|
श्रीमद् भागवत पुराण उद्धवमंत्रणया श्रीकृष्णस्येन्द्रप्रस्थगमनम् - श्रीकृष्णांचे इंद्रप्रस्थाला जाणे - संहिता - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् ) इत्युदीरितमाकर्ण्य देवऋषेरुद्धवोऽब्रवीत् । सभ्यानां मतमाज्ञाय कृष्णस्य च महामतिः ॥ १ ॥
श्रीशुकदेव सांगतात - ( अनुष्टुप् ) कृष्णाचे ऐकता शब्द उद्धवो तो महामती । सर्वांचे जाणुनी चित्त विचारे बोलला असे ॥ १ ॥
महामतिः उद्धवः - मोठा बुद्धिवान असा उद्धव - इति देवर्षेः उदीरितं आकर्ण्य - याप्रमाणे नारदाचे भाषण ऐकून - कृष्णस्य सभ्यानां च मतम् आज्ञाय - श्रीकृष्णाचे व सभासदांचे मत जाणून - अब्रवीत् - म्हणाला ॥१॥
श्रीशुक म्हणतात - श्रीकृष्णांचे म्हणणे ऐकून अत्यंत बुद्धिमान उद्धवाने देवर्षी नारद, सभासद आणि श्रीकृष्णांच्या मतावर विचार केला आणि नंतर तो बोलू लागला. (१)
श्रीउद्धव उवाच -
यदुक्तं ऋषिणा देव साचिव्यं यक्ष्यतस्त्वया । कार्यं पैतृष्वसेयस्य रक्षा च शरणैषिणाम् ॥ २ ॥
उद्धव म्हणाला - देवर्षी बोलले तैसे यज्ञी जाणेच युक्त ते । शरणागत जे त्यांची रक्षा तो करणे असे ॥ २ ॥
देव - हे कृष्णा - ऋषिणा यत् उक्तं - नारद मुनीने जसे सांगितले - यक्ष्यतः पैतृष्वस्नेयस्य - यज्ञ करणार्या आतेभावाचे - त्वया साचिव्यं कार्यं - त्वा सहाय्य करावे - शरणैषिणां च रक्षा (कार्या) - आणि शरण आलेल्यांचे रक्षण करावे. ॥२॥
उद्धव म्हणाला- भगवन ! देवर्षी नारदांनी सांगितल्याप्रमाणे आपण आतेभाऊ पांडवांच्या यज्ञात जाऊन त्यांना साहाय्य केले पाहिजे. त्याचबरोबर शरणागतांचे रक्षण करणे हेही आपले कर्तव्यच आहे. (२)
यष्टव्यम्राजसूयेन दिक् चक्रजयिना विभो ।
अतो जरासुतजय उभयार्थो मतो मम ॥ ३ ॥
राजसूय असा यज्ञ विजयी श्रेष्ठ तो करी । जरासंधास जिंकावे आता आवश्यको असे ॥ ३ ॥
विभो - हे कृष्णा - दिक्चक्रजयिना राजसूयेन यष्टव्यं - चारी दिशांची राज्ये जिंकणार्याने राजसूय यज्ञ करावा असे म्हणतात - अतः जरासुतजयः - म्हणून जरासंधाला जिंकणे हे - उभयार्थः (सन्) मम मतः - दोन्ही कार्ये साधणारे मला मान्य आहे. ॥३॥
हे प्रभो ! जो सर्व दिशांवर विजय मोळवतो, तोच राजसूय यज्ञ करू शकतो. तेव्हा जरासंधाला जिंकण्यामुळे पांडवांचा यज्ञ आणि शरणागतांचे रक्षण या दोन्ही गोष्टी साधतील असे मला वाटते. (३)
अस्माकं च महानर्थो ह्येतेनैव भविष्यति ।
यशश्च तव गोविन्द राज्ञो बद्धान् विमुञ्चतः ॥ ४ ॥
मारता त्या जरासंधा हेतू सफल होतसे । बंदिवान् सुटता सर्व यशप्राप्तीहि होय ती ॥ ४ ॥
गोविंद - हे श्रीकृष्णा - हि - खरोखर - एतेन एव - ह्यायोगेच असल्यामुळे - अस्माकं महान् अर्थः (सिध्येत) - आमचाहि मोठा अर्थ साधेल - बद्धान् राज्ञः विमुञ्चतः तव च - व बन्धनात सापडलेल्या राजांची सुटका करणार्या तुझी - यशः च भविष्यति - कीर्तिही होईल ॥४॥
शिवाय यामुळेच हे गोविंदा ! आमचेही मोठे काम होईल. त्याचबरोबर कैद केलेले राजे मुक्त केल्याने आपली सर्वत्र कीर्ती होईल. (४)
स वै दुर्विषहो राजा नागायुतसमो बले ।
बलिनामपि चान्येषां भीमं समबलं विना ॥ ५ ॥
दहाहजार हत्तींच्या बळाने त्रासितो नृपां । भीमसेन असा एक तयाला हरवू शके ॥ ५ ॥
बले नागायुतसमः - सामर्थ्याने दहा हजार हत्तींसारखा - सः राजा - तो जरासंध राजा - समबलं भीमं विना - तुल्यसामर्थ्याच्या भीमाशिवाय - अन्येषां बलिनाम् च अपि दुर्विषहः वै - दुसर्या त्याहून बलिष्ठ असलेल्यांनाही स्पर्धा करण्यास खरोखर कठीण आहे ॥५॥
जरासंध इतर बलवानांना जिंकण्यासारखा नाही. कारण त्याला दहा हजार हत्तींचे बळ आहे. त्याला फक्त तुल्यबल भीमसेनच पराभूत करू शकतो. (५)
द्वैरथे स तु जेतव्यो मा शताक्षौहिणीयुतः ।
ब्रह्मण्योऽभ्यर्थितो विप्रैः न प्रत्याख्याति कर्हिचित् ॥ ६ ॥
एकटा गाठणे त्याला ससैन्य नच तो हरे । द्विजभक्त असाची तो विन्मूख नच पाठवी ॥ ६ ॥
सः तु - तो जरासंध तर - द्वैरथे जेतव्यः - द्वंद्वयुद्धामध्ये जिंकणे शक्य आहे - शताक्षौहिणीयुतः (सन् समरे) मा (जेतव्यः) - शंभर अक्षौहिणी सैन्याने युक्त असल्यामुळे रणात जिंकणे शक्य नाही - ब्रह्मण्यः (सः) - ब्राह्मणांचे कल्याण करणारा जरासंध - विप्रेः अभ्यर्थितः - ब्राह्मणांनी प्रार्थिला असता - कर्हिचित् न प्रत्याख्याति - कधीही अमान्य करीत नाही ॥६॥
त्याला द्वंद्वयुद्धातच जिंकले पाहिजे. तो शंभर अक्षौहिणी सेना घेऊन युद्धात उतरेल, तेव्हा नको. जरासंध हा ब्राह्मणभक्त आहे. जर ब्राह्मणांनी त्याच्याकडे याचना केली, तर तो त्याला विन्मुख पाठवीत नाही. (६)
ब्रह्मवेषधरो गत्वा तं भिक्षेत वृकोदरः ।
हनिष्यति न सन्देहो द्वैरथे तव सन्निधौ ॥ ७ ॥
द्विजवेषात जावोनी युद्ध भिक्षाचि मागणे । द्वंदयुद्धातची भीम मारील दैत्य तो पहा ॥ ७ ॥
वृकोदरः - भीम - ब्रह्मवेषधरः - ब्राह्मणाचा वेष घेतलेला - तं गत्वा - जरासंधाजवळ जाऊन - (द्वैरथं) भिक्षेत - द्वंद्वयुद्धाची भिक्षा मागो - (सः) द्वैरथे तव सन्निधौ (तं) हनिष्यति - तो भीम द्वंद्वयुद्धामध्ये तू जवळ असताना जरासंधाला मारील - (अत्र) संदेहः नः - ह्यात संशय नाही ॥७॥
म्हणून भीमसेनाने ब्राह्मणाचा वेष घेऊन त्याच्याकडे भिक्षा मागावी. आपल्या उपस्थितीमध्ये द्वंद्वयुद्धात भीमसेन त्याला मारील, याविषयी शंका नाही.
निमित्तं परमीशस्य विश्वसर्गनिरोधयोः ।
हिरण्यगर्भः शर्वश्च कालस्यारूपिणस्तव ॥ ८ ॥
शक्तिमान् तुम्हि तो काल हेतू सृष्टिसही तुम्ही । ब्रह्मा शंकर हे दोघे निमित्तमात्रची तसे ॥ ८ ॥
विश्वसर्गनिरोधयोः ईशस्य - जगाची उत्पत्ती व संहार करण्याच्या कामी समर्थ अशा - अरूपिणः कालस्य तव - रूपरहित काळस्वरुपी तुला - हिरण्यगर्भः शर्वः च - ब्रह्मदेव व शंकर हे - परं निमित्तं - केवळ निमित्तमात्र होत ॥८॥
हे प्रभो ! आपण सर्वशक्तीमान, रूपरहित कालस्वरूप आहात. विश्वाची निर्मिती आणि प्रलय आपल्याच शक्तीने होतात. ब्रह्मदेव आणि शंकर हे केवळ निमित्तमात्र आहेत. (त्याचप्रमाणे जरासंधाचा वध आपल्या शक्तीने होईल, भीमसेन त्याला फक्त निमित्तमात्र असेल.) (७)
( वसंततिलका )
गायन्ति ते विशदकर्म गृहेषु देव्यो राज्ञां स्वशत्रुवधमात्मविमोक्षणं च । गोप्यश्च कुञ्जरपतेर्जनकात्मजायाः पित्रोश्च लब्धशरणा मुनयो वयं च ॥ ९ ॥
( वसंततिलका ) राण्याहि गातिल हरी तव कीर्ति तेंव्हा शत्रूस मारुन जधी नृप मुक्त होती । शंखाचुडास वधिता गज मुक्ति होता कंसा वधीसि, अम्हि ती जशि नित्य गातो ॥ ९ ॥
लब्धशरणाः - मिळाला आहे रक्षणकर्ता ज्यांना अशा - राज्ञां देव्यः गोप्यः च - जरासंधाच्या बंदिखान्यात पडलेल्या राजांच्या स्त्रिया व गोपी - गृहेषु - आपल्या घरी - स्वशत्रुवधं आत्मविमोक्षणं च - आपल्या शत्रूंचा नाश व स्वतःच्या पतींची मुक्तता हे - ते विशदकर्म गायन्ति - तुझे निर्मळ कृत्य गातात - मुनयः वयं च - ऋषि व आम्ही - कुंजरपतेः (नक्रात् मोक्षणं) - गजेंद्राची नक्रापासून केलेली सुटका - जनकात्मजायाः (रावणात् मोक्षणं) - सीतेची रावणापासून केलेली सुटका - पित्रोः च (कंसात् मोक्षणं) - वसुदेव, देवकी यांची कंसापासून केलेली सुटका ॥९॥
तेव्हा कैदखान्यात पडलेल्या राजांच्या राण्या स्वत:च्या महालांत आपल्या या विशुद्ध लीलेचे गायन करतील की, आपण त्यांच्या शत्रूचा नाश केलात आणि त्यांच्या पतींना सोडविलेत. यापूर्वी ज्याप्रमाणे गोपी स्वत:ला शंखचूडापासून सोडविण्याचा पराक्रम गात, शरणागत मुनिगण, गजेंद्र आणि जानकीच्या उद्धाराची लीला गात तसेच आम्ही आपल्या माता-पित्यांना कंसाच्या कारागृहातून सोडविलेल्या लीलेचे गायन करीत असतो. (९)
( अनुष्टुप् )
जरासन्धवधः कृष्ण भूर्यर्थायोपकल्पते । प्रायः पाकविपाकेन तव चाभिमतः क्रतुः ॥ १० ॥
( अनुष्टुप् ) म्हणोनि वधिणे दैत्या नृपपुण्य स्मरोनिया । तुम्हा तो आवडे आता जाणे यज्ञास त्या त्वरे ॥ १० ॥
कृष्ण - हे श्रीकृष्णा - जरासन्धवधः भूरि अर्थाय उपकल्पते - जरासंधाचा वध पुष्कळ अर्थ साधण्यास समर्थ आहे - क्रतुः च - आणि राजसूय यज्ञ - प्रायः पाकविपाकेन - बहुधा पुण्यपापरूपी कर्माचे फल या रूपाने - तव अभिमतः - तुला मान्यच आहे ॥१०॥
म्हणून हे श्रीकृष्णा ! जरासंधाचा वध पुष्कळ गोष्टी साध्य करून देईल. बंदिस्त राजांच्या पुण्यप्रभावाने किंवा जरासंधाच्या पापप्रभावाने, आपणही यावेळी राजसूय यज्ञ होणेच पसंत करीत आहात. (१०)
श्रीशुक उवाच -
इत्युद्धव वचो राजन् सर्वतोभद्रमच्युतम् । देवर्षिर्यदुवृद्धाश्च कृष्णश्च प्रत्यपूजयन् ॥ ११ ॥
श्रीशुकदेव सांगतात - परीक्षित् ! उद्धवाचे हे हितैषी शुद्ध बोलणे । सर्वांना एकवेळेची वाटले ते समर्पक ॥ ११ ॥
राजन् - हे राजा - देवर्षिः च यदुवृद्धाः कृष्णः च - नारद, वृद्ध यादव व श्रीकृष्ण हे - इति सर्वतोभद्रं अच्युतं उद्धववचः - याप्रमाणे सर्वप्रकारे कल्याण कारक व युक्तियुक्त असे उद्धवाचे भाषण - प्रत्यपूजयन् - अभिनंदिते झाले ॥११॥
श्रीशुक म्हणतात- परीक्षिता ! उद्धवाचा हा सल्ला सर्वप्रकारे हितकारक होता. शिवाय खोडून काढता येणारा नव्हता. देवर्षी नारद, यदुवंशातील ज्येष्ठ-श्रेष्ठ आणि स्वत: श्रीकृष्णांनीसुद्धा त्याचे म्हणणे मनापासून मान्य केले. (११)
अथादिशत् प्रयाणाय भगवान् देवकीसुतः ।
भृत्यान् दारुकजैत्रादीन् अनुज्ञाप्य गुरून् विभुः ॥ १२ ॥
गुरु नी वसुदेवांची कृष्णे आज्ञाहि घेतली । आज्ञापी जैत्र दारूका निघण्या हस्तिनापुरा ॥ १२ ॥
अथ - नंतर - विभुः भगवान् देवकीसुतः - सर्वव्यापी भगवान देवकीपुत्र श्रीकृष्ण - गुरून् अनुज्ञाप्य - वसुदेवादि वडील मंडळीची आज्ञा घेऊन - दारुकजैत्रादीन् भृत्यान् - दारुक, जैत्र आदिकरून सेवकांना - प्रयाणाय आदिशत् - प्रवासाकरिता आज्ञापिता झाला ॥१२॥
अंतर्यामी भगवान श्रीकृष्णांनी यानंतर वसुदेव इत्यादी गुरुजनांची संमती घेऊन दारुक, जैत्र इत्यादी सेवकांना इंद्रप्रस्थाकडे जाण्यासाठी तयारी करण्याची आज्ञा केली. (१२)
निर्गमय्यावरोधान् स्वान् ससुतान् सपरिच्छदान् ।
सङ्कर्षणमनुज्ञाप्य यदुराजं च शत्रुहन् । सूतोपनीतं स्वरथं आरुहद् गरुडध्वजम् ॥ १३ ॥
आज्ञा ती घेतली तैशी राम नी उग्रसेनची । धाडिल्या पुढती पत्न्या मुले बाळे नि अन्य ते । रथात बैसले कृष्ण पुन्हा या गरुडध्वजी ॥ १३ ॥
शत्रुहन् - हे शत्रुनाशका परीक्षित राजा - संकर्षणं यदुराजं च अनुज्ञाप्य - बलराम व उग्रसेन यांची आज्ञा घेऊन - ससुतान् सपरिच्छदान् - पुत्र व परिवार यांसह - स्वान् अवरोधान् निर्गमय्य - आपल्या अंतः पुरातील स्त्रियांना प्रयाण करावयास लावून - सूतोपनीतं गरुडध्वजं रवरथं - सारथ्याने जवळ आणलेल्या व ज्याच्या ध्वजस्तंभावर गरुड आहे अशा आपल्या रथावर - आरुहत् - चढला ॥१३॥
यानंतर शत्रुसंहारक श्रीकृष्णांनी यदुराज उग्रसेन व बलरामांची आज्ञा घेऊन मुलाबाळांसह राण्या आणि त्यांचे सर्व सामान पुढे पाठविले व पाठोपाठ दारुकाने आणलेल्या गरुडध्वज रथावर ते स्वत: आरूढ झाले. (१३)
( प्रभावती )
ततो रथद्विपभटसादिनायकैः करालया परिवृत आत्मसेनया । मृदङ्ग भेर्यानक शङ्खगोमुखैः प्रघोषघोषितककुभो निराक्रमत् ॥ १४ ॥
( गति ) निघे पुन्हाहि दळ अश्व हत्तिचे रथामधेहि अन तसे पदीहि जे । मृदंग भेरि अनक शंख वाजती सघोष नास पसरला दिशात त्या ॥ १४ ॥
ततः - नंतर - रथद्विपभटसादिनायकैः करालया आत्मसेनया (च) परिवृतः (सः) - रथ, हत्ती, योद्धे, घोडेस्वार यांच्या अधिपतींनी आणि शूर अशा आपल्या सैन्याने वेष्टिलेला असा श्रीकृष्ण - मृदंगभेर्यानकशंखगोमुखैः प्रघोषघोषित् ककुभः - मृदंग, भेरी, दुदुंभि, शंख व गोमुख ह्या वाद्यांनी मोठ्या शब्दाने गर्जवून सोडलेल्या दिशेपासून - निराक्रमत् - बाहेर पडला ॥१४॥
त्यानंतर रथ, हत्ती, घोडेस्वार आणि पायदळ यांची प्रचंड सेना घेऊन ते निघाले. त्यावेळी मृदंग, नगारे, ढोल, शंख आणि रणशिंगांच्या उच्च स्वराने सर्व दिशा दुमदुमून गेल्या. (१४)
नृवाजिकाञ्चन शिबिकाभिरच्युतं
सहात्मजाः पतिमनु सुव्रता ययुः । वरांबराभरणविलेपनस्रजः सुसंवृता नृभिरसिचर्मपाणिभिः ॥ १५ ॥
सजोनि त्या नववसने विभूषिता गळा मणी दरवळ तो विलेप तो । नि स्वर्गपालखि मधुनी स्त्रिया तशा सभोवती परिचर रक्षिती तया ॥ १५ ॥
सहात्मजाः सुव्रताः - पुत्रांसह असलेल्या व सदाचारसंपन्न अशा - वरांबराभरणविलेपनस्नजः - उत्तम वस्त्रे, अलंकार, चंदनाची उटी व माळा धारण करणार्या - (च) असिचर्मपाणिभिः नृभिः सुसंवृताः - व तरवार आणि ढाल हातात घेतलेल्या मनुष्यांनी वेष्टिलेल्या - नृवाजिकांचनशिबिकाभिः - मनुष्यांच्या व घोड्यांच्या सुवर्णाच्या पालख्यांतून - पतिं अच्युतं अनु - पति जो श्रीकृष्ण त्याच्या मागोमाग - ययुः - गेल्या ॥१५॥
रुक्मिणी इत्यादी श्रीकृष्णांच्या हजारो पतिव्रता पत्न्या आपल्या मुलांसह सुंदर वस्त्रालंकार, चंदन, फुलांचे हार इत्यादींनी नटूनथटून, डोल्या, रथ आणि सोन्याने मढविलेल्या पालख्यांत बसून पतींच्या मागून निघाल्या. यावेळी पायदळ शिपाई हातात ढाल-तलवारी घेऊन त्यांचे रक्षण करीत चालले होते. (१५)
नरोष्ट्रगोमहिषखराश्वतर्यनः
करेणुभिः परिजनवारयोषितः । स्वलङ्कृताः कटकुटिकम्बलाम्बराद् उपस्करा ययुरधियुज्य सर्वतः ॥ १६ ॥
महीष उंटि सजित नर्तिका तशा छतादि घेउनि कुटि गाडिशी कुणी । स्त्रिया येति अनुचर पालखीत ही नि कुंजरा वरति बसोनि या कुणी ॥ १६ ॥
स्वलंकृताः - अलंकार घातलेल्या - कटकुटिकंबलाम्बराद्युपस्कराः - गवतांची घरे व कांबळ्यांची वस्त्रे हीच आहेत साहित्ये ज्यांची अशा - परिजनवारयोषितः - सेवक व वारांगना - नरोष्ट्रगोमहिषखराश्वतर्यनः करेणुभिः - मनुष्य, उंट, बैल, रेडे, गाढव, खेचरे, खटारे व हत्ती यांच्यावर - सर्वतः अधियुज्य - सर्व प्रकारे साहित्य लादून - ययुः - गेल्या ॥१६॥
याच प्रकारे त्यांच्या सेवकांच्या स्त्रिया आणि वारागंना चांगल्या प्रकारे वेषभूषा करून गवताच्या झोपड्या, वेगवेगळ्या प्रकारचे तंबू, कनाती, कांबळी तसेच अंथरूण-पांघरूण इत्यादी सामग्री बैल, म्हशी, गाढवे आणि खेचरांवर लादून तसेच स्वत: पालख्या, उंट, छकडे आणि हत्तिणी यांवर बसून चालू लागल्या. (१६)
बलं बृहद्ध्वजपटछत्रचामरैः
वरायुधाभरणकिरीटवर्मभिः । दिवांशुभिस्तुमुलरवं बभौ रवेः यथार्णवः क्षुभिततिमिङ्गिलोर्मिभिः ॥ १७ ॥
जसा दिसे उदधि तो उफाळता तशीच चवरि पताक छत्र ते । किरीट नी कवचधारी दळात त्या उफाळता रविपरि सैन्य भासले ॥ १७ ॥
तुमुलरवं बलं - भयंकर शब्द करणारे सैन्य - बृहद्ध्वजपटछत्रचामरैः - उंच उंच ध्वज, मोठमोठया पताका, छत्र, व चवर्या यांनी - वरायुधाभरणकिरीटवर्मभिः - उत्तम आयुधे, अलंकार, मुकुट व कवचे यांनी - दिवा - दिवसा - रवेः अंशुभिः - सूर्याच्या किरणांमुळे - यथा अर्णवः क्षुभिततिमिंगिलोर्मिभिः (तथा) - ज्याप्रमाणे समुद्र क्षुब्ध झालेल्या माशांनी व लाटांनी शोभतो त्याप्रमाणे - बभौ - शोभला. ॥१७॥
जसा सुसरी मगरी आणि लाटांच्या उसळण्याने क्षुब्ध झालेला समुद्र शोभून दिसतो, तशी अतिशय गोंगाट होत असलेली, फडफडणा-या मोठमोठ्या पताका, छत्रे, चामरे, श्रेष्ठ शस्त्रास्त्रे, वस्त्रालंकार, मुगुट, कवचे यांनी युक्त आणि दिवसा त्यांच्यावर पडलेली सूर्याची किरणे यांमुळे भगवान श्रीकृष्णांची सेना अतिशय शोभून दिसत होती. (१७)
अथो मुनिर्यदुपतिना सभाजितः
प्रणम्य तं हृदि विदधद् विहायसा । निशम्य तद्व्यवसितमाहृतार्हणो मुकुन्दसन्दर्शननिर्वृतेन्द्रियः ॥ १८ ॥
तदा मुनी मनि बहु हर्षले पहा हरीस पाहुनि अति तृप्त जाहले । निघावया हरिपुजिता तयास तै मनात श्रीकृष्ण धरूनी चलोनि गेले ॥ १८ ॥
अथो - नंतर - यदुपतिना सभाजितः - श्रीकृष्णाने पूजिलेला - मुकुंदसंदर्शननिर्वृतेन्द्रियः - श्रीकृष्णाच्या दर्शनाने आनंदित झाली आहेत इंद्रिये ज्याची असा - आहृतार्हणः - आणि पूजा स्वीकारिली आहे ज्याने असा - मुनिः - नारद - तद्व्यवसितं निशम्य - श्रीकृष्णाचा तो निश्चय ऐकून - हृदि विदधत् - हृदयामध्ये धारण करणारा असा - तं प्रणम्य - श्रीकृष्णाला नमस्कार करून - विहायसा (ययौ) - आकाशमार्गाने गेला. ॥१८॥
नंतर श्रीकृष्णांनी सत्कार केलेले नारद त्यांचा निश्चय ऐकून व त्यांचे दर्शन झाल्यामुळे प्रसन्न झाले. त्यानंतर त्यांनी केलेली पूजा स्वीकारून देवर्षी नारदांनी त्यांना प्रणाम केला आणि त्यांची दिव्य मूर्ती हृदयात धारण करून आकाशमार्गाने प्रस्थान केले. (१८)
( अनुष्टुप् )
राजदूतमुवाचेदं भगवान् प्रीणयन् गिरा । मा भैष्ट दूत भद्रं वो घातयिष्यामि मागधम् ॥ १९ ॥
( अनुष्टुप् ) पुन्हा श्री वदले कृष्ण बंदिदूतास सौम्य की । न भ्यावे भद्र ते होई मारितो मी जरासुता ॥ १९ ॥
भगवान् - श्रीकृष्ण - गिरा प्रीणयन् - वाणीने प्रसन्न करीत - राजदूतं इदं उवाच - राजांनी पाठविलेल्या दूताला असे म्हणाला - दूत - हे दूता - मा भैष्ट - भिऊ नका - वः भद्रं (अस्तु) - तुमचे कल्याण असो - मागधं घातयिष्यामि - जरासंधाला मी मारवीन. ॥१९॥
यानंतर भगवान श्रीकृष्ण जरासंधाच्या बंदी राजांच्या दूताला आपल्या मधुर वाणीने आश्वासन देत म्हणाले- " दूता ! तू तुझ्या राजांना जाऊन सांग की, भिऊ नका ! तुम्हा सर्वांचे कल्याण असो ! मी जरासंधाला मारवीन. (१९)
इत्युक्तः प्रस्थितो दूतो यथावद् अवदन् नृपान् ।
तेऽपि सन्दर्शनं शौरेः प्रत्यैक्षन् यन्मुमुक्षवः ॥ २० ॥
गेला भृत्य गिरिव्रजी बोलला जसच्या तसे । राजेही पाहती वाट सुटण्या दर्शना तसे ॥ २० ॥
इति (भगवता) उक्तः दूतः - अशा रीतीने श्रीकृष्णाने सांगितलेला दूत - प्रस्थितः - गेला - यथावत् (च) नृपान् अवदत् - व जसेच्या तसे राजांना सांगता झाला - ते अपि - ते राजेहि - शौरेः संदर्शनं प्रत्यैक्षन् - श्रीकृष्णाच्या दर्शनाची वाट पहात बसले - यत् - कारण - (ते) मुमुक्षवः (आसन्) - ते मुक्त होण्याची इच्छा करणारे होते. ॥२०॥
भगवंतांचा निरोप घेऊन गेलेल्या दूताने त्यांचा संदेश राजांना सांगितला. ते राजेसुद्धा कारागृहातून सुटण्यासाठी, भगवंतांच्या दर्शनाची वाट पाहू लागले. (२०)
आनर्तसौवीरमरून् तीर्त्वा विनशनं हरिः ।
गिरीन् नदीरतीयाय पुरग्रामव्रजाकरान् ॥ २१ ॥
आनर्त मरु सौवीर कुरुक्षेत्र नि पर्वत । ओलांडुनि नद्या गावे चालले हरि ते पुढे ॥ २१ ॥
हरिः - श्रीकृष्ण - आनर्तसौवीरमरून् - अनर्त, सौवीर व मारवाड ह्या देशांना - गिरीन् नदीः - पर्वत व नद्या ह्यांना - पुरग्रामव्रजाकरान् - नगरे, खेडीपाडी, गौळवाडे खाणी ही - तीर्त्वा - उल्लंघून - विनशनं अतीयाय - कुरुक्षेत्रहि ओलांडून पुढे गेला ॥२१॥
नंतर श्रीकृष्ण आनर्त, सौवीर, मरू, कुरुक्षेत्र आणि तेथे जाताना मध्ये लागणारे पर्वत, नद्या, नगरे, गावे, गौळवाडे, खाणी इत्यादी पार करून पुढे जाऊ लागले. (२१)
ततो दृषद्वतीं तीर्त्वा मुकुन्दोऽथ सरस्वतीम् ।
पञ्चालानथ मत्स्यांश्च शक्रप्रस्थमथागमत् ॥ २२ ॥
वृषद्वती नदी तैशी केली पार सरस्वती । पांचाल मत्स्य देशाने इंद्रप्रस्थास पातले ॥ २२ ॥
अथ मुकुंदः - नंतर श्रीकृष्ण - ततः दृषद्वतीं सरस्वतीं च तीर्त्वा - तेथून दृषद्वती व सरस्वती या नद्या उतरून - अथ पञ्चालान् मत्स्यान् च - नंतर पञ्चालदेश व मत्स्यदेश हे - शक्रप्रस्थं अगमत् - इंद्रप्रस्थाला प्राप्त झाला. ॥२२॥
भगवान मुकुंद दृषद्वती व सरस्वती नदी पार करून तसेच पांचाल आणि मत्स्य हे देश मागे टाकून इंद्रप्रस्थाला जाऊन पोहोचले. (२२)
तमुपागतमाकर्ण्य प्रीतो दुर्दर्शनं नृणाम् ।
अजातशत्रुर्निरगात् सोपाध्यायः सुहृद्वृतः ॥ २३ ॥
श्रीकृष्ण येतसे ऐसे कळता श्रीयुधिष्ठिरा । आनंदे उठले रोम स्वागता पातले तदा ॥ २३ ॥
सोपाध्यायः सुहृद्वृतः अजातशत्रुः - उपाध्यायासह व मित्रांनी वेष्टिलेला धर्मराजा - नृणां दुर्दर्शनं तं - मनुष्यांना दुर्घट आहे दर्शन ज्याचे अशा श्रीकृष्णाला - उपागतं आकर्ण्य - आलेला ऐकून - प्रीतः - आनंदित झालेला - निरगात् - बाहेर निघाला. ॥२३॥
ज्यांचे दर्शन माणसांना होणे दुर्मिळ आहे, ते श्रीकृष्ण जवळ आलेत, ही बातमी स्मजली, तेव्हा आचार्य आणि संबंधितांसह युधिष्ठिर त्यांच्या स्वागतासाठी नगराच्या बाहेर आला. (२३)
गीतवादित्रघोषेण ब्रह्मघोषेण भूयसा ।
अभ्ययात् स हृषीकेशं प्राणाः प्राणमिवादृतः ॥ २४ ॥
गीत मंगल ते झाले द्विजांनी वेद गायिले । स्वागता त्या हृषीकेशा प्राण इंद्रियि जै मिळे ॥ ३४ ॥
सः - तो धर्मराजा - आदृतः - आदरयुक्त असा - हृषीकेशं - श्रीकृष्णाला - प्राणाः प्राणम् इव - जसे पंचप्राण जीवाला त्याप्रमाणे - भूयसा - मोठया - गीतवादित्रघोषेण ब्रह्मघोषेण (च) - गायन-वादनाच्या शब्दाने व वेदमंत्रांच्या घोषाने - अभ्ययात् - सामोरा गेला. ॥२४॥
मंगल गीते गायिली जाऊ लागली, वाद्ये वाजू लागली. इंद्रियांनी मुख्य प्राणाला भेटण्यासाठी आतुरतेने जावे, त्याप्रमाणे धर्मराज अत्यंत आदराने हृषीकेशांचे स्वागत करण्यासाठी निघाला. (२४)
दृष्ट्वा विक्लिन्नहृदयः कृष्णं स्नेहेन पाण्डवः ।
चिराद् दृष्टं प्रियतमं सस्वजेऽथ पुनः पुनः ॥ २५ ॥
पाहता भगवंताला तृप्तले धर्मराज ते । पाहिले खूप वर्षांनी प्रेमाने धरिले तया ॥ २५ ॥
अथ - नंतर - स्नेहेन विक्लिन्नहृदयः पाण्डवः - प्रेमाने ज्याचे हृदय भडभडून आले आहे असा धर्मराजा - चिरात् दृष्टं प्रियतमं कृष्णं दृष्टवा - पुष्कळ दिवसांनी दिसलेल्या अत्यंत प्रिय अशा श्रीकृष्णाला पाहून - पुनः पुनः संस्वजे - वारंवार आलिंगन देता झाला. ॥२५॥
श्रीकृष्णांना पाहून युधिष्ठिराचे हृदय अत्यंत स्नेहाने सद्गदित झाले. पुष्कळ दिवसांनंतर आपला प्रियतम भेटल्यामुळे तो पुन्हा पुन्हा त्यांना आपल्या हृदयाशी कवटाळू लागला. (२५)
( मिश्र )
दोर्भ्यां परिष्वज्य रमामलालयं मुकुन्दगात्रं नृपतिर्हताशुभः । लेभे परां निर्वृतिमश्रुलोचनो हृष्यत्तनुर्विस्मृत लोकविभ्रमः ॥ २६ ॥
( इंद्रवज्रा ) पायी तयाच्या नित लक्षुमी ती भेटोनि त्याला बहु ताप नष्टे । आनंदडोही बुडले तदाते संसार त्यांना मुळि आठवेना ॥ २६ ॥
हताशुभः - नष्ट झाले आहे पाप ज्याचे असा - अश्रुलोचनः - ज्याच्या नेत्रांत आनंदाश्रु आले आहेत असा - हृष्यत्तनुः - ज्याच्या शरीरावर रोमांच उत्पन्न झाले आहेत असा - विस्मृतलोकविभ्रमः - लोकव्यवहाराला विसरून गेलेला असा - नृपतिः - धर्मराजा - स्मामलालयं मुकुन्दगात्रं - लक्ष्मीचे रहाण्याचे निर्मळ घरच अशा श्रीकृष्णाच्या शरीराला - दोर्भ्यां परिष्वज्य - दोन्ही बाजूंनी आलिंगन देऊन - परां निर्वृतिं लेभे - अत्यंत सौख्य मिळविता झाला. ॥२६॥
लक्ष्मीचे पवित्र निवासस्थान असलेल्या श्रीकृष्णांच्या श्रीविग्रहाला दोन्ही बाहूंनी आलिंगन दिल्यामुळे युधिष्ठिराचे सारे पाप नष्ट झाले. तो परमानंदसमुद्रात डुंबू लागला. त्याच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. अंग-अंग रोमांचित झाले. त्याला या मायिक प्रपंचाचे स्मरणही राहिले नाही. (२६)
तं मातुलेयं परिरभ्य निर्वृतो
भीमः स्मयन् प्रेमजलाकुलेन्द्रियः । यमौ किरीटी च सुहृत्तमं मुदा प्रवृद्धबाष्पाः परिरेभिरेऽच्युतम् ॥ २७ ॥
भेटे पुन्हा भीम हरीस प्रेमे आनंद झाला उभयास तैसा । नकूल पार्थो सहदेव तैसे त्यां भेटता अश्रुहि पातले की ॥ २७ ॥
प्रेमजवाकुलेन्द्रियः भीमः - प्रेमाच्या आवेशाने ज्याची इन्द्रिये व्याकुळ झाली आहेत असा भीम - स्मयन् - स्मित हास्य करीत - मातुलेयं तं परिरभ्य - मामेभाऊ श्रीकृष्णाला आलिंगन देऊन - निर्वृतः (अभवत्) - सुखी झाला - यमौ किरीटी च - नकुळ, सहदेव आणि अर्जुन हे - मुदा प्रवृद्धबाष्पाः - आनंदाने ज्यांचे अश्रुबिंदु वाढत आहेत असे - सुहृत्तमं अच्युतं परिरेभिरे - मित्रश्रेष्ठ अशा श्रीकृष्णाला आलिंगन देते झाले. ॥२७॥
त्यानंतर भीमसेनाने मंद हास्य करून आपले मामेभाऊ श्रीकृष्णांना आलिंगन दिले. त्यावेळी झालेल्या आनंदाने आणि प्रेमोत्कर्षाने त्याची सारी इंद्रिये उचंबळून आली. नकुल, सहदेव आणि अर्जुन यांनी सुद्धा आपले परम प्रियतम आणि अकारण परम हितचिंतक अशा भगवान श्रीकृष्णांना मोठ्या आनंदाने आलिंगन दिले. त्यावेळी त्यांच्याही नेत्रांतून अश्रूंचा पूर वाहू लागला. (२७)
( अनुष्टुप् )
अर्जुनेन परिष्वक्तो यमाभ्यामभिवादितः । ब्राह्मणेभ्यो नमस्कृत्य वृद्धेभ्यश्च यथार्हतः ॥ २८ ॥ मानिनो मानयामास कुरुसृञ्जयकैकयान् । सूतमागधगन्धर्वा वन्दिनश्चोपमंत्रिणः ॥ २९ ॥ मृदङ्गशङ्खपटह वीणापणवगोमुखैः । ब्राह्मणाश्चारविन्दाक्षं तुष्टुवुर्ननृतुर्जगुः ॥ ३० ॥
( अनुष्टुप् ) अर्जून नकुलो तैसे भेटे तो सहदेवही । कृष्णाने द्विज वृद्धांना युक्त तैसे प्रणामिले ॥ २८ ॥ सन्मानिती नृपो थोर कुरु सृंजय केकयो । सूते नी मागधे वंदे द्विजांनी स्तुति गायिली ॥ २९ ॥ गंधर्व नट आदी ते वीणा ढोल नि शंख ते । मृदंग भेरिनादाने प्रसन्ने गात नाचले ॥ ३० ॥
अर्जुनेन परिष्वक्तः - अर्जुनाने आलिंगिलेला - यमाभ्यां अभिवादितः - नकुळ व सहदेव यांनी वंदिलेला - यथार्हतः - योग्यतेनुसार - ब्राह्मणेभ्यः वृद्धेभ्यः च नमस्कृत्य - ब्राह्मण व वृद्ध यांना नमस्कार करून - (सर्वैः) मानितः (सः) - सर्वांनी मान दिलेला श्रीकृष्ण - कुरुसृञ्जयकैकयान् सूतमागधगन्धर्वान् वंदिनः उपमन्त्रिणः च - कुरु, सृंजय, कैकय, सूत, मागध, गायक, स्तुतिपाठक व उपमंत्री यांना - मानयामास - मान देता झाला. ॥२८-२९॥ ब्राह्मणाः च - आणि ब्राह्मण - मृदङ्गशङखपटहवीणापणवगोमुखैः - मृदंग, शंख, नगारा, वीणा, ढोल व गोमुख ह्या वाद्यांनी - अरविन्दाक्षं तुष्टुवुः ननृतुः जगुः - कमलनेत्र श्रीकृष्णाची स्तुति करीत नाचू-गाऊ लागले. ॥३०॥
अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना पुन्हा आलिंगन दिले. नकुल आणि सहदेवाने अभिवादन केले आणि स्वत: भगवान श्रीकृष्णांनी ब्राह्मणांना आणि कुरुवंशातील वृद्धांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे नमस्कार केला. (२८) कुरु, सृंजय आणि कैकय देशांच्या राजांनी भगवान श्रीकृष्णांचा सन्मान केला आणि भगवान श्रीकृष्णांनीसुद्धा त्यांचा यथायोग्य सत्कार केला. सूत, मागध, वंदी आणि ब्राह्मण भगवंतांची स्तुती करू लागले. तसेच गंधर्व, नट, विदूषक इत्यादी मृदंग, शंख, नगारे, वीणा, ढोल आणि शिंगे वाजवून भगवान श्रीकृष्णांना प्रसन्न करण्यासाठी नाचू गाऊ लागले. (२९-३०)
एवं सुहृद्भिः पर्यस्तः पुण्यश्लोकशिखामणिः ।
संस्तूयमानो भगवान् विवेशालङ्कृतं पुरम् ॥ ३१ ॥
सुहृदा घेउनी कृष्ण इंद्रप्रस्थास पातले । त्या वेळी सर्व लोकांनी श्रीकृष्णाला प्रशंसिले ॥ ३१ ॥
एवं सुहृद्भिः पर्यस्तः - याप्रमाणे मित्रांनी वेष्टिलेला - पुण्यश्लोकशिखामणिः - पुण्यकीर्ति लोकांमध्ये श्रेष्ठ असा - संस्तूयमानः भगवान् - स्तविला जाणारा श्रीकृष्ण - अलंकृतं पुरं विवेश - भूषविलेल्या इंद्रप्रस्थ नगरीत शिरला. ॥३१॥
पुण्यकीर्तींचे चूडामणी अशा श्रीकृष्णांनी अशाप्रकारे आपल्या सुहृदबांधवांसह सर्व प्रकारे सुशोभित केलेल्या इंद्रप्रस्थ नगरीत लोकंकडून स्तुती घेत प्रवेश केला. (३१)
( वसंततिलका )
संसिक्तवर्त्म करिणां मदगन्धतोयैः चित्रध्वजैः कनकतोरणपूर्णकुम्भैः । मृष्टात्मभिर्नवदुकूलविभूषणस्रग् गन्धैर्नृभिर्युवतिभिश्च विराजमानम् ॥ ३२ ॥ उद्दीप्तदीपबलिभिः प्रतिसद्म जाल निर्यातधूपरुचिरं विलसत्पताकम् । मूर्धन्यहेमकलशै रजतोरुशृङ्गैः जुष्टं ददर्श भवनैः कुरुराजधाम ॥ ३३ ॥
( वसंततिलका ) संमार्जनो नि तिथले मदगंध रस्ते झेंडे घरास मणि तोरण ठाइ ठाई । न्हावून सर्व सजले नर नारि तेथे पुष्पादि लेवुनि तसे फिरती सजोनी ॥ ३२ ॥ दीपावलीच सजली जणु गेही गेही बाहेर धूप पसरे झरती झरोके । गेहास स्वर्णशिखरे अन त्या पताका ती राजधानि बघता हरि चालला तो ॥ ३३ ॥
करिणां मदगन्धतोयैः संसिक्तवर्त्म - हत्तींच्या मदाच्या सुगंधयुक्त उदकांनी शिंपिले आहेत रस्ते ज्यातील असे - चित्रध्वजैः कनकतोरणपूर्णकुंभैः - चित्रविचित्र पताकांनी व सुवर्णाच्या तोरणांसह असलेल्या जलपूर्ण घटांनी - नवदुकूलविभूषणस्नग्गन्धैः - नवीन रेशमी वस्त्रे व अलंकार आणि सुगंधित माळा ही धारण करणार्या - मृष्टात्मभिः नृभिः युवतिभिः च - शुद्ध अंतःकरणाच्या पुरुषांनी व स्त्रियांनी - विराजमानं - शोभणारे - उद्दीप्तदीपबलिभिः - प्रज्वलित दिव्यांनी व बलिकर्मांनी युक्त असे - प्रतिसद्मजालनिर्यातधूपरुचिरं - प्रत्येक घराच्या खिडक्यांतून बाहेर आलेल्या धूपामुळे सुंदर दिसणारे - विलसत्पताकं - फडकत आहेत पताका ज्यांत असे - मूर्धन्यहेमकलशैः रजतोरुशृंगैः भवनैः जुष्टं - ज्यांच्या मस्तकावर सुवर्णाचे कलश आणि रुप्याची शिखरे आहेत अशा गृहांनी युक्त असे - कुरुराजधाम ददर्श - कौरवराज जो युधिष्ठिर त्याचे राजधानीचे नगर पहाता झाला. ॥३२-३३॥
इंद्रप्रस्थ नगरातील मार्ग हत्तींच्या मदरसाने व सुगंधित पाण्याने सुगंधित झाले होते. जागोजागी रंगीबेरंगी ध्वज लावले होते. सोन्याची तोरणे बांधली गेली होती. आणि पाणी भरलेले सुवर्णकलश ठेवलेले होते. नगरातील स्त्री-पुरुष स्नान करून नवीन वस्त्रे, अलंकार, फुलांचे हार आणि सुवासिक द्रव्यांनी नटलेले होते. (३२) प्रत्येक घराच्या झरोक्यातून धुपाचा सुगंधी धूर बाहेर पडत होता. त्या घरांवर पताका फडकत होत्या. ज्यांच्यावर सोन्याचे कळस बसवले होते, अशी चांदीची शिखरे झगमगत होती. अशा प्रकारचे वाडे असलेली पांडवांची राजधानी पाहात भगवान श्रीकृष्ण चालले होते. (३३)
प्राप्तं निशम्य नरलोचनपानपात्रम्
औत्सुक्यविश्लथितकेश दुकूलबन्धाः । सद्यो विसृज्य गृहकर्म पतींश्च तल्पे द्रष्टुं ययुर्युवतयः स्म नरेन्द्रमार्गे ॥ ३४ ॥
विश्वात सुंदर हरी चलतो पथाने ऐकोनि वेणि वसने सुटली स्त्रियांची । सोडोनि सेज पतिची बघती पथासी श्रीकृष्ण दर्शन तदा करण्या स्त्रिया त्या ॥ ३४ ॥
नरलोचनपानपात्रं (तं) प्राप्तं निशम्य - मनुष्यांच्या नेत्राचा आदरपूर्वक अवलोकनाचा विषय असा तो श्रीकृष्ण आला आहे असे ऐकून - औत्सुक्यविश्लथितकेशदुकूलबन्धाः - औत्कण्ठयाने शिथिल झाले आहेत केसांचे व वस्त्रांचे बंध ज्यांचे अशा - युवतयः - तरुण स्त्रिया - गृहकर्म - घरांतील कृत्यांना - तल्पे पतीन् च - तसेच बिछान्यावर पतींना - सद्यः विसृज्य - तत्काळ सोडून देऊन - (तं) द्रष्टुं - त्या श्रीकृष्णाला पहाण्यासाठी - नरेन्द्रमार्गे ययुः स्म - राजमार्गावर गेल्या. ॥३४॥
तरुणींना जेव्हा समजले की मानवी डोळ्यांचे पारणे फेडणारे भगवान श्रीकृष्ण राजमार्गावरून निघाले आहेत, तेव्हा त्यांच्या दर्शनाच्या उत्कंठेने त्यांच्या वेण्या आणि निरगाठी ढिल्या पडल्या. काहींनी घरातील काम अर्धवट सोडून दिले तर काहीजणी शय्येवर झोपलेल्या पतींनासुद्धा सोडून देऊन श्रीकृष्णांच्या दर्शनासाठी धावतच राजमार्गावर आल्या. (३४)
तस्मिन् सुसङ्कुल इभाश्वरथद्विपद्भिः
कृष्णंसभार्यमुपलभ्य गृहाधिरूढाः । नार्यो विकीर्य कुसुमैर्मनसोपगुह्य सुस्वागतं विदधुरुत्स्मयवीक्षितेन ॥ ३५ ॥
गर्दी तशीच जमली रथ हत्ति यांची पायी कितेक चलती अन सैन्य तैसे । सज्जात राजललना बघती हरीला वृष्टी करीति वरुनी सुमनांचि तेंव्हा ॥ ३५ ॥
गृहाधिरूढाः नार्यः - घरांच्या गच्च्यांवर चढलेल्या स्त्रिया - इभाश्वरथद्विपद्भिः सुसंकुले तस्मिन् - हत्ती, घोडे, रथ व पायदळ यांनी व्यापिलेल्या त्या राजमार्गावर - सभार्यं कृष्णं उपलभ्य - स्त्रियांसह श्रीकृष्णाला पाहून - कुसुमैः विकीर्य - पुष्पवृष्टि करून - मनसा उपगुह्य - मनाने आलिंगन देऊन - उत्स्मयवीक्षितेन सुस्वागतं विदधुः - अत्यंत स्मितहास्ययुक्त अवलोकनाने श्रीकृष्णाचे उत्तम स्वागत करित्या झाल्या. ॥३५॥
सडकेवर हत्ती, घोडे, रथ आनि पायदळ सेना यांची एकच गर्दी झाली होती. त्या स्त्रियांनी गच्च्यांवर चढून सपत्नीक श्रीकृष्णांचे दर्शन घेतले. त्यांच्यावर पुष्पवर्षाव केला आणि मनोमन त्यांना आलिंगन देऊन प्रेमपूर्ण मंद हास्ययुक्त नजरेने त्यांचे स्वागत केले. (३५)
ऊचुः स्त्रियः पथि निरीक्ष्य मुकुन्दपत्नीः
तारा यथोडुपसहाः किमकार्यमूभिः । यच्चक्षुषां पुरुषमौलिरुदारहास लीलावलोककलयोत्सवमातनोति ॥ ३६ ॥
पत्न्यां सवे बघुनि श्रीहरि जै शशी तो तारांगणात विलासे गमला स्त्रियांना । नी बोलती सखि पहा फळले कसे ते पुण्यो तदाच मिळते नित दर्शनो त्यां ॥ ३६ ॥
स्त्रियः - नागरिक स्त्रिया - यथा उडुपसहाः ताराः - जशा चंद्रासह असणार्या तारका तशा - मुकुन्दपत्नीः पथि निरीक्ष्य - श्रीकृष्णाच्या स्त्रियांना मार्गात अवलोकन करून - ऊचुः - म्हणाल्या - अमूभिः किं (पुण्यं) अकारि - ह्या स्त्रियांनी कोणते पुण्य केले होते बरे - यत् - कारण - पुरुषमौलिः - पुरुषश्रेष्ठ श्रीकृष्ण - उदारहासलीलावलोककलया - सुंदर हास्ययुक्त अशा लीलाकटाक्षांनी - (आसाम्) चक्षुषां उत्सवं आतनोति - या स्त्रियांच्या नेत्रांना आनंद देतो. ॥३६॥
चंद्राभोवती असणा-या ता-यांप्रमाणे श्रीकृष्णांच्या पत्न्यांना राजमार्गावर पाहून नगरातील स्त्रिया आपापसात म्हणू लागल्या की, "या भाग्यवान राण्यांनी असे कोणते पुण्य केले असावे की, ज्यामुळे पुरुषोत्तम श्रीकृष्ण आपले दिव्य हास्य आणि विलासपूर्ण नजरेने त्यांच्याकडे पाहून त्यांच्या डोळ्यांना परम आनंद देत आहेत." (३६)
तत्र तत्रोपसङ्गम्य पौरा मङ्गलपाणयः ।
( अनुष्टुप् ) चक्रुः सपर्यां कृष्णाय श्रेणीमुख्या हतैनसः ॥ ३७ ॥
( अनुष्टुप् ) राजमार्गी असा कृष्ण चालता नागरीक ते । भेटवस्तूस अर्पोनी करिती स्वागतो तया ॥ ३७ ॥
मंगलपाणयः हतैनसः - मंगल पदार्थांना धारण करणारे व निष्पाप असे - श्रेणीमुख्याः पौराः - निरनिराळ्या पेठांतील मुख्य असे कारागीर लोक - तत्र तत्र उपसंगम्य - त्या त्या ठिकाणी एकत्र जमून - कृष्णाय सपर्यां चक्रुः - श्रीकृष्णाची पूजा करिते झाले. ॥३७॥
श्रीकृष्ण अशा प्रकारे जात असता निष्पाप शिल्पकारांनी ठिकठिकाणी त्यांना भेटून अनेक मंगल वस्तूंनी त्यांची पूजा करून त्यांचे स्वागत केले. (३७)
अन्तःपुरजनैः प्रीत्या मुकुन्दः फुल्ललोचनैः ।
ससम्भ्रमैरभ्युपेतः प्राविशद् राजमन्दिरम् ॥ ३८ ॥
अंतःपुरात कृष्णाला पाहता ललना तिथे । आनंदे भरले नेत्र कृष्ण ये राजमंदिरी ॥ ३८ ॥
फुल्ललोचनैः अन्तःपुरजनैः - प्रफुल्लित नेत्राच्या स्त्रियांनी - ससंभ्रमैः अभ्युपेतः मुकुन्दः - त्वरापूर्वक सत्कारिलेला श्रीकृष्ण - प्रीत्या राजमंदिरं प्राविशत् - प्रीतीने राजमंदिरात गेला. ॥३८॥
श्रीकृष्णांना पाहून अंत:पुरातील स्त्रियांनी घाईघाईने येऊन प्रेमपूर्ण डोळ्यांनी भगवंतांचे स्वागत केले. त्याचा स्वीकार करीत श्रीकृष्ण राजवाड्यात आले. (३८)
पृथा विलोक्य भ्रात्रेयं कृष्णं त्रिभुवनेश्वरम् ।
प्रीतात्मोत्थाय पर्यङ्कात् सस्नुषा परिषस्वजे ॥ ३९ ॥
भाच्याला पाहते कुंती श्रीकृष्णा भुवनेश्वरा । द्रौपदी सह ती आली कृष्णा वक्षास घेतले ॥ ३९ ॥
पृथा - कुंती - भ्रात्रेयं त्रिभुवनेश्वरं कृष्णं विलोक्य - भाचा जो त्रैलोक्यपति कृष्ण त्याला पाहून - प्रीतात्मा - प्रसन्नचित्त झालेली - सस्नुषा - सुनेसह - पर्यङ्कात् उत्थाय - पलंगावरून उठून - (तं) परिषस्वजे - त्याला आलिंगन देती झाली. ॥३९॥
आपला त्रिभुवनपती भाचा श्रीकृष्ण याला जेव्हा कुंतीने पाहिले, तेव्हा तिचे हृदय प्रेमाने भरून आले. पलंगावरून उठून ती सुनांसह पुढे आली आणि तिने भाच्याला छातीशी धरले. (३९)
गोविन्दं गृहमानीय देवदेवेशमादृतः ।
पूजायां नाविदत् कृत्यं प्रमोदोपहतो नृपः ॥ ४० ॥
गोविंद गेहि तो येता विसरे धर्मभान ते । पूजेचा क्रमही त्यांनी नाठवे काय नी कसे ॥ ४० ॥
नृपः - धर्मराजा - देवदेवेशं गोविंदं गृहं आनीय - मोठमोठया देवांचा अधिपति अशा श्रीकृष्णाला घरी आणून - आदृतः प्रमोदोपहतः (भूत्वा) - आदरयुक्त आनंदाने भरून गेलेला असा - पूजायां कृत्यं न अविदत् - पूजेतील सविस्तर कृत्य जाणता झाला नाही. ॥४०॥
युधिष्ठिराने देवदेवेश्वर भगवान श्रीकृष्णांना राजमहालात आदरपूर्वक आणले. पण तेव्हा आनंदाच्या भरात भगवंतांची पूजा कशी करावी, तेच राजा विसरून गेला. (४०)
पितृस्वसुर्गुरुस्त्रीणां कृष्णश्चक्रेऽभिवादनम् ।
स्वयं च कृष्णया राजन् भगिन्या चाभिवन्दितः ॥ ४१ ॥
कृष्णाने वंदिली आत्त्या गुरुपत्न्याहि वंदिल्या । सुभद्रा द्रौपदी यांनी कृष्णाला वंदिले पुन्हा ॥ ४१ ॥
राजन् - हे राजा - कृष्णः - श्रीकृष्ण - पितृष्वसुः - आत्या जी कुंती तिला - गुरुस्त्रीणां च - आणि वडील स्त्रियांना - अभिवादनं चक्रे - नमस्कार करिता झाला - स्वयं च - आणि स्वतः - कृष्णया भगिन्या च अभिवन्दितः - द्रौपदीकडून व सुभद्रेकडून वंदिला गेला. ॥४१॥
राजा ! भगवान श्रीकृष्णांनी आत्या कुंती आणि वडिल मंडळींच्या पत्न्यांना अभिवादन केले. त्यांची बहीण सुभद्रा आणि द्रौपदीने भगवंतांना नमस्कार केला. (४१)
श्वश्र्वा सञ्चोदिता कृष्णा कृष्णपत्नीश्च सर्वशः ।
आनर्च रुक्मिणीं सत्यां भद्रां जाम्बवतीं तथा ॥ ४२ ॥ कालिन्दीं मित्रविन्दां च शैब्यां नाग्नजितीं सतीम् । अन्याश्चाभ्यागता यास्तु वासःस्रङ्मण्डनादिभिः ॥ ४३ ॥
सासूचे द्रौपदी मानी वस्त्रालंकार देउनी । रुक्मिणी सत्यभामा नी भद्रा जांबवती तसे ॥ ४२ ॥ कालिंदी मित्रविंदानी सत्यासाध्वी नि लक्ष्मणा । अन्य राण्यासही तैसे युक्त सत्कारिले असे ॥ ४३ ॥
श्वश्र्वा संचोदिता कृष्णा - कुंतीने आज्ञापिलेली द्रौपदी - रुक्मिणीं सत्यां भद्रां जाम्बवतीं - रुक्मिणी, सत्यभामा, भद्रा व जांबवती ह्यांना - तथा च (इतराः) कृष्णपत्नीः - त्याप्रमाणे दुसर्या कृष्णस्त्रियांना - सर्वशः आनर्च - सर्वप्रकारे पूजिती झाली. ॥४२॥ वासःस्नङ्मण्डनादिभिः - वस्त्रे, माळा, व भूषणे यांनी - कालिन्दीं मित्रविंदां शैब्यां सतीं नाग्नजितीं च - कालिन्दी, मित्रविंदा, शैब्या, व सती नाग्नजिती ह्यांना - याः च अभ्यागताः अन्याः (ताः) - आणि ज्या दुसर्या स्त्रिया आल्या होत्या त्यांना. ॥४३॥
सासूने सांगितल्याप्रमाणे द्रौपदीने वस्त्रे, अलंकार, पुष्पहार इत्यादींद्वारा रुक्मिणी, सत्यभामा, भद्रा, जांबवती, कालिंदी, मित्रविंदा, लक्ष्मणा आणि सत्या या भगवान श्रीकृष्णांच्या पट्टराण्यांचा व तेथे आलेल्या अन्य राण्यांचाही यथायोग्य सत्कार केला. (४२-४३)
सुखं निवासयामास धर्मराजो जनार्दनम् ।
ससैन्यं सानुगामत्यं सभार्यं च नवं नवम् ॥ ४४ ॥
धर्माने भगवान् कृष्णा सेवार्थ मंत्रि नी स्त्रिया । सेवको सैन्य ठेवोनी सुखाने ठेविले असे ॥ ४४ ॥
सः धर्मराजः - तो धर्मराजा - ससैन्यं सानुगामात्यं सभार्यं च जनार्दनं - सैन्य, सेवक, प्रधान आणि पत्न्या यांसह श्रीकृष्णाची - नवं नवं सुखं निवासयामास - नवीन नवीन रीतीने सुखकारक होईल अशी रहाण्याची व्यवस्था करिता झाला. ॥४४॥
युधिष्ठिराने श्रीकृष्णांच्या त्यांची सेना, सेवक, मंत्री आणि पत्न्यांना नित्य नवे वाटेल अशा ठिकाणी आरामात राहाण्याची व्यवस्था केली. (४४)
तर्पयित्वा खाण्डवेन वह्निं फाल्गुनसंयुतः ।
मोचयित्वा मयं येन राज्ञे दिव्या सभा कृता ॥ ४५ ॥
खांडवा जाळुनी कृष्णे केले अग्नीस तृप्त तै । मयाला सोडिता तेणे रचिली दिव्य ती सभा ॥ ४५ ॥
फाल्गुनसंयुतः - अर्जुनासहित असा - खांडवेन वह्निं तर्पयित्वा - खांडव वनाने अग्नीला तृप्त करून - येन राज्ञे दिव्या सभा कृता - ज्याने धर्मराजासाठी अलौकिक दिव्य सभा निर्माण केली - (तं) मयं मोचयित्वा (च) - त्या मयासुराला वणव्यापासून मुक्त करून. ॥४५॥
अर्जुनाच्या बरोबर राहून श्रीकृष्णांनी खांडव वन देऊन अग्नीला तृप्त केले होते आणि त्यातून मयासुराला वाचविले होते. त्या मयासुरानेच युधिष्ठिराला एक दिव्य सभागृह तयार करून दिले. (४५)
उवास कतिचिन् मासान् राज्ञः प्रियचिकीर्षया ।
विहरन् रथमारुह्य फाल्गुनेन भटैर्वृतः ॥ ४६ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे उत्तरार्धे कृष्णस्य इंद्रप्रस्थगमनं नाम एकसप्ततितमोऽध्यायः ॥ ७१ ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
धर्म इच्छेस जाणोनी राहिले कैक मास तै । हरि अर्जुन हे दोघे विहार करिती वनीं ॥ ४६ ॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर एकाहत्तरावा अध्याय हा ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
भटैः वृतः - योद्ध्यांनी वेष्टिलेला - फाल्गुनेन (सह) - अर्जुनासह - रथं आरुह्य विहरन् - रथात बसून विहार करीत - राज्ञः प्रियचिकीर्षया कतिचित् मासान् उवास - धर्मराजाचे प्रिय करण्याच्या इच्छेने कित्येक महिने रहाता झाला. ॥४६॥
युधिष्ठिराला आनंद देण्यासाठी श्रीकृष्ण काही महिने तेथेच राहिले. ते अर्जुनासह् वेळोवेळी रथावर स्वार होऊन विहार करण्यासाठी सैनिकांसह इतरत्र जात असत. (४६)
अध्याय एकाहत्तरावा समाप्त |