|
श्रीमद् भागवत पुराण
रामकृष्णयोर्द्वारकागमनं बलरामविवाहः, द्वारकागमन, बलरामांचा विवाह व श्रीकृष्णांकडे रुक्मिणीचा संदेश घेऊन ब्राह्मणाचे येणे - संहिता - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् ) इत्थं सोऽनगृहीतोऽन्ग कृष्णेनेक्ष्वाकु नन्दनः । तं परिक्रम्य सन्नम्य निश्चक्राम गुहामुखात् ॥ १ ॥
(अनुष्टुप् ) श्रीशुकदेव सांगतात - मुचकुंदा असा केला कृष्णाने तो अनुग्रह । कृष्णा परिक्रमा केली बाहेर पातला पुन्हा ॥ १ ॥
अङ्ग - हे परीक्षित राजा - कृष्णेन इत्थं अनुगृहीतः सः - श्रीकृष्णाने याप्रमाणे अनुग्रह दिलेला तो - इक्ष्वाकुनंदनः - इक्ष्वाकुवंशात उत्पन्न झालेला मुचुकुंद - तं परिक्रम्य संनम्य (च) - त्या श्रीकृष्णाला प्रदक्षिणा घालून व नमस्कार करून - गुहामुखात् निश्चकाम - गुहेच्या द्वारातून बाहेर पडला. ॥१॥
श्रीशुक म्हणतात - अशा प्रकारे श्रीकृष्णांनी इक्ष्वाकुनंदन मुचुकुंदावर कृपा केली. नंतर त्याने भगवंतांना प्रदक्षिणा घालून नमस्कार केला आणि तो गुहेच्या बाहेर पडला. (१)
संवीक्ष्य क्षुल्लकान् मर्त्यान् पशून् वीरुद्वनस्पतीन् ।
मत्वा कलियुगं प्राप्तं जगाम दिशमुत्तराम् ॥ २ ॥
बाहेर येउनी पाही माणसे पशु पक्षि नी । वृक्षही सान ते झाले आकारे पूर्विच्याहुनी । लक्षोनी कलियूगाते गेला तो उत्तरेकडे ॥ २ ॥
सः - तो मुचुकुंद - मर्त्यान् पशून् वीरुद्वनस्पतीन् क्षुल्लकान् वीक्ष्य - मनुष्ये, पशु, वेली व वृक्ष हे खुजट व ठेंगणे आहेत असे पाहून - कलियुगं प्राप्तं मत्वा - कलियुग चालू झाले असे मानून - उत्तरां दिशं जगाम - उत्तर दिशेला गेला. ॥२॥
त्याने बाहेर येऊन पाहिले, तर माणसे, पशू, वेली आणि झाडे पहिल्यापेक्षा पुष्कळच लहान आकाराची झाली. त्यावरून कलियुग आले असे जाणून तो उत्तर दिशेकडे निघून गेला. (२)
तपःश्रद्धायुतो धीरो निःसङ्गो मुक्तसंशयः ।
समाधाय मनः कृष्णे प्राविशद् गन्धमादनम् ॥ ३ ॥
तप श्रद्धा नि ध्यान संदेहमुक्त तो असे । कृष्णात लावुनी चित्त गंधमादनि पातला ॥ ३ ॥
तपःश्रद्धायुतः धीरः - तपश्चर्येवर ज्याची निष्ठा आहे असा गंभीर बुद्धीचा - निःसङगः मुक्तसंशयः (सः) - सर्वसंगपरित्याग केलेला व सर्व संशय ज्याचे नष्ट झाले आहेत असा तो मुचुकुंद - कृष्णे मनः समाधाय - कृष्णावर मन ठेवून - गंधमादनं प्राविशत् - गंधमादन पर्वतावर गेला. ॥३॥
तो तपश्चर्या, श्रद्धा, धैर्य आणि अनासक्तीने युक्त होता. तसेच संशयापासून मुक्त होता, आपले चित्त श्रीकृष्णांचे ठायी ठेवून तो गंधमादन पर्वतावर गेला. (३)
बदर्याश्रममासाद्य नरनारायणालयम् ।
सर्वद्वन्द्वसहः शान्तः तपसाराधयद् हरिम् ॥ ४ ॥
साहोनी शीत उष्णाला नर नारायणाश्रमी । तपासी लागला नित्य भगवान् हरिपूजनी ॥ ४ ॥
नरनारायणालयं बदर्याश्रमम् आसाद्य - नरनारायण जेथे राहतात त्या बदरिकाश्रमात येऊन - सर्वद्वंद्वसहः शान्तः (सः) - सुखदुःखादि सर्व द्वंद्वे सहन करणारा तो शांत मुचुकुंद - तपसा हरिं आराधयत् - तपश्चर्येने भगवंताची आराधना करिता झाला. ॥४॥
नर नारायणांचे निवासस्थान असलेल्या बदरिकाश्रमात जाऊन अतिशय शांत चित्ताने ऊन थंडी इत्यादी द्वंद्वे सहन करीत तो तपश्चर्येने भगवंतांची आराधना करू लागला. (४)
भगवान् पुनराव्रज्य पुरीं यवनवेष्टिताम् ।
हत्वा म्लेच्छबलं निन्ये तदीयं द्वारकां धनम् ॥ ५ ॥
भगवान् मथुरी आले सेनेने घेरिले तसे । म्लेंच्छांना मारुनी सर्व द्वारकी धन आणिले ॥ ५ ॥
भगवान् - श्रीकृष्ण - पुनः - पुनः - यवनवेष्टितां पुरीं आव्रज्य - कालयवनाच्या म्लेच्छसैन्याने वेढिलेल्या मथुरानगरीत येऊन - म्लेच्छबलं हत्वा - म्लेच्छसैन्याचा नाश करून - तदीयं धनं द्वारकां निन्ये - त्यांचे सर्व द्रव्य द्वारकेत नेता झाला. ॥५॥
इकडे भगवान पुन्हा मथुरापुरीला परतले. कालयवनाच्या सेनेने अजूनपर्यंत तिला वेढा दिलेलाच होता. आता त्यांनी म्लेंच्छांच्या सेनेचा संहार केला आणि त्यांचे सर्व धन ते द्वारकेला घेऊन गेले. (५)
नीयमाने धने गोभिः नृभिश्चाच्युतचोदितैः ।
आजगाम जरासन्धः त्रयोविंशत्यनीकपः ॥ ६ ॥
माणसे धन ते नेता बैलांच्या वरि लादुनी । अठ्राव्या वेळि तो आला मागधो सैन्य घेउनी ॥ ६ ॥
अच्युतचोदितैः नृभिः गोभिः च - श्रीकृष्णाने आज्ञा दिलेल्या मनुष्यांकडून व बैलांकडून - धने नीयमाने - द्रव्य नेले जात असता - त्रयोविंशत्यनीकपः जरासंधः - तेवीस अक्षौहिणी सैन्यांचा अधिपति बनलेला जरासंध - तत्र आजगाम - तेथे आला ॥६॥
जेव्हा श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार माणसांवर आणि बैलावर लादून ते धन नेले जाऊ लागले, त्यावेळी मगधराज जरासंध पुन्हा तेवीस अक्षौहिणी सेना घेऊन आला. (६)
विलोक्य वेगरभसं रिपुसैन्यस्य माधवौ ।
मनुष्यचेष्टामापन्नौ राजन् दुद्रुवतुर्द्रुतम् ॥ ७ ॥
शत्रूंचा पाहुनी वेग स्फूर्तीने कृष्णराम ते । माणसा परि भीवोनी लागले ते पळावया ॥ ७ ॥
राजन् - हे परीक्षित राजा - मनुष्यचेष्टाम् आपन्नौ माधवौ - मनुष्याप्रमाणे लीला करणारे बलराम व श्रीकृष्ण - रिपुसैन्यस्य वेगरभसं विलोक्य - शत्रुसैन्याच्या वेगाचे सामर्थ्य पाहून - द्रुतं दुद्रुवतुः - लवकर पळून जाते झाले ॥७॥
परीक्षिता ! शत्रुसेनेचा प्रचंड वेग पाहून राम-कृष्ण मनुष्यांसारखे त्यांच्या समोरून वेगाने पळू लागले. (७)
विहाय वित्तं प्रचुरं अभीतौ भीरुभीतवत् ।
पद्भ्यां पलाशाभ्यां चेलतुर्बहुयोजनम् ॥ ८ ॥
टाकिले द्रव्य ते सारे पायांनी धावले पहा । नव्हती मुळि ती भीती परी नाट्य रचीयले ॥ ८ ॥
अभीतौ (तौ) - वस्तुतः न भ्यालेले असे बलराम व कृष्ण - प्रचुरं वित्तं विहाय - पुष्कळसे द्रव्य तेथेच टाकून - भीरुभीतवत् - घाबरटासारखे भ्याल्याप्रमाणे दाखवून - पद्मपलाशाभ्यां पद्भ्यां - कमलपत्राप्रमाणे कोमल अशा पायांनी - बहुयोजनं चेलतुः - कित्येक योजने चालून गेले ॥८॥
निर्भय असून सुद्धा जणू काही फार भ्यालो आहोत, असे भासवीत ते दोघे सगळे धन तेथेच सोडून पुष्कळ अंतरपर्यंत कमलदलाप्रमाणे कोमल पायांनीच पळू लागले. (८)
पलायमानौ तौ दृष्ट्वा मागधः प्रहसन् बली ।
अन्वधावद् रथानीकैः ईशयोरप्रमाणवित् ॥ ९ ॥
मागधे पाहिले बंधू पळती राम कृष्ण हे । धावला रथ घेवोनी प्रभाव नच जाणता ॥ ९ ॥
बली मागधः - बलवान असा जरासंध - तौ पलायमानौ दृष्ट्वा - बलराम व श्रीकृष्ण हे पळत आहेत असे पाहून - प्रहसन् - हास्य करीत - ईशयोः अप्रमाणवित् - बलराम व श्रीकृष्ण यांचे सामर्थ्य न जाणणारा - रथानीकैः अन्वधावत् - रथ व सैन्य यांसह पाठलाग करिता झाला ॥९॥
महाबली मगधराज ते पळून जात आहेत, असे पाहून मोठ्याने हसू लागला आणि आपल्या रथदळाने वेगाने त्यांचा पाठलाग करू लागला. कारण ईश्वररूप त्यांचा प्रभाव व भाव त्याला ज्ञात नव्हता. (९)
विवरण :- भगवंतानी एका दगडात दोन पक्षी मारले. कालयवनाचा वध मुचकुंदाकडून करविला आणि मुचकुंदाला मुक्ती दिली. (हे सर्व धवलपुरानजिक घडले.) स्वतः मथुरेला परत आल्यानंतर कालयवनाच्या सैन्याची लूट केली आणि ती द्वारकेकडे पाठविली. तशी ती लूट द्वारकेकडे पाठविण्याचे कारण काय असावे ? त्याचवेळी जरासंध तिकडे येत होता. तेव्हा द्वारकेकडे जाणारी लूट स्वतः लुटण्याचा प्रयत्न तो निश्चितच करेल आणि त्यामध्ये व्यस्त राहिल्यावर आपणांस पलायन करणे सोपे होईल असा श्रीकृष्णाचा हेतू असावा. (८-९)
प्रद्रुत्य दूरं संश्रान्तौ तुङ्गमारुहतां गिरिम् ।
प्रवर्षणाख्यं भगवान् नित्यदा यत्र वर्षति ॥ १० ॥
थकले म्हणुनी गेले त्या प्रवर्षण पर्वती । पडे नित्य तिथे वर्षा म्हणोनी हा प्रवर्षण ॥ १० ॥
दूरं प्रद्रुत्य संश्रान्तौ - दूरपर्यंत धावून थकलेले ते बलराम व श्रीकृष्ण - भगवान् यत्र नित्यदा वर्षति - इंद्र जेथे नेहमी पाऊस पाडितो - (तं) प्रवर्षणाख्यं तुङ्गं गिरिम् आरुहतां - त्या प्रवर्षण नावाच्या उंच पर्वतावर चढले ॥१०॥
पुष्कळ लांबपर्यंत पळण्यामुळे थकले आणि अतिश्य उंच अशा प्रवर्षण पर्वतावर चढले. तेथे नेहमीच मेघ पाऊस पाडीत असतात. (१०)
गिरौ निलीनावाज्ञाय नाधिगम्य पदं नृप ।
ददाह गिरिमेधोभिः समन्ताद् अग्निमुत्सृजन् ॥ ११ ॥
जरासंध बघे की हे लपले बंधु पर्वती । धुंडिता दिसले ना ते पेटवी पर्वतास तो ॥ ११ ॥
नृप - हे राजा - (तौ) गिरौ निलीनौ आज्ञाय - ते दोघे पर्वतावर दिसत नाहीसे झाले असे जाणून - (तयोः) पदं न अधिगम्य - त्यांच्या पावलांच्या खुणाहि न दिसल्यामुळे - समन्तात् अग्निम् उत्सृजन् - पर्वताच्या सभोवार अग्नि लावून - एधोभिः गिरिं ददाह - काष्ठाच्या योगे पर्वताला जाळिता झाला. ॥११॥
परीक्षिता ! लपून राहिलेल्या त्यांचा ठावठिकाणा समजाला नाही, तेव्हा जरासंधाने इंधनाने भरलेल्या प्रवर्षण पर्वताला चारी बाजूंनी पेटवून दिले. (११)
तत उत्पत्य तरसा दह्यमानतटादुभौ ।
दशैकयोजनात्तुङ्गान् निपेततुरधो भुवि ॥ १२ ॥
शिखरे पेटली तेंव्हा द्वादशो योजने असे । बंधू उतरले खाली सेना ओलांडुनी तशी ॥ १२ ॥
उभौ - ते दोघे बलराम व श्रीकृष्ण - दशैकयोजनोत्तुंगात् - चव्वेचाळीस कोस उंच अशा - ततः दह्यमानतटात् - त्या पर्वताच्या जळणार्या कडयावरून - तरसा उत्पत्य - एकाएकी वेगाने उडी मारून - अधः भुवि निपेततुः - खाली जमिनीवर उतरले. ॥१२॥
तेव्हा दोन्ही भावांनी अतिशय वेगाने त्या चव्वेचाळीस कोस उंच पर्वताच्या जळत्या कड्यावरून एकदम खाली जमिनीवर उडी टाकली. (१२)
अलक्ष्यमाणौ रिपुणा सानुगेन यदूत्तमौ ।
स्वपुरं पुनरायातौ समुद्रपरिखां नृप ॥ १३ ॥
दिसले नच ते कोणा नृपालाही तसेच त्या । पुन्हा ते पातले दोघे सुखाने द्वारकापुरी ॥ १३ ॥
नृप - हे राजा - सानुगेन रिपुणा अलक्ष्यमाणौ - अनुचरांसह शत्रूने न पाहिलेले - यदूत्तमौ - बलराम व श्रीकृष्ण - समुद्रपरिखां स्वपुरं - जिच्या सभोवार समुद्र हाच खंदक आहे अशा द्वारका नगरीला - पुनः आयातौ - पुनः आले. ॥१३॥
राजन ! जरासंधाला किंवा त्याच्या कोणत्याही सैनिकाला न दिसता ते दोघे यदुश्रेष्ठ तेथून निघून समुद्राने वेढलेल्या आपल्या द्वारकापुरीला परतले. (१३)
विवरण :- जरासंध तेवीस अक्षौहिणी सैन्य घेऊन आल्यानंतर रामकृष्ण द्वारकेकडे निघाले आणि वाटेत प्रवर्षण पर्वतावर शिखरावर चढले. ते पाहून जरासंधाने अनेक राजांच्या मदतीने गोमंत पर्वतास वेढा घातला. त्या दोघांचा शोध लागला नाही, म्हणून संपूर्ण पर्वतास आग लावली. त्या आगीत ते दोघे जळून भस्म झाले. अशी आपली 'खोटी समजूत' करून घेतली. (मृषा मन्वानः) तसे त्याला वाटण्यास आणखीही एक कारण होते, चहू बाजूंनी बलशाली राजांच्या असलेल्या वेढयातून त्या दोघांना निसटून जाणे अशक्य होते. त्यामुळे आगीत जळून गेले असावेत असा ग्रह होणे शक्य; शिवाय त्याने त्यानंतर फारशी चिकित्सा केली नाही, कारण सतत सतरा वेळा स्वारी करून त्याची शक्ती नक्कीच क्षीण झाली असणार. तो तनाने, मनाने खचला असणार. शिवाय त्यांची (रामकृष्णांची) दग्ध शरीरे जरी त्यास मिळाली नसली, तरी ती पूर्ण जळून भस्म झाली असावी, असे त्यास वाटणे शक्य आहे. तेव्हा आता पुरे हा स्वारीचा हटट ! (असेहि त्यास वाटणे साहजिक आहे) निदान अठराव्या वेळी तरी जिंकलो ना ? (मग ज्याचा शेवट गोड ते सारेच गोड) अशी आपल्या मनाची समजूत करून जरासंध खुशीत राहिला, मगधास परत गेला. अर्थात त्यानंतर त्याने पुन्हा स्वारी केली नाही, हे उघडच आहे. (१३)
सोऽपि दग्धाविति मृषा मन्वानो बलकेशवौ ।
बलमाकृष्य सुमहन् मगधान् मागधो ययौ ॥ १४ ॥
कृष्ण नी बलरामो हे जळाले मानिता मनीं । पातला आपुल्या देशा मोठे ते सैन्य घेउनी ॥ १४ ॥
बलकेशवौ दग्धौ - बलराम व श्रीकृष्ण जळून गेले - इति मृषा मन्वानः स मागधः अपि - असे खोटेच मानणारा तो जरासंधहि - सुमहत् बलम् आकृष्य - मोठे सैन्य परत फिरवून - मगधान् ययौ - आपल्या मगध देशाला परत जाता झाला. ॥१४॥
जरासंधाला उगीचच वाटले की राम कृष्ण जळून गेले आणि मग तो आपली प्रचंड सेना माघारी फिरवून मगधदेशाकडे आला. (१४)
आनर्ताधिपतिः श्रीमान् रैवतो रैवतीं सुताम् ।
ब्रह्मणा चोदितः प्रादाद् बलायेति पुरोदितम् ॥ १५ ॥
वदलो नवव्या स्कंधी आनर्त देशिचा नृप । रैवते रेवती कन्या बलरामा दिली असे ॥ १५ ॥
आनर्ताधिपतिः श्रीमान् रैवतः - आनर्त देशाचा राजा रैवत - ब्रह्मणा चोदितः - ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून - रेवतीं सुतां - रेवती नावाच्या कन्येला - बलाय प्रादात् - बलरामाला देता झाला - इति पुरा उदितम् - असे पूर्वी सांगितले. ॥१५॥
हे मी तुला अगोदरच सांगितले आहे की, आनर्त देशाचा राजा श्रीमान रैवत याने आपल्या रेवती नावाच्या कन्येचा विवाह ब्रह्मदेवांच्या प्रेरणेने बलरामांशी लावून दिला होता. (१५)
विवरण :- क्षणमात्र - ईश्वराची आणि मानवाची कालगणना यात (काळाचा कितीतरी) फरक असतो, हे पुन्हा इथे दिसून येते. मुचकुंद स्वर्गात देवांचे रक्षण करीत असता इकडे पृथ्वीवर कितीतरी काळ मागे पडला होता. त्याचे राज्य, सर्व परिवार काल-कवलित झाला होता. (हा काल स्वर्गात अल्प आणि पृथ्वीवर फार मोठा होता.) मुचकुंद स्वर्गातून पुन्हा पृथ्वीवर येऊन गुहेत निद्राधीन झाला, त्यानंतर पुन्हा गुहेबाहेर आल्यानंतर कलियुगाचा प्रारंभ झाला होता. तीच गोष्ट इथे दिसून येते. रैवत राजा आपल्या मुलीच्या विवाहासंबंधी विचारावयास गेला असता त्याला माहीत असलेले राजपुत्र केव्हाच कालवश झाले होते. (ब्रह्मदेवाच्या भेटण्याच्या कालावधीपर्यंत बराच काळ लोटला होता.) (एखादा क्षण म्हणजे कित्येक युगे असे म्हटले जाते.) त्यामुळे आता पृथ्वीवर असलेल्या राजपुत्रांशीच विवाह करण्याचा सल्ला ब्रह्मदेवाने राजास दिला.) ब्रह्मदेवाच्या सल्ल्याप्रमाणे रैवताची कन्या रेवतीचा विवाह बलरामाशी झाला. ती कृतयुगातील असल्याने बलरामापेक्षा खूपच उंच होती. (रेवती एकवीस हात आणि बलराम सात हात उंच होता असे म्हटले जाते.) शिवाय वरापेक्षा वधू उंच असणे, आणि तीही एवढया प्रमाणात योग्य वाटत नाही. (एकवेळ वर अधिक उंच असला तरी चालते, तशी अनेक उदाहरणेहि दिसून येतात) उंचीतील हे अंतर दूर करण्यासाठी बलरामाने आपल्या हलाच्या सहाय्याने तिचे खांदे ओढून घेतले आणि तिची उंची सात हात केली. इथे एक गमतीचा विरोध दिसतो, कृष्णाने कुब्जेची हनुवटी धरून तिला उंच केले तर बलरामाने रेवतीला गिडडे केले. (१५)
भगवानपि गोविन्द उपयेमे कुरूद्वह ।
वैदर्भीं भीष्मकसुतां श्रियो मात्रां स्वयंवरे ॥ १६ ॥ प्रमथ्य तरसा राज्ञः शाल्वादीन् चैद्यपक्षगान् । पश्यतां सर्वलोकानां तार्क्ष्यपुत्रः सुधामिव ॥ १७ ॥
स्वयंवरात गोविंदे शिशुपालादि शाल्वला । बळाने हारिले सर्व रुक्मिणी हरुनी तिशी ॥ १६ ॥ विवाह साजरा केला गरूड नेइ जै सुधा । रुक्मिणी भीमक ची ती स्वयं लक्ष्मीच जन्मली ॥ १७ ॥
कुरूद्वह - हे कुरूश्रेष्ठ परीक्षित राजा - भगवान् गोविन्दः अपि - भगवान श्रीकृष्णसुद्धा - श्रियः मात्रां - लक्ष्मीचाच अंश अशा - वैदर्भीं भीष्मकसुतां - विदर्भराजा जो भीष्मक त्याच्या कन्येला - स्वयंवरे उपयेमे - स्वयंवरामध्ये वरिता झाला. ॥१६॥ चैद्यपक्षगान् शाल्वादीन् राज्ञः तरसा प्रमथ्य - शिशुपालादि चेदि देशांतील लोकांच्या पक्षाला मिळालेल्या शाल्वादि राजांना वेगाने जिंकून - सर्वलोकानां पश्यताम् - सर्व लोकांच्या समक्ष - तार्क्ष्यपुत्रः सुधाम् इव - गरूड जसा अमृताला त्याप्रमाणे. ॥१७॥
परिक्षिता ! भगवान श्रीकृष्णांनीसुद्धा स्वयंवरासाठी आलेल्या शिशुपाल आणि त्याचे पक्षपाती असलेल्या शाल्व इत्यादी राजांना मोठ्या शौर्याने हरवून सगळ्यांचा देखत गरूडाने अमृत हरण केले त्याप्रमाणे विदर्भ देशाच्या राजकुमारी रुक्मिणीचे हरण केले आणि तिच्याशी विवाह केला. लक्ष्मीचा अवतार असलेली रुक्मिणी राजा भीष्मकाची कन्या होती. (१६-१७)
श्रीराजोवाच
भगवान् भीष्मकसुतां रुक्मिणीं रुचिराननाम् । राक्षसेन विधानेन उपयेम इति श्रुतम् ॥ १८ ॥
राजा परीक्षिताने विचारले - भगवन् ! ऐकिले आम्ही भीष्मक्नंदिनी रुक्मिणी । बळाने आणिली कृष्णे राक्षसी लग्न लाविले ॥ १८ ॥
भगवान् - श्रीकृष्ण - रुचिराननां भीष्मकसुतां रुक्मिणीं - सुंदर मुखाच्या भीष्मककन्या रुक्मिणीला - राक्षसेन विधानेन उपयेमे - राक्षसविधीने वरिता झाला - इति श्रुतम् - असे आम्ही ऐकिले आहे. ॥१८॥
परीक्षिताने विचारले - मुनिवर्य ! आम्ही ऐकले आहे की, भगवान श्रीकृष्णांनी, भीष्मकनंदिनी सुंदरी रुक्मिणीदेवीशी राक्षसविधीने विवाह केला होता. (१८)
भगवन् श्रोतुमिच्छामि कृष्णस्यामिततेजसः ।
यथा मागधशाल्वादीन् जित्वा कन्यामुपाहरत् ॥ १९ ॥
कृष्णाने शाल्वलादींना जिंकिले कवण्या परी । तेजस्वी भगवान् कृष्णे रुक्मिणी हरिली कशी ॥ १९ ॥
भगवन् - हे शुकाचार्य - यथा मागधशाल्वादीन् जित्वा - ज्या रीतीने जरासंध व शाल्व इत्यादि राजांना जिंकून - कन्याम् उपाहरत् - भीष्मकाच्या कन्येचे हरण करिता झाला - (तत्) अमिततेजसः कृष्णस्य (चरित्रं) - ते अत्यंत पराक्रम करणार्या श्रीकृष्णाचे चरित्र - श्रोतुम् इच्छामि - ऐकण्याची मला इच्छा आहे. ॥१९॥
आता मी हे सविस्तर ऐकू इच्छितो की, परम तेजस्वी भगवान श्रीकृष्णांनी जरासंध, शाल्व इत्यादी राजांना जिंकून कोणत्या प्रकारे रुक्मिणीचे हरण केले ? (१९)
ब्रह्मन् कृष्णकथाः पुण्या माध्वीर्लोकमलापहाः ।
को नु तृप्येत श्रृण्वानः श्रुतज्ञो नित्यनूतनाः ॥ २० ॥
पुण्यदा कृष्णलीला त्या धुती विश्वाचिया मळा । ऐकता वाटती नित्य नवीन कोण त्या त्यजी ॥ २० ॥
ब्रह्मन् - हे शुकाचार्य - पुण्याः माध्वीः - पुण्यकारक व मधुर - लोकामलापहाः नित्यनूतनाः कृष्णकथाः - लोकांचे पाप नाहीसे करणार्या व नित्य नवीन वाटणार्या श्रीकृष्णाच्या कथा - शृण्वानः श्रुतज्ञः कः - ऐकणारा कोणता ज्ञानी पुरुष - न तृप्येत - तृप्त होईल बरे ॥२०॥
हे ब्रह्मर्षे ! कोणता रसिक भक्त, पवित्र, मधुर, पापनाशक व नित्य नवीन वाटणार्या श्रीकृष्णकथा ऐकून तृप्त होईल ? (२०)
श्रीबादरायणिरुवाच -
राजाऽऽसीद् भीष्मको नाम विदर्भाधिपतिर्महान् । तस्य पञ्चाभवन् पुत्राः कन्यैका च वरानना ॥ २१ ॥
श्रीशुकदेव सांगतात - भीष्मक ते विदर्भाचे राजे हो श्री परीक्षिता । पाचपुत्र तशी एक मुलगी रूपवान् तयां ॥ २१ ॥
विदर्भाधिपतिः - विदर्भ देशावर राज्य करणारा - महान् भीष्मकः नाम राजा आसीत् - मोठा भीष्मक नावाचा राजा होता - तस्य एका वरानना कन्या - त्याला एक सुंदर मुलगी - पञ्च पुत्राः च अभवन् - आणि पाच मुलगे झाले. ॥२१॥
श्रीशुक म्हणतात - महाराज भीष्मक विदर्भ देशाचा अधिपती होता. त्याला पाच पुत्र आणि एक सुंदर कन्या होती. (२१)
रुक्म्यग्रजो रुक्मरथो रुक्मबाहुरनन्तरः ।
रुक्मकेशो रुक्ममाली रुक्मिण्येषा स्वसा सती ॥ २२ ॥
रुक्मी थोर रुक्मिरथो रुक्मिबाहू तसाच तो । रुक्मेश रुक्ममाली नी रुक्मिणी भगिनी सती ॥ २२ ॥
अग्रजः रुक्मी अनन्तरः रुक्मरथः रुक्मबाहुः - त्यात वडील पुत्र रुक्मी व त्याच्या खालचे रुक्मरथ व रुक्मबाहु - रुक्मकेशः रुक्ममाली च - रुक्मकेश व रुक्ममाली - एषां स्वसा सती रुक्मिणी - ह्या सर्वांची बहीण अशी साध्वी रुक्मिणी. ॥२२॥
थोरल्या पुत्राचे नाव रुक्मी होते. आणि धाकट्यांची नावे क्रमशः रुक्मरथ, रुक्मबाहू, रुक्मकेश आणि रुक्ममाली अशी होती. सुशील रुक्मीणी यांची बहीण होती. (२२)
सोपश्रुत्य मुकुन्दस्य रूपवीर्यगुणश्रियः ।
गृहागतैर्गीयमानान् तं मेने सदृशं पतिम् ॥ २३ ॥
भगवान् कृष्णसौंदर्य गुण वैभव वीरता । एकता रुक्मिणी इच्छी पती तो योग्य आपणा ॥ २३ ॥
सा - ती रुक्मिणी - गृहागतैः गीयमानाः - घरी आलेल्या सत्पुरुषांनी गायिलेले - मुकुन्दस्य रूपवीर्यगुणश्रियः - श्रीकृष्णाचे स्वरूप, पराक्रम, गुण व ऐश्वर्य - उपश्रुत्य - श्रवण करून - तं सदृशं पतिं मेने - त्याला योग्य पति असे मानिती झाली. ॥२३॥
रुक्मिणीने राजवाड्यात येणार्या अतिथींच्या तोंडून भगवान श्रीकृष्णांचे सौंदर्य, पराक्रम, गुण आणि वैभवाबद्दल प्रशंसा ऐकली, तेव्हा तिने निश्चय केला की, भगवान श्रीकृष्णच आपल्याला अनुरूप पती आहेत. (२३)
तां बुद्धिलक्षणौदार्य रूपशीलगुणाश्रयाम् ।
कृष्णश्च सदृशीं भार्यां समुद्वोढुं मनो दधे ॥ २४ ॥
भगवान् कृष्णही जाणी तिचे रूप नि लक्षणे । म्हणोनी ठरवी चित्ती पत्नी ती आपणा बरी ॥ २४ ॥
कृष्णः च - कृष्णसुद्धा - बुद्धिलक्षणौदार्यरूपशीलगुणश्रियाम् - तरतरीत बुद्धि, उत्तम लक्षणे, औदार्य, सौंदर्य, उत्तम आचरण व गुण यांचे स्थान अशा - तां सदृशीं भार्यां समुद्वोढुं - त्या योग्य स्त्रीला वरण्याचे - मनः दधे - मनांत आणिता झाला. ॥२४॥
श्रीकृष्णांनीसुद्धा बुद्धी, लक्षणे, उदारता, सौंदर्य, शील आणि इतरही गुणांमध्ये अद्वितीय अशीच रुक्मीणी आहे, हे जाणून स्वतःला अनुरूप अशा तिच्याशी विवाह करण्याचा निश्चय केला. (२४)
बन्धूनामिच्छतां दातुं कृष्णाय भगिनीं नृप ।
ततो निवार्य कृष्णद् विड् रुक्मी चैद्यममन्यत ॥ २५ ॥
चारीही इच्छिती बंधू कृष्ण हा योग्य मेहुणा । परी रुक्मी करी द्वेष शिशुपालास इच्छि जो ॥ २५ ॥
नृप - हे परीक्षित राजा - ततः - नंतर - कृष्णद्विट् रुक्मी - श्रीकृष्णाचा द्वेष करणारा रुक्मी - कृष्णाय भगिनीं दातुं इच्छतां बंधूनां - श्रीकृष्णाला बहीण देण्याविषयी इच्छिणार्या बंधूंना - निवार्य - अडथळा करून - चैद्यम् अमन्यत - शिशुपालाला मानिता झाला. ॥२५॥
आपल्या बहिणीचा विवाह श्रीकृष्णांशीच व्हावा, असेच रुक्मिणीच्या बांधवांनासुद्धा वाटत होते. परंतु रुक्मी श्रीकृष्णांचा द्वेष करीत असे. त्याने त्यांना विरोध करून शिशुपाल हाच आपल्या बहिणीसाठी योग्य वर ठरवला. (२५)
तदवेत्यासितापाङ्गी वैदर्भी दुर्मना भृशम् ।
विचिन्त्याप्तं द्विजं कञ्चित् कृष्णाय प्राहिणोद् द्रुतम् ॥ २६ ॥
बंधूचा रोध ऐकोनी रुक्मिणी दुःखि जाहली । त्वरीत द्विज विश्वासू तिने कृष्णासि धाडिला ॥ २६ ॥
तत् - ते - अवेत्य - जाणून - असितापाङगी वैदर्भी - कृष्णवर्णाचे कटाक्ष असणारी रुक्मिणी - भृशं दुर्मनाः (भूत्वा) - अत्यंत खिन्न होऊन - कंचित् द्विजं आप्तं विचिन्त्य - कोणा एका ब्राह्मणाला विश्वासू समजून - कृष्णाय द्रुतं प्राहिणोत् - कृष्णाकडे लवकर पाठविती झाली. ॥२६॥
सुंदरी रुक्मिणील जेव्हा हे समजले, तेव्हा ती अतिशय उदास झाली. विचारांती तिने एका विश्वासपात्र ब्रह्मणाला श्रीकृष्णांकडे ताबडतोब पाठविले. (२६)
द्वारकां स समभ्येत्य प्रतीहारैः प्रवेशितः ।
अपश्यदाद्यं पुरुषं आसीनं काञ्चनासने ॥ २७ ॥
द्विज येता महाद्वारी द्वापालेचि पोचिले । पाहिले द्विजदेवाने कृष्णा कांचन आसनी ॥ २७ ॥
सः - तो ब्राह्मण - द्वारकां - द्वारकेस - प्रतीहारैःप्रवेशितः - द्वारपालांनी आत नेलेला - काञ्चनासने आसीनं - सुवर्णाच्या आसनावर बसलेल्या - आद्यं पुरुषं - पुराणपुरुष अशा श्रीकृष्णाला - अपश्यत् - पहाता झाला. ॥२७॥
जेव्हा तो ब्राह्मण द्वारकापुरीत पोहोचला, तेव्हा द्वारपाल त्याला राजमहालात घेऊन गेले. तेथे त्याने आदिपुरुष भगवान श्रीकृष्ण सोन्याच्या सिंहासनावर विराजमान झाले आहेत असे पाहिले. (२७)
दृष्ट्वा ब्रह्मण्यदेवः तमवरुह्य निजासनात् ।
उपवेश्यार्हयां चक्रे यथाऽऽत्मानं दिवौकसः ॥ २८ ॥
द्वजभक्त असा कृष्ण उठला पूजिले द्विजा । जशा त्या देवता त्याची आदरे करिती पुजा ॥ २८ ॥
ब्रह्मण्यदेवः - ब्राह्मणांचे कल्याण करणारा श्रीकृष्ण - तं दृष्ट्वा - त्या ब्राह्मणाला पाहून - निजासनात् अवरुह्य - आपल्या आसनावरून खाली उतरून - (तं) उपवेश्य - त्याला आसनावर बसवून - यथा दिवौकसः आत्मानं - जसे देव स्वतःला पूजितात त्याप्रमाणे - (तं द्विजं) अर्हयांचक्रे - त्या ब्राह्मणांची पूजा करिता झाला. ॥२८॥
त्याला पाहताच ब्राह्मणांचे परम भक्त भगवान श्रीकृष्ण आपल्या आसनावरून खाली उतरले आणि त्याला आसनावर बसवून जसे देव भगवंतांची पूजा करतात, तशीच त्यांनी त्याची पूजा केली. (२८)
तं भुक्तवन्तं विश्रान्तं उपगम्य सतां गतिः ।
पाणिनाभिमृशन् पादौ अव्यग्रस्तमपृच्छत ॥ २९ ॥
सत्कार भोजने होता जावोनी कृष्ण त्याजला । चेपिता पाय तो बोले वचने नम्र शांत ते ॥ २९ ॥
सतां गतिः - साधूंचा आश्रय असा श्रीकृष्ण - भुक्तवन्तं विधान्तं तम् उपागम्य - भोजन करून विश्रान्ति घेतलेल्या त्याच्याजवळ जाऊन - पाणिना पादौ अभिमृशन् - हाताने पायांना स्पर्श करून - अव्यग्रः - स्वस्थपणाने - तम् अपृच्छत - त्याला विचारिता झाला. ॥२९॥
ब्राह्मणाचे भोजन व विश्रांती झाल्यावर संतांचे आश्रयस्थान असणारे भगवान त्याच्याजवळ गेले आणि आपल्या हातांनी त्याचे पाय चेपीत अत्यंत शांतपणे विचारू लागले. (२९)
कच्चिद् द्विजवरश्रेष्ठ धर्मस्ते वृद्धसम्मतः ।
वर्तते नातिकृच्छ्रेण सन्तुष्टमनसः सदा ॥ ३० ॥
द्विजवरा सुखी हो ना धर्म स्वीकृत पूर्वजे । पाळण्या न कुठे बाधा संतुष्ट मनि होत ना ? ॥ ३० ॥
द्विजवरश्रेष्ठ - हे श्रेष्ठ ब्राह्मणा - सदा संतुष्टमनसः ते - नित्य संतुष्ट अन्तःकरणाच्या तुझा - वृद्धसंमतः धर्मः - वृद्धांना मान्य असा धर्म - अतिकृच्छ्रेण न वर्तते कच्चित् - मोठया कष्टात सापडलेला नाही ना ॥३०॥
श्रीकृष्ण म्हणाले - " हे थोर ब्राह्मणा ! आपले चित्त नेहमी संतुष्ट असते ना ? आपल्या पूर्वजांपासून चालत आलेल्या धर्माचे पालन करण्यात आपल्याला काही अडचण तर येत नाही ना ? (३०)
विवरण :- रुक्मिणीचा संदेश घेऊन आलेल्या ब्राह्मण अतिथीशी श्रीकृष्णाचे वर्तन अत्यंत नम्र, सुसंस्कृत आणि अतिथीधर्माचे योग्य तर्हेने पालन करणारे दिसून येते. स्वतः राजा असूनहि त्याला दरबारात (उठून) उत्थापन देणे, त्याचे पाय दाबून देणे, शिवाय पाहिल्याबरोबरच त्याच्यावर आगमनाबाबतच्या हेतूबद्दल प्रश्नांचा भडिमार न करणे या सर्वांमधून त्याचा परिपक्व सुसंस्कृतपणाच दिसून येतो. शिवाय स्वागत केल्यानंतर ब्राह्मणाला त्याने विचारलेल्या प्रश्नातून त्याचे शिष्टाचार पालन दिसून येते. कारण ब्राह्मणाला प्रथम त्याचे, त्याच्या गुरूचे अध्ययन, अध्यापन, धर्माचरण इ.बद्दलचे प्रश्न विचारून नंतर त्याचे वैयक्तिक कुशल आणि मग आगमन हेतू विचारला जातो. हे सर्वच कृष्णाने यथायोग्य रीतीने पालन केलेले दिसते. 'संतोषः एव ब्राह्मणस्य परमो धर्मः ।' ब्राह्मणाच्या बाबतीत असे म्हटले जाते. पण हा संतोष म्हणजे काय ? उत्तम अन्न-वस्त्र-निवारा नव्हे, ऐहिक संपन्नता नव्हे तर वर्णाश्रमधर्मांचे यथायोग्य पालन करण्याइतपत स्वास्थ्य मिळणे; अध्ययन-अध्यापनाचे कार्य निर्वेधरीतीने चालणे; आणि हे प्राप्त झाले की, तो खरा संतुष्ट होतो. एकवेळ तो एकभुक्त राहिल, उपाशी राहिल पण विद्याध्ययन, धर्माचरण यापासून दूर रहाणार नाही. त्याला एवढे स्वास्थ्य मिळवून देण्याची नैतिक जबाबदारी राजाची असते. (ऋषिमुनी, ब्राह्मण यांच्या चरितार्थाची, रक्षणाची जबाबदारी राजाची असते. म्हणूनच कालिदासाचा दुष्यंत राजा 'शाकुंतल' नाटकामध्ये म्हणतो, 'राजरक्षितव्यानि तपोवनानि नाम ।') आणि अशा वृत्तीचे ब्राह्मण ज्या राज्यात असतात, तो राजाहि संतुष्ट राहू शकतो. (३०)
सन्तुष्टो यर्हि वर्तेत ब्राह्मणो येन केनचित् ।
अहीयमानः स्वाद्धर्मात् स ह्यस्याखिलकामधुक् ॥ ३१ ॥
द्विजाने मिळते त्यात संतोष मानणे तसा । निष्ठेने पाळिता धर्म कामना पूर्ण होत त्या ॥ ३१ ॥
यर्हि - जर - स्वात् धर्मात् अहीयमानः - आपल्या धर्मापासून भ्रष्ट न होणारा - ब्राह्मणः - ब्राह्मण - येनकेनचित् संतुष्टः वर्तेत - जे काही मिळेल त्याने संतुष्ट असेल - तर्हि - तर - सः हि - तो धर्म खरोखर - अस्य अखिलकामधुक् (भवति) - त्याच्या इच्छा पूर्ण करणारा होतो. ॥३१॥
जे काही मिळेल त्यातच जर ब्राह्मण संतुष्ट राहिला आणि आपल्या धर्मापासून तो च्युत झाला नाही, तर तो संतोषच त्याच्या सर्व कामना पूर्ण करतो. (३१)
असन्तुष्टोऽसकृल्लोकान् आप्नोत्यपि सुरेश्वरः ।
अकिञ्चनोऽपि सन्तुष्टः शेते सर्वाङ्गविज्वरः ॥ ३२ ॥
इंद्रपद मिळोनीया संतोष नसता मनीं । लागते भटकावे नी संतोषी झोपतो सुखे ॥ ३२ ॥
सुरेश्वरः अपि - देवेंद्र सुद्धा - असंतुष्टः - संतुष्ट न झाल्यामुळे - असकृत् - वारंवार - लोकान् आप्नोति - लोकांना प्राप्त होतो - अकिंचनः अपि - दरिद्री सुद्धा - संतुष्टः - संतुष्ट होऊन - सर्वाङगविज्वरः शेते - सर्व दुःखापासून मुक्त होऊन स्वस्थ झोपतो. ॥३२॥
असंतुष्ट मनुष्य देवांचा राजा झाला तरी त्याला सुखासाठी एका लोकातून दुसर्या लोकात वारंवार भटकावे लागेल. परंतु संतुष्ट मनुष्य काहीही नसले तरी सर्व प्रकारच्या तापांपासून मुक्त होऊन सुखाने झोप घेऊ शकतो. (३२)
विप्रान् स्वलाभसन्तुष्टान् साधून् भूतसुहृत्तमान् ।
निरहङ्कारिणः शान्तान् नमस्ये शिरसासकृत् ॥ ३३ ॥
संतोषे मिळले घेता शांती हीत मिळे तया । अशा त्या द्विजदेवाला नमी मी शिर टेकुनी ॥ ३३ ॥
स्वलाभसंतुष्टान् - आपोआप जे मिळेल त्यावर संतुष्ट असणार्या - साधून् - सज्जन - भूतसुहृत्तमान् - प्राण्यांवर पित्याप्रमाणे प्रेम करणार्या - निरहंकारिणः - अहंकाररहित अशा - शान्तान् - शांत - विप्रान् - ब्राह्मणांना - शिरसा असकृत् नमस्ये - मस्तकाने मी वारंवार नमस्कार करीन. ॥३३॥
सहजपणे प्राप्त झालेल्या वस्तूंमुळे जे संतुष्ट असतात, ज्यांचा स्वभाव संतांसारखा असतो आणि जे सर्व प्राण्यांचे परम हितैषी असतात, जे अहंकाररहित व शांत असतात, त्या ब्राह्मणांना मी सदैव मस्तक लववून नमस्कार करतो. (३३)
कच्चिद् वः कुशलं ब्रह्मन् राजतो यस्य हि प्रजाः ।
सुखं वसन्ति विषये पाल्यमानाः स मे प्रियः ॥ ३४ ॥
सुविधा आपणा राजा पोचितो का वदा मला । प्रजेला पोषिता युक्त दोघां आनंद लाभतो ॥ ३४ ॥
ब्राह्मण - हे ब्राह्मणा - वः कुशलं कच्चित् - तुमचे कुशल आहे ना - हि - कारण - राजतः यस्य विषये - राज्य करणार्या ज्या राजाच्या देशात - पाल्यमानाः प्रजाः - रक्षिलेल्या प्रजा - सुखं वसन्ति - सुखाने रहातात - सः मे प्रियः - तो राजा मला प्रिय आहे. ॥३४॥
हे ब्रह्मन ! राजाकडून आपल्याला सर्व प्रकारचे सुख मिळते ना ? ज्याच्या राज्यामध्ये प्रजेचे चांगल्या तर्हेने पालन होते आणि ती आनंदाने राहते, तो राजा मला प्रिय असतो. (३४)
यतस्त्वमागतो दुर्गं निस्तीर्येह यदिच्छया ।
सर्वं नो ब्रूह्यगुह्यं चेत् किं कार्यं करवाम ते ॥ ३५ ॥
कोठूनी पातले विप्रा कठीण मार्ग येथला । इच्छा काय असे सांगा सेवा काय करू तशी ॥ ३५ ॥
त्वं - तू - यतः - ज्या ठिकाणाहून - यदिच्छया - ज्याच्या इच्छेने - दुर्गं निस्तीर्य - समुद्र ओलांडून - इह आगतः - येथे आलास - अगुह्यं चेत् - गुप्त नसेल तर - सर्वं नः ब्रूहि - सर्व आम्हाला सांग - ते किं कार्यं करवाम - आम्ही तुझे काय काम करावे. ॥३५॥
हे ब्रह्मन ! आपण कोठून, कोणत्या हेतूने आणि कोणती इच्छा मनात धरून एवढा अवघड मार्ग आक्रमण करून येथे आला आहात ? जर काही विशेष गुपित नसेल, तर आम्हांला सांगा. आम्ही आपले कोणते काम करावे ? (३५)
एवं सम्पृष्टसम्प्रश्नो ब्राह्मणः परमेष्ठिना ।
लीलागृहीतदेहेन तस्मै सर्वमवर्णयत् ॥ ३६ ॥
मनुष्यरूपि तो कृष्ण द्विजदेवा विचारिता । तेंव्हा ते वदले सारे रुक्मिणींचा निरोपही ॥ ३६ ॥
लीलागृहीतदेहेन परमेष्ठिना - लीलेसाठी घेतला आहे अवतार ज्याने अशा परमेश्वराने - एवं संपृष्टसंप्रश्नः ब्राह्मणः - याप्रमाणे विचारिला आहे प्रश्न ज्याला असा ब्राह्मण - तस्मै सर्वं अवर्णयत् - त्या परमेश्वराला सर्व सांगता झाला. ॥३६॥
लीलेनेच मनुष्यरूप धारण करणार्या भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा ब्राह्मणाला असे विचारले, तेव्हा त्याने त्यांना रुक्मिणीच्या विवाहाविषयी सांगितले. (त्याने भगवंतांना रुक्मिणीने दिलेले सातश्लोकी पत्र दिले. नंतर श्रीकृष्णांच्या आज्ञेवरून तो ते वाचू लागला (३६)
श्रीरुक्मिण्युवाच -
( वसंततिलका ) श्रुत्वा गुणान् भुवनसुन्दर शृण्वतां ते निर्विश्य कर्णविवरैः हरतोऽङ्गतापम् रूपं दृशां दृशिमतां अखिलार्थलाभं त्वय्यच्युताविशति चित्तं अपत्रपं मे ॥ ३७ ॥
रुक्मिणीने सांगितले की - ( वसंततिलका ) ऐके गुणा भुवनसुंदर मी तुझ्या जै । ते कर्ण मार्गि शिरुनी विझतात ताप ॥ ते रूप नेत्रि बघता पुरुषार्थ होती । सोडोनि लाज सगळी तुज चित्त लागे ॥ ३७ ॥
भुवनसुंदर अच्युत - हे त्रैलोक्यसुंदरा श्रीकृष्णा - शृण्वतां - ऐकणार्यांच्या - कर्णविवरैः निर्विश्य - कर्णांच्या छिद्रातून आत शिरून - अंगतापं हरतः ते - शरीराच्या तापाला दूर करणार्या तुझे - गुणान् - गुण - (च) दृशिमतां दृशां अखिलार्थलाभं रूपं - व डोळसांच्या दृष्टींना सर्व अर्थांची प्राप्ति करून देणारे रूप - श्रुत्वा - ऐकून - मे चित्तं - माझे अन्तःकरण - अपत्रपं - निर्लज्जपणे - त्वयि आविशति - तुझ्या ठिकाणी प्रविष्ट होत आहे. ॥३७॥
रुक्मिणींनी म्हटले आहे - " हे त्रिभुवनसुंदरा ! ऐकणार्या कानांमार्फत आपले गुण ज्याच्या हृदयात प्रवेश करून त्याचा त्रिविध ताप दूर करतात, तसेच जे आपले रूप डोळे असणार्या जीवांच्या डोळ्यांना सर्व पुरुषार्थ प्राप्त करून देते, असे आपले गुण-सौंदर्य वर्णन ऐकून, हे अच्युता ! संकोच सोडून माझ्या चित्ताने आपल्या ठिकाणी प्रवेश केला आहे. (३७)
का त्वा मुकुन्द महती कुलशीलरूप
विद्यावयोद्रविणधामभिरात्मतुल्यम् धीरा पतिं कुलवती न वृणीत कन्या काले नृसिंह नरलोकमनोऽभिरामम् ॥ ३८ ॥
पाही मुकुंद नयनी अद्वितीय ऐसा । विद्या रुपी नि गुणशील कुले स्वभावे ॥ जीवा मिळेचि बघता रुप शांति थोर । ती कोण हो युवति जी वरि ना तुला की ॥ ३८ ॥
नृसिंह मुकुन्द - हे पुरुषश्रेष्ठा श्रीकृष्णा - का धीरा महती कुलवती कन्या - गंभीर व मोठया मनाची सत्कुलात उत्पन्न झालेली कोणती कन्या - कुलशीलरूपविद्यावयोद्रविणधामभिः - कुल, स्वभाव, स्वरूप, ज्ञान, वय, ऐश्वर्य व पराक्रम यांनी - आत्मतुल्यम् - स्वतःच्या बरोबरीच्या - नरलोकमनोभिरामम् - मनुष्यलोकांचे मनोरंजन करणार्या - त्वा - तुला - काले - योग्य काळी - पतिं न वृणीत - पति म्हणून वरणार नाही. ॥३८॥
हे मुकुंदा ! पुरुषोत्तमा ! कुल, शील, स्वभाव, सौंदर्य, विद्या, वय , द्रव्य अशा कोणत्याही बाबतीत अद्वितीय असलेल्या व सर्वांचे मन मोहविणार्या आपल्याला कोणती कुलवती आणि धैर्यशील अशी श्रेष्ठ कन्या विवाहकाली पती म्हणून वरणार नाही ? (३८)
तन्मे भवान् खलु वृतः पतिरङ्ग जायाम्
आत्मार्पितश्च भवतोऽत्र विभो विधेहि । मा वीरभागमभिमर्शतु चैद्य आराद् गोमायुवन्मृगपतेः बलिमम्बुजाक्ष ॥ ३९ ॥
तेणे मनात वरि मी मनि कृष्णदेवा । तू जाणशीच सगळे वरि पत्निरूपी ॥ मी देह हा शुरमणी तुज अर्पियेला । हा सिंहभाग मिळवी शिशुपाल कोल्हा ॥ ३९ ॥
अङग अम्बुजाक्ष विभो - हे कमलनेत्रा श्रीकृष्णा - तत् - म्हणून - मे भवान् पतिः वृतः खलु - माझ्याकडून तू पति म्हणून खरोखर वरिला गेला आहेस - आत्मा च अर्पितः - आणि आत्मा अर्पिला आहे - अत्र भवतः जायां विधेहि - ह्या ठिकाणी तू मला स्वतःची पत्नी कर - चैद्यः - शिशुपाल - मृगपतेः बलिं गोमायुवत् - सिंहाच्या वाटयाला जसा कोल्ह्याने स्पर्श करावा तसा - आरात् - दुरूनहि - वीरभागं मा अभिमर्शतु - वीरपुरुषाचा वाटा अशा मला स्पर्श न करो. ॥३९॥
म्हणून हे प्रभो ! आपल्याला पती म्हणून वरले नाही ? मी माझे सर्वस्व आपल्याला अर्पण केले आहे. आपण येथे येऊन माझा पत्नी म्हणून स्वीकार करा. हे कमलनयना ! आपल्यासारख्या वीराचा हा भाग, सिंहाचा वाटा कोल्ह्याने न्यावा, तसा शिशुपालाने येऊन पळवू नये. (३९)
विवरण :- विदर्भ राजकन्या रुक्मिणी आणि श्रीकृष्ण हे दोघे केवळ एकमेकांचे रूप-गुणवर्णन ऐकूनच (एकमेकांच्या) प्रेमात पडले होते. परंतु या विवाहास रुक्मीचा (रुक्मिणीचा भाऊ) विरोध होता. त्याने शिशुपालाशी तिचा विवाह ठरविला होता. तो रुक्मिणीस मान्य नव्हता. म्हणून ब्राह्मणाकरवी संदेश पाठवून तिने श्रीकृष्णाशी विवाह करण्याची आपली इच्छा व्यक्त केली होती. त्यात ती म्हणते, 'तुमचे रूपगुणवर्णन ऐकून माझे मन निर्लज्ज झाले अन तुमच्यावर मोहित झाले.' (अपत्रप) इथे वरवर पाहता 'निर्लज्ज' हा शब्द अयोग्य, कठोर वाटतो. स्त्री ही शालीनता, स्त्रीसुलभ लज्जा यांनी युक्त असल्याने एखाद्या पुरुषापुढे आपण होऊन विवाहाचा प्रस्ताव ठेवते आहे, हे कोणत्याहि काळात, अगदी आजच्या युगातही, काहीसे अयोग्य मानले जाते. 'धिक् तां याचते स्वयम्' (आपण होऊन विवाहाचा प्रस्ताव करते, तिचा धिक्कार असो) असे म्हटले जातेच. परंतु रुक्मिणी जर गप्प बसली असती, तर तिचा विवाह तिच्या मनाविरुद्ध शिशुपालाशी झाला असता, आणि ती कायमची दुःखी झाली असती. नंतर ती असाही युक्तिवाद करते की, 'मी कोणत्याही बाबतीत कमी नाही. रूप, गुण, सदाचरण, विद्याध्ययन या सर्वांनी परिपूर्ण आहेच; शिवाय जप-जाप्य, दान, व्रत-वैकल्ये, पूजा इ.मध्येही निष्णात आहे. त्यामुळे आपली अर्धांगिनी होण्यास मी योग्यच आहे.' तिच्या या विधानातून तिचे सर्व गुण-वैभव दिसून आले तरी तितकाच आत्मसन्मानहि जाणवून येतो. आपला हा संदेश आणखी परिणामकारी होण्यास ती सांगते की, 'सिंहाचा घास त्यानेच खावा, कोल्ह्याने नाही.' याचाच अर्थ रुक्मिणीला श्रीकृष्ण हाच वर योग्य आहे, शिशुपाल नाही. (तिने त्याला मनाने वरले आहेच) त्याच्यासाठी ती अनेक जन्म पुन्हा पुन्हा घेण्यास तयार आहे. (३७-३९)
पूर्तेष्टदत्तनियमव्रतदेवविप्र
गुर्वर्चनादिभिरलं भगवान् परेशः । आराधितो यदि गदाग्रज एत्य पाणिं गृह्णातु मे न दमघोषसुतादयोऽन्ये ॥ ४० ॥
दानादि कर्म नियमो व्रत पूजनो नी । सेवा द्विजा नि गुरुची हरिची करी मी ॥ हे सत्य हो तरि मला हरि, कृष्ण येता । ना स्पर्शिणेचि शिशुपाल तनूस माझ्या ॥ ४० ॥
यदि - जर - परेशः भगवान् - श्रीकृष्ण परमेश्वर - पूर्तेष्टदत्तनियमव्रतदेव विप्रगुर्वर्चनादिभिः - धर्मार्थ विहिरी खणणे, होमहवन करणे, दानधर्म करणे, नियमांचे व व्रताचे पालन करणे, देव, ब्राह्मण व गुरू ह्यांची पूजा करणे इत्यादि कर्मांनी - अलं आराधितः (चेत्) - चांगल्या रीतीने जर पूजिला असेल - (तर्हि) गदाग्रजः - तर श्रीकृष्ण - एत्य मे पाणिं गृह्णातु - येऊन माझे पाणिग्रहण करो - अन्ये दमघोषसुतादयः (पाणिं) न (गृह्णन्तु) - दुसरे शिशुपालादिक माझे पाणिग्रहण न करोत. ॥४०॥
मी जर यापूर्वी जन्मजन्मांतरी पूर्त ( विहिरी, तलाव इत्यादी खोदणे ), इष्ट ( यज्ञादि करणे ), दान, नियम, व्रते करून तसेच देव, ब्राह्मण आणि गुरू इत्यादींच्या पूजेने भगवान परमेश्वरांची पूर्णपणे आराधना केली असेल, तर भगवान श्रीकृष्णांनी येऊन माझे पाणिग्रहण करावे, शिशुपालादी इतरांनी नव्हे. (४०)
श्वो भाविनि त्वमजितोद्वहने विदर्भान्
गुप्तः समेत्य पृतनापतिभिः परीतः । निर्मथ्य चैद्यमगधेन्द्रबलं प्रसह्य मां राक्षसेन विधिनोद्वह वीर्यशुल्काम् ॥ ४१ ॥
माझ्या विवाह पहिल्या दिनि गुप्त यावे । मारोनि टाक सगळे शिशुपाल आदी ॥ सैन्यास मारुनि मला मग नेउनीया । त्या राक्षसीच विधिने वरिणे मला हो ॥ ४१ ॥
अजित - हे अजिंक्य श्रीकृष्णा - पृतनापतिभिः परीतः त्वं - सेनापतींनी वेष्टिलेला असा तू - श्वोभाविनि उद्वहने - उद्या होणार्या विवाहप्रसंगी - विदर्भान् गुप्तःसमेत्य - विदर्भ देशामध्ये गुप्तरीतीने येऊन - चैद्यमगधेन्द्रबलं निर्मथ्य - शिशुपालादि चैद्य राजे व जरासंधादि मागध राजे ह्यांच्या सैन्याचे मंथन करून - प्रसह्य - बलात्काराने - वीर्यशुल्कां मां - पराक्रमच आहे मूल्य जिचे अशा मला - राक्षसेन विधिना उद्वह - राक्षसविधीने वर. ॥४१॥
हे अजिता ! विवाहाच्या आदल्या दिवशी आपण आमच्या राजधानीमध्ये गुप्तरूपाने या आणि नंतर सेनापतींसह शिशुपाल व जरासंधाची सेना बळाने उध्वस्त करून टाका आणि आपल्या शौर्याचे मोल देऊन, राक्षसविधीने माझे पाणिग्रहण करा. (४१)
विवरण :- राक्षसेन विधिना उद्वह - विवाहपद्धती जरी एकूण आठ प्रकारच्या असल्या तरी गंधर्व, राक्षस आणि ब्राह्म या तीन पद्धती विशेष मान्य व प्रचलित आहेत. ब्राह्मणाच्या साक्षीने झालेला ब्राह्मविधी, ज्या पद्धतीने रुक्मिणीने संदेश पाठविला, तो गंधर्वविधि व वधूचे हरण करून केलेला विवाह हा राक्षसविधी. कृष्ण-रुक्मिणीचा राक्षस विधीने विवाह होणेच त्या परिस्थीतीत योग्य होते. कृष्णाशी विवाह होणे रुक्मिला मान्य नसल्याने दोनच दिवसांनी तिचा विवाह शिशुपालाशी होणार होता. म्हणून तो टाळण्यास रुक्मिणी श्रीकृष्णास आपल्या सामर्थ्याचे जोरावर शिशुपाल-जरासंध यांच्या सेनांना पराभूत करून, तिला जिंकून, तिच्याशी विवाह करण्यास सांगते. तिच्यासारखी रूपगुणसंपन्न वधू मिळविण्यासाठी श्रीकृष्णाला एवढे करावयास हवेच. कारण ती सर्वसामान्य थोडीच आहे ? शिवाय पळून जाणेही तिला कमीपणाचे वाटते. तिच्यासारख्या खानदानी राजकन्येला ते शोभणारे नाही. त्यामुळे आपल्या सामर्थ्याच्या जोरावर मला जिंकून मला येथून घेऊन जा, म्हणजेच माझ्याशी राक्षसविधीने विवाह कर असे तिला सुचवावयाचे आहे. (वास्तविक ब्राह्मविधी हा पर्याय जरी सर्वात योग्य असला तरी त्या परिस्थीतीत तो शक्य नव्हता. त्यामुळे राक्षसविधी हाच पर्याय प्राप्त परिस्थितीत योग्य.) (४१)
अन्तःपुरान्तरचरीमनिहत्य बन्धून्
त्वामुद्वहे कथमिति प्रवदाम्युपायम् । पूर्वेद्युरस्ति महती कुलदेवियात्रा यस्यां बहिर्नववधूर्गिरिजामुपेयात् ॥ ४२ ॥
अंतःपुरात निवसे जरि मी तरी पै । सांगेन तीहि इथली रित जी कुळाची ॥ बाहेर मंदिर असे कुळस्वामिनीचे । येई वराति गिरिजापुजनास मी तै ॥ ४२ ॥
अन्तःपुरान्तरचरीं त्वां - अन्तःपुरात हिंडणार्या तुला - बन्धून् अनिहत्य कथम् उद्वहे - तुझ्या बंधूंना मारल्याशिवाय कसे वरू - इति (चेत्) उपायं प्रवदामि - असे जर तू म्हणशील तर मी तुला एक उपाय सांगते - पूर्वेद्युः महती कुलदेवियात्रा अस्ति - आदल्या दिवशी मोठी कुलदेवीची यात्रा भरते - यस्यां नववधूः बहिः गिरिजाम् उपेयात् - ज्या यात्रेमध्ये नवरीमुलगी बाहेर दर्शनाकरिता येत असते. ॥४२॥
आपण जर असा विचार करीत असाल की, अंतःपुरात असणार्या माझ्याशी बंधूना न मारता विवाह कसा करावा ? तर मी आपणास एक उपाय सांगते. विवाहाच्या आदल्या दिवशी कुलदेवतेचे दर्शन करण्यासाठी एक मोठी मिरवणूक निघते, तीमधून नववधूला नगराबाहेर गिरिजादेवीच्या मंदिरात जावे लागते. (४२)
यस्याङ्घ्रिपङ्कजरजःस्नपनं महान्तो
वाञ्छन्त्युमापतिरिवात्मतमोऽपहत्यै । यर्ह्यम्बुजाक्ष न लभेय भवत्प्रसादं जह्यामसून् व्रतकृशान् शतजन्मभिः स्यात् ॥ ४३ ॥
ब्रह्मादि घेति तव ती पदधूळ अंगी । तेणेचि त्यां मिळतसे मनि शुद्धि तैसी ॥ ती ना मिळे जर मला त्यजि मी स्वप्राण । जातील जन्म पुढती तरि लाभ होय ॥ ४३ ॥
अम्बुजाक्ष - कमलनेत्रा श्रीकृष्णा - महान्तः - महात्मे - आत्मतमोपहत्यै - स्वतःचे अज्ञान दूर करण्याकरिता - उमापतिः इव - शंकरांप्रमाणे - यस्य अङ्घ्रिपङ्कजरजःस्नपनं वाञ्छन्ति - ज्याच्या चरणकमळाच्या परागांचे स्नान इच्छितात - भवत्प्रसादं न लभेय - त्या तुमचा प्रसाद जर मला मिळाला नाही तर - व्रतकृशान् असून् जह्याम् - व्रताने कृश झालेले प्राण मी टाकून देईन - (येन) शतजन्मभिः (त्वत्प्रसादः) स्यात् - ज्यामुळे शंभर जन्मांनी तरी तुझा प्रसाद होईल. ॥४३॥
हे कमलनयना ! शंकरासारखे मोठ- मोठे देवसुद्धा आत्मशुद्धीसाठी आपल्या चरणकमलांच्या धुळीने स्नान करू इच्छितात. मी जर आपला तो प्रसाद प्राप्त करू शकले नाही, तर व्रते करून शरीराला कृश करून प्राणत्याग करीन. मग आपल्या कृपेसाठी शेकडो जन्म का घ्यावे लागेनात ! (४३)
ब्राह्मण उवाच -
( अनुष्टुप् ) इत्येते गुह्यसन्देशा यदुदेव मयाऽऽहृताः । विमृश्य कर्तुं यच्चात्र क्रियतां तदनन्तरम् ॥ ४४ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे उत्तरार्धे रुक्मिण्युद्वाहप्रस्तावे द्विपञ्चाशत्तमोऽध्यायः ॥ ५२ ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
द्विजदेव म्हणाले - असा हा गुह्य संदेश यदुदेवा तुम्हास मी । सांगण्या पातलो येथे त्वरीत कार्य साधिणे ॥ ४४ ॥ ॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर बावन्नावा अध्याय हा ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
यदुदेव - हे यादवश्रेष्ठा श्रीकृष्णा - इति एते गुह्यसंदेशाः - असे हे गुप्त निरोप - मया आहृताः - मी आणिले आहेत - अत्र विमृश्य - ह्या बाबतीत विचार करून - यत् च कर्तुं (उचितम्) - जे काही करणे योग्य असेल - तत् अनन्तरं क्रियताम् - ते ह्यानंतर आपण करावे. ॥४४॥
ब्राह्मण म्हणाला - हे यदुश्रेष्ठा ! रुक्मिणीचा हा अत्यंत गुप्त असा संदेश मी आपल्याकडे आणला आहे. यासंबंधी जे काही करावयाचे असेल, त्याबद्दल विचार करुन ताबडतोब त्यानुसार करा. (४४)
अध्याय बावन्नावा समाप्त |