श्रीमद् भागवत पुराण
स्कन्ध दहावा
अध्याय अडुसष्टावा

सांबविवाहः; बलरामेण हस्तिनापुरकर्षणं च -

कौरवांवर बलरामांचा कोप आणि सांबाचा विवाह -


संहिता - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् )
दुर्योधनसुतां राजन् लक्ष्मणां समितिंजयः ।
स्वयंवरस्थामहरत् सांबो जाम्बवतीसुतः ॥ १ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
( अनुष्टुप् )
दुर्योधनसुता राजा ! लक्ष्मणा ती स्वयंवरी ।
जिंकोनी आणिली वीरे सांबे जांबवतीसुते ॥ १ ॥

राजन् - हे परीक्षित राजा - समितिंजयः जाम्बवतीसुतः साम्बः - युद्धात विजय मिळविणारा जांबवतीचा मुलगा सांब - दुर्योधनसुतां लक्ष्मणां - दुर्योधनाची कन्या जी लक्ष्मणा तिला - स्वयंवरस्थाम् अहरत् - ती स्वयंवरासाठी उभी राहिली असता पळवून नेता झाला. ॥१॥
श्रीशुक म्हणतात- परीक्षिता ! युद्धात विजय मिळविणार्‍या जांबवतीपुत्र सांबाने स्वयंवरात दुर्योधनाची कन्या लक्ष्मणा हिला पळविले. (१)


कौरवाः कुपिता ऊचुः दुर्विनीतोऽयमर्भकः ।
कदर्थीकृत्य नः कन्यां अकामां अहरद् बलात् ॥ २ ॥
कौरवो बोलले क्रोधे उद्धटे बलपूर्वक ।
कन्या ती ओढुनी नेली इच्छा ती नसता तिची ॥ २ ॥

दुर्विनीतः अयं अर्भकः - उद्धट असा हा पोर - नः कदर्थीकृत्य - आम्हाला तुच्छ समजून - अकामां कन्यां - त्याला वरण्याची इच्छा न करणार्‍या कन्येला - बलात् अहरत् - बलात्काराने पळवून नेता झाला - (इति) कुपिताः कौरवाः ऊचुः - असे रागावलेले कौरव म्हणाले. ॥२॥
त्यामुळे कौरवांना राग आला. ते म्हणाले, "हा मुलगा उर्मट आहे. त्याने आम्हांला तुच्छ लेखून बळजबरीने आमच्या कन्येचे तिच्या मर्जीविरुद्ध अपहरण केले. (२)


बध्नीतेमं दुर्विनीतं किं करिष्यन्ति वृष्णयः ।
येऽस्मत् प्रसादोपचितां दत्तां नो भुञ्जते महीम् ॥ ३ ॥
उद्धटा बांधुनी आणा यदुवंशास क्रोध तो ।
येता ना बिघडे कांही जगती आमुच्या कृपे ॥ ३ ॥

दुर्विनीतं इमं बध्नीत - उद्धट असा ह्या पोराला बांधून टाका - वृष्णयः किं करिष्यन्ति - यादव काय करणार आहेत - ये - जे यादव - नः दत्तां - आम्ही दिलेले - अस्मत्प्रसादोपचितां महीं - व आमच्या प्रसादाने भरभराटीस आलेले राज्य - भुञ्जते - उपभोगीत आहेत. ॥३॥
म्हणून या उद्धटाला पकडून बांधून टाका. यादव आमचे काय वाकडे करू शकणार ? ते आम्हीच दयाबुद्धीने दिलेल्या धान्यसंपन्न जमिनीचा उपभोग घेत आहेत. (३)


निगृहीतं सुतं श्रुत्वा यद्येष्यन्तीह वृष्णयः ।
भग्नदर्पाः शमं यान्ति प्राणा इव सुसंयताः ॥ ४ ॥
बंदिस्त पुत्र पाहोनी येता ते लढुही तया ।
घमेंड जिरवु सारे योगी इंद्रिय जिंकी जै ॥ ४ ॥

वृष्णय़ः - यादव - सुतं निगृहीतं श्रुत्वा - मुलाला पकडून ठेविले आहे असे ऐकून - यदि इह एष्यन्ति - जर येथे येतील - सुसंयताः प्राणाः इव - प्राणायामादिकांनी ताब्यात ठेविलेल्या इंद्रियांप्रमाणे - भग्नदर्पाः शमं यान्ति - नष्ट झाला आहे गर्व ज्यांचा असे शांत होतील. ॥४॥
आपल्या मुलाला कैद केल्याचे ऐकून जर ते लोक इकडे आले, तर आम्ही त्यांची घमेंड जिरवू. त्यामुळे जसे संयमी पुरूष इंद्रियांना शांत करतात त्याप्रमाणे तेही शांत होतील. (४)


इति कर्णः शलो भूरिः यज्ञकेतुः सुयोधनः ।
साम्बमारेभिरे बद्धुं कुरुवृद्धानुमोदिताः ॥ ५ ॥
असे कर्ण शलो भूरी यज्ञकेतू सुयोधन ।
कुरुवृद्धां पुसोनीया कृतीला सिद्ध जाहले ॥ ५ ॥

इति - असा विचार करून - कर्णः शलः भूरिः यज्ञकेतुः सुयोधनः (एते) - कर्ण, शल, भूरि, यज्ञकेतु व दुर्योधन हे - कुरुवृद्धानुमोदिताः - धृतराष्ट्रादि वृद्ध कौरवांनी संमति दिलेले असे - सांबं बद्धुं आरेभिरे - सांबाला बांधावयास सरसावले. ॥५॥
असा विचार करून कर्ण, शल, भूरिश्रवा, यज्ञकेतू आणि दुर्योधन यांनी कुरुवंशातील ज्येष्ठांच्या संमतीने सांबाला पकडण्याची तयारी केली. (५)


दृष्ट्वानुधावतः साम्बो धार्तराष्ट्रान् महारथः ।
प्रगृह्य रुचिरं चापं तस्थौ सिंह इवैकलः ॥ ६ ॥
पाहिले पाठिसी सांबे धृष्टराष्ट्र दळास त्या ।
धनुष्य घेउनी आला सिंहाच्या परि एकटा ॥ ६ ॥

महारथः सांबः - महारथी सांब - अनुधावतः धार्तराष्ट्रान् दृष्टवा - पाठलाग करणार्‍या दुर्योधनादिकांना पाहून - एकलः सिंहः इव - एकटा असलेल्या सिंहाप्रमाणे - रुचिरं चापं प्रगृह्य तस्थौ - सुंदर धनुष्य घेऊन उभा राहिला. ॥६॥
कौरव पाठलाग करीत आहेत असे पाहून महारथी सांब एक सुंदर धनुष्य घेऊन सिंहासारखा एकटाच रणांगणात उतरला. (६)


तं ते जिघृक्षवः क्रुद्धाः तिष्ठ तिष्ठेति भाषिणः ।
आसाद्य धन्विनो बाणैः कर्णाग्रण्यः समाकिरन् ॥ ७ ॥
तिकडे कर्ण तो मुख्य सेना घेवोनि पातला ।
क्रोधाने ओरडे थांब बाणांची वृष्टि ही करी ॥ ७ ॥

जिघृक्षवः क्रुद्धाः - पकडण्याची इच्छा करणारे व रागावलेले - तिष्ठ तिष्ठ इति भाषिणः - उभा रहा उभा रहा असे बोलणारे - कर्णाग्रण्यः ते धन्विनः - कर्णप्रमुख असे ते हातांत धनुष्ये घेतलेले कौरव - बाणैः आसाद्य - धनुष्याला बाण जोडून - तं समाकिरन् - त्या सांबावर बाणांची वृष्टि करिते झाले. ॥७॥
इकडे कर्णाला सेनापती बनवून कौरववीर, धनुष्य घेतलेल्या सांबाजवळ येऊन पोहोचले आणि रागाने त्याला पकडण्याच्या इच्छेने "थांब ! थांब !" असे म्हणत त्याच्यावर बाणांचा वर्षाव करू लागले. (७)


सोऽपविद्धः कुरुश्रेष्ठ कुरुभिर्यदुनन्दनः ।
नामृष्यत् तदचिन्त्यार्भः सिंह क्षुद्रमृगैरिव ॥ ८ ॥
परीक्षित् ! सांब तो होता प्रत्यक्ष कृष्णनंदन ।
मृगा मृगेंद्र पाही तै तुच्छये क्रोधोनि पाहि तो ॥ ८ ॥

कुरुश्रेष्ठ - हे परीक्षित राजा - कुरुभिः अपविद्धः - कौरवांनी वेष्टिलेला - यदुनंदनः अचिन्त्यार्भः सः - यदुकुलाला आनंद देणारा कृष्णपुत्र तो सांब - क्षुद्रमृगैः सिंहः (वृतः) इव - सामान्य पशूंनी वेष्टिलेल्या सिंहाप्रमाणे - तत् न अमृष्यत् - त्यांची पर्वा करता झाला नाही. ॥८॥
परीक्षिता ! यदुनंदन सांब अचिंत्य ऐश्वर्यशाली अशा भगवान श्रीकृष्णांचा पुत्र होता. जसा सिंह तुच्छ पशूंच्या आक्रमणामुळे चिडतो, त्याप्रमाणे तो कौरवांच्या चढाईने त्यांच्यावर चिडला. (८)


विस्फूर्ज्य रुचिरं चापं सर्वान् विव्याध सायकैः ।
कर्णादीन् षड्रथान् वीरः तावद्‌भिर्युगपत् पृथक् ॥ ९ ॥
सांबे धनुष्य ताणोनी कर्णासह सहा विरां ।
सोडिले षट् षट् बाण प्रत्येका वेगळे तसे ॥ ९ ॥

(सः) वीरः रुचिरं चापं विस्फूर्ज्य - तो वीर सांब सुंदर धनुष्याचा टणत्कार करून - कर्णादीन् सर्वान् षड्रथान् - कर्णप्रमुख सर्वहि सहा वीरांना - पृथक् - प्रत्येकी - तावद्‌भिः सायकैः - तितक्याच बाणांनी - युगपत् विव्याध - एकाच वेळी प्रहार करिता झाला. ॥९॥
सांबाने आपल्या सुंदर धनुष्याचा टणत्कार करून, जे वेगवेगळ्या सहा रथांवर स्वार झाले होते, त्या कर्ण इत्यादी सहा वीरांच्यावर एकदम सहा बाणांनी वेगवेगळा वर्षाव केला. (९)


चतुर्भिश्चतुरो वाहान् एकैकेन च सारथीन् ।
रथिनश्च महेष्वासान् तस्य तत्तेऽभ्यपूजयन् ॥ १० ॥
चौ चौ बाणहि अश्वांसी एकेक सारथी विरां ।
हस्तलाघव देखोनी शत्रुंनी त्या प्रशंसिले ॥ १० ॥

चतुर्भिः चतुरः वाहान् - चार बाणांनी चार घोडयांना - च एकैकेन सारथीन् - आणि एकेक बाणाने सारथ्यांना - महेष्वासान् रथिनः च - आणि मोठमोठी धनुष्ये हातात घेतलेल्या वीरांना - ते तस्य तत् (पराक्रमम्) अभ्यपूजयन् - ते कौरव त्याच्या त्या पराक्रमाची प्रशंसा करू लागले. ॥१०॥
त्यांपैकी चार चार बाण त्यांच्या चार चार घोड्यांवर, एक एक त्यांच्या सारथ्यावर आणि एक एक त्या महान धनुष्यधारी वीरांवर सोडला. सांबाचे हे अद्‍भूत हस्तकौशल्य पाहून शत्रुपक्षातील वीरसुद्धा त्याची प्रशंसा करू लागले. (१०)


तं तु ते विरथं चक्रुः चत्वारश्चतुरो हयान् ।
एकस्तु सारथिं जघ्ने चिच्छेदान्यः शरासनम् ॥ ११ ॥
सर्वांनी त्या मिळोनीया सांबाचा रथ तोडिला ।
अश्व चौ मारिले चौघे एके सारथि मारिला ।
सांबचे धनु ते एके तोडिता सांब बांधिला ॥ ११ ॥

तु - परंतु - तं - त्याला - ते - कौरव - विरथं चक्रुः - रथहीन करिते झाले - चत्वारः चतुरः हयान् (जघ्नुः) - चौघे जण चार घोडयांना मारिते झाले - एकः तु - एक तर - सारथिं जघ्ने - सारथ्याला मारिता झाला - अन्यः - दुसरा - शरासनं चिच्छेद - धनुष्य तोडिता झाला. ॥११॥
नंतर त्या सहा वीरांपैकी चौघांनी एकेका बाणाने त्याचे चार घोडे मारले, एका वीराने सारथ्याला मारले आणि एका वीराने सांबाचे धनुष्य मोडून टाकले. अशा प्रकारे त्यांनी सांबाला रथहीन व शस्त्रहीन केले. (११)


तं बद्ध्वा विरथीकृत्य कृच्छ्रेण कुरवो युधि ।
कुमारं स्वस्य कन्यां च स्वपुरं जयिनोऽविशन् ॥ १२ ॥
लक्ष्मणापुत्रि घेवोनी जयची मानुनी तसा ।
हस्तिनापुरि ते आले आनंदे सर्व वीर की ॥ १२ ॥

कुरवः तं कुमारम् कृच्छ्‌रेण युधि विरथीकृत्य - ते कौरव त्या बालकाला मोठया कष्टाने युद्धभूमीवर रथहीन करून - बध्द्वा - बांधून - जयिनः - विजयी झालेले असे - (तं) स्वस्य कन्यां च - त्या सांबाला आणि स्वतःच्या कन्येला - स्वपुरं अविशन् - आपल्या नगरीत गेले. ॥१२॥
अशा प्रकारे विजयी कौरवांनी रथहीन सांबाला कसेबसे बांधून त्याला आणि आपल्या कन्येला घेऊन ते हस्तिनापुरात परतले. (१२)


तच्छ्रुत्वा नारदोक्तेन राजन् सञ्जातमन्यवः ।
कुरून् प्रत्युद्यमं चक्रुः उग्रसेनप्रचोदिताः ॥ १३ ॥
नारदे कथिता सारे क्रोधले यदुवंशिही ।
उग्रसेननृपाज्ञेने युद्धार्थ सर्व पातले ॥ १३ ॥

राजन् - हे परीक्षित राजा - नारदोक्तेन तत् श्रुत्वा - नारदाच्या सांगण्यावरून ते वर्तमान ऐकून - संजातमन्यवः - ज्यांना क्रोध आला आहे असे - उग्रसेनप्रचोदिताः (ते) - उग्रसेनाने आज्ञापिलेले ते यादव - कुरून् प्रत्युद्यमं चक्रुः - कौरवांचा प्रतिकार करण्याच्या प्रयत्‍नाला लागले. ॥१३॥
परीक्षिता ! नारदांकडून हा वृत्तांत ऐकून यादवांना अतिशय क्रोध आला. उग्रसेनाच्या आज्ञेवरून ते कौरवांवर चढाई करण्याच्या तयारीला लागले. (१३)


सान्त्वयित्वा तु तान् रामः सन्नद्धान् वृष्णिपुङ्गवान् ।
नैच्छय् कुरूणां वृष्णीनां कलिं कलिमलापहः ॥ १४ ॥
कलीच्या पापतापाला शमिण्या बळि जन्मले ।
कुशुशी लढणे योग्य तयांना वाटले नसे ॥ १४ ॥

कलिमलापहः रामः तु - कलिरूपी पातकाचा नाश करणारा बलराम तर - सन्नद्धान् तान् वृष्णिपुंगवान् - सज्ज झालेल्या त्या मोठमोठया शूर यादवांना - सांत्वयित्वा - सांत्वन करून - कुरूणां वृष्णींना कलिं - कौरव व यादव यांच्यामधील कलहाला - न ऐच्छत् - इच्छिता झाला नाही. ॥१४॥
कलह नाहीसा करू इच्छिणार्‍या बलरामांनी युद्धसज्ज यादवांचे सांत्वन केले. कारण कुरू आणि वृष्णी यांचे आपापसातील भांडण त्यांना योग्य वाटत नव्हते. (१४)


जगाम हास्तिनपुरं रथेनादित्यवर्चसा ।
ब्राह्मणैः कुलवृद्धैश्च वृतश्चन्द्र इव ग्रहैः ॥ १५ ॥
सर्वांना करुनी शांत तेजस्वी रथि बैसले ।
द्विज नी वृद्ध घेवोनी निघाले रथि चंद्र जै ॥ १५ ॥

ब्राह्मणैः च कुलवृद्धैः वृतः (सः) - ब्राह्मण व कुलांतील वृद्धपुरुष ह्यांनी वेष्टिलेला तो बलराम - ग्रहैः चंद्रः इव - ग्रहांनी वेष्टिलेल्या चंद्राप्रमाणे - आदित्यवर्चसा रथेन - सूर्याप्रमाणे तेजस्वी अशा रथात बसून - हास्तिनपुरं जगाम - हास्तिनपुराला गेला. ॥१५॥
नंतर स्वत: सूर्यासारख्या तेजस्वी रथावर स्वार होऊन ते हस्तिनापुरला गेले. त्यांच्याबरोबर काही ब्राह्मण आणि ज्येष्ठ यादव होते. ग्रहांसमवेत चंद्र असावा, तसे त्यांच्यासमवेत बलराम होते. (१५)


गत्वा गजाह्वयं रामो बाह्योपवनमास्थितः ।
उद्धवं प्रेषयामास धृतराष्ट्रं बुभुत्सया ॥ १६ ॥
थांबले वनि ते एका समीप हस्तिनापुरा ।
जाणण्या कुरुहेतू तो उद्धवा धाडिले असे ॥ १६ ॥

रामः - बलराम - गजाह्वयं गत्वा - हास्तिनपुराला जाऊन - बाह्योपवनं आस्थितः - गावाबाहेरील बागेत राहिलेला असा - धृतराष्ट्रं बुभुत्सया - धृतराष्ट्राचा अभिप्राय जाणण्याच्या इच्छेने - उद्धवं प्रेषयामास - उद्धवाला पाठविता झाला. ॥१६॥
हस्तिनापुरला जाऊन बलराम नगराच्या बाहेर एका उपवनात थांबले आणि कौरवांचा काय मानस आहे, हे जाणून घेण्यासाठी त्यांनी उद्धवाला धृतराष्ट्राकडे पाठविले. (१६)


सोऽभिवन्द्याम्बिकापुत्रं भीष्मं द्रोणं च बाह्लिकम् ।
दुर्योधनं च विधिवद् राममागतमब्रवीत् ॥ १७ ॥
उद्धवे सभि जावोनी धृतराष्ट्रास नी तसे ।
आचार्या वंदिले, बोले येतात बलरामजी ॥ १७ ॥

सः - तो उद्धव - अम्बिकापुत्रं - धृतराष्ट्राला - भीष्मं द्रोणं च बाह्‌लिकं दुर्योधनं च - भीष्म, द्रोण, बाल्हीक आणि दुर्योधन ह्यांना - विधिवत् अभिवन्द्य - यथाशास्त्र वंदन करून - आगतं रामं अब्रवीत् - आलेल्या बलरामाविषयी सांगता झाला. ॥१७॥
उद्धवाने कौरवांच्या सभेत जाऊन धृतराष्ट्र, भीष्म, द्रोणाचार्य, बाल्हीक आणि दुर्योधन यांना विधिपूर्वक प्रणाम करून निवेदन केले की, "बलराम आले आहेत." (१७)


तेऽतिप्रीतास्तमाकर्ण्य प्राप्तं रामं सुहृत्तमम् ।
तमर्चयित्वाभिययुः सर्वे मङ्गलपाणयः ॥ १८ ॥
हितैषी राम येता तो ऐकता कुरु हर्षले ।
सत्कारा पातले सर्व मांगल्यस्तुति गाउनी ॥ १८ ॥

सुहृत्तमं तं रामं प्राप्तम् आकर्ण्य - श्रेष्ठ मित्र अशा त्या बलरामाला आलेला ऐकून - अतिप्रीताः ते - अत्यंत प्रसन्न झालेले ते कौरव - तं अर्चयित्वा - त्या उद्धवाचा सत्कार करून - मंगलपाणयः सर्वे - मंगलकारक पदार्थ हातात घेतले आहेत असे ते सर्व - (तं) अभिययुः - बलरामाकडे गेले. ॥१८॥
आपले परम सुहृद बलराम आले आहेत, हे ऐकून कौरव अतिशय आनंदित झाले. उद्धवाचा सत्कार करून व आपल्या हातत पवित्र सामग्री घेऊन बलरामाच्या स्वागतासाठी ते निघाले. (१८)


तं सङ्गम्य यथान्यायं गामर्घ्यं च न्यवेदयन् ।
तेषां ये तत्प्रभावज्ञाः प्रणेमुः शिरसा बलम् ॥ १९ ॥
सत्कारा दिधल्या गाई अर्घ्यही अर्पिले कुणी ।
प्रभाव जाणिती त्यांनी वंदिले शिर टेकुनी ॥ १९ ॥

यथान्यायं तं संगम्य - योग्य प्रकारे त्या बलरामाकडे जाऊन - गां अर्घ्यं च न्यवेदयन् - गाय व अर्घ्यादि उपचार अर्पण करिते झाले - तेषां ये तत्प्रभावज्ञाः (ते) - त्यांमध्ये जे त्या बलरामाचा पराक्रम जाणणारे होते ते - शिरसा बलं प्रणेमुः - मस्तकाने बलरामाला नमस्कार करिते झाले. ॥१९॥
नंतर आपपल्या वयोमानानुसार आणि संबंधानुसार सर्वजण बलरामांना भेटले आणि त्यांच्या सत्काराप्रीत्यर्थ त्यांना गाय अर्पण करून त्यांनी त्यांची पूजा केली. त्यांपैकी जे भगवान बलरामांचा प्रभाव जाणत होते, त्यांनी मस्तक लववून त्यांना नमस्कार केला. (१९)


बन्धून् कुशलिनः श्रुत्वा पृष्ट्वा शिवमनामयम् ।
परस्परमथो रामो बभाषेऽविक्लवं वचः ॥ २० ॥
पुसले कुशलो क्षेम एकमेका परस्परे ।
धीर गंभीर वाणीने बोलले बलराम तै ॥ २० ॥

बन्धून् कुशलिनः श्रुत्वा - बांधव खुशाल आहेत असे ऐकून - परस्परं शिवं अनामयं पृष्टवा - एकमेकांना खुशालीचे व आरोग्याचे प्रश्न विचारिल्यावर - अथो - मग - रामः - बलराम - अविक्लवं वचः बभाषे - निर्भयपणे भाषण करिता झाला. ॥२०॥
त्यानंतर त्यांनी एकमेकांना खुशाली विचारली आणि ती त्यांनी एकमेकांना सांगितली. नंतर निर्भयपणे बलराम त्यांना म्हणाले. (२०)


उग्रसेनः क्षितीशेशो यद् व आज्ञापयत् प्रभुः ।
तद् अव्यग्रधियः श्रुत्वा कुरुध्वं माविलम्बितम् ॥ २१ ॥
उग्रसेन महाराजे तुम्हा आज्ञा दिली असे ।
एकाग्रे सर्वची ऐका शीघ्रची पाळणे तुम्ही ॥ २१ ॥

क्षितीशेशः प्रभुः उग्रसेनः - सार्वभौ‌म समर्थ राजा उग्रसेन - यत् वः आज्ञापयत् - जे तुम्हाला आज्ञापिता झाला - तत् अव्यग्रधियः श्रुत्वा - ते शांत चित्ताने ऐकून - मा विलंबितं कुरुध्वं - वेळ न लावता करा. ॥२१॥
राजाधिराज महाराज उग्रसेनांनी तुम्हांला एक आज्ञा केली आहे. ती तुम्ही शांतपणे ऐकून घेऊन ताबडतोब तिचे पालन करा. (२१)


यद् यूयं बहवस्त्वेकं जित्वाधर्मेण धार्मिकम् ।
अबध्नीताथ तन्मृष्ये बन्धूनामैक्यकाम्यया ॥ २२ ॥
वदले सांब धर्मात्मा अधर्मे बांधिले तया ।
न व्हावे आपुले तेढ सोडणे वधुनी वरा ॥ २२ ॥

यत् तु - जे तर - यूयं बहवः - तुम्ही पुष्कळ जण - धार्मिकं एकं अधर्मेण जित्वा - धर्माचरण करणार्‍या एकाला अधर्माने जिंकून - अथ अबध्नीत - नंतर बांधिते झालात - तत् बन्धूनाम् ऐक्यकाम्यया मृष्ये - ते बांधवात एकी रहावी या इच्छेने मी सहन करीत आहे. ॥२२॥
महाराजांनी सांगितले आहे- "आम्हांस हे माहित आहे की, तुम्ही पुष्कळांनी मिळून अधर्माने, धर्मशील, एकाकी सांबाल एकटाच जिंकून बंदिवान केले. आम्हा बांधवांत फूट पडू नये म्हणून आम्ही ते सहन केले. (असमर्थ होतो म्हणून नव्हे )" (२२)


वीर्यशौर्यबलोन्नद्धं आत्मशक्तिसमं वचः ।
कुरवो बलदेवस्य निशम्योचुः प्रकोपिताः ॥ २३ ॥
शूरता - वीरतापूर्ण युक्त ते बळि बोलले ।
कौरवा पातला क्रोध क्रोधाने बोलु लागले ॥ २३ ॥

कुरवः - कौरव - वीर्यशौर्यबलोन्नद्धम् - पराक्रम, सामर्थ्य व शक्ति ह्यांनी वाढलेले - आत्मशक्तिसमं - आपल्या शक्तिला अनुरूप असे - बलदेवस्य वचः निशम्य - बलरामाचे भाषण ऐकून - प्रकोपिताः - रागावलेले असे - ऊचुः - म्हणाले. ॥२३॥
बलरामांचे बोलणे वीरता, शौर्य आणि सामर्थ्य यांच्या उत्कर्षाने परिपूर्ण तसेच त्यांच्या शक्तीला अनुरूप असेच होते. ते ऐकून कौरव रागाने म्हणाले. (२३)


अहो महच्चित्रमिदं कालगत्या दुरत्यया ।
आरुरुक्षत्युपानद् वै शिरो मुकुटसेवितम् ॥ २४ ॥
आश्चर्य केवढे आही काळाची चाल वगळी ।
जोड्यांना वाटते जावे सारोनी मुकुटा शिरीं ॥ २४ ॥

अहो - अहो - इदं महत् चित्रम् - हे मोठे आश्चर्य होय - दुरत्यया कालगत्या - अतिक्रम करण्यास कठीण अशा कालगतीने - उपानत् - पादत्राण - मुकुटसेवितं शिरः - मुकुट सेविणार्‍या मस्तकावर - आरुरुक्षति वैः - खरोखर आरुढ होत आहे. ॥२४॥
अहो ! ही तर मोठ्या आश्चर्याचीच गोष्ट आहे. कालगती कोणी टाळू शकत नाही, हेच खरे ! म्हणून जेथे मुकुटाने बसावे, तेथे आज पायातील जोडे बसू इच्छितात ! (२४)


एते यौनेन संबद्धाः सहशय्यासनाशनाः ।
वृष्णयस्तुल्यतां नीता अस्मद् दत्तनृपासनाः ॥ २५ ॥
सोयरे यदुही झाले पंक्तीस जेवु लागले ।
सिंहासन दिले त्यांना प्रतिष्ठा दिधली तशी ॥ २५ ॥

एते वृष्णयः - हे यादव - यौनेन संबद्धाः - कुंतीच्या विवाहाने जोडिलेले - सहशय्यासनाशनाः - एके ठिकाणी शयन, आसन व भोजन होत आहे असे - अस्मद्दत्तनृपासनाः - आम्ही दिले आहे राज्य ज्यांना असे - तुल्यतां नीताः - सारख्या अधिकाराला नेले गेले. ॥२५॥
यांच्याशी आम्ही विवाह- संबंध जोडला. हे आमच्याबरोबर झोपणे-बसणे, खाणे-पिणे करू लागले. आम्हीच त्यांना राजसिंहासन देऊन आमच्या बरोबरीला आणले. (२५)


चामरव्यजने शङ्खं आतपत्रं च पाण्डुरम् ।
किरीटमासनं शय्यां भुञ्जन्त्यस्मदुपेक्षया ॥ २६ ॥
चामरे शंख छत्रे नी मुकूट राज‍आसने ।
शय्याही भोगिती तैसी आम्ही दुर्लक्षिले तयां ॥ २६ ॥

अस्मदुपेक्षया - आम्ही दुर्लक्ष करीत असल्यामुळे - चामरव्यजने - चवरी पंखा - शंखं पाण्डुरं आतपत्रं च - शंख आणि पांढरे छत्र - किरीटं आसनं शय्यां भुञ्जन्ति - मुकुट, आसन, शय्या यांचा उपभोग घेतात. ॥२६॥
आम्ही दुर्लक्ष करतो, म्हणून हे यदुवंशी चवर्‍या, पंखा, शंख, पांढरे छत्र, मुगुट, राजसिंहासन आणि बहुमोल शय्या यांचा उपयोग करीत आहेत. (२६)


( इंद्रवंशा )
अलं यदूनां नरदेवलाञ्छनैः
     दातुः प्रतीपैः फणिनामिवामृतम् ।
येऽस्मत्प्रसादोपचिता हि यादवा
     आज्ञापयन्त्यद्य गतत्रपा बत ॥ २७ ॥
( इंद्रवज्रा )
हे फार झाले नृपचिन्ह यांचे
     घ्यावे बळे हे शिरजोर होती ।
कृपाप्रसादे जगती कुरुच्या
     निर्लज्ज आज्ञा करिती पुन्हा हे ॥ २७ ॥

फणिनाम् अमृतं इव - सर्पांना पाजलेल्या अमृताप्रमाणे - दातुः प्रतीपैः - देणार्‍याच्या विरुद्ध वर्तन करणारी - यदूनां नरदेवलांछनैः अलं - यादवांना दिलेली राजचिन्हे पुरे झाली - हि - कारण - अस्मत्प्रसादोपचिताः ये यादवाः - आमच्या प्रसादामुळे भरभराटीस आलेले हे यादव - गतत्रपाः - निर्लज्ज झालेले असे - अद्य (नः) आज्ञापयन्ति बत - आज आम्हाला खरोखर आज्ञा करीत आहेत. ॥२७॥
यापुढे ही राजचिन्हे यादवांना द्यायलाच नकोत ! जसे सापाला दूध पाजणे घातक ठरते, त्याचप्रमाणे राज्य देणार्‍या आमच्याच विरुद्ध हे वागत आहेत. आमच्याच कृपेने ज्यांची भरभराट झाली तेच यादव (कृतघ्न होऊन) निर्लज्जपणे आम्हांलाच आज्ञा करीत आहेत. धिक्कर असो यांचा ! (२७)


( अनुष्टुप् )
कथमिन्द्रोऽपि कुरुभिः भीष्मद्रोणार्जुनादिभिः ।
अदत्तमवरुन्धीत सिंहग्रस्तमिवोरणः ॥ २८ ॥
( अनुष्टुप् )
सिंहाचा भाग ना घेई लांडगा त्याच त्या परी ।
अर्जून द्रोण भीष्मांची इंद्रही वस्तु भोगिना ॥ २८ ॥

इन्द्रः अपि - इंद्रसुद्धा - उरणः सिंहग्रस्तं इव - मेंढा, सिंहाने गिळिलेला पदार्थ - भीष्मद्रोणार्जुनादिभिः - भीष्म, द्रोण, अर्जुन इत्यादि - कुरुभिः - कौरवांनी - अदत्तं - न दिलेले असे - कथं अवरुंधीत - कसे स्वीकारील. ॥२८॥
सिंहाचा घास जसा मेंढा काढून घेऊ शकत नाही, त्याचप्रमाणे जर भीष्म, द्रोण, अर्जुन इत्यादी कौरववीरांनी राज्य द्यायचे नाकारले, तर स्वत: इंद्र तरी ते कसे घेऊ शकेल ? (२८)


श्रीबादरायणिरुवाच -
जन्मबन्धुश्रीयोन्नद्ध मदास्ते भरतर्षभ ।
आश्राव्य रामं दुर्वाच्यं असभ्याः पुरमाविशन् ॥ २९ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
परीक्षित् कुरुवंशींना संपत्ती कुळगर्व तो ।
साधा आचार सोडोनी हस्तिनापुरि पातले ॥ २९ ॥

भरतर्षभ - हे भरतश्रेष्ठा परीक्षित राजा - जन्मबन्धुश्रिया उन्नद्धमदाः - जन्माने व बंधूंनी दिलेल्या ऐश्वर्याने ज्यांचा मद वाढला आहे असे - असभ्याः ते - असभ्य असे ते कौरव - रामं दुर्वाच्यं आश्राव्य - बलरामाला कठोर शब्द बोलून - पुरं आविशन् - आपल्या हास्तिनपुराला परत गेले. ॥२९॥
श्रीशुक म्हणतात - परीक्षिता ! कौरव उच्च कूळ, शूर बांधव आणि राज्यलक्ष्मी यांच्या गर्वाने उन्मत्त झाले होते. बलरामांना असभ्यपणे अशी दुरुत्तरे ऐकवून ते हस्तिनापुरात परतले. (२९)


दृष्ट्वा कुरूनां दौःशील्यं श्रुत्वावाच्यानि चाच्युतः ।
अवोचत् कोपसंरब्धो दुष्प्रेक्ष्यः प्रहसन् मुहुः ॥ ३० ॥
दुष्टता पाहिली रामे बोलणे ऐकिले तसे ।
संतापे लाल होवोनी मोठ्याने हासती तदा ॥ ३० ॥

कुरूणां दौःशील्यं दृष्टवा - कौरवांचा हा वाईट स्वभाव पाहून - अवाच्यानि च श्रुत्वा - आणि निंदात्मक अशी भाषणे ऐकून - अच्युतः - बलराम - कोपसंरब्धः दुष्प्रेक्ष्यः (भूत्वा) - क्रोधाविष्ट झालेला व पहाण्यास कठीण असा होऊन - प्रहसन् मुहुः अवोचत् - हसतहसत वारंवार म्हणाला. ॥३०॥
बलरामांनी कौरवांचे असभ्य वर्तन पाहिले, त्यांची दुरुत्तरेही ऐकली. त्यामुळे त्यांचा चेहेरा रागाने लालबुंद झाला. त्यावेळी त्यांच्याकडे पाहावतही नव्हते. ते वारंवार जोरजोराने हसत म्हणू लागले. (३०)


नूनं नानामदोन्नद्धाः शान्तिं नेच्छन्त्यसाधवः ।
तेषां हि प्रशमो दण्डः पशूनां लगुडो यथा ॥ ३१ ॥
खरेचि दुष्ट जे त्यांना संपत्ती कुळ-गर्व हो ।
नेच्छिती शांति हे दुष्ट पशुंना लाठिचे हवी ॥ ३१ ॥

नानामदोन्नद्धा असाधवः - अनेक प्रकारच्या मदाने उन्मत्त झालेले दुर्जन पुरुष - नूनं शान्तिं न इच्छन्ति - खरोखर शांतीला इच्छित नाहीत - यथा पशूनां लगुडः - जसा पशूंना सोटा - तेषां दण्डः प्रशमः हि - त्या दुष्टांना शिक्षा करणे हाच त्यांच्या शांतीचा उपाय होय. ॥३१॥
जे दुष्ट निरनिराळ्या मदांनी उन्मत्त होतात, त्यांना शांतीची इच्छा नसते. पशूंना वठणीवर आणण्यासाठी दंडुक्याचा प्रयोग करणे आवश्यक असते, त्याचप्रमाणे अशांना योग्य मार्गावर आणण्याचा उपाय म्हणजे त्यांना शासन करणे हेच होय. (३१)


अहो यदून् सुसंरब्धाम् कृष्णं च कुपितं शनैः ।
सान्त्वयित्वाहमेतेषां शममिच्छन् इहागतः ॥ ३२ ॥
आमुचे सैन्य नी कृष्ण लढाया सिद्धले परी ।
राखिली शांति मी तेथे नी आलो समजावया ॥ ३२ ॥

अहो - दुष्ट कौरव हो - सुसंरब्धान् यदून् - क्रुद्ध झालेल्या यादवांना - कुपितं कृष्णं च - आणि रागावलेल्या कृष्णाला - शनैः सान्त्वयित्वा - हळू हळू शांत करून - अहं - मी - एतेषां शमं इच्छन् - यादव कौरवांमध्ये शांति रहावी अशा इच्छेने - इह आगतः - येथे आलो आहे. ॥३२॥
आता हेच पहा ना ! यादव आणि श्रीकृष्णसुद्धा रागाने लढाई करण्याच्या तयारीत होते. मीच त्यांना समजावून सांगून यांना शांत करण्यासाठी येथे आलो होतो. (३२)


त इमे मन्दमतयः कलहाभिरताः खलाः ।
तं मामवज्ञाय मुहुः दुर्भाषान् मानिनोऽब्रुवन् ॥ ३३ ॥
परी सारे इथे दुष्ट ह्यांना भांडण आवडे ।
तिरस्कार करोनीया बकती वाटले तसे ॥ ३३ ॥

मन्दमतयः कलहाभिरताः खलाः - मंदबुद्धि, कलहाची आवड असलेले व दुष्ट असे - मानिनः ते इमे - अभिमानी असे ते हे कौरव - तं मां अवज्ञाय - त्या माझा अपमान करून - मुहुः दुर्भाषान् अब्रुवन् - वारंवार निंदात्मक भाषणे करिते झाले. ॥३३॥
तरीसुद्धा हे भांडणाची खुमखुमी असणारे, अहंकारी मूर्ख वारंवार माझा तिरस्कार करून, बोलू नये ते बोलले. (३३)


नोग्रसेनः किल विभुः भोजवृष्ण्यन्धकेश्वरः ।
शक्रादयो लोकपाला यस्यादेशानुवर्तिनः ॥ ३४ ॥
ठीक, ठीक असो बंधू इंद्रादी देव पाळिती ।
आज्ञा ती उग्रसेनाची पहा ते नृप ना कसे ! ॥ ३४ ॥

भोजवृष्ण्यन्धकेश्वरः उग्रसेनः - भोज, वृष्णि व अंधक यांचा अधिपति उग्रसेन - किल न विभुः - खरोखर आज्ञा करण्यास समर्थ नाही काय ? - शक्रादयः लोकपालाः - इंद्रादिक लोकपाल - यस्य आदेशानुवर्तिनः - ज्या उग्रसेनाच्या आज्ञेने वागतात. ॥३४॥
इंद्र इत्यादी लोकपालही ज्यांच्या आज्ञेचे पालन करतात, ते भोज, वृष्णी आणि अंधकवंशी यादवांचे राजे उग्रसेन यांना आज्ञा करू शकत नाहीत काय ? (३४)


सुधर्माऽऽक्रम्यते येन पारिजातोऽमराङ्‌घ्रिपः ।
आनीय भुज्यते सोऽसौ न किलाध्यासनार्हणः ॥ ३५ ॥
सुधर्मा सभि जो राजे पारिजातास मेळि जो ।
राज सिंहासना युक्त नव्हे कास कास कृष्ण पात्र तो ॥ ३५ ॥

येन सुधर्मा आक्रम्यते - ज्याने देवांची सुधर्मा नावाची सभा आपल्या स्वाधीन करून घेतली - अमरांघ्रिपः पारिजातः - देववृक्ष असा पारिजातक - आनीय (येन) भुज्यते - आणून ज्याकडून सेविला जात आहे - सः असौ अध्यासनार्हणः न किल - तो हा श्रीकृष्ण सिंहासनारूढ होण्यास योग्य नाही काय ? ॥३५॥
सुधर्मासभेत जे विराजमान असतात, ज्यांनी देववृक्ष पारिजातक आणून आपल्या उपवनाला लावला, ते भगवान श्रीकृष्णसुद्धा राजसिंहासनाचे अधिकारी नाहीत काय ? (३५)


यस्य पादयुगं साक्षात् श्रीरुपास्तेऽखिलेश्वरी ।
स नार्हति किल श्रीशो नरदेवपरिच्छदान् ॥ ३६ ॥
स्वयं भगवती देवी सेविते नित्य ज्या पदा ।
तो का ना राजचिन्हाते ठेविण्या पात्रही तसा ॥ ३६ ॥

अखिलेश्वरी श्रीः - त्रैलोक्यस्वामिनी लक्ष्मी - साक्षात् - प्रत्यक्ष - यस्य पादयुगम् उपास्ते - ज्याच्या चरणांची उपासना करिते - सः श्रीशः - तो लक्ष्मीपति विष्णु - नरदेवपरिच्छदान् किल न अर्हति - राजचिन्हांना धारण करण्यास योग्य नाही काय ॥३६॥
सगळ्या जगाची स्वामिनी भगवती लक्ष्मी स्वत: ज्यांच्या चरणकमलांची सेवा करते, ते लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्ण छत्र, चामरे इत्यादी राजोचित सामग्री जवळ बाळागू शकत नाहीत काय ? (३६)


( वसंततिलका )
यस्याङ्‌घ्रिपङ्कजरजोऽखिललोकपालैः
     मौल्युत्तमैर्धृतमुपासिततीर्थतीर्थम् ।
ब्रह्मा भवोऽहमपि यस्य कलाः कलायाः
     श्रीश्चोद्वहेम चिरमस्य नृपासनं क्व ॥ ३७ ॥
( वसंततिलका )
ज्याच्या पदीचि धुळ घेवुनि संत नेती
     तीर्था पवित्र करिती अन शंकरादी ।
ती पायधूळ धरिती हरिची सदा त्या
     ते राज‍आसन कुठे मिळते बसाया! ॥ ३७ ॥

उपासिततीर्थतीर्थं - उपासना केली आहे गंगादि तीर्थांची ज्यांनी अशा योग्यांनाहि पवित्र करणारे तीर्थ असे - यस्य अङ्‌घ्रिपङकजरजः - ज्याच्या चरणकमलाचे पराग - अखिललोकपालैः मौल्युत्तमैः धृतं - इंद्रादि सर्व लोकपालांनी आपल्या मुकुटयुक्त श्रेष्ठ मस्तकांनी धारण केले - ब्रह्मा भवः अहं श्रीः च अपि - ब्रह्मदेव, शंकर, मी आणि लक्ष्मी सुद्धा - यस्य कलायाः कलाः (सन्तः) - ज्याच्या अंशाचे अंश असून - चिरं (तं) उद्वहेम - नित्य ज्याची उपासना करीत असतो - अस्य नृपासनं क्व - अशा त्या श्रीकृष्णाला राज्यासन म्हणजे काय पदार्थ आहे ? ॥३७॥
ज्यांच्या चरणकमलांची धूळ संत पुरूष सेवन करीत असलेल्या गंगा इत्यादी तीर्थांनासुद्धा तीर्थपणा आणून देणारी आहे, सगळे लोकपाल आपापल्या श्रेष्ठ मुगुटावर जिला धारण करतात, ज्यांच्या अंशांचे अंश असलेले ब्रह्मदेव, शंकर, मी आणि लक्ष्मी जी नेहमी मस्तकांवर धारण करतो, त्या "श्रीकृष्णांना राजसिंहासन कोठून ?" असे म्हणता ! (३७)


( अनुष्टुप् )
भुञ्जते कुरुभिर्दत्तं भूखण्डं वृष्णयः किल ।
उपानहः किल वयं स्वयं तु कुरवः शिरः ॥ ३८ ॥
बिचारे यदुवंशी ते कुरूचे अन्न भक्षिती ।
आ हो आम्ही असू जोडे कुरू ते मुकुटोच की ! ॥ ३८ ॥

वृष्णय़ः - यादव - कुरुभिः दत्तं भूखण्डं - कौरवांनी दिलेल्या पृथ्वीच्या भागाला - भुञ्जते किल - खरोखर सेवितात - वयं उपानहः किल - खरोखर आम्ही पादत्राणे - स्वयं तु कुरवः शिरः - आणि स्वतः कौरव मात्र मस्तक होत. ॥३८॥
बिचारे यादव म्हणे कौरवांनी दिलेला जमिनीचा तुकडा भोगतात. आम्ही म्हणे पायातील जोडे ! आणि हे कौरव म्हणे मस्तक ! वाहवा रे ! (३८)


अहो ऐश्वर्यमत्तानां मत्तानामिव मानिनाम् ।
असंबद्धा गिरो रुक्षाः कः सहेतानुशासीता ॥ ३९ ॥
गर्वे वेडेचि झाले हे बोलती कटु भाष्य ते ।
दंड देण्या समर्थो मी मजला साहवे कसे ? ॥ ३९ ॥

अहो कः अनुशासिता - दुसर्‍याला शासन करण्यात समर्थ असा कोणता पुरुष - मानिनां - अभिमानी अशा - मत्तानाम् इव ऐश्वर्यमत्तानां - मद्याने मत्त झाल्याप्रमाणे ऐश्वर्यमदाने उन्मत्त झालेल्या लोकांची - रूक्षाः असंबद्धाः गिरः - कठोर व वेडीवाकडी भाषणे - सहेत - सहन करील ॥३९॥
अहो ! ऐश्वर्याने माजलेल्या, घमेंडखोर, वेड्याप्रमाणे बडबडणार्‍या यांची असंबद्ध, निरर्थक बडबड, यांना शासन करू शकणारा माझ्यासारखा कसा सहन करू शकेल ? (३९)


अद्य निष्कौरवं पृथ्वीं करिष्यामीत्यमर्षितः ।
गृहीत्वा हलमुत्तस्थौ दहन्निव जगत्त्रयम् ॥ ४० ॥
निष्कौरव ही पृथ्वी करितो राम बोलले ।
त्रिलोका जाळिती वाटे हाती नांगर घेतला ॥ ४० ॥

अद्य निष्कौरवीं पृथ्वीं करिष्यामि - आज मी कौरवरहित पृथ्वी करीन - इति अमर्षितः (बलः) - असे म्हणून रागावलेला बलराम - जगत्‌त्रयं दहन् इव - त्रैलोक्य जणू जाळीतच की काय - हलं गृहीत्वा उत्तस्थौ - नांगर घेऊन उठला. ॥४०॥
आज मी सगळी पृथ्वी कौरवरहित करून टाकीन, असे म्हणत बलराम अत्यंत क्रोधाने जणू त्रैलोक्याचे भस्म करून टाकण्यासाठी आपला नांगर हातात घेऊन उभे राहिले. (४०)


लाङ्गलाग्रेण नगरं उद्विदार्य गजाह्वयम् ।
विचकर्ष स गङ्गायां प्रहरिष्यन्नमर्षितः ॥ ४१ ॥
उप्‌टोनी काढिले त्यांनी फाळाने हस्तिनापुरा ।
क्रोधाने बुडवायाते गंगापात्रासि ओढिती ॥ ४१ ॥

अमर्षितः सः - रागावलेला बलराम - लांगलाग्रेण - नांगराच्या टोकाने - गजाह्वयं नगरं - हास्तिनपुर नगराला - प्रहरिष्यन् - प्रहार करून - उद्विदार्य - उपटून - गंगायां विचकर्ष - गंगेत ओढून आणिता झाला. ॥४१॥
त्यांनी त्याच्या टोकाने हस्तिनापूर उखडले आणि ते बुडविण्यासाठी अतिशय क्रोधाने गंगेकडे ओढू लागले. (४१)


जलयानमिवाघूर्णं गङ्गायां नगरं पतत् ।
आकृष्यमाणमालोक्य कौरवाः जातसंभ्रमाः ॥ ४२ ॥
डौले नाव तसे झाले कंपीत हस्तिनापुर ।
पांडवे पाहिला गाव पडे गंगेत सर्वची ॥ ४२ ॥

कौरवाः - कौरव - जलयानम् इव आघूर्णं - नौकेप्रमाणे फिरत असलेल्या - आकृष्यमाणं गंगायां पतत् - ओढिल्या जाणार्‍या व गंगेत पडत असलेल्या - नगरं आलोक्य - हास्तिनपुराला पाहून - जातसंभ्रमाः (जाताः) - गडबडून गेलेले झाले. ॥४२॥
नांगराच्या ओढण्याने, पाण्यामध्ये नाव जशी डगमगते, त्याप्रमाणे हस्तिनापुर हलू लागले. आपले नगर गंगेमध्ये बुडवण्यसाठी ओढले जात असलेले पाहून कौरव घाबरले. (४२)


तमेव शरणं जग्मुः सकुटुम्बा जिजीविषवः ।
सलक्ष्मणं पुरस्कृत्य साम्बं प्राञ्जलयः प्रभुम् ॥ ४३ ॥
लक्ष्मणा सह तो सांब तयांनी आणिला पुढे ।
सकुटुंब पुढे येता प्रार्थिती हात जोडुनी ॥ ४३ ॥

सकुटुंबा जिजीषवः (ते) - कुटुंबासह जगण्याची इच्छा करणारे ते कौरव - सलक्ष्मणं सांबं पुरस्कृत्य - लक्ष्मणेसह सांबाला पुढे करून - प्राञ्जलयः (भूत्वा) - हात जोडून - तं प्रभुम् एव शरणं जग्मुः - त्या समर्थ बलरामालाच शरण गेले. ॥४३॥
नंतर त्यांनी लक्ष्मणेसह सांबाला पुढे केले आणि आपल्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी, कुटुंबियांसह हात जोडून, सर्वशक्तिमान अशा भगवान बलरामांना ते शरण गेले. (४३)


राम रामाखिलाधार प्रभावं न विदाम ते ।
मूढानां नः कुबुद्धीनां क्षन्तुमर्हस्यतिक्रमम् ॥ ४४ ॥
लोकाभिराम रामा हो तुम्ही तो पृथ्वि धारिली ।
अज्ञानें मूर्ख हो आम्ही अपराधा क्षमा करा ॥ ४४ ॥

अखिलाधार - सर्वांना आधार देणार्‍या - रामराम - हे लोकमनोरंजन करणार्‍या बलरामा - ते प्रभावं न विदाम - तुझ्या पराक्रमाची आम्हास जाणीव नाही - कुबुद्धीनां मूढानां नः - दुष्टबुद्धी मूर्ख अशा आमचा - अतिक्रमं क्षन्तुं अर्हसि - अपराध क्षमा करण्यास तू योग्य आहेस. ॥४४॥
हे लोकाभिराम बलराम ! आपण सगळ्या जगताचे आधार आहात. आम्ही आपला प्रभाव जाणला नाही. हे प्रभो ! आम्हां मूर्खांच्या अपराधाबद्दल आम्हांला क्षमा करावी. (४४)


स्थित्युत्पत्त्यप्ययानां त्वमेको हेतुर्निराश्रयः ।
लोकान् क्रीडनकानीश क्रीडतस्ते वदन्ति हि ॥ ४५ ॥
जगाचे हेरु ही तुम्ही निराधार स्वयं असा ।
वदती ऋषि हे विश्व खेळणे खेळता तुम्ही ॥ ४५ ॥

ईश - हे ऐश्वर्यसंपन्न बलरामा - निराश्रयः एकः त्वं - आश्रयरहित एकटा तू - (जगतः) स्थित्युत्पत्यप्ययानां हेतुः - रक्षण, उत्पत्ति व संहार यांना कारण आहेस - लोकान् - लोकांना - क्रीडतः ते - खेळणार्‍या तुझी - क्रीडनकान् वदन्ति हि - खरोखर खेळणी म्हणतात. ॥४५॥
आपण जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयाचे कारण आहात आणि स्वत: कोणत्याही आधाराविना राहाता. हे सर्वशक्तिमान प्रभो ! हे त्रैलोक्य आपली खेळणी आहेत, असे ज्ञानी म्हणतात. (४५)


( मिश्र )
त्वमेव मूर्ध्नीदमनन्त लीलया
     भूमण्डलं बिभर्षि सहस्रमूर्धन् ।
अन्ते च यः स्वात्मनि रुद्धविश्वः
     शेषेऽद्वितीयः परिशिष्यमाणः ॥ ४६ ॥
( इंद्रवज्रा )
तुम्ही धरेला धरिला लिलेने
     सहस्र डोके प्रभुजी तुम्हाला ।
तुम्हीच अंती लिन सर्व घेता
     नी राहता एकटेची निजोनी ॥ ४६ ॥

सहस्रमूर्धन् अनंत - हजार फणांच्या शेषा - त्वम् एव - तूच - इदं भूमण्डलं - ह्या पृथ्वीमंडळाला - लीलया मूर्ध्नि बिभर्षि - लीलेने मस्तकावर धारण करितोस - अन्ते च - आणि प्रलयकाली - स्वात्मनि रुद्धविश्वः - स्वतःच्या ठिकाणी ज्याने जगाचा अवरोध केला आहे असा - अद्वितीयः परिशिष्यमाणः - एकटा उरलेला असा - यः (त्वं) शेषे - जो तू शयन करितोस. ॥४६॥
हे अनंता ! आपली हजारो मस्तके आहेत आणि आपण सहजपणे हे भूमंडल आपल्या मस्तकावर ठेवले आहे. जेव्हा प्रलय होतो, तेव्हा आपण सार्‍या जगाला आपल्यामध्ये लीन करून घेता आणि शिल्लक असलेले एकटेच आपण शयन करीत असता. (४६)


( अनुष्टुप् )
कोपस्तेऽखिलशिक्षार्थं न द्वेषान्न च मत्सरात् ।
बिभ्रतो भगवन् सत्त्वं स्थितिपालनतत्परः ॥ ४७ ॥
( अनुष्टुप् )
सत्वमयी अशा रूपा धारिता स्थिति पालनी ।
न द्वेषे कोपले तुम्ही जीवांना बोधिता तुम्ही ॥ ४७ ॥

भगवन् - हे भगवान बलरामा - सत्त्वं बिभ्रतः ते कोपः - सत्त्वगुण धारण करणार्‍या तुझा कोप - अखिलशिक्षार्थम् (अस्ति) - सर्वांना नीट वळण लावण्यासाठी असतो - न द्वेषात् न च मत्सरात् - द्वेषामुळे नसतो व मत्सरामुळेहि नसतो - (किन्तु) स्थितिपालनतत्परः (अस्ति) - तर सर्वांचे अस्तित्व राखून रक्षण करण्यात दक्ष असतो. ॥४७॥
हे भगवन ! आपण जगताची स्थिती आणि पालन करण्यासाठी विशुद्ध सत्वमय शरीर धारण केले आहे. आपला हा क्रोध, द्वेष किंवा मत्सर यांमुळे नसून सर्वांना शिक्षण देण्यासाठी आहे. (४७)


नमस्ते सर्वभूतात्मन् सर्वशक्तिधराव्यय ।
विश्वकर्मन् नमस्तेऽस्तु त्वां वयं शरणं गताः ॥ ४८ ॥
नमस्ते सर्वभूतात्मा सर्वशक्तिधरा तुम्हा ।
नमस्ते विश्वकर्माते तुम्हा शरणि पातलो ॥ ४८ ॥

सर्वभूतात्मन् - हे सर्व प्राण्यांच्या नियंत्या - सर्वशक्तिधर अव्यय - हे सर्वसामर्थ्यवान अविनाशी बलरामा - ते नमः (अस्तु) - तुला नमस्कार असो - विश्वकर्मन् - हे जगदुत्पत्तिकारका बलरामा - ते नमः (अस्तु) - तुला नमस्कार असो - वयं तु त्वां शरणं गताः - आम्ही तर तुला शरण आलो आहो. ॥४८॥
हे सर्व शक्तींना धारण करणार्‍या सर्वप्राणिस्वरूप अविनाशी भगवन ! आम्ही आपल्याला नमस्कार करीत आहोत. हे विश्व निर्माण करणार्‍या देवा ! आम्ही आपणांस शरण आलो आहोत. (४८)


श्रीशुक उवाच -
एवं प्रपन्नैः संविग्नैः वेपमानायनैर्बलः ।
प्रसादितः सुप्रसन्नो मा भैष्टेत्यभयं ददौ ॥ ४९ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
डळ्‌मळे नगरी तेंव्हा सर्वची भयभीत ते ।
येवोनी प्रार्थिता ऐसे न भ्यावे राम बोलले ॥ ४९ ॥

एवं प्रपन्नैः संविग्नैः वेपमानायनैः - याप्रमाणे शरण आलेल्या, भ्यालेल्या व थरथर कापणारे आहे हास्तिनपुर नगर ज्यांचे अशा त्या कौरवांनी - प्रसादितः (अतः) सुप्रसन्नः बलः - प्रार्थिलेला व म्हणून सुप्रसन्न झालेला बलराम - मा भेष्ट - भिऊ नका - इति अभयं ददौ - असे म्हणून अभयवचन देता झाला. ॥४९॥
श्रीशुक म्हणतात- नगर डगमगू लागल्याने भयभीत झालेले कौरव भगवान बलरामांना शरण आले आणि त्यांनी त्यांची स्तुती केली. तेव्हा अत्यंत प्रसन्न होऊन, "भिऊ नका" असे म्हणून त्यांनी त्यांना अभय दिले. (४९)


दुर्योधनः पारिबर्हं कुञ्जरान् षष्टिहायनान् ।
ददौ च द्वादशशतानि अयुतानि तुरङ्गमान् ॥ ५० ॥
रथानां षट्सहस्राणि रौक्माणां सूर्यवर्चसाम् ।
दासीनां निष्ककण्ठीनां सहस्रं दुहितृवत्सलः ॥ ५१ ॥
दुर्योधनास ती पुत्री अत्यंत लाडकी अशी ।
आंदना साठवर्षाचे बाराशे हत्ति ते दिले ॥ ५० ॥
दहा हजार ते घोडे षट्सहस्र रथो तसे ।
सालंकृत अशा दास्या सहस्र दिधल्या पहा ॥ ५१ ॥

दुर्योधनः - दुर्योधन - षष्टिहायनान् द्वादश शतान् कुञ्जरान् - साठ वर्षे वयाचे बाराशे हत्ती - (द्वादश) अयुतानि च तुरङगमान् - आणि बारा दशसहस्र घोडे - पारिबर्हं ददौ - आंदण देता झाला. ॥५०॥ दुहितृवत्सलः (सः) - कन्येवर प्रेम करणारा तो दुर्योधन - रौक्माणां सूर्यवर्चसां रथानां षट् सहस्राणि - सुवर्णाचे, सूर्याप्रमाणे तेजस्वी सहा हजार रथ - निष्ककण्ठीनां दासीनां सहस्रं - सुवर्णाच्या अलंकारांनी भूषविलेल्या हजार दासी. ॥५१॥
कन्येवरील प्रेमामुळे दुर्योधनाने वरदक्षिणा म्हणून साठ साठ वर्षांचे बाराशे हत्ती, दहा हजार घोडे, सूर्यासारखे चमकणारे सोन्याचे सहा हजार रथ आणि सोन्याचे हार घातलेल्या एक हजार दासी दिल्या. (५०-५१)


प्रतिगृह्य तु तत्सर्वं भगवान् सात्वतर्षभः ।
ससुतः सस्नुषः प्रायात् सुहृद्‌भिरभिनन्दितः ॥ ५२ ॥
स्वीकारिता असे सर्व पुत्र सूनहि घेउनी ।
कौरवा अभिनंदोनी निघाले द्वारकापुरा ॥ ५२ ॥

सात्वतर्षभः भगवान् तु - यादवश्रेष्ठ बलराम तर - सुहृद्‌भिः अभिनंदितः - कौरवांनी अभिनंदन केलेला असा - तत् सर्वं प्रतिगृह्य - ते सर्व घेऊन - ससुतः सस्नुषः प्रायात् - पुत्र सांब व सून लक्ष्मणा ह्यांसह द्वारकेस जाण्यास निघाला. ॥५२॥
आप्तांनी सत्कार केलेले यदुश्रेष्ठ भगवान बलराम त्या सर्वाचा स्वीकार करून नवदांपत्याला बरोबर घेऊन द्वारकेकडे परतले. (५२)


( मिश्र )
ततः प्रविष्टः स्वपुरं हलायुधः
     समेत्य बन्धूननुरक्तचेतसः ।
शशंस सर्वं यदुपुङ्गवानां
     मध्ये सभायां कुरुषु स्वचेष्टितम् ॥ ५३ ॥
( इंद्रवज्रा )
उत्सुक सार्‍या स्वजना मिळाले
     द्वारावतीसी बळिराम ऐसे ।
चरित्र सारे वदले सभेत
     जे जाहले त्या कुच्या पुरात ॥ ५३ ॥

ततः स्वपुरं प्रविष्टः हलायुधः - नंतर द्वारकेत आलेला बलराम - अनुरक्तचेतसः बन्धून् समेत्य - अत्यंत प्रेमयुक्त अंतःकरणाच्या यादवांना भेटून - यदुपुंगवानां मध्येसभायां - यादवश्रेष्ठांच्या सभेत - कुरुषु सर्वं स्वचेष्टितं शशंस - कुरुदेशात केलेले स्वतःचे कृत्य सांगता झाला. ॥५३॥
नंतर बलराम द्वारकापुरीत पोहोचले व आपल्या प्रिय बांधवांना भेटले. त्यांनी हस्तिनापुरात कौरवांशी जे काही घडले, ते सर्व यादवसभेत सांगितले. (५३)


( अनुष्टुप् )
अद्यापि च पुरं ह्येतत् सूचयद् रामविक्रमम् ।
समुन्नतं दक्षिणतो गङ्गायां अनुदृश्यते ॥ ५४ ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां दशमस्कन्धे उत्तरार्धे
हस्तिनपुरकर्षणरूपसंकर्षणविजयो नाम अष्टषष्टितमोऽध्यायः ॥ ६८ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
( अनुष्टुप् )
परीक्षित् ! आज ही तैसे कलते हस्तिनापुर ।
गंगाजीची दिशा दावी प्रतीक रामकीर्तिचे ॥ ५४ ॥
॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर अडुसष्टावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

अद्यापि च - आणि अजूनहि - रामविक्रमं सूचयत् एतत् पुरं - बलरामाचा पराक्रम सुचविणारे हे हास्तिनपुर - दक्षिणतः समुन्नतं - दक्षिण बाजूला वर उचललेले असे - गंगायां अनुदृश्यते हि - गंगातीरी खरोखर नित्य दिसत आहे. ॥५४॥ - अडुसष्टावा अध्याय समाप्त
आजही दक्षिणेकडे उंच असलेले आणि गंगेकडे थोडेसे झुकलेले हे हस्तिनापूर बलरामांच्या पराक्रमाचे सूचक आहे. (५४)


अध्याय अडुसष्टावा समाप्त

GO TOP