|
श्रीमद् भागवत पुराण चाणूरमुष्टिकादीनां मल्लानां निधनं कंसस्य वधश्च - चाणूर, मुष्टिक इत्यादी पहिलवानांचा व कंसाचा उद्धार - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् ) एवं चर्चितसङ्कल्पो भगवान् मधुसूदनः । आससादाथ चणूरं मुष्टिकं रोहिणीसुतः ॥ १ ॥
( अनुष्टुप् ) श्रीशुकदेव सांगतात - परीक्षित् भगवान् कृष्णे चाणुरा मारु इच्छिले । चाणुरा भिडला कृष्ण मुष्टिका बलराम तो ॥ १ ॥
अथ - नंतर एवं - ह्याप्रमाणे चर्चितसंकल्पः - ज्याने आपला विचार निश्चित केला आहे असा भगवान् मधुसूदनः - भगवान श्रीकृष्ण चाणूरम् आससाद - चाणूराजवळ प्राप्त झाला (च) रोहिणीसुतः - आणि बलराम मुष्टिकं (आससाद) - मुष्टिकाजवळ प्राप्त झाला. ॥१॥
श्रीशुक म्हणतात- श्रीकृष्णांनी चाणूरादिकांना मारण्याचे निश्चित ठरवून स्वतः चाणूराला आणि बलराम मुष्टिकाला जाऊन भिडले. (१)
विवरण :- चाणूर मुष्टिकच्या वधाचा निश्चय केलेले रामकृष्ण (चर्चित संकल्पः) आखाडयात उतरले, असा जरी श्लोकाचा अर्थ असला तरी असे म्हटले जाते की, भगवान असा संकल्प करीत नाहीत. एक तर त्यांच्या भक्तांनी तशी विनंती केली तर; किंवा भगवंताच्या हातूनच त्यांचा उद्धार व्हावयाच असेल तर. असेही म्हणता येईल की जे मधु-कैटभ कित्येक हजार वर्षे त्यांच्याशी लढण्याइतके प्रबळ होते, त्यांनासुद्धा भगवंतांनी त्यांच्या इच्छेनुसारच मारले; तिथे चाणूर मुष्टिकाचे काय ? या मल्लांचा भगवंताच्या हातून उद्धारच व्हावयाचा होता. असेच म्हणता येईल, किंवा चाणूरादि सहा मल्ल म्हणजे कंसाच्या शरीरातील षड्रिपू (त्यांचे आश्रित) त्यांचे प्रतीक, आधी त्यांचा (षड्रिपूंचा) नाश करून मग कृष्णाने कंसाचा उद्धार केला. (१)
हस्ताभ्यां हस्तयोर्बद्ध्वा पद्भ्यामेव च पादयोः ।
विचकर्षतुरन्योन्यं प्रसह्य विजिगीषया ॥ २ ॥
जिंकण्या दुसर्या मल्ला हातात हात नी तसे । पायात पाय घालोनी एकमेकास ओढिती ॥ २ ॥
(तौ) विजिगीषया - ते दोघे जिंकण्याच्या इच्छेने हस्ताभ्यां हस्तयोः बद्ध्वा - आपल्या दोन्ही हातांनी प्रतिस्पर्ध्याचे दोन्ही हात जखडून पद्भ्याम् च एव पादयोः (बद्ध्वा) - आणि आपल्या पायांनी प्रतिपक्षाचे पाय जखडून प्रसह्य अन्योन्यं विचकर्षतुः - बलात्काराने एकमेकांना ओढिते झाले. ॥२॥
एकमेकांना जिंकण्याच्या हेतूने त्यांनी हातांना हात बांधले आणि पायांत पाय अडकवून ताकदीने ते आपापल्याकडे दुसर्यांना ओढू लागले. (२)
अरत्नी द्वे अरत्निभ्यां जानुभ्यां चैव जानुनी ।
शिरः शीर्ष्णोरसोरस्तौ अन्योन्यं अभिजघ्नतुः ॥ ३ ॥
पंजे पंजात नी तैसे गुडघे गुडघ्यास नी । छातीस छाति देवोनि एकमेकास मारिति ॥ ३ ॥
अरत्नीभ्यां द्वे अरत्नी - हातांनी हातांना च जानुभ्यां जानुनी एव - आणि मांडयांनी मांडयांना शीर्ष्णा शिरः - मस्तकाने मस्तकाला उरसा उरः - छातीने छातीला (एवं) तौ अन्योन्यम् अभिजघ्नतुः - याप्रमाणे ते दोघे एकमेकांना ताडिते झाले.॥३॥
त्यांनी कोपरापासूनच्या हातांना हात, गुडघ्यांना गुडघे, डोक्यांना डोकी आणि छातींना छाती टेकवून ते एकमेकांवर आघात करू लागले. (३)
परिभ्रामणविक्षेप परिरम्भावपातनैः ।
उत्सर्पणापसर्पणैः चान्योन्यं प्रत्यरुन्धताम् ॥ ४ ॥
डावपेच करोनीया फिर्विती जोडिदार तो । ढकलिती कधी तैसे बांधिती आवळोनिया । आपटिती सुटती तैसे धावती रोधिती तसे ॥ ४ ॥
परिभ्रामण - हाताने धरून गरगर फिरविणे, विक्षेपपरिरम्भावपातनैः - फेकणे, घट्ट आवळून धरणे व खाली पाडणे या क्रियांनी च उत्सर्पणापसर्पणैः - दुसर्याच्या पेचांतून सुटणे व दूर जाणे ह्यांनी अन्यौन्यं प्रत्यरुन्धताम् - एकमेकांनाच रोध करिते झाले. ॥४॥
गरगर फिरवणे, लांब ढकलणे, मिठीत घेणे, खाली पाडणे, पुढे जाणे, मागे येणे इत्यादी प्रकारांनी ते एकमेकांवर डावपेच करू लागले. (४)
उत्थापनैरुन्नयनैः चालनैः स्थापनैरपि ।
परस्परं जिगीषन्तौ अपचक्रतुरात्मनः ॥ ५ ॥
प्रहार करुनी कोणी जर्जरो करु पाहती । पडता दुसरा स्पर्धी गुढघे पाय आवळी । उचली आवळोनीया गळा दाबोनि लोटिती ॥ ५ ॥
उत्थापनैः उन्नयनैः - वर उठवणे व उचलून नेणे ह्या विधीने चालनैः स्थापनैः अपि - आपला पेच सोडवणे व दुसर्याला पेच घालून स्थिर करणे ह्यांनी परस्परं जिगीषन्तौ - एकमेकाला जिंकण्याची इच्छा करणारे ते आत्मनः अपचक्रतुः - शरीराला दुखविते झाले. ॥५॥
तसेच वर उठवणे, उचलणे, चाल करून जाणे किंवा स्तब्ध उभे राहाणे, अशा रीतीने ते शरीरांना इजा पोहोचवू लागले. (५)
तद्बलाबलवद् युद्धं समेताः सर्वयोषितः ।
ऊचुः परस्परं राजन् सानुकम्पा वरूथशः ॥ ६ ॥
कुस्त्या पहावया स्त्रीया तेथील कैक पातल्या । पाहता वीर ते थोर बाळांसी कुस्ति खेळता । गटाने येउनी एक बोलती त्या परस्परे ॥ ६ ॥
राजन् - हे परीक्षित राजा सर्वयोषितः - सर्व स्त्रिया वरूथशः समेताः - संघाने जमून तत् युद्धं बलाबलवत् (अस्ति) - हे मल्लयुद्ध बलवानाचे निर्बलाशी होणारे होय (इति) सानुकम्पाः - असे म्हणून ज्यांच्या हृदयात दया उत्पन्न झाली आहे अशा परस्परं ऊचुः - एकमेकींमध्ये बोलू लागल्या. ॥६॥
परीक्षिता ! कुस्त्यांची ही दंगल पाहाण्यासाठी नगरातील पुष्कळशा महिलासुद्धा आल्या होत्या. मोठमोठ्या पहिलवानांबरोबर हे लहान अशक्त बालक लढत आहेत, असे पाहून त्या मुलांची दया येऊन त्या गटागटाने आपापसांत चर्चा करू लागल्या. (६)
महानयं बताधर्म एषां राजसभासदाम् ।
ये बलाबलवद् युद्धं राज्ञोऽन्विच्छन्ति पश्यतः ॥ ७ ॥
सभासद् कंस राजाचे अन्याय करिती पहा । खेदाचे गोष्ट ही ऐसी राजाच्या साक्षिने घडे ॥ ७ ॥
ये - जे बलाबलवत् युद्धं पश्यतः राज्ञः - बलांचे निर्बलांशी होणारे युद्ध पाहणार्या राजांच्या अन्विच्छन्ति - इच्छेला अनुसरत आहेत अयं - हा एषां राजसभासदां - ह्या राजसभेत बसलेल्या लोकांचा महान् अधर्मः बत - खरोखर मोठा अधर्मच होय. ॥७॥
येथे हे राजसभेतील लोक केवढा अधर्म करीत आहेत पाहा ! राजाच्यासमोरच हे बलवान आणि दुर्बल यांची कुस्ती करू पाहात आहेत. (७)
विवरण :- तुल्यबळांशीच युद्ध व्हावे, ही रामकृष्णांची सूचना मान्य झाली नाही आणि त्यांचे मल्लांशी युद्ध सुरू झाले. मात्र ही गोष्ट युद्ध पाहणार्या स्त्रियांना खटकली. रामकृष्णांसारखे कोवळे तरुण आणि बलाढय मल्ल यांचे युद्ध हा अधर्मच, असे त्यांना वाटले. याखेरीज आणखी एक गोष्ट त्यांना विशेष करून खटकली की कंस ते सर्व निमूटपणे पहात होता. (त्याला असेच तुल्यबळ नसणार्यांचे युद्ध होऊन रामकृष्णांना पराभूत करावयाचे होते.) आणि मंत्रिगणहि हे सर्व निमूटपणे पहात होते. युद्धाचे नियम धाब्यावर बसवून जर तुल्यबळात युद्ध नसेल तर तो अधर्म राजाने खपवून घेणे योग्य नाही आणि त्याला जर मान्य असेल तर ते युद्ध मधेच थांबवून राजाला चार गोष्टी सुनावणे हे मंत्र्यांचे ही कर्तव्य आहे. सामान्य सभाजनांना या गोष्टी माहीत होत्या; आणि त्यांना जे खटकत होते, त्याकडे कंस जाणून बुजून दुर्लक्ष करीत होता, हे स्पष्ट दिसून येते. (कारण हस्ते-परहस्ते का होईना, त्याला कृष्णाचा वध करायचा होता.) (६-७)
क्व वज्रसारसर्वाङ्गौ मल्लौ शैलेन्द्रसन्निभौ ।
क्व चातिसुकुमाराङ्गौ किशोरौ नाप्तयौवनौ ॥ ८ ॥
भगिनी बघ गे कैसे वज्राच्या परि देह ते । किशोर बळि नी कृष्ण सुकुमार पहा कुठे ॥ ८ ॥
वज्रसारसर्वाङगौ - वज्राप्रमाणे बळकट अवयव असणारे शैलेन्द्रसन्निभौ मल्लौ क्व - मोठया पर्वतासारखे हे दोन मल्ल कोणीकडे च - आणि अतिसुकुमाराङगौ - अत्यंत कोमल शरीराचे नाप्तयौवनौ - ज्यांना तारुण्य प्राप्त झाले नाही किशौरौ क्व - असे हे दोघे लहान बालक कोणीकडे. ॥८॥
वज्राप्रमाणे कठोर शरीर असणारे व मोठ्या पर्वताप्रमाणे दिसणारे हे मल्ल कोणीकडे; आणि अजून तारूण्यात सुद्धा न आलेले अतिशय कोमल शरीराचे हे किशोर कोणीकडे ! (८)
धर्मव्यतिक्रमो ह्यस्य समाजस्य ध्रुवं भवेत् ।
यत्राधर्मः समुत्तिष्ठेत् न स्थेयं तत्र कर्हिचित् ॥ ९ ॥
जेवढे बघती त्यांना धर्म हा मोडिल्या मुळे । लागेल पाप ते मोठे न थांबा येथ आपण ॥ ९ ॥
ध्रुवं - खरोखर अस्य समाजस्य - ह्या समाजाचा धर्मव्यतिक्रमः हि - हा मोठा अधर्मच भवेत् - होय यत्र अधर्मः समुत्तिष्ठेत् - जेथे अधर्म उत्पन्न होईल तत्र कर्हिचित् न स्थेयम् - तेथे कधीही राहू नये. ॥९॥
या पाहाणार्या लोकांना धर्माचे उल्लंघन केल्याचे पाप निश्चितच लागणार ! वास्तविक जेथे अधर्म असेल, तेथे कधीच थांबू नये. (९)
न सभां प्रविशेत् प्राज्ञः सभ्यदोषान् अनुस्मरन् ।
अब्रुवन् विब्रुवन्नज्ञो नरः किल्बिषमश्नुते ॥ १० ॥
शास्त्र ते सांगते ऐसे न थांबा दोष-जाणुनी । सांगणे ऐकणे खोटे साहने दोष या त्रयी ॥ १० ॥
प्राज्ञः - बुद्धिमान पुरुषाने सभ्यदोषान् अनुस्मरन् - सभासदांचे स्वाभाविक उत्पन्न होणारे दोष मनात आणून नरः - पुरुष अब्रुवन् - माहित असूनहि न बोलणारा विब्रुवन् - किंवा विरुद्ध बोलणारा अज्ञः - अथवा मला काहीएक माहित नाही असे बोलणारा सुद्धा किल्बिषम् अश्रुते - दोषी होतो. ॥१०॥
बुद्धिमान पुरुषाने सभेत उपस्थित असलेल्यांचे दोष जाणल्यास त्या सभेमध्ये जाऊ नये. कारण तेथे जाऊन त्यांचे अवगुण न सांगणे, गप्प बसणे किंवा मी जाणत नाही, असे म्हणणे, या तिन्हीही गोष्टी मनुष्याला दोषाचे भागीदार बनवितात. (१०)
वल्गतः शत्रुमभितः कृष्णस्य वदनाम्बुजम् ।
वीक्ष्यतां श्रमवार्युप्तं पद्मकोशमिवाम्बुभिः ॥ ११ ॥
पहा पहा कसा कृष्ण घेरितो चारि बाजुने । शोभती धर्मबिंदूही कमळावरि जै जल ॥ ११ ॥
शत्रुम् अभितः वल्गतः कृष्णस्य - शत्रूच्या सभोवार धावणार्या श्रीकृष्णाचे अम्बुभिः पद्मकोशम् इव - उदकांनी युक्त अशा कमळांच्या गाभ्याप्रमाणे असणारे श्रमवार्युप्तं - व श्रमाने उत्पन्न झालेल्या घर्मबिंदूंनी व्यापिलेले वदनाम्बुजं वीक्षतां - मुखकमल पहा. ॥११॥
शत्रूच्या चारी बाजूंनी फिरणार्या श्रीकृष्णांच्या मुखकमलाकडे पाहा तरी ! कमळाच्या पानावर पाण्याचे बिंदू चमकावे त्याप्रमाणेच त्यांच्या चेहर्यावर घामाचे बिंदू चमकर आहेत. (११)
किं न पश्यत रामस्य मुखमाताम्रलोचनम् ।
मुष्टिकं प्रति सामर्षं हाससंरम्भशोभितम् ॥ १२ ॥
सखये दिसले कां ते बळी संतप्त होउनी । मारितो मुष्टिका कैसा असा तो शोभतो कसा ॥ १२ ॥
रामस्य - बलरामाचे मुष्टिकं प्रतिसामर्षं - मुष्टिकाला उद्देशून क्रोधाविष्ट झालेले हाससंरम्भशोभितं - हसण्याच्या वेशाने शोभणारे आताम्रलोचनं मुखं - किंचित् तांबूस वर्णाचे मुख न पश्यत किं - तुम्ही पहात नाही काय ॥१२॥
मुष्टिकावर रागावल्यामुळे डोळे लाल झालेला बलरामांचा चेहरा तुम्हांला दिसत नाही का ? तरीसुद्धा त्यांच्या अनावर हास्यामुळे तो किती सुंदर दिसत आहे, नाही ? (१२)
( वसंततिलका )
पुण्या बत व्रजभुवो यदयं नृलिङ्ग गूढः पुराणपुरुषो वनचित्रमाल्यः । गाः पालयन्सहबलः क्वणयंश्च वेणुं विक्रीदयाञ्चति गिरित्ररमार्चिताङ्घ्रिः ॥ १३ ॥
( वसंततिलका ) आहे पवित्र व्रज भू वसतो हरी तै लक्ष्मी तसेचि शिवतो पुजितो जयाला । लेवोनि माळ वनिची हरिवंशि फुंकी । नी रामकृष्ण द्वय ही वनि गायि नेती ॥ १३ ॥
बत व्रजभुवः पुण्याः - खरोखर गोकुळातील भूमि पुण्यवान होय यत् - कारण अयं - हा नृलिङगगूढः - मनुष्यरूप धारण करून गुप्तरीतीने राहणारा पुराणपुरुषः - अनादि परमेश्वर वनचित्रमाल्यः - गळ्यात चित्रविचित्र अशी अरण्यातील फुलांची माळा धारण करणारा गिरित्ररमार्चिताङ्घ्रिः - शंकर व लक्ष्मी ह्यांनी ज्याच्या चरणाचे पूजन केले आहे असा सहबलः - बलरामासह वेणुं क्वणयन् - वेणू वाजवीत गाः पालयन् - गाई राखीत विक्रीडया अञ्चति - जेथे क्रीडेसाठी जातो. ॥१३॥
खरे पाहू जाता व्रजभूमी किती धन्य आहे ? कारण हे पुरुषोत्तम तेथे मनुष्याचा वेष घेऊन लपून राहातात. स्वतः भगवान शंकर आणि लक्ष्मी ज्यांच्या चरणांची पूजा करतात, तेच प्रभू तेथे रंगी-बेरंगी रानफुलांची माळ घालून बलरामांसह बासरी वाजवीत, गाई चारीत, निरनिराळे खेळ खेळत आनंदाने विहार करतात. (१३)
गोप्यस्तपः किमचरन् यदमुष्य रूपं
लावण्यसारमसमोर्ध्वमनन्यसिद्धम् । दृग्भिः पिबन्त्यनुसवाभिनवं दुरापम् एकान्तधाम यशसः श्रीय ऐश्वरस्य ॥ १४ ॥
नाही सखे कळत ते तप गोपिकांचे नेत्रे सदाचि पिति त्या हरिच्या रुपाला । लावण्यसार हरि तो नच कोणि तैसा तो नित्य नूतन दिसे मिळता व्रजिंना ॥ १४ ॥
गोप्यः - गोपी किं तपः अचरन् - कोणते तप करत्या झाल्या यत् - कारण अमुष्य - ह्या श्रीकृष्णाचे लावण्यसारं - सौंदर्याचे सारच असे असमोर्ध्वं - व ज्याच्याशी बरोबरीने किंवा अधिकपणाने तुलना करता येत नाही असे अनन्यसिद्धं - दुसर्या कशानेहि सिद्ध न होणारे अनुसवाभिनवं - प्रत्येक क्षणी नव्याप्रमाणे भासणारे दुरापं - दुर्लभ यशसः श्रियः ऐश्वर्यस्य एकान्तधाम - कीर्ति, लक्ष्मी व ऐश्वर्य यांचे एकच स्थान असे रूपं दृग्भिः पिबन्ति - स्वरूप नेत्रांनी प्राशितात. ॥१४॥
दोन्ही डोळ्यांनी नित्यनिरंतर यांच्या रूप-माधुर्याचे पान करणार्या गोपींनी कोणती तपश्चर्या केली होती, कोण जाणे ! यांचे स्वयंसिद्ध रूप म्हणजे लावण्याचे सारसर्वस्वच ! जगात कोणाचेही रूप यांच्या तोडीचे नाही, तर मग अधिक कोठून असणार ! हे रूप क्षणाक्षणाला नवेच भासते. सर्व यश, सौंदर्य आणि ऐश्वर्य यांचे हे एकमेव आश्रयस्थान आहे. याचे दर्शन तर अतिशय दुर्लभ आहे. (१४)
या दोहनेऽवहनने मथनोपलेप
प्रेङ्खेङ्खनार्भरुदितो-क्षणमार्जनादौ । गायन्ति चैनमनुरक्तधियोऽश्रुकण्ठ्यो धन्या व्रजस्त्रिय उरुक्रमचित्तयानाः ॥ १५ ॥
त्या धन्य गोपि व्रजिच्या हरि चित्ति ध्याती प्रेमे भरोनि असवे हरिकीर्ति गाती । त्या कांडणी दळणि नी मथिता दुहीता न्हाता धुता नि करिता सगळेचि कामे ॥ १५ ॥
च - आणि याः - ज्या गोपी एनं अनुरक्तधियः - ह्या श्रीकृष्णाच्या ठिकाणी प्रेमबुद्धि ठेवून अश्रुकण्टयः - अश्रूमुळे दाटला आहे कंठ ज्यांचा अशा दोहने - दूध काढण्याच्या वेळी अवहनने - कांडण्याच्या वेळी मथनोपलेपप्रेङखेङखना - घुसळणे, उटी लावणे, पाळणा हालवणे, अर्भरुदितौक्षणमार्जनादौ - मूल रडू लागले असता, सारविणे, झाडणे इत्यादि कार्याच्या वेळी गायन्ति - गाणी गातात उरुक्रमचित्तयानाः - श्रीकृष्णाच्या ठिकाणी ज्यांचे चित्त आसक्त झाले आहे अशा व्रजस्त्रियः धन्याः - गोकुळातील त्या गोपी धन्य होत. ॥१५॥
व्रजातील गोपी धन्य होत ! नेहमी श्रीकृष्णांमध्येच चित्त लागून राहिल्यामुळे प्रेमपूर्ण हृदयाने व प्रेमाश्रूंनी सद्गदीत झालेल्या कंठाने त्या धार काढताना, दही घुसळताना, धान्य कांडताना, जमीन सावताना, बालकांना झोके देताना, रडणार्या बालकांची समजूत घालताना, त्यांना न्हाऊ-माखू घालताना, घरांची झाडझूड करताना, अशी सगळी कामे करीत असताना श्रीकृष्णांच्या गुणांचेच गायन करीत. (१५)
प्रातर्व्रजाद् व्रजत आविशतश्च सायं
गोभिः समं क्वणयतोऽस्य निशम्य वेणुम् । निर्गम्य तूर्णमबलाः पथि भूरिपुण्याः पश्यन्ति सस्मितमुखं सदयावलोकम् ॥ १६ ॥
जायी वनात हरि हा नित त्या सकाळी चारोनि गायि परते मग सांजवेळी । तै वाजवी अतिव सुंदर बासुरी ती सोडोनि काम बघती व्रजनारि धन्या ॥ १६ ॥
भूरिपुण्याः अबलाः - ज्यांनी पुष्कळ पुण्य केले आहे अशा गोपी पथि - मार्गामध्ये गोभिः समं - गाईंसह प्रातः व्रजात् व्रजतः - सकाळी गोकुळातून बाहेर जाणार्या च सायं आविशतः - आणि संध्याकाळी गोकुळात परत येणार्या क्वणयतः अस्य - व वेणुवाद्य वाजविणार्या ह्या श्रीकृष्णाचा वेणुं निशम्य - वेणुध्वनि ऐकून तूर्णं निर्गम्य - त्वरेने बाहेर पडून सदयावलोकं - दयेने पहाणार्या व सस्मितमुखं पश्यन्ति - स्मित हास्य करणारे आहे मुख ज्याचे अशा श्रीकृष्णाला पहातात. ॥१६॥
हे जेव्हा प्रातःकाळी गाईंना चारण्यासाठी व्रजातून वनामध्ये जातात आणि सायंकाळी त्यांना घेऊन परत येतात, तेव्हा त्यांनी वाजविलेली मधुर बासरी ऐकून गोपी लगबगीने घरातून बाहेर रस्त्यामध्ये येतात. त्यावेळी स्मितहास्य, तसेच दयेने भरलेल्या नजरेने युक्त असे त्यांचे मुखकमल त्यांना पाहायला मिळते. केवढे हे त्यांचे पुण्य ! (१६)
( अनुष्टुप् )
एवं प्रभाषमाणासु स्त्रीषु योगेश्वरो हरिः । शत्रुं हन्तुं मनश्चक्रे भगवान् भरतर्षभ ॥ १७ ॥
( अनुष्टुप् ) परीक्षित् पूरवासी त्या बोलता नारि या अशा । योगेश्वरो मनीं लक्षी मारण्या शत्रु चाणुरा ॥ १७ ॥
भरतर्षभ - हे भरतश्रेष्ठा परीक्षित राजा योगेश्वरः भगवान् हरिः - योगाधिपति भगवान श्रीकृष्ण स्त्रीषु एवं प्रभाषमाणासु - स्त्रिया याप्रमाणे भाषण करीत असता शत्रुं हन्तुं मनः चक्रे - शत्रूला मारण्याचे मनात आणिता झाला. ॥१७॥
हे भरतश्रेष्ठा ! त्या स्त्रिया जेव्हा असे बोलत होत्या, त्याचवेळी भगवान श्रीकृष्णांनी शत्रूला मारण्याचा मनोमन निश्चय केला. (१७)
सभयाः स्त्रीगिरः श्रुत्वा पुत्रस्नेहशुचाऽऽतुरौ ।
पितरौ अन्वतप्येतां पुत्रयोरबुधौ बलम् ॥ १८ ॥
भयाने बोलती स्त्रीया ऐकती वसुदेव नी । देवकी घाबरे चित्ती पुत्र शौर्य न जाणुनी ॥ १८ ॥
सभयाः स्त्रीगिरः श्रुत्वा - भीतिदर्शक असे स्त्रियांचे शब्द ऐकून पुत्रस्नेहशुचातुरौ - पुत्राविषयीच्या प्रेमामुळे शोकाकुल झालेले पितरौ - वसुदेव व देवकीहि पुत्रयोः बलम् अबुधौ - रामकृष्णांचे सामर्थ्य न जाणणारी अन्वतप्येतां - दुःख करू लागली. ॥१८॥
स्त्रियांची ही भयाकुल बोलणी ऐकून त्यांचे आईवडिल पुत्रस्नेहामुळे शोकाने विव्हळ झाले. कारण आपल्या पुत्रांचे शौर्य त्यांना माहीत नव्हते. (१८)
तैस्तैर्नियुद्धविधिभिः विविधैरच्युतेतरौ ।
युयुधाते यथान्योन्यं तथैव बलमुष्टिकौ ॥ १९ ॥
भिन्न भिन्न असे डाव चाणुरो कृष्णही करी । तसेच मुष्टिको राम लढती ते परस्परा ॥ १९ ॥
यथा - ज्याप्रमाणे अच्युतेतरौ - श्रीकृष्ण व चाणूर हे दोघे तैः तैः - त्या त्या विविधैः - अनेक प्रकारच्या नियुद्धविधिमिः - मल्लयुद्धाच्या पेचांनी तथा एव - तशाच प्रकारे बलमुष्टिकौ - बलराम व मुष्टिक युयुधाते - युद्ध करू लागले. ॥१९॥
श्रीकृष्ण आणि चाणूर हे दोघेही वेगवेगळ्या प्रकारचे डावपेच करीत एकमेकांशी ज्याप्रमाणे कुस्ती लढत होते, तसेच बलराम आणि मुष्टिकसुद्धा लढत होते. (१९)
भगवद्गात्रनिष्पातैः वज्रनीष्पेषनिष्ठुरैः ।
चाणूरो भज्यमानाङ्गो मुहुर्ग्लानिमवाप ह ॥ २० ॥
अंग प्रत्यंग कृष्णाचे वज्राच्या परि जाहले । रग्डिता शत्रु तो झाला मणक्या माजि की ढिला ॥ २० ॥
चाणूरः - चाणूर वज्रनिष्पेषनिष्ठुरैः - वज्राच्या तीक्ष्ण प्रतापाप्रमाणे कठीण अशा भगवद्गात्रनिष्पातैः - भगवंताच्या अवयवांच्या तीक्ष्ण प्रहारांनी भज्यमानाङगः - ज्याचे अवयव मोडून जात आहेत असा मुहुः ग्लानिम् अवाप ह - वारंवार मूर्च्छा पावला. ॥२०॥
भगवंतांच्या वज्रापेक्षाही कठोर अशा अंगांच्या रगडण्याने चाणूराची अंगे खिळखिळी होऊ लागली. त्याला वारंवार मूर्च्छा येऊ लागली. (२०)
स श्येनवेग उत्पत्य मुष्टीकृत्य करावुभौ ।
भगवन्तं वासुदेवं क्रुद्धो वक्षस्यबाधत ॥ २१ ॥
व्यथेने क्रोधला शत्रू ससाण्या परि झेप घे । कृष्णाच्या छातिसी त्याने केला मुष्ठीप्रहार तो ॥ २१ ॥
श्येनवेगः सः - ससाण्यासारखा वेग आहे ज्याचा असा चाणूर उभौ करौ मुष्टीकृत्य - दोन्ही हातांच्या मुठी वळून उत्पत्य - उडी मारून क्रुद्धः - रागावलेला असा भगवन्तं वासुदेवं - भगवान श्रीकृष्णाला वक्षसि अताडयत् - वक्षस्थलावर ताडिता झाला. ॥२१॥
शेवटी अत्यंत चिडून त्याने ससाण्याप्रमाणे झडप घातली आणि दोन्ही हातांच्या मुठी वळून त्याने भगवान श्रीकृष्णांच्या छातीवर प्रहार केला. (२१)
नाचलत् तत्प्रहारेण मालाहत इव द्विपः ।
बाह्वोर्निगृह्य चाणूरं बहुशो भ्रामयन् हरिः ॥ २२ ॥
फुलांचा गजरा जैसा हत्तीच्या अंगि तो पडे । अविचल तसा कृष्ण चित्तात शांत राहिला ॥ २२ ॥
हरिः - श्रीकृष्ण मालाहतः द्विपः इव - पुष्पमाळेने ताडिलेल्या हत्तीप्रमाणे तत् प्रहारेण - चाणूराच्या ताडनाने न अचलत् - हलला नाही चाणूरं बाह्वोः निगृह्य - चाणूराला दोन बाहूंचे ठिकाणी घट्ट धरून बहुशः भ्रामयन् - पुष्कळ वेळ गरगर फिरवीत. ॥२२॥
ज्याप्रमाणे फुलांच्या गजर्यांच्या मार्याने हत्ती जराही विचलीत होत नाही, त्याप्रमाणे त्याने केलेल्या प्रहाराने भगवान थोडेसुद्धा विचलित झाले नाहीत. त्यांनी चाणूराचे दोन्ही हात पकडले आणि त्याला अत्यंत वेगाने पुष्कळ वेळा गरागरा फिरवून जमिनीवर आपटले. (२२)
भूपृष्ठे पोथयामास तरसा क्षीण जीवितम् ।
विस्रस्ताकल्पकेशस्रग् इन्द्रध्वज इवापतत् ॥ २३ ॥
भूमिसी आपटी कृष्ण फिरवी आंतरीक्षि नी । अस्ताव्यस्त असा शत्रू फेकिला त्या भुमिवरी ॥ २३ ॥
क्षीणजीवितं - ज्याचे जीवित नष्ट झाले आहे अशा त्याला तरसा - वेगाने भूपृष्ठे पोथयामास - जमिनीवर आपटिता झाला विस्रस्ताकल्पकेशस्रक् (सः) - वेष, केशपाश, पुष्पमाळा व भूषणे ही गळून पडलेला असा तो चाणूर इन्द्रध्वजः इव अपतत् - इंद्रध्वजाप्रमाणे पडला. ॥२३॥
त्या वेगानेच त्याचे प्राण निघून गेले. त्याची वेषभूषा अस्ताव्यस्त झाली आणि त्याचे केस व फुलांच्या माळा विस्कटल्या. इंद्रध्वजाप्रमाणे तो खाली पडला. (२३)
विवरण :- मल्लयुद्धाचेवेळी कृष्ण-बलरामांनी मल्लांना पराभूत करून कसे ठार केले, याचे वर्णन करताना कृष्णाने चाणूराला फिरवून जमिनीवर आपटले. त्यावेळी तो जमिनीवर इंद्रध्वज जसा कोसळावा, तसा पडला असा उल्लेख आहे. हा इंद्रध्वजोत्सव गौड देशात (मध्य बंगाल व ओरिसातील प्रदेश) प्रसिद्ध. नगरद्वारात पन्नास बावन्न हातांइतका उंच ध्वज उभारून वस्त्रालंकारांनी नटवीत, मुळाशी इंद्राची मूर्ती चित्रित असे, नंतर तो जसा खाली पडत असे, तसा चाणूर पडला, असा उल्लेख. (२३)
तथैव मुष्टिकः पूर्वं स्वमुष्ट्याभिहतेन वै ।
बलभद्रेण बलिना तलेनाभिहतो भृशम् ॥ २४ ॥
तसीच बळिरामाने मुष्टिका ठोस मारिली । चापटी मारिली जोरे शत्रू तो थर्रर् कांपला ॥ २४ ॥
तथा एव - त्याचप्रमाणे मुष्टिकः - मुष्टिक पूर्वं स्वमुष्टया अभिहतेन - पूर्वी स्वतःच्या मुठीने ताडिलेल्या बलिना बलभद्रेण - बलवान अशा बलरामाने तलेन भृशं अभिहतः - तळहाताने अत्यंत ताडिला गेला. ॥२४॥
त्याचप्रमाणे मुष्टिकानेसुद्धा अगोदर बलरामांना एक ठोसा लगावला. त्यावर बलवान बलरामांनी त्याला अतिशय जोरात चापट मारली. (२४)
प्रवेपितः स रुधिरं उद्वमन् मुखतोऽर्दितः ।
व्यसुः पपातोर्व्युपस्थे वाताहत इवाङ्घ्रिपः ॥ २५ ॥
वार्यात उखडे वृक्ष तसा हा त्रासला बहू । निष्प्राण पडला खाली ओकला रक्तही बहू ॥ २५ ॥
अर्दितः सः - पीडिलेला तो मुष्टिक प्रवेपितः - कंपित होऊन मुखतः रुधिरं उद्वमन् - तोंडातून रक्त ओकत वाताहतः अङ्घ्रिपः इव - वार्याने ताडिलेल्या वृक्षाप्रमाणे व्यसुः (भूत्वा) - मृत होऊन उर्व्युपस्थे - जमिनीवर पपात - पडला. ॥२५॥
चापट बसताच तो कापू लागला. अत्यंत व्यथित झालेला तो तोंडातून रक्त ओकीत प्राण जाऊन वादळाने उखडलेल्या झाडाप्रमाणे जमिनीवर पडला. (२५)
ततः कूटमनुप्राप्तं रामः प्रहरतां वरः ।
अवधीत् लीलया राजन् सावज्ञं वाममुष्टिना ॥ २६ ॥
योद्धाश्रेष्ठ बळीरामे तत्काल दुसरा भिडू । कूटाला धरुनी डाव्या करें तुच्छोनि मारिले ॥ २६ ॥
राजन् - हे राजा ततः - नंतर प्रहरतां वरः रामः - प्रहार करणार्यांमध्ये श्रेष्ठ असा बलराम अनुप्राप्तं कूटं - आलेल्या कूट नावाच्या राक्षसाला सावज्ञं - अपमानपूर्वक लीलया वाममुष्टिना - सहज डाव्या हाताच्या मुठीने अवधीत् - मारिता झाला. ॥२६॥
हे राजन ! योद्ध्यांप्रमाणे श्रेष्ठ असणार्या बलरामांनी यानंतर कूट नावाच्या पहिलवानाला समोर येताच बेफिकीरपणे अगदी सहज डाव्या हाताच्या ठोशाने मारले. (२६)
तर्ह्येव हि शलः कृष्ण प्रपदाहतशीर्षकः ।
द्विधा विदीर्णस्तोशलक उभावपि निपेततुः ॥ २७ ॥
त्या क्षणी कृष्णलाथेने शलाचे शिरही तुटे । त्या शला चिरले जैसे तृण ते कापणे तसे ॥ २७ ॥
तर्हि एव हि - त्याच वेळी खरोखर कृष्णपदापहतशीर्षकः - श्रीकृष्णाच्या पायाने ज्याचे मस्तक तुडविले गेले आहे असा शलः - शल (च) द्विधा विदीर्णः तोशलकः - आणि दोन शकले केलेला तोशलक उभौ अपि निपेततुः - हे दोघेहि जमिनीवर पडले. ॥२७॥
भगवान श्रीकृष्णांनी त्याचवेळी पायाने ठोकर मारून शलाचे मस्तक उडवले आणि तोशलाला उभे चिरले. अशा प्रकारे दोघांचेही प्राणोत्क्रमण झाले. (२७)
चाणूरे मुष्टिके कूटे शले तोशलके हते ।
शेषाः प्रदुद्रुवुर्मल्लाः सर्वे प्राणपरीप्सवः ॥ २८ ॥
चाणुरो मुष्टिको कूट शल तोषल पाच हे । मरता, वाचले जे ते पळाले प्राण रक्षिण्या ॥ २८ ॥
चाणूरे मुष्टिके कूटे - चाणूर, मुष्टिक, कूट, शले तोशलके हते - शल व तोशलक हे मारिले असता शेषाःप्राणपरीप्सवः सर्वे मल्लाः - उरलेले प्राणरक्षणाची इच्छा करणारे इतर सर्व मल्ल प्रदुद्रुवुः - पळून गेले. ॥२८॥
जेव्हा चाणूर, मुष्टिक, कूट आणि तोशल हे पाचही पहिलवान मारले गेले, तेव्हा बाकीचे आपले प्राण वाचविण्यासाठी तेथून पळून गेले. (२८)
गोपान् वयस्यान् आकृष्य तैः संसृज्य विजह्रतुः ।
वाद्यमानेषु तूर्येषु वल्गन्तौ रुतनूपुरौ ॥ २९ ॥
पळता मल्ल ते सारे भेरीनादात नाचुनी । बळी कृष्ण तसे गोप खेळले मल्लखेळही ॥ २९ ॥
रुतनुपरौ वल्गन्तौ - पायांतील पैंजणांचा आवाज करीत इकडेतिकडे धावणारे रामकृष्ण तूर्येषु वाद्यमानेषु - भेरी वाजू लागल्या असता वयस्यान् गोपान् आकृष्य - बरोबरीच्या गोपांना पुढे ओढून तैः संसृज्य - त्यांशी संघटित होऊन विजह्लतुः - क्रीडा करू लागले. ॥२९॥
त्यानंतर भगवान श्रीकृष्ण-बलरामांनी आपल्या बरोबरीच्या गोपांना जवळ बोलावून त्यांना भिडून नाचत-गात, ढोलाच्या नादात आपल्या नूपुरांचा आवाज मिसळून ते विजयोत्सव साजरा करू लागले. (२९)
जनाः प्रजहृषुः सर्वे कर्मणा रामकृष्णयोः ।
ऋते कंसं विप्रमुख्याः साधवः साधु साध्विति ॥ ३० ॥
प्रेक्षकां मोद तो झाला कार्याने रामकृष्णाच्या । शिष्टे प्रशंसिले त्यांना तेणे कंस चिडे बहू ॥ ३० ॥
रामकृष्णयोः कर्मणा - बलराम व श्रीकृष्ण ह्यांच्या कृत्याने कंसं ऋते सर्वे जनाः - कंसाशिवाय सर्व लोक प्रजहृषुः - आनंदित झाले साधवः विप्रमुख्याः - सदाचारी श्रेष्ठ ब्राह्मण साधु साधु इति (अब्रुवन्) - चांगले, चांगले असे म्हणाले. ॥३०॥
राम-कृष्णांच्या ह्या अद्भूत कृत्याने सर्व लोकांना अतिशय आनंद झाला. कंसाखेरीज श्रेष्ठ ब्राह्मण आणि साधुपुरुष "वाहवा ! वाहवा !" म्हणून प्रशंसा करू लागले. (३०)
हतेषु मल्लवर्येषु विद्रुतेषु च भोजराट् ।
न्यवारयत् स्वतूर्याणि वाक्यं चेदमुवाच ह ॥ ३१ ॥
मारिता पाच ते मल्ल पळाले अन्य सर्व तै । कंसाने वाद्य ते सारे केले बंद नि तो वदे ॥ ३१ ॥
मल्लवर्येषु हतेषु - श्रेष्ठ श्रेष्ठ असे कित्येक मल्ल मारले गेले असता च विद्रुतेषु - व कित्येक पळून गेले असता भोजराट् - कंस स्वतूर्याणि न्यवारयत् - स्वतःच्या वाद्यांचे निवारण करिता झाला इदं च वाक्यम् उवाच ह - आणि हे वाक्य बोलला. ॥३१॥
मोठमोठे पहिलवान मारले गेले किंवा पळून गेले. हे पाहून भोजराज कंसाने आपली वाद्ये वाजविणे बंद केले आणि आपल्या सेवकांना आज्ञा केली. (३१)
निःसारयत दुर्वृत्तौ वसुदेवात्मजौ पुरात् ।
धनं हरत गोपानां नन्दं बध्नीत दुर्मतिम् ॥ ३२ ॥
अरे हे वसुदेवाचे दुश्चरित्र अशी मुले । हाकला येथुनी त्यांना लुटा नंदास बांधणे ॥ ३२ ॥
दुर्वृत्तौ वसुदेवात्मजौ - दुराचारी असे वसुदेवपुत्र जे बलराम व श्रीकृष्ण पुरात् निःसारयत - ह्यांना नगरातून हाकलून द्या गोपानां धनं हरत - गोपांचे द्रव्य हरण करा दुर्मतिं नन्दं बध्नीत - दुर्बुद्धि अशा नंदाला बांधून टाका. ॥३२॥
अरे ! वसुदेवाच्या या दुराचारी मुलांना नगराच्या बाहेर हाकलून द्या. गोपांचे सर्व धन हिसकावून घ्या आणि दुर्बुद्धी नंदाला कैद करा. (३२)
वसुदेवस्तु दुर्मेधा हन्यतामाश्वसत्तमः ।
उग्रसेनः पिता चापि सानुगः परपक्षगः ॥ ३३ ॥
कुबुद्धी वसुदेवो तो उग्रसेन पिता तसा । दोघांना मारणे शीघ्र जिते सोडान त्यांजला ॥ ३३ ॥
असत्तमः दुर्मेधाः वसुदेवः तु - असद्वर्तन करणारा वाईट बुद्धीचा वसुदेव तर आशु हन्यताम् - लवकर मारून टाका अपि च - आणखीहि परपक्षगः पिता उग्रसेनः - शत्रुपक्ष स्वीकारलेला पिता उग्रसेन सानुगः (हन्यतां) - अनुचरांसह मारा. ॥३३॥
अत्यंत कुबुद्धी आणि दुष्ट अशा वसुदेवाला ताबडतोब मारून टाका; तसेच, माझा बाप उग्रसेनही आपल्या अनुयायांसह शत्रूच्याच पक्षाला जाऊन मिळाला आहे. म्हणून त्यालासुद्धा जिवंत ठेवू नका. (३३)
विवरण :- सहाही मल्लांचा वध झाल्यानंतर गोकुळातून आलेले गोप आखाडयात येऊन आनंदोत्सव करू लागले. पण इकडे कंस अत्यंत संतप्त झाला. त्याने विजयोत्सव थांबविलाच पण 'दुष्ट' वसुदेवास मारण्याची आज्ञा केली. इतकेच नाही, तर आपले वडील उग्रसेन जे कृष्णाचे समर्थक होते, त्यांनाहि ठार मारण्याची आज्ञा केली. (परपक्षग) दुष्ट मनुष्याचा अपेक्षाभंग होऊन तो संतप्त झाल्यावर त्याचा सारासार विवेक कसा नष्ट होतो याचे हे उदाहरण. कृष्णाची बाजू सत्याची असल्याने उग्रसेन त्याचा पक्षपाती होता, पण आपले वडील आहेत म्हणून आपली अन्यायाची बाजूहि त्यांनी उचलून धरावी, ही कंसाची अपेक्षा. ती भंग झाल्याने तो नाते विसरून त्यांचा प्राण घेऊ इच्छित होता. वसुदेव तर पहिल्यापासूनच त्याच्या दृष्टीने शत्रू असल्याने त्याला ठार करणे आवश्यकच होते. (३३)
एवं विकत्थमाने वै कंसे प्रकुपितोऽव्ययः ।
लघिम्नोत्पत्य तरसा मञ्चमुत्तुङ्गमारुहत् ॥ ३४ ॥
बरळे कंस हा ऐसा तेंव्हा अक्षेय कृष्ण तो । वेगाने चढला मंची क्रोधपूर्ण असाचि की ॥ ३४ ॥
कंसे एवं वै विकत्थमाने - कंस ह्याचप्रमाणे खरोखर बडबड करीत असता प्रकुपितः अव्ययः (सः) - रागावलेला अविनाशी असा तो श्रीकृष्ण लघिन्मा तरसा उत्पत्य - कुशलतेने वेगाने उडी मारून उत्तुंङगं मञ्चं आरुहत् - उंच अशा आसनावर आरुढ झाला. ॥३४॥
अशाप्रकारे बडबडणार्या कंसावर अविनाशी श्रीकृष्ण चिडले आणि वेगाने सहजपणे त्या उंच मंचावर उडी मारून चढले. (३४)
तं आविशन्तमालोक्य मृत्युमात्मन आसनात् ।
मनस्वी सहसोत्थाय जगृहे सोऽसिचर्मणी ॥ ३५ ॥
मनात जाणिले कंसे मारण्या कृष्ण पातला । सखड्ग ढाल घेवोनी उठे सिंहासनातुनी ॥ ३५ ॥
मनस्वी सः - गंभीर मनाचा तो कंस तं आत्मनः मृत्यूं - तो श्रीकृष्ण मूर्तिमान आपला मृत्यूच असा आविशन्तं आलोक्य - आपल्याकडे येत आहे असे पाहून सहसा आसनात् उत्थाय - एकाएकी आसनावरून उठून असिचर्मणी जगृहे - तलवार व ढाल घेता झाला. ॥३५॥
अहंकारी कंसाने जेव्हा पाहिले की, आपला मृत्यू समोर येऊ लागला आहे, तेव्हा त्याने लगेच सिंहासनावरून उठून हातात ढाल-तलवार घेतली. (३५)
( मिश्र )
तं खड्गपाणिं विचरन्तमाशु श्येनं यथा दक्षिणसव्यमम्बरे । समग्रहीद् दुर्विषहोग्रतेजा यथोरगं तार्क्ष्यसुतः प्रसह्य ॥ ३६ ॥
( इंद्रवज्रा ) प्रहारण्या कंस घेई पवित्रा डावीकडे नी उजव्या करांसी । असह्य ऐसे हरिकृष्ण तेज बळे धरीला मग कंस कृष्णे ॥ ३६ ॥
दुर्विषहोग्रतेजाः (सः) - ज्याचे भयंकर तेज सहन करण्यास कठीण आहे असा तो श्रीकृष्ण खड्गपाणिं - हातात तलवार घेतलेल्या यथा श्येनं - ससाण्याप्रमाणे अम्बरे दक्षिणसव्यं विचरन्तं - अंतरिक्षात उजव्या डाव्या बाजूने फिरणार्या तं - त्या कंसाला यथा तार्क्ष्यसुतः उरगं - जसा गरुड सर्पाला त्याप्रमाणे प्रसह्य आशु समग्रहीत् - बलात्काराने तत्काळ धरिता झाला. ॥३६॥
हातात तलवार घेऊन प्रहार करण्यासाठी आकाशात उडणार्या ससाण्याप्रमाणे तो कधी डावीकडे तर कधी उजवीकडे जाऊ लागला, तेवढ्यात गरुडाने सापाला पकडावे तसे असह्य प्रखर तेज असणार्या भगवंतांनी त्याला घट्ट पकडले. (३६)
विवरण :- निसर्गात काही काही प्राण्यांचे आपापसात जन्मजात हाडवैर असते. जसे साप-मुंगूस, उंदीर-मांजर, इ. तसेच साप व गरुड यांचेहि वैर. जमिनीवर साप कोठेही सरपटताना दिसला, की गरुड आकाशातून त्याच्यावर झडप घालतो व त्यास उचलून नेतो. अशाप्रकारचे हाडवैर कृष्ण-कंसाचे होते. त्या दोघांची लढाई चालू असताना कंस आखाडयात इकडे तिकडे धावत होता; त्यावेळी गरुडाने जसे सापास पकडावे तसे कृष्णाने त्यास पकडले, असे समर्पक वर्णन आहे. गरुडाला पक्षीश्रेष्ठाची उपमा देतात. तो श्रीविष्णूचे वाहन. कृष्ण त्या गरुडाप्रमाणे बलाढय. जमिनीवर सरपटणार्या सापाप्रमाणे असणार्या कंसाला त्याने केव्हाच पकडून ठार केले असा भाव. (३६)
प्रगृह्य केशेषु चलत्किरीतं
निपात्य रङ्गोपरि तुङ्गमञ्चात् । तस्योपरिष्टात् स्वत्स्वयमब्जनाभः पपात विश्वाश्रय आत्मतन्त्रः ॥ ३७ ॥
मुकुट त्याचा पडला धरेशी केसा धरोनी मग कृष्ण पाडी । नी मुक्त ऐशा हरिने तयाच्या देहासि केला मग मुक्त नाच ॥ ३७ ॥
विश्वाश्रयः आत्मतन्त्रः अब्जनाभः - जगाला आश्रयभूत व स्वतंत्र असा पद्मनाभ श्रीकृष्ण चलत्किरीटं तुङ्गं (तं) - ज्याच्या मस्तकावरील मुकुट हालत आहे अशा उंच कंसाला केशेषु प्रगृह्य - केसांचे ठिकाणी धरून मञ्चात् रंगोपरि निपात्य - उच्चासनावरून रंगभूमीवर पाडून तस्य उपरिष्टात् स्वयं पपात - त्याच्यावर स्वतः पडला. ॥३७॥
याचवेळी कंसाचा मुगुट खाली पडला आणि भगवंतांनी त्याचे केस पकडून त्यलासुद्धा त्या उंच मंचावरून खाली आखाड्यात आपटले. आणि स्वतंत्र व सगळ्या विश्वाचा आश्रय असणार्या पद्मनाभांनी स्वतः त्याच्यावर उडी मारली. (३७)
विवरण :- कंसाचे केस पकडून त्याला खाली पाडून कृष्ण त्याच्यावर आरूढ झाला असे वर्णन. इथे कृष्णाला 'विश्वाश्रय' असे संबोधले आहे. ते त्याचे श्रेष्ठत्व दाखविण्यासाठी. कृष्ण म्हणजे विश्वाचा आधार, आत्मतंत्र, स्वतंत्र असा अर्थ. (३७)
तं सम्परेतं विचकर्ष भूमौ
हरिर्यथेभं जगतो विपश्यतः । हा हेति शब्दः सुमहान् तदाभूद् उदीरितः सर्वजनैर्नरेन्द्र ॥ ३८ ॥
लाथेचि मेला तै कंस शत्रू प्रेतास ओढी धरणीसि कृष्ण । सिंहो जसा ओढितो हत्ति लागी मेलो असा एकचि शब्द आला ॥ ३८ ॥
नरेन्द्र - हे परीक्षित राजा यथा हरिः - जसा सिंह इभं - हत्तीला (तथा) जगतः विपश्यतः - त्याप्रमाणे लोक पहात असता संपरेतं तं - मेलेल्या त्या कंसाला भूमौ विचकर्ष - पृथ्वीवर ओढिता झाला सर्वजनैः उदीरितः - त्या वेळी सर्व लोकांनी उच्चारिलेला हा हा इति सुमहान् शब्दः अभूत् - हा हा असा मोठा शब्द झाला. ॥३८॥
त्यामुळे कंसाचा तत्काळ मृत्यू झाला. नंतर जसा सिंह हत्तीला फरपटत नेतो, त्याचप्रमाणे सर्वांच्या देखत श्रीकृष्णांनी कंसाचे प्रेत जमिनीवरून फरपटत नेले. हे नरेंद्रा ! त्यावेळी सगळ्यांच्या तोंडून "हाय ! हाय" असे मोठ्याने उद्गार निघाले. (३८)
विवरण :- आखाडयात कृष्णाने कंसाला खाली पाडून ठार केले. त्याहीपेक्षा कृष्णरूपी काळ, यम समोर बघून कंस भीतीनेच निष्प्राण झाला असे म्हणणे अधिक योग्य. मग कृष्णाने त्याला फरफटत जमिनीवर आणले; कसे ? जसे सिंहाने हत्तीला ओढत न्यावे तसे. हत्ती हा महाकाय आणि बलाढयहि. पण जंगलाचा, सर्व पशूंचा अधिपती सिंहच. त्याच्या पराक्रमापुढे हत्तीची मात्रा चालत नाही. कंस पराक्रमी होता. पण त्याला न्यायाचे अधिष्ठान नव्हते. ती असुरी शक्ती होती, आणि म्हणूनच कृष्णाच्या दैवी शक्तीपुढे त्याचे काही चालले नाही, पाशवी शक्ती निष्प्रभ झाली. (३८)
स नित्यदोद्विग्नधिया तमीश्वरं
पिबन् वदन् वा विचरन् स्वपन्श्वसन् । ददर्श चक्रायुधमग्रतो यतः तदेव रूपं दुरवापमाप ॥ ३९ ॥
भितीत कंसो हरि चिंति नित्य खाता पिता चालत श्वास घेता । शत्रू मनी मानुनि नित्य ध्यायी सारुप्य मोक्षो हरि दे तयासी ॥ ३९ ॥
सः - तो कंस पिबन् - प्राशन करीत असता वदन् विचरन् - बोलत असता, हिंडत असता, स्वपन् वा श्वसन् - निद्रा घेत असता किंवा श्वासोच्छ्वास करीत असता नित्यदा उद्विग्नधिया - नेहमी उद्विग्नबुद्धीने तं चक्रायुधं ईश्वरं - चक्र धारण करणार्या ऐश्वर्यसंपन्न अशा त्या श्रीकृष्णाला अग्रतः ददर्श - पुढे पहात असे यतः - ज्यामुळे तत् एव दुरवापं - त्याच दुर्लभ श्रीकृष्णाच्या रूपं (सः) आप - रूपाला तो प्राप्त झाला. ॥३९॥
अत्यंत भयभीत होऊन कंस नेहमी श्रीकृष्णांचेच चिंतन करीत असे. तो खाता-पिताना, झोपताना-चालताना, बोलताना, किंवा श्वास घेताना अशा सर्वच वेळी आपल्या हातात सुदर्शन चक्र घेतलेल्या भगवान श्रीकृष्णांनाच पाहात होता. त्यामुळेच त्याला दुर्लभ अशी भगवंतांची सारुप्यमुक्ती मिळाली. (३९)
विवरण :- भगवान कृष्णाचा शत्रू कंस, त्याने कृष्णाचा सतत द्वेष केला. कृष्णाला कसे संपवावे, हाच रात्रंदिवस ध्यास. पण स्वतःच त्याचेकडून ठार झाला. मृत्यूनंतर त्याला दानवांना मिळतो तो नरक न मिळता दुर्लभ असे कृष्णस्वरूप प्राप्त झाले. हा विरोधाभास कसा ? सतत द्वेष हीही एकप्रकारची विरोधी भक्तीच. त्याचे वाईट करण्यासाठी, त्याला मारण्यासाठी का होईना, सतत कृष्णाचाच विचार, अगदी मरतानाही, आणि तो उपकारकच ठरला. शंख-चक्र-गदाधारी कृष्णाचे चिंतन करून तो स्वतः कृष्णरूप झाला. सारुप्य मुक्तीचा हाही एक प्रकार. (३९)
( अनुष्टुप् )
तस्यानुजा भ्रातरोऽष्टौ कंकन्यग्रोधकादयः । अभ्यधावन् अतिक्रुद्धा भ्रातुर्निर्वेशकारिणः ॥ ४० ॥
( अनुष्टुप् ) कंसाला आठ ते बंधू न्यग्रोध कंक हे द्वय । क्रोधाने बदला घ्याया रामकृष्णाशि धावले ॥ ४० ॥
कंकन्यग्रोधकादयः - कंक, न्यग्रोध इत्यादि तस्य अनुजाः अष्टौ भ्रातरः - त्या कंसाचे धाकटे आठ भाऊ भ्रातुः निर्वेशकारिणः - भ्रात्याच्या ऋणातून मुक्त होण्याची इच्छा करणारे अभिक्रुद्धाः अभ्यधावन् - क्रुद्ध होऊन धावत आले. ॥४०॥
कंक, न्यग्रोध इयादी कंसाचे धाकटे आठ भाऊ मोठ्या भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी संतापून त्यांच्या अंगावर धावले. (४०)
तथातिरभसांस्तांस्तु संयत्तात् रोहिणीसुतः ।
अहन् परिघमुद्यम्य पशूनिव मृगाधिपः ॥ ४१ ॥
बळीने पाहता दोघा परीघ उचलोनिया । पशूला सिंह जै मारी तसेचि मारिले द्वया ॥ ४१ ॥
रोहिणीसुतः - बलराम मृगाधिपः पशून् इव - सिंह पशूंना मारतो तथा - त्याप्रमाणे अतिरभसान् - अत्यंत वेगवान व संयत्तान् तान् तु - सज्ज झालेल्या त्या कंकादिकांना परिघं उद्यम अहन् - हातात अर्गळा घेऊन मारिता झाला. ॥४१॥
ते मोठ्या आवेशाने युद्धाच्या तयारीने येत असलेले पाहून बलरामांनी परिघाने, सिंहाने पशूंना मारतो, त्याप्रमाणे त्यांना मारले. (४१)
विवरण :- कंसवधानंतर कंकादि त्याच्या आठ भावांनी रागवून कृष्णावर हल्ला केला. (कंसाच्या उपकाराच्या ओझ्याखाली ते दबले असण्याची शक्यता, निर्वेश प्रेमामुळे नाही असा भाव) पण अगदी क्षुद्र पशूंना जसे मारावे तसे कृष्णाने त्यांना मारले. कंसाला मारल्यानंतर जसे हत्तीला सिंहाने मारावे, तसे मारले. असे वर्णन. हत्ती या शब्दाने कंसाचे शौर्य व्यक्त होते; पण 'पशू' या शब्दांनी त्याच्या भावांचे क्षुद्रत्व दिसून येते. (४१)
नेदुर्दुन्दुभयो व्योम्नि ब्रह्मेशाद्या विभूतयः ।
पुष्पैः किरन्तस्तं प्रीताः शशंसुर्ननृतुः स्त्रियः ॥ ४२ ॥
आकाशी वाजल्या भेरी ब्रह्मादी देव सर्व ते । स्तवोनी अर्पिती पुष्पे अप्सरा नाचल्या तशा ॥ ४२ ॥
दुन्दुभयः व्योम्नि नेदुः - दुंदुभि आकाशांत वाजू लागल्या ब्रह्मोशाद्याः विभूतयः - ब्रह्मदेव शंकर इत्यादि विभूति पुष्पैः तं किरन्तः - फुलांनी त्या कृष्णावर वृष्टि करीत प्रीताः शशंसुः - प्रसन्न मुद्रेने स्तुति करित्या झाल्या स्त्रियः ननृतुः - स्त्रिया नृत्य करू लागल्या. ॥४२॥
त्यावेळी आकाशात दुंदुभी वाजू लागल्या. भगवंतांचे विभूतिस्वरूप असलेले ब्रह्मदेव, शंकर इत्यादी देव आनंदाने पुष्पवर्षाव करीत त्यांची स्तुती करू लागले. अप्सरा नऋत्य करू लागल्या. (४२)
तेषां स्त्रियो महाराज सुहृन्मरणदुःखिताः ।
तत्राभीयुर्विनिघ्नन्त्यः शीर्षाण्यश्रुविलोचनाः ॥ ४३ ॥
नृपा ! कंसादिच्या स्त्रीया पिटीत ऊर तेधवा । रडता पातल्या तेथे विलापस्वर जाहला ॥ ४३ ॥
महाराज - हे महाराजा परीक्षित राजा सुहृन्मरणदुःखिताः आपल्या पतीच्या मृत्यूने दुःखी झालेल्या तेषां स्त्रियः - त्यांच्या स्त्रिया अश्रुविलोचनाः - ज्यांच्या डोळ्यांतून दुःखाश्रू वहात आहेत अशा शीर्षाणि विनिघ्नन्त्यः - मस्तकाला ताडण करीत तत्र - तेथे अभीयुः - आल्या. ॥४३॥
महाराज ! कंस आणि त्याच्या भावाच्या पत्न्या स्वजनांच्या मृत्यूमुळे अत्यंत दुःखी झाल्या. त्या डोकी बडवून घेई लागल्या. त्यावेळी त्यांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहात होत्या. (४३)
शयानान् न्वीरशय्यायां पतीन् आलिङ्ग्य शोचतीः ।
विलेपुः सुस्वरं नार्यो विसृजन्त्यो मुहुः शुचः ॥ ४४ ॥
वीरशय्ये वरी ऐसे नृपादी पाहता बहू । आक्रोश करुनी मोठा अश्रु त्या ढाळु लागल्या ॥ ४४ ॥
वीरशय्यायां शयानान् - रणांगणांत निजलेल्या पतीन् आलिङ्ग्य - पतींना आलिंगन देऊन शोचतीः - शोक करणार्या मुहुः शुचः विसृजन्त्यः नार्यः - वारंवार अश्रु ढाळणार्या त्या स्त्रिया सुस्वरं विलेपुः - करुण अशा स्वराने विलाप करू लागल्या. ॥४४॥
वीरशय्येवर कायमची झोप घेणार्या आपापल्या पतींना कवटाळून शोकग्रस्त झालेल्या त्या वारंवार अश्रू ढाळीत मोठ्याने आक्रोश करू लागल्या. (४४)
विवरण :- कंस आणि त्याच्या बंधूंच्या स्त्रिया आपापल्या पतींचे अचेतन देह कवटाळून विलाप करू लागल्या. त्या विलापास सुस्वर असा शब्द वापरला आहे. विलाप आणि सुस्वर हे दोन शब्द काहीसे विरुद्ध वाटतात, पण त्या विलापातहि एकप्रकारचा स्वर होता, त्या एकसुरात विलाप करीत होत्या, असे म्हणता येईल. (४४)
हा नाथ प्रिय धर्मज्ञ करुणानाथवत्सल ।
त्वया हतेन निहता वयं ते सगृहप्रजाः ॥ ४५ ॥
नाथा रे प्रीय धर्मज्ञा करुणाकर वत्सला । उजाड जाहलो आम्ही अनाथ पुत्र जाहले ॥ ४५ ॥
हा नाथ - अरेरे! हे नाथा प्रिय धर्मज्ञ - हे प्रिया, हे धर्म जाणणार्या, करुणानाथवत्सल - हे दयापते प्रेमळ स्वामिन् त्वया हतेन - तू मेल्यामुळे ते सगृहप्रजाः वयं - गृहासह अशा तुझ्या आम्ही प्रजा निहताः - मारिल्या गेलो आहोत. ॥४५॥
हे नाथा ! हे प्रियतमा ! हे धर्मज्ञा ! हे करुणामया ! हे अनाथवत्सला ! आपल्या मृत्यूने आमचाही मृत्यू झाल्यासारखाच आहे. आमची घरे आज उजाड झाली. आमची मुले अनाथ झाली. (४५)
त्वया विरहिता पत्या पुरीयं पुरुषर्षभ ।
न शोभते वयमिव निवृत्तोत्सवमङ्गला ॥ ४६ ॥
स्वामी हो विरहे सारे मांगल्योत्सव संपले । शोभाहीन अशा झालो विधवा आम्हि सर्व या ॥ ४६ ॥
पुरुषर्षभ - हे पुरुषश्रेष्ठा पत्या त्वया विरहिता - पती अशा तुजपासून वियुक्त झालेली इयं पुरी - ही नगरी निवृत्तोत्सवमङगला - जीतील उत्सवादि मंगल कृत्ये बंद पडली आहेत अशी वयम् इव न शोभते - आम्हाप्रमाणेच शोभत नाही. ॥४६॥
हे पुरुषश्रेष्ठा ! या पुरीचे आपणच स्वामी होता. आपण गेल्याने येथील उत्सव संपले. मांगल्य लयाला गेले. ही मथुरानगरी आमच्याप्रमाणेच अशोभनीय झाली. (४६)
अनागसां त्वं भूतानां कृतवान् द्रोहमुल्बणम् ।
तेनेमां भो दशां नीतो भूतध्रुक् को लभेत शम् ॥ ४७ ॥
निरपराधि प्राण्यांना द्रोहिले तुम्हि ते बहू । अन्याये गति ही झाली कोणा शांती मिळे तशी ॥ ४७ ॥
भो - हे नाथा त्वं - तू अनागसां भूतानां - निरपराधी प्राण्याशी उल्बणं द्रोहं कृतवान् - मोठे वैर केलेस तेन इमां दशां नीतः - त्यामुळे अशा दुर्दशेला प्राप्त झालास भूतध्रुक् कः (पुरुषः) - प्राण्य़ांशी वैर करणारा कोणता पुरुष शं लभेत - कल्याणाला मिळवील. ॥४७॥
स्वामी ! आपण निरपराध लोकांना अतिशय छळले. म्हणूनच आपली अशी दशा झाली. जीवांना पीडा देणार्या कोणाचे कल्याण होणार ? (४७)
विवरण :- विलाप करतानाहि कंसस्त्रिया खरे तेच बोलून जातात. कंसाच्या दुष्कृत्यांचा परिणाम सर्वांनाच भोगावा लागत होता. निरपराध, निष्पाप लोकांशी वैर करून कारण नसताना त्यांचे तळतळाट घेतले. स्वतः प्राणांस मुकले. आम्ही, आमची मुलेबाळे अनाथ झालो. विश्वाच्या निर्मात्याशी वैर करून ही अवस्था झाली. आधी वैर कोणाशी करावयाचे, हे कळावयास हवे. उन्मत्तपणामुळे ते न कळल्याने ही दुरवस्था झाली. तेव्हा निष्कारण वैर करणे घातकच, असा त्यांच्या बोलण्याचा भाव. (४७)
सर्वेषामिह भूतानां एष हि प्रभवाप्ययः ।
गोप्ता च तदवध्यायी न क्वचित् सुखमेधते ॥ ४८ ॥
आधार कृष्ण जीवांचा रक्षितो तोच जीवही । तिरस्कार तया होता कोणाला सुख लाभते ॥ ४८ ॥
एषः हि - हा खरोखर इह - ह्या लोकी सर्वेषां भूतानां - सर्व प्राण्यांची प्रभावाप्ययः गोप्ता च - उत्पत्ति, नाश व रक्षण करणारा आहे तदवध्यायी - त्याचा अपमान करणारा क्वचित् सुखं न एधते - कधीहि सुखाला प्राप्त होणार नाही. ॥४८॥
हे भगवान जगातील सर्व प्राण्यांची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयाचे कारण आहेत, जो यांचे वाईट व्हावे, असे इच्छितो, तो कधीच सुखी होत नाही." (४८)
श्रीशुक उवाच -
राजयोषित आश्वास्य भगवान् लोकभावनः । यामाहुर्लौकिकीं संस्थां हतानां समकारयत् ॥ ४९ ॥
श्रीशुकदेव सांगतात - परीक्षित् भगवान् कृष्ण जगाचा जीवनो असे । स्त्रियांना सांत्विले आणि केलेसे अंत्यकर्म ते ॥ ४९ ॥
लोकभावनः भगवान् - लोकांवर प्रेम करणारा श्रीकृष्ण राजयोषितः आश्वास्य - राजस्त्रियांचे सांत्वन करून यां हतानां - जिला मेलेल्यांची लौकिकीं संस्थां आहुः - लोकाचारानुसार और्ध्वदेहिक क्रिया असे म्हणतात (तां) समकारयत् - ती करविता झाला. ॥४९॥
श्रीशुकदेव म्हणतात- जगाचे पोषण करणार्या श्रीकृष्णांनी राण्यांचे सांत्वन केले आणि व्यवस्थित लोकरीतीनुसार मृतांचे क्रिया-कर्म करविले. (४९)
मातरं पितरं चैव मोचयित्वाथ बन्धनात् ।
कृष्णरामौ ववन्दाते शिरसा स्पृश्य पादयोः ॥ ५० ॥
कृष्णनी बलरामाने पितरां सोडवीयले । शीर ते टेकवोनीया पदासी वंदिले पुन्हा ॥ ५० ॥
अथ कृष्णरामौ - नंतर श्रीकृष्ण व बलराम मातरं च पितरं एव - मातेला आणि पित्यालाहि बन्धनात् मोचयित्वा - बन्धनापासून सोडवून पादयोः शिरसा स्पृश्य - पायांना मस्तकाने स्पर्श करून ववन्दाते - वंदन करते झाले. ॥५०॥
त्यानंतर श्रीकृष्ण-बलरामांनी माता-पित्यांना बंधनातून सोडविले आणि त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवून त्यांना वंदन केले. (५०)
देवकी वसुदेवश्च विज्ञाय जगदीश्वरौ ।
कृतसंवन्दनौ पुत्रौ सस्वजाते न शङ्कितौ ॥ ५१ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे पूर्वार्धे कंसवधो नाम चतुर्चत्वारिंशोऽध्यायः ॥ ४४ ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
पुत्रांनी नमिले तेंव्हा जगदीश्वर मानुनी । तयांनी त्या द्वयांना ना धरिले छातिसी पहा ॥ ५१ ॥ ॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर चव्वेचाळिसावा अध्याय हा ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
देवकी वसुदेवः च - देवकी आणि वसुदेव हे कृतसंवन्दनौ पुत्रौ - आपल्याला नमस्कार करणारे दोनहि पुत्र जगदीश्वरौ विज्ञाय - त्रैलोक्याधिपति परमेश्वरच आहेत असे जाणून शंकितौ न सस्वजाते - शंकायुक्त होऊन आलिंगन देते झाले नाहीत. ॥५१॥
परंतु आपल्या मुलांनी वंदन केल्यानंतरसुद्धा देवकी आणि वसुदेवांनी , ते जगदीश्वरच आहेत, पुत्र नव्हेत, असे समजून, त्यांना छातीशी कवटाळले नाही. (उलट स्वतःच हात जोडले.) (५१)
विवरण :- रामकृष्णांनी आपल्या आई-वडिलांना कारागृहातून मुक्त केले, आणि त्यांच्या पायावर डोके ठेवले. त्यावेळी आपल्या माता-पित्यांनी आपणांला छातीशी कवटाळावे, आपले मस्तक अवघ्राण करावे असे त्यांना वाटत होते, पण इथे मात्र त्या दोघांनी आपल्या मुलांनाच उलट हात जोडून वंदन केले. यामुळे रामकृष्णांचा काहीसा विरस झाला. कारण परमेश्वर झाला तरी मानवसुलभ, बालसुलभ अशा भावना त्यांच्यातहि सुप्तरूपाने होत्याच. (कारण आता ते मानवरूपात होते.) पण वसुदेव - देवकीने कृष्णाला चतुर्भुज रूपात पाहिले होते. त्याच्या पाहिलेल्या सर्व लीला दैवीच होत्या. त्यामुळे वात्सल्यभावापेक्षा इथे आदरभावच अधिक व्यक्त झाला. त्यांचे कंसभय तर दूर झालेच होते, आता ते बंधमुक्तहि होते. कदाचित इतक्या वर्षांच्या दुराव्याने नंतर एकदम आणि या पार्श्वभूमीवर भेटल्यावर ते गोंधळले असतील आणि पुत्रभावापेक्षा आदरभावच अधिक निर्माण झाला असेल. पण यावेळी जर इथे नंद - यशोदा असते तर यशोदेने मात्र त्यांना छातीशी कवटाळले असते, असेही वाटून जातेच. (५१) अध्याय चव्वेचाळिसावा समाप्त |