श्रीमद् भागवत पुराण
स्कन्ध दहावा
अध्याय सत्तरावा

श्रीकृष्णस्याह्निककृत्यवर्णनं; युधिष्ठिरसंदेशमादाय नारदस्य,
जरासंधकारानिबद्धनृपाणां संदेशमादाय दूतस्य चागमनम् -

भगवान श्रीकृष्णांची दिनचर्या आणि जरासंधाच्या कैदी राजांच्या दूताचे त्यांच्याकडे येणे -


संहिता - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् )
अथोषस्युपवृत्तायां कुक्कुटान् कूजतोऽशपन् ।
गृहीतकण्ठ्यः पतिभिः भाधव्यो विरहातुराः ॥ १ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
( अनुष्टुप् )
कोंबडा आरवे तेंव्हा शिव्या घालिती त्या स्त्रिया ।
कृष्णपत्‍न्या जयांच्या त्या मिठ्या कृष्णगळ्यात की ॥ १ ॥

अथ - रात्र संपल्यानंतर - उषसि उपवृत्तायां - प्रातःकाळ आला असता - पतिभिः गृहीतकण्ठ्यः - पति जो श्रीकृष्ण त्यांनी आलिंगिलेल्या - माधव्यः - कृष्णाच्या स्त्रिया - विरहातुराः - श्रीकृष्णाचा विरह होईल म्हणून कष्टी झालेल्या - कूजतः कुक्कुटान् - आरवणार्‍या कोंबड्यांना - अशपन् - शाप देत्या झाल्या ॥१॥
श्रीशुक म्हणतात - जेव्हा पहाटे कोंबडे आरवू लागत, तेव्हा ज्यांच्या गळ्यात श्रीकृष्णांचा हात असे, त्या श्रीकृष्णपत्न्या विरहाच्या भयाने व्याकूळ होऊन त्या कोंबड्यांना शिव्याशाप देत. (१)


वयांस्यरूरुवन् कृष्णं बोधयन्तीव वन्दिनः ।
गायत्स्वलिष्वनिद्राणि मन्दारवनवायुभिः ॥ २ ॥
दर्वळे पारिजातो तो भृंग ते तान छेडिती ।
भूपाळी पक्षि ते गाती कृष्ण जागे करावया ॥ २ ॥

मन्दारवनवायुभिः अलिषु गायत्सु - मंदार वृक्षांच्या उपवनातील सुगंधवायूमुळे भ्रमर गुंजारव करीत असता - अनिद्राणी वयांसि - निद्रेतून उठलेले पक्षी - बंदिनः इव - स्तुतिपाठक भाटांप्रमाणे - कृष्णं बोधयन्ति (इव) अरूरुवन् - श्रीकृष्णाला जणू जागे करण्यासाठी शब्द करिते झाले ॥२॥
त्यावेळी पारिजातकांच्या वनातील वा-याने जागे झालेले पक्षी भाटांप्रमाणे भगवान श्रीकृष्णांना जागविण्यासाठी मधुर किलबिलाट करीत आणि भ्रमर गुंजारव करीत. (२)


मुहूर्तं तं तु वैदर्भी नामृष्यद् अतिशोभनम् ।
परिरम्भणविश्लेषात् प्रियबाह्वन्तरं गता ॥ ३ ॥
रुक्मिणी कृष्णबाहूत आशंके सोडितो मिठी ।
ब्रह्ममुहूर्त असुनी असह्य वाटए तिला ॥ ३ ॥

वैदर्भी तु - रुक्मिणी तर - प्रियबाह्नन्तरं - प्रियपतीच्या दोन बाहूंच्या आत शिरलेली अशी - परिरम्भणविश्‍लेषात् - आलिंगनाचा बिघाड होईल ह्या भीतीने - अतिशोभनं तं मुहूर्तं (अपि) - अत्यंत शुभ असा तो ब्राह्ममुहूर्तही - न अमृष्यत् - सहन करिती झाली नाही ॥३॥
प्रियतमाच्या बाहूंत असलेल्या रुक्मिणीला तर आता आलिंगन सोडावे लागणार, म्हणून अत्यंत पवित्र असा ब्राह्ममुहूर्तसुद्धा येऊच नयेसा वाटत असे. (३)


ब्राह्मे मुहूर्त उत्थाय वार्युपस्पृश्य माधवः ।
दध्यौ प्रसन्नकरण आत्मानं तमसः परम् ॥ ४ ॥
मुहूर्ती उय्ठतो कृष्ण मुख हात धुवोनिया ।
आत्मचिंतनि तो बैसे आनंदे रोम ठाकती ॥ ४ ॥

माधवः - श्रीकृष्ण - प्रसन्नकरणः - शांत आहेत इन्द्रिये ज्याची असा - ब्राह्मे मुहूर्ते उत्थाय - ब्राह्ममुहूर्तावर उठून - वारि उपस्पृश्य - उदकाने आचमन करून - तमसः परं आत्मान दध्यौ - तमोगुणाच्या पलीकडे असणार्‍या आत्म्याचे ध्यान करिता झाला ॥४॥
श्रीकृष्ण दररोज ब्राह्ममुहूर्तावर उठून हात-पाय, तोंड धुऊन प्रसन्न अंत:करणाने मायातीत आत्मस्वरूपाचे ध्यान करीत. (४)


( मिश्र )
एकं स्वयंज्योतिरनन्यमव्ययं
     स्वसंस्थया नित्यनिरस्तकल्मषम् ।
ब्रह्माख्यमस्योद्‌भवनाशहेतुभिः
     स्वशक्तिभिर्लक्षितभावनिर्वृतिम् ॥ ५ ॥
( इंद्रवज्रा )
एको स्वयं तेज अनन्य आत्मा
     अस्तित्वहीनो अविनाशि सत्य ।
स्वयंप्रकाशो अन हेतु काल
     आनंद ब्रह्मा स्वय ध्यायि कृष्ण ॥ ५ ॥

(माधवः) एकं - श्रीकृष्ण, अद्वितीय अशा - स्वयंज्योतिः - स्वयंप्रकाश - अनन्यं अव्ययं - दुसर्‍या उपाधीने रहित व अविनाशी अशा - स्वसंस्थया नित्यनिरस्तकल्मषं - आत्मस्वरूपात नित्य रहात असल्यामुळे दूर केले आहेत दोष ज्याने अशा - अस्य उद्‌भवनाशहेतुभिः स्वशक्तिभिः - ह्या जगाची उत्पत्ति व संहार ह्याला कारणीभूत अशा स्वतःच्या शक्तींनी - लक्षितभावनिर्वृतिं - दर्शित केली आहेत अस्तित्व व आनंद ज्याची अशा - ब्रह्माख्यं - ब्रह्म नावाने असलेल्या परमेश्वराला ॥५॥
ते आत्मस्वरूप अखंड, स्वयंप्रकाश, निरुपाधिक व अविनाशी आहे. ते स्वभावत:च अविद्यारहित आहे. या जगाच्या उत्पात्ती, स्थिती व लयाला कारण असणा-या त्या आत्म्याच्या शक्तींमुळेच त्याची सत्ता व आनंद यांचा अनुभव येतो. त्यालाच ब्रह्म असे नाव आहे. (५)


अथाप्लुतोऽम्भस्यमले यथाविधि
     क्रियाकलापं परिधाय वाससी ।
चकार सन्ध्योपगमादि सत्तमो
     हुतानलो ब्रह्म जजाप वाग्यतः ॥ ६ ॥
घेई पुन्हा स्नान पवित्र ऐसे
     संध्या करी वंदन तेहि तैसे ।
गायत्रि जापी हरि मंत्र तो की
     आदर्श संता निजबोध दावी ॥ ६ ॥

अथ - ब्रह्मध्यानानंतर - अमले अम्भसि यथाविधि आप्लुतः - निर्मळ उदकामध्ये शास्त्रात दिलेल्या नियमाप्रमाणे स्नान केलेला - वाससी परिधाय - दोन वस्त्रे धारण करून - सन्ध्योपगमादि क्रियाकलापं चकार - संध्योपासनादि अनेक दैनिक कृत्ये करिता झाला - हुतानलः सत्तमः (सः) - हवन केले आहे असा साधुश्रेष्ठ श्रीकृष्ण - वाग्यतः ब्रह्म जजाप - मौन धरून गायत्रीमंत्राचा जप करिता झाला. ॥६॥
नंतर सदाचरणतत्पर असे ते विधिपूर्वक निर्मळ आणि पवित्र पाण्याने स्नान करीत. मग स्वच्छ धोतर नेसून व उपरणे पांघरून संध्यावंदनादी कर्मे करीत. त्यानंतर हवन करून मौन धरून गायत्रीमंत्राचा जप करीत. (६)


( अनुष्टुप् )
उपस्थायार्कमुद्यन्तं तर्पयित्वात्मनः कलाः ।
देवान् ऋषीन् पितॄन् वृद्धान् विप्रानभ्यर्च्य चात्मवान् ॥ ७ ॥
धेनूनां रुक्मश्रृङ्गीणां साध्वीनां मौक्तिकस्रजाम् ।
पयस्विनीनां गृष्टीनां सवत्सानां सुवाससाम् ॥ ८ ॥
ददौ रूप्यखुराग्राणां क्षौमाजिनतिलैः सह ।
अलङ्कृतेभ्यो विप्रेभ्यो बद्वं बद्वं दिने दिने ॥ ९ ॥
( अनुष्टुप् )
सूर्यपस्थान उदयी तर्पणे तद नंतर ।
द्वैअज वृद्धां पुन्हा वंदी तयांना पूजिही तसे ॥ ७ ॥
वस्त्रांनी सजवी गाई दुधाळ शांत ज्या तशा ।
व्यालेल्या नव नी शिंगां सुवर्ण मढवीयल्या ॥ ८ ॥
चांदीचे क्षीरही तैसे मोतीमाळ गळां बहू ।
गाई बावन्न त्या दान द्विजांना रोज देई तो ॥ ९ ॥

आत्मवान् (सः) - अध्यात्मज्ञानसंपन्न श्रीकृष्ण - उद्यन्तं अर्कं उपस्थाय - उदयाला येणार्‍या सूर्याची स्तुति करून - आत्मनः कलाः - स्वतःचेच अंश अशा - देवान् ऋषीन् पितृन् तर्पयित्वा - देव, ऋषि, पितर यांचे तर्पण करून - वृद्धान् विप्रान् च अभ्यर्च्य - व वृद्ध ब्राह्मणांची पूजा करून - रुक्मशृङगीणां - सुवर्णाची शिंगे असलेल्या - साध्वीनां - गरीब - मौक्तिकस्रजां - मोत्यांच्या माळा घातलेल्या - पयस्विनीनां गृष्टीनां - दूध देणार्‍या व पहिल्यांदाच प्रसूत झालेल्या - सवत्सानां सुवाससां - वासरांसहित उत्तम वस्त्रे घातलेल्या - रूप्यखुराग्राणां धेनूनां बद्वं बद्वं - रुप्याने मढविलेली आहेत खुरांची टोके ज्यांच्या अशा १३०८४ गाई - क्षौ‌माजिनतिलैः सह - रेशमी वस्त्रे, मृगचर्म व तीळ ह्यांसह - अलंकृतेभ्यः विप्रेभ्यः - अलंकारांनी भूषविलेल्या गाई ब्राह्मणांना - दिने दिने ददौ - प्रतिदिवशी देता झाला. ॥७-९॥
यानंतर ज्ञानी असे ते सूर्योदयाच्या वेळी सूर्याचे उपस्थान करीत आणि आपल्या अंशस्वरूप असलेल्या देव, ऋषी व पितरांना उद्देशून तर्पण करीत. नंतर ज्येष्ठ व आदरणीय ब्राह्मणांची विधीपूर्वक पूजा करून त्यांना वस्त्रालंकार देऊन दररोज प्रत्येकी एकेक बद्व (तेरा हजार चौर्‍याऐंशी) दुधाळ, प्रथमच व्यालेल्या, वासरू असणा-या, शांत स्वभावाच्या गाई, रेशमी वस्त्र, मृगचर्म आणि तीळ यांसह दान करीत. त्यावेळी त्यांना सुंदर वस्त्रे आणि मोत्यांच्या माळा घातल्या जात. त्यांच्या शिंगांना सोने आणि खुरांना चांदी मढविलेली असे. (७-९)


गोविप्रदेवतावृद्ध गुरून् भूतानि सर्वशः ।
नमस्कृत्यात्मसंभूतीः मङ्गलानि समस्पृशत् ॥ १० ॥
गो विप्र देवता वृद्ध गुरू या विभुती स्वयी ।
नमी समस्त त्या जीवां मांगल्या स्पर्शि तो पुन्हा ॥ १० ॥

गोविप्रदेवतावृद्धगुरून् भूतानि (च) - गाई, ब्राह्मण, देवता, वृद्ध, गुरू व भूते ह्यांना - सर्वशः नमस्कृत्य - सर्वप्रकारे वंदन करून - आत्मसंभूतीः मङगलानि समस्पृशत् - आपलेच असे जी कपिला गाय आणि इतर पवित्र पदार्थ त्यांना स्पर्श करिता झाला. ॥१०॥
त्यानंतर आपल्याच विभूतिरूप असलेल्या गाई, ब्राह्मण, देवता, वडिल माणसे, गुरुजन आनि सर्व प्राण्यांना प्रणाम करून मंगल वस्तूंना स्पर्श करीत. (१०)


आत्मानं भूषयामास नरलोकविभूषणम् ।
वासोभिर्भूषणैः स्वीयैः दिव्यस्रग् अनुलेपनैः ॥ ११ ॥
स्वयं सुंदर आसोनी नरलोकविभूषण ।
वस्त्रालंकार लेई नी विलेपी चंदनादिक ॥ ११ ॥

नरलोकविभूषणं आत्मानं - मनुष्यलोकाला भूषणभूत अशा आपल्या देहाला - स्वीयैः वासोभिः भूषणैः - स्वतःच्या पीतांबरादि वस्त्रांनी व कौस्तुभादि अलंकारांनी - दिव्यस्रगनुलेपनैः - उत्तम पुष्पमाळा व उटी यांनी - भूषयामास - शोभविता झाला. ॥११॥
परीक्षिता ! भगवंत करी या मनुष्यलोकाचा अलंकार असले, तरीसुद्धा ते आपली दिव्य वस्त्रे, अलंकार, फुलांचे हार, आणि चंदन इत्यादी वस्तूंनी स्वत:ला अलंकृत करीत. (११)


अवेक्ष्याज्यं तथाऽऽदर्शं गोवृषद्विजदेवताः ।
कामांश्च सर्ववर्णानां पौरान्तःपुरचारिणाम् ।
प्रदाप्य प्रकृतीः कामैः प्रतोष्य प्रत्यनन्दत ॥ १२ ॥
तुपात आरशामध्ये पाही नी गो वृष द्विजा ।
देवमूर्तीस वंदी तो पुन्हा अंतःपुरातल्या ।
चौवर्णा तुष्टवी तुष्टे आनंदे स्वय श्रीहरी ॥ १२ ॥

आज्यं तथा आदर्शं - तुपात व आरशात - (आत्मरूपं) अवेक्ष्य - स्वतःचे प्रतिबिंब पाहून - (च) गोवृषद्विजदेवताः (अवेक्ष्य) - आणि गाई, वृषभ, ब्राह्मण व देवता यांच्याकडे पाहून - च पौरान्तःपुरचारिणां सर्ववर्णानां कामान् - आणि नगरातील व अन्तःपुरातील सर्व वर्णांच्या लोकांचे हेतु - प्रदाप्य - पुरवून - कामैः प्रकृतीः प्रतोष्य - इष्ट वस्तूंनी प्रजांना संतुष्ट करून - प्रत्यनन्दत - आनंद देता झाला. ॥१२॥
यानंतर ते तूप आणि आरशात आपले मुख पाहात. गाय, बैल, ब्राह्मण आणि देवता यांचे दर्शन घेत. मग पुरवासी आणि अंत:पुरात राहाणार्‍या चारही वर्णांच्या लोकांच्या कामना पूर्ण केल्यानंतर आपल्या अन्य प्रजेची इच्छापूर्ती करून त्यांना संतुष्ट करीत. आणि या सर्वांना प्रसन्न पाहून स्वत: आनंदी होत. (१२)


संविभज्याग्रतो विप्रान् स्रक्‌ताम्बूलानुलेपनैः ।
सुहृदः प्रकृतीर्दारान् उपायुङ्क्त ततः स्वयम् ॥ १३ ॥
तांबूल पुष्पमाला नी अंगराग नि चंदन ।
द्विज स्वजन मंत्र्यांना राण्यांना वाटुनी पुन्हा ।
उरले आपुल्या कामी आणी तो मधुसूदन ॥ १३ ॥

अग्रतः स्रक्ताम्बूलानुलेपनैः विप्रान् संविभज्य - प्रथम माळा, तांबूल व चंदनाची उटी ब्राह्मणांना अर्पण करून - सुहृदः प्रकृतीः दारान् (संविभज्य) - मित्र, प्रजा व स्त्रिया ह्यांना ती देऊन - ततः स्वयम् उपायुङ्क्त - मग तो स्वतःसाठी घेई. ॥१३॥
फुलांच्या माळा, तांबूल, चंदन इत्यादी वस्तू ते अगोदर ब्राह्मणांना देत. नंतर स्वजन, मंत्री आणि राण्यांना वाटीत व नंतर स्वत: उपयोगात आणीत. (१३)


तावत् सूत उपानीय स्यन्दनं परमाद्‌भुतम् ।
सुग्रीवाद्यैर्हयैर्युक्तं प्रणम्यावस्थितोऽग्रतः ॥ १४ ॥
आटोपिता असे कर्म दारूक रथ घेउनी ।
येता प्रणामितो कृष्णा उभा सामोरि तो असे ॥ १४ ॥

तावत् - तितक्यात - सूतः - सारथी - सुग्रीवाद्यैः हयैः युक्तं - सुग्रीवादि प्रमुख घोडे जोडलेला - परमाद्‌भुतं स्यन्दनं - उत्तमोत्तम असा रथ - उपानीय - जवळ आणून - (श्रीकृष्णम्) प्रणम्य अग्रतः अवस्थितः - श्रीकृष्णाला नमस्कार करून त्यापुढे उभा राहिला. ॥१४॥
तोपर्यंत त्यांचा सारथी सुग्रीव इत्यादी घोडे जुंपलेला अत्यंत अद्भूत रथ घेऊन येई आणि प्रणाम करून भगवंतांच्या समोर उभा राही. (१४)


गृहीत्वा पाणिना पाणी सारथेस्तमथारुहत् ।
सात्यक्युद्धवसंयुक्तः पूर्वाद्रिमिव भास्करः ॥ १५ ॥
सात्यकी उद्धवा घेता सारथ्या हात देउनी ।
बसे रथात तो जैसा शोभे भास्कर-सूर्यची ॥ १५ ॥

अथ - नंतर - सात्यक्युद्धवसंयुक्तः (सः) - सात्यकी व उद्धव यांसह श्रीकृष्ण - पाणिना सारथेः पाणी गृहीत्वा - आपल्या हाताने सारथ्याचे हात धरून - भास्करः पूर्वाद्रिम् इव - सूर्य जसा उदयाचलावर आरूढ होतो त्याप्रमाणे - तम् आरुहत् - त्या रथावर आरूढ झाला. ॥१५॥
यानंतर ते सात्यकी आणि उद्धवासह आपल्या हाताने सारथ्याचे हात पकडून सूर्य ज्याप्रमाणे उदयाचलावर आरूढ होतो, त्याप्रमाणे रथावर स्वार होत. (१५)


ईक्षितोऽन्तःपुरस्त्रीणां सव्रीडप्रेमवीक्षितैः ।
कृच्छ्राद् विसृष्टो निरगात् जातहासो हरन् मनः ॥ १६ ॥
लाजती पाहुनी स्त्रीया कष्टाने त्यां निरोपिती ।
हासरा चोरिता चित्ता निघे कृष्ण पुढे तसा ॥ १६ ॥

अन्तःपुरस्त्रीणां सव्रीडप्रेमवीक्षितैः ईक्षितः - अन्तःपुरातील स्त्रियांच्या लज्जायुक्त प्रेमावलोकनांनी पाहिलेला - (ताभिः) कृच्छ्‌रात् विसृष्टः - त्यांनी कष्टाने अनुज्ञा दिलेला - जातहासः (सः) - किंचित हास्य करणारा तो - मनः हरन् निरगात् - त्यांची मने हरण करीत निघाला. ॥१६॥
त्यावेळी अंत:पुरतील स्त्रिया लज्जा आणि प्रेमपूर्ण नजरांनी त्यांच्याकडे पाहाय आणि मोठ्या कष्टाने त्यांना निरोप देत. तेव्हा भगवान स्मित हास्य करून त्यांचे मन बरोबर घेऊन महालाच्या बाहेर पडत. (१६)


सुधर्माख्यां सभां सर्वैः वृष्णिभिः परिवारितः ।
प्राविशद् यन्निविष्टानां न सन्त्यङ्ग षडूर्मयः ॥ १७ ॥
सुधर्मा या सभेमध्ये येई श्रीकृष्ण तेधवा ।
जेथे ऊर्मी शरीराच्या न होती क्षण एकही ॥ १७ ॥

अंग - हे राजा - सर्वैः वृष्णिभिः परिवारितः (सः) - सर्व यादवांनी वेष्टिलेला तो श्रीकृष्ण - सुधर्माख्यां सभां प्राविशत् - सुधर्मा नावाच्या सभेत प्रविष्ट झाला - यन्निविष्टानां षडूर्मयः न सन्ति - ज्या सभेत प्रविष्ट झालेल्या लोकांना सहा विकार होत नाहीत. ॥१७॥
परीक्षिता ! त्यानंतर भगवान श्रीकृष्ण सर्व यादवांसह सुधर्मा नावाच्या सभेत प्रवेश करीत. जे लोक त्या सभेत बसत, त्यांना तहान-भूक, शोक-मोह आणि जरा-मृत्यू हे सहा विकार बाधत नसत. (१७)


( वंशस्था )
तत्रोपविष्टः परमासने विभुः
     बभौ स्वभासा ककुभोऽवभासयन् ।
वृतो नृसिंहैर्यदुभिर्यदूत्तमो
     यथोडुराजो दिवि तारकागणैः ॥ १८ ॥
( इंद्रवज्रा )
अनेकरूपी मग कृष्ण एक
     सिंहासनी तो बसता विराजे ।
फाके दिशांना बहु तेज त्याचे
     जै तारकांमाजि शशि प्रकाशे ॥ १८ ॥

तत्र परमासने उपविष्टः - तेथे श्रेष्ठ आसनावर बसलेला - यदूत्तमः विभुः - यादवश्रेष्ठ श्रीकृष्ण - स्वभासा ककुभः अवभासयन् - आपल्या कांतीने दिशा प्रकाशित करीत - नृसिंहैः यदुभिः वृतः - लोकांमध्ये श्रेष्ठ अशा यादवांनी वेष्टिलेला - यथा दिवि उडुराजः तारकागणैः - जसा आकाशात चंद्र नक्षत्रसमुदायांसह शोभतो तसा - बभौ - शोभता झाला. ॥१८॥
भगवान तेथे जाऊन जेव्हा श्रेष्ठ सिंहासनावर विराजमान होत, तेव्हा त्यांच्या अंगकांतीने सर्व दिशा उजळून जात. जसा आकाशात तारकांनी वेढलेला चंद्र शोभून दिसतो, त्याप्रमाणे श्रेष्ठ यदुवीरांच्या मध्ये यदुपती श्रीकृष्ण शोभून दिसत. (१८)


( अनुष्टुप् )
तत्रोपमंत्रिणो राजन् नानाहास्यरसैर्विभुम् ।
उपतस्थुर्नटाचार्या नर्तक्यस्ताण्डवैः पृथक् ॥ १९ ॥
( अनुष्टुप् )
अभिनये नटाचार्य नाचोनी नर्तिका तसे ।
विदूषक विनोदाने कृष्णा रंजविती सभीं ॥ १९ ॥

राजन् - हे राजा - तत्र - तेथे - उपमन्त्रिणः - विनोद करणारे - नटाचार्याः - नाटयशास्त्रात प्रवीण असे लोक - नानाहास्यरसैः - अनेक प्रकारच्या हास्य रसांनी - नर्तक्यः ताण्डवैः - नाच करणार्‍या वारांगना ताण्डव नृत्यांनी - पृथक् विभुं उपतस्थुः - निरनिराळ्या रीतीने श्रीकृष्णाची सेवा करित्या झाल्या.॥१९॥
राजा ! सभेमध्ये विदूषक निरनिराळ्या प्रकारच्या हास्यविनोदांनी, नटाचार्य अभिनयांनी आणि नर्तकी कलापूर्ण नृत्यांनी अशा वेगवेगळ्या प्रकारे भगवंतांची सेवा करीत. (१९)


मृदङ्गवीणामुरज वेणुतालदरस्वनैः ।
ननृतुर्जगुस्तुष्टुवुश्च सूतमागधवन्दिनः ॥ २० ॥
वीणा मृदंग नी वंशी झांज शंखहि त्या ध्वने ।
सूत मागध नी वंदी स्तुती गाती नि नाचती ॥ २० ॥

सूतमागधबन्दिनः - पुराण-कथा सांगणारे स्तुतिपाठक व गायक - मृदङगवीणामुरजवेणुतालदरस्वनै - मृदंग, वीणा, डमरू, मुरली, टाळ व शंख यांचे शब्द करून - ननृतुः जगुः तुष्टुवुः च - नाचू लागले, गाऊ लागले व स्तुति करू लागले. ॥२०॥
त्यावेळी मृदंग, वीणा, पखवाज, बासरी, झांज आणि शंख या वाद्यांच्या घोषात सूत, मागध व भाट नाचत, गात आणि भगवंतांची स्तुती करीत. (२०)


तत्राहुर्ब्राह्मणाः केचित् आसीना ब्रह्मवादिनः ।
पूर्वेषां पुण्ययशसां राज्ञां चाकथयन् कथाः ॥ २१ ॥
व्याख्याते द्विज ते कोणी मंत्र व्याख्याहि बोलती ।
पवित्र नृपती यांचे चरित्र सांगतो कुणी ॥ २१ ॥

तत्र - तेथे - आसीनाः केचित् ब्राह्मणाः ब्रह्म आहुः - बसलेले कित्येक ब्राह्मण वेदांचे निरूपण करीत होते - वादिनः च - आणि वाद्यप्रवीण गायक - पुण्ययशसां पूर्वेषां राज्ञां कथाः - पवित्र आहे कीर्ति ज्यांची अशा पूर्वीच्या राजांच्या कथा - अकथयन् - सांगत होते. ॥२१॥
काही वेदवेत्ते ब्राह्मण तेथे बसून वेदमंत्रांचे विवेचन करीत आणि काहीजण पवित्रकीर्ती राजांची चरित्रे ऐकवीत. (२१)


तत्रैकः पुरुषो राजन् आगतोऽपूर्वदर्शनः ।
विज्ञापितो भगवते प्रतीहारैः प्रवेशितः ॥ २२ ॥
एकदा द्वारकाद्वारीं नवखा कोणि पातला ।
कितेक सूचना देता सभेत भृत्य नेइ त्यां ॥ २२ ॥

राजन् - हे परीक्षित राजा - तत्र - त्या सभेत - अपूर्वदर्शनः एकः पुरुषः आगतः - ज्याचे दर्शन पूर्वी कधी झालेले नाही असा एक पुरुष आला - प्रतीहारैः भगवते विज्ञापितः - द्वाररक्षकांनी श्रीकृष्णाला कळविलेला - प्रवेशितः - आत आणिला गेला. ॥२२॥
एके दिवशी तेथे एक नवीन मनुष्य आला. द्वारपालांनी भगवंतांना तो आल्याची सूचना देऊन त्याला सभागृहात आणले. (२२)


स नमस्कृत्य कृष्णाय परेशाय कृताञ्जलिः ।
राज्ञामावेदयद् दुखं जरासन्धनिरोधजम् ॥ २३ ॥
ये च दिग्विजये तस्य सन्नतिं न ययुर्नृपाः ।
प्रसह्य रुद्धास्तेनासन् अयुते द्वे गिरिव्रजे ॥ २४ ॥
कृष्णाला वंदिले त्याने नवख्या सेवके तदा ।
जिंकिता तो जरासंध ज्याने ना नमिले तया ॥ २३ ॥
राजे वीससहस्रो ते ठेवी कैदेत दानव ।
तयांचे दुःख तो सारे कृष्णाला वदला असे ॥ २४॥

सः परेशाय कृष्णाय नमस्कृत्य - तो पुरुष परमेश्वर श्रीकृष्णाला नमस्कार करून - कृताञ्जलिः - हात जोडलेला असा - राज्ञां जरासन्धनिरोधजं दुःखं आवेदयत् - जरासंधाने बंदीत टाकिल्यामुळे राजांचे दुःख सांगता झाला. ॥२३॥ च - आणि - ये नृपाः - जे राजे - तस्य दिग्विजये सन्नतिं न ययुः - त्याच्या दिग्विजयाच्या वेळी नम्र झाले नाहीत - (ते) द्वे अयुते - ते वीस हजार राजे - तेन गिरिव्रजे प्रसह्य आसन् - त्याने गिरिव्रज नामक किल्ल्यात बलात्काराने अटकवून ठेविले आहेत. ॥२४॥
त्या मनुष्याने भगवान श्रीकृष्णांना हात जोडून नमस्कार केला आणि त्या राजांचे दु:ख सांगितले की, जे वीस हजार राजे जरासंधाच्या दिग्विजयाच्या वेळी त्याला शरण आले नव्हते, त्यांना जरासंधाने बळजबरीने कैद करून एका किल्ल्यात ठेवले होते. (२३-२४)


राजान ऊचुः -
कृष्ण कृष्णाप्रमेयात्मन् प्रपन्नभयभञ्जन ।
वयं त्वां शरणं यामो भवभीताः पृथग्धियः ॥ २५ ॥
सच्चिदानंद कृष्णा रे तुम्हा अंत न लागतो ।
मोडिशी भय ते सर्व म्हणोनी पयि पातलो ॥ २५ ॥

कृष्ण कृष्ण अप्रमेयात्मन् - असंख्य रूपे धारण करणार्‍या व सर्वांची मने आकर्षण करणार्‍या हे श्रीकृष्णा - प्रपन्नभयभञ्जन - हे शरणागतांची भीति नष्ट करणार्‍या - भवभीताः पृथग्धियः वयं - संसाराला भ्यालेले भेदबुद्धीचे आम्ही - त्वां शरणं यामः - तुला शरण आलो आहो. ॥२५॥
हे भगवान श्रीकृष्ण ! आपले स्वरूप कोणालाही न कळणारे आहे. जे आपल्याला शरण येतात त्यांचे सर्व भय आपण नाहीसे करता. हे प्रभो ! आमची भेदबुद्धी नाहीशी झालेली आहे. आम्ही संसारामुळे भयभीत होऊन आपल्याला शरण आलो आहोत. (२५)


( वसंततिलका )
लोको विकर्मनिरतः कुशले प्रमत्तः
     कर्मण्ययं त्वदुदिते भवदर्चने स्वे ।
यस्तावदस्य बलवानिह जीविताशां
     सद्यश्छिनत्त्यनिमिषाय नमोऽस्तु तस्मै ॥ २६ ॥
( वसंततिलका )
ते जीव सर्व फसलेचि सकाम कर्मी
     ना पूजिता हरि तुला भ्रमती भवात ।
आशालतेस समुळे उपटोनि नेशी
     कालस्वरूप तुजला नमितो हरी मी ॥ २६ ॥

विकर्मनिरतः - विरुद्ध कर्मांवर अत्यंत प्रेम करणारा - त्वदुदिते कुशले भवदर्चने स्वे कर्मणि प्रमत्तः - तू सांगितलेल्या कल्याणकारक भगवत्पूजनविषयक स्वकर्माविषयी दुर्लक्ष करणारा - अयं लोकः - हा लोक - बलवान् - बलिष्ठ असा - यः - जो - तावत् (एव) - तितक्याच - इह - ह्या ठिकाणी - सद्यः - तत्काळ - अस्य जीविताशां छिनन्ति - ह्या लोकांची जगण्याची आशा तोडून टाकितो - तस्मै अनिमिषाय (तुभ्यम्) नमः अस्तु - त्या काळस्वरुपी तुला नमस्कार असो ॥२६॥
हे भगवन ! बहुतेक लोक निषिद्ध कर्मे करण्यात गुंतलेले असतात. ते आपण सांगितलेली आपली उपासनारूप कल्याणकारी कर्मे करीत नाहीत. जीवनसंबंधी आशा-अभिलाषांमध्ये भ्रमाने भटकत असतात. जे बलवान असे आपण कालरूपाने त्यांची जीवनाची आशा तत्काळ धुळीला मिळविता, त्या कालरूप आपल्याला आम्ही नमस्कार करतो. (२६)


लोके भवाञ्जगदिनः कलयावतीर्णः
     सद् रक्षणाय खलनिग्रहणाय चान्यः ।
कश्चित् त्वदीयमतियाति निदेशमीश
     किं वा जनः स्वकृतमृच्छति तन्न विद्मः ॥ २७ ॥
भक्तास रक्षिसि नि दंडिसि त्या खळांना
     आश्चर्य हेचि गमते खळ कष्ट देतो ।
दुष्कर्म दैत्यरुप घेउनि त्रासितो हे
     तो ते कसेचि घडते करि मुक्ति क्लेशीं ॥ २७ ॥

ईश - हे श्रीकृष्णा - जगदिनः भवान् - जगाचा प्रभु असा तू - सद्रक्षणाय खलनिग्रहणाय च - साधूंच्या रक्षणासाठी व दुष्टांच्या नाशासाठी - लोके कलया अवतीर्णः - ह्या लोकी अंशरूपाने अवतरलास - कश्चित् अन्यः - कोणी एखादा - त्वदीयं निदेशम् अतियाति - तुझ्या आज्ञेचे उल्लंघन करितो - किंवा - तसाच - (त्वया रक्ष्यमाणः) जनः - तुझ्याकडून रक्षिला जाणारा मनुष्य - स्वकृतं ऋच्छति - आपल्या कर्माचे दुःखरुप फल भोगतो - तत् (किम् इति) न विद्मः - ते का ते आम्हाला समजत नाही ॥२७॥
जगदीश्वर अशा आपण जगामध्ये संतांचे रक्षण आणि दुष्टांना शासन करण्यासाठी बलरामांसह अवतार घेतला आहे. असे असता हे प्रभो ! एखादा राजा आपल्या आज्ञेविरुद्ध वागून आम्हांला दु:ख देतो, की आमचीच कर्मे आम्हांला दु:ख देत आहेत, हे आम्हांला कळत नाही. (२७)


स्वप्नायितं नृपसुखं परतंत्रमीश
     शश्वद्‌भयेन मृतकेन धुरं वहामः ।
हित्वा तदात्मनि सुखं त्वदनीहलभ्यं
     क्लिश्यामहेऽतिकृपणास्तव माययेह ॥ २८ ॥
जाणोत राजसुख हे मिळते नशीबे
     नी ते असत्य सगळे अति तुच्छ तैसे ।
प्रेतापरीच तनु ही भय कैक पाठी
     ओढोनि क्लेश, त्यजितो निज सौख्य आम्ही ॥ २८ ॥

ईश - हे श्रीकृष्णा - स्वप्नायितं नृपसुखं परतन्त्रं - स्वप्नाप्रमाणे असणारे राजसुख पराधीन आहे - शश्वद्‌भयेन मृतकेन धुरं वहामः - नित्य आहे भय ज्याला अशा मरणधर्मी शरीराने आम्ही संसाराचा भार धारण करितो - अतिकृपणाः (वयं) - अत्यंत दीन असे आम्ही - इह - येथे - त्वत् अनीहलभ्यं तत् आत्मनि सुखं - तुझ्यापासून निष्काम कर्मांना मिळणारे ते आत्मसुख - हित्वा - टाकून - तव मायया क्लिश्यामहे - तुझ्या मायेमुळे दुःखी होत असतो ॥२८॥
हे प्रभो ! राज्योपभोगाचे सुख विषयसाध्य असून स्वप्नाप्रमाणे क्षणभंगुर आहे. तरीही नेहमी भयग्रस्त अशा नाशवंत शरीराने आम्ही हे ओझे ओढतोच. तुमच्याच मायेमुळे अत्यंत दीनवाणे झालेले आम्ही, निष्काम भक्तांना तुमच्यापासून मिळणारे आत्मसुख सोडून अकारण हे कष्ट भोगत आहोत. (२८)


तन्नो भवान् प्रणतशोकहराङ्‌घ्रियुग्मो
     बद्धान् वियुङ्क्ष्व मगधाह्वयकर्मपाशात् ।
यो भूभुजोऽयुतमतङ्गजवीर्यमेको
     बिभ्रद् रुरोध भवने मृगराडिवावीः ॥ २९ ॥
शोको नि मोह करिसी चरणासि नष्ट
     बंधास सोडवि हरी मगधाचिया त्या ।
हत्ती परी दशहजार हि शक्ती त्याची
     मेंढ्यापरी पकडुनी निज कैद ठेवी ॥ २९ ॥

तत् - म्हणून - प्रणतशौकहराङ्‌घ्रियुग्मः भवान् - शरण आलेल्यांचा शोक दूर करणारे आहे दोन्ही चरण ज्याचे असा तू - बद्धान् नः - बद्ध झालेल्या आम्हाला - मगधाह्वयकर्मपाशात् वियुंक्ष्व - मगधराज जरासंध नामक कर्मपाशापासून मुक्त कर - अयुतमतङ्गजवीर्य बिभ्रत् यः एकः - दहा हजार हत्तींचे बळ धारण करणारा तो एकटा जरासंध - मृगराट् आवीः इव - सिंह जसा मेंढ्यांना त्याप्रमाणे - भूभुजः भवने रुरोध - राजांना बंदिखान्यात कोंडून ठेविता झाला ॥२९॥
हे भगवन ! आपले चरण शरणागतांचे दु:ख नाहीसे करणारे आहेत. म्हणून आपणच जरासंधरूप कर्मांच्या बंधनातून आम्हांला सोडवा. हे प्रभो ! त्या एकट्याजवळ दहा हजार हत्तींचे बळ आहे आणि जसा सिंह मेढ्यांना जरबेत ठेवतो, त्याप्रमाणे त्याने आम्हांला आपल्या वाड्यात बंदिस्त करून ठेवले. (२९)


यो वै त्वया द्विनवकृत्व उदात्तचक्र
     भग्नो मृधे खलु भवन्तमनन्तवीर्यम् ।
जित्वा नृलोकनिरतं सकृदूढदर्पो
     युष्मत्प्रजा रुजति नोऽजित तद्विधेहि ॥ ३० ॥
हे चक्रपाणि सतरा समयास तू तो
     त्याला हरीसि हरसी समयास एक ।
शक्ती असोनि करिशी हरि ऐशि लीला
     भक्तासि हा त्रसितसे बघ युक्त तैसे ॥ ३० ॥

उदात्तचक्र अजित - हे सुदर्शनचक्र धारण करणार्‍या अजिंक्य श्रीकृष्णा - यः वै - जो जरासंध खरोखर - त्वया - तुझ्याकडून - द्विनवकृत्वः - अठरा वेळा - मृधे - युद्धात - खलु भग्नः - अगदी पराभूत झाला - अनन्तवीर्यं (अपि) नृलोकनिरतं भवन्तं - अपरिमितपराक्रमी परंतु मनुष्यशरीरात आनंद मानणार्‍या अशा तुला - सकृत् जित्वा - एकदाच जिंकून - ऊढदर्पः - गर्विष्ठ झालेला - युष्मत्प्रजाः नः रुजति - तुमच्या प्रजा अशा आम्हाला पीडा देतो - तत् (यत् युक्तं तत्) विधेहि - तरी जे योग्य असेल ते करा ॥३०॥
हे चक्रपाणी ! आपण जरासंधाशी अठरा वेळा युद्ध करून सतरा वेळा त्याचा पराभव करून त्याला सोडून दिले; परंतु एक वेळ त्याने आपल्यावर विजय प्राप्त केला. आपला पराक्रम अनंत आहे, हे आम्ही जाणतो; असे असूनही साधारण माणसासारखे वागत आपण पराभूत झाल्याचा अभिनय केलात; परंतु यामुळे त्याची घमेंड वाढली. कधीही जिंकले न जाणारे हे भगवन ! आपली प्रजा असलेल्या आम्हांला तो त्रास देणार नाही, असे करावे. (३०)


दूत उवाच -
( अनुष्टुप् )
इति मागधसंरुद्धा भवद्दर्शनकाङ्‌क्षिणः ।
प्रपन्नाः पादमूलं ते दीनानां शं विधीयताम् ॥ ३१ ॥
दूत म्हणाला -
( अनुष्टुप् )
दैत्याचे बंदि ते राजे या परी प्रार्थिती तुला ।
दर्शना इच्छिती पाया भद्र त्यांचे करा हरी ॥ ३१ ॥

इति मागधसंरुद्धाः - याप्रमाणे जरासंधाने अटकेत ठेविलेले - भवद्दर्शकाङ्‌क्षिणः (राजानः) - तुमच्या दर्शनाची इच्छा करणारे राजे - ते पादमूलं प्रपन्नाः - तुझ्या चरणाला शरण आले आहेत - (तेषां) दीनानां शं विधीयतां - त्या दीनांचे कल्याण करावे ॥३१॥
दूत म्हणाला- जरासंधचे बंदी असलेले राजे आपल्या पायाशी शरण आले आहेत आणि ते आपले दर्शन घेऊ इच्छितात. तरी आपण त्या दीनांचे कल्याण करावे. (३१)


श्रीशुक उवाच -
राजदूते ब्रुवत्येवं देवर्षिः परमद्युतिः ।
बिभ्रत् पिङ्गजटाभारं प्रादुरासीद् यथा रविः ॥ ३२ ॥
श्रीशुकदेवजी सांगतात -
दूत तो सांगता ऐसे देवर्षी पातले तिथे ।
जटा तेजाळती छान उगवे सूर्य तो जसा ॥ ३२ ॥

राजदूते एवं ब्रुवति - राजांचा दूत याप्रमाणे सांगत असता - परमद्युतिः देवर्षिः - अत्यंत तेजस्वी असा नारदऋषि - पिंगजटाभारं बिभ्रत् - पिंगट वर्णाच्या जटा धारण करणारा असा - यथा रविः (तथा) प्रादुरासीत् - जसा सूर्य तसा प्रगट झाला ॥३२॥
श्रीशुकदेव म्हणतात- राजांचा दूत असे सांगत होता, तेवढ्यात सोनेरी जटा असलेले परमतेजस्वी देवर्षी नारद सूर्योदय व्हावा तसे तेथे येऊन पोहोचले. (३२)


तं दृष्ट्वा भगवान् कृष्णः सर्वलोकेश्वरेश्वरः ।
ववन्द उत्थितः शीर्ष्णा ससभ्यः सानुगो मुदा ॥ ३३ ॥
देवाधि देव तो कृष्ण मंत्र्यांच्या सह तो उभा ।
राहिला पाहता त्यांना माथा टेकोनि वंदितो ॥ ३३ ॥

सर्वलोकेश्वरेश्वरः भगवान् कृष्णः - सर्व लोकपालांचा अधिपति असा भगवान श्रीकृष्ण - तं दृष्ट्वा - त्या नारदाला पाहून - ससभ्यः सानुगः मुदा उत्थितः - सभासद व सेवक ह्यांसह आनंदाने उठून उभा राहिला - शीर्ष्णा (च) ववन्द - व मस्तकाने वन्दन करिता झाला ॥३३॥
ब्रह्मदेव इत्यादी सर्व लोकपालांचे स्वामी भगवान श्रीकृष्ण त्यांना पाहाताच सभासद आणि सेवकांसह आनंदाने उठून उभे राहिले आणि मस्तक लववून त्यांना वंदन करू लागले. (३३)


सभाजयित्वा विधिवत् कृतासनपरिग्रहम् ।
बभाषे सुनृतैर्वाक्यैः श्रद्धया तर्पयन् मुनिम् ॥ ३४ ॥
आसनी बैसले तेंव्हा पूजिले विधिपूर्वक ।
संतुष्ट करिता त्यांना बोलले गोड त्यां असे ॥ ३४ ॥

कृतासनपरिग्रहं मुनिं - आसनाचा स्वीकार केला आहे अशा मुनीला - तर्पयन् - तृप्त करून - श्रद्धया (च) विधिवत् सभाजयित्वा - आणि श्रद्धेने यथाविधि पूजून - सूनृतैः वाक्यैः बभाषे - गोड शब्दांनी बोलता झाला ॥३४॥
देवर्षी नारद जेव्हा आसनावर बसले, तेव्हा भगवंतांनी त्यांची विधीपूर्वक पूजा केली आणि आपल्या श्रद्धेने त्यांना संतुष्ट करीत मधुर वाणीने ते म्हणाले. (३४)


अपि स्विदद्य लोकानां त्रयाणां अकुतोभयम् ।
ननु भूयान् भगवतो लोकान् पर्यटतो गुणः ॥ ३५ ॥
देवर्षी ठीक ना सारे त्रिलोकी भ्रमता तुम्ही ।
लाभ आम्हा असा त्याचा समाचार मिळे घरी ॥ ३५ ॥

अद्य त्रयाणां लोकानां अकुतोभयं अपिस्वित् - आज त्रैलोक्याचे सर्व प्रकारे कुशल आहे ना? - लोकान् पर्यटतः भगवतः - त्रैलोक्यात भ्रमण करणार्‍या तुमचा - ननु भूयान् गुणः - खरोखर मोठा उपयोग आहे ॥३५॥
हे देवर्षे ! सध्या तिन्ही लोकांचे कुशल आहे ना ? आपण तिन्ही लोकांमध्ये जात असता. यामुळेच आम्हांला आपल्याकडून सर्वांची खुशाली समजते. (३५)


न हि तेऽविदितं किञ्चित् लोकेषु ईश्वर कर्तृषु ।
अथ पृच्छामहे युष्मान् पाण्डवानां चिकीर्षितम् ॥ ३६ ॥
त्रिलोकी कोणती गोष्ट तुम्हा ज्ञात नसे अशी ।
युधिष्ठिरादिते बंधू इच्छिती काय ते वदा ॥ ३६ ॥

ते ईश्वरकर्तृषु लोकेषु किञ्चित् अविदितं नहि - तुला परमेश्वरनिर्मित लोकातील अमुक एक गोष्ट माहित नाही असे नाही - अथ पाण्डवानां चिकीर्षितं युष्मात् पृच्छामहे - म्हणून पांडवांच्या मनात काय करावयाचे आहे असे तुम्हाला विचारितो ॥३६॥
ईश्वराने रचलेल्या तिन्ही लोकांमधील अशी कोणतीही घटना नाही की, जी आपल्याला माहीत नाही. म्हणून आम्ही तुम्हांला विचारतो की, " पांडवांचे यावेळी काय चालले आहे ?" (३६)


श्रीनारद उवाच -
( मिश्र )
दृष्टा माया ते बहुशो दुरत्यया
     माया विभो विश्वसृजश्च मायिनः ।
भूतेषु भूमंश्चरतः स्वशक्तिभिः
     वह्नेरिवच्छन्नरुचो न मेऽद्‌भुतम् ॥ ३७ ॥
देवर्षि नारद म्हणाले -
( इंद्रवज्रा )
माया तुझी नी नच जाणि ब्रह्मा
     अनंत तू नी तव ऐशि माया ।
काष्ठात अग्नी त‍इ तूहि जीवां
     नी ती अम्हाला पुसतोस वार्ता ॥ ३७ ॥

भूमन् विभो - हे महासमर्थ प्रभो श्रीकृष्णा - मया ते दुरत्ययाः मायाः बहुशः दृष्टाः - मी उलटून जाण्यास कठीण अशा तुझ्या माया पुष्कळ प्रकारे पाहिल्या - विश्वसृजः च मायिनः (ते) - आणि ब्रह्मदेवालाहि मोहित करणार्‍या तुझ्या - स्वशक्तिभिः भूतेषु चरतः - स्वतःच्या शक्तिंनी प्राणिमात्रांच्या ठिकाणी संचार करणार्‍या - वन्हेः इव छन्नरुचः (ते प्रश्नः) - अग्नीप्रमाणे ज्याने आपली कांति आच्छादित केली आहे अशा तुझा प्रश्न - मे अद्‌भुतं न - मला आश्चर्यकारक वाटत नाही ॥३७॥
श्रीनारद म्हणाले- "हे सर्वव्यापी अनंता ! आपण विश्वाचे निर्माते असणा-या ब्रह्मदेव इत्यादींनासुद्धा कळण्यास कठीण अशी आपली माया मी अनेक वेळा पहिली आहे. लाकडात गुप्त असलेला अग्नी जसा स्वत:चे तेज लपवून ठेवतो, तसे आपण चराचरामध्ये आपल्या अचिंत्य शक्तीने गुप्तपणे व्यापून राहिलेले आहात. म्हणून आपण जे हे विचारीत आहात, त्याबद्दल मला काहीही आश्चर्य वाटत नाही." (३७)


तवेहितं कोऽर्हति साधु वेदितुं
     स्वमाययेदं सृजतो नियच्छतः ।
यद् विद्यमानात् मतयावभासते
     तस्मै नमस्ते स्वविलक्षणात्मने ॥ ३८ ॥
मायें हरी तू जग निर्मिसी हे
     असत्य सत्यो त‍इ भास होतो ।
अचिंत्य सारे तव रूप ऐसे
     मी तो तुला केवलची नमीतो ॥ ३८ ॥

यत् विद्यमानात्मतया अवभासते (तत्) इदं - जे आत्म्याच्या अस्तित्वामुळे भासमान होते असे ते हे जग - स्वमायया सृजतः - आपल्या मायेने उत्पन्न करणार्‍या - नियच्छतः (च) - आणि संहार करणार्‍या - तव ईहितं साधु वेदितुं कः अर्हति - तुझ्या मनातील अभिप्राय चांगल्या रीतीने जाणण्यास कोण समर्थ आहे? - स्वविलक्षणात्मने ते तस्मै नमः - अचिन्त्यस्वरुप असा जो तू त्या तुला नमस्कार असो ॥३८॥
हे भगवन ! आपण आपल्या मायेनेच या जगाची निर्मिती आणि संहार करता. आपल्या मायेमुळेच ते असत्य असूनही सत्य असल्यासारखे वाटते. आपण केव्हा काय करू इच्छिता, हे चांगल्या त-हेने कोणाला कळणार आहे ? ज्यांचे स्वरूप अचिंतनीय आहे, त्या आपल्याला मी नमस्कार करतो. (३८)


जीवस्य यः संसरतो विमोक्षणं
     न जानतोऽनर्थवहाच्छरीरतः ।
लीलावतारैः स्वयशः प्रदीपकं
     प्राज्वालयत्त्वा तमहं प्रपद्ये ॥ ३९ ॥
त्या वासनांनी फसते शरीर
     वाटे मुळी ना कधि मुक्त होतो ।
तुझ्या यशाने जळतात दुःखे
     म्हणोनि आलो शरणी तुझ्या मी ॥ ३९ ॥

यः - जो - संसरतः - जन्ममरणाच्या फेर्‍यात सापडलेल्या - अनर्थवहात् शरीरतः विमोक्षणं न जानतः - अनर्थोत्पादक शरीरापासून सुटका करून घेण्याच्या मार्गाला न जाणणार्‍या - जीवस्य प्रदीपकं स्वयशः - जीवाला ज्ञानाचा प्रकाश देणारे स्वतःचे यश - लीलावतारैः प्राज्वालयत् - लीलेने घेतलेल्या अवतारांनी प्रकाशित करता झाला - तं त्वा अहं प्रपद्ये - त्या तुला मी शरण आलो आहे ॥३९॥
या अनर्थकारक शरीरांमुळे जीव जन्म-मृत्यूच्या चक्रात फिरत राहातो व यातून मुक्त कसे व्हावे, हे तो जाणत नाही. वास्तविक त्याच्याच हितासाठी आपण नाना प्रकारचे लीलावतार धारण करून आपल्या पवित्र यशाचा दीप प्रज्वलित करता. त्या आपणांस मी शरण आलो आहे. (३९)


( अनुष्टुप् )
अथाप्याश्रावये ब्रह्म नरलोकविडम्बनम् ।
राज्ञः पैतृष्वसेयस्य भक्तस्य च चिकीर्षितम् ॥ ४० ॥
( अनुष्टुप् )
स्वयंब्रह्म असा तू नी भोळ्यासा पुसशी मला ।
तरीही सांगतो सर्व आतेबंधू कसेत ते ॥ ४० ॥

अथ अपि - तरी सुद्धा - नरलोकविडम्बनं ब्रह्म (त्वां) - मनुष्यलोकांचे अनुकरण करणार्‍या ब्रह्मरूपी तुला - पैतृष्वस्त्रेयस्य भक्तस्य च राज्ञः - आतेभाऊ व भक्त अशा धर्मराजाचे - चिकीर्षितं - मनात योजिलेले कार्य - आश्रावये - मी तुला सांगतो ॥४०॥
प्रभो ! आपण स्वत: परब्रह्म असून माणसासारखी लीला करीत मला विचारीत आहात. म्हणून मी आपला आतेभाऊ आणि भक्त, राजा युधिष्ठिर काय करू इच्छितो, ते सांगतो. (४०)


यक्ष्यति त्वां मखेन्द्रेण राजसूयेन पाण्डवः ।
पारमेष्ठ्यकामो नृपतिः तद्‌भवाननुमोदताम् ॥ ४१ ॥
भोग ते सत्य लोकीचे लाभले त्या युधिष्ठिरा ।
राजसूय असा यज्ञ योजी तो तव प्राप्तिसी ॥ ४१ ॥

पाण्डवः नृपतिः - पंडुपुत्र धर्मराजा - पारमेष्ठ्यकामः - चक्रवर्ति पदाची ज्याला इच्छा आहे असा - मखेन्द्रेण राजसूयेन - यज्ञांमध्ये श्रेष्ठ अशा राजसूय यज्ञाने - त्वां यक्ष्यति - तुला पुजणार आहे - भवान् तत् अनुमोदतां - तू त्याला संमति द्यावी ॥४१॥
आपल्या पूजेला योग्य अशी श्रेष्ठ संपत्ती मिळावी म्हणून राजा युधिष्ठिर, यज्ञांत श्रेष्ठ अशा राजसूय यज्ञाने आपली आराधना करू इच्छितो. आपण याला संमती द्यावी. (४१)


तस्मिन् देव क्रतुवरे भवन्तं वै सुरादयः ।
दिदृक्षवः समेष्यन्ति राजानश्च यशस्विनः ॥ ४२ ॥
भगवान् यज्ञि त्या थोर देवता नृपती तसे ।
येतील दर्शना सारे तुझ्या पायासि श्रीहरी ॥ ४२ ॥

देव - हे श्रीकृष्णा - तस्मिन् क्रतुवरे - त्या श्रेष्ठ राजसूय यज्ञामध्ये - भवन्तं दिदृक्षवः सुरादयः - तुला पाहण्यास इच्छिणारे देवादिक - यशस्विनः राजानः च - आणि यशस्वी राजे - समेष्यन्ति वै - खरोखर येतील ॥४२॥
हे भगवन ! त्या श्रेष्ठ यज्ञामध्ये आपले दर्शन घेण्यासाठी देव आणि यशस्वी राजे येणार आहेत. (४२)


श्रवणात् कीर्तनाद् ध्यानात् पूयन्तेऽन्तेवसायिनः ।
तव ब्रह्ममयस्येश किमुतेक्षाभिमर्शिनः ॥ ४३ ॥
श्रवणे कीर्तने ध्याने पापी पावन होतिही ।
प्रत्यक्ष स्पर्शिता तैसे दर्शने नच सांगणे ॥ ४३ ॥

ईश - हे ईश्वरा - अन्तेवसायिनः (अपि) - चांडालादिक सुद्धा - ब्रह्ममयस्य तव - ब्रह्ममूर्ति अशा तुझ्या - श्रवणात कीर्तनात् ध्यानात् - श्रवणाने, कीर्तनाने व ध्यानाने - पूयन्ते - पवित्र होतात - उत ईक्षाभिमर्शिनः किम् (न पूयन्ते) - मग तुला अवलोकन व स्पर्श करणारे का न पवित्र होतील? ॥४३॥
हे प्रभो ! ब्रह्मस्वरूप अशा आपले श्रवण, कीर्तन आणि ध्यान केल्याने अंत्यजसुद्धा पवित्र होतात. तर मग जे आपले दर्शन आणि स्पर्श प्राप्त करून घेतात, त्यांच्याबद्दल काय सांगावे ! (४३)


( वसंततिलका )
यस्यामलं दिवि यशः प्रथितं रसायां
     भूमौ च ते भुवनमङ्गल दिग्वितानम् ।
मन्दाकिनीति दिवि भोगवतीति चाधो
     गङ्गेति चेह चरणाम्बु पुनाति विश्वम् ॥ ४४ ॥
( वसंततिलका )
व्यापी तुझे यश असे जगतास सार्‍या
     पाताळ स्वर्गि पृथिवी, घनब्रह्म ऐसा ।
मंदाकिनी करितसे जगता पवित्र
     पाताळ स्वर्ग पृथिवी तव कीर्ति ऐशी ॥ ४४ ॥

भुवनमङ्गल - हे त्रैलोक्यमङ्गला श्रीकृष्णा - यस्य ते अमलं यशः - ज्या तुझे निर्मळ यश - दिवि - स्वर्गात - रसायां - पाताळात - भूमौ च - आणि पृथ्वीवर - दिग्वितानं प्रथितम् - दाही दिशांचे जणू छतच असे पसरले आहे - चरणांबु च - आणि तुझे पादोदक - दिवि मन्दाकिनी इति - स्वर्गात मंदाकिनी या नावाने - अधः भोगवती इति - पाताळात भोगवती नावाने - इह च गंगा इति - आणि ह्या लोकी गंगा या नावाने - विश्वं पुनाति - त्रैलोक्याला पवित्र करिते ॥४४॥
हे त्रिभुवनमंगला ! ज्याप्रमाणे आपली चरणामृतधारा स्वर्गामध्ये मंदाकिनी, पाताळात भोगवती आणि मृत्युलोकात गंगा या नावाने वाहात जाऊन सा-या विश्वाला पवित्र करीत आहे, त्याचप्रमाणे आपली निर्मळ कीर्ती सर्व दिशांमध्ये विस्तारली असून तिने स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ व्यापले आहेत. (४४)


श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् )
तत्र तेष्वात्मपक्षेष्व गृण्हत्सु विजिगीषया ।
वाचः पेशैः स्मयन् भृत्यमुद्धवं प्राह केशवः ॥ ४५ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
( अनुष्टुप् )
परीक्षित् ! सभिचे सर्व मागधा जिंकण्यास त्या ।
उत्सूक असता त्यांना नारदी शब्द ना रुचे ।
विश्वशास्ता तदा बोले हासोनी उद्धवास त्या ॥ ४५ ॥

तत्र - त्या सभेत - आत्मपक्षेषु तेषु (जरासंधस्य) विजिगीषया (नारदवाक्यम्) अगृह्‌णत्सु - आपल्या पक्षातील ते यादव जरासंधाला जिंकण्याच्या इच्छेने नारदाने केलेले ते भाषण स्वीकारीत नाहीत असे पाहून - केशवः - श्रीकृष्ण - वाचः पेशैः - वाचेच्या मधुरपणाने - स्मयन् यं उद्धवं प्राह - हास्य करीत सेवक अशा उद्धवाला म्हणाला ॥४५॥
श्रीशुक म्हणतात- जरासंधाला जिंकू इच्छिणा-या यादवांना नारदांचे हे म्हणणे पसंत पडले नाही. तेव्हा श्रीकृष्ण स्मितहास्य करीत अतिशय गोड वाणीने उद्धवाला म्हणाले. (४५)


श्रीभगवानुवाच -
त्वं हि नः परमं चक्षुः सुहृन् मंत्रार्थतत्त्ववित् ।
अथात्र ब्रूह्यनुष्ठेयं श्रद्दध्मः करवाम तत् ॥ ४६ ॥
श्रीभगवान् म्हणाले -
हितैषी सुहृदो चक्षू उद्धवा काय इच्छिशी ।
तुझ्या शब्दास श्रद्धा ती बोल तू, वागतो तसे ॥ ४६ ॥

त्वं हि नः परमं चक्षुः - तू खरोखर आमचा श्रेष्ठ नेत्र आहेस - सुहृत् मन्त्रार्थतत्त्ववित् - मित्र व गुप्त गोष्टींचे तत्त्व जाणणारा आहेस - तथा - यास्तव - अत्र अनुष्ठेयं ब्रूहि - या बाबतीत काय करावे ते सांग - तत् श्रद्दध्मः करवाम (च) - ते आम्ही खरे मानू व करू ॥४६॥
श्रीकृष्ण म्हणाले- उद्धवा ! तू माझा सुहृद, दिव्य नेत्र आणि राजनीती चांगल्या प्रकारे जाणणारा आहेत. म्हणून याविषयी काय करावे, ते तू सांग. तुझ्या म्हणण्यावर आमची श्रद्धा आहे म्हणून तुझ्या सल्ल्यानुसारच आम्ही वागू. (४६)


इत्युपामंत्रितो भर्त्रा सर्वज्ञेनापि मुग्धवत् ।
निदेशं शिरसाऽऽधाय उद्धवः प्रत्यभाषत ॥ ४७ ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां दशमस्कन्धे उत्तरार्धे
भगवद्यानविचारे नाम सप्ततितमोऽध्यायः ॥ ७० ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
उद्धवे पाहिले ऐसे सर्वज्ञ कृष्ण हा असा ।
विचार पुसतो तेंव्हा आज्ञा मानितो बोलले ॥ ४७ ॥
॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सत्तरावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

सर्वज्ञेन अपि भर्त्रा - सर्वज्ञ अशाही स्वामी श्रीकृष्णाने - मुग्धवत् इति उपामन्त्रितः उद्धवः - अज्ञ मनुष्याप्रमाणे अशा रीतीने गुप्त मत विचारिलेला उद्धव - शिरसा निदेशं आधाय प्रत्यभाषत - मस्तकाने आज्ञा स्वीकारून उत्तर देऊ लागला ॥४७॥ - सत्तरावा अध्याय समाप्त
उद्धवाने पाहिले की, आपले स्वामी सर्वज्ञ असूनही अजाणत्यासारखे सल्ला विचारीत आहेत. तेव्हा त्यांची आज्ञा शिरोधार्य मानून तो म्हणाला. (४७)


अध्याय सत्तरावा समाप्त

GO TOP