श्रीमद् भागवत पुराण
स्कन्ध दहावा
अध्याय अठ्ठावन्नावा

कालिन्दीमित्रविन्दासत्याभद्रालक्ष्मणादीनां पाणिग्रहणम् -

भगवान श्रीकृष्णांच्या अन्य विवाहांच्या कथा -


संहिता - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् )
एकदा पाण्डवान् द्रष्टुं प्रतीतान् पुरुषोत्तमः ।
इन्द्रप्रस्थं गतः श्रीमान् युयुधानादिभिर्वृतः ॥ १ ॥
(अनुष्टुप् )
श्रीशुकदेव सांगतात -
कृष्णाला पांडवो सर्व सुरक्षित् कळले तदा ।
इंद्रप्रस्थास ते गेले सात्यकी भाउकी सह ॥ १ ॥

एकदा - एके दिवशी - श्रीमान् पुरुषोत्तमः - ऐश्वर्यशाली श्रीकृष्ण - युयुधानादिभिः वृतः - सात्यकी आदिकरून यादवांसह - प्रतीतान् पाण्डवान् द्रष्टुं - पुनः सापडलेल्या पांडवांना पहाण्याकरिता - इंद्रप्रस्थं गतः - इंद्रप्रस्थाला गेला. ॥१॥

श्रीशुक म्हणतात - लाक्षागृहात न जळता परत आलेल्या पांडवांना भेटण्यासाठी भगवान श्रीकृष्ण इंद्रप्रस्थाला गेले. त्यांच्याबरोबर सात्यकी इत्यादि यादवही होते. (१)


दृष्ट्वा तमागतं पार्था मुकुन्दमखिलेश्वरम् ।
उत्तस्थुर्युगपद् वीराः प्राणा मुख्यमिवागतम् ॥ २ ॥
पांडवे पाहिले तेंव्हा मुकुंद जगदीश्वरा ।
शरीरीं प्राण ये तैसे सर्वची राहिले उभे ॥ २ ॥

वीराः पार्थाः - पराक्रमी पांडव - अखिलेश्वरं - सर्वांचा अधिपति अशा - तं मुकुन्दं दृष्टवा - त्या श्रीकृष्णाला पाहून - प्राणाः मुख्यम् (प्राणम्) आगतम् (दृष्टवा) इव - इंद्रिये प्राण परत आला असे पाहून उठावी त्याप्रमाणे - युगपत् उत्तस्थुः - एकाच वेळी उठून उभे राहिले. ॥२॥

सर्वेश्वर भगवान श्रीकृष्ण आलेले पाहून सर्व वीर पांडव एकदम उठून उभे राहिले. जसे, प्राणवायूचा संचार झाल्याबरोबर सर्व इंद्रिये उठतात. (२)


परिष्वज्याच्युतं वीरा अङ्गसङ्गहतैनसः ।
सानुरागस्मितं वक्त्रं वीक्ष्य तस्य मुदं ययुः ॥ ३ ॥
कृष्णा आलिंगुनी त्यांनी धुतला सर्व ताप तो ।
सुस्मीत मुख कृष्णाचे पाहता हर्षिं मग्नले ॥ ३ ॥

वीराः - पराक्रमी पांडव - अच्युतं परिष्वज्य - श्रीकृष्णाला आलिंगन देऊन - अङगसङगहतैनसः - ज्याच्या शरीरस्पर्शाने पाप नष्ट झाले आहे अशा - सानुरागस्मितं तस्य वक्त्रं - प्रेमामुळे मंदहास्य करणार्‍या त्या श्रीकृष्णाच्या मुखाला - वीक्ष्य - पाहून - मुदं ययुः - आनंदित झाले. ॥३॥

वीर पांडवांनी भगवान श्रीकृष्णांना आलिंगन दिले. त्यांच्याशी झालेल्या अंगस्पर्शाने त्यांची सर्व पापे धुऊन गेली. भगवंतांचे प्रेमपूर्ण स्मितहास्याने सुशोभित असे मुखारविंद पाहून ते आनंदमग्न झाले. (३)


युधिष्ठिरस्य भीमस्य कृत्वा पादाभिवन्दनम् ।
फाल्गुनं परिरभ्याथ यमाभ्यां चाभिवन्दितः ॥ ४ ॥
युधिष्ठीर तसे भीमा कृष्णाने वंदिलें पदीं ।
अर्जुना धरिले वक्षा अन्यांनी त्यास वंदिले ॥ ४ ॥

युधिष्ठिरस्य भीमस्य (च) - धर्मराज व भीम यांच्या - पादाभिवंदनं कृत्वा - पायांना वंदन करून - फाल्गुनं परिरभ्य - अर्जुनाला आलिंगन देऊन - अथ च - आणि त्यानंतर - (सः) यमाभ्याम् अभिवन्दितः - तो नकुल व सहदेव ह्या दोघांनी वंदिला गेला.॥४॥

श्रीकृष्णांनी युधिष्ठिर आणि भीमसेनाच्या चरणांना वंदन केले. अर्जुनाला आलिंगन दिले. नकुलाने आणि सहदेवाने भगवंतांच्या चरणांना वंदन केले. (४)


परमासन आसीनं कृष्णा कृष्णमनिन्दिता ।
नवोढा व्रीडिता किञ्चित् शनैरेत्याभ्यवन्दत ॥ ५ ॥
आसनी बैसता कृष्ण श्यामला द्रौपदी तदा ।
प्रथमी लाजली आणि पुन्हा कृष्णा प्रणामिले ॥ ५ ॥

अनिन्दिता नवोढा कृष्णा - दोषरहित अशी नवीन लग्न झालेली द्रौपदी - किंचित् व्रीडिता - किंचित लज्जित होऊन - परमासने आसीनं कृष्णं - उत्तम आसनावर बसलेल्या कृष्णाजवळ - शनैः एत्य - हळू हळू येऊन - अभ्यवन्दत - वंदन करिती झाली. ॥५॥

जेव्हा भगवान श्रीकृष्ण श्रेष्ठ सिंहासनावर विराजमान झाले, तेव्हा सर्वांगसुंदरी नववधू द्रौपदी, लाजत लाजत हळू हळू श्रीकृष्णांजवळ आली व तिने त्यांना नमस्कार केला. (५)


तथैव सात्यकिः पार्थैः पूजितश्चाभिवन्दितः ।
निषसादासनेऽन्ये च पूजिताः पर्युपासत ॥ ६ ॥
पांडवे सात्यकीचेही केले स्वागत तेधवा ।
कृष्णाच्या भोवती सर्व आसनीं बैसले तदा ॥ ६ ॥

तथैव च - आणि त्याचप्रमाणे - पार्थैः पूजितः - पांडवांनी पूजिलेला - अभिनन्दितः - अभिनंदन केलेला - सात्यकिः - सात्यकी - आसने निषसाद - आसनावर बसला - अन्ये च - आणि दुसरे - पूजिताः पर्युपासत - सत्कारिलेले असे आपापल्या आसनावर बसले. ॥६॥

तसेच पांडवांनी वीर सात्यकीचासुद्धा सत्कार करून त्याला वंदन केले. तो दुसर्‍या एका आसनावर बसला. इतर यादवांचाही सत्कार केल्यावर ते सुद्धा श्रीकृष्णांच्या चारी बाजूंना आसनावर बसले. (६)


( मिश्र )
पृथां समागत्य कृताभिवादनः
     तयातिहार्दार्द्रदृशाभिरम्भितः ।
आपृष्टवांस्तां कुशलं सहस्नुषां
     पितृष्वसारं परिपृष्टबान्धवः ॥ ७ ॥
( इंद्रवज्रा )
कृष्णे तदा वंदिली कुंति आत्त्या
     प्रेमे धरी ती हृदयास कृष्णा ।
प्रेमाश्रु आले हरिच्याहि नेत्रा
     कृष्णो पुसे मंगल क्षेम त्यांचे ॥ १० ॥

पृथां समागत्य - कुंतीजवळ येऊन - कृताभिवादनः - केले आहे वंदन ज्याने असा - तया अतिहार्दार्द्रदृशा अभिरम्भितः - त्या कुंतीने अत्यंत प्रेमाने आर्द्र झालेल्या दृष्टीने आलिंगिलेला - परिपृष्टबांधवः - विचारपूस केली आहे ज्याची असा तो श्रीकृष्ण - तां पितृष्वसारं सहस्नुषां - सुनेसह असलेल्या त्या कुंती आत्तेला - कुशलं आपृष्टवान् - खुशाली विचारिता झाला. ॥७॥

यानंतर श्रीकृष्णांनी आत्या कुंतीजवळा जाऊन तिच्या चरणांना वंदन केले. तिने अत्यंत स्नेहाने त्यांना हृदयाशी धरले. त्यावेळी तिच्या डोळ्यांतून प्रेमाश्रू वाहू लागले. कुंतीने श्रीकृष्णांना बांधवांची खुशाली विचारली आणि भगवंतांनीसुद्धा त्याचे यथोचित उत्तर देऊन तिला तिच्या सुनेची व तिची स्वत:ची खुशाली विचारली. (७)


( अनुष्टुप् )
तमाह प्रेमवैक्लव्य रुद्धकण्ठाश्रुलोचना ।
स्मरन्ती तान् बहून् क्लेशान् क्लेशापायात्मदर्शनम् ॥ ८ ॥
( अनुष्टुप )
दाटला कुंतिचा कंठ प्रेमाश्रु नेत्रि पातले ।
स्मरले दुःख ते रोधी हरीसी बोलली पुन्हा ॥ ८ ॥

प्रेमवैक्लव्यरुद्धकण्ठाश्रुलोचना - प्रेमामुळे प्राप्त झालेल्या दुःखाने कंठ रोधून गेल्यामुळे जिच्या नेत्रांतून अश्रू वहात आहेत अशी - तान् बहून् क्लेशान् स्मरन्ती - त्या पुष्कळ क्लेशांना स्मरणारी - क्लेशापायात्मदर्शनं तं - क्लेशांच्या निरसनार्थ स्वतः दर्शन देणार्‍या त्या श्रीकृष्णाला - आह - म्हणाली. ॥८॥

त्यावेळी प्रेमविव्हल झालेल्या कुंतीचा गळा दाटून आला होता, डोळ्यांतून अश्रू वाहात होते. भगवंतांनी विचारल्यावर तिला आपले पूर्वीचे पुष्कळ क्लेश आठवले आणि ज्यांचे दर्शन सर्व क्लेशांचा अंत करण्यासाठीच होते, त्या श्रीकृष्णांना ती म्हणू लागली. (८)


तदैव कुशलं नोऽभूत् सनाथास्ते कृता वयम् ।
ज्ञतीन् नः स्मरता कृष्ण भ्राता मे प्रेषितस्त्वया ॥ ९ ॥
घरचे जाणुनी आम्हा अक्रूरा धाडिलेस तू ।
कल्याण जाहले तेंव्हा करिशी तू सनाथ की ॥ ९ ॥

कृष्ण - हे श्रीकृष्णा - (यदा) ज्ञातीन् नः स्मृता त्वया - जेव्हा संबंधी अशा आमचे स्मरण करणार्‍या तुझ्याकडून - मे भ्राता - माझा भाऊ अक्रूर - प्रेषितः - पाठविला गेला - तदा एव - त्याच वेळी - नः कुशलं अभूत् - आमचे कुशल झाले - वयं ते सनाथा कृताः - आम्ही तुझ्याकडून सनाथ केले गेलो. ॥९॥

हे कृष्णा ! ज्यावेळी तू आम्हांला आपले संबंधी समजून आमची आठवण केलीस आणि आमची खुशाली समजून घेण्यासाठी बंधू अक्रूराला पाठविलेस, त्याचवेळी आमचे कल्याण झाले. आम्हां अनाथांना तू सनाथ केलेस. (९)


न तेऽस्ति स्वपरभ्रान्तिः विश्वस्य सुहृदात्मनः ।
तथापि स्मरतां शश्वत् क्लेशान् हंसि हृदि स्थितः ॥ १० ॥
विश्वात्मा तू सुहृद् विश्वां तुला ना भेद तो मुळी ।
स्मरता बसशी चित्ती नाशिसी क्लेश सर्वची ॥ १० ॥

सुहृदात्मनः विश्वस्य - मित्रांवर प्रेम करणार्‍या सर्वस्वरूपी - ते स्वपरभ्रान्तिः न अस्ति - तुला आपपर असा भ्रम नाही - तथापि - तरीसुद्धा - हृदि स्थितः (त्वम्) - हृदयात राहिलेला असा तू - शश्वत् (त्वा) स्मरतां जनानाम् क्लेशान् हंसि - नित्य तुझे स्मरण करणार्‍यांचे क्लेश दूर करतोस. ॥१०॥

तू संपूर्ण विश्वाचा हितैषी आणि आत्मा आहेस. तुझ्याजवळ आपपरभाव नाही. असे असूनही जे तुझे सदैव स्मरण करतात. त्यांच्या हृदयात तू येऊन बसतोस आणि त्यांना होणारे क्लेश मिटवतोस. (१०)


युधिष्ठिर उवाच -
किं न आचरितं श्रेयो न वेदाहमधीश्वर ।
योगेश्वराणां दुर्दर्शो यन्नो दृष्टः कुमेधसाम् ॥ ११ ॥
युधिष्टिरजी म्हणाले -
आमुचे पुण्य ते काय न कळे केवढे हरी ।
योग्यां दुर्लभ जी भेट ती या आम्हा घरी घडे ॥ ११ ॥

अधीश्वर - हे परमेश्वरा - नः किं श्रेयः आचरितं - आम्ही कोणते पुण्य केले होते - अहं न वेद - ते मला समजत नाही - यत् - कारण - योगेश्वराणां दुर्दर्शः (त्वं) - योगी लोकांनाहि ज्याचे दर्शन होणे कठीण असा तू - कुमेधसां नः दृष्टः (असि) - वाईट आहे बुद्धि ज्यांची अशा आमच्या दृष्टीस पडलास.॥११॥

युधिष्ठिर म्हणाला- "हे सर्वेश्वर श्रीकृष्णा ! आम्ही कोणते पुण्य केले होते, कळत नाही. योगेश्वरसुद्धा अत्यंत प्रयासाने ज्यांचे दर्शन घेतात, त्या आपण आम्हा सामान्यांना अनायासे दर्शन दिलेत." (११)


इति वै वार्षिकान् मासान् राज्ञा सोऽभ्यर्थितः सुखम् ।
जनयन् नयनानन्दं इन्द्रप्रस्थौकसां विभुः ॥ १२ ॥
सन्मान करिता राये मुक्कामा प्रार्थिले असे ।
प्रदाना रूप माधुर्य राहिले चार मास ते ॥ १२ ॥

राज्ञा अभ्यर्थितः सः विभुः - धर्मराजाने प्रार्थिलेला असा तो श्रीकृष्ण - इन्द्रप्रस्थौकसां नयनान्दं जनयन् - इंद्रप्रस्थात रहाणार्‍या लोकांच्या नेत्रांना आनंद देणारा - इति वै वार्षिकान् मासान् - याप्रमाणे खरोखर पावसाळ्याचे चार महिनेपर्यंत - सुखं (अवसत्) - सुखाने रहाता झाला. ॥१२॥

नंतर युधिष्ठिराने भगवंतांना काही दिवस तेथेच राहण्याची प्रार्थना केली, तेव्हा भगवान श्रीकृष्ण इंद्रप्रस्थातील लोकांच्या डोळ्यांना आनंद देत पावसाळ्याचे चार महिने तेथे सुखाने राहिले. (१२)


एकदा रथमारुह्य विजयो वानरध्वजम् ।
गाण्डीवं धनुरादाय तूणौ चाक्षयसायकौ ॥ १३ ॥
साकं कृष्णेन सन्नद्धो विहर्तुं विपिनं वनम् ।
बहुव्यालमृगाकीर्णं प्राविशत् परवीरहा ॥ १४ ॥
परीक्षित् एकदा पार्थ गांडीव धनु नी तसा ।
अक्षेय घेउनी भाता सकृष्ण रथि बैसला ॥ १३ ॥
ध्वजा ती कपि चिन्हाची, करण्या मृगया द्वय ।
निबीड वनि ते गेले जेथे सिंहादिही पशू ॥ १४ ॥

एकदा - एका प्रसंगी - परवीरहा विजयः - शत्रुपक्षीय वीरांना मारणारा विजयी अर्जुन - कृष्णेन साकं वानरध्वजं रथम् आरुह्य - श्रीकृष्णासह ज्याच्या ध्वजावर मारुती आहे अशा रथात बसून - गांडीवं धनुः - आणि गांडीव धनुष्य - अक्षयसायकौ तूणौ च - आणि ज्यातील बाण कधीहि कमी होत नाहीत असे दोन भाते - आदाय - घेऊन - सन्नद्धः (भूत्वा) - सज्ज होऊन - बहुव्यालमृगाकीर्णं गहनं वनं - पुष्कळ हिंस्त्र पशु व हरिण यांनी व्यापिलेल्या निबिड अरण्यात - विहर्तुं प्राविशत् - क्रीडा करण्याकरिता शिरला. ॥१३-१४॥

एकदा वीर अर्जुन कवच अंगावर चढवून गांडीव धनुष्य आणि अक्षय बाणांचे दोन भाते घेऊन श्रीकृष्णांसह वानरध्वज असलेल्या रथात बसून पुष्कळ हिंस्त्र प्राणी असलेल्य निबिड अरण्यात शिकारीसाठी गेला. (१३-१४)


तत्राविध्यच्छरैर्व्याघ्रान् शूकरान् महिषान् रुरून् ।
शरभान् गवयान् खगान् हरिणान्शशशल्लकान् ॥ १५ ॥
वाघ सूकर नी रेडे हरीण वानरे गवे ।
ससे सायाळ यांना त्या द्वयांनी मारिले असे ॥ १५ ॥

तत्र (सः) - तेथे तो अर्जुन - शरैः - बाणांनी - व्याघ्रान् सूकरान् महिषान् रुरून् - वाघ, वराह, रेडे व रुरु जातीचे हरिण ह्यांना - शरभान् गवयान् खड्‌गान् हरिणान् शशशल्लकान् - शरभ, गवे, गेंडे, हरिण, ससे व साळी यांना - अविद्धयत् - मारिता झाला. ॥१५॥

तेथे त्याने बाणांनी वाघ, डुकरे, रेडे, काळवीट, चित्ते, गौरेडे, गेंडे, हरीण, ससे, साळी इत्यादि प्राणी मारले. (१५)


तान् निन्युः किङ्करा राज्ञे मेध्यान् पर्वण्युपागते ।
तृट्परीतः परिश्रान्तो बिभत्सुर्यमुनामगात् ॥ १६ ॥
उचीत समयी कांही यज्ञभाग युधिष्ठिरा ।
दिला, तै पार्थ तो झाला तृषार्त वनि तेधवा ॥ १६ ॥

किंकराः - सेवक - मेध्यान् तान् पशून् - पवित्र अशा त्या मारलेल्या पशूंना - राज्ञे निन्युः - धर्मराजाकरिता नेते झाले - तृट्‌परीतः परिश्रांतः बीभत्सुः - तहानलेला व दमलेला असा अर्जुन - पर्वणि उपागते - पर्वणी आली असता - यमुनां अगात् - यमुनेवर गेला. ॥१६॥

त्यांपैकी पवित्र पशू, पर्वकाळ आलेला पाहून, सेवकांनी राजा युधिष्ठिराकडे नेले. इकडे अर्जुन शिकार करून दमल्यामुळे व तहान लागल्यामुळे यमुनेवर गेला. (१६)


तत्रोपस्पृश्य विशदं पीत्वा वारि महारथौ ।
कृष्णौ ददृशतुः कन्यां चरन्तीं चारुदर्शनाम् ॥ १७ ॥
दोघांनी यमुने काठी हात पाय धुवोनिया ।
प्राशिले जल नी तेव्हा दिसे धानस्थ सुंदरी ॥ १७ ॥

महारथौ कृष्णौ - महारथी असे श्रीकृष्ण व अर्जुन - तत्र उपस्पृश्य - तेथे आचमनादि विधि करून - विशदं वारि पीत्वा - निर्मळ उदक प्राशन करून - चरन्तीं चारुदर्शनां कन्यां ददर्शतुः - तेथे हिंडणार्‍या सुंदर कन्येला पहाता झाला. ॥१७॥

श्रीकृष्ण आणि अर्जुन हे दोन्ही महारथी यमुनेच्या पाण्यात हात-पाय धुऊन नदीचे निर्मल पाणी प्याले. इतक्यात तेथे तपश्चर्या करीत असलेली सुंदर कन्या त्यांनी पाहिली. (१७)


तामासाद्य वरारोहां सुद्विजां रुचिराननाम् ।
पप्रच्छ प्रेषितः सख्या फाल्गुनः प्रमदोत्तमाम् ॥ १८ ॥
रुचिरानन नी दात मांड्या सुंदर ही तिच्या ।
अर्जुना धाडिले कृष्णे अर्जुने पुसिले तिला ॥ १८ ॥

सख्या प्रेषितः फाल्गुनः - श्रीकृष्णाने पाठविलेला अर्जुन - वरारोहां सुद्विजां रुचिराननां - सुस्वरूपी, सुंदर दातांची व सुंदर मुखाची अशा - तां प्रमदोत्तमां आसाद्य - त्या उत्तम स्त्रीजवळ जाऊन - पप्रच्छ - विचारिता झाला. ॥१८॥

त्या श्रेष्ठ सुंदरीच्या मांड्या, दात आणि चेहरा अतिशय सुंदर होता. मित्राने पाठविल्यावरून अर्जुनाने जाऊन तिला विचारले. (१८)


का त्वं कस्यासि सुश्रोणि कुतो वा किं चिकीर्षसि ।
मन्ये त्वां पतिमिच्छन्तीं सर्वं कथय शोभने ॥ १९ ॥
कोण तू पुत्रि कोणाची.. इच्छिशी येथ काय तू ?
सांग तू मजला वाटे योग्य ती इच्छिशी पती ॥ १९ ॥

सुश्रोणि शोभने - हे सुंदरी हे पवित्र स्त्रिये - त्वं का - तू कोण - कस्य असि - कोणाची आहेस - कुतःअसि - कोठून आलीस - किं चिकीर्षसि - काय करण्याची इच्छा करतेस - त्वां पतिम् इच्छन्तीं मन्ये - तू पतीची इच्छा करणारी आहेस असे मला वाटते - सर्वं कथय - सर्व सांग. ॥१९॥

हे सुंदरी ! तू कोण आहेस ? कुणाची कन्या आहेस ? कोठून आलीस ? आणि येथे काय करू इच्छितेस ? मला वाटते की, तू पतीची इच्छा करीत आहेस. हे कल्याणी ! तू तुझा सर्व वृत्तांत सांग. (१९)


श्रीकालिन्द्युवाच -
अहं देवस्य सवितुः दुहिता पतिमिच्छती ।
विष्णुं वरेण्यं वरदं तपः परममास्थितः ॥ २० ॥
कालिंदी म्हणाली -
पुत्री मी सूर्यदेवाची विष्णु जो वरदायक ।
इच्छिते वरण्या त्यास म्हणोनी तप हे करी ॥ २० ॥

देवस्य सवितुः दुहिता अहं - प्रकाशमान सूर्याची कन्या अशी मी - वरेण्यं वरदं विष्णुं पतिम् इच्छन्तीं - श्रेष्ठ वर देणार्‍या विष्णूला पति करण्याची इच्छा धरून - परमं तपः आस्थिता - श्रेष्ठ तप करीत राहिले आहे. ॥२०॥

कालिंदी म्हणाली- " मी सूर्यदेवाची कन्या आहे. सर्वश्रेष्ठ, वर देणारे भगवान विष्णू मला पती म्हणून मिळावेत, म्हणून ही कठोर तपश्चर्या मी करीत आहे. (२०)


नान्यं पतिं वृणे वीर तमृते श्रीनिकेतनम् ।
तुष्यतां मे स भगवान् मुकुन्दोऽनाथसंश्रयः ॥ २१ ॥
श्रीनिवासा त्यजोनीया वीरा मी अन्य त्या कुणा ।
नेच्छिते वरण्या तेंव्हा पावो श्रीकृष्ण तो मला ॥ २१ ॥

वीर - हे पराक्रमी पुरुषा - श्रीनिकेतनं तम् ऋते - लक्ष्मीचे वसतिस्थान अशा श्रीकृष्णाशिवाय - अन्यं पतिं न वृणे - मी दुसर्‍याला पति म्हणून वरणार नाही - सः अनाथसंश्रयः भगवान् मुकुंदः - तो अनाथांचा आश्रम असा भगवान श्रीकृष्ण - मे तुष्यताम् - माझ्यावर संतुष्ट होवो. ॥२१॥

हे वीर अर्जुना ! लक्ष्मीचे आश्रय असणार्‍या भगवानांखेरीज आणखी कोणालाही मी पती म्हणून वरणार नाही. अनाथांचे आश्रय असणारे ते भगवान मुकुंद माझ्यावर प्रसन्न होवोत. (२१)


कालिन्दीति समाख्याता वसामि यमुनाजले ।
निर्मिते भवने पित्रा यावदच्युतदर्शनम् ॥ २२ ॥
कालिंदी मी मला येथे जळात रवि या पितें ।
महाल निर्मिला जो की विश्वकर्मेचि योजुनी ।
जोवरी कृष्ण ना भेटे तोवरी बैसते अशी ॥ २२ ॥

कालिन्दी इति समाख्याता (अहं) - कालिंदी ह्या नावाने प्रसिद्ध असलेली मी - यमुनाजले पित्रा निर्मिते भवने - यमुनेच्या उदकात पित्याने निर्मिलेल्या घरात - यावत् अच्युतदर्शनं - श्रीकृष्णाचे दर्शन होईपर्यंत - वसामि - रहात आहे. ॥२२॥

माझे नाव कालिंदी आहे. माझ्या पित्याने यमुनेच्या पाण्यात बांधलेल्या भवनात मी राहते. भगवंतांचे दर्शन होईपर्यंत मी येथेच राहणार." (२२)


तथावदद् गुडाकेशो वासुदेवाय सोऽपि ताम् ।
रथमारोप्य तद् विद्वान् धर्मराजमुपागमत् ॥ २३ ॥
कृष्णाला अर्जुने सारे कथिले जरि जाणि तो ।
आणिली रथि कालिंदी धर्मराजासमोरुनी ॥ २३ ॥

गुडाकेशः वासुदेवाय तथा अवदत् - अर्जुन श्रीकृष्णाला याप्रमाणे सांगता झाला - तद्विद्वान् सः अपि - ते जाणणारा तो श्रीकृष्णसुद्धा - तां रथम् आरोप्य धर्मराजम् उपागमत् - तिला रथात बसवून धर्मराजाजवळ आला.॥२३॥

अर्जुनाने श्रीकृष्णांना हा सर्व वृत्तांत सांगितला. त्यांना हे आधीच माहित होते. त्यांनी कालिंदीला रथात बसवून धर्मराजाकडे आणले. (२३)


यदैव कृष्णः सन्दिष्टः पार्थानां परमाद्‌भुतम् ।
कारयामास नगरं विचित्रं विश्वकर्मणा ॥ २४ ॥
पांडवे प्रार्थिता कृष्णा विश्वकर्मासि बाहुनी ।
अद्‌भूत नगरी केली पांडवांसाठि कृष्णने ॥ २४ ॥

यदा एव - ज्या वेळीच - कृष्णः (पांडवैः) संदिष्टः - श्रीकृष्ण पांडवांकडून प्रार्थिला गेला - पार्थानाम् - पांडवांसाठी - विश्वकर्मणा विचित्रं परमाद्‌भुतं नगरं कारयामास - विश्वकर्म्याकडून चित्रविचित्र व अत्यंत आश्चर्यजनक असे नगर बनविता झाला. ॥२४॥

यानंतर पांडवांनी विनंती केल्यावरून श्रीकृष्णांनी पांडवांना राहण्यासाठी म्हणून एक अत्यंत अद्‍भूत आणि विलक्षण नगर विश्वकर्म्याकडून तयार करवून दिले. (२४)


भगवांस्तत्र निवसन् स्वानां प्रियचिकीर्षया ।
अग्नये खाण्डवं दातुं अर्जुनस्यास सारथिः ॥ २५ ॥
भक्ता आनंद देण्याला कितेक दिन राहिले ।
खांडवो वन अग्नीला देण्या सारथि जाहले ॥ २५ ॥

भगवान् - श्रीकृष्ण - तत्र - तेथे - स्वानां प्रियचिकीर्षया - स्वकीयांचे प्रिय करण्याच्या इच्छेने - निवसन् (सन्) - रहात असता - अग्नये खाण्डवं दातुं - अग्नीला खांडववन देण्यासाठी - अर्जुनस्य सारथिः आस - अर्जुनाचा सारथी झाला. ॥२५॥

यावेळी पांडवांना आनंद देण्यासाठी भगवान त्यांचेकडे राहात असता, अग्निदेवाला खांडववन देण्यासाठी ते अर्जुनाचे सारथी झाले. (२५)


सोऽग्निस्तुष्टो धनुरदाद् हयान् श्वेतान् रथं नृप ।
अर्जुनायाक्षयौ तूणौ वर्म चाभेद्यमस्त्रिभिः ॥ २६ ॥
भोजने तुष्टला अग्नी चौ अश्व रथ गांडीव ।
अभेद्य कवचो भाता अर्नुना भेटिसी दिला ॥ २६ ॥

नृप - हे राजा - तुष्टः सः अग्निः - संतुष्ट झालेला तो अग्नि - धनुः - धनुष्य - श्वेतान् हयान् - पांढरे घोडे - रथं - रथ - अक्षयौ तूणौ - ज्यांतील बाण कधीहि संपत नाहीत असे दोन भाते - अस्त्रिभिः अभेद्यं वर्म च - आणि अस्त्रधारी शूर पुरुषांना विदीर्ण करता न येणारे चिलखत - अर्जुनाय अदात् - अर्जुनाला देता झाला. ॥२६॥

खांडववन मिळाल्याने प्रसन्न झालेल्या अग्नीने अर्जुनाला गांडीव धनुष्य, चार पांढरे घोडे, एक रथ, अक्षय बाणांचे दोन भाते आणि शस्त्रास्त्रांनी न तुटणारे एक कवच दिले. (२६)


मयश्च मोचितो वह्नेः सभां सख्य उपाहरत् ।
यस्मिन् दुर्योधनस्यासीत् जलस्थलदृशिभ्रमः ॥ २७ ॥
स तेन समनुज्ञातः सुहृद्‌भिश्चानुमोदितः ।
आययौ द्वारकां भूयः सात्यकिप्रमखैर्वृतः ॥ २८ ॥
जळता खांडवी पार्थे दानवा वाचवीयले ।
मयसभा तदा त्यांनी अर्जुना अर्पिली असे ॥ २७ ॥
अर्जुनादिक स्नेह्यांची घेवोनीया अनूमती ।
सात्यकी सह श्रीकृष्ण द्वारकापुरिं पातले ॥ २८ ॥

वह्नेः मोचितः मयः - अग्नीच्या तडाख्यातून सोडविलेला मयासुर - सख्ये सभां उपाहरत् - मित्र जो अर्जुन त्याच्यासाठी सभागृह रचिता झाला - यस्मिन् - जेथे - दुर्योधनस्य - दुर्योधनाला - जलस्थलदृशिभ्रमः आसीत् - पाणी व भूमी यासंबंधाने दृष्टिभ्रम झाला होता - तेन समनुज्ञातः - त्या अर्जुनाने आज्ञा दिलेला - सुहृद्‌भिः च अनुमोदितः - आणि मित्रांनी अनुमोदन दिलेला - सात्यकिप्रमुखैः वृतः सः - सात्यकि आदिकरून मुख्य यादवांनी वेष्टिलेला असा तो श्रीकृष्ण - भूयः द्वारकाम् आययौ - पुनः द्वारकेला आला. ॥२७-२८॥

खांडववन जळत असताना अर्जुनाने मय दानवाला अग्नीपासून वाचविले होते. म्हणून त्याने अर्जुनाशी मैत्री करून त्याच्यासाठी एक सभागृह तयार करून दिले. त्याच सभागृहात दुर्योधनाला पाण्याचे ठिकाणी जमीन आणि जमिनीच्या ठिकाणी पाण्याचा भास झाला होता. (२७) काही दिवसांनंतर अर्जुनाचा आणि इतर संबंधितांचा निरोप घेऊन श्रीकृष्ण, सात्यकी इत्यादींसह पुन्हा द्वारकेला परतले. (२८)


अथोपयेमे कालिन्दीं सुपुण्यर्त्वृक्ष ऊर्जिते ।
वितन्वन् परमानन्दं स्वानां परममङ्गलः ॥ २९ ॥
लग्न कालिंदिसी कृष्णे मुहूर्ती साधिले असे ।
तेणे संबंधि लोकांना परमानंद जाहला ॥ २९ ॥

अथ (सः) - नंतर तो श्रीकृष्ण - स्वानां परममङगलं परमानन्दं वितन्वन् - स्वकीयांना अत्यंत मंगलकारक आनंद देत - ऊर्जिते सुपुण्यर्त्वृक्षे मुहूर्ते - बलवान व पुण्यकारक ऋतु व नक्षत्र ज्यांत आहे अशा मुहूर्तावर - कालिन्दीं उपमेये - कालिंदीला वरिता झाला. ॥२९॥

तेथे आल्यानंतर त्यांनी विवाहासाठी योग्य ऋतू आणि मुहूर्त पाहून त्या मुहूर्तावर संबंधितांना परम मंगल आणि परमानंदाची प्राप्ती करुन देण्यासाठी कालिंदीचे पाणिग्रहण केले. (२९)


विन्द्यानुविन्द्यावावन्त्यौ दुर्योधनवशानुगौ ।
स्वयंवरे स्वभगिनीं कृष्णे सक्तां न्यषेधताम् ॥ ३० ॥
अवंति देशिचे राजे विंद नी अनुविंद ते ।
बहीण इच्छि ती त्यांची कृष्णाला वरण्यास नी ।
बंधू दुर्योधनीमित्र विवाहा रोधिले तिला ॥ ३० ॥

दुर्योधनवशानुगौ आवन्त्यौ विंदानुविन्दौ - दुर्योधनाच्या स्वाधीन राहिलेले अवन्तिदेशाचे विंद व अनुविंद असे दोन राजे - कृष्णे सक्तांस्वभगिनीं - श्रीकृष्णाच्या ठिकाणी आसक्त असणार्‍या आपल्या बहिणीला - स्वयंवरे न्यषेधताम् - स्वयंवरामध्ये निषेधिते झाले. ॥३०॥

विंद आणि अनुविंद हे दोघे अवंती देशाचे राजे होते. ते दुर्योधनाच्या मनाप्रमाणे वागणारे होते. त्यांची बहीण मित्रविंदा हिची स्वयंवरामध्ये श्रीकृष्णांना वरण्याची इच्छा होती. परंतु त्यांनी तिला विरोध केला. (३०)


राजाधिदेव्यास्तनयां मित्रविन्दां पितृष्वसुः ।
प्रसह्य हृतवान् कृष्णो राजन् राज्ञां प्रपश्यताम् ॥ ३१ ॥
आत्त्या राजाधिदेवीची मित्रविंदाच पुत्रि ती ।
भरल्या त्या सभेमाजी हरिली हरिने तिला ॥ ३१ ॥

राजन् - हे राजा - कृष्णः - श्रीकृष्ण - राज्ञां प्रपश्यतां - राजांसमक्ष - पितृष्वसुः राजाधिदेव्याः तनयां मित्रविंदाम् - आत्या जी राजाधिदेवी तिची कन्या जी मित्रविंदा तिला - प्रसह्य हृतवान् - बलात्काराने हरण करिता झाला. ॥३१॥

परिक्षिता ! श्रीकृष्णाची आत्या राजाधिदेवी हिची मित्रविंदा ही कन्य होती. राजांच्या भर सभेतून भगवान श्रीकृष्ण तिला आपल्या सामर्थ्यावर घेऊन गेले. (३१)


नग्नजिन्नाम कौशल्य आसीद् राजातिधार्मिकः ।
तस्य सत्याभवत् कन्या देवी नाग्नजिती नृप ॥ ३२ ॥
न तां शेकुर्नृपा वोढुं अजित्वा सप्त गोवृषान् ।
तीक्ष्णशृङ्गान् सुदुर्धर्षान् वीर्यगन्धासहान् खलान् ॥ ३३ ॥
नग्नजित् कोसलीराजा होता धार्मिक तेधवा ।
सत्या कन्या असे त्याला स्वरूपवान देखणी ॥ ३२ ॥
स्वयंवर असा झाला दुर्दान्त वृषभांस जो ।
जिंकील तोच कन्येला विवाहा पात्र मानिला ॥ ३३ ॥

नग्नजित् नाम - नग्नजित नावाचा - अतिधार्मिकः - अत्यंत धर्मिष्ठ असा - कौसल्यः राजा आसीत् - कोसल देशाचा राजा होता - नृप - हे परीक्षित राजा - तस्य सत्या नाग्नजिती देवी कन्या अभवत् - त्याची सत्या नावाची नाग्नजिती नावानेहि प्रसिद्ध अशी तेजस्वी कन्या होती. ॥३२॥

नृपाः - राजे - तीक्ष्णशृंगान् सुदुर्धर्षान् - तीक्ष्ण शिंगांच्या व जिंकण्यास कठीण अशा - वीरगन्धासहान् खलान् - वीरांचा गंधहि सहन न करणार्‍या व दांडग्या अशा - सप्त गोवृषान् - सात जातिवंत बैलांना - अजित्वा तां वोढुं न शेकुः - न जिंकल्यामुळे त्या नाग्नजितीला वरण्यास समर्थ झाले नाहीत. ॥३३॥

परीक्षिता ! कोसलदेशाचा राजा नग्नजित हा अत्यंत धार्मिक होता. त्याची सत्या नावाची मुलगी होती. नग्नजिताची कन्या असल्याने नाग्नजिती या नावानेही ती ओळखली जात होती. राजाच्या अटीनुसार, सात तीक्ष्ण शिंगांच्या, अजिंक्य, वीरांचा वासही सहन न करणार्‍या, दुष्ट बैलांवर विजय मिळवल्याशिवाय राजे त्या कन्येशी विवाह करू शकत नव्हते. (३२-३३)


तां श्रुत्वा वृषजिल्लभ्यां भगवान् सात्वतां पतिः ।
जगाम कौशल्यपुरं सैन्येन महता वृतः ॥ ३४ ॥
कृष्णाला कळले सारे स्वयंवर असा जधी ।
पातले कोसली देशी मोठी सेनाहि घेउनी ॥ ३४ ॥

सात्वतां पतिः भगवान् - यादवाधिपति श्रीकृष्ण - वृषजिल्लभ्यां तां श्रुत्वा - बैलांना जिंकणार्‍यालाच मिळणार्‍या नाग्नजितीविषयी ऐकून - महता सैन्येन वृतः - मोठया सैन्यासह - कौसल्यपुरं जगाम - अयोध्येला गेला. ॥३४॥

यदुश्रेष्ठ भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा हा वृत्तांत ऐकला की जो पुरूष त्या बैलांवर प्रभुत्व मिळवील, त्यालाच सत्या मिळेल; तेव्हा ते मोठी सेना घेऊन कौसल्यापुराला गेले. (३४)


स कोशलपतिः प्रीतः प्रत्युत्थानासनादिभिः ।
अर्हणेनापि गुरुणा पूजयन् प्रतिनन्दितः ॥ ३५ ॥
राजाने तेथ कृष्णाला सत्कारे पुजिले असे ।
कृष्णहि राजिया तैसे अभिनंदुनि बोलले ॥ ३५ ॥

कोसलपतिः सः - अयोध्यापति तो नग्नजित - प्रीतः सन् - प्रसन्न होऊन - प्रत्युत्थानासनादिभिः - उठून उभे रहाणे, बसावयाला आसन देणे इत्यादिकांनी - गुरुणा अर्हणेन अपि - श्रेष्ठ पूजासाहित्याने सुद्धा - (तं) पूजयन् - त्या श्रीकृष्णाला पूजिणारा असा - (तेन) प्रतिनंदितः - त्या श्रीकृष्णाकडून अभिनंदन केला गेला. ॥३५॥

कोसलनरेशाने आनंदाने उठून त्यांचे स्वागत केले आणि आसन देऊन मौल्यवान पूजासामग्रीने त्यांची पूजा केली. तेव्हा श्रीकृष्णांनीसुद्धा त्याचे अभिनंदन केले. (३५)


( वंशस्था )
वरं विलोक्याभिमतं समागतं
     नरेन्द्रकन्या चकमे रमापतिम् ।
भूयादयं मे पतिराशिषोऽमलाः
     करोतु सत्या यदि मे धृतो व्रतैः ॥ ३६ ॥
( इंद्रवज्रा )
सत्या बघे जो मनि इच्छिला तो
     रमापती ये स्वयची वराया ।
केली व्रते मी मनि चिंतुनीया
     तो लालसा ती करि पूर्ण आज ॥ ३६ ॥

नरेंद्रकन्या - राजकन्या नाग्नजिती - अभिमतं रमापतिं समागतं वीक्ष्य - आवडणार्‍या अशा लक्ष्मीपती श्रीकृष्णाला आलेला पाहून - (तं) चकमे - त्यास वरण्यास इच्छिती झाली - यदि मे व्रतैः ईश्वरः धृतः - जर मी व्रतांनी परमेश्वर पूजिला असेल - (तर्हि) अयं मे पतिः भूयात् - तर हा कृष्ण माझा पती होवो - अमलाः आशिषः सत्याः करोतु - शुभ आशीर्वाद खरे करो. ॥३६॥

राजकन्येने वर म्हणून आपल्याला प्रिय असणारे श्रीकृष्ण आलेले पाहून मनोमन अशी इच्छा केली की, "जर मी व्रतांचे पालन करून यांचेच चिंतन केले असेल, तर हेच माझे पती व्हावे आणि यांनी ही माझी पवित्र लालसा पूर्ण करावी." (३६)


( वसंततिलका )
यत्पादपङ्कजरजः शिरसा बिभर्ति
     श्रीरब्यजः सगिरिशः सह लोकपालैः ।
लीलातनुः स्वकृतसेतुपरीप्सयेशः
     कालेऽदधत्स भगवान् मम केन तुष्येत् ॥ ३७ ॥
( वसंततिलका )
ब्रह्मा रमा नि शिव ही पदधूळ घेती
     तो श्रीहरी धरितसे रुप मानवाचे
तो का व्रते नि तप हे करिता प्रसादे ?
     हेतू धरील तर तो मगची प्रसादे ॥ ३७ ॥

श्रीः - लक्ष्मी - अब्जजः - ब्रह्मदेव - लोकपालैः सह सः गिरिशः - लोकपालांसह तो शंकर - यत्पादपङ्‌कजरजः - ज्याच्या चरणकमळाचे पराग - शिरसा बिभर्ति - मस्तकाने धारण करितो - सः भगवान् ईशः - तो भगवान परमेश्वर - स्वकृतसेतुपरीप्सया - आपण केलेल्या धर्ममर्यादांचे रक्षण करण्याच्या इच्छेने - लीलातनूः काले दधत् - क्रीडा करण्यासाठी योग्य काळी शरीर धारण करणारा असा - मम केन तुष्येत् - माझ्यावर कशाने संतुष्ट होईल. ॥३७॥

लक्ष्मी, ब्रह्मदेव, शंकर आणि लोकपाल ज्यांच्या चरणकमलांची धूळ आपल्या मस्तकावर धारण करतात, आणि जे आपणच स्थापन केलेल्या धर्ममर्यादेचे रक्षण करण्यासाठी वेळोवेळी अनेक लीलावतार धारण करतात, ते प्रभू माझ्या कोणत्या सत्कर्माने प्रसन्न होणार आहेत ? (३७)


( अनुष्टुप् )
अर्चितं पुनरित्याह नारायण जगत्पते ।
आत्मानन्देन पूर्णस्य करवाणि किमल्पकः ॥ ३८ ॥
( अनुष्टुप् )
कृष्णाला अग्निजित् यांनी पूजिले विधिपूर्वक ।
क्षुद्र मी तुम्हि तो पूर्ण सेवा काय करू तुम्हा ॥ ३८ ॥

अर्चितं पुनः (नग्नजित्) इति आह - पूजिलेल्या श्रीकृष्णाला पुनः नग्नजित याप्रमाणे म्हणाला - नारायण जगत्पते - हे नारायणा, हे जगन्नाथा - अल्पकः (अहं) - क्षुद्र असा मी - आत्मानंदेन पूर्णस्य (ते) - स्वतःच्या आनंदाने पूर्ण असलेल्या तुझे - किं करवाणि - काय काम करू बरे ॥३८॥

नग्नजिताने श्रीकृष्णांची विधिपूर्वक पूजा करून प्रार्थना केली की, "हे जगत्पाते नारायणा ! आपण आपल्या स्वरुपभूत आनंदानेच परिपूर्ण आहात आणि मी एक तुच्छ मनुष्य आहे ! मी आपली काय सेवा करू ?" (३८)


श्रीशुक उवाच -
तमाह भगवान् हृष्टः कृतासनपरिग्रहः ।
मेघगम्भीरया वाचा सस्मितं कुरुनन्दन ॥ ३९ ॥
श्री शुकदेव सांगतात -
आसनी बैसता कृष्ण पूजें संतुष्ट जाहले ।
हासोनी मेघवाणीने नृपास बोलले तदा ॥ ३९ ॥

कुरुनंदन - हे कुरुकुलाला आनंद देणार्‍या परीक्षिता - कृतासनपरिग्रहः हृष्टः भवान् - आसनावर बसलेला व आनंदित झालेला भगवान श्रीकृष्ण - मेघगंभीरया वाचा सस्मितं तं आह - मेघाप्रमाणे गंभीर अशा वाणीने मंदहास्य करीत त्या नग्नजित राजाला म्हणाला. ॥३९॥

श्रीशुक म्हणतात- परीक्षिता ! नग्नजिताने दिलेल्या आसनावर बसून त्यांनी केलेल्या पूजेने संतुष्ट झालेले भगवान हसत हसत मेघाप्रमाणे गंभीर वाणीने त्याला म्हणाले. (३९)


श्रीभगवानुवाच -
( मिश्र )
नरेन्द्र याच्ञा कविभिर्विगर्हिता
     राजन्यबन्धोर्निजधर्मवर्तिनः ।
तथापि याचे तव सौहृदेच्छया
     कन्यां त्वदीयां न हि शुल्कदा वयम् ॥ ४० ॥
श्रीभगवान् म्हणाले -
( इंद्रवज्रा )
क्षत्रीय तेणे नच मागणे की
     धर्मज्ञ निंदा करिती तशाने ।
वाढावया स्नेह मी इच्छि पुत्री
     न आम्हि देतो वधुशुल्क कोणा ॥ ४० ॥

नरेन्द्र - हे नग्नजित राजा - कविभिः निजधर्मवर्तिनः राजन्यबन्धोः याञ्चा विगर्हिता - विद्वान लोकांनी स्वधर्माने वागणार्‍या क्षत्रियांना याचना ही निंद्य मानिली आहे - तथापि - तरीसुद्धा - सौहृदेच्छया - मैत्रीच्या इच्छेने - तव - तुझ्याजवळ - त्वदियां कन्यां याचे - तुझी कन्या मी मागतो - वयं शुल्कदाः नहि - आम्ही द्रव्य देणारे नव्हे ॥४०॥

श्रीभगवान म्हणाले- राजन ! आपल्या धर्माप्रमाणे वागणार्‍या क्षत्रियाच्या याचनेची विद्वानांनी निंदा केली आहे. तरीसुद्धा मी आपल्याशी मैत्रीसंबंध प्रस्थापित करण्यासाठी आपल्या कन्येला मागणी घालतो. या बदल्यात काहीही शुल्क देण्याची आमच्यामध्ये प्रथा नाही. (४०)


श्रीराजोवाच -
( अनुष्टुप् )
कोऽन्यस्तेऽभ्यधिको नाथ कन्यावर इहेप्सितः ।
गुणैकधाम्नो यस्याङ्गे श्रीर्वसत्यनपायिनी ॥ ४१ ॥
राजा नग्नजित् म्हणाला -
( अनुष्टुप् )
गुणधाम तुम्ही नाथा रमा नित्य वसे हृदी ।
श्रेष्ठ तुम्हाहुनी कोण कन्येला पति होय तो ॥ ४१ ॥

नाथ - महाराज - इह - ह्याठिकाणी - ते अभ्यधिकः - तुझ्याहून अधिक - अन्यः कः कन्यावरः ईप्सितः (स्यात्) - दुसरा कोणता बरे कन्येला वर असणार - गुणैकधाम्नः यस्य अङगे - गुणांचे एकच स्थान अशा ज्याच्या शरीरावर - अनपायिनी श्रीः वसति - अविनाशी लक्ष्मी रहाते. ॥४१॥

राजा म्हणाला- " प्रभो ! आपण सर्व गुणांचे निवासस्थान आहात. आपल्या वक्ष:स्थळावर लक्ष्मी नित्यवास करते. माझ्या कन्येसाठी आपल्याहून श्रेष्ठ असा दुसरा कोणता वर असू शकेल बरे ?" (४१)


किं त्वस्माभिः कृतः पूर्वं समयः सात्वतर्षभ ।
पुंसां वीर्यपरीक्षार्थं कन्यावरपरीप्सया ॥ ४२ ॥
परी शिरोमणी आम्ही रचिला प्रण एक तो ।
बल पौरुष जाणाया आम्ही हे रचिले असे ॥ ४२ ॥

सात्वतर्षभ - हे यादवश्रेष्ठा कृष्णा - किंतु - परंतु - कन्यावरपरीप्सया - कन्येला योग्य वर मिळविण्याच्या इच्छेने - पुंसां वीर्यपरीक्षार्थं - पुरुषांच्या पराक्रमाची परीक्षा करण्याकरिता - अस्माभिः पूर्वं समयः कृतः - आम्ही पूर्वी पण केला आहे. ॥४२॥

परंतु हे यदुश्रेष्ठा, आम्ही पूर्वीच याविषयी एक पण केला आहे. कन्येसाठी योग्य वर शोधण्याकरिता पुरूषांच्या सामर्थ्याची परीक्षा घेण्यासाठीच आम्ही असे केले आहे. (४२)


सप्तैते गोवृषा वीर दुर्दान्ता दुरवग्रहाः ।
एतैर्भग्नाः सुबहवो भिन्नगात्रा नृपात्मजाः ॥ ४३ ॥
साती बैल असे जे की वेसणी नच टोचिले ।
अनेक राजपुत्रांना ययांनी ठार मारिले ॥ ४३ ॥

वीर - हे शूरा - दुर्दान्ताः दुरवग्रहाः - अत्यंत दांडगे व धरण्यास कठीण असे - एते सप्त गोवृषाः - हे सात माजलेले बैल आहेत - सुबहवः नृपात्मजाः - पुष्कळ राजे - एतैः भिन्नगात्राः भग्नाः - ह्या बैलांकडून छिन्न अवयवाचे होऊन पराभव पावले.॥४३॥

हे वीरश्रेष्ठा ! आमचे हे सात बैल माजलेले असून कोणालाही न आवरणारे आहेत. पुष्कळशा राजकुमारांना यांनी घायाळ करून त्यांचा पराभव केला आहे. (४३)


यदिमे निगृहीताः स्युः त्वयैव यदुनन्दन ।
वरो भवानभिमतो दुहितुर्मे श्रियःपते ॥ ४४ ॥
वेसणी टोचणे यांना कृपया लक्षुमीपते ।
कन्येला वर तो तुम्ही अभीष्ट वाटता अम्हा ॥ ४४ ॥

यदुनंदन श्रियः पते - हे यदुकुळाला आनंद देणार्‍या लक्ष्मीपते श्रीकृष्णा - यदि त्वया एव इमे निगृहीताः स्युः - जर तुझ्याकडूनच हे बैल धरिले गेले - भवान् - तू - मे दुहितुः वरः अभिमतः (स्यात्) - माझ्या कन्येला पती म्हणून मान्य होशील.॥४४॥

हे श्रीकृष्णा ! आपणच जर यांना वेसण घातलीत, तर हे लक्ष्मीपते ! आपणच आमच्या कन्येसाठी योग्य वर ठराल. (४४)


एवं समयमाकर्ण्य बद्ध्वा परिकरं प्रभुः ।
आत्मानं सप्तधा कृत्वा न्यगृह्णाल्लीलयैव तान् ॥ ४५ ॥
दुपट्टा कसिला कृष्णे रूपे सातहि घेतली ।
पाहता पाहता त्यांना टोचिल्या वेसणी पहा ॥ ४५ ॥

प्रभुः - श्रीकृष्ण - एवं समयम् आकर्ण्य - असा पण ऐकून - परिकरं बद्‌ध्वा - कंबर बांधून - आत्मानं सप्तधा कृत्वा - स्वतः सात रूपे घेऊन - लीलया एव तान् न्यगृह्‌णात् - लीलेनेच त्या सात बैलांना धरिता झाला. ॥४५॥

नग्नजिताचा हा पण ऐकून श्रीकृष्णांनी कंबर कसली आणि सात रुपे घेऊन जाता जाता त्या बैलांना वेसण घातली. (४५)


बद्ध्वा तान् दामभिः शौरिः भग्नदर्पान् हतौजसः ।
व्यकर्सल्लीलया बद्धान्बालो दारुमयान् यथा ॥ ४६ ॥
बैलांचा जिरला गर्व पौरुषहीन जाहले ।
सातीही ओढिले कृष्णे मुले जै खेळती तसे ॥ ४६ ॥

शौरिः - श्रीकृष्ण - भग्नदर्पान् हतौजसाः तान् - गर्वरहित व निर्बळ झालेल्या त्या बैलांना - दामभिः बद्‌ध्वा - दाव्यांनी बांधून - यथा बालः दारुमयान् - जसा बालक लाकडांच्या बाहुल्यांना - तथा - त्याप्रमाणे - बद्धान् (तान्) लीलया व्यकर्षत् - बांधलेल्या त्या बैलांना लीलेने ओढिता झाला. ॥४६॥

त्यामुळे बैलांची मस्ती जिरली आणि त्यांचे बळ खच्ची झाले. आता भगवान श्रीकृष्ण त्यांना दोरीने बांधून, एखादे मूल लाकडी बैलांना ओढते, तसे त्या बैलांना ओढू लागले. (४६)


ततः प्रीतः सुतां राजा ददौ कृष्णाय विस्मितः ।
तां प्रत्यगृह्णाद्‌ भगवान् विधिवत् सदृशीं प्रभुः ॥ ४७ ॥
स्तिमीत जाहला राजा कृष्णा कन्याहि अर्पिली ।
अनुरूप अशी सत्या कृष्णाने वरिली असे ॥ ४७ ॥

ततः प्रीतः राजा - नंतर प्रसन्न झालेला नग्नजित राजा - विस्मितः (भूत्वा) कृष्णाय सुता ददौ - आश्चर्ययुक्त होऊन श्रीकृष्णाला कन्या देता झाला - भगवान् प्रभुः - भगवान श्रीकृष्ण - सदृशीं तां - योग्य अशा त्या नाग्नजितीला - विधिवत्‌प्रत्यगृह्‌णात् - यथाविधि स्वीकारिता झाला. ॥४७॥

राजाला अतिशय आश्चर्य वाटले. प्रसन्न होऊन त्याने श्रीकृष्णांना आपली कन्या दिली. आणि सर्वशक्तिमान भगवान श्रीकृष्णांनीसुद्धा आपल्याला अनुरुप अशा सत्येचे विधिपूर्वक पाणिग्रहण केले. (४७)


राजपत्‍न्यश्च दुहितुः कृष्णं लब्ध्वा प्रियं पतिम् ।
लेभिरे परमानन्दं जातश्च परमोत्सवः ॥ ४८ ॥
राण्यांनी पाहिला कृष्ण कन्येला पति लाभला ।
हर्षला सर्वची तेंव्हा उत्सवो मांडिला असे ॥ ४८ ॥

राजपत्‍न्यः च - आणि राजस्त्रिया - दुहितुः प्रियं कृष्णं पतिं लब्ध्वा - कन्येला आवडता श्रीकृष्ण पति मिळवून - परमानन्दं लेभिरे - अत्यंत आनंद मिळवित्या झाल्या - परमोत्सवः च जातः - आणि मोठा उत्सव झाला. ॥४८॥

आपल्या कन्येला प्रिय असे भगवान श्रीकृष्ण पती मिळाल्याचे पाहून राण्यांना अतिशय आनंद झाला आणि सगळीकडे मोठा उत्सव साजरा होऊ लागला. (४८)


शङ्खभेर्यानका नेदुः गीतवाद्यद्विजाशिषः ।
नरा नार्यः प्रमुदिताः सुवासःस्रगलङ्कृताः ॥ ४९ ॥
शंख ढोल नगारे नी श्रेष्ठ गायन जाहले ।
आशिर्वाद दिला विप्रे सजले नर नारि तै ॥ ४९ ॥

शङखभेर्यानकाः नेदुः - शंख, भेरी, चौघडे वाजू लागले - गीतवाद्यद्विजाशिषः (नेदुः) - गायन, वाद्ये व ब्राह्मणांचे आशीर्वाद यांचा ध्वनी झाला - नराः नार्यः च - पुरुष व स्त्रिया - प्रमुदिताः भूत्वा - आनंदित होऊन - सुवासः स्रगलंकृताः - सुंदर वस्त्रे, माळा यांनी सुशोभित झाल्या. ॥४९॥

शंख, ढोल, नगारे वाजू लागले. सगळीकडे गाणे-बजावणे सुरू झाले. ब्राह्मण आशीर्वाद देऊ लागले. सुंदर वस्त्रे, फुलांचे हार आणि दागुन्यांनी नटून-थटून नगरातील स्त्री-पुरूष आनंदोत्सव साजरा करू लागले. (४९)


दशधेनुसहस्राणि पारिबर्हमदाद् विभुः ।
युवतीनां त्रिसाहस्रं निष्कग्रीवसुवाससम् ॥ ५० ॥
नवनागसहस्राणि नागाच्छतगुणान् रथान् ।
रथाच्छतगुणानश्वान् अश्वाच्छतगुणान् नरान् ॥ ५१ ॥
राजेश्री नग्नजित् यांनी गाई दशहजार नी ।
अलंकृत् वस्त्रहारांनी त्रिसहस्र कुमारिका ॥ ५० ॥
नऊ हजार हत्ती नी नऊ लक्ष तसे रथ ।
नऊ कोटी तसे अश्व भृत्य नौ अब्ज ते दिले ॥ ५१ ॥

विभुः - समर्थ असा नग्नजित राजा - दशधेनुसहस्राणि - दहा हजार गाई - निष्कग्रीवसुवाससां - ज्यांच्या गळ्यांत सुवर्णाचे अलंकार आहेत व ज्या सुंदर वस्त्र नेसल्या आहेत अशा - युवतीनां त्रिसाहस्रं - तीन हजार तरुण दासी - पारिबर्हं अदात् - आंदण म्हणून देता झाला. ॥५०॥

नवनागसहस्राणि - नऊ हजार हत्ती - नागात् शतगुणान् रथान् - हत्तींच्या शतपटीने रथ - रथात् शतगुणान् अश्वान् - रथांच्या शतपटीने घोडे - अश्वात् शतगुणान् नरान् - घोडयाच्या शतपटीने सेवक - पारिबर्हं अदात् - आंदण म्हणून देता झाला. ॥५१॥

राजाने दहा हजार गाई आणि सुंदर वस्त्रे परिधान करुन गळ्यात सुवर्णहार घातलेल्या तीन हजार तरूण दासी वरदक्षिणा म्हणून दिल्या. त्याचबरोबर नऊ हजार हत्ती, नऊ लाख रथ, नऊ कोटी घोडे आणि नऊ अब्ज सेवकसुद्धा वरदक्षिणा म्हणून दिले. (५०-५१)


दम्पती रथमारोप्य महत्या सेनया वृतौ ।
स्नेहप्रक्लिन्नहृदयो यापयामास कोशलः ॥ ५२ ॥
राजाने पुत्रि जावाई रथात बैसवोनिया ।
निरोप दिधला त्यांना हृदये द्रवली तदा ॥ ५२ ॥

प्रेमप्रक्लिन्नहृदयः कोसलः - प्रेमाने ज्याचे हृदय भिजून गेले आहे असा अयोध्यापति नग्नजित राजा - महत्या सेनया वृतौ दंपती - मोठया सेनेने वेष्टिलेल्या पतिपत्‍नीच्या जोडप्याला - रथं आरोप्य - रथात बसवून - यापयामास - पाठविता झाला. ॥५२॥

नग्नजिताने त्या दांपत्याची रथात बसवून विशाल सेनेसह पाठवणी केली. त्यावेळी वात्सल्याने त्याचे हृदय भरून आले होते. (५२)


श्रुत्वैतद् रुरुधुर्भूपा नयन्तं पथि कन्यकाम् ।
भग्नवीर्याः सुदुर्मर्षा यदुभिर्गोवृषैः पुरा ॥ ५३ ॥
त्या बैले कैक राजांचे बल पौरुष हारिले ।
न सहोनी तयें मार्गी कृष्णाला वेढिले असे ॥ ५३ ॥

पुरा - पूर्वी - यदुभिः गोवृषैः च - यादवांनी आणि उन्मत्त बैलांनी - भग्नवीर्याः - ज्याचे वीर्य नष्ट केले आहे असे - सुदुर्मर्षाः - दुसर्‍याचा उत्कर्ष मुळीच सहन न करणारे - भूपाः - राजे - एतत् श्रुत्वा - हे ऐकून - कन्यकां नयन्तं (कृष्णम्) - कन्येला नेणार्‍या श्रीकृष्णाला - पथि रुरुधुः - मार्गात अडविते झाले. ॥५३॥

यादवांनी आणि नग्नजिताच्या बैलांनी या आधी ज्या राजांचे बळ धुळीस मिळविले होते, त्या राजांनी जेव्हा हा वृत्तांत ऐकला, तेव्हा ते सहन न होऊन सत्याला घेऊन जात असताना त्या राजांनी वाटेत श्रीकृष्णांना वेढा घातला. (५३)


तानस्यतः शरव्रातान् बन्धुप्रियकृदर्जुनः ।
गाण्डीवी कालयामास सिंहः क्षुद्रमृगानिव ॥ ५४ ॥
बाणांची वृष्टिही केली अर्जुने धनु घेउनी ।
सिंह जै पशुते फाडी तसे ते सर्व मारिले ॥ ५४ ॥

बंधुप्रियकृत् गांडीवी अर्जुनः - बंधूचे प्रिय करणारा व गांडीव धनुष्य धारण करणारा अर्जुन - शरव्रातान् अस्यतः तान् - बाणांचे समूह सोडणार्‍या त्या राजांना - सिंहः क्षुद्रमृगान् इव - सिंह जसा क्षुद्र पशूंना पळवून लावतो त्याप्रमाणे - कालयामास - पळवून लाविता झाला. ॥५४॥

आणि ते त्यांच्यावर बाणांचा वर्षाव करू लागले. त्यावेळी अर्जुनाने आपल्या मित्राचे प्रिय करण्यासाठी गांडीव धनुष्य हातात घेऊन, सिंह ज्याप्रमाणे क्षुद्र पशूंना पळवून लावतो. त्याप्रमाणे त्या राजांना त्याने पिटाळून लावले. (५४)


पारिबर्हमुपागृह्य द्वारकामेत्य सत्यया ।
रेमे यदूनामृषभो भगवान् देवकीसुतः ॥ ५५ ॥
सत्याला घेउनी कृष्ण द्वारकापुरि पातले ।
गृहस्थोचित ते सर्व विहार करु लागले ॥ ५५ ॥

यदूनाम् ऋषभः भगवान देवकीसुतः - यादवश्रेष्ठ असा भगवान देवकीपुत्र श्रीकृष्ण - पारिबर्हं उपागृह्य - आंदण दिलेले पदार्थ घेऊन - द्वारकां एत्य - द्वारकेला येऊन - सत्या (सह) रेमे - सत्येशी रममाण झाला. ॥५५॥

त्यानंतर यदुश्रेष्ठ देवकीनंदन ती वरदक्षिणा आणि सत्या यांना घेऊन द्वारकेत आले आणि तिच्यासह आनंदात राहू लागले. (५५)


श्रुतकीर्तेः सुतां भद्रां उपयेमे पितृष्वसुः ।
कैकेयीं भ्रातृभिर्दत्तां कृष्णः सन्तर्दनादिभिः ॥ ५६ ॥
आत्त्या ती श्रुतकीर्तीजी कैकयी देशि जी दिली ।
भद्रा जी तिजला कन्या ती संतर्दन बंधुने ।
कृष्णाला अर्पिली तैसे कृष्णाने वरिले तिला ॥ ५६ ॥

कृष्णः - श्रीकृष्ण - संतर्दनादिभिः भ्रातृभिः दत्तां - संतर्दनादिक भावांनी दिलेल्या - कैकेयीं - केकय राजाच्या कन्येला - (च) पितृष्वसुः श्रुतकीर्तेः सुतां भद्रां - आणि आत्या जी श्रुतकीर्ति तिच्या भद्रानामक कन्येला - उपयेमे - वरिता झाला. ॥५६॥

श्रीकृष्णांनी केकय देशातील आत्या श्रुतकीर्ती हिच्या भद्रा नावाच्या कन्येशी विवाह केला. तिच्या संतर्दन इत्यादि भावांनी स्वत:च तिला श्रीकृष्णांना दिले होते. (५६)


सुतां च मद्राधिपतेः लक्ष्मणां लक्षणैर्यताम् ।
स्वयंवरे जहारैकः स सुपर्णः सुधामिव ॥ ५७ ॥
भद्राधिपतिची कन्या लक्ष्मणा जी सुलक्षणा ।
हरिली एकट्या कृष्णे गरूड नेइ जै सुधा ॥ ५७ ॥

च - आणि - एकः सः - एकटा तो श्रीकृष्ण - सुपर्णः सुधाम् इव - गरुड जसा अमृताला हरण करितो त्याप्रमाणे - लक्षणैः युतां - लक्षणांनी युक्त अशा - मद्राधिपतेः सुतां लक्ष्मणां - मद्र राजाची कन्या जी लक्ष्मणा तिला - स्वयंवरे जहार - स्वयंवरामध्ये हरण करिता झाला. ॥५७॥

मद्र देशाच्या राजाची लक्ष्मणा नावाची एक कन्या होती. ती अत्यंत सुलक्षणी होती. गरुडाने ज्याप्रमाणे स्वर्गातून अमृत पळविले, त्याचप्रमाणे श्रीकृष्णांनी स्वयंवरामध्ये एकट्यानेच तिचे हरण केले. (५७)


अन्याश्चैवंविधा भार्याः कृष्णस्यासन् सहस्रशः ।
भौमं हत्वा तन्निरोधाद् आहृताश्चारुदर्शनाः ॥ ५८ ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां दशमस्कन्धे उत्तरार्धे
अष्टमहिष्युद्वाहो नाम अष्टपञ्चाशत्तमोऽध्यायः ॥ ५८ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
हजारो वरिला पत्‍न्या भगवान हरिने पुन्हा ।
भौमासुरास मारोनी केल्या ज्या मुक्त बंधनी ॥ ५८ ॥
॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर अठ्ठावन्नावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

कृष्णस्य - श्रीकृष्णाच्या - भौ‌मं हत्वा तन्निरोधात् आहृताः - भूमिपुत्र नरकासुराला मारून त्याच्या बंदीतून सोडवून आणलेल्या - चारुदर्शनाः - सुंदर स्वरूपाच्या - अन्याः च एवंविधा सहस्रशः भार्याः - दुसर्‍याहि अशा हजारो पत्‍न्या - आसन् - होत्या. ॥५८॥

भगवान श्रीकॄष्णांच्या अशा आणखीही हजारो स्त्रिया होत्या. भौ‍मासुराला मारून त्याच्या बंदिगृहातून त्यांनी त्या सुंदरींना सोडवून आणले होते. (५८)


अध्याय अठ्ठावन्नावा समाप्त

GO TOP