|
श्रीमद् भागवत पुराण
पौण्ड्रककाशिराजयोर्वधः; स्वप्रयुक्तेनाभिचारागिना पौंड्रक आणि काशिराजाचा उद्धार - संहिता - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् ) नन्दव्रजं गते रामे करूषाधिपतिर्नृप । वासुदेवोऽहमित्यज्ञो दूतं कृष्णाय प्राहिणोत् ॥ १ ॥
श्रीशुकदेव सांगतात - ( अनुष्टुप् ) बलराम व्रजीं जाता करूषनृप पौंड्रक । दूत धाडोनि कृष्णाला कळवी वासुदेव मी ॥ १ ॥
नृप - हे राजा - रामे नंदव्रजं गते - बलराम नंदाच्या गोकुळात गेला असता - अज्ञः - ज्ञानहीन असा - करूषाधिपतिः - करूष देशाचा राजा पौंड्रक - अहं वासुदेवः इति - मी वासुदेव आहे असे म्हणून - कृष्णाय दूतं प्राहिणोत् - श्रीकृष्णाकडे दूत पाठविता झाला. ॥१॥
श्रीशुक म्हणता - परीक्षिता ! बलराम जेव्हा नंदबाबांच्या व्रजामध्ये गेले होते, तेव्हा इकडे करूष देशाचा अज्ञानी राजा पौंड्रक याने श्रीकृष्णांकडे एक दूत पाठवून असे कळविले की, "भगवान वासुदेव मी आहे." (१)
त्वं वासुदेवो भगवान् अवतीऋनो जगत्पतिः ।
इति प्रस्तोभितो बालैः मेन आत्मानमच्युतम् ॥ २ ॥
मूर्ख ते म्हणती त्याला तूचि श्रीवासुदेव तो । जन्मलो जग रक्षाया, मूर्ख तो समजे तसे ॥ २ ॥
त्वं जगत्पतिः भगवान् वासुदेवः अवतीर्णः - तू त्रैलोक्याधिपति भगवान वासुदेव अवतीर्ण झाला आहेस - इति बालैः प्रस्तोभितः (सः) - याप्रमाणे अज्ञानी लोकांनी चढविलेला तो - आत्मानं अच्युतं मेने - स्वतःला ईश्वर मानिता झाला. ॥२॥
मूर्ख लोक त्याला चिथावणी देत होते की, आपणच भगवान वासुदेव आहात आणि जगाचे रक्षण करण्यसाठी पृथ्वीवर अवतीर्ण झाला आहात. "त्यामुळे तो मूर्ख स्वत:लाच भगवान समजू लागला. (२)
दूतं च प्राहिणोन्मन्दः कृष्णायाव्यक्तवर्त्मने ।
द्वारकायां यथा बालो नृपो बालकृतोऽबुधः ॥ ३ ॥
मुलात खेळता बाळ राजाच्या परि वागतो । तसा लीला न जाणोनी द्वारकीं दूत धाडिला ॥ ३ ॥
च - आणि - यथा अबुधः बालः - ज्याप्रमाणे एखादा अज्ञ बालक - बालकृतः नृपः - मुलांनी केलेला खेळातला राजा - (तथा) मंदः (सः) - त्याप्रमाणे मंदबुद्धीचा तो पौंड्रक - द्वारकायां - द्वारकेत - अव्यक्तवर्त्मने कृष्णाय दूतं प्राहिणोत् - ज्याचा मार्ग कळण्यासारखा नाही अशा कृष्णाकडे दूत पाठविता झाला. ॥३॥
लहान मुले खेळताना ज्याप्रमाणे एखाद्या मुलाला राजा करतात आणि तो राजाप्रमाणे त्यांच्याशी वागू लागतो. त्याप्रमाणे मंदबुद्धी अज्ञानी पौंड्रकाने, अचिंत्यस्वरूप भगवान श्रीकृष्णांकडे द्वारकेला आपला दूत पाठविला. (३)
दूतस्तु द्वारकामेत्य सभायामास्थितं प्रभुम् ।
कृष्णं कमलपत्राक्षं राजसन्देशमब्रवीत् ॥ ४ ॥
दूत तो द्वारकीं आला बैसला त्या सभेत नी । कृष्णां कमलपत्राक्षां राजसंदेश बोलला ॥ ४ ॥
दूतः तु द्वारकाम् एत्य - दूत तर द्वारकेत येऊन - सभायाम् आस्थितं प्रभुं - सभेत बसलेल्या समर्थ अशा - कमलपत्राक्षं कृष्णं - कमळाच्या पानाप्रमाणे नेत्र असलेल्या कृष्णाला - राजसंदेशम् अब्रवीत् - राजाचा निरोप सांगता झाला. ॥४॥
पौंड्रकाचा दूत द्वारकेला आला आणि राजसभेत बसलेल्या कमलनयन भगवान श्रीकृष्णांना त्याने राजाचा निरोप सांगितला. (४)
वासुदेवोऽवतीर्नोऽहं एक एव न चापरः ।
भूतानामनुकम्पार्थं त्वं तु मिथ्याभिधां त्यज ॥ ५ ॥
एक मी वासुदेवो तो दुसरा नच की कुणी । उद्धारा जन्मलो मीच न मानी वासुदेव तू ॥ ५ ॥
अहम् एकः एव वासुदेवः भूतानां अनुकंपार्थं अवतीर्णः - मी एकटाच वासुदेव प्राण्यांवर दया करण्यासाठी अवतीर्ण झालो आहे - न च अपरः - आणि दुसरा कोणीहि नाही - त्वं तु मिथ्याभिधां त्यज - तू धारण केलेले खोटे नाव सोड. ॥५॥
मीच एकमात्र वासुदेव आहे. दुसरा कोणी नाही. प्राण्यांवर कृपा करण्यसाठी मीच अवतार धारण केला आहे. तू आपले वासुदेव असे खोटेच नाव घेतले आहेस. ते आता टाकून दे. (५)
यानि त्वमस्मच्चिह्नानि मौढ्याद् बिभर्षि सात्वत ।
त्यक्त्वैहि मां त्वं शरणं नो चेद् देहि ममाहवम् ॥ ६ ॥
मूर्खत्वे धारिशी चिन्ह् सोडोनी शरणार्थ ये । न जरी मानिशी तैसा युद्धा सामोरि ये असा ॥ ६ ॥
सात्वत - हे यादवा - त्वं मौढयात् यानि अस्मच्चिह्नानि बिभर्षि - तू मूर्खपणाने जी आमची चिन्हे धारण केली आहेस - (तानि) त्यक्त्वा - ती टाकून देऊन - त्वं मां शरणं एहि - तू मला शरण ये - नो चेत् मम आहवं देहि - नाहीतर माझ्याशी युद्ध कर. ॥६॥
हे यादवा ! तू मूर्खपणाने माझी चिन्हे धारण केली आहेस. ती टाकून मला शरण ये. नाहीतर माझ्याशी युद्ध कर." (६)
श्रीशुक उवाच -
कत्थनं तदुपाकर्ण्य पौण्ड्रकस्याल्पमेधसः । उग्रसेनादयः सभ्या उच्चकैर्जहसुस्तदा ॥ ७ ॥
श्रीशुकदेव सांगतात - मूढाचे ऐकता श्ब्द उग्रसेनादि वीर ते । मोठ्याने हासले सर्व प्पौंड्रका तेधवा नृपा ! ॥ ७ ॥
अल्पमेधसः पौंड्रकस्य - अल्पबुद्धीच्या पौंड्रक राजाचे - तत् कत्थनं उपाकर्ण्य - ते बडबडणे ऐकून - तदा - त्यावेळी - उग्रसेनादयः सभ्याः - उग्रसेनप्रमुख सभासद - उच्चकैः जहसुः - मोठयाने हसू लागले. ॥७॥
श्रीशुक म्हणतात- मंदबुद्धी पौंड्रकाची ही बडबड ऐकून उग्रसेन इत्यादी सभासद जोरजोराने हसू लागले. (७)
उवाच दूतं भगवान् परिहासकथामनु ।
उत्स्रक्ष्ये मूढ चिह्नानि यैस्त्वमेवं विकत्थसे ॥ ८ ॥ मुखं तदपिधायाज्ञ कङ्कगृध्रवटैर्वृतः । शयिष्यसे हतस्तत्र भविता शरणं शुनाम् ॥ ९ ॥
दूताला वदले कृष्ण सांग जा तुझिया नृपा । न त्यागी चक्र हे चिन्ह सोडील वधण्यास ते ॥ ८ ॥ जल्पसी ज्या बलाने ते पालथे मरतील नी । गिधाडे तोडिती तेंव्हा कुत्र्याला नमिती जसे ॥ ९ ॥
भगवान् - श्रीकृष्ण - परिहासकथाम् अनु - हास्यगोष्टी संपल्यानंतर - दूतं उवाच - दूताला म्हणाला - मूढ - हे मूर्ख पौंड्रका - त्वं यैः एवं विकत्थसे - तू ज्या कृत्रिम चिन्हांनी अशी बडबड करीत आहेस - (तानि) चिह्नानि उत्स्रक्ष्ये - ती चिन्हे टाकायला लावीन. ॥८॥ अज्ञ - हे मूर्खा - कङकगृध्रवटैः वृतः (त्वं) - कंक पक्षी, गिधाडे व वटवाघूळ यांनी वेढिलेला तू - तत् मुखं अपिधाय - ते आपले तोंड झाकून - तत्र हतः शयिष्यसे - तेथे मरून शयन करशील - शुनां शरणं भविता - कुत्र्यांचे आश्रयस्थान होशील. ॥९॥
त्या लोकांचे हसणे संपल्यावर भगवान श्रीकृष्ण दूताला म्हणाले - तू आपल्या राजाला सांग की, "अरे मूर्खा ! मी माझी चक्र इत्यादी चिन्हे तुझ्यावर व ज्या साथीदारांच्या चिथावणीवरून तू ही बडबड करीत आहेस, त्यांच्यावरही सोडीन. त्यावेळी हे मूर्खा ! तू आपले तोंड लपवून घार, गिधाड, होला, इत्यादी मांसभक्षण करणार्या पक्ष्यांच्या गराड्यात पडून राहाशील आणि कुत्र्यांना शरण जाशील." (८-९)
इति दूतस्तमाक्षेपं स्वामिने सर्वमाहरत् ।
कृष्णोऽपि रथमास्थाय काशीमुपजगाम ह ॥ १० ॥
भृत्य निर्भत्सना ऐके जाता स्वामीस बोलला । कृष्ण स्वार रथीं होता काशिदेशास घेरिले ॥ १० ॥
इति (कथितः) दूतः - असे सांगितला गेलेला दूत - सर्वं तदाक्षेपं स्वामिने आहरत् - कृष्णाचे सर्व निंदात्मक भाषण राजा पौंड्रकाला सांगता झाला - कृष्णः अपि - कृष्णसुद्धा - रथम् आस्थाय - रथात बसून - काशीम् उपजगाम ह - काशीला जाता झाला. ॥१०॥
दूताने भगवंतांचा हा रस्कारयुक्त निरोप पौंड्रकाला जसाच्या तसा सांगितला. इकडे श्रीकृष्णांनीसुद्धा रथावर स्वार होऊन काशीवर चढाई केली. (कारण तो राजा त्यावेळी मित्र असलेल्या काशिराजाजवळ राहात होता.) (१०)
पौण्ड्रकोऽपि तदुद्योगं उपलभ्य महारथः ।
अक्षौहिणीभ्यां संयुक्तो निश्चक्राम पुराद् द्रुतम् ॥ ११ ॥
आक्रमण बघोनियां पौंड्रका तो महारथी । दोन अक्षौहिणी सैन्य घेवोनी युद्धि पातला ॥ ११ ॥
महारथः पौंड्रकः अपि - महारथी पौंड्रकसुद्धा - तदुद्योगं उपलभ्य - त्या श्रीकृष्णाचा उद्योग जाणून - अक्षौहिणीभ्यां संयुक्तः - दोन अक्षौहिणी सैन्यासह - पुरात् द्रुतं निश्चक्राम - नगरातून तत्काळ बाहेर पडला. ॥११॥
भगवान श्रीकृष्णांनी आक्रमण केल्याची बातमी ऐकून महारथी पौंड्रकसुद्धा दोन अक्षौहिणी सेनेसह ताबडतोब नगराच्या बाहेर आला. (११)
तस्य काशीपतिर्मित्रं पार्ष्णिग्राहोऽन्वयान्नृप ।
अक्षौहिणीभिस्तिसृभिः अपश्यत् पौण्ड्रकं हरिः ॥ १२ ॥
काशिराज तया मागे तीन अक्षौहिणी सह । सहाय्या पातला तेंव्हा कृष्णे पौंड्रक पाहिला ॥ १२ ॥
नृप - हे राजा - तस्य मित्रं काशिपतिः तिसृभिः अक्षौहिणीभिः (सह) - त्याचा मित्र काशिपति तीन अक्षौहिणी सैन्य बरोबर घेऊन - पार्ष्णिग्राहः अन्वयात् - पाठिराखा म्हणून त्याच्या मागोमाग बाहेर पडला - हरिः पौंड्रकं अपश्यत् - श्रीकृष्ण पौंड्रकाला पहाता झाला. ॥१२॥
काशीचा राजा पौंड्रकाचा मित्र होता. म्हणून तो सुद्धा त्याला साहाय्य करण्यासाठी तीन अक्षौहिणी सेनेसह त्याच्या पाठोपाठ आला. परीक्षिता ! त्यावेळी श्रीकृष्णांनी पौंड्रकाला पाहिले. (१२)
शङ्खार्यसिगदाशार्ङ्ग श्रीवत्साद्युपलक्षितम् ।
बिभ्राणं कौस्तुभमणिं वनमालाविभूषितम् ॥ १३ ॥ कौशेयवाससी पीते वसानं गरुडध्वजम् । अमूल्यमौल्याभरणं स्फुरन्मकरकुण्डलम् ॥ १४ ॥ दृष्ट्वा तमात्मनस्तुल्यं वेषं कृत्रिममास्थितम् । यथा नटं रङ्गगतं विजहास भृशं हरीः ॥ १५ ॥
शंखचक्र गदा पद्म शार्ङ्ग श्रीवत्स चिन्हही । खोटाचि कौस्तुभो लेई गळ्यात वनमालही ॥ १३ ॥ ध्वजीं चिन्ह गरुडाचे पीतअंबर नेसला । अमूल्य मुकुटो तैसा मकराकार कुंडले ॥१४ ॥ मंचकी नट ये जैसा खोटा तो सजला तसा । पाहिनी सोंग ते कृष्ण हासला खद्खदोनिया ॥ १५ ॥
शङखार्यसिगदाशार्ङगश्रीवत्साद्युपलक्षितं - शंख, चक्र, तरवार, गदा, शार्ङग धनुष्य व श्रीवत्सादि चिन्हे यांनी युक्त अशा - कौस्तुभमणिं बिभ्राणं - कौस्तुभमणी धारण करणार्या - वनमालाविभूषितं - वनमालेने शोभणार्या - पीते कौशेयवाससी वसानं - पिवळी दोन रेशमी वस्त्रे धारण करणार्या - गरुडध्वजं - ज्याच्या ध्वजावर गरुडाचे चिन्ह आहे अशा - अमूल्यमौल्याभरणं - अमूल्य असा किरीट व अलंकार आहेत ज्याचे असा - स्फुरन्मकरकुण्डलं - तळपत आहेत मकराकार कुंडले ज्याच्या कानात अशा - यथा रङगगतं नटं - ज्याप्रमाणे रंगभूमीवर आलेला नट त्याप्रमाणे - कृत्रिमं आत्मनः तुल्यवेषं आस्थितं तं दृष्टवा - बनावट असा स्वतःसारखा वेष धारण केलेल्या त्याला पाहून - हरिः भृशं विजहास - श्रीकृष्ण अत्यंत हास्य करिता झाला. ॥१३-१५॥
पौंड्रकानेसुद्धा शंख, चक्र, तलवार, गदा, शाङ्र्गधनुष्य आणि श्रीवत्सचिन्ह इत्यादी धारण केले होते. त्याच्या छातीवर कौस्तुभमणी आणि गळ्यात वनमालासुद्धा होती. (१३) त्याने रेशमी पीतांबर परिधान केले होते आणि रथाच्या ध्वजावर गरुडचिन्हसुद्धा लावून ठेवले होते. त्याच्या मस्तकावर मौल्यवान मुगुट होता आणि कानांमध्ये मकराकृती कुंडले झगमगत होती. (१४) जशी एखाद्या नटाने रंगमंचावर वेषभूषा करावी, तशी आपल्यासारखीच त्याची कृत्रिम वेष-भूषा पाहून श्रीकृष्ण खदाखदा हसू लागले. (१५)
शुलैर्गदाभिः परिघैः शक्त्यृष्टिप्रासतोमरैः ।
असिभिः पट्टिशैर्बाणैः प्राहरन्नरयो हरिम् ॥ १६ ॥
शूला गदा परीघो नी शक्ती ऋष्टी नि तोमर । पट्टीश खड्ग नी बाण कृष्णासी फेकि शत्रु तो ॥ १६ ॥
अरयः - शत्रु - शूलैः गदाभिः परिघैः - त्रिशूळ, गदा, अर्गळा यांनी - शक्त्यृष्टिप्रासतोमरैः - शक्ति, ऋष्टि, भाला, तोमर यांनी - असिभिः पट्टिशैः बाणैः - तरवारी, पटटे व बाण यांनी - हरिं प्राहरन् - श्रीकृष्णावर प्रहार करिते झाले. ॥१६॥
आता शत्रूंनी श्रीकृष्णांवर त्रिशूल, गदा, मद्गर, शक्ती, ऋष्टी, प्रास, तोमर, तलवारी, पट्टिश आणि बाण या शस्त्रास्त्रांचा मारा केला. (१६)
( मिश्र )
कृष्णस्तु तत्पौण्ड्रककाशिराजयोः बलं गजस्यन्दनवाजिपत्तिमत् । गदासिचक्रेषुभिरार्दयद् भृशं यथा युगान्ते हुतभुक् पृथक् प्रजाः ॥ १७ ॥
( इंद्रवज्रा ) जाळी जसा तो प्रलयाग्नि प्राण्या तसेचि कृष्णो बहु शस्त्र सोडी । काशी तसे पौंड्रक या नृपाचे रथाश्व हत्ती बहु नष्ट झाले ॥ १७ ॥
कृष्णः तु - श्रीकृष्ण तर - पौंड्रककाशिराजयोः - पौंड्रक व काशिपति यांचे - गजस्यन्दनवाजिपत्तिमत् - हत्ती, रथ, घोडेस्वार व पायदळ असे चार प्रकारचे - तत् बलं - ते सैन्य - यथा हुतभुक् युगान्ते पृथक् प्रजाः - ज्याप्रमाणे अग्नि प्रलयकाळी सर्व प्रकारच्या प्राण्यांना त्रस्त करितो त्याप्रमाणे - गदासि चक्रेषुभिः - गदा, तरवार, सुदर्शनचक्र व बाण ह्या योगे - भृशं आर्दयत् - अत्यंत मर्दिता झाला. ॥१७॥
प्रलयाच्या वेळी ज्याप्रमाणे आग सर्व प्रकारच्या प्राण्यांना जाळून टाकते, त्याचप्रमाणे श्रीकृष्णांनीसुद्धा गदा, तलवार, चक्र आणि बाण या शस्त्रास्त्रांनी पौंड्रक व काशिराजाचे हत्ती, रथ, घोडे आणि पायदळ अशा चतुरंग सेनेला उध्वस्त केले. (१७)
आयोधनं तद् रथवाजिकुञ्जर
द्विपत्खरोष्ट्रैररिणावखण्डितैः । बभौ चितं मोदवहं मनस्विनां आक्रीडनं भूतपतेरिवोल्बणम् ॥ १८ ॥
ते उंट सारे खर माणसे ही प्रत्येक झाले शत खंड जैसे । तो भूतनाथो क्रिडला तिथे की उत्साहले वीर बघोनि यत्त्या ॥ १८ ॥
अरिणा अवखण्डितैः - सुदर्शनचक्राने तोडून टाकिलेल्या - रथवाजिकुञ्जरद्विपत्खरोष्ट्रैः चितं - रथ, घोडे, हत्ती, मनुष्ये, गाढव, उंट ह्यांनी भरलेले - तत् आयोधनं - ते युद्धस्थान - भूतपतेः उल्बणं आक्रीडनम् इव - शंकराचे भयंकर क्रीडांगणच की काय असे - मनस्विनां मोदवहं बभौ - शूर पुरुषांना आनंद देणारे असे शोभले. ॥१८॥
ती रणभूमी, भगवंतांच्या चक्राने तुकडे तुकडे झालेल्या रथ, घोडे, हत्ती, सैनिक, गाढवे आणि उंटांनी भरून गेली. त्यावेळी असे वाटत होते की, जणू भूतनाथ शंकरांचे ते भयानक क्रीडास्थळच आहे. ते पाहून शूरांचा उत्साह अधिकच वाढत गेला होता. (१८)
( अनुष्टुप् )
अथाह पौण्ड्रकं शौरिः भो भो पौण्ड्रक यद्भवान् । दूतवाक्येन मामाह तान्यस्त्रण्युत्सृजामि ते ॥ १९ ॥
( अनुष्टुप् ) पौंड्राला वदले कृष्ण वदसी सोड चिन्ह हे । सोडितो चक्र हे आता अन्यही शस्त्र हे तसे ॥ १९ ॥
अथ शौरिः पौंड्रकं आह - नंतर श्रीकृष्ण पौंड्रकाला म्हणाला - भो भो पौंड्रक - हे हे पौंड्रक - यत् भवान् दूतवाक्येन माम् आह - जे तू दूताकडून मला बोललास - तानि अस्राणि ते उत्सृजामि - ती अस्त्रे तुझ्या अंगावर सोडतो. ॥१९॥
भगवान श्रीकृष्ण पौंड्रकाला म्हणाले, " ए, पौंड्रका ! तू दूताद्वारे मला जी चिन्हे सोडून द्यायला सांगितली होतीस, ती मी आता तुझ्यावर सोडतो." (१९)
त्याजयिष्येऽभिधानं मे यत्त्वयाज्ञ मृषा धृतम् ।
व्रजामि शरनं तेऽद्य यदि नेच्छामि संयुगम् ॥ २० ॥
खोटेचि घेशी तू नाम नाव ते काढितो तुझे । वाचला तर तू येतो तुजसी शरणार्थ मी ॥ २० ॥
अज्ञ - हे मूढा - यत् त्वया मे अभिधानं मृषा धृतं - जे तू माझे नाव खोटेपणाने धारण केले आहेस - (तत् त्वया) त्याजयिष्ये - ते तुझ्य़ाकडून टाकवीन - यदि संयुगं न इच्छामि - जर मला युद्ध करण्याची इच्छा नसेल - (तर्हि) अद्य ते शरणं व्रजामि - तर आज तुला शरण येईन. ॥२०॥
तू जे खोटेच माझे नाव धारण केले आहेस, तेही मूर्खा ! आता तुला सोडायला भाग पाडतो. आणि जर मी तुझ्याशी युद्ध करू शकलो नाही, तर तुला शरणही येतो. (२०)
इति क्षिप्त्वा शितैर्बाणैः विरथीकृत्य पौण्ड्रकम् ।
शिरोऽवृश्चद् रथाङ्गेन वज्रेणेन्द्रो यथा गिरेः ॥ २१ ॥
कृष्णाने सोडिता बाण रथ तो मोडला असे । चक्राने छेदिले शीर इंद्र जै गिरि छेदितो ॥ २१ ॥
इति क्षिप्त्वा - अशा रीतीने निंदा करून - शितैः बाणैः पौंड्रकं विरथीकृत्य - तीक्ष्ण बाणांनी पौंड्रकाला रथविहिन करून - यथा इन्द्रः वज्रेण गिरः (शिरः) - जसा इंद्र वज्राने पर्वताचे शिखर त्याप्रमाणे - रथाङगेन (तस्य) शिरः अवृश्चत् - चक्राच्या योगे त्याचे मस्तक तोडिता झाला.॥२१॥
श्रीकृष्णांनी त्याला अशा प्रकारे खडसावून तीक्ष्ण बाणांनी त्याच्या रथाचे तुकडे केले आणि जसे इंद्राने वज्राने पर्वताचे शिखर उडवावे तसे चक्राने त्याचे मस्तक उडविले. (२१)
तथा काशीपतेः कायात् शिर उत्कृत्य पत्रिभिः ।
न्यपातयत् काशीपुर्यां पद्मकोशमिवानिलः ॥ २२ ॥
तसेचि काशिराजाचे शीर छेदोनिया पुरा । फेकिले कमळा जैसा वारा तोडोनि फेकितो ॥ २२ ॥
तथा पत्रिभिः काशिपतेः कायात् शिरः उत्कृत्य - त्याचप्रमाणे बाणांनी काशिपतीच्या शरीरापासून मस्तक उपटून काढून - अनिलः पद्मकोशम् इव - वायु जसा कमळाच्या कळ्याला दूर नेतो त्याप्रमाणे - काशिपुर्यां न्यपातयत् - काशीनगरीत पाडिता झाला. ॥२२॥
तसेच जशी वार्याने कमळाची कळी जमिनीवर पाडवी, त्याप्रमाणे भगवंतांनी आपल्या बाणांनी काशी-नरेशाचे मस्तक धडावरून उडवून काशीपुरीत टाकले. (२२)
एवं मत्सरिणं हत्वा पौण्ड्रकं ससखं हरिः ।
द्वारकामाविशत् सिद्धैः गीयमानकथामृतः ॥ २३ ॥
या परी ढोंगी तो पौंड्रक काशिराजा सख्यासही । मारता पातला कृष्ण सिद्ध गाती कथामृता ॥ २३ ॥
सिद्धैः गीयमानकथामृतः हरिः - सिद्धांनी ज्याच्या अमृतासारख्या कथा गायिल्या आहेत असा श्रीकृष्ण - एवं मत्सरिणं ससखं पौंड्रकं हत्वा - याप्रमाणे द्वेष करणार्या त्या पौंड्रकाला मित्रासह मारून - द्वारकाम् आविशत् - द्वारकेत शिरला. ॥२३॥
अशा प्रकारे आपला द्वेष करणार्या पौंड्रकाला आणि त्याचा मित्र काशिराज याला मारून श्रीकृष्ण द्वारकेला परतले. त्यावेळी सिद्धगण भगवंतांच्या अमृतमय कथांचे गायन करीत होते. (२३)
स नित्यं भगवद्ध्यान प्रध्वस्ताखिलबन्धनः ।
बिभ्राणश्च हरे राजन् स्वरूपं तन्मयोऽभवत् ॥ २४ ॥
परीक्षित् पौंड्रके राये वेष घेवोनि चिंतिले । ध्यासाने स्मरिले राय सारुप्य मिळले तया ॥ २४ ॥
राजन् - हे राजा - नित्यं भगवद्ध्यानप्रध्वस्ताखिलबन्धनः - नेहमी भगवंताचे चिंतन केल्यामुळे ज्याची सर्व बंधने तुटून गेली आहेत असा - च हरेः स्वरूपं बिभ्राणः - आणि श्रीकृष्णासारखे स्वरूप धारण करणारा - सः - तो पौंड्रक - तन्मयः अभवत् - श्रीकृष्णमय झाला. ॥२४॥
परीक्षिता ! पौंड्रक भगवंतांच्या रूपाचे नेहेमी चिंतन करीत असे. यामुळे त्याची सर्व बंधने गळून पडली. भगवंतांसारखा वेषही तो धारण करीत असे. त्यामुळे तो भगवंतांच्या सारुप्याला जाऊन मिळाला. (२४)
शिरः पतितमालोक्य राजद्वारे सकुण्डलम् ।
किमिदं कस्य वा वक्त्रं इति संशिशिरे जनाः ॥ २५ ॥
काशीत राजद्वाराशी मंडीत शिर पाहता । संदेहे पाहती सर्व, कोणाचे शिर हे असे ॥ २५ ॥
जनाः - लोक - राजद्वारे पतितं सकुण्डलं शिरः आलोक्य - राजवाडयाच्या दरवाज्याजवळ पडलेले कुंडलांसहित मस्तक अवलोकन करून - किम् इदं वा कस्य वक्त्रं - हे काय आहे किंवा हे कोणाचे शिर आहे - इति संशयिरे - अशा संशयात पडले. ॥२५॥
इकडे काशीनगरात राजमहालाच्या दरवाजावर एक कुंडले असलेले मस्कत पडल्याचे पाहून लोक विचार करू लागले की, हे काय आहे ? हे कोणाचे मस्तक आहे ? (२५)
राज्ञः काशीपतेर्ज्ञात्वा महिष्यः पुत्रबान्धवाः ।
पौराश्च हा हता राजन् नाथ नाथेति प्रारुदन् ॥ २६ ॥
कळता रडल्या राण्या लोकही रडले तसे । हाय हाय नृपा नाथा आमुचा सर्व नाश हा ॥ २६ ॥
(इदं) काशिपतेः राज्ञः (शिरः) - हे काशिपति राजाचे मस्तक - (इति) ज्ञात्वा - असे जाणून - महिष्यः पुत्रबान्धवाः पौराः च - राजस्त्रिया, राजपुत्र, राजबांधव व नागरिक लोक - हा हताः (स्मः) - अरेरे आमचा घात झाला - राजन् नाथ नाथ इति प्रारुदन् - हे राजा, आमचे मनोरथ पूर्ण करणार्या नाथा, नाथा असे म्हणून रडू लागले. ॥२६॥
ते काशीनरेशाचे मस्तक आहे, असे जेव्हा समजले, तेव्हा त्याच्या राण्या, पुत्र, बांधव तसेच नागरिक हे नाथ ! हे राज ! हाय ! हाय ! आमचा सर्वनाश झाला, असे म्हणून मोठ्याने रडू लागले. (२६)
सुदक्षिणस्तस्य सुतः कृत्वा संस्थाविधिं पितुः ।
निहत्य पितृहन्तारं यास्याम्यपचितिं पितुः ॥ २७ ॥ इत्यात्मनाभिसन्धाय सोपाध्यायो महेश्वरम् । सुदक्षिणोऽर्चयामास परमेण समाधिना ॥ २८ ॥
सुदक्षणे तयेपुत्रे अंत्येष्ठी करुनी पुन्हा । मनात ठरवी ऐसे मारीन पितृघातकी ॥ २७ ॥ एकाग्रे शंकरा त्याने आचार्या घेउनी सवे । आराधिले मनी हेतू कृष्णाला मारितोच मी ॥ २८ ॥
तस्य सुतः सुदक्षिणः - त्या काशिराजाचा पुत्र सुदक्षिण - पितुः संस्थाविधिं कृत्वा - पित्याचा और्ध्वदेहिक संस्कार करून - पितृहन्तारं निहत्य - पित्याला मारणाराला मारून - पितुः अपचितिं यास्यामि - पित्याच्या ऋणातून मुक्त होईन. ॥२७॥ इति आत्मना अभिसंधाय - याप्रमाणे आपल्या मनाशी ठरवून - सोपाध्यायः सुदक्षिणः - उपाध्यायासह तो सुदक्षिण - परमेण समाधिना - एकाग्र समाधीच्या योगाने - महेश्वरं अर्चयामास - शंकराला पूजिता झाला. ॥२८॥
त्याचा सुदक्षिण नावाचा पुत्र होता. त्याने पित्याचे अंत्येष्टि संस्कार करून मनोमन निश्चय केला की, आपल्या पित्याच्या वध करणार्याला मारूनच मी पित्याच्या ऋणातून मुक्त होईन. असे ठरवून तो आपल्या कुलपुरोहितांसह एकाग्रतेने भगवान शंकरांची आराधना करू लागला. (२७-२८)
प्रीतोऽविमुक्ते भगवांन् तस्मै वरमदाद् भवः ।
पितृहन्तृवधोपायं स वव्रे वरमीप्सितम् ॥ २९ ॥
वर माग तुझा काय ? प्रसन्ने शिव बोलता । मारण्या पितृघाती तो उपाय सांगणे म्हणे ॥ २९ ॥
भगवान् भवः - भगवान शंकर - अविमुक्ते - काशीक्षेत्रामध्ये - प्रीतः - प्रसन्न होऊन - तस्मै वरं अदात् - त्याला वर देऊ लागला - सः पितृहन्तृवधोपायं - तो सुदक्षिण पित्याला मारणार्याचा नाश करण्याचा उपाय हा - ईप्सितं वरं वव्रे - इष्ट वर मागता झाला. ॥२९॥
काशी नगरीमध्ये त्याच्या आराधनेने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्याला वर मागण्यास सांगितले. सुदक्षिणाने आपल्या पित्याचा वध करणार्याला मारण्याचा उपाय सांगा, असा इच्छित वर मागितला. (२९)
दक्षिणाग्निं परिचर ब्राह्मणैः सममृत्विजम् ।
अभिचारविधानेन स चाग्निः प्रमथैर्वृतः ॥ ३० ॥ साधयिष्यति सङ्कल्पं अब्रह्मण्ये प्रयोजितः । इत्यादिष्टस्तथा चक्रे कृष्णायाभिचरन् व्रती ॥ ३१ ॥
वएदले शिव ते त्याला ब्राह्मणासह यज्ञि तो । ऋत्विग्भूता यजावे नी दक्षिणागीत तो तशा । अभिचार विधीनेच साध्य हेतूहि होय तो ॥ ३० ॥ असावा द्विज द्वेष्टा तो संकल्प साध्य होतसे । तेणे केला विधी सर्व शत्रुमारण याग हा ॥ ३१ ॥
ब्राह्मणैः समं - ब्राह्मणांसह - अभिचारविधानेन - जारण, मारण, उच्चाटन अशा विधीने - ऋत्विजं दक्षिणाग्निं परिचर - ऋत्विज नाव धारण करणारा जो दक्षिणाग्नि त्याचे पूजन कर - सः अग्निः च - आणि तो दक्षिणाग्नि - प्रमथैः वृतः - प्रमथादि क्रूर गणांसहित - अब्रह्मण्ये प्रयोजितः - दुष्कृत्यांच्या ठिकाणी योजिला असता - (तव) संकल्पं साधयिष्यति - तुझे मनोरथ पूर्ण करील - इति आदिष्टः - अशा रीतीने उपदेशिलेला - कृष्णाय अभिचरन् व्रती - कृष्णाला मारण्यासाठी मारणविधीचे अनुष्ठान करून व्रत करणारा तो - तथा चक्रे - तसे करता झाला. ॥३०-३१॥
भगवान शंकर म्हणाले, "तू ब्राह्मणांसह यज्ञदेवता ऋत्विजस्वरूप दक्षिणाग्नीची आभिचारिक विधीने आराधना कर. यामुळे तो अग्नी प्रमथगणांसह प्रगट होईल व तू जर ब्राह्मणांचे भक्त नसणार्यांवर त्याचा प्रयोग करशील, तर तो तुझा संकल्प सिद्धीला नेईल." असे सांगितल्यावर सुदक्षिण श्रीकृष्णांना मारण्यासाठी नियमपूर्वक अनुष्ठान करू लागला. (३०-३१)
ततोऽग्निरुत्थितः कुण्डान् मूर्तिमानतिभीषणः ।
तप्तताम्रशिखाश्मश्रुः अङ्गारोद्गारिलोचनः ॥ ३२ ॥
होता पूर्ण अभीचार प्रकटे अग्निदेवता । तप्त तांब्यावरी केश मिशा दाढी नि नेत्र ते ॥ ३२ ॥
ततः - नंतर - अतिभीषणः - अत्यंत भयंकर - तप्तताम्रशिखश्मश्रुः - ज्याची शेंडी व दाढीमिशी तापलेल्या तांब्याप्रमाणे लाल आहे असा - अंगारोद्गारिलोचनः - ज्याच्या नेत्रांतून झळझळीत ज्वाळा बाहेर पडत आहेत असा - मूर्तिमान् अग्निः - प्रत्यक्ष अग्नि - कुण्डात् उत्थितः - कुंडातून वर आला ॥३२॥
अनुष्ठान पूर्ण होताच यज्ञकुंडातून अतिशय भीषण असा अग्नी मूर्तिमंत होऊन प्रगट झाला. त्याचे केस आणि दाढी-मिशा तापलेल्या तांब्याप्रमाणे लाल होत्या. डोळ्यांतून ज्वाळा बाहेर पडत होत्या. (३२)
दंष्ट्रोग्रभ्रुकुटीदण्ड कठोरास्यः स्वजिह्वया ।
आलिहन् सृक्वणी नग्नो विधुन्वन् त्रिशिखं ज्वलत् ॥ ३३ ॥
भ्रुकुटी उग्र नी तेढ्या जिभल्या चाटितो असा । नागवा फिरवी शूळ तयात अग्नि तो निघे ॥ ३३ ॥
दंष्ट्रोग्रभ्रुकुटीदंडकठोरास्यः - दाढांनी व भयंकर यष्टीसारख्या लांब भृकुटींनी ज्याचे मुख क्रूर दिसत आहे असा - स्वजिह्वया सृक्किणी आलिहन् - आपल्या जिभेने ओठांच्या बाहेरचा भाग चाटणारा - नग्नः ज्वलत् त्रिशिखं विधुन्वन् - नग्न व पेटता त्रिशूळ फिरविणारा ॥३३॥
उग्र दाढा आणि चढवलेल्या भुवयांमुळे त्याच्या तोंडातून जणू क्रूरताच बाहेर पडत होती. तो आपल्या जिभेने तोंडाची दोन्ही टोके चाटीत होता. तो उघडाबंब असून त्याने हातात पेटता त्रिशूळ घेतला होता आणि तो वारंवार फिरवीत होता. (३३)
पद्भ्यां तालप्रमाणाभ्यां कम्पयन् अवनीतलम् ।
सोऽभ्यधावद् वृतो भूतैः द्वारकां प्रदहन् दिशः ॥ ३४ ॥
ताडाच्या परि ते पाय चालता भूमिकंप हो । क्षणात द्वारकीं आला सवे कित्येक भूत ते ॥ ३४ ॥
भूतैः वृतः सः - भूतगणांनी वेष्टिलेला तो अग्नि - तालप्रमाणाभ्यां पद्भ्यां अवनीतलं कम्पयन् - ताडासारख्या पायांनी पृथ्वीला कापवीत - दिशः प्रदहन् द्वारकां अभ्यधावत् - दिशांना जाळीत द्वारकेकडे धावला ॥३४॥
त्याचे पाय ताडाच्या झाडाप्रमाणे लांब होते. त्याच्या चालण्याने जमीन हादरत होती आणि ज्वाळांनी आजूबाजूचा प्रदेश दग्ध करीत तो पुष्कळ भूतांसह द्वारकेजवळ जाऊन पोहोचला. (३४)
तं आभिचारदहनं आयान्तं द्वारकौकसः ।
विलोक्य तत्रसुः सर्वे वनदाहे मृगा यथा ॥ ३५ ॥
जंगला लागता आग हरिणे पळती जशी । तसे ते द्वारकावासी भिवोनी धावु लागले ॥ ३५ ॥
सर्वे द्वारकौकसः - सर्व द्वारकावासी जन - आयान्तं तं आभिचारदहनं विलोक्य - येणार्या त्या लोकनाशक अग्नीला पाहून - यथा वनदाहे मृगाः - जसे अरण्य जळू लागले असता हरिणादि पशु त्याप्रमाणे - तत्रसुः - घाबरले ॥३५॥
ती आभिचारिक आग अगदी जवळ आल्याचे पाहून, जंगलाला आग लागल्यानंतर जसे पशू भयभीत होतात, त्याप्रमाणे द्वारकेतील लोक भयभीत झाले. (३५)
अक्षैः सभायां क्रीडन्तं भगवन्तं भयातुराः ।
त्राहि त्राहि त्रिलोकेश वह्नेः प्रदहतः पुरम् ॥ ३६ ॥
कृष्णाच्यापाशि ते आले वदले रक्ष तू अम्हा । नगरा लागली आग सर्वची भस्म होतसे ॥ ३६ ॥
भयातुराः - भीतीने व्याकुळ झालेले लोक - सभायां अक्षैः क्रीडन्तं भगवन्तं (आगत्य) - सभेत फाशांनी खेळणार्या श्रीकृष्णाजवळ येऊन - त्रिलोकेश - हे त्रैलोक्याधिपते कृष्णा - पुरं प्रदहतः वन्हेः त्राहि त्राहि - नगरीला जाळणार्या अग्नीपासून आमचे रक्षण कर ॥३६॥
ते लोक भयभीत होऊन भगवंतांच्याकडे आले. भगवान त्यावेळी सभेमध्ये द्यूत खेळत होते. त्यांनी भगवंतांना प्रार्थना केली, "हे त्रैलोक्यनाथा ! वाचवा. नगर जाळणार्या या आगीपासून आमचे रक्षण करा." (३६)
श्रुत्वा तज्जनवैक्लव्यं दृष्ट्वा स्वानां च साध्वसम् ।
शरण्यः संप्रहस्याह मा भैष्टेत्यवितास्म्यहम् ॥ ३७ ॥
कृष्ण तो स्वजना पाही प्रार्थिती ओरडोनिया । हासुनी वदला त्यांना न भ्यावे रक्षितो तुम्हां ॥ ३७ ॥
शरण्यः (सः) - शरणागतांचे रक्षण करणारा तो श्रीकृष्ण - तत् जनवैक्लव्यं श्रुत्वा - लोकांचे ते संकट ऐकून - स्वानां च साध्वसं दृष्ट्वा - व स्वकीयांचे भय पाहून - मा भैष्ट इति संप्रहस्य आह - भिऊ नका असे किंचित् हसून म्हणाला - अहं अवितास्मि - मी रक्षण करीन ॥३७॥
स्वजन भयभीत झालेले पाहून व त्यांचा आक्रोश ऐकून शरणागतवत्सल भगवंत हसून म्हणाले- " घाबरू नका. मी तुमचे रक्षण करीन." (३७)
सर्वस्यान्तर्बहिःसाक्षी कृत्यां माहेश्वरीं विभुः ।
विज्ञाय तद्विघातार्थं पार्श्वस्थं चक्रमादिशत् ॥ ३८ ॥
अंतर्बाह्य असा ज्ञाता ऐशा कृत्त्येस जाणता । सुदर्शणास आज्ञापी प्रतिकार करावया ॥ ३८ ॥
सर्वस्य अन्तर्बहिःसाक्षी विभुः - सर्वांच्या हृदयांतील व बाह्य प्रदेशातील प्रत्येक गोष्ट साक्षीरूपाने पहाणारा श्रीकृष्ण - माहेश्वरीं कृत्यां विज्ञाय - शंकराने निर्माण केलेली ही लोकविनाशक कृत्या आहे असे जाणून - तद्विघातार्थं पार्श्वस्थं चक्रम् आदिशत् - त्या कृत्येच्या नाशार्थ जवळ असणार्या सुदर्शनचक्राला आज्ञा देता झाला ॥३८॥
सर्वांचे अंतर्बाह्य साक्षी असलेल्या भगवंतांनी ही माहेश्वरी कृत्या आहे, हे जाणून तिचा प्रतिकार करण्याची आपल्याजवळव असलेल्या सुदर्शन चक्राला आज्ञा केली. (३८)
( मिश्र )
तत्सूर्यकोटिप्रतिमं सुदर्शनं जाज्वल्यमानं प्रलयानलप्रभम् । स्वतेजसा खं ककुभोऽथ रोदसी चक्रं मुकुन्दास्त्रं अथाग्निमार्दयत् ॥ ३९ ॥
( इंद्रवज्रा ) जाज्वल्य अग्नी जणु कोटि सूर्य सुदर्शना या हरि सोडि तेंव्हा । आकाश दाही दिशिचहि सारा ठेचोनि काढी अभिचार अग्नी ॥ ३९ ॥
अथ - नंतर - सूर्यकोटिप्रतिमं - कोट्यवधि सूर्याप्रमाणे प्रखर - जाज्वल्यमानं प्रलयानलप्रभं - अत्यंत चकचकणारे, प्रलयाग्नीप्रमाणे तेजस्वी असे - स्वतेजसा खं ककुभः अथ रोदसी (प्रकाशयत्) - आपल्या तेजाने आकाश, दिशा, त्याचप्रमाणे स्वर्ग व भूमी ह्यांना प्रकाशित करणारे - मुकुंदास्त्रं - श्रीकृष्णाचे मुख्य अस्त्र - तत् सुदर्शनं चक्रं अग्निम् आर्दयत् - ते सुदर्शनचक्र अग्नीला त्रासून सोडिते झाले ॥३९॥
भगवान मुकुंदांचे अस्त्र सुदर्शन चक्रकोट्यवधी सूर्यांप्रमाणे तेजस्वी आणि प्रलयकालीन अग्नीप्रमाणे धगधगणारे होते. त्याच्या तेजाने आकाश, दिशा आणि अंतरिक्ष उजळून निघाले आणि त्याने अभिचार- अग्नीला निस्तेज केले. (३९)
( वसंततिलका )
कृत्यानलः प्रतिहतः स रथाङ्गपाणेः अस्त्रौजसा स नृप भग्नमुखो निवृत्तः । वाराणसीं परिसमेत्य सुदक्षिणं तं सर्त्विग्जनं समदहत् स्वकृतोऽभिचारः ॥ ४० ॥
( वसंततिलका ) अस्त्रो सुदर्शन करी बहुमान ऐसा थोबाद फूट फुटुनी हततेज कृत्या । काशीत ती परतली उलटोनिं येता जाळीयलाचि नृपती गुरुही तसाची ॥ ४० ॥
नृप - हे राजा - सः कृत्यानलः - लोकांचा नाश करणारा तो कृत्याग्नि - रथाङ्गपाणेः अस्त्रौजसा प्रतिहतः - चक्रपाणि श्रीकृष्णाच्या अस्त्रप्रभावाने पराजित झाला - सः भग्नमुखः निवृत्तः - तो अग्नि तोंड फुटल्यासारकखा तेथून परत फिरला - वाराणसीं परिसमेत्य - काशीक्षेत्रात येऊन - सर्त्विग्जनं तं सुदक्षिणं - ऋत्विजांसह त्या सुदक्षिणाला - समदहत् - जाळून टाकिता झाला - (सः) अभिचारः स्वकृतः (एव) - हा नाश त्याने स्वतःच करून घेतलेला होय ॥४०॥
भगवान श्रीकृष्णांचे अस्त्र (असलेल्या) सुदर्शन चक्राच्या शक्तीने कृत्यारूप आगीचे मुख छिन्न-विछिन्न झाले. तिचे तेज नष्ट झाले, शक्ती कुंठित झाली आणि ती तेथून परतून काशीला आली व तिने ऋत्विज-आचार्यांसह सुदक्षिणाला जाळून भस्म केले. अशा प्रकारे त्याचा अभिचार त्याच्याच विनाशाला कारणीभूत ठरला. (४०)
( मिश्र )
चक्रं च विष्णोस्तदनुप्रविष्टं वाराणसीं साट्टसभालयापणाम् । सगोपुराट्टालककोष्ठसङ्कुलां सकोशहस्त्यश्वरथान्नशालाम् ॥ ४१ ॥ ( अनुष्टुप् ) दग्ध्वा वाराणसीं सर्वां विष्णोश्चक्रं सुदर्शनम् । भूयः पार्श्वमुपातिष्ठत् कृष्णस्याक्लिष्टकर्मणः ॥ ४२ ॥
( इंद्रवज्रा ) काशीस आले हरिचक्र पाठीं जेथे सभा हाट विशाल गेह । हत्ती खजाने अन धान्य कोठ्या अश्वो रथो तेथे कितेक होते ॥ ४१ ॥ ( अनुष्टुप् ) सर्वची सर्व ती काशी विष्णुचक्रेची जाळिता । भस्म ती सर्वची होता कृष्णाच्यापाशि पातले ॥ ४२ ॥
तदनुप्रविष्टं विष्णोः चक्रं च - आणि त्यामागून प्रविष्ट झालेले विष्णूचे सुदर्शन चक्र - साट्टसभालयापणां - उंच पीठांनी युक्त सभागृहे व बाजार यांसहित अशा - सगोपुराट्टालककोष्ठसंकुलां - वेशी, गच्च्या, व कोठारे यांनी व्यापिलेल्या - सकोशहस्त्यश्वरथान्नशालां - भांडारे, गजशाला, अश्वशाला, रथ व अन्नशाला यांनी भरलेल्या - वाराणसीम् (अदहत्) - काशीनगराला जाळिता झाला ॥४१॥ अक्लिष्टकर्मणः विष्णोः कृष्णस्य - सहाजिकपणे मोठमोठी कृत्ये करणार्या व्यापक श्रीकृष्णाचे - सुदर्शनं चक्रं - सुदर्शनचक्र - सर्वां वाराणसीं दग्ध्वा - सर्व काशीनगरी जाळून - भूयः (कृष्णस्य) पार्श्वं उपातिष्ठत् - पुनः श्रीकृष्णाच्या जवळ प्राप्त झाले ॥४२॥
कृत्येच्या पाठोपाठ सुदर्शन चक्रसुद्धा काशीला येऊन पोहोचले. त्याने गच्च्या, सभागृहे, बाजार, गोपुरे, बुरुज, कोठारे, खजिने, हत्ती, घोडे, रथ आणि अन्नशाळा असलेली संपूर्ण काशी जाळून आनंदपूर्ण कृत्ये करणार्या भगवान श्रीकृष्णांकडे ते परत आले. (४१-४२)
य एनं श्रावयेन्मर्त्य उत्तमःश्लोकविक्रमम् ।
समाहितो वा श्रृणुयात् सर्वपापैः प्रमुच्यते ॥ ४३ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे उत्तरार्धे पौण्ड्रकादिवधो नाम षट्षष्टितमोऽध्यायः ॥ ६६ ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
पुण्यश्लोक असा कृष्ण ऐकता त्याचि ही लीला । अथवा ऐकवी अन्यां तयाचे पाप संपते ॥ ४३ ॥ ॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सहासष्टावा अध्याय हा ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
यः मर्त्यः - जो मनुष्य - समाहितः - शांतपणे - एनं उत्तमश्लोकविक्रमं श्रावयेत् - हा भगवंताचा पराक्रम लोकांना सांगतो - वा (स्वयं) शृणुयात् - किंवा स्वतः श्रवण करतो - (सः) सर्वपापैः प्रमुच्यते - तो सर्व पातकांपासून मुक्त होतो ॥४३॥ - सहासष्टावा अध्याय समाप्त
जो मनुष्य पुण्यकीर्ती श्रीकृष्णांचा हा पराक्रम एकाग्रतेने ऐकतो किंवा दुसर्याला ऐकवितो, त्याची सर्व पापांपासून सुटका होते. (४३)
अध्याय सहासष्टावा समाप्त |