|
श्रीमद् भागवत पुराण राजसूयोपक्रमे पाण्डवानां दिग्विजयः; भीमेन जरासंध वधश्च - पांडवांच्या राजसूय यज्ञाचे आयोजन आणि जरासंधाचा उद्धार - संहिता - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् ) एकदा तु सभामध्य आस्थितो मुनिभिर्वृतः । ब्राह्मणैः क्षत्रियैर्वैश्यैः भ्रातृभिश्च युधिष्ठिरः ॥ १ ॥ आचार्यैः कुलवृद्धैश्च ज्ञातिसंबन्धिबान्धवैः । श्रृण्वतामेव चैतेषां आभाष्येदमुवाच ह ॥ २ ॥
श्रीशुकदेव सांगतात - ( अनुष्टुप् ) एकदा त्या सभेमध्ये बैसता मुनि नी द्विज । क्षत्रीय वैश्य नी भीम चारी बंधुहि ते तसे ॥ १ ॥ भावकी गुरु नी वृद्ध संबंधी सोयरे तसे । सर्वां समक्ष कृष्णाला धर्मे संवाद साधिला ॥ २ ॥
एकदा - एके दिवशी सभामध्य आस्थितः - सभेत बसलेला मुनिभिः ब्राह्मणैः क्षत्रियैः वैश्यैः भ्रातृभिः च वृतः - आणि ऋषि, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व भीमादि भाऊ यांनी वेष्टिलेला युधिष्ठिरः तु - धर्मराजा तर आचार्यैः कुलवृद्धैः ज्ञातिसम्बन्धिबान्धवैः च (वृतः) - आचार्य, कुळातील वडील मंडळी, जातभाई, इष्टमित्र व बांधव यांनी वेष्टिलेला एतेषां शृण्वतां एव - ही सर्व मंडळी ऐकत असताच (कृष्णम्) आभाष्य इदं उवाच ह - श्रीकृष्णाला हाक मारून असे म्हणाला ॥१-२॥
श्रीशुक म्हणतात- युधिष्ठिर एके दिवशी मुनी, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, बंधू, आचार्य, कुळातील ज्येष्ठ, नातलग, संबंधित आणि कुटुंबियांच्या बरोबर राजसभेत बसला होता. सर्वांच्या देखतच श्रीकृष्णांना उद्देशून तो म्हणाला. (१-२)
श्रीयुधिष्ठिर उवाच -
( वसंततिलका ) क्रतुराजेन गोविन्द राजसूयेन पावनीः । यक्ष्ये विभूतीर्भवतः तत्संपादय नः प्रभो ॥ ३ ॥
धर्मराज युधिष्ठिर म्हणाले - गोविंदा राजसूयाने तुम्हा नी विभुती रुपा । यजन करु मी इच्छी संकल्प पूर्ण तो करा ॥ ३ ॥
प्रभो गोविंद - हे समर्थ गोविंदा क्रतुराजेन राजसूयेन भवतः पावनीः विभूतीः यक्ष्ये - सर्व यज्ञांचा राजा अशा राजसूय यज्ञाच्या द्वारे तुझ्या पवित्र इंद्रादि विभूतीचे मी पूजन करणार आहे तत् नः (कार्यं) संपादय - ते आमचे कार्य सिद्धीला ने ॥३॥
युधिष्ठिर म्हणाला- हे गोविंदा ! यज्ञांचा राजा अशा राजसूय यज्ञाने मी आपल्या पावन विभूतीस्वरूप देवतांचे पूजन करू इच्छितो. हे प्रभो ! आपण माझा हा संकल्प पुरा करावा. (३)
त्वत्पादुके अविरतं परि ये चरन्ति
ध्यायन्त्यभद्रनशने शुचयो गृणन्ति । विन्दन्ति ते कमलनाभ भवापवर्गम् आशासते यदि त आशिष ईश नान्ये ॥ ४ ॥
( वसंततिलका ) ध्याती पदास तुझिया जन तेचि धन्य ते जन्म मृत्यु मधुनी सुटतात देवा । जे इच्छितात विषया मिळती तया ते त्यांना न मुक्ति मिळते नच मोक्ष लाभे ॥ ४ ॥
कमलनाभ ईश - ज्याच्या नाभिस्थानावर कमल आहे अशा हे श्रीकृष्णा ये शुचयः (नराः) - जे पुण्य़वान पुरुष अभद्रनशने त्वत्पादुके - अशुभांचा नाश करणार्या तुझ्या पायांची अविरतं परि चरन्ति - एकसारखी सेवा करितात ध्यायन्ति गृणन्ति (च) - ध्यान करितात व स्तुति करितात ते भवापवर्गं विन्दन्ति - ते संसारबंधनातून मुक्ति मिळवितात. यदि आशासते (तर्हि) ते आशिषः (विंदन्ति) - जर ते काही इच्छा करतील तर त्या इष्ट वस्तु ते मिळवितात अन्ये न (विन्दंति) - दुसरे कोणी या मिळवीत नाहीत. ॥४॥
हे कमलनाभा ! सर्व अमंगल नष्ट करणा-या आपल्या चरणकमलांची जे लोक निरंतर सेवा करतात, ध्यान आणि स्तुती करतात तेच खरे पवित्र होत. ते संसारापासून आपली सुटका करून घेतात. आणि जर त्यांनी संसारातील विषयांची इच्छा केली, तर त्यांचीसुद्धा त्यांना प्राप्ती होते; परंतु अभक्तांना मात्र काहीच मिळत नाही. (४)
तद्देवदेव भवतश्चरणारविन्द
सेवानुभावमिह पश्यतु लोक एषः । ये त्वां भजन्ति न भजन्त्युत वोभयेषां निष्ठां प्रदर्शय विभो कुरुसृञ्जयानाम् ॥ ५ ॥
देवाधि देव जन सर्व बघोत तू ते नी तो प्रभाव भरतो हृदयात त्यांच्या । भक्ती न जे करिति नी भजती तयांचा तू भेद दाव सकला कुरु सृंजयाला ॥ ५ ॥
देवदेव प्रभो - हे देवांच्या देवा श्रीकृष्णा तत् - म्हणून एषः लोकः - हा जनसमुदाय इह - ह्या ठिकाणी भवतः चरणारविन्दसेवानुभावं - तुझ्या पदकमलाच्या सेवेचे सामर्थ्य पश्यतु - पाहो ये त्वां भजन्ति - जे तुला भजतात उत वा (ये) न भजन्ति - किंवा जे भजत नाहीत अशा उभयेषां कुरुसृञ्जयानां - दोन्ही प्रकारच्या कौरवांना व सृंजयांना (तेषां) निष्ठां प्रदर्शय - त्यांची स्थिती दाखव. ॥५॥
हे देवदेवा ! या लोकांना आपल्या चरणकमलांच्या सेवेचा प्रभाव पाहू दे ! कुरुवंशी आणि सृंजयवंशी राजांपैकी जे लोक आपले भजन करतात आणि जे करीत नाहीत, त्यांच्यामधील अंतर हे प्रभो ! आपण लोकांना दाखवा. (५)
न ब्रह्मणः स्वपरभेदमतिस्तव स्यात्
सर्वात्मनः समदृशः स्वसुखानुभूतेः । संसेवतां सुरतरोरिव ते प्रसादः सेवानुरूपमुदयो न विपर्ययोऽत्र ॥ ६ ॥
तू ब्रह्ममोद सम नी सकलास आत्मा ना भेद तो मुळि तुला परका अपूला । भक्तास कल्पतरुच्या परि पावतोस सेवेत न्यून पडते नच न्यून तू तो ॥ ६ ॥
ब्रह्मणः सर्वात्मनः समदृशः स्वसुखानुभूतेः तव - ब्रह्मरूपी, सर्वत्र आत्मरूपाने रहाणार्या समदृष्टि व आत्मसुखाचा अनुभव घेणार्या तुला स्वपरभेदमतिः न स्यात् - आपपर भाव मुळीच नाही संसेवतां सुरतरोः इव ते प्रसादः - सेवा करणार्यांना कल्पवृक्षाप्रमाणे असणार्या तुझी कृपा सेवानुरूपं उदयः (भवति) - सेवेला उचित असा उत्कर्ष होणे हीच होय अत्र विपर्ययः न - ह्यात कधीही उलट होत नाही. ॥६॥
प्रभो ! आपण सर्वांचे आत्मा, समदर्शी आणि आत्मानंदाचे साक्षात्कारी आहात. स्वत: ब्रह्म आहात. आपल्या ठायी आपपरभाव नाही. तरीसुद्धा, जे आपली सेवा करतात, त्यांना कल्पवृक्षाप्रमाणे फळ मिळतेच. त्या फळामध्ये जो कमी अधिकपणा असतो, तो सेवेनुसार असतो. याउलट कधी होत नाही. (६)
श्रीभगवानुवाच -
( अनुष्टुप् ) सम्यग् व्यवसितं राजन् भवता शत्रुकर्शन । कल्याणी येन ते कीर्तिः लोकान् अनुभविष्यति ॥ ७ ॥
भगवान् श्रीकृष्ण म्हणाले - ( अनुष्टुप् ) विजयी नृपती राजा निश्चय उत्तमो असे । राजसूय अशा यज्ञे होय विस्तार कीर्तिचा ॥ ७ ॥
शत्रुकर्शन राजन् - हे शत्रुनाशका धर्मराजा भवता सम्यक् व्यवसितं - तू उत्तम निश्चय केला आहेस येन ते कल्याणी कीर्तिः - ज्यामुळे तुझी कल्याणकारक कीर्ति लोकान् अनुभविष्यति - सर्व लोकांचा अनुभव घेईल. ॥७॥
श्रीभगवान म्हणाले- हे शत्रूवर विजय मिळविणा-या धर्मराजा ! आपला निश्चय अतिशय चांगला आहे. हा यज्ञ केल्याने सर्व लोकांमध्ये आपल्या मंगलमय कीर्तीचा विस्तार होईल. (७)
ऋषीणां पितृदेवानां सुहृदामपि नः प्रभो ।
सर्वेषामपि भूतानां ईप्सितः क्रतुराडयम् ॥ ८ ॥
ऋषिंना पितरां देवां आम्हा नी काय ते वदो । सर्वची प्राणि मात्राला अभीष्ट यज्ञ तो असे ॥ ८ ॥
प्रभो - हे धर्मराजा अयं क्रतुराट् - हा यज्ञांचा राजा असा राजसूय यज्ञ ऋषीणां पितृदेवानां - ऋषि, पितर, व देव ह्यांना सुहृदाम् नः अपि - मित्र अशा आम्हालाही सर्वेषाम् अपि भूतानां - सर्वही प्राणिमात्रांना ईप्सितः - इष्ट आहे. ॥८॥
हे राजन ! आपला हा महायज्ञ ऋषी, पितर, देवता, संबंधित आम्ही व सर्व प्राणी या सर्वांना प्रिय आहे. (८)
विजित्य नृपतीन् सर्वान् कृत्वा च जगतीं वशे ।
सम्भृत्य सर्वसम्भारान् आहरस्व महाक्रतुम् ॥ ९ ॥
पृथ्वीचे नृपती सर्व सर्व ते वश ठेवुनी । सामग्री मेळुनी सर्व महायज्ञास बैसणे ॥ ९ ॥
सर्वान् नृपतीन् विजित्य - सर्व राजांना जिंकून जगतीं च वशे कृत्वा - आणि जगाला आपल्या स्वाधीन करून सर्वसंभारान् संभृत्य - सर्व साहित्य गोळा करून महाक्रतुं आहरस्व - तू राजसूय यज्ञ कर. ॥९॥
पृथ्वीवरील सर्व राजांना जिंकून सर्व पृथ्वी आपल्या ताब्यात घे आणि सर्व सामग्री एकत्रित करून हा महायज्ञ कर. (९)
एते ते भ्रातरो राजन् लोकपालांशसंभवाः ।
जितोऽस्म्यात्मवता तेऽहं दुर्जयो योऽकृतात्मभिः ॥ १० ॥
नृपती तुमचे बंधू अंश ते लोकपालचे । संयमी सद्गुणी वीर अशांना वश नित्य मी ॥ १० ॥
राजन् - हे धर्मराजा एते ते भ्रातरः - हे तुझे भाऊ लोकपालांशसंभवाः (सन्ति) - इंद्रादि लोकपालांच्या अंशापासून उत्पन्न झाले आहेत यः अकृतात्मभिः दुर्जेयः - जो इंद्रियनिग्रह न करणार्यांना जिंकता न येणारा असा आहे (सः) अहं - तो मी आत्मवता ते जितः अस्मि - जितेंद्रिय अशा तुझ्याकडून जिंकला गेलो आहे. ॥१०॥
महाराज ! तुझे हे चारही भाऊ लोकपालांच्या अंशापासून जन्मले आहेत. संयमी अशा तू इंद्रियांवर ताबा नसणा-यांना प्राप्त न होणा-या मला जिंकून घेतले आहेस. (१०)
न कश्चिन्मत्परं लोके तेजसा यशसा श्रिया ।
विभूतिभिर्वाभिभवेद् देवोऽपि किमु पार्थिवः ॥ ११ ॥
विश्वात कोणि ना द्वेषी माझ्या भक्तास षड्गुणी । तर ती शक्यता नाही तिरस्कारील कोण तो ॥ ११ ॥
कश्चित् देवः अपि - कोणता देवही लोके - लोकांमध्ये मत्परं - माझी उपासना करणार्या भक्ताचा तेजसा यशसा श्रिया - तेजाने, कीर्तीने व ऐश्वर्याने वा विभूतिभिः - किंवा सैन्यादि सामग्रीने न अभिभवेत् - पराभव करू शकणार नाही उ पार्थिवः किम् - अरे, मग सामान्य राजाची कथा काय ? ॥११॥
जगात देवसुद्धा तेज, यश, लक्ष्मी किंवा ऐश्वर्य यांच्या बळावर माझ्या भक्ताचा पराभव करू शकणार नाही. मग एखाद्या राजाची काय कथा ! (११)
श्रीशुक उवाच -
निशम्य भगवद्गीतं प्रीतः फुल्लमुखाम्बुजः । भ्रातॄन् दिग्विजयेऽयुङ्क्त विष्णुतेजोपबृंहितान् ॥ १२ ॥
श्रीशुकदेव सांगतात - ऐकता भगवत् शब्द आनंदे भरता नृप । दिग्विजय तसा सांगे बंधुंना शक्तिसंचरे ॥ १२ ॥
फुल्लमुखाम्बुजः प्रतिः (सः) - प्रफुल्लित झाले आहे मुखकमळ ज्याचे असा प्रसन्न झालेला धर्मराज भगवद्गीतं निशम्य - श्रीकृष्णाचे भाषण ऐकून विष्णुतेजोपबृंहितान् भ्रातृन् - भगवंताच्या तेजाने वाढलेल्या भावांना दिग्विजये अयुङ्क्त - दिग्विजयाच्या कामी योजिता झाला. ॥१२॥
श्रीशुक म्हणतात- भगवंतांचे म्हणणे ऐकून संतुष्ट झालेल्या युधिष्ठिराचे मुखकमल प्रफुल्लित झाले. त्याने श्रीकृष्णतेजाने अधिक प्रभावशाली बनलेल्या आपल्या भावांना दिग्विजय करण्याची आज्ञा दिली. (१२)
सहदेवं दक्षिणस्यां आदिशत् सह सृञ्जयैः ।
दिशि प्रतीच्यां नकुलं उदीच्यां सव्यसाचिनम् । प्राच्यां वृकोदरं मत्स्यैः केकयैः सह मद्रकैः ॥ १३ ॥
सृंजयो सहदेवाला दक्षिणीं धाडिले असे । मत्स्यदेशास नकुला पश्चिमीं धाडिले असे । केकयी अर्जुना लागी दिधली उत्तरो दिशा । मद्रास भीमसेनाला पूर्वदेशास धाडिले ॥ १३ ॥
सृञ्जयैः सह सहदेवं दक्षिणस्याम् आदिशत् - सहदेवाला सृंजयासह दक्षिण दिशेकडे जाण्यास आज्ञा देता झाला प्रतीच्यां दिशि नकुलं - पश्चिम दिशेकडे नकुळाला उदीच्यां सव्यसाचिनं - उत्तर दिशेकडे अर्जुनाला प्राच्यां (च) मत्स्यैः केकयैः मद्रकैः सह वृकोदरं (आदिशत्) - व पूर्व दिशेकडे मत्स्य, केकय व मद्रदेश येथील राजांसह भीमाला जाण्याची आज्ञा देता झाला. ॥१३॥
त्याने सृंजयवंशी वीरंसह सहदेवाला दक्षिण दिशेकडे, नकुलाला मत्स्यदेशीय वीरांसह पश्मिमेकडे, अर्जुनाला केकयदेशीय वीरांसह उत्तरेकडे आणि भीमसेनाला मद्रदेशीय वीरांसह पूर्व दिशेकडे पाठविले. (१३)
ते विजित्य नृपान् वीरा आजह्रुर्दिग्भ्य ओजसा ।
अजातशत्रवे भूरि द्रविणं नृप यक्ष्यते ॥ १४ ॥
भीमसेनादि वीरांनी बल पौरुष योजुनी । नृपती जिंकले थोर रायां धन समर्पिले ॥ १४ ॥
नृप - हे परीक्षित राजा ते वीराः - ते पराक्रमी भीमादि भाऊ नृपान् विजित्य - राजांना जिंकून ओजसा - उत्साहशक्तीच्या योगाने यक्ष्यते अजातशत्रवे - यज्ञ करणार्या धर्मराजाकरिता दिग्भ्यः भूरि द्रविणं आजह्लुः - चारहि दिशांकडून पुष्कळ द्रव्य आणिते झाले. ॥१४॥
परीक्षिता ! त्या वीरांनी आपल्या सामर्थ्याने सर्व दिशांकडील राजांना जिंकले आणि यज्ञ करू इच्छिणा-या युधिष्ठिअराला विपुल धन आणून दिले. (१४)
श्रुत्वाजितं जरासन्धं नृपतेर्ध्यायतो हरिः ।
आहोपायं तमेवाद्य उद्धवो यमुवाच ह ॥ १५ ॥
न जिंके तो जरापुत्र चिंतेत धर्म तेधवा । कृष्ण ती बोलले युक्ती वदले उद्धवो जसे ॥ १५ ॥
आद्यः हरिः - आदि पुरुष असा श्रीकृष्ण ध्यायतः नृपतेः - विचार करीत बसलेल्या धर्मराजाकडून जरासंधं अजितं श्रुत्वा - जरासंध जिंकिला गेला नाही असे ऐकून यं (उपायं) उद्धवः उवाच ह - जो उपाय उद्धवाने पूर्वी सुचविला होता तम् एव उपायम् आह - तोच उपाय सांगता झाला. ॥१५॥
अजून जरासंध अजिंक्य आहे, हे ऐकून राजाला काळजी वाटू लागली. त्यावेळी श्रीकृष्णांनी उद्धवांनी सांगितलेला उपाय त्याला सांगितला. (१५)
भीमसेनोऽर्जुनः कृष्णो ब्रह्मलिङ्गधरास्त्रयः ।
जग्मुर्गिरिव्रजं तात बृहद्रथसुतो यतः ॥ १६ ॥
अर्जून भीम नी कृष्ण द्विजवेष करोनिया । पातले ते गिरिव्रजी जरासंधपुरास त्या ॥ १६ ॥
तात - हे परीक्षित राजा भीमसेनः अर्जुनः कृष्णः (च) - भीम, अर्जुन व कृष्ण असे ब्रह्मलिङगधराः त्रयः - ब्राह्मणाचे रूप धारण करणारे तिघेजण यतः बृहद्रथसुतः (आसीत्) - बृहद्रथाचा पुत्र जरासंध जेथे रहात होता (तं) गिरिव्रजं जग्मुः - त्या पर्वतसमूहाने वेष्टिलेल्या स्थानाला गेले. ॥१६॥
परीक्षिता ! यानंतर भीमसेन, अर्जुन आणि श्रीकृष्ण हे तिघेही ब्राह्मणांचा वेष घेऊन गिरिव्रजाला गेले. तेथेच जरासंध राहात होता. (१६)
ते गत्वाऽऽतिथ्यवेलायां गृहेषु गृहमेधिनम् ।
ब्रह्मण्यं समयाचेरन् राजन्या ब्रह्मलिङ्गिनः ॥ १७ ॥
द्विजभक्त असा दैत्य गृहस्थाश्रम पाळि तो । अतिथी पूजना वेळी बोलले वेषधारि हे ॥ १७ ॥
ब्रह्मलिङगिनः ते राजन्याः - ब्राह्मणांचे रूप धारण करणारे ते क्षत्रिय आतिथ्यवेलायां गत्वा - अतिथीचे पूजन करण्याच्या प्रसंगी ब्रह्मण्यं गृहेषु गृहमेधिनं (जरासंधम्) - ब्राह्मणांचे हित करणार्या व घरामध्ये गृहस्थधर्माचे आचरण करणार्या जरासंधाजवळ समयाचेरन् - याचना करिते झाले. ॥१७॥
राजा जरासंध ब्राह्मणांचा भक्त आणि गृहस्थोचित धर्मांचे पालन करणारा होता. वरील तिघे क्षत्रिय ब्राह्मणाचा वेष घेऊन अतिथीसत्काराच्या वेळी जरासंधाकडे गेले आणि त्यांनी त्याच्याकडे याचना केली. (१७)
राजन् विद्ध्यतिथीन् प्राप्तान् अर्थिनो दूरमागतान् ।
तन्नः प्रयच्छ भद्रं ते यद् वयं कामयामहे ॥ १८ ॥
तिघे आले दुरोनिया प्रयोजन विशेष ते । इच्छितो आम्हि ते कांही अवश्य देइजे अम्हा ॥ १८ ॥
राजन् - हे राजा दूरं आगतान् - लांबून आलेले अर्थिनः अतिथीन् प्राप्तान् - याचनार्थ अतिथि म्हणून आलेले (नः) विद्धि - आम्हाला जाण यत् वयं कामयामहे तत् नः प्रयच्छ - जे आम्ही इच्छित आहोत ते आम्हाला दे ते भद्रं (अस्तु) - तुझे कल्याण असो. ॥१८॥
राजन ! आपले कल्याण असो ! आम्ही तिघेजण आपले अतिथी म्हणून आलो आहोत आणि फार लांबून आलो आहोत. म्हणून आम्ही मागू ते आपण आम्हांला द्यावे. (१८)
किं दुर्मर्षं तितिक्षूणां किं अकार्यं असाधुभिः ।
किं न देयं वदान्यानां कः परः समदर्शिनाम् ॥ १९ ॥
क्षमावान् काय ना साही दुष्ट तो काय ना करी । उदार काय ना देई परका कोण त्या समा ॥ १९ ॥
तितिक्षूणां किं दुर्मर्षं - सहनशीलांना असह्य काय आहे असाधुभिः अकार्यं किम् - दुष्टांना वाईट काय आहे वदान्यानां अदेयं किम् - दानशूरांना न देता येण्यासारखे काय आहे समदर्शिनां कः परः - समदृष्टि ठेवणार्यांना परकी कोण आहे ? ॥१९॥
सहनशील माणसे काय सहन करू शकत नाहीत? दुष्ट माणसांना न करण्यासारखे काय असते? उदार पुरुष काय देऊ शकत नाहीत आणि समदर्शी असणा-याला परका कोण आहे ? (१९)
योऽनित्येन शरीरेण सतां गेयं यशो ध्रुवम् ।
नाचिनोति स्वयं कल्पः स वाच्यः शोच्य एव सः ॥ २० ॥
समर्थ असुनी कोण नाशवंतास बाळगी । गाती संत जरी कोणा निंदा दुःखचि ते असे ॥ २० ॥
यः स्वयंकल्पः (सन्) - जो स्वतः समर्थ असता अनित्येन शरीरेण - क्षणभंगुर अशा शरीराने सतां गेयं ध्रुवं यशः - सज्जनांना गाता येण्यासारखे चिरस्थायी यश न आचिनोति - साठवीत नाही सः वाच्यः - तो निंदेला पात्र होतो सः शोच्यः एव - तो कीव करण्यास योग्य होय. ॥२०॥
जो मनुष्य स्वत: समर्थ असूनही या नाशवान शरीराने सज्जनांनी वाखाणण्याजोगे अविनाशी यश मिळवत नाही, त्याची निंदा करावी, तेवढी थोडीच. त्याच्याविषयी शोक करणेच योग्य आहे. (२०)
हरिश्चन्द्रो रन्तिदेव उञ्छवृत्तिः शिबिर्बलिः ।
व्याधः कपोतो बहवो ह्यध्रुवेण ध्रुवं गताः ॥ २१ ॥
हरिश्चंद्रो रंतिदेव दाणे खावोनि राहिले । बळी मुद्गल नी व्याध अतिथ्या देह देउनी । अविनाशी असे झाले आम्हा विन्मुख ना करी ॥ २१ ॥
हि - खरोखर हरिश्चंद्रः रंतिदेवः उञ्छवृत्तिः शिबिः बलिः - हरिश्चंद्र, रंतिदेव, उञ्छवृत्तीने निर्वाह करणारा मुद्गल, शिबि, व बलि व्याधः कपोतः बहवः (अन्ये च) - व्याध, कपोत व तसेच दुसरे पुष्कळजण अध्रुवेण ध्रुवं गताः - क्षणभंगुर शरीराने चिरस्थायी मोक्षाला प्राप्त झाले ॥२१॥
राजन ! हरिश्चंद्र, रंतिदेव, धान्याचे शेतात पडलेले दाणे वेचून उदरनिर्वाह करणारे मुद्गल, शिबी, बली, व्याध, कपोत इत्यादी पुष्कळशा व्यक्तींनी अतिथीला आपले सर्वस्व देऊन या नाशवान शरीराने अविनाशी पद प्राप्त करून घेतले. (२१)
श्रीशुक उवाच -
स्वरैराकृतिभिस्तांस्तु प्रकोष्ठैर्ज्याहतैरपि । राजन्यबन्धून् विज्ञाय दृष्टपूर्वानचिन्तयत् ॥ २२ ॥
श्रीशुकदेव सांगतात - आवाज चेहरे तैसे घट खांद्यासि पाहुनी । द्विज ना जाणिले दैत्य ओळखी आठवी मनी ॥ २२ ॥
तु - परंतु स्वरैः आकृतिभिः - स्वर, आकार यांवरून ज्याहतैः प्रकोष्ठैः अपि - धनुष्यरज्जूचे घट्टे पडलेल्या हातांवरून तान् दृष्टपूर्वान् राजन्यबंधून् विज्ञाय - त्यांना पूर्वी पाहिलेले क्षत्रिय असे ओळखून अचिंतयत् - विचार करिता झाला ॥२२॥
श्रीशुक म्हणतात- जरासंधाने त्या लोकांचा आवाज, त्यांचे रूप, मनगटावर धनुष्याच्या दोरीचे पडलेले घट्टे, ही चिन्हे पाहून ते क्षत्रिय आहेत, हे ओळखले. आता त्यांना पूर्वी कोठे पाहिले असावे, याविषयी तो आठवू लागला. (२२)
राजन्यबन्धवो ह्येते ब्रह्मलिङ्गानि बिभ्रति ।
ददानि भिक्षितं तेभ्य आत्मानमपि दुस्त्यजम् ॥ २३ ॥
भयाने पातले कोणी द्विजवेष करोनिया । जर हे मागती भिक्षा तर मी देइही तशी । याचना करिता यांनी देहही अर्पितो ययां ॥ २३ ॥
एते हि राजन्यबन्धवः - हे खरोखर क्षत्रिय ब्रह्मलिंगानि बिभ्रति - ब्राह्मणांची चिन्हे धारण करीत आहेत भिक्षितं (सत्) दुस्त्यजं आत्मानम् अपि - याचिलेले असता देण्यास कठीण असे शरीरसुद्धा तेभ्यः ददामि - मी त्यांना देईन. ॥२३॥
हे खात्रीने क्षत्रिय असून ब्राह्मणाचा वेष घेऊन आले आहेत. म्हणून त्यांना मी याचना केल्यास, देण्यास कठीण असे माझे शरीरही देईन. (२३)
बलेर्नु श्रूयते कीर्तिः वितता दिक्ष्वकल्मषा ।
ऐश्वर्याद् भ्रंशितस्यापि विप्रव्याजेन विष्णुना ॥ २४ ॥ श्रियं जिहीर्षतेन्द्रस्य विष्णवे द्विजरूपिणे । जानन्नपि महीं प्रादाद् वार्यमाणोऽपि दैत्यराट् ॥ २५ ॥
विष्णुने द्विजवेषाने लुटिला बळि सर्व तो । पवित्र बळिची कीर्ति आजही श्रेष्ठ गात ती ॥ २४ ॥ बळीचे लुटुनी द्रव्य देवेंद्रा विष्णुने दिले । गुरुने रोधिले त्याला तरी दान दिले तये ॥ २५ ॥
विप्रव्याजेन इंद्रस्य श्रियं जिहिर्षता विष्णुना - ब्राह्मणाच्या रूपाने इंद्राची संपत्ति इंद्रासाठी हरण करण्याची इच्छा करणार्या विष्णूने ऐश्वर्यात् भ्रंशितस्य अपि बलेः - ऐश्वर्यापासून भ्रष्ट केलेल्याहि बलिराजाची नु - खरोखर अकल्मषा कीर्तिः - निर्दोष कीर्ति दिक्षु वितता - दाही दिशांमध्ये पसरलेली श्रूयते - ऐकण्यात येते जानन् अपि (शुक्रेण) वार्यमाणः अपि दैत्यराट् - सर्व जाणणाराहि व शुक्राचार्याकडून निषेधिला जाणाराहि दैत्यांचा राजा बलि द्विजरूपिणे विष्णवे महीं प्रादात् - ब्राह्मणाचे रूप घेतलेल्या विष्णूला पृथ्वी देता झाला. ॥२४-२५॥
भगवंतांनी ब्राह्मणाचा वेष धारण करून बलीचे सारे ऐश्वर्य हिरावून घेतले, तरीसुद्धा त्याची सगळीकडे पसरलेली पवित्र कीर्ती आजसुद्धा ऐकिवात आहे. (२४) भगवंतांनी इंद्राची राज्यलक्ष्मी बलीकडून काढून घेऊन त्याला परत देण्यासाठीच ब्राह्मणाचे रूप धारण केले होते, हे माहीत असूनही आणि शुक्राचार्यांनी अडवूनही दैत्यराजाने त्यांना पृथ्वीचे दान दिलेच ना ! (२५)
जीवता ब्राह्मणार्थाय को न्वर्थः क्षत्रबन्धुना ।
देहेन पतमानेन नेहता विपुलं यशः ॥ २६ ॥
नाशवंत असा देह येणेचि यश साधिणे । न जो जगे द्विजासाठी तयाचे व्यर्थ ते जिणे ॥ २६ ॥
ब्राह्मणार्थाय - ब्राह्मणासाठी पतमानेन देहेन विपुलं यशः न ईहता जीवता क्षत्रबंधुना - नाशवंत देहाकडून पुष्कळ कीर्ति संपादण्याची इच्छा न करणार्या जिवंत क्षत्रियांचा कः नु अर्थः - कोणता बरे उपयोग आहे ? ॥२६॥
जो क्षत्रिय ब्राह्मणासाठी आपले जीवन खर्ची घालून या नाशवान शरीराने विपुल यश संपादन करीत नाही, त्याच्या जगण्याला काय अर्थ आहे? (२६)
इत्युदारमतिः प्राह कृष्णार्जुनवृकोदरान् ।
हे विप्रा व्रियतां कामो ददाम्यात्मशिरोऽपि वः ॥ २७ ॥
खरा उदार तो होता वेषधारी द्विजां म्हणे । इच्छा असेल ते मागा मागता शिर देइ हे ॥ २७ ॥
इति उदारमतिः (सः) - याप्रमाणे उदारबुद्धीचा तो जरासंध कृष्णार्जुन वृकोदरान् प्राह - श्रीकृष्ण, अर्जुन व भीम ह्यांना म्हणाला हे विप्राः - ब्राह्मण हो कामः व्रियतां - इच्छेप्रमाणे याचना करावी आत्मशिरः अपि वः ददामि - स्वतःचे मस्तकहि तुम्हाला देईन. ॥२७॥
उदार अंत:करणाच्या जरासंधाने असा विचार करून श्रीकृष्ण, अर्जुन आणि भीमसेनाला म्हटले - ब्राह्मणांनो ! आपणास पाहिजे ते मागा. मी आपल्याला माझे मस्तकसुद्धा द्यायला तयार आहे. (२७)
श्रीभगवानुवाच -
युद्धं नो देहि राजेन्द्र द्वन्द्वशो यदि मन्यसे । युद्धार्थिनो वयं प्राप्ता राजन्या नान्यकाङ्क्षिणः ॥ २८ ॥
भगवान् श्रीकृष्ण म्हणाले - भोजनेच्छू न ते आम्ही युद्धार्थी क्षत्रियो असू । द्वंद्वयुद्ध अशी भिक्षा इच्छिशी तर दे अम्हा ॥ २८ ॥
वयं राजन्याः - आम्ही क्षत्रिय युद्धार्थिनः प्राप्ताः - युद्धभिक्षा मागण्यासाठी आलो आहो अन्नकांक्षिणः न - अन्नाची इच्छा करणारे नाही राजेन्द्र - जरासंधा यदि मन्यसे - जर तुला वाटत असेल तर द्वंद्वशः युद्धं नः देहि - द्वंद्वयुद्ध आम्हाला दे. ॥२८॥
श्रीकृष्ण म्हणाले- राजेंद्रा ! आम्हांला अन्न नको. आम्ही क्षत्रिय आपल्याकडे युद्धासाठी आलो आहोत. आपली इच्छा असेल, तर आपण आम्हांस द्वंद्वयुद्धाची भिक्षा द्यावी. (२८)
असौ वृकोदरः पार्थः तस्य भ्रातार्जुनो ह्ययम् ।
अनयोर्मातुलेयं मां कृष्णं जानीहि ते रिपुम् ॥ २९ ॥
पहा हे पंडुचे पुत्र भीम अर्जुन मी असे । जुना तुझा असा शत्रू कृष्ण आहे उभा पहा ॥ २९ ॥
असौ पार्थः वृकोदरः (अस्ति) - हा कुंतिपुत्र भीम होय अयं हि तस्य भ्राता अर्जुनः - हा खरोखर त्या भीमाचा भाऊ अर्जुन आहे अनयोः मातुलेयं मां ते रिपुं कृष्णं जानीहि - या दोघांचा मामेभाऊ असा मी तुझा शत्रु कृष्ण समज. ॥२९॥
हे पहा ! हा पांडुपुत्र भीमसेन आहे आणि हा याचा भाऊ अर्जुन आहे. मी या दोघांचा मामेभाऊ व तुझा शत्रू कृष्ण आहे. (२९)
एवमावेदितो राजा जहासोच्चैः स्म मागधः ।
आह चामर्षितो मन्दा युद्धं तर्हि ददामि वः ॥ ३० ॥
हासे परिचये दैत्य चिडोनी वदला असे । मूर्खांनो इच्छिता युद्ध तरी मी ते स्विकारितो ॥ ३० ॥
एवं आवेदितः मागधः राजा - ह्याप्रमाणे सांगितलेला जरासंध राजा उच्चैः जहास स्म - मोठयाने हसला अमर्षितः च आह - आणि रागावलेला असा म्हणाला मंदाः - अहो मंदबुद्धीच्या पुरुषांनो तर्हि वः युद्धं ददामि - तर तुम्हाला मी द्वंद्वयुद्ध देतो. ॥३०॥
श्रीकृष्णांनी असे सांगितले, तेव्हा राजा जरासंध खो खो करून हसू लागला. आणि मग चिडून म्हणाला - अरे मूर्खांनो ! तुम्हांला जर युद्धच हवे असेल तर ते देतो. (३०)
न त्वया भीरुणा योत्स्ये युधि विक्लवतेजसा ।
मथुरां स्वपुरीं त्यक्त्वा समुद्रं शरणं गतः ॥ ३१ ॥
भित्रा युद्धात तू कृष्णा मथुरा सोडिली भये । समुद्री राहसी तेंव्हा तुमसी मच मी लढे ॥ ३१ ॥
स्वपुरीं मथुरां त्यक्त्वा - आपली नगरी मथुरा सोडून (त्वं) समुद्रं शरणं गतः - तू समुद्राला शरण गेलास (तेन) विक्लवचेतसा भीरुणा त्वया - अशा त्या भ्रमिष्ट अंतःकरणाच्या भित्र्या तुझ्याबरोबर युधि न योत्स्ये - द्वंद्वयुद्धामध्ये मी युद्ध करणार नाही. ॥३१॥
परंतु कृष्णा ! तू भित्रा आहेस ! युद्धामध्ये तू माझ्या भीतीने मथुरा नगरी सोडून समुद्राला शरण गेलास. म्हणून मी तुझ्याशी लढणार नाही. (३१)
अयं तु वयसा तुल्यो नातिसत्त्वो न मे समः ।
अर्जुनो न भवेद् योद्धा भीमस्तुल्यबलो मम ॥ ३२ ॥
अर्जुनही नसे योद्धा बालची दुर्बला असा । न लढे म्हणूनी त्याशी बलवान् भीम जोड हा ॥ ३२ ॥
अयं अर्जुनः तु - हा अर्जुन तर वयसा अतुल्यः - वयाने समान नाही असा न अतिसत्त्वः न समः - अत्यंत बलिष्ठ नाही व माझ्या समान नाही मे योद्धा न भवेत् - माझा प्रतिस्पर्धी होणे योग्य नाही भीमः मम तुल्यबलः - भीम हा माझ्याशी बलाने सारखा आहे. ॥३२॥
हा अर्जुनसुद्धा वयाने माझ्यापेक्षा लहान असून माझ्या बरोबरीचा बलवान वीर नाही. म्हणून मी याच्याबरोबर लढणार नाही. हा भीमसेन मात्र माझ्यासारखाच बलवान आहे. (३२)
इत्युक्त्वा भीमसेनाय प्रादाय महतीं गदाम् ।
द्वितीयां स्वयमादाय निर्जगाम पुराद् बहिः ॥ ३३ ॥
बोलोनी हे जरासंधे भीमाला दिधली गदा । स्वयही घेतली एक पुरा बाहेर पातला ॥ ३३ ॥
इति उक्त्वा - असे म्हणून भीमसेनाय महतीं गदां प्रादाय - भीमाला मोठी गदा देऊन (च) द्वितीयां (गदां) स्वयं आदाय - आणि दुसरी गदा स्वतः घेऊन पुरात् बहिः निर्जगाम - नगरातून बाहेर निघाला. ॥३३॥
असे म्हणून जरासंधाने भीमसेनाला एक मोठी गदा दिली आणि स्वत: दुसरी गदा घेऊन तो नगराच्या बाहेर आला. (३३)
ततः समे खले वीरौ संयुक्तावितरेतरौ ।
जघ्नतुर्वज्रकल्पाभ्यां गदाभ्यां रणदुर्मदौ ॥ ३४ ॥
भिडले मत्त ते वीर वज्रासम कठीण त्या । गदेने मारती तेंव्हा एकमेकास शक्तिने ॥ ३४ ॥
ततः समे खले - नंतर सपाट युद्धभूमीवर संयुक्तौ - एकत्र भिडलेले रणदुर्मदौ वीरौ - युद्धामुळे उन्मत्त बनलेले ते दोघे वीर वज्रकल्पाभ्यां गदाभ्यां - वज्राप्रमाणे बळकट अशा गदांनी इतरेतरौ जघ्नतुः - एकमेकांवर प्रहार करिते झाले. ॥३४॥
नंतर युद्धाची खुमखुमी असलेले दोन्ही वीर सपाट रणभूमीवर येऊन एकमेकांना भिडले आणि आपल्या वज्रासारख्या प्रचंड गदेने एकमेकांवर प्रहार करू लागले. (३४)
मण्डलानि विचित्राणि सव्यं दक्षिणमेव च ।
चरतोः शुशुभे युद्धं नटयोरिव रङ्गिणोः ॥ ३५ ॥
पवित्रा घेत ते डावा उजवा बदलोनिया । मंचकी नट ते जैसे शोभेने लढती जसे ॥ ३५ ॥
सव्यं दक्षिणं च एव - उजव्या बाजूने व डाव्या बाजूने विचित्राणि मण्डलानि चरतोः (तयोः) युद्धम् - चित्रविचित्र मंडलाकार भ्रमण करणार्या त्या दोघांचे युद्ध रंगिणोः इव नटयोः - रंगभूमीवर फिरणार्या नटांच्या हालचालींप्रमाणे शुशुभे - शोभले. ॥३५॥
ते डावीकडे उजवीकडे असे वेगवेगळे पवित्रे बदलत असता असे शोभून दिसत होते की, जणू काही दोन श्रेष्ठ नट रंगमंचावर युद्धाचा अभिनय करीत आहेत. (३५)
ततश्चटचटाशब्दो वज्रनिष्पेषसन्निभः ।
गदयोः क्षिप्तयो राजन् दन्तयोरिव दन्तिनोः ॥ ३६ ॥
गदा त्या भिडती तेंव्हा हत्ती ते लढती जसे । दातास दात मारोनी कडाडे वीज ती जशी ॥ ३६ ॥
राजन् - हे परीक्षित राजा ततः - नंतर क्षिप्तयोः गदयोः - फेकलेल्या दोन गदांचा दन्तिनोः दन्तयोः इव - हत्तींच्या दातांच्या प्रमाणे वज्रनिष्पेषसन्निभः चटचटाशब्दः (जातः) - वज्राच्या आघातासारखा चटचट असा शब्द झाला. ॥३६॥
परीक्षिता ! जेव्हा एकाची गदा दुस-याच्या गदेला टक्कर देत असे, तेव्हा वाटे की, झुंजणा-या दोन हत्तींच्या दातांचा खटखट आवाज होत आहे किंवा विजांचा कडकडाट होत आहे. (३६)
( वसंततिलका )
ते वै गदे भुजजवेन निपात्यमाने अन्योन्यतोंऽसकटिपादकरोरुजत्रून् । चूर्णीबभूवतुरुपेत्य यथार्कशाखे संयुध्यतोर्द्विरदयोरिव दीप्तमन्व्योः ॥ ३७ ॥
( वसंततिलका ) खंडोनि वृक्ष करिती जधि हत्ति मार जोती कितेक तुकडे मग फांदियांचे । तैशा गदाहि तुटती करिता प्रहार खांदा भुजांस करिता बहु तो प्रहार ॥ ३७ ॥
दीप्तमन्य्वोः द्विरदयोः इव संयुध्यतोः (तयोः) - प्रदीप्त झाला आहे राग ज्यांचा अशा हत्तीप्रमाणे लढणार्या त्या दोघांच्या भुजजवेन निपात्यमाने ते गदे - बाहूंच्या योगे जोराने फेकल्या जाणार्या त्या दोन गदा अन्योन्यतः - एकमेकांकडून अंसकटिपादकरोरुजत्रून् उपेत्य - खांदे, कंबर, हात, मांडया, सांधे यांवर पडून यथा अर्कशाखे - जशा रुईच्या फांद्या (तथा) चूर्णीबभूवतुः - तशा चूर्ण झाल्या. ॥३७॥
जेव्हा दोन हत्ती अतिशय रागाने झुंजू लागतात आणि रुईच्या फांद्या तोडून एकमेकांवर त्यांचे तडाखे देतात, त्यावेळी त्या फांद्यांचे तुकडे तुकडे होतात. त्याप्रमाणे जेव्हा जरासंध आणि भीमसेन बाहुबलाने आपापल्या गदांनी एकमेकांचे खांदे, कंबर, पाय, हात, मांड्या आणि खांद्यांचे सांधे यांवर वार करू लागले, तेव्हा त्यांच्या गदांचा चुराडा झाला. (३७)
इत्थं तयोः प्रहतयोर्गदयोर्नृवीरौ
क्रुद्धौ स्वमुष्टिभिरयःस्परशैरपिष्टाम् । शब्दस्तयोः प्रहरतोरिभयोरिवासीन् निर्घातवज्रपरुषस्तलताडनोत्थः ॥ ३८ ॥
जाती गदा तुटुनि तै मग वीर दोघे मुष्टी करोनि करिती अति मार तैसा । हत्तीपरीच लढती अन शब्द जैसे । गर्जोनि वीज चमके नभ मंडळात ॥ ३८ ॥
इत्थं तयोः गदयोः प्रहतयोः - याप्रमाणे त्या गदा एकमेकांवर फेकिल्या असता क्रुद्धौ नृवीरौ - रागावलेले असे ते दोघे पराक्रमी पुरुष अयःस्पर्शैः स्वमुष्ठिभिः - लोखंडाप्रमाणे मारा ज्यांचा अशा मुठींनी अपिष्टां - चूर्ण करिते झाले तलताडनोत्थः - ताडांच्या ताडनाने उत्पन्न झालेला प्रहरतोः तयोः शब्दः - प्रहार करणार्या त्या दोघांचा शब्द इभयोः इव - हत्तीप्रमाणे निर्घातवज्रपरुषः आसीत् - एकमेकांवर आदळलेल्या वज्रांप्रमाणे भयंकर असा होता. ॥३८॥
अशा प्रकारे जेव्हा गदांचा चक्काचूर झाला, तेव्हा ते दोघेही वीर रागाने ठोसे लगावून एकमेकांचे चूर्ण करण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांचे ठोसे म्हणजे जणू लोखंडी हातोड्यांचेच वार होते. दोन हत्तींप्रमाणे लढणा-या त्यांच्या थपडा आणि ठोशांचा आवाज विजेच्या कडकडाटाप्रमाणे भासत होता. (३८)
( अनुष्टुप् )
तयोरेवं प्रहरतोः समशिक्षाबलौजसोः । निर्विशेषमभूद् युद्धं अक्षीणजवयोर्नृप ॥ ३९ ॥
( अनुष्टुप् ) समान बल उत्साह युद्ध कौशल्यही तसे । न कोणी थकला तैसा न हारे जिंकिही कुणी ॥ ३९ ॥
नृप - हे परीक्षित राजा एवं प्रहरतोः - याप्रमाणे प्रहार करणार्या समशिक्षाबलोजसोः - सारखी आहेत शिक्षण, शक्ति व सामर्थ्य ही ज्यांची अशा अक्षीणजीवयोः तयोः - क्षीण झाले नाही बळ ज्यांचे अशा त्या दोघांचे निर्विशेषं युद्धं अभूत् - सारख्या योग्यतेचे युद्ध झाले. ॥३९॥
परीक्षिता ! जरासंध आणि भीमसेन या दोघांचेही युद्धातील कौशल्य, बळ आणि उत्साह सारखाच होता. दोघांची शक्ती जराही कमी झाली नव्हती. त्यामुळे जय-पराजयाचे चिन्ह दिसेना. (३९)
एवं तयोर्महाराज युध्यतोः सप्तविंशतिः ।
दिनानि निरगंस्तत्र सुहृद्वन् निशि तिष्ठतोः ॥ ४० ॥
रात्री थांबोनि ते दोघे मित्राच्या परि राहती । दिवसा लढती ऐसे सत्ताविस दिनी पहा ॥ ४० ॥
महाराज - हे परीक्षित राजा तत्र - तेथे निशि सुहृद्वत् तिष्ठतोः - रात्री मित्रांप्रमाणे वागणार्या (दिवा) युध्यतोः तयोः - दिवसा युद्ध करणार्या त्या दोघांचे एवं सप्तविंशतिः दिनानि निरगन् - याप्रमाणे सत्तावीस दिवस निघून गेले. ॥४०॥
दोघेही वीर रात्रीच्या वेळी मित्रांसारखे राहात आणि दिवसा अटीतटीने लढत. महाराज ! अशा प्रकारे लढता लढता त्यांचे सत्तावीस दिवस निघून गेले. (४०)
एकदा मातुलेयं वै प्राह राजन् वृकोदरः ।
न शक्तोऽहं जरासन्धं निर्जेतुं युधि माधव ॥ ४१ ॥
दुसर्या दिनि तो भीम कृष्णाला वदला असे । जरासंधास या युद्धी मी ना जिंकू शके कधी ॥ ४१ ॥
राजन् - हे परीक्षित राजा एकदा - एके दिवशी वृकोदरः मातुलेयं वै प्राह - भीम मामेभाऊ जो श्रीकृष्ण त्याला म्हणाला माधव - हे श्रीकृष्णा अहं जरासंधं युधि निर्जेतुं न शक्तः - मी जरासंधाला युद्धात जिंकण्यास समर्थ नाही. ॥४१॥
राजा ! अठ्ठाविसव्या दिवशी भीमसेन आपल्या मामेभाऊ श्रीकृष्णाला म्हणाला- "माधवा ! युद्धामध्ये मी जरासांधाला जिंकू शकणार नाही." (४१)
शत्रोर्जन्ममृती विद्वान् जीवितं च जराकृतम् ।
पार्थमाप्याययन् स्वेन तेजसाचिन्तयद्धरिः ॥ ४२ ॥
रहस्य जन्म मृत्यूचे कृष्णा माहीत ते असे । भीमा दिधली शक्ती उपाय दिधला तसा ॥ ४२ ॥
हरिः - श्रीकृष्ण शत्रोः जन्ममृती - शत्रु जो जरासंध त्याचे जन्म व मृत्यू ह्यांना जराकृतं च जीवितं विद्वान् - आणि जराराक्षसीकडून मिळालेल्या त्याचे जीवित जाणणारा असा स्वेन तेजसा पार्थं आप्याययन् - आपल्या तेजाने भीमाला पुष्ट करीत होत्साता अचिन्तयत् - विचार करू लागला. ॥४२॥
श्रीकृष्णांना जरासंधाचे जन्म-मृत्यू माहीत होते. तसेच जरा नावाच्या राक्षसिणीने जरासंधाच्या शरीराचे दोन तुकडे जोडून त्याला जीवदान दोले आहे, हेही ते जाणत होते. म्हणून त्यांनी भीमसेनाच्या शरीरामध्ये आपल्या शक्तीचा संचार करून त्याला बळ देत जरासंधाच्या वधाच्या युक्तीविषयी विचार केला. (४२)
सञ्चिन्त्यारिवधोपायं भीमस्यामोघदर्शनः ।
दर्शयामास विटपं पाटयन्निव संज्ञया ॥ ४३ ॥
अगाध ज्ञान कृष्णाचे उपाय मारण्या तसा । कळता फाडिली फांदी भीमा संकेत तो दिला ॥ ४३ ॥
अमोघदर्शनः (सः) - निष्फळ नाही दर्शन ज्याचे असा तो श्रीकृष्ण अरिवधोपायं संचिन्त्य - शत्रूच्या वधाविषयीचा उपाय मनात योजून संज्ञया विटपं पाटयन् इव - खुणेने झाडाची फांदी जणू दुभागीत भीमस्य दर्शयामास - भीमाला सुचविता झाला. ॥४३॥
त्यांनी त्याच्या मृत्यूचा उपाय म्हणून एक फांदी मधोमध चिरून ती खूण म्हणून भीमसेनाला दाखविली. (४३)
तद्विज्ञाय महासत्त्वो भीमः प्रहरतां वरः ।
गृहीत्वा पादयोः शत्रुं पातयामास भूतले ॥ ४४ ॥
शक्तिमंत अशा भीमे संकेत दिधला असे । पाय त्याचे धरोनीया पाडिला धरणीस तो ॥ ४४ ॥
प्रहरतां वरः महासत्त्वः सः भीमः - योद्ध्यांमध्ये श्रेष्ठ व मोठा बलाढय असा तो भीम तत् विज्ञाय - ती खूण जाणून पादयोः गृहीत्वा - पाय धरून भूतले शत्रुं पातयामास - भूमीवर शत्रु जो जरासंध त्याला पाडिता झाला. ॥४४॥
वीराग्रणी परम शक्तिशाली भीमसेनाने श्रीकृष्णांचा अभिप्राय जाणून जरासंधाचे पाय धरून त्याला जमिनीवर आपटले. (४४)
एकं पादं पदाक्रम्य दोर्भ्यामन्यं प्रगृह्य सः ।
गुदतः पाटयामास शाखमिव महागजः ॥ ४५ ॥
पायाने एक पायाते दाबोनी धरिला पुन्हा । दुसरा ओढुनी हाते भीमे दैत्यास फाडिले ॥ ४५ ॥
सः - तो भीम (स्वेन) पदा (शत्रोः) एकं पादं आक्रम्य - आपल्या पायाने शत्रूचा एक पाय दाबून धरून अन्यं दोर्भ्यां प्रगृह्य - दुसरा पाय दोन हातांनी धरून महागजः शाखाम् इव - जसा मोठा हत्ती, झाडाची फांदी फाडितो त्याप्रमाणे गुदतः पाटयामास - गुदापासून फाडीता झाला. ॥४५॥
नंतर त्याने त्याचा एक पाय आपल्या पायाने खाली दाबत आणि दुसरा आपल्या दोन्ही हातांनी पकडला. यानंतर भीमसेनाने हत्ती ज्याप्रमाणे झाडाची फांदी चिरतो, त्याप्रमाणे गुदद्वारापासून त्याला मधोमध चिरले. (४५)
एकपादोरुवृषण कटिपृष्ठस्तनांसके ।
एकबाह्वक्षिभ्रूकर्णे शकले ददृशुः प्रजाः ॥ ४६ ॥
एक पाय तसे अंड कमर पाथ नी स्तन । भुजा नेत्र तसे डोके भीमे अर्धाचि फाडिला ॥ ४६ ॥
प्रजाः - लोक एकपादोरुवृषणकटिपृष्ठस्तनांसके - एक पाय, एक मांडी, एक वृषण, एक कटिभाग, एक पृष्ठभाग, एक स्तन व एक खांदा असे एकएकच अवयव असलेले एकबाह्वक्षिभ्रूकर्णे शकले - एक दंड, एक डोळा, एक भुवई व एक कान असलेले, मधोमध चिरलेले शरीराचे दोन भाग ददृशुः - पहाते झाले. ॥४६॥
तेव्हा लोकांना जरासंधाच्या शरीराचे एक पाय, मांडी, अंडकोश, कंबर, पाठ, स्तन, खांदा, भुजा, डोळे, भुवया आणि कान वेगवेगळे झालेले दोन तुकडे दिसले. (४६)
हाहाकारो महानासीत् निहते मगधेश्वरे ।
पूजयामासतुर्भीमं परिरभ्य जयाच्यतौ ॥ ४७ ॥
हाहाःकार तदा झाला मरता मगधेश्वरो । कृष्णार्जुनेहि भीमाला भेटता अभिनंदिले ॥ ४७ ॥
मगधेश्वरे निहते - जरासंध मारिला गेला असता महान् हाहाकारः आसीत् - मोठा हाहाकार झाला जयाच्युतौ - अर्जुन व श्रीकृष्ण भीमं परिरभ्य पूजयामासतुः - भीमाला आलिंगन देऊन प्रशंसिते झाले. ॥४७॥
मगधराज जरासंधाचा मृत्यू झाल्यावर तेथील प्रजेमध्ये हाहाकार उडाला. त्याचवेळी श्रीकृष्ण आणि अर्जुनाने भीमसेनाला मिठी मारून त्याचा गौरव केला. (४७)
सहदेवं तत्तनयं भगवान्भूतभावनः ।
अभ्यषिञ्चदमेयात्मा मगधानां पतिं प्रभुः । मोचयामास राजन्यान् संरुद्धा मागधेन ये ॥ ४८ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे उत्तरार्धे जरासन्ध वधो नाम द्विसप्ततितमोऽध्यायः ॥ ७२ ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
कृष्णाचे रूप नी हेतू कोणासी न कळे कधी । जीवांचा जीवनो दाता तयाने सहदेव जो । जरासंध सुतो त्याला राज्यासी अभिषेकिले । बंदिवान् सर्व ते राजे कृष्णाने सोडिले तदा ॥ ४८ ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर बाहत्तरावा अध्याय हा ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
अमेयात्मा प्रभुः - निरुपम सामर्थ्याचा व सर्वशक्तिमान भूतभावनः भगवान् - प्राण्यांचे रक्षण करणारा श्रीकृष्ण तत्तनयं सहदेवं - त्या जरासंधाचा पुत्र जो सहदेव त्याला मगधानां पतिं अभ्यषिञ्चत् - मगध देशाचा राजा म्हणून अभिषेकिता झाला ये मागधेन संरुद्धाः - जे जरासंधाने बंदीत ठेविले होते (तान्) राजन्यान् मोचयामास - त्या राजांना सोडविता झाला. ॥४८॥
सर्वशक्तिमान, ज्यांचे स्वरूप जाणणे कठीण, जे सर्व प्राण्यांचे जीवनदाते आहेत, त्या श्रीकृष्णांनी जरासंधाच्या राज्यावर त्याचा मुलगा सहदेव याला मगधाधिपती म्हणून अभिषेक केला. आणि जरासंधाने ज्या राजांना कैद करून ठेवले होते, त्यांची कारागृहातून सुटका केली. (४८)
अध्याय बाहत्तरावा समाप्त |