|
श्रीमद् भागवत पुराण कृष्णस्य कुण्डिनपुरे गमनं, रुक्मिणीहरणं च - रुक्मिणीहरण - संहिता - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् ) वैदर्भ्याः स तु सन्देशं निशम्य यदुनन्दनः । प्रगृह्य पाणिना पाणिं प्रहसन् इदमब्रवीत् ॥ १ ॥
(अनुष्टुप् ) श्रीशुकदेव सांगतात - वैदर्भी राजकन्येचा कृष्णे संदेश ऐकिला । द्विजहात धरोनीया हासुनी बोलले असे ॥ १ ॥
सः यदुनन्दनः तु - तो श्रीकृष्ण तर - वैदर्भ्याः संदेशं निशम्य - रुक्मिणीचा निरोप ऐकून - (स्वेन) पाणिना विप्रस्य पाणिं प्रगृह्य - आपल्या हाताने ब्राह्मणांचा हात धरून - प्रहसन् - हसत - इदं अब्रवीत् - असे म्हणाला. ॥१॥
श्रीशुक म्हणतात - रुक्मिणीचा हा संदेश ऐकून श्रीकृष्ण ब्राह्मणाचा हात हातात घेऊन हसत हसत म्हणाले, (१)
श्रीभगवानुवाच -
तथाहमपि तच्चित्तो निद्रां च न लभे निशि । वेदाहं रुक्मिणा द्वेषान् ममोद्वाहो निवारितः ॥ २ ॥ भगवान् श्रीकृष्ण म्हणतात - मीही इच्छी तसा तीते तिच्याशी चित्त लागले । न लागे झोप ती रात्री रुक्मि तो द्वेषितो अम्हा ॥ २ ॥
तथा - त्याप्रमाणे - तच्चितः अहम् अपि - तिच्या ठिकाणी अन्तःकरण आहे ज्याचे अशा मला सुद्धा - निशि निद्रां च न लभे - रात्रौ झोप लागत नाही - रुक्मिणा - रुक्मीने - द्वेषात् - शत्रुत्वामुळे - मम उद्वाहः निवारितः - माझ्याशी होणार्या विवाहाचे निवारण केले - इति अहं वेद - हे मी जाणतो. ॥२॥
श्रीभगवान म्हणाले- माझेही मन तिच्यातच लागून राहिल्यामुळे मला रात्री झोपसुद्धा लागत नाही. माझ्या द्वेषामुळे रुक्मीने माझ्याशी तिच्या विवाहाला विरोध केला आहे, हे मला माहीत आहे. (२)
तामानयिष्य उन्मथ्य राजन्यापसदान् मृधे ।
मत्परामनवद्याङ्गी- मेधसोऽग्निशिखामिव ॥ ३ ॥
लाकडे घासिता त्यात अग्नि तो आपणा मिळे । तसे मी मारुत्नी त्यांना सुंदरी मिळवीन ती ॥ ३ ॥
मृधे राजन्यापसदान् उन्मथ्य - युद्धामध्ये दुष्ट राजांचा नाश करून - मत्परां अनवद्याङगीं तां - मीच आहे सर्वस्व जीचे अशा त्या निर्दोष स्वरूपाच्या रुक्मिणीला - एधसः अग्निशिखाम् इव - लाकडातून मंथन करून अग्नि आणावा तसा - आनयिष्ये - आणीन. ॥३॥
परंतु मी त्या नीच क्षत्रियांना पराभूत करून माझ्यावर प्रेम करणार्या त्या सुंदर राजकुमारीला लाकडातून अग्निज्वाळा आणावी, तशी घेऊन येईन. (३)
श्रीशुक उवाच -
उद्वाहर्क्षं च विज्ञाय रुक्मिण्या मधुसूदनः । रथः संयुज्यतामाशु दारुकेत्याह सारथिम् ॥ ४ ॥
श्रीशुकदेव सांगतात - मधुसूदन कृष्णाने परवा लग्न जाणुनी । दारुका दिधली आज्ञा त्वरीत रथ जुंपण्या ॥ ४ ॥
(ततः) च मधुसूदनः - नंतर श्रीकृष्ण - रुक्मिण्याः उद्वाहर्क्षं विज्ञाय - रुक्मिणीच्या लग्नाचे नक्षत्र जाणून - दारुक - हे दारुका - रथः आशु संयुज्यतां - लवकर रथ जोडावा - इति सारथिं आह - असे सारथ्याला म्हणाला. ॥४॥
श्रीशुक म्हणतात- रुक्मिणीचा विवाहमुहूर्त जाणून श्रीकृष्णांनी सारथ्याला आज्ञा केली की, "दारुका ! ताबडतोब रथ जोड." (४)
स चाश्वैः शैब्यसुग्रीव मेघपुष्पबलाहकैः ।
युक्तं रथमुपानीय तस्थौ प्राञ्जलिरग्रतः ॥ ५ ॥
रथाते शैब्य सुग्रीव मेघपुष्प बलाहको । जुंपिले अश्व हे चार रथ हा सज्ज जाहला ॥ ५ ॥
सः च - आणि तो सारथी - शैब्यसुग्रीवमेघपुष्पबलाहकैः अश्वैः - शैब्य, सुग्रीव, मेघपुष्प व बलाहक या चार घोडयांनी - युक्तं रथं उपानीय - युक्त असा रथ जवळ आणून - प्राञ्जलिः अग्रतः तस्थौ - हात जोडून पुढे उभा राहिला. ॥५॥
शैब्य, सुग्रीव, मेगपुष्प आणि बलाहक नावाचे चार घोडे रथाला जुंपून तो रथ तेथे आणून, दारुक हात जोडून भगवंताच्या समोर उभा राहिला. श्रीकृष्णांनी ब्राह्मणाला अगोदर रथात बसवून नंतर आपणही बसले व त्या वेगवान घोड्यांच्या साह्याने एका रात्रीत काठेवाडातून विदर्भ देशाला जाऊन पोहोचले. (५)
आरुह्य स्यन्दनं शौरिः द्विजमारोप्य तूर्णगैः ।
आनर्तादेकरात्रेण विदर्भानगमद्धयैः ॥ ६ ॥
शूरनंदन श्रीकृष्णो द्विजा प्रथम बैसवी । पुन्हा रथात तो बैसे रात्रीत पोचले तिथे ॥ ६ ॥
शौरिः - श्रीकृष्ण - स्यन्दनं आरुह्य - रथात बसून - द्विजं आरोप्य - ब्राह्मणाला बसवून - तूर्णगैः हयैः - त्वरेने धावणार्या घोडयांच्या योगाने - आनर्तात् विदर्भान् - आनर्त देशाहून विदर्भ देशाला - एकरात्रेण अगमत् - एका रात्रीत आला. ॥६॥
श्रीकृष्णांनी ब्राह्मणाला अगोदर रथात बसवून नंतर आपणही बसले व त्या वेगवान घोड्यांच्या साह्याने एका रात्रीत काठेवाडातून विदर्भ देशाला जाऊन पोहोचले. (६)
विवरण :- रुक्मिणीने श्रीकृष्णास संदेश पाठवून तातडीने कुंडीनपुरास येण्याची विनंती केली होती. कारण दोन दिवसातच तिचा विवाह तिच्या मनाविरुद्ध शिशुपालाशी होणार होता हे सर्व जाणून श्रीकृष्ण दुसरे दिवशीच कुंडिनपुरात दाखल झाला. आता प्रश्न असा पडेल की कुठे द्वारका आणि कुठे कुंडिनपुर ! एका रात्रीत इतके अंतर गाठणे कसे शक्य झाले ? पण स्वतः कृष्ण एक कुशल अश्वपरीक्षक होता. त्याला घोडयांची उत्तम परीक्षा असल्याने घोडयांचे व्यापारी आपले घोडे आधी द्वारकेस आणतात, असे म्हटले जाते. त्याच्याजवळचा एक-एक घोडा हजार घोडयांची शक्ती असणारा होता. आणि असे अनेक घोडे त्याच्याजवळ होते. त्यापैकी चार उत्तम घोडे त्याने रथास जोडले. हेच घोडे जोडलेला रथ जरासंधाशी युद्ध करावयासाठी आणला होता. शिवाय त्याचा दारुक नावाचा सारथीही सारथ्य करण्यात अत्यंत कुशल होता. त्यामुळे भारताच्या पश्चिमेस असलेल्या द्वारकेहून मध्यप्रदेश (विदर्भ) मध्ये असणार्या कुंडिनपुरास एका रात्रीत येणे अशक्य नव्हते. (६)
राजा स कुण्डिनपतिः पुत्रस्नेहवशं गतः ।
शिशुपालाय स्वां कन्यां दास्यन् कर्माण्यकारयत् ॥ ७ ॥
कुंडीनपति तो भिष्मक् पुत्र रुक्मिस ऐकता । शिशुपाल-स्वकन्येच्या विवाहा लागला असे ॥ ७ ॥
सः कुण्डिनपतिः राजा - तो कुण्डिनगराचा अधिपति भीष्मक राजा - पुत्रस्नेहवशं गतः - पुत्रावरील प्रेमाच्या स्वाधीन झालेला असा - शिशुपालाय स्वां कन्यां दास्यन् - शिशुपालाला आपली मुलगी रुक्मिणी देण्याच्या उद्देशाने - कर्माणि अकारयत् - विवाहकृत्ये करविता झाला. ॥७॥
पुत्रप्रेमामुळे कुंडिननरेश भीष्मक, आपली कन्या शिशुपालाला देण्यासाठी विवाहाच्या उत्सवाची तयारी करीत होता. (७)
विवरण :- इकडे रुक्मिणीचा पिता भीष्मक काय करीत होता ? तिच्या लग्नाच्या पूर्वीचे विधी. पण त्याची अवस्था कशी होती ? ती 'पुत्रस्नेहवशं गतः' या शब्दातून दिसून येते. (मुलगा रुक्मीच्या प्रेमाने अगतिक झालेला) त्याला मनातून शिशुपालाशी होणारा रुक्मिणीचा विवाह मान्य नसावा, पण रुक्मीच्या हटटापुढे, कदाचित त्याच्यापुढे काही न चालल्यानेहि तो आपला विरोध उघड करू शकला नसावा. पुत्रावरील प्रेमाने हतबल होऊन त्याने या विवाहास मान्यता दिली असावी. (७)
पुरं सम्मृष्टसंसिक्त मार्गरथ्याचतुष्पथम् ।
चित्रध्वजपताकाभिः तोरणैः समलङ्कृतम् ॥ ८ ॥
झाडिले सर्व ते मार्ग सडे संमार्जिले तिथे । सपुष्प ठेविल्या कुंड्या तोरणे ध्वज लाविले ॥ ८ ॥
संमृष्टसंसिक्तमार्गरथ्याचतुष्पथम् - झाडिले व शिंपिले आहेत रस्ते, राजमार्ग व चव्हाटे ज्यातील असे - पुरं - नगर - चित्रध्वजपताकाभिः तोरणैः समलङ्कृतम् - चित्रविचित्र गुढया, तोरणे व पताका ह्यांनी भूषविलेले. ॥८॥
नगरातील राजमार्ग, चौक, झाडून साफ केले गेले होते. त्यांच्यावर सडा संमार्जन केले होते. रंगी बेरंगी ध्वज आणि पताका लावलेल्या होत्या. तोरणे बांधली गेली होती. (८)
स्रग्गन्धमाल्याभरणैः विरजोऽम्बरभूषितैः ।
जुष्टं स्त्रीपुरुषैः श्रीमद् गृहैः अगुरुधूपितैः ॥ ९ ॥
पुष्पमाला फुले गंध वस्त्रालंकार लेवुनी । सजले नर-नारी तै दर्वळे धूपगंध तो ॥ ९ ॥
स्रग्गन्धमाल्याभरणैः विरजोम्बरभूषितैः स्त्रीपुरुषैः - सुगंधी फुलांच्या माळा, चंदनादि सुगंधी पदार्थ, फुले व अलंकार यांनी युक्त व निर्मळ वस्त्रांनी शोभणार्या स्त्रियांनी व पुरुषांनी - अगुरुधूपितैः श्रीमद्गृहैः (च) जुष्टम् (आसीत्) - व काळ्या चंदनाने सुगंधित केलेल्या श्रीमंतांच्या घरांनी युक्त झाले. ॥९॥
तेथील स्त्री-पुरुष पुष्पमाळा, अत्तरे, दागिने आणि निर्मल वस्त्रांनी नटले होते. तेथील वैभवसंपन्न महालांतून धुपाचा सुगंध दरवळत होता. (९)
पितॄन् देवान् समभ्यर्च्य विप्रांश्च विधिवन्नृप ।
भोजयित्वा यथान्यायं वाचयामास मङ्गलम् ॥ १० ॥ सुस्नातां सुदतीं कन्यां कृतकौतुकमङ्गलाम् । आहतांशुकयुग्मेन भूषितां भूषणोत्तमैः ॥ ११ ॥
पितरे देवता यांना विधिपूर्वक पूजिता । ब्राह्मणा दिधले भोज स्वस्तिवाचन जाहले ॥ १० ॥ सुंदरा शोभलीकन्या मंगलस्नान जाहले । वस्त्र आभूषणे ल्याली करीं कंकण शोभले ॥ ११ ॥
नृप - हे परीक्षित राजा - पितृन् देवान् समभ्यर्च्य - पितर व देव यांची पूजा करून - विप्रान् च विधिवत् भोजयित्वा - आणि ब्राह्मणांना योग्यरीतीने भोजन घालून - यथान्यायं मङगलं वाचयामास - लौकिक रीतीला अनुसरून पुण्याहवाचनादि मंगलविधि करविता झाला - सुस्नातां - स्नान केलेल्या - कृतकौतुकमङगलाम् - केली आहेत विवाहासंबंधी मांगलिक कृत्ये जीची अशा - अहतांशुकयुग्मेन भूषणोत्तमैः च भूषिताम् - नवीन दोन वस्त्रे आणि उंची दागिने यांनी अलंकृत केलेल्या अशा - सुदतीं कन्याम् - सुंदर कन्येप्रत. ॥१०-११॥
परीक्षिता ! राजा भीष्मकाने देव, पितर आणि ब्राह्मणांचे विधिपूर्वक पूजन करून, पुण्याहवाचन करून ब्राह्मणांना भोजन घातले. (१०) शुभ्र दंतपंक्ती असणार्या राजकुमारीला मंगल स्नान घालून हातात लग्नकंकण बांधले. दोन नवीन वस्त्रे नेसविली आणि अंगावर उत्तमोत्तम अलंकार घातले. (११)
चक्रुः सामर्ग्यजुर्मन्त्रैरः वध्वा रक्षां द्विजोत्तमाः ।
पुरोहितोऽथर्वविद् वै जुहाव ग्रहशान्तये ॥ १२ ॥
सामऋक् यजु मंत्राने तिजला रक्षिले असे । अथर्वे ग्रहशांतीही केलीसे त्या पुरोहिते ॥ १२ ॥
द्विजोत्तमाः - श्रेष्ठ ब्राह्मण - सामर्ग्यजुर्मन्त्रैः वध्वाः रक्षां चक्रुः - सामवेद, ऋग्वेद व यजुर्वेद ह्यांतील मंत्रांनी वधू जी रुक्मिणी तिचा रक्षाविधि करते झाले - वै - नंतर - अथर्ववित् पुरोहितः - अथर्ववेद जाणणारा पुरोहित - ग्रहशान्तये जुहाव - ग्रहांच्या शान्तीकरिता होम करिता झाला. ॥१२॥
श्रेष्ठ ब्राह्मणांनी साम, ऋक् आणि यजुर्वेदातील मंत्रांनी तिच्यासाठी रक्षणकवच तयार केले. तसेच अथर्ववेदाच्या विद्वान पुरोहितांनी ग्रहशांतीसाठी हवन केले. (१२)
हिरण्यरूप्य वासांसि तिलांश्च गुडमिश्रितान् ।
प्रादाद् धेनूश्च विप्रेभ्यो राजा विधिविदां वरः ॥ १३ ॥
शास्त्र विधि बहू जाणी तसा भीष्मक भूप तो । सोने चांदी तसे वस्त्र गूळ तीळ द्विजा दिले ॥ १३ ॥
विधिविदां वरः राजा - विधि जाणणार्यांमध्ये श्रेष्ठ असा तो भीष्मक राजा - विप्रेभ्यः - ब्राह्मणांना - हिरण्यरूप्यवासांसि - सोने, रुपे, वस्त्रे - च गुडमिश्रितान् तिलान् - आणि गुळ मिसळलेले तीळ - धेनूः च प्रादात् - आणि गाई देता झाला. ॥१३॥
शास्त्र जाणणार्या राजाने सोने, चांदी, वस्त्रे, तिळगूळ आणि गाई ब्राह्मणांना दान दिल्या. (१३)
एवं चेदिपती राजा दमघोषः सुताय वै ।
कारयामास मन्त्रज्ञैः सर्वमभ्युदयोचितम् ॥ १४ ॥
चेदिराज दमघोषे मंत्राने शिशुपालला । मांगलीक असे कृत्य विवाहार्थचि साधिले ॥ १४ ॥
एवं चेदिपतिः दमघोषः राजा - याप्रमाणे चेदिदेशाचा अधिपति दमघोष राजा - सुताय - पुत्र जो शिशुपाल त्यासाठी - मन्त्रज्ञैः सर्वं अभ्युदयोचितं वै कारयामास - मंत्र जाणणार्या विद्वान् ब्राह्मणांकडून सर्व काही विवाहाला योग्य असे कृत्य करविता झाला. ॥१४॥
याचप्रकारे चेदिनरेश दमघोषानेसुद्धा आपला पुत्र शिशुपाल याचे मंत्रज्ञ ब्राह्मणांकडून विवाहासंबंधीचे मंगलविधी करविले. (१४)
मदच्युद्भिर्गजानीकैः स्यन्दनैर्हेममालिभिः ।
पत्त्यश्वसङ्कुलैः सैन्यैः परीतः कुण्डीनं ययौ ॥ १५ ॥
मदच्युत असे हत्ती माला सूवर्णसे रथ । दळाश्व घेउनी सारे कौंडिण्यपुरि चालले ॥ १५ ॥
मदच्युद्भिः - ज्यांच्या गंडस्थलांतून मद गळत आहे अशा - गजानीकैः - हत्तीच्या सैन्यांनी - हेममालिभिः स्यन्दनैः - सुवर्णाने मढविलेल्या रथांनी - पत्त्यश्वसंकुलैः सैन्यैः - पायदळ व घोडेस्वार यांनी युक्त अशा सैन्यांनी - परीतः (सः) - वेष्टिलेला तो - कुण्डिनं ययौ - कुण्डिन नगराला गेला. ॥१५॥
त्यानंतर तो मदरस वाहात असणार्या हत्तींचे दळ, सोन्याच्या हारांनी सजविलेले रथ, पायदळ आणि घोडेस्वारांची सेना बरोबर घेऊन कुंडिनपुरला जाऊन पोहोचला. (१५)
तं वै विदर्भाधिपतिः समभ्येत्याभिपूज्य च ।
निवेशयामास मुदा कल्पितान्यनिवेशने ॥ १६ ॥
राजा भीष्मक सामोरी आले नी पूजिले तया । आनंदे जनवासात वर्हाडी राहिले पुन्हा ॥ १६ ॥
विदर्भादिपति - विदर्भ राजा भीष्मक - तं वै समभ्येत्य - त्याला सामोरा येऊन - अभिपूज्य च - आणि त्याची पूजा करून - कल्पितान्यनिवेशने - त्याच्यासाठी उभारलेल्या स्वतंत्र तंबूमध्ये - मुदा निवेशयामास - आनंदाने स्थापना करिता झाला. ॥१६॥
विदर्भराज भीष्मकाने सामोरे जाऊन त्यांचे स्वागत करून प्रथेनुसार त्यांचे पूजन केले. त्यानंतर, अगोदरच त्यांच्यासाठी निश्चित केलेल्या ठिकाणी आनंदाने त्यांची निवासाची व्यवस्था केली. (१६)
तत्र शाल्वो जरासन्धो दन्तवक्रो विदूरथः ।
आजग्मुश्चैद्यपक्षीयाः पौण्ड्रकाद्याः सहस्रशः ॥ १७ ॥
वक्रदंद जरासंधो शाल्व पौंड्रक नी तसे । हजारो शिशुपालाचे वरातीं पातले नृप ॥ १७ ॥
तत्र - तेथे - शाल्वः जरासन्धः दन्तवक्त्रः - शाल्व, जरासंध व दन्तवक्त्र - विदूरथः सहस्त्रशः चैद्यपक्षीयाः पौण्ड्रकाद्याः - विदूरथ आणि हजारो शिशुपालाच्या पक्षाचे पौंड्रकादि राजे - आजग्मुः - आले. ॥१७॥
त्यांच्याबरोबर शिशुपालाचे शाल्व, जरासंध, दंतवक्त्र, विदूरथ, पौंड्रक इत्यादी हजारो मित्रराजे आले होते. (१७)
कृष्णरामद्विषो यत्ताः कन्यां चैद्याय साधितुम् ।
यद्यागत्य हरेत् कृष्णो रामाद्यैर्यदुभिर्वृतः ॥ १८ ॥ योत्स्यामः संहतास्तेन इति निश्चितमानसाः । आजग्मुर्भूभुजः सर्वे समग्रबलवाहनाः ॥ १९ ॥
सर्व ते रामकृष्णाचे विरोधात असेच की । रुक्मिणी शिशुपालाला मिळावी सर्व इच्छिती ॥ १८ ॥ प्रसंगी लढु कृष्णासी मिळोनी एक सर्व हे । रथाश्व हत्ति नी सेना सवे घेवोनि पातले ॥ १९ ॥
कृष्णरामद्विषः - श्रीकृष्ण व बलराम ह्यांचा द्वेष करणारे जरासंधादि राजे - चैद्याय कन्यां साधितुम् यत्ताः - शिशुपालाला कन्या रुक्मिणी मिळवून देण्याकरिता सिद्ध झाले - कृष्णः - श्रीकृष्ण - रामाद्यैः यदुभिः वृतः - बलरामादि यादवांनी वेष्टिलेला असा - यदि आगत्य (तां) हरेत् - जर येऊन रुक्मिणीचे हरण करील - (तर्हि) संहता तेन योत्स्यामः - तर एकत्र होऊन त्या श्रीकृष्णाशी युद्ध करू - इति - असा - निश्चितमानसाः सर्वे भूभुजः - निश्चय केला आहे मनाशी ज्यांनी असे सर्व राजे - समग्रबलवाहनाः - संपूर्ण सैन्य व वाहने ह्यांसह - आजग्मुः - आले. ॥१८-१९॥
ते सर्वजण राम-कृष्णांचे शत्रू होते आणि रुक्मिणी शिशुपालालाच मिळावी, ह्यासाठी आले होते, त्यांनी अगोदरच निश्वय केला होता की, श्रीकृष्ण बलरामादी यादवांना आपल्याबरोबर आणून कन्येचे हरण करण्याचा प्रयत्न करील, तर सर्वांनी मिळून त्यांच्याशी लढाई करायची. त्या राजांनी याचसाठी आपापाली संपूर्ण सेना आणि वाहने बरोबर आणली होती. (१८-१९)
श्रुत्वैतद् भगवान् रामो विपक्षीय नृपोद्यमम् ।
कृष्णं चैकं गतं हर्तुं कन्यां कलहशंकितः ॥ २० ॥
भगवान बलरामाला कळाले सज्ज शत्रु ते । कृष्ण तो एकटा गेला शंकीत जाहले मनीं ॥ २० ॥
भगवान् रामः - सर्वैश्वर्यसंपन्न बलराम - एतत् विपक्षीयनृपोद्यमं - ह्या शत्रुपक्षाकडील राजांच्या उद्योगाला - कन्यां च हर्तुं गतम् एकं कृष्णं - आणि रुक्मिणी कन्येचे हरण करण्याकरिता एकटयाच गेलेल्या श्रीकृष्णाला - श्रुत्वा - ऐकून - कलहशंकितः - कलह होईल अशा भीतीने युक्त झाला. ॥२०॥
शत्रुपक्षाच्या राजांच्या या तयारीची माहिती भगवान बलरामांना मिळाली आणि बंधू श्रीकृष्ण एकटाच राजकुमारीचे हरण करण्यासाठी गेला आहे, असेही जेव्हा त्यांनी ऐकले, तेव्हा त्यांना तेथे लढाई होण्याची दाट शंका आली. (२०)
बलेन महता सार्धं भ्रातृस्नेहपरिप्लुतः ।
त्वरितः कुण्डिनं प्रागाद् गजाश्वरथपत्तिभिः ॥ २१ ॥
जाणती शक्ति कृष्णाची परी ते प्रेम दाटले । त्वरीत दळ घेवोनी कौंडिण्यपुरि चालले ॥ २१ ॥
भ्रातृस्नेहपरिप्लुतः (सः) - बंधु जो श्रीकृष्ण त्याच्याविषयी प्रेमाने युक्त असा तो बलराम - महता बलेन सार्धं - मोठया सैन्यासह - त्वरितः - लवकर - गजाश्वरथपत्तिभिः - हत्ती, रथ, घोडेस्वार व पायदळ बरोबर घेऊन - कुण्डिनं प्रागात् - कुंडिन नगराला प्राप्त झाला. ॥२१॥
बंधुप्रेमामुळे त्यांचे हृदय भरुन आले त्यामुळे ते लगेच हत्ती, घोडे, रथ आणि पायदळ अशी चतुरंग सेना बरोबर घेऊन कुंडिनपुराकडे गेले. (२१)
भीष्मकन्या वरारोहा काङ्क्षन्त्यागमनं हरेः ।
प्रत्यापत्तिमपश्यन्ती द्विजस्याचिन्तयत्तदा ॥ २२ ॥
इकडे रुक्मिणी पाही कृष्णाची वाट सारखी । न कृष्ण द्विजही येता चिंतीत जाहली बहु ॥ २२ ॥
हरेः आगमनं काङ्क्षन्ती - श्रीकृष्णाच्या येण्याची वाट पहाणारी - वरारोहा भीष्मकन्या - विवाहयोग्य सर्वावयवसंपन्न भीष्मकाची कन्या रुक्मिणी - द्विजस्य प्रत्यापत्तिम् अपश्यन्ती - ब्राह्मणाचे परत येणे न पहाणारी अशी - तदा अचिन्तयत् - त्यावेळी विचार करू लागली. ॥२२॥
इकडे सुंदरी रुक्मिणी श्रीकृष्णांच्या आगमनाची प्रतिक्षा करीत होती. परंतु ब्राह्मणसुद्धा अजून परतला नाही, हे पाहून ती चिंतातुर झाली. (२२)
अहो त्रियामान्तरित उद्वाहो मेऽल्पराधसः ।
नागच्छत्यरविन्दाक्षो नाहं वेद्म्यत्र कारणम् । सोऽपि नावर्ततेऽद्यापि मत्सन्देशहरो द्विजः ॥ २३ ॥
आता ही उरली रात्र कैसे कृष्ण न पातले । कळेना काय होई ते संदेशी द्विजही न ये ॥ २३ ॥
अहो - काय हो - अल्पराधसः मे उद्वाहः - दुर्दैवी असा माझा विवाह - त्रियामान्तरितः - एका रात्रीच्या अवधीने होणारा आहे - अरविन्दाक्षः (च) न आगच्छति - आणि श्रीकृष्ण तर अजून आला नाही - अहं अत्र कारणं न वेद्मि - असे होण्याचे कारण मी जाणत नाही - मत्सदेशहरः सः द्विजः अपि - माझा निरोप घेऊन गेलेला तो ब्राह्मणसुद्धा - अद्यापि न आवर्तते - अजूनहि परत आला नाही. ॥२३॥
अहो ! माझ्या अभागिनीच्या विवाहाला आता फक्त एक रात्र शिल्लक राहिली, परंतु कमलनयन भगवान अजूनही आले नाहीत, याचे कारण कळत नाही. एवढेच काय, माझा संदेश घेऊन गेलेला ब्राह्मणसुद्धा अजून परतला नाही. (२३)
अपि मय्यनवद्यात्मा दृष्ट्वा किञ्चिज्जुगुप्सितम् ।
मत्पाणिग्रहणे नूनं नायाति हि कृतोद्यमः ॥ २४ ॥
विशुद्ध पुरुषो कृष्ण माझ्यांत कांहि ते उणे । वाटले काय की त्याते म्हणोनी नच पातले ॥ २४ ॥
हि - खरोखर - कृतोद्यमः अनवद्यात्मा सः - ज्याने पूर्वीच उद्योग केला आहे असा व स्तुत्य आहे आत्मा ज्याचा असा तो श्रीकृष्ण - मयि किञ्चित् जुगुप्सितं दृष्ट्वा - माझ्या ठिकाणी काही तरी दोष आहे असे पाहून - मत्पाणिग्रहणे - माझे पाणिग्रहण करण्यासाठी - न आयाति - आला नाही - अपि नूनं - असेही खरोखर असेल काय. ॥२४॥
विशुद्धस्वरुप श्रीकृष्ण माझ्यामध्ये काही दोष दिसल्यामुळेच माझे पाणिग्रहण करण्याचे ठरवूनही खात्रीने येथे आले नसतील. (२४)
दुर्भगाया न मे धाता नानुकूलो महेश्वरः ।
देवी वा विमुखी गौरी रुद्राणी गिरिजा सती ॥ २५ ॥
मंदभाग्य गमे माझे अनुकूल न शंकर । अप्रसन्न सती वाटे मजसी रुद्रपत्नि ती ॥ २५ ॥
दुर्भगायाः मे - दुर्दैवी अशा मला - धाता अनुकूलः न - ब्रह्मदेव अनुकूल नाही - महेश्वरः (अनुकूलः) न - शंकरहि अनुकूल नाही - रुद्राणी गिरिजा गौरी सती देवी वा - किंवा रुद्राची पत्नी व पर्वताची कन्या साध्वी पार्वती देवी - विमुखा - प्रतिकूल झाली आहे. ॥२५॥
मीच अभागिनी आहे. त्यामुळेच विधाता आणि भगवान शंकरसुद्धा मला अनुकूल नाहीत, असे दिसते. रुद्रपत्नी गिरिराजकुमारी सती पार्वती देवीही माझ्यावर प्रसन्न नसावी. (२५)
एवं चिन्तयती बाला गोविन्दहृतमानसा ।
न्यमीलयत कालज्ञा नेत्रे चाश्रुकलाकुले ॥ २६ ॥
विचारी पडली ऐसी कृष्णाने चित्त चोरिले । स्मरते वेळही आहे सअश्रु एत्र झाकिले ॥ २६ ॥
एवं चिन्तयती - याप्रमाणे काळजी करणारी - गोविन्दहृतमानसा - श्रीकृष्णाने जिचे अन्तःकरण हिरावून घेतले आहे अशी - बाला - कन्या रुक्मिणी - कालज्ञा - काळवेळ जाणणारी अशी - अश्रुकुलाकुले नेत्रे - अश्रूंनी भरून गेलेले असे दोन डोळे - न्यमीलयत - मिटती झाली. ॥२६॥
जिचे मन भगवंतांनी हिरावून घेतले होते, त्यांचाच विचार करता करता, "अजून वेळ आहे" असे म्हणून तिने आपले अश्रूंनी भरलेले डोळे मिटून घेतले. (२६)
एवं वध्वाः प्रतीक्षन्त्या गोविन्दागमनं नृप ।
वाम ऊरुर्भुजो नेत्रं अस्फुरन् प्रियभाषिणः ॥ २७ ॥
प्रतिक्षा करिता ऐसी उजवी बाहु मांडि नी । नेत्रही स्फुरला डावा प्रीयागमनि हे शुभ ॥ २७ ॥
नृप - हे राजा - एवं - याप्रमाणे - प्रियभाषिणः - गोड भाषण करणार्या - गोविन्दागमनं प्रतीक्षन्त्याः वध्वाः - श्रीकृष्णाच्या येण्याची वाट पहाणार्या रुक्मिणी कन्येची - वामः ऊरुः - डावी मांडी - भुजः नेत्रम् अस्फुरत् - दंड व नेत्र स्फुरण पावू लागला. ॥२७॥
परीक्षिता ! श्रीकृष्णांच्या आगमनाची अशा प्रकारे वाट पाहणार्या रुक्मिणीची डावी मांडी, हात आणि डोळा फडफडू लागला. ही चिन्हे मनासारखे घडणार असल्याची सूचक होती. (२७)
अथ कृष्णविनिर्दिष्टः स एव द्विजसत्तमः ।
अन्तःपुरचरीं देवीं राजपुत्रीं ददर्श ह ॥ २८ ॥
कृष्णा संदेश देवोनी पातले द्विजदेव ते । ध्यानमग्न जशी देवी तशी रुक्मिणी पाहिली ॥ २८ ॥
अथ - नंतर - कृष्णविनिर्दिष्टः - श्रीकृष्णाने आज्ञा दिलेला - सः द्विजसत्तमः एव - तो ब्राह्मणश्रेष्ठच - अन्तःपुरचरीं देवीं राजपुत्रीं - अन्तपुरात हिंडणार्या त्या राजकन्या रुक्मिणीला - ददर्श ह - पहाता झाला. ॥२८॥
इतक्यात श्रीकृष्णांनी पाठविलेला तोच ब्राह्मण आला व त्याने राजकुमारीची अंतःपुरात भेट घेतली. (२८)
सा तं प्रहृष्टवदनं अव्यग्रात्मगतिं सती ।
आलक्ष्य लक्षणाभिज्ञा समपृच्छत् शुचिस्मिता ॥ २९ ॥
प्रसन्न द्विजदेवाला पाहिले रुक्मिणी हिने । ओळखी कृष्ण तो येतो द्विजाला पुसले तिने ॥ २९ ॥
शुचिस्मिता लक्षणाभिज्ञा सा सती - शुभ्रवर्णाचे मंदहास्य करणारी व सर्व लक्षणे जाणणारी ती सदाचारसंपन्न रुक्मिणी - प्रहृष्टवदनं अव्यग्रात्मगतिं तं - हसतमुख व अध्यात्मज्ञानसंपन्न त्या ब्राह्मणाला - आलक्ष्य समपृच्छत् - पाहून विचारिती झाली. ॥२९॥
ब्राह्मणाचा चेहरा प्रफुल्लित व निश्चिंत आहे असे पाहून लक्षणांवरून कार्यसिद्धी ओळखून प्रसन्नतेने स्मित करीत तिने ब्राह्मणाला विचारले. (२९)
तस्या आवेदयत् प्राप्तं शशंस यदुनन्दनम् ।
उक्तं च सत्यवचनं आत्मोपनयनं प्रति ॥ ३० ॥
श्रीकृष्ण पातले येथे नेण्यासी तुजला तसे । प्रतिज्ञा वदले सत्य द्विज तो वदला असे ॥ ३० ॥
(सः) तस्यै प्राप्तं यदुनन्दनम् आवेदयत् - तो ब्राह्मण त्या रुक्मिणीला कृष्ण आला आहे असे सांगून - शशंस - स्तुति करिता झाला - आत्मोपनयनं प्रति सत्यवचनं उक्तं - आणि तिला स्वतःला घेऊन जाण्याचे त्याचे सत्यवचनहि सांगता झाला. ॥३०॥
ब्राह्मणाने सांगितले की, "श्रीकृष्ण येथे आलेले असून त्यांनी तुम्हांला घेऊन जाण्याची सत्यप्रतिज्ञा केली आहे." (३०)
तमागतं समाज्ञाय वैदर्भी हृष्टमानसा ।
न पश्यन्ती ब्राह्मणाय प्रियमन्यन्ननाम सा ॥ ३१ ॥
आनंद भरला चित्ती द्विजाला प्रीय कृष्ण तो । म्हणोनी रुक्मिणीने त्यां केले वंदन केवल ॥ ३१ ॥
हृष्टमानसा वैदर्भी - आनंदित अन्तःकरणाची ती रुक्मिणी - तं आगतं समाज्ञाय - त्या ब्राह्मणाला आलेला जाणून - अन्यतः प्रियं न पश्यन्ती - दुसरे आवडीचे असे न पहाणारी - (केवलं) ननाम - त्या ब्राह्मणाला फक्त नमस्कार करिती झाली. ॥३१॥
ते आल्याचे कळताच रुक्मिणीचे हृदय आनंदाने भरून आले. त्याच्या मोबदल्यात त्याला देण्याजोगी कोणतीही गोष्ट न दिसल्याने तिने फक्त नमस्कार केला. लक्ष्मीचा ब्राह्मणाला नमस्कार म्हणजे जगातील सर्व संपत्ती त्याला देणेच नव्हे का ? (३१)
विवरण :- ब्राह्मणाने रुक्मिणीचा संदेश श्रीकृष्णाकडे वेळेवर पोचविल्यामुळेच श्रीकृष्ण कुंडिनपुरास ताबडतोब येऊ शकला. मग आपला विवाह श्रीकृष्णाशीच होईल, याची रुक्मिणीला खात्री पटली. मात्र ती ब्राह्मणास विसरली नाही. मग ज्याने एवढे मोठे काम केले, तिला तिचे जीवनसर्वस्व मिळवून दिले, त्याला बक्षीस काय द्यावे, तिला सुचेना. त्याने केलेले कामच एवढे मोठे होते की त्यापुढे कोणतेहि बक्षीस कमीच ठरावे. काही वेळा भरपूर बोलायचे असूनहि कंठ दाटून येऊन तोंडातून एकहि शब्द फुटत नाही, वाणी मूक होते, तशी तिची अवस्था झाली आणि तिच्या मनातील सर्व भावना केवळ त्याला केलेल्या प्रणामातून बाहेर पडल्या. लक्ष्मीचा अंश असणारी रुक्मिणी, ज्या लक्ष्मीपुढे सर्व जग झुकते, अशी रुक्मिणी एका ब्राह्मणापुढे नतमस्तक झाली, हेच त्याचे फार मोठे बक्षीस म्हटले पाहिजे. (अर्थात नंतर ब्राह्मणाला भरपूर द्रव्य निश्चितच मिळाले असणार हे उघड आहे.) (३१)
प्राप्तौ श्रुत्वा स्वदुहितुः उद्वाहप्रेक्षणोत्सुकौ ।
अभ्ययात्तूर्यघोषेण रामकृष्णौ समर्हणैः ॥ ३२ ॥
भीष्मका कळले कृष्णराम हे लग्न पाहण्या । पातले तेधवा तेणे सवाद्य भेट देउनी ॥ ३२ ॥
(सः) स्वदुहितुः उद्वाहप्रेक्षणोत्सुकौ रामकृष्णौ प्राप्तौ श्रुत्वा - तो भीष्मक राजा आपल्या कन्येचा विवाह पहाण्यासाठी उत्सुक असे बलराम व श्रीकृष्ण आलेले ऐकून - समर्हणैः (सह) - पूजासाहित्य घेऊन - तूर्यघोषेण अभ्ययात् - मंगलवाद्ये वाजवीत सामोरा आला. ॥३२॥
राम - कृष्ण आपल्या कन्येचा विवाह पाहाण्याच्या उत्सुकतेने आले आहेत, हे ऐकून भीष्मक मंगल वाद्ये वाजवीत, पूजेची सामग्री घेऊन, त्यांना सामोरा गेला. (३२)
मधुपर्कमुपानीय वासांसि विरजांसि सः ।
उपायनान्यभीष्टानि विधिवत् समपूजयत् ॥ ३३ ॥
मधुपर्क तसे वस्त्र उत्तमोत्तम भेटि ही । अर्पिल्या द्वय बंधूंना पूजिले विधिपूर्वक ॥ ३३ ॥
सः - तो भीष्मक - मधुपर्कं - मधुपर्क - (च) विरजांसि वासांसि - आणि निर्मळ वस्त्रे - अभीष्टानि उपायनानि - आणि इच्छित भेटीचे पदार्थ - उपानीय - आणून - विधिवत् समपूजयत् - यथाशास्त्र पूजिता झाला. ॥३३॥
त्यानंतर मधुपर्क करून उत्तम वस्त्रे व उत्तमोत्तम भेटवस्तू देऊन विधिपूर्वक त्याने त्यांची पूजा केली. (३३)
तयोर्निवेशनं श्रीमद् उपकल्प्य महामतिः ।
ससैन्ययोः सानुगयोः आतिथ्यं विदधे यथा ॥ ३४ ॥
बुद्धिमान भीष्मक् होते हरिची भक्तिही तशी । कृष्णा सत्कारिले खूप सर सेनेसि त्या परी ॥ ३४ ॥
महामति - मोठा बुद्धिवान भीष्मक राजा - ससैन्ययोः सानुगयोः तयोः - सैन्यांसह व सेवकांसह अशा त्या दोघा रामकृष्णांना - श्रीमत् निवेशनम् उपकल्प्य - राहण्यासाठी शृंगारिलेला तंबू देऊन - यथा (विधि) आतिथ्यं विदधे - यथायोग्यरीतीने सत्कार करिता झाला. ॥३४॥
नंतर बुद्धीमान भीष्मकाने सेना व परिवारासह त्या दोघांची सर्व सामग्रींनी युक्त अशा निवासस्थानात राहाण्याची व्यवस्था केली आणि त्यांचा यथोचित आदरसत्कार केला. (३४)
एवं राज्ञां समेतानां यथावीर्यं यथावयः ।
यथाबलं यथावित्तं सर्वैः कामैः समर्हयत् ॥ ३५ ॥
भीष्मके सर्व राजांचा अधिकारचि लक्षुनी । इच्छीत वस्तुदेवोनी सत्कार बहु अर्पिला ॥ ३५ ॥
एवं समेतानां राज्ञां - याप्रमाणे एकत्र जमलेल्या राजांची - यथावीर्यं यथावयः - जसा ज्याचा पराक्रम, जसे ज्याचे वय - यथाबलं यथावित्तं - जसे ज्याचे सैन्य किंवा सामर्थ्य तसेच जशी ज्याची श्रीमंती - (तथा) सर्वैः कामैः समर्हयत् - तशा रीतीने सर्व इच्छा पुरवून पूजिता झाला. ॥३५॥
भीष्मकाकडे जे राजे आले होते, त्या सर्वांचे पराक्रम, वय, शौर्य, धन इत्यादी पाहून त्यांच्या त्यांच्या योग्यतेनुसार त्यांना सर्व वस्तू देऊन त्याने त्यांचा मोठा सत्कार केला. (३५)
कृष्णमागतमाकर्ण्य विदर्भपुरवासिनः ।
आगत्य नेत्राञ्जलिभिः पपुस्तन्मुखपङ्कजम् ॥ ३६ ॥
विदर्भ देशिच्या लोका कळला कृष्ण पातले । दर्शना पातले सर्व सौंदर्य नेत्रि प्राशिती ॥ ३६ ॥
विदर्भपुरवासिनः - विदर्भ नगरीत रहाणारे लोक - कृष्णं आगतम् आकर्ण्य - श्रीकृष्णाला आलेला ऐकून - आगत्य - जवळ येऊन - नेत्राञ्जलिभिः - नेत्ररूपी ओंजळींनी - तन्मुखपङ्कजम् पपौ - त्या श्रीकृष्णाचे मुखकमळ पिते झाले. ॥३६॥
श्रीकृष्ण येथे आले आहेत, असे विदर्भ देशाच्या नागरिकांनी जेव्हा ऐकले, तेव्हा ते भगवंताच्या निवासस्थानी आले आणि त्यांनी आपल्या डोळ्यांच्या ओंजळींनी त्यांच्या मुखारविंदाच्या सौंदर्याचे आकंठ पान केले. (३६)
अस्यैव भार्या भवितुं रुक्मिण्यर्हति नापरा ।
असावप्यनवद्यात्मा भैष्म्याः समुचितः पतिः ॥ ३७ ॥
वदती सर्व ते तेंव्हा रुक्मिणी श्यामसुंदर । जोडा हा दिसतो योग्य न शोभे दुजि याजला ॥ ३७ ॥
रुक्मिणी एव - रुक्मिणीच - अस्य भार्या भवितुम् अर्हति - ह्याची भार्या होण्यास योग्य आहे - अपरा न - दुसरी नव्हे - अनवद्यात्मा - निर्दोषस्वरूपाचा असा - असौ अपि - हा श्रीकृष्णसुद्धा - भैष्म्याः पतिः समुचितः - रुक्मिणीला योग्य पति होय. ॥३७॥
ते आपापसात म्हणू लागले की, "रुक्मिणीच यांची पत्नी होण्यास योग्य आहे, दुसरी कोणी नव्हे आणि परमपवित्र असे हेच रुक्मिणीसाठी योग्य पती आहेत." (३७)
किञ्चित्सुचरितं यत् नः तेन तुष्टस्त्रिलोककृत् ।
अनुगृह्णातु गृह्णातु वैदर्भ्याः पाणिमच्युतः ॥ ३८ ॥
आमुची पूर्वपुण्याई असेल कांहि ती तशी । विधाता घडवी ऐसे कृपेने जोड हा असा ॥ ३८ ॥
यत् नः किञ्चित् सुचरितम् - जे आमचे काही थोडेबहुत पुण्य असेल - तेन तुष्टः त्रिलोककृत् - त्यायोगे संतुष्ट झालेला त्रैलोक्यरक्षक असा - अच्युतः - श्रीकृष्ण - (नः) अनुगृह्णातु - आम्हावर अनुग्रह करो. ॥३८॥
आम्ही जर काही सत्कर्म केले असेल, तर त्रिलोकविधाता आमच्यावर प्रसन्न होवो आणि अशी कृपा करो की, श्रीकृष्णच रुक्मिणीचे पाणिग्रहण करो" (३८)
एवं प्रेमकलाबद्धा वदन्ति स्म पुरौकसः ।
कन्या चान्तःपुरात् प्रागाद् भटैर्गुप्ताम्बिकालयम् ॥ ३९ ॥
प्रेमाने वदती लोक समयी याच रुक्मिणी । ससैन्य निघली तैशी दर्शना देविमंदिरा ॥ ३९ ॥
प्रेमकलाबद्धाः पुरौकसः - प्रेमाने बद्ध झालेले नागरिक लोक - एवं वदन्ति स्म - याप्रमाणे बोलू लागले - च - आणि - कन्या - राजकन्या रुक्मिणी - भटैः गुप्ता - योद्ध्यांनी रक्षिलेली अशी - अन्तःपुरात् - अंतःपुरातून - अम्बिकालयम् - अम्बिकेच्या मंदिरात - प्रागात् - प्राप्त झाली. ॥३९॥
रुक्मिणीबद्दलच्या प्रेमामुळे जेव्हा नागरिक आपापसात असे बोलत होते, त्याचवेळी रुक्मिणी अंतःपुरातून बाहेर येऊन सैनिकांच्या पहार्यात देवीच्या मंदिराकडे जाण्यासाठी निघाली. (३९)
पद्भ्यां विनिर्ययौ द्रष्टुं भवान्याः पादपल्लवम् ।
सा चानुध्यायती सम्यङ् मुकुन्दचरणाम्बुजम् ॥ ४० ॥
देवीच्या पडण्या पाया चाले रुक्मिणि पायि ती । मनात ध्यायली नित्य मुकुंदचरणांबुजा ॥ ४० ॥
सा च - आणि ती रुक्मिणी - मुकुन्दचरणाम्बुजं सम्यक् अनुध्यायती - श्रीकृष्णाच्या चरणकमलांचे उत्तमरीतीने चिन्तन करणारी अशी - भवान्याः पादपल्लवं द्रष्टुं - अम्बिकेच्या कोमल चरणांचे दर्शन घेण्याकरिता - पद्भ्यां विनिर्ययौ - पायांनी चालत गेली. ॥४०॥
श्रीकृष्णांच्या चरणकमलांचे मनःपूर्वक चिंतन करीत ती भवानीच्या चरणांचे दर्शन घेण्यासाठी पायीच निघाली. (४०)
यतवाङ्मातृभिः सार्धं सखीभिः परिवारिता ।
गुप्ता राजभटैः शूरैः सन्नद्धैरुद्यतायुधैः । मृडङ्गशङ्खपणवाः तूर्यभेर्यश्च जघ्निरे ॥ ४१ ॥
मौन धरोनिया होती, माता मैत्रिणि सोबती । शस्त्रास्त्र घेउनी हाती सेनेने रक्षिले तिला । मृदंग शंख नी ढोल तुतार्या बहु वाजती ॥ ४१ ॥
सखिभिः परिवारिता - मैत्रिणींनी वेष्टिलेली ती - शूरैः सन्नद्धैः उद्यतायुधैः राजभटै गुप्ता - पराक्रमी, सज्ज व शस्त्रास्त्रे धारण करणार्या राजाच्या योद्ध्यांनी रक्षिलेली - मातृभिः सार्धं - मातांसह - तत्र जगाम - तेथे प्राप्त झाली - मृदङगशंख पणवाः - मृदंग, शंख व पणव - तूर्यभेर्यश्च - तुतार्या व नगारे - जघ्निरे - वाजविते झाले. ॥४१॥
तिने मौन धारण केले होते आणि तिच्या माता व मैत्रिणी बरोबर होत्या. हातात शस्त्रास्त्रे घेतलेले शूर राजसैनिक, कवच अंगावर घालून, त्यांचे रक्षण करीत होते. त्यावेळी मृदंग, शंख, ढोल, तुतार्या आणि भेरी वाजत होत्या. (४१)
नानोपहार बलिभिः वारमुख्याः सहस्रशः ।
स्रग्गन्धवस्त्राभरणैः द्विजपत्न्यः स्वलङ्कृताः ॥ ४२ ॥ गायन्त्यश्च स्तुवन्तश्च गायका वाद्यवादकाः । परिवार्य वधूं जग्मुः सूतमागधवन्दिनः ॥ ४३ ॥
वस्त्रालंकार लेवोनी द्विजपत्न्याहि सोबती । वारांगना करीं पूजावस्तू घेउनी चालती ॥ ४२ ॥ गायके गायिली गाणी स्तुती मागधि गायिली । जय् जय्कार तसा झाला ख्यातिवर्णन चालले ॥ ४३ ॥
सहस्रशः वारमुख्याः - हजारो वारांगना - नानोपहारबलिभिः - अनेक प्रकारची वायने व भेटीचे पदार्थ घेऊन - स्वलङ्कृताः द्विजपत्न्यः - अलंकार घातलेल्या ब्राह्मणस्त्रिया - स्रग्गन्धवस्त्राभरणैः - माळा, गंध, वस्त्रे व अलंकार हे घेऊन - गायन्तः स्तुवन्तः च गायकाः - गाणारे व स्तुती करणारे भाट - वाद्यवादकाः सूतमागधबन्दिनः (च) - आणि वाद्ये वाजविणारे सूत, मागध व बंदिजन - वधूं परिवार्य जग्मुः - नवरीभोवती एकत्र झाले. ॥४२-४३॥
पुष्कळाशा ब्राह्मणपत्न्या, चंदन इत्यादी सुगंधी द्रव्ये लावून, गजरे घालून आणि वस्त्रालंकारांनी नटून थटून तिच्याबरोबर चालल्या होत्या. तसेच अनेक प्रकारचे नजराणे घेऊन हजारो वारांगना बरोबर चालल्या होत्या. (४२) गवई गात चालले होते, वाद्ये वाजविणारे वाद्ये वाजवीत चालले होते आणि सूत, मागध व भट वधूच्या चारी बाजूंनी त्यांची स्तुती गात चालले होते. (४३)
आसाद्य देवीसदनं धौतपादकराम्बुजा ।
उपस्पृश्य शुचिः शान्ता प्रविवेशाम्बिकान्तिकम् ॥ ४४ ॥
देवीच्या मंदिरी येता धुतले हात पाय नी । आचम्य करुनी शांतचित्ते मंदिरि पातली ॥ ४४ ॥
धौतपादकराम्बुजा - धुतले आहेत हातपाय जीने अशी - शुचिः शान्ता (सा) - शुद्ध व शान्त ती रुक्मिणी - उपस्पृश्य - आचमन करून - देवीसदनम् आसाद्य - अंबिकेच्या मंदिराशी जाऊन - अम्बिकान्तिकं प्रविवेश - अम्बिकेच्या जवळ गेली. ॥४४॥
देवीच्या मंदिराजवळ पोहोचल्यावर रुक्मिणीने हात-पाय धुतले. आचमन केले. नंतर अंतर्बाह्य पवित्र होऊन शांत मनाने ती देवीजवळ जाऊन बसली. (४४)
तां वै प्रवयसो बालां विधिज्ञा विप्रयोषितः ।
भवानीं वन्दयां चक्रुः भवपत्नीं भवान्विताम् ॥ ४५ ॥
म्हातार्या जाणत्या विप्रा सोबती पातल्या तिथे । तयांनी देविते हीस प्रणाम करवीयला ॥ ४५ ॥
विधिज्ञाः प्रवयसः विप्रयोषितः - विधि जाणणार्या वृद्ध ब्राह्मणस्त्रिया - तां बालां वै - त्या रुक्मिणी कन्येकडून - भवान्वितां भवपत्नीं भवानी - शंकरासहित अशा शिवपत्नी अम्बिकेला - वन्दयां चक्रुः - वंदन करवित्या झाल्या. ॥४५॥
कर्मकांड जाणणार्या वृद्ध ब्राह्मणस्त्रिया तिच्याबरोबर होत्या. त्यांनी रुक्मिणीला शिवपार्वतींना वंदन करावयास लावले. (४५)
नमस्ये त्वाम्बिकेऽभीक्ष्णं स्वसन्तानयुतां शिवाम् ।
भूयात् पतिर्मे भगवान् कृष्णस्तदनुमोदताम् ॥ ४६ ॥
वदली रुक्मिणी तेंव्हा वंदिते तुज नी गणां । करावी पूर्ण ती इच्छा श्रीकृष्ण पति दे मला ॥ ४६ ॥
अम्बिके - हे अम्बिके - स्वसंतानयुतां शिवां त्वा - आपल्या मुलांसह कल्याण करणार्या अशा तुला - अभीक्ष्णं नमस्ये - मी वारंवार नमस्कार करिते - भगवान् कृष्णः - भगवान श्रीकृष्ण - मे पतिः भूयात् - माझा पति होवो - तत् अनुमोदताम् - या गोष्टीला संमती द्यावी. ॥४६॥
तेव्हा रुक्मिणीने देवीला प्रार्थना केली, "हे अंबिके ! तुझ्या स्कंद व गणेश या पुत्रांसह मंगल करणार्या तुला मी वारंवार नमस्कार करीत आहे. भगवान श्रीकृष्णच माझे पती व्हावेत, असा मला वर दे." (४६)
अद्भिर्गन्धाक्षतैर्धूपैः वासःस्रङ्माल्य भूषणैः ।
नानोपहारबलिभिः प्रदीपावलिभिः पृथक् ॥ ४७ ॥
अक्षता जल गंधे नी धूप वस्त्रादि अर्पिता । आरती जाहली तेंव्हा अंबिका देविची तशी ॥ ४७ ॥
अद्भिः गन्धाक्षतैः - पाण्यांनी, गंध व अक्षता यांनी - धूपैः वासः स्रङ्माल्यभूषणैः - धूपांनी, वस्त्रांनी व माळा फुले व अलंकार यांनी - नानोपहार बलिभिः - अनेक प्रकारच्या पूजासाहित्यांनी व नैवेद्यांनी - प्रदीपावलिभिः - दिव्यांच्या रांगांनी - (सा) पृथक् (तां पूजयामास) - ती रुक्मिणी निरनिराळ्या रीतीने अम्बिकेची पूजा करिती झाली. ॥४७॥
नंतर तिने पाणी, गंध, अक्षता, धूप, वस्त्रे, फुलांच्या माळा, फुले, अलंकार, अनेक प्रकारचे नैवेद्य, भेटवस्तू आणि आरती इत्यादी सामग्रींनी अंबिकादेवीची पूजा केली. (४७)
विवरण :- रुक्मिणी अंबिकेच्या देवालयात आली आणि तिने वृद्ध ब्राह्मणींच्या मार्गदर्शनाखाली तिची व अन्य ब्राह्मणींची पूजा केली. ती स्वतः जरी लक्ष्मीची अंशभूत होती, (वैदर्भीं भीष्मकसुतां श्रियोमात्राम् ।) तर सामान्य स्त्रियांप्रमाणे ही पूजा का ? असे वाटण्याची शक्यता. पण आता ती मानवी अवतारात आहे हे लक्षात घेऊनच तिच्या सर्व आचरणाकडे बघावयास हवे. (४७)
विप्रस्त्रियः पतिमतीः तथा तैः समपूजयत् ।
लवणापूपताम्बूल कण्ठसूत्रफलेक्षुभिः ॥ ४८ ॥
मीठ पोहे फळे पान ऊस नी कंठसूत्र या । साहित्येपूजिल्या सर्व सवाष्णब्राह्मणी तदा ॥ ४८ ॥
तथा - त्याचप्रमाणे - पतिमतीः विप्रस्त्रियः - पतियुक्त अशा सौभाग्यवती ब्राह्मणस्त्रियांची - तैः लवणापूपताम्बूलकण्ठसूत्रफलेक्षुभिः - मीठ, घृतपक्व पदार्थ, विडा, कंठसूत्र व ऊस अशा पदार्थांनी - समपूजयत् - पूजा करिती झाली. ॥४८॥
त्यानंतर तिने वरील सामग्रीने तसेच मीठ, अनारसे, विडे, मंगळसूत्र, फले आणि ऊस यांनी सौभाग्यवती ब्राह्मण स्त्रियांचेसुद्धा पूजन केले. (४८)
तस्यै स्त्रियस्ताः प्रददुः शेषां युयुजुराशिषः ।
ताभ्यो देव्यै नमश्चक्रे शेषां च जगृहे वधूः ॥ ४९ ॥
आशिर्वाद दिला त्यांनी प्रसाद दिधला तसा । नमिते नवती त्यांना प्रसाद मग सेविते ॥ ४९ ॥
ताः स्त्रियः - त्या स्त्रिया - तस्यै - त्या रूक्मिणीला - शेषां प्रददुः - निर्माल्य देत्या झाल्या - आशिषः प्रयुयुजुः - आशीर्वाद देत्या झाल्या - वधूः - उपवर रुक्मिणी - ताभ्यः देव्यै (च) नमः चक्रे - त्या स्त्रियांना व देवी अंबिकेला नमस्कार करिती झाली - शेषां च जगृहे - आणि निर्माल्य घेती झाली. ॥४९॥
तेव्हा ब्राह्मणस्त्रियांनी तिला आशीर्वादपूर्वक प्रसादमाला दिली आणि वधूनेही ब्राह्मणस्त्रिया व माता अंबिकेला नमस्कार करुन ती प्रसादमाला ग्रहण केली. (४९)
मुनिव्रतमथ त्यक्त्वा निश्चक्रामाम्बिकागृहात् ।
प्रगृह्य पाणिना भृत्यां रत्नमुद्रोपशोभिना ॥ ५० ॥
संपता विधि तो सर्व सोडिले मौन ते तिने । धरिता सखिचा हात आली ती मंदिरातुनी ॥ ५० ॥
अथ - नंतर - सा - ती रुक्मिणी - मुनिव्रतं त्यक्त्वा - मौनव्रताचा त्याग करून - रत्नमुद्रोपशोभिना पाणिना - रत्नांच्या अंगठीने शोभणार्या हाताने - भृत्यां प्रगृह्य - दासीला धरून - अम्बिकागृहात् निश्चक्राम - अंबिकेच्या मंदिरातून बाहेर निघाली. ॥५०॥
नंतर मौन सोडून रत्नजडित अंगठीने शोभणार्या हाताने एका दासीचा हात धरून ती मंदिराच्या बाहेर पडली. (५०)
( मिश्र )
तां देवमायामिव वीरमोहिनीं सुमध्यमां कुण्डलमण्डिताननाम् । श्यामां नितम्बार्पितरत्नमेखलां व्यञ्जत्स्तनीं कुन्तलशङ्कितेक्षणाम् ॥ ५१ ॥
( इंद्रवज्रा ) वीरास मोही जणु देवमाया सुमध्यमा कुंडलमंडिता ती । कटीस रत्नांकित मेखळा ती वज्रस्तना शंकित पाहि नेत्रे ॥ ५१ ॥
देवमायाम् इव - देवांच्या मायेप्रमाणे - वीरमोहिनीं - वीरांना मोहित करणार्या - सुमध्यमां - सुंदर अशा - कुण्डलमण्डिताननाम् - जिचे मुख कुंडलांनी सुशोभित केले आहे अशा - श्यामां - सोळा वर्षाचे वय असलेल्या - नितम्बार्पितरत्नमेखलां - जिच्या कंबरेत रत्नांचा कंबरपटटा घातलेला आहे अशा - व्यञ्जत्स्तनीं - व्यक्त होत आहेत स्तन जिचे अशा - कुन्तलशङ्कितेक्षणाम् - केसांना भ्यालेले जणू आहेत नेत्र जिचे अशा - तां (दृष्टवा) - त्या रुक्मिणीला पाहून. ॥५१॥
भगवंताच्या मायेप्रमाणे, तीही वीरांना मोहित करणारी होती. तिचा कटिप्रदेश सुंदर होता. मुखावर कुंडलांचे तेज झगमगत होते. त्या कुमारीने कमरेवर रत्नांचा कमरपट्टा धारण केला होता. वक्षःस्थळ काहीसे उभार होते, आणि तिची दृष्टी केसांच्या बटांमुळे काहीशी चंचल होत होती. (५१)
शुचिस्मितां बिम्बफलाधरद्युति
शोणायमानद्विजकुन्दकुड्मलाम् । पदा चलन्तीं कलहंसगामिनीं सिञ्जत्कलानूपुरधामशोभिना । विलोक्य वीरा मुमुहुः समागता यशस्विनस्तत्कृतहृच्छयार्दिताः ॥ ५२ ॥
ती दंतपंक्ती जणु कुंदमाला नी ओठलाली पसरे तयांसी । ते हास्य मोठे रमणीय होते झंकारती पैंजण पायभागी । ती हंसचाली चलता बघोनी ते वीर सारे मनि मोहले की । त्या कामदेवे करण्यास सिद्धी बाणे विदीर्णो हृदयेहि केली ॥ ५२ ॥
शुचिस्मितां - शुभ्र मंदहास्य करणार्या - बिम्बफलाधरद्युतिशोणायमानद्विजकुन्दकुङ्मलाम् - पिकलेल्या तोंडल्यासारखे अधरोष्ठाच्या कांतीने आरक्त झालेले कुंदाच्या कळ्याप्रमाणे आहेत दात जिचे अशा - सिञ्चत्कलानूपुरधामशोभिना पदा - मधुर शब्द करणार्या पैंजणाच्या कांतीने शोभणार्या पायाने - चलन्तीं - चालणार्या - कलहंसगामिनीं - राजहंसाप्रमाणे गमन करणार्या - (तां) विलोक्य - त्या रूक्मिणीला पाहून - समागताः यशस्विनः वीराः - आलेले यशस्वी वीर - तत्कृतहृच्छयार्दिताः - तिच्या दर्शनामुळे कामपीडित होऊन - मुमुहुः - मोहित झाले. ॥५२॥
तिच्या ओठांवर पवित्र हास्य होते. तिची दंतपंक्ती कुंदकळ्यांप्रमाणे शुभ्र होती, परंतु पिकलेल्या तोंडल्याप्रमाणे लाल असलेल्या ओठांच्या कांतीने लालसर दिसत होती. तिच्या पायांत नूपुर चमकत होते आणि त्यांचा रुणझुण आवाज होत होता. ती जेव्हा पायीच राजहंसाच्या गतीने चालली होती, तेव्हा तिला पाहून तेथे आलेले, युद्धात कीर्ती मिळवलेले वीरही मोहित झाले. कामदेवांच्या बाणांनी जणू त्यांचे हृदय विदिर्ण करून टाकले होते. (५२)
( वसंततिलका )
यां वीक्ष्य ते नृपतयस्तदुदारहास व्रीडावलोकहृतचेतस उज्झितास्त्राः । पेतुः क्षितौ गजरथाश्वगता विमूढा यात्राच्छलेन हरयेऽर्पयतीं स्वशोभाम् ॥ ५३ ॥
( वसंततिलका ) ओवाळिते हरि वरी रुप तैचि चाले ती रुक्मिणी हळुपदीच वरातिं चाले । लज्जीत हास्य बघुनी हरपोनि शुद्ध मूर्छित वीर पदले गळलेहि शस्त्रे ॥ ५३ ॥
ते नृपतयः - ते राजे - यां वीक्ष्य - ज्या रुक्मिणीला पाहून - तदुदारहासव्रीडावलोकहृतचेतसः - तिचे गंभीर हास्य व लज्जायुक्त अवलोकन यांनी हिरावून घेतली आहेत अन्तःकरणे ज्यांची असे - उज्झितास्त्राः - शस्त्रास्त्रांचा त्याग ज्यांनी केला आहे असे - गजरथाश्वगताः - हत्ती, रथ व घोडे यांवर बसलेले - यात्राच्छलेन - गमनाच्या निमित्ताने - हरये स्वशोभां अर्पयतीं (तां विलोक्य) - श्रीकृष्णाला स्वतःची शोभा अर्पण करणार्या त्या रुक्मिणीला पाहून - विमूढाः - मोहित झालेले असे - क्षितौ पेतुः - पृथ्वीवर पडले. ॥५३॥
अशाप्रकारे चालण्याच्या निमित्ताने रुक्मिणी आपले सौंदर्य श्रीहरींना अर्पण करीत होती. तिला पाहून तसेच मनमोकळे हास्य आणि लाजरी नजर यांनी ज्यांचे चित्त ठिकाणावर राहिले नाही, त्या राजांच्या हातातून शस्त्रास्त्रे गळून पडली व ते स्वतःसुद्धा रथ, हत्ती तसेच घोड्यांवरुन खाली जमिनीवर केव्हा पडले, त्यांना कळलेच नाही. (५३)
सैवं शनैश्चलयती चलपद्मकोशौ
प्राप्तिं तदा भगवतः प्रसमीक्षमाणा । उत्सार्य वामकरजैरलकानपङ्गैः प्राप्तान्ह्रियैक्षत नृपान् ददृशेऽच्युतं च ॥ ५४ ॥
पाहोनि वाट हरिची अतिमंद चाले डाव्या करेंचि कच ते वरि सावरोनी । लाजोनि दृष्टि फिरवी नृपती वरी ती तेंव्हाच श्याम दिसला मग सुंदरीला ॥ ५४ ॥
एवं - याप्रमाणे - चलपद्मकोशौ शनैः चलयती - चंचल अशा कमळांना हळूहळू हलविणारी - सा - ती रुक्मिणी - तदा भगवतः प्राप्तिं प्रसमीक्षमाणा - त्यावेळी भगवत्प्राप्तीची इच्छा करणारी होऊन - वामकरजैः - डाव्या हाताच्या नखांनी - अलकान् - तोंडावर आलेल्या कुरळ्या केसांना - (च) प्राप्तान् नृपान् - आणि जवळ असणार्या राजांना - उत्सार्य - बाजूस सारून - ह्लिया - लज्जेने - अपाङगैः - कटाक्षांनी - अच्युतं ददृशे - श्रीकृष्णाला पाहती झाली. ॥५४॥
अशा प्रकारे रुक्मिणी श्रीकृष्णांच्या प्राप्तीची पावले हळू हळू पुढे टाकीत होती. तिने आपल्या डाव्या हाताच्या बोटांनी केस बाजूला सारले आणि तिथे आलेल्या राजांकडे लज्जित नजरेने पाहिले. त्याचवेळी तिला श्रीकृष्णांचे दर्शन झाले. (५४)
( मिश्र )
तां राजकन्यां रथमारुरुक्षतीं जहार कृष्णो द्विषतां समीक्षताम् । रथं समारोप्य सुपर्णलक्षणं राजन्यचक्रं परिभूय माधवः ॥ ५५ ॥ ततो ययौ रामपुरोगमः शनैः सृगालमध्यादिव भागहृद्धरिः ॥ ५६ ॥
( इंद्रवज्रा ) रुक्मीणि इच्छी रथि बैसण्या त्या त्या वीरमाथीं पद ठेवुनीया । गरूड चिन्हांकित ज्या ध्वजा त्या रथात कृष्णो उचलोनि घेई ॥ ५५ ॥ मृगेंद्र कोल्ह्यातुनि जै शिकार तसेच कृष्णो यदु सर्व गेले ॥ ५६ ॥
कृष्णः - श्रीकृष्ण - द्विषतां समीक्षतां - शत्रूंच्या समक्ष - रथं आरुरुक्षतीं तां राजकन्यां जहार - रथावर चढण्यास इच्छिणार्या त्या राजकन्या रुक्मिणीला हरिता झाला - माधवः - लक्ष्मीपति श्रीकृष्ण - सुपर्णलक्षणं रथं समारोप्य - गरुड आहे चिन्ह ज्याचे अशा रथावर बसवून - राजन्यचक्रं परिभूय - व क्षत्रियसैन्याचा पराजय करून - सृगालमध्यात् भागहृत् हरिः इव - कोल्ह्यांच्या मधून आपला भाग घेऊन जाणार्या सिंहाप्रमाणे - रामपुरौगमैः - बलरामादि यादवांसह - शनैः - हळू हळू - ततः ययौ - तेथून गेला. ॥५५-५६॥
रथावर चढू पाहाणार्या त्या राजकन्येला श्रीकृष्णांनी, सर्व शत्रू पाहात असतानाच, गरुडाचे चिन्ह असलेल्या रथात बसविले आणि त्या राजांचा पराभव करून तिला नेले. (५५) यानंतर कोल्ह्यांच्या कळपातून सिंह ज्याप्रमाणे आपला भाग घेऊन जातो, त्याचप्रमाणे रुक्मिणीला घेऊन भगवान श्रीकृष्ण, बलराम इत्यादींसह तेथून निघून गेले. (५६)
विवरण :- अंबिकेच्या देवालयातून बाहेर पडून रथात बसणार्या रुक्मिणीचे शिशुपाल इ. राजे पहात असता श्रीकृष्णाने हरण केले. आणि तो सावकाश गेला. (शनैः) इथे 'शनैः' हा शब्द श्रीकृष्णाचा निर्भयपणा आणि आत्मविश्वास सुचवितो. वास्तविक त्यावेळी तेथे शिशुपालासारखे सशस्त्र आणि दक्ष असे अनेक राजे आजूबाजूला होते. आणि कृष्णाचे जवळ फक्त बलराम होता. अबलख घोडे होते अन कुशल सारथी होता, पण हे दोघे बंधू सर्व राजांना पुरून उरणारे होते. त्यांचा आपल्या बाहुबलावर पूर्ण आणि सार्थ विश्वास होता. म्हणून कोणतीही गडबड-घाई न करता तो सावकाश रथ चालवू लागला. (५५) विवरण :- मागील श्लोकात कोल्ह्याच्या कळपातून सिंहाने आपला भाग उचलावा, त्याप्रमाणे शिशुपाल आणि इतर राजांच्या गराडयामधून श्रीकृष्णाने रुक्मिणीचे हरण केले, असे वर्णन आहे. मात्र इथे जरासंध, शिशुपाल इ. राजे, विशेषतः जरासंध स्वतःलाच सिंह समजतो आणि स्वतः शस्त्रसज्ज असूनहि या 'गवळ्याने' तिचे हरण केले, असे म्हणून जरी 'धिक्कार असो' असे म्हणतो तरी श्रीकृष्णास 'सामान्य गवळी' म्हणून त्याचा पाणउतारा करण्यास कमी करत नाही. आपण शूरवीर असून रुक्मिणी ही केवळ आपलीच मालमत्ता आहे, असा त्यास भ्रम आहे. इतकी फजीती होऊनहि तो अशा केवळ वल्गना करतो, म्हणून अशा या तथाकथित वीराची कीव करावी तेवढी थोडीच ! (५६)
तं मानिनः स्वाभिभवं यशःक्षयं
परे जरासन्धमुखा न सेहिरे । अहो धिगस्मान्यश आत्तधन्वनां गोपैर्हृतं केशरिणां मृगैरिव ॥ ५७ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे उत्तरार्धे रुक्मिणीहरणं नाम त्रिपञ्चाशत्तमोऽध्यायः ॥ ५३ ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
गर्वी जरासंध नि भूप सर्व कीर्तिक्षयाने बहु क्रोधले की । धिक्कार आम्हा धनुवीर शांत हिरावुनीया यश नेति गोप ॥ ५७ ॥ ॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर त्रेपन्नावा अध्याय हा ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
मानिनः जरासंधवशाः परे - अभिमानी व जरासंधाच्या आधीन असणारे शत्रुपक्षीय राजे - तं यशःक्षयं स्वाभिभवं - त्या कीर्तीचा नाश करणार्या स्वतःच्या पराजयाला - न सेहिरे - सहन करिते झाले नाहीत - अहो - काय हो - आत्तधन्वनां (नः) यशः - शस्त्रधारी अशा आमची कीर्ति - केसरिणां मृगैः इव - सिंहाची कीर्ति हरिणांनी हरावी त्याप्रमाणे - गोपैः हृतम् - गोपांनी हरिली - अस्मान् धिक् - आम्हाला धिक्कार असो. ॥५७॥
जरासंधाच्या पक्षाच्या अभिमानी राजांना त्यावेळी आपला हा केलेला मोठा पराभव आणि कीर्तींचा नाश सहन झाला नाही. ते म्हणू लागले - "अहो ! आम्हा धनुर्धरांच्या यशाचा धिक्कार असो ! या गवळ्यांच्या मुलांनी, सिंहाचा भाग हरिणांनी घेऊन जावा, त्याप्रमाणे आमचे यश हिरावून नेले." (५७)
अध्याय त्रेपन्नावा समाप्त |