हे आमचे स्वामी ! या मगधराजाला आम्ही दोष देत नाही. भगवन ! कारण राज्यलक्ष्मीपासून राजांना दूर करणे ही आपली कृपाच होय. (९)
राज्यैश्वर्यमदोन्नद्धो न श्रेयो विन्दते नृपः ।
त्वन्मायामोहितोऽनित्या मन्यते सम्पदोऽचलाः ॥ १० ॥
धनाने मद तो होता तेणे भद्र न साधले । मोहात गुंतती तेची धना सर्वस्व मानिती ॥ १० ॥
राज्यैश्वर्यमदोन्नद्धः त्वन्मायामोहितः नृपः - राज्यैश्वर्याच्या मदाने उन्मत्त झालेला व तुझ्या मायेने मोहित झालेला राजा श्रेयः न विन्दते - कल्याणाला मिळवीत नाही अनित्याः संपदः अचलाः मन्यते - अस्थिर अशा संपत्तींना स्थिर मानितो. ॥१०॥
राज्यैश्वर्याच्या घमेंडीने उन्मत्त झालेल्या राजाला कल्याणाची प्राप्ती कधीही होऊ शकत नाही. आपल्या मायेने मोहित होऊन तो अनित्य अशा संपत्तीलाच स्थिर समजतो. (१०)
मृगतृष्णां यथा बाला मन्यन्त उदकाशयम् ।
एवं वैकारिकीं मायां अयुक्ता वस्तु चक्षते ॥ ११ ॥
मृगजळा जसे मूर्ख तळेचि मानिती तसे । अज्ञानी भ्रम होवोनी माया सत्यचि मानिती ॥ ११ ॥
यथा बालाः - ज्याप्रमाणे बालक मृगतृष्णां उदकाशयं मन्यन्ते - मृगजळाला तलाव असे मानितात एवं - याप्रमाणे अयुक्ताः - अविचारी पुरुष वैकारिकीं मायां वस्तु चक्षते - सृष्टयादि उत्पन्न करणार्या मायेला सद्वस्तु असे समजतात. ॥११॥
अज्ञानी लोक ज्याप्रमाणे मृगजळाच्या पाण्यालाच जलाशय समजतात, त्याचप्रमाणे इंद्रियलोलुप, अज्ञानी माणसे या बदलणा-या मायेला सत्य वस्तू समजतात. (११)
( मिश्र )
वयं पुरा श्रीमदनष्टदृष्टयो जिगीषयास्या इतरेतरस्पृधः । घ्नन्तः प्रजाः स्वा अतिनिर्घृणाः प्रभो मृत्युं पुरस्त्वाविगणय्य दुर्मदाः ॥ १२ ॥
( इंद्रवज्रा ) आधी आम्ही सर्व धनांध होतो स्पर्धे प्रजेचा बहुनाश झाला । क्रोधी तसे मत्तचि आम्हि होतो मृत्यू उभा हा नच ते कळे की ॥ १२ ॥
प्रभो - हे श्रीकृष्णा पुरा - पूर्वी वयं - आम्ही श्रीमदनष्टदृष्टयः - ऐश्वर्यमदाने ज्यांची दृष्टि नष्ट झाली आहे असे अस्याः जिगीषयाः इतरेतरस्पृधः - ह्या पृथ्वीला जिंकण्याच्या इच्छेने एकमेकांशी स्पर्धा करणारे स्वाः प्रजाः घ्नन्तः - आपल्या प्रजांचा नाश करणारे अतिनिर्घृणाः - अत्यंत निर्दय पुरः मृत्यूं त्वां अविगणय्य - पुढे उभ्या असलेल्या मृत्यूस्वरूपी तुला न जुमानून दुर्मदाः - मदोन्मत्त झालो होतो. ॥१२॥
भगवन ! आम्ही अगोदर संपत्तीच्या नशेने आंधळे झालो होतो. या पृथ्वीला जिंकून घेण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करीत होतो आणि क्रूरपणे आपल्याच प्रजेला नष्ट करीत होतो. आम्ही इतके मस्तवाल झालो होतो की, आपण मृत्यूस्वरूपाने आमच्यासमोर उभे आहात, याचीही आम्हांला पर्वा नव्हती. (१२)
त एव कृष्णाद्य गभीररंहसा
दुरन्तवीर्येण विचालिताः श्रियः । कालेन तन्वा भवतोऽनुकम्पया विनष्टदर्पाश्चरणौ स्मराम ते ॥ १३ ॥
हा काळ त्याची गहना गती ती ते रूप आहे तुमचेच कृष्णा । ते वित्त गेले अन गर्व गेला तेंव्हाचि आले स्मरणी पदो हे ॥ १३ ॥
आद्य कृष्ण - हे आदिपुरुषा श्रीकृष्णा (तव) तन्वा गभीररंहसा दुरन्तवीर्येण कालेन - तुझेच स्वरूप अशा अत्यंत वेगवान व ज्याच्या पराक्रमाचा अंत जाणणे कठीण आहे अशा काळाकडून श्रियः विचालिताः ते एव (वयम्) - ऐश्वर्यापासून भ्रष्ट केले गेलेले तेच आम्ही राजे भवतः अनुकम्पया - तुझ्या कृपेने विनष्टदर्पाः (सन्तः) - गर्वरहित होत्साते ते चरणौ स्मराम - तुझ्या चरणकमलाचे आम्ही स्मरण करितो. ॥१३॥
हे श्रीकृष्णा ! त्याचा आम्हांला आज अतिशय वेगवान व असामान्य बलशाली अशा आपलेच स्वरूप असलेल्या काळाने राज्यापासून दूर केले. ज्यांच्या कृपेनेच आमचा गर्व नाहीसा झाला, अशा आपल्या चरणकमलांचे आम्ही स्मरण करीत आहोत. (१३)
अथो न राज्यम्मृगतृष्णिरूपितं
देहेन शश्वत् पतता रुजां भुवा । उपासितव्यं स्पृहयामहे विभो क्रियाफलं प्रेत्य च कर्णरोचनम् ॥ १४ ॥
शरीर रोगासचि जन्म देते न राज्य आता मन इच्छिते ते । निस्सार सारे कळले मनाला ऐकोनि वाटे बहु सुंदरो ते ॥ १४ ॥
विभो - हे श्रीकृष्णा अथो - आता शश्वत्पतता रुजां भुवा देहेन - वारंवार पडणार्या, रोगांचे माहेरघर अशा देहाने उपासितव्यं - सेविल्या जाणार्या मृगतृष्णिरूपितं राज्यं - मृगजळाप्रमाणे मिथ्या असणार्या राज्याला (तथा) च - त्याचप्रमाणे कर्णरोचनं प्रेत्य (उपासितव्यं) क्रियाफलं - आणि कानाला आवडणार्या व मरणानंतर प्राप्त होणार्या कर्माच्या स्वर्गादि फळाला न स्पृहयामहे - आम्ही इच्छित नाही. ॥१४॥
हे विभो ! दिवसेंदिवस क्षीण होणा-या व रोगांची जन्मभूमी असलेल्या या शरीराने मृगजळासारखे राज्य भोगण्याची आम्हांला अभिलाषा नाही, तसेच कानाला भुरळ पाडणा-या मृत्यूनंतरच्या स्वर्गादी कर्मफलांचीसुद्धा आम्हांला इच्छा नाही. (१४)
( अनुष्टुप् )
तं नः समादिशोपायं येन ते चरणाब्जयोः । स्मृतिर्यथा न विरमेद् अपि संसरतामिह ॥ १५ ॥
( अनुष्टुप् ) कृपया सांगणे कांही तुझ्या या चरणास ती । विस्मृती न घडे केंव्हा मिळो जन्म कुठेहि तो ॥ १५ ॥
इह - ह्या लोकी संसरतां नः अपि - संसारात रहाणार्याहि आमची यथा - जेणेकरून येन - ज्यामुळे ते चरणाब्जयोः स्मृतिः न विरमेत् - तुझ्या चरणकमलांची आठवण नाहीशी होणार नाही तं उपायं समादिश - त्या उपायाचा उपदेश कर. ॥१५॥
आता आपण आम्हांला हा उपाय सांगा की, जेणेकरून येथे संसारात राहूनही आपल्या चरणकमलांची सदैव आठवण राहील. (१५)
कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने ।
प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः ॥ १६ ॥
श्रीकृष्णा वासुदेवा रे श्रीहरी परमात्मने । दुःखाते नष्टिसी देवा गोविंदा नमितो तुला ॥ १६ ॥
हरये परमात्मने - सर्वांची दुःखे हरण करणार्या व श्रेष्ठ अशा आत्मस्वरुपाने रहाणार्या प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय - शरणागतांची दुःखे दूर करणार्या व इंद्रियांचा स्वामी अशा वासुदेवाय कृष्णाय नमः नमः - वसुदेवपुत्र श्रीकृष्णाला वारंवार नमस्कार असो ॥१६॥
नमस्कार करणा-यांच्या दु:खाचा नाश करणा-या हे श्रीकृष्णा ! वासुदेवा ! हरे ! परमात्मन ! गोविंदा ! आमचा आपल्याला वारंवार नमस्कार असो ! (१६)
श्रीशुक उवाच -
संस्तूयमानो भगवान् राजभिर्मुक्तबन्धनैः । तानाह करुणस्तात शरण्यः श्लक्ष्णया गिरा ॥ १७ ॥
श्रीशुकदेव सांगतात - कैदेची सुटका होता स्तविता नृप सर्व ते । करुणाकर तो बोले मधूर शब्द तो असे ॥ १७ ॥
तात - हे परीक्षित राजा मुक्तबन्धनैः राजभिः संस्तूयमानः - कारागृहातून मुक्त झालेल्या राजांकडून स्तविला जाणारा शरण्यः करुणः भगवान् - शरणागतांचे रक्षण करणारा दयाळु श्रीकृष्ण श्लक्ष्णया गिरा तान् आह - मधुर वाणीने त्या राजांना म्हणाला ॥१७॥
श्रीशुक म्हणतात- परीक्षिता ! कारागृहातून मुक्त झालेल्या राजांनी जेव्हा अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांची स्तुती केली, तेव्हा शरणागतरक्षक दयाळू प्रभू मधुर वाणीने त्यांना म्हणाले. (१७)
श्रीभगवानुवाच -
अद्य प्रभृति वो भूपा मय्यात्मन्यखिलेश्वरे । सुदृढा जायते भक्तिः बाढमाशंसितं तथा ॥ १८ ॥
भगवान् श्रीकृष्ण म्हणाले - नृपांनो इच्छिता तैशी लाभेल भक्ति ती तुम्हा । सर्वात्मा मीच तो आहे सर्वांचा स्वामिही तसा ॥ १८ ॥
भूपाः - राजेहो यथा (युष्माभिः) आशंसितं (तथा) - जशी तुम्ही इच्छा केली आहे त्याप्रमाणे अद्यप्रभृति - आजपासून अखिलेश्वरे आत्मनि मयि - त्रैलोक्यधीश व आत्मरूपी अशा माझ्या ठिकाणी वः भक्तिः सुदृढा बाढम् जायते - तुमची भक्ति निश्चयाने दृढ होईल ॥१८॥
श्रीकृष्ण म्हणाले- हे राजांनो ! तुम्ही सर्वांनी जी इच्छा प्रगट केली, त्यानुसार आजपासून सर्वांचा आत्मा आणि सर्वांचा स्वामी अशा माझ्या ठायी तुमची खात्रीने सुदृढ भक्ती राहील. (१८)
दिष्ट्या व्यवसितं भूपा भवन्त ऋतभाषिणः ।
श्रीयैश्वर्यमदोन्नाहं पश्य उन्मादकं नृणाम् ॥ १९ ॥
भाग्ये संकल्पिले तुम्ही आनंद वाटला मला । तुम्ही ते वदला सत्य धनाने लोक माजती ॥ १९ ॥
भूपाः - राजेहो दिष्ट्या (युष्माभिः) व्यवसितं - सुदैवाने तुम्ही हा निश्चय केला भवन्तः ऋतभाषिणः (सन्ति) - तुम्ही खरे बोलणारे आहा श्रियैश्वर्यमदोन्नाहं नृणां उन्मादकं पश्ये - संपत्तीच्या ऐश्वर्यमदामुळे प्राप्त झालेले स्वैरपण मनुष्यांना मद उत्पन्न करणारे आहे हे मी पाहतो ॥१९॥
हे राजांनो ! तुम्ही जे मागितले, तेच उत्तम आहे. तुम्ही केलेली स्तुती खरी आहे; कारण मीसुद्धा पाहातो की, संपत्ती आणि ऐश्वर्याच्या घमेंडीने पुष्कळसे लोक उच्छृंखल होतात. (१९)
हैहयो नहुषो वेनो रावणो नरकोऽपरे ।
श्रीमदाद् भ्रंशिताः स्थानाद् देवदैत्यनरेश्वराः ॥ २० ॥
हैहयो नहुषो वेण रावणो नरकासुर । देवता नृपती कैक मदाने भ्रष्ट जाहले ॥ २० ॥
हैहयः नहुषः वेनः रावणः नरकः - सहस्रार्जुन, नहुष, वेनराजा, रावण व नरकासुर अपरे देवदैत्यनरेश्वराः - दुसरेहि देव, दैत्य व राजे श्रीमदात् स्थानात् भ्रंशिताः - ऐश्वर्यमदामुळे स्थानापासून भ्रष्ट झाले ॥२०॥
हैहय, नहुष, वेन, रावण, नरकासुर इत्यादी अनेकजण तसेच देव, दैत्य आनि राजे ऐश्वर्याच्या गर्वामुळे पदभ्रष्ट झाले. (२०)
भवन्त एतद् विज्ञाय देहाद्युत्पाद्यमन्तवत् ।
मां यजन्तोऽध्वरैर्युक्ताः प्रजा धर्मेण रक्षथ ॥ २१ ॥
उपजे मरते ते ते आसक्ती त्याजची नको । संयमे मजला ध्यावे धर्माने रक्षिणे प्रजा ॥ २१ ॥
भवन्तः - तुम्ही देहादि उत्पाद्यं अन्तवत् - देह आदिकरून उत्पन्न झालेले पदार्थ नाशिवंत आहेत एतत् विज्ञाय - असे जाणून अध्वरैः मां यजन्तः - यज्ञांनी माझे पूजन करीत युक्ताः - दक्ष असे धर्मेण प्रजाः रक्षथ - धर्माने प्रजांचे रक्षण करा ॥२१॥
तुम्ही हेही समजून घ्या की, शरीरादी उत्पन्न होणा-या सर्व गोष्टी नाश पावतात. म्हणून मन आपल्या ताब्यात ठेवून यज्ञांनी माझे पूजन करा आणि धर्माप्रमाणे प्रजेचे रक्षण करा. (२१)
संतन्वन्तः प्रजातन्तून् सुखं दुःखं भवाभवौ ।
प्राप्तं प्राप्तं च सेवन्तो मच्चित्ता विचरिष्यथ ॥ २२ ॥
रक्षा परंपरा सर्व भोग सर्वस्वि त्यागिणे । संतान वाढवा थोर सुख दुःखादि ती कृपा । माझीच मानणे, चित्ती आठवा मजला तुम्ही ॥ २२ ॥
प्रजातन्तून् सन्तन्वन्तः - प्रजारूपी अंकुराला वाढविणारे सुखं दुःखं भवाभवौ च - सुख, दुःख व जन्म-मरण प्राप्तं प्राप्तं सेवन्तः - जे जे प्राप्त होईल ते सेविणारे मच्चित्ताः विचरिष्यथ - माझ्या ठिकाणी अन्तःकरण वृत्ति स्थिर करून वागा ॥२२॥
तुम्ही आपल्या वंशपरंपरेचे रक्षण करण्यासाठी संतान उत्पन्न करा आणि प्रारब्धानुसार जन्म-मृत्यू, सुख-दु:ख इत्यादी जे काही प्राप्त होईल, ते समभावाने स्वीकारून आपले चित्त माझ्या ठिकाणी लावून आपले जीवन चालवा. (२२)
उदासीनाश्च देहादौ आत्मारामा धृतव्रताः ।
मय्यावेश्य मनः सम्यङ् मां अन्ते ब्रह्म यास्यथ ॥ २३ ॥
उदास राहणे चित्ती आत्मरंगात रंगणे । आश्रमीव्रत ते पाळा ब्रह्मरूपात याल तै ॥ २३ ॥
देहादौ उदासीनाः - देहादिकांच्या ठिकाणी आसक्ति न ठेवणारे असे आत्मारामाः धृतव्रताः च - आत्म्याच्या ठिकाणी रममाण होणारे व व्रतादिकांचे अनुष्ठान करणारे मनः मयि सम्यक् आवेश्य - मन माझ्या ठिकाणी चांगल्या रितीने ठेऊन अन्ते ब्रह्म मां यास्यथ - शेवटी ब्रह्मरुपी माझ्या जवळ याल ॥२३॥
देहादिकांविषयी उदासीन राहा आणि स्वस्वरूप रममाण व्हा. त्याचप्रमाणे आपल्या आश्रमाला योग्य अशा व्रतांचे पालन करीत जा. आपले मन योग्य प्रकारे माझ्या ठिकाणी लावल्याने शेवटी तुम्ही ब्रह्मस्वरूप अशा मलाच प्राप्त व्हाल. (२३)
श्रीशुक उवाच -
इत्यादिश्य नृपान् कृष्णो भगवान् भुवनेश्वरः । तेषां न्ययुङ्क्त पुरुषान् स्त्रियो मज्जनकर्मणि ॥ २४ ॥
श्रीशुकदेव सांगतात - भुवनेश्वर कृष्णाने आज्ञा देवोनिया अशी । स्नानादी घालण्या त्यांना दास दास्यासि बोलले ॥ २४ ॥
भुवनेश्वरः भगवान् कृष्णः - त्रैलोक्याधिपति भगवान श्रीकृष्ण इति नृपान् आदिश्य - याप्रमाणे राजांना उपदेश करून तेषां मज्जनकर्मणि - त्यांच्या स्नानादि कृत्यांमध्ये स्त्रियः पुरुषान् (च) न्ययुङ्क्त - दासी व सेवक यांची योजना करिता झाला ॥२४॥
श्रीशुक म्हणतात- भुवनेश्वर भगवान श्रीकृष्णांनी राजांना हा आदेश देऊन त्यांना स्नान इत्यादी घालण्यासाठी अनेक स्त्री-पुरूषांची नियुक्ती केली. (२४)
सपर्यां कारयामास सहदेवेन भारत ।
नरदेवोचितैर्वस्त्रैः भूषणैः स्रग्विलेपनैः ॥ २५ ॥
परीक्षित् ! सहदेवाने उचीत वस्त्र देउनी । माला गंधादिके त्यांना सर्वां सन्मानिले असे ॥ २५ ॥
भारत - हे परीक्षित राजा सहदेवेन - सहदेवाकडून नरदेवोचितैः वस्त्रैः भूषणैः स्नग्विलेपनैः - राजाला योग्य अशा वस्त्रांनी, अलंकारांनी, माळांनी व उट्यांनी (तेषां) सपर्यां कारयामास - त्या राजांची पूजा करविता झाला ॥२५॥
परीक्षिता ! सहदेवांकडून त्यांना राजाला योग्य अशी वस्त्रे, आभूषणे, पुष्पमाला, चंदन इत्यादी देववून त्यांचा सन्मान करविला. (२५)
भोजयित्वा वरान्नेन सुस्नातान् समलङ्कृतान् ।
भोगैश्च विविधैर्युक्तान् तांबूलाद्यैर्नृपोचितैः ॥ २६ ॥
स्नान स्वच्छ करोनीया सजले नृपती तदा । कृष्णे जेवविले त्यांना युक्त भोगहि ते दिले ॥ २६ ॥
सुस्नातान् समलंकृतान् (तान्) - स्नान केलेल्या व अलंकारांनी भूषविलेल्या त्या राजांना वरान्नेन भोजयित्वा - उत्तम अन्नांचे भोजन देववून नृपोचितैः ताम्बूलाद्यैः विविधैः भोगैः च युक्तान् कृत्वा - राजांना योग्य अशा तांबूलादि अनेक भोगांनी युक्त असे करून ॥२६॥
जेव्हा ते राजे अभ्यंग स्नान करून वस्त्रे, आभूषणे परिधान करून तयार झाले, तेव्हा भगवंतांनी त्यांना उत्तमोत्तम पदार्थांचे भोजन देवविले आणि तांबूल इत्यादी विविध प्रकारचे राजोचित भोग देवविले. (२६)
ते पूजिता मुकुन्देन राजानो मृष्टकुण्डलाः ।
विरेजुर्मोचिताः क्लेशात् प्रावृडन्ते यथा ग्रहाः ॥ २७ ॥
सन्मानिता असे कृष्णे दुःख ते सर्व संपले । कुंडले शोभती कर्णी आकाशी चांदण्या जशा ॥ २७ ॥
मुकुन्देन - श्रीकृष्णाने क्लेशात् मोचिताः - दुःखमुक्त केलेले मृष्टकुण्डलाः ते राजानः - तेजस्वी कुंडले धारण करणारे ते राजे पूजिताः - पूजिले असता यथा प्रावृडन्ते ग्रहाः - जसे पावसाळ्याच्या शेवटी ग्रह (तथा) विरेजुः - तसे शोभले ॥२७॥
अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी त्या राजांचा बंधमुक्त करुन सन्मान केला, तेव्हा पावसाळा संपल्यानंतर तारे शोभावेत, त्याप्रमाणे तेजस्वी कुंडले घातलेले ते शोभू लागले. (२७)
रथान् सदश्वान् आरोप्य मणिकाञ्चनभूषितान् ।
प्रीणय्य सुनृतैर्वाक्यैः स्वदेशान् प्रत्ययापयत् ॥ २८ ॥
सुवर्ण रत्न देवोनी श्रेष्ठ ऐशा रथां मधे । सर्वांना बैसवी कृष्ण त्यांच्या देशास पाठवी ॥ २८ ॥
मणिकाञ्चनभूषितान् सदश्वान् रथान् आरोप्य - मण्यांनी व सुवर्णाने भूषविलेल्या व चांगले घोडे जुंपलेल्या रथांत बसवून सूनृतैः वाक्यैः प्रीणय्य - मधुर भाषणांनी आनंदित करून (तान्) स्वदेशान् प्रत्ययापयत् - त्यांना आपापल्या देशांत पाठविता झाला ॥२८॥
नंतर श्रीकृष्णांनी त्यांना सुवर्णाने आणि रत्नांनी मढविलेल्या, उत्तम घोडे जुंपलेल्या रथांमध्ये बसवून, गोड शब्दांनी तृप्त करून आपपल्या देशाकडे पाठविले. (२८)
त एवं मोचिताः कृच्छ्रात् कृष्णेन सुमहात्मना ।
ययुस्तमेव ध्यायन्तः कृतानि च जगत्पतेः ॥ २९ ॥
कष्टमुक्त असे राजे केले श्रीहरिने तदा । कृष्णाचे गुण नी रूपा चिंतनी नृप चालले ॥ २९ ॥
सुमहात्मना कृष्णेन - थोर मनाच्या श्रीकृष्णाने एवं कृच्छ्रात् मोचिताः ते - याप्रमाणे दुःखापासून मुक्त केलेले ते राजे तम् एव ध्यायन्तः - त्या श्रीकृष्णाचेच चिंतन करीत जगत्पतेः कृतानि च (स्मरन्तः) - व त्या जगन्नाथाच्या पराक्रमाचे स्मरण करीत ययुः - गेले ॥२९॥
महात्म्या श्रीकृष्णांनी अशा प्रकारे त्या राजांना मोठ्या संकटातून मुक्त केले. आता ते श्रीकृष्णांचेच रूप, गुण आणि लीलांचे चिंतन करीत आपापल्या राजधानीकडे गेले. (२९)
जगदुः प्रकृतिभ्यस्ते महापुरुषचेष्टितम् ।
यथान्वशासद् भगवान् तथा चक्रुरतन्द्रिताः ॥ ३० ॥
तेथ जाता हरीची ती लीला लोकास सांगती । जागते राहिले चित्ती बोधाच्या परि वागती ॥ ३० ॥
ते - ते राजे महापुरुषचेष्टितं प्रकृतिभ्यः जगदुः - परमेश्वराचे कृत्य प्रजांना सांगते झाले च - आणि भगवान् यथा अन्वशासत् - भगवान जसा उपदेश करिता झाला तथा अतन्द्रिताः चक्रुः - त्याप्रमाणे सावधपणे करते झाले ॥३०॥
त्या राजांनी तेथे जाऊन आपापल्या प्रजाजनांना त्या परमपुरुषाची अद्भुत लीला ऐकविली. त्यानंतर अत्यंत काळजीपूर्वक भगवंतांच्या आज्ञेनुसार ते राज्य करू लागले. (३०)
जरासन्धं घातयित्वा भीमसेनेन केशवः ।
पार्थाभ्यां संयुतः प्रायात् सहदेवेन पूजितः ॥ ३१ ॥ गत्वा ते खाण्डवप्रस्थं शङ्खान् दध्मुर्जितारयः । हर्षयन्तः स्वसुहृदो दुर्हृदां चासुखावहाः ॥ ३२ ॥
जरासंधास हे ऐसे भीमाच्या करवी हरी । वधिता निघला तेंव्हा पूजिले सहदेवने ॥ ३१ ॥ तिघेही पातले वीर इंद्रप्रस्थात तेधवा । फुंकिले आपुले शंख शत्रुंना दुःख जाहले ॥ ३२ ॥
सहदेवेन पूजितः केशवः - सहदेवाने पूजिलेला श्रीकृष्ण भीमसेनेन जरासंधं घातयित्वा - भीमाकडून जरासंधाला मारवून पार्थाभ्यां संयुतः प्रायात् - भीमार्जुनांसह जाण्यास निघाला ॥३१॥ स्वसुहृदः हर्षयन्तः - आपल्या स्नेह्यांना आनंद देणारे दुर्हृदां च असुखावहाः - आणि दुष्ट शत्रूंना दुःख देणारे जितारयः ते - ज्यांनी शत्रूला जिंकिले आहे असे श्रीकृष्ण, भीम व अर्जुन खाण्डवप्रस्थं गत्वा - इंद्रप्रस्थाला जाऊन शङ्खान् दध्मुः - शंख वाजविते झाले ॥३२॥
अशा प्रकारे श्रीकृष्णांनी भीमसेनाच्या हस्ते जरासंधाचा वध करवून, भीमसेन आणि अर्जुनासह जरासंधपुत्र सहदेवाकडून सन्मानित होऊन इंद्रप्रस्थाकडे प्रयाण केले. इंद्रप्रस्थाजवळ पोहोचल्यावर त्या विजयी वीरांनी आपापले शंख वाजविले. त्यामुळे त्यांच्या इष्ट-मित्रांना सुख आणि शत्रूंना अतिशय दु:ख झाले. (३१-३२)
तच्छ्रुत्वा प्रीतमनस इन्द्रप्रस्थनिवासिनः ।
मेनिरे मागधं शान्तं राजा चाप्तमनोरथः ॥ ३३ ॥
ऐकता ध्वनि तो लोक आनंदे उठले पहा । जाणिले मारिले दैत्या यज्ञहि पूर्ण होतसे ॥ ३३ ॥
तत् श्रुत्वा - तो शंखनाद श्रवण करून प्रीतमनसः - प्रसन्न झाले आहे चित्त ज्यांचे असे इन्द्रप्रस्थनिवासिनः - इंद्रप्रस्थात रहाणारे लोक मागधं शान्तं मेनिरे - जरासंध मृत झाला असे मानिते झाले राजा च - आणि राजा युधिष्ठिर आप्तमनोरथः (बभूव) - प्राप्त झाला आहे मनोरथ ज्याला असा झाला ॥३३॥
तो शंखध्वनी ऐकून इंद्रप्रस्थवासियांची मने आनंदित झाली. जरासंध मारला गेला, हे त्यांना कळाले. युधिष्ठिराचे संकल्पही पूर्ण झाले. (३३)
अभिवन्द्याथ राजानं भीमार्जुनजनार्दनाः ।
सर्वमाश्रावयां चक्रुः आत्मना यदनुष्ठितम् ॥ ३४ ॥
भीम अर्जुन कृष्णाने वंदिला धर्मराज तो । जरासंध वधाची ती वदले सर्वची कथा ॥ ३४ ॥
अथ - नंतर भीमार्जुनजनार्दनाः - भीम, अर्जुन, श्रीकृष्ण हे राजानम् अभिवन्द्य - धर्मराजाला वंदन करून यत् आत्मना अनुष्ठितं - जे कार्य आपल्याकडून केले गेले (तत्) सर्वं आश्रावयांचक्रुः - ते सर्व सविस्तर सांगते झाले ॥३४॥
भीमसेन, अर्जुन आणि श्रीकृष्णांनी राजाला वंदन केले. तसेच जरासंधाचा वध करण्यासाठी त्यांना जे जे करावे लागले, ते सर्व त्यांनी सांगितले. (३४)
निशम्य धर्मराजस्तत् केशवेनानुकम्पितम् ।
आनन्दाश्रुकलां मुञ्चन् प्रेम्णा नोवाच किञ्चन ॥ ३५ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे उत्तरार्धे कृष्णाद्यागमने नाम त्रिसप्ततितमोऽध्यायः ॥ ७३ ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
ऐकता धर्मराजे ते प्रेमाने भरले पहा । नेत्रात दाटले अश्रू न कांही बोलले तदा ॥ ३५ ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर त्र्याहत्तरावा अध्याय हा ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
धर्मराजः - धर्मराज केशवेन अनुकंपितं तत् निशम्य - श्रीकृष्णाने कृपाळूपणे घडवून आणिलेले ते कृत्य श्रवण करून प्रेम्णा आनन्दाश्रुकलां मुञ्चन् - प्रेमाने आनंदाश्रूचे बिंदु सोडीत किंचन न उवाच - काहीहि बोलला नाही ॥३५॥ त्र्याहत्तरावा अध्याय समाप्त
श्रीकृष्णांची ही आपल्यावरील कृपा ऐकून युधिष्ठिर सद्गदित झाला त्याच्या नेत्रांतून आनंदाश्रू वाहू लागले. भगवंतांचे ते प्रेम पाहून त्याच्या तोंडून शब्द फुटेना ! (३५)
अध्याय त्र्याहत्तरावा समाप्त |