|
श्रीमद् भागवत पुराण
स्यमंतकोपाख्यानं, भगवनन्तः कलंक मार्जनम् स्यमंतक मण्याची कथा, जांबवती आणि सत्यभामा ह्यांच्याशी श्रीकृष्णांचा विवाह - संहिता - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् ) सत्राजितः स्वतनयां कृष्णाय कृतकिल्बिषः । स्यमन्तकेन मणिना स्वयमुद्यम्य दत्तवान् ॥ १ ॥
(अनुष्टुप् ) श्रीशुकदेव सांगतात - खोटा कलंक लावी तो कृष्णाला सतराजित । स्यमंतक तशी कन्या मार्जना अर्पिती पुन्हा ॥ १ ॥
कृतकिल्बिषः सत्राजितः - ज्याने अपराध केला आहे असा सत्राजित - स्वयम् उद्यम्य - स्वतः उद्योग करून - स्वतनयां - आपल्या कन्येला - स्यमन्तकेन मणिना (सह) - स्यमंतक नावाच्या मण्यासह - कृष्णाय दत्तवान् - श्रीकृष्णाला देता झाला ॥१॥
श्रीशुक म्हणतात- सत्राजिताने श्रीकृष्णावर खोटाच आळ घेतला होता; त्या अपराधाचे परिमार्जन करण्यासाठी त्याने स्वत: स्यमंतकमण्यासह आपली कन्या श्रीकृष्णांना दिली. (१)
श्रीराजोवाच -
सत्राजितः किमकरोद् ब्रह्मन् कृष्णस्य किल्बिषः । स्यमन्तकः कुतस्तस्य कस्माद् दत्ता सुता हरेः ॥ २ ॥
राजा परीक्षिताने विचारले - द्विजा सत्राजिते केला कोणता अपराध तो । त्याकडे तो मणि कैसा कन्या कृष्णास अर्पि कां ? ॥ २ ॥
ब्रह्मन् - हे शुकाचार्य - सत्राजितः - सत्राजित - कृष्णस्य किं किल्बिषं अकरोत् - श्रीकृष्णाचा कोणता अपराध करिता झाला - तस्य स्यमन्तकः कुतः (प्राप्तः) - त्याला स्यमंतक मणी कोठून मिळाला - (तेन) सुता हरेः कस्मात् दत्ता - त्याने मुलगी श्रीकृष्णाला काय कारणास्तव दिली ॥२॥
राजाने विचारले- ब्रह्मन ! सत्राजिताने श्रीकृष्णांचा कोणता अपराध केला होता ? त्याला स्यमंतकमणी कोठून मिळाला होता ? आणि त्याने आपली कन्या त्यांना का दिली ? (२)
श्रीशुक उवाच -
आसीत् सत्राजितः सूर्यो भक्तस्य परमः सखा । प्रीतस्तस्मै मणिं प्रादात् सूर्यस्तुष्टः स्यमन्तकम् ॥ ३ ॥
श्रीशुकदेव सांगतात - सूर्याचा भक्त तो श्रेष्ठ म्हणोनी मित्र ते द्वय । प्रसन्न होउनी सूर्ये स्यमंतक् मणि अर्पिला ॥ ३ ॥
सूर्यः - सूर्य - भक्तस्य सत्राजितः - भक्त जो सत्राजित त्याचा - परमः सखा आसीत् - श्रेष्ठ मित्र होता - तुष्टः सूर्यः - संतुष्ट झालेला सूर्य - प्रीतः - प्रसन्न होऊन - तस्मै - त्या सत्राजिताला - स्यमन्तकं मणिं प्रादात् - स्यमन्तक मणी देता झाला ॥३॥
श्रीशुक म्हणाले- भक्त असलेल्या सत्राजिताचा सूर्य हा परम मित्र होता. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन सूर्याने त्याला स्यमंतक मणी दिला होता. (३)
स तं बिभ्रन् मणिं कण्ठे भ्राजमानो यथा रविः ।
प्रविष्टो द्वारकां राजन् तेजसा नोपलक्षितः ॥ ४ ॥
धरिता मणि तो कंठी सत्राजित् भास्करा परी । आला तो द्वारकेमाजी ते जे त्या नोळखी कुणी ॥ ४ ॥
राजन् - हे परीक्षित राजा - यथा रविः तथा - जसा सूर्य त्याप्रमाणे - भ्राजमानः सः - प्रकाशणारा तो सत्राजित - तं मणिं कण्ठे बिभ्रन् - तो स्यमंतक मणी गळ्यात धारण करणारा - तस्य तेजसा नोपलक्षितः - त्या मण्याच्या तेजामुळे ओळखता न आलेला असा - द्वारकां प्रविष्टः - द्वारकेत शिरला ॥४॥
तो मणी गळ्यात घातला असता सत्राजित सूर्यासारखा चमकू लागला. परीक्षिता ! सत्राजित द्वारकेत आला, तेव्हा मण्याच्या अत्यंत तेजामुळे लोक त्याला ओळखू शकले नाहीत. (४)
तं विलोक्य जना दूरात् तेजसा मुष्टदृष्टयः ।
दीव्यतेऽक्षैर्भगवते शशंसुः सूर्यशङ्किताः ॥ ५ ॥
पाहता झाकिती नेत्र लोकांना सूर्य वाटला । लोक ते सांगती कृष्णा खेळे चौरस कृष्ण जै ॥ ५ ॥
तस्य तेजसा मुष्टदृष्टयः जनाः - तेजाने ज्यांची दृष्टी दिपून गेली आहे असे लोक - दूरात् तं विलोक्य - दुरूनच त्या सत्राजिताला पाहून - सूर्यशंकिताः - हा सूर्य आहे असे वाटणारे - अक्षैः दीव्यते भगवते - फाशांनी खेळणार्या श्रीकृष्णाला - शशंसुः - सांगते झाले ॥५॥
त्याला लांबूनच पाहून त्याच्या तेजाने लोकांचे डोळे दिपून गेले. लोकांना तो सूर्यच वाटला. द्यूत खेळत असलेल्या भगवंतांना त्यांनी जाऊन ही गोष्ट सांगितली. (५)
नारायण नमस्तेऽस्तु शङ्खचक्रगदाधर ।
दामोदरारविन्दाक्ष गोविन्द यदुनन्दन ॥ ६ ॥
शंख चक्र गदा धारी गोविंदा यदुनंदना । दामोदरा पंकजाक्षा तुजला प्रणिपात हा ॥ ६ ॥
शंखचक्रगदाधर नारायण - हे शंख, चक्र व गदा धारण करणार्या श्रीकृष्णा - दामोदर अरविन्दाक्ष यदुनंदन गोविंद - हे दामोदरा कमलनयना, हे यदुनंदना गोविंदा - ते नमः अस्तु - तुला नमस्कार असो ॥६॥
लोक म्हणाले. "हे शंख-चक्रगदाधारी नारायणा ! कमलनयन दामोदरा ! यदुनंदन गोविंदा ! आपणांस नमस्कार असो." (६)
एष आयाति सविता त्वां दिदृक्षुर्जगत्पते ।
मुष्णन् गभस्तिचक्रेण नृणां चक्षूंषि तिग्मगुः ॥ ७ ॥
तेजाळ तेज घेवोनी आपुल्या दर्शनास तो । चंडांक्षु सूर्य तो येतो पसरीत स्वतेज की ॥ ७ ॥
जगत्पते - हे जगन्नाथा श्रीकृष्णा - त्वां दिदृक्षुः - तुला पहाण्याची इच्छा करणारा - तिग्मगुः एषः सविता - तीक्ष्ण किरण असणारा हा सूर्य - गभस्तिचक्रेण नृणां चक्षूंषि मुष्णन् - किरणसमुहाने मनुष्यांचे डोळे दिपवीत - आयाति - येत आहे ॥७॥
हे जगदीश्वरा ! आपल्या चमकणार्या किरणांनी लोकांचे डोळे दिपवीत हा प्रखरकिरण सूर्य आपल्या दर्शनासाठी येत आहे. (७)
नन्वन्विच्छन्ति ते मार्गं त्रीलोक्यां विबुधर्षभाः ।
ज्ञात्वाद्य गूढं यदुषु द्रष्टुं त्वां यात्यजः प्रभो ॥ ८ ॥
त्रिलोकी शोधिती देव तरी तूं त्यां न भेटसी । येथे तू जाणुनी आला प्रत्यक्ष सूर्यदेव तो ॥ ८ ॥
प्रभो - हे समर्थ श्रीकृष्णा - ननु - खरोखर - विबुधर्षभाः - श्रेष्ठ देव - त्रिलोक्यां - त्रैलोक्यात - ते मार्गं अन्विच्छन्ति - तुझ्या मार्गाचा शोध करितात - अजः - सूर्य - अद्य - आज - त्वां यदुषु गूढं ज्ञात्वा - तू यदुकुळात गुप्तरीतीने रहात आहेस असे जाणून - आयाति - येत आहे ॥८॥
प्रभो ! सर्व श्रेष्ठ देव त्रैलोक्यामध्ये आपल्याला प्राप्त करण्याचा मार्ग शोधीत असतात. परंतु आपण यदुवंशात गुप्तपणे राहिला आहात, हे जाणून आज स्वत: सूर्यनारायण आपल्या दर्शनासाठी येत आहे." (८)
श्रीशुक उवाच -
निशम्य बालवचनं प्रहस्याम्बुजलोचनः । प्राह नासौ रविर्देवः सत्राजिन्मणिना ज्वलन् ॥ ९ ॥
श्रीशुकदेव सांगतात - बालकापरि हे बोल ऐकता कृष्ण हासले । सत्राजित असे तो हो मण्याने चमके असा ॥ ९ ॥
अंबुजलोचनः (सः) - कमलनेत्र श्रीकृष्ण - बालवचनं निशम्य - अज्ञानी लोकांचे भाषण ऐकून - प्रहस्य - किंचित हसून - असौ मणीना ज्वलन् सत्राजित् (अस्ति) - हा स्यमन्तक मण्याने प्रकाशणारा सत्राजित होय - देवः रविः न - प्रकाशणारा सूर्य नव्हे - (इति) आह - असे म्हणाला ॥९॥
श्रीशुक म्हणतात - अज्ञानी लोकांचे हे बोलणे ऐकून कमलनयन भगवान श्रीकृष्ण हसून म्हणाले, " अहो ! हे सूर्यदेव नाहीत. हा मण्यामुळे चमकणारा सत्राजित आहे." (९)
सत्राजित् स्वगृहं श्रीमत् कृतकौतुकमङ्गलम् ।
प्रविश्य देवसदने मणिं विप्रैर्न्यवेशयत् ॥ १० ॥
स्वताच्या घरि तो गेला मंगलोत्सव जाहला । स्यमंतक मणी विप्रे मंदिरी स्थापिला असे ॥ १० ॥
सत्राजित् - सत्राजित - विप्रैः कृतकौतुकमङ्गलं - ब्राह्मणांकडून ज्यात मंगलोत्सव करविले आहेत अशा - श्रीमत् स्वगृहं प्रविश्य - आपल्या शोभायमान घरात शिरून - देवसदने मणिं न्यवेशयत् - देवघरात स्यमंतक मणी स्थापिता झाला ॥१०॥
यानंतर सत्राजित आपल्या मंगल उत्सव चालू असलेल्या समृद्ध घरामध्ये आला. ब्राह्मणांकरवी त्याने तो मणी देवघरात स्थापन केला. (१०)
दिने दिने स्वर्णभारान् अष्टौ स सृजति प्रभो ।
दुर्भिक्षमार्यरिष्टानि सर्पाधिव्याधयोऽशुभाः । न सन्ति मायिनस्तत्र यत्रास्तेऽभ्यर्चितो मणिः ॥ ११ ॥
प्रतीदिन मणी देई आठभार सुवर्ण ते । जेथे तो पूजिला जाई तेथे दुर्भिक्ष ना कधी । ग्रहपीडा महामारी अशूभ कोणते नसे ॥ ११ ॥
प्रभो - हे परीक्षित राजा - सः - तो मणी - दिनेदिने - प्रतिदिवशी - अष्टौ स्वर्णभारान् सृजती - आठ भार सुवर्ण बाहेर टाकितो - यत्र मणीः अभ्यर्चितः आस्ते - जेथे मणी पूजिला जातो - तत्र - तेथे - अशुभाः - अकल्याण करणारे - दुर्भिक्षमार्यरिष्टानि सर्पाधिव्याधयः (च) - दुष्काळ, महामारी, अपशकुन, साप, चिंता व रोग - न सन्ति - होत नाहीत - मायिनः न सन्ति - कपटी लोक असत नाहीत ॥११॥
परीक्षिता तो मणी दररोज आठ भार सोने देत असे. आणि जेथे त्याचे पूजन होत असे, तेथे दुर्भिक्ष, महामारी, ग्रहपीडा, सर्पभय, मानसिक आणि शारीरिक व्यथा तसेच निरनिराळ्या मायांचा उपद्रव इत्यादी काहीही अशुभ घडत नसे. (११)
स याचितो मणिं क्वापि यदुराजाय शौरिणा ।
नैवार्थकामुकः प्रादाद् याच्ञाभङ्गमतर्कयन् ॥ १२ ॥
प्रसंगी एकदा कृष्ण वदला सतराजिता । उग्रसेना मणि द्यावा परी ना मानि तो तदा ॥ १२ ॥
क्व अपि - एकदा - शौरिणा यदुराजाय मणिं याचितः सः - श्रीकृष्णाने उग्रसेनाकरिता मण्याची याचना केलेला तो सत्राजित - अर्थकामुकः (सन्) - द्रव्याची इच्छा करणारा असल्यामुळे - याञ्चाभङ्गम् अतर्कयत् - याचनेच्या भंगाचा विचार न करिता - न एव प्रादात् - देता झाला नाही ॥१२॥
एकदा प्रसंवशात श्रीकृष्ण त्याला म्हणाले, "सत्राजिता ! तू तुझ्याजवळचा मणी राजा उग्रसेन यांना दे." परंतु तो लोभी असल्यामुळे त्याने तो मणी दिला नाही. यामुळे भगवंतांच्या आज्ञेचे उल्लंघन होईल, याचा विचारही त्याच्या मनात आला नाही. (१२)
तमेकदा मणिं कण्ठे प्रतिमुच्य महाप्रभम् ।
प्रसेनो हयमारुह्य मृगायां व्यचरद् वने ॥ १३ ॥
प्रसेन बंधु तो त्याचा एकदा मणि धारुनी । रात्री वनात तो गेला शिकार करण्या पहा ॥ १३ ॥
एकदा - एके दिवशी - प्रसेनः - प्रसेन - महाप्रभं तं मणिं - तो मोठा तेजस्वी मणी - कंठे प्रतिमुच्य - गळ्यात घालून - हयं आरुह्य - घोड्यावर बसून - वने मृगयां व्यचरत् - अरण्यात जाऊन मृगया करिता झाला ॥१३॥
एके दिवशी सत्राजिताचा भाऊ प्रसेन याने तो अतिशय प्रकाशमान मणी आपल्या गळ्यात घातला आणि घोड्यावर स्वार होऊन तो शिकारीसाठी वनात गेला. (१३)
प्रसेनं सहयं हत्वा मणिमाच्छिद्य केशरी ।
गिरिं विशन्जाम्बवता निहतो मणिमिच्छता ॥ १४ ॥
सिंहे एके तिथे त्याला अश्वाला ठार मारुनी । घेवोनी मणि तो गेला गुंफेत आपुल्या तदा । सिंहाला जांबवानाने मारोनी मणि घेतला ॥ १४ ॥
केसरी - सिंह - सहयं प्रसेनं हत्वा - घोड्यासह प्रसेनाला मारून - मणीं आच्छिद्य - मणी हरण करून - गिरिं विशन् - पर्वताच्या गुहेत शिरत असता - मणीम् इच्छता जाम्बवता - मण्याची इच्छा करणार्या जांबवानाने - निहतः - मारून टाकिला ॥१४॥
तेथे एका सिंहाने घोड्यासह प्रसेनाला मारून तो मणी काढून घेतला. तो आता पर्वतात शिरणार इतक्यात जांबवानाने त्या मण्यासाठी त्याला मारले. (१३)
सोऽपि चक्रे कुमारस्य मणिं क्रीडनकं बिले ।
अपश्यन्भ्रातरं भ्राता सत्राजित् पर्यतप्यत ॥ १५ ॥
त्याने तो आपुल्या बाळा गुंफेत खेळण्या दिला । झाले सत्राजिता दुःख बंधू ना परते जधी ॥ १५ ॥
सः अपि - तो जांबवान सुद्धा - बिले - गुहेत - (तं) कुमारस्य मणीं क्रीडनकं चक्रे - त्या मण्याला मुलाचे खेळणे करिता झाला - भ्राता सत्राजित् - भाऊ सत्राजित - भ्रातरं अपश्यन् - भाऊ जो प्रसेन त्याला न पाहून - पर्यतप्यत - दुःखी झाला ॥१५॥
तो मणी आपल्या गुहेमध्ये नेऊन त्याने तो मुलाला खेळावयास दिला. आपला भाऊ परत न आल्याचे पाहून सत्राजिताला अतिशय दु:ख झाले. (१५)
प्रायः कृष्णेन निहतो मणिग्रीवो वनं गतः ।
भ्राता ममेति तच्छ्रुत्वा कर्णे कर्णेऽजपन्जनाः ॥ १६ ॥
संशयो घेतला त्याने कृष्णाने बंधू मारिला । ऐकता बोल हे त्याचे पुरीं कुजबूज जाहली ॥ १६ ॥
मणीग्रीवः वनं गतः मम भ्राता - स्यमंतकमणी गळ्यात आहे ज्याच्या असा अरण्यात नेलेला माझा भाऊ - प्रायः कृष्णेन निहतः - बहुतकरून श्रीकृष्णाने मारिला असावा - इति श्रुत्वा - असे ऐकून - जनाः कर्णेकर्णे अजपन् - लोक आपापसात, कानांशी कुजबुजू लागले ॥१६॥
गळ्यात मणी घालून वनात गेलेल्या माझ्या भावाला श्रीकृष्णानेच मारले असावे." सत्राजिताचे हे म्हणणे ऐकून लोकही आपापसात तेच कुजबुजू लागले. (१६)
विवरण :- भाऊ प्रसेन याच्याजवळील (स्यमंतक) मणी सिंहाने हिरावून घेतला आणि त्यास ठार केले, ही वस्तुस्थिती सत्राजितास माहीत नसल्याने मण्याच्या लोभाने कृष्णानेच आपल्या भावास मारले, असा त्याचा गैरसमज झाला. दुःखाची गोष्ट म्हणजे ही गोष्ट कर्णोपकर्णी झाली अन बर्याचशा द्वारकावासीयांचाहि श्रीकृष्णाच्याबद्दल गैरसमज होऊ लागला. इथे सामान्य लोकांची मनोवृत्ती दिसून येते. वास्तविक कृष्णावर त्यांचे निरतिशय प्रेम होते. त्याला ते लहानपणापासून ओळखत होते. देवतुल्य मानत होते. इतके असूनहि कृष्णाबद्दल त्यांच्या मनात शंका, अविश्वास निर्माण झाला, यावरून त्यांची चंचल, उथळ आणि अपरिपक्व बुद्धीच दिसून येते. ऐकीव गोष्टीवर विचार न करता विश्वास ठेवणे हे किती चुकीचे हेही समजून येते. इकडे कृष्णही अत्यंत व्यथित झाला. वास्तविक त्याच्या दृष्टीने हे योग्य नव्हते. कारण तो सामान्य नव्हता, स्थितप्रज्ञ होता. पण ज्या सामान्य लोकांचा तो राजा होता, त्यांच्या मनस्थितीचा विचार करणे त्याला आवश्यक होते. खोटी गोष्टही सतत अनेकदा अनेकांकडून कानावर पडली तर ती खरी वाटते, हा नियम असल्याने आपल्याबद्दल सर्वांचा गैरसमज होऊ नये, म्हणून त्याने मण्याचा शोध करण्यास प्रारंभ केला. (मोठया व्यक्तींच्याबद्दल आणखीही एक गोष्ट, ती म्हणजे अपकीर्ती ही त्यांना मरणाहूनहि भयंकर वाटते. कृष्ण त्यामुळे अधिक व्यथित झाला.) शिवाय त्याला तो मणी स्वतःसाठी नकोच होता. (ज्याने सोन्याची द्वारका उभारली, त्याला कमी काय ?) तर असा मणी राजाजवळ असावयास हवा, म्हणून त्याने तो उग्रसेनासाठी मागितला होता. रोज आठ भार सोने देणारी, सर्व आधि-व्याधि नष्ट करणारी वस्तु वैयक्तिक असणे धोक्याचेच होते. आणि ती सार्वजनिक व राष्ट्रीय असणे हे त्या वस्तुच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही योग्य होते. या सर्व घटनांवरून जनमानसाच्या मताचा आदर करण्याची कृष्णाची वृत्तीही दिसून येते. (१६)
भगवान् तदुपश्रुत्य दुर्यशो लिप्तमात्मनि ।
मार्ष्टुं प्रसेनपदवीं अन्वपद्यत नागरैः ॥ १७ ॥
कृष्णाने जाणिले सर्व कलंक लागतो असा । सभ्य लोकां सवे कृष्ण धुंडिण्या वनि पातले ॥ १७ ॥
भगवान् - श्रीकृष्ण - तत् उपश्रुत्य - ते ऐकून - आत्मनि लिप्तं दुर्यशः मार्ष्टुं - आपल्यावर लादलेली दुष्कीर्ति दूर करण्याकरिता - नागरैः प्रसेनपदवीम् अन्वपद्यत - द्वारकावासी जनांसह प्रसेनाच्या मार्गाला अनुसरता झाला ॥१७॥
श्रीकृष्णांनी जेव्हा हे ऐकले, तेव्हा आपल्याला लागलेला हा कलंक पुसून टाकण्यासाठी, ते नगरातील काही पुरुषांना बरोबर घेऊन प्रसेनाला शोधण्यासाठी वनात गेले. (१७)
हतं प्रसेनं अश्वं च वीक्ष्य केशरिणा वने ।
तं चाद्रिपृष्ठे निहतं ऋक्षेण ददृशुर्जनाः ॥ १८ ॥
शोधिता दिसले लोका सिंहाने अश्व मारिला । सिंहाच्या पदचिन्हाने जाणिले सिंहही तसा । अस्वले मारिला एका गुंफेच्या पुढती पहा ॥ १८ ॥
जनाः - लोक - वने - अरण्यात - प्रसेनं अश्वं च - प्रसेनाला व घोड्याला - केसरिणा हतं - सिंहाने मारिले - वीक्ष्य - पाहून - तं च - त्या सिंहाला सुद्धा - अद्रिपृष्ठे - पर्वताच्या पृष्ठभागावर - ऋक्षेण निहतं - एका अस्वलाने मारिलेला - ददृशुः - पहाते झाले ॥१८॥
तेथे शोध घेत असता लोकांना दिसले की, जंगलामध्ये सिंहाने प्रसेन आणि त्याच्या घोड्याला मारले आहे. आणि पुढे जाऊन पाहातात, तर पर्वतावर एका अस्वलाने सिंहालाही मारून टाकले आहे. (१८)
ऋक्षराजबिलं भीमं अन्धेन तमसावृतम् ।
एको विवेश भगवान् अवस्थाप्य बहिः प्रजाः ॥ १९ ॥
तिथेचि सर्व लोकांना कृष्णाने थांबवोनिया । अंधार्या घोर त्या गुंफी एकटाच प्रवेशला ॥ १९ ॥
एकः भगवान् - एकटा श्रीकृष्ण - प्रजाः बहिः अवस्थाप्य - द्वारकावासी जनांना बाहेर ठेवून - अन्धेन तमसा आवृतं - गाढ अंधकाराने वेष्टिलेल्या - भीमं - भयंकर अशा - ऋक्षराजबिलं - अस्वलांचा राजा जो जांबवान त्याच्या बिळात - विवेश - शिरला ॥१९॥
भगवान श्रीकृष्णांनी सर्वांना बाहेरच बसवून आपण एकट्यानेच त्या घोर अंधकाराने भरलेल्या अस्वलाच्या भयंकर गुहेत प्रवेश केला. (१९)
तत्र दृष्ट्वा मणिप्रेष्ठं बालक्रीडनकं कृतम् ।
हर्तुं कृतमतिः तस्मिन् अवतस्थेऽर्भकान्तिके ॥ २० ॥
कृष्णाने पाहिले तेथे खेळणे मणि जाहला । पिलांच्यापासि येवोनी उभा राहोनि ठाकला ॥ २० ॥
तत्र - तेथे - बालक्रीडनकं कृतं - लहान बालकाचे खेळणे केलेल्या - मणिश्रेष्ठं दृष्ट्वा - त्या श्रेष्ठ स्यमंतक मण्याला पाहून - हर्तुं कृतमतिः (सः) - तो हरण करण्याचा निश्चय केलेला तो श्रीकृष्ण - तस्मिन् अर्भकान्तिके अवतस्थे - त्या बालकाच्या जवळच उभा राहिला ॥२०॥
मुलाला खेळण्यासाठी दिलेला तो मौल्यवान मणी पाहून त्याच्याकडून काढून घेण्याच्या उद्देशाने ते मुलाजवळ जाऊन उभे राहिले. (२०)
तमपूर्वं नरं दृष्ट्वा धात्री चुक्रोश भीतवत् ।
तच्छ्रुत्वाभ्यद्रवत् क्रुद्धो जाम्बवान् बलिनां वरः ॥ २१ ॥
नवखा दिसता कोणी पिले ओरडली तदा । चित्कार ऐकुनी त्यांचा क्रोधेचि जांब पातला ॥ २१ ॥
धात्री - दाई - अपूर्वं तं नरं दृष्ट्वा - पूर्वी कधीहि न पाहिलेल्या अशा त्या मनुष्याला पाहून - भीतवत् चुक्रोश - भ्याल्याप्रमाणे ओरडू लागली - तत् श्रुत्वा - ते ओरडणे ऐकून - बलिनां वरः जाम्बवान् - बलिष्ठांमध्ये श्रेष्ठ असा जांबवान - क्रुद्धः अभ्यद्रवत् - रागावून धावत आला ॥२१॥
त्या गुहेत एका अपरिचित माणसाला आल्याचे पाहून मुलाची दाई घाबरून ओरडू लागली. ते ऐकून महाबलवान ऋक्षराज जांबवान रागावून तेथे धावत आला. (२१)
स वै भगवता तेन युयुधे स्वामीनाऽऽत्मनः ।
पुरुषम्प्राकृतं मत्वा कुपितो नानुभाववित् ॥ २२ ॥
माहात्म्य नच जाणी तो कृष्णा माणूस मानुनी । लढाया जाहला सिद्ध कृष्णस्वामी सवे पहा ॥ २२ ॥
सः वै - तो जांबवान खरोखर - कुपितः - रागावलेला - (तं) पुरुषं प्राकृतं मत्वा - त्या कृष्णाला सामान्य पुरुष मानून - नानुभाववित् - त्याचा पराक्रम न जाणणारा असा - आत्मनः स्वामिना तेन भगवता - आपला अधिपति अशा त्या श्रीकृष्णाबरोबर - युयुधे - युद्ध करिता झाला ॥२२॥
परीक्षिता ! जांबवानाला तो सामान्य मनुष्य वाटल्यामुळे त्याचा राग आला. त्याचे सामर्थ्य त्याला माहित नव्हते. त्यामुळे तो आपल्या स्वामींशीच युद्ध करू लागला. (२२)
द्वन्द्वयुद्धं सुतुमुलं उभयोर्विजिगीषतोः ।
आयुधाश्मद्रुमैर्दोर्भिः क्रव्यार्थे श्येनयोरिव ॥ २३ ॥
ससाणे लढती तैसे दोघेही झुंजु लागले । शस्त्रास्त्र सोडुनी जांब बाहुयुद्धास लागला ॥ २३ ॥
विजिगीषतोः उभयोः - जिंकण्याची इच्छा करणार्या उभयतांचे - क्रव्यार्थे (युद्धमानयोः) श्येनयोः इव - मांसासाठी लढणार्या दोन ससाण्यांप्रमाणे - आयुधाश्मद्रुमैः दोर्भिः - शस्त्रास्त्रे, दगड, वृक्ष यांनी व बाहूंनी - सुतुमुलं द्वंदयुद्धं (अभवत्) - घनघोर द्वंद्वयुद्ध झाले ॥२३॥
मांसाच्या तुकड्यासाठी ज्याप्रमाणे दोन ससाणे आपापसात लढतात, त्याचप्रमाणे विजयाच्या इच्छेने श्रीकृष्ण आणि जांबवान आपापसात घनघोर युद्ध करू लागले. अगोदर शस्त्रांनी, नंतर मोठमोठ्या दगडांनी, नंतर झाडांनी आणि शेवटी बाहूंनी ते युद्ध करू लागले. (२३)
आसीत्तदष्टाविंशा इतरेतरमुष्टिभिः ।
वज्रनिष्पेषपरुषैः अविश्रममहर्निशम् ॥ २४ ॥
वज्रप्रहार जैसे ते प्रहार करिती तदा । अठ्ठाविस दिन रात्री लढले नच थांबता ॥ २४ ॥
वज्रनिष्पेषपरुषैः - व्रजाच्या प्रहाराप्रमाणे कठीण अशा - इतरेतरमुष्टिभिः - एकमेकांच्या मुठींनी - भूतं तत् - झालेले ते युद्ध - अविश्रमं अहर्निशं अष्टाविंशाहं - विश्रांति न घेता अहोरात्र अठ्ठावीस दिवसपर्यंत चाललेले - आसीत् - होते ॥२४॥
वज्रप्रहाराप्रमाणे कठोर ठोसे एकमेकांना मारीत ते दोघे अठ्ठावीस दिवसपर्यंत विश्रांती न घेता, रात्रंदिवस लढत होते. (२४)
कृष्णमुष्टिविनिष्पात निष्पिष्टाङ्गोरु बन्धनः ।
क्षीणसत्त्वः स्विन्नगात्रः तमाहातीव विस्मितः ॥ २५ ॥
शेवटी मारुनी ठोसा कृष्णाने ठेचिले तया । शरीरा फुटला घाम आश्चर्ये वदला तदा ॥ २५ ॥
कृष्णमुष्टिविनिष्पाता निष्पिष्टांगोरुबन्धनः - श्रीकृष्णाच्या मुष्टिप्रहाराने चूर्ण झाले आहेत अवयवांचे सांधे ज्याच्या असा - क्षीणसत्त्वः स्विन्नगात्रः - ज्याचे बळ नष्ट झाले आहे आणि ज्याचे अवयव घामाने भिजले आहेत असा - (सः) अतीव विस्मितः तं आह - तो जांबवान अत्यंत आश्चर्यचकित होऊन त्या श्रीकृष्णाला म्हणाला ॥२५॥
शेवटी श्रीकृष्णांच्या ठोशांमुळे जांबवानाची हाडे खिळखिळी झाली. त्याचा उत्साह मावळला. शरीर घामाने डबडबले. तेव्हा त्याने अत्यंत आश्चर्यचकित होऊन भगवान श्रीकृष्णांना म्हटले. (५२)
जाने त्वां सर्वभूतानां प्राण ओजः सहो बलम् ।
विष्णुं पुराणपुरुषं प्रभविष्णुमधीश्वरम् ॥ २६ ॥
प्रभो मी जाणिले तुम्हा तुम्ही विष्णु स्वयं असा । तुम्हीच सर्व जीवांचे प्राण इंद्रिय नी बल ॥ २६ ॥
त्वां - तुला - सर्वभूतानां प्राणः - सर्व प्राणिमात्रांचा प्राण - ओजः सहः बलं - इंद्रियांची शक्ति, मानसिक शक्ति व शारीरिक शक्ति - विष्णुं - विष्णु - पुराणपुरुषं - अनादि श्रेष्ठ पुरुष - प्रभविष्णुं अधीश्वरं जाने - उत्पत्तिकर्ता व श्रेष्ठ अधिपति असे मी जाणतो ॥२६॥
हे प्रभो ! मी आता जाणले की, आपणच सर्व प्राण्यांचे स्वामी, रक्षणकर्ते, पुराणपुरुष भगवान विष्णू आहात. आपणच सर्वांचे प्राण, इंद्रियबल, मनोबल आणि शरीरबल आहात. (२६)
त्वं हि विश्वसृजां स्रष्टा सृष्टानामपि यच्च सत् ।
कालः कलयतामीशः पर आत्मा तथात्मनाम् ॥ २७ ॥
ब्रह्म्याला निर्मिले तुम्ही तुम्ही सर्वत्र राजता । कालाचे नियते तुम्ही आत्माराम तुम्ही असा ॥ २७ ॥
त्वं हि - तू खरोखर - विश्वसृजां स्त्रष्टा - प्रजापतीचा उत्पादक - यत् च अपि सृज्यानां सत् - जे काही उत्पन्न केलेल्या जगाचे उपादान कारण - कलयतां कालः - प्रेरणा करणार्यांमध्ये कालस्वरूपी - वरः ईशः - श्रेष्ठ परमेश्वर - तथा आत्मनां आत्मा (असि) - त्याचप्रमाणे आत्म्यांचाहि आत्मा आहेस ॥२७॥
विश्वाची उत्पत्ती करणार्यांचीही उत्पत्ती करणारे आपणच आहात. उत्पन्न केलेल्या पदार्थांमध्ये सुद्धा सत्तारूपाने आपणच विराजमान आहात. काळाचे जितके म्हणून अवयव आहेत, त्या सर्वांचे नियमन करणारे काळ आपणच आहात आणि शरीरभेदामुळे वेगवेगळे भासणार्या अंतरात्म्यांचे परम आत्मासुद्धा आपणच आहात. (२७)
विवरण :- जांबवान आणि श्रीकृष्ण यांचे युद्ध सत्तावीस दिवस चालले. त्यात तो बलशाली ऋक्षराज घायाळ झाला अन तेव्हा त्यास श्रीकृष्णाची खरी ओळख पटली. तो स्तुती करू लागला. तू पृथ्वी इ. निर्माण करणार्या सर्व तत्त्वांना जन्म देणारा आहेस, तू सर्वात्मक आहेस, काळ हा सर्वश्रेष्ठ मानला जातो, पण तू त्याहीपेक्षा श्रेष्ठ आहेस. विश्वाची निर्मिती, संहार व पालन करणार्यांचाही तू निर्माता. (मी तुला ओळखले नाही व साध्या मण्यासाठी तुझ्याशी लढाई केली हे माझेच अज्ञान.) (२७)
( वसंततिलका )
यस्येषदुत्कलितरोषकटाक्षमोक्षैः वर्त्मादिशत् क्षुभितनक्र तिमिङ्गलोऽब्धिः । सेतुः कृतः स्वयश उज्ज्वलिता च लङ्का रक्षःशिरांसि भुवि पेतुरिषुक्षतानि ॥ २८ ॥
( वसंततिलका ) मी ते स्मरे बघसि तू जधिं सागरास नक्रादि ते खवळती मग सेतु होय । ते मेळविण्यास यश तू जितिलीस लंका बाणे तुझ्याचि शिर राक्षसिते उडाले ॥ २८ ॥
यस्य (तव) - ज्या तुझ्या - ईषदुत्कलितरोषकटाक्षमोक्षैः - किंचित वाढलेल्या क्रोधाने फेकलेल्या कटाक्षांनी - क्षुभितनक्रतिमिङ्गिलः अब्धिः - क्षुब्ध झाले आहेत जलचर, सुसरी व मासे ज्यातील असा समुद्र - वर्त्म अदिशत् - मार्ग करून देता झाला - स्वयशः सेतुः कृतः - आपली कीर्तिच असा पूल बांधिला - लंका च उज्ज्वलिता - आणि लंका जाळून टाकिली - इषुक्षतानि रक्षःशिरांसि - बाणांनी तोडिलेली रावणाची मस्तके - भुवि पेतुः - पृथ्वीवर पडली ॥२८॥
हे प्रभो ! जेव्हा आपण जरासे रागावून क्रुद्ध नजरेने समुद्राकडे पाहिले होते, त्यावेळी समुद्रात राहाणार्या मोठमोठ्या सुसरी व मासे घाबरले आणि समुद्राने आपल्याला वाट करून दिली. तेव्हा आपण त्याच्यावर आपल्या कीर्तीचाच पूल बांधला. लंका जाळली आणि राक्षसांची मस्तके आपल्या बाणांनी छिन्नविच्छिन्न करून जमिनीवर पाडली. तेच माझे श्रीराम आपण असून आज श्रीकृष्णांच्या रूपाने येथे आला आहात.(२८)
विवरण :- 'सीतेच्या मुक्ततेसाठी लंकेला जाताना वाटेत समुद्र आडवा आला. त्यावर बांधल्या जाणार्या सेतूचा पाया काही केल्या स्थिर रहात नव्हता. वारंवार समुद्राची प्रार्थना करूनहि भयंकर जलचरयुक्त लाटांचे तांडव चालूच राहिले. तेव्हा संतप्त श्रीरामांनी समुद्रावरच धनुष्य-बाण रोखले आणि मग समुद्र शरण आला. सेतू बांधून वानरसेनेसह श्रीराम लंकेस गेला. दूत म्हणून रावणाकडे गेलेल्या हनुमानाच्या पुच्छाला आग लावल्याने त्याने त्याच पुच्छाने लंकेचे दहन केले. नंतर झालेल्या राम-रावणाच्या युद्धात रावण पराभूत झाला व त्याची सर्व तोंडे रामाच्या बाणांनी तुटून जमिनीवर पडली. रामाच्या या पराक्रमात रामरूपी तूच आहेस, असे श्रीकृष्णाची स्तुती करताना जांबवान म्हणतो. कारण स्वतः त्याचे इष्ट दैवत राम असल्याने त्याने श्रीकृष्णातच रामाला पाहिले. (२८)
( अनुष्टुप् )
इति विज्ञातवीज्ञानं ऋक्षराजानमच्युतः । व्याजहार महाराज भगवान् देवकीसुतः ॥ २९ ॥ अभिमृश्यारविन्दाक्षः पाणिना शंकरेण तम् । कृपया परया भक्तं मेघगम्भीरया गिरा ॥ ३० ॥
( अनुष्टुप् ) परीक्षित् ऋक्षराजा तो जांबवान् ओळखी जधी । नेत्रारविंद कृष्णाते तदा कल्याणकारि तो ॥ २९ ॥ आपुला हात त्या जांबतनुशी फिरवीयला । गंभीरवणिने त्याला प्रेमाने बोलला असे ॥ ३० ॥
महाराज - हे परीक्षित राजा - भगवान् देवकीसुतः अच्युतः - देवकीचा पुत्र भगवान श्रीकृष्ण - इति विज्ञातविज्ञानम् ऋक्षराजानं - याप्रमाणे ज्याला सर्वप्रकारचे ज्ञान झाले आहे अशा अस्वलांचा राजा जो जांबवान त्याला - व्याजहार - म्हणाला ॥२९॥ अरविंदाक्षः - कमलनेत्र श्रीकृष्ण - शंकरेण पाणिना - कल्याणकारी अशा हाताने - भक्तं तं अभिमृश्य - भक्त अशा त्या जांबवानाला स्पर्श करून - परया कृपया - मोठ्या कृपेने - प्रेमगंभीरया गिरा (आह) - प्रेमाने ओथंबलेल्या शब्दांनी म्हणाला ॥३०॥
परीक्षिता ! जेव्हा ऋक्षराज जांबवानाने भगवंतांना ओळखले, तेव्हा कमलनयन भगवान श्रीकृष्णांनी आपला कल्याणकारी हात त्याच्या शरीरावरून फिरविला आणि नंतर परम कृपेने, प्रेमपूर्ण गंभीर वाणीने, आपल्या त्या भक्त जांबवानाला म्हटले. (२९-३०)
मणिहेतोरिह प्राप्ता वयमृक्षपते बिलम् ।
मिथ्याभिशापं प्रमृजन् आत्मनो मणिनामुना ॥ ३१ ॥
ऋक्षराज मणि हेते गुंफेत पातलो असे । मणी हा देउनी त्यांना कलंक धुवु इच्छितो ॥ ३१ ॥
ऋक्षपते - जांबवाना - वयं - आम्ही - मणीहेतोः - स्यमंतक मण्यासाठी - अमुना मणिना आत्मनः मिथ्याभिशापं प्रमृजन् - ह्या मण्याच्या योगाने स्वतःचा खोटा आरोप नष्ट करण्यासाठी - इह बिलं प्राप्तः - या गुहेत आलो ॥३१॥
ऋक्षराज ! आम्ही मण्यासाठी तुझ्या गुहेत आलो आहोत. या मण्यामुळे माझ्यावर आलेला खोटा आळ मी पुसून टाकू इच्छितो. (३१)
इत्युक्तः स्वां दुहितरं कन्यां जाम्बवतीं मुदा ।
अर्हणार्थं स मणिना कृष्णायोपजहार ह ॥ ३२ ॥
ऐकता जांबवंताने आनंदे कृष्ण पूजिला । कुमारी जांबवंती नी मणीही पायि अर्पिला ॥ ३२ ॥
इत्युक्तः सः - असे बोलला गेलेला तो जांबवान - स्वां दुहितरं कन्यां जांबवतीं - आपली सुंदर अविवाहित मुलगी जी जांबवती तिला - मुदा - आनंदाने - कृष्णाय अर्हणार्थं - श्रीकृष्णाचा सत्कार करण्यासाठी - मनीना उपजहार ह - स्यमंतक मण्यासह भेट म्हणून अर्पिता झाला ॥३२॥
भगवंतांनी असे म्हटल्यावर जांबवानाने मोठ्या आनंदाने त्यांचा सन्मान करण्यासाठी आपली कन्या जांबवती मण्यासह त्यांना अर्पण केली. (३२)
अदृष्ट्वा निर्गमं शौरेः प्रविष्टस्य बिलं जनाः ।
प्रतीक्ष्य द्वादशाहानि दुःखिताः स्वपुरं ययुः ॥ ३३ ॥
बाहेर तिष्ठले लोक बारा दिन पुन्हा तया । जाहले दुःख ते फार द्वारकापुरि पातले ॥ ३३ ॥
जनाः - द्वारकादासी जन - बिलं प्रविष्टस्य शौरेः - बिळात शिरलेल्या श्रीकृष्णाचे - निर्गमं अदृष्ट्वा - बाहेर येणे न पाहिल्यामुळे - द्वादशाहानि प्रतीक्ष्य - बारा दिवसापर्यंत वाट पाहून - दुःखिताः स्वपुरं ययुः - दुःखित असे आपल्या नगराला परत गेले ॥३३॥
गुहेत गेलेले श्रीकृष्ण बारा दिवस झाले तरी गुहेच्या बाहेर आले नाहीत, असे पाहून बाहेर थांबलेले लोक अत्यंत दु:खी होऊन द्वारकेला परत आले. (३३)
निशम्य देवकी देवी रक्मिण्यानकदुन्दुभिः ।
सुहृदो ज्ञातयोऽशोचन् बिलात् कृष्णमनिर्गतम् ॥ ३४ ॥
तिथे ती देवकी माता रुक्मिणी वसुदेवजी । दुःखीत जाहले सर्व न येता कृष्ण तेधवा ॥ ३४ ॥
देवकी देवी रुक्मिणी आनकदुन्दुभिः सुहृदः ज्ञातयः - देवी देवकी, रुक्मिणी, वसुदेव, मित्र, संबंधी, बांधव - बिलात् अनिर्गतं कृष्णं निशम्य - बिळातून श्रीकृष्ण बाहेर आला नाही असे ऐकून - अशोचन् - शोक करिते झाले. ॥३४॥
तेथे जेव्हा माता देवकी, रुक्मिणी, वसुदेव तसेच इतर संबंधित आणि कुटुंबियांना श्रीकृष्ण गुहेच्या बाहेर आले नाहीत हे समजले, तेव्हा त्यांना अतिशय दु:ख झाले. (३४)
सत्राजितं शपन्तस्ते दुःखिता द्वारकौकसः ।
उपतस्थुर्महामायां दुर्गां कृष्णोपलब्धये ॥ ३५ ॥
द्वारकावासि ते सर्व दुःखे सत्राजितास त्या । वाईट बोलले सारे देवीला सर्व प्रार्थिती ॥ ३५ ॥
दुःखिताः ते द्वारकौकसः - दुःखी झालेले ते द्वारकावासी जन - सत्राजितं शपन्तः - सत्राजिताला दोष देऊन - कृष्णोपलब्धये - श्रीकृष्णाच्या प्राप्तीसाठी - महामायां दुर्गां - महामाया नावाच्या दुर्गेला - उपतस्थुः - प्रार्थिते झाले. ॥३५॥
सर्व द्वारकावासी दु:खी होऊन सत्राजिताला शिव्याशाप देऊ लागले आणि श्रीकृष्ण परत यावेत, म्हणून महामाया दुर्गादेवीला शरण जाऊन तिची उपासना करू लागले. (३५)
तेषां तु देव्युपस्थानात् प्रत्यादिष्टाशिषा स च ।
प्रादुर्बभूव सिद्धार्थः सदारो हर्षयन् हरिः ॥ ३६ ॥
देवी प्रसन्न झाली नी आशिर्वाद दिला तिने । तेवढ्यात मणी पत्नी सवे तो कृष्ण पातला ॥ ३६ ॥
तेषां देव्युपस्थानात् तु - त्या लोकांनी केलेल्या देवीच्या उपासनेमुळे तर - प्रत्यादिष्टाशिषा - मिळालेल्या आशीर्वादाने - सिद्धार्थः सः हरिः - परिपूर्ण आहेत मनोरथ ज्याचे असा तो श्रीकृष्ण - सदारः हर्षयन् प्रादुर्बभूव - स्त्रीसह आनंद देणारा असा प्रगट झाला. ॥३६॥
त्यांच्या उपासनेने दुर्गादेवी प्रसन्न झाली आणि तिच्या आशीर्वादाने त्याचवेळी तेथे नववधू जांबवतीसह कार्यसिद्धी केलेले श्रीकॄष्ण सर्वांना आनंदित करीत प्रगट झाले. (३६)
उपलभ्य हृषीकेशं मृतं पुनरिवागतम् ।
सह पत्न्या मणिग्रीवं सर्वे जातमहोत्सवाः ॥ ३७ ॥
आनंदमग्न ते झाले सपत्न कृष्ण पाहता । मणी तो शोभला कंठी मरुनी जणु पातला ॥ ३७ ॥
मृत्वा पुनः आगतम् इव - मरून पुनः परत आल्याप्रमाणे - पत्न्या सह मणिग्रीवं हृषीकेशं उपलभ्य - स्त्रीसह गळ्यात स्यमंतकमणी धारण करणार्या श्रीकृष्णाला आलेला पाहून - सर्वे जातमहोत्सवाः (आसन्) - सर्व लोक आनंदित झाले. ॥३७॥
भगवान श्रीकृष्ण पत्नीसह गळ्यात मणी धारण करून आलेले पाहून सर्व द्वारकावासी परमानंदात मग्न झाले. कारण ते जणू मेलेलेच जिवंत होऊन परत आल्यासारखे त्यांना वाटले. (३७)
सत्राजितं समाहूय सभायां राजसन्निधौ ।
प्राप्तिं चाख्याय भगवान् मणिं तस्मै न्यवेदयत् ॥ ३८ ॥
पुन्हा श्री भगवान् कृष्ण उग्रसेनापुढे सभीं । सत्रजितास बोलावी, हाडसोनि मणी दिला ॥ ३८ ॥
भगवान् - श्रीकृष्ण - सभायां सत्राजितं समाहूय - सभेत सत्राजिताला बोलावून - राजसन्निधौ च (मणेः) प्राप्तिं आख्याय - आणि राजासमक्ष स्यमंतकमणी मिळाल्याचे वृत्त सांगून - तस्मै मणिं न्यवेदयत् - त्या सत्राजिताला स्यमंतकमणी अर्पिता झाला. ॥३८॥
त्यानंतर भगवंतांनी सत्राजिताला राजसभेमध्ये महाराज उग्रसेनांकडे बोलावले आणि मणी कसा परत मिळाला, त्याची सर्व हकीकत सांगून त्यांनी तो मणी सत्राजिताकडे सोपविला. (३८)
स चातिव्रीडितो रत्नं गृहीत्वावाङ्मुखस्ततः ।
अनुतप्यमानो भवनं अगमत् स्वेन पाप्मना ॥ ३९ ॥
मणी तो घेतला त्याने लाजेने खालि पाहि तो । पश्चात्ताप तया झाला तसाचि घरि पातला ॥ ३९ ॥
ततः च - आणि त्यानंतर - सः अतीव्रीडितः अवाङ्मुख - तो सत्राजित अत्यंत लज्जित होऊन व खाली मान घालून - रत्नं गृहीत्वा - मणी घेऊन - स्वेन पाप्मना अनुतप्यमानः - आपल्या पापाने पश्चात्ताप पावलेला असा - भवनम् अगमत् - आपल्या घरी परत गेला. ॥३९॥
सत्राजित अत्यंत खजिल झाला. मणी त्याने परत घेतला. परंतु त्याची मान खाली झाली. आपण केलेल्या अपराधाबद्दल त्याला अत्यंत पश्चात्तप होत होता. कसातरी तो आपल्या घरी जाऊन पोहोचला. (३९)
सोऽनुध्यायंस्तदेवाघं बलवद्विग्रहाकुलः ।
कथं मृजाम्यात्मरजः प्रसीदेद् वाच्युतः कथम् ॥ ४० ॥
अपराध सले नित्य विरोधे भय दाटले । परिमार्जन तो शोधी प्रसन्न कृष्ण व्हावया ॥ ४० ॥
बलवद्विग्रहाकुलः सः - मोठयांबरोबर कलह केल्यामुळे व्याकुळ झालेला तो सत्राजित - तत् एव अघम् अनुध्यायन् - त्याच पातकासारखा विचार करीत - आत्मरजः कथं मृजामि - स्वतःचे पाप कसे नाहीसे करू - वा अच्युतः कथं प्रसीदेत - किंवा श्रीकृष्ण कसा प्रसन्न होईल ? ॥४०॥
त्याच्या मनात नेहमी स्वत:चा अपराधच येऊ लागला. बलवानाबरोबर वैर केल्यामुळे तो अत्यंत भयभीत झाला होता. तो विचार करत होता की, "मी आपल्या अपराधाचे परिमार्जन कसे करावे ? श्रीकृष्ण आपल्यावर कसे प्रसन्न होतील ? (४०)
किंकृत्वा साधु मह्यं स्यात् न शपेद् वा जनो यथा ।
अदीर्घदर्शनं क्षुद्रं मूढं द्रविणलोलुपम् ॥ ४१ ॥
कल्याणार्थ करू काय जेणे लोक न निंदिती । अदूरदृष्टी मी शुद्र लोभाने मूर्ख जाहलो ॥ ४१ ॥
किं कृत्वा मह्यं साधु स्यात् - काय केले असता माझे कल्याण होईल - यथा वा - किंवा ज्यायोगे - अदीर्घदर्शनं क्षुद्रं मूढं द्रविणलोलुपं (मां) जनः न शपेत् - अल्पदृष्टीच्या क्षुद्र, मूर्ख व द्रव्याविषयी लुब्ध झालेल्या मला लोक शाप देणार नाहीत. ॥४१॥
काय केल्याने माझे कल्याण होईल आणि लोक माझी निर्भत्सना करणार नाहीत. मी खरोखरच अदूरदर्शी, क्षुद्र आहे. धनाच्या लोभाने मी मूर्खपणा करून बसलो. (४१)
दास्ये दुहितरं तस्मै स्त्रीरत्नं रत्नमेव च ।
उपायोऽयं समीचीनः तस्य शान्तिर्न चान्यथा ॥ ४२ ॥
आता मी सत्यभामा ही कन्यारत्नात रत्न जी । आणीक मणिही कृष्णा अर्पोनी पाप हे धुतो ॥ ४२ ॥
दुहितरं स्त्रीरत्नं - माझी जी मुलगी सुंदर सत्यभामा ती - रत्नम् च एव - आणि स्यमंतक मणी सुद्धा - तस्मै दास्ये - त्या श्रीकृष्णाला मी देईन - अयं समीचीनः उपायः - हा उत्तम उपाय होय - अन्यथा च तस्य शान्तिः न - दुसर्या कोणत्याहि प्रकारे त्याची शांति होणार नाही. ॥४२॥
आता मी स्त्रियांमध्ये रत्नासमान असणारी माझी कन्या सत्यभामा आणि हा स्यमंतकमणी, हे दोन्हीही श्रीकृष्णांना देईन. हा उपाय अत्यंत चांगला आहे. यामुळे माझ्या अपराधाचे परिमार्जन होऊ शकेल. याशिवाय दुसरा उपाय नाही. (४२)
एवं व्यवसितो बुद्ध्या सत्राजित् स्वसुतां शुभाम् ।
मणिं च स्वयमुद्यम्य कृष्णायोपजहार ह ॥ ४३ ॥
विवेक बुद्धिने त्याने स्वताशी ठरवोनिया । स्यमंतक तशी कन्या कृष्णाला अर्पिली तये ॥ ४३ ॥
एवं बुद्ध्या व्यवसितः सताजित् - याप्रमाणे बुद्धीने निश्चय केलेला सत्राजित - शुभां स्वसुतां मणीं च - आपली सुंदर मुलगी व मणी - स्वयं उद्यम्य - स्वतः हातात घेऊन - कृष्णाय उपजहार ह - श्रीकृष्णाला देता झाला. ॥४३॥
सत्राजिताने विवेकबुद्धीने असा निश्चय करून तो अमलात आणण्यासाठी तो स्वत:च उद्योगाला लागला आणि त्याने आपली सुंदर कन्या व स्यमंतकमणी श्रीकृष्णांना अर्पण केले. (४३)
तां सत्यभामां भगवान् उपयेमे यथाविधि ।
बहुभिर्याचितां शील रूपौदार्यगुणान्विताम् ॥ ४४ ॥
विधिपूर्वक कृष्णाने सत्यभामा वरीयली । रूप शील गुणे तैशी अनेक इच्छिती जिला ॥ ४४ ॥
भगवान् - श्रीकृष्ण - बहुभिः याचितां - पुष्कळांनी याचिलेल्या - शीलरूपौदार्यगुणान्वितां - स्वभाव, सौंदर्य, उदारता व गुण ह्यांनी युक्त अशा - तां सत्यभामां - त्या सत्यभामेला - यथाविधि उपयेमे - यथाशास्त्र वरिता झाला. ॥४४॥
सत्यभामा शील, सौंदर्य, औदार्य इत्यादी गुणांनी युक्त होती. बर्याच जणांनी तिला मागणीही घातली होती. परंतु आता श्रीकृष्णांनी विधिपूर्वक तिचे पाणिग्रहण केले. (४४)
भगवानाह न मणिं प्रतीच्छामो वयं नृप ।
तवास्तां देवभक्तस्य वयं च फलभागिनः ॥ ४५ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे उत्तरार्धे स्यमंतकोपाख्याने षट्पञ्चाशत्तमोऽध्यायः ॥ ५६ ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
वदले भगवान् कृष्ण न आम्ही मणि घेत हा । सूर्यभक्त तुम्ही आहा तुमच्यापाशि ठेविणे । तो जे निर्मील ते सोने आम्हा द्यावे तुम्ही पहा ॥ ४५ ॥ ॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर छपन्नावा अध्याय हा ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
नृप - हे परीक्षित राजा - भगवान् आह - श्रीकृष्ण म्हणाला - वयं मणीं न प्रतीच्छामः - आम्ही मण्यांचा स्वीकार करीत नाही - देवभक्तस्य तव (एव) आस्तां - देवांचा भक्त अशा तुझ्याजवळच तो असो - वयं च फलभागिनः (समः) - आणि आम्ही फळाचा उपभोग घेणारे आहो. ॥४५॥
परीक्षिता ! भगवान श्रीकृष्ण सत्राजिताला म्हणाले. "आम्ही स्यमंतकमणी घेणार नाही. तू सूर्याचा भक्त आहेस. म्हणून तो तुझ्याजवळच राहू दे. आम्ही फक्त त्याच्यापासून मिळणार्या फळाचा म्हणजे सोन्याचा स्वीकार करू." (४५)
विवरण :- शेवटी सत्राजिताला कळून चुकले की स्यमंतक मण्याच्या बाबतीत कृष्णासारख्या थोर विभूतीबद्दल आपला गैरसमज झाला होता. त्याला पश्चात्ताप झाला. म्हणून स्त्रियांमध्ये रत्नाप्रमाणे असणारी आणि जिच्या प्राप्तीची इच्छा अनेक राजांना होती, अशी आपली रूपगुणसुंदर कन्या सत्यभामा मण्यासह कृष्णास अर्पण केली. कृष्णाने सत्यभामेचा स्वीकार केला. पण मणी नाकारला, त्याचे कारण सांगताना म्हणाला की, तुझ्या भक्तीवर प्रसन्न होऊन हा मणी सूर्याने तुला दिल्याने त्यावर तुझाच अधिकार असणे योग्य. शिवाय मीही तुला आता मुलाप्रमाणेच आहे. (कदाचित सत्राजितास मुलगा नसावा) त्यामुळे या मण्यापासून मिळणार्या धनामध्ये आमचाहि वाटा आहेच. (मणीरूपी मुद्दल तुझ्याजवळच राहू दे. त्याचे प्रत्येक दिवशी आठ भाराप्रमाणे मिळणारे व्याज, शिवाय सर्व आधिव्याधिपासून मुक्तता हे सर्व आम्हाला दे, असाही त्याच्या बोलण्याचा आशय.) (४६) अध्याय छपन्नावा समाप्त |