|
श्रीमद् भागवत पुराण
सत्राजितं हत्वा शतधन्वनः स्यमन्तकहरणं, तस्य च वधः स्यमंतक हरण, शतधन्व्याचा उद्धार आणि अक्रूराला पुन्हा द्वारकेत बोलावणे - संहिता - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीबादरायणिरुवाच -
( अनुष्टुप् ) विज्ञातार्थोऽपि गोविन्दो दग्धानाकर्ण्य पाण्डवान् । कुन्तीं च कुल्यकरणे सहरामो ययौ कुरून् ॥ १ ॥
(अनुष्टुप् ) श्रीशुकदेव सांगतात - कळाले जरि गोविंदा त्या लाक्षागृहि पांडव । वाचले, परि वार्तेने बुडोनी सर्व वारले । तदा ते बलरामाच्या सोबती तेथ पातले ॥ १ ॥
गोविंदः - श्रीकृष्ण - विज्ञातार्थः सन् अपि - जाणिला आहे खरा वृत्तांत ज्याने असा असताहि - पाण्डवान् कुंतीं दग्धान् आकर्ण्य - पांडव व कुंती जळून मेली असे ऐकून - कुल्यकरणे - कुळाला साजेशी विचारपूस करण्याकरिता - सहरामः कुरून् ययौ - बलरामासह कुरुदेशाला गेला. ॥१॥
श्रीशुक म्हणतात- लाक्षागृहाला लावलेल्या आगीमुळे पांडवांचा केसही वाकडा झाला नाही, हे जरी श्रीकृष्णांना माहीत होते, तरीसुद्धा कुंती आणि पांडव जळून मेले आहेत, हे कळल्यावर कुळाची रीत पाळण्यासाठी ते बलरामांसह हस्तिनापुराला गेले. (१)
विवरण :- कृष्णाचा मुत्सद्दीपणा आणि व्यवहारचातुर्य या श्लोकात दिसून येते. वास्तविक लाक्षागृहात विदुराने खणलेल्या बिळातून पांडव सुखरूप बाहेर पडले होते. हे सर्व माहीत असूनहि काहीच माहीत नसल्यासारखे दाखवीत कृष्ण हस्तिनापुरास कौरवांचे समाचारास म्हणून आला. शिवाय आपापसात कितीही वैर असले तरी मृत्यूनंतर सांत्वनाला जाणे (प्रसंगी अंत्ययात्रेस जाणे) हा एक फार मोठा उपचाराचा भाग मानला जातो. तोच व्यवहार पाळण्यासाठी कृष्ण हस्तिनापुरास आला. (१)
भीष्मं कृपं सविदुरं गान्धारीं द्रोणमेव च ।
तुल्यदुःखौ च सङ्गम्य हा कष्टमिति होचतुः ॥ २ ॥
भीष्मा कृपा विदूरा नी गांधारी द्रोण यांजला । भेटुनी बोलले हाय दुःखाची गोष्ट जाहली ॥ २ ॥
भीष्मं सविदूरं कृपं गांधारीं द्रोणम् एव च - भीष्म, विदुरासह कृप, गांधारी आणि द्रोण यांसुद्धा सर्वांना - संगम्य - भेटून - तुल्यदुःखौ च - आणि त्यांच्याशी समदुःखी होऊन - हा कष्टं - अरेरे फार वाईट गोष्ट झाली - इति ह ऊचतुः - असे खरोखर म्हणाले. ॥२॥
तेथे जाऊन भीष्म, कृपाचार्य, विदुर, गांधारी आणि द्रोणाचार्यांना भेटून त्यांचे सांत्वन करून, सहानुभूती दाखवून ते त्यांना म्हणाले- "अरेरे ! फार वाईट झाले. !" (२)
लब्ध्वैतदन्तरं राजन् शतधन्वानमूचतुः ।
अक्रूरकृतवर्माणौ मणिः कस्मान्न गृह्यते ॥ ३ ॥
अवधीत तदा राजा कृतवर्मा नि अक्रुर । शतधन्व्या वदो गेले सत्राजित्मणि चोरणे ॥ ३ ॥
राजन् - हे राजा - एतत् अन्तरं लब्ध्वा - ही संधी साधून - अक्रूरकृतवर्माणौ - अक्रूर व कृतवर्मा - कस्मात् मणिः न गृह्यते - काय कारणास्तव स्यमंतक मणी घेत नाहीस ? - (इति) शतधन्वानं ऊचतुः - असे शतधन्व्याला म्हणाले. ॥३॥
ही संधी साधून अक्रूर आणि कृतवर्मा शतधन्व्याला म्हणाले- "तू सत्राजिताकडून मणी का घेत नाहीस ?" (३)
योऽस्मभ्यं संप्रतिश्रुत्य कन्यारत्नं विगर्ह्य नः ।
कृष्णायादान्न सत्राजित् कस्माद् भ्रातरमन्वियात् ॥ ४ ॥
सत्राजित् वदला होता देतो पुत्री म्हणोनिया । न देता द्वेषितो आता त्यालाही ठार मारु की ॥ ४ ॥
यः अस्मभ्यं कन्यारत्नं संप्रतिश्रुत्य - जो आम्हाला मुलगी देण्याचे वचन देऊन - नः विगर्ह्य - आमचा तिरस्कार करून - कृष्णाय अदात् - श्रीकृष्णाला देता झाला - (सः) सत्राजित् - तो सत्राजित - भ्रातरं कस्मात् न अन्वियात् - भाऊ जो प्रसेन त्याच्या मागोमाग का न जावा ? ॥४॥
ज्याने आपली सुंदर कन्या तुला देण्याचे वचन दिले होते, त्यानेच आता आम्हांला झिडकरून श्रीकृष्णांना ती दिली. तर सत्राजितालासुद्धा भावामागोमाग यमपुरीत का पाठवू नये ? (४)
एवं भिन्नमतिस्ताभ्यां सत्राजितमसत्तमः ।
शयानमवधील्लोभात् स पापः क्षीण जीवितः ॥ ५ ॥
पापी तो शतधन्वा नी मृत्यू समिप पातला । सत्राजित् मारिला तेणे द्वयांची फूस ऐकता ॥ ५ ॥
एवं ताभ्यां भिन्नमतिः - याप्रमाणे अक्रूर व कृतवर्मा यांनी मोहित केली आहे बुद्धि ज्याची असा - असत्तमः क्षीणजीवितः सः पापः - अत्यंत दुष्ट व संपले आहे आयुष्य ज्याचे असा पापी शतधन्वा - लोभात् - लोभामुळे - शयानं सत्राजितम् अवधीत् - निजलेल्या सत्राजिताला मारिता झाला. ॥५॥
शतधन्वा मुळचा दुष्ट होता आणि आता तर त्याचा मृत्यूही जवळ आला होता. त्या दोघांनी असा बुद्धिभेद केल्यामुळे त्याने लोभाने, झोपलेल्या स्थितीत सत्राजिताला ठार केले. (५)
स्त्रीणां विक्रोशमानानां क्रन्दन्तीनामनाथवत् ।
हत्वा पशून्सौनिकवत् ममणिमादाय जग्मिवान् ॥ ६ ॥
शोकाने रडती स्त्रीया परी दुर्लक्षुनी तयां । पळाला मणि घेवोनी पशूहत्या जशी करी ॥ ६ ॥
(तस्य) स्त्रीणां अनाथवत् क्रन्दन्तीनां विक्रोशमानानां च - सत्राजिताच्या स्त्रिया अनाथाप्रमाणे रडून आक्रोश करीत असताना - पशून् सौनिकवत् - पशूंना जसा खाटिक त्याप्रमाणे - (तं) हत्वा - त्या सत्राजिताला मारून - मणिम् आदाय - स्यमंतक मणी घेऊन - जग्मिवान् - निघून गेला. ॥६॥
यावेळी त्याच्या स्त्रिया अनाथाप्रमाणे रडू-ओरडू लागल्या. परंतु तिकडे लक्ष न देता कसाई जशी पशूंची हत्या करतो, त्याप्रमाणे शतधन्वा सत्राजिताला मारून व मणी घेऊन तेथून पसार झाला. (६)
सत्यभामा च पितरं हतं वीक्ष्य शुचार्पिता ।
व्यलपत्तात तातेति हा हतास्मीति मुह्यती ॥ ७ ॥
सत्यभामाहि शोकाने पिताजीऽ शब्द ओरडे । उठे मुर्च्छ्ये मधोनीया पुन्हाही शोक ती करी ॥ ७ ॥
च - आणि - सत्यभामा - सत्यभामा - पितरं हतं वीक्ष्य - पित्याला मारिलेला पाहून - शुचार्दिता (भूत्वा) - शोकाकुल होऊन - तात तात इति - अहो बाबा, अहो बाबा असे - हा हता अस्मि इति - अरे माझा घात झाला असे म्हणून - मुह्यती - मूर्च्छित झालेली - व्यलपत् - विलाप करिती झाली. ॥७॥
वडिलांना मारलेले पाहून सत्यभामा शोकाकुल झाली आणि " बाबा ! बाबा ! माझा घात झाला !" म्हणून विलाप करू लागली. मधून मधून ती बेशुद्धही पडत होती. (७)
तैलद्रोण्यां मृतं प्रास्य जगाम गजसाह्वयम् ।
कृष्णाय विदितार्थाय तप्ताऽऽचख्यौ पितुर्वधम् ॥ ८ ॥
तेलाच्या कढई मध्ये पित्याचे प्रेत ठेवुनी । हस्तिनापुरि ती आली कृष्णाला सर्व बोलली ॥ ८ ॥
तप्ता (सा) - दुःख पावलेली ती सत्यभामा - मृतं तैलाद्रोण्यां प्रास्य - मेलेल्या पित्याला तेलाच्या बुधल्यात ठेवून - गजसाह्वयम् जगाम - हस्तिनापुरला गेली - विदितार्थाय कृष्णाय - ज्याला खरा प्रकार माहित आहे अशा श्रीकृष्णाला - पितुः वधं आचख्यौ - पित्याचा वध झाल्याचे सांगती झाली. ॥८॥
नंतर पित्याचे शव तेलाच्या कढईत ठेवून ती हस्तिनापुरला गेली. अत्यंत दु:खी अंत:करणाने श्रीकृष्णांना तिने आपल्या वडिलांच्या हत्येची बातमी सांगितली. वास्तविक हे सर्व त्यांना अगोदरच माहीत होते. (८)
तदाकर्ण्येश्वरौ राजन् अनुसृत्य नृलोकताम् ।
अहो नः परमं कष्टं इत्यस्राक्षौ विलेपतुः ॥ ९ ॥
परीक्षित राम नी कृष्ण मानवी करुनी लिला । ढाळिती अश्रु शोकाने वदती ही विपत्तिची ॥ ९ ॥
राजन् - हे परीक्षित राजा - ईश्वरौ - बलराम व कृष्ण - तत् आकर्ण्य - ते ऐकून - नृलोकतां अनुसृत्य - मनुष्यधर्माला अनुसरून - अहो नः परमं कष्टं - केवढे हो आमच्यावर मोठे संकट आले - इति - असे म्हणून - अस्राक्षौ विलेपतुः - डोळ्यात अश्रू आहेत ज्यांच्या असे विलाप करिते झाले. ॥९॥
राजा ! श्रीकृष्ण व बलराम ते ऐकून सामान्य मनुष्यासारखे अश्रू गाळू लागले. आणि म्हणू लागले, "अरेरे ! आमच्यावर दु:खाचा केवढा मोठा डोंगर कोसळला !" (९)
आगत्य भगवांस्तस्मात् सभार्यः साग्रजः पुरम् ।
शतधन्वानमारेभे हन्तुं हर्तुं मणिं ततः ॥ १० ॥
पातली सत्यभामा नी राम कृष्णहि द्वारकीं । मारण्या शतधन्व्याला उद्योगी लागले पहा ॥ १० ॥
सभार्यः साग्रजः भगवान् - पत्नीसह व बलरामासह श्रीकृष्ण - तस्मात् - त्या हस्तिनापुरातून - पुरं आगत्य - द्वारकानगरीला येऊन - शतधन्वानं हन्तुम् ततः च मणिं हर्तुं आरेभे - शतधन्व्याला मारण्याच्या व त्यापासून मणी हरण करण्याच्या उद्योगाला लागला. ॥१०॥
यानंतर भगवान, सत्यभामा आणि बलराम यांच्यासह द्वारकेला परत आले आणि शतधन्व्याला मारून त्याच्याकडून मणी काढून घेण्याचा विचार करू लागले. (१०)
सोऽपि कृतोद्यमं ज्ञात्वा भीतः प्राणपरीप्सया ।
साहाय्ये कृतवर्माणं अयाचत स चाब्रवीत् ॥ ११ ॥
कळाले शतधन्वा तो प्राणाचे भय घेउनी । रक्षणार्थ वदो गेला कृतवर्मासि तो म्हणे ॥ ११ ॥
सः अपि - शतधन्वासुद्धा - कृष्णोद्यमं ज्ञात्वा - श्रीकृष्णाचा उद्योग जाणून - भीतः - भ्यालेला असा - प्राणपरीप्सया - प्राणरक्षणाच्या इच्छेने - कृतवर्माणं - कृतवर्म्याला - साहय्ये अयाचत - साहाय्यासाठी प्रार्थिता झाला - सः च अब्रवीत् - पण तो कृतवर्मा म्हणाला. ॥११॥
श्रीकृष्णाचे मनोगत शतधन्व्याला समजले, तेव्हा तो अतिशय घाबरला आणि आपले प्राण वाचविण्यासाठी त्याने कृतवर्म्याकडे मदत मागितली, तेव्हा कृतवर्मा म्हणाला. (११)
नाहमीस्वरयोः कुर्यां हेलनं रामकृष्णयोः ।
को नु क्षेमाय कल्पेत तयोर्वृजिनमाचरन् ॥ १२ ॥
शक्तिमान् ईश कृष्णाते कधी मी लढुना शके । इह नी परलोकात वैरे कोण सुखी वसे ॥ १२ ॥
ईश्वरयोः रामकृष्णयोः - सर्वसमर्थ अशा बलराम व श्रीकृष्ण यांच्याशी - हेलनं न कुर्याम् - मी विरोध करणार नाही - तयोः वृजिनम् आचरन् - त्या रामकृष्णांचा अपराध करणारा - कः नु क्षेमाय कल्पेत - कोणता पुरुष कल्याण मिळविण्यास तयार होईल बरे ॥१२॥
श्रीकृष्ण आणि बलराम सर्वशक्तिमान आहेत. मी त्यांच्याशी वैर करून कोणाचे भले होणार आहे ? (१२)
कंसः सहानुगोऽपीतो यद्द्वेषात्त्याजितः श्रिया ।
जरासन्धः सप्तदश संयुगान् विरथो गतः ॥ १३ ॥
कंसाने बांधिता वैर हरला प्राण नी धना । सत्रा वेळा जरासंध हारता पायि तो पळे ॥ १३ ॥
यद्द्वेषात् - ज्या रामकृष्णांशी शत्रुत्व केल्यामुळे - श्रिया त्याजितः - लक्ष्मीने टाकिलेला - सानुगः कंसः अपीतः - अनुचरासह कंस मृत झाला - जरासंधः - जरासंध - सप्तदशसंयुगान् - सतरा युद्धांमध्ये - विरथः गतः - विरथ होऊन गेला. ॥१३॥
त्यांचा द्वेष केल्याने कंस राज्य घालवून आपल्या अनुयायांसह मारला गेला. तसाच जरासंध सतरा वेळा युद्धात हार पत्करून रथाशिवायच राजधानीकडे परत गेला. (१३)
प्रत्याख्यातः स चाक्रूरं पार्ष्णिग्राहमयाचत ।
सोऽप्याह को विरुध्येत विद्वानीश्वरयोर्बलम् ॥ १४ ॥ य इदं लीलया विश्वं सृजत्यवति हन्ति च । चेष्टां विश्वसृजो यस्य न विदुर्मोहिताजया ॥ १५ ॥ यः सप्तहायनः शैलं उत्पाट्यैकेन पाणिना । दधार लीलया बाल उच्छिलीन्ध्रमिवार्भकः ॥ १६ ॥ नमस्तस्मै भगवते कृष्णायाद्भुतकर्मणे । अनन्तायादिभूताय कूटस्थायात्मने नमः ॥ १७ ॥
कृतवर्मा असे त्याला देई उत्तर तो तदा । अक्रूरा प्रार्थिता त्याला अक्रूर बोलला असे ॥ १४ ॥ बंधो रे कोण तो ऐसा बल पौरुष जाणता । बांधील वैर तो त्यासी रची तो मोडि विश्व हे ॥ १५ ॥ करील काय तो केंव्हा ब्रह्माही जाणु ना शके । वय जै सात वर्षाचे तदा पर्वत हा धरी ॥ १६ ॥ सात दिन असे त्याने रक्षिले गोप नी पशू । अनंता आत्मरूपा त्या माझा रे प्रणिपात हा ॥ १७ ॥
(तेन) प्रत्याख्यातः सः च - त्या कृतवर्म्याने नाकारलेला तो शतधन्वा - अक्रूरं पार्ष्णिग्राहं अयाचत - अक्रूराला सहायक म्हणून याचिता झाला - सः अपि - तो अक्रूरसुद्धा - ईश्वरयोः बलं विद्वान् कः - समर्थ अशा रामकृष्णांचे बळ जाणणारा कोणता पुरुष - (तयोः) विरुद्ध्येत (इति) आह - त्या दोघांच्या विरुद्ध आचरण करील असे म्हणाला. ॥१४॥ यः - जो - विश्वं - हे जग - लीलया सृजति अवति हन्ति च - लीलेने उत्पन्न करतो, रक्षितो व नष्ट करितो - अजया मोहिताः (जनाः) - मायेने मोहित झालेले लोक - विश्वसृजः यस्य - जो जग निर्माण करतो अशा - तस्य चेष्टां न विदुः - त्या ईश्वराची लीला जाणत नाहीत. ॥१५॥ यः सप्तहायनः बालः (सन्) - जो सात वर्षांचा बालक असताना - एकेन पाणिना शैलम् उत्पाटय - एका हाताने पर्वत उपटून - अर्भकः उच्छिलीन्ध्रम् इव - बालक जसे अळंब्याला उचलते त्याप्रमाणे - लीलया दधार - लीलेने धरिता झाला. ॥१६॥ अद्भुतकर्मणे आदिभूताय कूटस्थाय - आश्चर्यकारक कर्मे करणारा, सर्वांच्या आदि आणि अविकार्य अशा - अनन्ताय - अविनाशी - आत्मने तस्मै भगवते कृष्णाय नमः नमः - सर्वव्यापी त्या षड्गुणैश्वर्यसंपन्न कृष्णाला वारंवार नमस्कार असो. ॥१७॥
जेव्हा कृतवर्म्याने त्याला असे वाटेला लावले, तेव्हा शतधन्व्याने अक्रूराला साहाय्य करण्याची विनंती केली. तोही म्हणाला, "त्या समर्थांचे बळ जाणणारा कोण त्यांच्याशी वैर करील ? जे लीलेने या विश्वाची रचना, संरक्षण आणि संहार करतात, तसेच ते केव्हा काय करू इच्छितात, ही गोष्ट त्यांच्या मायेने मोहित झालेले ब्रह्मदेव इत्यादी विश्व-विधातेसुद्धा समजू शकत नाहीत, सात वर्षांचे असतानाच ज्यांनी एका हातानेच गोवर्धन पर्वत जमिनीतून उखडला आणि लहान मुलाने पावसाळी छत्री धरावी त्याप्रमाणे उचलून धरला. मी तर त्या अचाट कर्मे करणार्या भगवान श्रीकृष्णांना नमस्कार करतो. ते अनंत, अनादी, निष्क्रिय आणि आत्मस्वरूप आहेत. मी त्यांना नमस्कार करतो." (१४-१७)
प्रत्याख्यातः स तेनापि शतधन्वा महामणिम् ।
तस्मिन् न्यस्याश्वमारुह्य शतयोजनगं ययौ ॥ १८ ॥
अक्रूरशब्द ऐकोनी ठेवोनी मणी त्याजसी । बसे घोड्यावरी ऐशा चारशे कोस जो पळे ॥ १८ ॥
(एवं) तेन अपि प्रत्याख्यातः - याप्रमाणे त्या अक्रूरानेहि निषेधिलेला - सः शतधन्वा - तो शतधन्वा - महामणिं तस्मिन् न्यस्य - स्यमंतकमणी त्या अक्रूराजवळ ठेवून - शतयोजनगं - चारशे कोस वेगाने चालणार्या - अश्वं आरुह्य - घोडयावर बसून - ययौ - जाता झाला. ॥१८॥
अक्रूराने त्याला असे वाटेला लावले, तेव्हा शतधन्व्याने तो स्यमंतकमणी अक्रूराजवळ ठेव म्हणून ठेवला आणि आपण चारशे कोस सलगपणे चालणार्या घोड्यावर स्वार होऊन तेथून मोठ्या वेगाने निघून गेला. (१८)
गरुडध्वजमारुह्य रथं रामजनार्दनौ ।
अन्वयातां महावेगैः अश्वै राजन् गुरुद्रुहम् ॥ १९ ॥
भगवान् कृष्ण नी राम गरुडध्वज या रथीं । बैसले धावले तैसे श्वशूरशत्रु मारिण्या ॥ १९ ॥
राजन् - हे राजा - रामजनार्दनौ - बलराम व श्रीकृष्ण - गरुडध्वजं रथम् आरुह्य - ज्याच्या ध्वजावर गरुड बसला आहे अशा रथात बसून - महावेगैः अश्वैः - मोठया वेगाने धावणार्या घोडयांच्या योगे - गुरुद्रुहुं अन्वयाताम् - गुरूचा द्रोह करणार्या शतधन्व्याचा पाठलाग करिते झाले. ॥१९॥
राजन ! गरुडचिन्ह असलेला ध्वज ज्याच्यावर फडकत होता आनि अतिशय वेगवान घोडे ज्याला जोडले होते, त्या रथावर आरूढ होऊन राम-कृष्ण सासर्याला मारणार्या शतधन्व्याचा पाठलाग करू लागले. (१९)
मिथिलायामुपवने विसृज्य पतितं हयम् ।
पद्भ्यामधावत् सन्त्रस्तः कृष्णोऽप्यन्वद्रवद्रुषा ॥ २० ॥
मिथीलापुरिच्या पाशी घोड्या वरुनि शत्रु तो । पडता पळता पायी क्रोधे मागेचि कृष्ण तो ॥ २० ॥
मिथिलायां उपवने - मिथिलेतील उपवनात - पतितं हयं विसृज्य - पडलेल्या घोडयाला सोडून - संत्रस्तः पद्भ्याम् अधावत् - पीडित झालेला असा पायांनीचा धावू लागला - कृष्णः अपि रूषा अन्वद्रवत् - श्रीकृष्णहि क्रोधाने त्याच्या मागोमाग धावला. ॥२०॥
मिथिलेच्या जवळ एका उपवनात शतधन्व्याचा घोडा जमिनीवर कोसळला. त्यामुळे तो घोड्याला तेथेच टाकून पायीच पळू लागला. तो अत्यंत भयभीत झाला होता. श्रीकृष्णसुद्धा रागाने त्याचा पाठलाग करू लागले. (२०)
पदातेर्भगवांस्तस्य पदातिस्तिग्मनेमिना ।
चक्रेण शिर उत्कृत्य वाससो व्यचिनोन्मणिम् ॥ २१ ॥
गाठी पायीच नी त्याला चक्रशस्त्र करोनिया । छेदिले शीर ते त्याचे मणी तो वस्त्रि शोधला ॥ २१ ॥
पदातिः भगवान् - पायाने धावणारा श्रीकृष्ण - पदातेः तस्य - पायाने धावणार्या शतधन्व्याचे - शिरः - मस्तक - तिग्मनेमिना चक्रेण उत्कृत्य - तीक्ष्ण धारेच्या सुदर्शन चक्राने तोडून - (तस्य) वाससोः मणिं व्यचिनोत् - त्याच्या दोन्ही वस्त्रांमध्ये स्यमंतकमणी शोधिता झाला. ॥२१॥
शतधन्वा पायीच पळत होता. म्हणून भगवंतांनीसुद्धा पायीच त्याचा पाठलाग करून तीक्ष्ण धारेच्या सुदर्शन चक्राने त्याचे मस्तक छाटले आणि त्याच्या अंगावरील कपड्यांत स्यमंतकमण्याचा शोध घेतला. (२१)
अलब्धमणिरागत्य कृष्ण आहाग्रजान्तिकम् ।
वृथा हतः शतधनुः मणिस्तत्र न विद्यते ॥ २२ ॥
व्यर्थची मारिले याते न मणी याज पासि तो । वदला कृष्ण तो ऐसा बळिरामास तेधवा ॥ २२ ॥
अलब्धमणिः कृष्णः - स्यमंतकमणी न सापडलेला श्रीकृष्ण - अग्रजान्तिकम् आगत्य - ज्येष्ठ बंधू जो बलराम त्याजवळ येऊन - आह - म्हणाला - शतधनुः वृथा हतः - शतधन्वा उगीच मारिला - तत्र मणिः न विद्यते - त्याच्यापाशी मणी नाही. ॥२२॥
परंतु मणी सापडला नाही, तेव्हा श्रीकृष्ण वडिल बंधूकडे येऊन म्हणाले, "आम्ही शतधन्व्याला उगीचच मारले. कारण त्याच्याजवळ स्यमंतकमणी नव्हता !" (२२)
तत आह बलो नूनं स मणिः शतधन्वना ।
कस्मिंश्चित् पुरुषे न्यस्तः तमन्वेष पुरं व्रज ॥ २३ ॥
बळिराम वदे कृष्णा कोणाच्या पाशि तो मणी । असेल ठेविला याने तेंव्हा जा द्वारकापुरीं ॥ २३ ॥
ततः बलः आह - तेव्हा बलराम म्हणाला - सः मणिः - तो मणी - शतधन्वना नूनं कस्मिंश्चित् पुरुषे न्यस्तः - शतधन्व्याने खरोखर कोणत्या तरी पुरुषाजवळ ठेविला असावा - तं अन्वेष (ततः) पुरं व्रज - त्याला शोध, व नंतर नगरीत जा. ॥२३॥
तेव्हा बलराम म्हणाले, "शतधन्व्याने स्यमंतकमणी कोणाजवळ तरी ठेवला आहे, यात शंका नाही. आता तू द्वारकेला जा आणि त्याचा शोध घे. (२३)
अहं वैदेहमिच्छामि द्रष्टुं प्रियतमं मम ।
इत्युक्त्वा मिथिलां राजन् विवेश यदुनन्दनः ॥ २४ ॥
विदेहीनृप तो मित्र भेटू मी इच्छितो तया । यदुवंशविरो गेला वदता मिथिलापुरा ॥ २४ ॥
अहं मम प्रियतमं विदेहं द्रष्टुं इच्छामि - मी माझ्या अत्यंत प्रिय अशा जनकराजाला भेटू इच्छितो - इति उक्त्वा - असे बोलून - राजन् - हे राजा - यदुनन्दनः - बलराम - मिथिलां विवेश - मिथिला नगरीत शिरला. ॥२४॥
मला विदेहराजाची भेट घ्यावयाची आहे. कारण तो माझा अतिशय प्रिय मित्र आहे." परीक्षिता ! असे म्हणून बलराम मिथिला नगरीमध्ये गेले. (२४)
तं दृष्ट्वा सहसोत्थाय मैथिलः प्रीतमानसः ।
अर्हयां आस विधिवद् अर्हणीयं समर्हणैः ॥ २५ ॥
आनंदे भरला राजा पाहता बलरामला । त्वरीत योजिल्या वस्तू आसनी पूजिले बलां ॥ २५ ॥
मैथिलः - जनकराजा - तं दृष्टवा सहसा उत्थाय - त्या बलरामाला पाहून एकाएकी उठून - प्रीतमानसः - प्रसन्न अंतःकरण झालेला - अर्हणीयं (तं) - पूज्य अशा त्या बलरामाला - समर्हणैः विधिवत् अर्हयामास - पूजासामग्रीने यथाशास्त्र पूजिता झाला. ॥२५॥
पूजनीय बलरामांना येताना पाहून मिथिलाधिपतीचे हृदय आनंदाने भरून आले. त्याने ताबडतोब आसनावरून उठून पूजासाहित्याने त्यांची यथासांग पूजा केली. (२५)
उवास तस्यां कतिचिन् मिथिलायां समा विभुः ।
मानितः प्रीतियुक्तेन जनकेन महात्मना । ततोऽशिक्षद् गदां काले धार्तराष्ट्रः सुयोधनः ॥ २६ ॥
कितेक दिन ते तेथे राहिले मिथिलापुरीं । महात्मा जनकाने तै सन्मान बहु अर्पिला । शिके दुर्योधनो तेथे गदायुद्ध बळी कडे ॥ २६ ॥
विभुः - व्यापक असा बलराम - तस्यां मिथिलायां - त्या मिथिलानगरीत - प्रीतियुक्तेन महात्मना जनकेन मानितः - प्रेमळ व थोर मनाच्या जनकाने सत्कारिलेला असा - कतिचित् समाः उवास - कित्येक वर्षे राहिला - ततः - त्याच्यापासून - धार्तराष्ट्रः सुयोधनः - धृतराष्ट्राचा पुत्र दुर्योधन - काले गदां अशिक्षत् - योग्य काळी गदाविद्या शिकला. ॥२६॥
यानंतर बलराम काही वर्षे मिथिला नगरीतच राहिले. महात्मा जनकाने अतिशय प्रेमाने आणि सन्मानाने त्यांना ठेवून घेतले. यानंतर योग्य वेळी धृतराष्ट्र-पुत्र सुयोघनाने बलरामांकडून गदायुद्धाचे शिक्षण घेतले. (२६)
विवरण :- अक्रूर आणि कृतवर्मा यांच्या सांगण्यावरून शतधन्व्याने सत्राजितास ठार मारून स्यमंतक मणी मिळविला. परंतु नंतर जीवाच्या भीतीने तो अक्रूराजवळ देऊन तो वेगवान घोडयावर बसून द्वारकेतून पळाला. कृष्णाने त्याचा पाठलाग करून त्यास ठार मारले व त्याच्या वस्त्रांमध्ये तो मणी शोधू लागला. परंतु मणी कुठेच मिळाला नाही. त्याने तसे बलरामास सांगितले. हे सर्व पहाता असे वाटते की मणी शतधन्व्याकडे नाही, अक्रूराकडे आहे हे सर्वज्ञ कृष्णास माहीत थोडेच नसणार ? परंतु बलरामासही कृष्णाबद्दलची शंका आली असावी (मणी कृष्णाजवळच आहे अशी) आणि ती शंका दूर करण्यास त्याने मुद्दामच बलरामासमोर शतधन्व्याचा वध करून त्याच्याजवळ मणी शोधण्याचा देखावा केला असावा. कदाचित बलरामासही हे सर्व माहीत असावे आणि मिथिलेला जाण्याच्या उत्सुकतेमुळे कृष्णाला द्वारकेला जाण्यास सांगून स्वतः मिथिलेकडे प्रयाण केले असावे. कृष्णलीलेचा हा एक असाही भाग ! (२५-२६)
केशवो द्वारकामेत्य निधनं शतधन्वनः ।
अप्राप्तिं च मणेः प्राह प्रियायाः प्रियकृद् विभुः ॥ २७ ॥
इकडे कृष्ण ते आले द्वारकी वदले तदा । न मिळे मणि तो तेथे शतधन्व्यासि मारुनी ॥ २७ ॥
प्रियायाः प्रियकृत् विभुः केशवः - पत्नी जी सत्यभामा तिचे प्रिय करणारा सर्वव्यापी श्रीकृष्ण - द्वारकां एत्य - द्वारकेत येऊन - शतधन्वनः निधनं - शतधन्व्याचा मृत्यू - मणेः च अप्राप्तिं प्राह - व स्यमंतकमण्याची प्राप्ति न झाल्याचे सांगता झाला. ॥२७॥
प्रिय पत्नी सत्यभामेचे आवडते कार्य करून भगवान श्रीकृष्ण द्वारकेला परतले आणि त्यांनी शतधन्व्याला मारले, परंतु स्यमंतकमणी त्याच्याजवळ मिळाला नाही, असे त्यांनी सत्यभामेला सांगितले. (२७)
ततः स कारयामास क्रिया बन्धोर्हतस्य वै ।
साकं सुहृद्भिर्भगवान् या याः स्युः साम्परायिकीः ॥ २८ ॥
और्ध्वदेहिक क्रीया ती श्वशूर प्रेतिची तदा । भावकी जमवोनीया कृष्णे आटोपिले असे ॥ २८ ॥
ततः सः भगवान् - नंतर तो श्रीकृष्ण - सुहृद्भिः साकं - बांधवांसह - याः याः सांपरायिकाः क्रियाः स्युः - ज्या ज्या पारलौकिक क्रिया आहेत - (ताः) - त्या - हतस्य बन्धोः वै कारयामास - मेलेल्या सत्राजिताच्या खरोखर करविता झाला. ॥२८॥
त्यानंतर त्यांनी बांधवांसह आपले सासरे सत्राजित यांच्या सर्व और्ध्वदैहिक क्रिया करविल्या. (२८)
अक्रूरः कृतवर्मा च श्रुत्वा शतधनोर्वधम् ।
व्यूषतुर्भयवित्रस्तौ द्वारकायाः प्रयोजकौ ॥ २९ ॥
अक्रूर कृतवर्माने शतधन्वासि प्रेरिता । सत्राजित् मारिला तेणे पळाले भिउनी द्वय ॥ २९ ॥
प्रयोजकौ अक्रूरः कृतवर्मा च - शतधन्व्याचे प्रेरक अक्रूर आणि कृतवर्मा - शतधनोः वधं श्रुत्वा - शतधन्व्याचा वध ऐकून - भयवित्रस्तौ - भीतीने गांगरून गेलेले असे - द्वारकायाः व्यूषतुः - द्वारकेतून निघून गेले. ॥२९॥
अक्रूर आणि कृतवर्मा यांनी शतधन्व्याला सत्राजिताच्या वधासाठी उद्युक्त केले होते. म्हणून श्रीकृष्णांनी शतधन्व्याला मारलेले ऐकून ते अत्यंत भयभीत होऊन द्वारकेतून पळून गेले. (२९)
अक्रूरे प्रोषितेऽरिष्टानि आसन्वै द्वारकौकसाम् ।
शारीरा मानसास्तापा मुहुर्दैविकभौतिकाः ॥ ३० ॥ इत्यङ्गोपदिशन्त्येके विस्मृत्य प्रागुदाहृतम् । मुनिवासनिवासे किं घटेतारिष्टदर्शनम् ॥ ३१ ॥
वदती लोक ते कांही अक्रूर पळता असा । उत्पात द्वारकीं झाले कष्टही पडले जनां ॥ ३० ॥ बोलती काल ते आज सर्वा विस्मृति ती घडे । पवित्र कृष्ण तो जेथे अशूभ तेथ कायसे ॥ ३१ ॥
अक्रूरे प्रोषिते - अक्रूर द्वारकेतून निघून गेला असता - द्वारकौकसां अरिष्टानि आसन् वै - द्वारकावासी जनांना दुश्चिन्हे होऊ लागली - दैविकभौतिकाः - आधिदैविक व आधिभौतिक असे - शारीराः मानसाः तापाः मुहुः (अभजन्) - शारीरिक व मानसिक असे ताप वारंवार होऊ लागले. ॥३०॥ अङग - हे राजा - एके - कित्येक लोक - प्रागुदाहृतं विस्मृत्य - पूर्वी सांगितलेल्या श्रीकृष्ण माहात्म्याला विसरून - मुनिवासनिवासे - मुनींचे निवासस्थान अशा श्रीकृष्णाच्या रहाण्याच्या ठिकाणी - अरिष्टदर्शनं घटेत किं - दुश्चिन्हे उद्भवणे संभवनीय आहे काय ? असे म्हणू लागले. ॥३१॥
परीक्षिता ! काही लोक म्हणतात की, अक्रूर द्वारकेतून निघून गेल्यानंतर द्वारकेत राहणार्यांना अनेक प्रकारच्या संकटांना तोंड द्यावे लागले. दैविक आणि भौतिक कारणांनी तेथील नागरिकांना वारंवार शारीरिक आणि मानसिक कष्ट सहन करावे लागले. परंतु जे असे म्हणतात, ते या अगोदर सांगितलेल्या गोष्टी विसरून जातात. ज्या श्रीकृष्णांच्यामध्ये सर्व मुनी निवास करतात, त्यांचे निवासस्थान असलेल्या द्वारकेत उपद्रव होईल, हे कधीतरी शक्य आहे काय ? (३०-३१)
विवरण :- शतधन्व्याकडे शोध करूनहि मणी मिळाला नाही असे द्वारकेला परत आल्यानंतर कृष्णाने सत्यभामेस सांगितले. इथे बलरामाप्रमाणेच सत्यभामेलाहि कृष्णाने खरी खरी वस्तुस्थिती सांगितली नाही, असे दिसते. श्रीकृष्णाचा यामागेहि निश्चितच काही हेतू असावा. (३१)
देवेऽवर्षति काशीशः श्वफल्कायागताय वै ।
स्वसुतां गान्दिनीं प्रादात् ततोऽवर्षत् स्म काशिषु ॥ ३२ ॥ तत्सुतस्तत्प्रभावोऽसौ अक्रूरो यत्र यत्र ह । देवोऽभिवर्षते तत्र नोपतापा न मारीकाः ॥ ३३ ॥ इति वृद्धवचः श्रुत्वा नैतावदिह कारणम् । इति मत्वा समानाय्य प्राहाक्रूरं जनार्दनः ॥ ३४ ॥
वृद्ध ते वदले कोणी काशिराज्यात एकदा । दुष्काळ पडला तेंव्हा श्वफल्का गादिनंदिनी ॥ ३२ ॥ देवोनी लग्न ते केले तेंव्हाच वृष्टी जाहली । अक्रूर पुत्र तो त्यांचा त्याचाही तो प्रभावकी । जेथे तो निवसे तेथे रोग-राई न होतसे ॥ ३३ ॥ कृष्णाने जाणिले सर्व तरीही अक्रुरास त्या । शोधिले भृत्य धाडोनी नी बोलावुनि घेतले ॥ ३४ ॥
काशीशः - काशीपति - काशिषु देवे अवर्षति - काशीदेशामध्ये पाऊस पडत नाहीसा झाला असता - आगताय श्वफल्काय - आलेल्या श्वफल्काला - स्वसुतां गांदिनी वै प्रादात् - आपली कन्या जी गांदिनी ती खरोखर देता झाला - ततः अवर्षत् स्म - नंतर पाऊस पडला. ॥३२॥ तत्प्रभावः तत्सुतः असौ अक्रूरः - तसाच पराक्रम करणारा त्या श्वफल्काचा पुत्र अक्रूर - यत्र यत्र आस्ते तत्र देवः अभिवर्षते ह - जेथे जेथे असतो तेथे तेथे पाऊस पडतो - उपतापाः न - व त्रिविध ताप होत नाहीत - मारिकाः न - कालर्यासारखे मारक रोग होत नाहीत. ॥३३॥ इति वृद्धवचः श्रुत्वा - असे वृद्धांचे भाषण ऐकून - एतावत् इह कारणं न इति मत्वा - एवढेच केवळ ह्याला कारण नाही असे मानून - जनार्दनः अक्रूरं समानाय्य प्राह - श्रीकृष्ण अक्रूराला बोलावून म्हणाला. ॥३४॥
त्यावेळी नगरातील वृद्ध नागरिक म्हणाले- "एकदा काशीनरेशाच्या राज्यामध्ये पाऊस पडत नव्हता. तेव्हा त्यांनी आपल्या राज्यात आलेल्या अक्रूराचा पिता श्वफल्क याला आपली कन्या गांदिनी दिली. तेव्हा त्या राज्यात पाऊस पडला. अक्रूरसुद्धा श्वफल्काचाच पुत्र आहे आणि त्याचाही तसाच प्रभाव आहे. म्हणून तो जेथे राहातो, तेथे भरपूर पाऊस पडतो. आणि तेथे कोणत्याही प्रकारचे कष्ट, रोगराई इत्यादी उपद्रव होत नाहीत." परीक्षिता ! त्या लोकांचे म्हणणे ऐकून भगवंतांनी विचार केला की, "या उपद्रवाचे एवढे एकच कारण नाही." हे माहीत असूनसुद्धा भगवंतांनी दूत पाठवून अक्रूराला शोधून आणून त्याला म्हटले. (३२-३४)
विवरण :- शतधन्व्याप्रमाणे श्रीकृष्ण आपणांसहि ठार करेल या भीतीने अक्रूर आणि कृतवर्म्याने द्वारकेतून पळ काढला. मात्र इथे एक शंका येते, अक्रूराला श्रीकृष्णाच्या सर्वज्ञतेबद्दल कल्पना नसेल का ? आपल्याजवळच मणी आहे हे माहीत असून मुद्दामच कृष्ण हा देखावा करत असावा, असे त्यास वाटले असावे. शिवाय हे माहीत असूनहि मण्याचा लोभ त्याला सुटला नसावा. (३३)
पूजयित्वाभिभाष्यैनं कथयित्वा प्रियाः कथाः ।
विज्ञताखिलचित्तज्ञः स्मयमान उवाच ह ॥ ३५ ॥
गोड त्या बोलला कृष्ण तसे स्वागतिले असे । भगवान् जाणितो चित्त तेंव्हा हासुनि बोलला ॥ ३५ ॥
विदिताखिलचित्तज्ञः स्मयमानः (सः) - सर्वांच्या अन्तःकरणांतील अभिप्राय जाणणारा व मंद हास्य करणारा तो श्रीकृष्ण - एनं पूजयित्वा - ह्या अक्रूराची पूजा करून - अभिभाष्य - विचारपूस करून - प्रियाः कथाः कथयित्वा - आवडत्या कथा सांगून - उवाच ह - बोलला. ॥३५॥
भगवंतांनी त्याचा मोठा सत्कार केला आणि गोड-गोड बोलून त्याच्याशी संभाषण केले. नंतर सर्वांचे अंत:करण जाणणारे भगवान हसत हसत अक्रूराला म्हणाले. (३५)
ननु दानपते न्यस्तः त्वय्यास्ते शतधन्वना ।
स्यमन्तको मणिः श्रीमान् विदितः पूर्वमेव नः ॥ ३६ ॥
धर्म तो पाळिता तुम्ही आम्हा माहित की मणी । शतधन्वे तुम्हापाशी ठेविला तो सुरक्षित ॥ ३६ ॥
दानपते - हे दान देणार्यांमध्ये श्रेष्ठ अक्रूरा - शतधन्वना - शतधन्वाने - त्वयि - तुझ्या ठिकाणी - श्रीमान् स्यमन्तकः मणिः - शोभायमान स्यमंतक मणी - ननु न्यस्तः आस्ते - खरोखर ठेव म्हणून ठेविली आहे. ॥३६॥
हे दानशूर काका ! संपत्ती देणारा स्यमंतकमणी शतधन्व्याने आपल्याजवळ ठेवला आहे, ही गोष्ट आम्हांला अगोदरच माहीत होती. (३६)
सत्राजितोऽनपत्यत्वाद् गृह्णीयुर्दुहितुः सुताः ।
दायं निनीयापः पिण्डान् विमुच्यर्णं च शेषितम् ॥ ३७ ॥
सत्राजिता न पुत्रो नी पुत्रीचे पुत्रची पुढे । पिंडदान करोनीया होती वारस त्याचिये ॥ ३७ ॥
सत्राजितः अनपत्यत्वात् - सत्राजिताला पुत्र नसल्यामुळे - दुहितुः सुताः - मुलीचे मुलगे - अपः पिण्डान् च निनीय - त्याला पाणी व पिंड देऊन - ऋणं च विमुच्य - आणि त्याला तीन्ही ऋणांतून मुक्त करून - शेषितं दायं - उरलेले धन - गृह्णीयुः - घेवोत. ॥३७॥
सत्राजिताला पुत्र नसल्यामुळे त्याच्या मुलीची मुलेच त्यांना तिलांजली देऊन पिंडदान करतील, त्याचे ऋणही फेडतील आणि त्यातून जे काही शिल्लक राहील, त्याचे उत्तराधिकारी होतील. (३७)
तथापि दुर्धरस्त्वन्यैः त्वय्यास्तां सुव्रते मणिः ।
किन्तु मामग्रजः सम्यङ् न प्रत्येति मणिं प्रति ॥ ३८ ॥
स्यमंतक मणी तेंव्हा मिळावा आमुच्या मुलां । तरीही ठेवणे तुम्हा पाशी ते गैरही नसे । परी श्री बलरामो हे विश्वास नच ठेविती ॥ ३८ ॥
तथापि - तरी - अन्यैः दुर्धरः मणिः तु - दुसर्यांनी धारण करण्यास कठीण असा स्यमंतकमणी मात्र - त्वयि आस्तां - तुझ्याजवळ राहो - किंतु - परंतु - अग्रजः - ज्येष्ठ बंधु बलराम - मणिं प्रति - मण्याच्या बाबतीत - मां सम्यक् न प्रत्येति - माझ्यावर चांगला विश्वास ठेवीत नाहीत. ॥३८॥
अशारीतीने जरी तो मणी माझ्याकडेच असला पाहिजे, तरीसुद्धा तो तुमच्याजवळच ठेवा. कारण आपण व्रतनिष्ठ आहात. शिवाय तो मणी इतरांना सांभाळणे कठीण आहे. परंतु माझ्या थोरल्या बंधूंना त्या मण्यासंबंधी माझ्यावर विश्वास नाही. (३८)
दर्शयस्व महाभाग बन्धूनां शान्तिमावह ।
अव्युच्छिन्ना मखास्तेऽद्य वर्तन्ते रुक्मवेदयः ॥ ३९ ॥
म्हणोनी हो महाभागा संशयो दूर तो करा । मणीप्रभाव मेळोनी तुम्ही यज्ञास योजिता । सुवर्ण वेदिही तेथे निर्मितात पुनः पुन्हा ॥ ३९ ॥
महाभाग - हे थोर भाग्याच्या अक्रूरा - (तस्मात्) (तं) दर्शयस्व - ह्यासाठी स्यमंतकमणी दाखीव - बंधूनां शांतिम् आवह - व बांधवांना शांति दे - अद्य ते रुक्मवेदयः मखाः - आज तुझे सुवर्णाची वेदी असणारे यज्ञ - अव्युच्छिन्नाः वर्तन्ते - अखंड चालले आहेत. ॥३९॥
म्हणून हे अक्रूरा ! आपण तो मणी दाखवून आमच्या बांधवांची शंका दूर करून त्यांना समाधान द्या. त्या मण्याच्या सामर्थ्यावर आपण आजकाल लागोपाठ सोन्याची वेदी बनवून यज्ञ करीत आहात. (३९)
एवं सामभिरालब्धः श्वफल्कतनयो मणिम् ।
आदाय वाससाच्छन्नः ददौ सूर्यसमप्रभम् ॥ ४० ॥
समजावी असा कृष्ण तेंव्हा तो कपड्यातला । काढिला मणि नी कृष्णा अक्रुरे दिधला असे ॥ ४० ॥
एवं सामभिः आलब्धः - याप्रमाणे शांततेच्या उपायांनी उपदेशिलेला - श्वफल्कतनयः - श्वफल्काचा पुत्र अक्रूर - वाससा आच्छन्नं - वस्त्राने गुंडाळलेला - सूर्यसमप्रभम् - सूर्याप्रमाणे तेज असणारा - मणिम् आदाय - स्यमंतक मणी घेऊन - (कृष्णाय) ददौ - कृष्णाला देता झाला. ॥४०॥
श्रीकृष्णांनी अशाप्रकारे त्याची समजूत घातली, तेव्हा अक्रूराने वस्त्रात लपवून ठेवलेला तो सूर्यासारखा प्रकाशमान मणी बाहेर काढला आणि श्रीकृष्णांना दिला. (४०)
स्यमन्तकं दर्शयित्वा ज्ञातिभ्यो रज आत्मनः ।
विमृज्य मणिना भूयः तस्मै प्रत्यर्पयत् प्रभुः ॥ ४१ ॥
कृष्णाने भावुकीला तो स्यमंत मणि दाविला । कलंक धुतला सर्व अक्रूरा दिधला पुन्हा ॥ ४१ ॥
प्रभुः - श्रीकृष्ण - स्यमंतकं ज्ञातिभ्यः दर्शयित्वा - स्यमंतक बांधवांना मणी दाखवून - आत्मनः रजः मणिना विसृज्य - आपल्यावरील आरोप मण्याच्या योगे दूर करून - भूयः तस्मै प्रत्यपर्यत् - पुनः त्या अक्रूराला परत देता झाला. ॥४१॥
श्रीकृष्णांनी तो स्यमंतक मणी आपल्या बांधवांना दाखवून आपल्यावर आलेला आळ दूर केला आणि तो मणी अक्रूराला परत दिला. (४१)
( प्रहर्षिणी )
यस्त्वेतद्भगवत ईश्वरस्य विष्णोः वीर्याढ्यं वृजिनहरं सुमङ्गलं च । आख्यानं पठति शृणोत्यनुस्मरेद् वा दुष्कीर्तिं दुरितमपोह्य याति शान्तिम् ॥ ४२ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे उत्तरार्धे स्यमंतकोपाख्याने सप्तपञ्चाशत्तमोऽध्यायः ॥ ५७ ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
( प्रहर्षिणी ) सर्वीं व्यापक हरिची कथा पवित्र नाशी पाप सकल नी धुते कलंक । वाची वा स्मरण करी नि कर्णि ऐके त्याचे पाप धुउनि सगळे मिळेचि शांती ॥ ४२ ॥ ॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सत्तावन्नावा अध्याय हा ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
यः तु - जो कोणी पुरुष - भगवतः ईश्वरस्य विष्णोः - षड्गुणैश्वर्यसंपन्न भगवान विष्णूचे - वीर्याढयं वृजिनहरं सुमङगलं च एतत् आख्यानं - पराक्रमाने युक्त, पातकाचे क्षालन करणारे आणि अत्यंत मंगल असे हे चरित्र - पठति शृणोति वा अनुस्मरेत् - पठण करितो, श्रवण करितो किंवा सतत स्मरतो - (सः) दुष्कीर्तिं दुरितं (च) अपोह्य - तो अपकीर्ति आणि पातक ह्यांचा नाश करून - शान्तिं याति - शांततेला प्राप्त होतो. ॥४२॥
सर्वशक्तिमान, सर्वव्यापक, भगवान श्रीकृष्णांच्या पराक्रमांनी परिपूर्ण असे हे आख्यान सगळी पापे दूर करणारे व परम मंगलमय आहे. जो हे वाचतो, ऐकतो किंवा याचे स्मरण करतो, तो सर्व प्रकारची अपकीर्ती आणि पापांपासून मुक्त होऊन शांती प्राप्त करून घेतो. (४२)
अध्याय सत्तावन्नवा समाप्त |