श्रीमद् भागवत पुराण
दशमः स्कन्धः
चत्वारिंशोऽध्यायः

अक्रूरकृता भगवत् स्तुति -

अक्रूराने केलेली भगवान श्रीकृष्णांची स्तुती -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीअक्रूर उवाच -
( मिश्र )
नतोऽस्म्यहं त्वाखिलहेतुहेतुं
     नारायणं पूरुषमाद्यमव्ययम् ।
यन्नाभिजातादरविन्दकोषाद्
     ब्रह्माऽऽविरासीद् यत एष लोकः ॥ १ ॥
( इंद्रवज्रा )
अक्रूर म्हणाले -
प्रभो नमस्ते मुळ हेतु तूची
     नाभीत ब्रह्मा तव जन्मला की ।
जो निर्मितो सर्व चराचराला
     मी रे तुझ्या या चरणा नमीतो ॥ १ ॥

अहं - मी - अखिलहेतुहेतुं - सर्व कारणांचे कारण - पुरुषं - सर्वांच्या शरीरात वास्तव्य करणारा - आद्यं - सर्वांच्या आधी असणारा - अव्ययम् - अविनाशी - यन्नाभिजातात् - ज्याच्या नाभीपासून उत्पन्न झालेल्या - अरविन्दकोशात् - कमळाच्या कोशातून - ब्रह्मा आविरासीत् - ब्रह्मदेव प्रकट झाला - यतः एषः लोकः - ज्यापासून हा लोक - आविरासीत् - प्रकट झाला - (तं) नारायणं - त्या जलशायी अशा - त्वा - तुला - नतः अस्मि - नम्र झालो आहे. ॥१॥
अक्रूर म्हणाला- प्रभो ! आपण प्रकृती इत्यादी सर्व कारणांचे कारण आहात. आपणच अविनाशी पुरुषोत्तम नारायण आहात. तसेच ज्यांनी या जगाची निर्मिती केली, त्या ब्रह्मदेवांची उत्पत्ती आपल्याच नाभिकमलातून झाली. मी आपल्याला नमस्कार करतो. (१)


भूस्तोयमग्निः पवनं खमादिः
     महानजादिर्मन इन्द्रियाणि ।
सर्वेन्द्रियार्था विबुधाश्च सर्वे
     ये हेतवस्ते जगतोऽङ्‌गभूताः ॥ २ ॥
तू इंद्रियांचा अधिदेव तैसा
     ती पंचभूतेहि तुझीच रूपे ।
चराचराचा तुचि एक हेतू
     ही सृष्टि सारी तव रूप आहे ॥ २ ॥

भूः तोयम् - पृथ्वी, जल - अग्निः पवनः - अग्नि, वायु - खम् आदिः - आकाश, अहंकार - महान् अजादिः - महतत्व व प्रकृत्यादि - मनः इन्द्रियाणि - मन व इंद्रिये - सर्वेन्द्रियार्थाः - सर्व इंद्रियांचे शब्दादि विषय - सर्वे विबुधाः - सर्व देव - ये च जगतः - जी काही जगदुत्पत्तीला - हेतवः (ते सर्वे) - कारणीभूत साधने आहेत ती सर्व - ते अङगभूताः - तुझ्या शरीरापासून उत्पन्न झाली आहेत. ॥२॥
पृथ्वी, जल, वायू, आकाश, अहंकार, महत्तत्व, प्रकृती, पुरुष, मन, इंद्रिये, सर्व इंद्रियांचे विषय आणि त्यांच्या अधिष्ठानभूत देवता हेच सर्व चराचर जगाला कारण आहेत. पण हे सगळे आपलेच अंगस्वरूप आहेत. (२)


नैते स्वरूपं विदुरात्मनस्ते
     ह्यजादयोऽनात्मतया गृहीताः ।
अजोऽनुबद्धः स गुणैरजाया
     गुणात् परं वेद न ते स्वरूपम् ॥ ३ ॥
अनात्म सारे जड विश्व ऐसे
     म्हणोनि त्यांना कळणे न रूप ।
ब्रह्मा तुझा तो जरि अंश सत्य
     रजोगुणी त्यां नकळे स्वरूप ॥ ३ ॥

अनात्मतया गृहीताः एते अजादयः - आत्मज्ञानाच्या अभावाने पछाडलेले हे ब्रह्मादिक - आत्मनः ते स्वरूपं न विदुः - आत्मस्वरूपी तुझ्या स्वरूपाला जाणत नाही - हि - कारण - सः अजः - तो ब्रह्मदेव - अजायाः गुणैः अनुबद्धः - मायेच्या गुणांनी बद्ध झालेला - गुणात् परं ते स्वरूपं - गुणाहून पलीकडे असलेल्या तुझ्या स्वरूपाला - न वेद - जाणत नाही. ॥३॥
प्रकृती इत्यादी सर्व पदार्थ अचेतन असल्यामुळे आत्मस्वरूप अशा तुमचे स्वरूप जाणू शकत नाहीत; ब्रह्मदेवसुद्धा प्रकृतीच्या गुणांनी युक्त आहेत. म्हणून तेसुद्धा आपले गुणांच्या पलीकडे असलेले स्वरूप जाणत नाहीत. (३)

विवरण :- एकाच वेळी दोन ठिकाणी राम-कृष्णांना पाहून अक्रूर काहीसा गोंधळला होता. पण काही वेळाने त्याचा हा संभ्रम दूर झाला आणि तो भगवंताची स्तुति करू लागला. 'हे प्रभु ! तू आदि, अव्यय आणि अविकारी आहेस, मायेपासून मुक्त आहेस. तो ब्रह्मा तुझ्या नाभिकमलापासून निर्माण झाला, परंतु तोही तुझे वास्तव रूप जाणत नाही. कारण तो मायेपासून मुक्त नाही. पृथ्वी, आप, तेज, वायु इ. पंचमहाभूते, सर्व देव हे तुझ्यापासून निर्माण झाले. माया, अहंकार इ. जे या जगाचे निर्माते ते तुझ्यापासून निर्माण झाले; परंतु कोणीही तुझे रूप जाणत नाही.' (३)



( अनुष्टुप् )
त्वां योगिनो यजन्त्यद्धा महापुरुषमीश्वरम् ।
साध्यात्मं साधिभूतं च साधिदैवं च साधवः ॥ ४ ॥
( अनुष्टुप् )
ध्याती योगी तुला ध्यानी अंतर्यामी अशा रुपा ।
महापुरुष ते ध्याती परमात्मी रुपा तुझ्या ॥ ४ ॥

योगिनः साधवः - योगी असे सत्पुरुष - महापुरुषं - मोठा पुरुष अशा - साध्यात्मं साधिभूतं साधिदैवं च - अध्यात्मासह, अधिभूतासह व अधिदैवासह असणार्‍या अशा - ईश्वरं त्वां - ऐश्वर्यसंपन्न तुला - अद्धा - उत्तम रीतीने - यजन्ति - पूजितात. ॥४॥
साधू, योगी, अध्यात्म, अधिभूत व अधिदैव यांचे साक्षी महापुरुष व नियंत्रक ईश्वराच्या रूपामध्ये आपलीच उपासना करतात. (४)


त्रय्या च विद्यया केचित् त्वां वै वैतानिका द्विजाः ।
यजन्ते विततैर्यज्ञैः नानारूपामराख्यया ॥ ५ ॥
त्रैविद्यावादि ते कैक सांगती रूप ते तुझे ।
करिती यज्ञ ते श्रेष्ठ यज्ञदेवा उपासिती ॥ ५ ॥

केचित् वैतानिकाः द्विजाः - कित्येक यज्ञ करणारे ब्राह्मण - नानारूपामराख्यया - अनेक प्रकारची रूपे धारण करणार्‍या देवांच्या नावाने - त्रय्या विद्यया च - आणि तीन वेदांनी - विततैः यज्ञैः - विस्तृत झालेल्या यज्ञांनी - त्वां वै - तुलाच - यजन्ते - पूजितात. ॥५॥
काही कर्मकांडी ब्राह्मण वेदमंत्रांनी अनेक देवतावाचक नावे आणि अनेक रूपे असलेले यज्ञ करतात आणि त्याद्वारा आपलीच उपासना करतात. (५)


एके त्वाखिलकर्माणि सन्न्यस्योपशमं गताः ।
ज्ञानिनो ज्ञानयज्ञेन यजन्ति ज्ञानविग्रहम् ॥ ६ ॥
ज्ञानी संन्यास घेवोनी शांतभावात राहती ।
ज्ञानयज्ञी तसे ज्ञानी पूजिती ज्ञानरूप ते ॥ ६ ॥

एके ज्ञानिनः - कित्येक ज्ञानी पुरुष - अखिलकर्माणि संन्यस्य - सर्व कर्मांचा त्याग करून - उपशमं गताः - शांतीला प्राप्त झालेले असे - ज्ञान विग्रहं त्वा - ज्ञानमूर्ति अशा तुला - ज्ञानयज्ञेन - ज्ञानयज्ञाने - यजन्ति - पूजितात. ॥६॥
काही ज्ञानी सर्व कर्मांचा त्याग करून शांत भावात स्थिर राहातात आणि समाधीने ज्ञानस्वरूप अशा आपलीच आराधना करतात. (६)


अन्ये च संस्कृतात्मानो विधिनाभिहितेन ते ।
यजन्ति त्वन्मयास्त्वां वै बहुमूर्त्येकमूर्तिकम् ॥ ७ ॥
वैष्णवो पंचरात्रीत चतुर्व्यूहादि रूप ते ।
एक नारायणो रूपा विधिने पूजिती तुला ॥ ७ ॥

संस्कृतात्मनः - ज्यांचे मन संस्काराने युक्त झाले आहे असे - त्वन्मयाः - तुझ्याच ठिकाणी लीन झालेले - अन्ये ते - दुसरे ते कित्येक - बहुमूर्त्यैकमूर्तिकम् - अनेक रूपांमध्ये एकरूपाने राहणार्‍या - त्वां वै - तुलाच - अभिहितेन विधिना - शास्त्रोक्त पद्धतीने - यजन्ति - पूजितात. ॥७॥
आणखी काही शुद्धचित्त वैष्णव आपणच सांगितलेल्या पांचरात्र इत्यादी विधींनी आपल्याशी तन्मय होऊन आपल्या ’चतुर्व्युह’ इत्यादी अनेक किंवा ’नारायण’ या एकाच स्वरूपाची पूजा करतात. (७)


त्वामेवान्ये शिवोक्तेन मार्गेण शिवरूपिणम् ।
बह्वाचार्यविभेदेन भगवन् समुपासते ॥ ८ ॥
शैव ते शंकरद्वारा शिवरूपास पूजिती ।
अनेक भेद ते त्यात आचार्य मार्ग तेवढे ॥ ८ ॥

भगवन् - हे श्रीकृष्णा - अन्ये - दुसरे - शिवरूपिणं त्वां एव - शिवस्वरूपी अशा तुलाच - ब्रह्‌वाचार्यविभेदेन - अनेक आचार्यांच्या भिन्नत्वामुळे - शिवोक्तेन मार्गेण - शंकरांनी सांगितलेल्या मार्गाने - समुपासते - सेवितात. ॥८॥
भगवन ! दुसरे काही लोक शैवपंथानुसार आचार्यभेदामुळे अनेक अवांतर भेद असलेल्या शिवस्वरूप अशा आपलीच पूजा करतात. (८)


सर्व एव यजन्ति त्वां सर्वदेवमयेश्वरम् ।
येऽप्यन्यदेवताभक्ता यद्यप्यन्यधियः प्रभो ॥ ९ ॥
भेदाने भजती ते ती सर्वपूजा तुझी असे ।
सर्वेश्वर असा तूं तो देवतांरूप ते तुझे ॥ ९ ॥

प्रभो - हे श्रीकृष्णा - अन्यदेवताभक्ताः अपि ये (सन्ति) - दुसर्‍या देवतांची उपासना करणारेहि जे आहेत - (ते) यदि अपि अन्यधियः - ते जरी दुसरीकडे चित्त ठेवणारे असले तरीही - सर्वे एव - सर्वच - सर्वदेवमयेश्वरं त्वां - सर्वदेवस्वरूपी तुला भगवंताला - यजन्ति - पूजितात. ॥९॥
हे प्रभो ! जे लोक दुसर्‍या देवतांची भक्ती करतात आणि त्या देवतांना आपल्यापेक्षा भिन्न समजतात, ते सर्वजणसुद्धा वास्तविक आपलीच आराधना करतात. कारण आपणच सर्व देवतांच्या रूपांमध्ये आहात आणि सर्वेश्वरसुद्धा आहात. (९)


यथाद्रिप्रभवा नद्यः पर्जन्यापूरिताः प्रभो ।
विशन्ति सर्वतः सिन्धुं तद्वत्त्वां गतयोऽन्ततः ॥ १० ॥
पर्वतीच्या नद्या सार्‍या सागतां मिळती तसे ।
अनेक भक्तिच्या मार्गे सर्व ते तुज पूजिती ॥ १० ॥

प्रभो - हे श्रीकृष्णा - यथा अद्रिप्रभवाः नद्यः - जशा पर्वतापासून निघालेल्या नद्या - पर्जन्यपूरिताः - पर्जन्यामुळे तुडुंब भरून - सर्वतः अन्ततः सिन्धुं विशन्ति - सर्व बाजूंनी शेवटी समुद्राला मिळतात - तद्वत् - त्याचप्रमाणे - गतयः - धर्ममार्ग - त्वां (विशन्ति) - तुझ्यात प्रविष्ट होतात. ॥१०॥
हे प्रभो ! जशा पर्वतात उगम पावणार्‍या नद्या पावसाच्या पाण्याने भरून सर्व बाजूंनी समुद्रात प्रवेश करतात, त्याचप्रमाणे सर्व प्रकारचे उपासनामार्ग शेवटी आपल्यालाच येऊन मिळतात. (१०)


सत्त्वं रजस्तम इति भवतः प्रकृतेर्गुणाः ।
तेषु हि प्राकृताः प्रोता आब्रह्मस्थावरादयः ॥ ११ ॥
वस्त्रात सूत जैं होते तसा तू या चराचरी ।
त्रैगुणी भरला तूची सदैव ओतप्रोत की ॥ ११ ॥

सत्त्वं रजः तमः इति - सत्त्व, रज व तम असे हे - भवतः प्रकृतेः गुणाः (सन्ति) - तुझ्या मायेचे गुण होत - हि - आणि - तेषु - त्या गुणांच्या ठिकाणी - प्राकृताः - मायेपासून उत्पन्न झालेले - आब्रह्मस्थावरादयः - ब्रह्मदेवापासून तो वृक्षपाषाणापर्यंतचे सर्व पदार्थ - प्रोताः (सन्ति) - पूर्णरीतीने भरून राहिले आहेत. ॥११॥
प्रभो ! सत्त्व, रज आणि तम हे आपल्या प्रकृतीचे तीन गुण आहेत. ब्रह्मदेवापासून ते स्थावर वस्तूंपर्यंतचे सर्व चराचर जीव त्या तीन गुणांनीच ओतप्रोत भरलेले आहेत. (११)

विवरण :- कृष्णाची स्तुतिकरताना अक्रूर पुढे म्हणतो, 'सर्वच ज्ञानी लोक तुझे खरे स्वरूप जाणत नाहीत. प्रत्येकजण आपआपल्या बुद्धीनुसार तुझ्या रूपाची कल्पना करून तुझी आराधना करतो, कोणी विद्या प्राप्त करून, कोणी यज्ञा-याग करून तर काही सर्व कर्मांचा त्याग करून संन्यस्त वृत्तीने ज्ञानयज्ञाच्या रूपाने तुझी आराधना करतात. काही सगुण-साकार रूपात तुझी भक्ती करतात. कोणी शिवाच्या रूपात, तर कोणी विष्णूच्या रूपात, तर कोणी तुला अनेक रूपात पहातात. तर कोणी इतर देवतांपासून वेगवेगळ्या रूपात पहातात. कोणी एकत्व भावनेने, शेवटी तुझे रूप-गुण समजून घेण्याचे मार्ग अनेक, पण आराध्य तूच एक. ज्याप्रमाणे आकाशातून पडलेले पाणी एकाच सागरात येते, कोणत्याही देवाला केलेला नमस्कार एका केशवाकडेच येतो. त्याप्रमाणे सर्व लोक शेवटी तुझीच पूजा आराधना करतात.' (७-११)



( मिश्र )
तुभ्यं नमस्तेऽस्त्वविषक्तदृष्टये
     सर्वात्मने सर्वधियां च साक्षिणे ।
गुणप्रवाहोऽयमविद्यया कृतः
     प्रवर्तते देवनृतिर्यगात्मसु ॥ १२ ॥
( इंद्रवज्रा )
तू सर्वव्यापी तरि तू निराळा
     तू साक्षि सार्‍या मनवृत्ति लागी ।
अज्ञानकंदो भ्रमती समस्त
     अलिप्त तू तो तुजला नमस्ते ॥ १२ ॥

तुभ्यं नमः - तुला नमस्कार असो - अविषक्तदृष्टये - ज्याची दृष्टी कोठेहि आसक्त होत नाही अशा - सर्वात्मने - सर्वांचा आत्मा अशा - च सर्वाधियां साक्षिणे - आणि सर्वांच्या बुद्धीचा साक्षी अशा - ते (नमः) अस्तु - तुला नमस्कार असो - अविद्यया कृतः - अज्ञानाने केलेला - अयं गुणप्रवाहः - हा गुणांचा ओघ - देवनृतिर्यगात्मसु - देव, मनुष्य व पशुपक्षी यांच्या आत्म्यांच्या ठिकाणी - प्रवर्तते - वेगाने वाहतो. ॥१२॥
परंतु आपण सर्वस्वरूप असूनही त्या गुणांनी लिप्त झालेले नाहीत. आपण सर्व वृत्तींचे साक्षी आहात. तीन गुणांचा प्रवाह अज्ञानमूलक असून तो देवता, मनुष्य, पशु-पक्षी इत्यादी सर्व योनींमध्ये व्याप्त आहे. मी आपणांस नमस्कार करतो. (१२)


अग्निर्मुखं तेऽवनिरङ्‌घ्रिरीक्षणं
     सूर्यो नभो नाभिरथो दिशः श्रुतिः ।
द्यौः कं सुरेन्द्रास्तव बाहवोऽर्णवाः
     कुक्षिर्मरुत् प्राणबलं प्रकल्पितम् ॥ १३ ॥
अग्नी मुखो नी तव पाय पृथ्वी
     ते सूर्य चंद्रो नयने दिशा ज्या ।
त्या कर्ण स्वर्गा तव शीर शोभे
     भुजात देवो बगली समुद्र ।
ती प्राणशक्ती तव वायु वाहे
     संकल्प रूपेचि उपासनेला ॥ १३ ॥

अग्निः ते मुखं - अग्नि हा तुझे मुख होय - अङ्‌घ्रिः अवनिः - पाय ही पृथ्वी - ईक्षणं सूर्यः - डोळा हा सूर्य - नाभिः नमः - नाभिस्थान हे आकाश होय - अथो दिशः श्रुतिः - तसेच दिशा हे कर्ण होत - द्यौः कं - स्वर्ग हे मस्तक होय - सुरेंद्राः तव बाहवः - इंद्र हे तुझे हात होत - अर्णवाः कुक्षिः - समुद्र ही कुशी - मरुत् प्राणबलं प्रकल्पितम् - वायु हाच प्राणस्वरूप सामर्थ्य असे कल्पिले आहे.॥१३॥
अग्नी आपले मुख, पृथ्वी चरण, सूर्य आणि चंद्र नेत्र, आकाश नाभी, दिशा कान, स्वर्ग मस्तक, देवेंद्र भुजा, समुद्र उदर आणि वायू आपल्या प्राणशक्तीच्या रूपामध्ये उपासनेसाठी कल्पिलेला आहे. (१३)


रोमाणि वृक्षौषधयः शिरोरुहा ।
     मेघाः परस्यास्थिनखानि तेऽद्रयः ।
निमेषणं रात्र्यहनी प्रजापतिः
     मेढ्रस्तु वृष्टिस्तव वीर्यमिष्यते ॥ १४ ॥
त्या औषधी रोम रोमात सार्‍या
     ते केश मेघो गिरि अस्थि त्या की ।
त्या पापण्याशी दिन रात्र होय
     ही वृष्टि वीर्यो रुपि कल्पिलेली ॥ १४ ॥

परस्य ते - परमेश्वर अशा तुझे - रोमाणि - अंगावरील केस - वृक्षौषधयः - झाडे व औषधि होत - मेघा शिरोरुहाः - मेघ हे तुझे मस्तकावरील केस होत - अद्रयः अस्थिनखानि - पर्वत हे हाडे व नखे होत - निमेषणं रात्र्यहनी - तुझ्या डोळ्याची उघडझाप हीच अहोरात्र होय - प्रजापतिः तु (तव) मेढ्‌रः - ब्रह्मदेव तर तुझे शिस्न होय - वृष्टिः तव वीर्यं - पाऊस हा तुझे वीर्य - इष्यते - असे समजले जाते. ॥१४॥
वृक्ष आणि वनस्पती हे रोम, मेघ डोक्यावरील केस, पर्वत आपली हाडे व नखे, दिवस व रात्र पापण्यांची उघडझाप, प्रजापती जननेंद्रिय आणि पाऊस हेच आपले वीर्य आहे. (१४)


त्वय्यव्ययात्मन् पुरुषे प्रकल्पिता
     लोकाः सपाला बहुजीवसङ्‌कुलाः ।
यथा जले सञ्जिहते जलौकसो
     ऽप्युदुम्बरे वा मशका मनोमये ॥ १५ ॥
औदुंबराच्या फळि कीट जैसे
     फळांपरी ते रुप लोकपाल ।
उपासनेला परि कल्पिलेले
     मनोमयी पूरुष रूप त्याचे ॥ १५ ॥

अव्ययात्मन् - हे अविनाशी आत्मस्वरूपा श्रीकृष्णा - यथा जलौकसः जले - जसे मत्स्यादि जलचर उदकामध्ये - अपि वा - अथवा - मशकाः उदुम्बुरे संजिहते - बारीक किडे उंबराच्या फळांमध्ये चालतात - (तथा) मनोमये पुरुषे - तसेच मनोरूपी शरीरात वास्तव्य करणार्‍या - त्वयि - तुझ्या ठिकाणी - बहुजीवसंकुलाः - पुष्कळ जीवांनी व्याप्त असे - सपालाः लोकाः - लोकपालांसह लोक - प्रकल्पिताः - कल्पिले आहेत. ॥१५॥
हे अविनाशी भगवन ! जसे पाण्यामध्ये पुष्कळसे जलचर जीव आणि औंदुंबराच्या फळामध्ये लहान-लहान कीटक असतात. त्याचप्रमाणे उपासनेसाठी स्वीकारलेल्या आपल्या मनोमय पुरुषरूपामध्ये अनेक प्रकारच्या जीवजंतूंनी भरलेले असे लोक आणि त्यांचे लोकपाल कल्पिलेले आहेत. (१५)


( अनुष्टुप् )
यानि यानीह रूपाणि क्रीडनार्थं बिभर्षि हि ।
तैरामृष्टशुचो लोका मुदा गायन्ति ते यशः ॥ १६ ॥
( अनुष्टुप् )
क्रीडार्थ धरिशी रूपे लोकांचा शोक हारिशी ।
यश ते निर्मलो ऐसे गातात लोक ते पुन्हा ॥ १६ ॥

इह - ह्या लोकी - क्रीडनार्थं - क्रीडा करण्याकरिता - यानि यानि रूपाणि - जी जी रूपे - बिभर्षि - धरतोस - तैः हि - त्यांनीच - आमृष्टशुचः - शोकरहित झालेले - लोकाः - लोक - मुदा ते यशः गायन्ति - आनंदाने तुझे यश गातात. ॥१६॥
प्रभो ! आपण लीला करण्यासाठी पृथ्वीवर जी जी रूपे धारण करता, ते सर्व अवतार, लोकांचा शोक-मोह धुऊन टाकतात आणि नंतर तेच लोक मोठ्या आनंदाने आपल्या यशाचे गायन करीत असतात. (१६)


नमः कारणमत्स्याय प्रलयाब्धिचराय च ।
हयशीर्ष्णे नमस्तुभ्यं मधुकैटभमृत्यवे ॥ १७ ॥
रक्षिण्या वेद तू घेशी मत्स्यावतार तो तसा ।
हैग्रीव वधिण्या दैत्य नमितो तेहि रूप मी ॥ १७ ॥

प्रलयाब्धिचराय - प्रलयकाळच्या समुद्रात संचार करणार्‍या - कारणमत्स्याय नमः - जगदुत्पत्तीला कारणीभूत अशा मत्स्यावतार घेणार्‍या तुला नमस्कार असो - च मधुकैटभमृत्यवे - आणि मधुदैत्य व कैटभ दैत्य ह्यांचा मृत्यूच अशा - हयशीर्ष्णे तुभ्यं नमः - हयशीर्ष नावाने अवतार घेणार्‍या तुला नमस्कार असो.॥१७॥
आपण वेद, ऋषी, वनस्पती यांचे रक्षण आणि सत्यव्रताला ज्ञान देण्यासाठी म्हणून मत्स्यरूप धारण करून प्रलयाच्या समुद्रामध्ये स्वच्छंद विहार केला होता. त्या मत्स्यरूपाला मी नमस्कार करतो. आपणच मधु आणि कैटभ नावाच्या असुरांचा संहार करण्यासाठी हयग्रीव अवतार धारण केला होता. मी आपल्या त्या रूपालासुद्धा नमस्कार करतो. (१७)


अकूपाराय बृहते नमो मन्दरधारिणे ।
क्षित्युद्धारविहाराय नमः सूकरमूर्तये ॥ १८ ॥
विशाल कूर्मरूपाने मंदराचल धारिला ।
क्षित्युद्धारा वराहोही त्या रूपा नमि मी पुन्हा ॥ १८ ॥

मन्दरधारिणे - मंदरपर्वताला पाठीवर धारण करणार्‍या - बृहते अकूपाराय नमः - व मोठे कूर्मरूप धारण करणार्‍या तुला नमस्कार असो - क्षित्युद्धारविहाराय - पृथ्वीचा उद्धार करणे हीच आहे क्रीडा ज्याची अशा - सूकरमूर्तये (त्वां) - वराहस्वरूप घेणार्‍या तुला - नमः - नमस्कार असो. ॥१८॥
आपणच ते विशाल कूर्माचे रूप धारण करून मंदराचलाला धारण केले होते. आपल्याला मी नमस्कार करतो. आपणच पृथ्वीच्या उद्धाराची लीला करण्यासाठी वराहरूपाचा स्वीकार केला होता. आपणास माझा नमस्कार असो. (१८)


नमस्तेऽद्‍भुतसिंहाय साधुलोकभयापह ।
वामनाय नमस्तुभ्यं क्रान्तत्रिभुवनाय च ॥ १९ ॥
नृसिंहरूप तू घेशी भक्तप्रल्हाद रक्षिण्या ।
वामनो व्यापिशी विश्व तुजला प्रणिपातहा ॥ १९ ॥

साधुलोकभयापह - हे सत्पुरुषांची भीति दूर करणार्‍या श्रीकृष्णा - अद्भुतसिंहाय ते नमः - आश्चर्यकारक सिंहरूप धारण करणार्‍या तुला नमस्कार असो - च - आणि - क्रान्तत्रिभुवनाय - ज्याने त्रैलोक्य पादाक्रान्त केले आहे अशा - वामनाय तुभ्यं - वामनावतारी तुला - नमः - नमस्कार असो. ॥१९॥
प्रल्हादासारख्या साधुजनांचे भय मिटविणार्‍या हे प्रभो ! आपल्या त्या अलौकिक नृसिंह रूपाला मी नमस्कार करतो. आपण वामनरूप घेऊन आपल्या पायाने तीन लोक व्यापले होते. मी आपणास नमस्कार करीत आहे. (१९)


नमो भृगूणां पतये दृप्तक्षत्रवनच्छिदे ।
नमस्ते रघुवर्याय रावणान्तकराय च ॥ २० ॥
नमो परशुरामाला गर्वी क्षत्रीय मारिशी ।
नमस्ते रघुवीराला रावणा तूच मारिशी ॥ २० ॥

दृप्तक्षत्रवनच्छिदे - गर्विष्ठ क्षत्रियरूपी अरण्याला तोडणार्‍या - भृगूणां पतये नमः - भृगुश्रेष्ठ परशुराम अशा तुला नमस्कार असो - च - आणि - रावणान्तकराय - रावणाचा नाश करणार्‍या - रघुवर्याय ते नमः - रघुश्रेष्ठ अशा तुला नमस्कार असो. ॥२०॥
धर्माचे उल्लंघन करणार्‍या गर्विष्ठ क्षत्रियरूपी वनाला तोडणार्‍या परशुरामाला मी नमस्कार करतो. रावणाचा नाश करणार्‍या श्रीरामांना मी नमस्कार करतो. (२०)


नमस्ते वासुदेवाय नमः सङ्‌कर्षणाय च ।
प्रद्युम्नायनिरुद्धाय सात्वतां पतये नमः ॥ २१ ॥
नमस्ते वासुदेवाला नमो संकर्षणासही ।
प्रद्युम्न अनिरुद्धो या रूपालाही मनो नमः ॥ २१ ॥

वासुदेवाय ते नमः - वसुदेवपुत्र अशा तुला नमस्कार असो - च - आणि - संकर्षणाय नमः - बलरामस्वरुपी तुला नमस्कार असो - प्रद्युम्नाय अनिरुद्धाय - प्रद्युन्म व अनिरुद्ध ह्या नावांनी अवतीर्ण होणार्‍या - सात्वतांपतये (ते) - यादवांचा अधिपति अशा तुला - नमः - नमस्कार असो ॥२१॥
वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध या चतुर्व्युहरूपात असणार्‍या भागवंतांच्या देवाला मी नमस्कार करतो. (२१)


नमो बुद्धाय शुद्धाय दैत्यदानवमोहिने ।
म्लेच्छप्रायक्षत्रहन्त्रे नमस्ते कल्किरूपिणे ॥ २२ ॥
नमो बुद्धास शुद्धाला दैत्य दानव मोहना ।
म्लेंच्छप्राय नृपा मारी कल्की तू तूजला नमो ॥ २२ ॥

दैत्यदानवमोहिने - दितिपुत्र व दनुपुत्र अशा दुष्टांना मोहित करणार्‍या - शुद्धाय बुद्धाय नमः - शुद्ध अशा ज्ञानस्वरुपी तुला नमस्कार असो - म्लेच्छप्रायक्षत्रहन्त्रे - म्लेच्छमय झालेल्या क्षत्रियांचा नाश करणार्‍या - कल्किरूपिणे ते नमः - कल्किस्वरूपाने अवतार घेणार्‍या तुला नमस्कार असो ॥२२॥
दैत्य आणि दानवांना मोहित करण्यासाठी शुद्ध असे बुद्धरूप घेणार्‍या आपणास मी नमस्कार करीत आहे. पृथ्वीवरील क्षत्रिय जेव्हा म्लेंच्छांप्रमाणे वर्तन करू लागतील, तेव्हा त्यांचा नाश करण्यासाठी कल्किरूप घेणार्‍या आपणास मी नमस्कार करतो. (२२)


भगवन् जीवलोकोऽयं मोहितस्तव मायया ।
अहं ममेत्यसद्‍ग्राहो भ्राम्यते कर्मवर्त्मसु ॥ २३ ॥
भगवान् सर्व हे जीव मायेने मोहिले पहा ।
मी माझे म्हणती सर्व फिरती कर्ममार्गि ते ॥ २३ ॥

भगवन् - हे श्रीकृष्णा - अयं जीवलोकः - मृत्युलोकातील हा प्रत्येक प्राणी - तवमायया मोहितः (अस्ति) - तुझ्या मायेने मोहित झाला आहे - अहं मम इति असद्ग्राहः - मी, माझे अशाप्रकारचा जो मिथ्या अभिमान तो - कर्मवर्त्मसु भ्राम्यते - कर्ममार्गात प्राण्याला फिरवितो ॥२३॥
भगवन ! हा जीवलोक आपल्या मायेने मोहित झाला आहे. त्यामुळेच ’मी-माझे’ या खोट्या दुराग्रहात फसून कर्ममार्गामध्ये भटकत आहे.


अहं चात्मात्मजागार दारार्थस्वजनादिषु ।
भ्रमामि स्वप्नकल्पेषु मूढः सत्यधिया विभो ॥ २४ ॥
स्वप्नवत् सर्व ही सृष्टी घर दारा नि पुत्र ते ।
धन नी स्वजनी सारे सत्य मानिता फसे ॥ २४ ॥

च - आणि - विभो - हे कृष्णा - मूढः अहं - मूर्ख असा मी - स्वप्नकल्पेषु - स्वप्नाप्रमाणे मिथ्या असलेल्या - आत्मात्मजागारदारार्थ - स्वतःचा देह, पुत्र, घर, स्त्री, द्रव्य - स्वजनादिषु - व आप्तेष्ट यांच्या ठिकाणी - सत्यधिया भ्रमामि - ती खरी आहेत असे मानून भटकतो ॥२४॥
हे प्रभो ! मी सुद्धा किती मूर्ख ! स्वप्नात दिसणार्‍या पदार्थाप्रमाणे भ्रामक असणारे देह-घर, पत्‍नी-पुत्र, धन-स्वजन इत्यादी खरे समजून त्यांच्या मोहात गुंतून भटकत आहे. (२४)


अनित्यानात्मदुःखेषु विपर्ययमतिर्ह्यहम् ।
द्वन्द्वारामस्तमोविष्टो न जाने त्वात्मनः प्रियम् ॥ २५ ॥
अनित्या नित्य मी मानी दुःखाला सुख मानिले ।
द्वंद्वात रमलो नित्य विसरे सत्य तू प्रिया ॥ २५ ॥

अनित्यानात्मदुःखेषु - नित्य, आत्मरूप नव्हेत आणि दुःखमय आहेत अशा वस्तूंच्या ठिकाणी - विपर्ययमतिः अहं - उलटबुद्धी झालेला मी - द्वंद्वारामः - सुखदुःखादि द्वंद्वांच्या ठिकाणी रममाण होणारा - तमोविष्टः - अज्ञानाने वेष्टिलेला असा - आत्मनः प्रियं तु - स्वतःचे प्रिय तर - न हि जाने - जाणतच नाही ॥२५॥
प्रभो ! माझा मूर्खपणा तर पहा ! मी अनित्य वस्तूंना नित्य, अनात्म्याला आत्मा आणि दुःखाला सुख समजलो. अशा प्रकारे मी अज्ञानाने सांसारिक सुख-दुःखांतच रमून गेलो आणि ज्यांच्यावर खरे प्रेम करावे त्या आपल्याला विसरलो. (२५)

विवरण :- कृष्णाच्या कृपेने अक्रूरालाहि आत्मज्ञान प्राप्त झाले. इतर सर्व (क्षुद्र) जीवांप्रमाणे आपणहि मायेने, अज्ञानाने या संसाराच्या पाशात अडकलो आणि खर्‍या ज्ञानाला, सुखाला आणि प्रभु-चरण-दर्शनास वंचित झालो, हे त्यास समजले. विषयलोलुप होऊन आपण या संसाराच्या चक्रात भ्रमण करीत राहिलो आणि खर्‍या आनंदापासून दूर राहिलो, कृष्णदर्शनाची आपणांस आस लागली नाही. (२५)



यथाबुधो जलं हित्वा प्रतिच्छन्नं तदुद्‍भवैः ।
अभ्येति मृगतृष्णां वै तद्वत्त्वाहं पराङ्‌मुखः ॥ २६ ॥
शेवाळ पाहता मूढ खालचे जल नेणती ।
मृगजळा परे सौख्य भटके त्याज साठि की ॥ २६ ॥

अबुधः - अज्ञानी पुरुष - तदुद्‍भवैः प्रतिच्छनं - त्या उदकापासून उत्पन्न झालेल्या गवतांनी आच्छादिलेल्या - जलं हित्वा - उदकाला सोडून - यथा मृगतृष्णां अभ्येति - जसा मृगजळाकडे धाव घेतो - तद्वत् वै - त्याचप्रमाणे - अहं - मी - त्वा पराङ्गमुखः - तुला सोडून ॥२६॥
जसे एखाद्या अडाणी माणसाने पाण्यासाठी तळ्याकडे जावे आणि त्याच्यावर त्याच्यामुळेच उत्पन्न झालेले शेवाळ पाहून तेथे पाणी नाही असे समजावे आणि या‍उलट मृगजळाकडे धाव घ्यावी, तसाच मीसुद्धा आपल्याला सोडून खोट्या सुखाच्या मागे भटकत आहे. (२६)


नोत्सहेऽहं कृपणधीः कामकर्महतं मनः ।
रोद्धुं प्रमाथिभिश्चाक्षैः ह्रियमाणमितस्ततः ॥ २७ ॥
अक्षर ज्ञान ना जाणी कर्म संकल्प हो मनी ।
दुर्दम्य विषयो सारे मन ना रोधु मी शके ॥ २७ ॥

कृपणधीः अहं - कृपणबुद्धीचा मी - प्रमाथिभिः अक्षैः - क्षुब्ध झालेल्या डोळ्यांनी - इतस्ततः ह्रियमाणं - इकडे तिकडे हरण केल्या जाणार्‍या - कामकर्महतं मनः - सकामकर्मांनी दुर्बळ बनलेल्या मनाला - रोद्धुं न उत्सहे - रोधण्यास उत्सुक होत नाही ॥२७॥
माझी बुद्धी विषयवासनायुक्त आहे. माझ्या मनामध्ये अनेक वस्तूंच्या कामना आणि त्या पूर्ण करण्यासाठी कर्म करण्याचे संकल्प उठत असतात. शिवाय निग्रह करण्यास अत्यंत कठीण अशी ही इंद्रिये मनाला बळजबरीने इकडे तिकडे फरपटत नेतात, म्हणून मी या मनाला रोखू शकत नाही. (२७)

विवरण :- आपले अज्ञान कसे होते, याचे वर्णन करताना अक्रूर शेवाळाने झाकलेल्या पाण्याचे आणि मृगजळाचे उदाहरण देतो. अज्ञानी मनुष्य शेवाळाने झाकलेले पाणी सोडून मृगजळाच्या मागे धावतो. त्याचे हाते काहीच लागत नाही. व्यावहारिक दृष्टीने पाहिले तर शेवाळाने झाकलेले पाणी अशुद्ध, दूषित मानावयास हरकत नाही. पण ते सोडून मृगजळाचे मागे धावणे कितपत योग्य ? तिथे तर पाण्याचे अस्तित्वच नसून केवळ आभास असतो. आणि तो आभास तहानलेल्यास मैलोगणती पळवितो. पण त्याचे हाती शेवटी शून्यच लागते; वाटयास केवल श्रमच येतात. शेवाळाखाली निदान खर्‍या पाण्याचे अस्तित्व तरी असते. शिवाय जी तृणपाती वर दिसतात, ती त्याच पाण्यातून निर्माण झालेली असतात, ती दूर केल्यानंतर खर्‍या पाण्याची प्राप्ती होणारच असते. त्याप्रमाणे मायेच्या आवरणाखाली तुझे शुद्ध परमात्मस्वरूप पाहण्याचे सोडून विषयवासनांनी युक्त अशा देहाच्या मोहात मी पडलो आणि मृगजळाप्रमाणे मला तुझ्य़ा दर्शनाची प्राप्ती कधीच झाली नाही. शेवटी आता ती शुभवेळ आली आहे, असे अक्रूरास वाटते. श्रीकृष्णाचे दर्शन त्याच्याच इच्छेने आणि आपल्या महद्‌भाग्याने झाले आहे. आता आपल्या उद्धाराची वेळ आली आहे. आणखी काय हवे ? कृष्ण कृपेने आपल्या हातून सत्कृत्ये घडतील, माया-बंध गळून पडतील आणि आपल्याला कायमस्वरूपी कृष्णाचे चरणी आश्रय मिळेल, याची त्यास खात्री पटली. (२७)



( वसंततिलका )
सोऽहं तवाङ्‌घ्र्युपगतोऽस्म्यसतां दुरापं
     तच्चाप्यहं भवदनुग्रह ईश मन्ये ।
पुंसो भवेद् यर्हि संसरणापवर्गः
     त्वय्यब्जनाभ सदुपासनया मतिः स्यात् ॥ २८ ॥
( वसंततिलका )
ऐसा भवात फिरुनी तव छत्रि आलो ।
     हाही तुझाचि गमतो मजला प्रसाद ।
येताचि काळ भवमुक्तहि जीव होण्या ।
     तो संत संग घडतो मनही स्थिरावे ॥ २८ ॥

ईश - हे श्रीकृष्णा - सः अहं - तो मी - असतां दुरापं तव अङ्‌‍घ्रि - दुष्टांना प्राप्त होण्यास कठीण अशा तुझ्या चरणाप्रत - उपगतः अस्मि - प्राप्त झालो आहे - तत् च अपि - आणि तो सुद्धा - भवदनुग्रहः (अस्ति) - तुझा उपकार होय - (इति) मन्ये - असे मी मानतो - अब्जनाभ - हे पद्मनाभा कृष्णा - सदुपासनया - संतांच्या सेवेने - (यदि) त्वयि मतिः स्यात् - जर तुझ्या ठिकाणी बुद्धि जडेल - पुंसः - पुरुषाला - संसरणापवर्गः भवेत् - संसारापासून मुक्ति प्राप्त होईल ॥२८॥
तो मी, अभक्तांना अतिशय दुर्लभ अशा आपल्या चरणकमलांना शरण आलो आहे. हे स्वामी ! हा सुद्धा मी आपला कृपाप्रसादच मानतो. कारण हे पद्मनाभ ! जेव्हा जीवाची संसारातून मुक्त होण्याची वेळ येते, तेव्हाच सत्पुरुषांची उपासना घडून चित्तवृत्ती आपल्या ठायी जडते. (२८)


( अनुष्टुप् )
नमो विज्ञानमात्राय सर्वप्रत्ययहेतवे ।
पुरुषेशप्रधानाय ब्रह्मणेऽनन्तशक्तये ॥ २९ ॥
( अनुष्टुप् )
नमो विज्ञान रूपाला अधिष्ठाता जिवास तू ।
विश्वाचा नियता तूची ब्रह्मानंता तुला नमो ॥ २९ ॥

विज्ञानमात्राय - अनुभविक ज्ञान हेच आहे स्वरुप ज्याचे अशा - सर्वप्रत्ययहेतवे - सर्वज्ञानाला कारणीभूत - पुरुषेशप्रधानाय - पुरुषांच्या अधिपतींमध्ये मुख्य अशा - अनन्तशक्तये ब्रह्मणे नमः - अनन्त शक्तीच्या ब्रह्मरुपी तुला नमस्कार असो ॥२९॥
! आपण शुद्ध विज्ञानस्वरूप आहात. सर्व अनुभूतींचे आपणच कारण आहात. जीव, ईश्वर आणि प्रकृती आपणच आहात. आपल्या शक्ती अनंत आहेत. आपण स्वतः ब्रह्म आहात. मी आपणांस नमस्कार करीत आहे. (२९)


नमस्ते वासुदेवाय सर्वभूतक्षयाय च ।
हृषीकेश नमस्तुभ्यं प्रपन्नं पाहि मां प्रभो ॥ ३० ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां दशमस्कन्धे पूर्वार्धे अक्रूरस्तुतिर्नाम चत्वारिंशोऽध्यायः ॥ ४० ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
नमस्ते वासुदेवाला सर्व भूतात साक्षितू ।
नमितो मी हृषीकेशा रक्ष मी शरणी तुझ्या ॥ ३० ॥
॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर चाळिसावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

प्रभो हृषीकेश - इंद्रियांचा चालक अशा हे श्रीकृष्णा - सर्वभूतक्षयाय वासुदेवाय ते - सर्व प्राण्यांचा अन्त करणार्‍या वसुदेवपुत्र अशा तुला - नमः - नमस्कार असो - तुभ्यं च नमः - तुला पुनः नमस्कार असो - प्रपन्नं मां पाहि - शरणागत अशा माझे रक्षण कर ॥३०॥
प्रभो ! आपणच वासुदेव आणि सर्व जीवांचे आश्रयस्थान संकर्षण आहात. बुद्धी मनाच्या व अधिष्ठात्या (प्रद्युम्न आणि अनिरुद्ध) हृषीकेशा ! मी आपणांस नमस्कार करतो. प्रभो ! शरण आलेल्या माझे रक्षण करा. (३०)


अध्याय चाळिसावा समाप्त

GO TOP