श्रीमद् भागवत पुराण
स्कन्ध दहावा
अध्याय चोपन्नावा

यदुभिः सह संग्रामे चैद्यपक्षीयराज्ञां पराजयः
रुक्मिणः पराभवः, बलभद्रकृत सांत्वनं, रुक्मिणीश्रीकृष्ण विवाहश्च -

शिशुपालाचे सहकारी राजे आणि रुक्मी यांचा पराभव व श्रीकृष्ण-रुक्मिणी विवाह -


संहिता - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् )
इति सर्वे सुसंरब्धा वाहानारुह्य दंशिताः ।
स्वैः स्वैर्बलैः परिक्रान्ता अन्वीयुर्धृतकार्मुकाः ॥ १ ॥
(अनुष्टुप् )
श्रीशुकदेव सांगतात -
क्रोधून बोलले सारे सकवच् रथि बैसले ।
सेना धनुष्य घेवोनी कृष्णाच्या पाठि धावले ॥ १ ॥

इति (आत्मानं धिक्कृतवन्तः) - याप्रमाणे स्वतःचा धिक्कार करणारे - सुसंरब्धाः - क्रोधाविष्ठ झालेले - दंशिताः - चिलखत घातलेले - धृतकार्मुकाः सर्वे - हातात धनुष्य घेतलेले सर्व राजे - वाहान् आरुह्य - आपल्या वाहनावर आरूढ होऊन - स्वैः स्वैः बलैः परिक्रान्ताः - आपापल्या सैन्याने वेष्टिलेले - (कृष्णम्) अन्वीयुः - कृष्णामागून धावले. ॥१॥

श्रीशुकदेव म्हणतात - अशा प्रकारे क्रोधाविष्ठ झालेले सर्व राजे अंगावर चिलखत घालून आपापल्या वाहनांवर स्वार झाले आणि धनुष्ये घेऊन, आपापल्या सेनेसह श्रीकृष्णांवर धावले. (१)


तानापतत आलोक्य यादवानीकयूथपाः ।
तस्थुस्तत्सम्मुखा राजन् विस्फूर्ज्य स्वधनूंषि ते ॥ २ ॥
यदुसेनापती पाही शत्रुंचे दळ पातले ।
टणत्कार धनुष्याते देवोनी शत्रु रोधिला ॥ २ ॥

राजन् - हे परीक्षित राजा - ते यादवानीकयूथपाः - ते यादवसेनापती - आपततः तान् आलोक्य - मागोमाग पाठलाग करीत येणार्‍या त्या राजांना पाहून - धनुंषिविस्फूर्ज्य - धनुष्यांचा टणत्कार करून - तत्संमुखाः तस्थूः - त्या राजांसमोर उभे राहिले. ॥२॥

राजन ! यादवांच्या सेनापतींनी जेव्हा पाहिले की, शत्रू आपल्यावर चढाई करीत आहेत, तेव्हा त्यांनीसुद्धा आपापल्य धनुष्याचा टणत्कार केला आणि तोंड फिरवून ते त्यांच्या समोर उभे राहिले. (२)


अश्वपृष्ठे गजस्कन्धे रथोपस्थे च्र कोविदाः ।
मुमुचुः शरवर्षाणि मेघा अद्रिष्वपो यथा ॥ ३ ॥
चतुरंग तशी सेना मर्मज्ञ युद्ध साधण्या ।
तयांनी यदुसेनेला झाकिले बाणवृष्टिने ॥ ३ ॥

कोविदाः - युद्धकुशल पुरुष - यथा मेघाः अद्रिषु अपः (वर्षन्ति तथा) - जसे मेघ पर्वतांवर पाण्याची वृष्टि करितात तसे - अश्वपृष्ठे गजपृष्ठे च रथोपस्थे - घोडयांच्या व हत्तींच्या पाठीवर आणि रथांतील बसण्याचा स्थानावर - शरवर्षाणि मुमुचुः - बाणांची वृष्टि करिते झाले. ॥३॥

जरासंधाच्या सेनेतील काहीजण घोड्यांवर, काहीजण हत्तींवर तर काहीजण रथांत बसलेले होते. धनुर्विद्येत निष्णात असणारे ते यादवांवर बाणांचा असा वर्षा करू लागले की, जसा ढगांनी डोंगरावर पाडलेला मुसळधार पाऊस. (३)

विवरण :- या श्लोकात फार मोठया प्रमाणावरील शत्रुसैन्य आणि अगदी कमी असे यादव सैनिक यांना मेघ आणि पर्वत यांची उपमा दिली आहे. आपल्या डोळ्यादेखत कृष्ण-बलराम रुक्मिणीचे हरण करून तिला रथातून घेऊन गेले, हे पाहून जरासंधादि राजे अपमानित झाले व शस्त्रसज्ज होऊन त्यांचा पाठलाग करून बाणांचा वर्षाव करू लागले. कशाप्रमाणे ? ज्याप्रमाणे मेघ पर्वतावर मुसळधार पर्जन्यवृष्टि करतात, त्याप्रमाणे. यावरून शत्रु सैन्याची संख्या व त्याचे सामर्थ्य दिसून येते. ते सैन्य पावसाच्या सरीप्रमाणे प्रमाणाने प्रचंड; पण चल आणि अस्थिर. परंतु कृष्ण-बलरामांची यादव सेना संख्येने कमी, पण पर्वताप्रमाणे स्थिर व अचल होती, हे दिसून येते. म्हणूनच संख्येने कमी असूनहि कृष्ण-बलरामांचे सैनिक पलायन न करता धैर्याने शत्रूचा सामना करून शेवटी विजयी झाले. (३)



पत्युर्बलं शरासारैः छन्नं वीक्ष्य सुमध्यमा ।
सव्रीड्मैक्षत् तद्वक्त्रं भयविह्वललोचना ॥ ४ ॥
सुंदरी रुक्मिणी पाही कृष्णसेना अशी तदा ।
लजायुक्त भितीने ती पाही कृष्णमुखा कडे ॥ ४ ॥

पत्युः बलं - पति जो श्रीकृष्ण त्याचे सैन्य - शरासारैः छन्नं वीक्ष्य - बाणांच्या वृष्टीने आच्छादिलेले पाहून - भयविह्वललोचना सुमध्यमा (सा) - भयाने जिचे नेत्र विव्हळ झाले आहेत अशी ती सुंदर रुक्मिणी - तद्वक्त्रं सव्रीडं ऐक्षत् - श्रीकृष्णमुखाकडे लज्जेने पाहू लागली. ॥४॥

रुक्मिणीने आपल्या पतीची सेना बाणवर्षावाने आच्छादिली गेलेली पाहिली, तेव्हा लाजून, भयभीत नेत्रांनी, तिने भगवान श्रीकृष्णांच्या मुखाकडे पाहिले. (४)


प्रहस्य भगवानाह मा स्म भैर्वामलोचने ।
विनङ्क्ष्यत्यधुनैवैतत् तावकैः शात्रवं बलम् ॥ ५ ॥
हासुनी बोलले कृष्ण सुंदरी भय ते नको ।
सेनाही आपुली आता शत्रुसेनेस मारिते ॥ ५ ॥

भगवान् प्रहस्य (तां) आह - श्रीकृष्ण किंचित हास्य करून त्या रुक्मिणीला म्हणाला - वामलोचने - सुंदर आहेत नेत्र जिचे अशा हे रुक्मिणी - मा भैः स्म - भिऊ नको - अधुना एव - आताच - तावकैः (वीरैः) - तुझ्या सैनिकांकडून - एतत् शात्रवं बलं - हे शत्रूंचे सैन्य - विनङ्‌क्ष्यति - नाश पावेल. ॥५॥

भगवान हसून म्हणाले, "सुंदरी ! भिऊ नकोस ! तुझ्या सेनेकडून आत्ताच शत्रूच्या सेनेचा नाश होईल." (५)


तेषां तद्विक्रमं वीरा गदसङ्कर्षणादयः ।
अमृष्यमाणा नाराचैः जघ्नुर्हयगजान् रथान् ॥ ६ ॥
इकडे यदुवीरो ते गद संकर्षणादि ते ।
शत्रुकृत्य न साहोनी तोडिती गज नी रथ ॥ ६ ॥

तद्विक्रमं - शत्रूंचा पराक्रम - अमृष्यमाणाः - न सहन करणारे - गदसंकर्षणादयः वीराः - गद, बलराम इत्यादि पराक्रमी यादव - नाराचैः - बाणांनी - तेषां हयगजान् रथान् - त्यांच्या हत्तींना, घोडयांना व रथांना - जघ्नुः - मारिते झाले. ॥६॥

इकडे गद, संकर्षण इत्यादि यदुवंशी वीरांना शत्रूचा पराक्रम सहन न होऊन त्यांनी शत्रूंचे हत्ती, घोडे व रथ यांच्यावर बाणांचा वर्षाव केला. (६)


पेतुः शिरांसि रथिनां अश्विनां गजिनां भुवि ।
सकुण्डलकिरीटानि सोष्णीषाणि च कोटिशः ॥ ७ ॥
हस्ताः सासिगदेष्वासाः करभा ऊरवोऽङ्घ्रयः ।
अश्वाश्वतरनागोष्ट्र खरमर्त्यशिरांसि च ॥ ८ ॥
रथ घोडे नि हत्तींच्या वरी ते शत्रु बैसले ।
तयांची कुंडले टोपां सहीत कापिली शिरे ॥ ७ ॥
सगदा धनु खड्गांचे हात पाय तुटोनिया ।
पडली रक्तबंबाळ पशु शीरे कितेक तै ॥ ८ ॥

रथिनां अश्विनां गजिनां - रथातून युद्ध करणार्‍या वीरांची, घोडेस्वारांची व हत्तीवरील वीरांची - सकुण्डलकिरीटानि च सोष्णीषाणी - कुण्डलांसह मुकुट घातलेली आणि शिरस्राणांसह अशी - कोटिशः शिरांसि भुवि पेतुः - कोटयवधि मस्तके पृथ्वीवर पडली. ॥७॥

सासिगदेष्वासाः हस्ताः - तलवार, गदा व धनुष्य धरलेले हात - करभाः ऊरवः अङ्‌घ्रयः - मनगटे, मांडया व पाय - अश्वाश्वतरनागोष्ट्रखरमर्त्यशिरांसि च (भुवि पेतुः) - आणि घोडे, खेचरे, हत्ती, उंट, गाढव व मनुष्ये ह्यांची मस्तके पृथ्वीवर पडली. ॥८॥

त्यांच्या बाणांनी रथ, घोडे आणि हत्तींवर बसलेल्या शत्रुपक्षाच्या वीरांची कुंडले, किरीट व पगड्यांनी सुसोभित झालेली कोट्यावधी मस्तके, खड्ग, गदा आणि धनुष्ययुक्त हात, मनगटे, मांड्या तसेच पाय तुटून जमिनीवर पडू लागले. अशाच प्रकारे घोडे, खेचरे, हत्ती, उंट, गाढवे आणि माणसांची मस्तकेसुद्धा तुटून रणभूमीवर पडू लागली. (७-८)


हन्यमानबलानीका वृष्णिभिर्जयकाङ्क्षिभिः ।
राजानो विमुखा जग्मुः जरासन्धपुरःसराः ॥ ९ ॥
शेवटी यदुसैन्याने मोडिले शत्रु सैन्य ते ।
जरासंधादि ते राजे पळाले पाठ दावुनी ॥ ९ ॥

जयकाङ्‌क्षिभिः वृष्णिभिः - जय इच्छिणार्‍या यादवांकडून - हन्यमानबलानीकाः - मारिले जात आहे सैन्य ज्यांचे असे - जरासन्धपुरःसराः राजानः - जरासंध आहे प्रमुख ज्यांमध्ये असे राजे - विमुखाः जग्मुः - तोंडे फिरवून परत गेले. ॥९॥

शेवटी विजयाची अपेक्षा करणार्‍या यादवांनी शत्रूच्या सेनेचा धुव्वा उडविला. जरासंध इत्यादी सर्व राजे युद्धाकडे पाठ फिरवून निघाले. (९)


शिशुपालं समभ्येत्य हृतदारमिवातुरम् ।
नष्टत्विषं गतोत्साहं शुष्यद् वदनमब्रुवन् ॥ १० ॥
भावी पत्‍नी अशी नेता न तेज शिशुपालला ।
राहिले, वदला त्याला जरासंध असे पहा ॥ १० ॥

हृतदारं इव आतुरम् - हरण केली गेली आहे पत्‍नी ज्याची अशा पुरुषाप्रमाणे विव्हल झालेल्या - नष्टत्विषं गतोत्साहं - नाहीसा झाला आहे त्वेष ज्याचा व उत्साह गेला आहे ज्याचा अशा - शुष्यद्वदनं शिशुपालम् समभ्येत्य - ज्याचे मुख सुकून गेले आहे अशा शिशुपालाजवळ जाऊन - जरासंधादयः अब्रुवन् - जरासंधादि म्हणाले. ॥१०॥

आपल्या भावी पत्‍नीला पळविल्यामुळे दु:खी झालेल्या निस्तेज, निरुत्साही, तोंड वाळलेल्या शिशुपालाजवळ जाऊन त्याला ते म्हणाले. (१०)


भो भोः पुरुषशार्दूल दौर्मनस्यमिदं त्यज ।
न प्रियाप्रिययो राजन् निष्ठा देहिषु दृश्यते ॥ ११ ॥
अरे रे नरसिंहा रे उदासी सोड तू पहा ।
न राही स्थिति ती एक यश वा अपयेश ते ॥ ११ ॥

भो भो राजन् - हे राजा शिशुपाला - पुरुषशार्दूल - हे पुरुषश्रेष्ठा - इदं दौर्मनस्यं त्यज - हा मनाचा खिन्नपणा सोडून दे - प्रियाप्रिययोः निष्ठा - प्रिय किंवा अप्रिय गोष्टींचे स्थैर्य - देहिषु न दृश्यते - प्राण्यांमध्ये दिसत नाही. ॥११॥

हे पुरुषसिंहा ! ही उदासीनता सोडून दे; कारण हे राजन ! प्राण्यांच्या बाबतीत कोणतीही गोष्ट मनासारखीच होईल किंवा मनाविरुद्ध होईलच याची खात्री देता येत नाही. (११)

विवरण :- जरासंध व शिशुपाल यांचा रामकृष्णाकडून लाजिरवाणा पराभव झाला. त्यांच्या भावी वधूचे डोळ्यादेखत रामकृष्णांनी हरण केले. अशा दुहेरी अपमानास त्यांना तोंड द्यावे लागले. शिशुपालाच्या दुःखाला पारावार राहिला नाही. तेव्हा त्याचे सांत्वन करताना इतर राजे म्हणाले, 'मानवी जीवनामध्ये सुख किंवा दुःख काहीच कायम रहात नाही, परिस्थिती बदलत असते. (नीचैर्गच्छत्युपरि च दशा चक्रनेमिक्रमेण । चाकाचे आरे जसे ते चाक फिरते तसे खाली-वर फिरतात, तसे सुख-दुःखाचे चक्रहि फिरते.) त्यामुळे आताचा हा दुःखाचा काळ क्षणीक आहे, तो जाऊन निश्चितच सुख प्राप्त होईल. (युद्धात यशस्वी व्हाल.) (११)



यथा दारुमयी योषित् नृत्यते कुहकेच्छया ।
एवं ईश्वरतन्त्रोऽयं ईहते सुखदुःखयोः ॥ १२ ॥
बाहुल्यांचा जसा खेळ तसे त्या भगवत्‌कृपें ।
लाभते सुख वा दुःख खेद त्याचा करू नये ॥ १२ ॥

यथा दारुमयी योषित् - जशी लाकडाची बाहुली - कुहकेच्छया नृत्यते - नाचविणार्‍याच्या इच्छेने नाचते - एवं ईश्वरतन्त्रः अयं - त्याप्रमाणे ईश्वराधीन असा हा जीव - सुखदुःखयोः ईहते - सुखदुःखांमध्ये धडपड करितो. ॥१२॥

कठपुतळी ज्याप्रमाणे सूत्राधाराच्या इच्छेनुसार नाचत असते, त्याप्रमाणे हा जीवसुद्धा भगवंतांच्या इच्छेनुसारच सुख-दु:खासंबंधी प्रयत्‍न करीत असतो. (१२)

विवरण :- आपल्या विधानास पुष्टी देण्यास राजे व्यावहारिक उदाहरण देतात. ज्याप्रमाणे कळसूत्री बाहुली आपल्या इच्छेप्रमाणे न नाचता हाती दोरी असणार्‍याच्या इच्छेप्रमाणे, तो नाचवेल तसे नाचते, तिच्या इच्छेला काहीच किंमत नसते; त्याप्रमाणे मनुष्याच्या इच्छेला काहीच किंमत नाही. त्याला त्याच्या इच्छेप्रमाणे सुख-दुःख न मिळता ईश्वराच्या इच्छेप्रमाणे मिळते. (ईश्वरेच्छा बलीयसी) मनुष्यहि ईश्वराच्या हातातील कळसूत्री बाहुलेच आहे. त्याला त्याच्या गुणकर्मानुसार आणि ईश्वरेच्छेप्रमाणे सुखदुःख मिळते. म्हणून आता मिळालेले दुःख हे ईश्वराच्या इच्छेनुसार मिळाले असे समज, आणि ही परिस्थिती पालटून सुखाचे दिवस येतील ही आशा बाळगून रहा. (ठेविले अनंते तैसेचि रहावे असे म्हटले आहेच.) (१२)



शौरेः सप्तदशाहं वै संयुगानि पराजितः ।
त्रयोविंशतिभिः सैन्यैः जिग्य एकमहं परम् ॥ १३ ॥
तेविस् अक्षौहिनी सैन्य सत्रावेळाहि कृष्णने ।
मारिले परि मी अंती एकदा यश घेतले ॥ १३ ॥

त्रयोविंशतिभिः सैन्यैः युक्तः अहं - तेवीस अक्षौहिणी सैन्यासह असणारा मी - सप्तदश संयुगानि शौरैः पराजितः वै - सतरा वेळा युद्धामध्ये श्रीकृष्णाकडून जिंकला गेलो - किन्तु - पण - एकं परं संयुगम् - एक शेवटचे युद्ध - अहं जिग्ये - मी जिंकिता झालो. ॥१३॥

तेवीस तेवीस अक्षौहिणी सेनेसह माझा श्रीकृष्णाने सतरा वेळा पराभव केला. मी मात्र एकदाच त्यांच्यावर विजय मिळविला. (१३)

विवरण :- जरासंधहि शिशुपालाचा समदुःखी होता. तो तर सतरा वेळा पराभूत होऊन अठराव्या वेळी विजयी झाल्याच्या समजुतीत होता. (रामकृष्ण आगीत जळून मेले ही त्याची समजूत तर वेडेपणाची ठरली हे त्यालाहि कळले असणारच.) तोही आपल्या जय-पराजयाला तत्त्वज्ञानाची झालर लावत आता सांगतो, 'मला सतरा वेळा पराभूत होऊनहि दुःख झाले नाही आणि अठराव्या वेळच्या विजयाचाही आनंद झाला नाही. (ही दोनहि विधाने खोटीच, कारण एकदा पराभव झाल्यानंतर दुःख, अपमान झाला नसता, तर त्याने पुन्हा पुन्हा स्वारी केली नसती अन अठराव्या वेळी रामकृष्ण केवळ दिसले नाहीत, म्हणून विजयी झाल्याची समजूत करून घेऊन आनंदोत्सव केला नसता.) सुख आणि दुःख मला दोनहि परमेश्वरानेच दिले असे मी मानतो.' आपण स्थितप्रज्ञ आहोत, (सुखदुःखे समेकृत्वा अशी भावना झाली असल्याने) असा जो जरासंधाने आव आणला आहे, त्यात त्याचा दांभिकपणाच दिसून येतो. (१३)



तथाप्यहं न शोचामि न प्रहृष्यामि कर्हिचित् ।
कालेन दैवयुक्तेन जानन् विद्रावितं जगत् ॥ १४ ॥
न मला दुःख वा हर्ष मी ते प्रारब्ध मानितो ।
भगवान् कालशक्तीने फिरवी विश्वचक्र हे ॥ १४ ॥

तथापि - तरीसुद्धा - दैवयुक्तेन कालेन - दैवाने युक्त अशा कालाने - विद्रावितं जगत् जानन् - चालविलेल्या जगाला जाणारा - अहं - मी - कर्हिचित् न शोचामि न प्रहृष्यामि - कधीहि शोक करीत नाही व आनंदितही होत नाही. ॥१४॥

तरीसुद्धा या घटनेबद्दल मी कधी शोक करीत नाही की आनंदीत होत नाही. कारण मला हे माहीत आहे की, प्रारब्धानुसार कालच या जगाला नाचवीत असतो. (१४)


अधुनापि वयं सर्वे वीरयूथपयूथपाः ।
पराजिताः फल्गुतन्त्रैः यदुभिः कृष्णपालितैः ॥ १५ ॥
प्रमूख वीर सेनेचे नच संशय आपण ।
थोड्याशा कृष्णसेनेने या वेळी हरवीयले ॥ १५ ॥

वीर - हे पराक्रमी पुरुषा - तथापि - तरीहि - यूथपयूथपाः सर्वे वयं - सेनापतीचे अधिपती असे सर्व आम्ही - अधुना अपि - आता सुद्धा - फल्गुतन्त्रैः कृष्णपालितैः यदुभिः पराजिताः - थोडे सैन्य असणार्‍या परंतु श्रीकृष्णाने रक्षिलेल्या यादवांकडून जिंकले गेलो. ॥१५॥

आम्ही सर्वजण मोठमोठ्या वीर सेनापतींचे सुद्धा अधिपती असून श्रीकृष्णाच्या आधिपत्याखाली असलेल्या यादवांनी थोड्याशा सेनेनिशीच आमचा पराजय केला. (१५)


रिपवो जिग्युरधुना काल आत्मानुसारिणि ।
तदा वयं विजेष्यामो यदा कालः प्रदक्षिणः ॥ १६ ॥
अनुकूल तया काल म्हणोनी शत्रु जिंकला ।
येताच उजवा काल जिंकू आपण तेधवा ॥ १६ ॥

अधुना - सांप्रत - रिपवः - शत्रु - आत्मानुसारिणि काले - त्यांना स्वतःला अनुकूल अशा कालामध्ये - जिग्युः - जिंकिते झाले - यदा कालः (अस्माकम्) प्रदक्षिणः (भवेत्) - जेव्हा काळ आम्हाला अनुकूल होईल - तदा वयं विजेष्यामः - तेव्हा आम्ही जिंकू. ॥१६॥

यावेळी शत्रूंचा विजय झाला, कारण काल त्यांना अनुकूल होता. जेव्हा तो आम्हांला अनुकूल होईल, तेव्हा आम्हीसुद्धा त्यांना जिंकू. (१६)

विवरण :- जरासंधाने तोंडाने कितीही तत्त्वज्ञान सांगितले तरी त्याला आतून कृष्णाशी युद्ध करण्याची खुमखुमी होतीच हे या श्लोकात दिसून येते. कारण काळ आता कृष्णाला अनुकूल आहे म्हणून तो जिंकला, आपल्याला अनुकूल झाला की आपणहि जिंकूच असे त्याचे मत. याचवरून कृष्णाबद्दलचा त्याच्या मनातील उघड उघड द्वेष दिसून येतो. फक्त कृष्णापुढे काहीच न चालल्याने त्याने तत्त्वज्ञान (पोकळ) सांगितले होते एवढेच. (१६)



श्रीशुक उवाच -
एवं प्रबोधितो मित्रैः चैद्योऽगात् सानुगः पुरम् ।
हतशेषाः पुनस्तेऽपि ययुः स्वं स्वं पुरं नृपाः ॥ १७ ॥
चेदिराज शिशुपाल स्वदेशी पातला तदा ।
आपुल्या नगरा गेले मरता वाचले असे ॥ १७ ॥

एवं मित्रैः प्रबोधितः चैद्यः - याप्रमाणे मित्रांनी उपदेशिलेला शिशुपाल - सानुगः पुरम् अगात् - अनुयायांसह नगराला गेला - पुनः - पुनः - हतशेषाःते नृपाः अपि - मारून उरलेले ते राजे सुद्धा - स्वं स्वं पुरं ययुः - आपापल्या नगराला गेले. ॥१७॥

जेव्हा मित्रांनी त्याला अशाप्रकारे समजावले, तेव्हा तो आपल्या अनुयायांसह आपल्या राजधानीला परत गेला आणि त्याचे वाचलेले मित्रराजेसुद्धा आपापल्या नगरांकडे गेले. (१७)


रुक्मी तु राक्षसोद्वाहं कृष्णद्विडसहन् स्वसुः ।
पृष्ठतोऽन्वगमत् कृष्णं अक्षौहिण्या वृतो बली ॥ १८ ॥
न सहे रुक्मिवीराला एक अक्षौणि सैन्य ते ।
घेवोनी कृष्ण सेनेच्या पाठीसी धावला असे ॥ १८ ॥

कृष्णाद्विट् रुक्मी तु - श्रीकृष्णाचा द्वेष करणारा रुक्मी तर - स्वसुः राक्षसोद्वाहम् असहन् - बहीण जी रुक्मिणी तिच्या राक्षस विवाहाला सहन न करणारा - अक्षौहिण्या युतःबली - एक अक्षौहिणी सैन्याने वेष्टिलेला असा बलिष्ठ - कृष्णं पृष्ठतः अन्वगमत् - श्रीकृष्णाच्या मागोमाग पाठलाग करीत चालला. ॥१८॥

विवरण :- या सर्व राजांमध्ये कृष्णाचा खरा शत्रू होता रुक्मी. तो मनापासून कृष्णाचा द्वेष करीत होता. त्यातून कृष्णाने रुक्मिणीचे हरण केले, ही राक्षस-विवाहाची पद्धत त्याला आपल्या खानदानी मोठेपणाला कलंकभूत आणि अत्यंत अपमानास्पद वाटली. (१८)

पण कृष्णद्वेष्ट्या रुक्मीला मात्र बहिणीचा श्रीकृष्णांशी राक्षसविवाह सहन झाला नाही. त्यामुळे बलवान रुक्मीने एक अक्षौहिणी सेनेसह श्रीकृष्णांचा पाठलाग केला. (१८)


रुक्म्यमर्षी सुसंरब्धः श्रृण्वतां सर्वभूभुजाम् ।
प्रतिजज्ञे महाबाहुः दंशितः सशरासनः ॥ १९ ॥
क्रोधाने पेटला रुक्मी कवचो लेवुनी, करी ।
धनुष्य घेउनी बोले संकल्प त्या नृपां पुढे ॥ १९ ॥

अमर्षी सुसंरब्धः महाबाहुः दंशितः - क्रोधी, संतापलेला, आजानुबाहु व चिलखत घातलेला - सशरासनः रुक्मी - धनुष्य धारण केलेला रुक्मी - सर्वभूभुजां शृण्वतां - सर्व राजे ऐकत असता - प्रतिजज्ञे - प्रतिज्ञा करिता झाला. ॥१९॥

महाबाहू रुक्मी खवळला. कवच अंगात घालून आणि धनुष्य घेऊन त्याने सर्व राजांच्या समोर प्रतिज्ञा केली. (१९)


अहत्वा समरे कृष्णं अप्रत्यूह्य च रुक्मिणीम् ।
कुण्डिनं न प्रवेक्ष्यामि सत्यमेतद्ब्रवीमि वः ॥ २० ॥
न मारी जर मी कृष्णा न आणी बहिणीस त्या ।
तर मी नच की येई कुंडिण्यपुरि या कधी ॥ २० ॥

समरे कृष्णम् अहत्वा - युद्धात श्रीकृष्णाला मारल्याशिवाय - च रुक्मिणीम् अप्रत्यूह्य - आणि रुक्मिणीला परत आणिल्याशिवाय - कुण्डिनं न प्रवेक्ष्यामि - कुंडिनगरीत प्रवेश करणार नाही - एतत् वः सत्यं ब्रवीमि - हे तुम्हाला खरे सांगतो. ॥२०॥

आपणा सर्वांसमक्ष मी प्रतिज्ञा करतो की, जर युद्धात श्रीकृष्णाला मारून मी रुक्मिणीला परत आणले नाही, तर कुंडिनपुरात प्रवेश करणार नाही. (२०)


इत्युक्त्वा रथमारुह्य सारथिं प्राह सत्वरः ।
चोदयाश्वान्यतः कृष्णः तस्य मे संयुगं भवेत् ॥ २१ ॥
वदला सारथ्याला की शीघ्रातिशीघ्र चालणे ।
होईल आजची माझे कृष्णाशी घोर युद्ध ते ॥ २१ ॥

इति उक्त्वा - असे बोलून - रथम् आरुह्य - रथात चढून - सत्वरः सारथिं प्राह - तत्काळ सारथ्याला म्हणाला - यतः कृष्णः अस्ति ततः अश्वान् चोदय - जिकडे कृष्ण आहे तिकडे घोडे हाक - (येन) तस्य मे संयुगं भवेत् - ज्यायोगे त्याच्याशी माझे युद्ध होईल. ॥२१॥

असे म्हणून तो रथावर आरूढ झाला आणि सारथ्याला म्हणाला, "जेथे कृष्ण असेल, तेथे घोड्यांना ताबडतोब पिटाळ. आज मला त्याच्याबरोबर युद्ध करायचे आहे." (२१)


अद्याहं निशितैर्बाणैः गोपालस्य सुदुर्मतेः ।
नेष्ये वीर्यमदं येन स्वसा मे प्रसभं हृता ॥ २२ ॥
आज मी तीक्ष्ण बाणाने गोपाचा गर्व नष्टितो ।
पहा साहस ते कैसे नेतसे भगिनी बळें ॥ २२ ॥

अद्य अहं - आज मी - निशितैः बाणैः - तीक्ष्ण बाणांनी - सुदुर्मतेः गोपालस्य - दुष्टबुद्धी अशा गुराखी श्रीकृष्णाचा - वीर्यमदं नेष्ये - पराक्रमाविषयींचा गर्व हरण करीन - येन मे स्वसा प्रसभं हृता - ज्याने माझी बहीण बलात्काराने हिरावून नेली. ॥२२॥

आज मी माझ्या तीक्ष्ण बाणांनी त्या दुष्ट गवळ्याच्या शौर्याचा गर्व धुळीला मिळवीन. कारण माझ्या बहिणीला तो बळजबरीने घेऊन गेला आहे.(२२)


विकत्थमानः कुमतिः ईश्वरस्याप्रमाणवित् ।
रथेनैकेन गोविन्दं तिष्ठ तिष्ठेत्यथाह्वयत् ॥ २३ ॥
परीक्षित् कृष्णते जाते रुक्मी तो नच जाणि की ।
गोविंदापाशि तो येता वदला थांब थांब रे ॥ २३ ॥

अथ - नंतर - कुमतिः ईश्वरस्य अप्रमाणवित् (सः) - दुर्बुद्धी व ईश्वराची योग्यता न जाणणारा तो रुक्मी - विकत्थमानः - बडबड करीत - एकेन रथेन - एकाच रथाने - तिष्ठ तिष्ठ इति - उभा रहा उभा रहा असे - गोविंदम् आह्वयत् - श्रीकृष्णाला बोलाविता झाला. ॥२३॥

भगवंतांचा प्रभाव न ओळखणारा तो मूर्ख अशी बडबड करीत फक्त एकच रथ घेऊन श्रीकृष्णांना " थांब ! थांब !" म्हणून आव्हान देऊ लागला. (२३)


धनुर्विकृष्य सुदृढं जघ्ने कृष्णं त्रिभिः शरैः ।
आह चात्र क्षणं तिष्ठ यदूनां कुलपांसन ॥ २४ ॥
यत्र यासि स्वसारं मे मुषित्वा ध्वाङ्क्षवद्धविः ।
हरिष्येऽद्य मदं मन्द मायिनः कूटयोधिनः ॥ २५ ॥
सोडिले तीर ते तीन बळाने धनु खेचुनी ।
वदला क्षण तू थांब यदुवंशकलंक तू ॥ २४ ॥
कावळा आहुती चोरी तसा रुक्मिणि चोरिशी ।
मायावी कपटी तू तो गर्व मी हरितो तुझा ॥ २५ ॥

सुदृढं धनुः विकृष्य - बळकट धनुष्य ओढून - त्रिभिः शरैः - तीन बाणांनी - कृष्णं जघ्ने - श्रीकृष्णाला ताडिता झाला - आह च - आणि म्हणाला - यदूनां कुलपांसन - हे यदुकुळाला दूषविणार्‍या कृष्णा - अत्र क्षणं तिष्ठ - येथे क्षणभर उभा रहा. ॥२४॥

मंद - हे मंदबुद्धीच्या कृष्णा - हविः ध्वाङ्‌क्षवत् - हविर्भागाचे जसा कावळा हरण करितो त्याप्रमाणे - मे स्वसारं मुषित्वा - माझ्या बहिणीला चोरून - कुत्र यासि - कोठे जातोस - अद्य - आज - कूटयोधिनः मायिनः ते - कपटाने युद्ध करणार्‍या मायावी अशा तुझा - मदं - गर्व - हरिष्ये - मी हरीन. ॥२५॥

त्याने धनुष्याची दोरी ताकदीने ओढून श्रीकृष्णांना तीन बाण मारले आणि तो म्हणाला, "यदूंच्या कुलकलंका ! जरा थांब. कावळ्याने हविर्द्रव्य पळवावे, त्याप्रमाणे तू माझ्या बहिणीची चोरी करून कुठे पळून चाललास ? अरे मूर्खा ! तू मायावी आणि कपटयुद्धात कुशल आहेस. आज मी तुझा गर्व पार धुळीला मिळवतो." (२४-२५)

विवरण :- कृष्णाला 'गवळी' इ. तिरस्कारयुक्त अपशब्द वापरून रुक्मीचे समाधान झाले नाही; तर त्याचा पूर्ण पराभव करून आपल्या बहिणीला परत आणल्याशिवाय आपले खरे समाधान नाही असे वाटून त्याने तिला परत आणण्याची प्रतिज्ञाच केली. त्याच्या म्हणण्याप्रमाणे कृष्णाने रुक्मिणीला कसे उचलून नेले ? कावळ्याने यज्ञातील हविर्भाग पळवून न्यावा तसे. वास्तविक यज्ञातील हविर्भागावर अग्नी, इंद्र यांचाच खरा अधिकार असतो. तो हविर्भाग त्यांना मोठया श्रद्धेने यजमानाने अर्पण केलेला असतो. यज्ञासारख्या पवित्र ठिकाणी कावळ्याला प्रवेशहि निषिद्ध, मग हविर्भाग मिळणे तर दूरच. त्याची ती लायकीच नाही. त्याने फक्त पिंडच खावा. पण लबाडीने जर त्याने पळविला, तर त्याला मारूनच टाकायला हवे. तसेच कृष्णरूपी कावळा रुक्मिणीला योग्य वर नाहीच, तो मान (रुक्मीच्या दृष्टीने) शिशुपालाचाच. म्हणून कृष्णरूपी कावळ्याने पळविलेला रुक्मिणीरूपी 'हवि' योग्य अशा वराला, म्हणजे शिशुपालालाच मिळावयास हवा, असा भाव. (२५)



यावन्न मे हतो बाणैः शयीथा मुञ्च दारीकाम् ।
स्मयन्कृष्णो धनुश्छित्त्वा षड्‌भिर्विव्याध रुक्मिणम् ॥ २६ ॥
अष्टभिश्चतुरो वाहान् द्वाभ्यां सूतं ध्वजं त्रिभिः ।
स चान्यत् धनुरादाय कृष्णं विव्याध पञ्चभिः ॥ २७ ॥
मुलगी सोडुनी जा तू अन्यथा तीर सोडितो ।
सहा सोडोनिया बाण कृष्णाने धनु तोडिले ॥ २६ ॥
अश्वासी चार नी तैसे सारथ्यावीर दोन ते ।
ध्वजेला तीन नी पाच रुक्मिच्या वरि सोडिले ॥ २७ ॥

यावत् - जोपर्यंत - मे बाणः - माझ्या बाणांनी - हतः न शयिथाः - वधिलेला तू शयन केले नाहीस - (तावत्) दारिकां मुञ्च्व - तोपर्यंत धाकटी बहिण जी रुक्मिणी तिला सोडून दे - (इति श्रुत्वा) स्मयन् कृष्णः - असे ऐकून स्मित करणारा श्रीकृष्ण - (तस्य) धनुः छित्वा - त्या रुक्मीचे धनुष्य तोडून - षड्‌भिः रुक्मिणं विव्याध - सहा बाणांनी रुक्मीला ताडिता झाला - अष्टभिः चतुरः वाहान् - आठ बाणांनी चार घोडयांना - द्वाभ्यां सूतं - दोन बाणांनी सारथ्याला - त्रिभिः ध्वजं - तीन बाणांनी ध्वजाला - विव्याध - वेधिता झाला - सः च - रुक्मीसुद्धा - अन्यत् धनुः आदाय - दुसरे धनुष्य घेऊन - पञ्च्वभिः कृष्णं विव्याध - पाच बाणांनी श्रीकृष्णाला वेधिता झाला. ॥२६-२७॥

माझे बाण जोपर्यंत तुला जमिनीवर आडवे करीत नाहीत, तोवरच या मुलीला सोडून दे. तेव्हा श्रीकृष्णांनी किंचीत हसून त्याचे धनुष्य तोडून टाकले आणि त्याच्यावर सहा बाण सोडले. (२६) तसेच त्याच्या चार घोड्यांवर आठ बाण आणि सारथ्यावर दोन बाण सोडले. शिवाय तीन बाणांनी ध्वज तोडून टाकला. तेव्हा रुक्मीने दुसरे धनुष्य घेऊन श्रीकृष्णांवर पाच बाण सोडले. (२७)


तैस्तादितः शरौघैस्तु चिच्छेद धनुरच्युतः ।
पुनरन्यद् उपादत्त तदप्यच्छिनदव्ययः ॥ २८ ॥
दुसरे धनु जै भंगे रुक्मी तै तिसरे हि घे ।
तरीही तिसरे तोडी अच्यूत अविनाशि तो ॥ २८ ॥

तैः शरौघैः ताडितः अच्युतः तु - त्या बाणसमूहांनी ताडिलेला श्रीकृष्ण तर - (तस्य) धनुः चिच्छेद - त्या रुक्मीचे धनुष्य तोडिता झाला - (सः अपि) पुनः अन्यत् उपादत्त - तो रुक्मीसुद्धा पुनः दुसरे धनुष्य घेता झाला - अव्ययः तत् अपि अच्छिनत् - अविनाशी अशा श्रीकृष्णाने ते सुद्धा धनुष्य़ तोडिले. ॥२८॥

ते बाण लागल्यावर त्यांनी त्याचे तेही धनुष्य तोडून टाकले. नंतर रुक्मीने आणखी एक धनुष्य घेतले, परंतु अच्युतांनी तेही तोडून टाकले. (२८)


परिघं पट्टिशं शूलं चर्मासी शक्तितोमरौ ।
यद्यदायुधमादत्त तत् सर्वं सोऽच्छिनद्धरिः ॥ २९ ॥
पट्टीश परिघो शूळ ढाल खड्ग नि तोमर ।
शस्त्रास्त्र करि घे रुक्मी तेंव्हाचि कृष्ण तोडी ते ॥ २९ ॥

परिघं पटटिशं शूलं चर्मासी शक्तितोमरौ - परिघ, पटटिश, शूल, ढाल, तलवार, शक्ति व तोमर - यत् यत् आयुधं (रुक्मी) आदत्त - जे जे आयुध रुक्मी ग्रहण करी - तत् सर्वं सः हरिः अच्छिनत् - ते सर्व तो श्रीकृष्ण तोडिता झाला. ॥२९॥

रुक्मीने परिघ, पट्टिश, शूल, ढाल, तलवार, शक्ती, तोमर इत्यादी जी जी शस्त्रास्त्रे हातात घेतली, ती ती सर्व भगवंतांनी तोडून टाकली. (२९)


ततो रथादवप्लुत्य खड्गपाणिर्जिघांसया ।
कृष्णमभ्यद्रवत् क्रुद्धः पतङ्ग इव पावकम् ॥ ३० ॥
पुन्हा घेवोनि खड्गाते माराया रुक्मी धावला ।
अग्निच्या वरि जै झेप पतंग घेतसे तसा ॥ ३० ॥

ततः - नंतर - खड्‌गपाणिः (सः) - हातात तलवार घेतलेला तो रुक्मी - कृष्णं जिघांसया - श्रीकुष्णाला मारण्याच्या इच्छेने - रथात् अवप्लुत्य - रथातून उडी मारून - क्रुद्धः - रागावलेला - पतङगः पावकम् इव (कृष्णं) अभ्यपतत् - पतंग अग्नीकडे जसा तसा कृष्णाकडे धावत गेला. ॥३०॥

तेव्हा संतापून रुक्मीने हातात तलवार घेऊन श्रीकृष्णांना मारण्याच्या हेतूने रथातून खाली उडी टाकली आणि पतंग जसा दिव्यावर झेप घेतो, त्याप्रमाणे त्याने त्यांच्यावर झेप घेतली. (३०)

विवरण :- रुक्मीने टाकलेले सर्व बाण कृष्णाने मध्येच तोडून टाकले. तेव्हा संतापून तो तलवार हाती घेऊन रथातून खाली उतरला व पतंग जसा दिव्यावर (अग्नीवर) झडप घेतो, तसा कृष्णावर तुटून पडला. इथे रुक्मीस पतंगाची व कृष्णास अग्नीची उपमा दिली आहे. पतंग अग्नीवर झेप घेतो, तेव्हा त्याचा मृत्यू अटळ, हे उघडच असते. परंतु आपल्या आवाक्याचा, परिणामांचा विचार न करता तो अग्नीवर, ज्योतीवर झेप घेत असतो. त्याचवेळी त्याचा मृत्य़ुही अटळच असतो. पण अविचाराने तो आपला मृत्यू ओढवून घेतो, त्याप्रमाणे श्रीकृष्णावर हल्ला, म्हणजे पराभव, मृत्यू अटळ हे वास्तव समजून न घेता रुक्मीने त्याच्यावर हल्ला करून आपला पराभव ओढवून घेतला असा भाव. (३०)



तस्य चापततः खड्गं तिलशश्चर्म चेषुभिः ।
छित्त्वासिमाददे तिग्मं रुक्मिणं हन्तुमुद्यतः ॥ ३१ ॥
कृष्णाने बाण सोडोनी खड्ग नी ढालही तशी ।
ठिकर्‍या ठिकर्‍या केली माराया खड्ग घेतले ॥ ३१ ॥

सः अपि - तो श्रीकृष्णसुद्धा - आपततः तस्य च - धावत येणार्‍या त्या रुक्मीची - खड्‌गं च चर्म - तलवार व ढाल यांचे - इषुभिः तिलशः छित्त्वा - बाणांनी तिळाएवढे तुकडे करून - रुक्मिणं हन्तुं उद्यतः - रुक्मीला मारण्यास उद्युक्त झालेला - तिग्मं असिं आददे - तीक्ष्ण तलवार घेता झाला. ॥३१॥

रुक्मी चाल करून येत असलेला पाहून श्रीकृष्णांनी आपल्या बाणांनी त्याच्या ढाल-तलवारीचे तुकडे तुकडे केले आणि त्याला मारण्यासाठी म्हणून तीक्ष्ण तलवार हातात घेतली. (३१)


दृष्ट्वा भ्रातृवधोद्योगं रुक्मिणी भयविह्वला ।
पतित्वा पादयोर्भर्तुः उवाच करुणं सती ॥ ३२ ॥
बंधुला वधण्या कृष्ण निघता पाहि रुक्मिणी ।
भयाने धरुनी पाय कृष्णाला विनवीतसे ॥ ३२ ॥

(कृष्णस्य) भ्रातृवधोद्योगं दृष्टवा - कृष्णाचा आपल्या भावाला मारण्याबद्दलचा उद्योग पाहून - भयविह्वला सती रुक्मिणी - भयाने व्याकुळ झालेली साध्वी रुक्मिणी - भर्तुः पादयोः पतित्वा - पति जो श्रीकृष्ण त्याच्या पाया पडून - करुणं उवाच - दीनपणाने बोलली. ॥३२॥

आपले भावी पती भावाला मारू पाहात आहेत, हे पाहून रुक्मिणी भीतीने व्याकूळ झाली आणि पतींच्या चरणांवर लोटांगण घालून काकुळतीने म्हणाली. (३२)


श्रीरुक्मिण्युवाच -
योगेश्वराप्रमेयात्मन् देवदेव जगत्पते ।
हन्तुं नार्हसि कल्याण भ्रातरं मे महाभुज ॥ ३३ ॥
कृष्णा योगेश्वरो तुम्ही देवदेवो जगत्पती ।
न मारी बंधु हा माझा बली कल्याणरूप तू ॥ ३३ ॥

योगेश्वर अप्रमेयात्मन् - हे योगाधिपते, निरुपमस्वरूपा - देवदेव जगत्पते - हे देवश्रेष्ठा जगन्नाथा - कल्याण महाभुज - हे कल्याणस्वरूपा आजानुबाहो श्रीकृष्णा - मे भ्रातरं हन्तुं न अर्हसि - माझ्य़ा भावाला मारण्यास तू योग्य नाहीस. ॥३३॥

हे देवदेवा ! हे जगत्पाते ! हे योगेश्वरा ! आपले स्वरूप कोणी जाणू शकत नाही. हे महापरक्रमी ! हे कल्याणस्वरूप ! आपण माझ्या भावाला मारू नये. (३३)


श्रीशुक उवाच -
( मिश्र )
तया परित्रासविकम्पिताङ्गया
     शुचावशुष्यन् मुखरुद्धकण्ठया ।
कातर्यविस्रंसितहेममालया
     गृहीतपादः करुणो न्यवर्तत ॥ ३४ ॥
( इंद्रवज्रा )
श्रीशुकदेवजी सांगतात -
थरारली रुक्मिणि अंग‍अंगी
     सुके मुखो नी भरलाहि कंठ ।
धरी हरीचे पद रुक्मिणी तै
     रुक्मास सोडी नच कृष्ण मारी ॥ ३४ ॥

परित्रासविकम्पितङगया - त्रासामुळे कापू लागले आहे शरीर जीचे अशा - शुचा अवशुष्यन्मुखरुद्धकण्ठया - शोकाने मुख सुकून गेल्यामुळे जिचा कंठ सद्‌गदित झाला आहे अशा - कातर्यविस्रंसितहेममालया - घाबरल्यामुळे सुवर्णमाळा गळून गेली आहे जिची अशा - तया - त्या रुक्मिणीने - गृहीतपादः - ज्याचे चरण घटट धरले आहेत असा - करुणः न्यवर्तत - दयाळू श्रीकृष्ण परावृत्त झाला. ॥३४॥

श्रीशुक म्हणतात- रुक्मिणी भीतीने थरथर कापत होती. शोकामुळे तिचा चेहरा सुकला होता, गळा दाटून आला होता. भीतीमुळे सोन्याचा हार तिच्या गळ्यातून खाली पडला होता. अशा अवस्थेत तिने भगवंतांचे चरण पकडले. तेव्हा भगवंतांचे हृदय करुणेने द्रवले आणि त्यांनी रुक्मीला मारण्याचा विचार सोडून दिला. (३४)


चैलेन बद्ध्वा तमसाधुकारीणं
     सश्मश्रुकेशं प्रवपन् व्यरूपयत् ।
तावन्ममर्दुः परसैन्यमद्‌भुतं
     यदुप्रवीरा नलिनीं यथा गजाः ॥ ३५ ॥
तरीहि धावे वधण्यास रुक्मी
     बांधी हरी तै मग मूछ कापी ।
अद्‌भूत सेना यदूची अशी की
     विध्वंसिले ते अरिसैन्य सारे ॥ ३५ ॥

असाधुकारिणं तं - दुर्वर्तनी अशा त्या रुक्मीला - चैलेन बद्‌ध्वा - वस्त्राने बांधून - सश्मश्रुकेशं प्रवपन् व्यरूपयत् - दाढीसुद्धा क्षौर करून विरूप करिता झाला - तावत् - तितक्यात - यदुप्रवीराः - पराक्रमी यादव - यथा गजाः नलिनीं (तथा) - जसा हत्ती कमलिनीला तसा - अद्‌भुतं परसैन्यं ममर्दुः - आश्चर्यजनक अशा शत्रुसैन्याला मारिते झाले. ॥३५॥

तरीसुद्धा मारण्याचा प्रयत्‍न करणार्‍या त्याला श्रीकृष्णांनी दुपट्ट्याने बांधून व त्याच्या दाढी-मिशांचे पाट काढून त्याला विद्रूप केले. तोपर्यंत यदुवीरांनी शत्रूच्या अद्‌भूत सेनेला हत्ती जसे कमळांचे ताटवे चुरगाळून टाकतो, त्याप्रमाणे छिन्नविछिन्न करून टाकले. (३५)

विवरण :- हाती तलवार घेऊन अंगावर तुटून पडलेल्या रुक्मीला पकडून कृष्णाने त्याच्या दाढी-मिशा छाटल्या आणि त्याला विद्रूप केले. इतक्यात रुक्मीच्या सैन्याचा नाश करून यादववीरही परत आले; कसे ? हत्ती कमलाचे मर्दन करतो (कमळ चुरगळून टाकतो) तसे. या उपमेवरून हत्तीरूपी यादवांनी रुक्मीच्या कमळरूपी सैन्याला अत्यंत सहजतेने अगदी खेळातल्याप्रमाणे पिटाळून लावले, त्यांना चिरडले हे सिद्ध होते. (३५)



( अनुष्टुप् )
कृष्णान्तिकं उपव्रज्य ददृशुस्तत्र रुक्मिणम् ।
तथाभूतं हतप्रायं दृष्ट्वा सङ्कर्षणो विभुः ।
विमुच्य बद्धं करुणो भगवान् कृष्णमब्रवीत् ॥ ३६ ॥
( अनुष्टुप् )
बलरामहि ते येता अर्धमेला नि बद्ध या ।
रुक्मीस पाहता सोडी, कृष्णाला वदले तदा ॥ ३६ ॥

कृष्णान्तिकम् उपव्रज्य - श्रीकृष्णाजवळ येऊन - तत्र रुक्मिणं ददृशुः - तेथे रुक्मीला पाहते झाले - संकर्षणः विभुः - समर्थ बलराम - तथाभूतं हतप्रायं (रुक्मिणं) दृष्टवा - तशा तर्‍हेच्या नष्टप्राय झालेल्या त्या रुक्मीला पाहून - करुणः - दयाळू - भगवान् - बलराम - बद्धं तं विमुच्य - बांधलेल्या रुक्मीला सोडून - कृष्णम् अब्रवीत् - श्रीकृष्णाला म्हणाला. ॥३६॥

नंतर ते लोक तेथून माघारी फिरून श्रीकृष्णांच्याजवळ आले आणि पाहातात तर दुपट्ट्याने बांधलेला रुक्मी अर्धमेल्या अवस्थेत पडला आहे. त्याला पाहून भगवान बलरामांना त्याची दया आली आणि त्यांनी त्याला मोकळे केले. नंतर ते श्रीकृष्णांना म्हणाले. (३६)


असाध्विदं त्वया कृष्ण कृतं अस्मज्जुगुप्सितम् ।
वपनं श्मश्रुकेशानां वैरूप्यं सुहृदो वधः ॥ ३७ ॥
न योग्य जाहले कृष्णा मुंडनो मृत्युची असे ।
निंदनीय असे कार्य आपणा नच शोभते ॥ ३७ ॥

कृष्ण - हे श्रीकृष्णा - त्वया - तुझ्याकडून - इदं अस्मज्जुगुप्सितं असाधु कृतं - हे आमच्या कुळाला न साजेसे निंद्य व वाईट कृत्य केले गेले - सुहृदः श्मश्रुकेशानां वपनं वैरूप्यं वधः - मित्राचे दाढीमिशादि केस काढून कुरूपत्व करणे म्हणजे वधच होय. ॥३७॥

हे कृष्णा ! तू हे चांगले केले नाहीस. असे करणे आम्हांला शोभत नाही. आपल्या नातलगाच्या दाढी-मिशा छाटून त्याला कुरूप करणे, हा तर एक प्रकारे त्याचा वधच होय. (३७)

विवरण :- वैरूप्यं सुहृदो वधः - वास्तविक श्रीकृष्ण रुक्मीचा वधच करणार होता; पण रुक्मिणीने तसे करू दिले नाही. कृष्णाने त्याच्या दाढी-मिशा (केशवपन) काढून त्यास विद्रूप केले, ही गोष्ट बलरामास आवडली नाही. शूर पुरुषाचे, किंवा कोणत्याहि पुरुषाचे अशा रीतीने केशवपन म्हणजे त्याच्या दृष्टीने अत्यंत अपमानास्पद. (दाढी-मिशा हे तर पौरूषत्वाचे प्रतीक मानले जाते.) मरणापेक्षाहि हा अपमान यातनावह ! आणि (बलरामाचे दृष्टीने) अशा रीतीने एखाद्याला शिक्षा देणे, ही ती शिक्षा देणार्‍यालाहि शोभनीय नाही. त्यात त्याचा असंस्कृतपणाच दिसून येतो. मित्रहत्या जशी निंदनीय, तसे हे कृत्य असे बलरामाचे मत. (३७)



मैवास्मान् साध्व्यसूयेथा भ्रातुर्वैरूप्यचिन्तया ।
सुखदुःखदो न चान्योऽस्ति यतः स्वकृतभुक् पुमान् ॥ ३८ ॥
रुक्मिणीसी वदे तैसा आम्हा दुष्ट न मानणे ।
जीवनी सुख दुःखाला कर्माने जीव भोगतो ॥ ३८ ॥

भ्रातुः वैरूप्यचिन्तया - भावाला कुरूप केल्याच्या काळजीने - अस्मान् साधु मा एव असुयेथाः - तुम्ही आम्हाला इतका मोठा दोष देऊ नका - यतः पुमान् स्वकृतभुक् - कारण पुरुष आपल्या कर्माचे फळ भोगतो - सुखदुःखदः अन्यः न अस्ति - सुख व दुःख देणारा असा दुसरा कोणीहि नाही. ॥३८॥

त्यानंतर रुक्मिणीला उद्देशून ते म्हाणाले- " हे पतिव्रते ! तुझ्या भावाला विद्रूप केले, म्हणून आमच्यावर तू रागावू नकोस. कारण जीवाला सुख-दु:ख देणारा दुसरा-तिसरा कोणी नसून त्याला स्वत:च्याच कर्माचे फळ भोगावे लागते." (३८)

विवरण :- रुक्मिणीचा गैरसमज होऊ नये म्हणून तिची समजुत घालताना बलराम म्हणतो, 'माणसाला आपल्याच कर्माने सुखदुःख भोगावे लागते. त्याच्या बोलण्याचा असा आशय की, रुक्मीची ही दशा म्हणजे तो कृष्णाशी अकारण वाईट वागल्याचा परिणाम आहे. यात कृष्णाचा कोणताच दोष नाही.' (३८)



बन्धुर्वधार्हदोषोऽपि न बन्धोर्वधमर्हति ।
त्याज्यः स्वेनैव दोषेण हतः किं हन्यते पुनः ॥ ३९ ॥
कृष्णासी वदले तैसे संबंधी वधपात्र ही ।
असता त्याजला नोव्हे उचीत मारणे कधी ॥ ३९ ॥

वधार्हदोषः बंधुः अपि - वध करण्यायोग्य असा दोष करणारा बंधुसुद्धा - बंधोः - भावापासून - वधं न अर्हति - वधाला पात्र होत नाही - स्वेन एव दोषेण (सः) त्याज्यः (अभूत्) - आपल्याच दोषाने टाकण्याला योग्य झालेला आहे - हतः पुनः किं हन्यते - मेलेल्याला पुनः मारण्यात काय अर्थ आहे ? ॥३९॥

नंतर श्रीकृष्णाला म्हणाले- " कृष्णा ! आपल्या नातेवाईकाने वध करण्यायोग्य अपराध केला, तरीसुद्धा आपल्याकडून त्याचा वध होणे योग्य नाही. त्याला सोडून दिले पाहिजे. स्वत:च्या अपराधामुळे तो अगोदरच मेल्यासारखा झालेला असतो. मेलेल्याला पुन्हा काय मारणार ?" (३९)

विवरण :- रुक्मीला मारण्याची इच्छा करणार्‍या कृष्णाला बलराम एक व्यावहारिक तत्त्व सांगतो, 'मेलेल्याला मारण्यात काय अर्थ ?' म्हणजेच एकतर रुक्मीच्या मनाविरुद्ध रुक्मिणीने अत्यंत सामान्य अशा गवळ्याशी राक्षसविवाह केला. इतकेच नाही तर त्या गवळ्याने कृष्णाने आपल्या अगदी मोजक्या सैनिकांसह त्याच्या प्रचंड सेनेचा पराभव केला. हे सर्व रुक्मीला आधी मरणप्राय यातना देणारे आहेच मग पुन्हा त्याला आणखी विद्रूप करून अपमानित करण्यात 'मारण्यात' काय अर्थ ? तेथे आपल्याच मनाचा क्षुद्रपणा दिसून येतो. (३९)



क्षत्रियाणामयं धर्मः प्रजापतिविनिर्मितः ।
भ्रातापि भ्रातरं हन्याद् येन घोरतमस्ततः ॥ ४० ॥
वदले रुक्मिणीलाही क्षात्रधर्मचि हा असा ।
युद्धात मारती बंधू क्षात्रधर्मचि घोर हा ॥ ४० ॥

प्रजापतिविनिर्मितः - ब्रह्मदेवाने निर्मिलेला - अयं क्षत्रियाणां धर्मः (अस्ति) - हा क्षत्रियांचा धर्म आहे - येन - ज्यामुळे - भ्राता अपि भ्रातरं हन्यात् - भाऊहि भावाला मारितो - ततः - यास्तव - सः धर्मः घोरतरः (अस्ति) - तो धर्म फार भयंकर आहे. ॥४०॥

पुन्हा रुक्मिणीला म्हणाले- "हे पतिव्रते ! ब्रह्मदेवांनी क्षत्रियांचा धर्मच असा केला आहे की, भावानेसुद्धा आपल्या भावाला मारावे. म्हणून हा क्षात्रधर्म अत्यंत कठोर आहे." (४०)


राज्यस्य भूमेर्वित्तस्य स्त्रियो मानस्य तेजसः ।
मानिनोऽन्यस्य वा हेतोः श्रीमदान्धाः क्षिपन्ति हि ॥ ४१ ॥
पुन्हा ते वदले कृष्णा ! धने जे अंध जाहले ।
ते राज्य धन स्त्री मान कारणे बंधु द्वेषिती ॥ ४१ ॥

मानिनः श्रीमदान्धाः - गर्विष्ठ असे ऐश्वर्यमदाने अन्ध झालेले पुरुष - राज्यस्य भूमेः वित्तस्य - राज्याच्या, पृथ्वीच्या, द्रव्याच्या - स्त्रियः मानस्य तेजसः - स्त्रियांच्या अभिमानाच्या पराक्रमाच्या - अन्यस्य वा - किंवा दुसर्‍या - हेतोः - कारणासाठी - क्षिपन्ति हि - धिक्कारितात. ॥४१॥

नंतर श्रीकृष्णांना म्हणाले- "जे अभिमानी लोक संपत्तीच्या गर्वाने आंधळे झालेले असतात, ते राज्य, पृथ्वी, पैसा, स्त्री, मान, तेज किंवा अन्य कोणत्याही कारणाने आपल्या बांधवांचासुद्धा तिरस्कार करतात." (४१)


तवेयं विषमा बुद्धिः सर्वभूतेषु दुर्हृदाम् ।
यन्मन्यसे सदाभद्रं सुहृदां भद्रमज्ञवत् ॥ ४२ ॥
साध्वी गे ! तुमचा बंधू प्राणिया द्वेषितो सदा ।
म्हणोनि दंडिले त्यासी भेद ना मानणे मुळी ॥ ४२ ॥

यत् - ज्याअर्थी - सर्वभूतेषु दुर्हृदां - सर्व प्राण्यांच्या ठिकाणी दुष्ट वर्तन करणार्‍या - सुहृदां भद्रं - बांधवांचे कल्याण - सदा अज्ञवत् अभद्रं मन्यसे - नेहमी अडाणी मनुष्याप्रमाणे अकल्याणकारी असे मानितेस - तत् - त्याअर्थी - तव इयं बुद्धिः विषमा - तुझी ही बुद्धी विपरीत होय. ॥४२॥

पुन्हा ते रुक्मिणीला म्हणाले- "तुझा भाऊ सर्व प्राण्यांचा द्वेष करणारा आहे. त्याच्या कल्याणासाठीच आम्ही हा दंड त्याला दिला आहे; त्याला तू अज्ञानी लोकांप्रमाणे अनुचित मानीत असलीस, तर हा तुझ्या बुद्धीचा दोष आहे." (४२)


आत्ममोहो नृणामेष कल्प्यते देवमायया ।
सुहृद् दुर्हृद् उदासीन इति देहात्ममानिनाम् ॥ ४३ ॥
देवी जे मोह मायेने आत्मा देहास मानिती ।
तयांना वाटती शत्रू मित्रही ते उदास की ॥ ४३ ॥

देहात्ममानिनां नृणां - देहालाच आत्मा मानणार्‍या मनुष्यांचा - सुहृत् दुर्हृत् उदासीनः इति - मित्र, शत्रु व उदासीन असा - एषः आत्ममोहः - हा आत्म्याला झालेला मोह - देवमायया कल्प्यते - देवाच्या मायेने होतो. ॥४३॥

हे देवी ! जे लोक भगवंतांच्या मायेने मोहित होऊन देहालाच आत्मा मानतात, त्यांनाच हा आपला मित्र, हा शत्रू आणि हा त्रयस्थ असा मोह होतो. (४३)


एक एव परो ह्यात्मा सर्वेषामपि देहिनाम् ।
नानेव गृह्यते मूढैः यथा ज्योतिर्यथा नभः ॥ ४४ ॥
आत्मा सर्वात तो एक माया त्याला न स्पर्शिते ।
जळींच्या प्रतिबिंबाला सूर्य ना मानणे कधी ॥ ४४ ॥

हि - खरोखर - सर्वेषां देहिनाम् अपि - सर्व प्राण्यांचाहि - एकः एव आत्मा सन् - एकच आत्मा असा तू - यथा ज्योतिः यथा नभः (तथा) - जसे सूर्यबिंब किंवा जसे आकाश त्याप्रमाणे - मूढैः (सः) नाना इव गुह्यते - मूर्ख लोकांकडून तो अनेक अशासारखा मानिला जातो. ॥४४॥

देह धारण करणार्‍या सर्वांचा मायातीत आत्मा एकच आहे. पाणी, घडा या उपाधिभेदाने जसे सूर्य, चंद्र इत्यादी आणि आकाश एकच असून अनेक वाटतात, त्याचप्रमाणे मूर्ख लोक शरीरभेदाने आत्मा भिन्न आहे, असे मानतात. (४४)

विवरण :- आत्मा व परमात्मा यांच्या अस्तित्वाबद्दल अधिक स्पष्टीकरण देताना बलराम म्हणतो, शरीरे वेगवेगळी, पण आत्मा एकच असतो. एकच आत्मा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या रूपात असला तरी तो एकच आहे. घटामध्ये जी पोकळी असते ती आकाशातील पोकळीपेक्षा वेगळी नाही. नदीमध्ये घट भरून ठेवला, तर त्यातील पाणी भोवतालच्या पाण्यापेक्षा वेगळे नसते. घटाचे आवरण (उपाधी) दूर झाले की, ते नदीतील पाण्यात मिसळून जाते. एकच पाणी अनेक घटात असले तरी शेवटी पाणी एकच असते. त्याचप्रमाणे परमात्मा प्रत्येक जीवात अस्तित्वात असतो. तीच गोष्ट दीप आणि सूर्य यांचीही. दिवा म्हणजेच सूर्याचे लहान रूप, त्यामुळे दोहोतही अभिन्नत्व आहे. (आपणा सर्वांचे शरीर एकाच परमात्म्याच्या रूपाने युक्त आहे. तेव्हा रुक्मीला मिळाले एवढे शासन पुरे असेही बलरामास सुचवावयाचे असावे.) (४४)



देह आद्यन्तवानेष द्रव्यप्राणगुणात्मकः ।
आत्मन्यविद्यया कॢप्तः संसारयति देहिनम् ॥ ४५ ॥
शरीरा आदि नी अंत तन्मात्र गुण या रुपी ।
अहंकार म्हणोनी त्यां भवात सापडे असा॥ ४५ ॥

द्रव्यप्राणगुणात्मकः - द्रव्य, प्राण व गुण ह्यांनी बनलेला - आद्यन्तवान् एष देहः - उत्पत्ति व नाश असणारा हा देह - आत्मनि अविद्यया क्लृप्तः - आत्म्याच्याच ठिकाणी अज्ञानाने कल्पिलेला असा - देहिनं संसारयात - प्राण्याला जन्ममरणरूपी संसारचक्रात पाडितो. ॥४५॥

या शरीराला उत्पत्ती आणि नाश आहे. पंचमहाभूते, पंचप्राण, तन्मात्रा आणि त्रिगुण हे याचे स्वरूप आहे. देहाची अज्ञानामुळेच आत्म्याच्या ठिकाणी कल्पना केली गेलेली आहे आणि या कल्पनेनेच प्राणी जन्म-मृत्युच्या फेर्‍यात अडकतो. (४५)

विवरण :- बलराम आणखी पुढे म्हणतो, 'देह हा कसा बनतो ? पंचप्राणांनी युक्त (प्राण, अपान, समान, व्यान आणि उदान) सत्त्व, रज, तम या तीनही गुणांनी आणि नऊ द्रव्ये (पंचमहाभूते अधिक काल, दिक्, आत्मा व मन) व पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूते या सर्वांनी मिळून बनतो. या देहाला प्रारंभ म्हणजेच जन्म व अंत म्हणजेच मृत्यू आहे. तो अज्ञान, लोभ, मोह, माया यांनी युक्त आहे. मात्र आत्मा हा अविनाशी आहे, नित्य आहे. त्यामुळे देह आणि आत्मा एकच मानणे हे अज्ञान.' (४५)



नात्मनोऽन्येन संयोगो वियोगश्चासतः सति ।
तद् हेतुत्वात् तत्प्रसिद्धेः दृग्‌रूपाभ्यां यथा रवेः ॥ ४६ ॥
नेत्ररूप असे दोन्ही सूर्याने दिसती पहा ।
सूर्याचा नच सम्बंध आत्मा तैसाचि दूर तो ॥ ४६ ॥

सति - हे रुक्मिणी - (अनात्मनः) असतः - आत्मेतराचे अस्तित्वच नसल्यामुळे - आत्मनः - आत्म्याचा - अन्येन - दुसर्‍यांशी - तत्प्रसिद्धेः तद्धेतुत्वात् - अनात्म्याचा भास आत्म्यापासूनच होत असल्यामुळे - यथा रवेः दृग्रूपाभ्यां - जसा सूर्याचा दृष्टि व रूप ह्यांशी तसा - संयोगः वियोगः च न - संयोग व वियोग होत नाही. ॥४६॥

हे साध्वी ! डोळे आणि रूप ही दोन्हीही सूर्यामुळे प्रकाशित होतात. सूर्य हेच त्यांचे कारण आहे. म्हणून सूर्यापासून डोळे आणि रूपाचा कधी वियोग होत नाही की संयोग होत नाही. त्याचप्रमाणे सर्व जगाची सत्ता आत्मसत्तेमुळे प्रत्ययास येते, सर्व जगाचा प्रकाशक आत्माच आहे. तर मग आत्म्याशी दुसर्‍या असत् पदार्थांचा संयोग किंवा वियोग कसा होऊ शकेल ? (४६)


जन्मादयस्तु देहस्य विक्रिया नात्मनः क्वचित् ।
कलानामिव नैवेन्दोः मृतिर्ह्यस्य कुहूरिव ॥ ४७ ॥
जन्मणे राहणे वृद्धी बदलो क्षय मृत्यु हे ।
आत्म्याला नसते कांही चंद्राला क्षय जै नसे ॥ ४७ ॥

जन्मादयः तु - जन्म, मृत्यू इत्यादि तर - इन्दोः कलानाम् इव देहस्य विक्रिया - चंद्राच्या कलांप्रमाणेच देहाचे विकार होत - आत्मनः क्वचित् न एव (भवति) - आत्म्याला कधीच होत नाही - हि - तसेच - अस्य मृतिः - ह्याचा मृत्यू - कुहूः इव - अमावस्येप्रमाणेच होय. ॥४७॥

जन्म घेणे, असणे, वाढणे, बदलणे, क्षीण होणे आणि मरणे हे सर्व विकार शरीराचेच असतात; आत्म्याचे नव्हेत. जसे कृष्णपक्षामध्ये कलांचा क्षय होतो, चंद्राचा नाही; परंतु अमावस्येच्या दिवशी लोक व्यवहारात चंद्राचाच क्षय झाला असे म्हणतात. त्याचप्रमाणे जन्म-मृत्यू इत्यादी सर्व विकार शरीराचेच असतात. परंतु भ्रमाने लोक त्याला आत्म्याचेच समजतात. (४७)

विवरण :- आत्मा व देह यांच्या अवस्था कशा वेगवेगळ्या आहेत, हे आणखी स्पष्ट करताना बलराम म्हणतो, 'देह हा सर्व विकारांनी युक्त, त्यामध्ये सतत बदल होतो. बालपण, यौवन, जरा या अवस्थातून देह जात असतो. पण शरीरात असणार्‍या आत्म्याला या कोणत्याच अवस्था नसतात. हे स्पष्ट करण्यासाठी त्याने चंद्राचे उदाहरण दिले आहे. चंद्राच्या कलांची प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत वृद्धी होते आणि नंतर अमावास्येपर्यंत र्‍हास होतो. मात्र ही वृद्धी आणि र्‍हास त्या कलांचाच होतो; चंद्राचा नाही. कलांचा र्‍हास झाल्याने अमावस्या होते, चंद्र नाहीसा होत नाही. (दुसर्‍या दिवसापासून त्याचे अस्तित्व दिसून येतेच.) त्याप्रमाणे शरीराबरोबर आत्मा नष्ट झाला असे मानणे चुकीचे. (४७)



यथा शयान आत्मानं विषयान् फलमेव च ।
अनुभुङ्क्तेऽप्यसत्यर्थे तथाऽऽप्नोत्यबुधो भवम् ॥ ४८ ॥
वास्तवीं नसता वस्तू स्वप्नात जीव भोगितो ।
अज्ञानी जीव तै सारे संसारा सत्य मानिती ॥ ४८ ॥

यथा शयानः - जसा निजलेला पुरुष - आत्मानं विषयान् फलं च एव - स्वतःला भोग्य विषयांना व भोगक्रियेला - अर्थं असति अपि - मुळात काही अर्थ नसताना सुद्धा - अनुभुङ्‌क्ते - उपभोगितो - तथा अबुधः भवं प्राप्नोति - तसा अज्ञ पुरुष संसाराला प्राप्त होतो. ॥४८॥

जसा झोपलेला मनुष्य स्वप्नात कोणताही पदार्थ अस्तित्वात नसतानाही, भोगणारा, भोगली जाणारी वस्तू आणि भोगरूप फळांचा अनुभव घेतो. त्याचप्रमाणे अज्ञानी लोक खोट्या प्रपंचाचा खरा समजून अनुभव घेतात. (४८)


तस्मादज्ञानजं शोकं आत्मशोषविमोहनम् ।
तत्त्वज्ञानेन निर्हृत्य स्वस्था भव शुचिस्मिते ॥ ४९ ॥
म्हणोनी त्यजिणे शोक अज्ञानवश तो असे ।
सोडोनी आत्मरूपात स्थिर हो साध्वि तू अता ॥ ४९ ॥

शुचिस्मिते - शुद्ध व मंद हास्य करणार्‍या हे रुक्मिणी - तस्मात् - म्हणून - आत्मशोषविमोहनम् - आत्म्याला शुष्क मोहित करणार्‍या - अज्ञानजं शोकं - अज्ञानापासून उत्पन्न झालेल्या शोकाला - तत्त्वज्ञानेन निर्हृत्य - तात्त्विक ज्ञानाने दूर करून - स्वस्था भव - शांत हो. ॥४९॥

म्हणून हे सुहास्यवदने ! अज्ञानामुळे होणार्‍या या शोकाचा त्याग कर. हा शोक अंत:करणाला उदास करतो, मोहित करतो. म्हणून तत्त्वज्ञानाने याला पूर्णपणे सोडून देऊन तू आपल्या स्वरूपात स्थिर हो. (४९)

विवरण :- रुक्मीच्या झालेल्या अवहेलनेबद्दल रुक्मिणीस दुःख होत होते. त्याबद्दल बलरामाने आधी तिला खर्‍या परिस्थितीची जाणीव करून देताना सांगितले होतेच की ज्याने सतत दुसर्‍याचे (विशेषतः श्रीकृष्णाचे) अहित चिंतिले, अहित केले, त्याच्याबद्दल शोक करणे चुकीचे. शेवटी तो तिला म्हणतो की, 'मनुष्याला स्वप्नातील सर्वच गोष्टी (वास्तवात खर्‍या नसूनहि) खर्‍या वाटतात. त्यांच्याबद्दल सुखदुःखादि भावनाहि त्याच्या मनात निर्माण होतात. तीच गोष्ट अनित्य, मिथ्या असणार्‍या संसाराबद्दलची आहे. जे तुला आता खरे वाटते, ज्याबद्दल तुझ्या मनात माया, मोह आहे ते वास्तव नाही, भ्रम आहे. अज्ञानामुळे ते खरे वाटते. आता तरी ही भावना सोड आणि ज्ञानाचा अवलंब करून शांत आणि समबुद्धी हो. तसेच जे झाले, ते त्याच्याच (रुक्मीच्या) कर्माचे फळ असे समज. (४९)



श्रीशुक उवाच -
एवं भगवता तन्वी रामेण प्रतिबोधिता ।
वैमनस्यं परित्यज्य मनो बुद्ध्या समादधे ॥ ५० ॥
श्रीशुकदेव सांगतात -
बलाने बोधिता ऐसे मनाचा मळ सर्व तो ।
रुक्मिणी धूतसे सर्व विवेके शांत जाहली ॥ ५० ॥

भगवता रामेण - भगवान बलरामाने - एवं प्रतिबोधिता तन्वी - याप्रमाणे उपदेशिलेली ती सुंदरी रुक्मिणी - वैमनस्यं परित्यज्य - मनाची खिन्नता टाकून - बुद्ध्या मनः समादधे - ज्ञानाने मन शांत करिती झाली. ॥५०॥

श्रीशुक म्हणतात- बलरामांनी जेव्हा रुक्मिणीची अशी समजूत घातली, तेव्हा रुक्मिणीने मनातील कटुता काढून टाकून विवेकबुद्धीने मनाचे समाधान केले. (५०)


प्राणावशेष उत्सृष्टो द्विड्‌भिर्हतबलप्रभः ।
स्मरन्विरूपकरणं वितथात्ममनोरथः ॥ ५१ ॥
चक्रे भोजकटं नाम निवासाय महत्पुरम् ।
अहत्वा दुर्मतिं कृष्णं अप्रत्यूह्य यवीयसीम् ।
कुण्डिनं न प्रवेक्ष्यामीति उक्त्वा तत्रावसद् रुषा ॥ ५२ ॥
रुक्मीचे तेज नी सेना नष्टली वाचला जिवे ।
नच तो विसरे कांही विरूप नि मनोरथ ॥ ५१ ॥
भोजकटपुरा त्याने राहण्या निर्मिले असे ।
प्रतिज्ञा करण्या पूर्ण तेथ तो राहु लागला ॥ ५२ ॥

प्राणावशेषः उत्सृष्टः (सः) - केवळ प्राणच आहे अवशिष्ट ज्याचा असा सोडून दिलेला तो रुक्मी - द्विड्‌भिः हतबलप्रभः - शत्रूंनी पराक्रम व तेज नष्ट केली आहेत ज्याची असा - विरूपकरणं स्मरन् - आपल्याला विरूप केल्याचे लक्षात ठेवून - वितथात्ममनोरथः - ज्याचे स्वतःचे मनोरथ पूर्ण झाले नाहीत असा - दुर्मतिं कृष्णं अहत्वा - दुष्टबुद्धि कृष्णाला मारल्याशिवाय - यवीयसीम् अप्रत्यूह्य - धाकटया बहिणीला परत आणल्याशिवाय - कुण्डिनं न प्रवेक्ष्यामि - कुंडिन नगरीत शिरणार नाही - इति उक्त्वा - असे बोलून - रुषा तत्र अवसत् - रागाने तेथे राहिला. ॥५१-५२॥

शत्रूंनी ज्याचे सैन्य आणि तेज नाहीसे केले होते, त्या रुक्मीचे फक्त प्राणच वाचले होते. त्याचे मनोरथ धुळीला मिळाले. आपल्याला विद्रूप केले गेले, ही आठवण तो विसरू शकत नव्हता. (५१) म्हणून त्याने आपल्याला राहाण्यासाठी भोजकट नावाची एक मोठी नगरी वसविली. त्याने अगोदरच प्रतिज्ञा केली होती की, "दुर्बुद्धी कृष्णाला मारल्याशिवाय आणि आपल्या धाकट्या बहिणीला परत आणल्याशिवाय आपण कुंडिनपुरात प्रवेश करणार नाही." म्हणून रागाने तो तेथेच राहू लागला. (५२)


भगवान् भीष्मकसुतां एवं निर्जित्य भूमिपान् ।
पुरमानीय विधिवद् उपयेमे कुरूद्वह ॥ ५३ ॥
या परी भगवान् कृष्णे जिंकिले सर्व भूपती ।
रुक्मिणी द्वारकीं नेली विधीने ती स्विकारिली ॥ ५३ ॥

कुरूद्वह - हे कुरुश्रेष्ठा परीक्षित राजा - भगवान् - श्रीकृष्ण - भूमिपान् निर्जित्य - राजांना जिंकून - भीष्मकसुताम् पुरम् एवं आनीय - भीष्मकराजाची कन्या जी रुक्मिणी तिला आपल्या नगरीलाच आणून - विधिवत् उपयेमे - यथाविधि वरिता झाला. ॥५३॥

परीक्षिता ! अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी सर्व राजांना जिंकून रुक्मिणीला द्वारकेमध्ये आणून विधिपूर्वक तिचे पाणिग्रहण केले. (५३)


तदा महोत्सवो नॄणां यदुपुर्यां गृहे गृहे ।
अभूदनन्यभावानां कृष्णे यदुपतौ नृप ॥ ५४ ॥
उत्सवो मानिला सर्वे द्वारकेच्या घरोघरी ।
अनन्य प्रेम हो त्यांचे भगवान् कृष्णच्या प्रती ॥ ५४ ॥

नृप - हे राजा - कृष्णे यदुपतौ - श्रीकृष्ण हा यादवांचा रक्षक झाला असता - यदुपुर्यां - यादवांच्या नगरीत - गृहेगृहे - घरोघर - तदा - त्यावेळी - अनन्यभावानां नृणां - अनन्यभक्ति करणार्‍या मनुष्यांचा - महोत्सवः अभूत् - मोठा उत्सव झाला. ॥५४॥

हे राजन ! द्वारकेतील लोकांना यदुपती श्रीकृष्णांबद्दल अनन्य प्रेम होते. त्यामुळे तेथे घरोघर मोठा उत्सव साजरा केला जाऊ लागला. (५४)


नरा नार्यश्च मुदिताः प्रमृष्टमणिकुण्डलाः ।
पारिबर्हमुपाजह्रुः वरयोश्चित्रवाससोः ॥ ५५ ॥
सजले नर नारी तै दिव्यकुंडल लेवुनी ।
नवरा - नवरी यांना अर्पिती भेटि कैक ते ॥ ५५ ॥

प्रमृष्टमणिकुण्डलाः - तेजस्वी आहेत मण्यांची कुंडले ज्यांची असे - मुदिताः नराः नार्यः च - आनंदित झालेले पुरुष व स्त्रिया - वरयोः चित्रावससोः - श्रेष्ठ अशी चित्रविचित्र वस्त्रे - पारिबर्हं उपाजह्लु - भेटी म्हणून आणिते झाले. ॥५५॥

तेथील आनंदित झालेल्या स्त्री-पुरुषांनी रत्‍नांची चमकणारी कुंडले घातली होती. त्यांनी सुंदर पोषाख परिधान केलेल्या वधू-वरांना अनेक नजराणे अहेर म्हणून दिले. (५५)


( मिश्र )
सा वृष्णिपुर्युत्तम्भितेन्द्रकेतुभिः
     विचित्रमाल्याम्बररत्‍नतोरणैः ।
बभौ प्रतिद्वार्युपकॢप्तमङ्गलैः
     आपूर्णकुम्भागुरुधूपदीपकैः ॥ ५६ ॥
( इंद्रवज्रा )
अपूर्व शोभा गमली पुराशी
     माला नि झेंडे मणि तोरणे ती ।
दुधा खिरीचे घटही जळाचे
     धूपो नि दीपावलि लावलेली ॥ ५६ ॥

सा वृष्णिपुरी - ती यादवांची नगरी - उत्तभितेन्द्रकेतुभिः - उभारिलेल्या ध्वजांनी - विचित्रमाल्याम्बररत्‍नतोरणैः - चित्रविचित्र फुले, वस्त्रे, रत्‍ने व तोरणे यांनी - प्रतिद्वारि - प्रत्येक द्वारावर - उपक्लृप्तमङगलैः आपूर्णकुम्भागुरुधूपदीपकैः - शुभ चिन्ह म्हणून ठेविलेले जलपूर्ण घट, काळा चंदन, सुगंधी धूप व दीप यांनी - बभौ - शोभली. ॥५६॥

त्यावेळी द्वारकेत कोठे कोठे ध्वज उंच ठिकाणी फडकत होते. ठिकठिकाणी रंगीबेरंगी माळा, वस्त्रे आणि रत्‍नांची तोरणे बांधलेली होती. घरांच्या दारांवर मंगल वस्तू लावल्या होत्या. पाण्याने भरलेल्या कलशांनी, अगुरू आणि धुपाच्या सुगंधाने व दीपमाळांमुळे ती नगरी विलक्षण शोभून दिसत होती. (५६)


( अनुष्टुप् )
सिक्तमार्गा मदच्युद्‌भिः आहूतप्रेष्ठभूभुजाम् ।
गजैर्द्वाःसु परामृष्ट रम्भापूगोपशोभिता ॥ ५७ ॥
( अनुष्टुप् )
आमंत्रिले नृपो मित्र पथीं गजमदो गळे ।
सुपारी केळि खांबांनी मार्ग शोभित जाहले ॥ ५७ ॥

आहूतप्रेष्ठभूभुजां - आमंत्रित अशा श्रेष्ठ राजांच्या - मदच्युद्‌भिः गजैः सिक्तमार्गा (सा) - मद सांडणार्‍या हत्तींनी जीतील रस्ते शिंपडले आहेत अशी ती नगरी - द्वास्सु परामृष्टरम्भापूगोपशोभिता (आसीत्) - दरवाजावर लावलेल्या केळी व पोफळी यांनी सुशोभित झाली. ॥५७॥

अत्यंत जिवलग राजांना आमंत्रित केले होते. त्यांच्या उन्मत्त हत्तींच्या मदाच्या झिरपण्याने द्वारकेतील सडका भिजल्या होत्या. प्रत्येक दरवाजावर केळीचे खांब आणि सुपारीची झाडे लावलेली असल्याने ती नगरी विलक्षण सुंदर दिसत होती. (५७)


कुरुसृञ्जयकैकेय विदर्भ-यदुकुन्तयः ।
मिथो मुमुदिरे तस्मिन् संभ्रमात् परिधावताम् ॥ ५८ ॥
उत्सवीं जाहली गर्दी कुरु संजय कैकय ।
विदर्भ यदुनी कुंतीवंशे आनंद मानिला ॥ ५८ ॥

संभ्रमात् परिधावतां - गडबडीने इकडेतिकडे धावणार्‍यांमध्ये - कुरुसृंजयकैकेयविदर्भयदुकुंतयः - कुरु, सृंजय, कैकेय, विदर्भ, यदु व कुंति ह्या कुळांतील राजे - तस्मिन् मिथः मुमुदिरे - त्या उत्सवात एकमेकांत आनंद करिते झाले. ॥५८॥

त्या उत्सवात इकडे तिकडे घाईघाईने धावणार्‍या कुरू, सृंजय, कैकेय, विदर्भ, यदू आणि कुंती या वंशाचे लोक एकमेकांसमवेत आनंदोत्सव साजरा करीत होते. (५८)


रुक्मिण्या हरणं श्रुत्वा गीयमानं ततस्ततः ।
राजानो राजकन्याश्च बभूवुर्भृशविस्मिताः ॥ ५९ ॥
रुक्मिणीहरणाची ती कीर्ती लोकेहि गायिली ।
ऐकता राजकन्या त्या विस्मीत जाहल्या बहू ॥ ५९ ॥

राजानः राजकन्याः च - राजे व राजकन्या - ततः ततः गीयमानं - त्या त्या ठिकाणी गायिलेले - रुक्मिण्या हरणं श्रुत्वा - रुक्मिणीहरणाचे वृत्त ऐकून - भृशं विस्मिताः बभूवुः - अत्यंत आश्चर्यचकित झाल्या. ॥५९॥

जिकडे तिकडे रुक्मिणीहरणाचा प्रसंग ऐकून व त्याचेच गुणगान ऐकून राजे आणि राजकन्या अत्यंत आश्चर्यचकित झाल्या. (५९)


द्वारकायां अभूद् राजन् महामोदः पुरौकसाम् ।
रुक्मिण्या रमयोपेतं दृष्ट्वा कृष्णं श्रियः पतिम् ॥ ६० ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां दशमस्कन्धे उत्तरार्धे
रुक्मिण्युद्‌वाहे चतुःपञ्चाशत्तमोऽध्यायः ॥ ५४ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
रुक्मिणी लक्षुमी साक्षात् पाहिली द्वारका जने ।
आनंद जाहला सर्वा सकृष्ण पाहता नृपा ॥ ६० ॥
॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर चोपन्नावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

राजन् - हे राजा - द्वारकायां - द्वारकेत - रुक्मिण्या रमया उपेतं - रुक्मिणी नावाच्या लक्ष्मीने युक्त अशा - श्रियः पतिं कृष्णं दृष्टवा - लक्ष्मीपती श्रीकृष्णाला पाहून - पुरौकसां महामोहः अभूत् - नागरिकांना मोठा आनंद झाला. ॥६०॥

महाराज ! रुक्मिणीरूपी लक्ष्मीला साक्षात लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्णांच्या बरोबर पाहून द्वारकावासी स्त्री-पुरुषांना अत्यंत आनंद झाला. (६०)


अध्याय चोपन्नावा समाप्त

GO TOP