श्रीमद् भागवत पुराण
स्कन्ध दहावा
अध्याय एकोणसत्तरावा

देवर्षिनारदकर्तृकं भगवतो गृहचर्यादर्शनम् -

देवर्षी नारदांनी भगवंतांचा गृहस्थाश्रम पाहाणे -


संहिता - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् )
नरकं निहतं श्रुत्वा तथोद्वाहं च योषिताम् ।
कृष्णेनैकेन बह्वीनां तद् दिदृक्षुः स्म नारदः ॥ १ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
( अनुष्टुप् )
वधिला भौम कृष्णाने हजारो वरिल्या स्त्रिया ।
नारदे ऐकता ऐसे झाले आतुर पाहण्या ॥ १ ॥

नारदः नरकं निहतं श्रुत्वा - नारद, नरकासुराला मारिलेले ऐकून - तथा च - त्याचप्रमाणे - बह्वीनां योषितां - पुष्कळ स्त्रियांशी - एकेन कृष्णेन - एकटया श्रीकृष्णाने - (कृतम्) उद्वाहं श्रुत्वा - केलेला विवाह ऐकून - तत् दिदृक्षुः (भवति) स्म - ते पाहण्याची इच्छा करणारा झाला. ॥१॥
श्रीशुक म्हणतात-देवर्षी नारदांनी जेव्हा ऐकले की, भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराला मारून एकट्यानेच हजारो राजकुमारींशी विवाह केला आहे, तेव्हा भगवंतांचा गृहस्थाश्रम पाहावा अशी इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली. (१)


चित्रं बतैतदेकेन वपुषा युगपत् पृथक् ।
गृहेषु द्व्यष्टसाहस्रं स्त्रिय एक उदावहत् ॥ २ ॥
विभक्त मंदिरांमाजी सोळाहजार नी शत ।
हरीने वरिल्या कैशा एकाच समयास त्या ॥ २ ॥

एकः - एकटा श्रीकृष्ण - एकेन वपुषा - एकाच शरीराने - पृथक् - निरनिराळ्या - गृहेषु - घरात - द्‌व्यष्टसाहस्रं स्त्रियः - सोळा हजार स्त्रियांशी - युगपत् उदावहत् - एकाच वेळी विवाह लाविता झाला - एतत् बत चित्रं - हे खरोखर मोठे आश्चर्य होय. ॥२॥
ते विचार करू लागले, "अहो ! श्रीकृष्णांनी एकाच शरीराने, एकाच वेळी, सोळा हजार महालांमध्ये वेगवेगळ्या सोळा हजार राजकुमारींचे पाणिग्रहण केले, हे केवढे आश्चर्य आहे !" (२)


इत्युत्सुको द्वारवतीं देवर्षिर्द्रष्टुमागमत् ।
पुष्पितोपवनाराम द्विजालिकुलनादिताम् ॥ ३ ॥
औत्सुके पाहण्या लीला द्वारकापुरि पातले ।
सपुष्प वृक्ष उद्याने पाहिले भृंग गुंजता ॥ ३ ॥

इति - असे म्हणून - (तत्) द्रष्टुं उत्सुकः देवर्षिः - ते पाहण्यासाठी उत्कंठित झालेला नारद - पुष्पितोपवनारामद्विजालिकुलनादितां - फुललेली झाडे असलेल्या बगीच्यांतील पक्षी व भुंगे ह्यांच्या थव्यांच्या शब्दांनी गजबजून गेलेल्या - द्वारवतीं आगमत् - द्वारकेला प्राप्त झाला. ॥३॥
या उत्सुकतेने देवर्षी नारद भगवंतांची ही लीला पाहाण्यासाठी द्वारकेत आले. तेथील उपवने आणि उद्याने फुलांनी लहडलेली होती. त्यावर निरनिराळ्या प्रकारचे पक्षी किलबिलत होते आणि भ्रमर गुंजारव करत होते. (३)


उत्फुल्लेन्दीवराम्भोज कह्लारकुमुदोत्पलैः ।
छुरितेषु सरःसूच्चैः कूजितां हंससारसैः ॥ ४ ॥
स्वच्छ तळ्यांमध्ये होती कंज श्वेत नि रक्त ते ।
कौमूद दाटले तैसे हंस सारसचा रव ॥ ४ ॥

उत्फुल्लेन्दीवराम्भोजकह्‌लारकुमुदोत्पलैः - फुललेल्या अशा इन्दीवर, अंभोज, कल्हार, कुमुद व उत्पल नावाच्या कमळांनी - छुरितेषु सरस्सु - व्याप्त अशा सरोवरांमध्ये - हंससारसैः उच्चैः कूजितां (द्वारवतीं आगमत्) - हंस व सारस पक्षी यांनी मोठमोठे शब्द करून गजबजून टाकिलेल्या द्वारकेला गेला. ॥४॥
निर्मळ पाण्याने भरलेल्या सरोवरांमध्ये निळी, लाल आणि शुभ्र रंगाची निरनिराळ्या जातींची कमळे उमललेली होती. त्यामध्ये हंस आणि सारस किलबिल करीत होते. (४)


प्रासादलक्षैर्नवभिः जुष्टां स्फाटिकराजतैः ।
महामरकतप्रख्यैः स्वर्णरत्‍नपरिच्छदैः ॥ ५ ॥
रजतो स्पटिकी तेथे नवू लक्ष महालते ।
शोभल्या फरशा तेथे हिरे माणीक ज्यात त्या ॥ ५ ॥

स्फाटिकराजतैः - स्फटिकाच्या पाषाणांनी शोभणार्‍या - महामरकतप्रख्यैः - मोठमोठया पाचूच्या मण्यांनी प्रकाशणार्‍या - स्वर्णरत्‍नपरिच्छदैः - सुवर्ण व रत्‍ने यावर जडविलेल्या - नवभिः प्रासादलक्षैः जुष्टां - नऊ लक्ष राजमंदिरांनी युक्त अशा - द्वारकां आगमत् - द्वारकेत आला. ॥५॥
तेथे स्फटिकाचे आणि चांदीचे नऊ लक्ष महाल होते. तेथील पाचूच्या फरशा कांतीने झगमगत होत्या. तेथे सोने आणि रत्नांच्या पुष्कळ वस्तू होत्या. (५)


( मिश्र )
विभक्तरथ्यापथचत्वरापणैः
     शालासभाभी रुचिरां सुरालयैः ।
संसिक्तमार्गाङ्गनवीथिदेहलीं
     पतत्पताका ध्वजवारितातपाम् ॥ ६ ॥
( इंद्रवज्रा )
ते चौक रस्ते सजले हि तैसे
     शाला सभास्थान नि मंदिरे ते ।
संमार्जिले तेथ हि सर्व स्थाने
     झेंडे पताका नित डौलती तै ॥ ६ ॥

विभक्तरथ्यापथचत्वरापणैः - आखलेले राजमार्ग, गल्ल्या, चव्हाटे व पेठा यांनी - शालासभाभिः - घरे व सभागृहे यांनी - सुरालयैः - देवळांनी - रुचिरां - शोभणार्‍या - संसिक्तमार्गांगणवीथिदेहलीं - नीट शिंपिलेले आहेत रस्ते, अंगणे, पायवाटा व उंबरठे जीतील अशा - पतत्पताकाध्वजवारितातपां - हलणार्‍या अशा पताका व ध्वज यांनी जीतील सूर्यकिरणांचे निवारण झाले आहे अशा. ॥६॥
राजमार्ग, इतर रस्ते, चौक, बाजार, घोडे, हत्ती, जनावरे इत्यादी बांधण्याची ठिकाणे, सभागृहे आणि मंदिरे यांमुळे नगराचे सौं‍दर्य अधिकच खुलून दिसत होते. तेथील सडका, अंगणे, चौक आणि देवड्या याठिकाणी सडे घातले होते. पताका व ध्वज यांमुळे रस्त्यांवर ऊन लागत नव्हते. (६)


( अनुष्टुप् )
तस्यामन्तःपुरं श्रीमद् अर्चितं सर्वधिष्ण्यपैः ।
हरेः स्वकौशलं यत्र त्वष्ट्रा कार्त्स्न्येन दर्शितम् ॥ ७ ॥
( अनुष्टुप् )
कृष्णाचे तेथची होते ते अंतःपुर सुंदर ।
निर्मिले विश्वकर्माने पूजिती लोकपाल ते ॥ ७ ॥

त्वष्ट्रा - विश्वकर्म्याने - यत्र - ज्या द्वारकेत - स्वकौशलं कार्त्स्येन दर्शितं - स्वतःचे नैपुण्य पूर्णपणे दाखविले आहे अशा - तस्यां - त्या द्वारकेत - सर्वधिष्ण्यपैः अर्चितं - सर्व लोकपालांनी पूजिलेले - श्रीमत् हरेः अन्तःपुरं (अस्ति) - शोभायमान श्रीकृष्णाचे अंतःपुर आहे. ॥७॥
त्या द्वारका नगरीत श्रीकृष्णांचे अत्यंत सुंदर असे अंत:पुर होते. सर्व लोकपाल त्यांची पूजा आणि प्रशंसा करीत असत. ते निर्माण करण्यामध्ये विश्वकर्म्याने आपले सारे कौशल्य पणाला लावले होते. (७)


तत्र षोडशभिः सद्म सहस्रैः समलङ्कृतम् ।
विवेशैकतमं शौरेः पत्‍नीनां भवनं महत् ॥ ८ ॥
जास्त सोळा जहाराने राण्यांचे ते महाल तै ।
मोठ्याशा भवना मध्ये देवर्षी पातले पहा ॥ ८ ॥

तत्र - तेथे - षोडशभिः सद्मसहस्रैः समलंकृतं - सोळा हजार मंदिरांनी शोभणार्‍या - शौरेः पत्‍नीनां - श्रीकृष्णस्त्रियांच्या - एकतमं महत् भवनं विवेश - एका मोठया मंदिरात शिरला. ॥८॥
त्या अंत:पुरात भगवंतांच्या राण्यांचे सोळा हजाराहून अधिक शोभिवंत महाल होते. त्यांपैकी एका विशाल भवनामध्ये देवर्षी नारदांनी प्रवेश केला. (८)


विष्टब्धं विद्रुमस्तंभैः वैदूर्यफलकोत्तमैः ।
इन्द्रनीलमयैः कुड्यैः जगत्या चाहतत्विषा ॥ ९ ॥
पोवळ्याचे तिथे खांब सज्जिं वैडूर्य र‍त्न ते ।
इंद्रनीलांकिता भिंती छतही शोभले तसे ॥ ९ ॥

विद्रुमस्तम्भैः विष्टब्धं - पोवळ्यांच्या खांबावर उभारलेल्या - वैदूर्यफलकोत्तमैः - वैदूर्यांनी जडविलेल्या उत्तम फळ्यांनी कडीपाट केलेल्या - इन्द्रनीलमयैः कुडयैः - इंद्रनीळ मण्यांच्या भिंतींनी - च - आणि - अहतत्विषा - नष्ट झाली नाही कान्ति जीची अशा - (तादृश्या) जगत्या - तसल्याच भूमीने - उपलक्षितं भुवनं विवेश - सजलेल्या घरात शिरला. ॥९॥
त्या महालांत पोवळ्यांचे खांब, वैदूर्य मण्यांच्या उत्तम फळ्या आणि इंद्रनील मण्यांच्या भिंती झगमगत होत्या. तसेच तेथील फरशा चमकदार इंद्रनील मण्यांच्या बनविलेल्या होत्या. (९)


वितानैर्निर्मितैस्त्वष्ट्रा मुक्तादामविलम्बिभिः ।
दान्तैरासनपर्यङ्कैः मण्युत्तमपरिष्कृतैः ॥ १० ॥
दासीभिर्निष्ककण्ठीभिः सुवासोभिरलङ्कृतम् ।
पुम्भिः सकञ्चुकोष्णीष सुवस्त्रमणिकुण्डलैः ॥ ११ ॥
कैक ते चांदवे तेथे मोत्यांच्या झालरी तयां ।
मंचकी आसनी र‍त्न हस्तिदंत असेचि ते ॥ १० ॥
फिरती दास दासी त्या व्यग्र कार्यात सर्वची ।
अलंकृत् सर्व ते लोक सर्वची दिव्य ते कसे ॥ ११ ॥

त्वष्ट्रा निर्मितैः - विश्वकर्म्याने निर्मिलेल्या - मुक्तादामविलंबिभिः वितानैः - मोत्यांच्या सरांचे आहेत घोस ज्यांना अशा छतांनी - मण्युत्तमपरिष्कृतैः - उत्तम मण्यांनी भूषविलेल्या - दान्तैः आसनपर्यंकैः (उपलक्षितं) - हस्तिदंताच्या आसनांनी व पलंगांनी युक्त अशा - निष्ककंठीभिः सुवासोभिः दासीभिः अलंकृतं - गळ्यात सुवर्णाचे अलंकार घातलेल्या व सुंदर वस्त्रे नेसलेल्या दासींनी शोभणार्‍या - सकंचुकोष्णीषसुवस्त्रमणिकुण्डलैः पुंभिः (उपलक्षितं) - चिलखत, शिरस्त्राण, सुंदर वस्त्र व मणिखचित कुंडले धारण करणार्‍या पुरुषांनी युक्त अशा. ॥१०-११॥
विश्वकर्म्याने पुष्कळसे असे चांदवे बनविलेले होते की, ज्यांना मोत्यांच्या माळा लावल्या होत्या. तेथे रत्नजडित हस्तिदंती आसने आणि पलंग होते. (१०) गळ्यांत सोन्याचे हार घातलेल्या आणि सुंदर वस्त्रांनी नटलेल्या दासी तसेच अंगरखे व पगडी घातलेले आणि रत्नजडित कुंडले धारण केलेले सेवक त्या महालांची शोभा वाढवीत होते. (११)


( वसंततिलका )
रत्‍नप्रदीपनिकरद्युतिभिर्निरस्त
     ध्वान्तं विचित्रवलभीषु शिखण्डिनोऽङ्ग ।
नृत्यन्ति यत्र विहितागुरुधूपमक्षैः
     निर्यान्तमीक्ष्य घनबुद्धय उन्नदन्तः ॥ १२ ॥
( वसंततिलका )
दीपो नि र‍त्न तम नाह्सिति तेथ सारा
     गंधात धूप जळता निघतो झरोकीं ।
केका करीति मयुरो बघुनी तयाला
     वाटे तयांस जलदो नभि दाटले ते ॥ १२ ॥

अंग - हे राजा - रत्‍नप्रदीपनिकरद्युतिभिः निरस्तध्वान्तं - रत्‍नांच्या दीपसमूहांच्या कांतींनी ज्यातील अंधकार नाहीसा झाला आहे अशा - यत्र - जेथे - विचित्रवलभीषु विहिताः शिखण्डिनः - चित्रविचित्र खेचणीवर बसविलेले मोर - अक्षैः निर्यांतं अगुरुधूपं ईक्ष्य - खिडक्यातून बाहेर आलेला अगुरुचा धूर पाहून - घनबुद्धयः - हे मेघच आहेत अशा बुद्धीने - उन्नदन्तः - मोठमोठे शब्द करीत - नृत्यन्ति - नृत्य करितात. ॥१२॥
अनेक रत्नजडित दिवे आपल्या झगमगाटाने त्यांतील अंधकार नाहीसा करीत होते. अगुरू धूप घातल्यामुळे झरोक्यातून धूर बाहेर पडत होता. तो पाहून रंगी-बेरंगी रत्नमय सज्जावर बसलेले मोर ते ढग आहेत, असे वाटून मोठ्याने केकारव करीत थुई थुई नाचू लागत. (१२)


तस्मिन्समानगुणरूपवयःसुवेष
     दासीसहस्रयुतयानुसवं गृहिण्या ।
विप्रो ददर्श चमरव्यजनेन रुक्म
     दण्डेन सात्वतपतिं परिवीजयन्त्या ॥ १३ ॥
देवर्षि नारद तिथे बघती हरीला
     रुक्मिणी सेवि चवर्‍या हलवोनि हाते ।
दासी तिथे असुनिया हरिच्या हजारो
     रुक्मीणिऽशाच गमती गुणरूप यांनी ॥ १३ ॥

विप्रः - देवर्षि नारद - तस्मिन् - त्या अन्तःपुरात - समानगुणरूपवयःसुवेषदासीसहस्रयुतया - सारखे आहेत गुण, रूप, वय व मंगल वेष ज्यांचे अशा हजारो दासींनी युक्त - रुक्मदण्डेन चमरव्यजनेन सात्वतपतिं अनुसवं परिवीजयन्त्या - सुवर्णाचा दांडा असलेल्या चवरीने श्रीकृष्णाला सारखा वारा घालणार्‍या - गृहिण्या (सह स्थितं कृष्णं) ददर्श - पत्‍नीसह बसलेल्या श्रीकृष्णाला पाहता झाला. ॥१३॥
देवर्षी नारदांना तेथे असे दिसले की, भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीबरोबर तेथे असून ती स्वत: भगवंतांना सोन्याची दांडी असलेल्या चवरीने वारा घालीत आहे. तसेच तेथे रुक्मिणीसारख्याच गुण, रूप, वय आणि वेष-भूषा असलेल्या हजारो दासीसुद्धा नेहमी असत. (१३)


तं सन्निरीक्ष्य भगवान् सहसोत्थितश्री
     पर्यङ्कतः सकलधर्मभृतां वरिष्ठः ।
आनम्य पादयुगलं शिरसा किरीट
     जुष्टेन साञ्जलिरवीविशदासने स्वे ॥ १४ ॥
धर्मज्ञ कृष्णमणि हा बहु जाणताही
     देवर्षि पाहुनि तदा उठला त्वरेने ।
टेकोनिया मुकुट तो पद वंदि त्यांचे
     जोडोनिया करहि आसनि बैसवी की ॥ १४ ॥

सकलधर्मभृतां वरिष्ठः भगवान् - संपूर्ण धर्माचरणी पुरुषांमध्ये श्रेष्ठ असा श्रीकृष्ण - तं सन्निरीक्ष्य - त्या नारदाला पाहून - सहसा श्रीपर्यङकतः उत्थितः - एकाएकी रुक्मिणीच्या पलंगावरून उठून - किरीटजुष्टेन शिरसा - मुकुट घातलेल्या मस्तकाने - (तस्य) पादयुगलं आनम्य - नारदाच्या दोन्ही पायांना नमस्कार करून - साञ्जलिः (तं) स्वे आसने अवीविशत् - हात जोडून त्याला आपल्या आसनावर बसविता झाला. ॥१४॥
नारदांना पाहाताच सर्व धार्मिक लोकांचे मुकुटमणी भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीच्या पलंगावरून लगेच उठून उभे राहिले. देवर्षी नारदांच्या चरणी त्यांनी मुगुट असलेल्या मस्तकाने प्रणाम केला आणि हात जोडून त्यांना आपल्या आसनावर बसविले. (१४)


तस्यावनिज्य चरणौ तदपः स्वमूर्ध्ना
     बिभ्रज्जगद्‌गुरुतमोऽपि सतां पतिर्हि ।
ब्रह्मण्यदेव इति यद्‌गुणनाम युक्तं
     तस्यैव यच्चरणशौचमशेषतीर्थम् ॥ १५ ॥
गंगा निघे पदि जया जगता गुरू जो
     आदर्श दावि जगता स्वय स्वामि कृष्ण ।
ब्रह्मण्य देव बिरुदो हरिसी उचीत
     धूवोनि पाय मुनिचे श्रि तीर्थ घेई ॥ १५ ॥

जगद्‌गुरुतरः अपि सतां पतिः - सर्व जगद्‌‍गुरूंमध्ये श्रेष्ठ व साधूंचा अधिपति असाहि श्रीकृष्ण - तस्य चरणौ अवनिज्य - त्या नारदाचे पाय धुवून - तत् अपः स्वमूर्ध्ना अबिभ्रत् - ते उदक आपल्या मस्तकावर धारण करिता झाला - ब्रह्मण्यदेवः इति यत् गुणनाम (तत्) तस्य एव युक्तं - ब्राह्मणांचे कल्याण करणारा देव असे जे याचे गुण व नाव ते त्या श्रीकृष्णालाच योग्य आहे - हि - कारण - यच्चरणशौचं - ज्याच्या चरणापासून निघालेले शुद्ध गंगोदक - अशेषतीर्थं (अस्ति) - सर्व जगाला पवित्र करणारे आहे. ॥१५॥
भगवान श्रीकृष्ण चराचर जगाचे परम गुरू आहेत आणि त्यांच्या चरणांपासून निघालेले गंगाजल सगळ्या जगाला पवित्र करणारे आहे, यात बिलकुल शंका नाही. तरीसुद्धा ते संतांचे परम आदर्श होते. शिवाय त्यांचे ’ब्रह्मण्यदेव’ (ब्राह्मणांना देव मानणे) हे त्यांच्या गुणांना अनुरूप असेच नावही आहे. म्हणूनच त्यांनी स्वत: नारदांची पाद्यपूजा करून ते चरणामृत आपल्या मस्तकी धारण केले. (१५)


संपूज्य देवऋषिवर्यमृषिः पुराणो
     नारायणो नरसखो विधिनोदितेन ।
वाण्याभिभाष्य मितयामृतमिष्टया तं
     प्राह प्रभो भगवते करवाम हे किम् ॥ १६ ॥
नारायणो नर सखा पुरुषो पुराणो
     पूजी मुनीपद तदा बिधिने स्वयेची ।
थोडे नि गोड वदता करि स्वागताते
     सेवा कशी करु तुम्हा भगवंत तुम्ही ॥ १६ ॥

नरसखः पुराणः ऋषिः नारायणः - अर्जुनाचा मित्र पुराणपुरुष महर्षि श्रीकृष्ण - उदितेन विधिना - शास्त्रात सांगितलेल्या पूजाविधीने - देवऋषिवर्यं संपूज्य - देवर्षि नारदाची पूजा करून - अमृतमिष्टया मितया वाण्या अभिभाष्य - अमृताप्रमाणे मधुर अशा मोजक्या शब्दांनी बोलून - प्रभो - हे समर्थ नारदा - भगवते किं करवामहे - षड्‌गुणैश्वर्यसंपन्न अशा तुमचे आम्ही कोणते कार्य करावे - (इति) तं प्राह - असे त्या नारदाला म्हणाला. ॥१६॥
नराचे मित्र पुराण ऋषी भगवान नारायणांनी शास्त्रोक्त पद्धतीने देवर्षी नारदांची पूजा केली. नंतर अमृतापेक्षाही मधुर व मोजक्या शब्दांनी त्यांचे स्वागत करून त्यांना म्हटले- " प्रभो ! आपण स्वत: समग्र ज्ञान, वैराग्य, धर्म, यश, श्री आणि ऐश्वर्याने परिपूर्ण आहात. तरीही आम्ही आपली कोणती सेवा करावी ?" (१६)


श्रीनारद उवाच -
नैवाद्‌भुतं त्वयि विभोऽखिललोकनाथे
     मैत्री जनेषु सकलेषु दमः खलानाम् ।
निःश्रेयसाय हि जगत्स्थितिरक्षणाभ्यां
     स्वैरावतार उरुगाय विदाम सुष्ठु ॥ १७ ॥
देवर्षि नारद म्हणाले -
स्वामी तुम्हीच जगता नच हे नवे की ।
     भक्तास प्रेम करणे अन् दंड दुष्टा ।
रक्षावयास जगता तुम्हि जन्म घेता
     माहीत तेहि पुरते मजला हरी ते ॥ १७ ॥

अखिललोकनाथ उरुगाय विभो - हे त्रैलोक्याधिपते समर्थ श्रीकृष्णा - सकलेषु जनेषु मैत्री - सर्व प्राणिमात्रांवरील प्रेम - खलानां दमः - दुष्टांना शासन - (इदं) त्वयि अद्‌भुतं न एव - हे तुझ्या ठिकाणी आश्चर्य नाहीच - हि - कारण - जगत्स्थितिरक्षणाभ्यां - जगाची उत्पत्ति व रक्षण ह्या योगे - निःश्रेयसाय - कल्याण करण्याकरिता - (तव) स्वैरावतारः (भवति) - तुझा स्वेच्छेने अवतार होतो - सुष्ठु विदाम - आम्ही चांगले जाणतो. ॥१७॥
नारद म्हणाले- भगवन ! आपण सर्व लोकांचे स्वामी आहात. आपली सर्वांशी मैत्री आहे. तरीही आपण दुष्टांना शासन करता, यात काही आश्चर्य नाही. हे परमयशस्वी प्रभो ! आपण जगाचे पालन आणि रक्षण करण्याबरोबरच जीवांचे श्रेष्ठ कल्याण करण्यासाठी स्वेच्छेने अवतार धारण केला आहे, हे आम्ही चांगल्या रीतीने जाणतो. (१७)


दृष्टं तवाङ्घ्रियुगलं जनतापवर्गं
     ब्रह्मादिभिर्हृदि विचिन्त्यमगाधबोधैः ।
संसारकूपपतितोत्तरणावलम्बं
     ध्यायंश्चराम्यनुगृहाण यथा स्मृतिः स्यात् ॥ १८ ॥
भाग्येचे लाभति तुझे पद दर्शनाते
     ब्रह्मादि ज्ञानि करिती तव ध्यान नित्य ।
हा एक मार्ग तरण्या भवसागरात
     व्हावी कृपा अह्सिच की पद चित्ति राहो ॥ १८ ॥

जनतापवर्गं - लोकांना मोक्ष देणारे - अगाधबोधैः ब्रह्मादिभिः - अपरिमित आहे ज्ञान ज्यांचे अशा ब्रह्मदेवादिकांनी - हृदि विचिन्त्यं - हृदयात चिंतिण्यास योग्य असे - संसारकूपपतितोत्तरणावलम्बं - संसाररूपी विहिरीत पडलेल्यांना वर येण्यास आधार असे - तव अङ्‌घ्रियुगलं - तुझे दोन चरण - दृष्टम् - दृष्टीस पडले - (तत्) ध्यायन् चरामि - त्या पायांचे चिंतन करीत मी हिंडतो - यथा (तस्य) स्मृतिः स्यात् (तथा) अनुगृहाण - जेणेकरून तुझ्या पायांची स्मृति राहील तशी कृपा कर. ॥१८॥
आज आपल्या चरणकमलांचे मला दर्शन झाले, ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. आपली ही चरणकमले सर्व लोकांना मोक्ष देण्यास समर्थ आहेत. ज्यांचे ज्ञान अमर्याद आहे, असे ब्रह्मदेव, शंकर इत्यादी देव आपल्या हृदयामध्ये त्यांचे चिंतन करीत असतात. आपले हे चरणच संसाररूप विहिरीत पडलेल्या लोकांना बाहेर येण्याचे साधन आहे. आपण माझ्यावर अशी कृपा करा की, आपल्या चरणकमलांचे मला नेहमी स्मरण राहावे आणि मी त्यांच्या ध्यानात तन्मय असावे. (१८)


( अनुष्टुप् )
ततोऽन्यदाविशद्‌ गेहं कृष्णपत्‍न्याः स नारदः ।
योगेश्वरेश्वरस्याङ्ग योगमायाविवित्सया ॥ १९ ॥
( अनुष्टुप् )
पुन्हा देवर्षि ते गेल दुसर्‍या मंदिरी तदा ।
योगमाया पहायाते श्री योगेश्वर कृष्णची ॥ १९ ॥

अंग - हे राजा - ततः सः नारदः - नंतर तो नारद - योगेश्वरेश्वरस्य योगमायाविवित्सया - मोठमोठया योग्यांचा अधिपति अशा श्रीकृष्णाची योगमाया जाणण्याच्या इच्छेने - कृष्णपत्‍न्याः अन्यत् गेहं आविशत् - श्रीकृष्णाच्या दुसर्‍या एका स्त्रीच्या घरात शिरला. ॥१९॥
परीक्षिता ! यानंतर देवर्षी नारद योगेश्वरांचे सुद्धा ईश्वर अशा भगवान श्रीकृष्णांच्या योगमायेचे रहस्य जाणून घेण्यासाठी त्यांच्या दुस-या पत्नीच्या महालात गेले. (१९)


दीव्यन्तमक्षैस्तत्रापि प्रियया चोद्धवेन च ।
पूजितः परया भक्त्या प्रत्युत्थानासनादिभिः ॥ २० ॥
तिथेही चौरसा खेळे प्रियेच्या सह कृष्ण तो ।
तिथेही भगवान् कृष्णे पूजिले अर्चिले तसे ॥ २० ॥

तत्र अपि - तेथेहि - प्रियया च उद्धवेन च अक्षैः दीव्यन्तं (तम् अद्राक्षीत्) - प्रिय पत्‍नी व उद्धव यांसह फाशांनी खेळणार्‍या कृष्णाला पाहता झाला - परया भक्त्या प्रत्युत्थानासनादिभिः पूजितः (च) - आणि मोठया भक्तीने सामोरे जाणे, बसावयाला आसन देणे इत्यादि उपचारांनी पूजिला गेला. ॥२०॥
तेथेही त्यांनी असे पाहिले की, भगवान आपली प्रिया आणि उद्धव यांच्याबरोबर द्यूत खेळत आहेत. तेथेसुद्धा भगवंतांनी उभे राहून त्यांचे स्वागत केले, आसनावर बसविले आणि मोठ्या भक्तिभावाने त्यांची पूजा केली. (२०)


पृष्टश्चाविदुषेवासौ कदाऽऽयातो भवानिति ।
क्रियते किं नु पूर्णानां अपूर्णैरस्मदादिभिः ॥ २१ ॥
माहीत नसल्या ऐसे पुसतो कृष्ण नारदा ।
कधी आले करू काय सेवा मी तृप्त हो तुम्ही ॥ २१ ॥

भवान् कदा आयातः - आपण केव्हा आलात - च अपूर्णैः अस्मदादिभिः - आणि पूर्ण मनोरथ न झालेल्या आमच्यासारख्यांनी - पूर्णानां (वः) किं नु क्रियते - निरिच्छ अशा तुमचे कोणते कार्य करावे - इति अविदुषा इव - अशा रीतीने जसे काही आपणाला माहीतच नाही असे दाखवून - असौ पृष्टः - तो नारद विचारिला गेला. ॥२१॥
यानंतर भगवंतांनी आपल्याला काहीच माहीत नाही असे दाखवीत नारदांना विचारले, "आपण केव्हा आलात ? आपण तर सर्व दृष्टींनी परिपूर्ण आहात. अपूर्ण अशा आम्ही आपली काय सेवा करावी ?" (२१)


अथापि ब्रूहि नो ब्रह्मन् जन्मैतच्छोभनं कुरु ।
स तु विस्मित उत्थाय तूष्णीमन्यदगाद्‌ गृहम् ॥ २२ ॥
तरीही करणे आज्ञा ब्रह्मरूप तुम्ही असा ।
आज्ञेने करणे धन्य, स्तिमीत मुनि जाहले ॥ २२ ॥

ब्रह्मन् - हे नारदा - अथ अपि - तरीसुद्धा - नः ब्रूहि - आम्हाला सांग - एतत् जन्म शोभनं कुरु - हा आमचा जन्म सफल कर - विस्मितः सः तु - आश्चर्यचकित झालेला तो नारद तर - उत्थाय - उठून - तूष्णीं अन्यत् गृहं अगात् - काहीएक न बोलता मुकाटयाने दुसर्‍या घरी गेला. ॥२२॥
तरीसुद्धा हे ब्रह्मन ! आपण आम्हांला आपल्या सेवेची संधी देऊन आमचा जन्म सफळ करा. हे ऐकून चकित झालेले नारद तेथून गुपचूपपणे दुस-या महालाकडे निघून गेले. (२२)


तत्राप्यचष्ट गोविन्दं लालयन्तं सुतान् शिशून् ।
ततोऽन्यस्मिन्गृहेऽपश्यन् मज्जनाय कृतोद्यमम् ॥ २३ ॥
महाली तिसर्‍या जाता हरी पुत्रास खेळवी ।
महाली पुढच्या जाता स्नानासी कृष्ण बैसले ॥ २३ ॥

तत्र अपि - तेथेहि - शिशून् सुतान् लालयन्तं - लहान पुत्रांना खेळविणार्‍या - गोविन्दं अचष्ट - श्रीकृष्णाला पाहता झाला - ततः अन्यस्मिन् गृहे - नंतर दुसर्‍या घरी - मज्जनाय कृतोद्यमं (कृष्णं) अपश्यत् - स्नान करण्यास केली आहे सिद्धता ज्याने अशा कृष्णाला पाहता झाला. ॥२३॥
नारदांना त्या महालात श्रीकृष्ण आपल्या लहान लहान मुलांना खेळवीत आहेत, असे दिसले. तेथून पुढच्या महालात गेले, तर भगवान स्नानाला जाण्याची तयारी करीत आहेत, असे त्यांनी पाहिले. (२३)


जुह्वन्तं च वितानाग्नीन् यजन्तं पञ्चभिर्मखैः ।
भोजयन्तं द्विजान् क्वापि भुञ्जानमवशेषितम् ॥ २४ ॥
कुठे तो हवितो यज्ञीं आवाही देवतास तो ।
द्विजांना जेववी कोठे कुठे नैवेद्य भक्षि तो ॥ २४ ॥

(क्व) च वितानाग्नीन् जुह्वन्तं - कोठे अग्निहोत्रविधीने आहवनीय अग्नीला हविर्भाग देत आहे अशा - (क्व अपि) पञ्चभिः मखैः यजन्तं - कोठे पंचमहायज्ञ करीत आहे अशा - क्व अपि द्विजान् भोजयन्तं - एका घरी ब्राह्मणांना भोजन घालीत आहे अशा - (क्व अपि) अवशेषितं भुञ्जानं (कृष्णं अचष्ट) - एका ठिकाणी हविर्भाग देऊन उरलेल्या अन्नाचे सेवन करीत आहे अशा श्रीकृष्णाला पाहता झाला. ॥२४॥
कोठे ते हवन करीत आहेत, तर कोठे पंचमहायज्ञ करीत आहेत. कोठे ब्राह्मणांना भोजन देत आहेत, तर कोठे त्यांच्या भोजनानंतर स्वत: अन्न ग्रहण करीत आहेत. (२४)


क्वापि सन्ध्यामुपासीनं जपन्तं ब्रह्म वाग्यतम् ।
एकत्र चासिचर्माभ्यां चरन्तमसिवर्त्मसु ॥ २५ ॥
कुठे संध्या करी कोठे मौने गायत्रिते जपे ।
ढाल खड्ग कुठे घेता पवित्रा बदली तसा ॥ २५ ॥

क्व अपि - एका ठिकाणी - संध्याम् उपासीनं - संध्या करीत आहे अशा - वाग्यतं ब्रह्म जपन्तं - मौन धरून गायत्रीमंत्राचा जप करीत आहे अशा - एकत्र च - व एके ठिकाणी - असिचर्मभ्यां - तरवार व ढाल घेऊन - असिवर्त्मसु चरन्तं - तरवारीचे हात फिरवीत आहे अशा. ॥२५॥
कोठे संध्या करीत आहेत, तर कोठे मौन धारण करून गायत्रीमंत्राचा जप करीत आहेत. कोठे हातात ढाल-तलवार घेऊन ते चालवण्याचा सराव करीत आहेत. (२५)


अश्वैर्गजै रथैः क्वापि विचरन्तं गदाग्रजम् ।
क्वचिच्छयानं पर्यङ्के स्तूयमानं च वन्दिभिः ॥ २६ ॥
घोडा हत्ती रथी कोठे स्वार होवोनिया फिरे ।
मंचकी झोपला कोठे जाती वंदी स्तुति कुठे ॥ २६ ॥

क्व अपि - दुसर्‍या एका घरामध्ये - अश्वैः गजैः रथैः विचरन्तं - हत्ती, रथ व घोडे ह्यांवरून हिंडत असलेल्या - गदाग्रजं (अचष्ट) - श्रीकृष्णाला पाहता झाला - क्वचित् पर्यङके शयानं - एका ठिकाणी पलंगावर शयन केलेल्या - बन्दिभिः च स्तूयमानं (श्रीकृष्णं अपश्यत्) - आणि स्तुतिपाठक भाटांनी स्तविल्या जाणार्‍या श्रीकृष्णाला पाहता झाला. ॥२६॥
कोठे घोडे, हत्ती किंवा रथावर स्वार होऊन फिरत आहेत. तर कोठे पलंगावर झोपले आहेत. कोठे भाट त्यांची स्तुती करीत आहेत. (२६)


मंत्रयन्तं च कस्मिंश्चित् मंत्रिभिश्चोद्धवादिभिः ।
जलक्रीडारतं क्वापि वारमुख्याबलावृतम् ॥ २७ ॥
परामर्श करी कोठे मंत्र्यांशी उद्धादिका ।
सवे वरांगना कोठे जलक्रीडा करी हरी ॥ २७ ॥

कस्मिंश्चित् (गृहे) च - दुसर्‍या एका घरामध्ये तर - उद्धवादिभिः मन्त्रिभिः मन्त्रयन्तं - उद्धवादि प्रधानांबरोबर गुप्त विचार करणार्‍या - क्व च अपि - आणि कोठे तर - वारमुख्याबलावृतं - प्रमुख वारांगनांनी वेष्टिलेल्या - जलक्रीडारतं (कृष्णम् अपश्यत्) - जलक्रीडा करण्यात आसक्त झालेल्या श्रीकृष्णाला पाहता झाला. ॥२७॥
एखाद्या महालात उद्धव इत्यादी मंत्र्यांबरोबर राजकीय विषयावर चर्चा करीत आहेत, तर कोठे उत्तमोत्तम स्त्रियांसमवेत जलक्रीडा करीत आहेत. (२७)


कुत्रचिद्द्विजमुख्येभ्यो ददतं गाः स्वलङ्कृताः ।
इतिहासपुराणानि श्रृण्वन्तं मङ्गलानि च ॥ २८ ॥
कुठे सालंकृता गाई ब्राह्मणा दान देई तो ।
पुराण इतिहासाते ऐकण्या बैसला कुठे ॥ २८ ॥

कुत्रचित् - एका घरी - स्वलंकृताः गाः द्विजमुख्येभ्यः ददतं - उत्तमप्रकारे शोभित केलेल्या गाई श्रेष्ठ ब्राह्मणांना देणार्‍या - च - आणि - मङगलानि इतिहासपुराणानि शृण्वन्तं (कृष्णम् अचष्ट) - मंगलकारक इतिहास व पुराणे श्रवण करणार्‍या श्रीकृष्णाला पाहता झाला. ॥२८॥
कोठे वस्त्रालंकारांनी सुशोभीत अशा गाईंचे श्रेष्ठ ब्राह्मणांना दान करीत आहेत, तर कोठे मंगल अशा इतिहास पुराणांचे श्रवण करीत आहेत. (२८)


हसन्तं हासकथया कदाचित् प्रियया गृहे ।
क्वापि धर्मं सेवमानं अर्थकामौ च कुत्रचित् ॥ २९ ॥
कुठे पत्‍नीसवे कृष्ण विनोद हास्य ते करी ।
धर्म अर्थ कुठे सेवी कुठे भोगास लागला ॥ २९ ॥

कदाचित् गृहे - एका घरामध्ये - प्रियया हास्यकथया हसन्तं - प्रियपत्‍नीसह हसण्यासारख्या गोष्टी सांगून हसणार्‍या - क्व अपि - एका घरी - धर्मं सेवमानं - धर्माचरण करणार्‍या - कुत्रचित् च अर्थकामौ सेवमानम् - आणि एका घरामध्ये अर्थ व काम ह्या पुरुषार्थांचे सेवन करणार्‍या. ॥२९॥
कोठे आपल्या प्रियेबरोबर हास्यविनोद करीत खिदळत आहेत. तर कोठे धर्मशात्राचा अभ्यास करीत आहेत. कोठे अर्थाजन चालू आहे, तर कोठे धर्माला अनुकूल अशा विषयांचा उपभोग घेत आहेत. (२९)


ध्यायन्तमेकमासीनं पुरुषं प्रकृतेः परम् ।
शुश्रूषन्तं गुरून् क्वापि कामैर्भोगैः सपर्यया ॥ ३० ॥
कुठे एकांति बैसोनी ध्यान लावोनियां स्थिर ।
कुठे तो गुरुसी दान देवोनी सेवि लागला ॥ ३० ॥

प्रकृतेः परं एकं पुरुषं ध्यायन्तं - प्रकृतीच्या पलीकडे असलेल्या एकच अद्वितीय अशा परमेश्वराचे ध्यान करीत - आसीनम् - बसलेल्या - क्व अपि - एके ठिकाणी - कामैः भोगैः सपर्यया (च) - इष्ट भोग्य पदार्थांनी व पूजासाहित्याने - गुरून् शुश्रूषन्तं (कृष्णं अपश्यत्) - गुरूची सेवा करणार्‍या श्रीकृष्णाला पाहता झाला. ॥३०॥
कोठे एकांतात बसून प्रकृतीच्या पलीकडे असणा-या पुरुषाचे ध्यान करीत आहेत, तर कोठे गुरुजनांना त्यांच्या इच्छेनुसार हवे ते अर्पण करुन त्यांची सेवाशुश्रूषा करीत आहेत. (३०)


कुर्वन्तं विग्रहं कैश्चित् सन्धिं चान्यत्र केशवम् ।
कुत्रापि सह रामेण चिन्तयन्तं सतां शिवम् ॥ ३१ ॥
नारदे पाहिले कोठे युद्धाच्या गोष्टी तो करी ।
कुठे संधीत बोले नी कुठे रामास बोलतो ॥ ३१ ॥

कैश्चित् विग्रहं कुर्वन्तम् - कोठे कलह करणार्‍या - अन्यत्र च सन्धिं (कुर्वन्तं) - आणि दुसर्‍या ठिकाणी सख्य करणार्‍या - कुत्र अपि - एका ठिकाणी - रामेण सह - बलरामासह - सतां शिवं चिन्तयन्तं केशवं (अपश्यत्) - साधूंच्या हिताविषयी चिंतन करीत बसलेल्या श्रीकृष्णाला पाहता झाला. ॥३१॥
ते कोणाबरोबर युद्धासंबंधी बोलत आहेत, तर कोणाबरोबर तहासंबंधी ! कोठे ते बलरामांबरोबर बसून सत्पुरुषांचे कल्याण करण्याबाबत विचार करीत आहेत. (३१)


पुत्राणां दुहितॄणां च काले विध्युपयापनम् ।
दारैर्वरैस्तत्सदृशैः कल्पयन्तं विभूतिभिः ॥ ३२ ॥
पुत्र वा पुत्रिचा कोठे समान जोड पाहुनी ।
विधिवत् करतां लग्न धडाकेबाज ही तसे ॥ ३२ ॥

पुत्राणां दुहितृणां च - मुलगे व मुली यांचे - काले - योग्यकाळी - तत्सदृशैः विभूतिभिः - त्यांना साजेल अशा ऐश्वर्यांनी - दारैः वरैः विध्युपयापनं कल्पयन्तं - स्त्रियांशी व पतींशी विधियुक्त विवाह जमविणार्‍या. ॥३२॥
योग्य वेळ आल्याने कोठे पुत्र आणि कन्या यांचे इचित अशा पत्नी आणि वरांबरोबर शास्त्रानुसार थाटामाटात विवाह लावून देत आहेत. (३२)


प्रस्थापनोपनयनैः अपत्यानां महोत्सवान् ।
वीक्ष्य योगेश्वरेशस्य येषां लोका विसिस्मिरे ॥ ३३ ॥
कन्या वाटेस लावी नी कुठे आणावया निघे ।
विराट उत्सवा लोक होती स्तिमित पाहता ॥ ३३ ॥

येषां अपत्यानां प्रस्थापनोपायनैः - ज्या मुलामुलींना सासरी पाठविणे व माहेरी आणणे इत्यादि प्रसंगांनी - योगेश्वरस्य उत्सवान् वीक्ष्य - योगाधिपति श्रीकृष्णाचे महोत्सव पाहून - लोकाः विसिस्मिरे - लोक आश्चर्य करिते झाले. ॥३३॥
कोठे सासरी चाललेया कन्यांना निरोप देत आहेत, तर कोठे त्यांना बोलवण्याच्या तयारीत आहेत. योगेश्वरेश्वर श्रीकृष्णांचे हे थाट पाहून लोक आश्चर्यचकित होत होते. (३३)


यजन्तं सकलान् देवान् क्वापि क्रतुभिरूर्जितैः ।
पूर्तयन्तं क्वचिद् धर्मं कूर्पाराममठादिभिः ॥ ३४ ॥
कुठे यज्ञ करी मोठा देवता पूजने कुठे ।
बगीचे मठ नी कूप बांधता कर्म आचरी ॥ ३४ ॥

क्व अपि - एके ठिकाणी - ऊर्जितैः क्रतुभिः - योग्य यज्ञांनी - सकलान् देवान् यजन्तं - सर्व देवतांचे पूजन करणार्‍या - क्वचित् - काही ठिकाणी - कूपाराममठादिभिः - विहिरी, बागा, आश्रम अशा उपयोगी कृत्यांनी - धर्मं पूर्तयन्तं - धर्मांची पूर्तता करणार्‍या श्रीकृष्णाला पाहता झाला. ॥३४॥
कोठे मोठमोठे यज्ञ करून सर्व देवतांचे पूजन करीत आहेत, तर कोठे विहिरी, बगीचे, मठ इत्यादी बांधून पूर्त धर्माचे आचरण करीत आहेत. (३४)


चरन्तं मृगयां क्वापि हयमारुह्य सैन्धवम् ।
घ्नन्तं तत्र पशून् मेध्यान् परीतं यदुपुङ्गवैः ॥ ३५ ॥
मृगया करि तो कोठे सिंधु अश्वासि बैसुनी ।
मेधपशू बधी तेथे यज्ञाच्या करिता हरी ॥ ३५ ॥

क्व अपि - एका ठिकाणी - सैन्धवं हयं आरुह्य - सिंधुदेशीय अश्वावर बसून - मृगयां चरन्तं - मृगया करणार्‍या - ततः मेध्यान् पशून् घ्नन्तं - तेथे यज्ञाला योग्य अशा पशूंना मारणार्‍या - यदुपुङगवैः परी (तं अचष्ट) - श्रेष्ठ यादवांनी वेष्टिलेल्या श्रीकृष्णाला पाहता झाला. ॥३५॥
कोठे श्रेष्ठ यादवांच्या समवेत घोड्यावर बसून यज्ञाला योग्य पशूंची शिकार करीत आहेत. (३५)


अव्यक्तलिङ्गं प्रकृतिषु अन्तःपुरगृहादिषु ।
क्वचिच्चरन्तं योगेशं तत्तद्‌भावबुभुत्सया ॥ ३६ ॥
कुठे बलदुनी वेष लपोनी हेतु जाणण्या ।
प्रजेत फिरतो तैसा श्री योगेश्वर कृष्ण तो ॥ ३६ ॥

क्वचित् - एके ठिकाणी - तत्तद्‌भावबुभुत्सया - त्यांचे अभिप्राय जाणण्याच्या इच्छेने - प्रकृतिषु - लोकांमध्ये - अन्तःपुरगृहादिषु - अन्तःपुरातील गृहादि ठिकाणी - अव्यक्तलिङगं चरन्तं योगेशं (अपश्यत्) - गुप्तरीतीने संचार करणार्‍या योगाधिपति श्रीकृष्णाला पाहता झाला. ॥३६॥
आणि काही वेळा लोक, अंत:पुरे इत्यादी ठिकाणी सर्वांचे मत जाणून घेण्यासाठी गुप्त वेषात ते योगेश्वर फिरत आहेत. (३६)


अथोवाच हृषीकेशं नारदः प्रहसन्निव ।
योगमायोदयं वीक्ष्य मानुषीं ईयुषो गतिम् ॥ ३७ ॥
देवर्षे पाहिली माया भगवान् हृषीकेशची ।
वैभवा पाहता ऐशा स्मितेची बोलले असे ॥ ३७ ॥

अथ - नंतर - नारदः - नारद - मानुषीं गतिं ईयुषः - मनुष्यजन्माला आलेल्या श्रीकृष्णाचा - योगमायोदयं वीक्ष्य - योगमायेसंबंधी उत्कर्ष पाहून - प्रहसन् इव - जणू थटटा करीत - हृषीकेशम् उवाच - श्रीकृष्णाला म्हणाला. ॥३७॥
अशा प्रकारे मनुष्यासारखी लीला करीत असलेल्या श्रीकृष्णांच्या योगमायेचे वैभव पाहून नारद हसत हसत त्यांना म्हणाले. (३७)


विदाम योगमायास्ते दुर्दर्शा अपि मायिनाम् ।
योगेश्वरात्मन् निर्भाता भवत्पादनिषेवया ॥ ३८ ॥
योएश्वरा तुझी माया अगम्य नकळे कुणा ।
परी ते जाणिता आम्ही भजता सर्व हे कळे ॥ ३८ ॥

योगेश्वर - हे श्रीकृष्णा - मयिनाम् अपि दुर्दर्शाः - मायावी पुरुषांनाहि दिसण्यास कठीण अशा - भवत्पादनिषेवया आत्मन् निर्भाताः - तुमच्या चरणसेवेने अन्तःकरणात प्रकाशलेल्या - ते योगमायाः विदाम - तुझ्या योगमाया मी जाणत आहे. ॥३८॥
हे योगेश्वरा ! ब्रह्मदेव इत्यादी मायावींनासुद्धा दिसण्यास कठीण अशी योगमाया आपल्या चरणकमलांची सेवा केल्याने स्वत:च आमच्यासमोर प्रगट झाली आहे. (३८)


अनुजानीहि मां देव लोकांस्ते यशसाऽऽप्लुतान् ।
पर्यटामि तवोद्‌गायन् लीला भुवनपावनीम् ॥ ३९ ॥
चौदाही भुवनी कीर्ती देवाधिदेव रे तुझी ।
द्यावी आज्ञा मला कृष्णा फिरतो गात या लिला ॥ ३९ ॥

देव - हे श्रीकृष्णा - मां अनुजानीहि - मला जाण्याची आज्ञा दे - भुवनपावनी तव लीलां उद्‌गायन् - त्रैलोक्याला पवित्र करणार्‍या तुझ्या लीला गात - ते यशसा आप्लुतान् लोकान् पर्यटामि - तुझ्या कीर्तीने भरलेल्या लोकांमध्ये मी फिरत राहीन. ॥३९॥
हे भगवंता ! मला निरोप द्या. यानंतर आपल्या सुयशाने परिपूर्ण असलेल्या त्रिभुवनात मी आपल्या त्रिभुवनाला पावन करणा-या लीलेचे गायन करीत विहार करीन. (३९)


श्रीभगवानुवाच -
ब्रह्मन्धन्नस्य वक्ताहं कर्ता तदनुमोदिता ।
तच्छिक्षयन्लोकमिमं आस्थितः पुत्र मा खिदः ॥ ४० ॥
श्रीशुक उवाच -
इत्याचरन्तं सद्धर्मान् पावनान् गृहमेधिनाम् ।
तमेव सर्वगेहेषु सन्तमेकं ददर्श ह ॥ ४१ ॥
भगवान् श्रीकृष्ण म्हणाले -
देवर्षी धर्मवेत्ता मी धार्मीक अनुमोदक ।
वर्ततो शिकवायाते न व्या मोहीत ते तुम्ही ॥ ४० ॥
श्रीशुकदेव सांगतात -
गृहस्थधर्म हा श्रेष्ठ या परी कृष्ण आचरी ।
एकटा जरि तो तैसा नारदा भिन्न भासला ॥ ४१ ॥

पुत्र - हे बाळा नारदा - ब्रह्मन् - हे ब्रह्मस्वरूपा - अहं धर्मस्य वक्ता - मी धर्माचा उपदेश करणारा आहे - (धर्मस्य) कर्ता तदनुमोदिता (च अस्मि) - धर्माचरण करणारा व धर्माला अनुमोदन देणारा आहे - तत् शिक्षयन् - त्या धर्माचे शिक्षण देण्यासाठी - इमं लोकम् आस्थितः - ह्या भूलोकी अवतार धारण केला आहे - मा खिदः - दुःख करू नको - इति गृहमेधिनां पावनान् सद्धर्मान् आचरन्तं - याप्रमाणे गृहस्थाश्रमांचे पवित्र धर्म आचरणार्‍या - सर्वगेहेषु सन्तं - व सर्वांच्या घरात राहणार्‍या - तम् एव - त्या श्रीकृष्णाला - एकं ददर्श ह - एकालाच पाहता झाला. ॥४०-४१॥
श्रीकृष्ण म्हणाले- नारदमुनी ! मीच धर्माचा उपदेशक, पालन करणारा आणि त्याचे अनुष्ठान करणा-यांना अनुमोदन देणाराही आहे. म्हणून जगाला धर्माचे शिक्षण देण्याच्या उद्देशानेच मी अशा प्रकारे धर्माचरण करतो. वत्सा ! या मायेने तू मोहित होऊ नकोस. (४०) श्रीशुक म्हणतात - अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण गृहस्थाश्रमातील लोकांना पवित्र करणा-या श्रेष्ठ धर्मांचे आचरण करीत होते. सर्व प्रासादांतून ते एकटेच वावरत आहेत, असे नारदांनी पाहिले. (४१)


कृष्णस्यानन्तवीर्यस्य योगमायामहोदयम् ।
मुहुर्दृष्ट्वा ऋषिरभूद् विस्मितो जातकौतुकः ॥ ४२ ॥
अनंत कृष्णशक्ती ती योगमाया बघोनिया ।
वारंवार मुनीला ते आश्चर्य वाटले असे ॥ ४२ ॥

ऋषिः - नारद - अनंतवीर्यस्य कृष्णस्य - अगणित पराक्रम करणार्‍या श्रीकृष्णाच्या - योगमायामहोदयं दृष्टवा - योगमायेचा उदय पाहून - मुहुः विस्मितः जातकौतुकः अभूत् - वारंवार आश्चर्यचकित होऊन कौतुक करीत राहिला. ॥४२॥
अनंत शक्ती असणा-या श्रीकृष्णांच्या योगमायेचे परम ऐश्वर्य वारंवार पाहून देवर्षी नारदांच्या आश्चर्याला आणि कुतूहलाला सीमाच राहिली नाही. (४२)


इत्यर्थकामधर्मेषु कृष्णेन श्रद्धितात्मना ।
सम्यक् सभाजितः प्रीतः तमेवानुस्मरन् ययौ ॥ ४३ ॥
गृहस्था परि श्रीकृष्ण श्रद्धेने धर्म पाळिता ।
द्वारकीं वसला तेणे नारदा बहु अर्चिले ।
प्रसन्ने नारदो गेले कृष्णाला स्मरता मनीं ॥ ४३ ॥

इति - याप्रमाणे - अर्थकामधर्मेषु श्रद्धितात्मना कृष्णेन - अर्थ, काम व धर्म ह्या तीन पुरुषार्थांची ठिकाणी श्रद्धा ठेवणार्‍या श्रीकृष्णाने - सम्यक् सभाजितः प्रीतः (नारदः) - उत्तम रीतीने पूजिलेला व प्रसन्न झालेला नारद - तम् एव अनुस्मरन् ययौ - त्या श्रीकृष्णाचेच स्मरण करीत निघून गेला. ॥४३॥
धर्म, अर्थ आणि काम या पुरुषर्थांच्या ठायी श्रद्धा असणा-या श्रीकृष्णांनी नारदांचा चांगला सन्मान केला. त्यामुळे आनंदित होऊन, भगवंतांचेच स्मरण करीत ते तेथून निघून गेले. (४३)


( वसंततिलका )
एवं मनुष्यपदवीमनुवर्तमानो
     नारायणोऽखिलभवाय गृहीतशक्तिः ।
रेमेऽङ्ग षोडशसहस्रवराङ्गनानां
     सव्रीडसौहृदनिरीक्षणहासजुष्टः ॥ ४४ ॥
( वसंततिलका )
ना ना करी हरि तशी जग भद्र व्हाया
     माणूसरुफ धरुनी करितो लिला त्या ।
सोळा सहस्र अधिका जरि त्यास पत्‍न्या
     सर्वांस तो रमतसे हसता तयांशी ॥ ४४ ॥

अंग - हे राजा - नारायणः - श्रीकृष्ण - एवं मनुष्यपदवीं अनुवर्तमानः - याप्रमाणे मनुष्यांच्या मार्गाचे अनुसरण करीत - अखिलभवाय गृहीतशक्तिः - सर्वांच्या उत्कर्षाकरिता शक्ति धारण करणारा असा - षोडशसहस्रवराङगनानां - सोळा हजार स्त्रियांच्या - सव्रीडसौहृदनिरीक्षणहासजुष्टः - लज्जायुक्त प्रेमदृष्टीने अवलोकिलेला व हास्यरसाने सेविलेला असा - रेमे - रममाण झाला. ॥४४॥
राजन ! भगवान नारायण सगळ्या जगाच्या कल्याणासाठी आपल्या अचिंत्य मायेचा स्वीकार करून मनुष्यासारख्या लीला करीत सोळा हजारांहूनही अधिक पत्न्यांच्या लज्जायुक्त आणि प्रेमपूर्ण नजरांनी तसेच मंद स्मितहास्यांनी केलेली सेवा घेऊन त्यांच्याबरोबर रममाण होते. (४४)


यानीह विश्वविलयोद्‌भववृत्तिहेतुः
     कर्माण्यनन्यविषयाणि हरीश्चकार
यस्त्वङ्ग गायति श्रृणोत्यनुमोदते वा
     भक्तिर्भवेद्‌भगवति ह्यपवर्गमार्गे ॥ ४५ ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां दशमस्कन्धे उत्तरार्धे
कृष्णगार्हस्थ्यदर्शनं नाम एकोनसप्ततिमोऽध्यायः ॥ ६९ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
लीला तशा न जमल्या जगती कुणाला
     जन्म स्थिती नि लय हे हरिचेच हेतु ।
गाता नि ऐकि कथना अनुमोदिता ही
     भक्ती मिळेल हरिची पदि चित्त राही ॥ ४५ ॥
॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर एकोणसत्तरावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

अंग - हे राजा - विश्वविलयोद्‌भववृत्तिहेतुः हरिः - जगताची उत्पत्ति, स्थिति व संहार करण्यास कारणीभूत असा श्रीकृष्ण - इह - ह्या ठिकाणी - यानि अनन्यविषयाणि कर्माणि चकार - जी अलौकिक कृत्ये करिता झाला - (तानि) यः तु गायति - त्यांचे जो कोणी गायन करितो - शृणोति अनुमोदते वा - श्रवण करितो किंवा अनुमोदन देतो - अपवर्गमार्गे भगवति - मोक्षाचा मार्ग अशा भगवंताच्या ठिकाणी - भक्तिः भवेत् हि - खरोखर भक्ति उत्पन्न होईल. ॥४५॥ - एकोणसत्तरावा अध्याय समाप्त
परीक्षिता ! विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयाचे परम कारण असणा-या श्रीकृष्णांनी ज्या लीला केल्या, त्या दुसरा कोणीही करू शकणार नाही. जे त्यांच्या लीलांचे गायन, श्रवण करतात आणि गायन श्रवण करणा-यांना उत्तेजन देतात, त्यांच्या ठिकाणी मोक्षाला मार्गस्वरूप अशा भगवंतांविषयी भक्ती उत्पन्न होते. (४५)


अध्याय एकोणसत्तरावा समाप्त

GO TOP