श्रीमद् भागवत पुराण
दशमः स्कन्धः
एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः

अक्रूरस्य हस्तिनापुरे गमनं; कुन्त्याः करुणोद्‌गारः;
अक्रूरधृतराष्ट संवादः; अक्रूरस्य पुनर्यदुपूर्यामागमनंच -

अक्रूराचे हस्तिनापुरला गमन -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् )
स गत्वा हास्तिनपुरं पौरवेन्द्रयशोऽङ्‌कितम् ।
ददर्श तत्राम्बिकेयं सभीष्मं विदुरं पृथाम् ॥ १ ॥
सहपुत्रं च बाह्लीकं भारद्वाजं सगौतमम् ।
कर्णं सुयोधनं द्रौणिं पाण्डवान्सुहृदोऽपरान् ॥ २ ॥
( अनुष्टुप् )
श्रीशुकदेव सांगतात -
अक्रूर घेउनी आज्ञा हस्तिनापुरि पातले ।
अक्षय कीर्तिची चिन्हे वस्तुवस्तूत तेथल्या ।
दिसली पुरुवंशाच्या नृपतींची पदोपदी ॥ १ ॥
तिथे ते धृतराष्ट्रोनी भीमो विदुर कुंति नी ।
बाल्हीक सोमदत्तो नी अश्वत्थामा नि द्रोण तै ।
कर्ण दुर्योधनो तैसे युधिष्ठिरादि पांडवा ।
अन्यान्य इष्टमित्रांना भेटले प्रेमपूर्वक ॥ २ ॥

सः पौरवेन्द्रयशोऽङ्‌कितम् - तो अक्रूर पौरव राजांच्या कीर्तीने चिन्हित झालेल्या हस्तिनापुरं गत्वा - हस्तिनापुराला जाऊन तत्र सभीष्मं आम्बिकेयं विदुरं पृथां - तेथे भीष्मासह धृतराष्ट्र, विदुर, कुंती, सहपुत्रं बाह्‌लीकं - पुत्रासह बाहलीक, सगौतमं भारद्वाजं कर्णं - कृपाचार्यासह द्रोणाचार्य, कर्ण, सुयोधनं द्रौणिं पाण्डवान् - दुर्योधन, अश्वत्थामा, पांडव अपरान् सुहृदः च ददर्श - व दुसरेहि आप्त यांना पाहता झाला. ॥१-२॥
श्रीशुक म्हणतात- अक्रूर पुरूवंशी राजांच्या कीर्तीने मंडित असलेल्या हस्तिनापुरला गेला. तो तेथे धृतराष्ट्र, भीष्म, विदुर, कुंती, बाल्हीक आणि त्याचा पुत्र सोमदत्त, द्रोणाचार्य, कृपाचार्य, कर्ण, दुर्योधन, अश्वत्थामा, पांडव व इतर इष्टमित्रांना भेटला. (१-२)


यथावद् उपसङ्‌गम्य बन्धुभिर्गान्दिनीसुतः ।
सम्पृष्टस्तैः सुहृद्वार्तां स्वयं चापृच्छदव्ययम् ॥ ३ ॥
संबंधितासि भेटे जै अक्रूर गाधिनंदन ।
तयांनी पुसले क्षेम मथुरावासिचे तसे ॥ ३ ॥

बंधुभिः यथावत् उपसंगम्य - बांधवांच्या यथायोग्य भेटी घेतल्यावर गांदिनीसुतः - अक्रूर तैः सुहृद्वार्तां संपृष्टः - त्या बांधवांकडून आप्तजनांची खुशाली विचारिली गेली स्वयं च (तान्) अव्ययं अपृच्छत् - आणि स्वतः त्यांना खुशाली विचारिता झाला. ॥३॥
अक्रूर जेव्हा सर्व संबंधितांना आस्थेवाईकपणे भेटला, तेव्हा तेथील लोकांनी मथुरावासी स्वजनांची खुशाली त्याला विचारली. त्याचे उत्तर देऊन अक्रूरानेसुद्धा त्यांच्या खुशालीसंबंधी चौकशी केली. (३)


उवास कतिचिन्मासान् राज्ञो वृत्तविवित्सया ।
दुष्प्रजस्याल्पसारस्य खलच्छन्दानुवर्तिनः ॥ ४ ॥
पाहण्या धृतराष्ट्रो ते पांडवां वागतो कसे ।
राहता दिसले त्यांना शकुनी फूस लावितो ॥ ४ ॥

दुष्प्रजस्य - ज्याचे पुत्र दुष्ट आहेत अल्पसारस्य - व जो कोत्या बुद्धीचा खलच्छंदानुवर्तिनः - आणि दुर्जनांच्या सांगण्याप्रमाणे वागणारा राज्ञः - अशा त्या धृतराष्ट्र राजाचे वृत्तविवित्सया - वागणूक जाणण्याच्या इच्छेने कतिचित् मासान् उवास - कित्येक महिने रहाता झाला. ॥४॥
राजाचे पांडवांबरोबरचे वर्तन जाणून घेण्यासाठीच अक्रूर काही महिने तेथे राहिला. खरे पाहू गेले तर, आपल्या दुष्ट पुत्रांच्या इच्छेविरुद्ध काहीही करण्याचे धाडस, शकुनी इत्यादी दुष्टांच्या सल्ल्यानुसार काम करणार्‍या धृतराष्ट्रामध्ये नव्हते. (४)


तेज ओजो बलं वीर्यं प्रश्रयादींश्च सद्‍गुणान् ।
प्रजानुरागं पार्थेषु न सहद्‌भिश्चिकीर्षितम् ॥ ५ ॥
कृतं च धार्तराष्ट्रैर्यद् गरदानाद्यपेशलम् ।
आचख्यौ सर्वमेवास्मै पृथा विदुर एव च ॥ ६ ॥
वदले कुंति विदुरो प्रभाव बल वीरता ।
विनयो शस्त्रकौशल्य पांडवांचे बघोनिया ।
दुर्योधन जळे चित्ती अनिष्ठ करण्या बघे ॥ ५ ॥
दुर्योधनादि बंधूंनी पांडवा कैक वेळ ते ।
वीषपानादिचे घात केलासे अग्निघातही ॥ ६ ॥

पृथा विदुरः च - कुंती आणि विदुर पार्थेषु - पांडवांच्या ठिकाणी तेजः ओजः बलं - तेज, शक्ति, उत्साह, वीर्यप्रश्रयादीन् सद्‌गुणान् - पराक्रम, विनय इत्यादि सद्‌गुण प्रजानुरागं च - आणि प्रजांचे त्यांजवरील प्रेम नसहद्भिः धार्तराष्ट्रैः - सहन न करणार्‍या धृतराष्ट्रपुत्र दुर्योधनादिकांनी चिकीर्षितं गरदानादि अपेशलं - योजिलेल्या विष देणे इत्यादि वाईट गोष्टी तत् च सर्वम् एव अस्मै आचख्यौ - ते सर्व काही ह्या अक्रूराला सांगता झाला. ॥५-६॥
धृतराष्ट्राचे दुर्योधन इत्यादी पुत्र पांडवांचा प्रभाव, शस्त्रकौशल्य, बल, शौर्य आणि विनय इत्यादी सद्‍गुण पाहून त्यांचा द्वेष करतात. प्रजा पांडवांवरच अधिक प्रेम करते, हेही त्यांना सहन होत नाही. म्हणून त्यांनी पांडवांवर विषप्रयोग इत्यादीकरून त्यांच्यावर अत्याचार केलेले आहेत. कुंतीने आणि विदुराने हे सारे अक्रूराला सांगितले. (५-६)


पृथा तु भ्रातरं प्राप्तं अक्रूरमुपसृत्य तम् ।
उवाच जन्मनिलयं स्मरन्त्यश्रुकलेक्षणा ॥ ७ ॥
कुंतीच्या घरि ते आले भगिनी भेटली तयां ।
माहेरा आठवोनीया अश्रु ढाळीत बोलली ॥ ७ ॥

पृथा तु प्राप्तं - कुंती तर आलेल्या भ्रातरं तं उपसृत्य - त्या अक्रूर नामक भावाला सामोरी जाऊन जन्मनिलयं स्मरन्ती - जन्मभूमीचे स्मरण करीत अश्रुकुलेक्षणा उवाच - डोळ्यात अश्रू आणून म्हणाली. ॥७॥
अक्रूर जेव्हा कुंतीच्या घरी गेला, तेव्हा ती आपल्या भावाजवळ जाऊन बसली. अक्रूराला पाहून कुंतीच्या मनात आपल्या माहेराची आठवण जागी झाली आणि तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली. (७)


अपि स्मरन्ति नः सौम्य पितरौ भ्रातरश्च मे ।
भगिन्यौ भ्रातृपुत्राश्च जामयः सख्य एव च ॥ ८ ॥
प्रिय बंधो कधी माझी माय बाप नि बंधु ते ।
भाचे स्त्रिया सख्या कोणी आठवो करितात का ८ ॥

सौ‌म्य - हे अक्रूरा मे पितरौ भ्रातरः भगिन्यः (च) - माझे आईबाप, भाऊ व बहिणी भ्रातृपुत्राः जामयः सख्यः एव च - आणि भाचे, कुलस्त्रिया, मैत्रीणी ह्या सर्व न स्मरन्ति अपि - आमची आठवण करितात काय ? ॥८॥
दादा ! माझे आई-वडील, भाऊ-बहीणी, पुतणे, इतर नातलग स्त्रिया आणि मैत्रिणी माझी आठवण काढतात का ? (८)


भ्रात्रेयो भगवान् कृष्णः शरण्यो भक्तवत्सलः ।
पैतृष्वसेयान् स्मरति रामश्चाम्बुरुहेक्षणः ॥ ९ ॥
ऐकते मम भाचे ते कृष्ण नी बलराम हे ।
मामे भाऊ मुलांचे जे शरणागतरक्षक ॥ ९ ॥

भगवान् शरण्यः - सर्वैश्वर्यसंपन्न शरणागतांचे रक्षण करणारा भक्तवत्सलः भ्रात्रेयः कृष्णः - व भक्तांवर प्रेम करणारा माझा भाचा श्रीकृष्ण अम्बुरुहेक्षणः रामः च - आणि कमलनयन बलराम पैतृष्वस्रेयान् स्मरति (अपि) - आतेभावांची आठवण करतो काय ? ॥९॥
माझा भाचा भक्तवत्सल आणि शरण आलेल्यांचे रक्षण करणारा भगवान श्रीकृष्ण आणि कमलनयन बलराम यांना आपल्या या आतेभावांची कधी आठवण येते का ? (९)


सपत्‍नमध्ये शोचन्तीं वृकानां हरिणीमिव ।
सान्त्वयिष्यति मां वाक्यैः पितृहीनांश्च बालकान् ॥ १० ॥
शत्रुंनी घेरिले आम्हा हरिणी लांडग्यात जै ।
कृष्ण येईल का येथे आम्हाला सुखवील का ॥ १० ॥

वृकाणां हरिणीम् इव - लांडग्यांमध्ये असणार्‍या हरिणींप्रमाणे सपत्नमध्ये शोचन्तीं मां - शत्रूंच्या समुदायात शोक करणार्‍या माझे पितृहीनान् मे बालकान् च - आणि माझ्य़ा पितृरहित मुलांचे वाक्यैः सान्त्वयिष्यति अपि - मधुर भाषणांनी सांत्वन करील काय ? ॥१०॥
शत्रूंच्या गराड्यात असल्याने मी शोकाकुल आहे. लांडग्यांच्या कळपात हरिणी सापडावी, तशी माझी अवस्था आहे. श्रीकृष्ण कधी येथे येऊन माझे आणि या अनाथ बालकांचे सांत्वन करील काय ?" (१०)


कृष्ण कृष्ण महायोगिन् विश्वात्मन् विश्वभावन ।
प्रपन्नां पाहि गोविन्द शिशुभिश्चावसीदतीम् ॥ ११ ॥
(कृष्ण समोर आहे असे समजून म्हणते )
सच्चिदानंद कृष्णा रे योगी विश्वात्मरूप तू ।
गोविंदा भोगिते दुःख सुपुत्रा रक्षि रे मला ॥ ११ ॥

कृष्ण कृष्ण महायोगिन् - हे कृष्णा, हे कृष्णा, हे योगीश्वरा, विश्वभावन गोविंद - हे विश्व निर्माण करणार्‍या गोविंदा शिशुभिः (सह) अवसीदतीं - बालकांसह क्लेश भोगणार्‍या व प्रपन्नां (मां) पाहि - शरण आलेल्या माझे रक्षण कर. ॥११॥
हे सच्चिदानंदस्वरूप श्रीकृष्णा ! तू महायोगी आहेस, विश्वात्मा आहेस आणि तूच सगळ्या विश्वाचा जीवनदाता आहेस. हे गोविंदा ! आपल्या मुलांसह दुःखी असलेली मी तुला शरण आले आहे. आमचे रक्षण कर ! (११)


नान्यत्तव पदाम्भोजात् पश्यामि शरणं नृणाम् ।
बिभ्यतां मृत्युसंसाराद् ईस्वरस्यापवर्गिकात् ॥ १२ ॥
संसार नाशवंतो हा मोक्ष देती तुझी पदे ।
भवाचे भय ते ज्यांना त्यांना आश्रय तूच की ॥ १२ ॥

मृत्युसंसारात् बिभ्यतां नृणां - जन्ममृत्युरूप संसारापासून भ्यालेला मनुष्यांना ईश्वरस्य तव - परमेश्वर अशा तुझ्या आपवर्गिकात् पदाम्भोजात् अन्यत् - मोक्षदायक चरणकमलाशिवाय दुसरे शरणं न पश्यामि - रक्षक असे मला दिसत नाही. ॥१२॥
हे जग मृत्यूने व्याप्त आहे आणि तुझे चरण मोक्ष देणारे आहेत. जे लोक या जगाला भ्यालेले आहेत, त्यांच्यासाठी शरण जाण्याला तुझ्या चरणांव्यतिरिक्त आणखी दुसरा कोणताही आश्रय नाही. (१२)


नमः कृष्णाय शुद्धाय ब्रह्मणे परमात्मने ।
योगेश्वराय योगाय त्वामहं शरणं गता ॥ १३ ॥
न स्पर्शी तुजला माया शुद्ध तू परब्रह्मची ।
स्वामी तू साधनांचा, मी शरणी रक्ष तू मला ॥ १३ ॥

शुद्धाय ब्रह्मणे परमात्मने - शुद्ध, ब्रह्मरूपी व परमात्मा अशा योगेश्वराय योगाय - योगाधिपति व योगरूपी अशा कृष्णाय नमः - श्रीकृष्णाला नमस्कार असो अहं त्वां शरणं गता - मी तुला शरण आले आहे. ॥१३॥
हे श्रीकृष्णा ! तू परम शुद्ध परब्रह्म परमात्मा आहेस. सर्व योगांचा स्वामी असून तू स्वतः योगसुद्धा आहेस. तुला मी शरण आले आहे. तू माझे रक्षण कर." (१३)


श्रीशुक उवाच -
इत्यनुस्मृत्य स्वजनं कृष्णं च जगदीश्वरम् ।
प्रारुदद् दुखिता राजन् भवतां प्रपितामही ॥ १४ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
पंजी कुंती तुझी राजा कृष्णाला स्मरुनी तदा ।
बहूत दुःखिता झाली रडली स्फुंद स्फुंदुनी ॥ १४ ॥

राजन् - हे परीक्षित राजा दुःखिता भवतां प्रपितामही - दुःखित झालेली तुझी पणजी कुंती स्वजनं जगदीश्वरं कृष्णं च - आप्त व जगत्पति अशा श्रीकृष्णाला इति अनुसंस्मृत्य - ह्याप्रमाणे आठवून प्रारुदत् - रडती झाली. ॥१४॥
श्रीशुक म्हणतात - परीक्षिता ! तुझी पणजी कुंती अशा प्रकारे स्वजनांचे आणि जगदीश्वर भगवान श्रीकृष्णांचे स्मरण करून अत्यंत दुःखी होऊन रडू लागली. (१४)


समदुःखसुखोऽक्रूरो विदुरश्च महायशाः ।
सान्त्वयामासतुः कुन्तीं तत्पुत्रोत्पत्तिहेतुभिः ॥ १५ ॥
अक्रूर विदुरो दोघे सुख दुःख समान त्या ।
वदले कुंतिला दोघे अधर्म मोडण्यास्तव ।
तुजला पुत्र हे झाले या शब्दे समजाविले ॥ १५ ॥

समदुःखसुखः महायशाः - सुख व दुःख ही ज्याला समान आहेत असा महाकीर्तिमान अक्रूरः च विदुरः - अक्रूर व विदुर हे कुंतीं - कुंतीचे तत्पुत्रोत्पत्तिहेतुभिः - तिच्या धर्मादि पुत्रांच्या जन्माचे कारण सांगून सान्त्वयामासतुः - सांत्वन करिते झाले. ॥१५॥
अक्रूर आणि कीर्तीमान विदुर हे दोघेही सुख-दुःखाला समदृष्टीने पाहात होते. त्यांनी तिच्या पुत्रांच्या जन्मदात्या देवतांचे तिला स्मरण करून देऊन तिचे सांत्वन केले. (१५)

विवरण :- सद्‌सद्‌विवेकबुद्धी गमावलेल्या आणि पुत्रप्रेमाने अंध झालेल्या धृतराष्ट्राकडून पांडवांना न्याय्य वागणूक मिळत नाही, या आणि अशाच वार्तांनी अस्वस्थ झालेल्या श्रीकृष्णाने धृतराष्ट्रास संदेश देण्यासाठी अक्रूरास हस्तिनापुरी पाठविले. त्यावेळी अनाथ आणि असहाय्य कुंतीने पांडवांच्या भवितव्याबद्दल वाटणारी चिंता आणि आपले दुःख अक्रूरापुढे व्यक्त केले. (त्यावेळी) तिचे सांत्वन करताना अक्रूराने 'तुझे पुत्र पांडव हे देवपुत्र असून पराक्रमी आहेत. तू काळजी करू नको.' असाही तिला दिलासा दिला. शूरसेनकन्या कुंती हिने आपल्या कौ‌‍मार्यावस्थेत महाकोपी असणार्‍या दुर्वास ऋषींची सेवा केली होती. संतुष्ट होऊन त्यांनी तिला एक विलक्षण मंत्र दिला. ज्यायोगे इच्छित पुरुषाला आवाहन करून पुत्रप्राप्ती करवून घेणे तिला शक्य होणार होते. या अन्वये तिला सूर्यापासून कर्ण, यमापासून, युधिष्ठिर, वायूपासून भीम, आणि इंद्रापासून अर्जुन अशी पुत्रप्राप्ती झाली. हे पुत्र देवांश होते. हे उघडच. पुढे हाच मंत्र तिने माद्रीला दिला आणि त्यायोगे अश्विनीकुमारांच्यापासून नकुल-सहदेव यांचा जन्म झाला. हे पाच देवांचेच पुत्र असल्याने पराक्रमी आहेत, त्यांचे भवितव्य उज्ज्वल आहे, त्यांनी धर्मरक्षणासाठीच जन्म घेतला आहे, असा दिलासा अक्रूराने कुंतीला दिला. (१५)



यास्यन् राजानमभ्येत्य विषमं पुत्रलालसम् ।
अवदत्सुहृदां मध्ये बन्धुभिः सौहृदोदितम् ॥ १६ ॥
अक्रूर निघता गेले धृतराष्ट्राचिये सभीं ।
सभेत कृष्ण रामाचा संदेश बोलले पहा ॥ १६ ॥

यास्यन् (अक्रूरः) - परत जावयास निघालेला अक्रूर विषमं - विरुद्ध वर्तन करणार्‍या पुत्रलालसं राजानं अभ्येत्य - व पुत्रांवर प्रेम करणार्‍या धृतराष्ट्राजवळ येऊन बन्धुभिः - रामकृष्णादि बांधवांना सौह्लदोदितं - प्रेमाने सांगितलेला निरोप सुहृदां मध्ये अवदत् - मित्रांच्या समाजामध्ये सांगू लागला. ॥१६॥
अक्रूर मथुरेला जाण्यासाठी निघाला, तेव्हा राजा धृतराष्ट्राकडे गेला. राजा आपल्या पुत्रांचा पक्षपाती होता आणि पांडवांशी त्याचे वर्तन पुत्रांसारखे नव्हते. अक्रूराने सर्वां समक्ष श्रीकृष्णांचा मित्रत्वाचा संदेश त्याला पाठविला. (१६)


अक्रूर उवाच -
भो भो वैचित्रवीर्य त्वं कुरूणां कीर्तिवर्धन ।
भ्रातर्युपरते पाण्डौ अधुनाऽऽसनमास्थितः ॥ १७ ॥
अक्रूर म्हणाले -
धृतराष्ट्र महाराजा वाढवा कुरु कीर्ति ती ।
मरता पंडु तो आता तुम्हीच स्वामि जाहला ॥ १७ ॥

भो कुरूणां कीर्तिवर्धन - हे कुरूंची कीर्ति वाढविणार्‍या भो वैचित्रवीर्य - हे विचित्रवीर्यपुत्रा धृतराष्ट्रा भ्रातरि पाण्डौ उपरते (सति) - भाऊ पांडू मृत झाला असता त्वं अधुना - तू सांप्रत आसनम् आस्थितः - राज्यासनावर आरूढ झाला आहेस. ॥१७॥
अक्रूर म्हणाला- कुरूंची कीर्ती वाढविणारे विचित्रवीर्यपुत्र महाराज धृतराष्ट्र ! आपला बंधू पांडू स्वर्गाला गेल्यावर आपण आता राज्यावर बसला आहात. (१७)


धर्मेण पालयन् उर्वीं प्रजाः शीलेन रञ्जयन् ।
वर्तमानः समः स्वेषु श्रेयः कीर्तिमवाप्स्यसि ॥ १८ ॥
धर्माने पृथिवी पाळा सर्वां आनंदि ठेविणे ।
समान वागता येश सद्‌गती शेवटी मिळे ॥ १८ ॥

ऊर्वी धर्मेण पालयन् - पृथ्वीचे धर्माने रक्षण करीत प्रजाः शीलेन रञ्जयन् - प्रजांचे सुखभावाने रंजन करणारा च स्वेषु समः वर्तमानः - आणि आपल्या भाऊबंदांवर समबुद्धि ठेवणारा श्रेयः कीर्तिं च अवाप्स्यसि - कल्याण व कीर्ति मिळविशील. ॥१८॥
आपण धर्मानुसार पृथ्वीचे पालन करावे. सदाचरणाने प्रजेला प्रसन्न ठेवावे आणि स्वजनां-बरोबर समान वर्तन ठेवावे. असे करण्याने आपल्याला लोकांमध्ये यश आणि परलोकी सद्‍गती प्राप्त होईल. (१८)


अन्यथा त्वाचरँल्लोके गर्हितो यास्यसे तमः ।
तस्मात्समत्वे वर्तस्व पाण्डवेष्वात्मजेषु च ॥ १९ ॥
वाईट वागता निंदा, नरकी पडताल की ।
म्हणॊनी पुत्रवत् माना पांडवा कुंतिच्या सुता ॥१९ ॥

अन्यथा तु आचरन् - तसे न वागता विपरीत आचरण करशील तर लोके गर्हितः तमः यास्यसे - लोकांमध्ये निंदा पावून अधोगतीला जाशील तस्मात् पांडवेषु च - म्हणून पांडवांवर आणि आत्मजेषु समत्वे वर्तस्व - दुर्योधनादि पुत्रांवर समबुद्धि ठेवून वाग. ॥१९॥
आपण जर याच्या विपरीत आचरण कराल, तर या लोकी निंदा होईल आणि मृत्यूनंतर नरकात जावे लागेल; म्हणून आपले पुत्र आणि पांडव या दोघांशीही समानतेने वागा. (१९)


नेह चात्यन्तसंवासः कस्यचित् केनचित् सह ।
राजन् स्वेनापि देहेन किमु जायात्मजादिभिः ॥ २० ॥
अक्षेय कांहि ना राही एकदा सोडणे असे ।
शरीर त्यागिणे लागे पुसणे अन्य काय ते ॥ २० ॥

राजन् - हे राजा इह स्वेन अपि - ह्या लोकी आपल्यासुद्धा देहेन कर्हिचित् - देहाशी केव्हाही केनचित् सह अत्यंतसंवासः न - कोणाबरोबर नेहमी सहवास घडत नाही जायात्मजादिभिः - तर मग स्त्रीपुत्रादिकांशी सहवास न (इति) किमु - कायमचा घडणार नाही हे काय सांगावयाला पाहिजे ? ॥२०॥
आपल्याला माहीतच आहे की, या जगात कधीही, कोणीही, कोणाहीबरोबर कायमचा राहू शकत नाही. राजन ! हीच गोष्ट आपल्या शरीराच्या बाबतीतही आहे. तर मग स्त्री-पुत्रादिकांविषयी काय सांगावे ? (२०)


एकः प्रसूयते जन्तुः एक एव प्रलीयते ।
एकोऽनुभुङ्‌क्ते सुकृतं एक एव च दुष्कृतम् ॥ २१ ॥
एकता जन्मतो जीव मरतो अंति एकटा ।
पाप-पुण्य जसे ज्याचे एकटा भोगितो तसे ॥ २१ ॥

जन्तुः एकःप्रसूयते - प्राणी एकटाच जन्मास येतो एकः एव प्रलीयते - एकटाच मरतो एकः एव च सुकृतं अनुभुङ्‌क्ते - आणि एकटाच पुण्याचा उपभोग घेतो एकः एव दुष्कृतं (अनुभुङ्‌क्ते) - एकटाच पापाचा उपभोग घेतो. ॥२१॥
जीव एकटाच जन्माला येतो आणि एकटाच मरून जातो. आपल्या कर्मानुसार पाप-पुण्याचे फळसुद्धा एकटाच भोगतो. (२१)


अधर्मोपचितं वित्तं हरन्त्यन्येऽल्पमेधसः ।
सम्भोजनीयापदेशैः जलानीव जलौकसः ॥ २२ ॥
आपुले म्हणतो पुत्र पुत्रही वदती तसे ।
अधर्मे लुटिती द्रव्य जळा जळज ते जसे ॥ २२ ॥

अन्यं अल्पमेधसः - दुसरे अल्प बुद्धीचे प्राणी अधर्मोपचितं वित्तं - अधर्माने मिळविलेल्या द्रव्याला संभोजनीयापदेशैः - पोष्य वर्गाच्या निमित्तांनी जलौकसः जलानि इव हरन्ति - जलचर जसे उदकांना तसे हरण करितात. ॥२२॥
आमचे पालन-पोषण करणे हा तुमचा धर्मच आहे असे म्हणून अधर्माने मिळविलेले मूर्खाचे धन स्वजन लुटतात. जसे पाण्यात राहाणार्‍या जंतूंचे सर्वस्व असलेले पाणी त्यांचे संबंधितच संपवून टाकतात. (२२)


पुष्णाति यानधर्मेण स्वबुद्ध्या तमपण्डितम् ।
तेऽकृतार्थं प्रहिण्वन्ति प्राणा रायः सुतादयः ॥ २३ ॥
अधर्मे पोषिता मूर्ख सर्वांना आपुले म्हणे ।
असंतुष्ट असे त्यांना ठेविता मरतो पहा ॥ २३ ॥

यान् अधर्मेण - ज्यांना अधर्माने स्वबुद्ध्‌या पुष्णाति - हे आपले आहेत अशा बुद्धीने पोषितो ते प्राणाः रायः सुतादयः च - ते प्राण, द्रव्य व पुत्रादिक तं अपण्डितं अकृतार्थं प्रहिण्वन्ति - त्या मूर्खाला कृतकृत्य होण्यापूर्वीच सोडून देतात. ॥२३॥
जो माणूस, आपले समजून ज्यांचे अधर्मानेही पालनपोषण करतो, तेच प्राण, धन, पुत्र इत्यादी त्या मूर्खाला त्याच्या इच्छा अपुर्‍या ठेवूनच निघून जातात. (२३)


स्वयं किल्बिषमादाय तैस्त्यक्तो नार्थकोविदः ।
असिद्धार्थो विशत्यन्धं स्वधर्मविमुखस्तमः ॥ २४ ॥
धर्माला त्यजिता प्राणी खरा स्वार्थ न जाणतो ।
पापाचे घेतसे ओझे नरकी पडतो तसा ॥ २४ ॥

अर्थकोविदः - अर्थ संपादण्यात निष्णात स्वधर्मविमुखः ना - व स्वधर्माविषयी पराङ्‌मुख मनुष्य तैः त्यक्तः - त्या पुत्रादिकांनी सोडिलेला असिद्धार्थः - मनोरथ पूर्ण न झालेला असा स्वयं किल्बिषं आदाय - स्वतः पाप स्वीकारून अन्धं तमः प्रविशति - अंध नरकात पडतो. ॥२४॥
खरे म्हणाल तर, जो आपल्या धर्माला विन्मुख आहे, त्याला व्यावहारिक स्वार्थसुद्धा समजत नाही. ज्यांच्यासाठी तो अधर्म आचरतो, ते तर त्याला वार्‍यावर सोडतातच, शिवाय त्याला कधीच समाधान लाभत नाही आणि शेवटी तो घोर नरकात जातो. (२४)


तस्माल्लोकमिमं राजन् स्वप्नमायामनोरथम् ।
वीक्ष्यायम्यात्मनात्मानं समः शान्तो भव प्रभो ॥ २५ ॥
महाराजा म्हणोनीया स्वप्नवत् हे मनोरथ ।
प्रयत्‍ने चित्त रोधावे समत्वीं शांत होइ जे ॥ २५ ॥

प्रभो राजन् - हे समर्थ राजा तस्मात् इमं लोकं - म्हणून ह्या लोकाला स्वप्नमायामनोरथं वीक्ष्य - स्वप्न, माया किंवा मनोराज्य ह्याप्रमाणे मिथ्यारूपाने पाहून आत्मना आत्मानं आयम्य - स्वतः स्वतःचे नियमन करून शान्तः समः भव - शांततेने समबुद्धि ठेवणारा हो. ॥२५॥
म्हणून महाराज ! हा संसार म्हणजे स्वप्न, जादू किंवा मनोराज्यासारखा आहे, असे समजून स्वतःच स्वतःवर नियंत्रण ठेवून समत्वामध्ये स्थिर राहा आणि शांत व्हा. (२५)

विवरण :- कुंतीचे सांत्वन करून अक्रूर धृतराष्ट्राकडे आला आणि राम-कृष्णांचा संदेश कथन करताना म्हणाला, 'पंडूच्या मृत्यूनंतर कुंती आणि तिच्या मुलांचे न्यायपूर्वक पालन करणे, हा तुझा धर्म आहे. तुझी स्वतःची मुले आणि कुंतीची मुले यात भेदभाव करणे योग्य नाही. 'माझे', 'मी' ही सर्व माया आहे.' याचे अधिक विवेचन करताना तो पुढे म्हणाला, 'प्राणिमात्राचा देह हा क्षणभंगुर आहे. जीव एकटाच जन्मतो, मरतो एकटाच, त्याच्याबरोबर पत्नी-मुले जन्महि घेत नाहीत आणि त्याच्या वियोगाने मृत्यूही पावत नाहीत. अशा अवस्थेत पत्नी-मुलांचा काय भरवंसा ? कोणी कोणाचे नाही. स्वार्थी आणि पैशावरच प्रेम करणार्‍यांसाठी अधर्माने द्रव्य मिळविणे चुकीचे. ज्यांना 'माझे' 'माझे' म्हटले जाते, ते अधर्माने मिळविलेले द्रव्य फक्त हरण करतात, त्याचा उपभोग घेतात आणि ते द्रव्य मिळविणारा (पोषणकर्ता) फक्त पापाचा धनी होतो. कोणीही त्याच्या पापात सहभागी होत नाही. उलट (वाल्या कोळीची गोष्ट प्रसिद्धच आहे.) पोषणकर्त्याची निंदाच करतात. अंतसमयी त्याचा त्याग करतात. शेवटी पोषणकर्त्याची सोबत फक्त त्याचे पापच करते. 'हे माझे' 'माझे' म्हणणारा अत्यंत दुःखी होतो. एकच गोष्ट लक्षात ठेवावयास हवी की भरणपोषण करणारा फक्त तो परमात्मा आहे. आपण मानव नाही.' (आम्ही काय कुणाचे खातो रे तो राम आम्हाला देतो.) अक्रूराचे बोलणे एक विधान नसून त्यामधला गर्भितार्थ वेगळा होता हे उघड आहे. धृतराष्ट्रासाठी ते वरून विधान आणि आतून कान‌उघाडणी होती. त्याला स्पष्ट करायचे होते की, तू अंध आहेस, हा दैवयोग. पण मुलांवर आंधळे प्रेम करून पक्षपाती होऊ नको. तू राजा आहेस, समदृष्टी हो. मुलांच्या चुकीच्या वागण्यावर पांघरूण न घालता त्यांना योग्य त्या रीतीने वठणीवर आण. पांडवांना न्याय दे. तू जर अधर्माने याहीपुढे वागलास, तर तुझ्या त्या पापात तुझी मुले सामील होणार नाहीत, तू मात्र पापाच्या गर्तेत ढकलला जाशील. (१७-२५)



धृतराष्ट्र उवाच -
यथा वदति कल्याणीं वाचं दानपते भवान् ।
तथानया न तृप्यामि मर्त्यः प्राप्य यथामृतम् ॥ २६ ॥
राजा धृतराष्ट्र म्हणाला -
कल्याण बोलले माझे जै सुधा मर्तका मिळे ।
अमृते तृप्ति ना होय मी तसा नच तृप्त हो ॥ २६ ॥

दानपते - हे अक्रूरा भवान् यथा कल्याणीं वाचं वदति - तू जशी हितकारक वाणी उच्चारितोस तथा (शृण्वन्) अहं - तशी ऐकणारा मी यथा मर्त्यः अमृतं प्राप्य - जसे मनुष्याला अमृत मिळाले असताहि (तथा) अनया न तृप्यामि - तृप्त होत नाही तसा तृप्त होत नाही. ॥२६॥
धृतराष्ट्र म्हणाला - हे उत्तम सल्ला देणारे अक्रूर महोदय ! आपण माझ्या कल्याणाचीच गोष्ट सांगत आहात. मनुष्याला अमृत मिळाले, तर तो जसा तृप्त होत नाही, त्याचप्रमाणे मी सुद्धा आपल्या या उपदेशाने अजूनही तृप्त झालो नाही. (२६)


तथापि सूनृता सौम्य हृदि न स्थीयते चले ।
पुत्रानुरागविषमे विद्युत् सौदामनी यथा ॥ २७ ॥
हितैषी ! चंचलो चित्त बोध ना ठरतो तिथे ।
पुत्रप्रेमेचि हा भेद विजेच्या परि चित्त हे ॥ २७ ॥

तथापि सौ‌म्य - तरी सुद्धा हे अक्रूरा यथा सौदामनी विद्युत - जशी माळेच्या आकाराची वीज तथा पुत्रानुरागविषये - तसे पुत्रावर प्रेम करणार्‍या चले मे हृदि - चंचल अशा माझ्या हृदयामध्ये (ते) सूनृता (वाणी) न स्थीयते - तुझे हितकारी भाषण स्थिर रहात नाही. ॥२७॥
असे असूनही, हे साधो ! आपण करीत असलेला हा हिताचा उपदेश, माझ्या चंचल चित्तात स्थिर होत नाही. कारण पुत्रांच्या ममतेमुळे माझे मन विषम झाले आहे. जशी स्फटिकमय पर्वतावर चमकलेली वीज दुसर्‍याच क्षणी दिसेनाशी होते, तीच दशा आपल्या उपदेशाच्या बाबतीत होत आहे. (२७)

विवरण :- अक्रूराचे बोलणे ऐकून धृतराष्ट्र आपल्या मनाची अवस्था वर्णन करतो. 'हे सगळे मला कळते, पण वळत नाही. उपदेश फक्त कानातच जातो. तो हृदयात जाऊन आचरणात येत नाही. कारण माझे मन फारच चंचल आहे, पक्षपाती मन निःपक्षरीतीने वागण्याच्या विचारावर स्थिर रहात नाही. पुन्हा मूळ पदावर येते. विचार एक आणि आचरण विरुद्ध असे होते.' धृतराष्ट्राच्या या बोलण्यावरून आणि एकूणच त्याच्या वागण्यावरून तो ढोंगी, मतलबी, स्वार्थी असावा असे वाटते. शिवाय मुलांचा (दुर्योधनादि) त्याच्यावर नको इतका पगडा असावा. ज्यामुळे त्यांच्या अन्याय्य वागण्यावर तो नियंत्रण करू शकत नसावा असेही दिसून येते. (२७)



ईश्वरस्य विधिं को नु विधुनोत्यन्यथा पुमान् ।
भूमेर्भारावताराय योऽवतीर्णो यदोः कुले ॥ २८ ॥
ऐकतो शक्तिमान् कृष्ण पृथ्वीचा भार हारिण्या ।
जन्मले यदुवंशात त्यां इच्छे सर्व ते घडॆ ॥ २८ ॥

यः भूमेः भारावताराय - जो पृथ्वीचा भार दूर करण्याकरिता यदोः कुले अवतीर्णः - यदुकुलात उत्पन्न झाला आहे (तस्य) ईश्वरस्य विधिं - त्या ईश्वराच्या आज्ञेला कः नु पुमान् - कोणता बरे पुरुष अन्यथा विधुनोति - उलट करील ? ॥२८॥
सर्वशक्तिमान भगवान पृथ्वीवरील भार उतरविण्या-साठी यदुकुलात अवतीर्ण झाले आहेत. त्यांच्या विधानामध्ये कोण बदल करू शकेल ? (त्यांची जशी इच्छा असेल, तसेच होईल.) (२८)


( वसंततिलका )
यो दुर्विमर्शपथया निजमाययेदं
     सृष्ट्वा गुणान् विभजते तदनुप्रविष्टः ।
तस्मै नमो दुरवबोधविहारतन्त्र
     संसारचक्रगतये परमेश्वराय ॥ २९ ॥
( वसंततिलका )
माया अचिंत्य हरिची रचि सृष्टि तैसे
     नी त्यात तो शिरुनिया फळ तो विभागी ।
संसारचक्र फिरते हरिची लिला ही
     ऐश्वर्यशालि प्रभूसी नमितो पहा मी ॥ २९ ॥

b> दुर्विमर्शपथया - कळण्यास कठीण आहे मार्ग जिचा निजमायया - अशा आपल्या मायेने इदं सृष्ट्वा तत् अनुप्रविष्टः - हे जग उत्पन्न करून त्यात शिरून येः गुणान् विभजते - जे गुणांना भिन्न प्रकारचे करितो दुरवबोधविहारतन्तर - जाणण्यास कठीण अशा क्रीडेच्या आधीन असलेल्या संसारचक्र गतये तस्मै - संसारचक्राचा आधार अशा त्या परमेश्वराय नमः - ईश्वराला नमस्कार असो. ॥२९॥
भगवंतांच्या मायेचा मार्ग अचिंत्य आहे. त्या मायेच्या द्वाराच ते या जगाची निर्मिती करून त्यात प्रवेश करतात आणि कर्म व कर्मफलाची वाटणी करतात. या जगच्चक्राच्या निर्वैध चालीमागे त्यांच्या अचिंत्य लीलाशक्ती व्यतिरिक्त दुसरे कोणतेच कारण नाही. त्याच परमैश्वर्यशाली प्रभूंना मी नमस्कार करतो. (२९)

विवरण :- विदुराच्या तोंडून धृतराष्ट्राने कृष्णाचा संदेश ऐकला. आपल्या वागण्याचे जरी त्याने समर्थन केले नाही; तरी सन्मार्गाने, न्याय्य मार्गाने तो वागणार नाही, हेही उघड होते. पण कृष्णाची स्तुति करून त्याला नमन करताना तो म्हणतो, सृष्टीची निर्मिती करून तो त्यामध्ये प्रविष्ट आहे. (ततसृष्ट्‌वा तदेवानुप्राविशत् ।) तोच ही सृष्टि चालवितो, तिचे नियमन करतो. पृथ्वीवरील पापांचा भार हलका करण्यास त्याचा अवतार झाला आहे. प्राणिमात्रांना त्यांच्या कर्माची फळे तोच देतो. (पण आपल्याहि दुष्कृत्यांची फळे आपणांस भोगावी लागणार आहेत हे मात्र तो विसरला.) (२९)



श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् )
इत्यभिप्रेत्य नृपतेः अभिप्रायं स यादवः ।
सुहृद्‌भिः समनुज्ञातः पुनर्यदुपुरीमगात् ॥ ३० ॥
श्रीशुकदेव सांगतात -
( अनुष्टुप् )
अभिमान नृपाचा हा ऐकता स्वजनास त्या ।
प्रेमे निरोपिले आणि मथुरी पातले पुन्हा ॥ ३० ॥

सः यादवः - तो अक्रूर इति नृपतेः अभिप्रायं अभिप्रेत्य - असा राजाचा अभिप्राय जाणून सुहृद्भिः समनुज्ञातः - मित्रांनी आज्ञा दिलेला पुनः यदुपुरीं अगात् - पुनः मथुरेस गेला. ॥३०॥
श्रीशुक म्हणतात - अशाप्रकारे धृतराष्ट्राचा अभिप्राय जाणून घेऊन आणि स्वजन संबंधितांचा निरोप घेऊन अक्रूर मथुरेला परतला. (३०)


शशंस रामकृष्णाभ्यां धृतराष्ट्रविचेष्टितम् ।
पाण्डवान् प्रति कौरव्य यदर्थं प्रेषितः स्वयम् ॥ ३१ ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां दशमस्कन्धे पूर्वार्धे एकोनपञ्चाशोऽध्यायः ॥ ४९ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
परीक्षित सर्व ते कृष्णा बळरामास सर्व तो ।
बोले अक्रूर व्यवहार उद्देश पूर्ण जाहला ॥ ३१ ॥
॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर एकोणपन्नासावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

कौरव्य - हे परीक्षित राजा रामकृष्णाभ्यां - राम व कृष्ण यांनी यदर्थं स्वयं प्रेषितः (अक्रूरः) - ज्याकरिता स्वतः अक्रूर पाठविला होता तत् पाण्डवान् प्रति - ती पांडवांविषयी धृतराष्ट्रविचेष्टितं शशंस - धृतराष्ट्राची वागणूक सांगता झाला. ॥३१॥
परीक्षिता ! तेथे त्याने राम-कृष्णांना धृतराष्ट्राचे पांडवांशी असलेले वर्तन सांगितले. कारण त्याला त्यासाठीच हस्तिनापुरला पाठविले होते. (३१)


अध्याय एकोणपन्नासावा समाप्त

GO TOP