|
श्रीमद् भागवत पुराण ऊषा-अनिरुद्ध समागमः; अनिरुद्धस्य बंधनं च - उषा - अनिरुद्ध मिलन - संहिता - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीराजोवाच -
( अनुष्टुप् ) बाणस्य तनयां ऊषां उपयेमे यदूत्तमः । तत्र युद्धमभूद् घोरं हरिशङ्करयोर्महत् । एतत्सर्वं महायोगिन् समाख्यातुं त्वमर्हसि ॥ १ ॥
राजा परीक्षित् म्हणाला - ( अनुष्टुप् ) बाणकन्या उषा हीस अनिरुद्धे वरीयले । ऐकिले तैचि कृष्णो नी शिवाचे युद्ध जाहले । विस्तारे कृपया सांगा वृत्तांत सर्व तो अम्हा ॥ १ ॥
महायोगिन् - हे महायोगी शुकाचार्या - यदूत्तमः - यादवश्रेष्ठ अनिरुद्ध - बाणस्य तनयां ऊषां उपयेमे - बाणाची कन्या जी ऊषा तिला वरिता झाला - तत्र - त्याठिकाणी - हरिशङ्करयोः - श्रीकृष्ण व शंकर यांचे - महत् घोरं युद्धं अभूत् - मोठे भयंकर युद्ध झाले - त्वं एतत् सर्वं समाख्यातुं अर्हसि - तू ते सर्व सांगण्याला योग्य आहेस. ॥१॥
परीक्षिताने म्हटले- हे महायोगी ! मी असे ऐकले आहे की, यदुश्रेष्ठ अनिरुद्धाने बाणासुराची कन्या ऊषा हिचाशी विवाह केला होता आणि याप्रसंगी श्रीकृष्ण व शंकराचे अतिशय घनघोर असे युद्ध झाले होते. हा वृत्तांत आपण विस्तारपूर्वक मला सांगावा. (१)
श्रीशुक उवाच -
बाणः पुत्रशतज्येष्ठो बलेरासीन् महात्मनः । येन वामनरूपाय हरयेऽदायि मेदिनी ॥ २ ॥
श्रीशुकदेव सांगतात - महात्मा बळीची वार्ता तुम्हा मी बोललो असे । तयाच्या शतपुत्रात बाणासुरचि ज्येष्ठ तो ॥ २ ॥
बाणः - बाणासुर - महात्मनः बलेः - महात्म्या बलि राजाचा - पुत्रशतज्येष्ठः आसीत् - शंभर पुत्रांमध्ये श्रेष्ठ पुत्र होता - येन - ज्या बलिराजाकडून - वामनरूपाय हरये - वामनरूप धारण केलेल्या विष्णूला - मेदिनी अदायि - पृथ्वी दिली गेली. ॥२॥
श्रीशुक म्हणाले- महात्मा बलीची कथा तर तू ऐकलीच आहेस. ज्याने वामनसूपधारी भगवंतांना सार्या पृथ्वीचे दान केले होते, त्या महात्म्या बळिराजाला शंभर मुलगे होते. त्यांपैकी सर्वांत थोरल्याचे नाव बाण होते. (२)
तस्यौरसः सुतो बानः शिवभक्तिरतः सदा ।
मान्यो वदान्यो धीमांश्च सत्यसन्धो दृढव्रतः ॥ ३ ॥
रमे तो शिवभक्तीत समाज मानिही तसा । उदार बुद्धिमंतो तो वचने सत्यची करी ॥ ३ ॥
बाणः तस्य औरसः सुतः - बाणासुर हा त्या बलिराजाचा औरस पुत्र - सदा शिवभक्तिरतः - नित्य शिवभक्ति करण्यात तत्पर - मान्यः वदान्यः धीमान् सत्यसंधः दृढवतः च - आणि मान देण्यास योग्य, दाता, बुद्धिमान, खरे बोलणारा व कोणतेहि व्रत नेटाने चालविणारा होता. ॥३॥
बळीचा औरस पुत्र भगवान शंकरांच्या भक्तीमध्ये नेहमी गढून गेलेला असे. समाजात त्याच्याविषयी मोठा आदर होता. त्याचे औदार्य आणि बुद्धिमत्ता प्रशंसनीय होती. स्वत:ची प्रतिज्ञा तो पूर्ण करीत असे. शिवाय तो निष्ठेने व्रतपालन करीत असे. (३)
शोणिताख्ये पुरे रम्ये स राज्यं अकरोत्पुरा ।
तस्य शम्भोः प्रसादेन किङ्करा इव तेऽमराः । सहस्रबाहुर्वाद्येन ताण्डवेऽतोषयन्मृडम् ॥ ४ ॥
शोणीतपुरि तो राही इंद्रादी देवता तिथे । सेवा ती करिती नित्य शिवाचीच कृपा तशी । सहस्र बाहुने वाद्ये छेडिता शिव मेळिला ॥ ४ ॥
सः - तो बाणासुर - पुरा - पूर्वी - शोणिताख्ये रम्ये पुरे - शोणित नावाच्या रमणीय नगरामध्ये - राज्यं अकरोत् - राज्य करिता झाला - ते अमराः - ते देव - तस्य शम्भोः प्रसादेन - त्या बाणासुरावर शंकराची कृपा असल्यामुळे - किंकरा इव (आसन्) - सेवकाप्रमाणे होते - सहस्त्रबाहुः (सः) - हजार बाहु असलेला तो बाणासुर - वाद्येन - वाद्य वाजवून - ताण्डये मूडं अतोषयत् - तांडव नृत्यामध्ये शंकराला संतुष्ट करिता झाला. ॥४॥
त्या काळी तो रमणीय अशा शोणितपुरामध्ये राज्य करीत असे. भगवान शंकरांच्या कृपेने इंद्रादी देव नोकरांप्रमाणे त्याची सेवा करीत होते. त्याला एक हजार हात होते. एके दिवशी शंकर तांडवनृत्य करीत असताना त्याने एक हजार हातांनी अनेक प्रकारची वाद्ये वाजवून त्यांना प्रसन्न करून घेतले. (४)
भगवान् सर्वभूतेशः शरण्यो भक्तवत्सलः ।
वरेण छन्दयामास स तं वव्रे पुराधिपम् ॥ ५ ॥
शिव तो सर्व भक्तांना सदैव रक्षिता असे । प्रसन्ने वर त्यां देता वदला राहि या पुरीं ॥ ५ ॥
सर्वभूतेशः शरण्यः भक्तवत्सलः भगवान् - सर्व प्राण्यांचा अधिपति, शरणगतांचे रक्षण करणारा, भक्तांवर प्रेम करणारा भगवान शंकर - (तं) वरेण छन्दयामास - त्याला वराने संतुष्ट करिता झाला - स तं पुराधिपं वव्रे - तो बाणासुर शंकराजवळ पुराचे आधिपत्य मागता झाला. ॥५॥
भक्तवत्सल, शरणागताचे रक्षण करणारे आणि भूतमात्राचे स्वामी असलेले शंकर बाणासुराला म्हणाले, "तुला हवा तो वर माग." बाणासुर म्हणाला- "भगवन ! आपण माझ्या नगराचे रक्षण करीत राहावे." (५)
स एकदाऽऽह गिरिशं पार्श्वस्थं वीर्यदुर्मदः ।
किरीटेनार्कवर्णेन संस्पृशन् तत्पदाम्बुजम् ॥ ६ ॥
बल पौरुष गर्वात सोनेरी मुकिटा सह । शिवाला वंदुनी दैत्य मग तो बोलला असे ॥ ६ ॥
एकदा वीर्यदुर्मदः सः - एके दिवशी पराक्रमामुळे उन्मत्त झालेला तो बाणासुर - अर्कवर्णेन किरीटेन तत्पदाम्बुजं संस्पृशन् - सूर्याप्रमाणे तेजस्वी अशा मुकुटाने त्या शंकराच्या चरणकमळाला स्पर्श करीत - पार्श्वस्थं गिरिशं आह - जवळच असणार्या शंकराला म्हणाला. ॥६॥
बळाचा गर्व चढलेल्या बाणासुराने एके दिवशी त्याच्या शेजारी असलेल्या भगवान शंकरांच्या चरणकमलांना सूर्याप्रमाणे चमकणार्या मुकुटाने स्पर्श करून प्रणाम केला आणि म्हटले. ()
नमस्ये त्वां महादेव लोकानां गुरुमीश्वरम् ।
पुंसां अपूर्णकामानां कामपूरामराङ्घ्रिपम् ॥ ७ ॥
नमस्ते हो महादेवा त्रिलोकगुरु ईश्वरा । कल्पवृक्ष तुम्ही जीवा इच्छिले देतसा तुम्ही ॥ ७ ॥
महादेव - हे शंकरा - अपूर्णकामानां पुंसां - ज्यांच्या इच्छा पूर्ण नाहीत अशा पुरुषांच्या - कामपूरामराङ्घ्रिपम् - इच्छा पूर्ण करणारा कल्पवृक्ष अशा - लोकानां गुरुं ईश्वरं त्वां नमस्ये - लोकांचा गुरु परमेश्वर अशा तुला मी नमस्कार करीत आहे. ॥७॥
हे महादेवा ! आपण सर्व चराचर जगाचे गुरू आणि ईश्वर आहात. मी आपणास नमस्कार करीत आहे. ह्या लोकांचे मनोरथ पूर्ण झालेले नसतात, त्यांचे ते मनोरथ पूर्ण करणारे आपण कल्पवृक्ष आहात. ()
दोःसहस्रं त्वया दत्तं परं भाराय मेऽभवत् ।
त्रिलोक्यां प्रतियोद्धारं न लभे त्वदृते समम् ॥ ८ ॥
हजार बाहु या तुम्ही मजला दिधल्या अशा । उगाच वाहतो भार लढाया वीर ना कुणी ॥ ८ ॥
त्वया मे दत्तं दोःसहस्त्रं - तू मला दिलेले हजार हात - परं भाराय अभवत् - अत्यंत ओझ्यासारखे झाले आहेत - त्वदृते - तुझ्याशिवाय - त्रिलोक्यां समं प्रतियोद्धारं - त्रैलोक्यात माझ्या तोडीचा प्रतिस्पर्धी योद्धा - न लभे - मला आढळत नाही. ॥८॥
भगवन ! आपण मला एक हजार हात दिले आहे. परंतु ते मला केवळ भाररूप झाले आहेत. कारण या त्रैलोक्यात आपणाखेरीज माझ्याबरोबरीचा दुसरा कोणीच योद्धा मला आढळत नाही. (८)
कण्डूत्या निभृतैर्दोर्भिः युयुत्सुर्दिग्गजानहम् ।
आद्यायां चूर्णयन्नद्रीन् भीतास्तेऽपि प्रदुद्रुवुः ॥ ९ ॥
लढाया खजवे हात दिग्गजो दूर धावती । म्हणोनी गिरि ते थोर बुक्क्यांनी कैक फोडिले । तुम्हीच लढण्या युक्त मजसी या त्रिलोकि की ॥ ९ ॥
आद्य - हे आदिपुरुषा - अहं - मी - कण्डूत्या निभृतैः दोर्भिः - कंडूने भरून गेलेल्या बाहूंनी - दिग्गजान् युयुत्सुः - दिग्गजांशी युद्ध करण्याची इच्छा करणारा - अद्रीन् चूर्णयन् अयाम् - पर्वतांचे चूर्ण करीत चाललो - (तदा) ते अपि भीताः प्रदुद्रुवुः - तेव्हा ते दिग्गजहि भिऊन पळत सुटले. ॥९॥
हे आदिदेवा ! एक दिवस लढाईसाठी माझे हात एवढे सळसळू लागले की, मी पर्वत फोडीत दिग्गजांवर चालून गेलो. परंतु तेसुद्धा मला भिऊन पळून गेले." (९)
तत् श्रुत्वा भगवान् क्रुद्धः केतुस्ते भज्यते यदा ।
त्वद्दर्पघ्नं भवेन्मूढ संयुगं मत्समेन ते ॥ १० ॥
प्रार्थना ऐकता ऐशी थोडेसे क्रोधले शिव । तुटेल ध्वज हा तेंव्हा युद्धात गर्व हा जिरे ॥ १० ॥
भगवान् - शंकर - तत् श्रुत्वा क्रुद्धः - ते ऐकून रागावला - अब्रवीत् च - आणि म्हणाला - मूढ - हे मूर्खा बाणासुरा - ते केतुः यदा भज्यते - तुझा ध्वज जेव्हा मोडून पडेल - मत्समेन ते त्वद्दर्पघ्नं संयुगं भवेत् - तुझे माझ्यासारख्याशी तुझ्य़ा गर्वाचा परिहार करणारे युद्ध होईल. ॥१०॥
ते ऐकून रागावून भगवान शंकर म्हणाले- "अरे मूर्खा ! ज्यावेळी तुझी रथावरील ध्वजा मोडून खाली पडेल, त्यावेळी माझ्यासारख्याच योद्ध्याशी तुझे युद्ध होईल आणि तो तुझा गर्व नाहीसा करील." (१०)
इत्युक्तः कुमतिर्हृष्टः स्वगृहं प्राविशन्नृप ।
प्रतीक्षन् गिरिशादेशं स्ववीर्यनशनं कुधीः ॥ ११ ॥
ऐकता शिववाणी ती मूर्ख हा वाट पाहि ती । जिच्यात बलवीर्याचा होणार नाश हा तसा ॥ ११ ॥
नृप - हे राजा - कुमतिः कुधीः - दुष्टबुद्धि व वाईट विचार करणारा बाणासुर - इति उक्तः हृष्टः - याप्रमाणे सांगितल्यामुळे आनंदित झालेला असा - स्ववीर्यनशनं गिरिशादेशं प्रतीक्षन् - आपल्या पराक्रमाचा नाश करणार्या शंकराच्या आज्ञेची वाट पहात - स्वगृहं प्राविशत् - आपल्या घरी गेला. ॥११॥
परिक्षिता ! हे ऐकून मूर्ख बाणाला अतिशय आनंद झाला आणि तो आपल्या घरी परतला. आता तो मूर्ख, भगवान शंकरांच्या सांगण्याप्रमाणे आपल्या सामर्थ्याचा नाश करणार्या त्या युद्धाची वाट पाहू लागला. (११)
तस्योषा नाम दुहिता स्वप्ने प्राद्युम्निना रतिम् ।
कन्यालभत कान्तेन प्राग् अदृष्टश्रुतेन सा ॥ १२ ॥
उषा बाणसुरां कन्या पाही स्वप्नात भोगिला । न ऐकिला अनिरुद्ध कधी जो पाहिला नसे ॥ १२ ॥
तस्य ऊषा नाम दुहिता (आसीत्) - त्याला ऊषा नावाची कन्या होती - सा कन्या - ती कन्या - स्वप्ने - स्वप्नामध्ये - प्रागदृष्टश्रुतेन कान्तेन प्राद्युम्निना - पूर्वी न पाहिलेल्या व न ऐकिलेल्या सुंदर प्रद्युम्नपुत्र अनिरुद्धाबरोबर - रतिम् अलभत - रतिसुख मिळविती झाली. ॥१२॥
त्याची ऊषा नावाची एक कन्या होती. ती अजून कुमारीच होती. तरीसुद्धा एके दिवशी स्वप्नामध्ये तिने पाहिले की, "अनिरुद्धाशी आपला समागम झालेला आहे." विशेष म्हणजे तिने अनिरुद्धाला कधी पाहिले नव्हते की त्याच्याविषयी काही ऐकलेही नव्हते. (१२)
सा तत्र तमपश्यन्ती क्वासि कान्तेति वादिनी ।
सखीनां मध्य उत्तस्थौ विह्वला व्रीडिता भृशम् ॥ १३ ॥
प्राणप्रीय कुठे तू रे वदता उठली असे । सख्यांना पाहता सार्या लाजली बहु ती मनी ॥ १३ ॥
तत्र तं अपश्यन्ती सा - तेथे त्याला न पहाणारी ती ऊषा - कान्त क्व असि इति वादिनी - हे सुंदरा, तू कोठे आहेस असे बोलणारी - भृशं विह्वला व्रीडिता - अत्यंत विव्हल व लज्जित झालेली - सखीनां मध्ये - मैत्रिणींच्या मध्यभागी - उत्तस्थौ - उठून उभी राहिली. ॥१३॥
स्वप्नातच तो न दिसल्याने ती म्हणाली, "नाथ ! आपण कोठे आहात ?" असे म्हणताच ती जागी झाली व व्याकूळ होऊन उठून बसली. नंतर आपण सख्यांच्या मध्ये आहोत, असे पाहून अतिशय लज्जित झाली. (१३)
बाणस्य मंत्री कुम्भाण्डः चित्रलेखा च तत्सुता ।
सख्यपृच्छत् सखीं ऊषां कौतूहलसमन्विता ॥ १४ ॥
बाणासुरास मंत्री जो कुभांड त्यास पुत्रि ती । चित्रलेखा असे नाम उषासी पुसले तिने ॥ १४ ॥
बाणस्य मन्त्री कुम्भाण्डः (आसीत्) - बाणासुराचा कुंभांड नावाचा मंत्री होता - तत्सुता चित्रलेखा च सखी - आणि त्या कुंभांडाची चित्रलेखा नावाची कन्या ऊषेची मैत्रीण होती - कौतूहलसमन्विता - जिज्ञासेने युक्त झालेली ती - ऊषां सखीम् अपृच्छत् - मैत्रीण जी ऊषा तिला विचारिती झाली. ॥१४॥
बाणासुराच्या कुंभांड नावाच्या मंत्र्याची चित्रलेखा नावाची कन्या होती. ऊषा आणि चित्रलेखा एकमेकींच्या मैत्रिणी होत्या. चित्रलेखेने ऊषाला कुतूहलाने विचारले. (१४)
कं त्वं मृगयसे सुभ्रु कीदृशस्ते मनोरथः ।
हस्तग्राहं न तेऽद्यापि राजपुत्र्युपलक्षये ॥ १५ ॥
कोणा निश्चियले ना तू सुंदरी मीहि जाणिते । मग तू कोणत्या रूपा मनात कल्पिले असे ॥ १५ ॥
सुभ्रूः राजपुत्रि - हे सुंदर राजकन्ये - त्वं कं मृगयसे - तू कोणाला शोधीत आहेस - ते मनोरथः कीदृशः - तुझ्या मनातील हेतु काय आहे - अद्यापि ते हस्तग्राहं न उपलक्षये - अजून तुझे पाणिग्रहण करणारा मला कोणी आढळला नाही. ॥१५॥
हे सुंदर राजकुमारी ! अजून तुझे कोणी पाणिग्रहण केलेले नाही. तर मग तू कोणाला शोधीत आहेस ? आणि तुझ्या मनात काय आहे ? (१५)
दृष्टः कश्चिन्नरः स्वप्ने श्यामः कमललोचनः ।
पीतवासा बृहद् बाहुः योषितां हृदयंगमः ॥ १६ ॥
उषा म्हणाली - सखे मी पाहिला स्वप्नी सावळा पद्मलोचनो । पीतांबर असे अंगी चित्ताचा चोरटा असा ॥ १६ ॥
श्यामः - कृष्णवर्णाचा - कमललोचनः - कमळाप्रमाणे नेत्र असणारा - पीतवासाः - पिवळे वस्त्र नेसलेला - बृहद्बाहुः - मोठे बाहु असलेला - योषितां हृदयंगमः - स्त्रियांच्या मनात भरणारा - क्वचित् नरः - कोणी पुरुष - स्वप्ने दृष्टः - स्वप्नात पाहिलेला. ॥१६॥
ऊषा म्हणाली- गडे ! मी स्वप्नात एक पुरूष पाहिला. त्याच्या शरीराचा वर्ण सावळा असून नेत्र कमलदलाप्रमाणे होते. तो पीतांबर नेसलेला असून त्याचे बाहू पुष्ट होते. तो स्त्रियांना आवडेल, असाच होता. (१६)
तमहं मृगये कान्तं पाययित्वाधरं मधु ।
क्वापि यातः स्पृहयतीं क्षिप्त्वा मां वृजिनार्णवे ॥ १७ ॥
अधरामृत जो पाजी पीते मी त पिते तसे । स्वपान सोडुनी गेला धुंडीते प्राणवल्लभा ॥ १७ ॥
अधरं मधु पाययित्वा - अधरोष्ठमधु पाजून - स्पृहयतीं मां वृजिनार्णवेक्षिप्त्वा - त्याची इच्छा करणार्या मला दुःखसागरात लोटून - क्व अपि यातः - कोठेतरी निघून गेला - अहं तं कान्तं मृगये - त्या सुंदर पुरुषाला मी शोधत आहे. ॥१७॥
त्याने आपले अधरामृत मला पाजले. तो माला आणखी हवा होता, तेवढ्यात तो मला दु:खसागरात लोटून कुठेतरी निघून गेला. मी माझ्या त्याच प्राणवल्लभाचा शोध घेत आहे. (१७)
चित्रलेखोवाच -
व्यसनं तेऽपकर्षामि त्रिलोक्यां यदि भाव्यते । तं आनेष्ये वरं यस्ते मनोहर्ता तमादिश ॥ १८ ॥
चित्रलेखा म्हणाली - त्रिलोकी धुंडुनी त्याला व्यथा मी शांत ती करी । रेखिते चित्र मी तैसे धुंडोनी आणिते पहा ॥ १८ ॥
तं व्यसनम् अपिकर्षामि - तुझे दुःख मी दूर करते - यः ते मनाहर्ता - जो तुझ्या मनाचे हरण करणारा आहे - (सः) यदि त्रिलोक्यां भाव्यते - तो जर त्रैलोक्यात असणे संभवनीय असेल - (तर्हि) तं नरं अनिष्ये - तर मी त्याला घेऊन येईन - तम् आदिश - तो कोण आहे सांग. ॥१८॥
चित्रलेखा म्हणाली - "सखे ! तुझा चित्तचोर त्रैलोक्यात जर असेल, तर मला तो दाखव. मी त्याला आणीन आणि तुझी विरहव्यथा नाहीशी करीन." (१८)
इत्युक्त्वा देवगन्धर्व सिद्धचारणपन्नगान् ।
दैत्यविद्याधरान् यक्षान् मनुजांश्च यथालिखत् ॥ १९ ॥
वदता देव गंधर्व सिद्ध चारण पन्नग । दैत्य विद्याधरो यक्ष मनुष्य चित्र रेखिले ॥ १९ ॥
इति उक्त्वा - असे म्हणून - देवगन्धर्वसिद्धचारणपन्नगान् - देव, गंधर्व, सिद्ध, चारण, नाग यांची - दैत्यविद्याधरान् - दैत्य व विद्याधर यांची - यक्षान् च मनुजान् - आणि यक्ष व मनुष्य यांची - (सा) यथा (वत्) अलिखत् - ती हुबेहुब चित्रे काढिती झाली. ॥१९॥
असे म्हणून चित्रलेखेने काही देव, गंधर्व, सिद्ध, चारण, पन्नग, दैत्य, विद्याधर, यक्ष आणि माणसांची हुबेहूब चित्रे काढली. (१९)
मनुजेषु च सा वृष्नीन् शूरं आनकदुन्दुभिम् ।
व्यलिखद् रामकृष्णौ च प्रद्युम्नं वीक्ष्य लज्जिता ॥ २० ॥
शूरसेनो वसूदेव कृष्ण नी बलरामाचे । प्रद्युम्न रेखिला तेंव्हा उषा ती बहु लाजली ॥ २० ॥
सा च - आणि ती चित्रलेखा - मनुजेषु - मनुष्यांमध्ये - वृष्णीन् शूरम् आनकदुन्दुभिं - यादव, शूरसेन, वसुदेव यांची - रामकृष्णौ च प्रद्युम्नं - तशीच बलराम, श्रीकृष्ण, व प्रद्युम्न यांची - व्यलिखत् - चित्रे काढिती झाली - (तं) वीक्ष्य (सा) लज्जिता - त्या प्रद्युम्नाला पाहून ती ऊषा लाजली. ॥२०॥
मनुष्यांमध्ये तिने वृष्णिवंशातील शूरसेन, वसुदेव, बलराम आणि श्रीकृष्ण यांची चित्रे काढली. नंतर प्रद्युम्नाचे चित्र पाहताच ऊषा लाजली. (२०)
अनिरुद्धं विलिखितं वीक्ष्योषावाङ्मुखी ह्रिया ।
सोऽसावसाविति प्राह स्मयमाना महीपते ॥ २१ ॥
अनिरुद्धा उषा पाही तेंव्हा ती मान खालती । घालुनी हासली मंद वदली हाच गे प्रिय ॥ २१ ॥
महीपते - राजा - ऊषा विलिखितं अनिरुद्धं वीक्ष्य - ऊषा चित्रात काढिलेल्या अनिरुद्धाला पाहून - ह्लिया अवाङ्मुखी - लज्जेने खाली मुख करीत - असौ सः असौ - हाच तो हाच - इति स्मयमान प्राह - असे मंद हास्य करीत म्हणाली. ॥२१॥
परीक्षिता ! जेव्हा तिने अनिरुद्धाचे चित्र पाहिले, तेव्हा तर लाजेने आपली मान खाली घातली. नंतर स्मितहास्य करीत ती म्हणाली- "हाच. हाच तो माझा प्राणवल्लभ." (२१)
चित्रलेखा तमाज्ञाय पौत्रं कृष्णस्य योगिनी ।
ययौ विहायसा राजन् द्वारकां कृष्णपालिताम् ॥ २२ ॥
योगिनी चित्रलेखेनें जाणिला कृष्ण पौत्र तो । रात्री आकाशमार्गाने द्वारकापुरि पातली ॥ २२ ॥
राजन् - राजा - योगिनी चित्रलेखा - योगविद्या जाणणारी चित्रलेखा - तं कृष्णस्य पौत्रं आज्ञाय - तो श्रीकृष्णाचा नातू अनिरुद्ध होय असे जाणून - विहायसा कृष्णपालितां द्वारकां ययौ - आकाशमार्गाने श्रीकृष्णाने रक्षिलेल्या द्वारकेला गेली. ॥२२॥
परीक्षिता ! चित्रलेखा योगिनी होती. हा श्रीकृष्णांचा नातू आहे, हे ओळखून ती आकाशमार्गाने श्रीकृष्णांच्या द्वारकापुरीत पोहोचली. (२२)
तत्र सुप्तं सुपर्यङ्के प्राद्युम्निं योगमास्थिता ।
गृहीत्वा शोणितपुरं सख्यै प्रियमदर्शयत् ॥ २३ ॥
आपुल्या मंचकी तेंव्हा झोपले अनिरुद्ध ते । योगाने चित्रलेखेने उषेच्यापाशि आणिले ॥ २३ ॥
योगं आस्थिता (सा) - योगाचा अवलंब केलेली ती चित्रलेखा - तत्र - त्या द्वारकेत - सुपर्यङ्के सुप्तं प्राद्युम्निं - उंची पलंगावर निजलेल्या प्रद्युम्नपुत्र अनिरुद्धाला - गृहीत्वा - घेऊन - शोणितपुरम् (आनीय) - शोणितपुरामध्ये आणून - सख्यै प्रियम् अदर्शयत् - मैत्रीण जी ऊषा तिला प्रियकर दाखविती झाली. ॥२३॥
तेथे सुंदर पलंगावर झोपलेल्या अनिरुद्धाला योगसिद्धीच्या प्रभावाने चित्रलेखेने उचलून शोणितपुरात आणले आणि सखी ऊषेला तिच्या प्रियतमाचे दर्शन घडविले. (२३)
सा च तं सुन्दरवरं विलोक्य मुदितानना ।
दुष्प्रेक्ष्ये स्वगृहे पुम्भी रेमे प्राद्युम्निना समम् ॥ २४ ॥
आनंदेपुहुलुनी तेंव्हा उषा त्या प्राणवल्लभा । सहीत रत ती झाली विहारे मंदिरी पहा । सुरक्षित् स्थान ते होते पुरुषीसावली नसे ॥ २४ ॥
सा च - ती ऊषा - सुन्दरवरं तं विलोक्य मुदितानना - स्वरूपवानांमध्ये श्रेष्ठ अशा त्याला पाहून आनंदमुखी अशी - पुम्भिः दुष्प्रेक्ष्ये स्वगृहे - पुरुषांना पहाण्यास अशक्य अशा आपल्या घरामध्ये - प्राद्युम्निना समं रेमे - प्रद्युम्न पुत्र अनिरुद्धाबरोबर रममाण झाली. ॥२४॥
आपल्या परमसुंदर प्राणवल्लभाला पाहून आनंदाने तिचे मुखकमल प्रफुल्लित झाले आणि ती त्याच्याशी रममाण झाली. तिच्या त्या अंत:पुराकडे कोणीही पुरूष डोकावूनसुद्धा पाहू शकत नव्हता. (२४)
परार्ध्यवासःस्रग्गन्ध धूपदीपासनादिभिः ।
पानभोजन भक्ष्यैश्च वाक्यैः शुश्रूषणार्चितः ॥ २५ ॥ गूढः कन्यापुरे शश्वत् प्रवृद्धस्नेहया तया । नाहर्गणान् स बुबुधे ऊषयापहृतेन्द्रियः ॥ २६ ॥
दुणावे दिनि ते प्रेम निशीं चौपट जाहले । वस्त्र नी गजरे हार धूप नी गोड पेय ते ॥ २५ ॥ फराळ बोलणे गोड केली सेवा अशी तिने । भुलले अनिरुद्धो नी गेले तेथे बहु दिन ॥ २६ ॥
परार्ध्यवासःस्रग्गन्धधूपदीपासनादिभिः - श्रेष्ठ मूल्यवान उंची वस्त्रे, माळा, सुगंधी पदार्थ, धूप, दीप व आसन या योगे - पानभोजनभक्ष्यैः च - आणि पिण्याचे पदार्थ, सुग्रास भोजन व भक्ष्य पदार्थ या योगे - वाक्यैः शुश्रूषया अर्चितः - मधुर भाषणांनी नीट व्यवस्था राखण्याने तो अनिरुद्ध पूजिला गेला. ॥२५॥ कन्यापुरे गूढः - कन्येच्या महालामध्ये गुप्त रीतीने राहिलेला - शश्वत्प्रवृद्धस्नेहया तया ऊषया अपहृतेन्द्रियः सः - वारंवार जिचे प्रेम अत्यंत वाढत आहे अशा त्या ऊषेने ज्याची इन्द्रिये हिरावून घेतली आहेत असा अनिरुद्ध - अहर्गणान् न बुबुधे - दिवसांची संख्या जाणता झाला नाही. ॥२६॥
ऊषाचे त्याच्यावरील प्रेम दिवसेंदिवस वृद्धिंगत होऊ लागले. ती बहुमोल वस्त्रे, फुलांचे हार, सुगंधी द्रव्ये, धूप, दीप, आसन, सुमधुर पेये, खाद्यपदार्थ, मधुर वाणी इत्यादींनी त्याची सेवा करून त्याला खूष करीत असे. आपल्या प्रेमाने ऊषाने त्याचे मन जिंकून घेतले होते. त्या अंत:पुरात गुप्तपणे तिच्या सहवासात राहिलेल्या अनिरुद्धाला किती दिवस निघून गेले, याचा पत्ताच लागला नाही. (२५-२६)
तां तथा यदुवीरेण भुज्यमानां हतव्रताम् ।
हेतुभिर्लक्षयाञ्चक्रुः आप्रीतां दुरवच्छदैः ॥ २७ ॥ भटा आवेदयाञ्चक्रू राजंस्ते दुहितुर्वयम् । विचेष्टितं लक्षयाम कन्यायाः कुलदूषणम् ॥ २८ ॥
परीक्षित् ! सहवासे या उषाकौमार्य संपले । स्पष्ट ई जाहली चिन्हे प्रसन्न राहु लागली ॥ २७ ॥ रक्षके जाणिता राजा संबंध ओळखोनिया । बाणाला वदले तेंव्हा डाग हा लागतो कुळा ॥ २८ ॥
तथा यदुवीरेण भुज्यमानां - त्याप्रमाणे यदुश्रेष्ठ अनिरुद्धाने उपभोगिलेल्या - हतव्रतां - ब्रह्मचर्य व्रतापासून भ्रष्ट झालेल्या - आप्रीतां - सर्वप्रकारे प्रसन्न मुद्रेच्या - तां - त्या ऊषेला - दुखच्छदैः हेतुभिः लक्षयाञ्चक्रुः - आच्छादिता न येणार्या कारणांनी पहाते झाले.॥२७॥ राजन् - हे राजा - वयं - आम्ही - कन्यायाः कुलदूषणं - कन्येचे कुळाला बटटा लावणारे - ते दुहितुः विचेष्टितं - तुझ्या मुलीचे विरुद्ध आचरण - लक्षयामः - पहात आहोत - (इति) भटाः आवेदयाञ्चक्रुः - असे बाणासुराचे सैनिक त्याला निवेदन करिते झाले. ॥२८॥
यदुवीराच्या सहवासाने ऊषाचे कौमार्य नष्ट झाले होते. तिच्या शरीरावर अशी चिन्हे दिसू लागली होती की, जी कोणत्याही प्रकारे लपविली जाऊ शकत नव्हती. ऊषाही अतिशय आनंदी दिसत होती. पहारेकर्यांनी ते ओळखून बाणासुराकडे जाऊन सांगितले की, "राजन ! आपल्या राजकुमारीचे जे काही रंग-ढंग आम्ही पाहात आहोत, ते आपल्या कुळाला बट्टा लावणारे आहेत. (२७-२८)
अनपायिभिरस्माभिः गुप्तायाश्च गृहे प्रभो ।
कन्याया दूषणं पुम्भिः दुष्प्रेक्ष्याया न विद्महे ॥ २९ ॥
निशि दिनी प्रभो आम्ही महाला रक्षिले असे । पाहिले न तिने कोणा कलंक लागला कसी ॥ २९ ॥
प्रभो - हे राजा - अनपायिभिः अस्माभिः - सावधपणे कार्य करणार्या आम्ही - गुप्तायाः च पुम्भिः दुष्प्रेक्ष्यायाः कन्यायाः गृहे - रक्षिलेल्या व पुरुषांचे जिला दर्शनहि व्हावयाचे नाही अशा कन्येच्या घरात - दूषणं न विघ्नहे - दोषी कृत्य कसे घडले हे समजत नाही. ॥२९॥
हे प्रभो ! सावधपणे आम्ही महालावर पहारा देत असतो. आपल्या कन्येला बाहेरचा मनुष्य पाहूसुद्धा शकत नाही. असे असता ही कलंकित कशी झाली, कळत नाही." (२९)
ततः प्रव्यथितो बाणो दुहितुः श्रुतदूषणः ।
त्वरितः कन्यकागारं प्राप्तोऽद्राक्षीद् यदूद्वहम् ॥ ३० ॥
चारित्र्य पुत्रिचे ऐसे सांगता द्वारपालने । दुःखाने पातला गेहीं अनिरुद्ध दिसे तिथे ॥ ३० ॥
ततः दुहितुः श्रुतदूषणः प्रव्यथितः बाणः - नंतर कन्येचे दोषयुक्त आचरण ऐकून दुःखी झालेला बाणासुर - त्वरितः कन्यकागारं प्राप्तः - ताबडतोब कन्येच्या मंदिरात गेला - यदूद्वहम् (च) अद्राक्षीत् - व यदुकुलोत्पन्न अनिरुद्धाला पहाता झाला. ॥३०॥
आपल्या कन्येचा कलंक ऐकून बाणासुराला अतिशय वाईट वाटले. तो ताबडतोब ऊषेच्या महालात जाऊन पाहातो, तर तेथे अनिरुद्ध. (३०)
( मिश्र )
कामात्मजं तं भुवनैकसुन्दरं श्यामं पिशङ्गाम्बरमम्बुजेक्षणम् । बृहद्भुजं कुण्डलकुन्तलत्विषा स्मितावलोकेन च मण्डिताननम् ॥ ३१ ॥
( इंद्रवज्रा ) कामात्मजो तो अति सुंदरोकी पद्माक्षश्यामो तइ पीतवस्त्र । बृहद्भुजा कुंडल केशकाळे सुहास्य ओठी अति शोभले की ॥ ३१ ॥
भुवनैकसुन्दरं - त्रैलोक्यात अत्यंत स्वरूपवान अशा - श्यामं पिशंगाम्बरम् - कृष्णवर्णाच्या व पिवळे वस्त्र धारण केलेल्या - अम्बुजेक्षणं बृहद्भुजं - कमळाप्रमाणे नेत्र व मोठे दंड असलेल्या - कुण्डलकुन्तलत्विषा च स्मितावलोकेन मण्डिताननं - कुण्डलांच्या व कुरळ केसांच्या कांतीने आणि मंदहास्ययुक्त अवलोकनाने ज्याच्या मुखाला शोभा आली आहे अशा - कामात्मजं तं (अद्राक्षीत्) - प्रद्युम्नपुत्र अनिरुद्धाला पहाता झाला. ॥३१॥
अनिरुद्ध कामावतार प्रद्युम्नाचा पुत्र होता. त्याच्यासारखा सुंदर त्रिभुवनात दुसरा कोणी नव्हता. त्याच्या सावळ्या शरीरकांतीवर पीतांबर शोभत होता. लांब बाहू होते. कमलदलाप्रमाणे डोळे, कुरळे केस, कुंडलांची दीप्ती आणि मंद मंद हास्ययुक्त नजर यांमुळे मुखाचे सौंदर्य काही आगळेच दिसत होते. (३१)
दीव्यन्तमक्षैः प्रिययाभिनृम्णया
तदङ्गसङ्गस्तनकुङ्कुमस्रजम् । बाह्वोर्दधानं मधुमल्लिकाश्रितां तस्याग्र आसीनमवेक्ष्य विस्मितः ॥ ३२ ॥
प्रीयेसवे फासचि खेळताना गळी फुलांची बहु माळ शोभे । वक्षस्थलाची उटी लागलेली स्तिमीत बाणासुर होय तेंव्हा ॥ ३२ ॥
अभिनृम्णया प्रियया अक्षैः दीव्यन्तं - मंगल अशा प्रियपत्नी ऊषेसह फाशांनी खेळणार्या - मधुमल्लिकाश्रितां तदङगसङगस्तनकुङ्कुमस्रजं - मधुमालतीच्या फुलांनी तयार केलेल्या व त्या ऊषेच्या अवयवांना स्पृष्ट झाल्यामुळे जिच्या स्तनांवरील केशराची उटी जिला लागली आहे अशा पुष्पमाळेला - बाव्होः(मध्ये) दधानं - दोन्ही दंडांवर धारण करणार्या - तस्याः अग्रे आसीनं (तं) अवेक्ष्य - त्या ऊषेच्या समोर बसलेल्या अनिरुद्धाला पाहून - विस्मितः - आश्चर्यचकित झाला. ॥३२॥
त्यावेळी अनिरुद्ध सुंदर वेषभूषा केलेल्या प्रियेबरोबर द्यूत खेळत होता. मोगर्याचा हार त्याच्या गळ्यात होता आणि त्या हाराला ऊषाच्या अंगाचा स्पर्श झाल्याने तिच्या वक्ष:स्थाळाचे केशर लागले होते. त्याला ऊषेच्या जवळच बसलेला पाहून बाणासुर आश्चर्यचकित झाला. (३२)
स तं प्रविष्टं वृतमाततायिभिः
भटैरनीकैरवलोक्य माधवः । उद्यम्य मौर्वं परिघं व्यवस्थितो यथान्तको दण्डधरो जिघांसया ॥ ३३ ॥
सैनीक होते सहही तयाच्या सशस्त्र ऐसा बघता असूर । परीघ घेई अनिरुद्ध तेंव्हा दंडावया जै यम पातला तै ॥ ३३ ॥
सः माधवः - तो अनिरुद्ध - आततायिभिः भटैः अनीकैः वृत्तं - शस्रधारी योद्ध्यांनी व सैनिकांनी वेष्टिलेल्या - प्रविष्टं तं अवलोक्य - व आत शिरलेल्या त्या बाणासुराला पाहून - यथा जिघांसया दण्डधरः अन्तकः - ज्याप्रमाणे मारण्याच्या इच्छेने दंड धारण करणारा यमराज त्याप्रमाणे - मौर्वं परिघं उद्यम्य व्यवस्थितः - पोलादी खंडाची अर्गळा हातात घेऊन सज्ज झाला.॥३३॥
बाणासुर पुष्कळशा शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेल्या वीर सैनिकांसह महालात घुसल्याने जेव्हा अनिरुद्धाने पाहिले, तेव्हा त्याला मारण्यासाठी तो लोखंडाचा एक भयंकर परिघ उगारून पवित्र्यात उभा राहिला. जणू कालदंड घेतलेला यमच. (३३)
जिघृक्षया तान् परितः प्रसर्पतः
शुनो यथा शूकरयूथपोऽहनत् । ते हन्यमाना भवनाद् विनिर्गता निर्भिन्नमूर्धोरुभुजाः प्रदुद्रुवुः ॥ ३४ ॥
सैनीक येता धरण्यास त्याला येईल त्याला वधिले तयाने । मांढ्या भुजा अंग तुटोनि कोणी पळोनि गेले भयभीत होता ॥ ३४ ॥
(सः) जिघृक्षया परितः प्रसर्पतः तान् - तो अनिरुद्ध, पकडण्याच्या इच्छेने इकडे तिकडे धावणार्या त्या बाणासुराच्या सैनिकांना - यथा सूकरयूथपः शुनः (तथा) - ज्याप्रमाणे डुकरांचा अधिपति कुत्र्यांना मारितो त्याप्रमाणे - अहनत् - मारिता झाला - हन्यमानाः ते - मारिले जाणारे ते योद्धे - भवनात् विनिर्गताः - ऊषेच्या घरातून बाहेर पडून - निर्भिन्नमूर्धोरुभुजाः - ज्यांची मस्तके, मांडया, व दंड मोडून गेले आहेत असे - प्रदुद्रुवुः - पळत सुटले. ॥३४॥
ते सैनिक त्याला पकडण्यासाठी जसजसे त्याच्या अंगावर घावून जात, तसतसा तो त्यांना, डुकरांच्या कळपाच्या नायकाने कुत्र्यांना मारावे, त्याप्रमाणे मारू लागला. अनिरुद्धाच्या फटकार्याने त्या सैनिकांची मस्तके, हात, मांड्या इत्यादी अवयव तुटू लागले, तेव्हा ते महालाबाहेर पळून गेले. (३४)
तं नागपाशैर्बलिनन्दनो बली
घ्नन्तं स्वसैन्यं कुपितो बबन्ध ह । ऊषा भृशं शोकविषादविह्वला बद्धं निशम्याश्रुकलाक्ष्यरौदिषीत् ॥ ३५ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे उत्तरार्धे अनिरुद्धबन्धो नाम द्विषष्टितमोऽध्यायः ॥ ६२ ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
बाणासुराने वध पाहिला तो नी नागपाशे अनिरुद्ध यासी । बांधोनि टाली, बघता उषा ती शोके विलापे रडु लागली की ॥ ३५ ॥ ॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर बासष्ठावा अध्याय हा ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
बलिनन्दनः - बलिराजाचा पुत्र असा - कुपितः बली (सः) - रागावलेला बलिष्ठ बाणासुर - स्वसैन्यं घ्नन्तं तं - आपल्या सैनिकांना मारणार्या त्या अनिरुद्धाला - नागपाशैः बबन्ध ह - नागपाशांनी खरोखर बांधिता झाला - ऊषा - ऊषा - बद्धं निशम्य - अनिरुद्धाला बांधले आहे असे ऐकून - शोकविषादविह्वला - शोक व खेद ह्यांनी विव्हळ झालेली - अश्रुकलाक्षी - अश्रूंनी भरले आहेत नेत्र जिचे अशी - भृशं अरौदिषीत् - रडू लागली. ॥३५॥
आपल्या सेनेचा संहार करणार्या त्याला शूर बाणासुराने संतापून नागपाशांनी बांधले. आपल्या प्रियतमाला बांधलेले ऐकून ऊषा शोकाने आणि खेदाने अत्यंत विव्हळ झाली, तिच्या नेत्रांतून अश्रुधारा वाहू लागल्या आणि ती रडू लागली. (३५)
अध्याय बासष्टावा समाप्त |