श्रीमद् भागवत पुराण
स्कन्ध दहावा
अध्याय साठावा

रुक्मिणी श्रीकृष्णयोः प्रणयकलहः -

श्रीकृष्ण-रुक्मिणी-संवाद -


संहिता - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीबादरायणिरुवाच -
( अनुष्टुप् )
कर्हिचित् सुखमासीनं स्वतल्पस्थं जगद्गुरुम् ।
पतिं पर्यचरद्‌ भैष्मी व्यजनेन सखीजनैः ॥ १ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
( अनुष्टुप् )
सुखाने एकदा बैसे मंचकी तो जगद्‍गुरु ।
रुक्मिणी पाय चेपी नी सख्या पंखाहि ढाळिती ॥ १ ॥

कर्हिचित् - एके दिवशी - भैष्मी - भीष्मककन्या रुक्मिणी - सखीजनैः - मैत्रिणींच्या हस्ते - व्यजनेन - पंख्याने - सुखम् आसीनं - सुखाने बसलेल्या - जगद्‌गुरुं पतिं पर्यचरत् - त्रैलोक्याचा गुरु अशा पति श्रीकृष्णाची सेवा करिती झाली॥१॥

श्रीशुकाचार्य म्हणतात - जगद्‌गुरू श्रीकृष्ण एके दिवशी रुक्मिणीदेवींच्या पलंगावर आरामात बसले होते. भीष्मकनंदिनी रुक्मिणी आपल्या सख्यांसह पतीची पंख्याने वारा घालून सेवा करीत होती. (१)


यस्त्वेतत् लीलया विश्वं सृजत्यत्त्यवतीश्वरः ।
स हि जातः स्वसेतूनां गोपीथाय यदुष्वजः ॥ २ ॥
परीक्षित् । शक्तिमान् कृष्ण खेळता रचि विश्व हे ।
घालण्या धर्ममर्यादा यदूच्या कुळि जन्मला ॥ २ ॥

यः तु - जो तर - लीलया - सहजरीतीने - एतत् विश्वं - हे जग - सृजति अवति अत्ति - उत्पन्न करितो, रक्षितो व नष्ट करितो - सः हि ईश्वरः - तोच ईश्वर - अजः - जन्मरहित असूनहि - स्वसेतूनां गोपीथाय - आपण घातलेल्या मर्यादांच्या रक्षणाकरिता - यदुषु जातः - यदुकुळात उत्पन्न झाला. ॥२॥

जे परमेश्वर सहजतया या जगाची निर्मिती, पालन आणि प्रलय करतात, तेच अजन्मा प्रभू आपणच तयार केलेल्या धर्ममर्यादांचे रक्षण करण्यासाठी यदुकुलात अवतीर्ण झाले आहेत. (२)


तस्मिन् अन्तर्गृहे भ्राजन् मुक्तादामविलम्बिना ।
विराजिते वितानेन दीपैर्मणिमयैरपि ॥ ३ ॥
मल्लिकादामभिः पुष्पैः द्विरेफकुलनादितैः ।
जालरन्ध्रप्रविष्टैश्च गोभिश्चन्द्रमसोऽमलैः ॥ ४ ॥
पारिजातवनामोद वायुनोद्यानशालिना ।
धूपैः अगुरुजै राजन् जालरन्ध्रविनिर्गतैः ॥ ५ ॥
पयःफेननिभे शुभ्रे पर्यङ्के कशिपूत्तमे ।
उपतस्थे सुखासीनं जगतामीश्वरं पतिम् ॥ ६ ॥
चांदवे त्या महालात मोत्यांच्या झालरी तशा ।
रत्‍नांचे दीपही तेथे सदैवचि प्रकाशती ॥ ३ ॥
जाई नी जुइचे हार गंधाने दाटले तिथे ।
गुंजती भृंग ते नित्य चंद्राचे चांदणे असे ॥ ४ ॥
गंध तो पारिजाताचा वायू तो पसरी पहा ।
धूपाचा धूर नी गंध बाहेर येतसे तदा ॥ ५ ॥
स्वच्छ दुग्धापरी शय्यी मंचकी राजला हरी ।
विश्वाचा स्वामि तो कृष्ण रुक्मिणी सेवि त्या पदा ॥ ६ ॥

राजन् - हे राजा - भ्राजन्मुक्तादामविलंबिना - दैदीप्यमान मोत्यांच्या माळांनी लोंबणार्‍या - वितानेन - छताने - मणिमयैः दीपैः अपि - मण्यांच्या दिव्यांनीहि - विराजिते तस्मिन् अन्तगृहे - शोभणार्‍या त्या अन्तःपुरात - मल्लिकादामभिः पुष्पैः - मोगर्‍यांच्या माळांतील फुलांवरील - द्विरेफकुलनादिते - भ्रमरसमुदायांनी गजबजलेल्या - जालरन्ध्रप्रविष्टैः च - आणि खिडक्यांतून शिरलेल्या - चंद्रमसः अमलैः गोभिः - चंद्राच्या निर्मळ किरणांनी - उद्यानशालिना - बागेत संचार करणार्‍या - पारिजातवनामोदवायुना - पारिजातकाच्या वनातील सुगंधाने युक्त अशा वायूने - जालरन्ध्रविनिर्गतैः - खिडकीच्या द्वारा बाहेर निघालेल्या - अगुरुजैः धूपैः - कृष्णागुरुच्या धूपांनी - पयःफेननिभे शुभ्रे - दुधाच्या फेसाप्रमाणे शुभ्र - कशिपूत्तमे पर्यङ्‌के - उत्तम गादी अंथरलेल्या पलंगावर - सुखासीनं जगताम् ईश्वरं पतिं - सुखाने बसलेल्या त्रैलोक्याचा स्वामी अशा पति श्रीकृष्णाची - उपतस्थे - सेवा करिती झाली. ॥३-६॥

रुक्मिणीदेवीचे अंत:पुर अतिशय सुंदर होते. त्यामध्ये मोत्यांच्या लड्या लावलेले छत होते, रत्‍नांचे दिवे झगमगत होते. (३) जाईच्या माळा लावलेल्या होत्या. भ्रमरांचे थवे त्या फुलांवर गुंजारव करीत होते. झरोक्यांच्या जाळीतून चंद्राची शुभ्र किरणे आत येत होती. (४) राजा ! उपवनातीन पारिजातकाचा सुगंध घेऊन बगीच्यात वारा वाहात होता. झरोक्यांच्या जाळ्यांतून धुपाचा धूर बाहेर जात होता. (५) अशा महालात दुधाच्या फेसाप्रमाणे शुभ्र बिछाना घातलेल्या पलंगावर मोठ्या आनंदाने विराजमान झालेल्या त्रैलोक्याच्या स्वामींची रुक्मिणी सेवा करीत होती. (६)


वालव्यजनमादाय रत्‍नदण्डं सखीकरात् ।
तेन वीजयती देवी उपासांचक्र ईश्वरम् ॥ ७ ॥
रत्‍नांकित अशी दांडी पंख्याची घेउनी करी ।
हालवी रुक्मिणी तेव्हा करी सेवा अशी स्वयें ॥ ७ ॥

देवी - देवी रुक्मिणी - सखीकरात् रत्‍नदण्डं वालव्यजनं आदाय - मैत्रिणीच्या हातांतून रत्‍नांचा दांडा असलेली केसांची चवरी घेऊन - तेन वीजयती - त्यायोगे वारा घालीत ती - ईश्वरं उपासांचक्रे - श्रीकृष्णाची सेवा करिती झाली. ॥७॥

रत्‍नाची दांडी असलेली चवरी सखीच्या हातातून रुक्मिणीने घेतली आणि त्याने वारा घालीत ती भगवंतांची सेवा करू लागली. (७)


( वसंततिलका )
सोपाच्युतं क्वणयती मणिनूपुराभ्यां
     रेजेऽङ्गुलीयवलय व्यजनाग्रहस्ता ।
वस्त्रान्तगूढकुचकुङ्कुम शोणहार
     भासा नितम्बधृतया च परार्ध्यकाञ्च्या ॥ ८ ॥
( वसंततिलका )
हातात अंगठि नि कंकण शोभले तै
     पायात ही नुपुर ती झूणझूणतात ।
लाली स्तनास दिसते हळु केशराची
     ती मेखळा हलतसे करि ऐशि सेवा ॥ ८ ॥

अङ्गुलीयवलयव्यजनाग्रहस्ता - अंगठया, कंकणे व चवरी यांनी शोभणारा आहे हात जीचा अशी - सा - ती रुक्मिणी - उपाच्युतम् - श्रीकृष्णाजवळ - मणिनूपुराभ्यां क्वणयती - मण्यांच्या पैंजणांचा शब्द करीत - वस्त्रान्तगूढकुचकुङ्कुमशोणहारभासा - वस्त्रामध्ये आच्छादिलेल्या स्तनांवरील केशराने तांबडया झालेल्या हाराच्या कांतीने - नितम्बधृतया परार्ध्यकाञ्च्या च - आणि कंबरेत घातलेल्या महामूल्यवान कंबरपटटयाने - रेजे - शोभली. ॥८॥

तिच्या अंगठी व बांगड्या असलेल्या हातात चवरी शोभत होती. पायांत रत्‍नजडीत पैंजणे रुणझुण करीत होती. पदराच्या आड लपलेल्या स्तनांच्या केशराच्या लालीमुळे गळ्यातील मोत्यांचा हार लालसर दिसत होता आणि कमरेवर बहुमुल्य कमरपट्टा चमकत होता. अशी ती भगवंतांच्या जवळ राहून त्यांची सेवा करीत होती. (८)


तां रूपिणीं श्रीयमनन्यगतिं निरीक्ष्य
     या लीलया धृततनोरनुरूपरूपा ।
प्रीतः स्मयन्नलक-कुण्डलनिष्ककण्ठ
     वक्त्रोल्लसत् स्मितसुधां हरिराबभाषे ॥ ९ ॥
ती रुक्मिणी विलसते मणि कुंडलांनी
     श्रीयेचिया मुखिसुधा मधु हास्य तैसे ।
जाणी मनात हरिला अवतार ऐसा
     सेवा बघून हरि तो वदला प्रियेला ॥ ९ ॥

हरिः - श्रीकृष्ण - लीलया धृततनोः (कृष्णस्य) या अनुरूपरूपा - लीलेने घेतला आहे अवतार ज्याने अशा कृष्णाला साजेसे रूप आहे जीचे अशा - अनन्यगतिं रूपिणीं श्रियं - एकनिष्ठ अशा त्या मनुष्यदेहधारी लक्ष्मीला - निरीक्ष्य - पाहून - प्रीतः - प्रसन्न झालेला असा - स्मयन् - मंदहास्य करीत - अलककुण्डलनिष्ककण्ठवक्त्रोल्लसत्स्मितसुधां (तां) - कुरळे केस, कुंडले, सुवर्णाच्या पदकांनी शोभणारा कंठ ह्यांनी सुशोभित झालेल्या मुखाच्या ठिकाणी मंदहास्यरूपी अमृत जीच्या अशा तिला - बभाषे - म्हणाला. ॥९॥

कुरळे केस, कुंडले आणि गळ्यातील सुवर्णाचे हार यांनी शोभणार्‍या तिच्या मुखचंद्रावरुन हास्यरूप चांदण्यांचा अमृतवर्षाव होत होता. ती साक्षात एकनिष्ठ लक्ष्मीच होती. यावेळी तिने लीलेने भगवंतांना अनुरूप असे मनुष्यरूप धारण केले होते. तिल पाहून प्रसन्न झालेल्या श्रीकृष्णांनी हसत हसत तिला म्हटले. (९)


श्रीभगवानुवाच -
( अनुष्टुप् )
राजपुत्रीप्सिता भूपैः लोकपालविभूतिभिः ।
महानुभावैः श्रीमद्‌भी रूपौदार्यबलोर्जितैः ॥ १० ॥
तान्प्राप्तानर्थिनो हित्वा चैद्यादीन् स्मरदुर्मदान् ।
दत्ता भ्रात्रा स्वपित्रा च कस्मान्नो ववृषेऽसमान् ॥ ११ ॥
श्री भगवान् म्हणाले -
( अनुष्टुप् )
राजपुत्री तुझ्याशी ते ऐश्वर्यवंतही नृप ।
बलवान् रुपवान् ऐसे होते इच्छीत लग्न की ॥ १० ॥

राजपुत्रि - हे राजकन्ये रुक्मिणी - लोकपालविभूतिभिः - लोकपालांचे अंश अशा - महानुभावैः - मोठया पराक्रमी - रूपौदार्यबलोर्जितैः - सौंदर्य, औदार्य व सामर्थ्य ह्यांनी युक्त अशा - श्रीमद्‌भिः भूपैः - ऐश्वर्यवान राजांनी - (त्वं) ईप्सिता - तू इच्छिली गेली होतीस. ॥१०॥

श्रीभगवान म्हणाले- हे राजकुमारी ! ज्यांच्याजवळ लोकपालांच्यासारखे ऐश्वर्य होते, जे मोठे प्रभावशाली आणि श्रीमंत होते, त्याचप्रमाणे सौंदर्य, औदार्य आणि ताकदीमध्येही जे असामान्य होते, असे राजे तुला इच्छित होते. (१०)


राजभ्यो बिभ्यतः सुभ्रु समुद्रं शरणं गतान् ।
बलवद्‌भिः कृतद्वेषान् प्रायस्त्यक्त नृपासनान् ॥ १२ ॥
वाग्‌निश्चय पिता बंधू यांनी तो सोडिला असे ।
त्यागिता सर्व ते श्रेष्ठ मजला वारिलेस तू ॥ ११ ॥
जरासंधादिका भेणे समुद्रीं राहिलो अम्ही ।
थोरांसी वैर ते आहे राज्याचाही न वारसा ॥ १२ ॥

सुभ्रूः - हे सुंदरी - भ्रात्रा स्वपित्रा च दत्ता - भावाने व स्वतःच्या पित्याने दिलेली - स्मरदुर्मदान् - कामाने मदांध झालेल्या - अर्थिनः प्राप्तान् - तुझी मागणी करण्याकरिता प्राप्त झालेल्या - तान् - त्या - चैद्यादीन् हित्वा - शिशुपाल आदि करून राजांना सोडून - राजभ्यः बिभ्यतः - राजांना भिऊन - समुद्रं शरणं गतान् - समुद्राला शरण गेलेल्या - बलवद्‌भिः कृतद्वेषान् - बलवानांशी शत्रुत्व करणार्‍या - प्रायः त्यक्तनृपासनान् - बहुतेक राजसिंहासन सोडून दिलेल्या अशा - असमान् नः - सारख्या योग्यतेच्या नसणार्‍या आम्हाला - कस्मात् ववृषे - काय कारणास्तव वरिलेस. ॥११-१२॥

तुझे वडिल आणि भाऊ यांनीसुद्धा त्यांना शब्द दिला होता. जे कामोन्मत्त होऊन तुझे याचक बनले होते, त्या शिशुपाल इत्यादींना सोडून तुझ्या तोडीच्या नसलेल्या मला तू का वरलेस ? (११) हे सुंदरी ! जरासंध इत्यादी राजांच्या भीतीने आम्ही समुद्रात वस्ती केली आहे. बलवानांशी आम्ही वैर धरले आहे आणि जवळ जवळ राजसिंहासनही आम्हांला मिळण्यासारखे नाही. (१२)


अस्पष्टवर्त्मनां पुंसां अलोकपथमीयुषाम् ।
आस्थिताः पदवीं सुभ्रु प्रायः सीदन्ति योषितः ॥ १३ ॥
आमुचा मार्ग तो काय लोकां माहित तो नसे ।
अनुनयो नसे स्त्रीशी क्लेश त्यांना पडे तसा ॥ १३ ॥

सुभ्रूः - हे सुंदरी - अस्पष्टवर्त्मनां - अज्ञात आहे आचार ज्यांचा अशा - अलोकपथम् ईयुषां पुंसां - लोकांनी अमान्य केलेल्या मार्गाने जाणार्‍या पुरुषांच्या - पदवीं आस्थिताः - मार्गाला अनुसरलेल्या - योषितः - स्त्रिया - प्रायः सीदन्ति - बहुत करून दुःखित होतात. ॥१३॥

हे सुंदरी ! आमचा मार्ग कोणता, हे सुद्धा लोकांना माहीत नाही. लौकिक व्यवहार सोडून वागणारे आम्ही ! तसेच स्त्रियांना खूषही न करणार्‍या पुरूषांना वरणार्‍या स्त्रियांना बहुदा दु:खच भोगावे लागते. (१३)


निष्किञ्चना वयं शश्वत् निष्किञ्चनजनप्रियाः ।
तस्मा त्प्रायेण न ह्याढ्या मां भजन्ति सुमध्यमे ॥ १४ ॥
निष्कांचन असे आम्ही नव्हते पुढती नुरे ।
धनवान् नेच्छिती आम्हा प्रेम सेवा न अर्पिती ॥ १४ ॥

सुमध्यमे - हे सुंदरी - निष्किंचनजनप्रियाः वयं - दरिद्री लोक ज्यांना प्रिय आहेत असे आम्ही - शश्वत् निष्किञ्चनाः - नेहमी दरिदीच असणार - तस्मात् - यास्तव - आढयाः - श्रीमंत लोक - प्रायेण - बहुतकरून - मां न भजन्ति हि - मला खरोखर भजत नाहीत. ॥१४॥

हे सुंदरी ! आम्ही असे जवळ काही न बाळगणारे ! आणि जे जवळ काहीं बाळागत नाहीत अशाच लोकांवर आम्ही प्रेम करतो. यामुळेच धनवान लोक बहुदा आमच्या वार्‍यालाही राहात नाहीत. (१४)


ययोरात्मसमं वित्तं जन्मैश्वर्याकृतिर्भवः ।
तयोर्विवाहो मैत्री च नोत्तमाधमयोः क्वचित् ॥ १५ ॥
सम रूप कुलो द्रव्य तेथ मैत्री नि लग्न हो ।
श्रेष्ठत्वा अधमो यांशी न व्हावे मुळि ते तसे ॥ १५ ॥

ययोः - ज्या दोघांचे - वित्तं जन्म ऐश्वर्याकृतिः भवः - द्रव्य, जन्म, ऐश्वर्य, स्वरूप व भावी उन्नती - आत्मसमं (स्यात्) - एकमेकाला अनुरूप असेल - तयोः विवाहः मैत्री च (युज्यते) - त्या दोघांचा विवाह व मैत्री योग्य होय - क्वचित् - कधीहि - उत्तमाधमयोः न - उत्तम व अधम यांमधील विवाह व मैत्री योग्य नव्हे. ॥१५॥

ज्यांच्या धन, कूळ, ऐश्वर्य, सौंदर्य आणि प्रताप या गोष्टी सारख्या असतात, त्यांचेच परस्पर विवाह आणि मैत्री होतात. श्रेष्ठ-कनिष्ठांचे नव्हेत. (१५)


वैदर्भ्येतदविज्ञाय त्वयादीर्घसमीक्षया ।
वृता वयं गुणैर्हीना भिक्षुभिः श्लाघिता मुधा ॥ १६ ॥
वैदर्भी तू न जाणोनी वरिले स्तुती ऐकता ।
मी तो भिक्षू गुणहीन प्रशंसा खोटि ती असे ॥ १६ ॥

वैदर्भि - हे रुक्मिणी - अदीर्घसमीक्षया त्वया - दूरदृष्टीने विचार न करणार्‍या तुझ्याकडून - एतत् अविज्ञाय - हे न जाणता - गुणैः हीनाः - गुणरहित - भिक्षुभिः श्लाघिताः वयं - व संन्याशांनी स्तविलेले आम्ही - मुधा - व्यर्थ - वृताः - वरिले गेलो. ॥१६॥

हे विदर्भराजकुमारी ! दूरदर्शीपणा नसल्यामुळे तू या गोष्टींचा विचार केला नाहीस आणि भिक्षुकांकडून माझी खोटी प्रशंसा ऐकून माझ्यासारख्या गुणहीनाला तू वरलेस. (१६)


अथात्मनोऽनुरूपं वै भजस्व क्षत्रियर्षभम् ।
येन त्वमाशिषः सत्या इहामुत्र च लप्स्यसे ॥ १७ ॥
अनुरूप असा श्रेष्ठ आताही वरि क्षत्रिय ।
आशा सर्व पुर्‍या होती गाठणे वीर तो तसा ॥ १७ ॥

अथ - आता ह्यापुढे - वै - खरोखर - आत्मनः अनुरूपं - स्वतःला योग्य अशा - क्षत्रियर्षभं भजस्व - श्रेष्ठ क्षत्रियाला वर - येन - ज्यायोगे - इह अमुत्र च - ह्यालोकी व परलोकी - त्वं - तू - सत्याः आशिषः लप्स्यसे - खरे ऐश्वर्यभोग मिळविशील. ॥१७॥

अजूनही तू आपल्याला अनुरूप अशा श्रेष्ठ क्षत्रियाशी विवाहबद्ध हो; त्यामुळे तुझ्या इहपरलोकातील आकांक्षा पूर्ण होऊ शकतील. (१७)


चैद्यशाल्वजरासन्ध दन्तवक्रादयो नृपाः ।
मम द्विषन्ति वामोरु रुक्मी चापि तवाग्रजः ॥ १८ ॥
शिशुपाल जरासंध शाल्व नी दंतवक्र तो ।
रुक्मीही द्वेषितो आम्हा ठावुक काय ते तुला ? ॥ १८ ॥

वामोरु - हे सुंदरी - चैद्यशाल्वजरासन्धदन्तवक्रादयः नृपाः - शिशुपाल, शाल्व, जरासंध, दंतवक्र इत्यादि राजे - मम द्विषन्ति - माझा द्वेष करितात - तव अग्रजः रुक्मी च अपि - आणि तुझा भाऊ रुक्मी सुद्धा. ॥१८॥

हे सुंदरी ! तुला माहीतच आहे की, शिशुपाल, शाल्व, जरासंध, दंतवक्त्र इत्यादी राजे आणि तुझा थोरला भाऊ रुक्मीसुद्धा माझा द्वेष करीत आहेत. (१८)


तेषां वीर्यमदान्धानां दृप्तानां स्मयनुत्तये ।
आनितासि मया भद्रे तेजोऽपहरतासताम् ॥ १९ ॥
बल पौरुष यांनी ते मदांध सर्व जाहले ।
हारण्या गर्व तो त्यांचा तुजला मी हरीयले ॥ १९ ॥

भद्रे - हे कल्याणी रुक्मिणी - असतां तेजः अपहरता - दुष्टांचे तेज नष्ट करणार्‍या - मया - माझ्याकडून - वीर्यमदान्धानां दृप्तानां तेषां - पराक्रमाच्या मदाने अंध झालेल्या त्या गर्विष्ठ राजांचा - स्मयनुत्तये - गर्व दूर करण्यासाठी - (त्वं) आनीता असि - तू आणिली गेली. ॥१९॥

हे कल्याणी ! सामर्थ्याने मदांध झालेल्या, गर्विष्ठ अशा त्या दुष्टांचा गर्व नाहीसा करण्यासाठीच मी तुझे अपहरण करून तुला आणले. (१९)


उदासीना वयं नूनं न स्त्र्यपत्यार्थकामुकाः ।
आत्मलब्ध्याऽऽस्महे पूर्णा गेहयोर्ज्योतिरक्रियाः ॥ २० ॥
उदासीन असे आम्ही स्त्री द्रव्य पुत्र नेच्छितो ।
दीपशिखापरी साक्षी साक्षात्कारेचि धन्य हो ॥ २० ॥

वयं नूनं - आम्ही खरोखर - गेहयोः उदासीना - शरीर व घर ह्याठिकाणी उदासीन - ज्योतिरक्रियाः (च) - व दिव्याच्या ज्योतीप्रमाणे निष्क्रिय आहो - स्त्र्यपत्यार्थकामुकाः न - पत्‍नी, पुत्र व द्रव्य यांची इच्छा करणारे नाही - आत्मलब्ध्या षूर्णाः आस्महे - आत्म्याच्या प्राप्तीमुळे पूर्ण मनोरथ झालेले असे आहो.॥२०॥

आम्ही खरोखरच देह व घरदार यांविषयी उदासीन आहोत. स्त्री, संतान आणि धन यांची आम्हांला आकांक्षा नाही. आम्ही निष्क्रिय असून दिव्यासारखे साक्षीदार आहोत. आम्ही आमच्या आत्म्याच्या साक्षात्कारानेच पूर्णकाम आहोत. (२०)


श्रीशुक उवाच -
एतावदुक्त्वा भगवान् आत्मानं वल्लभामिव ।
मन्यमानामविश्लेषात् तद्दर्पघ्न उपारमत् ॥ २१ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
परीक्षित् ! क्षणही एक न त्यागी कृष्ण तो तिला ।
जाहला गर्व हा तीस म्हणोनी बोलले असे ॥ २१ ॥

तद्दर्पघ्नः - तिचा गर्व नाहीसा करणारा - भगवान् - श्रीकृष्ण - अविश्लेषात् आत्मानम् इव मन्यमानां - एक रूप असल्यामुळे आपल्याप्रमाणेच मानणार्‍या - वल्लभां - प्रिय पत्‍नीला - एतावत् उक्त्वा - इतके सांगून - उपारमत् - स्तब्ध झाला. ॥२१॥

श्रीशुक म्हणतात- श्रीकृष्ण आपल्यापासून कधीच दूर जात नसल्याकारणाने रुक्मिणीला "आपणच यांना सर्वाधिक प्रिय आहे." असा झालेला गर्व नाहीसा करण्यासाठीच भगवंत एवढे बोलले आणि गप्प राहिले. (२१)


( मिश्र )
इति त्रिलोकेशपतेस्तदाऽऽत्मनः
     प्रियस्य देव्यश्रुतपूर्वमप्रियम् ।
आश्रुत्य भीता हृदि जातवेपथुः
     चिन्तां दुरन्तां रुदती जगाम ह ॥ २२ ॥
( इंद्रवज्रा )
त्रिलोकस्वामी वदले असे ते
     अत्यंत झाली भयभीत चित्ती ।
उरी भरे ती धडकी तशी नी
     शोकार्णवासी रडता बुडाली ॥ २२ ॥

देवी - देवी रुक्मिणी - तदा - त्यावेळी - इति - याप्रमाणे - त्रिलोकेशपतेः आत्मनः प्रियस्य - त्रैलोक्याचा अधिपति अशा आपल्या प्रियपति श्रीकृष्णाचे - अश्रुतपूर्वं अप्रियं आश्रुत्य - पूर्वी न ऐकलेले अप्रिय भाषण ऐकून - हृदि भीता जातवेपथुः - अंतःकरणात भ्यालेली व शरीराला कंप सुटलेली अशी - रुदती दुरन्तां चिन्तां जगाम ह - रुदन करीत मोठी काळजी करू लागली. ॥२२॥

आपले प्रियतम त्रिलोकेश्वर भगवंतांचे पूर्वी कधीच न ऐकलेले हे अप्रिय बोल जेव्हा रुक्मिणीने ऐकले, तेव्हा ती भ्याली. तिचे हृदय धडधडू लागले. चिंतेच्या अथांग सागरात ती गटांगळ्या खाऊ लागली. अखेर ती रडू लागली. (२२)


पदा सुजातेन नखारुणश्रीया
     भुवं लिखन्त्यश्रुभिरञ्जनासितैः ।
आसिञ्चती कुङ्कुमरूषितौ स्तनौ
     तस्थावधोमुख्यतिदुःखरुद्धवाक् ॥ २३ ॥
टोची भुमीला नख कोवळे ते
     वक्षस्थळा अश्रु धुवून गेले ।
दुःखे तिचा तो भरलाही कंठ
     अधोमुखे ती तशि तिष्ठली की ॥ २३ ॥

सुजातेन नखारुणश्रिया पदा भुवं लिखन्ती - सर्वलक्षणसंपन्न व नखाच्या आरक्त वर्णाने शोभणार्‍या पायाने पृथ्वीवर लिहिणारी - अञ्जनासितैः अश्रुभिः - काजळाने काळ्या झालेल्या अश्रूंनी - कुङ्कुमरूषितौ स्तनौ आसिञ्चती - केशराने तांबडया झालेल्या स्तनांवर सिंचन करणारी - (सा) अधोमुखी अतिदुःखरुद्धवाक् तस्थौ - ती रुक्मिणी खाली मुख करून अत्यंत दुःखामुळे जिच्या मुखातून एक शब्दहि निघत नाही अशी स्तब्ध राहिली. ॥२३॥

नखांच्या लालिम्यामुळे सुंदर दिसणार्‍या पायाच्या नखाने ती जमीन उकरू लागली. डोळ्यांतील काजळाने काळे झालेले अश्रू केशराने रंगलेली वक्ष:स्थळे धुऊ लागले. ती मान खाली घालून उभी राहिली. अत्यंत दु:खाने तिच्या तोंडून शब्द फुटेना. (२३)


( वसंततिलका )
तस्याः सुदुःखभयशोकविनष्टबुद्धेः
     हस्ताच्छ्लथद्वलयतो व्यजनं पपात ।
देहश्च विक्लवधियः सहसैव मुह्यन्
     रम्भेव वायुविहतो प्रविकीर्य केशान् ॥ २४ ॥
( वसंततिलका )
झाली व्यथीत भयभीत नि शक्ति गेली
     ती कंकणेनि चवरी पडली भुमीसी ।
क्षीणे मती नि पडली मग मूर्च्छिता ती
     केळी पडे धरणिशी जणु वायु येता ॥ २४ ॥

सुदुःखभयशोकविनष्टबुद्धेः - अत्यंत दुःख व शोक यांनी जिची बुद्धि नष्ट झाली आहे अशा - विक्लवधियः तस्याः - व जिची विचारशक्ति कुंठित झाली आहे अशा त्या रुक्मिणीच्या - श्लथद्वलयतः हस्तात् व्यजनं - कंकणे सैल झालेल्या हातातून चवरी गळाली - (तस्याः) देहः च - आणि तिचा देह - सहसा एव मुह्यन् - एकाएकीच मोहित होऊन - वायुविहिता रम्भा इव - वायूने हलविलेल्या केळीप्रमाणे - केशान् प्रविकीर्य पपात - केस विस्कळीत होऊन खाली पडली. ॥२४॥

आत्यंतिक व्यथा, भय आणि शोकामुळे तिची विचारशक्ती लोप पावली, वियोगाच्या शंकेने ती इतकी दुबळी झाली की, तिच्या मनगटातील बांगड्या ओघळू लागल्या. हातातील चवरी गळून पडली. बुद्धी व्याकूळ झाल्याने तिला एकाएकी घेरी येऊ लागली. आणि वार्‍याने केळ उन्मळून पडावी, त्याप्रमाणे केस विस्कटून ती जमिनीवर कोसळली. (२४)


( अनुष्टुप् )
तद् दृष्ट्वा भगवान् कृष्णः प्रियायाः प्रेमबन्धनम् ।
हास्यप्रौढिमजानन्त्याः करुणः सोऽन्वकम्पत ॥ २५ ॥
( अनुष्टुप् )
न नेई हासण्यावारी प्रेमाने पडली अशी ।
कृष्णाने पाहता प्रीया हृदयी प्रेम दाटले ॥ २५ ॥

सः भगवान् कृष्णः - तो भगवान श्रीकृष्ण - हास्यप्रौढिम् अजानन्त्याः प्रियायाः - थटटेच्या गंभीरपणाला न जाणणार्‍या प्रिय रुक्मिणीचे - तत् प्रेमबंधनं दृष्टवा - ते प्रेमाचे बंधन पाहून - करुणः - दयायुक्त असा - अन्वकम्पत - कृपा करिता झाला. ॥२५॥

भगवान श्रीकृष्णांच्या लक्षात आले की, विनोदाचे मर्म लक्षात न आलेल्या रुक्मिणीची माझ्यावरील अत्यंत प्रेमामुळे अशी अवस्था झाली आहे. स्वभावत:च दयाळू असणार्‍या श्रीकृष्णांचे मन तिच्याबद्दलच्या करुणेने भरून आले. (२५)


पर्यङ्कादवरुह्याशु तामुत्थाप्य चतुर्भुजः ।
केशान् समुह्य तद्वक्त्रं प्रामृजत् पद्मपाणिना ॥ २६ ॥
चतुर्भुज उठे तैसा उचली आपुली प्रिया ।
बांधिले मोकळे केस पुशी मुख स्वये करे ॥ २६ ॥

चतुर्भुजः सः - चार हात असलेला तो श्रीकृष्ण - आशु पर्यङ्कात् अवरुह्य - लवकर पलंगावरून खाली उतरून - तां उत्थाप्य - तिला वर उठवून - केशान् समुह्य - तिचे केस सावरून - पद्मपाणिना - कमळासारख्या हाताने - तद्वक्त्रं प्रामृजत् - तिचे मुख पुसून काढिता झाला. ॥२६॥

(त्यावेळी) चार हात धारण केलेले भगवान चटकन पलंगावरून खाली उतरले आणि रुक्मिणीला त्यांनी उठविले. तिचे मोकळे झालेले केस सावरले आणि आपल्या कमलकराने तिचे तोंड कुरवाळले. (२६)


प्रमृज्याश्रुकले नेत्रे स्तनौ चोपहतौ शुचा ।
आश्लिष्य बाहुना राजन् अनन्यविषयां सतीम् ॥ २७ ॥
सान्त्वयामास सान्त्वज्ञः कृपया कृपणां प्रभुः ।
हास्यप्रौढिभ्रमच्चित्तां अतदर्हां सतां गतिः ॥ २८ ॥
अश्रूंनी स्तन नी नेत्र भिजले पुसिले करें ।
अनन्य प्रेमभावाने रुक्मिणी कवटाळिली ॥ २७ ॥
सांत्वनो आश्रयो तोची भक्ताला एकमात्र की ।
अवस्था पाहता तैशी बोलला रुक्मिणीस तो ॥ २८ ॥

राजन् - हे परीक्षित राजा - सान्त्वज्ञः सतां गतिः प्रभुः - सांत्वन करण्याचा विधि जाणणारा व सज्जनांना सद्‌गति देणारा समर्थ श्रीकृष्ण - अश्रुकले नेत्रे प्रमृज्य - अश्रूंनी भरलेले नेत्र पुसून - शुचा उपहतौ स्तनौ च - आणि शोकाने पीडिलेल्या स्तनांना - बाहुना आश्लिष्य - बाहूने आलिंगन देऊन - अनन्यविषयां कृपणां - जिला दुसरा विषय माहित नाही अशा दीन - हास्यप्रौढिभ्रमश्चित्ताम् अतदर्हां सतीं - थट्टेच्या गांभीर्यपणामुळे जिचे अन्तःकरण भ्रमिष्टासारखे झाले आहे व अशा थट्टेच्या विषयाला अयोग्य अशा या साध्वी रुक्मिणीला - कृपया सान्त्वयामास - दयाळूपणाने सान्त्वन करिता झाला. ॥२७-२८॥

हे राजा ! भगवंतांनी तिच्या डोळ्यांतील अश्रू आणि दु:खाश्रूंनी भिजलेले स्तन पुसून आपल्याबद्दल अनन्य प्रेमभाव असणार्‍या तिला बाहूंनी आलिंगन दिले. (२७) समजूत घालण्यात कुशल असणार्‍या भक्तवत्सल प्रभूंनी रुक्मिणी विनोदाने गोंधळून जाऊन बेचैन झालेली पाहून ’ तिची अशी थट्टा करायला नको होती,’ असे वाटून त्यांनी तिची समजूत घातली. (२८)


श्रीभगवानुवाच -
मा मा वैदर्भ्यसूयेथा जाने त्वां मत्परायणाम् ।
त्वद्वचः श्रोतुकामेन क्ष्वेल्याऽऽचरितमङ्गने ॥ २९ ॥
मुखं च प्रेमसंरम्भ स्फुरिताधरमीक्षितुम् ।
कटाक्षेपारुणापाङ्गं सुन्दरभ्रुकुटीतटम् ॥ ३० ॥
भगवान् श्रीकृष्ण म्हणाले -
ना, ना, प्रिये रुसू ऐशी कळाले प्रेम हे तुझे ।
प्रिये मी प्रेम बोलाते ऐकण्या छेडिले तुला ॥ २९ ॥
इच्छिले प्रणयी लाल ओठांना पाहणे मनीं ।
कटाक्ष टाकिता नेत्रे भुवया वेड लाविती ॥ ३० ॥

वैदर्भि अंगने - हे विदर्भराजकन्ये प्रिये - मा मा असूयेथाः - तू मला दोष देऊ नकोस - त्वां मत्परायणां जाने - तू माझ्याच ठिकाणी आसक्त आहेस हे मला माहीत आहे - त्वद्वचः श्रोतुकामेन (मया) - तुझे भाषण श्रवण करण्याची इच्छा करणार्‍या माझ्याकडून - प्रेमसंरम्भस्फुरिताधरं - प्रेमामुळे उत्पन्न होणार्‍या क्रोधाने अधरोष्ट फुरफुरत आहे असे - कटाक्षेपारुणापाङगं - व कटाक्ष फेकण्याने नेत्रांचा प्रान्तभाग आरक्त वर्णाचा झाला आहे असे - सुन्दरभ्रुकुटीतटम् - ज्यांतील भुवया सुंदर आहेत असे - मुखं ईक्षितुं - मुख पहाण्यासाठी - क्ष्वेल्या (एवम्) आचरितं - थट्टेने असे आचरण केले गेले. ॥२९-३०॥

श्रीकृष्ण म्हणाले- हे विदर्भनंदिनी ! माझे बोलणे तू मनावर घेऊ नकोस. तू माझ्याशीच एकनिष्ठ आहेस, हे मला माहित आहे. हे प्रिये ! तू काय म्हणतेस, ते ऐकण्यासाठीच मी तुझी थट्टा केली होती. (२९) ज्यावरील ओठ प्रणयकोपाने थरथरत आहेत असे, रागामुळे डोळ्यांना कडा लाल झालेले आणि भुवया उंचावलेले, तुझे सुंदर मुखकमल पाहण्यासाठीच मी हे बोललो. (३०)


अयं हि परमो लाभो गृहेषु गृहमेधिनाम् ।
यन्नर्मैरीयते यामः प्रियया भीरु भामिनि ॥ ३१ ॥
प्रिये जे दिन रात्रीस राबती त्यास त्यां घरी ।
अर्धांगी एकची होय, सुखाचे क्षण घालवी ॥ ३१ ॥

भीरु भामिनि - हे भित्र्ये सुंदरी - यत् प्रियया नर्मैः यामः गृहेषु नीयते - प्रियेबरोबर थट्टेची भाषणे करून जो काही काळ घरामध्ये घालविला जातो - अयं हि - हाच - गृहमेधिनां परमः लाभः - गृहस्थाश्रमी पुरुषांना श्रेष्ठ लाभ होय. ॥३१॥

हे घाबरट प्रिये ! गृहस्थांनी आपल्या प्रिय पत्‍नीबरोबर हास्यविनोद करीत काही घटका आनंदात घालविणे, हाच त्यांचा मोठा विरंगुळा होय. (३१)


श्रीशुक उवाच -
सैवं भगवता राजन् वैदर्भी परिसान्त्विता ।
ज्ञात्वा तत्परिहासोक्तिं प्रियत्यागभयं जहौ ॥ ३२ ॥
समश्लोकीमध्ये समानार्थी श्लोक नाही ॥ ३२ ॥

एवं भगवता परिसान्त्विता - याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने सान्त्वन केलेली - सा वैदर्भी - ती रुक्मिणी - तत्परिहासोक्तिं ज्ञात्वा - श्रीकृष्णाचे हे थटटेचे भाषण आहे असे जाणून - प्रियत्यागभयं जहौ - प्रियपती आपला त्याग करील की काय अशा प्रकारची भीति टाकिती झाली. ॥३२॥

श्रीशुक म्हणतात- राजन ! श्रीकृष्णांनी अशा प्रकारे समजाविले, तेव्हा ते चेष्टेचे बोलणे होते, हे लक्षात येऊन आपले प्रियतम आपल्याला सोडून देतील, ही तिची भीती दूर झाली. (३२)


बभाष ऋषभं पुंसां वीक्षन्ती भगवन्मुखम् ।
सव्रीडहासरुचिर स्निग्धापाङ्गेन भारत ॥ ३३ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
कृष्णाने प्राणप्रीयेला बोलोनी समजाविता ।
सलज्ज हासली प्रीया दृष्टीने पाही श्रीहरी ।
मुखारविंद कृष्णाचे बोलली निरखोनिया ॥ ३३ ॥

भारत - हे भरतकुलोत्पन्ना परीक्षित राजा - सव्रीडहासरुचिरस्निग्धापाङगेन - लज्जायुक्त हास्यामुळे सुंदर दिसणार्‍या प्रेमळ नेत्रकटाक्षाने - भगवन्मुखं वीक्षन्ती (सा) - श्रीकृष्णाच्या मुखाकडे पहाणारी ती रुक्मिणी - पुंसां ऋषभं (तं) बभाषे - पुरुषश्रेष्ठ अशा त्या श्रीकृष्णाला म्हणाली. ॥३३॥

परिक्षिता ! सलज्ज हास्य आणि प्रेमपूर्ण मधुर कटाक्षाने श्रीकृष्णांच्या मुखाकडे पाहात ती त्या पुरुषोत्तमांना म्हणाली. (३३)


श्रीरुक्मिण्युवाच -
( वसंततिलका )
नन्वेवमेतदरविन्दविलोचनाह
     यद् वै भवान् भगवतोऽसदृशी विभूम्नः ।
क्व स्वे महिम्न्यभिरतो भगवांस्त्र्यधीशः
     क्वाहं गुणप्रकृतिरज्ञगृहीतपादा ॥ ३४ ॥
रुक्मिणी म्हणाली -
( वसंततिलका )
ना मी तुम्हास अनुरूप गुण नी रुपाने
     नाही बरोबरि तुम्हा करु मी शके की ।
तुम्ही गुणातित प्रभो प्रकृती असे मी
     अज्ञानी ते भटकती मम पाठि मागे ॥ ३४ ॥

अरविन्दविलोचन - हे कमलनेत्रा श्रीकृष्णा - भगवतः विभूम्नः असदृशी - षड्‌गुणैश्वर्यसंपन्न अशा तुझ्या ऐश्वर्यालाच न शोभणारी - (इति) यत् वै भवान् (मां) आह - असे जे खरोखर आपण मला म्हणाला - ननु एतत् एवम् (अस्ति) - खरोखर हे तसेच आहे - स्वे महिम्नि अभिरतः त्र्यधीशः भगवान् क्व - आपल्या माहात्म्यामध्ये रममाण होणारे त्रैलोक्याधिपति षड्‌‍गुणैश्वर्यसंपन्न आपण कोणीकडे - गुणप्रकृतिः अज्ञगृहतिपादा अहं क्व - सत्त्वादि तीन गुणांच्या योगे मायिक स्वरूप धारण करणारी व अज्ञानी लोक जिच्या पायांचा आश्रय करितात अशी मी कोणीकडे.॥३४॥

रुक्मिणी म्हणाली- हे कमलनयना ! ऐश्वर्य इत्यादी सर्व गुणांनी युक्त अशा अनंत भगवानांना अनुरूप अशी मी नाही, हे आपले म्हणणे बरोबर आहे. आपल्या अखंड महिम्यात राहाणारे व ब्रह्मदेवादिकांचे अधिपती आपण कोठे आणि केवळ अज्ञानी लोकच जिची सेवा करतात, अशी मी गुणमय प्रकृती कोठे ? (३४)


सत्यं भयादिव गुणेभ्य उरुक्रमान्तः
     शेते समुद्र उपलम्भनमात्र आत्मा ।
नित्यं कदिन्द्रियगणैः कृतविग्रहस्त्वं
     त्वत्सेवकैर्नृपपदं विधुतं तमोऽन्धम् ॥ ३५ ॥
स्वामी कशी करु तुळा वदता तुम्ही की
     येथे लपोनि बसलो, गुणराज तुम्ही ।
आत्मस्वरूपि वसता अरि इंद्रियांचे
     अज्ञानि ते नृप असो नच तुम्हि तैसे ॥ ३५ ॥

उरुक्रम - हे महापराक्रमी श्रीकृष्णा - गुणेभ्यः भयात् इव - गुणांना भ्यालेला असाच की काय - उपलम्भनमात्रः आत्मा - केवळ चैतन्यात्मक आत्मरूप तू - समुद्रे अन्तः शेते - समुद्रामध्ये शयन करितोस - सत्यं - हे खरे आहे - त्वं - तू - नित्यं - नेहमी - कदिन्द्रियगणैः कृतविग्रहः (असि) - कुत्सित अशा इंद्रियसमूहाशी विरोध केलेला असा आहेस - त्वत्सेवकैः (अपि) - तुझ्य़ा सेवकांनीहि - नृपपदं अन्धं तमः विधुतं - राजपदरूपी अन्धकारमय अज्ञानाला नष्ट करून टाकिले आहे. ॥३५॥

हे त्रिविक्रमा ! आपण राजे लोकांच्या भीतीने समुद्रात येऊन लपला आहात हे आपले म्हणणेही बरोबर आहे. परंतु हे राजे म्हणजे तीन गुण. आपण जणू त्यांच्याच भीतीने अंत:करणरूप समुद्रामध्ये चैतन्यघन अनुभूतिस्वरूप आत्म्याच्या रूपामध्ये विराजमान असता. आपले राजांशी वैर आहे हेही खरेच ! पण ते राजे म्हणजे ही क्षुद्र इंद्रिये ! यांच्याशी आपले वैर आहेच ! आणि, हे प्रभो ! आपणास राजसिंहासन नाही हेही योग्यच आहे; कारण आपल्या भक्तांनीसुद्धा राजपद म्हणजे अज्ञानांधकार समजून त्याचा त्याग केला आहे. तर मग आपण त्याचा स्वीकार कसा कराल ? (३५)


त्वत्पादपद्ममकरन्दजुषां मुनीनां
     वर्त्मास्फुटं नृपशुभिर्ननु दुर्विभाव्यम् ।
यस्मादलौकिकमिवेहितमीश्वरस्य
     भूमंस्तवेहितमथो अनु ये भवन्तम् ॥ ३६ ॥
न मार्ग ना करितसा पुरुषी क्रिया नी
     ते सत्यची नरपशू नच जाणती ते ।
जे चालती पथ तुझा अतिश्रेष्ठ तेची
     ऐश्वर्य शक्ति तुझि ती नच बोलणे की ॥ ३६ ॥

भूमन् - हे विश्वव्यापका श्रीकृष्णा - ननु - खरोखर - नृपशुभिः - मनुष्यरूपी पशूंकडून - त्वत्पादपद्ममकरन्दजुषां मुनीनां - तुझ्या चरणकमळाच्या पुष्परसाचे सेवन करणार्‍या ऋषींचा - अस्फुटं वर्त्म - अस्पष्ट मार्ग - दुर्विभाव्यं - अतर्क्य आहे - यस्मात् ये भवन्तम् अनु (वर्तन्ते) - म्हणून जे तुम्हाला अनुसरतात - (तेषाम्) ईहितम् - त्यांचे आचरण - ईश्वरस्य इव - ईश्वराच्या प्रमाणे - अलौकिकम् अस्ति - लोकोत्तर आहे - अथो - तर मग - तव ईहितम् - तुझे आचरण - अलौकिकम् इति किमु वक्तव्यम् - अलौकिक आहे हे काय सांगावयास पाहिजे.॥३६॥

आपण म्हणता की, आपला मार्ग स्पष्ट नाही आणि लौकिकातील पुरूषांप्रमाणे आपण वागतसुद्धा नाही, हेही खरेच ! कारण मुनी आपल्या पादपद्मांचा मकरंदरस सेवन करतात. त्याचा मार्गसुद्धा अस्पष्ट असतो आणि विषयांमध्ये गुरफटलेल्या नरपशूंना त्याची कल्पनाही करता येत नाही. आणि हे अनंता ! आपल्याला अनुसरणार्‍या आपल्या भक्तांच्या क्रियाही जर अलौकिक असतात, तर मग सर्व शक्ती आणि ऐश्वर्यांचे आश्रय असणार्‍या, आपल्या क्रिया अलौकिक असतील, यात काय आश्चर्य ! (३६)


निष्किञ्चनो ननु भवान् न यतोऽस्ति किञ्चिद्
     यस्मै बलिं बलिभुजोऽपि हरन्त्यजाद्याः ।
न त्वा विदन्त्यसुतृपोऽन्तकमाढ्यतान्धाः
     प्रेष्ठो भवान् बलिभुजामपि तेऽपि तुभ्यम् ॥ ३७ ॥
दारिद्य ते वदसि जे तुचि श्रेष्ठ वस्तू
     ब्रह्मादि देव सगळे तुज वंदिती की ।
भक्तास तू प्रिय तसा तुज भक्त प्रीय
     द्रव्येचि अंध असता यम वाट पाही ॥ ३७ ॥

भवान् ननु निष्किञ्चनः - आपण खरोखर निष्किंचन आहा - यतः (भवतः) किंचित् (अधिकं) न अस्ति - ज्या तुमच्यापेक्षा काहीच अधिक नाही - बलिभुजः अजाद्याः अपि - बलि भक्षिणारे ब्रह्मादि देवहि - यस्मै बलिं हरन्ति - ज्या तुला बलि अर्पण करितात - आढयतान्धाः असुतृपः - श्रीमंतीमुळे आंधळे झालेले व इंद्रियांचीच केवळ तृप्ति करणारे लोक - अन्तकं त्वा न विदन्ति - सर्वांचा नाश करणार्‍या तुला जाणत नाहीत - भवान् बलिभुजाम् अपि प्रेष्ठः (अस्ति) - आपण बलि भक्षण करणार्‍या ब्रह्मादिकांनाहि अत्यंत प्रिय आहा - ते अपि तुभ्यं (प्रेष्ठाः) - ते देखील तुम्हाला फार प्रिय आहेत. ॥३७॥

आपण स्वत:ला निष्किंचन म्हणवता, तेही बरोबर आहे. कारण आपल्याखेरीज दुसरी कोणतीच वस्तू या विश्वात नाही, म्हणून आपल्याला निष्किंचन म्हणायचे ! शिवाय ज्या ब्रह्मदेव इत्यादी देवांची पूजा सर्व लोक करतात, तेच देव आपली पूजा करतात. सर्वलोकपूज्य अशा त्यांना आपण प्रिय आहात आणि ते आपल्याला प्रिय आहेत. धनाढ्य लोक आपल्याला भजत नाहीत, हे आपले म्हणणेही योग्यच आहे. जे लोक धनाच्या अभिमानाने आंधळे होऊन इंद्रियांना तृप्त करण्याच्या मागेच लागलेले असतात, ते आपले भजन करत नाहीत हे खरेच. कारण आपणच मृत्युरूप आहात, हे ते जाणत नाहीत. (३७)


त्वं वै समस्तपुरुषार्थमयः फलात्मा
     यद्वाञ्छया सुमतयो विसृजन्ति कृत्स्नम् ।
तेषां विभो समुचितो भवतः समाजः
     पुंसः स्त्रियाश्च रतयोः सुखदुःखिनोर्न ॥ ३८ ॥
तू ते समस्त पुरुषार्थ नि ते फलो ही
     ज्ञानी म्हणोनि भजती त्यजुनी अहंता ।
त्यांनाचि तो घडतसे सहवास ऐसा
     जे इंद्रियात रमती नच त्या मिळे हे ॥ ३८ ॥

त्वं - तू - वै - खरोखर - समस्तपुरुषार्थमयः फलात्मा (असि) - सर्व पुरुषार्थ देणारा फलस्वरूपी आहेस - यद्वाञ्छया - ज्या पुरुषार्थाची इच्छा धरून - सुमतयः कृत्स्नं विसृजन्ति - सज्जन सर्वांचा त्याग करितात - विभो - हे विश्वव्यापका - तेषां भवतः समाजः - त्यांचा व तुमचा सेव्यसेवक संबंध - समुचितः - योग्य आहे - रतयोः - एकमेकांशीच रममाण होणार्‍या - सुखदुःखिनोः - म्हणून सुख व दुःख यांचा अनुभव घेणार्‍या - पुंसः स्त्रियाः च - पुरुष व स्त्री यांचा - (भवतः समाजः समुचितः) न - तुमच्याशी संबंध योग्य नाही. ॥३८॥

आपणच चतुर्विध पुरुषार्थ आणि त्यांचे आनंदरूप फलस्वरूप आहात. अशा आपल्याला प्राप्त करण्यासाठी विचारवंत सर्वस्वाचा त्याग करतात. भगवन ! त्याच विवेकी पुरुषांचा आपल्याशी सेव्यसेवक संबंध असणे उचित आहे. जे लोक स्त्री-पुरूषसंबंधाने प्राप्त होणर्‍या सुख-दु:खाला वश होतात, त्यांच्याशी आपला संबंध कसा योग्य ठरेल ? (३८)


त्वं न्यस्तदण्डमुनिभिर्गदितानुभाव
     आत्माऽऽत्मदश्च जगतामिति मे वृतोऽसि ।
हित्वा भवद्‌भ्रुव उदीरितकालवेग
     ध्वस्ताशिषोऽब्जभवनाकपतीन् कुतोऽन्ये ॥ ३९ ॥
भिक्षूक गाति तुज ते मुनि साधु संत
     दुष्टासही कधि मनी नच त्रास देती ।
मी जाणिले हरि तुम्हा तुम्हि जीव जीवा
     ब्रह्मादि देव त्यजुनी वरिले तुम्हा मी ॥ ३९ ॥

त्वं - तू - न्यस्तदण्डमुनिभिः - ज्यांनी अलौकिक दंडांचा त्याग केला आहे अशा ऋषींनी - गदितानुभावः - ज्याचा पराक्रम वर्णिला आहे असा - जगताम् आत्मा - त्रैलोक्याचा आत्मा - आत्मदः च - आणि आत्म्याचेहि अर्पण करणारा आहेस - इति - यास्तव - भवद्‌भ्रुवः उदीरितकालवेगध्वस्ताशिषः - तुमच्या भ्रुकुटीपासून उत्पन्न झालेल्या काळाच्या वेगाने ज्यांची फळे नष्ट झाली आहेत अशा - अब्जभवनाकपतीन् - ब्रह्मदेव, शंकर, इंद्रादिदेव यांना - हित्वा - सोडून - (त्वं) मे वृतः असि - तू माझ्याकडून वरिला गेलास - अन्ये कुतः - इतर कसे वरिले जातील. ॥३९॥

भिक्षा मागून उदर-निर्वाह करणार्‍यांनी आपली प्रशंसा केली नाही, तर क्षमाशील संन्यासी महात्म्यांनी आपला महिमा वर्णिला आहे. मी अदूरदर्शीपणाने नव्हे तर समजून उमजून आपल्याला वरले आहे. कारण आपण सार्‍या जगताचे आत्मा आहात आणि आपल्या प्रेमी जनांना आपण आत्मदानही करीत असता. मी जाणून-बुजूनच त्या ब्रह्मदेव, देवराज इंद्र इत्यादींचा त्याग केला. कारण आपल्या भुवयांच्या इशार्‍यावर उत्पन्न होणार्‍या काळाच्या वेगाने त्यांच्या आशा-आक्षांकांवर पाणी पडते. मग इतरांची काय कथा ? (३९)


जाड्यं वचस्तव गदाग्रज यस्तु भूपान्
     विद्राव्य शार्ङ्गनिनदेन जहर्थ मां त्वम् ।
सिंहो यथा स्वबलिमीश पशून् स्वभागं
     तेभ्यो भयाद् यदुदधिं शरणं प्रपन्नः ॥ ४० ॥
नाही कळे मजसि की भय काय तुम्हा
     आणीक येथ लपलो वदता असत्य ।
शार्ङ्‍गधनूस धरिता मज आणिले की
     गर्जोनि तै पशुपरी नृप ते पळाले ॥ ४० ॥

गदाग्रज ईश - सर्वैश्वर्यसंपन्न व गदाचा ज्येष्ठ बंधु अशा हे श्रीकृष्णा - तु - पण - तव वचः जाडयम् - तुझ्या बोलण्यातच काही अर्थ नाही - यत् यः त्वम् - कारण जो तू - शार्ङगनिनदेन भूपान् विद्राव्य - शार्ङगधनुष्याच्या शब्दाने राजांना पळवून लावून - यथा सिंहः पशून् (विद्राव्य) - जसा सिंह पशूंना पळवून लावून - स्वबलिं (हरति तथा) - आपल्या भागाचा स्वीकार करितो त्याप्रमाणे - स्वभागं मां जहर्थ - स्वतःचा वाटा अशा मला हरिता झालास - तेभ्यः भयात् उदधिं शरणं प्रपन्नः - त्या राजांना भिऊन समुद्राला शरण गेलास - इति कथम् युज्येत - हे म्हणणे कसे जुळेल. ॥४०॥

हे गदाग्रजा ! आपण राजांच्या भीतीने समुद्रात निवास करू लागलात, हे आपले म्हणणे तर्कसंगत वाटत नाही. कारण आपण केवळ आपल्या शार्ड्ग्.धनुष्याच्या टणत्काराने माझ्या विवाहासाठी आलेल्या सर्व राजांना पळवून लावून मला पळवून आणलेत. जसा सिंह आपल्या आरोळीने वनातील पशूंना पिटाळून लावून आपला भाग घेऊन येतो. (४०)


यद्वाञ्छया नृपशिखामणयोऽङ्गवैन्य
     जायन्तनाहुषगयादय ऐक्यपत्यम् ।
राज्यं विसृज्य विविशुर्वनमम्बुजाक्ष
     सीदन्ति तेऽनुपदवीं त इहास्थिताः किम् ॥ ४१ ॥
जे चालती पथ तुझा बहु कष्ट त्यांना
     पृथू ययाति भरतो गय अंग
सोडोनि राज्य तव घोर तपोचि केव्हा
     यालाही कष्ट म्हणणे नच युक्त देवा ॥ ४१ ॥

यद्वाञ्छया - ज्या तुझ्या प्राप्तीच्या इच्छेने - नृपशिखामणयः - मोठमोठे राजे - अङगवैन्यजायन्तनाहुषगयादयः - अंग, पृथु, जयंतपुत्र भरत, नहुषपुत्र ययाति, गय इत्यादि - ऐकपत्यं राज्यं विसृज्य - सार्वभौ‌म राज्याचा त्याग करून - वनं विविशुः - अरण्यात गेले - (तस्य) ते - त्या तुझ्या - पदवीं अनु आस्थिता - मार्गाचा आश्रय केलेले लोक - अंबुजाक्ष - हे कमलनयना - इह सीदन्ति किम् - येथे संसारात पडून दुःखी होतात काय. ॥४१॥

हे कमलनयना ! जे माझ्या मागे लागतात, त्यांना साधारणपणे कष्टच भोगावे लागतात. असे आपण कसे म्हणता ? प्राचीन काळी अंग, पृथू, भरत, ययाती, गय इत्यादी राजराजेश्वर आपापले एकछत्री साम्राज्य सोडून ज्या आपल्याला प्राप्त करून घेण्याच्या इच्छेने तपश्चर्या करण्यासाठी वनामध्ये गेले होते; त्यांना आपले अनुयायी होण्यामुळे काही कष्ट झाले काय ? (४१)


कान्यं श्रयेत तव पादसरोजगन्धम्
     आघ्राय सन्मुखरितं जनतापवर्गम् ।
लक्ष्म्यालयं त्वविगणय्य गुणालयस्य
     मर्त्या सदोरुभयमर्थविवीक्तदृष्टिः ॥ ४२ ॥
तू बोलशी वरि कुणा गुणि भूप त्यासी
     येता पदास करिशी भय मुक्त तू तो ।
ती कोण स्त्री मज अशी परिभाग्यशाली
     मृत्यू जरादि भय ते तिजला मिळेना ॥ ४२ ॥

अर्थविविक्तदृष्टिः का - हितावर ठेविली आहे दृष्टि जीने अशी कोणती स्त्री - गुणालयस्य तव - गुणांचे निवासस्थान अशा तुझ्या - सन्मुखरितं - साधूंनी वर्णिलेल्या - जनताऽपवर्गम् - लोकांना मोक्ष देणार्‍या - लक्ष्‌म्यालयं - लक्ष्मीचे रहाण्याचे घरच अशा - पादसरोजगन्धं - चरणकमलांचा वास - आघ्राय - हुंगून - (तम्) अविगणय्य - त्याला न जुमानता - मर्त्यासदोरुभयं अन्यं तु - आपण मरणारे आहो असे नित्य भय बाळगणार्‍या दुसर्‍याला - श्रयेत - सेवील. ॥४२॥

आपण म्हणता की, मी एखाद्या राजकुमाराला वरावे. पण भगवन ! सर्व गुणांचे आश्रयस्थान असणार्‍या संतांनी स्तविलेल्या, लोकांना पाप-तापापासून मुक्त करणार्‍या, लक्ष्मीचे निवासस्थान असणार्‍या आपल्या चरणकमलांचा सुगंध एकदा घेतल्यावर आपला स्वार्थ-परमार्थ जाणणारी कोणती मनुष्य-स्त्री ते सोडून नेहमी मोठ्या भयांनी ग्रासलेल्यांचा स्वीकार करील ? (४२)


तं त्वानुरूपमभजं जगतामधीशम्
     आत्मानमत्र च परत्र च कामपूरम् ।
स्यान्मे तवाङ्घ्रिररणं सृतिभिर्भ्रमन्त्या
     यो वै भजन्तमुपयात्यनृतापवर्गः ॥ ४३ ॥
आत्मा नि स्वामि जगता हरि एकटा तू
     मी शोधुनी अनुरुपा वरिले तुम्हाला ।
नाही मला भिती तशी भव सागराची
     मी इच्छिते तव पदा भ्रम नाशिण्यासी ॥ ४३ ॥

जगताम् अधीशं - त्रैलोक्याचा स्वामी अशा - आत्मानं - आत्मस्वरूपी - अत्र च परत्र च कामपूरम् - ह्या लोकी आणि परलोकी इच्छा पुरविणार्‍या - अनुरूपं तं त्वा - योग्य अशा त्या तुला - अभजम् - सेविती झाल्ये - अनृतापवर्गः - आतल्या अशा संसाराचा नाश करणारा - यः वै तव अंघ्रिः - जो खरोखर तुझा चरण - भजन्तं उपयाति - भक्तांचे रक्षण करितो - सः - तो - सृतिभिः भ्रमन्त्याः मे - अनेक जन्मांमध्ये भ्रमण करणार्‍या माझा - अरणं स्यात् - रक्षक होवो. ॥४३॥

हे प्रभो ! इह-परलोकातील सर्व आशा पूर्ण करणार्‍या, तसेच सर्वांचे आत्मा असणार्‍या व मला अनुरूप अशाच जगदीश्वरांना मी वरले आहे. मला माझ्या कर्मांनुसार वेगवेगळ्या योनीत भटकावे लागले तरी नेहमी आपले भजन करणार्‍यांचा मिथ्या संसारभ्रम नाहीसा करणार्‍या व त्यांना आपले स्वरूपसुद्धा देऊन टाकणार्‍या अशा आपल्या चरणांनाच मी शरण असावे. (४३)


तस्याः स्युरच्युत नृपा भवतोपदिष्टाः
     स्त्रीणां गृहेषु खरगोश्वविडालभृत्याः ।
यत्कर्णमूलमरिकर्षण नोपयायाद्
     युष्मत्कथा मृडविरिञ्चसभासु गीता ॥ ४४ ॥
बैलासमान घरि जे करितात कष्ट
     ओझे खरा परि शिरी धरितात नित्य ।
दासा परी करिति ते नृप लाड स्त्रीशी
     ब्रह्मादि गाति गुण तो तव अच्युता रे ॥ ४४ ॥

अरिकर्षण अच्युत - हे शत्रुनाशका श्रीकृष्णा - यत्कर्णमूलं - ज्या स्त्रीच्या कानाच्या मुळाशी - मृडविरिञ्चसभासु गीताः - शंकर व ब्रह्मदेव ह्यांच्या सभेमध्ये गायिलेल्या - युष्मत्कथाः - तुमच्या कथा - न उपयायात् - पोचत नाहीत - भवता उपदिष्टाः - आपण सांगितलेले - स्त्रीणां गृहेषु स्वरगोश्वबिडालभृत्याः नृपाः - स्त्रियांच्या घरी गर्दभाप्रमाणे भारवाहक, वृषभाप्रमाणे क्लेश सोसणारे, कुत्र्याप्रमाणे अवमानिलेले, मांजराप्रमाणे कृपण व सेवकाप्रमाणे हात जोडून उभे रहाणारे असे राजे - तस्याः स्युः - त्या स्त्रीचे पति होतात. ॥४४॥

हे अच्युता ! हे शत्रुनाशना ! घरांमध्ये स्त्रियांची गाढवाप्रमाणे ओझी वाहणारे, बैलांप्रमाणे कामाला जुंपलेले, कुत्र्यांप्रमाणे तिरस्कार सहन करणारे, बोक्यांप्रमाणे हिंसक, दासाप्रमाणे सेवा करणारे, आपण सांगितलेले शिशुपाल इत्यादी राजे आहेत. जिच्या कानांवर शंकर, ब्रह्मदेव इत्यादी देवेश्वरांच्या सभेत गायन केल्या जाणार्‍या आपल्या कथा आल्या नसतील, तिलाच ते राजे लखलाभ होवोत. (४४)


त्वक्ष्मश्रुरोमनखकेशपिनद्धमन्तः
     मांसास्थिरक्तकृमिविट्कफपित्तवातम् ।
जीवच्छवं भजति कान्तमतिर्विमूढा
     या ते पदाब्जमकरन्दमजिघ्रती स्त्री ॥ ४५ ॥
भासे वरी तनु जरी अशि साजरी ती
     ते आत रक्त मल मूत्र नि कीट वायू ।
ति मूर्ख स्त्री म्हणतसे पति हा पहा की
     त्यांना कधी न मिळती चरणारविंद ॥ ४५ ॥

या - जी - ते पदाब्जमकरन्दं अजिघ्रती - तुझ्या चरणकमलाचा सुगंध न घेणारी आहे - (सा) विमूढा स्त्री - ती मूर्ख स्त्री - त्वक्श्मश्रुरोमनखकेशपिनद्धं - त्वचा, दाढीमिशी, केस, नखे इत्यादिकांनी वेष्टिलेल्या - अन्तः मांसास्थिरक्तकृमिविट्‌कफपित्तवातम् - आत मांस, हाडे, रक्त, किडे, मळ, कफ, वायु व पित्त यांनी भरलेल्या - जीवच्छवं - जिवंत प्रेतच अशा - कान्तमतिः भजति - पति मानून सेविते. ॥४५॥

वरून कातडे, दाढी-मिशा, रोम, नखे आणि केसांनी झाकलेले व आत मांस, हाडे, रक्त, किडे, मल-मूत्र, कफ, पित्त आणि वायू यांनी भरलेले, म्हणूनच जिवंत असून प्रेतासारख्या असणार्‍या या शरीराला, जिला आपल्या चरणारविंदाच्या मकरंदाचा सुगंध हुंगावयास मिळाला नाही, अशीच मूर्ख स्त्री आपला प्रिय पती समजून भजते. (४५)


अस्त्वम्बुजाक्ष मम ते चरणानुराग
     आत्मन् रतस्य मयि चानतिरिक्तदृष्टेः ।
यर्ह्यस्य वृद्धय उपात्तरजोऽतिमात्रो
     मामीक्षसे तदु ह नः परमानुकम्पा ॥ ४६ ॥
आत्मा तुम्ही असुनिया नच देही दृष्टी
     तुम्ही उदास मज हो नित पादसेवा ।
वृद्ध्यर्थ सृष्टि बघता गुण त्या रजाने
     तेंव्हा तुम्हीच मजला बहु बोधिता की ॥ ४६ ॥

अम्बुजाक्ष - कमलनेत्रा श्रीकृष्णा - च - आणि - मयिनतिरिक्तदृष्टेः - माझ्या ठिकाणी विशेषपणाची दृष्टि न ठेवणार्‍या - आत्मव्रतस्य ते - स्वतःच्याच ठिकाणी रममाण होणार्‍या तुझ्या - चरणानुरागः - चरणाच्या ठिकाणी प्रेम - मम अस्तु - मला असो - यर्हि अस्य वृद्धये उपात्तरजोतिमात्र - जरी या जगाच्या वृद्धीकरिता स्वीकारिला आहे रजोगुणाचा मोठा अंश ज्याने असा - माम् ईक्षसे - माझ्याकडे पहातोस - तत् उ ह नः परमानुकम्पा - हीच खरोखर आमच्यावर मोठी कृपा होय. ॥४६॥

हे कमलनयना ! आपण आत्माराम असल्याने माझ्याकडे आपली दृष्टी जात नसली, तरी आपल्या चरणकमलांवर माझे दृढ प्रेम असावे. जेव्हा आपण या जगाच्या अभिवृद्धीसाठी उत्कट रजोगुणाचा स्वीकार करून माझ्याकडे पाहता, तोसुद्धा आपला मोठा अनुग्रहच आहे, असे मी मानते. (४६)


( अनुष्टुप् )
नैवालीकमहं मन्ये वचस्ते मधुसूदन ।
अम्बाया एव हि प्रायः कन्यायाः स्याद् रतिः क्वचित् ॥ ४७ ॥
( अनुष्टुप् )
अनुरूप वरी कोणी वदता मधुसूदना ।
काशीनरेश अंबेच्या परि त्या दुसर्‍या असो ॥ ४७ ॥

मधुसूदन - हे मधुसूदना श्रीकृष्णा - ते वचः - तुझे भाषण - अहं अलीकम् न एव मन्ये - मी खोटे मानीतच नाही - हि - कारण - कन्यायाः रतिः - कन्येचे प्रेम - क्वचित् - कोणावर - अम्बायाः इव प्रायः स्यात् - अम्बेच्या प्रमाणे बहुतकरून असते. ॥४७॥

हे मधुसुदना ! एखाद्या अनुरूप वराला माळ घाल, असे आपण म्हणालात. तुमचे हे म्हणणे मला खोटे वाटत नाही. कारण कधी कधी एखाद्या पुरूषाने जिंकल्यानंतर सुद्धा काशिराजाची कन्या अंबा हिच्याप्रमाणे एखादीचे दुसर्‍या पुरूषावर प्रेम असू शकते. (४७)


व्यूढायाश्चापि पुंश्चल्या मनोऽभ्येति नवं नवम् ।
बुधोऽसतीं न बिभृयात् ता बिभ्रदुभयच्युतः ॥ ४८ ॥
कुलटा धुंडिते नित्य विवाहोत्तर ही बहू ।
चतुरे नच ठेवावी तेणे दुःखचि लाभते ॥ ४८ ॥

व्यूढायाः पुंश्चल्याः च अपि मनः - आणि विवाह लाविलेल्या व्यभिचारी स्त्रीचेहि मन - नवं नवं अभ्येति - नव्या नव्या पुरुषाकडे धाव घेते - बुधः असतीं न बिभृयात् - विद्वानाने दुराचारी स्त्रीशी विवाह लावू नये - तां बिभ्रत् उभयच्युतः - तिला वरणारा दोन्ही लोकांपासून भ्रष्ट होतो. ॥४८॥

कुलटा स्त्रीचे मन तर विवाह झाल्यानंतरही नवनवीन पुरूषांकडे ओढ घेते. बुद्धिमान पुरूषाने अशा स्त्रीला आपल्याजवळ ठेवू नये. तिला स्वीकारणारा पुरूष इहलोक आणि परलोक असे दोन्हीही घालवून बसतो. (४८)


श्रीभगवानुवाच -
साध्व्येतच्छ्रोतुकामैस्त्वं राजपुत्री प्रलम्भिता ।
मयोदितं यदन्वात्थ सर्वं तत् सत्यमेव हि ॥ ४९ ॥
समश्लोकीमध्ये समानार्थी श्लोक नाही ॥ ४९ ॥

साध्वि राजपुत्रि - हे पतिव्रते राजकन्ये रुक्मिणी - एतत् श्रोतुकामैः त्वं प्रलम्भिता - हे ऐकण्याच्या इच्छेने तू फसविली गेलीस - मया उदितं अनु - माझ्या भाषणानंतर - यत् (त्वं) आत्थ - तू जे म्हणालीस - सर्वं तत् सत्यम् एव हि - सर्व ते खरेच आहे ह्यात शंका नाही. ॥४९॥

श्रीकृष्ण म्हणाले- साध्वी ! राजकुमारी ! तुझ्या तोंडून हेच ऐकण्यासाठी मी तुझी थट्टा केली. तू माझ्या म्हणण्याचा जो जो अर्थ लावलास, तो अक्षरश: खरा आहे. (४९)


यान् यान् कामयसे कामान् मय्यकामाय भामिनि ।
सन्ति ह्येकान्तभक्तायाः तव कल्याणि नित्यदा ॥ ५० ॥
भगवान् श्रीकृष्ण म्हणाले -
ऐकण्या हेच ते सर्व तुला मी टोचिले असे ।
व्याख्या जी मम शब्दा तू लाविली युक्त ती असे ।
इच्छिशी सर्व ते लाभे बंधमुक्त करावया ॥ ५० ॥

कल्याणि भामिनि - हे भाग्यशाली स्त्रिये - अकामाय - वासना नष्ट होण्याकरिता - मयि - माझ्या ठिकाणी - यान् यान् कामान् कामयसे - ज्या ज्या मनोरथांची इच्छा करितेस - ते - ते मनोरथ - एकान्तभक्तायाः तव - एकान्त भक्ती करणार्‍या तुजजवळ - नित्यदा सन्ति हि - नित्य आहेतच. ॥५०॥

हे सुंदरी ! तू माझी अनन्य भक्त आहेस. तू माझ्याकडून ज्याची इच्छा धरशील, त्या तुझ्या इच्छा नेहेमीच पूर्ण होतील. शिवाय माझ्यासंबंधीच्या कामना सांसारिक बंधनात टाकणार्‍या नसतात. (५०)


उपलब्धं पतिप्रेम पातिव्रत्यं च तेऽनघे ।
यद्वाक्यैश्चाल्यमानाया न धीर्मय्यपकर्षिता ॥ ५१ ॥
पुण्यमयी तुझे प्रेम पातिव्रत्य बघीतले ।
विचलीत करू पाहे स्थीर बुद्धी तुझी असे ॥ ५१ ॥

अनघे - हे निष्पाप स्त्रिये - ते पातिव्रत्यं पतिप्रेम च - तुझे पातिव्रत्य व पतीवरील प्रेम - उपलब्धं - आढळून आले - यत् - कारण - वाक्यैः चाल्यमानायाः (ते) - भाषणांनी चळविल्या गेलेल्या तुझी - मयि - माझ्या ठिकाणी असणारी - धीः - बुद्धि - न अपकर्षिता - दूर झाली नाही. ॥५१॥

हे पुण्यशीले ! मी तुझे पतिप्रेम आणि पातिव्रत्य चांगल्या तर्‍हेने पारखले. कारण मी अनेक प्रकारे तुला विचलित करण्याचा प्रयत्‍न केला असतानाही तुझी बुद्धी माझ्यापासून दूर गेली नाही. (५१)


ये मां भजन्ति दाम्पत्ये तपसा व्रतचर्यया ।
कामात्मानोऽपवर्गेशं मोहिता मम मायया ॥ ५२ ॥
मोक्षस्वामी प्रिये मी नी लोकांना तारितो भवी ।
सकाम मज जो पूजी मायेत गुंतलाच तो ॥ ५२ ॥

ये - जे लोक - व्रतचर्यया - व्रताचरणाने - (वा) तपसा - किंवा तपश्चर्येने - अपवर्गेशं मां - मोक्षाधिपति अशा मला - दाम्पत्ये भजन्ति - पतिपत्‍नीविषयक सुखासाठी भजतात - कामात्मानः - विषयाचा अभिलाष करणारे - (ते) मम मायया मोहिताः - ते माझ्या मायेने मोहित झालेले. ॥५२॥

हे प्रिये ! मी मोक्ष देणारा आहे. असे असून जे सकाम पुरूष अनेक प्रकारची व्रते आणि तपश्चर्या करून दांपत्यसुखाची अभिलाषा करतात, ते माझ्या मायेने मोहित झाले आहेत, असे समजावे. (५२)


( इंद्रवंशा )
मां प्राप्य मानिन्यपवर्गसम्पदं
     वाञ्छन्ति ये सम्पद एव तत्पतिम् ।
ते मन्दभाग्या निरयेऽपि ये नृणां
     मात्रात्मकत्वात् निरयः सुसङ्गमः ॥ ५३ ॥
( इंद्रवज्रा )
मोक्षादिचा आश्रय मी प्रिये गे
     दुर्भागि ना ते भजती मला की ।
ज्या योनि लाभे सुकरादिकाची
     तो नर्क त्यांना अति गोड वाटे ॥ ५३ ॥

मानिनि - हे मानी स्त्रिये - ये - जे - अपवर्गसंपदं मां पतिं प्राप्य - मोक्ष आहे संपत्ति ज्याची अशा मला पति म्हणून मिळवून - संपदः एव - विषयांनाच - वाञ्छन्ति - इच्छितात - तत्पतिं (न) - त्या विषयींचा स्वामी अशा माझी इच्छा करीत नाहीत - ये (विषयाः) नृणां निरये अपि (भवन्ति) - जे विषय मनुष्यांना नरकामध्येहि असतात - (तान्) ये इच्छन्ति - त्यांना जे इच्छितात - ते मन्दभाग्याः सन्ति - ते दुर्दैवी होत - तेषां मात्रात्मकत्वात् निरयः सुसंगमः - ते विषयलोलुपच असल्यामुळे नरकाचा संबंध त्यांना सुलभच आहे. ॥५३॥

हे मानिनी ! मोक्ष व सर्व प्रकारच्या संपत्तींचा स्वामी परमात्मा अशा मला प्राप्त करूनसुद्धा जे लोक फक्त संपत्तीचीच अभिलाषा धरतात, माझी नव्हे, ते अभागीच होत. कारण विषयसुख नरकामध्येही मिळू शकते. परंतु त्या लोकांचे मन विषयांमध्येच गुंतलेले असते. म्हणूनच त्यांना नरकात जाणे सुद्धा चांगले वाटते. (५३)


( मिश्र )
दिष्ट्या गृहेश्वर्यसकृन्मयि त्वया
     कृतानुवृत्तिर्भवमोचनी खलैः ।
सुदुष्करासौ सुतरां दुराशिषो
     ह्यसुंभराया निकृतिं जुषः स्त्रियाः ॥ ५४ ॥
गृहेश्वरी मोद मनात वाटे
     या मुक्तिचा सेविसि तू पदाते ।
ना लाभते जी मनि इच्छि तृप्ती
     इंद्रीयभोगा तिजशी असे हे ॥ ५४ ॥

गृहेश्वरि - हे गृहस्वामिनी - त्वया - तुझ्याकडून - दिष्टया - सुदैवाने - खलैः सुदुष्करा - दुष्टांना करण्यास अत्यंत कठीण - भवमोचनी - संसारातून मुक्त करणारी - मयि अनुवृत्तिः - माझ्या ठिकाणी आसक्त असलेली - असकृत् कृता - व वारंवार केलेली - असौ - ही आदरबुद्धि - दुराशिषः - ज्यांचा अभिप्राय वाईट आहे अशा - असुंभरायाः - इंद्रियांचेच पोषण करणार्‍या - निकृतिजुषः स्त्रियः - लबाडी करणार्‍या स्त्रीला - सुतरां दुष्करा हि - खरोखर अत्यंत कठीण आहे. ॥५४॥

हे गृहस्वामिनी ! तू आतापर्यंत संसार-बंधनातून मुक्त करणार्‍या माझीच निरंतर सेवा केली आहेस. ही मोठीच आनंदाची गोष्ट आहे. संसारमुक्त माणसे असे कधीच करू शकत नाहीत. ज्या स्त्रियांचे चित्त वाईट कामनांनी भरलेले असते आणि ज्या आपल्या इंद्रियांच्या तृप्तीसाठीच निरनिराळ्या प्रकारची कपटकारस्थाने करीत असतात, त्यांना तर असे करणे खूपच अवघड आहे. (५४)


( वसंततिलका )
न त्वादृशीं प्रणयिनीं गृहिणीं गृहेषु
     पश्यामि मानिनि यया स्वविवाहकाले ।
प्राप्तान्नृपान्न विगणय्य रहोहरो मे
     प्रस्थापितो द्विज उपश्रुतसत्कथस्य ॥ ५५ ॥
( वसंततिलका )
नाही प्रिया बघितली तुज ऐशि प्रेमी
     तू ना बघून मजला स्तुति ऐकुनीयां ।
त्यागोनि अन्य नृपती द्विज धाडिला तो
     संदेश गुप्त दिधला मजला सखे तू ॥ ५५ ॥

मानिनि - हे मानी स्त्रिये - गृहेषु - घरामध्ये - त्वादृशीं प्रणयिनीं गृहिणीं न पश्यामि - तुझ्यासारखी प्रेम करणारी स्त्री मला आढळत नाही - यया - जिने - स्वविवाहकाले - स्वतःच्या विवाहप्रसंगी - प्राप्तान् नृपान् अवगणय्य - आलेल्या राजांना झीडकारून - उपश्रुतसत्कथस्य मे - श्रवण केल्या आहेत चांगल्या कथा ज्याच्या अशा माझ्याकडे - रहोहरः द्विजः - गुप्त निरोप आणणारा ब्राह्मण - प्रस्थापितः - पाठविला. ॥५५॥

हे मानिनी ! मला आपल्या घरामध्ये तुझ्यासारखी प्रेम करणारी पत्‍नी दुसरी कोणीही दिसत नाही; कारण फक्त माझी कीर्ती ऐकून आपल्याशी विवाहासाठी आलेल्या राजांची उपेक्षा करून ब्राह्मणाकरवी तू मला एक गुप्त संदेश पाठविला होतास. (५५)


भ्रातुर्विरूपकरणं युधि निर्जितस्य
     प्रोद्वाहपर्वणि च तद्वधमक्षगोष्ठ्याम् ।
दुःखं समुत्थमसहोऽस्मदयोगभीत्या
     नैवाब्रवीः किमपि तेन वयं जितास्ते ॥ ५६ ॥
केला विरूप समरी तव बंधु तैसा
     मारीयलाहि बलने अनिरुद्धलग्नी ।
तू साहिलेस सगळे नच शब्द केला
     तेणेचि मी वश तुला गुण पाहुनीया ॥ ५६ ॥

युधि निर्जितस्य भ्रातुः - युद्धात जिंकिलेल्या भावाचे - विरूपकरणं - कुरूप करणे - च - आणि - प्रोद्वाहपर्वणि - अनिरुद्धाच्या विवाहप्रसंगी - अक्षगोष्ठयाम् - द्यूत खेळण्याच्या सभेमध्ये - तद्वधं - त्या रुक्मीचा वध - अस्मदयोगभीत्या - माझा वियोग होईल ह्या भीतीने - समुत्थं दुःखं असहः - वारंवार उत्पन्न होणारे दुःख सहन केलेस - किम् अपि न एव अब्रवीः - काही एक सुद्धा बोलली नाहीस - तेन ते वयं जिताः - त्या कृत्याने तुझ्याकडून आम्ही जिंकले गेलो. ॥५६॥

तुझे हरण करतेवेळी मी तुझ्या भावाला युद्धात जिंकून त्याला विद्रूप केले होते आणि अनिरुद्धाच्या विवाहप्रसंगी द्यूत खेळतेवेळी बलरामाने तर त्याचा वध केला. परंतु आमच्याशी वियोग होईल, या भीतीने तू गुपचूपपणे सर्व दु:ख सहन केलेस. मल एका शब्दानेसुद्धा तू बोलली नाहीस. ह्या गुणामुळेच तू मला जिंकलेस. (भगवान त्रिकालदर्शी असल्यामुळे त्यांनी हा वधाचा भविष्यकालीन उल्लेख केला असावा) (५६)


दूतस्त्वयाऽऽत्मलभने सुविविक्तमन्त्रः
     प्रस्थापितो मयि चिरायति शून्यमेतत् ।
मत्वा जिहास इदं अङ्गमनन्ययोग्यं
     तिष्ठेत तत्त्वयि वयं प्रतिनन्दयामः ॥ ५७ ॥
संदेश प्राप्त असुनी मज वेळ झाला
     तेंव्हा तुलाचि गमले जग शून्य सारे ।
सर्वांग सुंदर अशी तनु अर्पिली तू
     ना फेड होय कधिही अभिनंदितो मी ॥ ५७ ॥

त्वया - तुझ्य़ाकडून - आत्मलभने - माझ्या प्राप्तीसाठी - सुविविक्तमन्त्रः दूतः प्रस्थापितः - सांगितला आहे अत्यंत गुप्त निरोप ज्यापाशी असा दूत पाठविला गेला - मयि चिरायति - मला येण्याला उशीर झाला असता - एतत् शून्यं मत्वा - हे जग शून्य मानून - अनन्ययोग्यं इदं अंगं जिहासे - दुसर्‍याला योग्य नसणारे हे शरीर मी टाकून देण्यास इच्छिते - इति त्वया उक्तम् - असे तू म्हणालीस - तत् त्वयि तिष्ठेत - ते कृत्य तुझ्या ठिकाणी संभवनीय आहे - वयं (तत्) प्रतिनन्दयामः - आम्ही त्या तुझ्या कृत्याचे अभिनंदन करितो. ॥५७॥

माझ्या प्राप्तीसाठी तू दूताकरवी आपला गुप्त संदेश पाठविला होतास. परंतु माझ्या येण्याला उशीर होत आहे असे दिसले, तेव्हा तुला हे सर्व जग असार वाटू लागले. त्यावेळी तू आपले शरीर दुसर्‍या कोणासाठीही योग्य नाही, असे समजून ते सोडण्याचा निश्चय केलास. तुझा हा प्रेमभाव तुझ्या ठिकाणीच राहू दे. आम्ही याची परतफेड करू शकत नाही. फक्त त्याचे कौतुक करतो. (५७)


श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् )
एवं सौरतसंलापैः भगवान् जगदीश्वरः ।
स्वरतो रमया रेमे नरलोकं विडम्बयन् ॥ ५८ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
( अनुष्टुप् ) आत्माराम जगा कृष्ण परीक्षित् जगदीश्वर ।
या परी प्रेम वाढाया बोले नी रत होयही ॥ ५८ ॥

जगदीश्वरः स्वरतः भगवान् - त्रैलोक्याधिपति व आत्म्याच्या ठिकाणी रममाण होणारा असा श्रीकृष्ण - नरलोकं विडम्बयन् - मनुष्यलोकांचे अनुकरण करीत - एवं सौरतसंलापैः - याप्रमाणे सुरतक्रीडाप्रसंगीच्या भाषणांनी - रमया रेमे - लक्ष्मी जी रुक्मिणी तिच्याशी रममाण झाला. ॥५८॥

श्रीशुक म्हणतात- जगदीश्वर भगवान श्रीकृष्ण आत्माराम असूनही सामान्य मनुष्यासारखे असे प्रेमालाप करीत रुक्मिणीबरोबर रममाण झाले. (५८)


तथान्यासामपि विभुः गृहेषु गृहवानिव ।
आस्थितो गृहमेधीयान् धर्मान् लोकगुरुर्हरिः ॥ ५९ ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां दशमस्कन्धे उत्तरार्धे
कृष्णरुक्मिणीसंवादो नाम षष्टितमोऽध्यायः ॥ ६० ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
सर्वव्यापक हा कृष्ण अन्य पत्‍न्यांचिये घरी ।
गृहस्थोचितची वागे भगवंत जगद्‌गुरु ॥ ५९ ॥
॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर साठावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

तथा - त्याचप्रमाणे - विभुः लोकगुरुः हरिः - व्यापक व लोकांचा शास्ता असा श्रीकृष्ण - गृहमेधीयान् धर्मान् आस्थितः - गृहस्थाश्रमी लोकांच्या धर्माचा स्वीकार केलेला असा - गृहवान् इव - गृहस्थाश्रमी पुरुषाप्रमाणे - अन्यासाम् अपि गृहेषु (रेमे) - दुसर्‍या स्त्रियांच्या मंदिरातहि रममाण झाला.॥५९॥

जगाला उपदेश करणारे सर्वव्यापक भगवान श्रीकृष्ण याचप्रमाणे अन्य पत्‍न्यांच्या महालांमध्येसुद्धा गृहस्थाप्रमाणे गृहस्थाश्रमाला उचित अशा धर्माचे आचरण करीत. (५९)


अध्याय साठावा समाप्त

GO TOP