श्रीमद् भागवत पुराण
दशमः स्कन्धः
एकपञ्चाशत्तमोऽध्यायः

कालयवनविनाशः, मुचुकुन्दकृता भगवतः स्तुतिश्च -

कालयवनाचे भस्म व मुचुकुंदाची कथा -


संहिता - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् )
तं विलोक्य विनिष्क्रान्तं उज्जिहानमिवोडुपम् ।
दर्शनीयतमं श्यामं पीतकौशेयवाससम् ॥ १ ॥
श्रीवत्सवक्षसं भ्राजत् कौस्तुभामुक्तकन्धरम् ।
पृथुदीर्घचतुर्बाहुं नवकञ्जारुणेक्षणम् ॥ २ ॥
नित्यप्रमुदितं श्रीमत् सुकपोलं शुचिस्मितम् ।
मुखारविन्दं बिभ्राणं स्फुरन्मकरकुण्डलम् ॥ ३ ॥
वासुदेवो ह्ययमिति पुमान् श्रीवत्सलाञ्छनः ।
चतुर्भुजोऽरविन्दाक्षो वनमाल्यतिसुंदरः ॥ ४ ॥
लक्षणैर्नारदप्रोक्तैः नान्यो भवितुमर्हति ।
निरायुधश्चलन् पद्‌भ्यां योत्स्येऽनेन निरायुधः ॥ ५ ॥
( अनुष्टुप् )
श्रीशुकदेव सांगतात -
परीक्षित् मथुरेतूनी बाहेर कृष्ण पातले ।
त्या वेळी वाटले पूर्णचंद्र ते रूप देखणे ॥ १ ॥
श्रीवत्सचिन्ह वक्षासी नेसला तो पितांबर ।
कौस्तुभो चमके कंठी आजानुचर त्या भुजा ॥ २ ॥
आरक्त कोवळे नेत्र आनंदराशि त्या मुखी ।
हासरे गाल ते कैसे पाहता चित्त चोरि तो ॥ ३ ॥
कुंडले मकराकार पाहता यवनाश्व तो ।
स्मरला वासुदेवो हा नारदो वदले तसे ॥ ४ ॥
वनमाळा गळा ऐशी न कोणी दुसरा असा ।
विनाशस्त्र असा येतो त्यासी मीही लढे तसा ॥ ५ ॥

उज्जिहानं उडुपं इव विनिष्क्रान्तं - वर येणार्‍या चंद्राप्रमाणे बाहेर पडणार्‍या - दर्शनीयतमं श्यामं - अत्यंत सुंदर व कृष्णवर्ण अशा - पीतकौशेयवाससं - पिवळे रेशमी वस्त्र नेसलेल्या - तं विलोक्य - त्या श्रीकृष्णाला पाहून - श्रीवत्सवक्षसं - ज्याच्या वक्षस्थलाच्या ठिकाणी श्रीवत्सलांछन शोभत आहे अशा - भ्राजत्कौस्तुभामुक्तकन्धरम् - चकाकणार्‍या कौस्तुभ मण्याने शोभिवंत झाला आहे कंठ ज्याचा अशा - पृथुदीर्घचतुर्बाहुं - लठठ व लांब आहेत चार हात ज्याला अशा - नवकञ्जारुणेक्षणम् - नवीन कमळाप्रमाणे आहेत डोळे ज्याचे अशा - नित्यप्रमुदितं - नेहमी आनंदित राहणार्‍या - श्रीमत्सुकपोलं - शोभायमान आहेत चांगले गाल ज्याचे अशा - शुचिस्मितम् - शुभ्र आहे मंदहास्य ज्याचे अशा - स्फुरन्मकरकुण्डलं मुखारविन्दं बिभ्राणम् - ज्याच्या कानांत मकराकार कुंडले शोभत आहेत अशा मुखकमळाला धारण करणार्‍या - तं विलोक्य - त्या श्रीकृष्णाला पाहून. ॥१-३॥

अयं हि - हाच - पुमान् - पुरुष - श्रीवत्सलांछनः चतुर्भुजः अरविन्दाक्षः वनमाली अतिसुंदरः - श्रीवत्सलांछन धारण करणारा, चार हात असणारा, कमळासारखे नेत्र असलेला, वनमाला धारण करणारा आणि अत्यंत सुंदर असा - वासुदेवः इति - वसुदेवपुत्र श्रीकृष्ण होय असे. ॥४॥

नारदप्रोक्तैः लक्षणैः - नारदाने सांगितलेल्या लक्षणांवरून - अन्यः भवितुं न अर्हति - दुसरा असणे शक्य नाही - निरायुधः पद्‌भ्यां चलन् - आयुधरहित असा पायानेच चालत आहे - अनेन - ह्या कृष्णाबरोबर - निरायुधः (अहं) योत्स्ये - मीहि आयुधरहित असाच युद्ध करीन. ॥५॥

श्रीशुक म्हणतात - श्रीकृष्ण मथुरा नगरीच्या मुख्य दरवाजातून उगवणार्‍या चंद्राप्रमाणे बाहेर पडले. त्यांचे श्यामल शरीर अत्यंत देखणे होते. त्यांनी रेशमी पीतांबर परिधान केला होता. त्यांच्या वक्षःस्थळावर श्रीवत्सचिन्ह शोभून दिसत होते. गळ्यात कौस्तुभमणी झगमगत् होता. लांब व पिळदार असे चार हात होते. ताज्या कमळाप्रमाणे तांबूस नेत्र होते. नित्य आनंद ओसंडून वाहणारे, सुंदर गालांनी युक्त, चमकणारी मकराकृती कुंडले असलेले त्यांचे सुंदर मुखकमल पवित्र हास्याने शोभत होते. त्यांना पाहून कालयवनाचाही निश्चय झाला की, हाच पुरुष वासुदेव होय. कारण नारदांनी जी जी लक्षणे सांगितली होती - वक्षःस्थळावर श्रीवत्साचे चिन्ह, चार भुजा, कमलपुष्पाप्रमाणे नेत्र, गळ्यात वनमाला आणि अपार सौंदर्य, हे सर्व याच्याशी जुळणारे आहे. म्हणून हा दुसरा कोणी असू शकत नाही. यावेळी हा कोणतेही शस्त्र हातात न घेता पायीच निघाला आहे. तेव्हा आपण सुद्धा त्याच्याशी शस्त्राविनाच लढावे. (१-५)


इति निश्चित्य यवनः प्राद्रवद्तं पराङ्‌मुखम् ।
अन्वधावत् जिघृक्षुस्तं दुरापमपि योगिनाम् ॥ ६ ॥
म्हणोनी धावला तैसा कृष्ण तै पाठ दावुनी ।
पळाला, धावला दैत्य धराया पाठ-पाठ की ॥ ६ ॥

यवनः - कालयवन - एवं निश्चित्य - असा निश्चय करून - पराङ्‌मुखं प्राद्रवन्तं - पाठ करून पळत सुटलेल्या - योगिनां दुरापम् अपि - योग्यांना मिळविण्यास कठीण अशाहि - तं जिघृक्षुः - त्या श्रीकृष्णाला धरण्याची इच्छा करणारा - अन्वधावत् - मागून धावू लागला. ॥६॥

असा निश्चय करुन कालयवन श्रीकृष्णांच्या दिशेने धावत सुटला. त्यावेळी ते तोंड फिरवून रणभूमीवरून पळून जाऊ लागले आणि त्या योग्यांनाही दुर्लभ अशा प्रभूंना पकडण्यासाठी कालयवन त्यांच्या मागे मागे धावू लागाले. (६)


हस्तप्राप्तमिवात्मानं हरीणा स पदे पदे ।
नीतो दर्शयता दूरं यवनेशोऽद्रिकन्दरम् ॥ ७ ॥
रणछोड पळे कैसा यवनाश्वास वाटले ।
आत्ता मी धरितो याला पावला पावलासही ॥ ७ ॥

पदेपदे - पावलोपावली - आत्मानं हस्तप्राप्तम् इव दर्शयता - स्वतःला हातात सापडल्यासारखे दाखविणार्‍या - अनेन हरिणा - त्या श्रीकृष्णाने - सः यवनेशः - तो कालयवन - दूरं अद्रिकन्दरं नीतः - लांब पर्वताच्या गुहेपर्यंत नेला. ॥७॥

पावलोपावली स्वतः हातात सापडल्याचे भासवीत भगवान त्या यवनराजाला पुष्कळ लांब एका पर्वताच्या गुहेत घेऊन गेले. (७)


पलायनं यदुकुले जातस्य तव नोचितम् ।
इति क्षिपन्ननुगतो नैनं प्रापाहताशुभः ॥ ८ ॥
ओरडे यदुवंशी तू न धाव युद्ध सोडुनी ।
अज्ञानी त्याजला कैसा मिळेल भगवान् हरी ॥ ८ ॥

अहताशुभः - ज्याचे पाप नष्ट झाले नाही असा - यदुकुले जातस्य तव पलायनं उचितं न - यदुकुळात उत्पन्न झालेल्या तुला पळून जाणे योग्य नाही - इति (तं) क्षिपन् - अशी त्या श्रीकृष्णाची निंदा करीत - अनुगतः - त्याच्या मागून धावू लागला - (परंतु) एनं न प्राप - परंतु ह्या श्रीकृष्णाला पकडू शकला नाही. ॥८॥

पाठीमागून (पळत येणारा ) कालयवन वारंवार हरकत घेत, "यदुवंशामध्ये जन्मलेल्या तुला पळून जाणे शोभत नाही", असे त्यांना टाकून बोलत त्यांच्या मागे मागे पळत होता. परंतु अजून त्याची पापे नष्ट झाली नव्हती, त्यामुळे भगवंतांना तो प्राप्त करून घेऊ शकला नाही. (८)


एवं क्षिप्तोऽपि भगवान् प्राविशद् गिरिकन्दरम् ।
सोऽपि प्रविष्टस्तत्रान्यं शयानं ददृशे नरम् ॥ ९ ॥
धावता भगवान् गुंफी पातले गिरिच्या तदा ।
यवनाश्व तिथे आला पाहतो कुणि झोपला ॥ ९ ॥

भगवान् - श्रीकृष्ण - एवं क्षिप्तः अपि - याप्रमाणे निंदिला असताहि - गिरिकन्दरम् - पर्वताच्या गुहेत - प्राविशत् - शिरला - तत्र प्रविष्टः सः अपि - तेथे शिरलेला तो कालयवनहि - अन्यं शयानं नरं ददृशे - दुसर्‍या निजलेल्या मनुष्याला पाहता झाला. ॥९॥

त्याच्या निंदेकडे लक्ष न देता भगवान त्या पर्वताच्या गुहेत शिरले. त्यांच्या पाठोपाठ कालयवनही गेला. तेथे त्याने एक दुसराच मनुष्य झोपल्याचे पाहिले. (९)


नन्वसौ दूरमानीय शेते मामिह साधुवत् ।
इति मत्वाच्युतं मूढः तं पदा समताडयत् ॥ १० ॥
वदला एवढ्या दूर आणोनी साधु हा बने ।
झोपला म्हणुनी मारी जोराची लाथ एक त्या ॥ १० ॥

ननु - खरोखर - असौ - हा श्रीकृष्ण - मां दूरं आनीय - मला इतक्या लांबपर्यंत आणून - इह साधुवत् शेते - येथे साधुपुरुषाप्रमाणे निजला आहे - इति - असे म्हणून - मूढः - मूर्ख कालयवन - तं अच्युतं मत्वा पदा समताडयत् - त्याला कृष्ण समजून पायाने ताडिता झाला.॥१०॥

त्याला पाहून कालयवनाने विचार केला की, "हा मला इतक्या लांब घेऊन येऊन आता साळसुदपणाने झोपला आहे", तो श्रीकृष्ण आहे, असे वाटून त्या मूर्खाने त्याला जोरात एक लाथ मारली. (१०)


स उत्थाय चिरं सुप्तः शनैरुन्मील्य लोचने ।
दिशो विलोकयन् पार्श्वे तमद्राक्षीदवस्थितम् ॥ ११ ॥
झोपला पुरुषो कैक दिनांचा उठला असे ।
उघडी नेत्र नी पाही समोर यवनाश्व तो ॥ ११ ॥

चिरं सुप्तः सः - पुष्कळ काळपर्यंत निजलेला तो पुरुष - उत्थाय - उठून - शनैः लोचने उन्मील्य - हळूच डोळे उघडून - पार्श्वे दिशः विलोकयन् - आजूबाजूला दिशांकडे पहात असता - अवस्थितं तं अद्राक्षीत् - उभ्या असलेल्या त्या कालयवनाला पाहता झाला. ॥११॥

तो पुरुष तेथे पुष्कळ दिवसांपासून झोपला होता. लाथेच्या तडाख्याने तो जागा झाला आणि हळू हळू त्याने आपले डोळे उघडले तो कालयवन उभा असल्याचे त्याला दिसले. (११)


स तावत्तस्य रुष्टस्य दृष्टिपातेन भारत ।
देहजेनाग्निना दग्धो भस्मसाद् अभवत्क्षणात् ॥ १२ ॥
जाहला रुष्ट तो योगी पाहता यवनाश्व तो ।
पेटला अंग अंगाला क्षणात भस्म जाहला ॥ १२ ॥

भारत - हे परीक्षित राजा - तावत् - तितक्यात - रुष्टस्य तस्य दृष्टिपातेन - रागावलेल्या त्या पुरुषाच्या अवलोकनाने - देहजेन अग्निना दग्धः - शरीरापासून उत्पन्न झालेल्या अग्नीमुळे जळून गेलेला असा - सः - तो कालयवन - क्षणात् भस्मसात् अभवत् - क्षणामध्ये भस्म झाला. ॥१२॥

परीक्षिता ! रागावलेल्या त्याची दृष्टी पडताच कालयवनाच्या शरीरातील अग्नी प्रज्वलित होऊन तो क्षणभरात जळून भस्मसात झाला. (१२)


श्रीराजोवाच -
को नाम स पुमान् ब्रह्मन् कस्य किंवीर्य एव च ।
कस्माद् गुहां गतः शिष्ये किंतेजो यवनार्दनः ॥ १३ ॥
राजा परीक्षिताने विचारले -
ज्याची दृष्टी पडे तेंव्हा जळाला यवनाश्व तो ।
कोण योगी कुणाचा तो तेथे का झोपला असे ॥ १३ ॥

ब्रह्मन् - हे शुकाचार्य - यवनार्दनः सः पुमान् कः नाम - कालयवनास मारणारा तो पुरुष कोण होता बरे - कस्य च एव - तो कोणाचा कोण व त्याचे काय सामर्थ्य होते - कस्मात् गुहां गतः शिश्ये - कशासाठी गुहेत जाऊन निजला होता - किं तेजः - त्याचे तेज तरी किती होते. ॥१३॥

राजाने विचारले - ब्रह्मन ! ज्याच्या केवळ दृष्टिक्षेपाने कालयवन जळून भस्म झाला, तो पुरुष कोण होता ? तो कोणाचा पुत्र होता ? त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची शक्ती होती ? तो पर्वताच्या गुहेत जाऊन का झोपला होता ? (१३)


श्रीशुक उवाच -
स इक्ष्वाकुकुले जातो मान्धातृतनयो महान् ।
मुचुकुन्द इति ख्यातो ब्रह्मण्यः सत्यसङ्गरः ॥ १४ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
इक्ष्वाकुवंशिचा राजा मांधातापुत्र तो असे ।
महापुरुष तो होता द्विजभक्त नि सत्य ही ॥ १४ ॥

सः - तो - इक्ष्वाकुकुले - इक्ष्वाकुवंशामध्ये - महान् - मोठा - मांधातृतनयः - मांधात्याचा मुलगा - मुचुकुन्दः ख्यातः - मुचुकुंद ह्या नावाने प्रसिद्ध असा - ब्रह्मण्यः सत्यसंगरः - ब्राह्मणांचे कल्याण करणारा आणि खर्‍या मार्गाने युद्ध करणारा असा - जातः - उत्पन्न झाला. ॥१४॥

श्रीशुक म्हाणाले - तो इक्ष्वाकुवंशातील मांधात्याचा पुत्र मुचुकुंद होता. तो ब्राह्मणभक्त, सत्यप्रतिज्ञ महापुरुष होता. (१४)


स याचितः सुरगणैः इन्द्राद्यैरात्मरक्षणे ।
असुरेभ्यः परित्रस्तैः तद् रक्षां सोऽकरोच्चिरम् ॥ १५ ॥
इंद्रादि देवता सर्व एकदा असुरी भये ।
प्रार्थिती मुचकुंदाते तोही रक्षी तयांस की ॥ १५ ॥

सः - तो मुचुकुंद - असुरेभ्यः परित्रस्तैः इंद्राद्यैः सुरगणैः - दैत्यांनी पीडिलेल्या इंद्रादि देवगणांनी - आत्मरक्षणे याचितः - स्वतःच्या रक्षणासाठी प्रार्थिला असता - सः - तो मुचुकुंद - तद्रक्षां चिरं अकरोत् - त्यांचे रक्षण पुष्कळ काळपर्यंत करिता झाला. ॥१५॥

एकदा असुरांना भ्यालेल्या इंद्रादी देवांनी आपल्या रक्षणासाठी राजा मुचुकुंदाला प्रार्थना केली. तेव्हा त्यांचे पुष्कळ काळपर्यंत त्यांचे रक्षण केले. (१५)


लब्ध्वा गुहं ते स्वःपालं मुचुकुन्दमथाब्रुवन् ।
राजन् विरमतां कृच्छ्राद् भवान् नः परिपालनात् ॥ १६ ॥
कितेकवर्ष ते झाले स्वामी कार्तिक लाभता ।
देवेंद्र प्रार्थिले याला तुम्ही विश्रांति घ्या अता ॥ १६ ॥

अथ - नंतर - ते - ते देव - गुहं स्वःपालं लब्ध्वा - कार्तिकस्वामीला स्वर्गरक्षक असा मिळवून - मुचुकुन्दम् अब्रुवन् - मुचुकुंदाला म्हणाले - राजन् - हे राजा - भवान् - तू - नः परिपालनात् कृच्छ्‌रात् - आम्हाला रक्षण करण्याच्या श्रमापासून - विरमतां - थांबावे. ॥१६॥

पुष्कळ दिवसांनंतर देवतांना जेव्हा कार्तिकेय सेनापती म्हणून मिळाले, तेव्हा ते मुचुकुंदाला म्हणाले- " राजन ! आमच्या रक्षणासाठी आपण पुष्कळ श्रम घेतले. आता विश्रांती घ्यावी. (१६)


नरलोके परित्यज्य राज्यं निहतकण्टकम् ।
अस्मान् पालयतो वीर कामास्ते सर्व उज्झिताः ॥ १७ ॥
वीरशिरोमणी तुम्ही त्यागिता श्रेष्ठ राज्य ते ।
त्यागोनि भोगही सर्व आम्हाला रक्षिले असे ॥ १७ ॥

वीर - हे पराक्रमी मुचुकुंदा - नरलोके - मनुष्यलोकातील - निहतकण्टकं राज्यं परित्यज्य - शत्रुरहित झालेले राज्य सोडून - अस्मान् पालयतः ते - आमचे रक्षण करणार्‍या तुझ्याकडून - सर्वे कामाः उज्झिताः - सर्व इच्छा टाकिल्या गेल्या आहेत. ॥१७॥

हे श्रेष्ठ वीरा ! आमचे रक्षण करता यावे म्हणून आपण मनुष्यलोकातील आपले निष्कंटक राज्य सोडून दिले. तसेच जीवनातील सर्व भोगांचाही त्याग केलात. (१७)


सुता महिष्यो भवतो ज्ञातयोऽमात्यमन्त्रिणः ।
प्रजाश्च तुल्यकालीना नाधुना सन्ति कालिताः ॥ १८ ॥
कालचक्रे धरेसी ते पुत्र राण्या नि बांधव ।
न कोणी राहिले मंत्री गेले काळमुखात ते ॥ १८ ॥

भवतः - तुझ्या - महिष्यः सुताः - स्त्रिया व पुत्र - ज्ञातयः अमात्यमन्त्रिणः - जातभाई, प्रधान व सल्लागारमंडळ - च तुल्यकालीयाः प्रजाः - आणि त्या काळात असणार्‍या प्रजा - कालिताः अधुना न सन्ति - कालाधीन झालेल्या सांप्रत अस्तित्वात नाहीत. ॥१८॥

आता आपले पुत्र, राण्या, बांधव आणि अमात्य, मंत्री, त्याचप्रमाणे त्यावेळच्या प्रजेपैकी कोणीही जिवंत नाही. सर्वांना काळाने गिळून टाकले. (१८)


कालो बलीयान् बलिनां भगवान् ईनीश्वरोऽव्ययः ।
प्रजाः कालयते क्रीडन् पशुपालो यथा पशून् ॥ १९ ॥
बळिचा बळि तो काळ भगवद्‌रूप तो असे ।
पाळिती गोप जै गाई तसा विश्वास पाळि हा ॥ १९ ॥

बलिनां बलीयान् - बलिष्ठांमध्ये बळकट असा - अव्ययः - अविनाशी - भगवान ईश्वरः कालः - परमेश्वररूपी भगवान काळ - क्रीडन् - क्रीडा करीत - पशुपालः यथा पशून् - पशुसंरक्षक जसा पशूंना तसा - प्रजाः कालयते - प्रजांना आपल्याकडे पळवून आणितो. ॥१९॥

सर्व बलवानांपेक्षाही काळ बलवान आहे. तो स्वतः परम समर्थ, अविनाशी आणि भगवत्स्वरूप आहे. गवळी जसा जनावरांना आपल्या ताब्यात ठेवतो, त्याप्रमाणे काळ सहजपणे सगळ्या प्रजेला आपल्या अधीन ठेवतो. (१९)


वरं वृणीष्व भद्रं ते ऋते कैवल्यमद्य नः ।
एक एवेश्वरस्तस्य भगवान् विष्णुरव्ययः ॥ २० ॥
राजा कल्याण हो सारे, मागणे मनि काय ते ।
मोक्ष सोडोनि ते देतो विष्णुच्या हाति तो असे ॥ २० ॥

अद्य - आज - नः - आमच्यापासून - कैवल्यम् ऋते - मोक्षाशिवाय - ते भद्रं वरं वृणीष्व - तुला कल्याणकारक असा वर मागून घे - अव्ययः भगवान् विष्णुः - अविनाशी भगवान विष्णु - एकः एव तस्य (मोक्षस्य) ईश्वरः - एकटाच त्या मोक्षाचा अधिपति आहे. ॥२०॥

राजा ! आपले कल्याण असो. मोक्षाखेरीज आमच्याकडून कोणताही वर मागून घ्या. कारण मोक्ष देण्याचे सामर्थ्य फक्त अविनाशी भगवान विष्णूंपाशीच आहे. (२०)

विवरण :- मुचकुंदाने बराच काळ स्वर्गात राहून असुरांपासून देवांचे रक्षण केले. आपल्या या कार्यामध्ये तो इतका व्यस्त होता की, त्यास आपल्या परिवाराचे आणि गेलेल्या काळाचे भान राहिले नाही. दरम्यानच्या काळात त्याचा सर्व परिवार काल-कवलित होऊन राज्यहि लयास गेले होते. त्या संदर्भात बोलताना देव त्यास म्हणाले, काळ हा ईश्वरापासून वेगळा नाहीच. सर्व प्राण्यांना काळरूपी शरीर धारण करणारा ईश्वरच नष्ट करीत असतो. (कालशरीरकः ईश्वरः एव कलयति इति कालः) क्रीडा करत करत भगवंत प्राण्यांना वश करतो, त्यांचे नियमन करतो आणि संहारहि करतो. काळाने तुझे सर्व कुटुंबीय नष्ट केले, हे वास्तव तू स्वीकार. पृथ्वी आणि स्वर्ग येथील कालगणना वेगळी. मुचकुंद बरीच वर्षे स्वर्गात जिवंत राहू शकला, कारण तो स्वर्ग होता. मात्र पृथ्वीच्या कालनियमनाप्रमाणे त्याचे राज्य, परिवार इ. सर्व कालाच्या प्रवाहात नष्ट झाले होते. अशा मुचकुंदाला 'वर माग', पण 'मोक्ष सोडून' असे देव म्हणाले, हे देव आणि कृष्ण परमात्मा यांच्यामध्ये फरक आहे. इतर कोणतीही ऐहिक गोष्ट प्राप्त करवून देणे देवांना शक्य. त्यांची तेवढी मर्यादा, पण विष्णू परमात्मा हा स्वतः अविनाशी असल्याने त्याचे सामर्थ्य मोठे, आणि मोक्षही तोच देऊ शकतो. अर्थात मोक्ष ही गोष्ट देण्यापेक्षा तपःसामर्थ्याने मिळवावयाची असते. त्यामुळे तोच मोक्ष देण्याचा अधिकारी. (१९-२०)



एवमुक्तः स वै देवान् अभिवन्द्य महायशाः ।
अशयिष्ट गुहाविष्टो निद्रया देवदत्तया ॥ २१ ॥
वंदिले मुचकुंदाने थकता झोप मागतो ।
म्हणोनी पातला तेथे गुंफेत झोपला असे ॥ २१ ॥

एवम् उक्तः - याप्रमाणे बोलला गेलेला - महायशाः सः - मोठा यशस्वी असा तो मुचुकुंद - देवान् अभिवन्द्य - देवांना नमस्कार करून - गुहाविष्टः - गुहेत शिरून - देवदत्तया निद्रया - देवांनी दिलेल्या निद्रेच्या योगाने - अशयिष्ट वै - खरोखर झोप घेता झाला. ॥२१॥

असे सांगितल्यावर परम यशस्वी मुचुकुंदाने देवांना नमस्कार केला आणि झोपेचा वर घेऊन, तो पर्वताच्या गुहेत जाऊन झोपला. (२१)


स्वापं यातं यस्तु मध्ये बोधयेत्त्वामचेतनः ।
स त्वया दृष्टमात्रस्तु भस्मीभवतु तत्क्षणात् ॥ २२ ॥
झोपेत मूढ जो कोणी तुजला उठवील तो ।
होईल पाहता भस्म देवांनी वर हा दिला ॥ २२ ॥

अचेतनः यः तु - जो कोणी अज्ञानी पुरुष - स्वापं यातं त्वां - झोपी गेलेल्या तुला - मध्ये बोधयेत् - मध्येच जागा करील - सः - तो - त्वया दृष्टमात्रः तु - तुझ्या दृष्टीस पडताक्षणीच - तत्क्षणात् भस्मीभवतु - तत्काळ भस्म होवो. ॥२२॥

त्यावेळी देवांनी सांगितले होते की, "हे राजा ! झोप घेत असताना जर एखाद्या अजाण माणसाने तुला मध्येच जागे केले, तर तो तुझ्या दृष्टीस पडताच त्याच क्षणी भस्म होऊन जाईल." (२२)


यवने भस्मसान्नीते भगवान् सात्वतर्षभः ।
आत्मानं दर्शयामास मुचुकुन्दाय धीमते ॥ २३ ॥
तमालोक्य घनश्यामं पीतकौशेयवाससम् ।
श्रीवत्सवक्षसं भ्राजत् कौस्तुभेन विराजितम् ॥ २४ ॥
चतुर्भुजं रोचमानं वैजयन्त्या च मालया ।
चारुप्रसन्नवदनं स्फुरन् मकरकुण्डलम् ॥ २५ ॥
प्रेक्षणीयं नृलोकस्य सानुरागस्मितेक्षणम् ।
अपीव्यवयसं मत्त मृगेन्द्रोदारविक्रमम् ॥ २६ ॥
पर्यपृच्छन् महाबुद्धिः तेजसा तस्य धर्षितः ।
शङ्‌कितः शनकै राजा दुर्धर्षमिव तेजसा ॥ २७ ॥
यवनो भस्म तो होता बुद्धिमान् मुचुकुंदला ।
भगवान् कृष्णने तेंव्हा दिधले स्वय दर्शन ॥ २३ ॥
मेघाच्या परि तो श्याम रेशमी वस्त्र नेसला ।
श्रीवत्सचिन्ह वक्षास कौस्तुभो शोभला गळा ॥ २४ ॥
चतुर्भुज असे रूप वैजयंतीहि शोभली ।
मुखी सुंदर ते हास्य मकराकार कुंडले ॥ २५ ॥
दृष्टीने वर्षतो प्रेम कुमार सिंहचाल ती ।
धर्यवान् जरि तो राजा तरी आश्चर्य दाटले ॥ २६ ॥
स्वताचे हारपे तेज कल्पनातीत तेज ते ।
शंकीत जाहला थोडा पाहता वदला असा ॥ २७ ॥

यवने भस्मसात् नीते - कालयवन भस्म झाला असता - सात्वतर्षभः भगवान् - यादवश्रेष्ठ भगवान श्रीकृष्ण - धीमते मुचुकुन्दाय - ज्ञानी मुचुकुंदाला - आत्मानं दर्शयामास - स्वतः दर्शन देता झाला. ॥२३॥

घनश्यामं पीतकौशेयवाससं - मेघाप्रमाणे कृष्णवर्णाच्या व पिवळे रेशमी वस्त्र धारण करणार्‍या - श्रीवत्सवक्षसं - ज्याच्या वक्षस्थलाच्या ठिकाणी श्रीवत्सलांछन शोभत आहे अशा - भ्राजत्कौस्तुभेन विराजितम् - दैदीप्यमान कौस्तुभाने शोभणार्‍या - तं आलोक्य - त्या श्रीकृष्णाला पाहून. ॥२४॥

चतुर्भुजं - चार बाहू असणार्‍या - वैजयन्त्या मालया च रोचमानं - व वैजयन्ती माळेने शोभणार्‍या - चारुप्रसन्नवदनं - सुंदर व प्रसन्न आहे मुख ज्याचे अशा - स्फुरन्मकरकुण्डलम् - ज्याच्या कानांत मकराकार तेजस्वी कुंडले आहेत अशा - नृलोकस्य प्रेक्षणीयं - मनुष्य लोकांमध्ये पाहण्यालायक अशा - सानुरागस्मितेक्षणम् - प्रेमपूर्वक मंद हास्ययुक्त आहे अवलोकन ज्याचे अशा - अपीच्यवयसं - नवीन सुंदर वयाच्या - मत्तमृगेन्द्रोदारविक्रमम् - मत्त सिंहाप्रमाणे मोठा आहे पराक्रम ज्याचा अशा.॥२५-२६॥

तस्य तेजसा धर्षितः - त्या श्रीकृष्णाच्या तेजाने दिपून गेलेला - महाबुद्धिः राजा - मोठा बुद्धिवान मुचुकुंद राजा - शंकितः - शंकायुक्त होऊन - तेजसा दुर्दर्शम् इव (तं) - तेजस्वीपणामुळे अजिंक्य अशा त्या श्रीकृष्णाला - शनकः पर्यपृच्छत् - हळूहळू विचारिता झाला. ॥२७॥

परीक्षिता ! कालयवनाला भस्मसात करून यदुश्रेष्ठ भगवान श्रीकृष्णांनी बुद्धिमान मुचुकुंदाला दर्शन दिले. वर्षाकालीन मेघाप्रमाणे सावळे रूप असलेल्या भगवान श्रीकृष्णांनी त्यावेळी रेशमी पीतांबर परिधान केला होता, वक्षःस्थळावर श्रीवत्स चिन्ह होते आणि तेजस्वी कौस्तुभमण्याने ते शोभत होते. मकराकृती कुंडले कानात झगमगत होती. प्रेमपूर्ण स्मितहास्ययुक्त नजर लोकांना आकर्षित करीत होती. अत्यंत देखणे तारुण्य, मदोन्मत्त सिंहाप्रमाणे निर्भय चाल ! अत्यंत बुद्धिमान राजा त्यांच्या तेजाने हतप्रभ झाला. तेजामुळे जवळ जाण्यासही कठीण अशा त्यांना भीतभीतच विचारले. (२३-२७)


श्रीमुचुकुन्द उवाच -
को भवानिह सम्प्राप्तो विपिने गिरिगह्वरे ।
पद्‌भ्यां पद्मपलाशाभ्यां विचरस्युरुकण्टके ॥ २८ ॥
राजा मुचकुंद म्हणाला -
तुम्ही कोण कसे आले कोवळे पाय घेउनी ।
काटेरी वन हे ऐसे येण्याचा हेतु काय तो ॥ २८ ॥

इह विपिने - ह्या अरण्यातील - गिरिगह्वरे - पर्वताच्या गुहेत - संप्राप्तः भवान् कः - प्राप्त झालेले आपण कोण आहा - पद्मपलाशाभ्यां पद्‌भ्‌यां - कमलपत्राप्रमाणे कोमल अशा पायांनी - उरुकण्टके (स्थाने) - पुष्कळ काटे असणार्‍या भूमीवर - विचरसि - तू हिंडत आहेस. ॥२८॥

मुचुकुंद म्हणाला - "आपण कोण आहात ? काट्या कुट्यांनी भरलेल्या या निबिड जंगलात आपल्या कमलाप्रमाणे कोमल असणार्‍या चरणांनी का बरे फिरत आहात ? आणि या पर्वताच्या गुहेत येण्याचा आपला हेतू कोणता ? (२८)


किं स्वित् तेजस्विनां तेजो भगवान् वा विभावसुः ।
सूर्यः सोमो महेन्द्रो वा लोकपालोऽपरोऽपि वा ॥ २९ ॥
अग्निदेव तुम्ही का ते तेजाचे तेजमूर्ति तो ।
देवेंद्र चंद्र का भानू लोकपाल तुम्ही असा ॥ २९ ॥

तेजस्विनां तेजः किंस्वित् - तू तेजस्वी पुरुषांचे तेज आहेस काय - वा भगवान् विभावसुः सूर्यः - किंवा तेजस्वी भगवान सूर्य आहेस - सोमः वा महेन्द्रः - चंद्र किंवा स्वर्गाधिपति इंद्र आहेस - लोकपालः अपि वा परः (असि) - लोकपाल अथवा परमेश्वर आहेस. ॥२९॥

आपण सर्व तेजस्वी पुरुषांचे मूर्तिमंत तेज किंवा भगवान अग्निदेव किंवा सूर्य, चंद्र, देवराज इंद्र किंवा दुसरे कोणी लोकपाल आहात काय ? (२९)


मन्ये त्वां देवदेवानां त्रयाणां पुरुषर्षभम् ।
यद् बाधसे गुहाध्वान्तं प्रदीपः प्रभया यथा ॥ ३० ॥
मला तो वाटते चित्ती तुम्ही नारायणो स्वये ।
तेजाने तुमच्या सारा येथला तम संपला ॥ ३० ॥

यत् - ज्याअर्थी - यथा प्रदीपः प्रभया तथा - जसा दिवा प्रकाशाने तसा - गुहाध्वान्तं बाधसे - गुहेतील अंधकार दूर करतोस - (तत्) त्वां - त्याअर्थी तुला - त्रयाणां देवदेवानां पुरुषर्षभं मन्ये - ब्रह्मादि तीनहि देवांमध्ये श्रेष्ठ असा पुरुषोत्तम असे मी मानितो. ॥३०॥

मला वाटते की, आपण तीन मुख्य देवांपैकी पुरुषोत्तम आहात; कारण दिवा ज्याप्रमाणे अंधार नाहीसा करतो, त्याचप्रमाणे आपण आपल्या अंगकांतीने या गुहेतील अंधार घालविला आहे. (३०)


शुश्रूषतामव्यलीकं अस्माकं नरपुङ्गव ।
स्वजन्म कर्म गोत्रं वा कथ्यतां यदि रोचते ॥ ३१ ॥
रुचले जर ते सांगा जन्म कार्य नि गोत्रही ।
मी तो सत्य मनाने ते इच्छूक ऐकण्या असे ॥ ३१ ॥

नरपुङगव - हे पुरुषश्रेष्ठा - अव्यलीकं शुश्रूषताम् अस्माकं - निष्कपटपणाने सेवा करणार्‍या आम्हाला - स्वजन्म कर्म गोत्रं वा - स्वतःचे जन्म, कर्म व कुल - यदि रोचते कथ्यतां - जर इच्छा असेल तर सांगावे. ॥३१॥

हे पुरुषश्रेष्त्ठ ! आपल्याला योग्य वाटत असेल, तर आम्हांला आपले जन्म, कर्म आणि गोत्र सांगा. कारण आम्ही ते ऐकण्यासाठी अंतःकरणापासून उत्सुक आहोत. (३१)


वयं तु पुरुषव्याघ्र ऐक्ष्वाकाः क्षत्रबन्धवः ।
मुचुकुन्द इति प्रोक्तो यौवनाश्वात्मजः प्रभो ॥ ३२ ॥
इक्ष्वाकु वंशिचा मी हो मांधातापुत्र क्षत्रिय ।
मुचकुंद असे नाम माझे हो पुरुषोत्तमा ॥ ३२ ॥

प्रभो पुरुषव्याघ्र - हे श्रेष्ठ पुरुषा - वयं तु ऐक्ष्वाकाः क्षत्रबन्धवः - आम्ही तर इक्ष्वाकुवंशात उत्पन्न झालेले क्षत्रिय आहोत - यौवनाश्वात्मजः मुचुकुन्दः इति प्रोक्तः - युवनाश्वाचा पुत्र जो मांधाता त्याचा मुलगा मुचुकुंद म्हणून प्रसिद्ध असा आहे. ॥३२॥

हे पुरुषोत्तमा ! आम्ही इक्ष्वाकुवंशी क्षत्रिय आहोत. हे प्रभो, माझे नाव मुचुकुंद असून युवनाश्वनंदन मान्धात्याचा मी पुत्र होय. (३२)


चिरप्रजागरश्रान्तो निद्रयापहतेन्द्रियः ।
शयेऽस्मिन्विजने कामं केनाप्युत्थापितोऽधुना ॥ ३३ ॥
जागोनी थकलो ऐसा निद्रेने शक्ति हारिली ।
म्हणोनी झोपलो होतो कुणी आत्ताच जागवी ॥ ३३ ॥

चिरप्रजागरश्रान्तः - पुष्कळ दिवसांच्या जागरणाने दमून गेलेला असा - निद्रयापहतेन्द्रियः - झोपेमुळे ज्याची इन्द्रिये शिथिल झाली आहेत असा - अस्मिन् विजने कामं शये - ह्या एकांत प्रदेशात स्वस्थ झोपलो होतो - अधुना केन अपि उत्थापितः - आताच कोणाकडून तरी उठविला गेलो. ॥३३॥

पुष्कळ दिवसांचे जाग्रण झाल्याने मी थकलो होतो. माझ्या सर्व इंद्रियांची शक्ती झोपेने हिरावून घेतली होती. म्हणून या निर्जन ठिकाणी मनसोक्त झोप घेत होतो. आताच मला कोणी तरी उठविले. (३३)


सोऽपि भस्मीकृतो नूनं आत्मीयेनैव पाप्मना ।
अनन्तरं भवान् श्रीमान् लक्षितोऽमित्रशासनः ॥ ३४ ॥
अवश्य पूर्ण पापाने भस्म तो जाहला असे ।
शत्रुजित् तुमचे झाले पुन्हा दर्शन हे असे ॥ ३४ ॥

सः अपि - तो सुद्धा - नूनं - खरोखर - आत्मीयेन एव पाप्मना - स्वतःच्याच पापाने - भस्मीकृतः - भस्म केला गेला - अनंतरं - त्यानंतर - अमित्रशातनः श्रीमान् भवान् - शत्रूंचा नाश करणारा सर्वैश्वर्यसंपन्न असा तू - लक्षितः - दिसलास. ॥३४॥

खात्रीने त्याच्या पापानेच त्याला जाळून टाकले. त्यानंतर शत्रूंचा नाश करणार्‍या, परम सुंदर अशा आपण मला दर्शन दिलेत. (३४)


तेजसा तेऽविषह्येण भूरि द्रष्टुं न शक्नुमः ।
हतौजसा महाभाग माननीयोऽसि देहिनाम् ॥ ३५ ॥
वंदनीय तुम्ही जीवा तुमचे दिव्य तेज हे ।
पाहता शक्ति ती गेली तुम्हा पाहूहि ना शके ॥ ३५ ॥

महाभाग - हे भाग्यवंता - ते अविषह्येन तेजसा - तुझ्या असह्य तेजामुळे - भूरि द्रष्टुं न शक्नुमः - तुला पुष्कळ वेळ पहाण्यास आम्ही समर्थ नाही - हतौजसः (त्वं) - ज्याने दुसर्‍यांचे बळ नष्ट करून सोडिले आहे असा तू - देहिनां माननीयः असि - प्राण्यांनी मान देण्याजोगा आहेस. ॥३५॥

हे महाभागा ! सर्व प्राण्यांना आपण आदरणीय आहात. आपल्या असह्य तेजाने माझी शक्ती क्षीण झाली आहे. मी आपल्याला फार वेळ पाहू शकत नाही. (३५)


एवं सम्भाषितो राज्ञा भगवान् भूतभावनः ।
प्रत्याह प्रहसन् वाण्या मेघनादगभीरया ॥ ३६ ॥
मुचकुंद नृपे ऐसे वदता भाग्यवान् हरी ।
हासोनी मेघ वाणीने गंभीर शब्द बोलला ॥ ३६ ॥

एवं राज्ञा संभाषितः - याप्रमाणे राजा मुचुकुंदाकडून बोलला गेलेला - भूतभावनः भगवान् - प्राण्यांचे रक्षण करणारा श्रीकृष्ण - प्रहसन् - किंचित हसून - मेघनादगभीरया वाण्या प्रत्याह - मेघाप्रमाणे गंभीर असलेल्या वाणीने प्रत्युत्तर देता झाला. ॥३६॥

राजा मुचुकुंद असे म्हणाला, तेव्हा सर्व प्राण्यांचे जीवनदाते भगवान हसत हसत मेघध्वनीप्रमाणे गंभीर वाणीने त्याला म्हणाले. (३६)


श्रीभगवानुवाच -
जन्मकर्माभिधानानि सन्ति मेऽङ्ग सहस्रशः ।
न शक्यन्तेऽनुसङ्ख्यातुं अनन्तत्वान्मयापि हि ॥ ३७ ॥
भगवान् श्रीकृष्ण म्हणाले -
हजारो जन्म नी कर्म तेवढे मम नाम ते ।
अनंत सर्व ते तैसे मोजणे शक्य ते नसे ॥ ३७ ॥

अङग - हे राजा - मे जन्मकर्माभिधानानि - माझे जन्म, कर्मे व नावे - सहस्त्रशः सन्ति - हजारो आहेत - मया अपि हि - माझ्याकडून सुद्धा खरोखर - अनन्तत्वात् - अगणित असल्यामुळे - (तानि) अनुसंख्यातुं न शक्यन्ते - ती मोजिली जाणे शक्य नाही. ॥३७॥

श्रीभगवान म्हणाले - मुचुकुंदा ! माझे जन्म, कर्मे आणि नामे हजारो आहेत. ती अनंत असल्याने मीही त्यांची गणती करू शकत नाही. (३७)


क्वचिद् रजांसि विममे पार्थिवान्युरुजन्मभिः ।
गुणकर्माभिधानानि न मे जन्मानि कर्हिचित् ॥ ३८ ॥
पृथ्वीचे कणही कोणी मोजही शकतो कधी ।
न परी गुण कर्मा नी माझ्या जन्मा न मोजणे ॥ ३८ ॥

क्वचित् - एखादे प्रसंगी - उरुजन्मभिः - पुष्कळ जन्मांनी - (कश्चित्) पार्थिवानि रजांसि विममे - कोणी एखादा पृथ्वीचे परमाणु मोजील - गुणकर्माभिधानानि मे जन्मानि - गुण व कर्मे यांनी निरनिराळी नावे असणारे माझे जन्म - कर्हिचित् न - कधीहि मोजता येणार नाहीत. ॥३८॥

एखादा पुरुष आपल्या अनेक जन्मांमध्ये पृथ्वीवरील धुळीचे कण मोजू शकेल, परंतु माझे जन्म, गुण, कर्मे आणि नामे यांची कधीच गणती करू शकणार नाही. (३८)


कालत्रयोपपन्नानि जन्मकर्माणि मे नृप ।
अनुक्रमन्तो नैवान्तं गच्छन्ति परमर्षयः ॥ ३९ ॥
त्रिकालज्ञ असे सिद्ध सनकादिक संत जे ।
कर्म ते वर्णिती माझे परी ना थांग तो तया ॥ ३९ ॥

नृप - हे राजा - कालत्रयोपपन्नानि - तीनहि काळांनी प्राप्त झालेली - मे जन्मकर्माणि - माझे जन्म व कर्मे - अनुक्रमन्तः - क्रमाने वर्णन करणारे - परमर्षयः - मोठमोठे ऋषि - अन्तं न एव गच्छन्ति - त्यांच्या शेवटास जात नाहीत. ॥३९॥

हे राजा ! श्रेष्ठ ऋषीसुद्धा माझ्या तिन्ही कालांतील जन्म आणि कर्मांचे वर्णन करीत असतात, परंतु त्यांना त्यांचा अंत लागत नाही. (३९)


तथाप्यद्यतनान्यङ्ग शृणुष्व गदतो मम ।
विज्ञापितो विरिञ्चेन पुराहं धर्मगुप्तये ।
भूमेर्भारायमाणानां असुराणां क्षयाय च ॥ ४० ॥
अवतीर्णो यदुकुले गृह आनकदुन्दुभेः ।
वदन्ति वासुदेवेति वसुदेवसुतं हि माम् ॥ ४१ ॥
असेल जरि हे ऐसे तरी ते वर्तमानची ।
वर्णितो नाम नी कर्म ब्रह्म्याने प्रार्थिले मला ।
असुरा मारण्या तैसे धर्म रक्षावया इथे ॥ ४० ॥
तयांनी प्रार्थिता ऐसे यदुवंशात जन्मलो ।
वासुदेव असे नाम पुत्र मी वसुदेवचा ॥ ४१ ॥

अङग - हे राजा - तथापि - तरी सुद्धा - अद्यतनानि गदतः मम शृणुष्व - हल्लीची जन्मादि कर्मे सांगणार्‍या माझ्याकडून ती ऐक - पुरा अहं - पूर्वी मी - धर्मगुप्तये - धर्मरक्षणासाठी - च - आणि - भूमेः भारायमाणानां - आणि पृथ्वीला भारभूत झालेल्या - असुराणां क्षयाय - दैत्यांच्या नाशासाठी - विरिंचेन विज्ञापितः - ब्रह्मदेवाने प्रार्थिला असता - यदुकुले - यदुवंशात - आनकदुन्दुभेः गृहे - वसुदेवाच्या घरी - अवतीर्णः - उत्पन्न झालो - हि - त्यामुळे - वसुदेवसुतं मां - वसुदेवपुत्र अशा मला - वासुदेव इति वदन्ति - वासुदेव असे म्हणतात. ॥४०-४१॥

असे असूनही राजा ! मी आपला वर्तमान जन्म, कर्मे आणि नामे तुला सांगतो, ऐक ! धर्माचे रक्षण आणि पृथ्वीला भारभूत झालेल्या असुरांचा संहार करण्यासाठी पूर्वी ब्रह्मदेवांनी मला प्रार्थना केली होती. (४०) त्यानुसार मी यदुवंशामध्ये वसुदेवांच्या घरी अवतार ग्रहण केला आहे. मी वसुदेवांचा पुत्र असल्यामुळे लोक मला वासुदेव म्हणतात. (४१)


कालनेमिर्हतः कंसः प्रलम्बाद्याश्च सद्‌‍द्विषः ।
अयं च यवनो दग्धो राजंस्ते तिग्मचक्षुषा ॥ ४२ ॥
आता पर्यंत कंसादी कैक मी दुष्ट मारिले ।
मीच तो प्रेरिता दैत्य तुझ्या दृष्टीत भस्मला ॥ ४२ ॥

राजन् - हे मुचुकुंद राजा - कालनेमिः कंसः हतः - कालनेमि दैत्य हाच जो कंस तो मारिला गेला - च सद्‌द्विषः प्रलंबाद्याः हता - आणि साधूंचा द्वेष करणारे प्रलंबादिकहि मारिले गेले - च अयं यवनः - आणि हा कालयवन - ते तिग्मचक्षुषा दग्धः - तुझ्या तीक्ष्ण नेत्राने भस्म झाला ॥४२॥

आतापर्यंत मी कंसाच्या रूपाने जन्म घेतलेल्या कालनेमी, प्रलंब इत्यादी साधुद्रोही असुरांचा संहार केला आहे. राजन ! आणि हा कालयवन तुझी तीक्ष्ण दृष्टी पडताच भस्म झाला. (४२)


सोऽहं तवानुग्रहार्थं गुहामेतामुपागतः ।
प्रार्थितः प्रचुरं पूर्वं त्वयाहं भक्तवत्सलः ॥ ४२ ॥
कृपा ही करण्या आलो तुजला गुंफी मी असा ।
मला तू पूजिले खूप भक्तवत्सल मी असे ॥ ४३ ॥

सः अहं - तो मी - तव अनुग्रहार्थं - तुझ्यावर कृपा करण्यासाठी - एतां गुहां - ह्या गुहेत - उपागतः - आलो आहे - पूर्वं - पूर्वी - भक्तवत्सलः अहं - भक्तांवर प्रेम करणारा मी - त्वया - तुझ्याकडून - प्रचुरं प्रार्थितः - पुष्कळ प्रार्थिला गेलो होतो ॥४३॥

तोच मी, तुझ्यावर कृपा करण्यासाठी या गुहेत आलो आहे. तू भक्तवत्सल अशा माझी यापूर्वी फार आराधना केली आहेस. (४३)


वरान् वृणीष्व राजर्षे सर्वान् कामान् ददामि ते ।
मां प्रसन्नो जनः कश्चित् न भूयोऽर्हति शोचितुम् ॥ ४२ ॥
राजर्षी म्हणूनी माग लालसा पूर्ण मी करी ।
शरणी येइ जो त्याला मुळीच शोक तो नुरे ॥ ४४ ॥

राजर्षे - हे राजर्षे - वरान् वृणीष्व - वर माग - ते सर्वान् कामान् ददामि - तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करीन - मां प्रपन्नः कश्चित् जनः - मला शरण आलेला कोणीही मनुष्य - भूयः शोचितुं न अर्हति - पुनः दुःखात पडण्यास योग्य नाही ॥४४॥

म्हणून हे राजर्षे ! वर माग. तुझ्या सर्व इच्छा मी पूर्ण करीन. जो पुरुष मला शरण येतो, त्याला पुन्हा शोक करावा लागत नाही. (४४)


श्रीशुक उवाच -
इत्युक्तस्तं प्रणम्याह मुचुकुन्दो मुदान्वितः ।
ज्ञात्वा नारायणं देवं गर्गवाक्यं अनुस्मरन् ॥ ४५ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
वदता कृष्ण हे ऐसे मुचकुंद स्मरे मनीं ।
भविष्य गर्गवाणी ती कृष्णा वंदोनि प्रार्थि तो ॥ ४५ ॥

इति उक्तः मुदा अन्वितः मुचुकुन्दः - असे बोलला गेलेला व आनंदाने युक्त झालेला मुचुकुंद - गर्गवाक्यम् अनुस्मरन् - गर्गमुनींचे भाषण आठवून - तं नारायणं देवं ज्ञात्वा - त्याला भगवान विष्णु असे जाणून - प्रणम्य आह - नमस्कार करून म्हणाला ॥४५॥

श्रीशुक म्हणतात - भगवान श्रीकृष्ण जेव्हा असे म्हणाले, तेव्हा गर्गांच्या वाणीचे राजा मुचुकुंदाला स्मरण झाले आणि ते भगवान नारायण आहेत, हे जाणून अतिशय आनंदाने त्याने भगवंताच्या चरणांना प्रणाम केला आणि स्तुती केली.(४५)


श्रीमुचुकुन्द उवाच -
( मिश्र )
विमोहितोऽयं जन ईश मायया
     त्वदीयया त्वां न भजत्यनर्थदृक् ।
सुखाय दुःखप्रभवेषु सज्जते
     गृहेषु योषित् पुरुषश्च वञ्चितः ॥ ४६ ॥
( इंद्रवज्रा )
मुचकुंद म्हणाला -
मायेत सारे जग जोपले हे
     भवभ्रमाने भजती न पापी ।
सुखास इच्छोनि दुःखात जाती
     फसोनि जाती ललना पुरूष ॥ ४६ ॥

ईश - हे ईश्वरा - त्वदीयया मायया विमोहितः - तुझ्या मायेने मोहित झालेला - अनर्थदृक् अयं जनः - संसारावर दृष्टि ठेवणारे हे लोक - त्वां न भजति - तुझे सेवन करीत नाहीत - वञ्चितः योषित् पुरुषः च - संसारात फसलेले स्त्रीपुरुष - दुःखप्रभवेषु गृहेषु - दुःखोत्पादक अशा घरांच्या ठिकाणी - सुखाय - सुखासाठी - सज्जते - आसक्ती ठेवितात. ॥४६॥

मुचुकुंद म्हणाला - हे प्रभो ! जगातील सर्व प्राणी आपल्या मायेने अत्यंत मोहीत होऊन राहिले आहेत. ते आपल्याला न भजल्याने अनर्थ होतो, हे जाणूनही आपले भजन करीत नाहीत. ते सुखासाठी सर्व दुःखांचे मूळ असलेल्या घरादारांत आसक्त होतात. अशा तर्‍हेने स्त्रिया आणि पुरुष परमार्थाला मुकतात. (४६)


लब्ध्वा जनो दुर्लभमत्र मानुषं
     कथञ्चिद् अव्यङ्गमयत्‍नतोऽनघ ।
पादारविन्दं न भजत्यसन्मतिः
     गृहान्धकूपे पतितो यथा पशुः ॥ ४७ ॥
संसार पापो तुजला शिवेना
     हा देह पूर्णो भजनास चांग ।
संसारि सारे विषयात गुंग
     ना जो भजे तो तृणकूपि जातो ॥ ४७ ॥

अनघ - हे निष्पाप राजा - जनः अत्र - प्राणी ह्या लोकी - अव्यङ्‌गम् दुर्लभं मानुषं (जन्म) - सर्वावयवसंपन्न असा दुर्लभ मनुष्य जन्म - कथंचित् - कसाबसा - अयत्‍नतः लब्ध्वा - सहज मिळवून - असन्मतिः - दुष्टबुद्धि होऊन - यथा गृहान्धकूपे पतितः पशुः (तथा) - पशूप्रमाणे गृहरूपी अंधकारमय खोल विहिरीत पडून - (भगवतः) पादारविन्दं न भजति - भगवंताच्या चरणकमलाला सेवीत नाही. ॥४७॥

हे पुण्यशील प्रभो ! या कर्मभूमीत दुर्लभ असा निर्दोष मनुष्यजन्म कसाबसा अनायासे मिळूनही दुर्बुद्धी मनुष्य, पशूप्रमाणे संसाररूप अंधार्‍या विहिरीत पडून राहा्तो आणि भगवंताच्या चरणकमलांची उपासना करीत नाही. (४७)


ममैष कालोऽजित निष्फलो गतो
     राज्यश्रियोन्नद्धमदस्य भूपतेः ।
मर्त्यात्मबुद्धेः सुतदारकोशभू
     ष्वासज्जमानस्य दुरन्तचिन्तया ॥ ४८ ॥
मी मत्त होतो धनवंत राजा
     मी मर्त्य देहा समजेचि आत्मा ।
लोभात होई मज सर्व चिंता
     असेचि गेले वय सर्व व्यर्थ ॥ ४८ ॥

अजित - हे श्रीकृष्णा - राज्यश्रिया उन्नद्धमदस्य - राज्यैश्वर्याने वाढलेला आहे मद ज्याचा अशा - मर्त्यात्मबुद्धेः - देहालाच आत्मा समजणार्‍या - दुरन्तचिन्तया (मायया) - जिचे चिन्तन करणे कठीण आहे अशा मायेने - सुतदारकोशभूषु - पुत्र, स्त्रिया, द्रव्यभांडार व राज्य ह्यांच्या ठिकाणी - आसज्जमानस्य - आसक्त होणार्‍या - भूपतेः मम - राजा अशा माझा - एषः कालः निष्फलः गतः - हा काळ फुकट गेला. ॥४८॥

हे भगवान ! मी राजा होतो. राज्यलक्ष्मीच्या गर्वाने उन्मत्त झालेल्या या शरीरालाच आत्मा मानणार्‍या आणि पुत्र, पत्‍नी, खजिना तसेच पृथ्वीच्या लोभामध्येच गुंतलेल्या व त्यांचीच अखंड चिंता करणार्‍या माझ्या जीवनाचा हा अमूल्य समय अगदीच व्यर्थ गेला. (४८)

विवरण :- पूर्वजन्मीच्या चांगल्या-वाईट कृत्यांचे फळ या जन्मी मिळते याचे उदाहरण मुचकुंदाच्या रूपाने इथे दिसते. त्याने केलेल्या परमेश्वरभक्तीचे फळ त्याला प्रत्यक्ष परमेश्वरदर्शनाने आता मिळाले. तेव्हा भगवंतांची स्तुती करताना तो म्हणाला, 'जन्म-मरणाच्या कित्येक फेर्‍यातून फिरल्यानंतर एकदा कधीतरी मनुष्य जन्म मिळतो. त्यावेळी परमेश्वरभक्ती करून त्याच्या चरणी स्थान मिळवावयाचे सोडून मनुष्य माया-मोहात गुरफटतो आणि संसाररूपी खोल अंध विहीरीत पडतो. जेथून त्याची सुटका होणे अशक्य. या विहिरीतून काही प्राप्त होईल, या लोभाने तो चाचपडत राहतो. पण त्याला काहीच प्राप्त होत नाही, उलट स्वतःची ओळखहि न पटल्याने तो आपले अस्तित्व विसरून जातो आणि दुःखाच्या, अज्ञानाच्या सागरात गटांगळ्या खात रहातो.' (४७-४८)



कलेवरेऽस्मिन् घटकुड्यसन्निभे
     निरूढमानो नरदेव इत्यहम् ।
वृतो रथेभाश्वपदात्यनीकपैः
     गां पर्यटंस्त्वागणयन्सुदुर्मदः ॥ ४९ ॥
हा देह जैसा घट मृत्तिकेचा
     मी तो स्वताला नरदेव मानी ।
मदांध ऐसा नच आत्मज्ञानी
     सेनेसवे या फिरलो जगात ॥ ४९ ॥

घटकुडयसंनिभे अस्मिन् कलेवरे - मातीचे भांडे किंवा मातीची भिंत ह्यासारख्या शरीरामध्ये - नरदेवः इति निरूढमानः - राजा म्हणून निवास करणारा - सुदुर्मदः अहं - मदोन्मत्त असा मी - रथेभाश्वपदात्यनीकपैः वृतः - रथ, हत्ती, घोडेस्वार व पायदळ ह्या चतुरंगसैन्याने वेष्टिलेला - त्वा अगणयन् - तुला न जुमानता - गां पर्यटन् (अस्मि) - पृथ्वीवर भटकत आहे. ॥४९॥

मातीचा घडा किंवा भिंतीप्रमाणे असलेले हे शरीर, यालाच मी राजा समजलो होतो. अशा प्रकारे मदांध होऊन मी आपली पर्वा न करता रथ, हत्ती, घोडे, पायदळ आणि सेनापती यांना बरोबर घेऊन या पृथ्वीवर इकडे तिकडे फिरत राहिलो. (४९)


प्रमत्तमुच्चैरितिकृत्यचिन्तया
     प्रवृद्धलोभं विषयेषु लालसम् ।
त्वमप्रमत्तः सहसाभिपद्यसे
     क्षुल्लेलिहानोऽहिरिवाखुमन्तकः ॥ ५० ॥
सोडी धरी कर्म अशाच चिंतीं
     प्रमत्त होता तुज ना स्मरे जो ।
त्यां काळ येतो हळुची लपोनी
     उंदीर खाया ज‍इ सर्प येतो ॥ ५० ॥

इति कृत्यचिन्तया प्रवृद्धलोभं - अशा कार्यविषयक चिंतनाने ज्याचा लोभ वाढला आहे अशा - विषयेषु लालसं - विषयांच्या ठिकाणी आसक्ति ठेवणार्‍या - उच्चैः प्रमत्तं - अत्यंत मदोन्मत्त झालेल्या - अप्रमत्तः - सावधपणाने वागणारा - अन्तकः त्वं - कालस्वरूपी तू - क्षुल्लेलिहानः अहिः आखुम् इव - क्षुधित होऊन जिभा चाटणारा सर्प जसा उंदराजवळ तसा - सहसा अभिपद्यते - एकाएकी प्राप्त होतोस. ॥५०॥

निरनिराळ्या कामांच्या चिंतेत पाहून बेसावध असलेल्या, विषयासक्त माणसाला नित्य सावध असणारे कालरुप आपण अचानक पकडता. जसा भुकेने व्याकुळ झालेला साप जीभ हालवीत बेसावध उंदराला पकडतो. (५०)

विवरण :- आतापर्यंतचे आपले आयुष्य ईश्वरभक्तीशिवाय कसे फुकट गेले, याबद्दल पश्चात्ताप व्यक्त करताना मुचकुंद म्हणतो, संपत्ती आणि ऐहिक ऐश्वर्य यामध्ये बुडालेला मी, त्यातच रममाण व्हावयाचे असते, अशा मिथ्या समाधानात राहिलो. माझ्या बुद्धीवर पडदा आला. अज्ञानाच्या या धुंदीतच असताना काळसर्प माझ्यासारख्या क्षुद्र उंदराला गिळायला जिभळ्या चाटत येतो आहे, याचाच मला विसर पडला. मला जर भक्तीने आत्मज्ञान झाले असते, तर माझी अशी अवस्था झाली नसती. (दोनहि श्लोकांमध्ये मुचकुंदाने वर्णन केलेली आपली अवस्था या श्लोकाप्रमाणे सर्वांनाच लागू पडते.) 'योनेः सहस्राणि बहूनि गत्वा, दुःखेन लब्ध्वापिच मानुषत्वम् । सुखावहं ये न भजन्ति विष्णुं ते वै मनुष्यात्मनि शत्रुभूताः ॥' (५०)



पुरा रथैर्हेमपरिष्कृतैश्चरन्
     मतंगजैर्वा नरदेवसंज्ञितः ।
स एव कालेन दुरत्ययेन ते
     कलेवरो विट्कृमिभस्मसंज्ञितः ॥ ५१ ॥
गजावरी वा रथि बैसल्याने
     वदोत तेंव्हा नृपती कुणी ते ।
जाता मरोनी मग घाण राही
     जाळोनि देता मग राख राही ॥ ५१ ॥

(यः) कलेवरः - जो देह - पुरा - पूर्वी - नरदेवसंज्ञितः - राजा हे नाव असलेला - हेमपरिष्कृतैः रथैः - सुवर्णानी भूषविलेल्या रथात बसून - वा मतङगजैः - किंवा हत्तीवर बसून - चरन् (आसीत्) - संचार करीत असे - सः एव - तोच देह - ते दुरत्ययेन कालेन - तुझ्या अविनाशी काळाने - विट्‌कृमिभस्मसंज्ञितः (भवति) - किडे, विष्ठा व भस्म ह्या नावाला प्राप्त होतो.॥५१॥

जो आधी सोन्याचा रथावर किंवा मोठमोठ्या हत्तींवर बसून जात असे आणि स्वतःला राजा म्हणवीत असे, तेच शरीर नंतर आपल्या अटळ काळामुळे विष्ठा, किडे किंवा राखेचा ढीग बनते. (५१)

विवरण :- तीनही जगाचा स्वामी असलेल्या, शृंगारलेल्या मनुष्यप्राण्याच्या या शरीरातून एकदा प्राणपक्षी उडून गेला, की त्या अचेतन कलेवराला शून्य किंमत. (निष्प्राण देह पडला, श्रमहि निमाले. अशी अवस्था) मग तो राजा असो किंवा आणखी कोणी. जिवंतपणी त्याला आदराने नमस्कार करणारे त्याच्याकडे पहातहि नाहीत. त्याचे शरीर कोल्ह्या-कुत्र्याचे भक्ष्य होते. म्हणूनच या नश्वर शरीराचा मोह धरणे, परमेश्वराकडे पूर्ण पाठ फिरविणे म्हणजे अज्ञान नाही तर काय ? (५१)



निर्जित्य दिक्चक्रमभूतविग्रहो
     वरासनस्थः समराजवन्दितः ।
गृहेषु मैथुन्यसुखेषु योषितां
     क्रीडामृगः पूरुष ईश नीयते ॥ ५२ ॥
सिंहासनासी बसता नरेश
     ते वीर मोठे नमिती तयाला ।
भोगावया जाय स्त्रियेस तेंव्हा
     वागे जणू तो पशु पाळलेला ॥ ५२ ॥

ईश - हे श्रीकृष्णा - दिक्चक्रं निर्जित्य - दिग्मंडळ जिंकून - अभूतविग्रहः - विग्रह झालेला असा - वरासनस्थः - उच्चासनावर बसलेला - समराजवन्दितः - बरोबरीच्या राजांनी वंदिलेला - मैथुन्यसुखेषु - स्त्रीसंभोगाचे सुख ज्यात आहे अशा - गृहेषु - घरांच्या ठिकाणी - पुरुषः - प्राणी - योषितां क्रीडामृगः नीयते - स्त्रियांचा खेळण्याचा पशुच असा बनविला जातो.॥५२॥

हे प्रभो ! ज्याने सर्व दिशांवर विजय प्राप्त केला आहे आणि ज्याच्याशी लढणारा जगात कोणीही राहिला नाही, जो श्रेष्ठ सिंहासनावर बसतो आणि बरोबरीचे राजे ज्याच्या चरणांवर नम्र होतात, तोच पुरुष जेव्हा स्त्रियांकडे विषयमुख भोगण्यासाठी जातो, तेव्हा तो त्यांच्या हातचे खेळणे बनतो. (५२)


करोति कर्माणि तपःसुनिष्ठितो
     निवृत्तभोगस्तदपेक्षया ददत् ।
पुनश्च भूयेयमहं स्वराडिति
     प्रवृद्धतर्षो न सुखाय कल्पते ॥ ५३ ॥
कोणी त्यजोनी विषयी सुखाला
     पुनश्च राज्यादिक इच्छितात ।
पुनश्च जन्मे बहु पुण्य इच्छी
     ना हो सुखी तो दृढ भोग होती ॥ ५३ ॥

तपस्सु निष्ठितः - तपश्चर्या करणारा - निवृत्तभोगः - जितेंद्रिय - तदपेक्षया ददत् - भोगेच्छेनेच दानधर्म करणारा - पुनः च अहं स्वराट्‌ भूयेयम् - पुनः आणखी मी इंद्र होईन - इति प्रवृद्धतर्षः - अशी ज्याची इच्छा वाढली आहे असा - कर्माणि करोति - कर्मे करितो - सुखाय न कल्पते - पण सुख मिळण्यास समर्थ होत नाही. ॥५३॥

एखादा मनुष्य विषयभोगांचा त्याग करून पुन्हा आपण सम्राट व्हावे, या इच्छेने दानादि पुण्ये, तपश्चर्या किंवा सत्कर्मे करतो, परंतु ज्याची तृष्णा वाढलेली असते, तो कधीच सुखी होऊ शकत नाही. (५३)

विवरण :- 'निवृत्तभोगः' आणि 'प्रवृद्धतर्षः' हे दोन शब्द इथे महत्त्वाचे. तरुणपणी ऐश्वर्य, भोग भोगून झाल्यानंतर वृद्धपणी व्रत, तप इत्यादीच्या मार्गाने भक्ती करणे चुकीचे. कारण ते सर्व सहेतुक, असेच ऐश्वर्य पुढील जन्मातहि मिळावे, या इच्छेने केलेली ही भक्ती. त्यामुळे असे करणारा जन्म-मरणाच्या फेर्‍यात अडकून फिरत रहातो. त्याचा लोभ कमी न होता वाढतच रहातो. म्हणून निर्हेतुक, निष्काम भक्तीच मनुष्याला मुक्ती देते, हे त्याने लक्षात ठेवावे. (५३)



भवापवर्गो भ्रमतो यदा भवेत्
     जनस्य तर्ह्यच्युत सत्समागमः ।
सत्सङ्गमो यर्हि तदैव सद्‌गतौ
     परावरेशे त्वयि जायते मतिः ॥ ५४ ॥
संसारचक्री जिव हा फिरे की
     मुक्त्यर्थ होतो मग संतसंग ।
संताश्रयो तू जगि एकटा नी
     क्षणात लाभे त‍इ ध्यान चित्ता ॥ ५४ ॥

अच्युत - हे श्रीकृष्णा - यदा - जेव्हा - भ्रमतः जनस्य - भ्रमण करणार्‍या प्राण्याचा - भवापवर्गः - संसारबंधनापासून मोक्ष - भवेत् - होईल - तर्हि एव - तेव्हाच - सत्समागमः (स्यात्) - साधूंची संगति प्राप्त होईल - यर्हि सत्संगमः (भवति) - जेव्हा साधूंचा समागम होतो - तदा एव - त्याच वेळी - सद्‌गतौ परावरेशे त्वयि - साधूंना सद्‌गति देणार्‍या सर्वश्रेष्ठ अशा तुझ्या ठिकाणी - मतिः जायते - बुद्धि उत्पन्न होते. ॥५४॥

हे भगवंता ! जन्म मृत्युरूप संसाराच्या चक्रात भटकणार्‍या जीवाची त्या चक्रातून बाहेर पडण्याची जेव्हा वेळ येते, तेव्हा त्याला सत्संग प्राप्त होतो आणि जेव्हा सत्संग प्राप्त होतो, त्याचवेळी संतांचे आश्रय, कार्य कारणरूप जगताचे एकमात्र स्वामी असलेल्या आपल्या ठिकाणी जीवाची बुद्धी स्थिर होते. (५४)

विवरण :- जेव्हा मनुष्याची जन्म-मरणाच्या फेर्‍यातून सुटका होण्याची वेळ येते, तेव्हा त्याला सत्संग लाभतो. त्यामुळे त्याचे ध्यान परमात्म्याकडे लागते आणि सुखोपभोगांपेक्षा तो मोक्षप्राप्तीची इच्छा करतो. (५४)



मन्ये ममानुग्रह ईश ते कृतो
     राज्यानुबन्धापगमो यदृच्छया ।
यः प्रार्थ्यते साधुभिरेकचर्यया
     वनं विविक्षद्‌भिरखण्डभूमिपैः ॥ ५५ ॥
अनायसे राज्यहि सर्व गेले
     तेणेचि झाले तव दर्शनो हे ।
साधुस्वभावी नृपती त्यजोनी
     राज्यादिकाते, तुज ते पुजीती ॥ ५५ ॥

ईश - हे श्रीकृष्णा - यः - जो - वनं विविक्षद्‌भिः - अरण्यात जाण्याची इच्छा करणार्‍या - अखण्डभूमिपैः - पुष्कळ काळपर्यंत अविछिन्न राज्य करणार्‍या - साधुभिः - जनकासारख्या साधूंकडून - एकचर्यया - एकांत भक्तीच्या योगे - प्रार्थ्यते - प्रार्थिला जातो - (सः) राज्यानुबन्धापगमः - असा तो राज्यसंबंधाचा विरह हा - ते यदृच्छया कृतः मम अनुग्रहः (अस्ति) - तू सहजगत्या केलेला माझ्यावरील उपकार होय - (इति) मन्ये - असे मी मानितो. ॥५५॥

भगवन ! मी तर असे समजतो की, आपण माझ्यावर कृपेचा वर्षाव केला आहे. कारण अनासक्त लोकसुद्धा फक्त त्याचीच प्रार्थना करीत असतात. (५५)


न कामयेऽन्यं तव पादसेवनाद्
     अकिञ्चनप्रार्थ्यतमाद्वरं विभो ।
आराध्य कस्त्वां ह्यपवर्गदं हरे
     वृणीत आर्यो वरमात्मबन्धनम् ॥ ५६ ॥
हे अंतरातात्मा तुज काय बोलू
     सेवेविना ना मुळि कांहि इच्छी ।
निस्पृह तेची भजती तुला नी
     त्यजोनि भोगा मग कोण मागे ॥ ५६ ॥

विभो हरे - हे समर्थ श्रीकृष्णा - अकिंचनप्रार्थ्यतमाम् - श्रेष्ठ सत्पुरुषांनी अत्यंत प्रार्थना केल्या जाणार्‍या - तव पादसेवनात् - तुझ्या पादसेवेहून - अहं अन्यं वरं न कामये - मी दुसरा वर इच्छित नाही - हि - कारण - कः आर्यः - कोणता जाणता पुरुष - अपवर्गदं त्वां आराध्य - मोक्ष देणार्‍या तुझी आराधना करून - आत्मबंधनं वरं वृणीत - आत्म्याला बंधन करणारा वर मागून घेईल. ॥५६॥

हे भगवान ! मोक्ष देणार्‍या आपली आराधना करून कोणता शहाणा मनुष्य़ आपल्याला बांधणार्‍या संसारातील विषयांचा वर मागेल बरे ! (५६)


तस्माद् विसृज्याशिष ईश सर्वतो
     रजस्तमःसत्त्वगुणानुबन्धनाः ।
निरञ्जनं निर्गुणमद्वयं परं
     त्वां ज्ञाप्तिमात्रं पुरुषं व्रजाम्यहम् ॥ ५७ ॥
म्हणोनि देवा गुण तोडुनीया
     मायाविना हे मन शुद्ध राहो ।
निरंजना निर्गुण तू पवित्र
     मी या रुपाच्या शरणार्थ आलो ॥ ५७ ॥

ईश - हे श्रीकृष्णा - रजस्तमःसत्त्वगुणानुबन्धनाः - रजोगुण, तमोगुण व सत्त्वगुण ह्यांना अनुसरणारे - आशिषः सर्वतः विसृज्य - भोग सर्वस्वी सोडून - निरञ्जनं निर्गुणं अद्वयं - निष्कलंक, निर्गुण व द्वैतरहित - ज्ञप्तिमात्रं परं पुरुषं त्वां - केवळ ज्ञानस्वरूपी श्रेष्ठ पुरुष अशा तुला - अहं व्रजामि - मी शरण आलो आहे. ॥५७॥

म्हणून हे प्रभो ! सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण यांच्याशी संबंध ठेवणार्‍या सर्व कामना सोडून मी फक्त, मायेशी किंचितही संबंध नसलेल्या, गुणातीत, अद्वितीय, चित्स्वरूप, परमपुरुष अशा आपणांस शरण आलो आहे. (५७)


( मालिनी )
चिरमिह वृजिनार्तः तप्यमानोऽनुतापैः
     अवितृषषडमित्रोऽलब्धशान्तिः कथञ्चित् ।
शरणद समुपेतः त्वत्पदाब्जं परात्मन्
     अभयमृतमशोकं पाहि मापन्नमीश ॥ ५८ ॥
( मालिनी )
बहुत दिन फळाते भोगितो आर्त होता
     कधि अरि-विषयो ते शांत ना हो पहा की ।
शरण चरणि आलो जेथ ना मृत्यु भेय
     मज हरि करि कृपा रक्षि स्वामी भवात ॥ ५८ ॥

शरणद परात्मन् ईश - हे शरण आलेल्यांना आश्रय देणार्‍या परमात्म्या श्रीकृष्णा - इह - येथे - वृजिनार्तः - पापाने पीडिलेला - अनुतापैः चिरं तप्यमानः - पश्चात्तापाने नेहमी संतप्त होणारा - अवितृषषडमित्रः - ज्यांची इच्छा नष्ट झाली नाही व जे कामक्रोधादि सहा शत्रु आहेत ज्याला असा - कथंचित् अलब्धशांतिः - ज्याला कोणत्याहि उपायाने शांति मिळाली नाही असा - अभयं अमृतं अशोकं - निर्भय मृत्यूला नष्ट करणार्‍या व शोकाचा नाश करणार्‍या - त्वत्पदाब्जं - तुझ्या चरणकमळाला - समुपेतः (अस्मि) - प्राप्त झालो आहे - आपन्नं मा पाहि - शरण आलेल्या अशा माझे रक्षण कर. ॥५८॥

भगवन ! अनादि काळापासून मी या जगात आपल्या कर्मफळांच्या भोगाने त्रस्त झालो आहे. पुन्हा त्यांच्या वासनांनी तप्त झालो आहे. माझ्या इंद्रियरूप सहा शत्रूंची हाव कधीही संपत नाही. त्यामुळे मला क्षणभरसुद्धा शांती मिळत नाही. म्हणून आत्मज्ञान करुन देणार्‍या हे प्रभो ! आता मी आपल्या निर्भय, सत्यरूप आणि शोकरहित चरणकमलांना शरण आलो आहे. आपण माझे रक्षण करा. (५८)


श्रीभगवानुवाच -
( अनुष्टुप् )
सार्वभौम महाराज मतिस्ते विमलोर्जिता ।
वरैः प्रलोभितस्यापि न कामैर्विहता यतः ॥ ५९ ॥
( अनुष्टुप् )
भगवान् श्रीकृष्ण सांगतात -
सार्वभौम महाराजा तुमची उच्च ती मती ।
प्रलोभन तुम्हा देता न त्यात गुंतले तुम्ही ॥ ५९ ॥

सार्वभौ‍म महाराज - हे सार्वभौ‍म मुचुकुन्दराजा - ते मतिः - तुझी बुद्धि - विमला च ऊर्जिता (अस्ति) - निष्पाप व प्रौढ आहे - यतः - कारण - वरैः प्रलोभितस्य अपि (सा) - वरांनी लोभविलेल्याहि तुझी ती बुद्धि - कामैः न विहता - वासनांनी नाश पावली नाही. ॥५९॥

श्रीकृष्ण म्हणाले - हे सार्वभौम महाराजा ! तुझी बुद्धी, अतिशय पवित्र आणि उच्च कोटीची आहे. मी तुला वर देण्याचे वारंवार प्रलोभन दाखविले, तरीसुद्धा ती कामनांनी चळली नाही. (५९)


प्रलोभितो वरैर्यत्त्वं अप्रमादाय विद्धि तत् ।
न धीरेकान्तभक्तानां आशीर्भिः भिद्यते क्वचित् ॥ ६० ॥
परीक्षा घेतली तैशी अनन्य भक्त जाहला ।
भक्तांची बुद्धि ती कोठे अन्यत्र भटकेच ना ॥ ६० ॥

त्वं यत् वरैः प्रलोभितः - तुला जो मी वरांचा लोभ दाखविला - तत् अप्रमादाय विद्धि - तो तुझ्या हातून असल्या चुका घडू नयेत म्हणून होय असे जाण - मयि एकभक्तानां धीः - माझ्या ठिकाणी एकनिष्ठ भक्ति करणार्‍यांची बुद्धि - आशीर्भिः क्वचित् न भिद्यते - भोगांच्या इच्छांनी कधीहि मोह पावत नाही. ॥६०॥

मी तुला जे वर देण्याचे प्रलोभन दाखविले, ते फक्त तुझ्या निश्चयाची परीक्षा घेण्यासाठी ! माझे जे अनन्य भक्त असतात, त्यांची बुद्धी कामनांमुळे कधीही सैरभैर होत नाही. (६०)


युञ्जानानां अभक्तानां प्राणायामादिभिर्मनः ।
अक्षीणवासनं राजन् दृश्यते पुनरुत्थितम् ॥ ६१ ॥
भक्त जे नसती त्यांचे प्राणायाम करोनिया ।
न राही रोधिल्या चित्त विषयी गुंतते पुन्हा ॥ ६१ ॥

राजन् - हे मुचुकुन्दा - प्राणायामादिभिः मनः युञ्जानानां अभक्तानां (तत्) - प्राणायामादि अष्टांग योगांनी मन ताब्यात ठेवणार्‍या परंतु माझी भक्ति न करणार्‍या योग्यांचे ते मन - अक्षीणवासनं पुनरुत्थितं दृश्यते - ज्याच्या वासना नष्ट झाल्या नाहीत असे पुनः विषयांकडे उठून धावणारे असे दिसते. ॥६१॥

जे लोक माझे भक्त नाहीत, ते प्राणायम इत्यादी साधनांनी मनाला वश करण्याचा कितीही प्रयत्‍न करोत, त्यांच्या वासना क्षीण होत नाहीत आणि हे राजन ! त्यांचे मन विषयांसाठी पुन्हा उचल खाते. (६१)


विचरस्व महीं कामं मय्यावेशितमानसः ।
अस्त्वेवं नित्यदा तुभ्यं भक्तिर्मय्यनपायिनी ॥ ६२ ॥
अर्पावे मजला चित्त फिरावे पृथिवीवरी ।
वासना शून्य नी शुद्ध मिळेल मम भक्ति ती ॥ ६२ ॥

मयि आवेशितमानसः (त्वं) - माझ्या ठिकाणी ठेविले आहे मन ज्याने असा तू - कामं महीं विचरस्व - यथेच्छ पृथ्वीवर हिंड - तुभ्यं - तुझी - मयि एव - माझेच ठिकाणी - अनपायिनी भक्तिः नित्यदा अस्तु - अविनाशी भक्ति नेहमी असो. ॥६२॥

तू आपले मन माझे ठिकाणी लाव आणि खुशाल पृथ्वीवर राहा. तुझी अखंड भक्ती नेहमी माझ्या ठिकाणी राहो. (६२)

विवरण :- 'वर माग' असे भगवंतानी मुचकुंदास सांगूनहि त्याने ऐहिक सुखोपभोगासारख्या कोणत्याच गोष्टीची अपेक्षा न करता फक्त परमेश्वरचरणी आश्रय मागितला, हे त्याच्या एकूण व्यक्तिमत्वाला धरूनच होते. या आधी जे त्याने असुरांपासून देवांचे रक्षण केले होते, तेही आपल्या परिवार-राज्यादि गोष्टी सर्व काही विसरून, आपले सर्वस्व अर्पण करून, अशारीतीने वैयक्तिक सुखाबद्दल निरभिलाष असणारा तो परमेश्वराकडे मोक्षाखेरीज आणखी काही मागेल, हे अपेक्षित नव्हतेच. (हे सर्व जाणूनहि कदाचित त्याची आणखी परीक्षा घेण्यासही भगवंतांनी त्यास वर मागण्यास सांगितले असावे.) (६२)



क्षात्रधर्मस्थितो जन्तून् न्यवधीर्मृगयादिभिः ।
समाहितस्तत्तपसा जह्यघं मदुपाश्रितः ॥ ६३ ॥
क्षत्रिय असता केली शिकार वधिले पशू ।
करावे ध्यान ते माझे पापां धूउनि काढणे ॥ ६३ ॥

क्षात्रधर्मस्थितः - क्षत्रियधर्माने वागून - मृगयादिभिः जन्तून् न्यवधीः - मृगयादिकांनी तू प्राण्यांचा वध केलास - तत् - म्हणून - तपसा समाहितः (भूत्वा) - तपश्चर्येने स्वस्थ अंतःकरणाचा होऊन - मदुपाश्रितः अघं जहि - माझा आश्रय करून पापाचा नाश कर. ॥६३॥

क्षत्रियधर्माचे आचरण करतेवेळी तू शिकार इत्यादी करताना जो पुष्कळ प्राण्यांचा वध केलास, त्याचे पाप आता एकाग्रचित्ताने माझी उपासना करीत तपश्चर्येने धुऊन टाक. (६३)


जन्मन्यनन्तरे राजन् सर्वभूतसुहृत्तमः ।
भूत्वा द्विजवरस्त्वं वै मामुपैष्यसि केवलम् ॥ ६४ ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां दशमस्कन्धे उत्तरार्धे मुचकुंदस्तुतिर्नाम एकपञ्चाशत्तमोऽध्यायः ॥ ५१ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
राजे हो पुढल्या जन्मी होताल द्विज उत्तम ।
हितैषी सर्व जीवांचे सुहृद् माझेचि व्हाल तै ॥ ६४ ॥
॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर एकावन्नावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

राजन् - हे राजा - अनन्तरे जन्मनि - पुढील जन्मी - सर्वभूतसुहृत्तमः - सर्व प्राण्याचा श्रेष्ठ मित्र असा - द्विजवरः भूत्वा - श्रेष्ठ ब्राह्मण होऊन - त्वं केवलं माम् उपेष्यसि वै - तू अद्वितीय व मुख्य अशा माझ्या ठिकाणी खरोखर प्राप्त होशील. ॥६४॥

राजन ! पुढच्या जन्मी तू ब्राह्मणकुळात जन्माला येशील आणि सर्व प्राण्यांचा परम सुहृद होशील आणि मला परमात्म्यालाच प्राप्त होशील. (६४)


अध्याय एकावन्नावा समाप्त

GO TOP