श्रीमद् भागवत पुराण
स्कन्ध दहावा
अध्याय सहासष्टावा

रैवतके द्विविद्वधः -

द्विविदाचा उद्धार


संहिता - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीराजोवाच -
( अनुष्टुप् )
भुयोऽहं श्रोतुमिच्छामि रामस्याद्‌भुतकर्मणः ।
अनन्तस्याप्रमेयस्य यदन्यत् कृतवान् प्रभुः ॥ १ ॥
राजा परिक्षिताने विचारले -
( अनुष्टुप् )
अनंत अपरा राम लीला अद्‌भुत त्याचिया ।
तयाचे आणखी काही कार्य ते ऐकु इच्छितो ॥ १ ॥

अहं - मी - अद्‌भुतकर्मणः अनन्तस्य अप्रमेयस्य रामस्य अन्यत् (चरितम्) - आश्चर्यजनक कर्मे करणार्‍या अविनाशी व निरुपम अशा बलरामाचे दुसरे चरित्र - भूयः श्रोतुम् इच्छामि - पुनः ऐकू इच्छितो - यत् अन्यत् (प्रभुः) कृतवान् - जे तो प्रभु करिता झाला ॥१॥
परीक्षित म्हणाला- अनंत, मनबुद्धीला न कळणार्‍या व अलौकिक कृत्ये करणार्‍या भगवान बलरामांनी आणखी जी काही अद्‍भूत कर्मे केली असतील, ती मी पुन्हा ऐकू इच्छितो. (१)


श्रीशुक उवाच -
नरकस्य सखा कश्चिद् द्विविदो नाम वानरः ।
सुग्रीवसचिवः सोऽथ भ्राता मैन्दस्य वीर्यवान् ॥ २ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
भौमाचा मित्र तो एक द्विविदो नाम वानर ।
सुग्रीवसचितो तोची बलवान् मैंद बंधु तो ॥ २ ॥

नरकस्य सखा - नरकासुराचा मित्र - कश्चित् द्विविदः नाम वानरः (आसीत्) - कोणी द्विविद नावाचा वानर होता - अथ - आणि - सः - तो - सुग्रीवसचिवः - सुग्रीवाचा प्रधान - मैन्दस्य - मैन्द नामक वानराचा - वीर्यवान् भ्राता (आसीत्) - पराक्रमी भाऊ होता ॥२॥
श्रीशुक म्हणाले- द्विविद नावाचा एक वानर होता. तो भौ‍मासुराचा मित्र, सुग्रीवाचा मंत्री आणि मैंदाचा शक्तिमान भाऊ होता. (२)


सख्युः सोऽपचितिं कुर्वन् वानरो राष्ट्रविप्लवम् ।
पुरग्रामाकरान् घोषान् अदहद् वह्निमुत्सृजन् ॥ ३ ॥
मारिला भौम कृष्णाने मित्रप्रेमार्थ तेधवा ।
गावे वने तशा वस्त्या जाळुनी भस्म हा करी ॥ ३ ॥

सख्युः अपचितिं कुर्वन् - मित्र जो नरकासुर त्याच्या ऋणाची फेड करणारा - सः वानरः - तो द्विविद वानर - राष्ट्रविप्लवं वह्निम् उत्सृजन् - देशाचा नाश होईल अशा रीतीने अग्नि पेटवून - पुरग्रामाकरान् घोषान् (च) अद्रहत् - नगरे, गाव, खाणी व गौळवाडे हे जाळून टाकिता झाला. ॥३॥
श्रीकृष्णांनी भौ‍मासुराला मारल्याचे त्याने ऐकले, तेव्हा त्याचा सूड घेण्यासाठी त्याने श्रीकृष्णांच्या राज्याला उपद्रव देण्यास सुरवात केली. तो वानर नगरे, गावे, खाणी आणि गवळ्यांच्या वस्त्यांना आगी लावून त्या जाळू लागला. (३)


क्वचित् स शैलानुत्पाट्य तैर्देशान् समचूर्णयत् ।
आनर्तान् सुतरामेव यत्रास्ते मित्रहा हरिः ॥ ४ ॥
गिरी फोडोनि विध्वंसी प्रांतच्या प्रांत नाशि हा ।
काठेवाडास नष्टी हा कृष्ण ज्या देशी राहिला ॥ ४ ॥

सः - तो द्विविद वानर - क्वचित् - एकदा - शैलान् उत्पाटय - पर्वत उपटून - तैः आनर्तान् देशान् सुतराम् एवं समचूर्णयत् - त्या पर्वतांनी आनर्तदेशांचे अगदी चूर्णच करिता झाला - यत्र - ज्या आनर्त देशात - मित्रहा हरिः आस्ते - मित्र जो नरकासुर त्याला मारणारा श्रीकृष्ण होता. ॥४॥
कधी कधी तो मोठमोठे पर्वत उखडून टाकून त्याने अनेक प्रदेशांचा चक्काचूर करीत असे आणि हे तो विशेष करून काठेवाडामध्ये करीत असे, कारण त्याच्या मित्राला मारणारे भगवान श्रीकृष्ण त्याच देशात राहत होते. (४)


क्वचित् समुद्रमध्यस्थो दोर्भ्यां उत्क्षिप्य तज्जलम् ।
देशान् नागायुतप्राणो वेलाकूले न्यमज्जयत् ॥ ५ ॥
दहाहजार हत्तींचे बळ त्या द्विविदा असे ।
समुद्री पोहता प्रांत तिरीचे जळि डुंबती ॥ ५ ॥

नागायुतप्राणः (सः) - दहा हजार हत्तींचे बळ असलेला तो द्विविद वानर - क्वचित् - एकदा - समुद्रमध्यस्थः - समुद्रामध्ये उभा राहिलेला असा - दोर्भ्यां तज्जलम् उत्क्षिप्य - दोन बाहूंनी ते समुद्रातील उदक वर उडवून - वेलाकूलान् देशान् अमज्जयत् - समुद्रकाठचे देश बुडविता झाला. ॥५॥
द्विविद वानराच्या अंगी दहा हजार हत्तींचे सामर्थ्य होते. तो दुष्ट कधी-कधी समुद्रात उभा राहून हाताने इतके पाणी उडवीट असे की, त्यामुळे समुद्राच्या काठावरील देश बुडून जात. (५)


आश्रमान् ऋषिमुख्यानां कृत्वा भग्नवनस्पतीन् ।
अदूषयत् शकृत् मूत्रैः अग्नीन् वैतानिकान् खलः ॥ ६ ॥
आश्रमी वृक्ष वेलिंची नासधूसहि तो करी ।
अग्निकुंडी मल मुत्रे अग्नि दूषितही करी ॥ ६ ॥

खलः - दुष्ट असा द्विविद - ऋषिमुख्यानां आश्रमान् भग्नवनस्पतीन् कृत्वा - मोठमोठया ऋषींचे आश्रम ज्यातील झाडे मोडून टाकिली आहेत असे करून - शकृन्मूत्रैः वैतानिकान् अग्नीन् अदूषयत् - विष्ठा व मूत्र यांनी यज्ञातील अग्नीना दूषित करिता झाला. ॥६॥
तो दुष्ट मोठमोठ्या मुनींच्या आश्रमांतील झाडे उपटून उध्वस्त करीत असे आणि त्यांनी यज्ञासाठी बांधलेल्या अग्निकुंडात मल-मूत्र टाकून तो अग्नी दूषित करीत असे. (६)


पुरुषान् योषितो दृप्तः क्ष्माभृद्द्रोणीगुहासु सः ।
निक्षिप्य चाप्यधाच्छैलैः पेशस्क्कास्कारीव कीटकम् ॥ ७ ॥
भृंगि जै अळि नेवोनी बिळात बंद तो करी ।
त्या परी पुरुषां स्त्रीया गुफेत बंद हा करी ॥ ७ ॥

दृप्तः सः - गर्विष्ठ असा तो द्विविदवानर - पुरुषान् योषितः च - पुरुष व स्त्रिया यांना - क्ष्माभृद्‌द्रोणीगुहासु - पर्वतांच्या दर्‍याखोर्‍यांमध्ये - पेशस्कारी कीटकम् इव निक्षिप्य - भ्रमर किडयाला ठेवितो त्याप्रमाणे ठेवून - शैलैः अप्यघात् - पाषाणांनी झाकून टाकी. ॥७॥
ज्याप्रमाणे कुंभारमाशी दुसर्‍या किड्यांना आणून आपल्या बिळात त्यांना डांबून टाकते, त्याचप्रमाणे तो मदोन्मत्त वानर स्त्रिया आणि पुरुषांना घेऊन जाऊन डोंगराच्या गुहांमध्ये डांबून त्यांना बाहेरून मोठमोठ्या शिळा लावून त्यांची तोंडे बंद करीत असे. (७)


एवं देशान् विप्रकुर्वन् दूषयंश्च कुलस्त्रियः ।
श्रुत्वा सुललितं गीतं गिरिं रैवतकं ययौ ॥ ८ ॥
त्रासवी नागरीकांना सतिंना भ्रष्ट तो करी ।
सुललीत पडे कानी रैवतक् पर्वताहुनी ।
म्हणोनी गीत ऐकाया गेला दुष्ट तिथे पहा ॥ ८ ॥

एवं - याप्रमाणे - देशान् विप्रकुर्वन् - देशांना त्रस्त करीत - कुलस्त्रियः च दूषयन् - आणि कुलीन स्त्रियांना भ्रष्ट करीत - सुललितं गीतं श्रुत्वा - अत्यंत मधुर गायन श्रवण करून - रैवतकं गिरिं ययौ - रैवतक पर्वतावर गेला. ॥८॥
तो अशा प्रकारे निरनिराळ्या ठिकाणच्या लोकांना त्रास देई. शिवाय कुलीन स्त्रियांनासुद्धा भ्रष्ट करीत असे. एके दिवशी तो दुष्ट मधुर संगीत ऐकून रैवतक पर्वतावर गेला. (८)


तत्रापश्यद् यदुपतिं रामं पुष्करमालिनम् ।
सुदर्शनीयसर्वाङ्गं ललनायूथमध्यगम् ॥ ९ ॥
तै पाही यदुरामाला अंग प्रत्यंग सुंदरा ।
कंजमाला असे कंठी स्त्रियात शोभला तसा ॥ ९ ॥

तत्र - तेथे - पुष्करमालिनं सुदर्शनीयसर्वाङगं - कमळांची माळ धारण केलेल्या व ज्याचे सर्व अवयव सुंदर आहेत अशा - ललनायूथमध्यगं - स्त्रीसमूहाच्या मध्ये असणार्‍या - यदुपतिं रामं अपश्यत् - यादवाधिपति बलरामाला पाहता झाला. ॥९॥
तेथे त्याने यदुश्रेष्ठ बलरामांना पाहिले. ते सर्वांगसुंदर असून त्यांनी कमळांची माळ गळ्यात घातली होती. त्यांच्या आजूबाजूला अनेक तरुणी होत्या. (९)


गायन्तं वारुणीं पीत्वा मदविह्वललोचनम् ।
विभ्राजमानं वपुषा प्रभिन्नमिव वारणम् ॥ १० ॥
वारुणी पिवुनी गातो मदविव्हल लोचने ।
मदमत्त गजा ऐसा शोभला बलराम तो ॥ १० ॥

गायन्तं - गाणार्‍या - वारुणीं पीत्वा मदविह्वललोचनं - वारुणी नावाचे मद्य पिऊन ज्याचे डोळे मदाने विव्हल झाले आहेत अशा - प्रभिन्नं वारणं इव - मत्त हत्तीप्रमाणे - वपुषा विभ्राजमानं - शरीराने शोभणार्‍या. ॥१०॥
मधुपान करून ते मधुर संगीत गात होते. त्यावेळी त्यांचे डोळे आनंदाने धुंद झाले होते. त्यांचे शरीर एखाद्या मदोन्मत्त हत्तीप्रमाणे शोभून दिसत होते. (१०)


दुष्टः शाखामृगः शाखां आरूढः कंपयन् द्रुमान् ।
चक्रे किलकिलाशब्दं आत्मानं संप्रदर्शयन् ॥ ११ ॥
दुष्ट वानर त्या वृक्षी बसोनी हालवी तसा ।
स्त्रियांच्या पुढती ठाके आनंदे चिरकोनिया ॥ ११ ॥

दुष्टः शाखामृगः - तो दुष्ट द्विविद वानर - शाखाम् आरुढः - फांदीवर चढून - द्रुमान् कंपयन् - झाडे हलवीत - आत्मानं संप्रदर्शयन् - स्वतःला दाखवीत - किलकिलाशब्दं चक्रे - किलकिल असा शब्द करिता झाला. ॥११॥
तो दुष्ट वानर झाडांच्या फांद्यांवर चढून त्या जोराने हलवीत आप्ले अस्तित्व दाखविण्यासाठी किलकिलाटही करीत असे. (११)


तस्य धार्ष्ट्यं कपेर्वीक्ष्य तरुण्यो जातिचापलाः ।
हास्यप्रिया विजहसुः बलदेवपरिग्रहाः ॥ १२ ॥
आवडे चंचळांना ते मजेने पाहु लागल्या ।
वानरी धैर्य पाहोनी हासले बलराम ते ॥ १२ ॥

जातिचापलाः हास्यप्रियाः - स्वभावतः चंचल व हास्यप्रिय अशा - बलदेवपरिग्रहाः तरुण्यः - बलरामाच्या त्या तरुण स्त्रिया - तस्य कपेः धार्ष्टयं वीक्ष्य - त्या वानराचा धीटपणा पाहून - विजहसुः - हसत्या झाल्या. ॥१२॥
स्वभावत:च चंचल आणि हसण्याची आवड असणार्‍या बलरामाच्या तरुण भार्या त्याच्या माकडचेष्टा पाहून खदखदा हसू लागल्या. (१२)


ता हेलयामास कपिः भूक्षेपैः संमुखादिभिः ।
दर्शयन् स्वगुदं तासां रामस्य च निरीक्षितः ॥ १३ ॥
बळी पुढे अता दुष्ट स्त्रियांना छेडु लागला ।
दाखवी गुद ते केंव्हा डोळ्यानें पालवी कधी ॥ १३ ॥

कपिः - द्विविद वानर - रामस्य निरीक्षतः - बलराम पहात असता - स्वगुदं तासां दर्शयन् - आपले गुदद्वार त्या स्त्रियांना दाखवित - भ्रूक्षेपैः संमुखादिभिः च - भुवया वाकड्या करणे व समोर उभे राहणे इत्यादि प्रकारांनी - ताः हेलयामास - त्यांची अवहेलना करिता झाला - प्रहरतां वरः बलः - प्रहर करणार्‍यांमध्ये श्रेष्ठ असा बलराम - क्रुद्धः ग्राव्णां तं प्राहरत् - रागावून दगडाने त्या वानरावर प्रहार करिता झाला ॥१३॥
आता तो वानर बलरामांच्या देखतच त्या स्त्रियांना पाहून समोरून जात, त्यांना आपला गुह्यभाग दाखवीत, तर कधी डोळे मिचकावीत त्यांची चेष्टा करू लागला. (१३)


तं ग्राव्णा प्राहरत् क्रुद्धो बलः प्रहरतां वरः ।
स वञ्चयित्वा ग्रावाणं मदिराकलशं कपिः ॥ १४ ॥
गृहीत्वा हेलयामास धूर्तस्तं कोपयन् हसन् ।
निर्भिद्य कलशं दुष्टो वासांस्यास्फालयद् बलम् ॥ १५ ॥
चेष्टा त्याच्या बघोनीया क्रोधले बलरामजी ।
द्विविदा मारिता दोंडा चुकवी अंग तेधवा ॥ १४ ॥
मधुघट कधी फोडी रामाला चिडवी असा ।
स्तिर्यांचे फाडिले वस्त्र बळीला हासु लागला ॥ १५ ॥

सः धूर्तः कपिः - तो लबाड वानर - ग्रावाणं वञ्चयित्वा - दगड चुकवून - मदिराकलशं गृहीत्वा - मद्याचे पात्र हिरावून घेऊन - तं कोपयन् हसन् - त्या बलरामाला राग आणीत व हसत - हेलयामास - अवहेलना करिता झाला ॥१४॥ दुष्टः सः - तो दुष्ट वानर - कलशं निर्भिद्य - मद्यपात्र फोडून टाकून - (स्त्रीणां) वासांसि आस्फालयत् - स्त्रियांची वस्त्रे फाडिता झाला - बलवान् मदिद्धतः (सः) - बलिष्ठ व मदोन्मत्त असा तो - (एवं) कदर्थीकृत्य विप्रचक्रे - याप्रमाणे त्या स्त्रियांना व बलरामाला तुच्छ लेखून अपकार करिता झाला ॥१५॥
ते पाहून वीरश्रेष्ठ बलरामांनी रागाने त्याला एक दगड फेकून मारला, परंतु तो चुकवून द्विविदाने झेप घालून त्याचा मधुकलश पळविला आणि तो बलरामांची खिल्ली उडवू लागला. नंतर त्या लबाड वानराने तो कलश फोडून वस्त्रेही फाडली. आणि कुचेष्टेने हसून बलरामांना तो चिडवू लागला. (१४-१५)


कदर्थीकृत्य बलवान् विप्रचक्रे मदोद्धतः ।
तं तस्याविनयं दृष्ट्वा देशांश्च तदुपद्रुतान् ॥ १६ ॥
क्रुद्धो मुसलमादत्त हलं चारिजिघांसया ।
द्विविदोऽपि महावीर्यः शालमुद्यम्य पाणिना ॥ १७ ॥
अभ्येत्य तरसा तेन बलं मूर्धन्यताडयत् ।
तं तु सङ्कर्षणो मूर्ध्नि पतन्तमचलो यथा ॥ १८ ॥
प्रतिजग्राह बलवान् सुनन्देनाहनच्च तम् ।
मूषलाहतमस्तिष्को विरेजे रक्तधारया ॥ १९ ॥
गिरिर्यथा गैरिकया प्रहारं नानुचिन्तयन् ।
पुनरन्यं समुत्क्षिप्य कृत्वा निष्पत्रमोजसा ॥ २० ॥
तेनाहनत् सुसङ्क्रुद्धः तं बलः शतधाच्छिनत् ।
ततोऽन्येन रुषा जघ्ने तं चापि शतधाच्छिनत् ॥ २१ ॥
बळीला तुच्छ मानी तो बळीही क्रोधले तये ।
शत्रु हा लक्ष्यिला त्यांनी दुर्दशा देशिची तशी ॥ १६ ॥
मुसळा नांगरी हाती आपुल्या घेतले असे ।
द्विवीद शक्तीमान् तैसा उपटी झाड शिंदिचे ॥ १७ ॥
रामाच्या मारण्या माथी पळता फेकिले असे ।
अविचल बळी राहा वृक्षाला धरिले करी ॥ १८ ॥
सुनंदमुसळे मारी बळी तो मर्कटास त्या ।
कपीचे फुटले डोके रक्तही वाहु लागले ॥ १९ ॥
गेरूचा धब्‌धबा जैसा कपी तो सजला तसा ।
डोकेही फुटता त्यान वेदना नच मानिता ॥ २० ॥
दुसरा उपटी वृक्ष बळीच्या अंगि फेकि तो ।
कित्येक फेकिता वृक्ष शतखंड करी बळी ॥ २१ ॥

तस्य तं अविनयं दृष्टवा - त्याचा तो द्वाडपणा पाहून - देशान् च तदुपद्रुतान् (दृष्टवा) - आणि देशांना त्याने पीडा दिली आहे असे पाहून - क्रुद्धः (सः) - रागावलेला तो बलराम - अरिजिघांसया - शत्रूला मारण्याच्या इच्छेने - मुसलं हलम् च आदत्त - मुसळ व नांगर हातात घेता झाला. ॥१६॥ महावीर्यः द्विविदः अपि - मोठा पराक्रमी द्विविद वानर सुद्धा - पाणिना शालम् उद्यम्य - हाताने ताडवृक्ष उपटून घेऊन - तरसा अभ्येत्य - वेगाने जवळ येऊन - तेन बलं मूर्धनि अताडयत् - त्या ताडवृक्षाने मस्तकावर ताडिता झाला. ॥१७॥ तु - परंतु - बलवान् संकर्षणः - बलिष्ट असा बलराम - यथा अचलः - जसा पर्वत स्थिर त्याप्रमाणे - मूर्घ्नि पतन्तं तं - मस्तकावर पडणार्‍या त्या ताडवृक्षाला - प्रतिजग्राह - धरिता झाला - च - आणि - सुनंदेन तम् अहनत् - सुनंद नामक मुसळाने त्या द्विविदाला ताडिता झाला. ॥१८॥ मुसलाहतमस्तिष्कः (सः) - मुसळाने ताडिला आहे मेंदु ज्याचा असा तो द्विविद - प्रहारं न अनुचिन्तयन् - बलरामाच्या प्रहाराला न जुमानता - यथा गैरिकया गिरिः - जसा कावेने पर्वत त्याप्रमाणे - रक्तधारया विरेजे - रक्ताच्या धारेने शोभला. ॥१९॥ पुनः अन्यं समुत्क्षिप्य - पुनः दुसरा ताडवृक्ष उपटून - ओजसा निष्पत्रं कृत्वा - आपल्या शक्तीने त्याची पाने नाहीशी करून - सुसंक्रुद्धः तेन (बलं) अहनत् - अत्यंत रागावून त्या ताडाने बलरामाला ताडिता झाला - बलः शतधा तं अच्छिनत् - बलराम त्या ताडाचे शेकडो तुकडे करिता झाला. ॥२०॥ ततः - नंतर - रुषा अन्येन जघ्ने - क्रोधाने दुसर्‍या ताडवृक्षाने ताडिता झाला - तं च अपि (बलः) शतधा अच्छिनत् - त्या ताडवृक्षालाहि बलराम शंभर प्रकारे तोडिता झाला २१॥
परीक्षिता ! जेव्हा अशा प्रकारे मदोन्मत्त बलवान द्विविद बलरामांना तुच्छ मानून त्यांची हेटाळणी करू लागला, तेव्हा त्यांनी त्याचा उर्मटपणा पाहून तसेच त्याने प्रदेशांची केलेली दुर्दशा पाहून त्याला मारण्याच्या हेतूने क्रोधाने आपला नांगर आणि मुसळ उचलले. द्विविदसुद्धा मोठा बलवान होता. त्याने एका हाताने सागवान उपटून मोठ्या वेगाने धावत जाऊन तो बलरामांच्या डोक्यावर मारला. पण बलरामांनी पर्वताप्रमाणे निश्चल राहून डोक्यावर पडणारा तो वृक्ष पकडला आणि आपल्या सुनंद नावच्या मुसळाने त्याच्यावर प्रहार केला. मुसळाच्या घावाने द्विविदाचे डोके फुटले आणि त्यातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. एखाद्या पर्वतावरून पातळ कावेची धार वाहात आहे असे ते दृश्य दिसू लागले. परंतु द्विविदाने आपले डोके फुटल्याची पर्वा केली नाही. अतिशय रागाने त्याने दुसरा एक वृक्ष उपटला. त्याची पाने-फांद्या तोडून टाकल्या आणि त्याचा बलरामांवर जोराने प्रहार केला. बलरामांनी त्याचे शेकडो तुकडे केले. (१६-२१)


एवं युध्यन् भगवता भग्ने भग्ने पुनः पुनः ।
आकृष्य सर्वतो वृक्षान् निर्वृक्षं अकरोद् वनम् ॥ २२ ॥
उपटी वृक्ष नी फेकी मारण्या झटतो तसा ।
वृक्षहीन असे झाले वन ते लढता तसे ॥ २२ ॥

एवं युद्धन् - याप्रमाणे युद्ध करीत - पुनः पुनः भगवता भग्ने भग्ने - पुनःपुनः भगवान बलरामाने ताडवृक्ष मोडमोडून टाकिले असता - सर्वतः वृक्षान् आकृष्य - सर्व बाजूंनी वृक्ष उपटून - तत् वनं - ते अरण्य - (द्विविदः) निर्वृक्षं अकरोत् - द्विविद वानर वृक्षरहित करिता झाला. ॥२२॥
अशा प्रकारे तो वानर त्यांच्याशी वृक्षांनी युद्ध करीतच राहिला. एक वुक्ष तोडल्यावर तो दुसरा वृक्ष उपटत असे. अशा तर्‍हेने सगळीकडचे वृक्ष उपटून त्याने सर्व वनच वृक्षहीन केले. (२२)


ततोऽमुञ्चच्छिलावर्षं बलस्योपर्यमर्षितः ।
तत्सर्वं चूर्णयामास लीलया मुसलायुधः ॥ २३ ॥
संपता वृक्ष ते सव चिडला बहु तो कपी ।
शिळांची करि तै वृष्टी बळी त्यां ठिकर्‍या करी ॥ २३ ॥

ततः अमर्षितः (सः) - नंतर रागावलेला तो द्विविद वानर - बलस्य उपरि शिलावर्षम् अमुञ्चत् - बलरामावर पाषाणाची वृष्टि करिता झाला - मुसलायुधा - मुसळ आहे आयुध ज्याचे असा बलराम - लीलया तत्सर्वं चूर्णयामास - लीलेने त्या सर्व पाषाणांचे चूर्ण करिता झाला. ॥२३॥
नंतर द्विविदाने संतापून बलरामांच्यावर दगडांचा वर्षाव सुरू केला. परंतु बलरामांनी मुसळाने त्या सर्व दगडांचा सहजपणे चक्काचूर केला. (२३)


स बाहू तालसङ्काशौ मुष्टीकृत्य कपीश्वरः ।
आसाद्य रोहिणीपुत्रं ताभ्यां वक्षस्यरूरुजत् ॥ २४ ॥
अंती ताडापरी बाहू मुष्टि बांधोनि धावला ।
झपाटे बळिला तैसा प्रहार छातिशी करी ॥ २४ ॥

कपीश्वरः सः - वानरश्रेष्ठ द्विविद - तालसंकाशौ बाहू मुष्टीकृत्य - ताडासारख्या दंडाच्या मुठी वळून - रोहिणीपुत्रं आसाद्य - बलरामावर चाल करून - ताभ्यां वक्षसि अरूरुजत् - त्या दोन्ही मुठींनी बलरामाच्या वक्षस्थळाला पीडा देता झाला. ॥२४॥
शेवटी कपिराज द्विविदाने आपल्या ताडाप्रमाणे लांब असलेल्या हाताच्या मुठींनी त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्या छातीवर प्रहार केले. (२४)


यादवेन्द्रोऽपि तं दोर्भ्यां त्यक्त्वा मुसललाङ्गले ।
जत्रावभ्यर्दयत्क्रुद्धः सोऽपतद् रुधिरं वमन् ॥ २५ ॥
क्रोधले बलरामो नी हाताने स्कंधि मारिता ।
ओकला कपि तो रक्त पडला धरणीवरी ॥ २५ ॥

यादवेन्द्रः अपि - यादवाधिपति बलराम सुद्धा - मुसललांगले त्यक्त्वा - मुसळ व नांगर टाकून देऊन - क्रुद्धः - रागावलेला असा - तं जत्रौ दोर्भ्यां अभ्यर्दयत् - त्या द्विविदाला मानेवर दोन बाहूंनी ताडिता झाला - सः रुधिरं वमन् अपतत् - तो द्विविद रक्त ओकत खाली पडला. ॥२५॥
तेव्हा यदुवंशशिरोमणी बलरामांनी नांगर आणि मुसळ बाजूला ठेवून अत्यंत रागाने दोन्ही हातांनी त्याच्या मानेवर प्रहार केला. त्यामुळे तो वानर रक्त ओकीत जमिनीवर पडला. (२५)


चकम्पे तेन पतता सटङ्कः सवनस्पतिः ।
पर्वतः कुरुशार्दूल वायुना नौरिवाम्भसि ॥ २६ ॥
वार्‍याने हालते नौका तसा हा पडता कपी ।
वृक्ष नी टेकड्या सारे कंपायमान जाहले ॥ २६ ॥

कुरुशार्दूल - हे कुरुश्रेष्ठा परीक्षित राजा - पतता तेन - पडणार्‍या त्या द्विविदामुळे - सवनस्पतिः सटंकः पर्वतः - वनस्पति व पाण्याची टाकी यांसह पर्वत - वायुना अंभसि नौः इव - वायूच्या योगे उदकामध्ये नौका हलते त्याप्रमाणे - चकम्पे - कापू लागला. ॥२६॥
परीक्षिता ! वादळ आल्यावर नाव जशी पाण्यात डगमगू लागते. त्याप्रमाणे त्याच्या पडण्याने वृक्ष आणि शिलाखंडांसह सगळा पर्वत डळमळू लागला. (२६)


जयशब्दो नमःशब्दः साधु साध्विति चाम्बरे ।
सुरसिद्धमुनीन्द्राणां आसीत् कुसुमवर्षिणाम् ॥ २७ ॥
लोक ते बोलले जय् जय् सिद्ध तैसे नमो नमः ।
ऋषी ते साधु साधू नी फुलांची वृष्टी जाहली ॥ २७ ॥

कुसुमवर्षिणां सुरसिद्धमुनीन्द्राणां - पुष्पाची वृष्टि करणार्‍या देव, सिद्ध व श्रेष्ठ ऋषि यांचा - अंबरे - आकाशात - जयशब्दः नमःशब्दः - जयजय व नमः नमः असा शब्द - साधु साधु इति च (शब्दः) - आणि वाहवा वाहवा असा मंगल शब्द - आसीत् - झाला. ॥२७॥
आकाशात देवता ’जय-जय’, सिद्ध लोक ’नमो नम:’ आणि मोठमोठे ऋषी ’साधु-साधु’ असे म्हणून बलरामांवर फुलांचा वर्षाव करू लागले. (२७)


एवं निहत्य द्विविदं जगद्व्यतिकरावहम् ।
संस्तूयमानो भगवान् जनैः स्वपुरमाविशत् ॥ २८ ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां दशमस्कन्धे उत्तरार्धे
द्विविदवधो नाम सप्तषष्टितमोऽध्यायः ॥ ६७ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
द्विवीद त्रासिले लोका म्हणोनी मारिता तया ।
द्वारकीं पातले राम प्रशंसा बहु जाहली ॥ २८ ॥
॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सदुसष्टावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

जगद्‌व्यतिकरावहं द्विविदं - जगाचा नाश करणार्‍या त्या द्विविद वानराला - एवं निहत्य - याप्रमाणे मारून - जनैः संस्तूयमानः भगवान् - लोकांकडून स्तविला जाणारा बलराम - स्वपुरम् आविशत् - आपल्या नगरीत शिरला. ॥२८॥ - सदुसष्ठावा अध्याय समाप्त
जगात उपद्रव माजविणार्‍या द्विविदाला अशा प्रकारे मारून भगवान द्वारकापुरीला परतले. त्यावेळी. सगळे नगरवासी त्यांची स्तुती करीत होते. (२८)


अध्याय सदुसष्ठावा समाप्त

GO TOP