श्रीमद् भागवत पुराण
स्कन्ध दहावा
अध्याय एकोणसाठावा

मुरवधः भौमासुरवधः, भूमिकृता भगवत्स्तुतिः
भौमाहृतषोडशसहस्रराजकन्यानां परिणयनं, पारिजातहरणं च -

भौ‍मासुराचा उद्धार आणि सोळा हजार एकशे राजकन्यांचा भगवंतांबरोबर विवाह -


संहिता - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीराजोवाच -
( अनुष्टुप् )
यथा हतो भगवता भौमो येने च ताः स्त्रियः ।
निरुद्धा एतदाचक्ष्व विक्रमं शार्ङ्गधन्वनः ॥ १ ॥
( अनुष्टुप् )
राजा परीक्षिताने विचारले -
भौमासुरास कृष्णाने वधिले काय कारणे ।
स्त्रियांना बंदिशाळेत का ठेवी असुरो वदा ॥ १ ॥

च - आणखी - येन ताः स्त्रियः निरुद्धाः - ज्याने त्या स्त्रिया बंदिगृहात ठेविल्या होत्या - (सः) भौ‌मः - तो भौ‌मासुर - भगवता यथा हतः - भगवान श्रीकृष्णाने कोणत्या प्रकारे मारिला - एतत् शार्ङगधन्वनः विक्रमं आचक्ष्व - हा श्रीकृष्णाचा पराक्रम सांगा. ॥१॥

परीक्षीत म्हणाला- ज्या भौ‍मासुराने त्या स्त्रियांना बंदिगृहात कोंडून ठेवले होते, त्याला श्रीकृष्णांनी कसे मारले ? त्या शार्ङ्गधनुष्यधारी श्रीकृष्णाचा तो पराक्रम आपण मला सांगावा. (१)


श्रीशुक उवाच -
इन्द्रेण हृतछत्रेण हृतकुण्डलबन्धुना ।
हृतामराद्रिस्थानेन ज्ञापितो भौमचेष्टितम् ।
सभार्यो गरुडारूढः प्राग्ज्योतिषपुरं ययौ ॥ २ ॥
श्रीशुकदेवजी सांगतात -
इंद्राचे छत्र नी माता अदितीकुंडले तसे ।
भौमाने घेतले तेंव्हा गाठिला मणिपर्वत ॥
कृष्णाला वदता इंद्र सत्यभामासवे हरी ।
गरुडी बैसुनी गेला प्राग्‌ज्योतिष या पुरा ॥ २ ॥

हृतच्छत्रेण - हरिलेले आहे छत्र ज्याचे अशा - हृतकुण्डलबन्धुना - हरण केले गेले आहे अमरपर्वतावरील स्थान ज्याचे अशा - इन्द्रेण - इंद्राने - भौ‌मचेष्टितं ज्ञापितः - नरकासुराचे कृत्य सांगितलेला असा श्रीकृष्ण - सभार्यः गरुडारुढः (भूत्वा) - पत्‍नीसह गरुडावर आरुढ होऊन - प्राग्ज्योतिषपुरं ययौ - प्राग्‌ज्योतिष देशाच्या नगराला गेला. ॥२॥

श्रीशुक म्हणाले- वरुणाचे छत्र, अदितीची कुंडले आणि मेरु पर्वतावरील देवतांचे मणिपर्वत नावाचे स्थान, भौ‍मासुराने हिसकावून घेतले होते. ही हकीकत इंद्राने श्रीकृष्णांना सांगितली. तेव्हा श्रीकृष्ण सत्यभामेसह गरुडावर स्वार होऊन भौ‍मासुराची राजधानी प्राग्‌‍ज्योतिषपूर येथे गेले. (२)


गिरिदुर्गैः शस्त्रदुर्गैः जलाग्न्यनिलदुर्गमम् ।
मुरपाशायुतैर्घोरैः दृढैः सर्वत आवृतम् ॥ ३ ॥
पहाडी तटबंदी तै सशस्त्र दळ ते पुन्हा ।
जलखंदक ते घोर विजेचे कुंपणो पुन्हा ।
विषारी वायुची भिंत मूरराक्षसि ते दळ ॥ ३ ॥

गिरिदुर्गैः - पर्वतावरील किल्ल्यांनी - शस्त्रदुर्गैः - शस्त्रांनी निर्मिलेल्या किल्ल्यांनी - सर्वतः (च) - व सर्व बाजूंनी - दृढैः घोरैः मुरपाशायुतैः आवृतं - बळकट व भयंकर अशा मुराच्या हजारो पाशांनी वेष्टिलेले - (च) जलाग्न्यनिलदुर्गमम् (आसीत्) - आणि उदक, अग्नि व वायु यांमुळे प्रवेश होण्यास कठीण असे होते. ॥३॥

प्राग्‌‍ज्योतिषपूरात प्रवेश करणे अत्यंत कठीण होते. तेथे चारी बाजूंनी डोंगरांची रांग होती, त्याच्या आत शस्त्रे लावून ठेवली होती, त्याच्या आत पाण्याने भरलेले खंदक होते, त्याच्या आत अग्नी पेटवलेले खंदक होते आणि त्याच्याही आतल्या बाजूला प्रचंड वारा वाहणारा तट होता. त्याच्यापुढे मूर नावाच्या दैत्याने नगराच्या चारी बाजूंना दहा हजार भयंकर आणि घट्ट असे फास लावून ठेवले होते. (३)


गदया निर्बिभेदाद्रीन् शस्त्रदुर्गाणि सायकैः ।
चक्रेणाग्निं जलं वायुं मुरपाशांस्तथासिना ॥ ४ ॥
कृष्ण गदे गिरी फोडी बाणांनी तटबंदि ती ।
चक्राने जाळिल वायू खडगाने सैन्य मारिले ॥ ४ ॥

(श्रीकृष्णः) गदया अद्रीन् निर्बिभेद - श्रीकृष्ण गदेने पर्वत फोडिता झाला - सायकैः शस्त्रदुर्गाणि - बाणांनी शस्त्रांचे किल्ले - चक्रेण अग्निं जलं वायुं - सुदर्शनचक्राने अग्नि, उदक व वायु यांना - तथा असिना मुरपाशान् - तसेच तरवारीने मुराच्या पाशांना. ॥४॥

श्रीकृष्णांनी गदेच्या प्रहारांनी डोंगर फोडून टाकले आणि शस्त्रांची तटबंदी बाणांनी छिन्नविछिन्न करुन टाकली. सुदर्शन चक्राने अग्नी, पाणी वायूचे तट उध्वस्त करुन टाकले. तसेच मूर दैत्याने लावलेले फास तलवारीने तोडून टाकले. (४)


शङ्खनादेन यन्त्राणि हृदयानि मनस्विनाम् ।
प्राकारं गदया गुर्व्या निर्बिभेद गदाधरः ॥ ५ ॥
फुंकिता शंख जोराने यंत्रचालक सर्व ते ।
मूर्छित हरिने केले गदें किल्लाहि तोडिला ॥ ५ ॥

गदाधरः - गदाधारी श्रीकृष्ण - शंखनादेन यन्त्राणि - शंखनादाने यंत्रे - मनस्विनां हृदयानि - तेजस्वी शत्रूंची हृदये - गुर्व्या गदया (च) प्राकारं - आणि जड अशा गदेने तटाच्या भिंती - निर्बिभेद - फोडिता झाला. ॥५॥

यंत्रे आणि वीर पुरुषांची हृदये, शंखानादाने विदीर्ण करुन टाकली आणि नगराचे कोट गदाधर भगवंतांनी भारी गदेने उध्वस्त करुन टाकले. (५)


पाञ्चजन्यध्वनिं श्रुत्वा युगान्तशनिभीषणम् ।
मुरः शयान उत्तस्थौ दैत्यः पञ्चशिरा जलात् ॥ ६ ॥
पांचजन्य ध्वनी ऐसा युगांत जणु पातला ।
जळी निद्रित तो होता दैत्य पंचमुखी असा ॥ ६ ॥

शयानः पञ्चशिराः मुरः दैत्यः - निजलेला पाच मस्तकांचा मुरनामक दैत्य - युगान्ताशनिभीषणं - प्रलयकालीन मेघगर्जनेप्रमाणे भयंकर असा - पाञ्चजन्यध्वनिं श्रुत्वा - पाञ्चजन्य शंखाचा शब्द ऐकून - जलात् उत्तस्थौ - खंदकाच्या उदकातून वर उठून उभा राहिला. ॥६॥

भगवंतांच्या पांचजन्य शंखाचा आवाज प्रलयकालीन विजेच्या कडकडाटाप्रमाणे महाभयंकर होता. तो ऐकून पाच डोक्याचा मूर दैत्य झोपेतून जागा झाला आणि पाण्यातून बाहेर आला. (६)


( मिश्र )
त्रिशूलमुद्यम्य सुदुर्निरीक्षणो
     युगान्तसूर्यानलरोचिरुल्बणः ।
ग्रसंस्त्रिलोकीमिव पञ्चभिर्मुखैः
     अभ्यद्रवत्तार्क्ष्यसुतं यथोरगः ॥ ७ ॥
( इंद्रवज्रा )
सूर्याग्निसा तो जळपूच दैत्य
     युगांत वाटे बघता तयाने ।
धावोनि आला करिं शूळ घेता
     वाटे जणू तो गिळितो त्रिलोक ॥ ७ ॥

सुदुर्निरीक्षणः - ज्याकडे पहाणे अत्यंत कठीण आहे असा - युगान्तसूर्यानलरोचिः - प्रलयकालाच्या सूर्याप्रमाणे व अग्नीप्रमाणे आहे कांती ज्याची असा - उल्बणः - भयंकर - पञ्चभिः मुखैः त्रिलोकीं ग्रसन् इव (सः) - पाच तोंडांनी त्रैलोक्याला जणू ग्रासणारा असा तो मुर - त्रिशूलम् उद्यम्य - त्रिशूळ उगारून - यथा उरगः तार्क्ष्यसुतं (तथा) - जसा साप गरुडाकडे त्याप्रमाणे - (तं) अभ्यद्रवत् - त्या श्रीकृष्णावर चालून गेला. ॥७॥

तो दैत्य प्रलयकालीन सूर्य आणि अग्नी यांच्यासारखा प्रचंड तेजस्वी होता. तो इतका भयंकर होता की, त्याच्याकडे डोळे वर करून पाहाणेसुद्धा कठीण होते. त्याने त्रिशूळ उचलला आणि साप गरुडावर तुटून पडतो, त्याप्रमाणे तो भगवंतांच्या अंगावर धावला. त्यावेळी असे वाटत होते की, जणू तो आपल्या पाचही मुखांनी त्रैलोक्य गिळून टाकील. (७)


आविध्य शूलं तरसा गरुत्मते
     निरस्य वक्त्रैर्व्यनदत् स पञ्चभिः ।
स रोदसी सर्वदिशोऽन्तरं महान्
     आपूरयन् अण्डकटाहमावृणोत् ॥ ८ ॥
त्रिशूळ फेकी गरुडावरी नी
     पाची मुखाने करि सिंह नाद ।
दाही दिशा नी तिन्हि लोक तेणे
     ब्रह्मांड सारे हादरुन गेले ॥ ८ ॥

सः - तो मुर - तरसा शूलं आविद्‍ध्य - वेगाने शूळ गरगर फिरवून - गरुत्मते निरस्य - गरुडावर फेकून - पञ्चभिः वक्त्रैः - पाच तोंडांनी - व्यनदत् - गर्जना करू लागला - (महान्) सः - मोठा तो ध्वनि - रोदसी - पृथ्वी व आकाश यांमधील अंतरिक्ष - सर्वदिशः अंबरं - सर्व दिशा व आकाश - आपूरयन् - भरणारा असा - अण्डकटाहं आवृणोत् - ब्रह्माण्डाला व्यापिता झाला. ॥८॥

त्याने आपला त्रिशूल प्रचंड वेगाने फिरवून गरुडावर फेकला आणि नंतर गर्जना करु लागला. त्याने केलेला प्रचंड आवाज सर्व ब्रह्मांडात घुमू लागला. (८)


तदापतद् वै त्रिशिखं गरुत्मते
     हरिः शराभ्यां अभिनत्त्रिधौजसा ।
मुखेषु तं चापि शरैरताडयत्
     तस्मै गदां सोऽपि रुषा व्यमुञ्चत ॥ ९ ॥
कौशल्यदावी हरि तेधवा नी
     बाणेचि खंडी शुळ तीन भागी ।
मुखात त्याच्या हरि सोड बाण
     क्रोधे गदा चालवि दैत्य तेंव्हा ॥ ९ ॥

तदा - त्यावेळी - त्रिशिखम् - त्रिशूळ - गरुत्मते - गरुडावर - वै आपतत् - खरोखर पडला - हरिः - श्रीकृष्ण - तं - त्या त्रिशूळाला - शराभ्यां - दोन बाणांनी - ओजसा वै त्रिधा अभिनत् - वेगाने तीन तुकडे करून पाडिता झाला - अपि तं च - आणि त्या मुरालाहि - शरैः मुखेषु - बाणांनी तोंडांवर - अताडयत् - ताडिता झाला - सः अपि - तो मुरसुद्धा - रुषा - रागाने - तस्मै - त्या श्रीकृष्णावर - गदां व्यमुञ्चत् - गदेला सोडिता झाला. ॥९॥

मूर दैत्याचा त्रिशूळ गरुडाकडे येताना पाहून त्यांनी दोन बाण त्याला मारले. त्यामुळे त्याच्या त्रिशूळाचे तीन तुकडे झाले. त्याचबरोबर मूर दैत्याच्या तोंडातसुद्धा भगवंतांनी पुष्कळसे बाण मारले. यामुळे त्या दैत्यानेही चिडून भगवंतांवर आपली गदा फेकली. (९)


तामापतन्तीं गदया गदां मृधे
     गदाग्रजो निर्बिभिदे सहस्रधा ।
उद्यम्य बाहूनभिधावतोऽजितः
     शिरांसि चक्रेण जहार लीलया ॥ १० ॥
कृष्णे गदा चालवुनी स्वताची
     तो मूर केला शतखंड जेंव्हा ।
येई भुजा तो पसरोनि तेंव्हा
     पाची शिरे छेदिलि श्रीहरिने ॥ १० ॥

गदाग्रजः अजितः - गदाचा वडील बंधु श्रीकृष्ण - मृधे - युद्धात - गदया - गदेने - आपतन्तीं तां गदां - चाल करून येणार्‍या त्या गदेला - सहस्रधा निर्बिभिदे - हजार तुकडे करून फोडिता झाला - बाहून् उद्यम्य - हात वर करून - अभिधावतः (तस्य) शिरांसि - धावणार्‍या त्या मुराची मस्तके - चक्रेण लीलया जहार - सुदर्शनचक्राने लीलेने हरण करिता झाला. ॥१०॥

परंतु श्रीकृष्णांनी आपल्या गदेच्या प्रहाराने, मूर दैत्याच्या गदेचा आपल्यापर्यंत येण्यापूर्वीच चुरा करुन टाकला. आता तो शस्त्रहीन झाल्यामुळे आपले हात उंचावून श्रीकृष्णांच्या अंगावर धावून आला. तेव्हा त्यांनी आपल्या चक्राने सहजपणे त्याची पाचही मस्तके छाटून टाकली. (१०)


व्यसुः पपाताम्भसि कृत्तशीर्षो
     निकृत्तशृङ्गोऽद्रिरिवेन्द्रतेजसा ।
तस्यात्मजाः सप्त पितुर्वधातुराः
     प्रतिक्रियामर्षजुषः समुद्यताः ॥ ११ ॥
ताम्रोऽन्तरिक्षः श्रवणो विभावसुः
     वसुर्नभस्वानरुणश्च सप्तमः ।
पीठं पुरस्कृत्य चमूपतिं मृधे
     भौमप्रयुक्ता निरग धृतायुधाः ॥ १२ ॥
उडोनि गेले मग पंचप्राण
     जळात त्याचे पडले हि प्रेत ।
ताम्रान्तरीक्षो श्रवणो वसू नी
     विभा नभस्वान् अरुणो ययांना ॥ ११ ॥
या दैत्य पुत्रा अति शोक झाला
     घेवोनि शस्त्रे मग धावले ते ।
सेनापती पीठ करोनि दैत्य
     भौमासुरे धाडिले की लढाया ॥ १२ ॥

कृत्तशीर्षः (सः) - ज्याची मस्तके तुटून गेली आहेत असा तो मुर - इन्द्रतेजसा निकृत्तशृङगः अद्रिः इव - इंद्राच्या तेजस्वी वज्राने ज्याचे शिखर तोडिले आहे अशा पर्वताप्रमाणे - व्यसुः (भूत्वा) अंभसि पपात - मृत होऊन उदकात पडला - तस्य - त्याचे - पितुः वधातुराः सप्त आत्मजाः - पित्याच्या वधामुळे पीडित झालेले सात पुत्र - प्रतिक्रियामर्षजुषः (भूत्वा) समुद्यताः - प्रतिकार करण्यासाठी क्रोधयुक्त होऊन युद्धास सिद्ध झाले. ॥११॥

ताम्रः अन्तरिक्षः श्रवणः विभावसुः वसुः नभस्वान् सप्तमः च अरुणः - ताम्र, अंतरिक्ष, श्रवण, विभावसु, वसु, नभस्वान आणि सातवा अरुण - चमूपतिं पीठं पुरस्कृत्य - सेनापति पीठाला पुढे करून - मृधे - युद्धात - भौ‌मप्रयुक्ताः - नरकासुराने प्रेरिलेले असे - धृतायुधाः - हातात आयुधे घेतलेले असे - निरगन् - बाहेर पडले. ॥१२॥

मस्तके छाटली जाताच दैत्याचे प्राणोत्क्रमण झाले आणि ज्याप्रमाणे इंद्राच्या वज्राने शिखर तोडलेला एखादा पर्वत समुद्रात कोसळतो, त्याप्रमाणे तो दैत्य पाण्यात पडला. ताम्र, अंतरिक्ष, श्रवण, विभावसू, वसू, नभस्वान आणि अरूण असे मूर दैत्याचे सात पुत्र होते. आपल्या पित्याच्या मृत्यूने ते अत्यंत शोकाकुल झाले आणि बदला घेण्यासाठी क्रोधयुक्त होऊन शस्त्रास्त्रांनी सुसज्ज झाले. पीठ नावाच्या दैत्याला आपला सेनापती बनवून, भौ‍मासुराच्या आदेशावरून त्यांनी श्रीकृष्णांवर चढाई केली. (११-१२)


प्रायुञ्जतासाद्य शरानसीन् गदाः
     शक्त्यृष्टिशूलान्यजिते रुषोल्बणाः ।
तच्छस्त्रकूटं भगवान् स्वमार्गणैः
     अमोघवीर्यस्तिलशश्चकर्त ह ॥ १३ ॥
योजोनि बाणे गद खड्ग शूळ
     त्रिशूळ शक्ती अतिवृष्टि केली ।
अनंत ऐसी हरिचीच शक्ती
     कोट्यावधी तीर सोडोनि मोडी ॥ १३ ॥

रुषा उल्बणाः - क्रोधाने वाढलेले ते - शरान् असीन् गदाः शक्त्यृष्टिशूलानि - बाण, तलवार, गदा, शक्ति, ऋष्टि व शूल इ. हत्यारे - आसाद्य - मिळवून - अजिते प्रायुज्जत - श्रीकृष्णावर सोडिते झाले - अमोघवीर्यः भगवान् - व्यर्थ न जाणारा आहे पराक्रम ज्याचा असा भगवान श्रीकृष्ण - स्वमार्गणैः - आपल्या बाणांनी - तच्छस्रकूटं तिलशः चकर्त ह - यांच्या शस्त्रसमूहाचे तिळाएवढे तुकडे करून सोडिता झाला. ॥१३॥

तेथे जाऊन अत्यंत क्रोधाने त्यांनी भगवान श्रीकृष्णांवर बाण, खड्ग, गदा, शक्ती, ऋष्टी, त्रिशूळ इत्यादी शस्त्रांचा वर्षाव केला. भगवंतांची शक्ती अमोघ असल्यामुळे त्यांनी आपल्या बाणांनी त्यांच्या शस्त्रास्त्रांचे तिळतिळ तुकडे केले. (१३)


तान्पीठमुख्याननयद् यमक्षयं
     निकृत्तशीर्षोरुभुजाङ्घ्रिवर्मणः ।
स्वानीकपानच्युतचक्रसायकैः
     तथा निरस्तान् नरको धरासुतः ॥ १४ ॥
( वंशस्था )
निरीक्ष्य दुर्मर्षण आस्रवन्मदैः
     गजैः पयोधिप्रभवैर्निराक्रमात् ।
दृष्ट्वा सभार्यं गरुडोपरि स्थितं
     सूर्योपरिष्टात् सतडिद्‌घनं यथा ।
कृष्णं स तस्मै व्यसृजच्छतघ्नीं
     योधाश्च सर्वे युगपत् च विव्यधुः ॥ १५ ॥
कृष्णप्रहारे मग पीठ दैत्य
     नी सैन्य सारे ठिकर्‍याच झाले ।
भौमासुरे घेवुनि मत्त सैन्य
     हत्ती सवे तो मग पातला की ॥ १४ ॥
सपत्‍नि पाही गरुडी हरीला
     वर्षाघनीं जै चमकेचि वीज ।
शतघ्न ऐशी मग शक्ती योजी
     सवेचि सर्वे बहु मार केला ॥ १५ ॥

निकृत्तशीर्षोरुभुजाङ्‌घ्रिवर्मणा - तोडिली आहेत मस्तके, मांडया, दंड, पाय व कवचे ज्यांची अशा - पीठमुख्यान् तान् - पीठ आहे प्रमुख ज्यांमध्ये अशा सेनापतींना - यमक्षयं अनयत् - यमलोकी पाठविता झाला - अच्युतचक्रसायकैः - श्रीकृष्णाचे सुदर्शन चक्र व बाण यांनी - तथा निरस्तान् - त्याप्रमाणे ठार केलेले - स्वान् अनीकपान् निरीक्ष्य - आपले सेनापति पाहून - धरासुतः नरकः - भूमीचा पुत्र नरकासुर - दुर्मर्षणः (भूत्वा) - फार संतप्त होऊन - आस्रवन्मदैः पयोधिप्रभवैः गजैः - मद पाझरणार्‍या क्षीरसागरोत्पन्न हत्तीसह - निराक्रमत् - बाहेर पडला - यथा सूर्योपरिष्टात् सतडित्‌‍घनं - ज्याप्रमाणे सूर्यावरून विद्युलतेसह मेघ यावा - (तथा) गरुडोपरि स्थितं सभार्यं कृष्णं दृष्टवा - त्याप्रमाणे गरुडावर बसलेल्या पत्‍नीसह अशा श्रीकृष्णाला पाहून - सः तस्मै शतघ्नीं व्यसृजत् - तो त्याच्यावर शतघ्नी सोडिता झाला - च - आणि - सर्वे योधाः - सर्व योद्धे - (तं) युगपत् विव्यधुः स्म - श्रीकृष्णाला एकदम वेधिते झाले. ॥१४-१५॥

भगवंतांनी सेनापती पीठ इत्यादी दैत्यांची मस्तके, मांड्या, हात, पाय आणि कवचे तोडून त्यांना यमसदनाला पाठविले. जेव्हा पृथ्वीपुत्र नरकासुराने पाहिले की, भगवान श्रीकृष्णांच्या चक्र आणि बाणांनी आपल्या सेनापतींचा संहार झाला आहे, तेव्हा त्याचा क्रोध अनावर झाला. समुद्रातून उत्पन्न झालेल्या व मद पाझरणार्‍या उन्मत्त हत्तींची सेना घेऊन तो नगराच्या बाहेर आला. त्याने पाहिले की, सूर्याच्या वर विजेसह पावसाळ्यातील काळा मेघ शोभावा त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण आपल्या पत्‍नीसह आकाशात गरुडावर बसले आहेत. भौ‍मासुराने स्वत: भगवंतांवर शतघ्नी नावाची शक्ती फेकली आणि त्याच्या सगळ्या सैनिकांनीसुद्धा एकदम त्यांच्यावर आपापली शस्त्रास्त्रे सोडली. (१४-१५)


तद्‌भौमसैन्यं भगवान् गदाग्रजो
     विचित्रवाजैर्निशितैः शिलीमुखैः ।
निकृत्तबाहूरुशिरोध्रविग्रहं
     चकार तर्ह्येव हताश्वकुञ्जरम् ॥ १६ ॥
विचित्र ऐसे पर ज्या तिराला
     ती तीक्ष्ण बाणे हरि सोडि तेंव्हा ।
भौमासुराचे मग सैन्य सारे
     घोडे नि हत्ती मरु लागले तै ॥ १६ ॥

भगवान् गदाग्रजः - भगवान श्रीकृष्ण - विचित्रवाजैः निशितैः शिलीमुखैः - चित्रविचित्र पिसारे असणार्‍या तीक्ष्ण बाणांनी - तत् भौ‌मसैन्यं - ते नरकासुराचे सैन्य - निकृत्तबाहूरुशिरोध्रविग्रहं - बाहु, मांडया, माना व शरीरे ही ज्यांची तुटून गेली आहेत असे - चकार - करिता झाला - तर्हि एव - त्याचवेळी - हताश्वकुंजरं (चकार) - घोडे व हत्ती ज्यांतील मेले आहेत असे करिता झाला.॥१६॥

भगवान श्रीकृष्ण चित्रविचित्र पंख असणारे तीक्ष्ण बाण नरकासुराच्या सैन्यावर सोडू लागले. त्यामुळे लगेचच भौ‍मासुराच्या सैनिकांचे हात, मांड्या, मुंडकी आणि धडे तुटून खाली पडू लागली. हत्ती आणि घोडेसुद्धा मरून पडले. (१६)


( अनुष्टुप् )
यानि योधैः प्रयुक्तानि शस्त्रास्त्राणि कुरूद्वह ।
हरिस्तान्यच्छिनत् तीक्ष्णैः शरैरेकैक शस्त्रीभिः ॥ १७ ॥
उह्यमानः सुपर्णेन पक्षाभ्यां निघ्नता गजान् ।
गुरुत्मता हन्यमानाः तुण्डपक्षनखैर्गजाः ॥ १८ ॥
पुरमेवाविशन्नार्ता नरको युध्ययुध्यत ।
दृष्ट्वा विद्रावितं सैन्यं गरुडेनार्दितं स्वकं ॥ १९ ॥
तं भौमः प्राहरच्छक्त्या वज्रः प्रतिहतो यतः ।
नाकम्पत तया विद्धो मालाहत इव द्विपः ॥ २० ॥
( अनुष्टुप् )
सैन्याने सोडिले जे जे ते ते शस्त्रास्त्र आपुल्या ।
बाणाने हरिने तेंव्हा मोडोनी काढिले तदा ॥ १७ ॥
गरूड झडपी हत्ती चोंचीने तोडिही तसा ।
आर्त ते जाहले सर्व घुसले नगरातही ॥ १८ ॥
भौमाने पाहिले सैन्य नगरीं घुसु लागले ।
वज्रभेदी अशी शक्ती योजी तो गरुडावरी ॥ १९ ॥
विफल जाहली शक्ती गरुडा स्फूर्ति जाहली ।
मत्त हत्तीस माळेचा प्रहार वाटतो तसा ॥ २० ॥

कुरूद्वह - हे परीक्षित राजा - गजान् निघ्नता सुपर्णेन - हत्तींना मारणार्‍या गरुडाकडून - पक्षाभ्यां उह्यमानः - पंखांनी वाहिला जाणारा असा - हरिः - श्रीकृष्ण - योधैः प्रयुक्तानि यानि शस्त्रास्त्राणि - योद्‌‍ध्यांनी सोडिलेली जी शस्त्रास्त्रे - तानि एकैकशः त्रिभिः तीक्ष्णैः शरैः - ती प्रत्येकी तीन तीन तीक्ष्ण बाणांनी - अच्छिनत् - तोडिता झाला - गरुत्मता - गरुडाकडून - तुंडपक्षनखैः - चोच, पंख व नखे यांनी ताडिले जाणारे - गजाः - हत्ती - आर्ताः - पीडित होऊन - पुरम् एव आविशन् - नगरातच शिरले - नरकः - नरकासुर - गरुडेन अर्दितं विद्रावितं स्वकं सैन्यं दृष्टवा - गरुडाने पीडिलेले व पळवून लाविलेले स्वतःचे सैन्य पाहून - युधि अयुध्यत - युद्धभूमीवर युद्ध करू लागला. ॥१७-१९॥

ततः वज्रः प्रतिहतः - ज्या शक्तीने वज्र नाश पावले - (तया) शक्त्या - त्या शक्तीने - भौ‌मः तं प्राहरत् - भूमिपुत्र नरकासुर गरुडावर प्रहार करिता झाला - मालाहतः द्विपः इव - माळेने ताडिलेला हत्ती त्याप्रमाणे - तया विद्धः (गरुडः) - त्या शक्तीने विद्ध झालेला गरुड - न अकंपत - हालला नाही. ॥२०॥

परीक्षिता ! भौ‍मासुराच्या सैनिकांनी भगवंतांवर जी जी शस्त्रास्त्रे चालविली होती, त्यांपैकी प्रत्येक, भगवंतांनी तीन तीन तीक्ष्ण बाणांनी तोडून टाकली. (१७) त्यावेळी श्रीकृष्ण ज्या गरुडावर बसले होते, तो आपल्या पंखांनी हत्तींना मारीत होता. तसेच चोचीने आणि नखांनी त्याने हत्तींना घायाळ केले, तेव्हा ते घाबरुन रणांगण सोडून नगरामध्येच घुसले. तेथे आता एकटा भौ‍मासुर लढत राहिला. गरुडाच्या माराने घायाळ होऊन आपली सेना पळून जाऊ लागलेली पाहून त्याने त्याच्यावर वज्रालासुद्धा निष्प्रभ्र करणारी शक्ती फेकली. परंतु तिच्या माराने गरुड जरासुद्धा विचलित झाला नाही. फुलांच्या माळेच्या प्रहाराने हत्ती विचलित होऊ नये तसा. (१८-२०)


शूलं भौमोऽच्युतं हन्तुं आददे वितथोद्यमः ।
तद्विसर्गात् पूर्वमेव नरकस्य शिरो हरिः ।
अपाहरद् गजस्थस्य चक्रेण क्षुरनेमिना ॥ २१ ॥
विफल जाहले यत्‍न तदा तो शूळ फेकितो ।
कृष्णाने तोडिला तोही नी भौमासुर कापिला ॥ २१ ॥

वितथोद्यमः भौ‌मः - व्यर्थ आहे उद्योग ज्याचा असा भूमिपुत्र नरकासुर - अच्युतं हन्तुं - श्रीकृष्णाला मारण्याकरिता - शूलं आददे - शूळ घेता झाला - हरिः - श्रीकृष्ण - तद्विसर्गात् पूर्वं एव - त्या त्रिशूलाला सोडण्यापूर्वीच - गजस्थस्य - हत्तीवर बसलेल्या - नरकस्य शिरः - नरकासुराचे मस्तक - क्षुरनेमिना चक्रेण - वस्तर्‍याप्रमाणे धार आहे ज्याची अशा सुदर्शनचक्राने - अपाहरत् - हरिता झाला. ॥२१॥

सर्व प्रयत्‍न निष्फळ झालेले पाहून त्याने श्रीकृष्णांना मारण्यासाठी हातात त्रिशूळ घेतला. परंतु तो त्याने फेकण्यापूर्वीच श्रीकृष्णांनी तीक्ष्ण धारेच्या चक्राने हत्तीवर बसलेल्या भौ‍मासुराचे मस्तक उडविले. (२१)


( मिश्र )
सकुण्डलं चारुकिरीटभूषणं
     बभौ पृथिव्यां पतितं समुज्ज्वलम् ।
हा हेति साध्वित्यृषयः सुरेश्वरा
     माल्यैर्मुकुन्दं विकिरन्त ईडिरे ॥ २२ ॥
( इंद्रवज्रा )
सकुंडले शीर किरीटि शोभे
     तुटोनि आले भुमिसी तसेची ।
दुःखीत झाले स्वजनो सखे ते
     देवें हरीला सुम वाहिले तै ॥ २२ ॥

सकुण्डलं चारुकिरीटभूषणं (तत्) - कुंडलासह सुंदर किरीट व अलंकार धारण केलेले ते मस्तक - समुज्ज्वलत् - चकाकत - पृथिव्यां पतितं बभौ - पृथ्वीवर पडलेले असे शोभले - ऋषयः सुरेश्वराः (च) - ऋषि व इंद्रादि देव - माल्यैः विकिरन्तः - फुलांची वृष्टि करणारे असे - हा हा इति - वाहवा, वाहवा असे - साधु इति - चांगले झाले असे म्हणून - मुकुंद ईडिरे - श्रीकृष्णाला स्तविते झाले. ॥२२॥

त्याचे कुंडले आणि सुंदर किरीटाने झगमगणारे मस्तक जमिनीवर पडले. ते पाहून भौ‍मासुराचे संबंधी " हाय हाय " करु लागले. ऋषी " वाहवा ! वाहवा ! " म्हणू लागले आणि देव भगवंतांवर पुष्पवृष्टि करीत स्तुती करु लागले. (२२)


ततश्च भूः कृष्णमुपेत्य कुण्डले ।
     प्रतप्तजाम्बूनदरत्‍नभास्वरे ।
सवैजयन्त्या वनमालयार्पयत्
     प्राचेतसं छत्रमथो महामणिम् ॥ २३ ॥
ती वैजयंती वनमान आणि
     अदीतिची कुंडल भूमि अर्पी ।
वरुणछत्रो नि तसा महान
     मणिहि अर्पी धरणी हरीला ॥ २३ ॥

ततः च - आणि नंतर - भूः - पृथ्वी - कृष्णं उपेत्य - श्रीकृष्णाजवळ येऊन - प्रतप्तजाम्बूनदरत्‍नभास्वरे कुंडले - निर्मळ झगझगणारी अशी आणि सुवर्ण व रत्‍ने यांनी प्रकाशणारी दोन कुंडले - (च) सवैजयन्त्या वनमालया - आणि वैजयंतीसह वनमाळेने युक्त - प्राचेतसं छत्रं - वरुणाचे छत्र - अथो महामणिं - आणि महारत्‍न - अर्पयत् - अर्पिती झाली. ॥२३॥

तेव्हा पृथ्वी भगवंतांकडे आली. तिने भगवान श्रीकृष्णांच्या गळ्यामध्ये वैजयंतीमाळ आणि वनमाळा घालून, अदितीची तापलेल्या सोन्याप्रमाणे चमकणारी रत्‍नजडित कुंडले भगवंतांना दिली. त्याचबरोबर वरुणाचे छत्र आणि एक मौल्यवान रत्‍न त्यांना दिले. (२३)


( अनुष्टुप् )
अस्तौषीदथ विश्वेशं देवी देववरार्चितम् ।
प्राञ्जलिः प्रणता राजन् भक्तिप्रवणया धिया ॥ २४ ॥
( अनुष्टुप् )
परीक्षिता क्षिती तेव्हा विश्वेशा कर जोडुनी ।
प्रणामी भक्तिभावाने गायिली स्तूति या परी ॥ २४ ॥

राजन् - हे परीक्षित राजा - अथ - नंतर - देवी - पृथ्वी - प्राञ्जलिः - हात जोडलेली अशी - प्रणता - नमस्कार करून - भक्तिप्रवणया धिया प्रणता - भक्तीने नम्र अशा बुद्धीने नमस्कार करणारी - देववरार्चितं विश्वेशं - श्रेष्ठ देवांनी पूजिलेल्या जगत्पति श्रीकृष्णाला - अस्तोषीत् - स्तविती झाली. ॥२४॥

राजन ! मोठमोठ्या देवतांनी पूजन केलेल्या त्या विश्वेश्वरांना प्रणाम करून, हात जोडून, भक्तिभावयुक्त अंत:करणाने पृथ्वीदेवी त्यांची स्तुती करु लागली. (२४)


भूमिरुवाच
नमस्ते देवदेवेश शङ्खचक्रगदाधर ।
भक्तेच्छोपात्तरूपाय परमात्मन्नमोऽस्तु ते ॥ २५ ॥
पृथ्विदेवी म्हणाली -
शंखचक्र गदाधारी देवेशा नमिते तुला ।
भक्त‍इच्छार्थ आलासी येथ तू प्रगटोनिया ॥ २५ ॥

देवदेवेश - मोठमोठया देवांचा अधिपति अशा हे श्रीकृष्णा - शङखचक्रगदाधर - शंख, चक्र व गदा धारण करणार्‍या हे ईश्वरा - परमात्मन् - हे परमेश्वरा - ते नमः - तुला नमस्कार असो - भक्तेच्छोपात्तरूपाय ते नमः अस्तु - भक्तांच्या इच्छेप्रमाणे घेतली आहेत स्वरूपे ज्याने अशा तुला नमस्कार असो. ॥२५॥

पृथ्वी म्हणाली - हे शंखचक्रधारी देवदेवेश्वरा ! मी आपणास नमस्कार करीत आहे. हे परमात्मन ! आपण आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यानुसारच आपले रुप प्रकट करता. आपणास मी नमस्कार करते. (२५)

विवरण :- वरुणाचे छत्र, इंद्रमाता अदितीची कुंडले आणि मेरुपर्वतावरील स्थान हे भौ‌मासुराने हरण केले आहे, असे इंद्राकडून कळल्यानंतर आता त्याचा बंदोबस्त करण्याची वेळ आली आहे, हे जाणून कृष्णाने त्यास युद्धात ठार केले. त्यानंतर त्याची स्तुती करताना भूमी म्हणाली, '(भौ‌मासुर हा भूमिपुत्र, त्यास तुझ्य़ाच आज्ञेने ठार करीन, असे वचन कृष्णाने तिला दिले होते.) तू देवांचा देव आहेस. शंख-चक्रगदाधारी आहेस. परंतु हे तुझे स्वरूप खरे नाही. तू भक्तवत्सल आहेस, त्यामुळे भक्तांना तुझे रूप जसे पहायला आवडते, त्याप्रमाणे, त्यांच्या इच्छेप्रमाणे तू रूप धारण करतोस. (भक्तेच्छोपात्तरूप) आणि म्हणूनच तू भक्तप्रिय आहेस. (२५)



नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने ।
नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रये ॥ २६ ॥
नमो पंकजनाभाला नमो पंकजमालिला ।
नमो पंकजनेत्राला नमो या पदपंकजा ॥ २६ ॥

पङ्कजनाभाय नमः - ज्याच्या नाभीच्या ठिकाणी कमळ आहे अशा तुला नमस्कार असो - पङकजमालिने नमः - कमळांच्या माळा धारण करणार्‍या तुला नमस्कार असो - पङकजाङ्घ्रये ते नमः - कमळाप्रमाणे पाय असणार्‍या तुला नमस्कार असो. ॥२६॥

प्रभो ! आपल्या नाभीतून कमल प्रगट झाले आहे. आपण कमळांची माळ गळ्यात घालता. आपले नेत्र कमळासारखे असून चरणही कमलाप्रमाणे सुकुमार आहेत. आपणास मी वारंवार नमस्कार करीत आहे. (२६)


नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय विष्णवे ।
पुरुषायादिबीजाय पूर्णबोधाय ते नमः ॥ २७ ॥
नमो तुला भगवते वासुदेवास विष्णुसी ।
पुरुष आदिवीजाला पूर्णबोधास या नमो ॥ २७ ॥

वासुदेवाय विष्णवे - वसुदेवपुत्र व सर्वव्यापी - पुरुषाय आदिबीजाय - सर्वांच्या शरीरात आत्मरूपाने रहाणार्‍या व मूळबीजरूपी - पूर्णबोधाय भगवते तुभ्यं नमः - पूर्ण ज्ञानी असा जो तू भगवान त्या तुला नमस्कार असो - ते नमः - तुला पुनः नमस्कार असो. ॥२७॥

आपण सर्व ऐश्वर्य, धर्म, यश, संपत्ती, ज्ञान आणि वैराग्याचे आश्रय आहात. आपण सर्वव्यापक असूनही स्वत: वसुदेवपुत्राच्या रुपाने प्रगट झाला आहात. मी आपणांस नमस्कार करीत आहे. (२७)

विवरण :- कृष्णाची स्तुती करताना भूमी पुढे म्हणते, 'तू षडैश्वर्यगुणसंपन्न आहेस. वसुदेवाचा पुत्र म्हणून 'वासुदेव' आहेस. तू सर्व प्राणिमात्रांचे आश्रयस्थान आहेस. जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय हे तूच घडवितोस. (तुझी 'पुरुष' विष्णू आणि पूर्णबोध ही नावे हे सिद्ध करतात.) या जगाच्या निर्मितीचे तू मूळ कारण आहेस. (आदिबीज) (पूर्वमेवा ह मिहासम्।) (२७)



अजाय जनयित्रेऽस्य ब्रह्मणेऽनन्तशक्तये ।
परावरात्मन् भूतात्मन् परमात्मन् नमोऽस्तु ते ॥ २८ ॥
अजन्मा जन्मिसी सृष्टी अनंतशक्ति ब्रह्म तू ।
चराचर अशा रूपा वारंवार प्रणाम हा ॥ २८ ॥

परावरात्मन् भूतात्मन् परमात्मन् - हे कार्यकारणस्वरूपा, हे कार्यस्वरूपा, हे प्राणिमात्रांच्या ठिकाणी आत्मरूपाने रहाणार्‍या परमात्म्या - अजाय अस्य जनयित्रे - स्वतः जन्मरहित असून ह्या जगाला उत्पन्न करणार्‍या - ब्रह्मणे अनन्तशक्तये - ब्रह्मस्वरूपी अनंत शक्तीच्या अशा - ते नमः अस्तु - तुला नमस्कार असो. ॥२८॥

आपण सर्व कारणांचेही परम कारण आदिपुरूष आहात. मी आपणांस नमस्कार करीत आहे. आपण स्वत: जन्मरहित असून या जगाचे जन्मदाते आहात. जगाचे जे काही कार्यकारणमय रुप आहे. जे चराचर आहे, ते सारे आपलेच स्वरुप आहे. हे परमात्मन ! आपल्या चरणांना माझा वारंवार नमस्कार असो ! (२८)

विवरण :- श्रीकृष्णाची स्तुती भूमी अनेक रूपांनी, अनेक नावांनी करत होती, मात्र जोपर्यंत अद्वितीय ब्रह्म म्हटले जात नाही, तोपर्यंत ती स्तुती पूर्ण होत नाही. ती त्याला अज, आदिबीज, पूर्णब्रह्म म्हणते, ती पुढे म्हणते, तू स्वतः अनंतशक्ती, म्हणून या जगाचा निर्माता, चराचराचा आत्मा, (आदिबीज) पण तरीही स्वतः मात्र शरीररहित आहेस. (अज-जन्मास न आलेला) तू अनंत आहेस, सर्व विश्वाला व्यापून राहिला आहेस. त्यामुळे वेदादि शब्दांनी जाणला जातोस. (अनंता वै वेदाः ।) (२८)



( मिश्र )
त्वं वै सिसृक्षुरज उत्कटं प्रभो
     तमो निरोधाय बिभर्ष्यसंवृतः ।
स्थानाय सत्त्वं जगतो जगत्पते
     कालः प्रधानं पुरुषो भवान् परः ॥ २९ ॥
( इंद्रवज्रा )
रजोगुणे निर्मिशि सृष्टि तैसी ।
     तमोगुणाने हरिसीहि सारी ।
नी सत्व योगे जिव जेववीशी
     न गुंतशी तू गुणहीन ऐसा ॥ २९ ॥

प्रभो - हे श्रीकृष्णा - त्वं वै - तू खरोखर - सिसृक्षुः - सृष्टि उत्पन्न करण्याच्या इच्छेने - उत्कटं रजः बिभर्षि - बलवान असा रजोगुण धारण करितोस - असंवृतः - न झाकलेला असा उघड रीतीने - निरोधाय तमः (बिभर्षि) - प्रलय करण्याकरिता तमोगुणाला धारण करितोस - जगत्पते - हे जगन्नाथा - जगतः स्थानाय सत्त्वं (बिभर्षि) - जगाच्या रक्षणासाठी तू सत्त्वगुण स्वीकारितोस - परः भवान् - श्रेष्ठ असा तू - कालः प्रधानं पुरुषः (असि) - काल, प्रकृति व पुरुष असा आहेस. ॥२९॥

प्रभो ! जेव्हा आपण जग उत्पन्न करु इच्छिता, तेव्हा उत्कट रजोगुणाचा, जेव्हा प्रलय करु इच्छिता, तेव्हा तमोगुणाचा आणि जेव्हा याचे पालन करु इच्छिता, तेव्हा सत्वगुणाचा स्वीकार करता. परंतु या तिन्ही गुणांनी आपण झाकले जात नाही. हे जगत्पते ! आपण स्वत:च प्रकृती, पुरूष आणि काळ आहात. तसेच या तिन्हींच्या पलीकडील आहात. (२९)

विवरण :- भूमी पुढे म्हणते, 'वास्तविक तू गुणातीत आहेस. (सत्त्व, रज, तम या तीनही गुणांच्या पार असणारा) परंतु त्रिगुणांनी युक्त होऊन जगाची निर्मिती करवून घेतोस. जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय घडवून आणणारे ब्रह्मा, विष्णू, महेश म्हणजेहि तूच आणि म्हणून या जगाचा निर्माताही तूच आहेस.' (२९)



अहं पयो ज्योतिरथानिलो नभो
     मात्राणि देवा मन इन्द्रियाणि ।
कर्ता महानित्यखिलं चराचरं
     त्वय्यद्वितीये भगवन्नयं भ्रमः ॥ ३० ॥
मी नी जलो तेज नभो नि वायू
     मात्रा तया तू मन इंद्रियासी ।
कर्ता जगां तूचि चराचराचा
     भ्रमेचि भासे मग भेद ऐसा ॥ ३० ॥

भगवन् - हे श्रीकृष्णा - अहं पयः ज्योतिः अनिलः नभः - मी पृथ्वी, उदक, तेज, वायु, आकाश - मात्राणि - पंचमहाभूतांची सूक्ष्म स्वरूपे - देवाः मनः इन्द्रियाणि - देव, मन, इंद्रिये - अथ कर्ता महान् - त्याचप्रमाणे अहंकार व महत्तत्व - इति अखिलं चराचरं - असे सर्व स्थावरजंगमात्मक विश्व - अयम् - हा - अद्वितीये त्वयि - एकरूपी तुझ्या ठिकाणी - भ्रमः (अस्ति) - भ्रम होय. ॥३०॥

हे भगवान ! मी (पृथ्वी), जल, अग्नी, वायू, आकाश, पंचतन्मात्रा, मन, इंद्रिये आणि त्यांच्या अधिष्ठात्री देवता, अहंकार व महत्तत्त्व असे हे संपूर्ण चराचर जग आपल्या अद्वितीय स्वरूपामध्ये भ्रमामुळेच पाहात आहे. (३०)

विवरण :- एकरूपत्त्व सांगताना भूमी पुढे म्हणते, 'सृष्टितील पंचमहाभूते, शरीरातील ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये या सर्वांचा निर्माता तूच, ती तुझीच रूपे. घटाचे मूळ रूप मातीत असते. माती आणि घट हे वेगळे नाहीत. (घट मातीपासूनच बनतो. पण तो तिच्यापासून वेगळा नाही.) त्याप्रमाणे या विश्वाचे कारण तूच, तुम्ही एकमेकांपासून वेगळे नाही. (३०)



तस्यात्मजोऽयं तव पादपङ्कजं
     भीतः प्रपन्नार्तिहरोपसादितः ।
तत् पालयैनं कुरु हस्तपङ्कजं
     शिरस्यमुष्याखिलकल्मषापहम् ॥ ३१ ॥
भौमासुराचा भगदत्त पुत्र
     माझाहि नातू, भयभीत झाला ।
मी घालिते रे पदि हा तुझ्या, तू
     ठेवी शिरासी वरदा कराते ॥ ३१ ॥

प्रपन्नार्तिहर - शरण आलेल्यांची पीडा दूर करणार्‍या हे श्रीकृष्णा - तस्य अयं आत्मजः - त्या नरकासुराचा हा पुत्र - भीतः - भ्यालेला - तव पादपङ्कजं उपसादितः - तुझ्या चरणकमलाला शरण आला आहे - तत् एनं पालय - म्हणून ह्याचे रक्षण कर - अखिलकल्मषापहं (ते) हस्तपंकजं - सर्व पातकांचे क्षालन करणारे तुझे करकमल - अमुष्य शिरसि - ह्याच्या मस्तकावर ठेव. ॥३१॥

हे शरणागतभयभंजना, प्रभो ! माझा पुत्र असलेल्या भौ‍मासुराचा हा भगदत्त नावाचा पुत्र भयभीत झाला आहे. मी याला आपल्या चरणकमलांजवळ घेऊन आले आहे. प्रभो ! आपण याचे रक्षण करावे आणि जे सार्‍या जगाचे पाप-ताप नष्ट करणारे आहे, ते करकमल याच्या मस्तकावर ठेवावे. (३१)


श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् )
इति भूम्यर्थितो वाग्भिः भगवान् भक्तिनम्रया ।
दत्त्वाभयं भौमगृहं प्राविशत् सकलर्द्धिमत् ॥ ३२ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
( अनुष्टुप् )
पृथ्वीने प्रार्थिता ऐसे कृष्णे अभय देउनी ।
स्वयेचि धनभांडारी गेला श्रीकृष्ण तेधवा ॥ ३२ ॥

भक्तिनम्रया भूम्या - भक्तीने नम्र झालेल्या पृथ्वीने - इति वाग्भिः अर्थितः भगवान् - याप्रमाणे स्तुतीच्या वचनाने प्रार्थिलेला भगवान श्रीकृष्ण - अभयं दत्त्वा - अभय देऊन - सकलर्द्धिमत् भौ‌मगृहं प्राविशत् - सर्व समृद्धीने युक्त अशा भूमिपुत्र नरकासुराच्या घरात शिरला. ॥३२॥

श्रीशुक म्हणतात- पृथ्वीने भक्तिभावाने विनम्र होऊन जेव्हा अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांची स्तुती करुन प्रार्थना केली, तेव्हा त्यांनी भगदत्ताला अभयदान दिले आणि सर्व प्रकारच्या संपत्तींनी संपन्न अशा भौ‍मासुराच्या राजवाड्यात प्रवेश केला. (३२)


तत्र राजन्यकन्यानां षट्सहस्राधिकायुतम् ।
भौमाहृतानां विक्रम्य राजभ्यो ददृशे हरिः ॥ ३३ ॥
कृष्णाने पाहिले तेथे सोळा हजार त्या मुली ।
नृपांच्या हरुनी तेथे ठेविल्या बंधनी पहा ॥ ३३ ॥

तत्र - तेथे - हरिः - श्रीकृष्ण - विक्रम्य - पराक्रम करून - भौ‌माहृतानां राजन्यकन्यानां षट्‌‍सहस्राधिकायुतं - भूमीपुत्र नरकासुराने हरण केलेल्या सोळा हजार राजकन्यांना - ददृशे - पहाता झाला. ॥३३॥

तेथे गेल्यावर भगवंतांनी पाहिले की, भौ‍मासुराने राजांना जिंकून त्यांच्या सोळा हजार राजकुमारी तेथे आणून ठेवल्या होत्या. (३३)


तं प्रविष्टं स्त्रियो वीक्ष्य नरवर्यं विमोहिताः ।
मनसा वव्रिरेऽभीष्टं पतिं दैवोपसादितम् ॥ ३४ ॥
अंतःपुरात कृष्णाला मुलिंनी पाहिले तदा ।
नी निर्हेतुक भावाने मनीं कृष्णा वरीयले ॥ ३४ ॥

स्त्रियः - स्त्रिया - दैवोपसादितं - सुदैवाने प्राप्त झालेल्या - तं नरवीरं प्रविष्टं वीक्ष्य - त्या नगरात आलेल्या पुरुषश्रेष्ठाला पाहून - विमोहिताः - मोहित झालेल्या अशा - मनसा अभीष्टं पतिं वव्रिरे - मनाने इष्ट असा पति म्हणून वरित्या झाल्या. ॥३४॥

अंत:पुरात आलेल्या नरश्रेष्ठ भगवान श्रीकृष्णांना जेव्हा त्या राजकुमारींनी पाहिले, तेव्हा त्या अत्यंत मोहित झाल्या आणि त्यांनी आपल्या भाग्यानेच आपल्याला मिळवून दिलेल्या त्यांना मनोमन प्रियतम पती म्हणून वरले. (३४)


भूयात् पतिरयं मह्यं धाता तदनुमोदताम् ।
इति सर्वाः पृथक् कृष्णे भावेन हृदयं दधुः ॥ ३५ ॥
आपापल्या मनीं सर्वे मिळावा पति हा असे ।
चिंतिले प्रेम भावाने हरिसी प्रेम अर्पिले ॥ ३५ ॥

अयं मह्यं पतिः भूयात् - हा माझा पति होवो - धाता तत् अनुमोदतां - ब्रह्मदेव त्या गोष्टीला अनुमोदन देवो - इति सर्वाः - असे म्हणून सर्व स्त्रिया - कृष्णे पृथग्भावेन - कृष्णाच्या ठिकाणी भिन्नभिन्न रीतीने भावना ठेवून - हृदयं दधुः - अंतःकरण आसक्त करित्या झाल्या. ॥३५॥

त्या राजकुमारींपैकी प्रत्येकीने स्वतंत्रपणे आपल्या मनात हाच भाव बाळगला की, "हे श्रीकृष्णच आपले पती व्हावेत आणि विधात्याने आपली ही अभिलाषा पूर्ण करावी. " अशा प्रकारे त्यांनी आपले हृदय भगवंतांना अर्पण केले. (३५)


ताः प्राहिणोद् द्वारवतीं सुमृष्टविरजोऽम्बराः ।
नरयानैर्महाकोशान् रथाश्वान् द्रविणं महत् ॥ ३६ ॥
सर्व त्या राजकन्यांना द्वारकापुरि धाडिले ।
संपत्ती रथ नी घोडे कृष्णाने भेटिही दिल्या ॥ ३६ ॥

कृष्णः - श्रीकृष्ण - सुमृष्टविरजोऽम्बराः ताः - सुंदर व निर्मळ वस्त्र नेसलेल्या त्या स्त्रिया - नरयानैः - पालखीतून - महाकोशान् रथान् महत् द्रविणं च - मोठमोठी कोठारे, रथ आणि मोठा द्रव्यनिधि - द्वारवतीं प्राहिणोत् - द्वारकेत पाठविता झाला. ॥३६॥

तेव्हा श्रीकृष्णांनी त्यांना सुंदर सुंदर वस्त्रे परिधान करवून, पालख्यांत बसवून द्वारकेला पाठविले आणि त्यांच्याबरोबर पुष्कळसे धन, रथ, घोडे तसेच अमाप संपत्तीही पाठविली. (३६)


ऐरावतकुलेभांश्च चतुर्दन्तांस्तरस्विनः ।
पाण्डुरांश्च चतुःषष्टिं प्रेरयामास केशवः ॥ ३७ ॥
ऐरावत कुलोत्पन्न चौदंई श्वेत हत्ति ते ।
चौंसष्ट द्वारकेला ते तेथुनी धाडिले पहा ॥ ३७ ॥

केशवः - श्रीकृष्ण - चतुर्दन्तान् तरस्विनः च पाण्डुरान् च - चार दातांचे वेगवान व शुभ्रवर्णाचे - चतुःषष्टिं ऐरावतकुलेभान् - चौसष्ट ऐरावतकुळात उत्पन्न झालेले हत्ती - प्रेषयामास - पाठवता झाला. ॥३७॥

ऐरावताच्या वंशात जन्मलेले, अत्यंत वेगवान, चार चार दातांचे, शुभ्र असे चौसष्ट हत्तीसुद्धा भगवंतांनी तेथून द्वारकेला पाठविले. (३७)


गत्वा सुरेन्द्रभवनं दत्त्वादित्यै च कुण्डले ।
पूजितस्त्रिदशेन्द्रेण सहेन्द्र्याण्या च सप्रियः ॥ ३८ ॥
इंद्राच्या भवनी जाता सत्यभामा नि कृष्णला ।
सपत्‍न पूजिले इंद्रे कृष्णे त्या कुंडले दिली ॥ ३८ ॥

सप्रियः (सः) - पत्‍नीसह तो श्रीकृष्ण - सुरेन्द्रभवनं गत्वा - इंद्रमंदिरी जाऊन - अदित्यै च कुण्डले दत्त्वा - आणि अदितीला कुंडले देऊन - च इंद्राण्या सह त्रिदशेन्द्रेण पूजितः - आणि इंद्राणीसह अशा देवेंद्राकडून पूजिला गेला. ॥३८॥

यानंतर भगवान श्रीकृष्ण अमरावतीतील इंद्रभवनात गेले. तेथे देवराज इंद्राने पत्‍नी इंद्राणीसह सत्यभामा आणि श्रीकॄष्णांची पूजा केली, तेव्हा भगवंतांनी अदितीची कुंडले तिला दिली. (३८)


चोदितो भार्ययोत्पाट्य पारीजातं गरुत्मति ।
आरोप्य सेन्द्रान् विबुधान् निर्जित्योपानयत् पुरम् ॥ ३९ ॥
इच्छिता सत्यभामा ती कल्पवृक्षास घेउनी ।
देवांनां हरवोनीया द्वारकापुरि आणिला ॥ ३९ ॥

भार्यया नोदितः (सः) - भार्येने प्रेरणा केलेला तो - पारिजातं उत्पाटय - पारिजातक वृक्षाला उपटून - गरुत्मति आरोप्य - गरुडावर ठेवून - सेन्द्रान् विबुधान् निर्जित्य - इंद्रासह देवांना जिंकून - पुरं उपानयत् - द्वारका नगरीला आणिता झाला. ॥३९॥

तेथून परत येताना सत्यभामेच्या सांगण्यावरून श्रीकृष्णांनी तेथील पारिजातक उपटून गरुडावर ठेवला. तेव्हा विरोध करणार्‍या इंद्रासह सर्व देवांना जिंकले आणि तो द्वारकेत घेऊन आले. (३९)


स्थापितः सत्यभामाया गृहोद्यानोपशोभनः ।
अन्वगुर्भ्रमराः स्वर्गात् तद् गन्धासवलम्पटाः ॥ ४० ॥
कृष्णाने सत्यभामेच्या अंगणी वृक्ष लाविला ।
बागेची वाढली शोभा स्वर्गीचा गंध पातला ॥ ४० ॥

(सः) सत्यभामायाः गृहोद्यानोपशोभनः स्थापितः - तो वृक्ष सत्यभामेच्या घराजवळील बगीच्याला शोभवील असा लाविला - तद्‌गन्धासवलम्पटाः भ्रमराः - त्या पारिजातक वृक्षाच्या सुगंधाला मोहित झालेले भुंगे - स्वर्गात् अन्वगुः - स्वर्गाहून त्याच्या मागोमाग आले. ॥४०॥

भगवंतांनी तो सत्यभामेच्या महालाच्या बागेत लावला. त्यामुळे बागेची शोभा अतिशय वाढली. त्या वृक्षाबरोबरच त्याचा सुगंध आणि मध यांचे लोभी भ्रमर स्वर्गातून द्वारकेत आले होते. (४०)


( मिश्र )
ययाच आनम्य किरीटकोटिभिः
     पादौ स्पृशन् अच्युतमर्थसाधनम् ।
सिद्धार्थ एतेन विगृह्यते महान्
     अहो सुराणां च तमो धिगाढ्यताम् ॥ ४१ ॥
( इंद्रवज्रा )
हेतेचि इंद्रे पद स्पर्शिले नी
     होताचि कार्यो लढला हरीसी ।
त्या देवतांना बहु क्रोध तैसा
     धिक्कार त्यांच्या धनसंचयाचा ॥ ४१ ॥

किरीटकोटिभिः - मुकुटाच्या टोकांनी - पादौ स्पृशन् - पायांना स्पर्श करून - आनम्य - नम्र होऊन - अर्थसाधनं अच्युतं ययाचे - कार्यसाधनाविषयी श्रीकृष्णाजवळ याचना करिता झाला - महान् (अपि) सिद्धार्थः - मोठाहि कार्यसिद्धि झालेला पुरुष - एतेन विगृह्यते - त्या योगाने युद्ध करितो - अहो च सुराणां तमः - कितीहो देवांचे हे अज्ञान - आढयतां धिक् - श्रीमंतीला धिक्कार असो. ॥४१॥

जेव्हा इंद्राने आपले काम साधावयाचे होते, तेव्हा त्याने आपले मस्तक लववून मुकुटाच्या टोकांनी भगवान श्रीकृष्णांच्या चरणांना स्पर्श करुन त्यांच्याकडून साहाय्यची भिक्षा मागितली होती, परंतु जेव्हा काम झाले, तेव्हा त्यांनी त्याच श्रीकृष्णांशी लढाई केली. खरोखर या देवांच्या मूर्खपणाचा आणि वैभवाच्या मस्तीचा धिक्कार असो ! (४१)


( अनुष्टुप् )
अथो मुहूर्त एकस्मिन् नानागारेषु ताः स्त्रियः ।
यथोपयेमे भगवान् तावद् रूपधरोऽव्ययः ॥ ४२ ॥
( अनुष्टुप् )
मुहूर्त पाहुनी युक्त, तेवढी घेउनी रुपे ।
कृष्णाने वरिल्या सार्‍या शास्त्रोक्त विधि तो जसा ॥ ४२ ॥

अथो - नंतर - अव्ययः भगवान् - अविनाशी श्रीकृष्ण - तावद्रूपधरः - तितकी स्वरूपे धारण करून - नानागारेषु - अनेक मंदिरांमध्ये - एकस्मिन् मुहूर्ते - एकाच मुहुर्तावर - यथा - यथाविधि - ताः स्त्रियाः उपयेमे - त्या स्त्रियांशी विवाह करिता झाला. ॥४२॥

यानंतर अविनाशी भगवान श्रीकृष्णांनी एकाच मुहूर्तावर, निरनिराळ्या भवनांमध्ये, वेगवेगळी रूपे धारण करून, एकाच वेळी, त्या सर्व राजकुमारींचे शास्त्रोक्त विधीने पाणिग्रहण केले. (४२)


( वंशस्था )
गृहेषु तासामनपाय्यतर्ककृत्
     निरस्तसाम्यातिशयेष्ववस्थितः ।
रेमे रमाभिर्निजकामसम्प्लुतो
     यथेतरो गार्हकमेधिकांश्चरन् ॥ ४३ ॥
( इंद्रवज्रा )
पृथक् महालीं हरि ठेवि त्यांना
     जगात नाही धन ते तिथे हो ।
इच्छेनुसारे हरि राहि तेथे
     गृहस्थधर्मा बहु आचरोनी ॥ ४३ ॥

अनपायी - अविनाशी - अतर्क्यकृत् - अलौकिक कृत्ये करणारा तो श्रीकृष्ण - निरस्तसाम्यातिशयेषु तासां गृहेषु अवस्थितः - न्यूनाधिक्यरहित अशा त्या स्त्रियांच्या मंदिरात वास्तव्य करून - निजकामसंप्लुतः - आत्मानंदात निमग्न झालेला असा - यथा इतरः (तथा) गार्हकमेधिकान् चरन् - जसा सामान्य पुरुष तसा गृहस्थधर्माचे आचरण करीत - रमाभिः रेमे - स्त्रियांसह रममाण झाला होता. ॥४३॥

त्या महामांमध्ये अशी दिव्य सामग्री भरलेली होती की, त्याच्या बरोबरीची जगात कोठेही असणार नाही. मग अधिकाची तर गोष्टच सोडा ! त्या महालांमध्ये राहून अतर्क्य लीला करणारे भगवान आत्मानंदात मग्न असूनही लक्ष्मीच्या अंशरूप अशा त्या पत्‍नींबरोबर, जसा एखादा सामान्य गृहस्थाश्रमी राहातो, त्याप्रमाणे राहून गृहस्थधर्मप्रमाणे आचरण करीत रमत होते. (४३)


( वसंततिलका )
इत्थं रमापतिमवाप्य पतिं स्त्रियस्ता
     ब्रह्मादयोऽपि न विदुः पदवीं यदीयाम् ।
भेजुर्मुदाविरतमेधितयानुराग
     हासावलोकनवसङ्गमजल्पलज्जाः ॥ ४४ ॥
( वसंततिलका )
ब्रह्मादि देव सगळे रुप नेणती ते
     तो श्रीरमापति तिथे मिळला स्त्रियांना ।
आनंद प्रेम दृढले बघती मधूर
     लाजोनि नित्य करिती हरिचीच सेवा ॥ ४४ ॥

ब्रह्मादयः अपि - ब्रह्मदेवादिक सुद्धा - यदीयां पदवीं न विदुः - ज्याच्या स्थानाला जाणत नाहीत - (तं) रमापतिं - त्या लक्ष्मीपतीला - इत्थं पतिं अवाप्य - याप्रमाणे पति म्हणून मिळवून - ताः स्त्रियः - त्या स्त्रिया - अनुरागहासावलोकनवसंगमजल्पलज्जाः - प्रेम व हास्य यांनी युक्त असे अवलोकन व त्याने युक्त अशी जी प्रथम भेट त्या वेळचे भाषण व ते करताना वाटणारी लज्जा यांनी युक्त होऊन - एधितया मुदा - वाढलेल्या आनंदाने - अविरतं भेजुः - नित्य सेवित्या झाल्या. ॥४४॥

परिक्षिता ! ब्रह्मदेवादिकांनाही ज्यांना प्राप्त करून घेण्याचा उपाय माहीत नाही, त्याच रमारमणांना त्या स्त्रियांनी पतीच्या रूपाने प्राप्त करून घेतले होते. आता नित्य त्यांचे प्रेम आणि आनंदाची वृद्धी होत होती. त्या प्रेमपूर्ण हास्ययुक्त कटाक्ष, नवसमागम, प्रेमलाप व प्रेमभाव वाढविणार्‍या लज्जेने युक्त होऊन भगवंतांची सर्वभावे सेवा करीत होत्या. (४४)


प्रत्युद्‌गमासनवरार्हणपदशौच
     ताम्बूलविश्रमणवीजनगन्धमाल्यैः ।
केशप्रसारशयनस्नपनोपहार्यैः
     दासीशता अपि विभोर्विदधुः स्म दास्यम् ॥ ४५ ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां दशमस्कन्धे उत्तरार्धे
पारिजातहरणनरकवधो नाम एकोनषष्टितमोऽध्यायः ॥ ५९ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
दासी कितेक असुनी स्वकरेचि कृष्णा
     पूजादि तांबुल पदा धुविणे नि स्नान ।
सेवा पदास अथवा हलवोनि पंखा
     स्वैपाक, हार करुनी नित सेविती त्या ॥ ४५ ॥
॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर एकोणसाठावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

दासीशताः अपि (ताः) - शेकडो दासी आहेत ज्यांच्यापाशी अशाहि त्या स्त्रिया - प्रत्युद्‌गमासनवरार्हणपादशौचतांबूलविश्रमणवीजनगन्धमाल्यैः - सामोरे जाणे, आसन, उत्तम पूजा, पाय धुवायला पाणी, विडा, श्रमपरिहारार्थ पंख्यांचा वारा, सुगंधी फुलांच्या माळा इत्यादि गोष्टींनी - केशप्रसारशयनस्नपनोपहार्यैः - केसांची रचना करणे, शय्या घालून देणे, स्नान घालणे व खाण्याचे पदार्थ देणे इत्यादि प्रकारांनी - विभोः दास्यं विदधुः स्म - श्रीकृष्णाची सेवा करित्या झाल्या. ॥४५॥

पत्‍न्यांच्याबरोबर सेवा करण्यासाठी शेकडो दासी राहात असत. तरीसुद्धा जेव्हा त्यांच्या महालात भगवान येत असत, तेव्हा त्या स्वत: पुढे होऊन आदराने त्यांना घेऊन येत, श्रेष्ठ आसनावर बसवीत, उत्तम सामग्रींनी त्यांची पूजा करीत, चरणकमले धूत, विडा करून देत, पाय चेपून थकवा दूर करीत, पंख्याने वारा घालीत, चंदन इत्यादी लावीत, फुलांचे हार घालीत, केस विंचरीत, झोपवीत, स्नान घालीत आणि अनेक प्रकारचे पदार्थ करून भोजन घालीत. अशा रीतीने स्वत:च्या हातांनी भगवंतांची सेवा करीत. (४५)


अध्याय एकोणसाठावा समाप्त

GO TOP