|
श्रीमद् भागवत पुराण
श्रीकृष्णबाणासुरसंग्रामः; तत्र माहेश्वरज्वरेण श्रीकृष्णांबरोबर बाणासुराचे युद्ध - संहिता - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् ) अपश्यतां चानिरुद्धं तद्बन्धूनां च भारत । चत्वारो वार्षिका मासा व्यतीयुरनुशोचताम् ॥ १ ॥
श्रीशुकदेव सांगतात - ( अनुष्टुप् ) संपला पावसाळाही न पत्ता अनिरुद्धचा । घरचे लोक ते सर्व शोकाकूलित जाहले ॥ १ ॥
भारत - हे परीक्षित राजा - च - आणि - अनिरुद्धं अपश्यतां - अनिरुद्धाला न पहाणार्या - (तं) अनुशोचतां च - आणि त्याच्यासाठी शोक करणार्या - तद्बन्धूनां - त्याच्या बांधवांचे - वार्षिकाः चत्वारः मासाः - पावसाळ्याचे चार महिने - व्यतीयुः - निघून गेले. ॥१॥
श्रीशुक म्हणतात- परीक्षिता ! पावसाळ्याचे चार महिने निघूने गेले; परंतु अनिरुद्धाचा शोध लागला नाही. यामुळे त्यांच्या घरातील लोक अतिशय शोकाकुल झाले होते. (१)
नारदात् तदुपाकर्ण्य वार्तां बद्धस्य कर्म च ।
प्रययुः शोणितपुरं वृष्णयः कृष्णदैवताः ॥ २ ॥
नारदे एकदा सर्व कथिली घडली कथा । कृष्णाने यदुवंशाने चढाई केलि तेधवा ॥ २ ॥
कृष्णदेवताः वृष्णयः - श्रीकृष्णाला देवाप्रमाणे समजणारे यादव - बद्धस्य (तस्य) तत् कर्मवार्तां च - बांधलेल्या अनिरुद्धाचे ते कृत्य व त्याचे वर्तमान - नारदात् उपाकर्ण्य - नारदाकडून ऐकून - शोणितपुरं प्रययुः - शोणितपुराला गेले. ॥२॥
नारदांकडून अनिरुद्धाचा पराक्रम व त्याचे नागपाशात बांधले जाणे, या घटना ऐकून श्रीकृष्णांनाच आपले दैवत मानणार्या यादवांनी शोणितपुरावर चढाई केली. (२)
प्रद्युम्नो युयुधानश्च गदः साम्बोऽथ सारणः ।
नन्दोपनन्दभद्राद्या रामकृष्णानुवर्तिनः ॥ ३ ॥ अक्षौहिणीभिर्द्वादशभिः समेताः सर्वतो दिशम् । रुरुधुर्बाणनगरं समन्तात् सात्वतर्षभाः ॥ ४ ॥
सांब सारण नी नंद प्रद्युम्न गद सात्यकी । सैन्य अक्षौहिणीबारा कृष्ण रामासवे तिथे ॥ ३ ॥ रचोनी व्यूह त्या सर्वे शोणीतपूर घेरिले ॥ ४ ॥
प्रद्युम्नः युयुधानः साम्बः गदः च - प्रद्युम्न, युयुधान, सांब व गद - अथ सारणः (च) नन्दोपनन्दभद्राद्याः रामकृष्णानुवर्तिनः (ययुः) - त्याचप्रमाणे सारण व नन्द, उपनन्द, भद्र इत्यादि बलराम व कृष्ण यांचे अनुयायी गेले. ॥३॥ सात्वतर्षभाः - यादवश्रेष्ठ - द्वादशभिः अक्षौहिणीभिः समेताः - बारा अक्षौहिणी सैन्याने युक्त असे - समन्तात् बाणनगरं सर्वतोदिशं रुरुधुः - सभोवार बाणासुराच्या नगराला सर्व बाजूंनी वेढिते झाले. ॥४॥
श्रीकृष्ण आणि बलराम यांच्याबरोबर असलेल्या प्रद्युम्न, सात्यकी, गद, सांब, सारण, नंद, उपनंद, भद्र इत्यादी यादवश्रेष्ठांनी बारा अक्षौहिणी सेनेचा बाणासुराच्या राजधानीला चारी बाजूंनी वेढा दिला. (३-४)
भज्यमानपुरोद्यान प्राकाराट्टालगोपुरम् ।
प्रेक्षमाणो रुषाविष्टः तुल्यसैन्योऽभिनिर्ययौ ॥ ५ ॥
उद्याने बुरुजे द्वारे सैन्याने फोडिली तसे । क्रोधोनी पातला बाण तेवढे सैन्य घेउनी ॥ ५ ॥
भज्यमानपुरोद्यानप्राकाराटटालगोपुरं प्रेक्षमाणः - मोडून जाणारी नगरातील उद्याने, मंदिरे, गच्च्या, वेशी यांना पहाणारा - रुषा आविष्टः (बाणः) तुल्यसैन्यः - क्रोधाविष्ठ झालेला बाणासुर यादवांच्या सैन्याइतके सैन्य आहे ज्याचे असा - अभिनिर्ययौ - बाहेर पडला. ॥५॥
यादवसेना नगरातील उद्याने, तट, बुरूज आणि गोपुरे यांची तोड-फोड करू लागली आहे, हे पाहून क्रोधाविष्ट बाणासुर बारा अक्षौहिणी सेना घेऊन नगराच्या बाहेर पडला. (५)
बाणार्थे भगवान् रुद्रः ससुतः प्रमथैर्वृतः ।
आरुह्य नन्दिवृषभं युयुधे रामकृष्णयोः ॥ ६ ॥
बाणासुरा कडोनीया प्रत्यक्ष शिव कार्तिक । गणांच्या सह ते आले लढाया रामकृष्णसी ॥ ६ ॥
भगवान् रुद्रः - भगवान शंकर - स्वसुतैः प्रमथैः वृतः - पुत्रांनी व प्रमथादि शिवगणांनी वेष्टिलेला असा - बाणार्थे - बाणासुरासाठी - नन्दिवृषभं आरुह्य - नंदिबैलावर बसून - रामकृष्णयोः युयुधे - बलराम व श्रीकृष्ण यांच्याशी युद्ध करू लागला. ॥६॥
बाणासुराच्या बाजूने भगवान शंकर नंदीवर स्वार होऊन आपले पुत्र आणि गणांसह राम-कृष्णांशी युद्ध करू लागले. (६)
आसीत् सुतुमुलं युद्धं अद्भुतं रोमहर्षणम् ।
कृष्णशङ्करयो राजन् प्रद्युम्नगुहयोरपि ॥ ७ ॥
घोरयुद्ध असे झाले पाहता रोम ठाकती । प्रद्युम्न कार्तिकेयासी लढले कृष्ण नी शिव ॥ ७ ॥
राजन् - हे राजा - कृष्णशंकरयोः - श्रीकृष्ण व शंकर यांचे - प्रद्युम्नगुहयोः अपि - प्रद्युम्न व कार्तिकस्वामी यांचेहि - रोमहर्षणं तुमुलं अद्भुतं युद्धं आसीत् - अंगावर रोमांच आणणारे घनघोर व आश्चर्यजनक युद्ध झाले. ॥७॥
परीक्षिता ! ते युद्ध इतके अद्भूत आणि घनघोर झाले की, ते पाहून अंगावर रोमांच उठत. भगवान श्रीकृष्णांशी शंकरांचे आणि प्रद्युम्नाशी कार्तिकेयाचे युद्ध झाले. (७)
कुम्भाण्डकूपकर्णाभ्यां बलेन सह संयुगः ।
साम्बस्य बाणपुत्रेण बाणेन सह सात्यकेः ॥ ८ ॥
कुभांड कूपकर्णासी लढले बलराम ते । सांब त्या बाणपुत्रांसी बाणासी सात्यकी लढे ॥ ८ ॥
कुम्भाण्डकूपकर्णाभ्यां सह बलेन संयुगः - कुंभांड व कूपकर्ण यांच्याशी बलरामाचे युद्ध झाले - साम्बस्य बाणपुत्रेण - सांबाचे बाणपुत्राशी - सात्यकेः बाणेन सह - सात्यकीचे बाणासुराशी. ॥८॥
बलरामांशी कुंभांडाचे आणि कूपकर्णाचे युद्ध झाले. बाणासुराच्या पुत्राला सांब आणि बाणासुराला सात्यकी जाऊन भिडले. (८)
ब्रह्मादयः सुराधीशा मुनयः सिद्धचारणाः ।
गन्धर्वाप्सरसो यक्षा विमानैर्द्रष्टुमागमन् ॥ ९ ॥
ब्रह्मादि देवता सिद्ध गंधर्व अप्सरा तशा । विमानी चढुनी आल्या युद्ध ऐसे पहावया ॥ ९ ॥
ब्रह्मादयः सुराधीशाः - ब्रह्मादिक मोठमोठे देव - मुनयः सिद्धचारणाः - मुनि, सिद्ध व चारण - गन्धर्वाप्सरसः यक्षाः - गंधर्व, अप्सरा व यक्ष - विमानैः दृष्टुं आगमन् - विमानातून युद्ध पहाण्यासाठी आले. ॥९॥
ब्रह्मदेव इत्यादी श्रेष्ठ देव, ऋषी, सिद्ध, चारण, गंधर्व, अप्सरा आणि यक्ष विमानांत बसून ते युद्ध पाहाण्यासाठी आले. (९)
शङ्करानुचरान् शौरिः भूतप्रमथगुह्यकान् ।
डाकिनीर्यातुधानांश्च वेतालान् सविनायकान् ॥ १० ॥ प्रेतमातृपिशाचांश्च कुष्माण्डान् ब्रह्मराक्षसान् । द्रावयामास तीक्ष्णाग्रैः शरैः शार्ङ्गधनुश्च्युतैः ॥ ११ ॥
शंकरानुचरो भूते प्रेत प्रथम गुह्यक । डाकिनी यातुधान् तैसे वेताळ नी विनायिका ॥ १० ॥ मातृगण पिशाच्चे नी कूष्मांड ब्रह्मराक्षसां । शार्ङ्गधनूस योजोनी अचुते मार मारिले ॥ ११ ॥
शौरिः - श्रीकृष्ण - शङ्करानुचरान् - शंकराचे सेवक अशा - भूतप्रमथगुह्यकान् - भूते, प्रमथ व गुह्यक यांना - डाकिनीः यातुधानाः - डाकिणी यातुधान - विनायकान् वेतालान् च - व विनायकासह वेताळांना - प्रेतमातृपिशाचान् च कूष्माण्डान् - प्रेत, मातृदेवता, पिशाचे व कूष्मांड यांना - ब्रह्मराक्षसान् - ब्रह्मराक्षसांना - शार्ङगधनुश्चुतैः तीक्ष्णाग्रैः शरैः - शार्ङग धनुष्यापासून सुटलेल्या बारीक टोकांच्या बाणांनी - द्रावयामास - पळवून लाविता झाला. ॥१०-११॥
श्रीकृष्णांनी आपल्या शार्ड्ग. धनुष्यावरून सोडलेल्या तीक्ष्ण टोकाच्या बाणांनी शंकरांचे सेवक असलेले भूत, प्रेत, प्रमथ, गुह्यक, डाकिणी, यातुधान, वेताल, विनायक, प्रेतगण, मातृगण, पिशाच, कूष्मांड आणि ब्रह्मराक्षस यांना मारून पळवून लावले. (१०-११)
पृथग्विधानि प्रायुङ्क्त पिणाक्यस्त्राणि शाङ्र्गिणे ।
प्रत्यस्त्रैः शमयामास शार्ङ्गपाणिरविस्मितः ॥ १२ ॥
कृष्णा अन्यान्य शस्त्राने वेधिले शिवशंकरे । कृष्णाने सहजी सर्व केले शांत तदा पहा ॥ १२ ॥
पिनाकी - पिनाक धनुष्य धारण करणारा शंकर - पृथग्विधानि अस्त्राणि - निरनिराळ्या प्रकाराची अस्त्रे - शार्ङगिणे प्रायुङ्क्त - शार्ङग धनुष्य धारण करणार्या श्रीकृष्णावर सोडिता झाला - शार्ङगपाणिः - श्रीकृष्ण (विष्णु) - अविस्मितः - आश्चर्य न करिता - प्रत्यस्त्रैः (तानि) शमयामास - विरुद्ध अस्त्रे सोडून त्या अस्त्रांना शांत करिता झाला.॥१२॥
पिनाकपाणी शंकरांनी शार्ड्गधारी श्रीकृष्णांवर निरनिराळ्या प्रकारची अस्त्रे फेकली, परंतु श्रीकृष्णांनी कोणत्याही प्रकारे विचलित न होता त्यांना आपल्या विरोधी अस्त्रांनी शांत केले. (१२)
ब्रह्मास्त्रस्य च ब्रह्मास्त्रं वायव्यस्य च पार्वतम् ।
आग्नेयस्य च पार्जन्यं नैजं पाशुपतस्य च ॥ १३ ॥
योजी ब्रह्मास्त्र ब्रह्मास्त्रा वायूस पर्वतास्त्र ते । पर्जन्य अग्निसी तैसे नैजो ते पाशुपातला ॥ १३ ॥
ब्रह्मास्त्रस्य च ब्रह्मास्त्रं - ब्रह्मास्त्राच्या परिहारार्थ ब्रह्मास्त्र - च वायव्यस्य पार्वतम् - व वायव्य अस्त्राविरुद्ध पर्वतास्त्र - च आग्नेयस्य पार्जन्यं - आणि अग्नि अस्त्राच्या विनाशार्थ पर्जन्यास्त्र - च पाशुपतस्य नैजं - आणि पाशुपतास्त्राच्या शमनार्थ स्वतःचे नारायणास्त्र. ॥१३॥
त्यांनी ब्रह्मास्त्राच्या शांतीसाठी ब्रह्मास्त्राचा, वायव्यास्त्रासाठी पर्वतास्त्राचा, आग्नेयास्त्रासाठी पर्जन्यास्त्राचा आणि पाशुपतास्त्रासाठी नारायणास्त्राचा प्रयोग केला. (१३)
मोहयित्वा तु गिरिशं जृम्भणास्त्रेण जृम्भितम् ।
बाणस्य पृतनां शौरिः जघानासिगदेषुभिः ॥ १४ ॥
जांभई अस्त्र श्रीकृष्णे योजिले शंकरा पुन्हा । युद्ध सोडोनि तो देई जांभया सारख्या तशा । हरा सोडोनिया कृष्णे सैन्यसंहार मांडिला ॥ १४ ॥
शौरिः तु - श्रीकृष्ण तर - जृम्भणास्त्रेण जृंभितं गिरिशं मोहयित्वा - जृम्भकास्त्राने जांभया देऊ लागलेल्या शंकराला मोहित करून - असिगदेषुभिः बाणस्य पृतनां जघान - तलवार, गदा व बाण यांनी बाणासुराच्या सेनेला मारिता झाला. ॥१४॥
यानंतर भगवान श्रीकृष्णांनी जृंभणास्त्राने महादेवांना मोहित केले. त्यामुळे ते युद्ध सोडून जांभया देऊ लागले. तेव्हा श्रीकृष्ण तलवार, गदा आणि बाणांनी बाणसुराच्या सेनेचा संहार करू लागले. (१४)
स्कन्दः प्रद्युम्नबाणौघैः अर्द्यमानः समन्ततः ।
असृग् विमुञ्चन् गात्रेभ्यः शिखिनापक्रमद् रणात् ॥ १५ ॥
प्रद्युम्न इकडे बाणें केले घायाळ कार्तिका । अंगांगी पातले रक्त पळाले मयुरासह ॥ १५ ॥
स्कन्दः - कार्तिकस्वामी - समन्ततः - चारहि बाजूंनी - प्रद्युम्नबाणौघैः अर्द्यमानः - प्रद्युम्नाच्या अनेक बाणांनी पीडिला जाणारा - गात्रेभ्यः असृक् विमुञ्चन् - अंगापासून रक्त गाळीत - शिखिना रणात् अपाक्रमत् - मोरावरून युद्धभूमी पासून निघून गेला. ॥१५॥
इकडे प्रद्युम्नाने बाणांच्या वर्षावाने कार्तिकेयाला घायाळ केले. त्याच्या अंगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. तो रणांगण सोडून आपले वाहन असणार्या मयूरावर बसून निघून गेला. (१६)
कुम्भाण्डः कूपकर्णश्च पेततुर्मुषलार्दितौ ।
दुद्रुवुस्तदनीकनि हतनाथानि सर्वतः ॥ १६ ॥
बळीच्या मुसळी मारे कुभांड कूपकर्णक । पडले रणभूमीसी सेना सर्वत्र पांगली ॥ १६ ॥
कुम्भाण्डः कूपकर्णः च - कुंभांड आणि कूपकर्ण - मुसलार्दितौ पेततुः - बलरामाच्या मुसळाने पीडित होऊन जमिनीवर पडले - हतनाथानि तदनीकानि - ज्यांचा स्वामी मृत झाला आहे अशी कुंभांड व कूपकर्ण यांची सैन्ये - सर्वतः दुद्रुवुः - जिकडे तिकडे पळून गेली. ॥१६॥
बलरामांनी आपल्या मुसळाच्या प्रहाराने कुंभांड आणि कूपकर्णाला घायाळ केले. ते रणभूमीवर कोसळले. अशा प्रकारे सेनापतींची वाताहत झालेली पाहून त्यांची सेना इकडे तिकडे पळू लागली. (१६)
विशीर्यमाणं स्वबलं दृष्ट्वा बाणोऽत्यमर्षणः ।
कृष्णं अभ्यद्रवत् संख्ये रथी हित्वैव सात्यकिम् ॥ १७ ॥
पाहता क्रोधला दैत्य चिडोनी सोडि सात्यकी । लढाया धावला वेगे कृष्णाच्या वरि तेधवा ॥ १७ ॥
रथी अत्यमर्षणः बाणः - रथात बसलेला असा अत्यंत क्रोधाविष्ट झालेला बाणासुर - स्वबलं विशीर्यमाणं दृष्ट्वा - आपले सैन्य अस्ताव्यस्त झालेले पाहून - सात्यकिं हित्वा - सात्यकीला सोडून - संख्ये कृष्णाम् एव अभ्यद्रवत् - युद्धभूमीवर श्रीकृष्णाकडेच धावत आला. ॥१७॥
रथावर स्वार झालेल्या बाणासुराला आपली सेना पळत असलेली पाहून अतिशय क्रोध आला. त्याने सात्यकीला सोडले आणि तो श्रीकृष्णांवर धावला. (१७)
धनूंष्याकृष्य युगपद् बाणः पञ्चशतानि वै ।
एकैकस्मिन् शरौ द्वौ द्वौ सन्दधे रणदुर्मदः ॥ १८ ॥
पाचशे धनु तो घेई हजार हात योजुनी । हजार लाविले बाण एकेका धनुसी द्वय ॥ १८ ॥
रणदुर्मदः बाणः - युद्धांविषयी फार गर्विष्ठ झालेला बाण - युगपत् पंचशतानि वै धनूंषि आकृष्य - एकाच वेळी एकदम पाचशे धनुष्ये ओढून - एकैकस्मिन् द्वौ द्वौ शरौ संदधे - प्रत्येक धनुष्यावर दोन दोन बाण जोडिता झाला. ॥१८॥
रणोन्मत्त बाणासुराने आपल्या एक हजार हातांनी एकाचवेळी पाचशे धनुष्यांच्या दोर्या खेचून प्रत्येकांतून दोन दोन बाण सोडले. (१८)
तानि चिच्छेद भगवान् धनूंसि युगपद्धरिः ।
सारथिं रथमश्वांश्च हत्वा शङ्खमपूरयत् ॥ १९ ॥
परंतु भगवान् कृष्णे सर्व ते बाण नी धनू । सारथी रथिचे घोडे तोडोनी शंख फुंकिला ॥ १९ ॥
भगवान् हरिः - भगवान श्रीकृष्ण - तानि धनूंषि युगपत् चिच्छेद - ती धनुष्ये एकदम तोडिता झाला - सारथिं रथं अश्वान् च हत्वा - सारथि, रथ व घोडे यांना मारून - शङ्खं अपूरयत् - शंख वाजविता झाला. ॥१९॥
परंतु भगवान श्रीकृष्णांनी एकाच वेळी त्याची सर्व धनुष्ये तोडून टाकली आणि त्याचे सारथी, रथ व घोड्यांना मारले व जयशंखध्वनी केला. (१९)
तन्माता कोटरा नाम नग्ना मक्तशिरोरुहा ।
पुरोऽवतस्थे कृष्णस्य पुत्रप्राणरिरक्षया ॥ २० ॥
कोटरा नावची देवी नागवी केश सोडिता । रक्षाया पुत्र तो बाण कृष्णा समिप पातली ॥ २० ॥
कोटरा नाम तन्माता - कोटरा नावाची त्याची माता - नग्ना मुक्तशिरोरुहा - नग्न होऊन व केस मोकळे सोडून - पुत्रप्राणरिरक्षया - पुत्राच्या प्राणांचे रक्षण करण्याच्या इच्छेने - कृष्णस्य पुरः अवतस्थे - श्रीकृष्णाच्या पुढे उभी राहिली. ॥२०॥
कोटरा नावाची बाणासुराची एक धर्ममाता होती. आपल्या पुत्राच्या प्राणरक्षणासाठी आपले केस मोकळे सोडून नग्नावस्थेत, ती भगवान श्रीकृष्णांसमोर येऊन उभी राहिली. (२०)
ततस्तिर्यङ्मुखो नग्नां अनिरीक्षन् गदाग्रजः ।
बाणश्च तावद् विरथः छिन्नधन्वाविशत् पुरम् ॥ २१ ॥
दृष्टी न टाकिता कृष्णे अन्यत्र पाहिले असे । बाण तो रथहीनोची नगरीं पातला तदा ॥ २१ ॥
ततः गदाग्रजः - नंतर श्रीकृष्ण - नग्नां अनिरीक्षन् - नग्न अशा कोटरेकडे न पहाता - तिर्यङ्मुखः (अभूत्) - बाजूला मुख वळविता झाला - तावत् च बाणः - आणि तेवढयाच अवधीत बाणासुर - विरथः छिन्नधन्वा - रथरहित व तुटले आहे धनुष्य ज्याचे असा - पुरं अविशत् - नगरात शिरला. ॥२१॥
तिच्यावर आपली दृष्टी पडू नये, म्हणून श्रीकृष्णांनी आपले तोंड दुसरीकडे फिरविले. तोपर्यंत बाणासुराची धनुष्ये व रथ मोडल्यामुळे तो आपल्या नगराकडे परतला. (२१)
विद्राविते भूतगणे ज्वरस्तु त्रीशिरास्त्रिपात् ।
अभ्यधावत दाशार्हं दहन्निव दिशो दश ॥ २२ ॥
त्रिपाद त्रिशिरे ऐसा शंकरे ज्वर सोडिला । दाही दिशास जाळोनी कृष्णाच्या वरि धाडिला ॥ २२ ॥
त्रिशिराः त्रिपात् ज्वरः तु - तीन मस्तके व तीन पाय असलेला ज्वर तर - भूतगणे विद्राविते - भूतगण पळू लागला असता - दश दिशः दहन् इव - दाही दिशांना जाळीतच की काय - दाशार्हं अभ्यधावत - श्रीकृष्णावर धावला. ॥२२॥
इकडे शंकरांचे भूतगण जेव्हा इकडे-तिकडे विखुरले गेले, तेव्हा तीन मस्तके आणि तीन पायांचा ज्वर जणू दाही दिशा जाळीत श्रीकृष्णांवर धावला. (२२)
अथ नारायणः देवः तं दृष्ट्वा व्यसृजज्ज्वरम् ।
माहेश्वरो वैष्णवश्च युयुधाते ज्वरावुभौ ॥ २३ ॥
ज्वर तो आपुला कृष्णे त्याच्या वरिच सोडिला । महेश वैष्णवी ऐसे ज्वर ते लढु लागले ॥ २३ ॥
अथ - नंतर - देवः नारायणः - दैदीप्यमान श्रीकृष्ण - तं दृष्ट्वा - त्या ज्वराला पाहून - (निजं) ज्वरं व्यसृजत् - आपला ज्वर सोडिता झाला - माहेश्वरः वैष्णवः च (इति) उभौ ज्वरौ (मिथः) युयुधाते - माहेश्वर व वैष्णव असे ते दोन ज्वर एकमेकांशी युद्ध करू लागले. ॥२३॥
तो आपल्याकडे येत असलेला पाहून भगवान श्रीकृष्णांनी आपला ज्वर सोडला. आता वैष्णव आणि माहेश्वर हे दोन्ही ज्वर आपापसात लढू लागले. (२३)
माहेश्वरः समाक्रन्दन् वैष्णवेन बलार्दितः ।
अलब्ध्वाभयमन्यत्र भीतो माहेश्वरो ज्वरः । शरणार्थी हृषीकेशं तुष्टाव प्रयताञ्जलिः ॥ २४ ॥
वैष्णवीज्वर तेजाने महेश्ज्वर त्रासला । पळाला भिवुनी चिर्के न त्राता त्याजला मिळे । तेधवा नम्र होवोनी कृष्णाला प्रार्थु लागला ॥ २४ ॥
वैष्णवेन बलार्दितः माहेश्वरः समाक्रंदन् - वैष्णवज्वराने बलात्काराने पीडिलेला माहेश्वर ज्वर आक्रोश करीत - अन्यत्र अभयं अलब्ध्वा - दुसरीकडे अभय न मिळाल्यामुळे - भीतः - भिऊन गेला - माहेश्वरः ज्वरः - तो माहेश्वर ज्वर - शरणार्थी प्रयताञ्जलिः - रक्षणाची इच्छा करणारा असा हात जोडून - हृषीकेशं तुष्टाव - श्रीकृष्णाची स्तुती करिता झाला. ॥२४॥
तेव्हा वैष्णव ज्वराच्या तेजाने माहेश्वर ज्वर हवालदिल होऊन ओरडू लागला आणि तो भयभीत झाला. जेव्हा त्याला कोठेही आश्रय मिळाला नाही, तेव्हा आपले रक्षण व्हावे, म्हणून अत्यंत नम्रतेने हात जोडून तो श्रीकृष्णांना प्रार्थना करू लागला. (२४)
ज्वर उवाच -
( मिश्र ) नमामि त्वानन्तशक्तिं परेशं सर्वात्मानं केवलं ज्ञप्तिमात्रम् । विश्वोत्पत्तिस्थानसंरोधहेतुं यत्तद् ब्रह्म ब्रह्मलिङ्गं प्रशान्तम् ॥ २५ ॥
ज्वर म्हणाला - ( शालिनी ) ऐशी शक्ती अंत ना तो तुझा की सर्वात्मा तू केवळ ज्ञानमूर्ती । श्रुतिंना जे वर्णिता ये न ऐसे ऐशा ब्रह्मा मी नमीतो सदाचा ॥ २५ ॥
अनन्तशक्तिं - अगणित शक्तिमान - सर्वात्मानं - सर्वांचा आत्मा - केवलं ज्ञप्तिमात्रं - केवळ ज्ञानस्वरूप - विश्वोत्पत्तिस्थानसंरोधहेतुं - जगाची उत्पत्ति, स्थिती व संहार यांना कारणीभूत - यत् ब्रह्म तत् - जे ब्रह्म म्हणतात तत्स्वरूपी - ब्रह्मलिङगं प्रशान्तं - वेदांनी ज्याचे ज्ञान होते व जो शान्तस्वरूप - परेशं त्वां नमामि - असा जो तू परमेश्वर त्या तुला मी नमस्कार करतो. ॥२५॥
माहेश्वर ज्वर म्हणाला- हे प्रभो ! आपली शक्ती अनंत आहे. आपण परमेश्वर आहात, आत्मा आहात. आपण अद्वितीय आणि परम ज्ञानस्वरूप आहात. संसाराची उत्पत्ती, स्थिती आणि संहार यांचे कारण आपणच आहात. श्रुती आपलेच वर्णन करतात. आपण समस्त विकाररहित असे स्वत: ब्रह्म आहात. मी आपणांस प्रणाम करीत आहे. (२५)
कालो दैवं कर्म जीवः स्वभावो
द्रव्यं क्षेत्रं प्राण आत्मा विकारः । तत्सङ्घातो बीजरोहप्रवाहः त्वन्मायैषा तन्निषेधं प्रपद्ये ॥ २६ ॥
कालो दैवो कर्म जीवस्वभाव द्रव्यो क्षेत्रो प्राण आत्मा विकार । या संघाने बीज पेरोनि देसी माया सारी ही तुझी, मी नमीतो ॥ २६ ॥
कालः दैवं कर्म जीवः स्वभावः द्रव्यं क्षेत्रं प्राणः आत्मा विकारः - काल, दैव, कर्म, जीव, स्वभाव, द्रव्य, शरीर, प्राण, आत्मा व विकार - तत्संघातः - त्या सर्वांचा समूह - बीजरोहप्रवाहः - बीज व अंकुर यांची परंपरा - एषा त्वन्माया - ही तुझी माया होय - तन्निषेधं (त्वां) प्रपद्ये - त्या मायेचा निषेध करणार्या तुला शरण आलो आहे. ॥२६॥
काल, दैव, कर्म, जीव, स्वभाव, द्रव्य, शरीर, सूत्रात्मा प्राण, अंहकार, अकरा इंद्रिये आणि पंचमहाभूते या सर्वांचा समुदाय असलेले लिंग शरीर आणि बीजांकुर न्यायानुसार त्याचे कर्म व कर्मातून पुन्हा लिंगशरीराची उत्पत्ती, ही सर्व आपली माया आहे. आपण मायेच्या पलीकडे आहात. मी आपणास शरण आलो आहे. (२६)
नानाभावैर्लीलयैवोपपन्नैः
देवान् साधून् लोकसेतून्बिभर्षि । हंस्युन्मार्गान् हिंसया वर्तमानान् जन्मैतत्ते भारहाराय भूमेः ॥ २७ ॥
नाना भावे खेळशी खेळ ऐसा साधूदेवा धर्मकार्ये करीशी । हिंसी ऐसे दैत्यही मारतोशी घेशी रूपा भारत्यागा धरेच्या ॥ २७ ॥
लीलया उपपन्नैः - लीलेने धारण केलेल्या - मानाभावैः एव - अनेक अवतारांनीच - लोकसेतून् देवान् साधून् बिभर्षि - लोकांचे धर्मरक्षण करणार्या देवांचे व साधूंचे तू पालन करतोस - हिंसया वर्तमानान् उन्मार्गान् हंसि - हिंसा करणार्या दुष्टांना तू मारतोस - भूमेः भारहाराय एतत् ते जन्म (अस्ति) - पृथ्वीचा भार दूर करण्याकरिता हा तुझा जन्म आहे. ॥२७॥
आपण लीलेनेच अनेक रूपे धारण करून देव, साधू व लोकमर्यादांचे पालन करता. त्याचबरोबर उन्मत्त आणि हिंसक अशा असुरांचा संहारही करता. आपला हा अवतार पृथ्वीवरील भार उतरविण्यासाठी झाला आहे. (२७)
तप्तोऽहं ते तेजसा दुःसहेन
शान्तोग्रेणात्युल्बणेन ज्वरेण । तावत्तापो देहिनां तेऽङ्घ्रिमूलं नो सेवेरन् यावदाशानुबद्धाः ॥ २८ ॥
तापे मी या रे ज्वरे त्रासलो की शांतो उग्रोतेज ते हे तुझेची । राही तापो देहधार्या तदाचा जो पर्यंतो येत ना या पदासी ॥ २८ ॥
अहं - मी - ते शान्तोग्रेण अत्युल्बणेन ज्वरेण - तुझ्या शीतज्वरनामक अत्यंत प्रखर ज्वराने - दुःसहेन तेजसा - असह्य तेजामुळे - तप्तः (अस्मि) - संतप्त झालो आहे - आशानुबद्धाः - विषयेच्छा करणारे पुरुष - यावत् ते अङ्घ्रिमूलं नो सेवेरन् - जोपर्यंत तुझ्या चरणाचे सेवन करीत नाहीत - तावत् (तेषां) देहिनां (त्वत्तः) तापः - तोपर्यंत त्या पुरुषांना तुझ्यापासून ताप होतो. ॥२८॥
हे प्रभो ! आपल्या शांत, उग्र आणि अत्यंत भयानक, दु:सह अशा तेजस्वी ज्वरामुळे मी अत्यंत तप्त होऊ लागलो आहे. भगवन ! देहधारी जीव जोपर्यंत आशेच्या फासात अडकून आपल्या चरणकमलांना शरण येत नाही, तोपर्यंत त्याचे ठिकाणी ताप राहातोच. (२८)
श्रीभगवानुवाच -
( अनुष्टुप् ) त्रिशिरस्ते प्रसन्नोऽस्मि व्येतु ते मज्ज्वराद्भयम् । यो नौ स्मरति संवादं तस्य त्वन्न भवेद्भयम् ॥ २९ ॥
श्रीभगवान म्हणाले - ( अनुष्टुप् ) त्रिशिरा निर्भयो राही प्रसन्न जाहलो तुला । स्मरे संवाद हा त्याला तुझे ना भय ते कधी ॥ २९ ॥
त्रिशिरः - हे माहेश्वर ज्वरा - ते प्रसन्नः अस्मि - मी तुझ्य़ावर प्रसन्न झालो आहे - मज्ज्वरात् ते भयं व्येतु - माझ्या वैष्णव ज्वरापासून तुला वाटणारे भय दूर होवो - यः नौ संवादं स्मरति - जो आपला उभयतांचा संवाद स्मरेल - तस्य त्वत् भयं न भवेत् - त्याला तुझ्यापासून भय नसो. ॥२९॥
श्रीभगवान म्हणाले- "हे त्रिशिरा ! मी तुझ्यावर प्रसन्न आहे; आता माझ्या या ज्वरापासूनचे तुला वाटणारे भय दूर होवो. जगात जो कोणी आम्हा दोघांच्या या संवादाचे स्मरण करील, त्याला तुझ्यापासून काहीही भय राहणार नाही. (२९)
इत्युक्तोऽच्युतमानम्य गतो माहेश्वरो ज्वरः ।
बाणस्तु रथमारूढः प्रागाद्योत्स्यञ्जनार्दनम् ॥ ३० ॥
वदता कृष्ण हे ऐसे गेला अन्मुनि तो ज्वर । रथी बैसोनि तेंव्हा तो लढाया बाण पातला ॥ ३० ॥
इति उक्तः माहेश्वरः ज्वरः - अशा रीतीने बोलला गेलेला माहेश्वर ज्वर - अच्युतं आनम्य गतः - श्रीकृष्णाला नमस्कार करून निघून गेला - बाणः तु - बाणासुर तर - रथम् आरूढः - रथात बसलेला असा - जनार्दनं योत्स्यन् प्रागात् - श्रीकृष्णाशी युद्ध करण्यासाठी आला. ॥३०॥
श्रीकृष्णांनी असे म्हटल्यानंतर माहेश्वर ज्वर त्यांना प्रणाम करून निघून गेला. तोपर्यंत बाणासुर रथावर स्वार होऊन श्रीकृष्णांशी युद्ध करण्यासाठी पुन्हा आला. (३०)
ततो बाहुसहस्रेण नानायुधधरोऽसुरः ।
मुमोच परमक्रुद्धो बाणांश्चक्रायुधे नृप ॥ ३१ ॥
सहस्र बाहुशी तेणे सहस्र शस्त्र घेतले । चक्रपाणीवरी क्रोधे तिरांचे वृष्टी तो करी ॥ ३१ ॥
नृप - हे राजा - ततः - नंतर - नानायुधधर असुरः - अनेक आयुधे धारण करणारा बाणासुर - परमक्रुद्धः - फार रागावून - बाहुसहस्त्रेण - हजार हातांनी - चक्रायुधे बाणान् मुमोच - श्रीकृष्णाच्या अंगावर बाण सोडिता झाला. ॥३१॥
परीक्षिता ! बाणसुराने आपल्या हजार हातांमध्ये निरनिराळ्या प्रकारची शस्त्रे घेतली होती. आता तो अत्यंत क्रोधाने चक्रपाणी भगवंतांवर बाणांचा वर्षाव करू लागला. (३१)
तस्यास्यतोऽस्त्राण्यसकृत् चक्रेण क्षुरनेमिना ।
चिच्छेद भगवान्बाहून् शाखा इव वनस्पतेः ॥ ३२ ॥
कृष्णाने पाहिली वृष्टी तदा तो चक्र सोडुनी । लागला बाहु छेदाया फांद्या त्या तोडणे तसे ॥ ३२ ॥
भगवान् - श्रीकृष्ण - क्षुरनेमिना चक्रेण - ज्याची धार वस्तर्याप्रमाणे तीक्ष्ण आहे अशा सुदर्शन चक्राने - असकृत् अस्त्राणि अस्यतः तस्य - वारंवार अस्त्रे फेकणार्या त्या बाणासुराचे - बाहून् - हात - वनस्पतेः शाखाः इव - झाडाच्या फांद्यांप्रमाणे - चिच्छेद - तोडिता झाला. ॥३२॥
श्रीकृष्णांनी एकसारखी अस्त्रे फेकणार्या बाणासुराचे हात तीक्ष्ण धारेच्या चक्राने झाडाच्या फांद्या तोडाव्या, तसे तोडून टाकले. (३२)
बाहुषु छिद्यमानेषु बाणस्य भगवान् भवः ।
भक्तानकम्प्युपव्रज्य चक्रायुधमभाषत ॥ ३३ ॥
तुटल्या बाहु त्या तैशा शंकरे पाहिले तदा । कृष्णाचा जवळी येता लागले स्तुति गावया ॥ ३३ ॥
भक्तानुकम्पी भगवान् भवः - भक्तांवर प्रेम करणारा भगवान शंकर - बाणस्य बाहुषु छिद्यमानेषु - बाणाचे हात तोडले जात असता - चक्रायुधम् उपव्रज्य अभाषत - श्रीकृष्णाजवळ येऊन म्हणाला. ॥३३॥
बाणासुराचे हात तोडले जात असताना भक्तवत्सल भगवान शंकर, चक्रधारी भगवान श्रीकृष्णांजवळ येऊन स्तुती करू लागले. (३३)
श्रीरुद्र उवाच -
त्वं हि ब्रह्म परं ज्योतिः गूढं ब्रह्मणि वाङ्मये । यं पश्यन्त्यमलात्मान आकाशमिव केवलम् ॥ ३४ ॥
भगवान रुद्र म्हणाले - तूचि ब्रह्म परंज्योती मंत्राने झाकल्या रुपी । निर्विकार तुझ्या रूपा महात्मे नित्य जाणिती ॥ ३४ ॥
त्वं हि ब्रह्म - तू खरोखर ब्रह्म आहेस - (त्वं हि) वाङ्मये ब्रह्मणि गूढं परं ज्योतिः - तूच शब्दाब्रह्मामध्ये गुप्ते रीतीने असणारे श्रेष्ठ तेज आहेस - अमलात्मानः - निर्मळ अन्तःकरणाचे साधु - यं - ज्याला - आकाशं इव केवलं - आकाशाप्रमाणे एकरूपी असा - पश्यन्ति - पहातात. ॥३४॥
भगवान शंकर म्हणाले- हे प्रभो ! वेदमंत्रांमध्ये आपण तात्पर्यरूपाने गुप्त असणारे, परमज्योतिस्वरूप, परब्रह्म आहात. शुद्ध हृदयाचे महात्मे आपल्या आकाशाप्रमाणे सर्वव्यापक आणि निर्विकार अशा स्वरूपाचा साक्षात्कार करून घेतात. (३४)
( मिश्र )
नाभिर्नभोऽग्निर्मुखमम्बु रेतो द्यौः शीर्षमाशाः श्रुतिरङ्घ्रिरुर्वी । चन्द्रो मनो यस्य दृगर्क आत्मा अहं समुद्रो जठरं भुजेन्द्रः ॥ ३५ ॥
( इंद्रवज्रा ) नाभी नभो अग्नि मुखो तुझे ते ती वीर्य पाणी शिर स्वर्ग शोभे । मी तो अहंकार नि चंद्र चित्त सूर्यो तुझे नेत्र नि इंद्र बाहु ॥ ३५ ॥
यस्य (ते) नाभिः नभः - ज्या तुझी बेंबी म्हणजे आकाश होय - मुखं अग्निः - मुख म्हणके अग्नि - रेतः अम्बु - वीर्य हे उदक - शीर्षाद्यौः - मस्तक स्वर्ग - श्रुतिः आशाः - कान ह्या दिशा - अङ्घ्रिः उर्वी - पाय ही पृथ्वी - मन चंद्रः - मन हा चंद्र - दृक् अर्कः - दृष्टि हा सूर्य - आत्मा अहं - आत्मा हा मी शंकर - जठरं समुद्रः- उदर हा समुद्र - भुजेन्द्रः - बाहु हा इंद्र. ॥३५॥
आकाश आपली नाभी, अग्नी मुख आणि पाणी वीर्य आहे. स्वर्ग मस्तक, दिशा कान आणि पृथ्वी चरण आहे. चंद्र मन, सूर्य नेत्र आणि मी शिव आपला अंहकार आहे. समुद्र आपले पोट आणि इंद्र हात आहे. (३५)
रोमाणि यस्यौषधयोऽम्बुवाहाः
केशा विरिञ्चो धिषणा विसर्गः । प्रजापतिर्हृदयं यस्य धर्मः स वै भवान् पुरुषो लोककल्पः ॥ ३६ ॥
वनस्पती रोम नि मेघ केस प्रजापती लिंग हृदेय धर्म । त्या लोकपाला तुलना जयाची तो तू स्वताची पुरुषो असा की ॥ ३६ ॥
यस्य रोमाणि ओषधयः - ज्याची रोमे (लव) ह्या औषधी - केशाः अम्बुवाहाः - केस हे मेघ - धिषणा विरिञ्चः - बुद्धी हा ब्रह्मदेव - विसर्गः प्रजापतिः - शिस्न हेच प्रजापति होय - यस्य हृदयं धर्मः - ज्याचे हृदय हा धर्म - सः वै भवान् लोककल्पः पुरुषः - तोच तू लोकांमध्ये कल्पिलेला विराट पुरुष आहेस. ॥३६॥
वनस्पती रोम आहेत. मेघ केस आहेत, ब्रह्मदेव बुद्धी आहे, प्रजापती लिंग आणि धर्म हृदय आहे. अशा प्रकारे आपणच विराट पुरूष आहात. (३६)
तवावतारोऽयमकुण्ठधामन्
धर्मस्य गुप्त्यै जगतो हिताय । वयं च सर्वे भवतानुभाविता विभावयामो भुवनानि सप्त ॥ ३७ ॥
रक्षावया धर्मचि जन्मला तू अभ्यूदया या जगतास तैसा । प्रभाव घेता अम्हि सर्व ऐसे पाळीतसो भूवन् सात देवा ॥ ३७ ॥
अकुण्ठधामन् - ज्याचे तेज कधीहि कुंठित होत नाही अशा हे श्रीकृष्णा - धर्मस्य गुप्त्यै - धर्माच्या रक्षणासाठी - जगतः भवाय - व जगाच्या उत्पत्तीसाठी - तव अयं अवतारः - तुझा हा अवतार होय - भवता अनुभाविताः च - आणि तुझ्याकडून रक्षिलेले - सर्वे वयं - आम्ही सर्व - सप्त भुवनानि विभावयामः - सात लोकांना रक्षितो. ॥३७॥
हे अखंडज्योतिस्वरूप परमात्मन ! आपला हा अवतार धर्माचे रक्षण आणि जगाचे कल्याण व्हावे, यासाठी आहे. आम्ही सर्वजण आपल्या प्रभावानेच संपन्न होऊन सातही भुवनांचे पाल करीत असतो. (३७)
त्वमेक आद्यः पुरुषोऽद्वितीयः
तुर्यः स्वदृग् हेतुरहेतुरीशः । प्रतीयसेऽथापि यथाविकारं स्वमायया सर्वगुणप्रसिद्ध्यै ॥ ३८ ॥
तू एक आद्यो पुरुषोऽद्वितीय तुर्येतही तू असशी हरी रे । प्रकाशिसी सर्व जिवास तूची मायारुपाने मग भेद होती ॥ ३८ ॥
त्वं एकः आद्यः पुरुषः अद्वितीयः - तू एकटा, सर्वांचा आदि, सर्व शरीरात आत्मरूपाने रहाणारा व द्वैतभावरहित असा आहेस - तुर्यः स्वदृक् हेतुः अहेतुः ईशः - मोक्षरूपी, आत्मज्ञानसंपन्न, जगाला कारण असून अकर्ता, व जगच्चालक असा तू आहेस - अथापि - तरीसुद्धा - सर्वगुणप्रसिद्ध्यै - सर्व विषयांच्या प्रकाशनाकरिता - यथाविकारं - विकारानुरूप - स्वमायया प्रतीयसे - आपल्या मायेने प्रगट होतोस. ॥३८॥
आपण सजातीय, विजातीय आणि स्वगतभेदरहित, एकमेव आणि अद्वितीय असे आदिपुरूष आहात. तुर्यतत्व आपणच आहात. आपण स्वयंप्रकाश आहात. आपण सर्वांचे कारण आहात, परंतु आपले कोणीही कारण नाही. असे असूनही आपण तिन्ही गुणांचे वेगळेपण प्रकाशित करण्यासाठी आपल्या मायेने देव, पशु-पक्षी, मनुष्य इत्यादी शरीरांनुसार वेगवेगळ्या रूपाने प्रतीत होता. (३८)
यथैव सूर्यः पिहितश्छायया स्वया
छायां च रूपाणि च सञ्चकास्ति । एवं गुणेनापिहितो गुणांस्त्वम् आत्मप्रदीपो गुणिनश्च भूमन् ॥ ३९ ॥
जीवास दावी रुप सूर्य तोची झाके ढगांची स्वयि सावलीने । तसाचि जीवा असशी प्रकाश गर्वे तुला ना शकतीचे पाहू ॥ ३९ ॥
भूमन् - हे सर्वव्यापका - यथा एव - ज्याप्रमाणेच - स्वया छायया पिहितः सूर्यः - आपल्या छायेने आच्छादिलेला सूर्य - छायां च रूपाणि च संचकास्ति - छायेला व रूपांना प्रकाशित करतो - एवं गुणेन अपिहितः - ह्याप्रमाणे गुणाने आच्छादिलेला - आत्मप्रदिपः त्वं - आत्मज्ञान संपन्न तू - गुणान् गुणिनः च प्रकाशयसि - गुणांना व गुणयुक्त पदार्थांना प्रकाशित करितोस. ॥३९॥
हे प्रभो ! ज्याप्रमाणे सूर्य आपलीच छाया असलेल्या ढगांनीच झाकला जातो आणि तो ढगाला व वेगवेगळ्या रूपांना प्रकाशित करतो, त्याप्रमाणे आपण स्वयंप्रकाश तर आहातच, परंतु गुणांमुळे जणू झाकले जाता आणि समस्त गुण तसेच गुणाभिमानी जीवांना प्रकाशित करता. वास्तविक आपण अनंत आहात. (३९)
( अनुष्टुप् )
यन्मायामोहितधियः पुत्रदारगृहादिषु । उन्मज्जन्ति निमज्जन्ति प्रसक्ता वृजिनार्णवे ॥ ४० ॥
( अनुष्टुप् ) मायेने मोहिता जीव घर-दारात गुंतती । स्वताच उडि घेवोनी बुडती दुःखसागरी ॥ ४० ॥
यन्मायामोहितधियः - ज्याच्या मायेने मोहित झाली आहे बुद्धि ज्यांची असे लोक - पुत्रदारगृहादिषु प्रसक्ता - पुत्र, स्त्रिया, घर इत्यादिकांच्या ठिकाणी आसक्त झालेले - वृजिनार्णवे उन्मज्जन्ति निमज्जन्ति (च) - पापाच्या समुद्रात बुडया मारतात व वर येतात. ॥४०॥
आपल्या मायेने मोहित होऊन लोक स्त्री-पुत्र, देह-घर इत्यादींमध्ये आसक्त होतात आणि पुन्हा दु:खाच्या अथांग समुद्रात गटांगळ्या खातात. (४०)
देवदत्तमिमं लब्ध्वा नृलोकमजितेन्द्रियः ।
यो नाद्रियेत त्वत्पादौ स शोच्यो ह्यात्मवञ्चकः ॥ ४१ ॥
कृपेने लाभतो देह जगती माणसास हा । न भजे तुजला तोची स्वताच फसतो तसा ॥ ४१ ॥
यः अजितेन्द्रियः - जो कामलंपट पुरुष - देवदत्तं इमं नृलोकं लब्ध्वा - देवाने दिलेल्या ह्या मनुष्यजन्माला मिळवून - त्वत्पादौ न आद्रियेत - तुझ्या चरणांच्या ठिकाणी आसक्त होत नाही - सः हि - तो खरोखर - शोच्यः आत्मवञ्चकः - कीव करण्यास पात्र असून स्वतःला फसवून घेणारा आहे. ॥४१॥
जो मनुष्य हे मानवी शरीर मिळून सुद्धा आपली इंद्रिये ताब्यात ठेवीत नाही आणि तुमच्या चरणकमलांचा आश्रय घेत नाही, त्याचे जीवन अत्यंत शोचनीय होय. तो स्वत:च स्वत:ला फसवणारा समजावा. (४१)
यस्त्वां विसृजते मर्त्य आत्मानं प्रियमीश्वरम् ।
विपर्ययेन्द्रियार्थार्थं विषमत्त्यमृतं त्यजन् ॥ ४२ ॥
जीवांचा प्रीय तू आत्मा मृत्यूचा घास देह हा । विषयीं सुख जो पाही विष पी त्यागुनी सुधा ॥ ४२ ॥
यः मर्त्यः - जो मनुष्य - आत्मानं प्रियं ईश्वरं त्वां - आत्मरूपी प्रिय परमेश्वर अशा तुला - विपर्ययेन्द्रियार्थार्थं - विरुद्ध अशा विषयसेवनासाठी - विसृजते - सोडून देतो - (सः) अमृतं त्यजन् विषम् अत्ति - तो अमृत टाकून विष खातो. ॥४२॥
सर्व प्राण्यांचे आत्मा, प्रियतम आणि ईश्वर असणार्या आपल्याला जो मनुष्य सोडतो आणि या उलट असणार्या तुच्छ विषयांमध्येच रमतो, तो अमृत सोडून विष पितो. (४२)
अहं ब्रह्माथ विबुधा मुनयश्चामलाशयाः ।
सर्वात्मना प्रपन्नास्त्वां आत्मानं प्रेष्ठमीश्वरम् ॥ ४३ ॥
मी ब्रह्मा देवता सर्व तुलाचि शरणागत । सर्वांचा प्रीय तू आत्मा सर्वांचा ईश्वरो तसा ॥ ४३ ॥
अथ - आता - अहं ब्रह्मा विबुधाः अमलाशयाः मुनयः च - मी ब्रह्मदेव, देव आणि निर्मळ अंतःकरणाचे ऋषि - आत्मानं प्रेष्ठं ईश्वरं त्वां - आत्मस्वरूपी परम प्रिय परमेश्वर अशा तुला - सर्वात्मना प्रपन्नाः - सर्व प्रकारे शरण आलो आहो. ॥४३॥
मी, ब्रह्मदेव, सर्व देवता आणि विशुद्ध हृदयाचे ऋषी सर्वात्मभावाने आपल्यालाच शरण असतात. कारण आपणच सर्वांचे आत्मा, प्रियतम आणि ईश्वर आहात. (४३)
( मिश्र )
तं त्वा जगत्स्थित्युदयान्तहेतुं समं प्रशान्तं सुहृदात्मदैवम् । अनन्यमेकं जगदात्मकेतं भवापवर्गाय भजाम देवम् ॥ ४४ ॥
( इंद्रवज्रा ) तू सर्व हेतू जगतास या नी तू इष्ट देवो सम शांत आत्मा । तू आश्रयो एकलाची जगासी । भुक्त्यर्थ आम्ही भजतो तुला की ॥ ४४ ॥
जगत्स्थित्युदयान्तहेतुं - जगाची उत्पत्ति, स्थिति व प्रलय यांना कारणीभूत - समं प्रशान्तं सुहृत् आत्मदैवम् - समबुद्धी, शांत, सर्वांचा मित्र, सर्वान्तर्यामी ईश्वर - अनन्यम् एकं जगदात्मकेतं - एकरूपी, अद्वितीय, जगताचे आत्मरूपी निवासस्थान असा - देवं तं त्वा - प्रकाशमान देव जो तू त्या तुला - भवापवर्गाय भजाम - संसारबंधनापासून मुक्त होण्यासाठी आम्ही भजतो. ॥४४॥
आपण जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लयाचे कारण आहात. आपण सर्वांचे ठायी, सम, परम शांत, सर्वांचे सुहृद, आत्मा आणि इष्टदेव आहात. आपण एक, अद्वितीय आणि जगताचे आधार तसेच अधिष्ठान आहात. हे प्रभो ! आम्ही सर्वजण या जन्ममृत्युरूप संसारचक्रातून मुक्त होण्यासाठी आपले भजन करीत आहोत. (४४)
अयं ममेष्टो दयितोऽनुवर्ती
मयाभयं दत्तममुष्य देव । संपाद्यतां तद्भवतः प्रसादो यथा हि ते दैत्यपतौ प्रसादः ॥ ४५ ॥
बाणासुरो हा मम प्रीय भक्त मी तो दिलासे वर श्रेष्ठ त्याला । प्रल्हाद याला जइ मानिशी तू प्रसाद याला तइ देइ देवा ॥ ४५ ॥
देव - हे श्रीकृष्णा - अयं - हा बाणासुर - मम इष्टः - माझा प्रिय भक्त - दयितः अनुवर्ती (च अस्ति) - व आवडता सेवक आहे - मया अमुष्य अभयं दत्तं - मी ह्याला अभय दिले आहे - तत् - याकरिता - यथा हि ते दैत्यपतौ प्रसादः (आसीत्) - जशी तुझी प्रल्हादावर कृपा झाली होती - (तथा) भवतः प्रसादः संपाद्यताम् - तशी तुझी कृपा ह्याच्यावर व्हावी. ॥४५॥
हे देवा ! हा बाणासुर माझा परमप्रिय, कृपेला पात्र झालेला सेवक आहे. मी याला अभय दिले आहे. प्रभो ! याचे पणजोबा प्रल्हाद याच्यावर आपली जशी कृपा आहे, तशीच कृपा याच्यावरही असावी. (४५)
श्रीभगवानुवाच -
( अनुष्टुप् ) यदात्थ भगवन् त्वं नः करवाम प्रियं तव । भवतो यद्व्यवसितं तन्मे साध्वनुमोदितम् ॥ ४६ ॥
श्रीभगवान् म्हणाले - ( अनुष्टुप् ) मानितो तुमची इच्छा तसा निर्भय मी करी । जाणुनी तुमचा हेतू याच्या मी बाहु तोडिल्या ॥ ४६ ॥
भगवन् - हे शंकरा - त्वत् नः यत् आत्थ - तू जे मला सांगितलेस - (तत्) तव प्रियं करवाम - ते तुझे प्रिय आम्ही करू - यत् भवतः व्यवसितं - जे तुझे करण्याचे ठरले आहे - तत् मे साधु अनुमोदितम् - त्याविषयी माझे चांगले अनुमोदन आहे. ॥४६॥
श्रीकॄष्ण म्हणाले- भगवन ! आपण आम्हांला जे सांगितले, त्याप्रमाणे आपल्याला प्रिय असणारे मी करीन. याच्यासाठी आपण पूर्वी जे ठरवले होते त्याला अनुसरूनच मी याचे हात तोडले आहेत. (४६)
अवध्योऽयं ममाप्येष वैरोचनिसुतोऽसुरः ।
प्रह्रादाय वरो दत्तो न वध्यो मे तवान्वयः ॥ ४७ ॥
जाणी मी बळिचा पुत्र म्हणोनी नच मारिला । प्रल्हादा दिधला शब्द वंश मी नच खंडितो ॥ ४७ ॥
अयं एषः वैरोचनिसुतः असुरः - तो हा बलिपुत्र बाणासुर - मम अपि अवध्यः - माझ्याकडूनहि वधिला जाण्यास योग्य नाही - तव अन्वयः मे वध्यः न - तुझ्या वंशातील कोणताहि पुरुष माझ्याकडून वधिला जाणार नाही - (इति) प्रह्लादाय वरः दत्तः - असा मी प्रल्हादाला वर दिला आहे. ॥४७॥
बाणासुर बलीचा पुत्र आहे, म्हणून मी याचा वध करू शकत नाही. कारण प्रल्हादाला वर दिला आहे की, "तुझ्या वंशातील कोणाचाही मी वध करणार नाही." (४७)
दर्पोपशमनायास्य प्रवृक्णा बाहवो मया ।
सूदितं च बलं भूरि यच्च भारायितं भुवः ॥ ४८ ॥
गर्व तो संपवायाते भुजा मी कापिल्या पहा । पृथ्वीचा भार जी सेना सर्व मी मारिली असे ॥ ४८ ॥
अस्य बाहवः - ह्या बाणासुराचे बाहु - दर्पोपशमनाय मया प्रवृक्णाः - गर्वपरिहारार्थ मी तोडिले - यत् च भुवः भारायितं - आणि जे पृथ्वीला भारभूत झाले होते - (तत्) च भूरि बलं सूदितं - ते पुष्कळसे सैन्य मारून टाकिले. ॥४८॥
याचा गर्व नाहीसा करण्यासाठीच मी याचे हात तोडले आहेत. तसेच जी सेना पृथ्वीला भार झाली होती, तिचा मी संहार केला. (४८)
चत्वारोऽस्य भुजाः शिष्टा भविष्यत्यजरामरः ।
पार्षदमुख्यो भवतो न कुतश्चिद्भयोऽसुरः ॥ ४९ ॥
राहिल्या चार त्या बाहू सदाचि राहती अशा । तुमच्या पार्षदांमध्ये श्रेष्ठ हो भय ना कदां ॥ ४९ ॥
अस्य शिष्टाः चत्वारः भुजाः - ह्या बाणासुराचे उरलेले चार हात - अजरामराः भविष्यन्ति - जरा व मृत्यू यांनी रहित होतील - नकुतश्चिद्भयः असुरः - ज्याला कोठूनहि भय नाही असा तो बाणासुर - भवतः पार्षदमुख्यः (भविता) - तुमचा मुख्य सेवक होईल. ॥४९॥
याचे चार हात अजून शिल्लक आहेत. ते अजर व अमर होतील. आपल्या पार्षदांमध्ये हा प्रमुख असेल. आता याला कोणापासूनही कोणत्याही प्रकारची भीती नाही. (४९)
इति लब्ध्वाभयं कृष्णं प्रणम्य शिरसासुरः ।
प्राद्युम्निं रथमारोप्य सवध्वा समुपानयत् ॥ ५० ॥
अभयो लाभता ऐसे असुरे कृष्ण वंदिला । अनिरुद्ध उषा यांना रथात आणिले तये ॥ ५० ॥
असुरः - बाणासुर - इति अभयं लब्ध्वा - याप्रमाणे अभय मिळवून - शिरसा कृष्णं प्रणम्य - मस्तकाने कृष्णाला नमस्कार करून - सवध्वा प्राद्युम्निं रथम् आरोप्य - ऊषेसह प्रद्युम्नपुत्र अनिरुद्धाला रथात बसवून - समुपानयत् - जवळ आणिता झाला. ॥५०॥
अशा प्रकारे श्रीकृष्णांकडून अभय मिळाल्यावर बाणासुराने त्यांच्याजवळ येऊन जमिनीवर डोके टेकवून त्यांना नमस्कार केला आणि आपली कन्या ऊषा हिच्यासह अनिरुद्धाला रथात बसवून भगवंतांकडे घेऊन आला. (५०)
अक्षौहिण्या परिवृतं सुवासःसमलङ्कृतम् ।
सपत्नीकं पुरस्कृत्य ययौ रुद्रानुमोदितः ॥ ५१ ॥
हराची संमती घेता अनिरुद्ध उषेस त्या । सालंकृत करोनीया अक्षौणी सैन्य घेउनी । पातले सर्वच्या सर्व द्वारकापुरि तेधवा ॥ ५१ ॥
रुद्रानुमोदितः (सः) - शंकराने अनुमोदन दिलेला कृष्ण - अक्षौहिण्या परिवृतं - अक्षौहिणी सैन्याने वेष्टिलेल्या - सुवासः समलंकृतं - व उंची वस्त्रांनी शोभिवंत केलेल्या - सपत्नीकं (तं) - अशा त्या सपत्नीक अनिरुद्धाला - पुरस्कृत्य ययौ - पुढे करून गेला. ॥५१॥
यानंतर श्रीकृष्णांनी महादेवांच्या संमतीने वस्त्रालंकार विभूषित ऊषा आणि अनिरुद्ध यांना पुढे करून एक अक्षौहिणी सेनेसह द्वारकेकडे प्रस्थान केले. (५१)
( वंशस्था )
स्वराजधानीं समलङ्कृतां ध्वजैः सतोरणैरुक्षितमार्गचत्वराम् । विवेश शङ्खानकदुन्दुभिस्वनैः अभ्युद्यतः पौरसुहृद्द्विजातिभिः ॥ ५२ ॥
( इंद्रवज्रा ) द्वारापुरी ती सजली तशीच संमार्जिले चंदन सर्व मारी । झेंडे पताका बहु लाविल्या नी सामोरि आले द्विज बंधु तेंव्हा । शंखानकाचा ध्वनि सर्व झाला प्रवेशला कृष्ण स्वराजधानी ॥ ५२ ॥
पौरसुहृद्द्विजातिभिः अभ्युद्यतः (सः) - नागरिक लोक, मित्र व ब्राह्मण यांनी जयजयकार केलेला तो श्रीकृष्ण - सतोरणैः ध्वजैः समलङ्कृतां - तोरणे व पताका यांनी शोभविलेल्या - उक्षितमार्गचत्वरां - शिंपिले आहेत रस्ते व चव्हाटे जीतील अशा - स्वराजधानीं - आपल्या राजधानीत - शङखानकदुन्दुभिस्वनैः - शंख, तुतार्या, चौघडयांचे शब्द होत असता - विवेश - शिरला. ॥५२॥
इकडे द्वारका ध्वजतोरणांनी सजविली गेली. सडका आणि चौकांमध्ये चंदनमिश्रित पाण्याचा सडा शिंपडला गेला. नगरातील नागरिक, बांधव आणि ब्राह्मण सामोरे आले. त्यावेळी शंख, नगारे आणि ढोल यांचा तुंबळ आवाज होता. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी आपल्या राजधानीमध्ये प्रवेश केला. (५२)
( अनुष्टुप् )
य एवं कृष्णविजयं शङ्करेण च संयुगम् । संस्मरेत् प्रातरुत्थाय न तस्य स्यात् पराजयः ॥ ५३ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे उत्तरार्धे अनिरुद्धानयनं नाम त्रिषष्टितमोऽध्यायः ॥ ६३ ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
( अनुष्टुप् ) कृष्ण नी शंकरो यांची युद्धाची विजयी कथा । सकाळी स्मरतो त्याला न कधीच पराजय ॥ ५३ ॥ ॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर त्रेसष्ठावा अध्याय हा ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
यः - जो - एवं - याप्रमाणे - शंकरेण संयुगं कृष्णविजयं च - शंकराशी झालेले युद्ध व श्रीकृष्णाचा विजयही - प्रातः उत्थाय संस्मरेत् - सकाळी उठून स्मरेल - तस्य पराजयः न स्यात् - त्याचा पराजय होणार नाही. ॥५३॥
परीक्षिता ! जो कोणी श्रीशंकरांच्याबरोबर श्रीकॄष्णांचे युद्ध आणि त्यांचा विजय, या कथेचे प्रात:काळी उठल्यावर स्मरण करतो, त्याचा कधीही पराजय होत नाही. (५३)
अध्याय त्रेसष्टावा समाप्त |