श्रीमद् भागवत पुराण
स्कन्ध दहावा
अध्याय चौसष्टावा

नृगस्योद्धारः -

नृग राजाची कथा -


संहिता - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीबादरायणिरुवाच -
( अनुष्टुप् )
एकदोपवनं राजन् जग्मुर्यदुकुमारकाः ।
विहर्तुं साम्बप्रद्युम्न चारुभानुगदादयः ॥ १ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
( अनुष्टुप् )
परीक्षित् ! एकदा सांब प्रद्युम्न चारुभान नी ।
गदादी राजपुत्रो हे फिराया वनि पातले ॥ १ ॥

राजन् - हे परीक्षित राजा - एकदा - एके दिवशी - साम्बप्रद्युम्नचारुभानुगदादयः - सांब, प्रद्युम्न, चारु, भानु व गद इत्यादि - यदुकुमारकाः - यदुपुत्र - विहर्तुं उपवनं जग्मुः - क्रीडा करण्यासाठी बागेत गेले. ॥१॥
श्रीशुक म्हणातात- परीक्षिता ! एके दिवशी सांब, प्रद्युम्न, चारुभानू, गद इत्यादी यदुवंशी राजकुमार फिरण्यासाठी उपवनात गेले. (१)


क्रीडित्वा सुचिरं तत्र विचिन्वन्तः पिपासिताः ।
जलं निरुदके कूपे ददृशुः सत्त्वमद्‌भुतम् ॥ २ ॥
खेळता तृष्णले सर्व पाण्याला शोधु लागले ।
विचित्र दिसला आड न पाणी जीव एक तै ॥ २ ॥

तत्र सुचिरं क्रीडित्वा - तेथे बराच वेळ खेळून - पिपासिताः - तहान लागलेले - जलं विचिन्वंतः - पाणी शोधणारे - निरुदके कूपे - पाणी नसलेल्या एका विहिरीत - अद्‌भुतं सत्त्वं ददृशुः - आश्चर्यजनक प्राण्याला पहाते झाले. ॥२॥
तेथे पुष्कळा वेळापर्यंत खेळ खेळल्याने त्यांना तहान लागली. तेव्हा ते इकडे तिकडे पाण्याचा शोध घेऊ लागले. त्यांना एका पाणी नसलेल्या विहिरीत एक विचित्र प्राणी दिसला. (२)


कृकलासं गिरिनिभं वीक्ष्य विस्मितमानसाः ।
तस्य चोद्धरणे यत्‍नं चक्रुस्ते कृपयान्विताः ॥ ३ ॥
सरडा पर्वता ऐसा सर्वा आश्चर्य जाहले ।
दयार्द्र जाहले सर्व काढाया यत्‍नि लागले ॥ ३ ॥

गिरिनिभं कृकलासं वीक्ष्य - पर्वताप्रमाणे विस्तीर्ण अशा सरडयाला पाहून - विस्मितमानसाः कृपयान्विताः ते - आश्चर्ययुक्त अंतःकरण झालेले व दयायुक्त असे ते कुमार - तस्य च उद्धरणे यत्‍नं चक्रुः - त्याला वर काढण्याचा प्रयत्‍न करिते झाले. ॥३॥
तो प्राणी म्हणजे पर्वताच्या आकाराचा एक सरडा होता. त्याला पाहून ते आश्चर्यचकित झाले. त्यांना त्याची दया येऊन ते त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्‍न करू लागले. (३)


चर्मजैस्तान्तवैः पाशैः बद्ध्वा पतितमर्भकाः ।
नाशक्नुवन् समुद्धर्तुं कृष्णायाचख्युरुत्सुकाः ॥ ४ ॥
दोरी वा वादिने त्याला बांधोनी ना निघेच की ।
श्रीकृष्णासी जाउनी सारे आश्चर्य सर्व बोलले ॥ ४ ॥

उत्सुकाः - उत्कंठित झालेले - अर्भकाः - ते बालक - पतितं (तं) - पडलेल्या त्या सरडयाला - चर्मजैः तान्तवैः पाशैः बद्‌ध्वा - कातडयाच्या व तंतूंच्या पाशांनी बांधून - समुद्धर्तुं न अशक्नुवन् - वर काढण्यास समर्थ झाले नाहीत - कृष्णाय आचख्युः - श्रीकृष्णाला सांगते झाले. ॥४॥
परंतु ती मुले जेव्हा त्या विहिरीत पडलेल्या सरड्याला कातडी दोराने बांधूनही बाहेर काढू शकले नाहीत, तेव्हा कुतूहलाने जाऊन त्यांनी ती गोष्ट श्रीकृष्णांना सांगितली. (४)


तत्रागत्यारविन्दाक्षो भगवान् विश्वभावनः ।
वीक्ष्योज्जहार वामेन तं करेण स लीलया ॥ ५ ॥
जगज्जीवन श्रीकृष्ण विहिरीपाशि पातले ।
सहजी काढिला त्यांनी बाहेर सरडा तदा ॥ ५ ॥

स विश्वभावनः अरविन्दाक्षः भगवान् - तो जगाचे संरक्षण करणारा कमलनेत्र भगवान श्रीकृष्ण - तत्र आगत्य - तेथे येऊन - वीक्ष्य (च) - आणि पाहून - वामेन करेण - डाव्या हाताने - तं लीलया उज्जहार - त्या सरडयाला सहज वर काढिता झाला. ॥५॥
जगाचे जीवनदाते कमलनयन भगवान श्रीकृष्ण त्या विहिरीपाशी आले. त्या सरड्याला पाहून आपल्या डाव्या हाताने सहज त्यांनी त्याला बाहेर काढले. (५)


( मिश्र )
स उत्तमःश्लोककराभिमृष्टो
     विहाय सद्यः कृकलासरूपम् ।
सन्तप्तचामीकरचारुवर्णः
     स्वर्ग्यद्‌भुतालङ्करणाम्बरस्रक् ॥ ६ ॥
( इंद्रवज्रा )
स्पर्शे हरीच्या रुप पालटोनी
     स्वर्गीय देहो मिळता तयाला ।
सोन्यापरी अंग सतेज झाले
     अद्‌भूत वस्त्रे अन हार कंठी ॥ ६ ॥

उत्तमश्लोककराभिमृष्टः सः - श्रीकृष्णाच्या हाताने मुक्त झालेला तो सरडा - सद्यः कृकलासरूपं विहाय - तत्काळ सरडयाचे स्वरूप टाकून - संतप्तचामीकरचारुवर्णः - तापलेल्या सुवर्णाप्रमाणे सुंदर वर्णाचा - अद्‌भुतालङकरणाम्बरस्रक् - आश्चर्यजनक आहेत अलंकार, वस्त्रे व माळ ज्याची असा - स्वर्गी (बभूव) - स्वर्गात रहाणारा देव झाला. ॥६॥
भगवान श्रीकृष्णांच्या करकमलाचा स्पर्श होताच सरड्याचे रूप टाकून तो एका स्वर्गीय देवतेच्या रूपात प्रगट झाला. आता त्याच्या शरीराचा रंग तापलेल्या सोन्याप्रमाणे चमकू लागला होता; आणि त्याच्या शरीरावर अद्‍भूत वस्त्रे, अलंकार आणि फुलांचे हार दिसू लागले होते. (६)


पप्रच्छ विद्वानपि तन्निदानं
     जनेषु विख्यापयितुं मुकुन्दः ।
कस्त्वं महाभाग वरेण्यरूपो
     देवोत्तमं त्वां गणयामि नूनम् ॥ ७ ॥
जाणी मनी कृष्ण तरी विचारी
     दावावया माणुसि भाव तैसा ।
तुम्ही महाभाग कुठोनि आले
     दिव्यस्वरूपी जणु देवताची ॥ ७ ॥

मुकुन्दः विद्वान् अपि - श्रीकृष्ण जाणत असताहि - तन्निदानं जनेषु विख्यापयितुं - त्याला सरडयाचा जन्म प्राप्त होण्याचे कारण लोकांमध्ये प्रसिद्ध होण्यासाठी - पप्रच्छ - विचारिता झाला - महाभाग - हे महाभाग्यवंता - वरेण्यरूपः त्वं कः - श्रेष्ठ स्वरूप धारण करणारा तू कोण आहेस - नूनं त्वां देवोत्तमं गणयामि - खरोखर तुला श्रेष्ठ देव असे समजतो. ॥७॥
या दिव्य पुरुषाला सरड्याची योनी का प्राप्त झाली, हे जरी श्रीकृष्णांना माहीत होते, तरीसुद्धा ते कारण सर्वसाधारण माणसांना माहीत व्हावे म्हणून त्यांनी त्याला विचारले, "हे महाभागा ! तू अत्यंत रूपवान आहेस. कोण तू ? खात्रीने तू कोणीतरी श्रेष्ठ देव असावास, असेच मला वाटते. (७)


दशामिमां वा कतमेन कर्मणा
     संप्रापितोऽस्यतदर्हः सुभद्र ।
आत्मानमाख्याहि विवित्सतां नो
     यन्मन्यसे नः क्षममत्र वक्तुम् ॥ ८ ॥
तुम्हा अशी योनि मिळे कशाने
     तुम्हा न शोभे अशि हीन योनी ।
वृत्तांत सारा जर युक्त वाटे
     तरी तसा तो कथिणे अम्हाला ॥ ८ ॥

सुभद्र - हे दैवशाली पुरुषा - अतदर्हः (त्वं) - ह्या वाईट स्थितीला अयोग्य असा तू - कतमेन वा कर्मणा - कोणत्या बरे कर्माने - इमां दशां संप्रापितः असि - ह्या अवस्थेला पोचविला गेलास - यत् अत्र नः वक्तुं क्षमं मन्यसे - जर ह्या बाबतीत आम्हांला सांगणे योग्य वाटत असेल तर - विवित्सतां नः आत्मानं आख्याहि - जाणण्याची इच्छा करणार्‍या आम्हाला स्वतःचे वृत्त सांग. ॥८॥
हे कल्याणमूर्ते ! कोणत्या कर्मामुळे तुला या योनीमध्ये यावे लागले ? तुझी अशी दशा होणे योग्य नव्हते. आम्ही तुझा वृत्तांत जाणू इच्छितो. तो आम्हांला सांगणे तुला योग्य वाटत असेल, तर सांग." (८)


श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् )
इति स्म राजा संपृष्टः कृष्णेनानन्तमूर्तिना ।
माधवं प्रणिपत्याह किरीटेनार्कवर्चसा ॥ ९ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
( अनुष्टुप् )
कृष्णाने पुसता ऐसे सूर्यापरि किरीट तो ।
झुकवी माधवापायी पुढे तो वद ला असा ॥ ९ ॥

अनन्तमूर्तिना कृष्णेन - अंतरहित आहे स्वरूप ज्याचे अशा श्रीकृष्णाने - इति संपृष्टः राजा - याप्रमाणे विचारलेला राजा - अर्कवर्चसा किरीटेन - सूर्यासारख्या तेजस्वी अशा मुकुटाने - माधवं प्रणिपत्य - श्रीकृष्णाला नमस्कार करून - आह स्म - म्हणाला. ॥९॥
श्रीशुक म्हणतात- जेव्हा अनंतमूर्ती श्रीकृष्णांनी राजाला असे विचारले, तेव्हा त्याने आपला सूर्यासारखा तेजस्वी मुकुट भगवंतांच्या चरणांवर टेकवून त्यांना प्रणाम करून म्हटले. (९)


नृग उवाच -
नृगो नाम नरेन्द्रोऽहं इक्ष्वाकुतनयः प्रभो ।
दानिष्वाख्यायमानेषु यदि ते कर्णमस्पृशम् ॥ १० ॥
राजानृग म्हणाला -
राजा‍इक्ष्वाकुपुत्रो मी नृग नामे असे प्रभो ।
नामावळीत दात्यांच्या मम नाम असे जरी ॥ १० ॥

प्रभो - हे कृष्णा - अहं इक्ष्वाकुतनयः - मी इक्ष्वाकु राजाचा पुत्र - नृगः नाम नरेन्द्रः - नृग नावाचा राजा - दानिषु आख्यायमानेषु - दानशूर लोक वर्णिले जात असता - यदि ते कर्णं अस्पृशम् - बहुधा तुझ्या ऐकिवातहि मी आलो असेन. ॥१०॥
नृग म्हणाला- प्रभो ! मी इक्ष्वाकूचा पुत्र नृग नावाचा राजा आहे. जर एखाद्याने आपल्यासमोर दानशूर पुरूषांचा उल्लेख केला असेल, तर त्यावेळी माझे नाव आपल्या कानांवर आले असेल. (१०)


किं नु तेऽविदितं नाथ सर्वभूतात्मसाक्षिणः ।
कालेनाव्याहतदृशो वक्ष्येऽथापि तवाज्ञया ॥ ११ ॥
वृत्तींचे तुम्हि तो साक्षी त्रिकलज्ञ तुम्ही असा ।
न लपे आमुच्यापाशी आज्ञा जाणोनि सांगतो ॥ ११ ॥

नाथ - हे श्रीकृष्णा - सर्वभूतात्मसाक्षिणः - सर्व प्राण्यांच्या ठिकाणी आत्मरूपाने रहाणार्‍या - कालेन अव्याहतदृशः ते - काळाने ज्याचे ज्ञान नष्ट झाले नाही अशा तुला - किं नु अविदितं (स्यात्) - काय बरे माहित नाही असे आहे - अथापि तव आज्ञया वक्ष्ये - तरी सुद्धा तुझ्या आज्ञेने मी सांगतो. ॥११॥
हे प्रभो ! आपण सर्व प्राण्यांच्या अंत:करणाचे साक्षी आहात. काळाचा पडदा आपल्या अखंड ज्ञानामध्ये बाधा आणू शकत नाही. म्हणून आपल्याला अज्ञात असे काय असणार आहे ? असे असूनही ’ आपली आज्ञा’ म्हणून मी सांगतो. (११)


यावत्यः सिकता भूमेः यावत्यो दिवि तारकाः ।
यावत्यो वर्षधाराश्च तावतीरददं स्म गाः ॥ १२ ॥
पृथ्वीचे कण नी तारे वृष्टीचे थेंब जेवढे ।
तेवढ्या दिधल्या गाई दान मी स्वय की हरी ॥ १२ ॥

भूमेः यावन्त्यः सिकताः - पृथ्वीवर जितके म्हणून रजःकण आहेत - दिवि यावन्त्यः तारकाः - आकाशात जितकी नक्षत्रे आहेत - यावन्त्यः च वर्षधाराः - आणि जितक्या म्हणून पावसाच्या धारा आहेत - तावतीः गाः अददं स्म - तितक्या गाई मी दान दिल्या. ॥१२॥
हे भगवन ! पृथ्वीवर जेवढे धुळीचे कण आहेत, आकाशात जितके तारे आहेत आणि पावसाळ्यात पाण्यच्या जेवढ्या धारा पडतात, तितक्या गायी मी दान केल्या होत्या. (१२)


( मिश्र )
पयस्विनीस्तरुणीः शीलरूप
     गुणोपपन्नाः कपिला हेमश्रृङ्गीः ।
न्यायार्जिता रूप्यखुराः सवत्सा
     दुकूलमालाभरणा ददावहम् ॥ १३ ॥
( इंद्रवज्रा )
दुधाळ श्रृंगा तरुणी गरीब
     सुलक्षणा नी कपिलाच गाई ।
सुवर्ण श्रृंगा रजतो खुरासी
     अलंकृता त्या दिधल्या अशा मी ॥ १३ ॥

अहं - मी - पयस्विनीः - चांगल्या दूध देणार्‍या - तरुणीः - तरुण - शीलरूपगुणोपपन्नाः - स्वभावाने, रूपांनी व गुणांनी श्रेष्ठ अशा - हेमश्रृङगीः - सोन्याने मढविली आहेत शिंगे ज्यांची अशा - रूप्यखुराः - रुप्याची टोपणे आहेत खुरांवर ज्यांच्या अशा - दुकूलमालाभरणाः - रेशमी वस्त्रे, माळा व अलंकार घातलेल्या - सवत्साः कपिलाः - वासरांसह कपिला गाई - न्यायार्जिताः - न्यायाने मिळविलेल्या - ददौ - देता झालो. ॥१३॥
त्या गाई दुधाळ, तरुण, साध्या, सुंदर सुलक्षणी आणि कपिला होत्या. न्यायार्जित धनाने मी त्या प्राप्त केल्या होत्या. सर्वांना वासरे होती. त्यांची शिंगे सोन्याने मढवलेली होती आणि खूर चांदीने, रेशमी वस्त्रे, हार आणि दागिन्यांनी त्यांना सजविले होते. अशा गायी मी दान दिल्या होत्या. (१३)


स्वलङ्कृतेभ्यो गुणशीलवद्‌भ्यः
     सीदत्कुटुम्बेभ्य ऋतव्रतेभ्यः ।
तपःश्रुतब्रह्मवदान्यसद्‌भ्यः
     प्रादां युवभ्यो द्विजपुङ्गवेभ्यः ॥ १४ ॥
जे विप्र पुत्रो गुणशीलवंत
     तपस्वि नी पाठक वेदविद्या ।
अध्यापिती जे श्रुति वेद त्यांना
     गाई अशा दान दिल्या प्रभोरे ॥ १४ ॥

स्वलङकृतेभ्यः गुणशीलवद्‌भ्यः - अलंकार घातलेल्या, गुण व स्वभाव यांनी युक्त अशा - सीदत्कुटुम्बेभ्यः ऋतव्रतेभ्यः - ज्यांची बायका मुले गरीबीमुळे दुःख भोगीत आहेत अशा व खरे बोलणार्‍या - तपःश्रुतब्रह्मवदान्यसद्‌भ्यः - तपश्चर्या, वेदाध्ययन व अध्यात्मविचार करणार्‍या व दानधर्म करणार्‍या - युवभ्यः द्विजपुङगवेभ्यः - तरुण श्रेष्ठ ब्राह्मणांना - (गाः) प्रादाम् - गाई देता झालो. ॥१४॥
जे श्रेष्ठ ब्राह्मणकुमार सद्‌गुणी, शीलसंपन्न, कुटुंबपोषणास असमर्थ, सत्यशील, तपस्वी, वेदपाठी, शिष्यांना विद्यादान करणारे, चारित्र्यसंपन्न आणि तरुण होते, त्यांना मी वस्त्रे, अलंकार देऊन गाईंचे दान करीत असे. (१४)


गोभूहिरण्यायतनाश्वहस्तिनः
     कन्याः सदासीस्तिलरूप्यशय्याः ।
वासांसि रत्‍नानि परिच्छदान् रथान्
     इष्टं च यज्ञैश्चरितं च पूर्तम् ॥ १५ ॥
सदासि कन्या घर अश्व सोने
     चांदी नि हत्ती तिळपर्वते ती ।
शय्या नि रत्‍ने वसने रथोही
     हे दान यज्ञे अन आड केले ॥ १५ ॥

गोभूहिरण्यायतनाश्वहस्तिनः - गाई, पृथ्वी, सुवर्ण, घरे, घोडे व हत्ती - सदासीः कन्याः - दासींसह कन्या - तिलरूप्यशय्याः - तीळ, रुपे व शय्या - वासांसि रत्‍नानि - वस्त्रे व रत्‍ने - परिच्छदान् रथान् - परिवार, रथ - यज्ञैः च इष्टं - आणि यज्ञांनी पूजा केली - पूर्तम् च चरितम् - आणि विहिरी बांधणे इत्यादि धर्मकृत्ये केली. ॥१५॥
अशा प्रकारे मी पुष्कळशा गायी, जमीन, सोने, घरे, घोडे, हत्ती, दासींसहित कन्या, तिळांचे पर्वत, चांदी, अंथरुणे, वस्त्रे, रत्‍ने, गृहसामग्री आणि रथ इत्यादींचे दान केले. अनेक यज्ञ केले आणि पुष्कळशा विहिरी, तलाव इत्यादी बांधले. (१५)


( अनुष्टुप् )
कस्यचिद् द्विजमुख्यस्य भ्रष्टा गौर्मम गोधने ।
संपृक्ताविदुषा सा च मया दत्ता द्विजातये ॥ १६ ॥
( अनुष्टुप् )
अप्रतिग्रहविप्राची एक गाय चुकोनिया ।
पातली मम गाईत नेणे मी दान ती दिली ॥ १६ ॥

कस्यचित् द्विजमुख्यस्य - कोणा एका श्रेष्ठ ब्राह्मणाची - भ्रष्टा गौः - पळून आलेली गाय - मम गोधने संपृक्ता - माझ्या गाईच्या कळपात मिसळली - अविदुषा मया च - आणि ते न जाणणार्‍या माझ्या कडून - सा - ती गाय - (अन्वस्मै) द्विजातये दत्ता - दुसर्‍या ब्राह्मणाला दिली गेली. ॥१६॥
एके दिवशी एका तपस्वी ब्राह्मणाची एक चुकलेली गाय माझ्या गायीमध्ये येऊन मिसळाली. मला याची कल्पना नव्हती. मी नकळत ती गाय दुसर्‍या एका ब्राह्मणाला दान दिली. (१६)


तां नीयमानां तत्स्वामी दृष्ट्रोवाच ममेति तम् ।
ममेति परिग्राह्याह नृगो मे दत्तवानिति ॥ १७ ॥
घेवोनी विप्र ती गाय जाताचि पहिला बघे ।
राजाने दिधली माते वदता दुसरा तया ॥ १७ ॥

तत्स्वामी - त्या गाईचा स्वामी - नीयमानां तां दृष्टवा - नेल्या जाणार्‍या त्या गाईला पाहून - मम (इयं) इति तं उवाच - माझी ही गाय आहे असे त्या ब्राह्मणाला म्हणाला - प्रतिग्राही - दान घेणारा - मम (इयं) इति - ही माझी आहे असे - नृगः मे दत्तवान् इति - नृगराजा ही मला देता झाला असे - आह - म्हणाला. ॥१७॥
जेव्हा ती गाय तो ब्राह्मण घेऊन चालला, तेव्हा त्या गाईचा मूळ मालक त्याला म्हणाला, "ही गाय माझी आहे." दान घेणारा ब्राह्मण म्हणाला, "ही माझी आहे. कारण नृग राजाने मला ही दान दिली आहे." (१७)


विप्रौ विवदमानौ मां ऊचतुः स्वार्थसाधकौ ।
भवान् दातापहर्तेति तच्छ्रुत्वा मेऽभवद्‌ भ्रमः ॥ १८ ॥
भांडता पातले आणि आत्ताच दान घेतली ।
भिक्षू द्विज वदे ऐसा चोरिली कावदे दुजा ।
द्वजांचे ऐकुनी शब्द भ्रमीत चित्ति जाहलो ॥ १८ ॥

स्वार्थसाधकौ विवदमानौ विप्रौ - स्वार्थलंपट व वाद करणारे ते दोघे ब्राह्मण - भवान् दाता अपहर्ता इति - तू दान देणारा व परत घेणारा आहेस असे - माम् ऊचतुः - मला म्हणाले - तत् श्रुत्वा मे भ्रमः अभवत् - ते ऐकून मला भ्रम उत्पन्न झाला. ॥१८॥
ते दोघे ब्राह्मण आपापसात भांडण करीत आपलेच म्हणणे खरे आहे, हे पटविण्यासाठी माझ्याकडे आले. एकजण म्हणाला, "ही गाय आपण मला दिली आहे;" व दुसरा म्हणाला, "असे असेल तर तू माझ्या गाईची चोरी केली आहेस." ते ऐकून माझे चित्त गोंधळून गेले. (१८)


अनुनीतावुभौ विप्रौ धर्मकृच्छ्रगतेन वै ।
गवां लक्षं प्रकृष्टानां दास्याम्येषा प्रदीयताम् ॥ १९ ॥
धर्मसंकट जाणोनि विनये वदलो तयां ।
मी देतो लक्ष गाई त्या परी द्या मज ही तुम्ही ॥ १९ ॥

धर्मकृच्छ्‌रगतेन (मया) उभौ विप्रौ अनुनीतौ - धर्मविषयक संकटात सापडलेल्या माझ्याकडून ते दोघे ब्राह्मण प्रार्थिले गेले - प्रकृष्टानां गवां लक्षं दास्यामि वै - खरोखर एक लक्ष उत्कृष्ट गाई मी देईन - एषा प्रदीयतां - ही गाय मला द्यावी. ॥१९॥
मी धर्मसंकटात सापडलो आणि त्या दोघांना अत्यंत नम्रतेने म्हणालो की, "हिच्या बदल्यात मी आपणास एक लक्ष उत्तम गाई देईन. आपण ही गाय मला परत द्या." (१९)


भवन्तावनुगृह्णीतां किङ्करस्याविजानतः ।
समुद्धरतं मां कृच्छ्रात् पतन्तं निरयेऽशुचौ ॥ २० ॥
नाहं प्रतीच्छे वै राजन् नित्युक्त्वा स्वाम्यपाक्रमत् ।
नान्यद्‌ गवामप्ययुतं इच्छामीत्यपरो ययौ ॥ २१ ॥
द्विज सेवक मी आहे अज्ञाने चूक जाहली ।
क्षमावे मजला आणि नरकीं वाचवा मला ॥ २० ॥
गेला तो वदुनी की मी बदली नच घे मुळी ।
गेला दुजाहि तो विप्र न घे दान वदोनिया ॥ २१ ॥

भवन्तौ - तुम्ही - अविजानतः किंकरस्य - अज्ञानी सेवक अशा माझ्यावर - अनुगृह्‌णीतां - अनुग्रह करा - अशुचौ निरये पतन्तं मां - अपवित्र नरकात पडणार्‍या मला - कृच्छ्‌रात् समुद्धरतं - संकटातून वर काढा. ॥२०॥ राजन् - हे राजा - अहं (इमां दातुम्) वै न प्रतीच्छे - मी ही देऊ इच्छित नाही - इति उक्त्वा - असे म्हणून - स्वामी अपाक्रमत् - गाईचा मूळ स्वामी निघून गेला - अपरः - दुसरा ब्राह्मण - अन्यत् गवां अयुतं अपि (गृहीतुम्) - हिच्या शिवाय दुसर्‍या लक्षहि गाई घेण्यास - न इच्छामि - मी इच्छित नाही - इति ययौ - असे म्हणून निघून गेला. ॥२१॥
मी आपला सेवक आहे. नकळतपणे माझ्या हातून हा अपराध घडला आहे. आपण माझ्यावर कृपा करा आणि मला अमंगळ नरकात जाऊन पडण्याच्या संकटातून वाचवा." (२०) "राजन ! मी हिच्या बदल्यात काहीही घेणार नाही." असे म्हणून गाईचा मूळ मालक निघून गेला. "तू हिच्या बदल्यात एक लक्षच काय दहा हजार आणखी गाई दिल्यास तरीसुद्धा मला नकोत," असे म्हणून दुसरा ब्राह्मणसुद्धा निघून गेला. (२१)


एतस्मिन् अन्तरे यामैः दूतैर्नीतो यमक्षयम् ।
यमेन पृष्टस्तत्राहं देवदेव जगत्पते ॥ २२ ॥
जै आयु संपली माझी पातले यमदूत तै ।
नेले मज यमापाशी यमाने पुसले मला ॥ २२ ॥

देवदेव जगत्पते - हे देवाधिदेवा जगन्नाथा - एतस्मिन् अन्तरे - इतक्या अवधीत - याम्यैः दूतैः (अहं) यमक्षयं नीतः - यमाच्या दूतांकडून मी यमलोकी नेला गेलो - तत्र अहं यमेन पृष्टः - तेथे मी यमाकडून विचारिला गेलो. ॥२२॥
देवाधिदेव जगदीश्वरा ! आयुष्य संपल्यावर यमराजाच्या दूतांनी मला यमपुरीला नेले. तेथे यमराजाच्या दूतांनी मला विचारले. (२२)


पूर्वं त्वमशुभं भुङ्क्ष उताहो नृपते शुभम् ।
नान्तं दानस्य धर्मस्य पश्ये लोकस्य भास्वतः ॥ २३ ॥
पापाचे फळ आधी का पुण्याचे आधि इच्छिशी ।
लाभेल तेजवान् लोक पुण्यवंत तसाच तू ॥ २३ ॥

नृपते - हे राजा - त्वं पूर्वं अशुभं भुङ्‌क्षे - तू प्रथम पापाचे फळ भोगणार - उताहो - किंवा - शुभं (भुङ्‌क्षे) - पुण्याचे फळ भोगणार ? - भास्वतः लोकस्य - तेजस्वी पुरुषांच्या - दानस्य धर्मस्य - दानधर्माचा - अन्तं न पश्ये - अंत मी पहात नाही. ॥२३॥
राजा ! तू अगोदर आपल्या पापाचे फळ भोगू इच्छितोस की पुण्याचे ? तू केलेले दान आणि धर्म याचे फळ म्हणून तुला असा तेजस्वी लोक प्राप्त होणार आहे की, ज्याला तोड नाही. (२३)


पूर्वं देवाशुभं भुञ्ज इति प्राह पतेति सः ।
तावद् अद्राक्षमात्मानं कृकलासं पतन् प्रभो ॥ २४ ॥
तेंव्हा मी वदलो देवा पापाचे फळ दे मला ।
तेंव्हाचि सरडा झालो पडलो येथ येउनी ॥ २४ ॥

देव - हे यमा - पूर्वं अशुभं भुञ्जे - प्रथम मी पापफळ भोगतो - इति (अहम् अब्रुवम्) - असे मी म्हणालो - सः पत इति प्राह - तो यम पड असे म्हणाला - प्रभो - हे कृष्णा - तावत् पतन् (अहं) - तेव्हा पडणारा मी - आत्मानं कृकलासं अद्राक्षम् - स्वतःला सरडा झालेला पहाता झालो. ॥२४॥
प्रभो ! तेव्हा मी यमराजाला म्हणालो, "देवा ! मी अगोदर पापाचे फळ भोगू इच्छितो." आणि त्याचक्षणी यमराज म्हणाला, "पड जा". त्याने असे म्हणताच मी तेथून खाली पडत असतानाच पाहिले की, आपण सरडा झालो आहे. (२४)


ब्रह्मण्यस्य वदान्यस्य तव दासस्य केशव ।
स्मृतिर्नाद्यापि विध्वस्ता भवत्सन्दर्शनार्थिनः ॥ २५ ॥
उदार दानि मी भक्त इच्छी मी तव दर्शन ।
तुझ्या कृपे स्मृती ऐशी जागती राहिली असे ॥ २५ ॥

केशव - हे श्रीकृष्णा - ब्रह्मणस्य वदान्यस्य - ब्राह्मणांचे रक्षण करणार्‍या दानशूर अशा - तव दासस्य - तुझा सेवक अशा - भवत्सन्दर्शनार्थिनः - तुमच्या दर्शनाची इच्छा करणार्‍या - (मे) स्मृतिः अद्य अपि न विध्वस्ता - माझी आठवण अजूनहि नाहीशी झाली नाही. ॥२५॥
हे प्रभो ! मी ब्राह्मणांचा सेवक, दानशूर आणि आपला भक्त होतो. आपले दर्शन व्हावे, अशी माझी उत्कट इच्छा होती. आपल्या कृपेनेच माझी पूर्वजन्माची आठवण अजून नाहीशी झाली नाही. (२५)


( वसंततिलका )
स त्वं कथं मम विभोऽक्षिपथः परात्मा
     योगेश्वरः श्रुतिदृशामलहृद्विभाव्यः ।
साक्षाद् अधोक्षज उरुव्यसनान्धबुद्धेः
     स्यान्मेऽनुदृश्य इह यस्य भवापवर्गः ॥ २६ ॥
( वसंततिलका )
योगीश्वरोहि भजती तुजला श्रुतीने
     ना जाणिले मज कशा दिसला हरी तू ।
कार्यात मी फसुनिया बहु अंध होतो
     जो या भवात सुटला तयि भेटसी तू ॥ २६ ॥

विभो अधोक्षज - हे समर्था श्रीकृष्णा - योगेश्वरैः श्रुतिदृशा अमलहृद्विभाव्यः - योगाधिपतींनी ज्ञानदृष्टिने आपल्या निर्मल अन्तःकरणात अवलोकिला जाणारा - सः परात्मा त्वं - परमेश्वर असा तो तू - उरुव्यसनान्धबुद्धेः मम - मोठया दुःखाने ज्याची बुद्धि अन्ध झालेली आहे अशा माझ्या - कथं अक्षिपथः (कथं च) मे साक्षात् (भूतः) - दृष्टीच्या मार्गात प्रत्यक्ष कसा पडलास - यस्य भवापवर्गः (भवति) - ज्याची संसारबंधनातून मुक्तता होते - (तस्य) इह (भवान्) अनुदृश्यः स्यात् - त्याला या ठिकाणी तू दृश्य होतोस. ॥२६॥
भगवन ! आपण परमात्मा आहात. शुद्ध अंत:करणाने योगेश्वर उपनिषदांच्या दृष्टीने स्वत:च्या हृदयात आपले ध्यान करीत असतात. हे इंद्रियातीत परमात्मन ! सरडा होण्याच्या मोठ्या दु:खामुळे मी विवेकहीन झालो असतानाही आपण साक्षात माझ्या दृष्टीसमोर कसे आलात? जेव्हा प्रपंचातून सुटण्याची वेळ येते, तेव्हाच आपले दर्शन होते. (२६)


( अनुष्टुप् )
देवदेव जगन्नाथ गोविन्द पुरुषोत्तम ।
नारायण हृषीकेश पुण्यश्लोकाच्युताव्यय ॥ २७ ॥
अनुजानीहि मां कृष्ण यान्तं देवगतिं प्रभो ।
यत्र क्वापि सतश्चेतो भूयान्मे त्वत्पदास्पदम् ॥ २८ ॥
( अनुष्टुप् )
देव देवा जगन्नाथा गोविंदा पुरुषोत्तमा ।
नारायणा हृषीकेशा अच्युता पुण्यश्लोक तूं ॥ २७ ॥
स्वर्गात चाललो कृष्णा आज्ञा द्यावी मला प्रभो ।
कृपा सदैव ती व्हावी चित्त राहो पदास या ॥ २८ ॥

देवदेव जगन्नाथ - हे देवाधिदेवा जगत्पते - गोविन्द पुरुषोत्तम - हे गोविन्दा, हे पुरुषश्रेष्ठा श्रीकृष्णा - नारायण हृषीकेश - हे नारायणा, हे हृषीकेशा - पुण्यश्लोक अव्यय अच्युत - हे पुण्यकीर्ते अविनाशीस्वरूपा अच्युता - प्रभो कृष्ण - हे समर्था कृष्णा - देवगतिं यान्तं मां अनुजानीहि - स्वर्गाला जाणार्‍या मला आज्ञा दे - यत्र क्व अपि सतः मे चेतः - कोणत्याहि ठिकाणी असलो तरी माझे अन्तःकरण - त्वत्पदास्पदं भूयात् - तुझ्या चरणी लागलेले असो. ॥२७-२८॥
हे देवदेवा ! हे पुरुषोत्तमा ! गोविन्दा ! हे अविनाशी अच्युता ! पवित्रकीर्ते ! हे नारायणा ! हे हृषीकेशा ! हे प्रभो ! मी आता देवलोकी चाललो. आपण मला अनुमती द्यावी. हे श्रीकृष्णा ! मी कोठेही असलो, तरी माझे चित्त नेहेमी आपल्या चरणकमलांवर स्थिर असावे. (२७-२८)


नमस्ते सर्वभावाय ब्रह्मणेऽनन्तशक्तये ।
कृष्णाय वासुदेवाय योगानां पतये नमः ॥ २९ ॥
अनंत ब्रह्म शक्ती तू सर्व जीवात राहसी ।
नमितो वासुदेवाला स्वामी योगेश्वरा सदा ॥ २९ ॥

सर्वभावाय - सर्वांच्या उत्पत्तीला कारण अशा - अनन्तशक्तये ब्रह्मणे ते नमः - अनंतशक्ति व ब्रह्मस्वरूपी अशा तुला नमस्कार असो - योगानां पतये वासुदेवाय कृष्णाय नमः - योगाधिपति व वसुदेवपुत्र अशा श्रीकृष्णाला नमस्कार असो. ॥२९॥
सर्व विश्वरूप, अनंतशक्ती, ब्रह्मस्वरूप अशा आपणांस मी नमस्कार करीत आहे. हे वासुदेवा ! श्रीकृष्णा ! योगेश्वरा ! मी आपणांस नमस्कार करीत आहे. (२९)


इत्युक्त्वा तं परिक्रम्य पादौ स्पृष्ट्वा स्वमौलिना ।
अनुज्ञातो विमानाग्र्यं आरुहत् पश्यतां नृणाम् ॥ ३० ॥
परिक्रमा नृगे केली चरणी शिर टेकिले ।
विमानी बसला एला आज्ञा घेवोनि तेधवा ॥ ३० ॥

इति उक्त्वा - असे म्हणून - तं परिक्रम्य - त्या श्रीकृष्णाला प्रदक्षिणा घालून - स्वमौलिना पादौ स्पृष्टवा - आपल्या मस्तकाने पायांना स्पर्श करून - अनुज्ञातः (सः) - आज्ञा दिलेला तो नृगराजा - नृणां पश्यतां - लोक पहात असता - विमानाग्र्यम् आरुहत् - श्रेष्ठ विमानात बसला. ॥३०॥
असे म्हणून नृगाने भगवंतांना प्रदक्षिणा घातली आणि आपल्या मुगुटाने त्यांच्या चरणांना स्पर्श करून नमस्कार केला. नंतर त्यांची आज्ञा घेऊन सर्वजण पाहात असतानाच तो श्रेष्ठ विमानात बसला. (३०)


कृष्णः परिजनं प्राह भगवान् देवकीसुतः ।
ब्रह्मण्यदेवो धर्मात्मा राजन्याननुशिक्षयन् ॥ ३१ ॥
नृग जाता कुटूंबीया द्विजाचे र्पेम सांगण्या ।
क्षत्रीयधर्म बोधाया श्रीकृष्ण बोलले असे ॥ ३१ ॥

ब्रह्मण्यदेवः धर्मात्मा - ब्राह्मणांचे रक्षण करणारा धर्ममूर्ति देव असा - भगवान् देवकीसुतः कृष्णः - भगवान देवकीपुत्र श्रीकृष्ण - राजन्यान् अनुशिक्षयन् - राजेलोकांना शिक्षण देत - परिजनं प्राह - सेवक मंडळीला सांगता झाला. ॥३१॥
ब्राह्मणांना देव मानणारे, धर्माचा आधार असलेले देवकीनंदन भगवान श्रीकृष्ण क्षत्रियांना उपदेश करण्यासाठी म्हणून तेथे उपस्थित असलेल्यांना म्हणाले. (३१)


दुर्जरं बत ब्रह्मस्वं भुक्तमग्नेर्मनागपि ।
तेजीयसोऽपि किमुत राज्ञां ईश्वरमानिनाम् ॥ ३२ ॥
अग्नि समान तेजस्वी असोनी अल्पसेहि ते ।
द्वजाचे न पचे द्रव्य तो हा राजा कशातला ॥ ३२ ॥

मनाक् अपि भुक्तं ब्रह्मस्वं - थोडेहि उपभोगिलेले ब्राह्मणाचे द्रव्य - अग्नेः तेजीयसः (पुरुषस्य) अपि दुर्जरं बत - अग्नीहून तेजस्वी अशा पुरुषाला सुद्धा पचविता येणे खरोखर कठीण आहे - ईश्वरमानिनां राज्ञां किमुत - तर मग आपण समर्थ आहो असा अभिमान बाळगणार्‍या राजांची कथा काय ? ॥३२॥
जे लोक अग्नीसारखे तेजस्वी असतात, तेसुद्धा ब्राह्मणांचे अल्पसेसुद्धा धन हिरावून घेऊन पचवू शकत नाहीत. तर मग स्वत:ला लोकांचे स्वामी समजणारे राजे कसे पचवू शकतील ? (३२)


नाहं हालाहलं मन्ये विषं यस्य प्रतिक्रिया ।
ब्रह्मस्वं हि विषं प्रोक्तं नास्य प्रतिविधिर्भुवि ॥ ३३ ॥
हलाहलां न मी मानी तया औषध ते असे ।
द्विजधन असे वीष नच औषध त्या मुळी ॥ ३३ ॥

अहं - मी - यस्य प्रतिक्रिया (विद्यते) - ज्याच्यावर उलट उपाय आहे - (तत्) हालाहलं विषं न मन्ये - त्या हालाहलाला विष असे माहीत नाही - हि ब्रह्मस्वं विषं प्रोक्तं - खरोखर ब्राह्मणाचे द्रव्य हेच विष होय असे सांगितले आहे - भुवि अस्य प्रतिविधिः न (शक्यते) - पृथ्वीवर याचा परिहार करिता येत नाही.॥३३॥
मी हालाहल विषाला विष मानीत नाही. कारण त्याच्यावर उपाय आहे. पण ब्राह्मणांचे धनच महान विष आहे. ते पचविण्याचा पृथ्वीवर कोणताही उपाय नाही. (३३)


हिनस्ति विषमत्तारं वह्निरद्‌भिः प्रशाम्यति ।
कुलं समूलं दहति ब्रह्मस्वारणिपावकः ॥ ३४ ॥
भक्षिता बाधते वीष विझतो अग्निही जलें ।
अरणी द्विजद्रव्याची समूळ जाळिते कुळा ॥ ३४ ॥

विषं अत्तारं हिनस्ति - विष खाणाराला मारिते - अद्‌भिः वह्निः प्रशाम्यति - उदकांनी अग्नि शांत होतो - ब्रह्मस्वारणिपावकः (तु) - पण ब्राह्मणांचे द्रव्य हेच कोणी अग्निमंथनकाष्ठ त्यापासून उत्पन्न झालेला अग्नि - कुलं समूलं दहति - कुळाला समूळ जाळितो. ॥३४॥
विष केवळ खाणार्‍याचेच प्राण घेते. आग पाण्याने विझविली जाऊ शकते. परंतु ब्राह्मणांच्या धनरूप अग्नीपासून जी आग उत्पन्न होते, ती सर्व कुळाला मुळापासून जाळून टाकते. (३४)


ब्रह्मस्वं दुरनुज्ञातं भुक्तं हन्ति त्रिपूरुषम् ।
प्रसह्य तु बलाद्‌ भुक्तं दश पूर्वान् दशापरान् ॥ ३५ ॥
संमती नसतआ घेता त्रासिते तीन त्या पिढ्या ।
बळाने लाटिता द्रव्य त्रासिते दशही पिढ्या ॥ ३५ ॥

दुरनुज्ञातं ब्रह्मस्वं - दुःखाने आज्ञा दिलेले ब्राह्मणांचे द्रव्य - भुक्तं (सत्) - खाल्ले असता - त्रिपुरुषं हन्ति - तीन पुरुषांना मारिते - बलात् प्रसह्य भुक्तं तु - बलात्काराने एकाएकी घेऊन खाल्लेले तर - दश पूर्वान् दश अपरान् (हन्ति) - दहा पूर्वीचे पुरुष व दहा पुढील पुरुष यांना मारिते. ॥३५॥
जर ब्राह्मणाच्या पूर्ण संमतीशिवाय त्याचे धन उपभोगले, तर ते तीन पिढ्यांना नष्ट करते आणि जर बळजबरीने त्याचा उपभोग घेतला, तर त्यामुळे भोगणार्‍याच्या पूर्वजांच्या दहा पिढ्या आणि भविष्यातीलसुद्धा दहा पिढ्या नष्ट होतात. (२५)


राजानो राजलक्ष्म्यान्धा नात्मपातं विचक्षते ।
निरयं येऽभिमन्यन्ते ब्रह्मस्वं साधु बालिशाः ॥ ३६ ॥
अंध तो राजलक्ष्मीने जाणून द्विजद्रव्य ते ।
घेइ त्या समजावा की स्वताच नर्क गाठिला ॥ ३६ ॥

राजलक्ष्‌म्या अन्धाः - राज्यैश्वर्याने आंधळे बनलेले - ये बालिशाः राजानः - जे मूर्ख राजे - निरयं ब्रह्मस्वं - नरकरूपी ब्राह्मणाच्या द्रव्याला - साधु अभिमन्यंते - चांगले मानितात - (ते) आत्मपातं न विचक्षते - ते स्वतःचा नाश पहात नाहीत. ॥३६॥
जे मूर्ख राजे आपल्या राजलक्ष्मीमुळे आंधळे बनून ब्राह्मणांचे धन हिरावून घेऊ इच्छितात, ते नरकात जाण्याचीच इच्छा करतात. स्वत:ला अध:पतनाच्या किती खोल खड्ड्यात पडावे लागेल, हे ते पाहात नाहीत. (३६)


गृह्णन्ति यावतः पांसून् क्रन्दतामश्रुबिन्दवः ।
विप्राणां हृतवृत्तीनां वदान्यानां कुटुंबिनाम् ॥ ३७ ॥
राजानो राजकुल्याश्च तावतोऽब्दान् निरङ्कुशाः ।
कुंभीपाकेषु पच्यन्ते ब्रह्मदायापहारिणः ॥ ३८ ॥
उदार हृदयी विप्र तमाची वृत्ति छेडिता ।
तयाच्या स्र्हुपाताने जेवढे कळ धूळिचे ॥ ३७ ॥
भिजती तेवढी वर्षे सत्व जो हारितो अशा ।
उताविळ नृपा लाभे नर्क जो कुंभिपाक तो ॥ ३८ ॥

हृतवृत्तीनां वदान्यानां कुटुम्बिनाम् - ज्यांची उपजीविकेची साधने हरण केली गेली आहेत व जे दानशूर असून कुटुंबवत्सल आहेत अशा - क्रन्दतां विप्राणां - आक्रोश करणार्‍या ब्राह्मणांचे - अश्रुबिन्दवः - अश्रुबिंदु - यावतः पांसून् गृह्‌णन्ति - जितक्या धुळीच्या कणांवर पडतील - तावतः अब्दान् - तितकी वर्षेपर्यंत - निरङकुशाः - उच्छृंखल असे - ब्रह्मदायापहारिणः - ब्राह्मणांचे द्रव्य हरण करणारे - राजानः राजकुल्याः च - राजे व राजकुलातील पुरुष - कुम्भीपाकेषु पच्यन्ते - कुंभीपाक नावाच्या नरकात दुःख भोगतात. ॥३७-३८॥
ज्या उदारहृदय, कुटुंबवत्सल ब्राह्मणांच्या उदरनिर्वाहाचे साधन हिरावून घेतले जाते, त्यांच्या रडण्याने पडणार्‍या त्यांच्या अश्रूंच्या थेंबांनी जमिनीवरील जितके धूलिकण भिजतात, तितकी वर्षेपर्यंत ब्राह्मणांचे धन हिरावून घेणार्‍या उच्छृंखल राजांना आणि त्यांच्या वंशजांना कुंभपाक नरकांमध्ये दु:ख भोगावे लागते. (३७-३८)


स्वदत्तां परदत्तां वा ब्रह्मवृत्तिं हरेच्च यः ।
षष्टिवर्षसहस्राणि विष्ठायां जायते कृमिः ॥ ३९ ॥
दुजांचे ऐकुनी शब्द वृत्ती वा धन जे द्विजी ।
लाटितो जन्म त्यां लाभे विष्टेत कीट हो‍उनी ॥ ३९ ॥

च - आणि - यः - जो - स्वदत्तां परदत्तां वा - स्वतः दिलेल्या किंवा दुसर्‍याने दिलेल्या - ब्रह्मवृत्तिं हरेत् - ब्राह्मणांच्या उपजीविकेचे हरण करील - (सः) षष्टिः वर्षसहस्राणि - तो साठ हजार वर्षेपर्यंत - विष्ठायां कृमिः जायते - विष्ठेमधील किडा होतो. ॥३९॥
जो माणूस आपण किंवा दुसर्‍यांनी ब्राह्मणांना दिलेली वृत्ती हिरावून घेतो, तो साठ हजार वर्षे विष्ठेतील किडा होतो. (३९)


न मे ब्रह्मधनं भूयाद् यद् गृध्वाल्पायुषो नराः ।
पराजिताश्च्युता राज्याद्‌ भवन्त्युद्वेजिनोऽहयः ॥ ४० ॥
म्हणोनी इच्छितो मी की चुकोनी कधिही असे ।
द्विजाचे धन ना यावे अल्पायू भोगणे असे ।
पराजय तसा होतो सापाचा जन्मही मिळे ॥ ४० ॥

मे ब्रह्मधनं न भूयात् - माझ्याजवळ ब्राह्मणांचे द्रव्य असू नये - यत् गृध्वा - जे इच्छून - अल्पायुषः नराः - अल्पायु झालेले लोक - पराजिताः राज्यात् च्युताः - पराभव पावलेले व राज्यापासून भ्रष्ट झालेले - उद्वेजिनः अहयः भवन्ति - लोकांना पीडा देणारे साप होतात. ॥४०॥
म्हणून मला वाटते की, ब्राह्मणांचे धन नजरचुकीनेसुद्धा माझ्या खजिन्यात येऊ नये. कारण जे लोक ब्राह्मणांच्या धनाची इच्छा करतात, ते या जन्मामध्ये अल्पायुषी, शत्रूंकडून पराभूत आणि राज्यभ्रष्ट होऊन जातात. तसेच मृत्युनंतरसुद्धा दुसर्‍यांना त्रास देणारे सापच होतात. (४०)


विप्रं कृतागसमपि नैव द्रुह्यत मामकाः ।
घ्नन्तं बहु शपन्तं वा नमस्कुरुत नित्यशः ॥ ४१ ॥
म्हणोनी ऐकणे सर्व अपराध असोनिही ।
न द्वषा ब्राह्मणा केंव्हा शापिताही नमा तया ॥ ४१ ॥

मामकाः - हे माझ्या भक्तांनो - घ्नन्तं बहु शपन्तं - मारणार्‍या किंवा पुष्कळ शाप देणार्‍या - कृतागसं अपि वा - अथवा अपराध करणार्‍याहि - विप्रम् - ब्राह्मणाचा - न एव द्रुह्यत - द्रोह करूच नका - (अपि तु) नित्यशः नमस्कुरुत- पण उलट तुम्ही त्यांना नित्य नमस्कार करा.॥४१॥
म्हणून माझ्या आप्तांनो ! ब्राह्मणांनी जरी अपराध केला तरीसुद्धा त्यांचा द्वेष करू नका. त्यांनी जरी मारले किंवा पुष्कळसे शिव्याशाप दिले, तरी तुम्ही त्यांना नेहेमी नमस्कारच करा. मी जसा सावध राहून वेळोवेळी ब्राह्मणांना नमस्कार करतो, त्याचप्रमाणे तुम्हीही नमस्कारच करा. (४१)


यथाहं प्रणमे विप्रान् अनुकालं समाहितः ।
तथा नमत यूयं च योऽन्यथा मे स दण्डभाक् ॥ ४२ ॥
त्रिकाल वंदितो त्यांना तुम्ही ही त्यां नमा तसे ।
आज्ञाभंग घडे जेंव्हा न क्षमा दंड देइ मी ॥ ४२ ॥

यथा अहं - ज्याप्रमाणे मी - समाहितः - स्वस्थ अंतःकरणाने युक्त असा - अनुकालं विप्रान् प्रणमे - वेळोवेळी ब्राह्मणांना नमस्कार करितो - तथा यूयं च नमत - त्याप्रमाणे तुम्हीही नमस्कार करा - यः अन्यथा सः मे दण्डभाक् - जो तसे न करील तो माझ्या दंडास पात्र होईल.॥४२॥
मी जसा सावध राहून वेळोवेळी ब्राह्मणांना नमस्कार करतो, त्याचप्रमाणे तुम्हीही करा. जे असे करणार नाहीत, त्यांना मी शिक्षा करीन. (४२)


ब्राह्मणार्थो ह्यपहृतो हर्तारं पातयत्यधः ।
अजानन्तमपि ह्येनं नृगं ब्राह्मणगौरिव ॥ ४३ ॥
चोराने चोरिता त्याला अधःपतन ना चुके ।
नृगा जै सहजी शिक्षा लाभली ते तसे घडे ॥ ४३ ॥

हि - कारण - ब्राह्मणगौः - ब्राह्मणाची गाय - अजानन्तम् अपि एनं नृगं इव - जशी न जाणणार्‍याहि ह्या नृगराजाला नरकात पाडिती झाली तसे - अपहृत ब्राह्मणार्थः - हरण केलेले ब्राह्मणाचे द्रव्य - हर्तारं अधः पातयति हि - हरण करणार्‍याला खरोखर नरकात पाडिते. ॥४३॥
नकळतही ब्राह्मणाचे हिरावून घेतलेले धन हिरावून घेणार्‍याचा अध:पात करते. जसे ब्राह्मणाच्या गायीने राजा नृगाला सरडा केले. (४३)


एवं विश्राव्य भगवान्मुकुन्दो द्वारकौकसः ।
पावनः सर्वलोकानां विवेश निजमंदिरम् ॥ ४४ ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां दशमस्कन्धे उत्तरार्धे
नृगोपाखानं नाम चतुःषष्टितमोऽध्यायः ॥ ६४ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
असे वोलोनि भगवान् द्वारकावासि त्या जना ।
आपुल्या मंदिरा माजी गेले तेंव्हा प्रवेशुनी ॥ ४४ ॥
॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर चौसष्टावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

सर्वलोकानां पावनः मुकुन्दः भगवान् - सर्व लोकांना पवित्र करणारा भगवान श्रीकृष्ण - एवं द्वारकौकसः विश्राव्य - याप्रमाणे द्वारकावासी लोकांना सांगून - निजमन्दिरं विवेश - आपल्या मंदिरी गेला. ॥४४॥
सर्व लोकांना पवित्र करणार्‍या भगवान श्रीकृष्णांनी द्वारकावासियांना अशाप्रकारे उपदेश करून ते आपल्या महालात निघून गेले.(४४)


अध्याय चौसष्टावा समाप्त

GO TOP