श्रीमद् भागवत पुराण
दशमः स्कन्धः
एकोन्चत्वारिंशोऽध्यायः

श्रीकृष्णबलरामयोर्मथुरायां प्रति प्रस्थानं
विरहकातर गोपीनां करुणोद्‌गारः
कालिंद्यां अक्रूरकर्तृकं भगवद्‌धाम दर्शनं च -

श्रीकृष्ण-बलरामांचे मथुरागमन -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् )
सुखोपविष्टः पर्यङ्‌के रमकृष्णोरुमानितः ।
लेभे मनोरथान् सर्वान् पन्पथि यान् स चकार ह ॥ १ ॥
( अनुष्टुप् )
श्रीशुकदेव सांगतात -
वाटेने चिंतिले तैसा कृष्ण नी बलरामने ।
केलासे बहु सन्मान शय्यी अक्रूर बैसले ॥ १ ॥

पर्यङ्‌के सुखोपविष्टः - पलंगावर सुखाने बसलेला - रामकृष्णोरुमानितः - बलराम आणि श्रीकृष्ण यांनी अत्यंत गौरविलेला - सः - तो अक्रूर - पथियान् मनोरथान् चकार ह - खरोखर मार्गात जे जे मनोरथ करिता झाला - (तान्) सर्वान् - त्या सर्वांना - लेभे - मिळविता झाला. ॥१॥
श्रीशुक म्हणतात - रामकृष्णांनी अक्रूराचे चांगल्या तर्‍हेने आदरातिथ्य केले. तो आरामात पलंगावर बसला. येताना वाटेत ज्या ज्या इच्छा त्याने मनात बाळगल्या होत्या, त्या सर्व पूर्ण झाल्या. (१)


किमलभ्यं भगवति प्रसन्ने श्रीनिकेतने ।
तथापि तत्परा राजन् न हि वाञ्छन्ति किञ्चन ॥ २ ॥
लक्षुमी आश्रये ज्याच्या काय तो देउ ना शके ।
तरीही हरिचे भक्त नेच्छिती कांहि वस्तु त्या ॥ २ ॥

राजन् - हे राजा - श्रीनिकेतने भगवति प्रसन्ने (सति) - लक्ष्मीचे निवासस्थान असा श्रीकृष्ण प्रसन्न झाला असता - अलभ्यं किम् (अस्ति) - मिळण्याजोगे असे काय आहे - तथा अपि - तरीसुद्धा - तत्पराः - त्याच्या ठिकाणी गढलेले लोक - किंचन - काही सुद्धाहि - न हि वाञ्छन्ति - इच्छीत नाहीत. ॥२॥
राजा ! लक्ष्मीचे आश्रयस्थान असलेले भगवान प्रसन्न झाल्यावर मिळणार नाही, असे काय आहे ? तरीसुद्धा भगवत्परायण भक्तजन कोणत्याही वस्तूची इच्छा करीत नाहीत. (२)


सायंतनाशनं कृत्वा भगवान् देवकीसुतः ।
सुहृत्सु वृत्तं कंसस्य पप्रच्छान्यच्चिकीर्षितम् ॥ ३ ॥
कृष्णाने जेवणे होता पुसले कंसवर्तन ।
पुसे क्षेम स्वलोकाचे योजनाही विचारिल्या ॥ ३ ॥

भगवान् देवकीपुत्रः - भगवान श्रीकृष्ण - सायंतनाशनं कृत्वा - सायंकाळचे भोजन करून - कंसस्य सुहृत्सु वृत्तं - कंसाचे मित्रांच्या ठिकाणी असणारे आचरण - अन्यत् चिकीर्षितम् - दुसरे बेत - पप्रच्छ - विचारिता झाला. ॥३॥
संध्याकाळचे भोजन झाल्यानंतर देवकीनंदन भगवान श्रीकृष्णांनी अक्रूराला कंसाचे नातलगांशी वागणे कसे असते, हे विचारून त्याच्या पुढील कार्यक्रमाविषयी विचारले. (३)


श्रीभगवानुवाच -
तात सौम्यागतः कच्चित् स्वागतं भद्रमस्तु वः ।
अपि स्वज्ञातिबन्धूनां अनमीवमनामयम् ॥ ४ ॥
श्री भगवान् म्हणाले -
काका मंगल हो सारे प्रवासी कष्टलात कां ।
मथुरी सुहृदो तैसे घरचे सुखरूप का ? ॥ ४ ॥

तात सौ‌म्य - हे शांत स्वभावाच्या अक्रूरा - स्वागतं - तुझे स्वागत असो - आगतः कच्चित् - तू आलास चांगले झाले - वः भद्रं अस्तु - तुमचे कल्याण असो - स्वज्ञातिबन्धूनां - आपल्या ज्ञातिबांधवांचे - अनमीवं अनामयं (च) - सौख्य आणि आरोग्य - अपि (अस्ति) - आहे ना. ॥४॥
श्रीकृष्ण म्हणाले- काका ! आपले मन पवित्र आहे. आपण आलात, आपले स्वागत असो. मी आपले कल्याण इच्छितो. मथुरेतील आमच्या आप्तस्वकीयांचे कुशल आणि आरोग्य बरे आहे ना ? (४)


किं नु नः कुशलं पृच्छे एधमाने कुलामये ।
कंसे मातुलनाम्न्यङ्‌ग स्वानां नस्तत्प्रजासु च ॥ ५ ॥
नामे मामा कुलांगार कुळाची व्याधि तो असे ।
तयाच्या नगरीचे ते क्षेम काय पुसो अम्ही ॥ ५ ॥

अङग - हे अक्रूरा - मातुलनाम्नि - मामा असे नाव धारण करणारा - कुलामये कंसे एधमाने (सति) - कुळाचा रोगच असा कंस उत्कर्ष पावत असता - नः स्वानां - आम्हा स्वकीयांचे - च - आणि - तत्प्रजासु - त्याच्या प्रजांच्या ठिकाणी - कुशलं - कुशल - किं नु पृच्छे - मी काय विचारावे. ॥५॥
अहो ! आमचा फक्त नावाचा मामा कंस म्हणजे आमच्या कुलाची व्याधीच आहे. ती वाढत असेपर्यंत आम्ही आमचे आप्तेष्ट आणि त्यांची मुले- बाळे यांच्या खुशालीविषयी काय विचारावे ? (५)


अहो अस्मदभूद् भूरि पित्रोर्वृजिनमार्ययोः ।
यद्धेतोः पुत्रमरणं यद्धेतोर्बन्धनं तयोः ॥ ६ ॥
माझ्या मुळे तसे काका पितरां कंस त्रासितो ।
वाटतो खेद तो चित्ती बांधोनी ठेवि दुष्ट तो ॥ ६ ॥

अहो - अहो - आर्ययोः पित्रोः - श्रेष्ठ अशा आईबापांना - अस्मत् - आम्हांमुळे - भूरि वृजिनं - फार दुःख - अभूत् - झाले - यद्धेतोः - ज्यांच्यामुळे - तयोः - त्या दोघांना - पुत्रमरणं (अनुभूतम्) - पुत्रांचे मरण अनुभवावे लागले - च - आणि - यद्धेतोः - ज्यांच्यामुळे - बन्धनं - अटक सोसावी लागली. ॥६॥
काका ! किती ही खेदाची गोष्ट आहे ! माझ्यामुळेच माझ्या निरपराध आणि सदाचरणी माता-पित्यांना अनेक हाल-अपेष्टा सहन कराव्या लागल्या. माझ्यामुळेच त्यांना तुरुंगात टाकले गेले आणि माझ्यामुळेच त्यांची मुले मारली गेली. ६

विवरण :- गोकुळात आलेल्या अक्रूराचे राम-कृष्णांनी यथोचित स्वागत केले; नंदबाबांनी भावभरल्या शब्दात खुशाली विचारली आणि नंद गेल्यानंतर रामकृष्णांनी पुन्हा अक्रूराकडे येऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. 'कंस नावालाच आमचा मामा, खरे तर शत्रूपेक्षाही भयानक. आमच्यामुळे आमचे माता-पिता बंदीगृहात आहेत. आमच्या आधीची सर्व भावंडे (आमच्यामुळे) मारली गेली आणि अजूनहि त्यांचे हाल संपत नाहीत. यामुळे आम्ही अतिशय दुःखी आहोत.' राम-कृष्णांची ही भावना अगदी योग्य. कोणत्याही सुपुत्राला आपले माता-पिता सुखातच असावे असे वाटते. निदान त्यांना त्रास तरी होऊ नये, ही भावना, आणि या त्रासाला कारणीभूत जर ती मुलेच असतील तर मनाची होणारी तडफड फारच वाईट. शिवाय, एकवेळ आपल्याला त्रास झालेला परवडला; पण आपल्या प्रिय व्यक्तिचे दुःख पाहणे नको, हा मानवी स्वभाव. त्यात तो त्रास दूर करणे शक्य नसेल, तर त्यातून येणारी असहाय्यता कशी असते हे इथे दिसते. (६)



दिष्ट्याद्य दर्शनं स्वानां मह्यं वः सौम्य काङ्‌क्षितम् ।
सञ्जातं वर्ण्यतां तात तवागमनकारणम् ॥ ७ ॥
रोज मी पाहिली वाट स्वजना भेटण्यास की ।
भाग्याने भेटले तुम्ही येण्याचा हेतु सांगणे ॥ ७ ॥

सौ‌म्य - हे शांत स्वभावाच्या अक्रूरा - अद्य - आज - दिष्टया - सुदैवाने - मह्यं - मला - कांक्षितं - इच्छिलेले असे - स्वानां वः - स्वकीय अशा तुमचे - दर्शनं संजातं - दर्शन झाले - तात - बा अक्रूरा - तव आगमनकारणं - तुझ्या येण्याचे कारण - वर्ण्यतां - सांगावे. ॥७॥
पुष्कळ दिवसांपासून माझी इच्छा होती की, आपल्यापैकी कोणाची तरी माझी भेट व्हावी. सुदैवाने आज ती इच्छा पूर्ण झाली. काका ! आता आपण मला हे सांगा की, आपण येथे येण्याचे कारण काय ? (७)


श्रीशुक उवाच -
पृष्टो भगवता सर्वं वर्णयामास माधवः ।
वैरानुबन्धं यदुषु वसुदेववधोद्यमम् ॥ ८ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
कृष्णाने पुसता ऐसे वदले कंसवैर ते ।
वाढले यदुवंशासी पित्याला मारु इच्छितो ॥ ८ ॥

भगवता पृष्टः - श्रीकृष्णाकडून विचारिला गेलेला - माधवः - मधुकुलोत्पन्न - यदुषु वैरानुबन्धं - यादवांच्या ठिकाणी शत्रुत्वाचा संबंध - (तत्) सर्वं - ते सर्व - वर्णयामास - वर्णिता झाला. ॥८॥
श्रीशुक म्हणतात- भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा अक्रूराला असा प्रश्न केला, तेव्हा कंसाने यादवांशी वैर आणि वसुदेवांना मारण्याचा त्याचा उद्योगसुद्धा त्याने त्यांना सांगितला. (८)


यत्सन्देशो यदर्थं वा दूतः सम्प्रेषितः स्वयम् ।
यदुक्तं नारदेनास्य स्वजन्मानकदुन्दुभेः ॥ ९ ॥
कंससंदेश सारा नी नारदाचे भविष्य ते ।
अक्रूरे सर्व ते तैसे कथिले कृष्णजीस की ॥ ९ ॥

वसुदेववधोद्यमं - वसुदेवाच्या वधाची खटपट - यत्सन्देशः - ज्याविषयी निरोप होता - वा - आणि - यदर्थं स्वयं दूतः संप्रेषितः - ज्यासाठी स्वतः दूत म्हणून पाठविला गेला - नारदेन - नारदाने - आनकदुन्दुभेः सकाशात् - वसुदेवाच्या जवळ - यत् अस्य जन्म उक्तं - जे त्याचेकरिता स्वतःचे जन्मवृत्त सांगितले ॥९॥
अक्रूराने कंसाचा संदेश, ज्या उद्देशाने त्याने आपल्याला दूत म्हणून पाठविले होते तो त्याचा उद्देश आणि नारदांनी वसुदेवांपासून श्रीकृष्णांचा जन्म घेण्याचा वृत्तांत जो कंसाला सांगितला होता तो, असा सर्व वृत्तांत सांगितला. (९)


श्रुत्वाक्रूरवचः कृष्णो बलश्च परवीरहा ।
प्रहस्य नन्दं पितरं राज्ञा दिष्टं विजज्ञतुः ॥ १० ॥
ऐकता हासले बंधू विपक्षदमनो द्वय ।
पिता नंदास कंसाची आज्ञा ती वदले पहा ॥ १० ॥

कृष्णः - श्रीकृष्ण - च - आणि - परवीरहा बलः - मोठमोठया वीरांना मारणारा असा बलराम - अक्रूरवचः श्रुत्वा - अक्रूराचे भाषण ऐकून - प्रहस्य - हसून - पितरं नन्दं - नंद पित्याला - राज्ञा आदिष्टं - राजाने आज्ञा केलेले - विजज्ञतुः - कळविते झाले. ॥१०॥
शत्रुपक्षाचा निःपात करणारे श्रीकृष्ण आणि बलराम, अक्रूराचे हे म्हणणे ऐकून हसू लागले आणि त्यानंतर त्यांनी नंदबाबांना कंसराजाची आज्ञा सांगितली. (१०)


गोपान् समादिशत् सोऽपि गृह्यतां सर्वगोरसः ।
उपायनानि गृह्णीध्वं युज्यन्तां शकटानि च ॥ ११ ॥
तदा त्या नंदबाबाने आज्ञा गोपास ती दिली ।
गोरसा करणे एक जाण्या जाड्याहि जुंपिणे ॥ ११ ॥

सः अपि - तो नंदहि - गोपान् - गोपांना - समादिशत् - आज्ञा करता झाला - सर्वगोरसः गृह्यतां - सर्वप्रकारचा गोरस घ्यावा - उपायनानिगृह्‌णीध्वं - भेटीचे पदार्थ तुम्ही घ्या - च - आणि - शकटानि युज्यन्तां - गाडया जोडाव्या. ॥११॥
तेव्हा नंदांनीही सर्व गोपांना आज्ञा केली की, "सगळे दूध एकत्र करा. नजराणे घ्या आणि छकडे जोडा." (११)


यास्यामः श्वो मधुपुरीं दास्यामो नृपते रसान् ।
द्रक्ष्यामः सुमहत्पर्व यान्ति जानपदाः किल ।
एवमाघोषयत्क्षत्रा नन्दगोपः स्वगोकुले ॥ १२ ॥
सकाळी मथुरी जाऊ कंसा गोरस देउ हे ।
दवंडी पिटली ग्रामीं उत्सवा मथुरीं चला ॥ १२ ॥

श्वः मधुपुरी यास्यामः - उद्या आपण मथुरेस जाणार - नृपतेः रसान् दास्यामः - राजाला दूध दही देणार - (तत्र) सुमहत् पर्व किल द्रक्ष्यामः - तेथे खरोखर अत्यंत मोठा उत्सव पाहणार - जानपदाः अपि - खेडयापाडयातील लोकहि - यान्ति - जातील - एवम् - असे - नन्दगोपः - नंदगोप - स्वगोकुले - आपल्या गौळवाडयात - क्षत्त्रा - नगर रक्षक अशा कोतवालाकडून - अघोषयत् - दवंडी पिटविता झाला. ॥१२॥
उद्याच आपण मथुरेला जाणार आहोत आणि तेथे जाऊन राजा कंसाला दूध, दही वगैरे देऊ. तेथे एक मोठा उत्सव होत आहे. तो पाहाण्यासाठी देशातील पुष्कळ लोक एकत्र येणार आहेत. आम्हीसुद्धा तो पाहू ! कोतवालामार्फत नंदांनी आपल्या गोकुळात अशी दवंडी पिटविली. (१२)


गोप्यस्तास्तद् उपश्रुत्य बभूवुर्व्यथिता भृशम् ।
रामकृष्णौ पुरीं नेतुं अक्रूरं व्रजमागतम् ॥ १३ ॥
अक्रूर कृष्ण रामाला आले नेण्या मथूरिसी ।
कळता गोपिका दुःखी व्याकूळ जाहल्या तदा ॥ १३ ॥

तत् - तेव्हा - ताः गोप्यः - त्या गोपी - रामकृष्णौ पुरीं नेतुं - राम-कृष्णाला नगराला नेण्यासाठी - व्रजं आगतं - गोकुळास आलेल्या - अक्रूरं उपश्रुत्य - अक्रूराला ऐकून - भृशं व्यथिताः बभूवुः - अत्यंत दुःखित झाल्या. ॥१३॥
आपल्या राम-कृष्णांना मथुरेला घेऊन जाण्यासाठी अक्रूर व्रजामध्ये आला आहे, हे ऐकून गोपी अतिशय व्याकूळ झाल्या. (१३)


काश्चित् तत्कृतहृत्ताप श्वासम्लानमुखश्रियः ।
स्रंसद्‌दुद्दुकूलवलय केशग्रंथ्यश्च काश्चन ॥ १४ ॥
पोळल्या उष्णश्वासाने सुकली मुखपद्म ती ।
दुःखाने हारपे शुद्ध केश वस्त्रा न लक्षची ॥ १४ ॥

काश्चित् - कित्येक स्त्रिया - तत्कृतहृत्ताप - त्याने उत्पन्न केलेल्या हृदयसंतापामुळे उत्पन्न झालेल्या - श्वासम्लानमुखश्रियः - श्वासांनी मलिन झाली आहे मुखाची शोभा ज्यांची अशा - काश्चन् - कित्येक - स्रंसद्दुकूलवलयकेशग्रन्थ्यः - ज्यांची रेशमी वस्त्रे, कंकणे व केशपाश गळत आहेत अशा. ॥१४॥
भगवान श्रीकृष्ण मथुरेला जाणर ही बातमी ऐकूनच काही गोपी शोकाकुल झाल्या. त्यांच्या उष्ण श्वासांमुळे त्यांची मुखकमले म्लान झाली. काहींची अशी दशा झाली की, त्यांची वस्त्रे ढळली, हातातील काकणे गळून पडली आणि वेण्या सैल झाल्या तरी याचाही त्यांना पत्ता लागला नाही. (१४)


अन्याश्च तदनुध्यान निवृत्ताशेषवृत्तयः ।
नाभ्यजानन् इमं लोकं आत्मलोकं गता इव ॥ १५ ॥
भगवान् ध्यायिता चित्ती आत्मरूपी स्थिरावल्या ।
सांसार नाठवे त्यांना निवृत्त चित्ति जाहल्या ॥ १५ ॥

च - तसेच - अन्याः - इतर स्त्रिया - तदनुध्यान - त्याच्या चिंतनाने - निवृत्ताशेषवृत्तयः - ज्यांच्या सर्व प्रकारच्या भावना नाहीशी झाल्या आहेत अशा - आत्मलोकं गताः इव - आत्मलोकी गेल्याप्रमाणे - इमं लोकं - ह्या लोकाला - न अभ्यजानन् - न जाणत्या झाल्या. ॥१५॥
भगवंतांच्या चिंतनाने काहींच्या चित्तवृत्तींचा लय झाला. जणू त्या समाधिस्त झाल्या आणि त्यांना स्वतःचेही भान राहिले नाही. (५१)


स्मरन्त्यश्चापराः शौरेः अनुरागस्मितेरिताः ।
हृदिस्पृशश्चित्रपदा गिरः संमुमुहुः स्त्रियः ॥ १६ ॥
गाती नी नाचती गोपी हासुनी कृष्णगीत ते ।
तल्लीन नाचता झाल्या मोहीत गायनी तशा ॥ १६ ॥

अपराः स्त्रियः - दुसर्‍या स्त्रिया - शौरेः अनुरागस्मितेरिताः - श्रीकृष्णाने प्रेमाने व मंदहास्याने उच्चारलेल्या - चित्रपदाः - सुंदर आहेत शब्द ज्यांतील अशा - हृदिस्पृशः - हृदयाला चटका लावणार्‍या - गिरः - भाषणांना - स्मरन्त्यः - आठवीत - संमुमुहुः - मूर्च्छित झाल्या. ॥१६॥
काही गोपी श्रीकृष्णांचे प्रेम, स्मितहास्य आणि हृदयस्पर्शी वैशिष्ट्यपूर्ण शब्दरचना असलेले बोलणे आठवून देहभान विसरल्या. (१६)


गतिं सुललितां चेष्टां स्निग्धहासावलोकनम् ।
शोकापहानि नर्माणि प्रोद्दामचरितानि च ॥ १७ ॥
लटकी हरिची चाल हासणे प्रेमयुक्त ते ।
मनात चिंतिती गोपी विरहे कांपरे भरे ॥ १७ ॥

मुकुन्दस्य - श्रीकृष्णाची - सुललितां गतिं - अत्यंत सुंदर अशी चालण्याची ढब - चेष्टां - हावभाव - स्निग्धहासावलोकनं - मधुर हास्याने युक्त असे पाहणे - शोकापहानि नर्माणि - खेद घालविणारे विनोद - च - आणि - प्रोद्दामचरितानि - अत्यंत अद्भुत कृत्ये. ॥१७॥
भगवंतांचे आकर्षक चालणे, हाव-भाव, प्रेमपूर्ण स्मितहास्ययुक्त पाहाणे, सर्व शोक मिटविणारी थट्टा आणि अलौकिक लीला हे सर्व आठवून (१७)


चिन्तयन्त्यो मुकुन्दस्य भीता विरहकातराः ।
समेताः सङ्‌घशः प्रोचुः अश्रुमुख्योऽच्युताशयाः ॥ १८ ॥
कृष्णार्पण अशी बुद्धी तयांचा प्राण कृष्ण तो ।
आसू ते वाहिले नेत्री जमोनी गोपि बोलती ॥ १८ ॥

मुकुंदस्य चिन्तयन्त्यः - श्रीकृष्णाचे चिन्तन करणार्‍या - भीताः विरहकातराः - भ्यालेल्या व श्रीकृष्ण वियोगामुळे त्रस्त झालेल्या - अच्युताशयाः - श्रीकृष्णमय आहेत इच्छा ज्यांच्या अशा - सङघशः समेताः - थव्याथव्यांनी जमलेल्या - अश्रुमुख्यः - अश्रूंनी युक्त आहेत मुखे ज्यांची अशा - प्रोचुः - म्हणाल्या. ॥१८॥
त्यांच्या विरहाच्या भीतीने त्या व्याकूळ झाल्या. त्यांचे जीवनच श्रीकृष्णमय झालेले असल्यामुळे त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. सार्‍याजणी एकत्र येऊन गटागटाने आपापसात म्हणू लागल्या. (१८)


श्रीगोप्य ऊचुः -
( मिश्र )
अहो विधातस्तव न क्वचिद् दया
     संयोज्य मैत्र्या प्रणयेन देहिनः ।
तांश्चाकृतार्थान् वियुनङ्‌क्ष्यपार्थकं
     विक्रीडितं तेऽर्भकचेष्टितं यथा ॥ १९ ॥
( इंद्रवज्रा )
गोपिका म्हणाल्या -
अरे विधात्या तुजला दया ना
     तू जोडिशी लोकचि प्रेम भावे ।
अतृप्त त्यांना तुचि तोडिशी रे
     हा खेळ सारा लटका तुझा की ॥ १९ ॥

अहोविधातः - अरे ब्रह्मदेवा - तव क्वचित् दया न (अस्ति) - तुला मुळीच दया नाही - देहिनः मैत्र्या प्रणयेन च संयोज्य - प्राण्यांना मैत्रीने व प्रेमाने एकत्र आणून - तान् अकृतार्थान् (एव) - त्यांना असंतुष्ट ठेवून कृतकृत्य होण्यापूर्वीच - वियुनङ्‌क्षि - वियुक्त करतोस - (अतः) - यास्तव - ते विक्रीडितं - तुझी क्रीडा - यथा अर्भकचेष्टितं (तथा) - ज्याप्रमाणे लहान मुलाची चेष्टा त्याप्रमाणे - अपार्थकं (अस्ति) - निरर्थक होय. ॥१९॥
गोपी म्हणाल्या - हे विधात्या ! हे विश्व घडवतोस खरे, परंतु तुझ्या हृदयात दयेचा लवलेश नाही. प्रथम तू मैत्रीने आणि प्रेमाने जीवांना एकमेकांशी जोडतोस, परंतु त्यांच्या इच्छा पूर्ण होण्या‍आधीच तू विनाकारणच त्यांची एकमेकांपासून ताटातूट करतोस. तुझा हा खेळ लहान पोरांसारखाच नव्हे का ? (१९)


यस्त्वं प्रदर्श्यासितकुन्तलावृतं
     मुकुन्दवक्त्रं सुकपोलमुन्नसम् ।
शोकापनोदस्मितलेशसुन्दरं
     करोषि पारोक्ष्यमसाधु ते कृतम् ॥ २० ॥
देवा किती हे बहू दुःख आहे
     तू दाविला श्याम प्रियो अम्हाला ।
कपाळि ज्याच्या कुरुळेच केस
     नी पोवळ्याच्या परि लालि गाली ॥
ते सुंदरो नाक नि हास्य तैसे
     क्षणात नष्टे शिण भार सारा ।
ऐशा मुखाते तुचि दाविले नी
     नी आज नेशी ययि दृष्टि आड ॥ २० ॥

यः त्वं - जो तू - असितकुन्तलावृतं - काळ्या केसांनी आच्छादलेले - सुकपोलं - सुंदर आहेत गाल ज्याचे असे - उन्नसं - उंच आहे नाक ज्याचे असे - शोकापनोदस्मितलेशसुन्दरं - खिन्नता घालविणार्‍या मंद हास्याच्या अल्पांशाने सुंदर झालेले - मुकुन्दवक्त्रं प्रदर्श्य - श्रीकृष्णाचे मुख दाखवून - पारोक्ष्यं करोषि - दृष्टीआड करीत आहेस - अतः - यास्तव - ते कृतं असाधु (अस्ति) - तुझे कृत्य दुष्ट आहे. ॥२०॥
हे विधात्या ! आधी आम्हांला मुकुंदांचे मुखकमल दाखविलेस. किती सुंदर आहे ते ! काळे कुरळे केस ज्याच्यावर भुरभुरत आहेत, सुंदर गाल आणि उभार नाक यांनी शोभणारे आणि स्मितहास्याच्या लकेरीने सगळा शोक दूर करणारे असे ते मुखकमळ आता मात्र आमच्या दृष्टी‍आड करीत आहेस ! केवढा हा तुझा दुष्टपणा ! (२०)


क्रूरस्त्वमक्रूरसमाख्यया स्म नः
     चक्षुर्हि दत्तं हरसे बताज्ञवत् ।
येनैकदेशेऽखिलसर्गसौष्ठवं
     त्वदीयमद्राक्ष्म वयं मधुद्विषः ॥ २१ ॥
अक्रूर दोषी मुळि ना ययात
     ही क्रूरता तो तव मूर्खतेची ।
कृष्णात सृष्टी अम्हि पाहतो की
     हे कृत्य ऐसे नच तू करावे ॥ २१ ॥

क्रूरः त्वं - निष्ठुर असा तू - अक्रूरसमाख्यया - अक्रूर नावाने - नः दत्तं चक्षुः - आम्हाला दिलेली दृष्टि - अज्ञवत् बत हरसे - खरोखर मूर्खाप्रमाणे हरण करीत आहेस - येन - जिच्या योगाने - वयं - आम्ही - मधुद्विषः एकदेशे (अपि) - श्रीकृष्णाच्या एकेका अवयवाच्या ठिकाणीहि - त्वदीयं अखिलसर्गसौष्ठवं - तुझ्या अखिल सृष्टि निर्माण करण्याच्या कौशल्याला - अद्राक्ष्म - पाहतो. ॥२१॥
तूच क्रूर आहेस. मात्र अक्रूर नाव घेऊन येथे आलास आणि तूच आम्हांला दिलेले हे डोळे मूर्खासारखे आमच्यापासून काढून घेत आहेस. यांच्याद्वारेच आम्ही श्रीकृष्णांच्या एकेका अंगामध्ये तुमच्या सृष्टीचे संपूर्ण सौंदर्य निरखून पाहात होतो. (२१)

विवरण :- कृष्णास घेऊन अक्रूर मथुरेस जाणार हे ऐकून गोपी अत्यंत व्यथित झाल्या, जणू त्यांचे प्राणच तो हिरावून नेतो आहे. त्यांनी दुःखावेगाने विधात्यास बोल लावला. अक्रूराची निंदा केली. त्या म्हणाल्या, 'हा अक्रूर कसला ? पक्का क्रूरच आहे. कारण आमचा प्राणप्रिय कृष्ण तो आमच्यापासून हिरावून नेत आहे. तो कृष्णाला नाही, तर आमच्या नेत्रांनाच जणू आमच्यापासून हरण करतो आहे. आमच्या डोळ्यांना पाहण्यासारखी एकच वस्तू, ती म्हणजे कृष्ण; तीच नाहीशी झाल्यावर या चर्मचक्षूंचा उपयोगच काय ? शिवाय गोपींना असेही वाटले, कृष्ण हेच आमचे नेत्र. त्याच्याबरोबर तेही गेले. मग आता आम्ही आंधळ्याच की ! मग अशा या अंधकारमय जीवनाचा यापुढे उपयोगच काय ? (२१)



न नन्दसूनुः क्षणभङ्‌गसौहृदः
     समीक्षते नः स्वकृतातुरा बत ।
विहाय गेहान् स्वजनान् तान् पतीन्
     तद्दास्यमद्धोपगता नवप्रियः ॥ २२ ॥
चटावला हा बहु प्रेम देण्या
     क्षणात संपे बहु प्रेम त्याचे ।
सोडोनि आलो घरदार सारे
     शोकात आम्हा नच पाहि कृष्ण ॥ २२ ॥

नवप्रियः - नवीन वस्तू आहे प्रिय ज्याला असा - क्षणभङगसौहृदः - थोडया वेळाने नष्ट झाले आहे प्रेम ज्याचे असा - नन्दसूनुः - नंदपुत्र - गेहान् स्वजनान् सुतान् पतीन् च विहाय - घरांना, स्वजनांना, पुत्रांना व पतींना सोडून - अद्धा - उघडपणे - तद्दास्यं उपगताः - त्याच्या सेवेला प्राप्त झालेल्या अशा - स्वकृतातुराः - आपल्या कृत्यांनी विव्हल झालेल्या अशा - नः - आम्हांला - न बत समीक्षते - खरोखर पहात नाही. ॥२२॥
काय आमचे दुर्दैव ! हे नंदनंदन एका क्षणात प्रेम सोडून देऊन, ज्या आम्ही आपले घर-दार, सगे-सोयरे, पती-पुत्र इत्यादींना सोडून यांच्या दासी झालो आणि ज्या यांच्यासाठीच आज शोकाकुल होत आहोत, त्या आमच्याकडे आज पाहातसुद्धा नाहीत. कारण यांना ’नवे ते हवे’ ना ! (२२)


सुखं प्रभाता रजनीयमाशिषः
     सत्या बभूवुः पुरयोषितां ध्रुवम् ।
याः संप्रविष्टस्य मुखं व्रजस्पतेः
     पास्यन्त्यपाङ्‌गोत् कलितस्मितासवम् ॥ २३ ॥
ही आजची मंगल सुप्रभात
     मथूरिच्या त्या तरुणी स्त्रियांना ।
पूर्तील इच्छा बहुता दिनीच्या
     पाहील त्यांना मिचकोनि नेत्र ।
नी मंदहास्ये मुखिच्या मधाला
     वाटोनि जाई मथुरा पुरात ।
नी त्या स्त्रिया हे मधुपान पीता
     होतील तृप्तो बहु मोदिताही ॥ २३ ॥

पुरयोषितां - नगरवासी स्त्रियांना - इयं रजनी - ही रात्र - सुखं प्रभाता (इति) ध्रुवं - सुखाने उजाडली हे खास - आशिषः सत्याः बभूवुः - आशीर्वाद खरे झाले - याः - ज्या स्त्रिया - संप्रविष्टस्य व्रजस्पतेः - प्रवेश केलेल्या गोकुळाधिपति कृष्णाच्या - अपाङगोत्कलितस्मितासवं मुखं - वाकडया दृष्टीने वृद्धिंगत झालेले मंद हास्यरूपी मद्य आहे ज्याच्या ठिकाणी अशा मुखाला - पास्यन्ति - पितील. ॥२३॥
आजच्या रात्रीनंतर येणारा उद्याचा प्रातःकाल मथुरेतील स्त्रियांसाठी निश्चितच अतिशय आनंददायक असेल. त्यांची पुष्कळ दिवसांची इच्छा उद्या पूर्ण होणार ! कारण जेव्हा व्रजराज श्यामसुंदर मथुरेत प्रवेश करतील, तेव्हा त्यांना त्यांचे कटाक्षातून प्रगट होणार्‍या स्मितरूप मधुरसाने युक्त श्रीमुख मनसोक्त पाहाता येईल ! (२३)


तासां मुकुन्दो मधुमञ्जुभाषितैरः
     गृहीतचित्तः परवान् मनस्व्यपि ।
कथं पुनर्नः प्रतियास्यतेऽबला
     ग्राम्याः सलज्जस्मितविभ्रमैर्भ्रमन् ॥ २४ ॥
आज्ञेत श्यामो गुरुनी पित्याच्या
     तरी हि त्याला भळतील नारीं ।
सलज्ज हास्ये हरि हा भुलेल
     कशास येई मग गोपि मध्ये ॥ २४ ॥

अबलाः - हे स्त्रियांनो - मुकुन्दः - श्रीकृष्ण - परवान् मनस्वी (च सन्) अपि - दुसर्‍याच्या अधीन व श्रेष्ठ आहे मन ज्याचे असा असताहि - तासां मधुमञ्जुभाषितैः गृहीतचित्तः - त्यांच्या गोड व मोहक अशा भाषणांनी आकर्षिले आहे मन ज्याचे असा - च - तसेच - (तासां) सलज्जस्मितविभ्रमैः - त्यांच्या लज्जेने युक्त अशा मंद हास्यांनी व कामचेष्टांनी - भ्रमन् - गोंधळलेला असा - ग्राम्याः नः - गावंढळ अशा आम्हांकडे - पुनः कथं प्रतियास्यते - पुनः कसा परत येईल. ॥२४॥
आमचे नंदकुमार धैर्यवान असून जरी वडिल माणसांच्या आज्ञेत वागणारे असले, तरी मथुरेतील युवती आपल्या मधाप्रमाणे मधाळ वचनांनी त्यांचे चित्त आपल्याकडे वेधून घेतील आणि हेही त्यांचे लज्जायुक्त स्मितहास्य आणि विलास पाहून तेथेच रमतील. मग ते आम्हां गावढळ गवळणींकडे परतून कशाला येतील बरे ? (२४)

विवरण :- गोपी कृष्णाच्या सर्वश्रेष्ठ भक्त निश्चितच होत्या; पण स्त्रीसुलभ मत्सरभावनेनेही युक्त होत्या. कृष्णाला गोकुळ सोडून मथुरेला जाताना पाहून त्यांचा मत्सर जागा झाला. त्यांना वाटले, आम्ही व्रजवासिनी गोपी म्हणजे खेडवळ, अडाणी, कुरूप बायका. मथुरावासी नागर स्त्रियांसारख्या सुंदर, कलानिपुण, रसिक थोडयाच आहोत ? आणि आमचा कृष्ण म्हणजे सौंदर्याचा भोक्ता, रसिक. आता तो आमच्याकडे थोडेच पहाणार ? निश्चितच त्यांच्याकडे आकृष्ट होणार, त्यांच्याशी रममाण होणार, तिथेच रहाणार. आता तो इकडे येईलच कसा ? यानंतर गोकुळाला त्याचे येणे नाही. त्याचे दर्शन आता होणे नाही, हे निश्चित. मत्सरग्रस्त स्त्रीची विवेकबुद्धी कशी नाहीशी होते, याचे हे उत्तम उदाहरण ! (२३-२४)



अद्य ध्रुवं तत्र दृशो भविष्यते
     दाशार्हभोजान्धक वृष्णिसात्वताम् ।
महोत्सवः श्रीरमणं गुणास्पदं
     द्रक्ष्यन्ति ये चाध्वनि देवकीसुतम् ॥ २५ ॥
ते आज धन्यो मथुरेस लोक
     दाशार्ह भोजांधक यादवो नी ।
वृष्णी कुळीचे हरि पाहतील
     होतील मार्गी मग तृप्त सारे ॥ २५ ॥

अद्य - आज - तत्र - त्याठिकाणी - ये - जे - श्रीरमणं - लक्ष्मीचा पति अशा - गुणास्पदं - सद्‌गुणांचे स्थान अशा - देवकीसुतं - श्रीकृष्णाला - द्रक्ष्यन्ति - पाहतील - च - तसेच - अध्वनि गच्छतं (तं द्रक्ष्यन्ति) - मार्गातून जाणार्‍या त्याला पाहतील - (तेषां) दाशार्हभोजांधकवृष्णि सात्वतां - त्या दाशार्ह, भोज, अंधक, वृष्णि व सात्वत यांच्या - दृशः - डोळ्यांना - ध्रुवं - खरोखर - महोत्सवः भविष्यते - मोठा आनंद होईल. ॥२५॥
आज रमारमण, गुणसागर, देवकीनंदनांच्या दर्शनाने मथुरेतील दाशार्ह भोज, अंधक आणि वृष्णिवंशी यादवांचे डोळे निश्चितच धन्य होतील ! त्याचबरोबर जे लोक येथून मथुरेला जाताना वाटेत त्यांना पाहातील, ते सुद्धा तृप्त होतील. (२५)


मैतद्विधस्याकरुणस्य नाम भूद्
     अक्रूर इत्येतदतीव दारुणः ।
योऽसावनाश्वास्य सुदुःखितं जनं
     प्रियात्प्रियं नेष्यति पारमध्वनः ॥ २६ ॥
पहा सखे अक्रूर निर्दयी हा
     श्री नंदलाला बघ दूर नेई ।
न धीर देई नच बोलतो की
     अक्रूर ऐस नच या म्हणावे ॥ २६ ॥

एतद्विधस्य अकरुणस्य - अशा प्रकारच्या निर्दय अशा मनुष्याचे - अक्रूरः इति - अक्रूर असे - एतत् नाम - हे नाव - मा भुत् - नसावे - यः अतीव दारुणः (अस्ति) - जो अत्यंत भयंकर असा आहे - असौ - हा - सुदुःखितः जनं अनाश्वास्य - अत्यंत दुःखित अशा लोकांना आश्वासन न देता - प्रियात् प्रियं (श्रीकृष्णं) - प्रिय वस्तूपेक्षांहि प्रिय अशा श्रीकृष्णाला - अध्वनः पारं - रस्त्याच्या पलीकडे - नेष्यति - नेणार आहे. ॥२६॥
पहा सख्यांनो ! इकडे आम्ही गोपी इतक्या दुःखित होत आहोत आणि हा अक्रूर आमच्या परम प्रियतम श्यामसुंदरांना आमच्या डोळ्यां‍आड लांब घेऊन निघाला आहे. शिवाय दोन गोष्टी सांगून आम्हांला धीरही देत नाही. अशा या अत्यंत क्रूर पुरुषाचे नाव अक्रूर असायलाच नको होते ! (२६)


अनार्द्रधीरेष समास्थितो रथं
     तमन्वमी च त्वरयन्ति दुर्मदाः ।
गोपा अनोभिः स्थविरैरुपेक्षितं
     दैवं च नोऽद्य प्रतिकूलमीहते ॥ २७ ॥
हा श्याम तैसा बहु निष्ठुरो की
     पहा पहा तो रथिं बैसला की ।
हे मत्त गोपो पळवीति गाड्या
     जा जा मना येइल ते करावे ॥ २७ ॥

अनार्द्रधीः एषः - ज्याच्या बुद्धीला मुळीच ओलावा नाही असा हा श्रीकृष्ण - रथं समास्थितः - रथात बसला - यं अनु - त्याच्या मागून - अमी दुर्मदाः गोपाः - हे उग्र असे गोप - अनोभिः त्वरयन्ति - गाडयांतून घाईने जात आहेत - च - आणि - स्थविरैः (तत्) उपेक्षितं - म्हातार्‍या लोकांनी त्याच्याकडे लक्ष दिले नाही - अद्य - आज - नः - आमचे - दैवं च - दैवहि - प्रतिकूलं ईहते - प्रतिकूल इच्छित आहे. ॥२७॥
! जराही दयामाया नसलेले हे श्रीकृष्णही रथात बसलेसुद्धा ! वेडे गोपगणही छकड्यांतून त्यांच्याबरोबर जाण्याची किती घाई करीत आहेत ! आणि आमच्यातील जाणती वृद्ध मंडळीही तिकडे कानाडोळा करीत आहेत. आज दैवच आमच्यावर उलटले आहे, हेच खरे ! (२७)


निवारयामः समुपेत्य माधवं
     किं नोऽकरिष्यन् कुलवृद्धबान्धवाः ।
मुकुन्दसङ्‌गान्निमिषार्धदुस्त्यजाद्
     दैवेन विध्वंसितदीनचेतसाम् ॥ २८ ॥
धावा पळा गे धरु कृष्ण सार्‍या
     पाहोत वृद्धो करतील काय ।
क्षणो न साहे हरिच्या विना हा
     दुर्भाग्य आले अनि या नशीबी ॥ २८ ॥

माधवं समुपेत्य निवारयामः - श्रीकृष्णाला भेटून आपण अडवू या - कुलवृद्धबान्धवाः - कुळातले वृद्ध असे बांधव - दैवेन निमिषार्धदुस्त्यजात् - दुर्दैवाने अगदी थोडया वेळात सोडण्यास कठीण - मुकुन्दसङगात् - अशा श्रीकृष्णाच्या सहवासापासून - विध्वंसितदीनचेतसां नः - अंतःकरणे दीन व उद्‌ध्वस्त केलेली आहेत अशा आमचे - किं अकरिष्यन् - काय करणार. ॥२८॥
चला ! आपणच जाऊन माधवांना अडवू. आपल्या घरांतील वृद्ध किंवा नातलग आपले काय करणार आहेत ? अर्ध्या क्षणासाठीसुद्धा सोडण्यास कठीण अशी मुकुंदांची सोबत आमच्या दुर्भाग्याने आज आमच्यापासून हिरावून घेऊन आम्हांला व्याकूळ करून सोडले आहे. (२८)


( वसंततिलका )
यस्यानुरागललितस्मितवल्गुमन्त्र
     लीलावलोकपरिरम्भणरासगोष्ठाम् ।
नीताः स्म नः क्षणमिव क्षणदा विना तं
     गोप्यः कथं न्वतितरेम तमो दुरन्तम् ॥ २९ ॥
( वसंततिलका )
त्या प्रेमहास्यि वदता बहु गोष्टि गोड
     आलिंगनी नि रसक्रीडत रात्र गेली ।
मोठीच रात्र असुनी क्षण भासली ती
     साहेल का विरह हा मग या मनाला ॥ २९ ॥

गोप्यः - हे गोपींनो - नः - आमच्या - यस्य - ज्याने - अनुरागललितस्मितवल्गुमंत्रलीलावलोक - प्रेम, सुंदर हास्य, मधुर गोष्टी, लीलेने पाहणे - परिरम्भणरासगोष्ठयां - व आलिंगन यांनी युक्त अशा रासक्रीडेच्या समारंभात - क्षणदाः - अनेक रात्री - क्षणं इव नीताः - क्षणासारख्या घालविल्या - तं विना - त्या श्रीकृष्णावाचून - दुरन्तं तमः - वाईट आहे शेवट ज्याचा अशा संसाराला - कथं नु - कसे बरे - अतितरेम - ओलांडावे. ॥२९॥
सख्यांनो ! ज्यांचे प्रेमपूर्ण मनोहर स्मितहास्य, गूढ अशा गोड गोड गोष्टी, प्रेमाने लीलेने पाहाणे, आणि दिलेली आलिंगने यांमुळे आपल्या त्या रासक्रीडेच्या रात्री, एका क्षणात संपल्या असे आपल्याला वाटले. आता त्यांच्याखेरीज ही अपार विरहव्यथा आम्ही कशी नाहीशी करावी बरे ? (२९)


योऽह्नः क्षये व्रजमनन्तसखः परीतो
     गोपैर्विशन् खुररजश्छुरितालकस्रक् ।
वेणुं क्वणन् स्मितकटाक्षनिरीक्षणेन
     चित्तं क्षिणोत्यमुमृते नु कथं भवेम ॥ ३० ॥
संध्येसि तो प्रतिदिनी परतोनि येता
     ते हार केश हरिचे धुळिमाखलेले ।
वंशीस तो करि रवो अन हास्य तैसे
     तो पाहता हृदयवेधि, कसे जगावे ॥ ३० ॥

अह्नः क्षये - दिवस संपण्याच्या वेळी - अनंतसखः - राम आहे भाऊ ज्याचा असा - गोपैः परीतः - गोपांनी वेष्टिलेला असा - खुररजच्छुरितालकस्रक् - खुरांच्या धुळीने मळली आहेत केस व माळ ज्याची असा - वेणुं क्वणन् - मुरली वाजवीत - व्रजं विशन् - गोकुळात शिरणारा असा - यः - जो श्रीकृष्ण - स्मितकटाक्षनिरीक्षणेन - मंद हास्याने युक्त अशा वाकडया नजरेने निरखून पाहण्याने - नः चित्तं क्षिणोति - आमचे मन हरण करतो - अमुं ऋते - त्याच्यावाचून - कथं नु भवेम - आम्ही कसे बरे जिवंत राहावे. ॥३०॥
दररोज सायंकाळी गोपालांनी वेढलेले ते बलरामांसह गाई चारून वनातून परत येत, त्यावेळी त्यांचे काळेभोर कुरळे केस आणि गळ्यातील पुष्पहार गाईंच्या खुरांमुळे उडालेल्या धुळीने माखलेले असत. बासरी वाजवीत आणि स्मितहास्ययुक्त कटाक्ष टाकीत ते आमची हृदये विद्ध करीत. त्यांच्याखेरीज आम्ही कशा जिवंत राहू बरे ? (३०)


श्रीशुक उवाच -
( मिश्र )
एवं ब्रुवाणा विरहातुरा भृशं
     व्रजस्त्रियः कृष्णविषक्तमानसाः ।
विसृज्य लज्जां रुरुदुः स्म सुस्वरं
     गोविन्द दामोदर माधवेति ॥ ३१ ॥
(इंद्रवज्रा )
श्रीशुकदेव सांगतात -
गोपी जरी हे वदतात शब्द
     आलिंगि कृष्णो मनि गोपिकांच्या ।
गोविंद दामोदर माधवारे
     सोडोनि लज्जा रडल्या वदोनी ॥ ३१ ॥

कृष्णविषक्तमानसाः - श्रीकृष्णाच्या अंतःकरणे आसक्त झालेल्या अशा - एवं ब्रुवाणाः - असे बोलणार्‍या - भृशं विरहातुराः - वियोगाने फार दुःखी झालेल्या - व्रजस्त्रियः - गोपी - लज्जां विसृज्य - लाज सोडून - गोविन्द दामोदर माधव इति - हे गोविंदा, हे दामोदरा, हे माधवा अशा हाका मारीत - सुस्वरं - गोड स्वराने - रुरुदुः स्म - रडल्या ॥३१॥
श्रीशुक म्हणतात- असे बोलणार्‍या अत्यंत विरहव्याकूळ गोपी लाज-लज्जा सोडून ’हे गोविंदा ! हे दामोदरा ! हे माधवा !’ म्हणत गळा काढून रडू लागल्या. (३१)


( अनुष्टुप् )
स्त्रीणामेवं रुदन्तीनां उदिते सवितर्यथ ।
अक्रूरश्चोदयामास कृतमैत्रादिको रथम् ॥ ३२ ॥
( अनुष्टुप् )
रडता रडता गोपी सरली रात्र ती अशी ।
स्नान संध्या करोनीया अक्रूर रथि बैसले ॥ ३२ ॥

अथ - नंतर - सवितरि उदिते - सूर्य उदय पावला असता - कृतमैत्रादिकः अक्रूरः - केली आहेत सूर्योपासनादि कृत्ये ज्याने असा अक्रूर - स्त्रीनां एवं रुदन्तीनां - सर्व स्त्रिया याप्रमाणे विलाप करीत असता - रथं चोदयामास - रथ हाकता झाला ॥३२॥
अशा प्रकारे रडण्यातच गोपींची सारी रात्र गेली. सूर्योदय झाला. संध्यावंदन वगैरे नित्यकर्मे आटोपून अक्रूर रथावर स्वार होऊन रथ हाकू लागला. (३२)


गोपास्तमन्वसज्जन्त नन्दाद्याः शकटैस्ततः ।
आदायोपायनं भूरि कुम्भान् गोरससम्भृतान् ॥ ३३ ॥
नंदबाबादि गोपांनी गोरसी कुंभ भेटि त्या ।
गाड्यात ठेविल्या पाठी सर्वची चालु लागले ॥ ३३ ॥

ततः - त्याच्या मागून - नन्दाद्याः गोपाः - नंद आदिकरून गोप - भूरि उपायनं - पुष्कळसे भेटीचे पदार्थ - गोरससंभृतान् कुम्भान् - गोरसांनी भरलेली भांडी - उपादाय - घेऊन - शकटैः - गाड्यातून - तं अन्वसज्जन्त - त्याला मागून गाठिते झाले ॥३३॥
नंद वगैरे गोपसुद्धा दूध, दही इत्यादींनी भरलेली मडकी आणि पुष्कळ भेटवस्तू घेऊन छकड्यात बसून त्यांच्या पाठोपाठ चालू लागले. (३३)


गोप्यश्च दयितं कृष्णं अनुव्रज्यानुरञ्जिताः ।
प्रत्यादेशं भगवतः काङ्‌क्षन्त्यश्चावतस्थिरे ॥ ३४ ॥
त्या वेळी गोपिका कृष्णा पाहोनीच सुखावल्या ।
संदेश ऐकण्या हेते तशाचि राहिल्या उभ्या ॥ ३४ ॥

गोप्यः च - गोपीहि - दयितं कृष्णं अनुव्रज्य अनुरञ्जिताः - प्रिय अशा श्रीकृष्णाच्या मागून जाऊन संतुष्ट झालेल्या - च - आणि - भगवतः प्रत्यादेशं काङ्क्षन्त्यः - श्रीकृष्णाकडून परत जाण्याची आज्ञा इच्छिणार्‍या - अवतस्थिरे - उभ्या राहिल्या ॥३४॥
याचवेळी प्रेमरंगात रंगलेल्या गोपी प्राणप्रिय श्रीकृष्णांजवळ गेल्या, तेव्हा त्यांनी वळून आपल्याकडे पाहिल्यामुळे त्या काहीशा आनंदित झाल्या. नंतर त्यांच्याकडून काही निरोप मिळेल, या आशेने तेथेच उभ्या राहिल्या. (३४)


तास्तथा तप्यतीर्वीक्ष्य स्वप्रस्थाणे यदूत्तमः ।
सान्त्वयामस सप्रेमैः आयास्य इति दौत्यकैः ॥ ३५ ॥
कृष्णाने पाहिल्या गोपी हृदयी जळती अशा ।
येईन मी अशा शब्दे कृष्णाने धीर तो दिला ॥ ३५ ॥

यदूत्तमः - यदुश्रेष्ठ श्रीकृष्ण - स्वप्रस्थाने तथा तप्यतीः ताः वीक्ष्य - आपल्या निघण्याच्या वेळी तशाप्रकारे दुःखित झालेल्या गोपींना पाहून - ‘आयास्ये’ इति सप्रेमैः दौत्यकैः - ‘येईन’ अशा प्रेमयुक्त निरोपांनी - (ताः) सान्त्वयामास - त्यांचे सांत्वन करता झाला ॥३५॥
आपण निघाल्यामुळे गोपी शोकसंतप्त झालेल्या पाहून त्यांनी दूतामार्फत "मी येईन" असा प्रेमाचा संदेश पाठवून त्यांना धीर दिला. (३५)


यावदालक्ष्यते केतुः यावद्रेणू रथस्य च ।
अनुप्रस्थापितात्मानो लेख्यानीवोपलक्षिताः ॥ ३६ ॥
चित्रवत् राहिल्या गोपी रथाचा ध्वज पाहात ।
दाटली धूळ ती सारी कृष्णासी चित्त धाडिले ॥ ३६ ॥

यावत् - जोपर्यंत - रथस्य केतुः - रथाचा ध्वज - च - आणि - यावत् रेणुः - जोपर्यंत धूळ - आलक्ष्यते - दिसत होती - अनुप्रस्थापितात्मानः (गोप्यः) - मागून पाठविली आहेत मने ज्यांनी अशा गोपी - विशोकाः - नाहीसा झाला आहे शोक ज्यांचा अशा - लेख्यानि इव उपलक्षिताः - चित्रांप्रमाणे दिसल्या. ॥३६॥
जोपर्यंत रथाचा ध्वज आणि चाकांमुळे उडणारी धूळ गोपींना दिसत होती, तोपर्यंत त्या चित्रासारख्या तटस्थ उभ्या राहिल्या; मात्र त्यांची मने नंदलाला मागोमाग चालली होती. (३६)


ता निराशा निववृतुः गोविन्दविनिवर्तने ।
विशोका अहनी निन्युः गायन्त्यः प्रियचेष्टितम् ॥ ३७ ॥
इच्छिती दूर जावोनी कृष्ण येईल सत्वर ।
न येता दुःखि गेहासी पातल्या गात त्या लीला ॥ ३७ ॥

गोविन्दविनिविर्तने निराशाः - श्रीकृष्णाच्या परत येण्याविषयी निराश झालेल्या - ताः निववृतुः - त्या गोपी परतल्या - प्रियचेष्टितं गायन्त्यः - आवडत्या श्रीकृष्णाच्या लीला गात - अहनि निन्युः - दिवस घालवित्या झाल्या. ॥३७॥
श्रीकृष्णांच्या परत फिरण्याची आशा मावळली, तेव्हा त्या घरी परतल्या. आता आपल्या प्रियतमाच्या लीलांचे गायन करीत त्या दिवस कंठू लागल्या आणि अशा प्रकारे आपला शोक हलका करू लागल्या. (३७)


भगवानपि सम्प्राप्तो रामाक्रूरयुतो नृप ।
रथेन वायुवेगेन कालिन्दीं अघनाशिनीम् ॥ ३८ ॥
इकडे बल नी कृष्ण वेगवान् रथि बैसुनी ।
यमुनातिरि ते आले अक्रूरासह सर्वही ॥ ३८ ॥

नृप - हे राजा - रामाक्रूरयुतः भगवान् अपि - बलराम व अक्रूर यांसह श्रीकृष्णहि - वायुवेगेन रथेन - वार्‍यासारखा आहे वेग ज्याचा अशा रथाने - अघनाशिनीं कालिंदीं संप्राप्तः - पापांचा नाश करणार्‍या यमुना नदीजवळ आला. ॥३८॥
हे राजा ! इकडे भगवान श्रीकृष्णसुद्धा बलराम आणि अक्रूर यांच्यासह वायूसमान वेग असणार्‍या रथात बसून पापनाशिनी यमुना नदीच्या तीरावर जाऊन पोहोचले.(३८)


तत्रोपस्पृश्य पानीयं पीत्वा मृष्टं मणिप्रभम् ।
वृक्षषण्डमुपव्रज्य सरामो रथमाविशत् ॥ ॥
सर्वांनी धुतले हात सुधावत् जल प्राशिले ।
पुन्हा ते कृष्ण नी रामो रथात बैसले पुन्हा ॥ ३९ ॥

तत्र - तेथे - सरामः (सः) - बलरामासह तो श्रीकृष्ण - मणिप्रभं मृष्टं पानीयं उपस्पृश्य - स्फटिकासारखे आहे तेज ज्याचे अशा निर्मळ पांण्याने आचमन करून - पीत्वा - पिऊन - च - आणि - वृक्षखण्डं उपव्रज्य - झाडाच्या राईत हिंडून - रथं आविशत् - रथात बसला. ॥३९॥
तेथे ते हात-तोंड धुऊन पाचूसारखे निळे आणि अमृताप्रमाणे गोड यमुना नदीचे पाणी प्याले. नंतर बलरामांसह भगवान वनरा‍ईत जाऊन रथात बसले. (३९)


अक्रूरस्तावुपामन्त्र्य निवेश्य च रथोपरि ।
कालिन्द्या ह्रदमागत्य स्नानं विधिवदाचरत् ॥ ४० ॥
रथीं बैसवुनी त्यांना अक्रूरे त्यां विचारुनी ।
यमुनाकुंडि ते आले विधिवत् स्नान घेतले ॥ ४० ॥

अक्रूरः - अक्रूर - तौ उपामन्त्र्यं - त्यांना बोलावून - रथोपरि निवेश्य - रथावर बसून - च - आणि - कालिन्द्याः ह्लदं आगत्य - यमुनेच्या डोहावर येऊन - विधिवत् स्नानं आचरत् - यथाशास्त्र स्नान करता झाला. ॥४०॥
दोघा भावांना रथात बसवून अक्रूर त्यांचा निरोप घेऊन यमुनेच्या डोहावर येऊन विधीपूर्वक स्नान करू लागला. (४०)


निमज्ज्य तस्मिन् सलिले जपन् ब्रह्म सनातनम् ।
तावेव ददृशेऽक्रूरो रामकृष्णौ समन्वितौ ॥ ४१ ॥
करोनी स्नान त्या कुंडी गायत्री जपण्या पुन्हा ।
घेतली बुडि त्या डोही दिसले राम-कृष्ण तै ॥ ४१ ॥

तस्मिन् सलिले निमज्य - त्या पाण्यात बुडी मारून - सनातनं ब्रह्म जपन् अक्रूरः - सनातन ब्रह्माचा जप करणारा अक्रूर - समन्वितौ - एकत्र बसलेल्या - तौ रामकृष्णौ एव - त्या दोघां राम-कृष्णांनाच - ददृशे - पाहता झाला. ॥४१॥
त्या पाण्यात बुडी मारून तो वेदमंत्रजप करू लागला. त्याचवेळी पाण्यात तेच श्रीकृष्ण आणि बलराम एकत्र बसलेले त्याला दिसले. (४१)

विवरण :- राम-कृष्णांसह रथातून मथुरेकडे जात असता अक्रूराने यमुनातीरी रथ थांबविला. राम-कृष्ण यमुनेच्या प्रवाहात उतरून जलप्राशन, आचमन इ. करून पुन्हा रथात येऊन बसल्यावर अक्रूराने यमुनेत स्नान केले. आणि बुडी मारून तो मंत्र-जप करू लागला तेव्हा पुन्हा तेच दोघे (प्रतिबिंबरूपात) त्यास जलात दिसू लागले. पाण्याबाहेर पाहिल्यानंतर ते पूर्वीप्रमाणेच रथात बसलेले दिसले. पाण्यामध्ये ते शेषशायी भगवान, ज्यांची स्तुति सिद्ध-योगी करीत आहेत अशा स्वरूपात होते. अक्रूर गोंधळला. हे काय ? मात्र ती होती भगवंताची लीला, काही क्षणापूर्वी अक्रूराच्या मनात काहीशी दुविधा निर्माण झाली होती. या सुकुमार कोवळ्या तरुणांना कंसाच्या ताब्यात देऊन आपण त्यांच्यावर अन्याय तर नाही ना करत ? जरी त्यांच्या देवत्वाबद्दल त्याला खात्री होती, तरी 'अतिस्नेहः पापशङकी' हेही आहेच ना ! म्हणून आपल्या ईश्वरत्वाबद्दलची त्याची खात्री पक्की करण्य़ास, त्याला संशयरहित करण्यास भगवंतानी त्याला आपले हे छोटेसे 'विश्वरूप' दाखविले असावे. खरा भक्त संशयरहित, संशयातीत हवा. त्याच्या हृदयात केवळ आणि केवळ परमेश्वरमूर्ती हवी, तिथे इतरांना थारा नाही. भक्ताचे मन शांत, आश्वस्त आणि निर्द्वन्द्व हवे. (अक्रूराच्या मनात राम-कृष्णांच्या सुरक्षेबद्दलहि काळजी होतीच. त्यामुळे तो चिंतित होताच.) या सर्व कारणामुळे अक्रूराला निःशंक करून परमानंद देण्यास परमेश्वराने ही लीला केली. शेवटचे श्लोक-संदर्भ - १. सनक - ब्रह्मदेवाच्या चार मानसपुत्रापैकी एक, सनत्कुमार, सनंदन, सनत्सुजात. २. वसु - देवतांचा एक वर्ग, एकूण ८, आप, ध्रुव, सोम, धर, अनिल, अनल, प्रत्यूष, प्रभास. ३. मरीची - प्रजापती, मनूने निर्माण केलेल्या पहिल्या दहा (कुटुंबचालक) प्रजापतीपैकी एक, किंवा ब्रह्माच्या दहा मानसपुत्रापैकी एक, कश्यपाचा पिता. ४. परशुराम - ब्राह्मणयोद्धा, जमदग्नीचा मुलगा, सहावा विष्णूचा अवतार, रेणुकामातेचे शिर वडिलांच्या आज्ञेने तोडले. कार्तवीर्याच्या मुलांनी जमदग्नीला ठार केले. त्यामुळे सर्व क्षत्रियांना नष्ट करण्याची प्रतिज्ञा, एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली. रामाने परशुरामाचा पराभव केला, सात चिरंजीवांपैकी एक मानला जातो. (अजूनहि महेंद्र पर्वतावर तप करतो ही कल्पना) ५. कार्तवीर्य - यदुवंशीय, कृतवीर्याचा मुलगा, दत्ताची आराधना करून एक हजार हात मिळविले, सहस्रार्जुन असेही नाव. (४१)



तौ रथस्थौ कथमिह सुतौ आनकदुन्दुभेः ।
तर्हि स्वित् स्यन्दने न स्त इत्युन्मज्ज्य व्यचष्ट सः ॥ ४२ ॥
रथात असुनी दोघे इथे हे पातले कसे ।
पाहती वर येवोनी येई शंका मनीं तदा ॥ ४२ ॥

सः - तो अक्रूर - रथस्थौ तौ आनकदुन्दुभेः सुतौ - रथात बसलेले असे ते वसुदेवाचे दोन पुत्र - इह कथं - येथे कसे - तर्हि - तर मग - स्यन्दने न स्तः स्वित् - रथात ते दोघे नाहीत की काय - इति (मत्वा) - असे वाटून - उन्मज्य व्यचष्ट - पाण्यातून वर निघून नीट पाहता झाला. ॥४२॥
रथात बसलेले वसुदेवाचे पुत्र इथे पाण्यात कसे काय ? आणि येथे आहेत तर कदाचित रथात नसतील, असा विचार करून त्याने पाण्यातून डोके वर काढून पाहिले. (४२)


तत्रापि च यथापूर्वं आसीनौ पुनरेव सः ।
न्यमज्जद् दर्शनं यन्मे मृषा किं सलिले तयोः ॥ ४३ ॥
रथात बैसले होते पूर्ववत् बंधु ते तसे ।
भ्रम हा मानुनी त्यांनी बुडी पाण्यात घेतली ॥ ४३ ॥

तत्र अपि - तेथेहि - यथापूर्वं आसीनौ (दृष्ट्वा) - पूर्वीप्रमाणे बसलेले पाहून - सलिले मे तयोः यत् दर्शनं (जातं) - पाण्यांत मला त्या दोघांचे जे दर्शन झाले - (तत्) मृषा किं - ते खोटे की काय - इति - असे वाटून - सः - तो अक्रूर - पुनः अपि - पुनः देखील - न्यमज्जत् - बुडी मारता झाला. ॥४३॥
तेथेही ते पहिल्याप्रमाणेच बसले होते. त्यांना पाण्यात पाहिले, तो आपला भ्रम असावा, असे वाटून त्याने पुन्हा बुडी मारली. (४३)


भूयस्तत्रापि सोऽद्राक्षीत् स्तूयमानमहीश्वरम् ।
सिद्धचारणगन्धर्वैः असुरैर्नतकन्धरैः ॥ ४४ ॥
तरीही दिसले तेंव्हा अनंत देव शेषजी ।
गंधर्व चारणो सिद्ध झुकोनी स्तुति गात तै ॥ ४४ ॥

सः - तो अक्रूर - भूयः तत्र अपि - पुनः तेथेहि - नतकन्धरैः सिद्धचारणगन्धर्वैः - नम्र आहेत माना ज्यांच्या अशा सिद्ध, चारण व गंधर्व यांनी - च - आणि - असुरैः - दैत्यांनी - स्तूयमानम् - स्तविल्या जाणार्‍या - देवं अहीश्वरं अद्राक्षीत् - देव अशा शेषाला पाहता झाला. ॥४४॥
परंतु पुन्हा त्याला असे दिसले की, तेथे साक्षात श्रीशेष विराजमान आहेत आणि सिद्ध, चारण, गंधर्व तसेच असुर मस्तक लववून त्यांची स्तुती करीत आहेत. (४४)


सहस्रशिरसं देवं सहस्रफणमौलिनम् ।
नीलाम्बरं विसश्वेतं शृङ्‌गैः श्वेतमिव स्थितम् ॥ ४५ ॥
हजार फणिचा शेष तेवढे टोप त्यां वरी ।
नीलांबर शरीरासी सहस्रश्वेत जै गिरी ॥ ४५ ॥

सहस्रशिरसं - ज्याला हजार मस्तके आहेत - सहस्रफणिमौलिनं - ज्याच्या हजार फणांवर किरीट आहेत - नीलाम्बरं - ज्याचे वस्त्र निळे आहे - बिसश्वेतं - ज्याचा शुभ्रवर्ण कमळाच्या तंतूप्रमाणे आहे - शृङगैः स्थितं श्वेतं इव (अद्राक्षीत्)- शिखरांसह असलेल्या शुभ्र श्वेतपर्वताप्रमाणे असलेल्या अशा (शेषाला पाहिले) ॥४५॥
त्यांना हजार मस्तके असून त्यांच्या प्रत्येक फण्यावर मुगुट शोभून दिसत आहे. कमळाच्या गाभ्याप्रमाणे असलेल्या उज्ज्वल शरीरावर त्यांनी नीलांबर परिधान केले आहे. त्यामुळे हजारो शिखरांनी युक्त अशा कैलासाप्रमाणे ते दिसत होते. (४५)


तस्योत्सङ्‌गे घनश्यामं पीतकौशेयवाससम् ।
पुरुषं चतुर्भुजं शान्तं पद्मपत्रारुणेक्षणम् ॥ ४६ ॥
अक्रूरे पाहिले हे ही घनश्याम असा हरी ।
शेषाच्या कुशिसी आहे चतुर्भुज पितांबर ।
राजीव लोचने शांत आरक्त दिसले पहा ॥ ४६ ॥

तस्य उत्सङगे - त्याच्या पृष्ठभागावर - घनश्यामं - मेघाप्रमाणे सावळा आहे वर्ण ज्याचा अशा - पीतकौशेयवाससं - पिवळे रेशमी आहे वस्त्र ज्याचे अशा - चतुर्भुजं - चार आहेत हात ज्याला अशा - शान्तं पुरुषं - शांत पुरुष अशा - पद्मपत्रारुणेक्षणं - कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे तांबूस आहेत डोळे ज्याचे अशा. ॥४६॥
त्यांच्याच अंगावर घनश्याम पहुडले आहेत. त्यांनी रेशमी पीतांबर परिधान केला आहे. ते अत्यंत शांत व चतुर्भुज असून त्यांचे तांबड्या कमळाच्या पाकळीसारखे लालसर डोळे आहेत. (४६)


चारुप्रसन्नवदनं चारुहासनिरीक्षणम् ।
सुभ्रून्नसं चरुकर्णं सुकपोलारुणाधरम् ॥ ४७ ॥
प्रसन्न वदनी हास्य सुडौल नाक भूवया ।
सुंदरो गाल नी कान ओठांना लाल ती छटा ॥ ४७ ॥

चारुप्रसन्नवदनं - सुंदर व प्रसन्न आहे मुख ज्याचे अशा - चारुहासनिरीक्षणं - सुंदर आहे हसणे व निरखून पाहणे ज्याचे अशा - सुभ्रून्नसं - सुंदर भुवया व उंच नाक ज्यास आहे अशा - चारुकर्णं - सुंदर आहेत कान ज्याला अशा - सुकपोलारुणाधरं - सुंदर गाल व तांबूस ओठ आहेत ज्याला अशा. ॥४७॥
त्यांचे मुख मनोहर आणि प्रसन्न असून त्यांचे पाहणे मधुर हास्याने शोभणारे आहे. भुवया सुंदर असून नाक अपरे आहे. त्यांचे कान, गाल आणि लालसर ओठ शोभिवंत दिसत आहेत. (४७)


प्रलम्बपीवरभुजं तुङ्‌गांसोरःस्थलश्रियम् ।
कम्बुकण्ठं निम्ननाभिं वलिमत्पल्लवोदरम् ॥ ४८ ॥
आजानबाहु त्या पुष्ट श्रीचिन्ह स्कंध उंच ते ।
त्रगुड्या पिंपळी पोट खोल नाभी सुशोभली ॥ ४८ ॥

प्रलंबपीवरभुजं - लांब व पुष्ट आहेत हात ज्याला अशा - तुङ्गांसोरःस्थलश्रियं - विशाल खांद्यांनी व छातीने शोभा आली आहे ज्याला अशा - कम्बुकण्ठं - शंखासारखा आहे कंठ ज्याचा अशा - निम्ननाभिं - खोल आहे नाभि ज्याची अशा - वलिमत्पल्लवोदरं - वळ्यांनी युक्त असे कोवळ्या पानासारखे आहे पोट ज्याचे अशा. ॥४८॥
त्यांचे हात गुडघ्यापर्यंत लांब आणि पुष्ट आहेत. खांदे उंच असून वक्षःस्थळावर लक्ष्मीदेवी आहे. गळा शंखाप्रमाणे असून नाभी खोल आहे. तीन वळ्यांनी शोभणारे उदर पिंपळपानाप्रमाणे शोभत आहे. (४८)


बृहत्कतिततश्रोणि करभोरुद्वयान्वितम् ।
चारुजानुयुगं चारु जङ्‌घायुगलसंयुतम् ॥ ४९ ॥
शंखाकार अशी मान सुडौल हरिची असे ।
गजशुंडी अशा मांड्या नितंब स्थुळ ते दिसे ॥ ४९ ॥

बृहत्कटितटश्रोणिकरभोरुद्वयान्वितम् - विशाल कंबर, ढुंगण व हत्तीचे पायांसारख्या मांडयांनी युक्त अशा - चारुजानुयुगं - सुंदर आहेत गुडघे ज्याचे अशा - चारुजङघायुगलसंयुतं - सुंदर अशा दोन पोटर्‍यांनी युक्त अशा. ॥४९॥
स्थूल कंबर आणि नितंब, हत्तीच्या सोंडेप्रमाणे जांघा, सुंदर गुडघे आणि पिंडर्‍या आहेत. (४९)


तुङ्‌गगुल्फारुणनख व्रातदीधितिभिर्वृतम् ।
नवाङ्‌गुल्यङ्‌गुष्ठदलैः विलसत् पादपङ्‌कजम् ॥ ५० ॥
गुडघे पिंढर्‍या टाचा उभार दिव्य ती नखे ।
बोटे ती चरणाचीया कावळ्या पाकळ्यां परी ॥ ५० ॥

तुङगगुल्फारुणनखव्रातदीधितिभिः वृतं - उंच घोटयांनी व तांबूस नखसमूहाच्या किरणांनी युक्त अशा - नवाङ्‌गुल्यङ्‌गुष्ठदलैः - ज्याचे पाय कोमल अंगुल्यांनी - विलसत्पादापङकजं - व पाकळ्यासारख्या अंगठयांनी शोभत आहेत अशा. ॥५०॥
घोटे उंच असून लाल लाल नखांतून किरणे बाहेर पडत आहेत. चरणकमळ दहा बोटांच्या पाकळ्यांनी शोभून दिसत आहे. (५०)


सुमहार्हमणिव्रात किरीटकटकाङ्‌गदैः ।
कटिसूत्रब्रह्मसूत्र हारनूपुरकुण्डलैः ॥ ५१ ॥
मुकूट मणि रत्‍नांचा कर्धनी हार नूपुरे ।
कडे नी कुंडले तैसे यज्ञोपवित दिव्य ते ॥ ५१ ॥

सुमहार्हमणिव्रातकिरीटकटकाङगदैः - मूल्यवान रत्नसमूह, किरीट, कडी व बाहुभूषणे यांनी - कटिसृत्रब्रह्मसूत्रहांरनुपूरकुण्डलैः - कडदोरा, यज्ञोपवीत, हार, पैंजण व कुंडले यांनी.॥५१॥
अत्यंत बहुमूल्य रत्‍नजडित असा मुगुट, कडी, बाजूबंद, करदोटा, यज्ञोपवीत, हार, नूपुरे आणि कुंडले यांनी ते अलंकृत आहेत. (५१)


भ्राजमानं पद्मकरं शङ्‌खचक्रगदाधरम् ।
श्रीवत्सवक्षसं भ्राजत् कौस्तुभं वनमालिनम् ॥ ५२ ॥
शंख चक्र गदा पद्म हरिने धारिले करी ।
श्रीवत्सचिन्ह वक्षास कौस्तुभो वनमाळही ॥ ५२ ॥

भ्राजमानं - शोभणार्‍या - पद्मकरं - कमळ आहे हातात ज्याच्या अशा - शङखचक्रगदाधरं - शंख, चक्र व गदा ही धारण करणार्‍या - श्रीवत्सवक्षसं - श्रीवत्स नामक चिन्ह आहे छातीवर ज्याच्या अशा - भ्राजत्कौस्तुभं - शोभत आहे कौस्तुभ रत्न ज्याच्या कंठात अशा - वनमालिनं - पायांपर्यंत लोंबणारी रानफुलांची माळा धारण करणार्‍या. ॥५२॥
एका हातात कमळ शोभत आहे आणि इतर तीन हातांमध्ये शंख, चक्र व गदा आहे. वक्षःस्थळावर श्रीवत्साचे चिन्ह, गळ्यात कौस्तुभमणी आणि वनमाला शोभत आहे. (५२)


सुनन्दनन्दप्रमुखैः पर्षदैः सनकादिभिः ।
सुरेशैर्ब्रह्मरुद्राद्यैः नवभिश्च द्विजोत्तमैः ॥ ५३ ॥
सुनंद नंद हे दोघे सनकादिक संत ते ।
ब्रह्मा सर्वेश्वरो रूद्र महर्षी नी प्रजापती ॥ ५३ ॥

सुनंदनन्दप्रमुखैः - सुनंद व नंद हे ज्यामध्ये प्रमुख आहेत - सनकादिभिः पार्षदैः - अशा सनकादिक सेवकांनी - ब्रह्मरुद्राद्यैः सुरेशैः - ब्रह्मदेव, शंकर इत्यादि देवांच्या अधिपतींनी - नवभिः द्विजोत्तमैः - नऊ ब्राह्मणश्रेष्ठांनी. ॥५३॥
नंद-सुनंद इत्यादी पार्षद आपले ’स्वामी’; सनकादी ऋषी ’परब्रह्म’; ब्रह्मदेव, महादेव इत्यादी देव ’सर्वेश्वर’; मरीची इत्यादी नऊ ब्राह्मण (५३)


प्रह्रादनारदवसु प्रमुखैर्भागवतोत्तमैः ।
स्तूयमानं पृथग्भावैः वचोभिरमलात्मभिः ॥ ५४ ॥
प्रह्लाद नारदो दोघे आथीही वसुस्वामि हा ।
निर्दोष वेदवाणीने गात तैं स्तोत्र गाउनी ॥ ५४ ॥

च - आणि - प्रह्लादनारदवसुप्रमुखैः - प्रह्लाद, नारद, वसु हे ज्यामध्ये प्रमुख आहेत - अमलात्मभिः भागवतोत्तमैः - अशा निर्मलान्तःकरणाच्या श्रेष्ठ भक्तांनी - पृथग्भावैः वचोभिः - निरनिराळे आहेत अभिप्राय ज्यांचे अशा भाषणांनी - स्तूयमानं - स्तविल्या जाणार्‍या. ५४॥
’प्रजापती’ आणि प्रल्हाद, नारद, वसू इत्यादी भगवंतांचे श्रेष्ठ भक्त त्यांना ’भगवान’ समजून त्या त्या भावांनुसार निर्दोष वेदवाणीने त्यांची स्तुती करीत आहेत. (५४)


श्रिया पुष्ट्या गिरा कान्त्या कीर्त्या तुष्ट्येलयोर्जया ।
विद्ययाविद्यया शक्त्या मायया च निषेवितम् ॥ ५५ ॥
श्रिया पुष्टी गिरा कांती कीर्तीऽला तुष्टि नी इला ।
ल्हादिनी संविती माया मूर्तिमान् सेविती हरी ॥ ५५ ॥

श्रिया - सौंदर्याने - पुष्टया - लठठपणाने - गिरा - भाषणाने - कान्त्या - कांतीने - कीर्त्या - यशाने - तुष्टया - संतोषाने - इलया - वाणीने - ऊर्जया - शक्तीने - विद्यया - ज्ञानाने - अविद्यया - अज्ञानाने - शक्त्या - सामर्थ्याने - च - आणि - मायया - मायेने - निषेवितं - सेविलेल्या अशा ॥५५॥
त्याचबरोबर लक्ष्मी, पुष्टी, सरस्वती, कांती, कीर्ती आणि तुष्टी (म्हणजेच ऐश्वर्य, बल, ज्ञान, श्री, यश आणि वैराग्य या षडैश्वर्ययुक्त) इला(पृथ्वीशक्ती), ऊर्जा (लीलाशक्ती), विद्या-अविद्या (जीवांना मोक्ष आणि बंधन यांना कारणरूप असणारी बहिरंग शक्ती) ह्लादिनी, संवित (अंतरंग शक्ती) आणि माया या शक्ती मूर्तिमंत होऊन त्यांची सेवा करीत आहेत. (५५)


विलोक्य सुभृशं प्रीतो भक्त्या परमया युतः ।
हृष्यत्तनूरुहो भाव परिक्लिन्नात्मलोचनः ॥ ५६ ॥
हृदयी हर्ष ना मावे शोभाही पाहता अशी ।
भक्तिने हर्षले अंग प्रेमाने अश्रु पातले ॥ ५६ ॥

(तं) विलोक्य - त्या श्रीकृष्णाला पाहून - सुभृशं प्रीतः - अत्यंत संतुष्ट झालेला असा - परमया भक्त्या युतः - श्रेष्ठ अशा भक्तीने युक्त झालेला - हृष्यत्तनूरुहः - आनंदित झाले आहे रोमांच ज्याचे अशा - भावपरिक्लिन्नात्मलोचनः - प्रेमामुळे ओले झाले आहे मन ज्याचे व अश्रूपूर्ण झाले आहेत डोळे ज्याचे असा. ॥५५-५६॥
हे सर्व पाहून अक्रूराला परमानंद झाला. मनात परम भक्तीचा उदय झाला. सारे शरीर पुलकित झाले. प्रेमभावाचा उद्रेक झाल्यामुळे त्याचे डोळे अश्रूंनी भरून आले. (५६)


गिरा गद्‍गदयास्तौषीत् सत्त्वमालम्ब्य सात्वतः ।
प्रणम्य मूर्ध्नावहितः कृताञ्जलिपुटः शनैः ॥ ५७ ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां दशमस्कन्धे पूर्वार्धे अक्रूरप्रतियाने एकोन्चत्वारिंशोऽध्यायः ॥ ३९ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
अक्रूरे धैर्य मेळोनी चरणीं त्यां प्रणामिला ।
सगद्‌गद अशा शब्दे भगवत् स्तुति गायिली ॥ ५७ ॥
॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर एकोणचाळिसावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

सात्वतः (सः) - भक्त असा तो अक्रूर - मूर्ध्ना प्रणम्य अवहितः - मस्तकाने प्रणाम करून लक्ष देऊन बसला - कृताञ्जलिपुटः - केलेली आहे ओंजळ ज्याने असा - सत्त्वं आलम्ब्य - धैर्य धरून - गद्‌गदया गिरा - गहिवरलेल्या वाणीने - शनैः अस्तौषीत् - हळू हळू स्तविता झाला. ॥५७॥
आता अक्रूराने धीर धरून भगवंतांच्या चरणांवर डोके टेकवून नमस्कार केला आणि हात जोडून हळू हळू सद्‍गदित वाणीने तो भगवंतांची स्तुती करू लागला. (५७)


अध्याय एकोणचाळिसावा समाप्त

GO TOP