श्रीमद् भागवत पुराण
दशमः स्कन्धः
त्रिचत्वारिंशोऽध्यायः

कुवलयापीडवधः; भगवतो मल्लशाखायां
प्रवेशः; चाणूरेणसह संवादश्च -

कुवलयापीडाचा उद्धार आणि आखाड्यात प्रवेश -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् )
अथ कृष्णश्च रामश्च कृतशौचौ परन्तप ।
मल्लदुन्दुभिनिर्घोषं श्रुत्वा द्रष्टुमुपेयतुः ॥ १ ॥
( अनुष्टुप् )
श्रीशुकदेव सांगतात -
आता श्रीकृष्ण नी राम स्नानादी उरकोनिया ।
दुंदुभीनाद ऐकोनी निघाले रंगभूमिसी ॥ १ ॥

परंतप - हे परीक्षित राजा - अथ - नंतर - कृष्णः च रामः च - श्रीकृष्ण व बलराम - कृतशौचौ - केला आहे शुद्ध होण्याचा विधि ज्यांनी असे - मल्लदुन्दुभिनिर्घोषं श्रुत्वा - मल्लांचा व नगार्‍यांचा गंभीर शब्द ऐकून - (रङगं) द्रष्टुं उपेयतुः - रंगभूमी पाहण्यासाठी आले. ॥१॥
श्रीशुक म्हणतात- हे परीक्षिता ! श्रीकृष्ण आणि बलराम स्नानादी नित्यकर्मे करून कुस्तीच्या नगार्‍याचा आवाज ऐकून ती पाहाण्यासाठी निघाले. (१)

विवरण :- मथुरेत आल्यानंतर रामकृष्णांनी दिवसा मथुरेच्या राजमार्गाचे हिंडून अवलोकन केले; धनुर्भंग केला आणि आपल्या वसतिस्थानी येऊन शांतपणे ते निद्राधीन झाले. दुसरे दिवशी सकाळी त्यांनी स्नानादि नित्यकर्मे पार पाडली. यास 'कृतशौच' असा शब्द वापरला आहे. तो शरीरशुद्धीसाठी आहेच; परंतु पुढे होणार्‍या कंसाच्या वधासंबंधीही असावा. कंस मामा, मथुरेचा राजा, त्याला ठार मारायचे याची काहीशी रुखरुख त्यांना लागली असावी, पण त्यांनी असाही विचार केला असावा की आम्ही आमचे शौर्य प्रदर्शन केले आहेच (धनुर्भंग करून) ते पाहूनहि (अन्यायाने कैदी केलेल्या) आमच्या माता-पित्यांना मुक्त करण्याची याला इच्छा तर होत नाहीच, उलट हा आम्हालाच कपटाने ठार मारण्याचा कट रचतो आहे. तेव्हा अशा तथाकथित मामाला ठार करण्यात पाप ते कोणते ? उलट ते एक खलनिर्दालनच ठरेल. पुण्यकर्मच ठरेल. म्हणजेच मनातील या किल्मिषाचे त्यांनी क्षालन केले आणि ते दोघे अंतर्बाह्य शुद्ध झाले. (१)



रङ्‌गद्वारं समासाद्य तस्मिन् नागमवस्थितम् ।
अपश्यत्कुवलयापीडं कृष्णोऽम्बष्ठप्रचोदितम् ॥ २ ॥
महाद्वारी हरी पाही नामे कुवलयापिड ।
माजरा हत्ति तो होता माहुता सह तेथ की ॥ ४ ॥

कृष्णः - श्रीकृष्ण - रङगद्वारं समासाद्य - रङगभूमीच्या द्वाराजवळ आल्यावर - तस्मिन् अवस्थितं - तेथे असलेल्या - अम्बष्ठप्रचोदितं - माहुताने प्रेरणा केलेल्या - कुवलयापीडं नागं - कुवल्यापीड नावाच्या हत्तीला - अपश्यत् - पाहता झाला. ॥२॥
आखाड्याच्या दरवाजात जाऊन श्रीकृष्णांनी पाहिले तर तेथे माहुताने कुवलयापीड नावाचा हत्ती उभा केला आहे. (२)


बद्ध्वा परिकरं शौरिः समुह्य कुटिलालकान् ।
उवाच हस्तिपं वाचा मेघनादगभीरया ॥ ३ ॥
कृष्णे सावरिले वस्त्र केशही सारिले तसे ।
गंभीर मेघवाणीने माहूत वदला असे ॥ ३ ॥

शौरिः - श्रीकृष्ण - परिकरं बद्धा - कंबरेभोवतीचे वस्त्र घट्ट बांधून - कुटिलालकान् समुह्य - कुरळे केश सावरून - मेघनादगभीरया - मेघासारख्या गंभीर अशा - वाचा - वाणीने - हस्तिपं उवाच - माहुताला म्हणाला. ॥३॥
तेव्हा श्रीकृष्णांनी कंबर कसली, कुरळे केस बांधले आणि मेघाप्रमाणे गंभीर वाणीने माहुताला म्हटले, (३)


अम्बष्ठाम्बष्ठ मार्गं नौ देह्यपक्रम मा चिरम् ।
नो चेत्सकुञ्जरं त्वाद्य नयामि यमसादनम् ॥ ४ ॥
माहवत् सोडि ही वाट ऐकतो कां उशीर कां ।
अन्यथा हत्ति नी तूंते धाडोत यमपूरिसी ॥ ४ ॥

अम्बष्ठ अम्बष्ठ - हे माहुता, हे माहुता - नौ मार्गं देहि - आम्हाला रस्ता दे - मा चिरम् - उशीर लावू नको - अपक्रम - बाजूला हो - नो चेत् - नाही तर - अद्य - आज - सकुञ्जरं त्वा - हत्तीसह तुला - यमसादनं नयामि - मी यमलोकाला नेईन. ॥४॥
माहुता ! अरे माहुता ! आम्हा दोघांना जाण्यासाठी वाट दे. बाजूला हो. वेळ लावू नकोस. नाहीतर मी हत्तीसह आताच्या आता तुला यमसदनाला पाठवितो. (४)


एवं निर्भर्त्सितोऽम्बष्ठः कुपितः कोपितं गजम् ।
चोदयामास कृष्णाय कालान्तक यमोपमम् ॥ ५ ॥
माहूते ऐकता शब्द क्रोधला यमची जसा ।
अंकुशे टोचिला हत्ती कृष्णाच्या वरि धावण्या ॥ ५ ॥

एवं निर्भत्सितः कुपितः अम्बष्ठः - याप्रमाणे धिक्कारल्यामुळे रागावलेला माहुत - कालान्तकयमोपमं - सर्वांचा नाश करणार्‍या काळस्वरूपी यमासारख्या - कोपितं गजं - भयंकर रागावलेल्या हत्तीला - कृष्णाय चोदयामास - श्रीकृष्णाच्या अंगावर सोडिता झाला. ॥५॥
श्रीकृष्णांनी माहुताला असे धमकावल्यावर तो रागाने लालबुंद झाला आणि त्याने काळ, मृत्यू किंवा यमराजाप्रमाणे भयंकर असणार्‍या कुवलयापीडाला क्रुद्ध करून श्रीकृष्णांच्या दिशेने सोडले. (५)

विवरण :- दुंदुभीचा नाद ऐकून रामकृष्ण आखाडयाकडे आले तेव्हा बाहेरच 'कुवलयापीड' नावाचा प्रचंड हत्ती माहूतासह त्यांना दिसला. हत्तीच्या नावावरूनच त्याचे सामर्थ्य प्रतीत होते. (कु वलयम् आपीडयति इति, चालताना आपल्या पावलांनी पृथ्वीला त्रस्त, कंपित करणारा.) कृष्णाने माहूताला हत्तीसह दूर होण्याची आज्ञा केली. न झाल्यास यमसदनी पाठविण्याची धमकी दिली. माहूत ते ऐकून संतप्त झाला आणि जणू यम, काळ, मृत्यू यांचे प्रतीक असणारा असा तो हत्ती त्या दोघांच्या अंगावर त्याने घातला. जणू त्याला सिद्ध करायचे होते, मला यमसदनी पाठविण्याआधी या यमाचा सामना कर. जिवंत राहतोस का ते पाहू, मग इतर गोष्टी ! (५)



करीन्द्रस्तमभिद्रुत्य करेण तरसाग्रहीत् ।
कराद् विगलितः सोऽमुं निहत्याङ्‌घ्रिष्वलीयत ॥ ६ ॥
आवळी शुंडिने हत्ती निसटे कृष्ण तेथुनी ।
मारिता एक तो ठोसा लपे त्याच्याच पायि तो ॥ ६ ॥

करीन्द्रः - तो श्रेष्ठ हत्ती - तरसा तम् अभिद्रुत्य - वेगाने त्या श्रीकृष्णावर धावत येऊन - करेण अग्रहीत् - सोंडेने धरिता झाला - करात् विगलितः सः - सोंडेतून निसटून गेलेला तो कृष्ण - अमुं निहत्य - त्या हत्तीला ताडण करून - अङ्‌घ्रिषु अलीयत् - त्याच्या पायांत लपून बसला. ॥६॥
कुवलयापीडाने भगवंतांच्यावर झेप घेऊन त्यांना अत्यंत वेगाने सोंडेत लपेटून घेतले. परंतु भगवंत सोंडेतून बाहेर सटकले आणि सोंडेवर एक ठोसा लगावून त्याच्या पायांच्या मधोमध जाऊन लपले. (६)


सङ्‌क्रुद्धस्तमचक्षाणो घ्राणदृष्टिः स केशवम् ।
परामृशत् पुष्करेण स प्रसह्य विनिर्गतः ॥ ७ ॥
कृष्ण ना दिसता हत्ती क्रोधला बहु नी तसे ।
सोंडीने धरिता हत्ती बळाने सुटला हरी ॥ ७ ॥

तं अचक्षाणः - त्या श्रीकृष्णाला न पाहणारा - घ्राणदृष्टिः - नाक हेच आहे पाहण्याचे साधन ज्याचे अशा - संक्रुद्धः सः - रागावलेला तो हत्ती - पुष्करेण केशवं परामृशत् - सोंडेने श्रीकृष्णाला स्पर्श करता झाला - (तदा) सः प्रसह्य विनिर्गतः - त्यावेळी श्रीकृष्ण मोठया वेगाने निसटून गेला. ॥७॥
ते दृष्टी‍आड झाल्याचे पाहून कुवलयापीडाला अतिशय राग आला. त्याने आपल्या सोंडेने हुंगून भगवंतांना शोधले आणि पकडलेसुद्धा. परंतु त्यांनी ताकदीने स्वतःस सोडविले. (७)

विवरण :- यमाप्रमाणे भासणारा कुवलयापीड कृष्णाच्या अंगावर चालून गेला. कृष्णाने त्यास चकवले आणि तो त्याच्या दोन पायात घुसला. कृष्ण दिसेनासा झाला. तेव्हा हत्तीने नाकाने वास घेऊन तो कोठे आहे, हे जाणून घेतले. न दिसणारी व्यक्ती वासावरून ओळखण्याचे ज्ञान पशूंना असते. म्हणून 'घ्राणदृष्टिः' असे हत्तीस म्हटले आहे. (पशवः हि घ्राणेन जानन्ति) (७)



पुच्छे प्रगृह्यातिबलं धनुषः पञ्चविंशतिम् ।
विचकर्ष यथा नागं सुपर्ण इव लीलया ॥ ८ ॥
शेपटी धरिली त्याची शतहातहि ओढिला ।
गरूड फर्पटी सापा तसा कृष्णहि फर्पटी ॥ ८ ॥

(सः) अतिबलं - तो श्रीकृष्ण अत्यंत बलाढय अशा - (तं) पुच्छे प्रगृह्य - त्या हत्तीची शेपटी घट्ट धरून - यथा सुपर्णः नागं लीलया इव - जसा गरुड सर्पाला खेळत नेतो त्याप्रमाणे - धनुषः पञ्चविंशतिं विचकर्ष - शंभर हात ओढिता झाला. ॥८॥
यानंतर भगवंतांनी त्या बलवान हत्तीचे शेपूट पकडून गरुड सापाला जसा फरपटत नेतो, त्याप्रमाणे अगदी सहजपणे त्याला शंभर हात फरपटत नेले. (८)


स पर्यावर्तमानेन सव्यदक्षिणतोऽच्युतः ।
बभ्राम भ्राम्यमाणेन गोवत्सेनेव बालकः ॥ ९ ॥
वासरा फिरवी तैसा कृष्ण हत्तीस खेळवी ।
वळता उजव्या बाजूं कृष्ण डावीकडे असे ॥ ९ ॥

अच्युतः सः - तो श्रीकृष्ण - सव्यदक्षिणतः पर्यावर्तमानेन (तेन सह) - डाव्या व उजव्या बाजूंनी वळणार्‍या त्या हत्तीसह - बालकः भ्राम्यमाणेन गोवत्सेन इव - जसे लहान मूल फिरविल्या जाणार्‍या वासराबरोबर फिरते त्याप्रमाणे - बभ्राम - फिरू लागला. ॥९॥
जसे गोल फिरणार्‍या वासराबरोबर ते लहान असताना फिरत, त्याप्रमाणे त्याचे शेपूट पकडून ते त्याला फिरवू लागले. तो जेव्हा डावीकडे वळून त्यांना पकडण्याचा प्रयत्‍न करी, तेव्हा ते उजवीकडे जात आणि जेव्हा तो उजवीकडे वळे, तेव्हा हे डावीकडे जात. (९)

विवरण :- कृष्णाला पकडण्यास हत्ती धावत होता आणि चपळ कृष्ण त्यास चकवीत होता. त्याची शेपूट धरून एखाद्या लहान मुलाने (लहान मुलगा हे विशेष!) वासराबरोबर फिरावे, त्यास खेळवावे, तसा त्या महाकाय हत्तीस तो खेळवीत होता. जो साक्षात् यमाप्रमाणे होता, त्याची कृष्णाने केलेली ही दयनीय अवस्था, यावरूनच कृष्णाच्या पुढील पराक्रमाची कल्पना येते. (९)



ततोऽभिमखमभ्येत्य पाणिनाऽऽहत्य वारणम् ।
प्राद्रवन् पातयामास स्पृश्यमानः पदे पदे ॥ १० ॥
पुन्हा त्या हत्तिला कृष्णे एकची ठोस मारिली ।
पाडण्या हरिसी धावे आता मग शिवी जणू ॥ १० ॥

ततः वारणम् अभिमुखम् अभ्येत्य - नंतर हत्तीसमोर येऊन - पाणिना आहत्य - हाताने ताडण करून - पदे पदे (तेन) स्पृश्यमानः - प्रतिपावलामागे त्या हत्तीकडून स्पर्शिला जाणारा कृष्ण - प्राद्रवन् - पळत पळत - (तं) पातयामास - हत्तीकडून पाडिता झाला. ॥१०॥
यानंतर त्यांनी हत्तीच्या समोर येऊन त्याला एक ठोसा लगावला आणि त्याला खाली पाडण्यासाठी म्हणून त्याच्या समोरून इकडे तिकडे ते असे पळू लागले की, तो जणू त्यांना आता पकडील किंवा नंतर पकडील. (१०)


स धावन् क्रीडया भूमौ पतित्वा सहसोत्थितः ।
तं मत्वा पतितं क्रुद्धो दन्ताभ्यां सोऽहनत् क्षितिम् ॥ ११ ॥
पळता पळता कृष्ण खोटाचि पडुनी पुन्हा ।
पळाला पाहता हत्ती क्रोधाने लाल जाहला ।
पडला कृष्ण पाहोनी खुपसी दांत भूमिसी ॥ ११ ॥

क्रीडया धावन् सः - लीलेने धावणारा तो श्रीकृष्ण - भूमौ पतित्वा सहसा उत्थितः - पृथ्वीवर पडून लगेच उठला - क्रुद्धः सः - रागावलेला तो हत्ती - पतितं तं मत्वा - श्रीकृष्णाला पडलेला असे मानून - दन्ताभ्यां क्षितिम् अहनत् - दोन्ही दातांनी जमिनीला ताडिता झाला. ॥११॥
धावता धावता श्रीकृष्णांनी एकदम जमिनीवर पडण्याचे नाटक केले आणि लगेच उठून ते उभे राहिले. त्या वेळी ते जमिनीवर पडले असे वाटून त्याने रागाने आपले दोन्ही दात त्यांच्यावर मारण्याचा प्रयत्‍न केला, पण ते दात जमिनीवर आपटले. (११)


स्वविक्रमे प्रतिहते कुंजरेन्द्रोऽत्यमर्षितः ।
चोद्यमानो महामात्रैः कृष्णमभ्यद्रवद् रुषा ॥ १२ ॥
धाव ही फसली तेंव्हा चिडला बहु हत्ति तो ।
माहूत प्रेरणे धावे कृष्णासी तुटुनी पडे ॥ १२ ॥

कुञ्जरेन्द्रः - तो मोठा हत्ती - स्वविक्रमे प्रतिहते अत्यमर्षितः - आपला पराक्रम फुकट गेला असता फारच रागावलेला असा - महामात्रैः चोद्यमानः - माहुतांनी प्रेरिला जाणारा - रुषा कृष्णम् अभ्यद्रवत् - क्रोधाने श्रीकृष्णाच्या अंगावर धावला. ॥१२॥
कुवलयापीडाची ही चढाई जेव्हा वाया गेली, तेव्हा तो आणखीनच चिडला. माहुतांनी हाकल्यावर तो क्रुद्ध होऊन श्रीकृष्णांवर तुटून पडला. (१२)


तमापतन्तमासाद्य भगवान् मधुसूदनः ।
निगृह्य पाणिना हस्तं पातयामास भूतले ॥ १३ ॥
पाहता तप्त तो हत्ती तो भगवान् मधुसूदनो ।
पकडी सोंड ती त्याची आपटी धरणीस त्या ॥ १३ ॥

मधुसूदनः भगवान् - मधु दैत्याला मारणारा भगवान श्रीकृष्ण - आपतन्तं तं आसाद्य - चाल करून येणार्‍या त्या हत्तीजवळ जाऊन - पाणिना हस्तं निगृह्य - हाताने सोंड घट्ट धरून - (तं) भूतले पातयामास - त्याला जमिनीवर पाडिता झाला. ॥१३॥
तो आपल्या अंगावर झेप घेत आहे असे पाहून भगवान मधुसूदन त्याच्याजवळ गेले आणि एकाच हाताने त्याची सोंड पकडून त्याला त्यांनी जमिनीवार आपटले. (१३)


पतितस्य पदाऽऽक्रम्य मृगेन्द्र इव लीलया ।
दन्तमुत्पाट्य तेनेभं हस्तिपांश्चाहनद्धरिः ॥ १४ ॥
पडता हत्ति तो खाली सिंहाच्या परि हा लिले ।
पायाने पाडितो दात माहूत मारिला पुन्हा ॥ १४ ॥

हरिः - श्रीकृष्ण - मृगेन्द्रः इव - सिंहाप्रमाणे - (तं) पदा लीलया आक्रम्य - त्या हत्तीवर सहज पाय देऊन - पतितस्य दन्तम् उत्पाटय - पडलेल्या त्याचे दात उपटून - तेन इभं हस्तिपान् च अहनत् - त्या दाताने हत्तीला व माहुताला ठार मारिता झाला. ॥१४॥
तो पडल्याबरोबर श्रीहरींनी सिंहाप्रमाणे सहज त्याला पायाने दाबून धरून त्याचा दात उपटला आणि त्याच दाताने हत्तीला आणि माहुतांना यमसदनाला पाठविले. (१४)


मृतकं द्विपमुत्सृज्य दन्तपाणिः समाविशत् ।
अंसन्यस्तविषाणोऽसृङ्‌ मदबिन्दुभिरङ्‌कितः ।
विरूढस्वेदकणिका वदनाम्बुरुहो बभौ ॥ १५ ॥
मारोनी टाकिला हत्ती हातात दात घेउनी ।
पातला रंगभूमीसी दृश्य ते रमणीय की ॥
खांद्याशी दात ते होते रक्ताने अंग शोभले ।
मुखपद्मी तसे हास्ये शोभे घाम कपाळि तो ॥ १५ ॥

दन्तपाणिः (सः) - हातात हत्तीचा दात घेतलेला श्रीकृष्ण - मृतकं द्विपम् उत्सृज्य - मेलेल्या हत्तीला तेथेच टाकून - (रङगं) समाविशत् - रङगभूमीवर प्रविष्ट झाला - अंसन्यस्तविषाणः - खांद्यावर हस्तिदंत ठेवलेला - असृङ्‌मदबिंदुभिः अंकितः - रक्त व मदाचे बिंदु यांनी माखलेला - विरूढस्वेदकणिकावदनाम्बुरुहः - ज्याच्या मुखकमळावर घर्मबिंदु आले आहेत असा - बभौ - शोभला. ॥१५॥
मेलेल्या हत्तीला तेथेच टाकून त्याचा दात घेऊन त्यांनी आखाड्याच्या जागी प्रवेश केला. यावेळची त्यांची शोभा काय वर्णावी ! हत्तीचा दात खांद्यावर होता, शरीरावर रक्त आणि हत्तीच्या मदाचे थेंब दिसत होते. आणि मुखकमलावर घामाचे बिंदू झळकत होते. (१५)


वृतौ गोपैः कतिपयैः बलदेवजनार्दनौ ।
रङ्‌गं विविशतू राजन् गजदन्तवरायुधौ ॥ १६ ॥
कृष्ण नी बलरामाच्या हातात दंतशस्त्र ते ।
शोभले सोबती गोप मंचासी पातले असे ॥ १६ ॥

राजन् - हे परीक्षित राजा - गजदन्तवरायुधौ - हस्तिदंतच आहे श्रेष्ठ आयुध ज्यांचे असे - कतिपयैः गोपैः वृतौ - कित्येक गोपांनी वेष्टिलेले - बलदेवजनार्दनौ - बलराम व श्रीकृष्ण - रङगं विविशतुः - रंगभूमीवर प्रविष्ट झाले. ॥१६॥
परीक्षिता ! श्रीकृष्ण आणि बलराम हातामध्ये शस्त्रासारखे गजदन्त घेऊन काही गोपालांबरोबर कुस्तीच्या मैदानापाशी आले. (१६)


( शार्दूलविक्रीडित )
मल्लानामशनिर्नृणां नरवरः
     स्त्रीणां स्मरो मूर्तिमान् ।
गोपानां स्वजनोऽसतां क्षितिभुजां
     शास्ता स्वपित्रोः शिशुः ।
मृत्युर्भोजपतेर्विराडविदुषां
     तत्त्वं परं योगिनां ।
वृष्णीनां परदेवतेति विदितो
     रङ्‌गं गतः साग्रजः ॥ १७ ॥
( शार्दूलविक्रीडित )
मलांना दिसला कठोर हरि नी स्त्रीयांसि कामो तसा
( अनुष्टुप् )
गोपांना सखया तसा नृपवरा तो शासको भासला ।
कंसाला यमनी विराट दिसला जे लोक अज्ञो तया
( अनुष्टुप् )
योग्या तत्व यदूंसि देव अन तो वृद्धां शिशू भासला ॥ १७ ॥

साग्रजः (सः) - बलरामासह श्रीकृष्ण - रङगं गतः - रंगभूमीवर आला असता - मल्लानाम् अशनिः (विदितः) - मल्लांना वज्र असा वाटला - नृणां नरवरः - सामान्य पुरुषांना श्रेष्ठ पुरुष वाटला - स्त्रीणां मूर्तिमान् स्मरः - स्त्रियांना मूर्तिमान मदन वाटला - गोपानां स्वजनः - गोपांना आपला आप्त वाटला - असतां क्षितिभुजां शास्ता - दुष्ट राजांना आपले शासन करणारा वाटला - स्वपित्रोः शिशुः - स्वतःच्या मातापित्यांना बालक वाटला - भोजपतेः मृत्यूः - कंसाला मृत्यु वाटला - अविदुषां विराट् - अडाणी माणसांना प्रचंड पुरुष वाटला - योगिनां परं तत्त्वं - योग्यांना श्रेष्ठ आत्मतत्त्व वाटला - वृष्णीनां परदेवता - यादवांना श्रेष्ठ देवता - इति विदितः - असा भासला. ॥१७॥
ज्यावेळी श्रीकृष्ण बलरामांसह समारंभ भवनात आले, तेव्हा पहिलवानांना व्रजकठोर, सामान्य लोकांना नररत्‍न, स्त्रियांना मूर्तिमंत कामदेव, गोपांना आप्त, दुष्ट राजांना शासन करणारे, त्यांच्या माता-पित्यांना मुलगा, कंसाला मृत्यू, अज्ञानी लोकांना सामान्य बालक, योग्यांना परम तत्त्व आणि वृष्णिवंशियांना श्रेष्ठ देव आहेत असे वाटले. (सर्वांचा एकाच भगवंतांमध्ये आपापल्या भावानुसार अनुक्रमे रौद्र, अद्‍भूत, शृंगार, हास्य, वीर, वात्सल्य, भयानक, बीभत्स, शांत आणि भक्ती या दहा रसांचा अनुभव आला.) (१७)

विवरण :- कृष्णाने कुवलयापीडास मारले आणि त्याचे दात हातात धरून त्याने आखाडयात प्रवेश केला, तेव्हा तो तेथील सर्वांना कसा दिसला, याचे हे वर्णन. अर्थात जशी दृष्टी जसा भाव तसे दर्शन. त्यावेळी जणू नवरसांनी त्याच्या शरीरात प्रवेश केला होता. म्हणून त्याच्याकडे पाहण्याची प्रत्येकाची जशी भावना तशा स्वरूपात तो त्यांना दिसला. जसे मल्लांना वज्राप्रमाणे (रौद्ररस) स्त्रियांना मदनाप्रमाणे (शृंगाररस) कंसाला मृत्यूप्रमाणे (भयानक रस) इ. (१७)



( अनुष्टुप् )
हतं कुवलयापीडं दृष्ट्वा तावपि दुर्जयौ ।
कंसो मनस्व्यपि तदा भृशमुद्विविजे नृप ॥ १८ ॥
( अनुष्टुप् )
परीक्षित धैर्यवान् कंसे पाहिला हत्ति मारिता ।
कठीण जिंकणे याला स्मरता घाबरे मनीं ॥ १८ ॥

नृप - हे राजा - तदा - तेव्हा - मनस्वी अपि कंसः - मनोनिग्रही असा कंस देखील - कुवलयापीडं हतं दृष्ट्वा - कुवलयापीड नामक हत्तीला मारिलेले पाहून - तौ अपि दुर्जयौ (मत्वा) - व त्या दोघा रामकृष्णांना अजिंक्य समजून - भृशम् उद्विविजे - फार उद्विग्न झाला. ॥१८॥
राजन ! कंस मोठा धीराचा पुरुष होता, तरीसुद्धा कुवलयापीडाला मारल्याचे पाहून त्याच्या लक्षात आले की, यांना जिंकणे अत्यंत अवघड आहे. त्यावेळी तो अतिशय भयभीत झाला. (१८)


( मिश्र )
तौ रेजतू रङ्‌गगतौ महाभुजौ
     विचित्रवेषाभरणस्रगम्बरौ ।
यथा नटावुत्तमवेषधारिणौ
     मनः क्षिपन्तौ प्रभया निरीक्षताम् ॥ १९ ॥
( इंद्रवज्रा )
महाभुजो श्रीहरी नी बळी तो
     लेवोनि वस्त्रे अन हार कंठी ।
सुशोभले ते नट तो सजे जै
     पाहोनि नेत्रा मिटवे न कोणी ॥ १९ ॥

विचित्रवेषाभरणस्रगम्बरौ - चित्रविचित्र वेष, अलंकार, पुष्पमाळा व वस्त्रे धारण करणारे - महाभुजौ - मोठमोठे आहेत दंड ज्यांचे असे - रङगगतौ तौ - रंगभूमीवर आलेले ते रामकृष्ण - यथा उत्तमवेषधारिणौ नटौ - उत्तम वेष घेतलेल्या नटाप्रमाणे - निरीक्षतां मनः प्रभया क्षिपन्तौ - पहाणार्‍यांचे मन स्वतःच्या कांतीने हरण करणारे असे - रेजतुः - शोभले. ॥१९॥
महापराक्रमी श्रीकृष्ण आणि बलराम फुलांचे हार, वस्त्रे आणि अलंकार यांमुळे सुंदर दिसत होते. असे वाटत होते की, उत्तम वेष धारण करून दोन नटच आले आहेत. त्यांच्या तेजामुळे पाहाणार्‍यांची मने त्यांच्यावरच खिळून जात. ते दोघेजण आखाड्यात असे शोभून दिसत होते. (१९)


निरीक्ष्य तावुत्तमपूरुषौ जना
     मञ्चस्थिता नागरराष्ट्रका नृप ।
प्रहर्षवेगोत्कलितेक्षणाननाः
     पपुर्न तृप्ता नयनैस्तदाननम् ॥ २० ॥
मंचावरी जे बहु थोर व्यक्ती
     पाहोनि कृष्णा खुलले मनात ।
प्रसन्न झाले बघता हरीला
     न होय तृप्ती मुळि त्यां दिठीची ॥ २० ॥

नृप - हे राजा - मञ्चस्थिताः नागरराष्ट्रकाः जनाः - उच्चासनावर बसलेले नगरातील व राष्ट्रातील लोक - उत्तमपूरुषौ तौ निरीक्ष्य - श्रेष्ठ पुरुष अशा त्या दोघा रामकृष्णांना पाहून - प्रहर्षवेगोत्कलितेक्षणाननाः - आनंदाच्या भराने प्रफुल्लित झाले आहेत नेत्र व मुखे ज्यांची असे - नयनैः तदाननं पपुः - नेत्रांनी त्यांचे मुख जणू पिते झाले - (परंतु) न तृप्ताः - परंतु तृप्त झाले नाहीत. ॥२०॥
परीक्षिता ! त्या पुरुषोत्तमांना पाहून मंचावर बसलेले मथुरेचे नागरिक आणि इतर देशांतील लोक यांचे डोळे अत्यानंदाने भरून आले आणि प्रफुल्लित चेहरे उत्कंठेने भरून आले. त्यांच्या मुखांकडे कितीही पाहिले, तरी लोकांचे डोळे तृप्त होतच नव्हते. (२०)

विवरण :- रामकृष्णांना पाहून मंचस्थित आणि इतर नागरिकांची अवस्था कशी झाली, याचे हे वर्णन. ते त्या दोघांच्या लावण्याने अगदी दिपून गेले. डोळे विस्फारून आणि 'आ' वासून त्यांच्या लावण्याचे रसपान करू लागले. त्यांचे सारे शरीर डोळ्यातच एकवटले. (२०)



( अनुष्टुप् )
पिबन्त इव चक्षुर्भ्यां लिहन्त इव जिह्वया ।
जिघ्रन्त इव नासाभ्यां श्लिष्यन्त इव बाहुभिः ॥ २१ ॥
( अनुष्टुप् )
वाटले पीति ते नेत्रे जिव्हेने चाटितात की ।
नाकाने सुंगिती आणि बाहूने कवटाळिती ॥ २१ ॥

चक्षुर्भ्यां पिबन्तः इव - जणू डोळ्यांनी प्राशन करणारे - जिह्वया लिहन्तः इव - जिभेने जणू चाटणारे - नासाभ्यां जिघ्रन्तः इव - नाकाने जणू त्याचा वास घेणारे - बाहुभिः श्लिष्यन्तः इव - जणू काय बाहूंनी आलिंगिणारे ॥२१॥
जणू काही ते त्यांना डोळ्यांनी पीत, जिभेने चाटीत, नाकाने हुंगीट आणि हातांनी धरून हॄदयाशी कवटाळीत. (२१)


ऊचुः परस्परं ते वै यथादृष्टं यथाश्रुतम् ।
तद् रूपगुणमाधुर्य प्रागल्भ्यस्मारिता इव ॥ २२ ॥
सौंदर्य गुणमाधूर्य धैर्य ते पाहुनी जणु ।
स्मरती हरिच्या लीला बोलती ते परस्परे ॥ २२ ॥

- ते वै - ते लोक खरोखर - यथा दृष्टं यथा श्रुतं - जसे पाहिले व जसे ऐकिले - (तथा) तद्‌रूपगुण - तशाच रीतीने त्या श्रीकृष्णाच्या व बलरामाच्या गुणांचे, - माधुर्यप्रागल्भ्यस्मारिताः इव - आणि गोड स्वरूपाचे व सामर्थ्याचे स्मरण झाल्
त्यांचे सौंदर्य, गुण, माधुर्य आणि निर्भयपणा यांनी जणू उपस्थितांना त्यांच्या लीलांचे स्मरण करून दिले आणि ते लोक आपापसात त्यांच्यासंबंधी पाहिलेल्या-ऐकलेल्या गोष्टींबद्दल एकमेकांना सांगू-ऐकू लागले. (२२)


एतौ भगवतः साक्षात् हरेर्नारायणस्य हि ।
अवतीर्णाविहांशेन वसुदेवस्य वेश्मनि ॥ २३ ॥
दोघे नारायणो अंश साक्षात् भगवान् श्रीहरी ।
पातले जन्मुनी भूसी वसुदेवजिच्या घरी ॥ २३ ॥

एतौ - हे दोघे बलराम व श्रीकृष्ण - इह वसुदेवस्य वेश्मनि - ह्या वसुदेवाच्या घरी - भगवतः हरेः नारायणस्य - भगवान श्रीविष्णूच्या - साक्षात् अंशेन - प्रत्यक्ष पूर्णांशाने - हि अवतीर्णौ - खरोखर अवतीर्ण झाले. ॥२३॥
हे दोघेजण साक्षात भगवान नारायणांचे अंश या पृथ्वीवर वसुदेवांच्या घरी अवतीर्ण झाले आहेत. (२३)


एष वै किल देवक्यां जातो नीतश्च गोकुलम् ।
कालमेतं वसन् गूढो ववृधे नन्दवेश्मनि ॥ २४ ॥
( अंगुलीनिर्देश करून )
सावळा देवकीपुत्र जन्मता वसुदेवने ।
गोकुळी ठेविले दोघा नंदाच्या घरि वाढले ॥ २४ ॥

एषः किल वै - हाच खरोखर श्रीकृष्ण - देवक्यां जातः - देवकीच्या ठिकाणी जन्मलेला - गोकुलं च नीतः - आणि गोकुळात नेला गेलेला - नन्दवेश्मनि - नंदाच्या घरी - एतं कालं - आतापर्यंत - गूढे वसन् - गुप्त रीतीने रहात - ववृधे - वाढला. ॥२४॥
हे सावळे देवकीपासून जन्मले होते. वसुदेवांनी यांना गोकुळात नेले होते. इतके दिवस ते तेथेच नंदांच्या घरी गुप्तपणे राहून मोठे झाले. (२४)


पूतनानेन नीतान्तं चक्रवातश्च दानवः ।
अर्जुनौ गुह्यकः केशी धेनुकोऽन्ये च तद्विधाः ॥ २५ ॥
पूतना नी तृणावर्त शंखचूड नि केशि तो ।
धेनुकादी असे दैत्य आंनीच मारिले पहा ॥ २५ ॥

अनेन - ह्या श्रीकृष्णाकडून - पूतना अन्तं नीता - पूतना नाशाप्रत नेली गेली - चक्रवातः दानवः च - आणि गरगर फिरणार्‍या वायूचे रूप घेतलेला दानव - अर्जुनौ - अर्जुन नावाचे दोन वृक्ष - गुह्यकः केशी - केशी नावाचा यक्ष - धेनुकः - धेनुकासुर - तद्विधाः अन्ये च - आणि तशाच सारखे दुसरे - अन्तं नीताः - मृत्यूप्रत नेले गेले
यांनीच पूतना, तृणावर्त, शंखचूड, केशी, धेनुक आणि यांसारख्या दैत्यांचा वध केला. शिवाय यमलार्जुनांचा उद्धार केला. (२५)


गावः सपाला एतेन दावाग्नेः परिमोचिताः ।
कालियो दमितः सर्प इन्द्रश्च विमदः कृतः ॥ २६ ॥
यांनीच अग्नि पासोनी बाळ गोपाळ रक्षिले ।
कालिया दमनो इंद्रमानमर्दन ही करी ॥ २६ ॥

एतेन - ह्या कृष्णाने - सपालाः गावः - गोपांसह गाई - दावाग्नेः परिमोचिताः - वणव्यातून सोडविल्या - कालियः सर्पः दमितः - कालिय नामक सर्प दमविला - इन्द्रः च विमदः कृतः - आणि इंद्र गर्वरहित केला गेला. ॥२६॥
यांनीच गाई आणि गोपालांना दावानलापासून वाचविले होते. तसेच कालिया नागाचे दमन आणि इंद्राचासुद्धा मानभंग केला होता. (२६)


सप्ताहमेकहस्तेन धृतोऽद्रिप्रवरोऽमुना ।
वर्षवाताशनिभ्यश्च परित्रातं च गोकुलम् ॥ २७ ॥
येणे गोवर्धनो हाती घेतला दिनि सप्त नी ।
वासुरे गाइ नी लोक वार्‍या पाण्यात रक्षिले ॥ २७ ॥

अमुना - ह्या श्रीकृष्णाने - अद्रिः - गोवर्धन पर्वत - एकहस्तेन सप्ताहं धृतः - एका हाताने सात दिवस उचलून धरिला - गोकुलं च - आणि गोकुळ - वर्षवाताशनिभ्यः - पर्जन्य, वादळ व विजा यांपासून - परित्रातं - रक्षिले. ॥२७॥
यांनीच सात दिवसपर्यंत एकाच हातावर गिरिराज गोवर्धनाला उचलून धरून वादळ, पाऊस, वीज यांपासून गोकुळ वाचविले. (२७)


गोप्योऽस्य नित्यमुदित हसितप्रेक्षणं मुखम् ।
पश्यन्त्यो विविधांस्तापान् तरन्ति स्माश्रमं मुदा ॥ २८ ॥
मंदहास्य तशी दृष्टी पाहता गोपि तृप्तल्या ।
सहजी मुक्त त्या झाल्या सर्व तापा मधोनीया ॥ २८ ॥

अस्य - ह्या श्रीकृष्णाचे - मुदितहसितप्रेक्षणं - नेहमी आनंदित व हास्ययुक्त आहे अवलोकन ज्याचे असे - मुखं - मुख - प्रेक्षन्त्यः गोप्यः - पाहणार्‍या गोपी - मुदा - आनंदाने - विविधान् तापान् - अनेक प्रकारच्या तापापासून - अश्रमं तरन्ति स्म - सहज मुक्त होत असतात. ॥२८॥
यांच्या नेहमीच सहास्य नजरेने पाहाणार्‍या मुखारविंदाच्या दर्शनाने आनंदित होणार्‍या गोपी सर्व प्रकारच्या तापांपासून अनायासेच मुक्त होत. (२८)


वदन्त्यनेन वंशोऽयं यदोः सुबहुविश्रुतः ।
श्रियं यशो महत्वं च लप्स्यते परिरक्षितः ॥ २९ ॥
भविष्य कथिले जाते रक्षिती यदुवंश हे ।
समृद्धी यश नी कीर्ती वंशा देतील हे द्वय ॥ २९ ॥

अनेन - ह्या श्रीकृष्णाने - परिरक्षितः - रक्षिलेला - सुबहुविश्रुतः - व अत्यंत प्रसिद्धीला आलेला - अयं यदोः वंशः - हा यदूचा वंश - श्रियं यशः महत्त्वं च - लक्ष्मी कीर्ति आणि मोठेपणा - लप्स्यते - मिळवील - (इति) वदन्ति - असे लोक बोलतात. ॥२९॥
असे म्हणतात की, हे यदुवंशाचे रक्षण करतील आणि हा अत्यंत प्रसिद्ध वंश यांच्यामुळे समृद्धी, यश आणि गौरव प्राप्त करील. (२९)


अयं चास्याग्रजः श्रीमान् रामः कमललोचनः ।
प्रलम्बो निहतो येन वत्सको ये बकादयः ॥ ३० ॥
बलराम दुजा त्याचा श्रेष्ठ बंधू असे पहा ।
वत्स बक प्रलंबाला ऐकतो मारिले यये ॥ ३० ॥

अयं च - हाच - अस्य अग्रजः - ह्या श्रीकृष्णाचा वडील भाऊ - कमललोचनः श्रीमान् रामः - कमलाप्रमाणे नेत्र असलेला सर्वैश्वर्यसंपन्न बलराम होय - येन प्रलम्बः निहतः - ज्याने प्रलम्ब मारिला - वत्सकः (निहतः) - वत्सासुर मारिला - ये (च) बकादयः (ते अपि निहताः) - आणि जे बकासुरादि दैत्य तेहि मारिले. ॥३०॥
हे दुसरे याच श्यामसुंदरांचे मोठे भाऊ कमलनयन श्रीबलराम आहेत. यांनीच प्रलंबासुर, वत्सासुर आणि बकासुर इत्यादींना मारले आहे. (३०)


जनेष्वेवं ब्रुवाणेषु तूर्येषु निनदत्सु च ।
कृष्णरामौ समाभाष्य चाणूरो वाक्यमब्रवीत् ॥ ३१ ॥
चर्चा ही चालता ऐसी तुतारी वाजु लागली ।
चाणुरे कृष्ण रामाला संबोधोनीच बोलला ॥ ३१ ॥

एवं जनेषु ब्रुवाणेषु - याप्रमाणे लोक आपापसांत बोलत असता - तुर्येषु च निनदत्सु - आणि वाद्ये वाजू लागली असता - चाणूरः - चाणूर मल्ल - कृष्णरामौ समाभाष्य - श्रीकृष्ण व बलराम ह्यांना उद्देशून - वाक्यं अब्रवीत् - भाषण करिता झाला. ॥३१॥
उपस्थितांमध्ये जेव्हा ही चर्चा चालू होती आणि तुतारी इत्यादी वाद्ये वाजत होती, त्यावेळी राम-कृष्णांना संबोधून चाणूर म्हणाला. (३१)


हे नन्दसूनो हे राम भवन्तौ वीरसंमतौ ।
नियुद्धकुशलौ श्रुत्वा राज्ञाऽऽहूतौ दिदृक्षुणा ॥ ३२ ॥
कृष्ण नी बलरामा रे तुम्ही वीरात श्रेष्ठ की ।
नृपाने ऐकिली कीर्ती कौशल्य दाखवा इथे ॥ ३२ ॥

हे नन्दसूनो हे राम - हे श्रीकृष्णा, हे बलरामा - भवन्तौ वीरसंमतौ नियुद्धकुशलौ (इति) श्रुत्वा - तुम्ही दोघे वीरांना मान्य व युद्ध करण्यात कुशल आहा असे ऐकून - (तत्) दिदृक्षुणा राज्ञा आहूतौ - ते तुमचे युद्धकौशल्य पाहण्याच्या इच्छेने कंसराजाकडून बोलाविले गेले आहा. ॥३२॥
हे नंदनंदना ! आणि हे रामा ! तुम्ही दोघे वीरांना आदरणीय असून कुस्तीत अतिशय निपुण आहात. हे ऐकुन तुमचे कौशल्य पाहाण्यासाठी राजाने तुम्हांला येथे बोलाविले आहे. (३२)


प्रियं राज्ञः प्रकुर्वत्यः श्रेयो विन्दन्ति वै प्रजाः ।
मनसा कर्मणा वाचा विपरीत मतोऽन्यथा ॥ ३३ ॥
बंधुनो मन वाणीने कर्माने नृप तोषवा ।
भले त्याच्यात ते होई अन्यथा हानि होतसे ॥ ३३ ॥

मनसा कर्मणा वाचा - मनाने, कर्माने व वाणीने - राज्ञः प्रियं प्रकुर्वत्यः प्रजाः - राजाचे प्रिय करणार्‍या प्रजा - वै श्रैयः विन्दन्ति - खरोखर कल्याण मिळवितात - अतः अन्यथा (कुर्वत्यः) - ह्याहून उलट वर्तन करणार्‍या - विपरीतं (विन्दन्ति) - उलट फळ मिळवितात. ॥३३॥
जी प्रजा मन-वचन-कर्माने राजाला प्रिय असणारे कार्य करते, तिचे कल्याण होते आणि जी याविरुद्ध वागते, तिचे नुकसान होते. (३३)

विवरण :- सर्वतोपरी राजाचे प्रिय करणार्‍या प्रजाजनांचे राजाहि कल्याणच करतो. आणि त्याविरुद्ध वागणार्‍यांना मृत्यूदंडहि देतो कारण तो राजा आहे. (प्रजाधिपती सर्व सत्ताधीश) असे चाणूर रामकृष्णांना सांगतो. मथुरावासी जसे कंसाचे प्रजाजन, तसे व्रजवासी रामकृष्णहि. राजा हा पित्यासमान. जर त्याचे अकल्याण करण्याची, त्याच्याशी द्रोह करण्याची इच्छा केलीत तर तो तुम्हाला मृत्यूदंड देऊ शकतो. कारण तो तुमचा पालनकर्ता सर्वेसर्वा आहे. तर त्याच्याशी नीट आणि नम्रपणाने वागा, असे चाणूरास सुचवायचे आहे. (३३)



नित्यं प्रमुदिता गोपा वत्सपाला यथा स्फुटम् ।
वनेषु मल्लयुद्धेन क्रीडन्तश्चारयन्ति गाः ॥ ३४ ॥
सर्वांना ज्ञात ते आहे गोपाळ गायि चारिता ।
जंगली खेळता कुस्ती लढता की परस्परा ॥ ३४ ॥

यथा वत्सपालाः - जसे वासरे चरविणारे मुलगे - तथा गोपाः अपि - तसे मोठे गोपहि - प्रमुदितः (सन्तः) - आनंदित होणारे - नित्यं मल्लयुद्धेन वनेषु क्रीडन्तः - नेहमी कुस्त्या खेळून अरण्यात क्रीडा करीत - गाः चारयन्ति - गाई चारितात - (इति) स्फुटं - हे उघड दिसत आहे. ॥३४॥
गाय आणि वासरे चारणार्‍या गवळ्यांची मुले दररोज आनंदाने वनामध्ये कुस्त्या खेळत असतात आणि गायी चारीत असतात, हे सर्वांना माहीत आहे. (३४)


तस्माद् राज्ञः प्रियं यूयं वयं च करवाम हे ।
भूतानि नः प्रसीदन्ति सर्वभूतमयो नृपः ॥ ३५ ॥
या असे तोषवा राजा खेळे मी तुमच्या सवे ।
समस्त तोषती तेणे राजा प्रतिक देशिचा ॥ ३५ ॥

तस्मात् - म्हणून - यूयं वयं च - तुम्ही आणि आम्ही - राज्ञः प्रियं करवामहे - कंसराजाचे प्रिय करू या - (तेन) भूतानि नः प्रसीदन्ति - त्यामुळे सर्व भूते आपल्यावर संतुष्ट होतील - (हि) नृपः सर्वभूतमयः (अस्ति) - कारण राजा हा सर्व भूतांचे स्वरूप असाच आहे. ॥३५॥
म्हणून हे वीरांनो, तुम्ही आणि आम्ही मिळून महाराजांना आवडणारी गोष्ट करू. राजा सर्व प्रजेचा प्रतिनिधी असल्यामुळे आपल्या असे करण्याने आपल्यावर प्रसन्न होतील. (३५)


तन्निशम्याब्रवीत् कृष्णो देशकालोचितं वचः ।
नियुद्धमात्मनोऽभीष्टं मन्यमानोऽभिनन्द्य च ॥ ३६ ॥
परीक्षित् भगवान् कृष्ण लढण्या इच्छिता मनीं ।
देश कालास लक्षोनी वदला कृष्ण तो असे ॥ ३६ ॥

कृष्णः - श्रीकृष्ण - तत् देशकालोचितं वचः निशम्य - ते स्थळाला व प्रसंगाला योग्य असे भाषण ऐकून - च - आणि - आत्मनः अभीष्टं मन्यमानः - मल्लयुद्ध आपल्याला अत्यंत प्रिय आहे असे मानणारा - (तत्) अभिनंद्य - त्याचे अभिनंदन करून - अब्रवीत् - म्हणाला. ॥३६॥
यांच्याशी कुस्ती करावी अशी श्रीकृष्णांची इच्छा होतीच. म्हणूनच चाणूराचे म्हणणे ऐकून आणि त्याचे स्वागत करून देशकालानुरुप ते म्हणाले. (३६)


प्रजा भोजपतेरस्य वयं चापि वनेचराः ।
करवाम प्रियं नित्यं तन्नः परमनुग्रहः ॥ ३७ ॥
चाणुरा आम्हि तो भोज कंसाची वनजो प्रजा ।
अवश्य साधिणे तैसे त्यात कल्याण आमुचे ॥ ३७ ॥

वयं - आम्ही - अस्य भोजपतेः प्रजाः (स्मः) - या कंसराजाच्या प्रजा आहो - वनेचराः च अपि - आणि अरण्यात हिंडणारेहि आहो - नित्यं (तस्य) प्रियं करवामः - आम्ही त्याचे नित्य प्रिय करावे - तत् परम् अनुग्रहः - तोच आमच्यावर मोठा अनुग्रह होय. ॥३७॥
चाणूरा ! आम्हीसुद्धा या भोजराज कंसाची वनवासी प्रजा आहोत. त्यांना आवडणारी गोष्ट आम्ही नेहमी केली पाहिजे. त्यातच आमचे उत्तम कल्याण आहे. (३७)


बाला वयं तुल्यबलैः क्रीडिष्यामो यथोचितम् ।
भवेन्नियुद्धं माधर्मः स्पृशेन्मल्ल सभासदः ॥ ३८ ॥
परी बालक हो आम्ही समान वयिचे असे ।
पाठवा कुस्तिला तेणे पंचा न्यायार्थ होग्य हो ॥ ३८ ॥

मल्ल - हे मल्ला चाणूरा - वयं बालाः - आम्ही लहान मुले आहोत - (यथा) अधर्मः सभासदः मा स्पृशेत् - जेणेकरून अधर्म सभेतील लोकांना स्पर्श करणार नाही - नियुद्धं (च) भवेत् - आणि मल्लयुद्धहि होईल - (तथा) तुल्यबलैः यथोचितं क्रीडिष्यामः - तशाप्रकारे योग्यतेनुसार समबल मल्लांशी क्रीडा करू. ॥३८॥
परंतु चाणूरा ! आम्ही लहान आहोत. म्हणून आम्ही आमच्या बरोबरीची ताकद असणार्‍या मुलांबरोबरच कुस्ती खेळू. कुस्ती ही सारखी शक्ती असणार्‍यांशीच झाली पाहिजे, त्यामुळे अन्यायाचे समर्थन केल्याचे पाप कुस्ती पाहाणार्‍या सभासदांना लागणार नाही. (३८)


चाणूर उवाच -
न बालो न किशोरस्त्वं बलश्च बलिनां वरः ।
लीलयेभो हतो येन सहस्रद्विपसत्त्वभृत् ॥ ३९ ॥
चाणूर म्हणाला -
अहो तुम्ही नसा बाल किशोर नच भासता ।
सहस्र हत्तिची शक्ती असा कुंजर मारिला ॥ ३९ ॥

त्वं च बलः - तू आणि बलराम - बालः न किशोरः न - बाल नव्हे व लहान मुलेहि नव्हे - बलिनां वरः - तर बलवानात श्रेष्ठ आहा - येन (त्वया) - ज्या तू - सहस्रद्विपसत्त्वभृत् - हजार हत्तींचे सामर्थ्य असणारा - इभः - कुवलयापीड हत्ती - लीलया हतः - लीलेने मारिला. ॥३९॥
चाणूर म्हणाला- अरे ! तू आणि बलराम दोघेही बाल नाहीत की किशोरही नाहीत. तुम्ही बलवानांमध्येही श्रेष्ठ आहात. तू एक हजार हत्तींचे बळ असणार्‍या कुवलयापीडाला सहज मारलेस. (३९)


तस्माद् भवद्‍भ्यां बलिभिः योद्धव्यं नानयोऽत्र वै ।
मयि विक्रम वार्ष्णेय बलेन सह मुष्टिकः ॥ ४० ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां दशमस्कन्धे पूर्वार्धे कुवलयापीडवधो नाम त्रिचत्वारिंशोऽध्यायः ॥ ४३ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
म्हणोनी तुम्हि दोघांनी लढणे आमुच्या सवे ।
कृष्णा तू मजसी तैसे रामा मुष्टिक तो लढे ॥ ४० ॥
॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर त्रेचाळिसावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

वार्ष्णेय - हे यादवकुलोत्पन्ना श्रीकृष्णा - तस्मात् - म्हणून - भवद्‌भ्यां - तुम्हा दोघांनी - बलिभिः योद्धव्यं - बलिष्ठ योद्ध्यांबरोबर मल्लयुद्ध करावे - अत्र वै अनयः न - ह्यात खरोखर अन्याय नाही - (त्वं) मयि विक्रम - तू माझ्याबरोबर पराक्रमाने मल्लयुद्ध कर - मुष्टिकः बलेन सह (विक्रमतु) - मुष्टिक हा बलरामाबरोबर मल्लयुद्ध करो. ॥४०॥
म्हणून तुम्ही दोघांनी बलवानांबरोबरच लढावे यात अन्याय मुळीच नाही. म्हणून श्रीकृष्णा ! तू माझ्याबरोबर कुस्ती खेळ आणि बलरामाबरोबर मुष्टिक लढेल. (४०)


अध्याय त्रेचाळिसावा समाप्त

GO TOP