श्रीमद् भागवत पुराण
दशमः स्कन्धः
पञ्चचत्वारिंशोऽध्यायः

वसुदेवदेवकी सान्त्वनम्; उग्रसेनस्य राज्याभिषेकः;
रामकृष्णयोरुपनयनं विद्याध्ययनं, गुरुर्मृतपुत्रस्यानयनं च -

श्रीकृष्ण-बलरामांचे उपनयन आणि गुरुकुलप्रवेश -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् )
पितरावुपलब्धार्थौ विदित्वा पुरुषोत्तमः ।
मा भूदिति निजां मायां ततान जनमोहिनीम् ॥ १ ॥
( अनुष्टुप् )
श्रीशुकदेव सांगतात -
कृष्णाने पाहिले की या पितरा ज्ञान जाहले ।
न योग्य जाणुनी चित्ती योगमायाचि सोडिली ॥ १ ॥

पुरुषोत्तमः - श्रीकृष्ण पितरौ उपलब्धार्थौ विदित्वा - मातापिता ज्ञानसंपन्न झाले असे जाणून (एवं) मा भूत् इति - असे होऊ नये म्हणून जनमोहिनी - लोकांना मोहित करणार्‍या निजां मायां ततान - स्वतःच्या मायेला पसरविता झाला. ॥१॥
श्रीशुक म्हणतात- श्रीकृष्णांच्या लक्षात आले की माता-पित्यांना माझ्या भगवद्‌भवाचे ज्ञान झाले आहे. त्यामुळे यांना पुत्रस्नेहाचे सुख मिळणार नाही, असा विचार करून त्यांनी, लोकांना मोहित करणारी आपली योगमाया त्यांच्यावर पसरली. (१)

विवरण :- मागील अध्यायाच्या शेवटी वसुदेव-देवकीला भगवंताच्या वास्तव ज्ञानाबद्दल झालेल्या जाणीवेची कल्पना येते. ते आपल्या दीर्घकाळ दुरावलेल्या मुलांना छातीशी न कवटाळता हात जोडून वंदन करतात. यामुळे कुठेतरी दुखावलेले भगवंत आपल्या मोहमायेने त्यांना झालेले ज्ञान दूर करण्याचा प्रयत्न करतात. (कदाचित अज्ञानात सुख असते, असे म्हणतात तेही खरे असेल) ते का ? इथेच लक्षात येते की, देव जसा भावाचा, तसा मायेचाहि भुकेला. एवढा तीन जगाचा पिता, पण तो स्वतः मात्र आपल्या माता-पित्याच्या वात्सल्यपूर्ण हस्तस्पर्शाला अधीर होता, आणि 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी' म्हणूनच म्हणतात, की परमेश्वरच खरा 'अनाथ' कारण त्याला वास्तवात कोणीच माता-पिता नाहीत. सारेच हात जोडणारे. पाठीवर हात फिरविणारे कोणीच नाहीत. म्हणजेच त्या त्रैलोक्यश्वरालाहि भोळे-भाबडे प्रेम, मायेची ऊब हवी असते. जोडलेल्या हातापेक्षा मायेने पाठीवर फिरणारे हात हवे असतात. ही माया, हे वात्सल्य मिळण्यास भगवंतानी आपले मोहमायेचे जाळे पसरून आपल्या माता-पित्यांचे खरे ज्ञान दूर केले. (१)



उवाच पितरावेत्य साग्रजः सात्वनर्षभः ।
प्रश्रयावनतः प्रीणन् अम्ब तातेति सादरम् ॥ २ ॥
बळिरामा सवे कृष्ण विनये झुकुनी तदा ।
प्रसन्न करण्या बोले बाबा बाबानि आई गे ॥ २ ॥

साग्रजःसाक्त्त्वर्षभः - भावांसह यादवश्रेष्ठ श्रीकृष्ण पितरौ एत्य - मातापित्यांजवळ येऊन प्रश्नयावनतः - नम्रतापूर्वक लीन होऊन अंब तात इति प्रीणन् - हे माते, अहो बाबा असे म्हणून त्यांना आनंदविणारा होऊन सादरम् उवाच - आदराने बोलू लागला. ॥२॥
यादवश्रेष्ठ श्रीकृष्ण थोरल्या बंधूसह आई-वडिलांकडे गेले आणि आदरपूर्वक विनम्रपणे "आई ! बाबा !" अशी हाक मारून त्यांना आनंदित करीत म्हणू लागले. (२)


नास्मत्तो युवयोस्तात नित्योत्कण्ठितयोरपि ।
बाल्यपौगण्डकैशोराः पुत्राभ्यां अभवन् क्वचित् ॥ ३ ॥
उत्कंठित तुम्हा साठी सदाचि पुत्र आम्हि हे ।
तरी बाल्य किशोरीच तुम्हा सुख न ते दिले ॥ ३ ॥

तात - अहो बाबा नित्योत्कण्ठितयोः अपि युवयोः - नेहमी उत्सुक झालेल्याहि तुम्हा उभयतांना अस्मत्तः पुत्राभ्यां - आम्हा पुत्रांकडून बाल्यपौगण्डकैशोराः - बाल्य, पौगंड व किशोर या अवस्थांतील सुखे क्वचित् न अभवन् - केव्हाही मिळाली नाहीत. ॥३॥
बाबा ! आई ! आम्ही आपले पुत्र असून आणि आमच्यासाठी आपण नेहमी उत्कंठित असूनसुद्धा आपण आमच्या बाल्य, पौगंड आणि किशोर या अवस्थांचे सुख आमच्याकडून मिळवू शकला नाहीत. (३)


न लब्धो दैवहतयोः वासो नौ भवदन्तिके ।
यां बालाः पितृगेहस्था विन्दन्ते लालिता मुदम् ॥ ४ ॥
दैवाने भाग्य ना लाभे तुमच्या पाशि राहणे ।
म्हणोनी घरचे सौख्य प्रेम लाड न लाभले ॥ ४ ॥

दैवहतयोः नौ - दुर्दैवी अशा आम्हाला भवदन्तिके वासः न लब्धः - तुमच्याजवळ रहावयास मिळाले नाही पितृगेहस्थः लालितः बालः - पितृगृही राहून लालनपालन केली गेलेली मुले यां मुदं विन्दन्ते - जो आनंस मिळवितात. ॥४॥
आम्हांलासुद्धा दुर्दैवाने आपल्या जवळ राहाण्याचे सौभाग्य प्राप्त झाले नाही. त्यामुळे आईवडिलांच्या घरी असणार्‍या मुलांना लाड करून घेण्याचे जे सुख मिळते, ते आम्हांला मिळू शकले नाही. (४)


सर्वार्थसम्भवो देहो जनितः पोषितो यतः ।
न तयोर्याति निर्वेशं पित्रोर्मर्त्यः शतायुषा ॥ ५ ॥
जन्मिती पितरे तैसे लाडिती पोषिती तदा ।
गाजवी पुरुषार्था ते न ते ऋण फिटे कधी ॥ ५ ॥

मर्त्यः - मनुष्य सर्वार्थसंभवः - सर्व पुरुषार्थ मिळवून देणारा देहः यतः जनितः - देह ज्यापासून उत्पन्न झाला च पोषितः - आणि पोषिला गेला तयोः पित्रोः निर्वेशं - त्या मातापित्यांचे उपकार फेडणे शतायुषा न याति - शंभर वर्षाचे आयुष्य खर्ची घातले तरी शक्य होणार नाही. ॥५॥
माता-पिताच या शरीराला जन्म देऊन त्याचे लालनपालन करतात. तेव्हा कुठे ते शरीर पुरुषार्थप्राप्तीचे साधन बनते. म्हणून एखाद्याने शंभर वर्षे जिवंत राहून जरी माता-पित्यांची सेवा केली, तरी तो त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. (५)

विवरण :- मानुषी देह हा दुर्लभ मानला जातो. जन्म-मरणाचे अनेक फेरे (८४ लक्ष फेरे असे मानले जाते) झाल्यावर तो प्राप्त होतो. म्हणून असा दुर्लभ देह सत्कृत्ये करून कारणी लावायचा, सार्थक करायचा, असा देह ज्या आईवडिलांपासून मिळतो, त्यांची सेवा करून त्यांचे ऋणी राहून, त्यांना सुखात ठेवण्याचा प्रयत्न करावयाचा. आपले जीवन सुरक्षित रहावे, म्हणून रामकृष्णांना कंसाच्या नजरेपासून दूर रहाणे आवश्यक होते; त्यामुळे ते आपल्या आई-वडिलांची सेवा करू शकले नाहीत, उलट त्यांना कंसाच्या बंदिवासात रहावे लागले, याबद्दल ते क्षमायाचना करतात. मानवी जीवनात धर्म-अर्थ-काम-मोक्ष या चार पुरुषार्थाची प्राप्ती हे अंतिम उद्दिष्ट मानले जाते. पण मानवी देहाशिवाय ते कसे शक्य ? म्हणून मानवी देह प्राप्त करवून देऊन चार पुरुषार्थाची प्राप्ती शक्य करवून देणारे माता-पिता श्रेष्ठ. त्यांच्या ऋणातून मुक्त होणे कठीण. (न फिटे ऋण कधीही जन्मदेचे ।) केवळ आई-वडिलांच्या पैशावर नजर ठेऊन तो लाटणारे आणि शेवटी त्यांना वृद्धाश्रमाची वाट दाखविणारे आजचे तरुण, त्यांनी यातून जरूर धडा घ्यावा. (५)



यस्तयोः आत्मजः कल्प आत्मना च धनेन च ।
वृत्तिं न दद्यात् तं प्रेत्य स्वमांसं खादयन्ति हि ॥ ६ ॥
धन तने न जो सेवी सामर्थ्य असुनी सुत ।
मरता यम तो त्याला त्याचेच मास भक्षवी ॥ ६ ॥

यः आत्मनः कल्पः - जो स्वतः सामर्थ्यवान असून आत्मना धनेन च - शरीर कष्टाने व द्रव्यद्वाराने तयोः वृत्तिं न दद्यात् - त्या मातापित्यांचे पोषण करीत नाही (यमदूताः) तं प्रेत्य - यमदूत त्याच्याकडून मरणानंतर स्वमांसं खादयन्ति - स्वतःचेच मांस खावयाला लावितात. ॥६॥
सामर्थ्य असूनही जो पुत्र आपल्या आई-वडिलांची शरीराने आणि धनाने सेवा करीत नाही, त्याला मेल्यानंतर यमदूत त्याच्याच शरीराचे मांस खाऊ घालतात. (६)

विवरण :- आपण आई-वडिलांना सुखात ठेऊ शकलो नाही, याबद्दलचे दुःख व्यक्त करताना राम-कृष्ण पुढे म्हणतात, जो देहाने आणि संपत्तीने समर्थ असूनहि आईवडिलांची सेवा करीत नाही, त्याला यमलोकात स्वमांसभक्षण करावे लागते. इथे 'आत्मना' आणि 'धनेन कल्यः' हे शब्द महत्त्वाचे. शरीर आणि धनाने संपन्न, म्हणजेच निर्धन आणि दुर्बल पुत्राने एकवेळ आईवडिलांची सेवा केली नाही, तरी चालेल, त्यांना ते क्षम्य ! मात्र आम्ही दोघेही तसे नाही. या दोनहि गोष्टी आमच्याजवळ असूनहि आम्ही आपली सेवा केली नाही हे दुःख. (कंसाच्या दृष्टीआड त्या दोघांनाहि रहाणे आवश्यक असल्याने जरी हे घडले तरी माता-पित्यांना सुखात न ठेवण्याचा दोष ते स्वतःकडे घेतात, हा त्यांचा मोठेपणा) (६)



मातरं पितरं वृद्धं भार्यां साध्वीं सुतं शिशुम् ।
गुरुं विप्रं प्रपन्नं च कल्पोऽबिभ्रत् श्वसन् मृतः ॥ ७ ॥
वृद्ध माता पिता विप्र सतीपत्‍नी नि बालक ।
संतती आश्रितो यांना न पोषी जो समर्थ तो ।
मुडद्या समची जाणा जिवंत पुत्र तो जरी ॥ ७ ॥

कल्पः - अंगी सामर्थ असून मातरं वृद्धं पितरं - माता, वयोवृद्ध पिता भार्यां साध्वीं शिशुं सुतं - पतिव्रता पत्नी व अल्पवयी बालक गुरुं प्रियं च प्रपन्नं - गुरु, ब्राह्मण व शरणागत ह्यांना अबिभ्रत् - न पोसणारा श्वसन् मृतः - जिवंत असूनहि मेल्यासारखा होय. ॥७॥
सामर्थ्य असूनही जो मनुष्य आपले म्हातारे माता-पिता, पतिव्रता पत्‍नी, लहान मुले, गुरु, ब्राह्मण आणि शरणागत यांचे पालनपोषण करीत नाही, तो जिवंत असूनही मेल्यासारखाच होय. (७)


तन्नावकल्पयोः कंसात् नित्यमुद्विग्नचेतसोः ।
मोघमेते व्यतिक्रान्ता दिवसा वामनर्चतोः ॥ ८ ॥
व्यर्थची वय हे गेले कंसाचे भय ठेवुनी ।
उद्विग्न राहिलो चित्ती सेवा ना घडली पहा ॥ ८ ॥

तत् कंसात् - म्हणून कंसापासून नित्यं उद्विग्नचेतसोः अकल्पयोः - नेहमी भ्यालेल्या व असमर्थ वां अनर्चतोः नौ - आणि तुमची सेवा न करणार्‍या आमचे एते दिवसाः मोघं व्यतिक्रान्ताः - इतके दिवस निरर्थ गेले. ॥८॥
आपली सेवा न करण्यामुळे आमचे इतके दिवस वाया गेले. कारण नेहमी कंसाच्या भीतीने आम्ही आपली सेवा करण्यास असमर्थ होतो. (८)


तत्क्षन्तुं अर्हथस्तात मातर्नौ परतन्त्रयोः ।
अकुर्वतोर्वां शुश्रूषां क्लिष्टयोर्दुर्हृदा भृशम् ॥ ९ ॥
माझे आई पिताजी हो दोघांनी क्षमिणे अम्हा ।
हाय हे केवढे कष्ट कंसाने दिधले तुम्हा ॥ ९ ॥

तात - अहो बाबा मातः - हे आई तत् - म्हणून दुर्हृदा भृशं क्लिष्टयोः - दुष्ट कंसाने अत्यंत क्लेशहि केलेल्या वां शुश्रूषां अकुर्वतोः - तुमची सेवा न करणार्‍या परतन्त्रयोः नौ - पराधीन अशा आम्हा दोघांना क्षन्तुं अर्हथः - क्षमा करण्यास योग्य आहा. ॥९॥
आई ! बाबा ! आपण दोघांनी तुमची सेवा न करणार्‍या आम्हांला क्षमा करावी. दुष्ट कंसाने आपल्याला अतिशय कष्ट दिले. परंतु आम्ही परतंत्र असल्यामुळे आपली काही सेवा करू शकलो नाही." (९)


श्रीशुक उवाच -
इति मायामनुष्यस्य हरेर्विश्वात्मनो गिरा ।
मोहितावङ्‌कमारोप्य परिष्वज्यापतुर्मुदम् ॥ १० ॥
श्रीशुकदेव सांगतात -
देवकीनंदने कृष्णे सांत्विता माय बाप ते ।
दोघांनी धरिले कृष्णा परमानंद मेळिला ॥ १० ॥

मायामनुष्यस्य - मायेने मनुष्यरूप घेणार्‍या विश्वात्मनः हरेः - विश्वरूपी श्रीकृष्णाच्या इति गिरा मोहितौ - ह्या वाणीने मोहित झालेली वसुदेवदेवकी अङ्‌कं आरोप्य - मांडीवर घेऊन (च) परिष्वज्य - आणि आलिंगन देऊन मुदं आपतुः - आनंदित झाली. ॥१०॥
श्रीशुक म्हणतात- मायेने मनुष्य बनलेल्या विश्वात्मा श्रीहरींची ही वाणी ऐकून, मोहित होऊन, देवकी-वसुदेवांनी त्यांना उचलून आपल्या मांडीवर घेतले आणि छातीशी कवटाळून परमानंद प्राप्त करून घेतला. (१०)


सिञ्चन्तौ अश्रुधाराभिः स्नेहपाशेन चावृतौ ।
न किञ्चिद् ऊचतू राजन् बाष्पकण्ठौ विमोहितौ ॥ ११ ॥
मायेने बद्ध ते झाले अश्रुंनी कृष्ण न्हाविला ।
दाटोनी कंठ तो येता न फुटे शब्द एकही ॥ ११ ॥

राजन् - हे परीक्षित राजा विमोहितौ - मोहित झालेले स्नेहपाशेन आवृतौ - व प्रेमपाशाने वेष्टून गेलेले अश्रुधाराभिः सिञ्चन्तौ - अश्रुधारांनी स्नान घालणारे बाष्पकण्ठौ (पितरौ) - सद्‌गदित कंठ झालेले मातापिता न किंचित् ऊचतुः - काहीहि बोलले नाहीत. ॥११॥
राजन ! स्नेहपाशाने बांधले जाऊन ते पूर्णतः मोहित झाले आणि अश्रुधारांनी त्यांना भिजवू लागले. अश्रूंनी कंठ दाटून आल्यामुळे ते काहीही बोलू शकले नाहीत. (११)

विवरण :- वसुदेव-देवकी यांच्या अवस्थेवरून ते पूर्ण भावनाविवश झालेले दिसून येते. भगवंतानी त्यांच्यावर जी माया टाकली होती, त्याचा त्यांना अपेक्षित असलेला परिणाम इथे दिसतो. जे माता-पिता भगवंतांसमोर हात जोडीत होते, तेच हात आता त्यांच्या पाठीवर मायेने फिरत होते, त्यांना प्रेमाने कुरवाळीत होते. ज्यासाठी ते दोघी अधीर होते. (११)



एवमाश्वास्य पितरौ भगवान् देवकीसुतः ।
मातामहं तूग्रसेनं यदूनामकरोत् नृपम् ॥ १२ ॥
सांत्विता पितरां कृष्णे प्रपिता उग्रसेनला ।
राजा जो यदुवंशाचा म्हणोनी स्थापिला पुन्हा ॥ १२ ॥

भगवान् देवकीसुतः - भगवान श्रीकृष्ण पितरौ एवं आश्वास्य - आई बापांचे याप्रमाणे समाधान करून मातामहं उग्रसेनं तु - आईचा पिता जो उग्रसेन त्याला तर यदूनां नृपं अकरोत् - यादवांचा राजा करिता झाला. ॥१२॥
अशा प्रकारे भगवान देवकीनंदानांनी आई-वडिलांचे सांत्वन करून आपले मातामह उग्रसेन यांना यादवांचा राजा केले. (१२)


आह चास्मान् महाराज प्रजाश्चाज्ञप्तुमर्हसि ।
ययातिशापाद् यदुभिः नासितव्यं नृपासने ॥ १३ ॥
नी वदे तो महाराजा आम्ही तो आपुली प्रजा ।
राजसिंहासनी कोणी न बसे यदु शापिता ॥ १३ ॥

आह च - आणि म्हणाला महाराज - हे राजाधिराजा प्रजाः अस्मान् - तुझी प्रजा अशा आम्हांला आज्ञप्तुं अर्हसि - आज्ञा करण्यास योग्य आहेस यदुभिः ययातिशापात् - यादवांनी ययातीच्या शापामुळे नृपासने न आसितव्यं - राज्यासनावर बसणे योग्य नव्हे. ॥१३॥
आणि त्यांना म्हटले- "महाराज ! आम्ही आपली प्रजा आहोत. आपण आम्हांला आज्ञा करावी. ययातीचा शाप असल्यामुळे यदुवंशी राजसिंहासनावर बसू शकत नाहीत. (आपण यदुवंशी असूनही माझ्या आज्ञेमुळे आपल्याला काही दोष लागणार नाही.)" (१३)


मयि भृत्य उपासीने भवतो विबुधादयः ।
बलिं हरन्त्यवनताः किमुतान्ये नराधिपाः ॥ १४ ॥
सेवको हो‍उनी मी जै सेवा ती आपुली करी ।
देवता झुकुनी देती भेटी आणोनि त्या तुम्हा ॥ १४ ॥

मयि भृत्ये उपासीने - मी सेवक जवळ असताना अवनताः विबुधादयः - नम्र झालेले देवादिक भवतः बलिं हरन्ति - तुला करभार अर्पण करतील उत अन्ये नराधिपाः किम् - मग इतर राजांची कथा काय ॥१४॥
मीच सेवक होऊन आपली सेवा करीत आहे, हे पाहून देवतासुद्धा मस्तक लववून आपल्याला नजराणे देतील, मग अन्य राजांबद्दल काय सांगावे ? (१४)


सर्वान् स्वान् ज्ञातिसंबन्धान् दिग्भ्यः कंसभयाकुलान् ।
यदुवृष्ण्यन्धकमधु दाशार्हकुकुरादिकान् ॥ १५ ॥
सभाजितान् समाश्वास्य विदेशावासकर्शितान् ।
न्यवासयत् स्वगेहेषु वित्तैः सन्तर्प्य विश्वकृत् ॥ १६ ॥
कंसाच्या जे भये वृष्णी अंधको यदु नी मधू ।
दाशार्ह कुकरो आदी गेले सोडोनि देह हा ॥ १५ ॥
तयांना आग्रहे धुंडी क्लेशले घर सोडिता ।
केले हे भगवान् कृष्णे विधात्याने परीक्षिता ॥ १६ ॥

विश्वकृत् - जगाची उत्पत्ति करणारा श्रीकृष्ण कंसभयाकुलान् - कंसाच्या भीतीने व्याकुळ झालेल्या सर्वान् स्वान् ज्ञातिसंबन्धान् - सर्व आपल्या आप्तेष्टांना यदुवृष्ण्यन्धकमधु - यदु, वृष्णि, अंधक, मधु, दाशार्हकुकुरादिकान् - दाशार्ह व कुकुर इत्यादि वंशात उत्पन्न झालेल्यांना दिग्भ्यः (आनाय्य) - सर्व दिशांकडून आणून विदेशावासकर्षितान् - परदेशी राहिल्यामुळे कृश झालेल्या सभाजितान् समाश्वास्य - सत्कारलेल्या त्यांचे समाधान करून वित्तैः संतर्प्य - द्रव्यांनी संतुष्ट करून स्वगेहेषु न्यवासयत् - आपापल्या घरात राहविता झाला. ॥१५-१६॥
जे कंसाच्या भीतीने व्याकूळ होऊन देशोधडीला लागले होते, त्या यदू, वृष्णी, अंधक, मधू, दाशार्ह, कुकुर इत्यादी वंशात जन्मलेल्या आपल्या नातेवाइकांचा शोध घेऊन श्रीकृष्णांनी त्यांना तेथून परत बोलाविले. घरापासून दूर परक्या जागी राहावे लागल्याने त्यांना अतिशय दुःख भोगावे लागले होते. विश्वविधात्या भगवंतांनी सांत्वन करून त्यांचा सत्कार केला, त्यांना खूप धन-संपत्ती देऊन तृप्त केले आणि आपापल्या ठिकाणी पुन्हा स्थानापन्न केले. (१५-१६)


कृष्णसङ्‌कर्षणभुजैः गुप्ता लब्धमनोरथाः ।
गृहेषु रेमिरे सिद्धाः कृष्णरामगतज्वराः ॥ १७ ॥
वृष्णि नी बलरामाच्या शक्तिने निर्भरो असे ।
सर्व ते आपुल्या गेही आनंदे राहु लागले ॥ १७ ॥

कृष्णसङ्‌कर्षणभुजैः गुप्ताः - श्रीकृष्ण व बलराम यांच्या बाहुबलाने रक्षिलेले कृष्णरामगतज्वराः - श्रीकृष्ण व बलराम यांच्या सहाय्याने सर्व पीडा नष्ट पावलेले असे लब्धमनोरथाः सिद्धाः - ज्यांचे सर्व मनोरथ पूर्ण झाले आहेत असे कृतार्थ झालेले यादव गृहेषु रेमिरे - घरांमध्ये आनंदाने राहू लागले. ॥१७॥
आता सर्वजण राम-कृष्णांच्या बाहुबलाखाली सुरक्षित होते. त्यांच्या कृपेने त्यांना कोणत्याही प्रकारचे दुःख नव्हते. त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण झाले होते. ते कृतार्थ झाले होते. आता ते आपापल्या घरांमध्ये आनंदाने राहू लागले. (१७)

विवरण :- कंसाच्या भयाने मथुरा सोडून गेलेले सर्व यादव आश्वस्त होऊन पुन्हा आपल्या घरी परत आले. 'गतज्वर' या शब्दावरून कंसाच्या तापदायक कारकीर्दीतून मुक्त झाल्याचा आनंद, तसेच 'सिद्धा' या शब्दावरून ज्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या असे यादव हे वर्णन यादवांची मनस्थिती दर्शविणारे आहे. (स्वगृही परत आल्याच्या तसेच कृष्णदर्शनाच्याहि) (१७)



वीक्षन्तोऽहरहः प्रीता मुकुन्दवदनाम्बुजम् ।
नित्यं प्रमुदितं श्रीमत् सदयस्मितवीक्षणम् ॥ १८ ॥
आनंदसदनो ऐसे झाले उत्साहिनी बली ।
स्वरूप नाचरी दृष्टी पाहता सर्व हर्षती ॥ १८ ॥

नित्यं प्रमुदितं - नेहमी आनंदित असणारे श्रीमत् - शोभायमान व सदयास्मितवीक्षणं - दयापूर्वक हास्य करून सर्वत्र अवलोकन करणारे मुकुन्दवदनाम्बुजं - श्रीकृष्णाचे मुखकमल अहरहः वीक्षन्तः (ते) - दररोज पहाणारे ते प्रीताः - आनंदित होत असत. ॥१८॥
श्रीकृष्णांचे मुखकमल नेहमी प्रफुल्लित असे. त्यांचे सौंदर्य अपार होते. दयाद्र हास्ययुक्त नजरेने पाहाणार्‍या त्या मुखाचे दररोज दर्शन घेऊन ते आनंदमग्न होत. (१८)

विवरण :- महाजनांचा केवळ सहवासहि कसा स्फुर्तिदायक असतो, याचे हे उदाहरण. केवल कृष्णदर्शनाने यादवांच्या अगदी वृद्धांच्याहि तनामनात शक्तीचा संचार झाला. कृष्णाच्या दर्शनरूपी अमृताने जणू सर्व यादवांच्या मृतवत् शरीरास संजीवनी प्राप्त झाली. (१८)



तत्र प्रवयसोऽप्यासन् युवानोऽतिबलौजसः ।
पिबन्तोऽक्षैर्मुकुन्दस्य मुखाम्बुजसुधां मुहुः ॥ १९ ॥
वृक्षही युवका ऐसे झाले उत्साहि नी बली ।
कां की नित्यचि त्या लाभे कृष्णदर्शन पान ते ॥ १९ ॥

तत्र अक्षैः - तेथे नेत्रांनी मुकुन्दस्य मुखाम्बुजसुधां - श्रीकृष्णाचे मुखकमलामृत मुहुः पिबन्तः - वारंवार पिणारे प्रवयसः अपि - वृद्धसुद्धा अतिबलौजसः युवानः आसन् - अतिबलिष्ठ व तरुण बनले. ॥१९॥
मथुरेतील म्हातारे लोकसुद्धा तरुणांप्रमाणे अत्यंत बलवान आणि उत्साही झाले होते, कारण ते आपल्या डोळ्यांची ओंजळ करून वारंवार भगवंतांच्या मुखारविंदाच्या अमृतमय मकरंदरसाचे पान करीत असत. (१९)


अथ नन्दं समसाद्य भगवान् देवकीसुतः ।
संकर्षणश्च राजेन्द्र परिष्वज्येदमूचतुः ॥ २० ॥
कृष्ण नी बलरामो हे नंदबाबास भेटुनी ।
गळ्यासी लागले आणि तयांना बोलु लागले ॥ २० ॥

राजेन्द्र - हे राजा अथ - नंतर भगवान् देवकीसुतः - भगवान श्रीकृष्ण च संकर्षणः - आणि बलराम नन्दं समासाद्य - नंदाजवळ येऊन (च) परिष्वज्य - आणि आलिंगन देऊन इदं ऊचतुः - याप्रमाणे बोलते झाले. ॥२०॥
हे राजेन्द्रा, नंतर भगवान देवकीनंदन आणि बलराम हे दोघेही नंदबाबांच्याजवळ आले आणि त्यांच्या गळ्याला मिठी मारून म्हणू लागले. (२०)


पितर्युवाभ्यां स्निग्धाभ्यां पोषितौ लालितौ भृशम् ।
पित्रोरभ्यधिका प्रीतिः आत्मजेष्वात्मनोऽपि हि ॥ २१ ॥
पिता जी यशदा माते पाजिले लाडिले अम्हा ।
शरिरे करिती प्रेम पिता माता न संशय ॥ २१ ॥

पितः - अहो बाबा स्निग्धाभ्यां युवाभ्यां - प्रेमळ अशा तुम्हांकडून भृशं पोषितौ - उत्तमरीतीने पोषिले गेलो हि - कारण पित्रोः - मातापित्यांची आत्मजेषु - पुत्रांच्या ठिकाणी आत्मनः अपि अभ्यधिका प्रीतिः - स्वतःपेक्षाहि अधिक प्रीति असते. ॥२१॥
बाबा ! आपण दोघांनी अत्यंत प्रेमाने आणि लाडाने आमचे पालन-पोषण केले. कारण आपल्या मुलांवर आई-बाप स्वतःच्या शरीरापेक्षाही अधिक प्रेम करतात, यात काहीच संशय नाही. (२१)


स पिता सा च जननी यौ पुष्णीतां स्वपुत्रवत् ।
शिशून्बन्धुभिरुत्सृष्टान् अकल्पैः पोषरक्षणे ॥ २२ ॥
त्यागिती पितरे त्यांना पुत्राच्या परि पोषिती ।
लाडिती लाविती प्रेम खरे ते माय-बाप की ॥ २२ ॥

यो - जे पोषणरक्षणे - पालनपोषण व रक्षण करण्यास अकल्पैः बंधुभिः - असमर्थ अशा बंधूंनी उत्सृष्टान् शिशून् - टाकून दिलेल्या बालकांचे स्वपुत्रवत् पुष्णीतां - आपल्या पुत्राप्रमाणे पोषण करितात सः पिता च सा (एव) जननी - तोच बाप व तीच माता होय. ॥२२॥
पालन-पोषण करू शकत नसल्यामुळे स्वजनांनी ज्यांचा त्याग केला, त्या बालकांचे जे आपल्या मुलांप्रमाणे पालन-पोषण करतात, तेच त्यांचे खरे आई-बाप होत. (२२)

विवरण :- वसुदेव-देवकीला आपली स्वतःची मुले मिळाली, मग नंद-यशोदेचे काय ? त्यांनी तर कृष्णाला आपलाच मुलगा मानले होते. मग आता सत्यस्थिती कळल्यावर तो आपणांस दुरावणार का ? नंदाची ही अवस्था जाणून घेऊन कृष्णाने त्याचे सांत्वन केले, तेव्हा भगवान म्हणाले, 'आम्ही अनाथ, परित्यक्त असूनहि आम्हाला प्राणांच्याहि पलीकडे आपण जपले. तर वसुदेव-देवकीच आमचे माता-पिता आहेत असे समजू नका. तर आपण दोघेहि आम्हाला त्यांच्याच जागी आहात.' (२२)



यात यूयं व्रजं तात वयं च स्नेहदुःखितान् ।
ज्ञातीन् वो द्रष्टुमेष्यामो विधाय सुहृदां सुखम् ॥ २३ ॥
जावे व्रजी तुम्ही आता वात्सल्ये दुःख होतसे ।
सुहृद् संबंधियां साठी येवूत सुखवावया ॥ २३ ॥

तात - अहो बाबा यूयं व्रजं यात - तुम्ही गोकुळात जा सुहृदां सुखं विधाय - आणि आप्तेष्टांना सुख देऊन स्नेहदुःखितान् ज्ञातीन् वः - प्रेमामुळे दुःखी झालेले संबंधी अशा तुम्हाला द्रष्टुं एष्यामः - भेटण्यास येऊ. ॥२३॥
बाबा ! आपण आता व्रजामध्ये परत जा. येथील सुहृद संबंधितांना सुखी करून आमच्यावरील वात्सल्यामुळे दुःखी झालेल्या तुम्हा सर्वांना भेटण्यासाठी आम्ही येऊ. (२३)


एवं सान्त्वय्य भगवान् नन्दं सव्रजमच्युतः ।
वासोऽलङ्‌कारकुप्याद्यैः अर्हयामास सादरम् ॥ २४ ॥
कृष्णाने नंदबाबादी गोपांना वस्त्र भूषणे ।
धातुंची देउनी भांडी सर्वा सत्कारिले असे ॥ २४ ॥

भगवान् अच्युतः - भगवान श्रीकृष्ण एवं संव्रजं नन्दं सान्त्वय्य - याप्रमाणे गोपांसह नन्दाचे सांत्वन करून वासोलंकारकुप्याद्यैः - वस्त्रे, अलंकार व तांब्याची भांडी इत्यादिकांनी सादरं अर्हयामास - आदरपूर्वक पूजिता झाला. ॥२४॥
भगवान श्रीकृष्णांनी नंदादी गोपांची अशी समजूत घालून व त्यांना अत्यंत आदरपूर्वक वस्त्रे, अलंकार, भांडी इत्यादी देऊन त्यांचा सत्कार केला. (२४)


इत्युक्तस्तौ परिष्वज्य नन्दः प्रणयविह्वलः ।
पूरयन् अश्रुभिर्नेत्रे सह गोपैर्व्रजं ययौ ॥ २५ ॥
कृष्णाने ऐकुनी शब्द बाळांना गळि लावुनी ।
पुन्हा ते भरल्या नेत्रे सगोप व्रजि पातले ॥ २५ ॥

इति उक्तः प्रणयविह्वलः नन्दः - याप्रमाणे बोलून प्रेमाने विव्हल झालेला नंद तौ परिष्वज्य - त्या दोघांना आलिंगन देऊन अश्रुभिः नेत्रे पूरयन् - अश्रूंनी ज्याचे नेत्र भरून आले आहेत असा गोपैः सह व्रजं ययौ - गोपांसह गोकुळात गेला. ॥२५॥
भगवंतांचे म्हणणे ऐकून नंदबाबांनी प्रेमाने सद्‍गदित होऊन दोन्ही मुलांना छातीशी धरले. नंतर अश्रूपूर्ण नेत्रांनी गोपांसह ते गोकुळात गेले. (२५)


अथ शूरसुतो राजन् पुत्रयोः समकारयत् ।
पुरोधसा ब्राह्मणैश्च यथावद् द्विजसंस्कृतिम् ॥ २६ ॥
पुन्हा श्री वसुदेवांनी गर्गाचार्य पुरोहिता ।
द्विजांच्या करवी केला द्वयांचा मुंजिचा विधी ॥ २६ ॥

राजन् - हे राजा अथ शूरसुतः - नंतर वसुदेव पुरोधसा च ब्राह्मणैः - पुरोहितांकडून व ब्राह्मणांकडून पुत्रयोः द्विजसंस्कृतिं - दोन्ही पुत्रांचे उपनयन संस्कार यथावत् समकारयत् - यथाविधि करविता झाला. ॥२६॥
हे राजन ! नंतर वसुदेवांनी पुरोहित व अन्य ब्राह्मणांकरवी दोन्ही मुलांचे विधिपूर्वक मौजीबंधन करविले. (२६)


तेभ्योऽदाद् दक्षिणा गावो रुक्ममालाः स्वलङ्‌कृताः ।
स्वलङ्‌कृतेभ्यः संपूज्य सवत्साः क्षौममालिनीः ॥ २७ ॥
वस्त्र आभूषणे द्रव्य सवत्स धेनु ज्या तशा ।
आलंकृत करुनी विप्रा दिधल्या दक्षिणा पहा ॥ २७ ॥

रुक्ममालाः - सुवर्णाच्या माळा घातलेल्या स्वलंकृताः क्षौ‌ममालिनीः - अलंकार घातलेल्या व रेशमी झुली घातलेल्या सवत्साः गाः - अशा सवत्स गाई दक्षिणाः - दक्षिणा स्वलंकृतेभ्यः तेभ्यः - अलंकार घातलेल्या त्या ब्राह्मणांची संपूज्य अदात् - पूजा करून देता झाला. ॥२७॥
नंतर त्यांनी वस्त्रालंकारांनी ब्राह्मणांचा सत्कार करून त्यांना पुष्कळ दक्षिणा दिली. तसेच गळ्यांत सोन्याच्या व रेशमी वस्त्रांच्या माळा घातलेल्या सवत्स गाई दान दिल्या. (२७)


याः कृष्णरामजन्मर्क्षे मनोदत्ता महामतिः ।
ताश्चाददादनुस्मृत्य कंसेनाधर्मतो हृताः ॥ २८ ॥
कृष्ण नी बलरामाचे जन्मनक्षत्र योजुनी ।
दान त्या दिधल्या गाई संकल्प मनिचा जसा ॥ २८ ॥

महामतिः - थोर मनाचा वसुदेव कृष्णरामजन्मर्क्षे - कृष्ण व राम ह्यांच्या जन्मनक्षत्री याः मनोदत्ताः आसन् - ज्या मनाने दिल्या होत्या (याः) च कंसेन अधर्मतः हृताः - आणि ज्या कंसाने अधर्माने हरण केल्या होत्या ताः अनुस्मृत्य अददात् - त्या गाई स्मरण करून देता झाला. ॥२८॥
महाबुद्धिमान वसुदेवांनी रामकृष्णांच्या जन्मनक्षत्राचे वेळी जितक्या गाई देण्याचा संकल्प केला होता व अगोदर कंसाने ज्या अन्यायाने हिरावून घेतल्या होत्या, त्याची आठवण ठेवून त्यांनी ब्राह्मणांना त्या दान दिल्या. (२८)


ततश्च लब्धसंस्कारौ द्विजत्वं प्राप्य सुव्रतौ ।
गर्गाद् यदुकुलाचार्याद् गायत्रं व्रतमास्थितौ ॥ २९ ॥
कृष्ण नी बलरामाला द्विजत्व प्राप्त जाहले ।
होतेच ब्रह्मचारी ते गायत्री पाठ घेतला ॥ २९ ॥

ततः च - आणि त्यानंतर लब्धसंस्कारौ - ज्यांचे उपनयनादि संस्कार केले आहेत व सुव्रतौ - चांगल्या रीतीने व्रताचरण करीत आहेत असे ते दोघे बलराम व श्रीकृष्ण द्विजत्वं प्राप्य - द्विजपणाला मिळवून यदुकुलाचार्यात् गर्गात् - यदुकुलाचा आचार्य जो गर्ग ऋषि त्यापासून गायत्रं - गायत्र्युपदेशग्रहणपूर्वक व्रतं आस्थितौ - ब्रह्मचर्यव्रताचे अनुष्ठान करिते झाले. ॥२९॥
अशा प्रकारे यदुवंशाचे पुरोहित गर्गाचार्य यांच्याकरवी यज्ञोपवीत संस्कार झाल्यावर राम-कृष्ण द्विज झाले. आता त्यांनी ब्रह्मचर्य व्रताचा स्वीकार करून त्याचे उत्तम पालन केले. (२९)


प्रभवौ सर्वविद्यानां सर्वज्ञौ जगदीश्वरौ ।
नान्यसिद्धामलज्ञानं गूहमानौ नरेहितैः ॥ ३० ॥
स्त्रोत ते सर्व विद्येचे सर्वज्ञ जगदीश्वर ।
विशुद्ध ज्ञान सिद्धो ते दडती मानवी रुपी ॥ ३० ॥

सर्वविद्यानां प्रभवौ - सर्व विद्यांचे उत्पादक सर्वज्ञौ - सर्व काही जाणणारे जगदीश्वरौ - त्रैलोक्याधिपति बलराम व श्रीकृष्ण नरेहितैः - मनुष्यासारख्या आचरणांनी नान्यसिद्धामलज्ञानं - स्वतःसिद्ध अशा निर्मळ ज्ञानाला गूहमानौ (स्तः) - आच्छादून टाकणारे झाले. ॥३०॥
ते जगाचे स्वामी होते. सर्वज्ञ होते. सर्व विद्यांची उत्पत्ती त्यांच्यापासूनच झाली आहे. त्यांचे निर्मल ज्ञान स्वतःसिद्ध होते. तरीसुद्धा मनुष्यासारख्या वागण्यामुळे त्यांनी ते लपवून ठेवले होते. (३०)


अथो गुरुकुले वासं इच्छन्तौ उपजग्मतुः ।
काश्यं सान्दीपनिं नाम ह्यवन्तिपुरवासिनम् ॥ ३१ ॥
गुरुकुला इच्छुनी गोले दोघे काश्यप गोत्रिच्या ।
सांदीपनी मुनी पाशी अवंति पुरवासि ते ॥ ३१ ॥

अथौ - नंतर गुरुकुले वासं इच्छन्तौ - गुरुगृही राहण्याची इच्छा करणारे अवन्तीपुरवासिनं - अवंतिनगरीत राहणार्‍या सांदीपनिं नाम - सांदीपनि नामक काश्यं उपजग्मतुः - काश्यपगोत्री गुरूजवळ गेले. ॥३१॥
आता ते दोघेजण गुरुकुलात निवास करण्याच्या इच्छेने अवंतिपुरात राहाणार्‍या काश्य गोत्राच्या सांदीपनी मुनींच्याकडे गेले. (३१)

विवरण :- रामकृष्णांचा उपनयन संस्कार कुलगुरु गर्गाचार्यांकडून झाला आणि वेदाध्ययनासाठी ते अवन्तीपुरीला सांदीपनींच्या आश्रमात आले. (सांदीपनी काश्यपगोत्री आणि अवंतीपुरीला रहाणारे होते असा उल्लेख आहे; परंतु काही टीकाकारांच्या मते ते काशीचे रहिवासी असून अवंतीपुरीला गुरुकुल चालवीत होते.) परंतु जे स्वतःच सर्व विद्या व कलांचे आश्रयस्थान, त्यांना गुरुकडून शिकण्याची गरज काय ? असा प्रश्न साहजिकच पडेल. पण इथे हे लक्षात घेतले पाहिजे की हे दोघेही देव आता मानवरूपात आहेत आणि मानवी अवस्थेचे सर्व नियम त्यांना लागू होणारे आहेत. अर्थात या सर्व विद्या व कला (१४ विद्या व ६४ कला) त्यांनी अत्यंत कमी वेळात आत्मसात केल्या. शिवाय राजपुत्र असो वा सामान्य गरीब घरातील विद्यार्थी असो, सर्वांना गुरुकुलात समान भावनेनेच वागविले जाते, याचाहि आदर्श त्यांना लोकांसमोर ठेवावयाचा असावा. (विद्याध्ययन करताना स्वतः रामकृष्ण जळणासाठी लाकडे आणावयास जंगलात जात असत, असाही उल्लेख आढळतो.) (३१)



यथोपसाद्य तौ दान्तौ गुरौ वृत्तिमनिन्दिताम् ।
ग्राहयन्तौ उपेतौ स्म भक्त्या देवमिवादृतौ ॥ ३२ ॥
विधिने राहिले तेथे सुसंयत् वागणे तसे ।
दोघेही गुरुची सेवा करिती इष्ट देव जै ॥ ३२ ॥

यथा (बत) उपसाद्य - योग्य पद्धतीने गुरूजवळ जाऊन दान्तौ - इंद्रियनिग्रह केलेले गुरौ - गुरूजवळ अनिन्दितां वृत्तिं ग्राहयन्तौ - योग्य वर्तन कसे ठेवावे हे लोकांना शिकविणारे आदृतौ तौ - आदरसत्कार केलेले ते बलराम व श्रीकृष्ण भक्त्या देवं इव - भक्तीने जसे देवाजवळ जावे उपेतौ स्म - तसे ते गुरूजवळ गेले. ॥३२॥
ते दोघे संयमशील भाऊ विधीपूर्वक गुरुजींच्याजवळ राहून गुरुंची उत्तम सेवा कशी करावी, याचा आदर्श लोकांसमोर ठेवीट अतिशय भक्तिभावाने देव समजून त्यांची सेवा करू लागले. (३२)

विवरण :- विद्यार्थी दशेतील रामकृष्ण गुरु सांदीपनींच्या आश्रमात कसे राहिले, तेथील वातावरण कसे होते याचे वर्णन इथे आहे. गुरुबद्दलची निष्ठा, गुरुपत्नीबद्दलचा आदर (यस्य देवे पराभक्तिः यथा देवे, तथा गुरौ ।) सेवावृत्ती, नम्रता या सर्वांचा आदर्श मानदंड असणारे ते विद्यार्थी असत. त्यांच्यासाठी 'दान्त' असा शब्द वापरला आहे, याचाच अर्थ इंद्रिये ताब्यात असलेले विद्यार्थी, असे विद्याग्रहणासाठी उत्सुक असलेले विद्यार्थी आणि शीलसंपन्न, ज्ञानसंपन्न, विद्यार्थ्यांवर अपत्यवत् प्रेम करणारे आदर्श गुरु या सर्वांचे वास्तव्य असणारी गुरुकुले म्हणजे ज्ञानाची आदर्श विद्यापीठेच होती. असे चारित्र्यसंपन्न गुरु आणि त्यांचे आदर्श शिष्य यांच्यापुढे मोठमोठे राजे लोक नतमस्तक होत; यात नवल ते काय ? कदाचित या सर्वांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचीही रामकृष्णांची इच्छा असावी. अर्थातच अशा विद्यार्थ्यांमुळे ते गुरुही धन्य झाले. (३२)



तयोर्द्विजवरस्तुष्टः शुद्धभावानुवृत्तिभिः ।
प्रोवाच वेदानखिलान् साङ्‌गोपनिषदो गुरुः ॥ ३३ ॥
शुद्धभाव अशी सेवा पाहता गुरु तोषले ।
वेदांगोपनिषद् सर्व दोघां दीक्षा दिली असे ॥ ३३ ॥

तयोः - त्या दोघांच्या शुद्धभावानुवृत्तिभिः तुष्टः - निर्मळ भावनापूर्वक आचरणांनी संतुष्ट झालेला द्विजवरः गुरुः - ब्राह्मणश्रेष्ठ सांदिपनि गुरू साङ्‌गोपनिषदः - सहा वेदांगे, उपनिषदे अखिलान् वेदान् प्रोवाच - व सर्व वेद पढविता झाला. ॥३३॥
ते करीत असलेल्या शुद्ध भावनेने युक्त अशा सेवेने गुरुवर्य सांदीपनी अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी त्यांना सहा अंगे आणि उपनिषदांसहित सर्व वेदांचे शिक्षण दिले. (३३)

विवरण :- सांदीपनींनी रामकृष्णांना चार वेद, (ऋक्, यजुस, साम आणि अथर्व) त्यांची सहा वेदांगे, (शिक्षा, कल्प, छंद, निरुक्त, व्याकरण, ज्योतिष) यांचे ज्ञान दिले. शिवाय उपनिषदांचेहि ज्ञान दिले. (उपनिषदांची संख्या कोणी १०२, तर कोणी २५० मानतात. शंकराचार्यांनी ११ उपनिषदांवर भाष्य केले आहे. ती प्रमुख मानली जातात. ईश, केन, कठ, प्रश्न, मुंडक, मांडूक्य, तैत्तिरीय, ऐतरेय, छांदोग्य, बृहदारण्यक, नृसिंहपूर्वतापनी इ.) (३३)



सरहस्यं धनुर्वेदं धर्मान् न्यायपथांस्तथा ।
तथा चान्वीक्षिकीं विद्यां राजनीतिं च षड्‌विधाम् ॥ ३४ ॥
धनुर्वेद स्मृती शास्त्र मिमांसा तर्क न्याय नी ।
राजनैतिक तो दंड द्वयां शिकविले तये ॥ ३४ ॥

सरहस्यं धनुर्वेदं - मंत्रज्ञानपूर्वक धनुर्विद्या धर्मान् तथा न्यायपथान् - धर्मशास्त्र तसेच न्यायशास्त्र तथा च आन्वीक्षिकीं विद्या - तशीच तर्कविद्या च षड्‌विधां राजनीतिं - आणि सहाप्रकारची राजनीति. ॥३४॥
याखेरीज मंत्र आणि देवतांच्या ज्ञानासह धनुर्वेद, मनुस्मृती इत्यादी धर्मशास्त्रे, मीमांसा इत्यादी वेदांचे तात्पर्य सांगणारी शास्त्रे, तर्कविद्या, त्याचबरोबर संधी, विग्रह, यान आसन, द्वैध आणि आश्रय या सहा भेदांनी युक्त अशा राजनीतीचेसुद्धा शिक्षण दिले. (३४)

विवरण :- याचवेळी गुरुंनी रामकृष्णांना आन्वीक्षिकी, तर्कविद्या, आत्मविद्या, धर्मशास्त्र, राजविद्या, संधि, विग्रह इ. सहा प्रकारच्या राजनीतीचेहि ज्ञान दिले. (३४)



सर्वं नरवरश्रेष्ठौ सर्वविद्याप्रवर्तकौ ।
सकृन्निगदमात्रेण तौ सञ्जगृहतुर्नृप ॥ ३५ ॥
सर्व नरवरो श्रेष्ठ सर्वविद्या प्रवर्तक ।
द्वय ही बंधु ते ऐसे ऐकता सांगती तसे ॥ ३५ ॥

नृप - हे राजा सर्वविद्याप्रवर्तकौ - सर्व विद्यांचे उत्पादक नरवरश्रेष्ठौ - मनुष्यश्रेष्ठ असे राम व कृष्ण सकृन्निगदमात्रेण - एकदा सांगताक्षणीच सर्वं जगृहतुः - सर्व स्वीकारते झाले. ॥३५॥
परीक्षिता ! सर्व विद्यांचे प्रवर्तक असलेले ते दोघे पुरुषश्रेष्ठ गुरुजींनी फक्त एक वेळ सांगताच सर्व विद्यांत पारंगत झाले. (३५)


अहोरात्रैश्चतुःषष्ट्या संयत्तौ तावतीः कलाः ।
गुरुदक्षिणयाऽऽचार्यं छन्दयामासतुर्नृप ॥ ३६ ॥
चौंसष्ट त्या दिन-रात्री शिकले सर्व त्या कला ।
शिकणे संपता त्यांनी गुरुला पुसले असे ।
आपुली सांगणे इच्छा देऊ ती दक्षिणा तशी ॥ ३६ ॥

नृप - हे राजा संयत्तौ - नियमितरीतीने वागणारे चतुःषष्टया अहोरात्रैः - चौसष्ठ दिवसांनी तावतीः कलाः - तितक्याच कला गुरुदक्षिणाय - गुरुदक्षिणेकरिता आचार्यं छंदयामासतुः - सांदिपनीला लोभविते झाले. ॥३६॥
परीक्षिता ! केवळ चौसष्ट दिवसांत त्यांनी तत्परतेने चौसष्ट कलांचे ज्ञान मिळविले. अशा प्रकारे अध्ययन संपल्यावर त्यांनी सांदीपनी मुनींना गुरुदक्षिणेविषयी प्रार्थना केली. (३६)

विवरण :- विद्याध्ययन हे गुरुदक्षिणेशिवाय अपूर्ण, म्हणून गुरुदक्षिणा कोणती द्यावी ? असा रामकृष्णांचा प्रश्न. धन, सुवर्ण इ. वस्तू सामान्य विद्यार्थ्याकडून घ्यायच्या. या अलौकिक विद्यार्थ्याकडून तशीच अलौकिक गुरुदक्षिणा हवी. म्हणून पत्नीशी विचारविनिमय करून प्रभास क्षेत्री समुद्रात बुडून मरण पावलेला पुत्र गुरुंनी परत मागितला. श्लोकाच्या शेवटी 'ह' हे अक्षर आहे. ते पादपूरणार्थक नसून विस्मय, आश्चर्य दाखविण्यासाठी वापरले आहे. (हेति विस्मये ।) कारण कितीही अलौकिक बुद्धी असली, तरी मृतास परत आणणे त्यांना शक्य होईल का ? असा प्रश्न गुरुंना पडणे साहजिक आहे. त्यांनाहि तसे वाटले असावे किंवा प्रश्न ऐकून विद्यार्थ्यानाहि आश्चर्य वाटले असावे. (३६)



( मिश्र )
द्विजस्तयोस्तं महिमानमद्‍भुतं
     संलोक्ष्य राजन् अतिमानुसीं मतिम् ।
संमन्त्र्य पत्‍न्या स महार्णवे मृतं
     बालं प्रभासे वरयां बभूव ह ॥ ३७ ॥
( इंद्रवज्रा )
अद्‌भूत बुद्धी गुरुपत्‍नि यांची
     जाणोनी दोघांस वदोनि गेली ।
प्रभास क्षेत्रास बुडोनि मेला
     तो पुत्र आम्हा परतोनि द्यावा ॥ ३७ ॥

राजन् - हे राजा सः द्विजः - तो ब्राह्मण तयोः - त्या दोघांच्या अद्भुतं तं महिमानं - त्या आश्चर्यकारक सामर्थ्याला संलक्ष्य - पाहून (च) अतिमानुषीं मतिं (संलक्ष्य) - आणि अलौकिक बुद्धिमत्ता पाहून पत्न्या संमन्त्र्य - पत्नीसह विचार ठरवून प्रभासे महार्णवे मृतं बालं - प्रभासक्षेत्री महासागरात मृत झालेल्या पुत्राला वरयांबभूव - मागता झाला. ॥३७॥
महाराज ! सांदीपनी मुनींनी त्यांचा अद्‌भूत महिमा आणि अलौकिक बुद्धिमत्ता पाहून आपल्या पत्‍नीचा सल्ला घेऊन प्रभासक्षेत्रामध्ये बुडून मरण पावलेला पुत्र आणून देण्याची गुरुदक्षिणा मागितली. (३७)


तेथेत्यथारुह्य महारथौ रथं
     प्रभासमासाद्य दुरन्तविक्रमौ ।
वेलामुपव्रज्य निषीदतुः क्षणं
     सिन्धुर्विदित्वार्हनमाहरत्तयोः ॥ ३८ ॥
रथात बैसोनि द्वयो निघाले
     मानोनि आज्ञाहि समुद्रक्षेत्री ।
साक्षात् प्रभूला बघता समुद्र
     पूजा करी घेउनी पातला की ॥ ३८ ॥

अथ - नंतर दुरन्तविक्रमौ महारथौ - अनन्त पराक्रम करणारे ते महारथी बलराम व श्रीकृष्ण तथेति - बरे आहे असे म्हणून रथं आरुह्य - रथावर चढून प्रभासं आसाद्य - प्रभासक्षेत्री जाऊन वेलाम् उपव्रज्य - व तेथील समुद्रतीराजवळ प्राप्त होऊन क्षणं निषीदतुः - क्षणभर बसले तौ ईश्वरौ इति विदित्वा - ते दोघे परमेश्वर आहेत असे जाणून सिंधुः - समुद्र तयोः अर्हणम् आहरत् - त्या दोघांची पूजा करिता झाला. ॥३८॥
अपूर्व पराक्रमी असे ते दोघेही महारथी "ठीक आहे" असे म्हणून रथावर आरूढ होऊन प्रभासक्षेत्री गेले. तेथे समुद्रतटावर ते क्षणभर बसले. हे परमेश्वर आहेत असे जाणून समुद्राने त्यांच्यासाठी पूजा-सामग्री आणली. (३८)


( अनुष्टुप् )
तमाह भगवानाशु गुरुपुत्रः प्रदीयताम् ।
योऽसाविह त्वया ग्रस्तो बालको महतोर्मिणा ॥ ३९ ॥
( अनुषुप् )
भगवान् वदले त्याला लाटा थोर तुझ्या अशा ।
तेणे तू गुरुपुत्राला नेले तू देइ शीघ्रची ॥ ३९ ॥

महता उर्मिणा त्वया - मोठया लाटेने तुझ्याकडून इह - येथे यः असौ बालकः - जो हा बालक ग्रस्तः - गिळला गेला (सः) गुरूपुत्रः आशु प्रदीयताम् - तो गुरुपुत्र लवकर परत द्यावा (इति) भगवान् तम् आह - असे श्रीकृष्ण त्या समुद्राला म्हणाला. ॥३९॥
भगवान समुद्राला म्हणाले, "समुद्रा ! तू आपल्या मोठमोठ्या लाटांनी येथून ज्या गुरुपुत्राला वाहात घेऊन गेलास, त्याला ताबडतोब दे." (३९)


श्रीसमुद्र उवाच -
न चाहार्षमहं देव दैत्यः पञ्चजनो महान् ।
अन्तर्जलचरः कृष्ण शङ्‌खरूपधरोऽसुरः ॥ ४० ॥
समुद्र म्हणाला -
न नेला पुत्र मी देवा जळात शंख दैत्य तो ।
राहतो चोरिला त्याने सहसा गुरुपुत्र तो ॥ ४० ॥

देवकृष्ण - हे तेजस्वी श्रीकृष्णा अहं (तं) न एव अहार्षम् - मी त्या गुरूपुत्राचे हरण केले नाही शंखरूपधरः - शंखासारखे स्वरूप धारण केलेला महान् असुरः - मोठा व स्वप्राणाच्या ठिकाणी रममाण होणारा पञ्चजनः दैत्यः - पंचजन नावाचा दैत्य अन्तर्जलचरः (अस्ति) - पाण्यात संचार करणारा आहे. ॥४०॥
समुद्र म्हणाला- "हे देवा श्रीकृष्णा ! त्याला मी नेले नाही. माझ्या पाण्यात पंचजन नावाचा एक मोठा दैत्य शंखाच्या रूपाने राहात आहे. (४०)


आस्ते तेनाहृतो नूनं तच्छ्रुत्वा सत्वरं प्रभुः ।
जलमाविश्य तं हत्वा नापश्यद् उदरेऽर्भकम् ॥ ४१ ॥
ऐकता जळिचा दैत्य मारोनी फाडिला असे ।
तरी ना भेटला पोटी गुरुपुत्र हरीस की ॥ ४१ ॥

नूनं तेन आहृतः आस्ते - खरोखर त्याने हरण केलेला आहे तत् श्रुत्वा - ते ऐकून प्रभुः - समर्थ श्रीकृष्ण सत्वरं जलं आविश्य - तत्काळ पाण्यात शिरून तं हत्वा - त्याला मारून उदरे अर्भकं न अपश्यत् - त्याच्या उदरात बालक पाहता झाला नाही. ॥४१॥
त्यानेच तो बालक नक्की चोरून नेला असला पाहिजे." ते ऐकून भगवान ताबडतोब पाण्यात शिरले आणि त्यांनी शंखासुराला मारले. परंतु त्याच्या पोटात तो बालक दिसला नाही. (४१)


तदङ्‌गप्रभवं शङ्‌खं आदाय रथमागमत् ।
ततः संयमनीं नाम यमस्य दयितां पुरीम् ॥ ४२ ॥
गत्वा जनार्दनः शङ्‌खं प्रदध्मौ सहलायुधः ।
शङ्‌खनिर्ह्रादमाकर्ण्य प्रजासंयमनो यमः ॥ ४३ ॥
तयोः सपर्यां महतीं चक्रे भक्त्युपबृंहिताम् ।
उवाचावनतः कृष्णं सर्वभूताशयालयम् ।
लीलामनुष्य हे विष्णो युवयोः करवाम किम् ॥ ४४ ॥
घेतला शंख तो कृष्णे बळीच्या सह पातले ।
यमाच्या नगरीं आणि फुंकिला शंख तो बहू ॥ ४२ ॥
यमाने भक्तिभावाने विधिने पूजिले द्वया ।
सच्चिदानंद कृष्णाला वदला यमराज तो ॥ ४३ ॥
लीलावतार घेवोनी मानवी रूप धारिले ।
सर्वव्यापक रे देवा काय सेवा करू तुम्हा ॥ ४४ ॥

तदङ्‌‌गप्रभवं शङ्खं आदाय - त्याच्या अवयवापासून निघालेला शंख घेऊन रथं आगमत् - रथाजवळ आला ततः संयमनीं नाम - नंतर संयमनी नावाच्या यमस्य दयितां पुरीं गत्वा - यमाच्या आवडत्या नगरीला जाऊन सहलायुधः जनार्दनः - बलरामासह श्रीकृष्ण शङ्खं प्रदध्मौ - शंख वाजविता झाला शंखनिह्लादम् आकर्ण्य - शंखाचा मोठा ध्वनि श्रवण करून प्रजासंयमनः यमः - प्रजेचे नियमन करणारा यम तयोः - त्या दोघा रामकृष्णांची भक्त्या उपबृंहिता महतीं सपर्यां चक्रे - भक्तीने वाढलेली अशी मोठी पूजा करता झाला अवनतः - नम्र होऊन हे लीलामनुष्य विष्णो - हे क्रीडार्थ मनुष्य वेष घेतलेल्या कृष्णा युवयोः किं करवाम - तुमचे काय काम करावे इति - असे सर्वभूताशयालयं कृष्णम् उवाच - सर्व प्राण्यांच्या इच्छांचे आश्रयस्थान अशा श्रीकृष्णाला म्हणाला. ॥४२-४४॥
तेव्हा त्याच्या शरीराचा शंख घेऊन भगवान रथाकडे परतले. तेथून बलरामांसह यमराजाच्या आवडत्या ’संयमनी ’ नगरीत जाऊन त्यांनी आपला शंख वाजविला. सर्व प्रजेवर नियंत्रण असणारा यम शंखाचा आवाज ऐकून तेथे आला आणि अत्यंत भक्तिभावाने त्याने विधिपूर्वक त्यांची थाटामाटात पूजा केली. नंतर सर्व प्राण्यांच्या हृदयात विराजमान असलेल्या श्रीकृष्णांना त्याने विनयाने म्हटले, "स्वलीलेनेच मनुष्य झालेल्या हे सर्वव्यापक परमेश्वरा ! मी आपणा दोघांची काय देवा करू ?" (४२-४४)


श्रीभगवान् उवाच -
गुरुपुत्रमिहानीतं निजकर्मनिबन्धनम् ।
आनयस्व महाराज मच्छासनपुरस्कृतः ॥ ॥
श्रीभगवान् म्हणाले -
यमराज गुरुपुत्रा तुम्ही तो कर्मबंधने ।
आणिले येथ तो त्याला क्षमोनी आणणे पुढे ॥ ४५ ॥

महाराज - हे महाराजा यमा मच्छासनपुरस्कृतः (त्वं) - माझ्या आज्ञेला पुढे करून तू इह आनीतं - येथे आणिलेल्या निजकर्मनिबन्धनं (अपि) गुरुपुत्रं - आपल्या कर्माने बद्ध झालेल्याहि त्या गुरुपुत्राला आनयस्व - आण. ॥४५॥
श्रीभगवान म्हणाले- "यमराज ! स्वतःच्या कर्मबंधनानुसार माझा गुरुपुत्र येथे आणला गेला आहे. तू माझ्या आज्ञेने त्याला माझ्याकडे घेऊन ये." (४५)


तथेति तेनोपानीतं गुरुपुत्रं यदूत्तमौ ।
दत्त्वा स्वगुरवे भूयो वृणीष्वेति तमूचतुः ॥ ४६ ॥
जी आज्ञा म्हणूनी धर्मे आणिला गुरुपुत्र तो ।
गुरुसी दिधला पुत्र वदले काय आणखी ॥ ४६ ॥

यदूत्तमौ - बलराम व श्रीकृष्ण तेन तथा इति (उक्ता) - यमाने बरे आहे असे म्हणून उपनीतं गुरुपुत्रं - आणलेल्या त्या गुरुपुत्राला स्वगुरवे दत्त्वा - आपल्या गुरुप्रत अर्पण करून भूयः वृणीष्व - पुनः वर मागा इति तं ऊचतुः - असे त्याला म्हणाले. ॥४६॥
जशी आपली आज्ञा असे म्हणून यमाने गुरुपुत्र आणून दिला. तेव्हा राम-कृष्णांनी तो मुलगा गुरुदेवांच्या स्वाधीन करून म्हटले की, "आपणास आणखी काही पाहिजे असले तर मागावे." (४६)

विवरण :- सांदीपनी गुरुंनी गुरुदक्षिणा म्हणून प्रभासक्षेत्री समुद्रात बुडून मरण पावलेला आपला पुत्र परत मागितला. ते करणे रामकृष्णांना आवश्यकच होते. (आज्ञा गुरुणाम् अविचारणीया ।) अर्थात अशा अलौकिक विभूतींना अशक्य ते काय ? त्यांनी यमराजास पुत्र परत देण्याची आज्ञा केली. (हे वैशिष्टय) शिवाय कृष्णलीलेचाहि तो एक भाग. पांचजन्य मिळवायचा होता. लीलेला एक कारण मिळाले. इथे 'निजकर्मबंधनम्' असा शब्द वापरला आहे. प्रत्येकाला आपल्या मागील कृतकर्माचे फळ मिळते. कदाचित गुरुपुत्राला त्याच्या मागील जन्मातील कर्माचे फळ म्हणून अल्पायुष्य मिळाले असावे. पृथ्वीवरील व्यक्तीचे प्राण हरण करून त्याला यमाकडे आणण्यास यमदूत बांधील असतात. यम आणि त्याचे दूत यांना तेवढाच अधिकार. प्राण परत देण्याचा नाही, परंतु इथे भगवंतासारख्या जगन्नियंत्याची आज्ञा होती. म्हणून भगवान म्हणतात, 'माझ्या आज्ञेवरून तू त्याला जिवंत कर; म्हणजे तुलाहि दोष लागणार नाही.' यमापुढे कोणाचाच इलाज चालत नाही, हे खरे असले तरी तो भगवंताचा सेवक, म्हणून त्यांची आज्ञा पालन करणे त्याला बांधीलच. (पूर्वी कृष्ण भगवंतांनी यमास जिंकले होते) म्हणूनच 'मत्शासनपुरस्कृतः' असा शब्द वापरला आहे. (४६)



श्रीगुरुरुवाच -
सम्यक् संपादितो वत्स भवद्‍भ्यां गुरुनिष्क्रयः ।
को नु युष्मद्विधगुरोः कामानामवशिष्यते ॥ ४७ ॥
गुरुजी म्हणाले -
लाभली दक्षिणा श्रेष्ठ आता काय हवे दुजे ।
श्रेष्ठाचा गुरु तो त्याला जगात काय ते उणे ॥ ४७ ॥

वत्स - बाळा श्रीकृष्णा भवद्‌भयां गुरुनिष्क्रयः सम्यक् संपादितः - तुम्हां दोघांनी गुरुदक्षिणा फारच उत्तम दिली युष्मद्विधगुरोः कः नु कामः - तुमच्यासारख्याचा गुरु अशा माझी कोणती बरे इच्छा अवशिष्यते नाम - पूर्ण व्हावयाची राहील बरे. ॥४७॥
गुरुजी म्हणाले- "मुलांनो ! तुम्ही दोघांनी उत्तम गुरुदक्षिणा दिलीत. आता आणखी काय पाहिजे ? तुमच्यासारख्यांच्या गुरुचे कोणते मनोरथ अपूर्ण राहू शकतील बरे ?" (४७)


गच्छतं स्वगृहं वीरौ कीर्तिर्वामस्तु पावनी ।
छन्दांस्ययातयामानि भवन्त्विह परत्र च ॥ ४८ ॥
वीरांनो घरि जा आता पवित्र कीर्तीवंत व्हा ।
नित्य नवी अशी विद्या कधी ना विसराल ही ॥ ४८ ॥

वीरौ - पराक्रमी अशा हे बलरामा स्वगृहं गच्छतं - आपल्या घरी जा (ते) कीर्तिः पावनी अस्तु - जगाला तुझी कीर्ति पवित्र करणारी असो इह च परत्र - ह्या लोकी व परलोकी छंदांसि अयात यामानि भवन्तु - वेद ताजे तरतरीत असोत. ॥४८॥
वीरांनो ! तुम्ही दोघेही आता आपल्या घरी जा. लोकांना पवित्र करणारी कीर्ती तुम्हांला प्राप्त होवो ! तुम्ही शिकून घेतलेली विद्या इहपरलोकी नित्य नूतन राहो. (४८)


गुरुणैवमनुज्ञातौ रथेनानिलरंहसा ।
आयातौ स्वपुरं तात पर्जन्यनिनदेन वै ॥ ४९ ॥
पुत्रा परीक्षिता ! तेंव्हा वेगवान् रथि बैसुनी ।
कृष्ण नी बलरामो हे पातले मथुरापुरा ॥ ४९ ॥

तात - बा परीक्षिता एवं गुरुणा अनुज्ञातौ - याप्रमाणे गुरूने आज्ञा दिलेले बलराम व श्रीकृष्ण पर्जन्यनिदेन - मेघाप्रमाणे गर्जना करणार्‍या अनिलरंहसा रथेन - व वायुवेगाने धावणार्‍या रथाने वै स्वपुरं आयातौ - खरोखर आपल्या नगराला आले. ॥४९॥
परीक्षिता ! अशा रीतीने गुरुजींनी अनुमती दिल्यावर वायूप्रमाणे वेग आणि मेघाप्रमाणे आवाज असणार्‍या रथावर आरूढ होऊन दोघे बंधू मथुरेला परतले. (४९)


समनन्दन् प्रजाः सर्वा दृष्ट्वा रामजनार्दनौ ।
अपश्यन्त्यो बह्वहानि नष्टलब्धधना इव ॥ ५० ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां दशमस्कन्धे पूर्वार्धे गुरुपुत्रानयनं नाम पञ्चचत्वारिंशोऽध्यायः ॥ ४५ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
विरही लोक ते सारे आनंदी मग्न जाहले ।
गेलेले धन ते लाभे तसे झाले तयांस की ॥ ५० ॥
॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर पंचेचाळिसावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

नष्टलब्धधनः इव - सापडलेले द्रव्य मिळाल्याप्रमाणेच बह्वहानि - पुष्कळ दिवसपर्यंत रामजनार्दनौ अपश्यन्त्यः - श्रीकृष्ण व बलराम ह्यांना न पाहणार्‍या सर्वाः प्रजाः - सर्व प्रजा (तौ) दृष्ट्वा समनन्दन् - त्यांना पाहून आनंदित झाल्या. ॥५०॥
पुष्कळ दिवस राम-कृष्णांना न पाहिल्याने दुःखी झालेली प्रजा ते आल्याचे पाहून आनंदित झाली. हरवलेले धन परत मिळाल्यावर व्हावी, तशी. (५०)

विवरण :- उपनयनानंतर सांदीपनी गुरुंच्या आश्रमात वेदाध्ययन करून, गुरुदक्षिणा देऊन, रामकृष्ण मथुरेस परत आले. तेव्हा मथुरावासीयांना कसा आनंद झाला याचे वर्णन. त्यांना नाहीसे झालेले द्रव्य पुन्हा मिळाल्याचा आनंद झाला. इथे लक्ष्मी आणि रामकृष्ण यात साम्य. सामान्य माणसाच्या जीवनात धनाचे, लक्ष्मीचे महत्त्व असाधारण. धनाशिवाय माणसाचे पानहि हलत नाही. थोडावेळ जरी लक्ष्मीचे दर्शन झाले नाही, तर तो कासावीस होतो. त्याचे सर्व जीवनव्यवहार ठप्प होतात. आणि धन पुन्हा दिसले की, त्याला अतीव आनंद होतो. तो माणसात येतो. आश्वस्त होतो. त्याप्रमाणे रामकृष्ण ज्या काळात सांदीपनींच्या आश्रमात होते, तेव्हा मथुरावासी मृतवत् होते. आता त्यांचे पुन्हा दर्शन झाल्यावर त्यांना संजीवनी मिळाली आणि पुनर्जीवन लाभ झाला असा भाव. (५०)



अध्याय पंचेचाळिसावा समाप्त

GO TOP