श्रीमद् भागवत पुराण
दशमः स्कन्धः
एकचत्वारिंशोऽध्यायः

रामकृष्णयोर्मथुरायां प्रवेशः; रजकवधः
वायकमालाकारयोरनुग्रहेणं च -

श्रीकृष्णांचा मथुरेत प्रवेश -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् )
स्तुवतस्तस्य भगवान् दर्शयित्वा जले वपुः ।
भूयः समाहरत् कृष्णो नटो नाट्यमिवात्मनः ॥ १ ॥
( अनुष्टुप् )
श्रीशुकदेव सांगतात -
अक्रूर स्तविता ऐसे कृष्णाने विश्वरूप ते ।
दाविले लोपिले जैसे नट तो बदली रुपे ॥ १ ॥

भगवान् कृष्णः - भगवान श्रीकृष्ण - स्तुवतः तस्य - स्तुति करणार्‍या त्या अक्रूराला - आत्मनः वपुः - आपले शरीर - जले दर्शयित्वा - पाण्यात दाखवून - नटः नाटयम् इव - नाटकी पुरुष स्वीकारलेल्या वेषाप्रमाणे - भूयःसमाहरत् - पुनः गुप्त करिता झाला. ॥१॥
श्रीशुकाचार्य म्हणतात- अक्रूर अशी स्तुती करीत असतानाच एखाद्या नटाने एखादी भूमिका संपल्यावर पुन्हा मूळ रूपात यावे, त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी त्याला पाण्यामध्ये आपल्या दिव्यरूपाचे दर्शन घडविले आणि पुन्हा ते आवरून घेतले. (१)

विवरण :- यमुनेच्या जलात स्नान करणार्‍या अक्रूरास एकाच वेळी, एकाच कृष्णाचे रूप दोन ठिकाणी दिसले. एक रथात आणि दुसरे जलात, तो भांबावला. पण नंतर तो सर्व शंकारहित झाला, आणि कृष्णाची स्तुति करू लागला. कृष्णानेहि आपले नाटय आवरते घेतले, एखाद्या नटाप्रमाणे. ज्याप्रमाणे एखादा नट आपली नाटकातील भूमिका काही काळच, तेवढयाच पुरती करतो, आणि पुन्हा आपल्या पूर्वीच्या मूळ रूपात येतो, त्याप्रमाणे कृष्णानेहि आपले रूप दोन ठिकाणी दाखविले आणि नंतर रथात असलेले आपले मूळ रूप धारण केले. (१)



सोऽपि चान्तर्हितं वीक्ष्य जलाद् उन्मज्ज्य सत्वरः ।
कृत्वा चावश्यकं सर्वं विस्मितो रथमागमत् ॥ २ ॥
अंतर्धान असे रूप पाहता पातले तिथे ।
बाहेर, येउनी कर्म केले नी रथिं बैसले ॥ २ ॥

अपि च - आणखी - सः - तो अक्रूर - (तत्) अन्तर्हितं वीक्ष्य - ते रूप गुप्त झाले असे पाहून - सत्वरः जलात् उन्मज्य - लवकर पाण्यातून बाहेर येऊन - च आवश्यकं सर्वं कृत्वा - आणि आवश्यक असे सर्व विधि करून - विस्मितः रथम् आगमत् - आश्चर्यचकित होऊन रथाजवळ आला. ॥२॥
भगवंतांचे ते दिव्यरूप अंतर्धान पावलेले पाहून तो पाण्याबाहेर आला आणि लगबगीने सर्व आवश्यक नित्यकर्मे पार पाडून चकित अवस्थेत रथाकडे परतला. (२)


तं अपृच्छद् हृषीकेशः किं ते दृष्टमिवाद्‍भुतम् ।
भूमौ वियति तोये वा तथा त्वां लक्षयामहे ॥ ३ ॥
विस्मीत दिसता त्यांना कृष्णाने पुसले असे ।
पाण्यात पृथिवी किंवा आकाश पाहिलेत का ? ॥ ३ ॥

हृषीकेशः - श्रीकृष्ण - भूमौ वियति वा तोये - पृथ्वीवर, आकाशात किंवा पाण्यात - अद्‌भुतम् इव - आश्चर्य करण्यासारखे - दृष्टं किं - तू काही पाहिलेस काय - तथा त्वां लक्षयामहे - तशासारखा आम्ही तुला पाहतो - (इति) तम् अपृच्छत् - असे त्या अक्रूराला विचारिता झाला. ॥३॥
श्रीकृष्णांनी त्याला विचारले, "काका ! आपण पृथ्वी, आकाश किंवा पाण्यामध्ये एखादी अद्‍भूत वस्तू पाहिलीत काय ? कारण आपल्याकडे पाहिल्यावर असेच वाटते." (३)


श्रीअक्रूर उवाच -
अद्‍भुतानीह यावन्ति भूमौ वियति वा जले ।
त्वयि विश्वात्मके तानि किं मेऽदृष्टं विपश्यतः ॥ ४ ॥
अक्रूर म्हणाला -
प्रभो पृथ्वी जलामध्ये अद्‌भूत नाभिचेहि ते ।
सर्वची तुझिया रूपीं प्रत्यक्ष पाहिले असे ॥ ४ ॥

इह भूमौ - ह्या पृथ्वीतलावर - वियति जले वा - आकाशात किंवा उदकात - यावन्ति अद्भुतानि (सन्ति) - जितकी म्हणून आश्चर्ये आहेत - तानि विश्वात्मके त्वयि - तितकी सर्व जगद्रूपी अशा तुझ्या ठिकाणी - विपश्यतः मे - पाहणार्‍या माझ्याकडून - अदृष्टं किम् (अस्ति) - पाहिले गेले नाही असे काय बरे आहे. ॥४॥
अक्रूर म्हणाला- प्रभो ! पृथ्वी, आकाश किंवा पाण्यामध्ये जितके म्हणून अद्‍भुत पदार्थ आहेत, ते सर्व विश्वस्वरूप आपल्यामध्येच आहेत. जर मी आपल्यालाच पाहात आहे, तर अशी कोणती अद्‍भूत वस्तू असणार आहे की, जी मी पाहिली नाही ? (४)


यत्राद्‍भुतानि सर्वाणि भूमौ वियति वा जले ।
तं त्वानुपश्यतो ब्रह्मन् किं मे दृष्टमिहाद्‍भुतम् ॥ ५ ॥
अद्‌भूत तेवढ्या वस्तू पाहतो तुझिया रुपी ।
मग मी सलिला मध्ये वेगळे काय पाहतो ॥ ५ ॥

ब्रह्मन् - हे ब्रह्मस्वरूपी श्रीकृष्णा - भूमौ वियति जले वा - पृथ्वीवरील, आकाशातील किंवा उदकातील - सर्वाणि अद्‌भुतानि - सर्व आश्चर्ये - यत्र (सन्ति) - ज्याठिकाणी आहेत - तं त्वा अनुपश्यतः - त्या तुला पाहणार्‍या - मे - माझ्याकडून - इह - येथे - किं अद्‌भुतं अदृष्टं - कोणते आश्चर्य पाहिले गेले नाही. ॥५॥
भगवन ! जेवढ्या म्हणून अद्‍भूत वस्तू आहेत, त्या पॄथ्वीवर असोत, पाण्यात असोत, किंवा आकाशात असोत त्या सगळ्या ज्यांच्यामध्ये आहेत, त्या आपल्यालाच मी पाहिल्यावर त्याखेरीज अद्‍भूत वस्तू मी कोणती पाहणार ? (५)


इत्युक्त्वा चोदयामास स्यन्दनं गान्दिनीसुतः ।
मथुरां अनयद् रामं कृष्णं चैव दिनात्यये ॥ ६ ॥
गादिनीनंदने ऐसे बोलता हाकिला रथ ।
ढळता दिन तो गेले मथुरापुरिं सर्व ते ॥ ६ ॥

गांदिनीसुतः - गांदिनीचा पुत्र अक्रूर - इति उक्त्वा - असे बोलून - स्यन्दनं चोदयामास - रथ हाकिता झाला - च - आणि - दिनात्यये - संध्याकाळी - रामं कृष्णं च - राम व कृष्ण यांना - मथुराम् अनयत् - मथुरेत आणिता झाला. ॥६॥
गांदिनीपुत्र अक्रूराने असे म्हणून रथ हाकला आणि त्याने श्रीकृष्ण आणि बलरामांना दिवस मावळतेवेळी मथुरापुरीत आणले. (६)


मार्गे ग्रामजना राजन् तत्र तत्रोपसङ्‌गताः ।
वसुदेवसुतौ वीक्ष्य प्रीता दृष्टिं न चाददुः ॥ ७ ॥
मार्गात स्थान स्थानी ते मथुरावासि भेटले ।
हर्षले पाहता दोघा न त्यांची पापणी हले ॥ ७ ॥

राजन् - हे परीक्षित राजा - मार्गे - मार्गात - तत्रतत्र - त्या त्या ठिकाणी - उपसङगताः - जवळ येऊन जमलेले - ग्रामजनाः - गावातील लोक - वसुदेवसुतौ वीक्ष्य - वसुदेवाच्या त्या दोघा पुत्रांना पाहून - प्रीताः - आनंदित झालेले - दृष्टिं न च आददुः - तेथून आपली दृष्टि वळविते झाले नाहीत. ॥७॥
परीक्षिता ! वाटेत ठिकठिकाणी लागणार्‍या गावातील लोक भेटण्यासाठी येत आणि वसुदेवपुत्रांना पाहून इतके आनंदमग्न होऊन जात की, ते आपली दृष्टी बाजूला करू शकत नसत. (७)


तावद् व्रजौकसस्तत्र नन्दगोपादयोऽग्रतः ।
पुरोपवनमासाद्य प्रतीक्षन्तोऽवतस्थिरे ॥ ८ ॥
नंदबाबादि ते सारे आधीच पोचले तिथे ।
पुराच्या द्वारि ते सर्व वाट पाहात थांबले ॥ ८ ॥

तावत् - तितक्यात - तत्र - तेथे - नन्दगोपादयः व्रजौकसः - नन्द, गोप इत्यादि गोकुळात राहणारे लोक - पुरोपवनम् आसाद्य - गावातील बागेत येऊन - प्रतीक्षन्तः - वाट पहात - अग्रतः - अगोदरच - अवतस्थिरे - बसले. ॥८॥
नंद इत्यादी गोप अगोदरच तेथे जाऊन पोहोचले होते आणि मथुरेच्या बाहेर उपवनात त्यांची वाट पाहात होते. (८)


तान् समेत्याह भगवान् अक्रूरं जगदीश्वरः ।
गृहीत्वा पाणिना पाणिं प्रश्रितं प्रहसन्निव ॥ ९ ॥
तयांच्या पाशि श्री कृष्णे अक्रुराहात ते स्वयें ।
हातात धरले आणि विनये बोलला असे ॥ ९ ॥

भगवान् जगदीश्वरः - भगवान श्रीकृष्ण - तान् समेत्य - त्यांच्याजवळ येऊन - पाणिना पाणिं गृहीत्वा - हातात हात घालून - प्रहसन् इव - हसल्याप्रमाणे दाखवून - प्रश्रितम् अक्रूरं आह - नम्र अशा अक्रूराला म्हणाला. ॥९॥
त्या सर्वांच्याजवळ जाऊन विनम्रपणे उभे असलेल्या अकृराचा हात आपल्या हातात घेऊन जगदीश्वर भगवान श्रीकृष्णांनी हसत हसत म्हटले- (९)


भवान् प्रविशतामग्रे सहयानः पुरीं गृहम् ।
वयं त्विहावमुच्याथ ततो द्रक्ष्यामहे पुरीम् ॥ १० ॥
काका ! प्रथम हा तुम्ही न्यावा रथ पुरां घरी ।
नगरा पाहण्या पायी येतो आम्ही इथोनिची ॥ १० ॥

सहयानः भवान् - रथासह तू - अग्रे - अगोदर - पुरीं (गत्वा) गृहं प्रविशताम् - गावात जाऊन घरी जावे - वयं तु - आम्ही तर - इह - येथे - अवमुच्य - रथातून उतरून - अथ - नंतर - ततः - मागाहून - पुरीं द्रक्ष्यामहे - गाव पाहण्यास जाऊ. ॥१०॥
काका ! आपण अगोदर रथासह पुढे जाऊन मथुरेत प्रवेश करा आणि आपल्या घरी जा. आम्ही येथे थांबून नंतर नगर पाहू. (१०)


श्रीअक्रूर उवाच -
नाहं भवद्‍भ्यां रहितः प्रवेक्ष्ये मथुरां प्रभो ।
त्यक्तुं नार्हसि मां नाथ भक्तं ते भक्तवत्सल ॥ ११ ॥
अक्रुरजी म्हणाले -
प्रभो ! तुम्हा विना मी तो नगरीं जाउ ना शके ।
स्वामी मी आपुला भक्त न सोडा मजला असे ॥ ११ ॥

प्रभो नाथ - हे समर्था श्रीकृष्णा - अहं - मी - भवद्‌भ्यां रहितः - तुझ्या शिवाय - मथुरां न प्रवेक्ष्ये - मथुरेत शिरणार नाही - भक्तवत्सल - हे भक्तांवर प्रेम करणार्‍या श्रीकृष्णा - ते भक्तं मां - तुझा भक्त अशा मला - त्यक्तुं न अर्हसि - टाकण्यास योग्य नाहीस. ॥११॥
अक्रूर म्हणाला- प्रभो ! मी आपणा दोघांखेरीज मथुरेत जाऊ शकत नाही. स्वामी ! मी आपला भक्त आहे. हे भक्तवत्सल प्रभो ! आपण मला एकट्याला सोडू नका. (११)


आगच्छ याम गेहान् नः सनाथान् कुर्वधोक्षज ।
सहाग्रजः सगोपालैः सुहृद्‌भिश्च सुहृत्तम ॥ १२ ॥
या चला बळिनी तुम्ही बाळगोपाळ नंदजी ।
प्रेमाने घर ते माझे सनाथ करणे हरि ॥ १२ ॥

सुहृत्तम अधोक्षज - हे श्रेष्ठ श्रीकृष्णा - सहाग्रजः - बलरामासह - सगोपालैः सुहृद्भिः च (सह) - गोपाळांसह व मित्रांसह - आगच्छ - चल - याम - जाऊ या - नः गेहान् सनाथान् कुरु - आमची घरे सनाथ कर. ॥१२॥
भगवन ! या. आपण माझ्याबरोबर चला. हे परम हितैषी भगवन ! आपण स्वतः बलराम, गोपाल, तसेच नंद इत्यादी आप्तांसह येऊन माझे घर सनाथ करा. (१२)


पुनीहि पादरजसा गृहान्नो गृहमेधिनाम् ।
यच्छौचेनानुतृप्यन्ति पितरः साग्नयः सुराः ॥ १३ ॥
गृहस्थाच्या घरापायधुळिने पावनो करा ।
देवता अग्नि नी गंगा पितरे तृप्तती पदीं ॥ १३ ॥

यच्छौचेन - ज्याच्या पादोदकाने - पितरः - पितर - (च) साग्नयः सुराः - आणि अग्नीसह देव - अनुतृप्यन्ति - तृप्त होतात - (तस्य ते) पादरजसा - त्या तुझ्या पायाच्या धुळीने - गृहमेधिनां नः - गृहस्थाश्रमी अशा आमची - गृहान् - घरे - पुनीहि - पवित्र कर ॥१३॥
आम्हां गृहस्थांची घरे आपल्या चरणधुळीने पावन करा. नंतर आम्ही आपले चरण धुऊ. त्या आपल्या चरणोदकाने अग्नी, देवता, पितर असे सर्वजण तृप्त होतील. (१३)


अवनिज्याङ्‌घ्रियुगलं आसीत् श्लोक्यो बलिर्महान् ।
ऐश्वर्यं अतुलं लेभे गतिं चैकान्तिनां तु या ॥ १४ ॥
तुमचे धुवुनी पाय बळीनें यश मेळिले ।
गाती संत सदा ज्याते भक्तांना गति श्रेष्ठ ती ॥ १४ ॥

- महान् बलिः - महात्मा बलिराजा - (तव) अङ्‌घ्रियुगलं अवनिज्य - तुझे दोन चरण धुऊन - श्लोक्यः आसीत् - स्तुतीला पात्र झाला - च - आणि - अतुलं ऐश्वर्यं - निरुपम ऐश्वर्य - (तथा) एकान्तिनां तु या (गतिः) - त्याचप्रमा
प्रभो ! आपले पाद्यपूजन करूनच बली महान पुण्यश्लोक ठरला. इतकेच नव्हे तर अनन्य भक्तांना मिळणारे अतुलनीय ऐश्वर्य आणि मोक्ष त्याला प्राप्त झाला. (४१)


आपस्तेऽङ्‌घ्र्यवनेजन्यः त्रींल्लोकान् शुचयोऽपुनन् ।
शिरसाधत्त याः शर्वः स्वर्याताः सगरात्मजाः ॥ १५ ॥
तुझ्याचि पदिची गंगा त्रिलोक ताप नाशिते ।
खरे पवित्र ते तीर्थ शंकरे शिरि घेतले ॥ १५ ॥

शर्वः - शंकर - याः शिरसा अधत्त - जे उदक मस्तकाने धरिता झाला - (याभिः) सगरात्मजाः - ज्या उदकाने सगरपुत्र - स्वः याताः - स्वर्गाला गेले - ताः - ते - (ते) अङ्‌घ्य्रवनेजन्यः शुचयः आपः - तुझे पाय धुण्याचे पवित्र उदक - त्रीन् लोकान् अपुनन् - त्रैलोक्याला पवित्र करते झाले. ॥१५॥
आपले चरण धुतलेले पाणी हेच पवित्र गंगोदक होय. त्याने तिन्ही लोक पवित्र केले. त्याच्याच स्पर्शाने सगराच्या पुत्रांना सद्‌गती प्राप्त झाली आणि तेच जल शंकरांनी आपल्या मस्तकावर धारण केले. (१५)


देवदेव जगन्नाथ पुण्यश्रवणकीर्तन ।
यदूत्तमोत्तमःश्लोक नारायण नमोऽस्तु ते ॥ १६ ॥
देवांचा देव तू स्वामी कीर्तनीय तुझ्या लिला ।
पुण्यश्लोक यशा गाती तुला मी प्रणिपातितो ॥ १६ ॥

देवदेव जगन्नाथ - हे देवश्रेष्ठा जगन्नाथा - पुण्यश्रवणकीर्तन - ज्याचे श्रवण व कीर्तन पुण्यकारक आहे अशा हे कृष्णा - यदूत्तमोत्तमश्लोक - श्रेष्ठ यदुकुलामध्ये उत्कर्षाला पावली आहे कीर्ति ज्याची अशा हे श्रीकृष्णा - नारायण ते नमः अस्तु - हे नारायणा तुला नमस्कार असो. ॥१६॥
हे यदुश्रेष्ठा ! हे देवाधिदेवा ! हे जगताचे स्वामी ! आपल्या गुणांचे आणि लीलांचे श्रवण व कीर्तन मंगलकारक आहे. उत्तम पुरुष आपल्या गुणांचे कीर्तन करीत असतात. हे नारायणा ! मी आपणास नमस्कार करतो. (१६)


श्रीभगवनुवाच -
आयास्ये भवतो गेहं अहमार्यसमन्वितः ।
यदुचक्रद्रुहं हत्वा वितरिष्ये सुहृत्प्रियम् ॥ १७ ॥
श्री भगवान् म्हणाले -
काका मी दाउच्या संगे येईन आपुल्या घरा ।
यदुंचा शत्रु तो कंस मारिता सुखवीन मी ॥ १७ ॥

अहं - मी - आर्यसमन्वितः - बलरामासह - भवतः गेहं आयास्ये - तुझ्या घरी येईन - यदुचक्रद्रुहं हत्वा - यादवसंघाशी शत्रुत्व करणार्‍या कंसाला मारून - सुहृत्प्रियं वितरिष्ये - मित्रांचे प्रिय करीन. ॥१७॥
श्रीभगवान म्हणाले - काका ! मी माझ्या दादाबरोबर आपल्या घरी येईन, पण अगोदर या यादवांच्या शत्रूला मारून माझ्या आप्तेष्टांना सुखी करीन. (१७)


श्रीशुक उवाच -
एवमुक्तो भगवता सोऽक्रूरो विमना इव ।
पुरीं प्रविष्टः कंसाय कर्मावेद्य गृहं ययौ ॥ १८ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
भगवान् बोलता ऐसे काका ते हिरमूसले ।
नगरी जाउनी कंसा सांगोनी घरि पातले ॥ १८ ॥

भगवता एवम् उक्तः - श्रीकृष्णाने याप्रमाणे बोलला गेलेला - सः अक्रूरः - तो अक्रूर - विमनाः इव (भूत्वा) - खिन्न झाल्यासारखा होऊन - पुरीं प्रविष्टः - मथुरेत शिरला - (च) कंसाय आवेद्य - आणि कंसाला सांगून - गृहं ययौ - घरी गेला. ॥१८॥
श्रीशुकदेव म्हणतात- भगवंतांनी असे म्हटल्यानंतर थोडासा खिन्न झालेला अक्रूर नगरात गेला आणि त्याने कंसाला त्याचे काम केल्याचे निवेदन केले आणि तो आपल्या घरी गेला. (१८)


अथापराह्ने भगवान् कृष्णः सङ्‌कर्षणान्वितः ।
मथुरां प्राविशद् गोपैः दिदृक्षुः परिवारितः ॥ १९ ॥
नगरी दिनि तिसर्‍या प्रहरी कृष्ण नी बलो ।
मथुरा पाहण्या गेले नगरी त्या प्रवेशुनी ॥ १९ ॥

अथ - नंतर - अपराह्‌णे - दुपारी - भगवान् कृष्णः - भगवान श्रीकृष्ण - संकर्षणान्वितः - बलरामासह - गोपैः परिवारितः - गोपांनी वेष्टिलेला असा - मथुरां दिदृक्षुः - मथुरा पाहण्याच्या इच्छेने - प्राविशत् - आत शिरला. ॥१९॥
नंतर तिसर्‍या प्रहरी, बलराम आणि गोपालांसह भगवान श्रीकृष्णांनी मथुरा पाहाण्यासाठी त्या नगरात प्रवेश केला. (१९)


( मिश्र )
ददर्श तां स्फाटिकतुङ्ग गोपुर
     द्वारां बृहद् हेमकपाटतोरणाम् ।
ताम्रारकोष्ठां परिखादुरासदां
     उद्यान रम्योप वनोपशोभिताम् ॥ २० ॥
( इंद्रवज्रा )
किल्ल्यास तेथे स्फटिकीच भिंती
     गोपूर तैसे बहु फाटकेही ।
सुवर्ण द्वारे अन तोरणे ती
     भिंतीस तांबे पितळो हि होते ।
प्रवेशण्याला बहु तो कठीण
     असाचि होता चर तो जलाचा ।
स्थळो स्थळी त्या रमण्यास बागा
     शोभा अशी शोभलि थोर तेथे ॥ २० ॥

स्फाटिकतुङगगोपुरद्वारां - स्फटिकाच्या उंच वेशी व दरवाजे जिला आहेत अशा - बृहद्धेमकपाटतोरणां - मोठमोठी सुवर्णाची कवाडे व तोरणे जिथे आहेत अशा - ताम्रारकोष्ठां - तांब्यापितळेची कोठारे आहेत अशा - परिखादुरासदां - भोवतीच्या खंदकामुळे आत प्रवेश होण्यास कठीण अशा - उद्यानरम्योपवनोपशोभिताम् - उद्याने व रमणीय उपवने ह्यांनी शोभणार्‍या - तां ददर्श - त्या मथुरा नगरीला पाहता झाला. ॥२०॥
भगवंतांनी पाहिले की, नगराच्या तटांना स्फटिकांची उंच उंच गोपुरे असून घरांना सुद्धा स्फटिकांची दारे लावलेली आहेत. त्यांना सोन्याचे मोठमोठे दरवाजे आणि सोन्याचीच तोरणे लावलेली आहेत. नगरात तांब्या-पितळेची धान्यांची कोठारे, पागा इत्यादी आहेत. चोहोबाजूंच्या खंदकामुळे कोठूनही त्या नगरात प्रवेश करणे कठीण आहे. जागोजागी असलेल्या फळबागांनी व रमणीय फुलबागांनी ती नगरी शोभिवंत दिसत आहे. (२०)


सौवर्णशृङ्‌गाटकहर्म्यनिष्कुटैः
     श्रेणीसभाभिः भवनैरुपस्कृताम् ।
वैदूर्यवज्रामलनीलविद्रुमैः
     मुक्ताहरिद्‌भिर्वलभीषु वेदिषु ॥ २१ ॥
ते चौक मोठे धनको महाल
     ओटे सभास्थान नि थोर वाडे ।
घरेहि तेथे अतिरम्य तैसी
     जेणे पुरा वाढतसेचि शोभा ॥ २१ ॥

सौवर्णशृङगाटकहर्म्यनिष्कुटैः - सोन्याचे चव्हाटे, श्रीमंतांची घरे, व घराजवळील बागबगीचे यांनी - श्रेणीसभाभिः - शिल्पशास्त्रज्ञांच्या बसण्याच्या ठिकाणांनी - भुवनैः - घरांनी - उपस्कृतां - शोभणार्‍या - वैदूर्यवज्रामलनीलविद्रुमैः - वैडूर्यमणी, हिरे, निर्मळ नीलमणी व पोवळी यांनी - मुक्ताहरिद्भिः - मोती व पाचू ह्यांनी - वलभीषु - वळचणीच्या ठिकाणी - वेदिषु - ओटयांवर - उपस्कृतां - सुशोभित केलेली अशा. ॥२१॥
सुवर्णाने सजविलेले चौक, धनिकांचे महाल, त्यांच्या सभोवतालचे बगीचे, कारागिरांचे बाजार व लोकांची निवासस्थाने नगराची शोभा वाढवीत आहेत. वैडूर्य, हिरे, स्फटिक, नील, पोवळी, मोती आणि पाचू इत्यादींनी मढविलेले सज्जे, चबुतरे, झरोके आणि फरशा झगमगत आहेत. (२१)


जुष्टेषु जालामुखरन्ध्रकुट्टिमेषु
     आविष्टपारावतबर्हिनादिताम् ।
संसिक्तरथ्यापणमार्गचत्वरां
     प्रकीर्णमाल्याङ्‌कुरलाजतण्डुलाम् ॥ २२ ॥
वैडूर्य रत्‍ने पवळे नि मोती
     यांनी झरोके सजलेहि सज्जे ।
बाजार चौकी पडले सडे नी
     स्थळी स्थळी अंकुर पुष्प शोभा ॥ २२ ॥

जुष्टेषु - सेविलेल्या - जालामुखरन्ध्रकुट्टिमेषु - खिडक्यांची छिद्रे व रत्नखचितभूमी त्या ठिकाणी - आविष्टपारावतबर्हिनादिताम् - बसलेल्या पारव्यांनी व मोरांनी गजबजून टाकिलेल्या - संसिक्तरथ्यापणमार्गचत्वरां - शिंपले आहेत राजमार्ग, पेठा व चव्हाटे जेथील अशा - प्रकीर्णमाल्याङ्‌कुरलाजतण्डुलाम् - जिकडेतिकडे पसरल्या आहेत फुलांच्या माळा, अंकुर, लाह्या व तांदूळ ज्याठिकाणी अशा. ॥२२॥
त्यांच्यावर बसलेले मोर, कबूतर इत्यादी पक्षी निरनिराळ्या बोली बोलत आहेत. सडका, बाजार, गल्ल्या आणि चौकांमध्ये पुष्कळ सुगंधी पाणी शिंपडलेले आहे. ठिकठिकाणी फुले, जवाचे अंकुर, लाह्या आणि तांदूळ पसरलेले आहेत. (२२)


आपूर्णकुम्भैर्दधिचन्दनोक्षितैः
     प्रसूनदीपावलिभिः सपल्लवैः ।
सवृन्दरम्भाक्रमुकैः सकेतुभिः
     स्वलङ्‌कृतत् द्वारगृहां सपट्टिकैः ॥ २३ ॥
दारावरी ते घट चंदनाचे
     दह्यादुधाने बहु चोपडीले ।
सपुष्प फांद्या सफलाहि कांही
     वस्त्रें असे ते घट शोभलेले ॥ २३ ॥

दधिचन्दनोक्षितैः आपूर्णकुम्भैः - दही व चंदनोदक यांनी शिंपिलेल्या पाण्यांनी भरलेल्या घटांनी - सपल्लवैः प्रसूनदीपावलिभिः - आंब्याचे डाहाळे, फुले व दिव्यांच्या रांगा यांनी - सपट्टिकैः सकेतुभिः - वस्त्रांसह शोभणार्‍या पताका व ध्वज यांनी - सवृन्तरम्भाक्रमुकैः - केळफुल आणि केळीचे घड व पोफळीची शिपटे ह्यांसह केळीच्या व सुपारीच्या झाडांनी - अलंकृतद्वारगृहां - शोभणारी आहेत घरांची द्वारे जिच्या अशा. ॥२३॥
घरांच्या दरवाजांपाशी दही आणि चंदनचर्चित असे पाण्याने भरलेले कलश ठेवले आहेत. तसेच ते दरवाजे फुले, दीपमाळा, पाने, घडांसह केळी आणि सुपारीची झाडे, झेंडे आणि रेशमी पताकांनी उत्तम रीतीने सजविले आहेत. (२३)


तां सम्प्रविष्टौ वसुदेवनन्दनौ
     वृतौ वयस्यैर्नरदेववर्त्मना ।
द्रष्टुं समीयुस्त्वरिताः पुरस्त्रियो
     हर्म्याणि चैवारुरुहुर्नृपोत्सुकाः ॥ २४ ॥
सबाळगोपाळ नि त्या बळीच्या
     पुरात गेला हरि त्या पथाने ।
उत्साहि स्त्रीया चढल्या जिन्यात
     पहावया श्रीहरि तो कसा ते ॥ २४ ॥

नृप - हे राजा - नरदेववर्त्मनः - राजमार्गाने - तां संप्रविष्टौ - त्या मथुरेत शिरलेले - वयस्यैः वृतौ - व बरोबरीच्या मित्रांनी वेष्टिलेले - वसुदेवनन्दनौ - वसुदेवाचे पुत्र असे जे बलराम व श्रीकृष्ण यांना - द्रष्टुं - पाहण्याकरिता - पुरस्त्रियः - नगरातील स्त्रिया - त्वरिताः समीयुः - लवकर प्राप्त झाल्या - च - आणि - उत्सुकाः - उत्कंठित होऊन - हर्म्याणि आरुरुहुः - गच्चीवर चढल्या. ॥२४॥
हे राजा ! वसुदेवनंदन श्रीकृष्ण आणि बलराम काही मित्रांसह राजमार्गाने मथुरा नगरीत प्रवेश करीत, त्यावेळी नगरातील स्त्रिया अतिशय उत्सुकतेने त्यांना पाहाण्यासाठी लगबगीने गच्च्यांवर चढून उभ्या राहिल्या. (२४)


काश्चिग् विपर्यग्धृतवस्त्रभूषणा
     विस्मृत्य चैकं युगलेष्वथापराः ।
कृतैकपत्रश्रवणैकनूपुरा
     नाङ्‌क्त्वा द्वितीयं त्वपराश्च लोचनम् ॥ २५ ॥
घाईत वस्त्रे अन दागिनेही
     ल्याल्याचि स्त्रीया उलटे तसे की ।
पायात झुबके नुपुरेहि कर्णी
     एकाच नेत्री कुणि अंजनो ते ॥ २५ ॥

काश्चित् - कित्येक - विपर्यग्धृतवस्त्रभूषणाः - उलट धारण केली आहेत वस्त्रे व भूषणे ज्यांनी अशा - अपराः च - आणि दुसर्‍या कित्येक - युगलेषु एकं विस्मृत्य - जोडींपैकी एक वस्त्र व अलंकार विसरून - कृतैकपत्रश्रवणैकनूपुराः - ज्यांनी एकाच कानात एक कुंडल घातले आहे व एकाच पायात एकच पैंजण घातला आहे अशा - च अपराः तु - आणि दुसर्‍या स्त्रिया तर - द्वितीयं लोचनं न अङ्‌क्त्वा - दुसर्‍या डोळ्यात काजळ न घालता. ॥२५॥
त्या गडबडीमध्ये काहींनी आपली वस्त्रे आणि दागिने उलट-सुलट परिधान केले. काहींनी चुकून कुंडले, बांगड्या इत्यादी दोन-दोन घाल्यण्या‍ऐवजी विसरून एक-एकच घातले. काहीजणींनी एकाच कानामध्ये तानवडे घातले तर कोणी एकाच पायाला पैंजण बांधले. कुणी एकाच डोळ्यात काजळ घातले. (२५)


अश्नन्त्य एकास्तदपास्य सोत्सवा
     अभ्यज्यमाना अकृतोपमज्जनाः ।
स्वपन्त्य उत्थाय निशम्य निःस्वनं
     प्रपाययन्त्योऽर्भमपोह्य मातरः ॥ २६ ॥
उष्ट्या कराने कुणि पातल्या की
     न स्नान कोणी उटणे तसेची ।
झोपेत कल्गा कुणि ऐकला ती
     तशीच गेली हरी पाहण्याला ।
बाळास माता स्तन पाजताना
     टाकोनि गेल्याहि जिन्यावरी की ॥ २६ ॥

सोत्सवाः एकाः - उत्साहयुक्त कित्येक स्त्रिया - अश्नन्त्यः - भोजन करीत असता - तत् अपास्य - ते टाकून - अभ्यज्यमानाः - स्नान केले नाही ज्यांनी अशा - स्वपन्त्यः उत्थाय - निजल्या असता तशाच उठून - निःस्वनं निशम्य - शब्द ऐकून - मातरः - माता - पाययन्त्यः - दूध पाजता पाजता - अर्भं अपोह्य (निर्गताः) - मुलाला सोडून तशाच निघाल्या. ॥२६॥
काही स्त्रिया भोजन करता करता हातातील घास तसाच टाकून निघाल्या . सर्वांची मने आनंदाने भरून आली होती. काहीजणी अंगाल तेल लावीत होत्या, त्या स्नान न करताच निघाल्या. ज्या झोपी गेल्या होत्या, त्या गडबड ऐकून उठून तशाच निघाल्या. ज्या माता मुलांना दूध पाजीत होत्या, त्या त्यांना खाली ठेवून निघाल्या. (२६)


मनांसि तासामरविन्दलोचनः
     प्रगल्भलीलाहसितावलोकनैः ।
जहार मत्तद्विरदेन्द्रविक्रमो
     दृशां ददच्छ्रीरमणात्मनोत्सवम् ॥ २७ ॥
हत्तीपरी मस्तीत कृष्ण चाले
     प्रगल्भ हास्या बघता हरीच्या ।
आनंदले ते नर नारि सर्व
     हास्यात त्याने मन चोरिले की ॥ २७ ॥

मत्तद्विरेन्द्रविक्रमः - उन्मत्त गजेंद्राप्रमाणे ज्याचा पराक्रम आहे असा - श्रीरमणात्मना - व लक्ष्मीला रमविणारा असा - दृशां उत्सवं ददत् - नेत्रांना आनंद देणारा असा - अरविन्दलोचनः - कमळाप्रमाणे नेत्र असणारा श्रीकृष्ण - प्रगल्भलीलाहसितावलोकैः - प्रौढ लीलांनी केलेल्या हास्यपूर्वक अवलोकनांनी - तासां मनांसि जहार - त्या स्त्रियांची अंतःकरणे हरण करिता झाला. ॥२७॥
कमलनयन भगवान श्रीकृष्ण मदमस्त गजराजासारखे डौलाने चालत होते. लक्ष्मीलासुद्धा आनंदित करणार्‍या आपल्या रूपाने नगरातील नारींच्या डोळ्यांना त्यांनी तृप्त केले आणि आपल्या विलासपूर्ण प्रगल्भ हास्ययुक्त नजरेने त्यांची मने आकर्षित करून घेतली. (२७)


( वसंततिलका )
दृष्ट्वा मुहुः श्रुतमनुद्रुतचेतसस्तं ।
     तत्प्रेक्षणोत्स्मितसुधोक्षणलब्धमानाः ।
आनन्दमूर्तिमुपगुह्य दृशात्मलब्धं ।
     हृष्यत्त्वचो जहुरनन्तमरिन्दमाधिम् ॥ २८ ॥
( वसंततिलका )
होत्या श्रवून ललना हरिच्या लिला त्या
     पाही हसून हरिही तव त्या स्त्रियांनी ।
तो धारिला हृदयि नी पुलकीत झाल्या
     व्याकूळ चित्त अजि ते बहुशांत झाले ॥ २८ ॥

अरिंदम - हे शत्रुदमना परीक्षित राजा - मुहुःश्रुतं तं दृष्टवा - वारंवार ऐकिलेल्या त्याला पाहून - अनुद्रुतचेतसः - ज्यांचे अंतःकरण त्याचे मागे लागले आहे अशा - तत्प्रेक्षणोत्स्मितसुधोक्षणलब्धमानाः - त्याच्या पाहण्याने व स्मित हास्याने प्राप्त झालेल्या अमृतसिंचनाचा ज्यांना मान मिळाला आहे अशा - आत्मलब्धम् आनन्दमूर्तिं - अन्तःकरणात चिंतनाने प्राप्त झालेल्या आनन्दमूर्ति श्रीकृष्णाला - दृशा उपगुह्य - नेत्रांनी आलिंगन देऊन - हृष्यत्त्वचः - ज्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले आहेत अशा गोपी - अनन्तम् आधिं जहुः - अगणित अशा मनोव्यथांना टाकून देत्या झाल्या. ॥२८॥
मथुरेतील स्त्रियांचे मन वारंवार श्रीकृष्णांच्या अद्‍भूत लीला ऐकूनच त्यांना पाहाण्यासाठी व्याकूळ झाले होते. आज त्यांनी त्यांना पाहिले. आणि श्रीकृष्णांनीसुद्धा आपल्या मंद स्मितहास्ययुक्त दृष्टीचा अमृतवर्षाव करून त्यांचा सन्मान केला. परीक्षिता ! त्या स्त्रिया आपल्या डोळ्यांच्याद्वारे भगवंतांना आपल्या हृदयात घेऊन गेल्या आणि त्यांच्या आनंदमय स्वरूपाला त्यांनी आलिंगन दिले. त्यांचे शरीर पुलकित झाले आणि पुष्कळ दिवसांची त्यांची विरहव्याधी शांत झाली. (२८)


( अनुष्टुप् )
प्रासादशिखरारूढाः प्रीत्युत्फुल्लमुखाम्बुजाः ।
अभ्यवर्षन् सौमनस्यैः प्रमदा बलकेशवौ ॥ २९ ॥
( अनुष्टुप् )
सज्जात जाउनी कृष्णा नारिंनी पुष्प वाहिले ।
मुखपद्मे स्त्रियांची ती प्रेमाने फुलली पहा ॥ २९ ॥

प्रासादशिखरारूढाः - मोठमोठया राजवाडयाच्या गच्च्यांवर चढलेल्या - प्रीत्युत्फुल्लमुखाम्बुजाः - प्रीतीने प्रफुल्लित झाली आहेत मुखकमळे ज्यांची अशा - प्रमदाः - स्त्रिया - बलकेशवौ - बलराम व श्रीकृष्ण ह्यांच्यावर - सौ‌मनस्यैः - फुलांच्या मुठींनी - अभ्यवर्षन् - वृष्टि करत्या झाल्या. ॥२९॥
महालांच्या गच्च्यांवर चढून मथुरेतील स्त्रिया बलराम आणि श्रीकृष्णांवर पुष्पवर्षाव करू लागल्या. त्यावेळी त्या स्त्रियांची मुखकमले प्रेमाने प्रफुल्लित झाली होती. (२९)


दध्यक्षतैः सोदपात्रैः स्रग्गन्धैरभ्युपायनैः ।
तावानर्चुः प्रमुदिताः तत्र तत्र द्विजातयः ॥ ३० ॥
त्रिवर्णे दहि भातो नी हार चंदन अर्पुनी ।
कृष्ण नी बलरामाला या परी पूजिले असे ॥ ३० ॥

प्रमुदिताः द्विजातयः - आनंदित झालेले ब्राह्मण - तत्र तत्र - त्या त्या ठिकाणी - सौदपात्रैः दध्यक्षतैः - जलपात्रासह आणलेले दही व अक्षता यांनी - स्रग्गन्धैः अभ्युपायनैः - आणि माळा व गंध यांनी तसेच आणलेल्या भेटीच्या पदार्थांनी - तौ आनर्चुः - त्या दोघा रामकृष्णांची पूजा करिते झाले. ॥३०॥
ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्यांनी ठिकठिकाणी दही, अक्षता, पाण्याने भरलेले घट, फुलांचे हार, चंदन आणि भेटवस्तूंनी राम-कृष्णांची आनंदमय होऊन पूजा केली. (३०)


ऊचुः पौरा अहो गोप्यः तपः किमचरन् महत् ।
या ह्येतावनुपश्यन्ति नरलोकमहोत्सवौ ॥ ३१ ॥
पाहता भगवंताला वदले धन्य गोपि त्या ।
कोणते तप ते त्यांचे परमानंद पाहती ॥ ३१ ॥

अहो - अहो - हि - खरोखर - याः - ज्या - नरलोकमहोत्सवौ एतौ - मनुष्यलोकाला मोठा आनंद देणार्‍या ह्या रामकृष्णांना - अनुपश्यन्ति - नित्य पाहतात - (ताः) गोप्यः - त्या गोपी - किं महत् तपः अचरन् - कोणते मोठे तप करित्या झाल्या - (इति) पौराः ऊचुः - असे मथुरेतील लोक आपापसांत बोलू लागले. ॥३१॥
राम-कृष्णांना पाहून नगरवासी म्हणू लागले, गोपींनी असे काय तप केले आहे की, जेणेकरून, मनुष्यमात्राला परमानंद देणार्‍या या दोघांना त्या नेहमी पाहात असत. (३१)


रजकं कञ्चिदायान्तं रङ्‌गकारं गदाग्रजः ।
दृष्ट्वायाचत वासांसि धौतान्यत्युत्तमानि च ॥ ३२ ॥
रंगारी रजको कोणी कृष्णे येताचि पाहिला ।
मागे कृष्ण तया वस्त्र उत्तमोत्तम जे असे ॥ ३२ ॥

गदाग्रजः - श्रीकृष्ण - कंचित् आयातं रंगकारं रजकं - कोणी एक आलेल्या रंगाचे काम करणार्‍या परिटाला - दृष्टवा - पाहून - अत्युत्तमानि धौतानि वासांसि - अतिशय उत्तम धुतलेली वस्त्रे - अयाचत - मागता झाला. ॥३२॥
त्याच वेळी कपडे रंगविण्याचेही काम करणारा एक धोबी येत असलेला श्रीकृष्णांनी पाहिला व त्याच्याकडे त्यांनी धुतलेले अतिशय उत्तम कपडे मागितले. (३२)


देह्यावयोः समुचितानि अङ्‌ग वासांसि चार्हतोः ।
भविष्यति परं श्रेयो दातुस्ते नात्र संशयः ॥ ३३ ॥
बंधो दे असले वस्त्र पुरेल मजला तसे ।
अधिकार अम्हा तैसा भद्र होईल की तुझे ॥ ३३ ॥

अंग - हे परिटा - अर्हतोः आवयोः - योग्य अशा आम्हां दोघांना - समुचितानि वासांसि देहि - योग्य वस्त्रे दे - दातुः ते - देणार्‍या तुझे - परं श्रेयः भविष्यति - अत्यंत कल्याण होईल - अत्र संशयः न - त्यात संशय नाही. ॥३३॥
बंधो ! आमच्या अंगाला व्यवस्थित बसतील, असे कपडे ते घालण्यास पात्र असणार्‍या आम्हांला दे. तू आम्हांला वस्त्रे दिलीस, तर तुझे परम कल्याण होईल, यात बिलकूल शंका नाही. (३३)


स याचितो भगवता परिपूर्णेन सर्वतः ।
साक्षेपं रुषितः प्राह भृत्यो राज्ञः सुदुर्मदः ॥ ३४ ॥
परिपूर्ण असा कृष्ण त्याचेच सर्व विश्व हे ।
रजको मूर्ख कंसाचा क्रोधाने वदला असे ॥ ३४ ॥

राज्ञः सुदुर्मदः भृत्य - राजाचा मदोन्मत्त सेवक असा - सः - तो परीट - सर्वतः परिपूर्णेन - ज्याच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत - भगवता याचितः - अशा श्रीकृष्णाने याचिला असता - रुषितः - रागावून - साक्षेपं - उद्धटपणे - प्राह - म्हणाला. ॥३४॥
सर्व दृष्टींनी परिपूर्ण असूनही भगवंतांनी वस्त्रांची मागणी केली; परंतु राजा कंसाचा तो अतिशय उर्मट सेवक रागावून तुच्छतेने म्हणाला, (३४)


ईदृशान्येव वासांसी नित्यं गिरिवनेचराः ।
परिधत्त किमुद्‌वृत्ता राजद्रव्याण्यभीप्सथ ॥ ३५ ॥
राहता जंगली तुम्ही तिथे हे मिळतेच कां ।
उद्दाम जाहला तुम्ही राजाला लुटताय का ? ॥ ३५ ॥

उद्‌‍वृत्ताः - हे उनाड गोप हो - गिरिवनेचराः (यूयं) - पर्वतावर व अरण्यात हिंडणारे तुम्ही - ईदृशानि एव वासांसि - अशा तर्‍हेची वस्त्रे - नित्यं परिधत्त किम् - नेहमी धारण करिता काय - राजद्रव्याणि अभीप्सथ - राजाच्या वस्तूंची इच्छा करिता काय. ॥३५॥
हे उद्दामांनो ! "दर्‍या-खोर्‍यात आणि जंगलात राहाणरे तुम्ही नेहमी असेच कपडे घालता काय ? मग आजच तुम्हांला राजाचे कपडे कशाला पाहिजेत ?" (३५)


याताशु बालिशा मैवं प्रार्थ्यं यदि जिजीवीषा ।
बध्नन्ति घ्नन्ति लुम्पन्ति दृप्तं राजकुलानि वै ॥ ३६ ॥
मूर्खांनो जा पळा तैसे जगणे इच्छिता तरी ।
राजभृत्य तुम्हा आता मारोनी लुटतील की ॥ ३६ ॥

बालिशाः - अरे मूर्ख मुलांनो - आशु यात - येथून लवकर जा - यदि जिजीविषा (स्यात्) - जर जगण्याची इच्छा असेल तर - एवं मा प्रार्थ्य - असे काही मागू नका - वै - खरोखर - राजकुलानि - राजाचे सेवक - दृप्तं - गर्विष्ठाला - बध्नन्ति घ्नन्ति लुम्पन्ति - बांधतात, मारतात व लुबाडतात. ॥३६॥
तर मूर्खांनो ! लवकर येथून निघून जा ! जगण्याची इच्छा असेल तर पुन्हा अशा तर्‍हेने मागू नका. तुमच्यासारख्या उन्मतांना राजाचे शिपाई कैद करतात, त्यांना मारहाण करतात, आणि त्यांच्याजवळ जे काही असेल, ते हिसकावून घेतात. (३६)


एवं विकत्थमानस्य कुपितो देवकीसुतः ।
रजकस्य कराग्रेण शिरः कायादपातयत् ॥ ३७ ॥
ऐकता क्रोधला कृष्ण मिठिने मान आवळी ।
रजको मरुनी खाली धरेशी पडला असे ॥ ३७ ॥

कुपितः देवकीसुतः - रागावलेला श्रीकृष्ण - एवं विकत्थमानस्य - याप्रमाणे बडबड करणार्‍या - रजकस्य शिरः - परिटाचे मस्तक - कराग्रेण - हाताच्या टिचकीने - कायात् अपाहरत् - शरीरापासून हरण करिता झाला. ॥३७॥
जेव्हा तो धोबी अशी बडबड करू लागला, तेव्हा श्रीकृष्णांनी हातानेच त्याचे मस्तक उडवले. (३७)

विवरण :- मथुरेला पोचल्यानंतर रामकृष्ण आणि सर्व गोप मथुरेच्या राजमार्गावरून नगरीची शोभा पहात हिंडू लागले. तेथे त्यांनी एका रजकाकडे असणार्‍या सुंदर वस्त्रांची मागणी केली. मात्र त्याने विनाकारणच त्यांची अवहेलना अन् अपमान केला; तेव्हा संतप्त कृष्णाने एका थपडेतच त्याचा वध केला. 'यथा राजा तथा प्रजा' याचे हे एक छोटेसे उदाहरण ! कंसाच्या राज्यातील काही लोक (सर्वच नव्हेत) कसे उन्मत्त होते, हे इथे दिसते. भगवान कृष्ण सर्वसामर्थ्यसंपन्न प्रत्यक्ष परमेश्वर ! वस्त्रांची कमी त्यांना थोडीच असणार ? पण एका परटाकडे कपडे मागणे, ही ही एक लीलाच. मात्र अशी उन्मत्त माणसे जर अपमानास्पद वागणूक देऊ लागली, तर त्याला तसेच प्रायश्चित्त दिले जाते. हा धडा कृष्णाने इथे दिला. (तसेच पुढे एका विणकराने आपण होऊन वस्त्रालंकार अर्पण केले त्याचेही उत्तम फळ त्याला मिळाले.) (३६-३७)



तस्यानुजीविनः सर्वे वासःकोशान् विसृज्य वै ।
दुद्रुवुः सर्वतो मार्गं वासांसि जगृहेऽच्युतः ॥ ३८ ॥
धोब्याचे भृत्य ते सारे गठ्ठे टाकोनि धावले ।
कृष्णाने सर्व ते वस्त्र आपुल्या करि घेतले ॥ ३८ ॥

सर्वे तस्य अनुजीविनः - सर्व त्या परिटाचे सेवक - वासःकोशान् विसृज्य - वस्त्रांचे गठ्ठे टाकून - सर्वतः मार्गं दुद्रुवुः वै - जिकडे तिकडे रस्त्यात पळत सुटले - अच्युतः वासांसि जगृहे - श्रीकृष्ण वस्त्रे घेता झाला. ॥३८॥
हे पाहून धोब्याच्या हाताखाली काम करणारे सर्वजण, कपड्यांची गाठोडी तेथेच टाकून, इकडे तिकडे पळून गेले. ती वस्त्रे श्रीकृष्णांनी घेतली. (३८)


वसित्वाऽऽत्मप्रिये वस्त्रे कृष्णः सङ्‌कर्षणस्तथा ।
शेषाण्यादत्त गोपेभ्यो विसृज्य भुवि कानिचित् ॥ ३९ ॥
स्वतः नेसला कृष्ण बळीदाऊसही दिले ।
गोपांना दिधले सार्‍या बाकी तेथेचि टाकिले ॥ ३९ ॥

कृष्णः तथा संकर्षणः - कृष्ण त्याचप्रमाणे बलराम - आत्मप्रिये वस्त्रे वसित्वा - स्वतःला आवडणारी दोन वस्त्रे धारण करून - कानिचित् भुवि विसृज्य - कित्येक जागच्या जागी टाकून - शेषाणि गोपेभ्यः आदत्त - बाकीची गोपांना देता झाला. ॥३९॥
मग श्रीकृष्ण आणि बलरामांनी आपल्या मनाजोगती वस्त्रे परिधान केली. आणि उरलेल्यांपैकी पुष्कळशी वस्त्रे गोपाळांना दिली. उरलेले कपडे जमिनीवर टाकून दिले. (३९)


ततस्तु वायकः प्रीतः तयोर्वेषमकल्पयत् ।
विचित्रवर्णैश्चैलेयैः आकल्पैरनुरूपतः ॥ ४० ॥
जाता पुढे सर्व थोडे भेटला शिंपि त्याजला ।
कृष्णाचे रूप पाहोनी हर्षाने वस्त्र तो शिवी ॥ ४० ॥

ततः - त्यानंतर - वायकः तु - कोष्टी तर - प्रीतः - आनंदित होऊन - अनुरूपतः - योग्य रीतीने - विचित्रवर्णैः - चित्रविचित्र रंगाच्या - चैलेयैः - कापडाने केलेल्या - आकल्पैः - भूषणांनी - तयोः वेषम् अकल्पयत् - त्या दोघा रामकृष्णांना भूषविता झाला. ॥४०॥
ते थोडेसे पुढे गेले, तेव्हा त्यांना एक शिंपी भेटला. भगवंतांचे अनुपम सौं‍दर्य पाहून तो अत्यंत प्रसन्न झाला. त्या रंगी-बेरंगी सुंदर वस्त्रांतून त्याने त्यांना शोभणारे वेष तयार करून दिले. (४०)


नानालक्षणवेषाभ्यां कृष्णरामौ विरेजतुः ।
स्वलङ्‌कृतौ बालगजौ पर्वणीव सितेतरौ ॥ ॥
वस्त्रांनी शोभले बंधू उत्सवी जणु ते द्वय ।
हत्तीची सजली पिल्ले कृष्ण नी श्वेतवर्णि हे ॥ ४१ ॥

पर्वणि स्वलङ्‌कृतौ बालगजौ इव - उत्सवप्रसंगी भूषविलेल्या दोन लहान हत्तींप्रमाणे - सितेतरौ कृष्णरामौ - शुभ्रवर्णाचा बलराम व कृष्णवर्णाचा श्रीकृष्ण - नानालक्षणवेषाभ्यां - अनेक प्रकारच्या लक्षणांनी व अलंकारयुक्त वेषांनी - विरेजतुः - शोभते झाले. ॥४१॥
अनेक प्रकारच्या वेषांनी एक सावळा व दुसरा गोरा असे ते दोघेही आणखीनच शोभू लागले. उत्सवाच्या वेळी उत्तम सजवलेली शुभ्र आणि सावळ्या रंगांची हत्तीची पिल्ले शोभावीत तसे. (४१)

विवरण :- रजकाकडील वस्त्रे आणि विणकराने भक्तिभावाने अर्पण केलेले वस्त्रालंकार यांनी राम-कृष्ण मंडीत झाले. त्यामुळे ते एखाद्या उत्सवातील गौर(शुभ्र) आणि कृष्ण अशा छोटया हत्तीप्रमाणे शोभू लागले. यामध्ये गौर रंगाचा बलराम आणि कृष्ण तर नावाप्रमाणे 'सांवला-सलोना' पण त्या दोघांचे शरीर मात्र एखाद्या हत्तीप्रमाणे बलवान, बलदंड आणि रेखीव होते. (म्हणूनच एका थपडेने कृष्णाने रजकाला उडविले.) हत्ती हे ऐश्वर्य, गजान्तलक्ष्मी यांचे प्रतीक. शुभ पर्वणी, उत्सव, समारंभ किंवा मिरवणुकीपुढे पालखीपुढे अंबारीसह सालंकृत हत्ती हवाच. त्यामुळे राम-कृष्ण मथुरेच्या मार्गावरून जात असता ते मार्गही ऐश्वर्यसंपन्न आणि पवित्र झाले असा आशय. (४१)



तस्य प्रसन्नो भगवान् प्रादात् सारूप्यमात्मनः ।
श्रियं च परमां लोके बलैश्वर्यस्मृतीन्द्रियम् ॥ ४२ ॥
कृष्णे प्रसन्न होवोनी शिंप्याला धन नी बल ।
अतिंद्रिय अशी शक्ती देवोनी भक्तिही दिली ॥ ४२ ॥

प्रसन्नः भगवान् - प्रसन्न झालेला श्रीकृष्ण - तस्य आत्मनः सारूप्यं - त्याला स्वतःचा सारूप्यनामक मोक्ष - लोके च - आणि ह्या लोकी - बलैश्वर्यस्मृतीन्द्रिंयम् - बल, ऐश्वर्य, स्मरणशक्ति व इंद्रियकौशल्य - च परमां श्रियं - आणि अतुल संपत्ति - प्रादात् - देता झाला. ॥४२॥
भगवान श्रीकृष्ण त्या शिंप्यावर प्रसन्न झाले. त्यांनी त्याला या लोकी भरपूर संपत्ती, शक्ती, ऐश्वर्य, आपले स्मरण आणि अतींद्रिय शक्ती दिल्या. तसेच मृत्यूनंतर आपले सारूप्यही दिले. (४२)


ततः सुदाम्नो भवनं मालाकारस्य जग्मतुः ।
तौ दृष्ट्वा स समुत्थाय ननाम शिरसा भुवि ॥ ४३ ॥
पुन्हा कृष्ण सुदाम्या या माळ्याच्या घरी पातले ।
पाहता वंदिले त्याने डोके भूमीस टेकुनी ॥ ४३ ॥

ततः - नंतर - तौ - ते रामकृष्ण - सुदाम्नः मालाकारस्य भवनं - सुदामा नावाच्या माळ्याच्या घरी - जग्मतुः - गेले - सः (तौ) दृष्टवा - तो त्यांना पाहून - समुत्थाय - उठून - शिरसा भुवि ननाम - मस्तकाने पृथ्वीवर साष्टांग नमस्कार घालता झाला. ॥४३॥
नंतर ते दोघे सुदामा माळ्याच्या घरी गेले. दोघा भावांना पाहाताच त्याने उठून जमिनीवर डोके टेकवून त्यांना प्रणाम केला. (४३)


तयोरासनमानीय पाद्यं चार्घ्यार्हणादिभिः ।
पूजां सानुगयोश्चक्रे स्रक्‌ताम्बूलानुलेपनैः ॥ ४४ ॥
आसने घातली आणी धुतले हात पाय ते ।
तांबूल चंदने हारें विधिने कृष्ण पूजि तो ॥ ४४ ॥

अथ - नंतर - आसनं पाद्यं च आनीय - आसन आणि पाय धुण्यासाठी पाणी आणून - अर्हणादिभिः स्रक्ताम्बूलानुलेपनैः - पूजा साहित्य पूर्वक पुष्पमाळा, विडे व उटया ह्यांनी - सानुगयोः तयोः - अनुचर अशा गोपांसह रामकृष्णांची - पूजां चक्रे - पूजा करिता झाला. ॥४४॥
नंतर त्यांना आसनावर बसवून त्याने त्यांचे पाय धुतले आणि गोपालांसह त्यांची अर्घ्य, फुलांचे हार, पाने, चंदन इत्यादी सामग्रीने विधिपूर्वक पूजा केली. (४४)


प्राह नः सार्थकं जन्म पावितं च कुलं प्रभो ।
पितृदेवर्षयो मह्यं तुष्टा ह्यागमनेन वाम् ॥ ४५ ॥
वदे कृष्णां तुझी दोघे पातले धन्य आज मी ।
पवित्र जाहले कूळ चौऋणी मुक्त जाहलो ॥ ४५ ॥

(सः) प्राह - तो माळी म्हणाला - प्रभो - हे समर्था श्रीकृष्णा - वाम् आगमनेन - तुमच्या आगमनाने - नः जन्म सार्थकं (जातं) - आमच्या जन्माचे सार्थक झाले - कुलं च पावितं - आणि कुल पवित्र झाले - पितृदेवर्षयः - पितर, देव व ऋषी - मह्यं तुष्टाः हि - माझ्यावर खरोखर संतुष्ट झाले. ॥४५॥
आणि तो म्हणाला, हे प्रभो ! आपणा दोघांच्या आगमनाने आमचा जन्म सफळ झाला. कुळ पवित्र झाले. तसेच आज पितर, देव आणि ऋषी आमच्यावर संतुष्ट झाले, असे मी मानतो. (४५)


भवन्तौ किल विश्वस्य जगतः कारणं परम् ।
अवतीर्णाविहांशेन क्षेमाय च भवाय च ॥ ४६ ॥
दोघेही जनकल्याणा जन्मले पृथिवीवरी ।
ज्ञान बलादि अंशाने घेतला अवतार हा ॥ ४६ ॥

भवन्तौ किल - आपण खरोखर - विश्वस्य जगतः परं कारणं - संपूर्ण जगाचे मुख्य उत्पादक असून - इह - येथे - अंशेन - पूर्णांशाने - क्षेमाय च भवाय च - जगाच्या कल्याणाकरिता व उत्कर्षाकरिता - अवतीर्णौ - अवतीर्ण झाला आहा. ॥४६॥
आपण दोघेजण संपूर्ण जगताचे परम कारण आहात. आपण या संसाराचा अभ्युदय आणि मोक्ष यासाठीच या पृथ्वीवर आपल्या शक्तींसह अवतीर्ण झाला आहात. (४६)


न हि वां विषमा दृष्टिः सुहृदोर्जगदात्मनोः ।
समयोः सर्वभूतेषु भजन्तं भजतोरपि ॥ ४७ ॥
भजका पावशी तूनी तुला ना भेद तो मुळी ।
जगाचा सुहृदो तूची तूचि सर्वात व्याप्त की ॥ ४७ ॥

सुहृदोः - मित्ररूपी - जगदात्मनोः - जगात आत्मरूपाने राहणार्‍या - सर्वभूतेषु समयोः - सर्व प्राण्यांचे ठिकाणी समबुद्धि ठेवणार्‍या - भजन्तम् अपि भजतोः - भक्ति करणार्‍या भक्तांचीही सेवा करणार्‍या - वां - तुम्हा दोघांच्या ठिकाणी - विषमा दृष्टिः नहि - अधिक‌उणी दृष्टी नाही. ॥४७॥
आपण जरी भजन करणार्‍यांनाच भजता, तरीसुद्धा आपल्या दृष्टीत विषमता नाही. कारण आपण सर्व जगताचे सुहृद आणि आत्मा आहात. आपण चराचरामध्ये समरूपाने राहता. (४७)

विवरण :- विणकरावर अनुग्रह करून भगवान् सुदामा नावाच्या माळ्याच्या घरी आले. तो तर त्यांचा अनन्य भक्तच. त्याने त्या उभयतांची पूजा केली. आणि त्यांची स्तुति करीत तो म्हणाला, 'तुम्ही या विश्वाची निर्मिती केली, यातील साधू-प्राणिमात्रांना अभय दिले. सर्वांना सारखेपणाने वागविले. भक्तांमध्ये भेदभाव केला नाही. ज्याप्रमाणे कल्पवृक्ष इच्छिलेल्या गोष्टींची प्राप्ती करून देतो, त्याप्रमाणे भक्तांच्या सर्व इच्छा तुम्ही पूर्ण करता. (४६-४७)



तावज्ञापयतं भृत्यं किमहं करवाणि वाम् ।
पुंसोऽत्यनुग्रहो ह्येष भवद्‌भिः यन्नियुज्यते ॥ ४८ ॥
दास मी करणे आज्ञा सेवा काय करू तुम्हा ।
कृपेने देशि तू आज्ञा नियुक्त करिशी तुची ॥ ४८ ॥

अहं वां किं करवाणि - मी आपले कोणते काम करावे - (इति) तौ (युवां) - अशी तुम्ही उभयतांनी - भृत्यं (मां) आज्ञापयतम् - सेवक अशा मला आज्ञा द्यावी - हि - कारण - भवद्भिः यत् नियुज्यते - आपण जी आज्ञा कराल - एषः पुंसः अत्यनुग्रहः - हा पुरुषांवर केलेला मोठा उपकार होय. ॥४८॥
मी आपला दास आहे. आपण दोघांनी मला आज्ञा करावी की, मी आपली काय सेवा करू ? भगवन ! आपण जीवाला आज्ञा देऊन एखाद्या कार्यासाठी त्याची नियुक्ती करता, हा आपला त्याच्यावर मोठाच अनुग्रह आहे. (४८)


इत्यभिप्रेत्य राजेन्द्र सुदामा प्रीतमानसः ।
शस्तैः सुगन्धैः कुसुमैं माला विरचिता ददौ ॥ ४९ ॥
राजेंद्रा ! स्तविता माळी कृष्णाचा हेतु जाणुनी ।
प्रेमाने पुष्पमाला त्या गंधीत अर्पिल्या द्वया ॥ ४९ ॥

राजेंद्र - हे राजा - प्रीतमानसः सुदामा - प्रसन्न अंतःकरण झालेला सुदामा - इति अभिप्रेत्य - असा आपला अभिप्राय व्यक्त करून - शस्तैः सुगन्धैः कुसुमैः विरचितां - योग्य सुवासिक फुलांनी तयार केलेल्या - मालाः ददौ - माळा देता झाला. ॥४९॥
हे राजेंद्रा ! भगवंतांचे मनोगत जाणून सुदाम्याने मोठ्या प्रेमाने अतिशय सुंदर सुंदर सुगंधित पुष्पांनी गुंफलेले हार त्यांच्या गळ्यात घातले. (४९)


ताभिः स्वलङ्‌कृतौ प्रीतौ कृष्णरामौ सहानुगौ ।
प्रणताय प्रपन्नाय ददतुर्वरदौ वरान् ॥ ५० ॥
गोपांना दिधले तेंव्हा प्रसन्न कृष्ण जाहला ।
शरणागत त्या माळ्या श्रेष्ठची वर ते दिले ॥ ५० ॥

ताभिः स्वलंकृतौ - त्या माळांनी भूषित केलेले - प्रीतौ वरदौ - प्रसन्न झालेले व वर देण्यास उद्युक्त झालेले - सहानुगौ कृष्णरामौ - गोपांसह श्रीकृष्ण व बलराम हे - प्रणताय प्रपन्नाय (तस्मै) - नम्र व शरण आलेल्या त्या माळ्याला - वरान् ददतुः - वर देते झाले. ॥५०॥
गोपाल आणि बलरामांसह भगवान श्रीकृष्ण जेव्हा त्या सुंदर-सुंदर हारांनी अलंकृत झाले, तेव्हा त्या वरदायक प्रभूंनी प्रसन्न होऊन विनम्र आणि शरण आलेल्या सुदाम्याला वर दिले. (५०)


सोऽपि वव्रेऽचलां भक्तिं तस्मिन् एवाखिलात्मनि ।
तद्‍भक्तेषु च सौहार्दं भूतेषु च दयां पराम् ॥ ५१ ॥
सुदामा वदला कृष्णा जीवां आत्माचि तू प्रभो ।
सर्वरूप तुझ्या पायी दयाभाव असाचि दे ॥ ५१ ॥

सः अपि - तो माळी सुद्धा - अखिलात्मनि तस्मिन् एव - सर्वांचा आत्मा अशा त्या श्रीकृष्णाच्या ठिकाणीच - अचलां भक्तिं - स्थिर भक्ति - तद्भक्तेषु च - आणि त्या परमेश्वराच्या भक्तांच्या ठिकाणी - सौहार्दं - मित्रासारखे प्रेम - भूतेषु परां दयां - आणि प्राणिमात्रांच्या ठिकाणी अत्यंत दया - वव्रे - अशी मागता झाला. ॥५१॥
सुदाम्यानेही त्यांच्याकडे हाच वर मागितला की सर्वस्वरूप अशा त्यांच्या ठायी आपली दृढ भक्ती असावी, त्यांच्या भक्तांशी मैत्री असावी आणि सर्व प्राण्यांबद्दल अत्यंत दया असावी. (५१)

विवरण :- मालाकार सुदाम्यास कृष्णाने वर मागण्यास सांगितले, त्याने 'अढळ भक्ति, मित्रभाव आणि सर्व प्राणिमात्रांवर दयाभाव.' हे मागणे मागितले. यावरून त्याची खरी भगवद्‌भक्ति निरपेक्ष बुद्धी आणि उदारमनस्कता दिसून येते. तो एक साधा मालाकार होता. म्हणजे तसा सामान्य परिस्थितीचाच असणार. वर मागण्याची संधी साधून त्याला भरपूर ऐहिक समृद्धि मिळवता आली असती. त्याने ते तर मागितले नाहीच, पण खर्‍या भक्ताला शोभेल असा कायमचा भक्तिभाव मागितला. विशेष म्हणजे सर्व प्राणिमात्रांवर दया, कृपा करावी हे मागणे म्हणजे त्याच्या विशाल मनाची खूण पटवणारे आहे. संकुचित, स्वार्थी, आत्मकेंद्रित वृत्ती सोडून जगाच्या कल्याणाचा विचार करणे हे अलौकिक वृत्तीचे लक्षण त्याच्या ठिकाणी निश्चितच दिसून येते. कृष्णाच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्टय खास करून या अध्यायात दिसून येते. कृष्णाने अनुग्रह कोणा-कोणावर केला ? कामकरी, श्रमजीवी, विणकर, माळी इ. अगदी सामान्य माणसांवर. त्याने स्वतःही अवतार एका सामान्य कुलातच घेतला. (बालपण नंदाच्या घरी गेले आणि नंद गोपाल असल्याने कृष्णाचा पहिला सर्व कार्यभाग सामान्यांच्या सान्निध्यातच झाला.) आणि कोणत्याही जातीत, वर्णात जन्माला आलेल्या सामान्यांवर समबुद्धीने अनुग्रह केला हे त्याचे वैशिष्टय. त्याने कंसाचा सामना करण्यापूर्वी मथुरेच्या राजरस्त्यांवरून फेरफटका मारला, तेव्हा आपल्या लोभस, मोहक, आकर्षक व्यक्तिमत्वाने सर्वांना आपलेसे करून घेतलेच, पण परीट, माळी इ.वर अनुग्रह केल्याने जनसामान्यांची सहानुभूतीही त्याला मिळाली. इथे त्याचे मुत्सद्दी व्यक्तिमत्व दिसून येते. (५१)



इति तस्मै वरं दत्त्वा श्रियं चान्वयवर्धिनीम् ।
बलमायुर्यशः कान्तिं निर्जगाम सहाग्रजः ॥ ५२ ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां दशमस्कन्धे पूर्वार्धे पुरप्रवेशो नाम एकचत्वारिंशोऽध्यायः ॥ ४१ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
तो तो वर दिला कृष्णे अक्षयी धन ही दिले ।
कांती कीर्ती बलो आयू त्यांदेता निघले पुढे ॥ ५२ ॥
॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर एकेचाळिसावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

इति - याप्रमाणे - वरं - वर - अन्वयवर्धिनीं श्रियं च - व वंशवर्धक संपत्ति - बलं आयुः यशः कांतिं च - आणि शक्ति, आयुष्य, कीर्ति व सौंदर्य - तस्मै दत्त्वा - त्याला देऊन - सहाग्रजः (सः) निर्जगाम - बलरामासह श्रीकृष्ण तेथून निघाला. ॥५२॥
हे वर त्याला देऊन शिवाय वंशपरंपरागत वाढत जाणारी लक्ष्मी, शौर्य, आयुष्य, कीर्ती आणि सौंदर्य हेही दिले. नंतर श्रीकृष्ण बलरामांसह पुढे गेले. (५२)


अध्याय एकेचाळिसावा समाप्त

GO TOP