|
श्रीमद् भागवत पुराण रामकृष्णयोर्जरासन्धेन सह युद्धं, द्वारकादुर्गनिर्माणंच - जरासंधाशी युद्ध आणि द्वारकेची निर्मिती - संहिता - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् ) अस्तिः प्राप्तिश्च कंसस्य महिष्यौ भरतर्षभ । मृते भर्तरि दुःखार्ते ईयतुः स्म पितुर्गृहान् ॥ १ ॥
( अनुष्टुप् ) श्रीशुकदेव सांगतात - अस्ति नी प्राप्ति या दोघी कंसराण्या परीक्षिता । पतीनिधनदुःखाने पित्याच्या घरी पातल्या ॥ १ ॥
भरतर्षभ - हे भरतश्रेष्ठा परीक्षित राजा - अस्तिः प्राप्तिः च (इति) - अस्ति व प्राप्ति अशा - कंसस्य महिष्यौ (आस्ताम्) - कंसाच्या दोन पट्टराण्या होत्या - भर्तरि मृते (सति) - पति मरण पावला असता - दुःखार्ते (ते) - दुःखाने व्याकुळ झालेल्या त्या दोघी - पितुः गृहान् ईयतुः स्म - पित्याच्या घरी गेल्या. ॥१॥
श्रीशुकाचार्य म्हणतात - अस्ती आणि प्राप्ती अशा कंसाच्या दोन राण्या होत्या. पतीच्या मृत्युने दुःखी झालेल्या त्या वडिलांच्या घरी गेल्या. (१)
पित्रे मगधराजाय जरासन्धाय दुःखिते ।
वेदयां चक्रतुः सर्वं आत्मवैधव्यकारणम् ॥ २ ॥
पिता मगधराजा तो जरासंधास दुःख ते । वदल्या विधवा होण्या सकारण प्रसंग तो ॥ २ ॥
दुःखिते (ते) - दुःखित झालेल्या त्या दोघी - पित्रे मगधराजाय जरासंधाय - पिता जो मगध देशाचा राजा जरासंध त्याला - सर्वम् आत्मवैधव्यकारणम् - स्वतःच्या वैधव्याचे सर्व कारण - वेदयांचक्रतुः - सांगत्या झाल्या. ॥२॥
मगधराज जरासंध हे त्यांचे वडील. त्यांनी दुःखी अंतःकरणाने त्यांना आपल्या वैधव्याचे कारण सांगितले. (२)
स तद् अप्रियमाकर्ण्य शोकामर्षयुतो नृप ।
अयादवीं महीं कर्तुं चक्रे परममुद्यमम् ॥ ३ ॥
शोकाकुल पिता झाला क्रोधाने पेटला पुन्हा । ठरवी यदुवंशाला युद्धात संपवावया ॥ ३ ॥
नृप - हे राजा - सः - तो जरासंध - तत् अप्रियम् आकर्ण्य - ती दुःखकारक वार्ता ऐकून - शोकामर्षयुतः - शोक व क्रोध ह्यांनी युक्त होऊन - महीं अयादवीं कर्तुं - पृथ्वी यादवरहित करण्यासाठी - परमम् उद्यमम् चक्रे - मोठा उद्योग करिता झाला. ॥३॥
परीक्षिता ! ही अप्रिय बातमी ऐकून जरासंधाला दुःख झाले. परंतु नंतर त्याने क्रोधाने पृथ्वी यादवरहित करण्याचा निश्चय करून युद्धाची जंगी तयारी केली. (३)
अक्षौहिणीभिर्विंशत्या तिसृभिश्चापि संवृतः ।
यदुराजधानीं मथुरां न्यरुणत् सर्वतो दिशम् ॥ ४ ॥
तेविस् अक्षौहिणी सैन्य आणिले मथुरेस नी । राजधानी यदुंची ती चौबाजू घेरिली असे ॥ ४ ॥
विंशत्या तिसृभिः च अपि - वीस आणखी तीन मिळून तेवीस - अक्षौहिणीभिः - अक्षौहिणी सैन्याने - संवृतः (सः) - युक्त असा तो जरासंध - सर्वतः दिशम् - सर्व बाजूंनी - यदुराजधानीं मथुरां न्यरुणत् - यादवांची राजधानीची नगरी जी मथुरा तिला वेढिता झाला. ॥४॥
तेवीस अक्षौहिणी सेनेसह यदूंची राजधानी असलेल्या मथुरेला त्याने चारी बाजूंनी वेढा दिला. (४)
निरीक्ष्य तद्बलं कृष्ण उद्वेलमिव सागरम् ।
स्वपुरं तेन संरुद्धं स्वजनं च भयाकुलम् ॥ ५ ॥
कृष्णाने पाहिली सेना समुद्रापरि घेरिते । आपुले स्वजनो सर्व जनताही भिली तशी ॥ ५ ॥
उद्वेलं सागरम् इव - अमर्याद वाढलेल्या समुद्राप्रमाणे - तद्बलं - त्या जरासंधाचे सैन्य - तेन संरुद्धं स्वपुरं - त्या सैन्याने वेढिलेली आपली मथुरा नगरी - भयाकुलं स्वजनं च - आणि भयाने व्याप्त अशा बांधवांना - निरीक्ष्य - पाहून. ॥५॥
श्रीकृष्णांनी पाहिले की, जरासंधाची सेना म्हणजे जणू खवळलेला समुद्रच ! त्याने आपल्या राजधानीला वेढा दिला असून आपले लोक भयभीत झाले आहेत. (५)
चिन्तयामास भगवान् हरिः कारणमानुषः ।
तद्देशकालानुगुणं स्वावतारप्रयोजनम् ॥ ६ ॥
पृथ्वीचा भार हाराया कृष्णे हा देह धारिला । कृष्णाने चिंतिले चित्ती हे काय कार्य आपुले ॥ ६ ॥
कृष्णः - श्रीकृष्ण - कारणमानुषः भगवान् हरिः - कारणाने मनुष्यावतार घेणारा भगवान श्रीहरि - तद्देशकालानुगुणं - त्या स्थलाला व कालाला अनुरूप असे - स्वावतारप्रयोजनम् - आपल्या अवताराचे कारण - चिन्तयामास - मनात आणिता झाला. ॥६॥
भगवान श्रीकृष्णांनी पृथ्वीचा भार उतरविण्यासाठीच मनुष्यावतार धारण केला होता. देशकालानुसार आपल्या अवताराचा उद्देश काय आहे याचा आता त्यांनी विचार केला. (६)
हनिष्यामि बलं ह्येतद् भुवि भारं समाहितम् ।
मागधेन समानीतं वश्यानां सर्वभूभुजाम् ॥ ७ ॥ अक्षौहिणीभिः सङ्ख्यातं भटाश्व रथकुञ्जरैः । मागधस्तु न हन्तव्यो भूयः कर्ता बलोद्यमम् ॥ ८ ॥
चिंतिले छान हे झाले सर्व योद्धेचि पातले । आता मी मारितो सर्व रथी पायदळी तसे ॥ ७ ॥ जरासंधा न मारी मी जीवीत राहणे वरा । तेणे तो आणखी कांही आणील असुरां इथे ॥ ८ ॥
वश्यानां सर्वभूभुजां - स्वाधीन असणार्या सर्व राजांचे - समाहितं - एकत्र जमलेले - एतत् भुविभारं - हे पृथ्वीला भारभूत असे - मागधेन समानीतं बलं - जरासंधाने आणिलेले सैन्य - हनिष्यामि हि - खरोखर मी मारून टाकितो. ॥७॥
भटाश्वरथकुञ्जरैः (युतं) - पायदळ, घोडेस्वार, रथी व हत्ती यांवर बसून युद्ध करणारे अशा चार प्रकारच्या वीरांनी युक्त - अक्षौहिणीभिः संख्यातं - अक्षौहिणीनीच मोजता येणारे - बलं हन्तव्यं - सैन्य मारावे - मागधः तु - जरासंध मात्र - न हन्तव्यः - मारू नये - (सः) भूयः बलोद्यमं कर्ता - तो पुनः सैन्य जमविण्याचा उद्योग करील. ॥८॥
त्यांनी विचार केला की, जरासंधाने आपले मांडलिक असलेल्या सर्व राजांच्या पायदळ, घोडदळ, रथी आणि हत्तींनी युक्त अशा अनेक अक्षौहिणी सेना एकत्र केल्या आहेत. पृथ्वीला भार झालेल्या यांचा नाश करावा. परंतु जरासंधाला यावेळी मारता कामा नये, कारण तो जिवंत राहिल्यास पुन्हा असुरांची पुष्कळशी सेना घेऊन येईल. (७-८)
एतदर्थोऽवतारोऽयं भूभारहरणाय मे ।
संरक्षणाय साधूनां कृतोऽन्येषां वधाय च ॥ ९ ॥
प्रयोजन असे माझे पृथ्वीचा भार हारिणे । रक्षिणे साधु संतांना दुर्जना ठार मारिणे ॥ ९ ॥
एतदर्थः - हाच आहे उद्देश ज्याचा असा - अयं मे अवतारः - हा माझा अवतार - भूभारहरणाय - पृथ्वीचा भार हरण करण्यासाठी - साधूनां संरक्षणाय - साधूंच्या रक्षणाकरिता - अन्येषां च वधाय - आणि साधूंहून दुसर्यांच्या दुष्टांच्या नाशाकरिता - कृतः - केला आहे. ॥९॥
माझा अवतार पृथ्वीचा भार हलक करणे, सज्जनांचे रक्षण करणे आणि दुर्जनांचा संहार करणे यासाठीच आहे. (९)
अन्योऽपि धर्मरक्षायै देहः संभ्रियते मया ।
विरामायाप्यधर्मस्य काले प्रभवतः क्वचित् ॥ १० ॥ एवं ध्यायति गोविन्द आकाशात् सूर्यवर्चसौ । रथौ उपस्थितौ सद्यः ससूतौ सपरिच्छदौ ॥ ११ ॥
धर्मरक्षावया ऐसा मी वेळो वेळि जन्मतो । अधर्म रोधण्या सारा अनेक देह धारितो ॥ १० ॥ गोविंदे चिंतिता चित्ती आकाशी दिव्य हो रथ । सुसज्ज युद्ध आयूधे सारथे आणिले असे ॥ ११ ॥
मया - माझ्याकडून - अन्यः अपि देहः - दुसराहि देह - धर्मरक्षायै - धर्माचे रक्षण करण्याकरिता - क्वचित् काले प्रभवतः - कधी कधी प्रसंगवशात उत्पन्न होणार्या - अधर्मस्य विरामाय अपि - अधर्माच्या नाशाकरिताहि - संभ्रियते - धारण केला जातो - गोविन्दे एवं ध्यायति (सति) - श्रीकृष्ण ह्याप्रमाणे चिंतन करीत असता - सूर्यवर्चसौ ससूतौ सपरिच्छदौ - सूर्याप्रमाणे तेजस्वी आणि सारथ्यासह व युद्धसामुग्रीसह असलेले - रथौ आकाशात् सद्यः उपस्थितौ - दोन रथ आकाशातून तत्काळ प्राप्त झाले.॥१०-११॥
धर्माचे रक्षण करण्यासाठी आणि वाढत्या अधर्माला आळा घालण्यासाठी वेळोवेळी मी अनेक शरीरे धारण करतो. (१०) श्रीकृष्ण असा विचार करीत होते, तेवढ्यात सूर्याप्रमाणे तेजस्वी दोन रथ आकाशातून खाली उतरले. त्यांमध्ये युद्धाची सर्व सामग्री आणि दोन सारथी होते. (११)
आयुधानि च दिव्यानि पुराणानि यदृच्छया ।
दृष्ट्वा तानि हृषीकेशः सङ्कर्षणमथाब्रवीत् ॥ १२ ॥
दिव्य सनातनो शस्त्र आपोआपचि पातले । पाहता भगवान् तेंव्हा बंधू रामास बोलला ॥ १२ ॥
हृषीकेशः - श्रीकृष्ण - यदृच्छया (आगतानि) - आपोआप आलेली - पुराणानि दिव्यानि तानि आयुधानि - अति प्राचीन व तेजस्वी अशी ती शस्त्रे - दृष्ट्वा - पाहून - अथ च - नंतर - संकर्षणं अब्रवीत् - बलरामास म्हणाला. ॥१२॥
त्याच वेळी भगवंताची दिव्य आणि सनातन आयुधेसुद्धा आपणहून तेथे आली. ती पाहून श्रीकृष्ण बलरामांना म्हणाले, (१२)
पश्यार्य व्यसनं प्राप्तं यदूनां त्वावतां प्रभो ।
एष ते रथ आयातो दयितानि आयुधानि च ॥ १३ ॥
शक्तिशाली तुम्ही बंधू तुम्ही स्वामी नि रक्षक । मानिती यदुवंशी हे आता संकट पातले । तुमचे प्रिय आयूध हल मूसळ ही रथीं ॥ १३ ॥
प्रभो आर्य - हे समर्थ बंधो - त्वावतां यदूनां - तूच आहेस रक्षणकर्ता ज्यांचा अशा यादवांवर - प्राप्तं व्यसनं पश्य - आलेले संकट पहा - एषः ते रथः आयातः - हा तुझा रथ आला आहे - दयितानि आयुधानि च आयातानि - आणि प्रिय आयुधेहि आली आहेत. ॥१३॥
दादा ! यावेळी आपण रक्षण करीत असलेल्या यादवांवर मोठे संकट आले आहे. पहा ! हा आपला रथ आला आहे आणि ही आवडती आयुधे. (१३)
यानमास्थाय जह्येतद् व्यसनात् स्वान् समुद्धर ।
एतदर्थं हि नौ जन्म साधूनामीश शर्मकृत् ॥ १४ ॥
संहारा शत्रु ते सारे रथात बसुनी अता । स्वजना रक्षिणे तैसे साधुंचे हित साधणे ॥ १४ ॥
ईश - हे समर्था - यानं आस्थाय एतत् जहि - रथात बसून हे सैन्य ठार कर - स्वान् व्यसनात् समुद्धर - आपल्या लोकांना संकटांतून मुक्त कर - हि - कारण - एतदर्थं - ह्याकरिताच - साधूनां शर्मकृत् - साधूंचे कल्याण करणारा - नौ जन्म (अस्ति) - आमचा जन्म आहे. ॥१४॥
आता आपण या रथावर आरूढ होऊन शत्रुसेनेचा संहार करा आणि आपल्या स्वजनांना या संकटापासून वाचवा. कारण हे भगवन ! साधूंचे कल्याण करण्यासाठी आपण अवतार धारण केला आहे. (१४)
त्रयोविंशत्यनीकाख्यं भूमेर्भारमपाकुरु ।
एवं संमंत्र्य दाशार्हौ दंशितौ रथिनौ पुरात् ॥ १५ ॥ निर्जग्मतुः स्वायुधाढ्यौ बलेनाल्पीयसाऽऽवृतौ । शङ्खं दध्मौ विनिर्गत्य हरिर्दारुकसारथिः ॥ १६ ॥
तेविस् अक्षौहिणी सैन्य मोठाचि भार हो कमी । तेंव्हा श्री बलरामाने धारिले कवचो तसे । बैसले रथि नी गेले बाहेर मथुरेचिया ॥ १५ ॥ कृष्णाचा रथ तो हाकी दारूक रथि बैसुनी । सवे थोडेचि ते सैन्य कृष्णे शंखहि फुंकिला ॥ १६ ॥
त्रयोविंशत्यनीकाख्यं - तेवीस अक्षौहिणी सैन्य हे आहे नाव ज्याचे असा - भूमेः भारं अपाकुरु - पृथ्वीचा भार दूर कर - एवं संमन्त्र्य - अशी मसलत करून - स्वायुधाढयौ अल्पीयसा बलेन (च) वृतौ - सुंदर आयुधांनी शोभणारे व थोडया सैन्याने युक्त असे - दाशार्हौ - दाशार्ह कुळात उत्पन्न झालेले ते श्रीकृष्ण व बलराम - दंशितौ रथिनौ (च) - अंगात चिलखते घालून व रथात बसून - पुरात् निर्जग्मतुः - नगरीतून बाहेर पडले - दारुकसारथिः हरिः - दारुक आहे सारथी ज्याचा असा श्रीकृष्ण - विनिर्गत्य - बाहेर पडून - शंखं दध्मौ - शंख वाजविता झाला. ॥१५-१६॥
म्हणून आता आपण हा तेवीस अक्षौहिणी सेनारूप पृथ्वीचा प्रचंड भार नष्ट करा. श्रीकृष्ण आणि बलरामांनी असा निश्चय करून कवचे धारण केली व रथात बसून ते मथुरेतून निघाले. त्यावेळी त्यांनी आपापली आयुधे आणि थोडीशी सेनाही बरोबर घेतली. दारुक सारथी असलेल्या श्रीकृष्णांनी नगराबाहेर आल्यावर आपला पांचजन्य शंख वाजविला. (१५-१६)
ततोऽभूत् परसैन्यानां हृदि वित्रासवेपथुः ।
तावाह मागधो वीक्ष्य हे कृष्ण पुरुषाधम ॥ १७ ॥ न त्वया योद्धुमिच्छामि बालेनैकेन लज्जया । गुप्तेन हि त्वया मन्द न योत्स्ये याहि बन्धुहन् ॥ १८ ॥ तव राम यदि श्रद्धा युध्यस्व धैर्यमुद्वह । हित्वा वा मच्छरैश्छिन्नं देहं स्वर्याहि मां जहि ॥ १९ ॥
ध्वनी तो ऐकता शत्रु मनात थर्रर्र कांपले । पाहता मागधो बोले पुरुषाधम । कृष्ण तू ॥ १७ ॥ लहान आणखी होय लढण्या लाज वाटते । लपशी, मारिशी मामा पळ तू नच रे लढू ॥ १८ ॥ तू बळी मरुनी युद्धी इच्छिशी स्वर्ग तो तरी । लढ नी जाय स्वर्गी अथवा मज मारणे ॥ १९ ॥
ततः - त्यामुळे - परसैन्यानां हृदि - शत्रुसैन्यांच्या हृदयामध्ये - वित्रासवेपथुः अभूत् - भीतीने कंप सुटला - मागधः - जरासंध - तौ वीक्ष्य आह - त्या दोघा रामकृष्णांना पाहून म्हणाला - हे पुरुषाधम कृष्ण - हे अधम पुरुषा कृष्णा. ॥१७॥
बन्धुहन् - हे बंधुहत्या करणार्या - एकेन बालेन त्वया (सह) - एकटया बालक अशा तुझ्याबरोबर - लज्जया - लाजेमुळे - योद्धुं न इच्छामि - मी युद्ध करू इच्छित नाही - मन्द - हे अज्ञानी मुला - गुप्तेन त्वया न योत्स्ये हि - लपून रहाणार्या अशा तुझ्याबरोबर मी युद्ध करणार नाही - याहि - तू परत जा - राम - हे बलरामा - यदि तव श्रद्धा - जर तुझी इच्छा असेल तर - धैर्यम् उद्वह युद्ध्यस्व (च) - धैर्य धर आणि युद्ध कर - मच्छरैः छिन्नं देहं हित्वा स्वः याहि - माझ्या बाणांनी विदीर्ण झालेला देह टाकून स्वर्गाला जा - वा - किंवा - मां जहि - मला मार. ॥१८-१९॥
तो नाद ऐकून शत्रुसेनेच्या हृदयात धडकी भरली. त्यांना पाहून मगधराज म्हणाला - "हे पुरुषधम कृष्णा ! तू अजून लहान आहेस. लपून छपून वावरणार्या तुझ्या एकट्याशी लढण्याची मला लाज वाटते. अरे मूर्खा ! तू तर आपल्या मामाचीच हत्या केली आहेस. म्हणूनही मी तुझ्याबरोबर लढू इच्छित नाही. जा, माझ्या समोरून निघून जा. (१७-१८) हे बलरामा ! युद्धात मेल्याने स्वर्ग मिळतो, अशी जर तुझी श्रद्धा असेल, तर हिंमत दाखवून तू माझ्याशी लढ. आणि माझ्या बाणांनी छिन्नविछिन्न झालेले शरीरे येथे सोडून स्वर्गात जा किंवा शक्ती असेल तर मला मार." (१९)
श्रीभगवानुवाच -
न वै शूरा विकत्थन्ते दर्शयन्त्येव पौरुषम् । न गृह्णीमो वचो राजन् आतुरस्य मुमूर्षतः ॥ २० ॥
भगवान् श्रीकृष्ण म्हणाले - माघधा शूर जो ऐसा टेंभा ना मिरवी कधी । पहा डोक्यावरी मृत्यू न बोल सन्निपातिसा ॥ २० ॥
राजन् - हे जरासंध राजा - शूराः वै न विकत्थन्ते- शूर कधीहि बडबड करीत नाहीत - पौरुषम् एव दर्शयन्ति - पराक्रमच दाखवितात - मुमूर्षतः आतुरस्य (ते) वचः न गृह्णिमः - मरण्याची इच्छा करणार्या आसन्नमरण अशा तुझे भाषण आम्ही स्वीकारीत नाही. ॥२०॥
श्रीभगवान म्हणाले, हे मगधराजा ! जे शूर असतात, ते तुझ्यासारखी प्रौढी मिरवीत नाहीत; ते शौर्यच दाखवितात. पहा ! आता तुझा मृत्यु जवळ आला आहे. मरताना रोगी जसा बरळतो, तशी तुझी ही बडबड आहे. आम्ही तुझ्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. (२०)
श्रीशुक उवाच -
( मिश्र ) जरासुतस्तावभिसृत्य माधवौ महाबलौघेन बलीयसाऽऽवृणोत् । ससैन्ययानध्वजवाजिसारथी सूर्यानलौ वायुरिवाभ्ररेणुभिः ॥ २१ ॥
( इंद्रवज्रा ) श्री शुकदेव सांगतात - भानू ढगाने अन अग्नि धूम्रे न तो दिसे पै नच झाकलेले । तसे बळी नी हरि-कृष्ण तेंव्हा ध्वजा रथांनी दिसती न कोणा ॥ २१ ॥
जरासुतः - जरासंध - वायुः अभ्ररेणुभिः सूर्यानलौ इव - जसा वायु मेघांनी व धुळीने सूर्य व अग्नि यांना अनुक्रमे आच्छादितो त्याप्रमाणे - ससैन्ययानध्वजवाजिसारथी - सैन्य, रथ, ध्वज, घोडे व सारथी यांनी युक्त असलेल्या - तौ माधवौ - त्या दोघा रामकृष्णांना - बलीयसा महाबलौघेन - बलवान अशा मोठया सैन्याच्या समूहाने - अभिसृत्य आवृणोत् - चाल करून आच्छादिता झाला. ॥२१॥
श्रीशुक म्हणतात - जसा वारा ढगांनी सूर्याला आणि धुराने आगीला झाकून टाकतो, त्याचप्रमाणे जरासंधाने राम कृष्णांसमोर येऊन, आपल्या अत्यंत बलवान आणि अपार सेनेद्वारा त्यांना चारी बाजूंनी वेढले. इतके की, त्यांची सेना, रथ, ध्वज, घोडे आणि सारथीही दिसेनासे झाले. (२१)
सुपर्णतालध्वजचिहित्नौ रथौ
अलक्षयन्त्यो हरिरामयोर्मृधे । स्त्रियः पुराट्टालकहर्म्यगोपुरं समाश्रिताः संमुमुहुः शुचार्दितः ॥ २२ ॥
सज्जात गेल्या मथुरी स्त्रिया त्या कौतुक पाह्या रणभूमिचे ते । गरूडचिन्हांकित कृष्णझेंडा नी ताड चिन्हांकित त्या बळीचा । ध्वजा दिसेना तइ शोक होता मूर्च्छित झाल्या रमण्या तिथे की ॥ २२ ॥
पुराट्टालकहर्म्यगोपुरं समाश्रिताः स्त्रियः - नगरातील राजमार्ग, पेठा, गच्च्या, वेशी ह्याठिकाणी जमलेल्या स्त्रिया - सुपर्णतालध्वजचिह्नितौ - गरुड व ताड ही ज्यांच्या ध्वजांवर चिन्हे आहेत असे - हरिरामयोः रथौः - श्रीकृष्ण व बलराम ह्यांचे दोन रथ - मृधे अलक्षयन्त्यः - युद्धभूमीवर न पहाणार्या अशा - शुचार्दिताः संमुमुहुः - शोकाकुल होऊन मूर्च्छित पडल्या. ॥२२॥
मथुरेतील स्त्रिया महालांच्या गच्च्या, वाडे आणि गोपुरांवर चढून युद्ध पाहात होत्या. युद्धभूमीवर श्रीकृष्णांचा गरुड चिह्नांकित आणि बलरामांचा ताड चिह्नांकित ध्वज असलेले रथ त्यांना दिसले नाहीत, तेव्हा त्या शोकावेगाने मूर्च्छित होऊन पडल्या. (२२)
हरिः परानीकपयोमुचां मुहुः
शिलीमुखात्युल्बणवर्षपीडितम् । स्वसैन्यमालोक्य सुरासुरार्चितं व्यस्फूर्जयत् शार्ङ्गशरासनोत्तमम् ॥ २३ ॥
श्रीकृष्ण पाही अरितीर तेंव्हा असंख्य आले जणु वृष्टि होय । व्यथीत झाले अपुलेहि वीर शारंग्धनू ते मग योजि हाते ॥ २३ ॥
सुरासुरार्चितं स्वसैन्यं - देव व दैत्य या दोघांनीहि पूजिलेले असे आपले सैन्य - परानीकपयोमुचां - शत्रुसैन्यरूपी मेघांच्या - शिलीमुखात्युल्बणवर्षपीडितम् आलोक्य - बाणरूपी तीक्ष्ण पर्जन्याने पीडिलेले पाहून - हरिः - श्रीकृष्ण - शरासनोत्तमम् शार्ङगं - श्रेष्ठ असे शार्ङगंधनुष्य - मुहुः व्यस्फूर्जयत् - पुनः पुनः वाजविता झाला. ॥२३॥
श्रीकृष्णांनी शत्रुसेनेचे वीर आपल्या सेनेवर, जसे ढग पाण्याच्या थेंबांचा पाऊस पाडतात, त्याप्रमाणे बाणांचा वर्षाव करीत आहेत आणि त्यामुळे आपल्या सेनेला अत्यंत पीडा होत आहे असे पाहिले, तेव्हा देव-दैत्यांना पूज्य असलेल्या शार्ङ्गधनुष्याचा टणत्कार केला. (२३)
गृह्णन् निशङ्गादथ सन्दधच्छरान्
विकृष्य मुञ्चन्शितबाणपूगान् । निघ्नन् रथान् कुञ्जरवाजिपत्तीन् निरन्तरं यद्वद् अलातचक्रम् ॥ २४ ॥ निर्भिन्नकुम्भाः करिणो निपेतुः अनेकशोऽश्वाः शरवृक्णकन्धराः । रथा हताश्वध्वजसूतनायकाः पदायतश्छिन्नभुजोरुकन्धराः ॥ २५ ॥
भात्यात घाली कर कृष्ण आणि काढोनि सोडी कितिएक बाण । धनुष्य ऐसे फिरले तदा की जै चक्रवातो घुमतो धरेशी । हत्ती रथो अश्वहि मागधाचे ते पायसैन्यो बहु मारले की ॥ २४ ॥ मेले किती हत्ति तुटोनि डोके घोडे शिरावीण कितेक मेले । रथा न घोडा अन सारथी तै ती स्यंदने कैक निकामि झाली । तुटोनि बाहू अन पाय मांड्या रणात झाला बहु ढीग मोठा ॥ २५ ॥
अथ - नंतर - यद्वत् अलातचक्रम् - ज्याप्रमाणे गरगर फिरणारे पेटलेले कोलीत त्याप्रमाणे - निषङगात् गृह्णन् - भात्यातून घेऊन - शरान् (धनुषि) संदधत् - बाण धनुष्याला जोडीत - विकृष्य - जोराने ओढून - शितबाणपूगान् मुञ्चन् - तीक्ष्ण बाणांचे समूह सोडणारा असा - रथान् कुञ्जरवाजिपत्तीन् - रथ, हत्ती, घोडे व पायदळ ह्यांना - निरन्तरं निघ्नन् - एकसारखे मारीत - करिणः निर्भिन्नकुम्भाः - हत्तींची गण्डस्थले भग्न होऊन - अश्वाः अनेकशः शरवृक्णकन्धराः - घोडे पुष्कळप्रकारे ज्यांच्या माना बाणांनी तुटून गेल्या आहेत असे - रथाः - रथ - हताश्वध्वजसूतनायकाः - घोडे, ध्वज, सारथी व अधिपति हे ज्यांतील नष्ट झाले आहेत असे - पदातयः - पायदळ - छिन्नभुजोरुकन्धराः - ज्यांचे बाहु, मांडया व माना विदीर्ण झाल्या आहेत असे - निपेतुः - पडले. ॥२४-२५॥
यानंतर ते भात्यातून बाण काढून, ते धनुष्याला लावून आणि धनुष्याची दोरी ओढून बाणांचा वर्षाव करू लागले. त्यावेळी त्यांचे ते धनुष्य इतक्या वेगाने फिरत होते, की जणू वेगाने फिरणारे जळते कोलीतच. अशाप्रकारे श्रीकृष्ण जरासंधाच्या हत्ती, घोडे, रथ आणि पायदल अशा चतुरंग सेनेचा संहार करू लागले. (२४) यामुळे मस्तके छिन्नविछिन्न झालेले हत्ती मरून पडू लागले. बाणांच्या वर्षावाने अनेक घोड्यांची डोकी धडापासून वेगळी झाली. रथदळांतील घोडे, ध्वज, सारथी आणि रथी नष्ट झाले आणि पायदळांतील सैनिकांचे हात, जांघा, मस्तके इत्यादी तुटून तेही खाली पडले. (२५)
सञ्छिद्यमानद्विपदेभवाजिनां
अङ्गप्रसूताः शतशोऽसृगापगाः । भुजाहयः पूरुषशीर्षकच्छपा हतद्विपद्वीपहय ग्रहाकुलाः ॥ २६ ॥ करोरुमीना नरकेशशैवला धनुस्तरङ्गायुधगुल्मसङ्कुलाः । अच्छूरिकावर्तभयानका महा मणिप्रवेकाभरणाश्मशर्कराः ॥ २७ ॥ प्रवर्तिता भीरुभयावहा मृधे मनस्विनां हर्षकरीः परस्परम् । विनिघ्नतारीन् मुषलेन दुर्मदान् सङ्कर्षणेनापरीमेयतेजसा ॥ २८ ॥
मारी बळी तै मुसळेचि शत्रू त्या रक्तपाते सरिताच झाल्या । कापीत कोणी अपुलाच शत्रू घोडे नि हत्ती जुझती तसेच ॥ २६ ॥ पुरात सर्पो तइ हात तेथे जै कासवे तै शिरे ते कितेक । ते मृत हत्ती जणु द्वीप ऐसे नक्रापरी अश्वहि भासले की ॥ २७ ॥ माशापरी हात नि पाय होते शैवाळ जैसे कचभार भासे । ढाली जशा की भवरेच त्यात भित्रे पुराला भिउनी पळाले ॥ २८ ॥
संछिद्यमानद्विपदेभवाजिनाम् - तोडल्या जाणार्या मनुष्यांच्या, हत्तींच्या व घोडयांच्या - अङगप्रसूताः - अवयवांपासून उत्पन्न झालेल्या - भुजाहयाः - बाहु हेच ज्यांतील सर्प आहेत अशा - पुरुषशीर्षकच्छपाः - मनुष्याची मस्तके हेच आहेत कासव ज्यांमध्ये अशा - हतद्विपद्वीपहयग्रहाकुलाः - मारलेले हत्ती हीच बेटे व मारलेले घोडे ह्याच सुसरी ज्यांत आहेत अशा - शतशः असृगापगाः (प्रवर्तिताः) - शेकडो रक्ताच्या नद्या वाहू लागल्या. ॥२६॥ करोरुमीनाः - हात व मांडया ह्याच आहेत मासे ज्यांमध्ये अशा - नरकेशशैवलाः - मनुष्यांचे केस हेच आहे शेवाळ ज्यांमध्ये अशा - धनुस्तरङगायुधगुल्मसंकुलाः - धनुष्ये ह्याच लाटा व आयुधे हीच झुडपे ह्यांनी युक्त अशा - अच्छूरिकावर्तभयानकाः - ढाली हेच भोवरे त्यामुळे भयंकर दिसणार्या - महामणिप्रवेकाभरणाश्मशर्कराः - मोठमोठया रत्नांचे उत्तमोत्तम अलंकार हेच आहेत पाषाण व वाळू ज्यांमध्ये अशा - असृगापगाः प्रवर्तिताः - रक्ताच्या नद्या वाहू लागल्या. ॥२७॥ भीरुभयावहाः - भित्र्यांना भय वाटण्याजोग्या - मनस्विनां परस्परं हर्षकरीः असृगापगाः - थोर मनाच्या लोकांना परस्पर आनंद देणार्या रक्ताच्या नद्या - मुसलेन दुर्मदान् अरीन् विनिघ्नता - मुसळाने मदोन्मत्त शत्रूंना मारणार्या - अपरिमेयतेजसा संकर्षणेन - अगणित पराक्रम करणार्या बलरामाने - मृधे प्रवर्तिताः - युद्धभूमीवर सुरु केल्या. ॥२८॥
अत्यंत तेजस्वी अशा भगवान बलरामांनी त्या युद्धात मुसळाच्या प्रहाराने पुष्कळशा उन्मत्त शत्रूंना मारून व माणसे, हत्ती, घोडे यांना घायाळ करून त्यांच्या अंगांतून निघालेल्या रक्ताच्या शेकडो नद्या वाहविल्या. त्या नद्यांमध्ये माणसांचे तुटलेले हात हेच साप, माणसांची मस्तके हीच कासवे, मेलेले हत्ती ही बेटे आणि घोडे हे मगर होते. हात आणि जांघा माशांप्रमाणे, माणसांचे केस शेवाळाप्रमाणे, धनुष्ये तरंगांप्रमाणे दिसत होती. बहुमुल्य रत्ने आणि अलंकार दगड व वाळूप्रमाणे दिसत होते. त्या नद्या पाहून भित्री माणसे घाबरत होती आणि वीरांचा आपापसात उत्साह वाढत होता. (२६-२८)
बलं तदङ्गार्णवदुर्गभैरवं
दुरन्तपारं मगधेन्द्रपालितम् । क्षयं प्रणीतं वसुदेवपुत्रयोः विक्रीडितं तज्जगदीशयोः परम् ॥ २९ ॥
सेना जरी जिंकियण्या कठीण कृष्णे बळी ने त्वरि मारियेली । स्वामी जगाचा करि काय नोव्हे हा खेळ त्याया सहजीच आहे ॥ २९ ॥
अङग - हे राजा - अर्णवदुर्गभैरवं - समुद्राप्रमाणे ओलांडून जाण्यास कठीण व भयंकर - दुरन्तपारं - ज्याचा अंत लागणे कठीण आहे असे - मगधेन्द्रपालितं तत् बलं - जरासंधाने रक्षिलेले सैन्य - (ताभ्यां) क्षयं प्रणीतं - त्या दोघा रामकृष्णांनी नाशाप्रत नेले - तत् - ते कृत्य - जगदीशयोः वसुदेवपुत्रयोः - जगाचे स्वामी अशा वसुदेवपुत्र रामकृष्णांचे - परं विक्रीडितम् - अगदी लीलेचे खेळणेच होय. ॥२९॥
परीक्षिता ! जरासंधाची ती सेना समुद्राप्रमाणे दुर्गम, भयावह आणि अपार होती. परंतु जगदीश्वर वसुदेवपुत्रांनी ती नष्ट करून टाकली. सेनेचा नाश करणे हा त्यांच्या दृष्टीने एक खेळच होता. (२९)
विवरण :- आपला जावई जो कंस (मथुराधिपति) त्याचा वध करून 'अस्ति' व 'प्राप्ति' या आपल्या दोन कन्यांना विधवा करणार्या केवळ श्रीकृष्णाचाच नव्हे, तर त्याच्या यदुकुळाचा समूळ उच्छेद करण्याचे जरासंधाने ठरविले. आपले आणि इतर राजांचे मिळून तेवीस अक्षौहिणी सैन्य घेऊन त्याने मथुरेवर हल्ला केला. पण राम-कृष्णांनी त्याच्या संपूर्ण सैन्याचा नाश केला. दोन विरुद्ध नुसते तेवीसच नाहीत; तर तेवीस अक्षौहिणी सैन्य जरासंधाचे होते. त्याचा नाश करणे देवांनाहि कठीण असे म्हटले तरी चुकीचे होणार नाही. पण या दोघांनीच एवढया सेनेचा नाश केला. (अर्थात ते सामान्य मानव थोडेच होते; मानवातारातील परमात्मेच होते हेही सत्यच.) ही न पटणारी गोष्ट शक्य झाली, ती का ? तर याला उत्तर देताना शुकमुनि म्हणतात, असा विजय मिळविणे म्हणजे त्यांच्या दृष्टीने खेळ होता. हातचा मळ होता. लहान मूल जसे खेळण्याशी खेळते, तसे ते युद्ध खेळले. ज्या परमात्म्याने या विश्वाची, ब्रह्मांडाची निर्मिती केली, एक क्रीडा म्हणून, अखिल ब्रह्मांडात, प्राणिमात्रात प्राण फुंकले, त्याला ही गोष्ट अशक्य थोडीच ? वरवर असंभव वाटणारी गोष्ट जाताजाता सहजरीत्या करून टाकणे ही त्याची एक क्रीडाच ! (२९)
स्थित्युद्भवान्तं भुवनत्रयस्य यः
समीहितेऽनन्तगुणः स्वलीलया । न तस्य चित्रं परपक्षनिग्रहः तथापि मर्त्यानुविधस्य वर्ण्यते ॥ ३० ॥
जो निर्मितो नी लिन सृष्टि घेतो कठीण त्याला मग काय विश्वीं । तरी मनुष्यापरि वेष धारी लीला करीतो म्हणणे तयासी ॥ ३० ॥
अनन्तगुणः यः - अनंत आहेत गुण ज्याचे असा जो श्रीकृष्ण - स्वलीलया - स्वतःच्या क्रीडेने - भुवनत्रयस्य स्थित्युद्भवान्तं - त्रैलोक्याची उत्पत्ति, स्थिति व लय - समीहते - करण्यास इच्छितो - तस्य परपक्षनिग्रहः चित्रं न - त्याने शत्रुपक्षाचा पराजय केला हे आश्चर्य नाही - तथापि - तरीहि - मर्त्यानुविधस्य (तस्य) वर्ण्यते - मनुष्यासारखे आचरण करणार्या त्या श्रीकृष्णाचे चरित्र वर्णिले जात आहे. ॥३०॥
जे अनंत गुणसागर भगवान लीलेने तिन्ही लोकांची उत्पत्ती, स्थिती आणि संहार करतात, त्यांना शत्रूच्या सेनेचा असा नाश करणे ही काही आश्चर्याची गोष्ट नाही; परंतु जेव्हा ते मनुष्यावताराने अशी कृती करतात, तेव्हा तिचे वर्णन करणे योग्यच नाही का ? (३०)
( अनुष्टुप् )
जग्राह विरथं रामो जरासन्धं महाबलम् । हतानीकावशिष्टासुं सिंहः सिंहमिवौजसा ॥ ३१ ॥
( अनुष्टुप् ) मेले ते शत्रुचे सैन्य शत्रूचा तुटला रथ । धरितो सिंह जै सिंहा तसा मागध बांधिला ॥ ३१ ॥
रामः - बलराम - हतानीकावशिष्टासुं - ज्याचे सर्व सैन्य नष्ट झाले असून प्राण मात्र अवशिष्ट राहिले आहेत असा - महाबलं विरथं जरासन्धं - मोठया बलाढय व रथविरहित झालेल्या जरासंधाला - सिंहः सिंहम् इव - सिंह जसा सिंहाला पकडतो त्याप्रमाणे - ओजसा जग्राह - पराक्रमाने पकडता झाला. ॥३१॥
अशा प्रकारे जरासंधाची सर्व सेना मारली गेली. रथसुद्धा मोडून पडला. फक्त शरीरात प्राण शिल्लक राहिले. तेव्हा जसा एक सिंह दुसर्या सिंहाला पकडतो, तसे बलरामांनी वेगाने महाबली जरासंधाला पकडले. (३१)
बध्यमानं हतारातिं पाशैर्वारुणमानुषैः ।
वारयामास गोविन्दः तेन कार्यचिकीर्षया ॥ ३२ ॥
विपक्षी नृपती कैक मागधे पूर्वि मारिले । बळीने बांधिले आज वरूणफास टाकुनी ॥ बळी तो मारु ही इच्छी परी कृष्णेचि सोडिला । असुरा जमवी हा तो आणखी मारण्या पुन्हा ॥ ३२ ॥
तेन वारुणमानुषैः पाशैः बध्यमानं - त्या बलरामाकडून वरुणपाश व मनुष्यपाश यांनी बांधल्या जाणार्या - हतारातिं - मारिले आहेत शत्रु ज्याने अशा - तं दृष्टवा - त्या जरासंधाला पाहून - गोविन्दः - श्रीकृष्ण - कार्यचिकीर्षया वारयामास - कार्य करण्याच्या इच्छेने बलरामाला निवारिता झाला. ॥३२॥
जरासंधाने शत्रुपक्षातील पुष्कळशा राजांचा वध केला होता. परंतु आज त्याला बलराम वरुणपाशाने आणि दोराने बांधीत होते. याला सोडून दिले, तर हा आणखी सेना आणील व तिचाही नाश करता येईल, असा विचार करून श्रीकृष्णानी बलरामांना अडवले. (३२)
विवरण :- 'तेन कार्यचिकीर्षया' आपल्या तेवीस अक्षौहिणी सैन्याची कृष्णाने धूळधाण उडविल्याचे पाहून जरासंध अत्यंत संतप्त झाला. तो बलरामावर चाल करून आला, त्यावर गदा फेकली. परंतु बलरामाने त्याला पकडून वरूणपाशाने बांधून ठेवले. मात्र कृष्णाने त्याला तसे करण्यापासून परावृत्त केले. आणि सोडून देण्यास सांगितले. इथे 'कार्यचिकीर्षया' म्हणजे बांधून ठेवण्याच्या कार्यापासून परावृत्त केले, असे म्हणता येईल. किंवा जरासंधाच्यामुळे जे कार्य पुढे होणार होते, त्या कार्यासाठी, ते कार्य करण्यासाठी असा अर्थ घेता येईल. 'विनाशाय दुष्कृताम्' हा कृष्णावताराचा प्रमुख हेतू. त्याला पृथ्वीवरील पापांचा भार नाहीसा करावयाचा होता. या युद्धात शत्रूच्या मोठया सैन्याचा निःपात झाला होताच. पण एवढयावरच न थांबता पुन्हा असेच मोठे सैन्य जमवून मथुरेवर स्वारी करण्याची त्याची योजना होती. (अशी त्याने सतरा वेळा स्वारी केली.) यामुळे प्रत्येक वेळी तितक्या शत्रूसैन्याचा नाश होऊन आपोआपच पृथ्वीवरील पापांचा भार हलका होणार होता. या विचाराने कृष्णाने जरासंधास सोडून दिले. इथे कृष्णाच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वातील 'मुत्सद्दीपणा' 'रणनीतीकुशलता' हा पैलू दिसून येतो. (३२)
सा मुक्तो लोकनाथाभ्यां व्रीडितो वीरसम्मतः ।
तपसे कृतसङ्कल्पो वारितः पथि राजभिः ॥ ३३ ॥ वाक्यैः पवित्रार्थपदैः नयनैः प्राकृतैरपि । स्वकर्मबन्धप्राप्तोऽयं यदुभिस्ते पराभवः ॥ ३४ ॥
शूरवीर असे थोर जरासंधास मानिती । लाजला तो बळी कृष्णे दयेने सोडिले तया ॥ ३३ ॥ तपस्या करण्या गेला परी मार्गात भूपती । भेटले वदले त्याला जिंकू कृष्णास हो चला ॥ ३४ ॥
लोकनाथाभ्यां मुक्तः - लोकाधिपति अशा रामकृष्णांनी सोडिलेला - व्रीडितः - लज्जित झालेला - वीरसंमतः - वीरांमध्ये पूज्य असा - सः - तो जरासंध - तपसे कृतसंकल्पः - तपश्चर्या करण्याविषयी केला आहे विचार ज्याने असा - पथि - मार्गात - राजभिः वारितः - राजेलोकांकडून निवारिला गेला. ॥३३॥ पवित्रार्थपदैः वाक्यैः - धर्मशास्त्रानुरूप अर्थ दाखविणारे शब्द आहेत ज्यात अशा वाक्यांनी - प्राकृतैः नयनैः अपि - लौकिक न्याय व नीतिशास्त्राचे नियम ह्यांनीहि - यदुभिः (कृतः) अयं ते पराभवः - यादवांनी केलेला हा तुझा पराभव - स्वकर्मबन्धप्राप्तः - तुझ्या पूर्वकर्मरूपी बंधनामुळे प्राप्त झाला आहे. ॥३४॥
मोठे मोठे वीर जरासंधाचा सन्मान करीत. राम कृष्णांनी दया दाखवून आपल्याला सोडून दिले, याची त्याला लाज वाटली; त्याने तपश्वर्या करण्याचा निश्वय केला. परंतु वाटेत इतर राजांनी त्याला अडवून धर्मोपदेश, राजनीती व लौकिक दृष्टांत देऊन समजाविले की, यदूंकडून तुमचा पराभव हा केवळ प्रारब्धामुळेच झालेला आहे. (३३-३४)
विवरण :- कृष्णाने पराभूत जरासंधास मृत्यूदंड न देता सोडून दिले. लज्जित जरासंध तपश्चर्या करण्यासाठी वनात जाऊ लागला; तेव्हा इतर राजांनी त्यास तसे करण्यापासून परावृत्त केले. आणि त्यास सांगितले, 'तुला पराभूत करण्याचे सामर्थ्य या यदुवंशीयांमध्ये नाही, जे झाले, ते तुझ्या कर्माने.' 'मगधो वै कर्मपाशात् ।' तू केलेल्या दुष्कृत्यांच्या फासात अडकून, त्या दुष्कृत्यांचे फळ म्हणून तुझा असा लाजिरवाणा आणि अविश्वसनीय पराभव झाला आहे. प्रत्यक्ष कृष्ण परमात्म्याशी शत्रुत्व म्हणजे मृत्यूलाच निमंत्रण. तेव्हा आता वनात जाण्याचा उपयोग नाही. (पण याच राजांनी त्याला ससैन्य साथ दिली होती; हे ही तितकेच खरे. कदाचित जरासंधाच्या दबावाने तसे केले असावे आणि नंतर त्यांना त्याचा पश्चात्ताप झाला असावा.) (३३-३४)
हतेषु सर्वानीकेषु नृपो बार्हद्रथस्तदा ।
उपेक्षितो भगवता मगधान् दुर्मना ययौ ॥ ३५ ॥
सेना सर्वचि मेली नी उपेक्षुनी बळी तदा । सोडिता खिन्न तो झाला गेला तो मगधी तसा ॥ ३५ ॥
तदा - त्यावेळी - सर्वानीकेषु हतेषु - सर्व सैन्य मारले गेले असता - बार्हद्रथः नृपः - जरासंध राजा - भगवता उपेक्षितः - भगवान श्रीकृष्णाने उपेक्षिलेला असा - दुर्मनाः - खिन्न आहे मन ज्याचे असा - मगधान् ययौ - मगध देशाला गेला. ॥३५॥
सर्व मरण पावल्यावर बलरामांनी जरासंधाची उपेक्षा करून त्याला सोडून दिले. त्यामुळे अतिशय उदास होऊन तो मगधदेशी निघून गेला. (३५)
मुकुन्दोऽप्यक्षतबलो निस्तीर्णारिबलार्णवः ।
विकीर्यमाणः कुसुमैः त्रीदशैरनुमोदितः ॥ ३६ ॥
भगवान् कृष्ण सेनेत न कोणा क्षति पोचली । देवांनी वरुनी केली फुलांची वृष्टि तेधवा ॥ ३६ ॥
अक्षतबलः - ज्याचे सैन्य नष्ट झाले नाही असा - निस्तीर्णारिबलार्णवः - व शत्रुसैन्यरूपी समुद्राचे ज्याने उल्लंघन केले आहे असा - मुकुन्दः अपि - श्रीकृष्णसुद्धा - त्रिदशैः अनुमोदितः - देवांकडून अनुमोदन दिला गेला - कुसुमैः (च) विकीर्यमाणः (अभूत्) - आणि पुष्पवृष्टि केला गेला ॥३६॥
भगवान श्रीकृष्णांच्या सेनेमध्ये कोणाचेच नुकसान झाले नाही आणि समुद्राप्रमाणे असणार्या जरासंधाच्या तेवीस अक्षौहिणी सेनेवर मात्र त्यांनी सहजगत्या विजय प्राप्त केला. त्यावेळी देवतांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून त्यांचे अभिनंदन केले. (३६)
माथुरैः उपसङ्गम्य विज्वरैर्मुदितात्मभिः ।
उपगीयमानविजयः सूतमागधवन्दिभिः ॥ ३७ ॥
जरासंध हरे तेंव्हा प्रजा निर्भय जाहली । हृदयी दाटला मोद वंदिंनी स्तुति गायिली ॥ ३७ ॥
विज्वरैः - पीडारहित झालेल्या - मुदितात्मभिः - आनंदित आहे अंतःकरण ज्यांचे अशा - माथुरैः - मथुरेतील लोकांनी - सुतमागधबन्दिभिः (सह) - पौराणिक, गायक व स्तुतिपाठक लोकांसह - उपसंगम्य - एकत्र जमून - उपगीयमानविजयः - ज्याचा पराक्रम गायिला आहे असा - सः स्वगरं ययौ - तो श्रीकृष्ण आपल्या नगराला गेला. ॥३७॥
जरासंधाच्या पराजयामुळे मथुरावासी भयमुक्त झाले होते आणि श्रीकृष्णांच्या विजयामुळे त्यांचे हृदय आनंदाने भरून गेले होते. श्रीकृष्ण त्यांना येऊन भेटले, त्यावेळी सूत, मगध आणि बंदीजन त्यांच्या विजयाची गीते गात होते. (३७)
शङ्खदुन्दुभयो नेदुः भेरीतूर्याण्यनेकशः ।
वीणावेणुमृदङ्गानि पुरं प्रविशति प्रभौ ॥ ३८ ॥
मथुरीं पातता कृष्ण स्वागता भेरि वासुर्या । वीणा मृदंग नी शंख यांचा घोषहि जाहला ॥ ३८ ॥
प्रभौ पुरं प्रविशति - श्रीकृष्ण मथुरेत शिरत असता - शंखदुन्दुभयः - शंख, आणि दुंदुभि - भेरीतूर्याणि - नगारे व तुतार्या - वीणावेणुमृदङ्गानि - वीणा, पावे व मृदंग - अनेकशः नेदुः - वारंवार वाजू लागले. ॥३८॥
श्रीकृष्णांनी नगरात प्रवेश करताच शंख, नगारे, भेरी, तुतारी, वीणा, बासरी, मृदंग इत्यादी अनेक प्रकारची मंगल वाद्ये वाजू लागली. (३८)
सिक्तमार्गां हृष्टजनां पताकाभिः अलङ्कृताम् ।
निर्घुष्टां ब्रह्मघोषेण कौतुकाबद्धतोरणाम् ॥ ३९ ॥
मार्ग समार्जिले सारे हास्याने खेळ चालले । तोरणे शोभले झेंडे द्विजांनी मंत्र गायिले ॥ ३९ ॥
सिक्तमार्गां - जिच्यातील रस्ते शिंपिलेले आहे अशा - हृष्टजनां - जीतील लोक आनंदित झाले आहेत अशा - पताकाभिः अलंकृतां - पताकांनी सजविलेल्या - ब्रह्मघोषेण निर्घुष्टां - वेदघोषाने दुमदुमून गेलेल्या - कौतुकाबद्धतोरणां - मंगलार्थ बांधली आहेत तोरणे जीत अशा. ॥३९॥
मथुरेतील रस्त्यांवर चंदनाचे सडे घातले होते. नागरिक आनंदोत्सव साजरा करीत होते. संपूर्ण नगर पताकांनी सजविले गेले होते. ब्राह्मणांचे वेदघोष घुमत होते आणि जिकडे तिकडे मंगलसूचक तोरणे बांधलेली दिसत होती. (३९)
निचीयमानो नारीभिः माल्यदध्यक्षताङ्कुरैः ।
निरीक्ष्यमाणः सस्नेहं प्रीत्युत्कलितलोचनैः ॥ ४० ॥ आयोधनगतं वित्तं अनन्तं वीरभूषणम् । यदुराजाय तत् सर्वं आहृतं प्रादिशत्प्रभुः ॥ ४१ ॥
प्रवेशता असा कृष्ण स्त्रियांनी पाहिले तया । हार फूल दही तैसे अंकूर वाहिले तया ॥ ४० ॥ अपार युद्धिचे द्रव्य वीरांचे दागिनेहि ते । दिधले उग्रसेनाला यदुराजास कृष्णने ॥ ४१ ॥
नारीभिः माल्यदध्यक्षताङ्कुरैः निचीयमानः - स्त्रियांकडून दही, अक्षता व दूर्वांकुर यांनी पूजिलेला - प्रीत्युत्कलितलोचनैः - प्रेमाने प्रफुल्लित झालेल्या नेत्रांनी - सस्नेहं - प्रेमपूर्वक - निरीक्ष्यमाणः - पाहिला गेलेला - प्रभुः - श्रीकृष्ण - आयोधनगतं - युद्धभूमीवर पडलेले - वीरभूषणं - वीरांचे भूषणरूप - अनन्तम् - अपरिमित असे - तत् सर्वं आहृतं वित्तं - ते सर्व आणलेले द्रव्य - यदुराजाय प्रादिशत् - यादवाधिपति उग्रसेनाला देता झाला. ॥४०-४१॥
ज्यावेळी श्रीकृष्ण नगरात प्रवेश करीत होते, त्यावेळी नगरातील स्त्रिया प्रेम आणि उत्कंठेने भरलेल्या नेत्रांनी त्यांना न्याहाळीत होत्या आणि फुले, दही, अक्षता, अंकुर यांचा त्यांच्यावर वर्षाव करीत होत्या. (४०) श्रीकृष्णांनी रणभूमीवरून अपरंपार धन आणि वीरांचे अलंकार आणले होते. ते सर्व त्या<नी यादवराज उग्रसेनाला दिले. (४१)
एवं सप्तदशकृत्वः तावत्यक्षौहिणीबलः ।
युयुधे मागधो राजा यदुभिः कृष्णपालितैः ॥ ४२ ॥
सत्रावेळा जरासंध एवढे सैन्य घेउनी । पातला लढला कृष्णा कृष्णसेनेसि ही तसा ॥ ४२ ॥
एवं - याप्रमाणे - तावत्यक्षौहिणीबलः - तितकेच तेवीस अक्षौहिणी सैन्य असलेला - मागधः राजा - मगधदेशाचा राजा जरासंध - कृष्णपालितैः यदुभिः - श्रीकृष्णाने रक्षिलेल्या यादवांबरोबर - सप्तदशकृत्वः - सतरावेळा - युयुधे - युद्ध करिता झाला. ॥४२॥
अशा प्रकारे सतरा वेळा, दरवेळी तेवीस अक्षौहिणी सेना एकत्रित करून मगधराज जरासंधाने श्रीकृष्णांच्या छत्राखाली असलेल्या यादवांशी युद्ध केले. (४२)
अक्षिण्वन् तद् बलं सर्वं वृष्णयः कृष्णतेजसा ।
हतेषु स्वेष्वनीकेषु त्यक्तोऽयादरिभिर्नृपः ॥ ४३ ॥
परंतु यादवे कृष्ण-शक्तिने हरिले तया । मारिता सर्व ते सैन्य स्वपुरा पातला पुन्हा ॥ ४३ ॥
वृष्णयः - यादव - कृष्णतेजसा - श्रीकृष्णाच्या तेजामुळे - तत् सर्वं बलं अक्षिण्वन् - ते सर्व जरासंधाचे सैन्य क्षीण करिते झाले - स्वेषु अनीकेषु हतेषु - स्वतःचे सैन्य मारले गेले असता - नृपः - जरासंध - अरिभिः त्यक्तः अयात् - शत्रूंनी सोडून दिला असता निघून गेला. ॥४३॥
परंतु श्रीकृष्णांच्या प्रभावामुळे यादवांनी प्रत्येक वेळी सर्व सेना नष्ट केली. जेव्हा सर्व सेना नष्ट होत असे, त्यावेळी यादवांनी सोडून दिलेला जरासंध आपल्या राजधानीकडे परतत असे. (४३)
अष्टादशम सङ्ग्रामे आगामिनि तदन्तरा ।
नारदप्रेषितो वीरो यवनः प्रत्यदृश्यत ॥ ४४ ॥
संग्राम आठरावा तो योजिता नारदे तदा । कालयवन तो दैत्य कृष्णाने पाहिला असे ॥ ४४ ॥
अष्टादशमसंग्रामे आगामिनि - अठरावा युद्धकाळ प्राप्त झाला असता - तदन्तरा - त्या अवकाशात - नारदप्रेषितः वीरः यवनः - नारदाने पाठविलेला पराक्रमी कालयवन - प्रत्यदृश्यत - दिसला. ॥४४॥
जेव्हा अठरावे युद्ध होणार होते, त्याचवेळी नारदांनी पाठविलेला वीर कालयवन राम - कृष्णांच्या दृष्टीस पडला. (४४)
रुरोध मथुरामेत्य तिसृभिः म्लेंच्छकोटिभिः ।
नृलोके चाप्रतिद्वन्द्वो वृष्णीन् श्रुत्वात्मसम्मितान् ॥ ४५ ॥
आपुल्या सम तो कृष्ण यादवी थोर सैन्य ते । ऐकता तीन कोटीचे म्लेंच्छ सैन्यचि योजिले ॥ ४५ ॥
नृलोके च अप्रतिद्वन्द्वः - मनुष्यलोकी ज्याला प्रतिस्पर्धी कोणी नव्हता असा तो कालयवन - वृष्णीन् आत्मसंमतान् श्रुत्वा - यादव आपल्या बरोबरीचे आहेत असे ऐकून - मथुरां एत्य - मथुरेत येऊन - तिसृभिः म्लेच्छकोटिभिः रुरोध - तीन कोटी म्लेच्छांकडून वेढिता झाला. ॥४५॥
युद्धामध्ये कालयवनासमोर उभा राहील असा दुसरा कोणताही वीर त्यावेळी जगात नव्ह्ता. यादव आपल्यासारखेच बलवान आहेत, हे ऐकून त्याने तीन कोटी म्लेंच्छ सेना आणून मथुरा नगरीला वेढा दिला. (४५)
तं दृष्ट्वाचिन्तयत्कृष्णः सङ्कर्षण सहायवान् ।
अहो यदूनां वृजिनं प्राप्तं ह्युभयतो महत् ॥ ४६ ॥
अकाली पाहिला हल्ला बंधुंनी युक्ति योजिली । विपत्ती दोन त्या एका समयी पातल्या तदा ॥ ४६ ॥
संकर्षणसहायवान् कृष्णः - बलरामाचे सहाय्य असलेला श्रीकृष्ण - तं दृष्ट्वा - त्या कालयवनाला पाहून - अचिन्तयत् - विचार करिता झाला - यदूनां हि उभयतः महत् वृजिनं प्राप्तम् - यादवांवर खरोखर दोन्ही बाजूंनी मोठेच संकट प्राप्त झाले. ॥४६॥
ते पाहून श्रीकृष्ण आणि बलराम यांनी विचार केला की, अहो ! यावेळी यादवांवर तर जरासंध आणि कालयवन या दोघांकडून एकाचवेळी संकट आले आहे. (४६)
यवनोऽयं निरुन्धेऽस्मान् अद्य तावन्महाबलः ।
मागधोऽप्यद्य वा श्वो वा परश्वो वाऽऽगमिष्यति ॥ ४७ ॥
बलवान् यवने आज आम्हाला घेरिले असे । उद्या वा परवा येई जरासंधहि शत्रु तो ॥ ४७ ॥
अयं महाबलः यवनः - हा मोठा बलाढय कालयवन - अद्यतावत् अस्मान् निरुन्धे - आज तर आम्हांला वेढित आहे - मागधः अपि - जरासंध सुद्धा - अद्य वा श्वो वा परश्वो वा - आज किंवा उद्या अथवा परवा - आगमिष्यति - येईल. ॥४७॥
आज या अतिशय बलशाली यवनाने येऊन आम्हाला घेरले आहे. आणि जरासंधसुद्धा आज, उद्या किंवा परवा येईलच. (४७)
आवयोः युध्यतोरस्य यद्यागन्ता जरासुतः ।
बन्धून् हनिष्यत्यथ वा नेष्यते स्वपुरं बली ॥ ४८ ॥
लढण्या गुंतलो दोघे तर तो भाउ-बंधु हे । बांधोनी नेइ तो यांना बलवान् बहुची असे ॥ ४८ ॥
अस्य आवयोः युद्ध्यतोः - त्याच्याबरोबर आपण उभयता युद्ध करीत असताना - यदि - जर - बली जरासुतः आगन्ता - बलाढय जरासंध येईल - (बन्धून्) वधिष्यति - बंधूंना मारील - अथवा स्वपुरं नेष्यते - किंवा आपल्या नगराला नेईल. ॥४८॥
जर आम्ही दोघेही याच्याबरोबर लढू लागलो आणि त्याचवेळी बलवान जरासंध येऊन पोहोचला, तर तो आमच्या बांधवांना मारील किंवा कैद करुन आपल्या नगरात घेऊन जाईल. (४८)
तस्मादद्य विधास्यामो दुर्गं द्विपददुर्गमम् ।
तत्र ज्ञातीन् समाधाय यवनं घातयामहे ॥ ४९ ॥
म्हणोनी निर्मुया दुर्ग दुर्गमो मानवास जो । किल्यात ठेवुया सारे मग या यवना वधू ॥ ४९ ॥
तस्मात् - म्हणून - अद्य - आज - द्विपददुर्गमम् दुर्गं विधास्यामः - मनुष्यांना जाण्यास कठीण असा किल्ला बांधू - तत्र (च) ज्ञातीन् समाधाय - आणि तेथे ज्ञातिबांधवांना ठेवून - यवनं घातयामहे - कालयवनाला मारून टाक. ॥४९॥
म्हणून आज आम्ही अशा ठिकाणी एक नगर बांधू की, ज्यामध्ये कोणाही मनुष्याला प्रवेश करणे अवघड जाईल. नंतर आपल्या बांधवांना तेथे पोहोचवून या यवनाचा वध करवू. (४९)
इति संमंत्र्य भगवान् दुर्गं द्वादशयोजनम् ।
अन्तःसमुद्रे नगरं कृत्स्नाद्भुतमचीकरत् ॥ ५० ॥
बंधूचा घेतला सल्ला कृष्णाने सागरात त्या । निर्मिले द्वारकापूर अठ्ठेचाळीस कोस जे ॥ ५० ॥
भगवान् - श्रीकृष्ण - इति संमन्त्र्य - असा विचार ठरवून - द्वादशयोजनं कृत्स्नाद्भुतं दुर्गं नगरं - बारा योजने विस्ताराचे अत्यंत आश्चर्यकारक आणि किल्ल्याप्रमाणे दुर्गम असे नगर - अन्तःसमुद्रे अचीकरत् - समुद्रामध्ये रचिता झाला. ॥५०॥
बलरामांशी अशा प्रकारे सल्लमसलत करुन श्रीकृष्णांनी समुद्राच्या आत मनुष्यांना जाण्यास कठीण असे एक नगर बनविले. त्यातील सर्वच वस्तू अद्भुत होत्या आणि त्या नगराची लांबी रुंदी शहाण्णव मैल होती. (५०)
विवरण :- प्रत्येकवेळी पराभूत होऊनहि जरासंध पुन्हा पुन्हा मथुरेवर हल्ला करीत राहिला. त्याच दरम्यान नारदमुनींनी सुचविल्यावरून 'कालयवन' या म्लेच्छानेहि तीन कोटी सैन्यासह मथुरेवर हल्ला केला. या हल्ल्याने भगवंत काहीसे चिंतित झाले. विचार करून त्यांनी आपल्या रणनीतीत थोडासा बदल करून माघार घेण्याचे ठरविले. काही वेळा अशी माघार घेणे इष्ट असते. रणनीतीचाच तो एक भाग असतो. (शिवाजी महाराजहि गनिमी कावा खेळत.) भगवंत तर युद्धकलानिपुण आणि श्रेष्ठ मुत्सद्दी होते. म्हणून मथुरावासीयांचे रक्षण करण्यासाठी त्यांनी त्यांना मथुरेपासून दूर ठेवण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी समुद्रामध्ये दुर्गम किल्ला बनवून त्यात स्थापत्यशास्त्राने युक्त आणि ऐश्वर्यसंपन्न अशी एक नगरी निर्माण केली. (राजाच्या दृष्टीने दुर्ग-किल्ला असणे आवश्यक होतेच.) शिवाय समुद्र हा कृष्णाचा सासरा. सर्व रत्नांना पोटात सामावून घेणारा, अत्यंत संपन्न असणारा (मुद्राभिः सहितः समुद्रः ।) असा धनी. त्याची कन्या लक्ष्मी, विष्णुपत्नी, माहेरी रहावयास मिळणार म्हणून खूश हाही एक वेगळा भाग. (असारे खलु संसारे सारं श्वशुरमन्दिरम् ।) अशा समुद्रातील नगरीमध्ये, द्वारकेत मथुरावासीयांना कृष्णाने योगसामर्थ्याने नेऊन ठेवले आणि त्यांचे रक्षण केले. (४९-५०)
दृश्यते यत्र हि त्वाष्ट्रं विज्ञानं शिल्पनैपुणम् ।
रथ्याचत्वरवीथीभिः यथावास्तु विनिर्मितम् ॥ ५१ ॥
अद्भुत वस्तु त्या तेथे नैपुण्य विश्वकर्मचे । योजुनी सडका रस्ते छेदिती ते परस्परा ॥ ५१ ॥
यत्र हि - जेथे खरोखर - शिल्पनैपुणं त्वाष्ट्रं विज्ञानं - कलाकौशल्यासंबंधी त्वष्टयाचे विशेष ज्ञान - रथ्याचत्त्वरवीथीभिः - रस्ते, चव्हाटे व पेठा यांनी - यथावास्तुविनिर्मितम् - जागच्या जागी पद्धतशीर घरे बांधिलेले - दृश्यते - दिसत होते. ॥५१॥
त्या नगरात सर्वत्र विश्वकर्म्याचे वास्तुज्ञान आणि शिल्पलकलेचे नैपुण्य प्रगट झाले होते. वास्तुशास्त्रानुसार सर्वत्र विश्वकर्म्याचे वास्तुज्ञान आणि शिल्पकलेचे नैपुण्य प्रगट झाले होते. वास्तुशास्त्रानुसार तेथे सडका, चौक आनि व्यापारी पेठा यांची रचना केली होती. (५१)
सुरद्रुम-लतोद्यान विचित्रोपवनान्वितम् ।
हेमशृङ्गैर्दिविस्पृग्भिः स्फटिकाट्टालगोपुरैः ॥ ५१ ॥
उद्याने शोभली तेथे स्वर्गीय वृक्ष डौलती । सुवर्णशिखरे उंच द्वारे सज्जेहि ते तसे ॥ ५२ ॥
सुरद्रुमलतोद्यानविचित्रोपवनान्वितम् - कल्पवृक्ष व कल्पलता ज्यांत आहेत अशी क्रीडास्थाने व चित्रविचित्र बागा ह्यांनी युक्त - दिविस्पृग्भिः हेमशृङगैः स्फाटिकाट्टालगोपुरैः - आकाशापर्यंत उंच गेलेल्या सुवर्णाच्या शिखरांनी युक्त असलेल्या स्फटिकाच्या गच्च्या व वेशी ह्यांनी - निर्मितम् - निर्मिलेले. ॥५२॥
देववृक्ष आणि वेली असलेली उद्याने व वैशिष्ट्यपूर्ण उपवनांनी युक्त असे ते नगर होते. सोन्याची शिखरे असलेले, स्फटिकांच्या गच्च्या आणि गगनचुंबी गोपुरे यांनी ते सुंदर दिसत होते. (५२)
राजतारकुटैः कोष्ठैः हेमकुम्भैः अलङ्कृतैः ।
रत्नकूटैः गृहैर्हेमैः महामरकतस्थलैः ॥ ५३ ॥
चांदीनी पितळेच्या त्या धान्य कोठ्याहि निर्मिल्या । स्वर्णमहाल नी त्याच्या शिखरा रत्न मौक्तिक ॥ ५३ ॥
राजतारकुटैः कोष्ठैः अलंकृतैः हेमकुम्भैः - पितळ व चांदी ह्यांनी निर्मिलेल्या कोठारांनी व भूषविलेल्या सुवर्णाच्या घटांनी - रक्तकूटैः गृहैः - पद्मरागमण्यांची शिखरे असलेल्या घरांनी - हैमैः महामारकतस्थलैः - सुवर्णाच्या व उंची पाचूच्या भूमींनी. ॥५३॥
तेथे धान्य ठेवण्यासाठी चांदी पितळेची गोदामे होती. तेथील महाल सोन्याचे होते व त्यांवर सुवर्णकलश बसविलेले होते. त्यांची शिखरे रत्नांची होती आणि फरशी मोठमोठ्या पाचूंची बनविलेली होती. (५३)
वास्तोष्पतीनां च गृहैः वल्लभीभिश्च निर्मितम् ।
चातुर्वर्ण्यजनाकीर्णं यदुदेवगृहोल्लसत् ॥ ५४ ॥
मंदिरे वास्तुदेवांची सज्जे सुंदर त्यात ते । वर्णचारी असे लोक निवास करण्या असे । मध्यभागी नृपाचे नी राम कृष्णमहाल ही ॥ ५४ ॥
वास्तोष्पतीनां गृहैः - देवालयांनी - च वलभीभिः निर्मितम् - आणि उच्च स्थाने ह्यांनी निर्मिलेले - चातुर्वर्णजनाकीर्णम् - चारहि वर्णाच्या लोकांनी गजबजलेले - वसुदेवगृहोल्लसत् - वसुदेवाच्या मंदिराने शोभणारे. ॥५४॥
तसेच त्या नगरात वास्तुदेवतेचे मंदिर आणि सज्जेसुद्धा होते. चारही वर्णांचे लोक तेथे राहाणार होते. तसेच तेथे यादवप्रमुखांचे महालही उठून दिसत होते. (५४)
सुधर्मां पारिजातं च महेन्द्रः प्राहिणोद्धरेः ।
यत्र चावस्थितो मर्त्यो मर्त्यधर्मैर्न युज्यते ॥ ५५ ॥
सुधर्मा पारिजातो हे देवेंद्रे दिधले तदा । सभा ती दिव्य ऐसी की भूक तृष्णा न लागते ॥ ५५ ॥
महेन्द्रः - इंद्र - हरेः - श्रीकृष्णाकरिता - सुधर्मां च पारिजातं च - सुधर्मा नावाची सभा व पारिजातक वृक्ष - प्राहिणोत् - पाठविता झाला - यत्र - जेथे - अवस्थितः मर्त्यः - असलेला मनुष्य - मर्त्यधर्मैः न युज्यते - मान्वधर्मांनी युक्त होत नाही. ॥५५॥
इंद्राने त्यावेळी श्रीकृष्णांसाठी पारिजात वृक्ष आणि सुधर्मा सभा पाठविली. तेथे बसलेल्या मनुष्याला मर्त्यलोकातील दुःखांचा स्पर्श होत नसे. (५५)
श्यामैककर्णान् वरुणो हयान् शुक्लान् मनोजवान् ।
अष्टौ निधिपतिः कोशान् लोकपालो निजोदयान् ॥ ५६ ॥ यद् यद् भगवता दत्तं आधिपत्यं स्वसिद्धये । सर्वं प्रत्यर्पयामासुः हरौ भूमिगते नृप ॥ ५७ ॥
मनोवेगे असे कैक वरुणे श्यामकर्ण नी । कुबेरे अष्टसंपत्ती लोकपाले विभूति त्या ॥ ५६ ॥ शक्तिनी सिद्धिही त्यांनी कृष्णाला दिधल्या पहा । तसे तो जन्मता कृष्ण अर्पिल्या पदि सर्व त्या ॥ ५७ ॥
नृप - हे राजा - वरुणः - वरुण - श्यामैककर्णान् मनोजवान् शुक्लान् हयान् - नीलवर्णाचा एकच कान असणार्या व मनोवेगाने धावणार्या शुभ्र घोडयांना - (च) लोकपालः निधिपतिः - आणि लोकपाल कुबेर - निजोदयान् अष्टौ कोशान् - स्वतःचा उदय करणार्या आठ निधींना - यत् यत् (च) - तसेच आणखी जे जे काही - आधिपत्यं - राजाला शोभणारे - भगवता स्वसिद्धये दत्तं - परमेश्वराने स्वकार्यसिद्ध्यर्थ दिले होते - (तत्) सर्वं - ते सर्व - हरौ भूमिगते - भगवंताने पृथ्वीवर अवतार घेतला असता - प्रत्यर्पयामासुः - परत अर्पिते झाले. ॥५६-५७॥
ज्यांचा एक एक कान काळा होता, असे मनोवेगाने धावणारे पांढरे घोडे वरुणाने पाठविले. धनपती कुबेराने आठ निधी पाठविले आनि अन्य लोकपालांनीसुद्धा स्वतःकडील महत्वाच्या संपत्ती भगवंतांकडे पाठविल्या. (५६) परीक्षिता ! लोकपालांना आपापली कामे करण्यासाठी श्रीकृष्णांनी जे जे दिले होते, ते ते सर्व श्रीकृष्ण पृथ्वीवर अवतीर्ण झाले, तेव्हा त्यांनी त्यांना अर्पण केले. (५७)
तत्र योगप्रभावेण नीत्वा सर्वजनं हरिः ।
प्रजापालेन रामेण कृष्णः समनुमन्त्रितः । निर्जगाम पुरद्वारात् पद्ममाली निरायुधः ॥ ५८ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे उत्तरार्धे दुर्गनिवेशनं नाम पञ्चाशोऽध्यायः ॥ ५० ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
योगमायें तदा कृष्णे स्वजना द्वारकापुरीं । दिधले पाठवोनीया उरले त्यास रक्षिण्या ॥ बळीला ठेविले तेथे विचारे माळ घातली । अस्त्र शस्त्र न घेता ते आले बाहेर कृष्ण तै ॥ ५८ ॥ ॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर पन्नासावा अध्याय हा ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
तत्र - त्या नगरीमध्ये - सर्वजनं योगप्रभावेण नीत्वा - मथुरेतील सर्व लोकांना योगसामर्थ्याने नेऊन - प्रजापालेन रामेण समनुमन्त्रितः हरिः कृष्णः - प्रजारक्षक बलरामाशी ज्याने मसलत केली आहे असा हरि श्रीकृष्ण - पद्ममाली निरायुधः - कमळाची माळ धारण करणारा व ज्याच्याजवळ शस्त्र नाही असा - पुरात् निर्जगाम - मथुरा नगरीच्या वेशीतून बाहेर पडला. ॥५८॥ पन्नासावा अध्याय समाप्त
आपल्या योगमायेने श्रीकृष्णांनी सर्व संबंधितांना द्वारकेमध्ये नेऊन पोहोचचिले. उरलेल्या प्रजेच्या रक्षणासाठी बलरामांना मथुरापुरीत ठेवून त्यांच्या सल्ल्याने गळ्यात कमळांची माळ घालून, कोणतेही शस्त्र हातात न घेता ते स्वतः नगराच्या प्रमुख दरवाजातून बाहेर पडले. (५८)
अध्याय पन्नासावा समाप्त |