|
श्रीमद् भागवत पुराण
कंसाज्ञया रामकृष्णौ मथुरां आनेतुं अक्रूरस्य अक्रूराचे व्रजगमन - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् ) अक्रूरोऽपि च तां रात्रिं मधुपुर्यां महामतिः । उषित्वा रथमास्थाय प्रययौ नन्दगोकुलम् ॥ १ ॥
( अनुष्टुप् ) श्रीशुकदेव सांगतात - अक्रूर बुद्धिमान् रात्री मथुरी थांबुनी पुन्हा । उषःकाली रथा मध्ये निघाले व्रजभूमिसी ॥ १ ॥
च - आणि - महामतिः अक्रूरः अपि - विशाल आहे बुद्धि ज्याची असा अक्रूरहि - तां रात्रिं मधुपुर्यां उषित्वा - त्या रात्री मथुरेत राहून - रथं आस्थाय - रथात बसून - नन्दगोकुलं प्रययौ - नंदाच्या गौळवाडयास गेला. ॥१॥
श्रीशुकाचार्य म्हणतात - महाबुद्धिमान अक्रूरसुद्धा त्या रात्री मथुरेत राहून सकाळी रथात बसून नंदांच्या गोकुळाकडे निघाला. (१)
गच्छन् पथि महाभागो भगवत्यम्बुजेक्षणे ।
भक्तिं परामुपगत एवमेतदचिन्तयत् ॥ २ ॥
अक्रूर व्रज मार्गात कमलाक्ष हरीचिया । भक्तिने घरले पूर्ण मनात चिंतु लागले ॥ २ ॥
अम्बुजेक्षणे भगवति - भगवान कमलनयन श्रीकृष्णाच्या ठिकाणी - परां भक्तिं उपगतः - श्रेष्ठ भक्तीप्रत प्राप्त झालेला - महाभागः (सः) - मोठा भाग्यवान असा तो अक्रूर - पथि गच्छन् - रस्त्याने जात असता - एवं एतत् अचिन्तयत् - अशा प्रकारे मनात आणिता झाला. ॥२॥
भाग्यवान अक्रूराची कमलनयन भगवंतांच्या ठिकाणी परम भक्ती होती. त्यामुळे गोकुळात जाताना तो असा विचार करू लागला. (२)
किं मयाऽऽचरितं भद्रं किं तप्तं परमं तपः ।
किं वाथाप्यर्हते दत्तं यद् द्रक्ष्याम्यद्य केशवम् ॥ ३ ॥
कोणते पुण्य मी केले तपस्या दान कोणते । जयाचे फळ ते आज घडते ,कृष्ण दर्शन ॥ ३ ॥
मया किं भद्रं आचरितं - मी कोणते पुण्य आचरिले - किं परमं तपः तप्तं - कोणते श्रेष्ठ तप केले - अथ अपि वा - किंवा तसेच - अर्हते किं दत्तं - सत्पात्री कोणते दान केले - यत् - ज्याच्या योगाने - अद्य केशवं द्रक्ष्यामि - आज मी श्रीकृष्णाला पाहीन. ॥३॥
मी असे कोणते शुभ कर्म केले होते, अशी कोणती दीर्घ तपश्चर्या केली होती किंवा कोणत्या सत्पात्र व्यक्तीला असे कोणते दान दिले होते की, ज्याचे फळ म्हणून आज मला भगवान श्रीकृष्णांचे दर्शन होणार ! (३)
ममैतद् दुर्लभं मन्ये उत्तमःश्लोकदर्शनम् ।
विषयात्मनो यथा ब्रह्म कीर्तनं शूद्रजन्मनः ॥ ४ ॥
विषयासक्त मी ऐसा ऋषिंनाही न तो मिळे । दुर्लभो मजला जैसे शूद्रपुत्रास वेद ते ॥ ४ ॥
विषयात्मनः शूद्रजन्मनः - विषयासक्त अशा शूद्रयोनीत जन्मलेल्याला - यथा ब्रह्मकीर्तनं (दुर्लभम्) - जसे वेदाध्ययन दुर्लभ - एतत्उत्तमश्लोकदर्शनम् - हे उत्तमश्लोक अशा श्रीकृष्णाचे दर्शन - मम दुर्लभं मन्ये - मला दुर्लभ आहे असे मी मानितो. ॥४॥
विषयासक्त अशा मला भगवंतांचे दर्शन अतिशय दुर्लभ वाटते. जसे शूद्र जातीतील माणसाला वेदपठण दुर्लभ असते. (४)
विवरण :- कंसाच्या आज्ञेप्रमाणे राम-कृष्णांना मथुरेस आणण्यास अक्रूर निघाला. वास्तविक त्या दोघांना मथुरेस आणण्यामागचा कंसाचा हेतू त्यांचा वध करणे हाच होता. आणि अक्रूराला त्याची आज्ञा पाळणे आवश्यक होते. तरीही गोकुळकडे चाललेला अक्रूर शेवटी भगवंताला आणण्यासच निघाला होता. त्यामुळे गोकुळाची वाट चालणार्या त्याच्या मनात सात्त्विक आणि कृष्णाच्याच विचारांनी गर्दी केली हा भगवद्भक्तीचा महिमा. अक्रूराला वाटले, आता आपणांस कृष्णाचे दर्शन होणार. खरंच, आपले इतके भाग्य आहे का ? माझ्यासारख्या सामान्य माणसाची ही पूर्वपुण्याईच म्हणायची, नाहीतर (त्या काळातील प्रथेप्रमाणे) जसे शूद्राला वेदाध्ययन दुर्लभ, तसे मला कृष्णदर्शन. पण ते होण्याचा योग मात्र आज आला आहे. (४)
मैवं ममाधमस्यापि स्यादेवाच्युतदर्शनम् ।
ह्रियमाणः कलनद्या क्वचित्तरति कश्चन ॥ ५ ॥
तरीही मजला नक्की घडेल कृष्णदर्शन । काळाचा ओघ हा ऐसा तृण जै पार हो नदी ॥ ५ ॥
मा एवं - असे नाही - अधमस्य मम अपि - नीच अशा मलाहि - अच्युतदर्शनं स्यात् एव - श्रीकृष्णाचे दर्शन होणारच - कालनद्या ह्लियमाणः कश्चन - काळरूपी नदीने वाहून नेला जाणारा एखादा प्राणी सुद्धा - क्वचित् - एखादे वेळी - तरति - तरून जातो. ॥५॥
परंतु तसेच काही नाही. मला अधमालासुद्धा भगवान श्रीकृष्णांचे दर्शन होईलच; जसे काळरूप नदीतून वाहात जाणारा एखादा एखादेवेळी संसार पार करू शकतो. (५)
विवरण :- अक्रूर पुढे म्हणतो, या काळरूपी नदीच्या प्रवाहात तरून जाणे आणि पैलतीराला लागणे, म्हणजेच हा संसाररूपी भवसागर उत्तम तर्हेने पार करणे, हे कठीण. त्या दुस्तर अशा प्रवाहात मनुष्य बुडणेच अटळ. पण अशा या भवसागरातून जाणारे विष्णूभक्त मात्र सुखरूपपणे तीराला लागतात; त्यांचा उद्धार होतो. कंसाचा सेवक असलो तरी मी भक्त कृष्णाचाच आहे; त्यामुळे आता त्याचे दर्शन होऊन माझा निश्चितच उद्धार होणार. (५)
ममाद्यामङ्गलं नष्टं फलवांश्चैव मे भवः ।
यन्नमस्ये भगवतो योगिध्येयांघ्रिपङ्कजम् ॥ ६ ॥
अशूभ नष्टले माझे साफल्य जन्मि जाहले । आज त्या चरणी साक्षात् नमस्कार करीन मी । यती योगी ययांचा जो ध्यानाचा विषयो असे ॥ ६ ॥
अद्य मम अमङगलं नष्टं - आज माझे पाप नाहीसे झाले - च - आणि - मे भवः फलवान् एव (जातः) - माझा जन्म सफलच झाला - यत् - ज्याअर्थी - भगवतः योगिध्येयाङ्घ्रिपङकजं - योग्यांनी ध्यान करण्यास योग्य अशा श्रीकृष्णाच्या पदकमळाला - नमस्ये - मी नमस्कार करीन. ॥६॥
आज माझी सारी पापे नष्ट झाली. आज माझा जन्म सफळ झाला; कारण योग्यांच्यासुद्धा ध्यानाचा विषय असणार्या भगवंतांच्या चरणकमलांना मी आज प्रत्यक्ष नमस्कार करणार आहे. (६)
( मिश्र )
कंसो बताद्याकृत मेऽत्यनुग्रहं द्रक्ष्येऽङ्घ्रिपद्मं प्रहितोऽमुना हरेः । कृतावतारस्य दुरत्ययं तमः पूर्वेऽतरन् यन्नखमण्डलत्विषा ॥ ७ ॥
( इंद्रवज्रा ) कंसेचि केली बहु ही कृपा की स्वयं हरीच्या पदि पावतो मी । अज्ञान नाशी नखकांति ज्याची स्वयं हरी तो प्रगटे इथे की ॥ ७ ॥
अद्य बत - आज खरोखर - कंसः मे अत्यनुग्रहं (एव) अकृत - कंस मजवर मोठी कृपाच करिता झाला - अमुना प्रहितः अहं - त्याने पाठविलेला असा मी - पूर्वे - पूर्वकाळचे लोक - यन्नखमण्डलत्विषा - ज्याच्या नखसमूहाच्या तेजाने - दुरत्ययं तमः - ओलांडण्यास कठीण अज्ञानाला - अतरन् - ओलांडते झाले - (तस्य) कृतावतारस्य हरेः - घेतलेला आहे अवतार ज्याने अशा श्रीकृष्णाच्या त्या - अङ्घ्रिपङकजं - पदकमळाला - द्रक्ष्ये - मी पाहीन. ॥७॥
अहो ! कंसाने आज माझ्यावर मोठीच कृपा केली आहे. त्याने पाठविल्यानेच मी या भूतलावर अवतीर्ण झालेल्या स्वतः भगवंतांच्या चरणकमलांचे दर्शन घेईन. त्यांच्या नखमंडलाच्या केवळ कांतीचे ध्यान करूनही पूर्वीचे ऋषी या अज्ञानरूप अपार अंधकारराशीला पार करू शकले. (७)
विवरण :- अक्रूरास वाटते, कंस आणि सत्कृत्य ? या गोष्टी कधीच घडणे शक्य नाही. त्याने केलेल्या कोणत्याही कृत्याचा परिणाम अमंगल, अशुभच. आता मात्र तो मला गोकुळात पाठवतो आहे, त्याचा हेतू वाईट आहे. पण परिणामी माझा मात्र फायदाच होणार आहे. मला कृष्णदर्शन होणार. माझे जीवन धन्य होणार. नकळत का होईना, (नकळत हा शब्द इथे महत्त्वाचा) कंसाने माझ्यावर हे उपकारच केले म्हणायचे ! (७)
यदर्चितं ब्रह्मभवादिभिः सुरैः
श्रिया च देव्या मुनिभिः ससात्वतैः । गोचारणायानुचरैश्चरद्वने यद्गोपिकानां कुचकुङ्कुमाङ्कितम् ॥ ८ ॥
ब्रह्मादि देवो पद ध्याति ज्याचे लक्ष्मी नि ज्ञानी नच सोडि ज्याते । चारावया गायिहि तेच जाती नी रंगती गोपिका वक्षगंधे ॥ ८ ॥
ब्रह्मभवादिभिः सुरैः - ब्रह्मदेव, शंकर इत्यादि देवांनी - देव्या स्त्रिया - देवी लक्ष्मीने - च - आणि - ससात्त्वतैः मुनिभिः - भक्तांसह मुनींनी - अनुचरैः (सह) - सोबत्यांबरोबर - गोचरणाय वने चरत् यत् - गाईंना चारण्यासाठी रानात फिरणारे जे - अर्चितम् - पूजिले - च - आणि - यत् - जे - गोपिकानां कुचकुङ्कुमाङ्कितं (अस्ति) - गोपींच्या स्तनांवरील केशराने युक्त आहे.॥८॥
ब्रह्मदेव, शंकर इत्यादी देव ज्यांची उपासना करतात, लक्ष्मीदेवी आणि प्रेमी भक्तांसह मोठमोठे ज्ञानी लोकसुद्धा ज्यांची आराधना करतात, जे गाई चारण्यासठी गोपालांबरोबर वनामध्ये भ्रमण करतात आणि जे गोपींच्या वक्षःस्थळावर लागलेल्या केशराने रंगून जातात, त्या श्रीचरणांचे आज मला दर्शन होणार ! (८)
द्रक्ष्यामि नूनं सुकपोलनासिकं
स्मितावलोकारुणकञ्जलोचनम् । मुखं मुकुन्दस्य गुडालकावृतं प्रदक्षिणं मे प्रचरन्ति वै मृगाः ॥ ९ ॥
त्या पोवळ्यांचा पदि रंग आहे मधु स्मितो नासिक पोपटाचे । गालावरी केश रुळोनि येती त्या श्रीमुखा मी अजि पाहतो की । अवश्य होई मज दर्शनो ते हरीण धावे उजव्या कराने ॥ ९ ॥
सुकपोलनासिकं - सुंदर आहेत गाल व नाक ज्याच्या ठिकाणी असे - स्मितावलोकारुणकञ्जलोचनं - हास्ययुक्त पाहणे व रक्तकमलासारखे आहेत नेत्र ज्याचे असे - गुडालकावृतं - कुरळ्या केसांनी आच्छादलेले - मुकुन्दस्य मुखं - श्रीकृष्णाचे मुख - नूनं द्रक्ष्यामि - खरोखर मी पाहीन - यत् - कारण - मृगाः - हरिण - मे प्रदक्षिणं प्रचरन्ति - माझ्या उजव्या बाजूने जात आहेत. ॥९॥
त्या मुकुंदांचे गाल व नाक देखणे आहे. त्यांचे लालसर कमलासारखे नेत्र स्मितपूर्वक पाहतात. त्यांचे ते कुरळ्या केसांनी शोभणारे मुखकमल मला आज खात्रीने पाहायला मिळणार ! कारण आज ही हरणे माझ्या उजव्या बाजूने जात आहेत. (९)
अप्यद्य विष्णोर्मनुजत्वमीयुषो
भारावताराय भुवो निजेच्छया । लावण्यधाम्नो भवितोपलम्भनं मह्यं न न स्यात् फलमञ्जसा दृशः ॥ १० ॥
हरावया भार धरेशी विष्णु स्वेच्छे मनुष्यीं करितोय लीला । लावण्यधामो मज आजि भेटे नेत्रासि माझ्या फळ आज लाभे ॥ १० ॥
अद्य - आज - निजेच्छया भुवः - स्वतःच्या इच्छेने पृथ्वीचा - भारावताराय मनुजत्वं ईयुषः - भार उतरण्यासाठी मनुष्यरूपाला प्राप्त झालेल्या अशा - लावण्यधाम्नः - सौंदर्याचे स्थान अशा - विष्णोः - श्रीविष्णूचे - उपलंभनं - दर्शन - अपि भविता - होईल ना - अञ्जसा - अनायासाने - मह्यं - माझ्या - दृशः - दृष्टीचे - फलं न स्यात् - फळ होणार नाही - न - नाही (का) ॥१०॥
पृथ्वीवरील भार उतरविण्यासाठी भगवान विष्णूंनी स्वेच्छेने मनुष्यावतार घेतला आहे. सौंदर्याच्या खाणीचेच आज मला दर्शन होणार ! सहजपणे माझ्या दृष्टीला मिळणारा हा लाभ नव्हे का ? (१०)
य ईक्षिताहंरहितोऽप्यसत्सतोः
स्वतेजसापास्ततमोभिदाभ्रमः । स्वमाययाऽऽत्मन् रचितैस्तदीक्षया प्राणाक्षधीभिः सदनेष्वभीयते ॥ ११ ॥
द्रष्ट जगाचा नच स्पर्शि माया भेद भ्रमोही दुर राहि त्याच्या । द्रष्टी कटाक्षे रचि जीव सारे गोपिं सवे तो व्रजि खेळ खेळे ॥ ११ ॥
सदसतोः ईक्षिता अपि - बर्यावाईटाचा पाहणारा असूनहि - अहंरहितः - अहंकाराने रहित असलेला - स्वतेजसा - स्वतःच्या सामर्थ्याने - अपास्ततमोभिदाभ्रमः - दूर केली आहेत अज्ञान, भेदबुद्धि व मोह ज्याने असा - यः - जो - स्वमायया - आपल्या मायेने - प्राणाक्षधीभिः (सह) - प्राण, इंद्रिये व बुद्धि यांसह - आत्मन्रचितैः (जीवैः) - आपल्या ठिकाणी रचिलेल्या जीवाच्या योगाने - सदनेषु - अनेक स्थानी - अभीयते - प्रत्ययास येतो. ॥११॥
जे अहंकार न बाळगता या कार्यकारणरूप जगाचे फक्त द्रष्टे आहेत, त्यांच्या ठिकाणी असणार्या स्वरूपसाक्षात्कार अज्ञानामुळे वाटणारा भेदभ्रम मुळीच असत नाही. ते आपल्या योगमायेनेच केवळ संकल्प करून प्राण, इंद्रिये, बुद्धी इत्यादींसह आपल्या स्वरूपभूत जीवांची निर्मिती करतात आणि त्यांच्याबरोबर गोकुळातील घराघरांतून निरनिराळ्या प्रकारच्या लीला करीत असल्यासारखे भासतात. (११)
यस्याखिलामीवहभिः सुमङ्गलैः
वाचो विमिश्रा गुणकर्मजन्मभिः । प्राणन्ति शुम्भन्ति पुनन्ति वै जगत् यास्तद्विरक्ताः शवशोभना मताः ॥ १२ ॥
वाणीसि गाता हरिकीर्ति कर्म स्फूःर्तीच लाभे जिवनी तयांच्या । धुवोनि जाते अपवित्र सारे न गाति ते तो जितप्रेत ऐसे ॥ १२ ॥
यस्य - ज्याच्या - सुमङगलैः - अत्यंत मंगलकारक अशा - अखिलामीवहभिः - सर्व पातके नष्ट करणार्या - गुणकर्मजन्मभिः - गुणांनी, कृत्यांनी व अवतारांनी - विमिश्राः वाचः - गौरविलेले असे बोल - जगत् - जगाला - प्राणन्ति - हालवितात - शुम्भन्ति - शोभवितात - च - आणि - पुनन्ति - पवित्र करितात - याः तद्विरक्ताः (ताः) - जे त्यांनी रहित असे बोल ते - शवशोभनाः (इति) - प्रेताचे अलंकार असे - मताः (सन्ति) - मानिलेले आहेत. ॥१२॥
सर्व पापांचा नाश करणारे त्यांचे परम मंगल गुण, कर्म आणि जन्म यांनी युक्त असलेली वाणीच जगाला जीवन देते, सौंदर्य देते आणि पवित्र करते. परंतु, जी वाणी हे वर्णन करीत नाही, ती प्रेताच्या साजशृंगारासारखीच व्यर्थ होय. (१२)
विवरण :- अक्रूराच्या ध्यानी-मनी एकमेव कृष्णच आहे. त्याच्या मूर्तीची स्थापना आपल्या मन-मंदिरात करून तो त्याची मानसपूजा करतो. त्याला वाटते, परब्रह्म असणारा हा कृष्ण या पृथ्वीवर आता मनुष्यरूपात अवतीर्ण झाला आहे. त्याचे माहात्म्य किती म्हणून वर्णन करावे ? मुख्य म्हणजे तो संपूर्ण ज्ञानी, सर्वज्ञ आहे. अज्ञानाने निर्माण होणार्या अहंकारापासून तो सर्वथा मुक्त आहे. अज्ञानरूपी अंधकाराने निर्माण होणारे सारे भेद संकुचितपणा तो आपल्या ज्ञानरूपी तेजाने नष्ट करतो. सर्व प्राणिमात्रांमध्ये तो प्राणरूपाने अस्तित्वात आहे, परंतु निराकार, निर्विकल्प रूपाने. तो निर्विकार आहे. आपल्या मायेने ज्याने या विश्वाची निर्मिती केली; अशा या जगन्नियंत्याला पाहण्याचे भाग्य मला लाभणार आहे. (११-१२)
स चावतीर्णः किल सत्वतान्वये
स्वसेतुपालामरवर्यशर्मकृत् । यशो वितन्वन् व्रज आस्त ईश्वरो गायन्ति देवा यदशेषमङ्गलम् ॥ १३ ॥
माहात्म्य त्याच्या गुणकीर्तनी हे तो विष्णु साक्षात् यदुवंशि जन्मे । भद्रार्थ भक्ता अन देवतांच्या व्रजात राही गुण देव गाती ॥ १३ ॥
सः - तो - स्वसेतुपाला - आपण घातलेल्या मर्यादांचे पालन करणार्या - अमरवर्यशर्मकृत् - देवश्रेष्ठांचे कल्याण करणारा असा - सात्त्वतान्वये अवतीर्णः - यादवांच्या कुलांत अवतरलेला - ईश्वरः - ईश्वर - देवाः अशेषमङगलं यत् गायन्ति - देव सर्वस्वी मंगलकारक अशा ज्याचे गायन करतात - (तत्) यशः वितन्वन् - ते यश पसरीत - व्रजे किल आस्ते - गोकुळात राहत आहे. ॥१३॥
तेच भगवान स्वतः यदुवंशामध्ये आपणच घालून दिलेल्या मर्यादांचे पालन करणार्या श्रेष्ठ देवतांचे कल्याण करण्यासाठी अवतीर्ण झाले आहेत. तेच भगवान आपली कीर्ती पसरवीत आज व्रजामध्ये निवास करीत आहेत. सर्व देवसुद्धा त्यांच्या संपूर्ण मंगलमय यशाचे गान करीत असतात. (१३)
तं त्वद्य नूनं महतां गतिं गुरुं
त्रैलोक्यकान्तं दृशिमन्महोत्सवम् । रूपं दधानं श्रिय ईप्सितास्पदं द्रक्ष्ये ममासन्नुषसः सुदर्शनाः ॥ १४ ॥
संदेह नाही अजि पाहि त्याला संताश्रयो नी गुरु जो जगाचा । लक्ष्मीपतीते अजि पाहतो मी या सुप्रभाती शुभ होय सर्व ॥ १४ ॥
महतां गतिम् - श्रेष्ठ पुरुषांचे आश्रयस्थान - गुरुं - श्रेष्ठ अशा - श्रियः इप्सितास्पदं - लक्ष्मीच्या इच्छेचा विषय अशा - दृशिमन्महोत्सवं - डोळे असलेल्या प्राण्यांचा मोठा आनंदच अशा - त्रैलोक्यकान्तं - तिन्ही लोकांत सुंदर अशा - रूपं - रूपाला - दधानं - धारण करणार्या - तं - त्याला - अद्य नूनं द्रक्ष्ये - आज खरोखरच मी पाहीन - मम - मला - उषसः - पहाटेपासून - सुदर्शनाः आसन् - चांगले शकुन झाले आहेत. ॥१४॥
ते महापुरुषांचे आश्रय आणि गुरू आहेत. त्यांचे सौंदर्य तिन्ही लोकांना मोहित करणारे आहे. दृष्टी असणार्यांचा ते परम आनंद आहेत; लक्ष्मीलासुद्धा हवेहवेसे वाटणारे रूप धारण केले आहे. त्यांचे मला आज खात्रीने दर्शन होणार ! कारण आज सकाळपासूनच मला शुभशकुन होत आहेत. (१४)
अथावरूढः सपदीशयो रथात्
प्रधानपुंसोश्चरणं स्वलब्धये । धिया धृतं योगिभिरप्यहं ध्रुवं नमस्य आभ्यां च सखीन् वनौकसः ॥ १५ ॥
रथातुनी धावत मी चलेन पडेत पाया बळि कृष्ण यांच्या । ते ध्यान बिंदू पद पाहि आज वंदीन बाळे मग गोपिकांची ॥ १५ ॥
अथ - नंतर - अहं - मी - सपदि रथात् अवरूढः (सन्) - लगेच रथातून खाली उतरून - योगिभिः अपि - योग्यांनीही - स्वलब्धये - आत्मप्राप्तीसाठी - धिया धृतं - बुद्धीच्या योगाने धारण केलेल्या - प्रधानपुंसोः ईशयोः चरणं - पुरुषांमध्ये श्रेष्ठ अशा परमेश्वरस्वरूपी रामकृष्णांच्या पायाला - च - आणि - आभ्यां (सह) - त्यांच्याबरोबर - वनौकसः सखीन् - रानात राहणार्या मित्रांना - ध्रुवं नमस्ये - निश्चयाने मी नमस्कार करीन. ॥१५॥
जेव्हा मी त्यांना पाहीन, तेव्हा सर्वश्रेष्ठ पुरुष बलराम तसेच श्रीकृष्णांच्या चरणांना नमस्कार करण्यासाठी लगेच रथातून खाली उडी टाकीन. योगी आत्मसाक्षात्कारासाठी ज्यांना आपल्या हृदयामध्ये धारण करतात, त्यांना मी आज प्रत्यक्ष पाहून त्यांच्या चरणांवर लोटांगण घालणार आहे. त्या दोघांच्याबरोबरच त्यांच्या वनवासी मित्रांनासुद्धा वंदन करणार. (१५)
अप्यङ्घ्रिमूले पतितस्य मे विभुः
शिरस्यधास्यन् निजहस्तपङ्कजम् । दत्ताभयं कालभुजाङ्गरंहसा प्रोद्वेजितानां शरणैषिणां णृनाम् ॥ १६ ॥
भाग्येचि जातो पदि मी पडेन ठेवील का तो शिरि हात माझ्या । सदाचि दे जो अभयो जगास जे काळ सर्पाबहु भीत त्यांना ॥ १६ ॥
विभुः - श्रीकृष्ण - अङ्घ्रिःमूले पतितस्य मे - पाया पडलेल्या माझ्या - शिरसि - मस्तकावर - कालभुजङगरंहसा - काळरूपी सापाच्या वेगाने - प्रोद्वेजितानां - त्रासलेल्या - शरणैषिणां - शरण येऊ इच्छिणार्या - नृणां - मनुष्यांना - दत्ताभयं - दिले आहे अभय ज्याने असा - निजहस्तपङकजं - आपला कमळासारखा हात - अपि अधास्यत् - ठेवील ना. ॥१६॥
जेव्हा मी त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवीन, तेव्हा ते आपले करकमल माझ्या मस्तकावर ठेवतील ना ? जे कालरूपी सापाच्या आवेशाने घाबरून जाऊन त्यांना शरण जातात, त्या लोकांना या करकमलांनीच तर अभयदान दिले आहे. (१६)
समर्हणं यत्र निधाय कौशिकः
तथा बलिश्चाप जगत्त्रयेन्द्रताम् । यद्वा विहारे व्रजयोषितां श्रमं स्पर्शेन सौगन्धिकगन्ध्यपानुदत् ॥ १७ ॥
इंद्रे बळीने पुजिले पदाला त्रिलोकराज्ये दिधली तयांना । सुगंध येतो हरिपाद पद्मा गोपीस स्पर्शी थकता हरी तो ॥ १७ ॥
कौशिकः - इंद्र - तथा - तसाच - बलिः - बलि - यत्र समर्हणं निधाय - ज्याच्या ठिकाणी पूजा अर्पून - जगत्रयेन्द्रतां आप - त्रैलोक्याचे आधिपत्य मिळविता झाला - वा - आणि - सौगन्धिकगन्धि - पांढर्या कमळाप्रमाणे आहे सुवास ज्यांचा असे - यत् - जे - विहारे - रासक्रीडेच्या प्रसंगी - स्पर्शेन - स्पर्शाने - व्रजयोषितां श्रमं अपानुदत् - गोकुळवासी स्त्रियांचे श्रम दूर करते झाले. ॥१७॥
इंद्राने आणि दैत्यराज बलीने भगवंतांच्या याच करकमलांमध्ये भेटवस्तू समर्पित करून तिन्ही लोकांचे प्रभुत्व प्राप्त करून घेतले. ज्या करकमलांमधून कमलपुष्पासारखा सुगंध येतो, त्या याच करकमलांनी स्वतःच्या स्पर्शाने रासलीलेच्या वेळी व्रजयुवतींचा थकवा घालविला होता. (१७)
विवरण :- अक्रूर पुढे म्हणतो, त्या परमात्म्याचे दर्शन झाल्यावर मी त्याच्या पायावर लोळण घेईन. आणि तो आपले करकमल आशीर्वाद स्वरुपात माझ्या मस्तकावर ठेवील. कसा असेल बरं त्याचा हात ? तर वेगाने धावणार्या कालरूपी भुजंगाला पाहून सामान्य संसारी लोक घाबरून धावत धावत त्याच्याकडे जातात, त्यांना आपल्या ज्या हातांनी तो अभय देतो, तो हा हात. ज्या हातावर बलीने दानासाठी उदक सोडले, तो हा हात. (आपल्या दातृत्वाबद्दल प्रसिद्ध असणार्या बलीने तीनही लोक जिंकले; तेव्हा भीतिग्रस्त देवांनी वामनाच्या, बटूच्या रूपात विष्णूला त्याच्याकडे दान मागण्यासाठी पाठविले. विष्णूने तीन पावले भूमी मागितली; आणि एक पाऊल स्वर्ग, दुसरे पृथ्वीवर ठेऊन तिसर्या पावलाने बळीला पाताळात ढकलले.) (१६-१७)
न मय्युपैष्यत्यरिबुद्धिमच्युतः
कंसस्य दूतः प्रहितोऽपि विश्वदृक् । योऽन्तर्बहिश्चेतस एतदीहितं क्षेत्रज्ञ ईक्षत्यमलेन चक्षुषा ॥ १८ ॥
मी कंसदूतो हरिपाशि आलो मला न मानो हरि शत्रु तैसा । सर्वज्ञ तो ना कधि मानि तैसे क्षेत्रज्ञ रूपे बघतो स्वयें तो ॥ १८ ॥
(यदि) अपि - जरीही - अहं - मी - प्रहितः - पाठविलेला - कंसस्य दूतः (अस्मि) - कंसाचा दूत आहे - विश्वदृक् अच्युतः - विश्वाचा साक्षी असा श्रीकृष्ण - मयि - माझ्या ठिकाणी - अरिबुद्धिं न उपैष्यति - शत्रुविषयक भावना धरणार नाही - क्षेत्रज्ञः यः - न जाणणारा असा जो - चेतसः अन्तः बहिः च (यत्) ईहितं - मनाच्या आत व बाहेर जे इच्छिलेले असेल - एतेत् - ते - अमलेन चक्षुषा - मलरहित अशा दृष्टीने - ईक्षति - पाहत असतो. ॥१८॥
कंसाने मला दूत म्हणून पाठविले असले, तरी अच्युत मला शत्रू समजणार नाहीत. कारण ते सगळ्या विश्वाचे साक्षी आहेत; म्हणून माझ्या अंतःकरणाच्या आत-बाहेर निर्मल ज्ञानदृष्टी ते पाहात असतात. (१८)
विवरण :- वास्तविक अक्रूर कंसाचा दूत, म्हणजे अप्रत्यक्षरित्या कृष्णाचा शत्रूच. मग कृष्णानेहि अक्रूराला आपला शत्रू मानले, तर ते योग्यच नव्हते का ? पण अक्रूर म्हणतो, कृष्ण सर्वज्ञ आहे. तो माझी असहाय्यता जरूर जाणेल, मनापासून मी कृष्णाचाच भक्त आहे, याची त्याला खात्री पटेल. माझे शरीर कंसाचे दास्य करते, पण मन कृष्णाची भक्ती करते. (यः मनसि तिष्ठति ।) हे तो अंतर्यामी निश्चितच जाणून घेईल. असे खात्रीपूर्वक अक्रूर म्हणतो. [इथे गीतेत सांगितलेला 'क्षेत्र-क्षेत्रज्ञ' भाव दिसून येतो. (इदं शरीरं कौन्तेय, क्षेत्रमिति अभिधीयते' ।) शरीर हे 'क्षेत्र, व शरीराचा, मनाचा स्वामी भगवंत हा 'क्षेत्रज्ञ'] (१८)
अप्यङ्घ्रिमूलेऽवहितं कृताञ्जलिं
मामीक्षिता सस्मितमार्द्रया दृशा । सपद्यपध्वस्तसमस्तकिल्बिषो वोढा मुदं वीतविशङ्क ऊर्जिताम् ॥ १९ ॥
राहीन तेथे कर जोडुनीया पाहीन प्रेमे हरि तैं मला की । जन्मांतरीचे मग पाप नासे नीमग्न होतो बहु मी सदाचा ॥ १९ ॥
अङ्घ्रिमूले अवहितं - पायाकडे लक्ष देणार्या - कृताञ्जलिं - केलेली आहे ओंजळ ज्याने अशा - मां - मला - आर्द्रया दृशा - दयार्द्र दृष्टीने - सस्मितं - हसत - अपि ईक्षिता - जर पाहील - सपदि - लगेच - अपध्वस्तसमस्तकिल्बिषः - नाहीशी झाली आहेत सर्व पातके ज्याची असा - वीतविशङकः - नाहीसे झाले आहेत संशय ज्याचे असा - ऊर्जितां मुदं - मोठया आनंदाला - वोढा - धारण करीन. ॥१९॥
मी त्यांच्या चरणाजवळ हात जोडून विनम्रभावाने उभा राहीन. तेव्हा स्मितहास्य करीत ते दयार्द्र दृष्टीने माझ्याकडे पाहातील. त्यावेळी माझे जन्मोजन्मींचे सगळे पाप त्याचवेळी नष्ट होऊन जाईल आणि मी निःशंकपणे परमानंदामध्ये मग्न होऊन जाईन. (१९)
सुहृत्तमं ज्ञातिमनन्यदैवतं
दोर्भ्यां बृहद्भ्यां परिरप्स्यतेऽथ माम् । आत्मा हि तीर्थीक्रियते तदैव मे बन्धश्च कर्मात्मक उच्छ्वसित्यतः ॥ २० ॥
मी त्या घराचे बहु हीत इच्छी वक्षास घेई मज देव तोची । आलिंगने पावन देह होई येईल शक्ती दुसर्या करासी ॥ २० ॥
अथ - नंतर - सुहृत्तमं - श्रेष्ठ मित्र अशा - ज्ञातिं - नातलग अशा - अनन्यदैवतं - ज्याला दुसरे दैवत नाही अशा - मां - मला - बृहद्भ्यां दोर्भ्यां - विशाल अशा दोन्ही हातांनी - यदा - जेव्हा - परिरप्स्यते - आलिंगन देईल - तदा एव - तेव्हाच - मे आत्मा तीर्थीक्रियते - माझा आत्मा पवित्र होईल - च - आणि - अतः - ह्यापुढे - (मे) कर्मात्मकः बन्धः - माझे कर्मरूप बंधन - उच्छ्वसिति - संपेल. ॥२०॥
मी त्यांच्या नात्यातील असून त्यांचा अत्यंत हितचिंतक आहे. त्यांच्याखेरीज माझे दुसरे दैवत नाही. म्हणून ते आपल्या पुष्ट बाहूंनी मला हृदयाशी धरतील. त्याचवेळी माझा देह तीर्थस्वरूप होईल आणि माझी कर्माची बंधने तुटून जातील. (२०)
विवरण :- अक्रूराचे शरीर रथात आहे, गोकुळाकडे चालले आहे; पण मन मात्र केव्हाच गोकुळात पोचले आहे, कृष्णाच्या पायी आहे. त्याला वाटते, मी शरीराने कंसाचा सेवक असलो तरी मनाने कृष्णाचाच भक्त आहे. याची खात्री कृष्णाला पटल्याची कोणती खूण ? तर तो आपल्या दीर्घबाहूंनी मला आलिंगन देऊन मला माझे हे (कंसाच्या चाकरीने अमंगल झालेले) शरीर पवित्र करेल, ती. त्या आलिंगनाने माझे सर्व मायापाश, माझे सर्व सांसारिक बंध गळून पडतील. इथे विरोधाभासाने परिणाम दाखविला आहे. दृढ आलिंगनाने बंध, पाश अधिकच घट्ट होतात. पण इथे भगवंताचे आलिंगन आहे. त्याने एकदा आपले म्हटले की सर्व सांसारिक मायापाश, ऐहिक बंधने गळून जातात. (२०)
लब्ध्वाङ्गसङ्गं प्रणतं कृताञ्जलिं
मां वक्ष्यतेऽक्रूर ततेत्युरुश्रवाः । तदा वयं जन्मभृतो महीयसा नैवादृतो यो धिगमुष्य जन्म तत् ॥ २१ ॥
आलिंगिता मी झुकवीन डोके म्हणेन काका मजला हरी तो । साफल्य होई मम जीवनाचे न कृष्ण ज्याचा, मृत देह तोची ॥ २१ ॥
उरुश्रवाः (कृष्णः) - श्रेष्ठ आहे कीर्ति ज्याची असा श्रीकृष्ण - लब्धाङगसङगं - प्राप्त झाला आहे शरीरस्पर्श ज्याला अशा - प्रणतं - अत्यंत नम्र अशा - कृताञ्जलिं - केली आहे ओंजळ ज्याने अशा - मा - मला - तत अक्रूर - हे अक्रूरा - इति वक्ष्यते - असे म्हणेल - तदा - तेव्हा - वयं - आम्ही - जन्मभृतः - ज्यांचे जीवित सफल झाले आहे असे - महीयसा (तेन) - श्रेष्ठ अशा त्याने - यः न आदृतः - जो आदरिला नाही - अमुष्य तत् जन्म धिक् - त्याच्या त्या जन्माला धिक्कार असो. ॥२१॥
ते मला जेव्हा आलिंगन देतील आणि मी हात जोडून मस्तक लववून त्यांच्यासमोर उभा राहीन आणि जेव्हा ते मला ’अक्रूर काका’ म्हणून हाक मारतील, तेव्हा माझे जीवन धन्य होईल. श्रीकृष्णांनी ज्याला आपले म्हटले नाही, त्याच्या त्या जन्माचा धिक्कार असो. (२१)
न तस्य कश्चिद् दयितः सुहृत्तमो
न चाप्रियो द्वेष्य उपेक्ष्य एव वा । तथापि भक्तान् भजते यथा तथा सुरद्रुमो यद्वदुपाश्रितोऽर्थदः ॥ २२ ॥
शत्रू नि मित्रो हरिसी कुणी ना हरी कुणाला नच की उपेक्षी । जै कल्पवृक्षो मनि इच्छिता दे भक्तास तैसा हरि प्रेम देतो ॥ २२ ॥
तस्य - त्याला - कश्चित् - कोणी - दयितः - प्रिय असा - च - आणि - सुहृत्तमः - अत्यंत मित्र असा - न - नाही - अप्रियः - नावडता - द्वेष्यः - द्वेष करण्यास योग्य असा - वा - किंवा - उपेक्ष्यः - उपेक्षा करण्यास योग्य असा - न एव (अस्ति) - नाहीच - तथापि - तरीसुद्धा - यद्वत् - ज्याप्रमाणे - सुरद्रुमः - कल्पवृक्ष - उपाश्रितः (सन्) - उपासना केली असता - अर्थदः (भवति) - इच्छिलेली वस्तु देणारा होतो - वयं - आम्ही - जन्मभृतः - ज्यांचे जीवित सफल झाले आहे असे - महीयसा (तेन) - श्रेष्ठ अशा त्याने - यः न आदृतः - जो आदरिला नाही - अमुष्य तत् जन्म धिक् - त्याच्या त्या जन्माला धिक्कार असो - तद्वत् - त्याप्रमाणे - भक्तान् - भक्तांना - यथा तथा - योग्यतेप्रमाणे - भजते - सेवितो. ॥२२॥
त्यांना कोणी प्रिय नाही की कोणी अत्यंत जवळचा नाही. त्यांचा कोणी नावडता नाही, कोणी शत्रू नाही की त्यांच्या उपेक्षेला पात्र असाही कोणी नाही तरीसुद्धा कल्पवृक्ष ज्याप्रमाणे आपल्या जवळ येऊन याचना करणार्याला त्याने मागितलेली वस्तू देतो, त्याचप्रमाणे भगवानसुद्धा जो त्यांना जसा भजतो, त्याला ते तसाच भजतात. (२२)
विवरण :- अक्रूर पुढे म्हणतो, भगवंत जरी समदृष्टी आहे; मित्र-शत्रू जाणत नाही, तरी तो (कल्पवृक्षाप्रमाणे) आपल्याच भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारा आहे. (कारण त्यानेच गीतेत म्हटले आहे 'ये यथा मां प्रपद्यन्ते, तांस्तथैव भजाम्यहम् ।) जरी मी शत्रूचा, कंसाचा सेवक असलो तरी कृष्ण माझी भक्ती जाणेल व माझ्यावर कृपा करेल याची खात्री आहे. (२२)
किं चाग्रजो मावनतं यदूत्तमः
स्मयन् परिष्वज्य गृहीतमञ्जलौ । गृहं प्रवेष्याप्तसमस्तसत्कृतं सम्प्रक्ष्यते कंसकृतं स्वबन्धुषु ॥ २३ ॥
राहीन तेथे कर जोडुनीया नेईल रामो मजला घरात । सत्कार तेथे मजला मिळेल पुसेल कंसो घरच्यास कैसा ॥ २३ ॥
किं च - आणखी - यदूत्तमः अग्रजः - यादवांमध्ये श्रेष्ठ असा वडील बंधू - स्मयन् (सन्) - हसत - परिष्वज्य - आलिंगन देऊन - अवनतं - नम्र अशा - अञ्जलौ गृहीतं - ओंजळीचे ठिकाणी धरलेल्या अशा - गृहं प्रवेश्य - घरात नेऊन - आप्तसमस्तसत्कृतं - सगळ्या आप्तांनी सत्कारिलेल्या अशा - मा - मला - स्वबन्धुषु - आपल्या बांधवांमध्ये - कंसकृतं - कंसाच्या कृत्याविषयी - संप्रचक्षते - प्रश्न करील. ॥२३॥
मी विनम्र भावाने मस्तक लववून जेव्हा बलरामदादांच्या समोर उभा राहीन तेव्हा हसत हसत ते मला आपल्या हृदयाशी धरून, माझे दोन्ही हात पकडून मला घरात घेऊन जातील. तेथे माझा सर्व प्रकारे पाहुणचार करतील. त्यानंतर मला विचारतील की, "आमच्या घरच्यांच्याबरोबर कंस कसा वागतो ?" (२३)
श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् ) इति सञ्चिन्तयन्कृष्णं श्वफल्कतनयोऽध्वनि । रथेन गोकुलं प्राप्तः सूर्यश्चास्तगिरिं नृप ॥ २४ ॥
( अनुष्टुप् ) श्रीशुकदेव सांगतात - श्वफल्कपुत्र अक्रूर चिंतनी बुडता रथे । पोचले नंदगावात अस्ताला रवि जाय तैं ॥ २४ ॥
नृप - हे राजा - अध्वनि - मार्गात - इति - याप्रमाणे - कृष्णं संचिन्तयन् - श्रीकृष्णाचे चिंतन करीत - श्वफल्कतनयः - अक्रूर - रथेन - रथाने - गोकुलं प्राप्तः - गोकुळात आला - च - आणि - सूर्यः अस्तगिरिं प्राप्तः - सूर्य अस्तगिरीला प्राप्त झाला. ॥२४॥
श्रीशुक म्हणतात- परीक्षिता ! श्वफल्काचा मुलगा अक्रूर वाटेत याच चिंतनात बुडून गेला असतानाच रथाने गोकुळात पोहोचला. तेव्हा सूर्य अस्ताचलाला गेला होता. (२४)
विवरण :- निवेदनाचे सूत्र पुढे नेत भगवान शुक सांगतात, सूर्य अस्ताला गेल्यानंतर अक्रूर गोकुळात पोहोचला. वास्तविक मथुरा आणि गोकुळ यांतील अंतर तसे फार नव्हते. (तीन साडे तीन कोस) आणि अक्रूर तर सकाळीच निघाला होता. मग गोकुळात पोहोचावयाला त्याला इतका वेळ का लागला असावा ? एक शक्यता, अक्रूर कृष्णचिंतनात रममाण झाल्याने रथाची गति मंद झाली असावी किंवा देहभान हरपल्याने, (कृष्णचिंतनात रममाण झाल्याने) अक्रूराच्या लक्षात गोकुळाचा मार्गही आला नसावा. (गोकुळाची वाट तो विसरला असावा.) (२४)
( मिश्र )
पदानि तस्याखिललोकपाल किरीटजुष्टामलपादरेणोः । ददर्श गोष्ठे क्षितिकौतुकानि विलक्षितान्यब्जयवाङ्कुशाद्यैः ॥ २५ ॥
( इंद्रवज्रा ) इंद्रादि ज्याला नमितात नित्य गोठ्यात ते पाय अक्रूर स्पर्शी । पद्मांकुशाचे पदिचिन्ह होते भूमी ठशाने बहु शोभली की ॥ २५ ॥
गोष्ठे - गौळवाडयात - अखिललोकपाल - सर्व राजे लोकांच्या - किरीटजुष्टामलपादरेणोः - मुकुटांनी सेविली आहे निर्मळ अशी पायधूळ ज्याची अशा - तस्य - त्याची - क्षितिकौतुकानि - पृथ्वीला आश्चर्यकारक अशी - अब्जयवाङ्कुशाद्यैः विलक्षितानि - कमळ, यव, अंकुश इत्यादि आकृतींनी चिन्हीत झालेली - पदानि - पाउले - ददर्श - पाहता झाला. ॥२५॥
ज्यांच्या चरणकमलांची पवित्र धूळ सर्व लोकपाल आपल्या किरीटांवर धारण करतात, त्यांच्या चरणचिन्हांचे अक्रूराने गोकुळात दर्शन घेतले. कमल, यव, अंकुश इत्यादी असाधारण चिन्हांमुळे त्यांची ओळख पटत होती आणि त्यांनीच पृथ्वीची शोभा वाढवली होती. (२५)
तद्दर्शनाह्लादविवृद्धसम्भ्रमः
प्रेम्णोर्ध्वरोमाश्रुकलाकुलेक्षणः । रथादवस्कन्द्य स तेष्वचेष्टत प्रभोरमून्यङ्घ्रिरजांस्यहो इति ॥ २६ ॥
आल्हादुनी ते विव्हळोनि गेले रोमांच आले नयनात पाणी । रथातुनी धावत तेथ आले वदे प्रभूची पदधूळ ही की ॥ २६ ॥
तद्दर्शनाह्लादविवृद्धसंभ्रमः - त्यांच्या दर्शनाच्या आनंदाने वाढली आहे घाई ज्याची असा - प्रेम्णा ऊर्ध्वरोमा - प्रेमाने उभे राहिले रोमांच ज्याचे असा - अश्रुकलाकुलेक्षणः - अश्रूंनी व्याकुळ झाले आहेत डोळे ज्याचे असा - सः - तो - रथात् अवस्कन्द्य - रथातून खाली उतरून - अहो अमूनिप्रभोः अङ्घ्रिजांसि - अहो ही श्रीकृष्णाची पायधूळ - इति (उक्त्वा) - असे म्हणून - अचेष्टत - तीत लोळला. ॥२६॥
त्या चरणचिन्हांचे दर्शन होताच अक्रूराच्या हृदयात आनंद मावेनासा झाला. प्रेमावेगाने त्याच्या अंगावर रोमांच आले. अश्रूंनी डोळे डबडबले. तेव्हा रथातून उडी मारून तो त्या धुळीत लोळू लागला आणि म्हणाला- "अहाहा ! हा तर आमच्या प्रभूंच्या चरणांच्या धुळीचा प्रसाद आहे." (२६)
( अनुष्टुप् )
देहंभृतामियानर्थो हित्वा दम्भं भियं शुचम् । सन्देशाद्यो हरेर्लिङ्ग दर्शनश्रवणादिभिः ॥ २७ ॥
( अनुष्टुप् ) अवस्था अक्रूराचे ती जीवांचा उच्च लाभ तो । भावना त्यागुनी सर्व हरीशी भाव लाविणे ॥ २७ ॥
सन्देशात् (आरभ्य) - निरोपापासून आरंभ करून - दम्भं भियं शुचं च हित्वा - गर्व, भीति व शोक टाकून - हरेः लिङगदर्शनश्रवणादिभिः - श्रीकृष्णाचे दर्शन, लीलांचे श्रवण इत्यादिकांनी - यः जातः - जो उत्पन्न झाला - इयान् (एव) - एवढाच - देहंभृतां - देहधारी प्राण्यांचा - अर्थः (अस्ति) - पुरुषार्थ होय. ॥२७॥
कंसाचा संदेश घेतल्यापासून श्रीहरींची चिन्हे, दर्शन, गुणश्रवण इत्यादींपर्यंत अक्रूराच्या चित्ताची जशी अवस्था झाली, तशी होणे हाच मनुष्याच्या देह धारण करण्याचा श्रेष्ठ लाभ आहे. म्हणून माणसाने दंभ, भय आणि शोक यांचा त्याग करून मनात नित्य असाच भाव बाळगावा. (२७)
ददर्श कृष्णं रामं च व्रजे गोदोहनं गतौ ।
पीतनीलाम्बरधरौ शरदम्बुरहेक्षणौ ॥ २८ ॥
व्रजीं अक्रूर जाता तै कृष्ण नी बलराम तो । उभेचि दुग्धशाळेत कमलाक्ष असे द्वयो ॥ २८ ॥
व्रजेगोदोहनं गतौ - गोठयात गाईंचे दूध काढण्यास गेलेल्या अशा - पीतनीलाम्बरधरौ - पिवळे व निळे अशी वस्त्रे धारण करणार्या - शरदम्बुरुहेक्षणौ - शरत्कालातील कमळाप्रमाणे आहेत डोळे ज्यांचे अशा - कृष्णं रामं च - श्रीकृष्णाला व बलरामाला - ददर्श - तो पाहता झाला. ॥२८॥
अक्रूराने व्रजात पोहोचल्यावर श्रीकृष्ण आणि बलराम या दोन्ही भावांना गाईंची धार काढण्यासाठी गेलेले पाहिले. श्यामसुंदर श्रीकृष्णांनी पीतांबर आणि बलरामांनी नीलांबर धारण केले होते. त्यांचे डोळे शरत्कालीन कमळाप्रमाणे सुंदर दिसत होते. (२८)
किशोरौ श्यामलश्वेतौ श्रीनिकेतौ बृहद्भुजौ ।
सुमुखौ सुन्दरवरौ बलद्विरदविक्रमौ ॥ २९ ॥
किशोर गौर श्यामो हे सौंदर्यखानची जसे । हत्तीची चालची तैसे हास्य नी लांब त्या भुजा ॥ २९ ॥
किशोरौ - अकरा ते पंधरा वर्षांच्या वयाचे अशा - श्यामलश्वेतौ - सावळ्या व गोर्या अशा - श्रीनिकेतौ - सौंदर्याचे निवासस्थान अशा - बृहद्भुजौ - विशाल आहेत दंड ज्यांचे अशा - सुमुखौ - सुंदर आहेत मुखे ज्यांची अशा - सुन्दरवरौ - सुंदर व श्रेष्ठ अशा - बालद्विरदविक्रमौ - लहानग्या हत्तीप्रमाणे आहे पराक्रम ज्यांचा अशा. ॥२९॥
त्यांनी नुकताच किशोरावस्थेत प्रवेश केला होता. एक सावळा आणि दुसरा गोरा असे ते दोघेही सौंदर्याची खाण होते. पुष्ट बाहू, सुंदर वदन असलेले ते अतिशय मनोहर दिसत होते आणि हत्तीच्या पिल्लाप्रमाणे त्यांची डौलदार चाल होती. (२९)
ध्वजवज्राङ्कुशाम्भोजैः चिह्नितैरङ्घ्रिभिर्व्रजम् ।
शोभयन्तौ महात्मानौ सानुक्रोशस्मितेक्षणौ ॥ ३० ॥
ध्वज अंकुश नी वज्र पद्मचिन्ह धरेस त्या । मंदहास्य दया पूर्ण औदार्यमूर्ति ते जसे ॥ ३० ॥
ध्वजवज्राङ्कुशाम्भोजैः - ध्वज, वज्र, अंकुश व कमळ - चिह्नितैः अङ्घ्रिभिः - या खुणांनी युक्त असलेल्या पायांनी - व्रजं शोभयन्तौ - गोठयाला सुशोभित करणार्या - महात्मानौ - उदार आहे मन ज्यांचे अशा - अनुक्रोशस्मितेक्षणौ - दया व हास्य यांनी युक्त आहेत डोळे ज्यांचे अशा. ॥३०॥
ते महात्मे ध्वज, वज्र, अंकुश आणि कमलाचे चिन्ह असलेल्या पायांनी व्रजभूमी सुशोभीत करीत. त्यांचे स्मितहास्यपूर्वक पाहाणे दयार्द्र होते. (३०)
उदाररुचिरक्रीडौ स्रग्विणौ वनमालिनौ ।
पुण्यगन्धानुलिप्ताङ्गौ स्नातौ विरजवाससौ ॥ ३१ ॥
औदार्यपूर्ण त्या लीला प्रकाशे वनमाळ ती । आत्ताच स्नान ते केले लिपिली चंदनो उटी ॥ ३१ ॥
उदाररुचिरक्रीडौ - उच्च प्रतीचे व सुंदर आहेत खेळ ज्यांचे अशा - स्रग्विणौ - फुलांच्या माळा धारण करणार्या - वनमालिनौ - पायापर्यंत लोंबणार्या रानफुलांच्या माला धारण करणार्या - स्नातौ - स्नान केलेल्या - पुण्यगन्धानुलिप्ताङगौ - सुवासिक उटयांनी माखलेली आहेत शरीरे ज्यांची अशा - विरजवाससौ - निर्मळ आहेत वस्त्रे ज्यांची अशा. ॥३१॥
त्यांची लीला उदात्त आणि सुंदर होती. गळ्यांत वनमाला आणि मण्यांचे हार झगमगत होते. त्यांनी स्नान करून निर्मळ वस्त्रे परिधान केली होती आणि शरीराला सुगंधी उटणे लावले होते. (३१)
प्रधानपुरुषावाद्यौ जगद्धेतू जगत्पती ।
अवतीर्णौ जगत्यर्थे स्वांशेन बलकेशवौ ॥ ३२ ॥
पाहिला अक्रूरे राजा ! जगद्हेतु जगत्पती । जगाच्या रक्षणासाठी पूर्णांशी पुरुषोत्तम ॥ ३२ ॥
जगद्धेत् - जगाचे कारण अशा - जगत्पती - जगाचे पालक अशा - जगत्यर्थे स्वांशेन अवतीर्णौ - पृथ्वीच्या हितासाठी आपापल्या अंशाने अवतरलेल्या - आद्यौ - सर्वांच्या आधी असलेल्या अशा - प्रधानपुरुषौ - श्रेष्ठ पुरुष अशा - बलकेशवौ - बळराम व श्रीकृष्ण यांना. ॥३२॥
जगाचे आदिकारण, जगाचे स्वामी, पुरुषोत्तम जगाच्या रक्षणासाठी आपल्या संपूर्ण अंशांनी बलराम आणि श्रीकृष्ण (३२)
विवरण :- अक्रूर राम-कृष्णांकडे आल्यानंतर ते दोघे त्याला कसे दिसले, याचे वर्णन इथे आहे. त्यांचे वर्णन करताना त्यांच्यासाठी अत्यंत समर्पक शब्दयोजना केली आहे. अक्रूर म्हणतो, ते 'प्रधानपुरुष' म्हणजे अत्यंत श्रेष्ठ असे पुरुषोत्तम आहेत. ते 'आद्य' म्हणजे जगाच्या निर्मितीपूर्वीही अस्तित्वात असणारे असून जगत्पालनासाठी त्यांनी मानवी रूपे धारण केली आहेत. त्यांची नावे, 'बलकेशवौ' ही ही समर्पक आहेत. बलाधिक्यात् बलः । (अत्यंत बलवान असा बलराम) (केशवः ब्रह्मरुद्रौ उत्पादयति इति केशवः ।) ब्रह्मा आणि रुद्र यांचा निर्माता अशा बल-केशवास अक्रूराने पाहिले. (३२)
दिशो वितिमिरा राजन् कुर्वाणौ प्रभया स्वया ।
यथा मारकतः शैलो रौप्यश्च कनकाचितौ ॥ ३३ ॥
जन्मले कृष्ण रामो हे कांतिने तम संपतो । पर्वता स्वर्ण चांदीने मढिता झळके जसा ॥ ३३ ॥
राजन् - हे राजा - स्वया प्रभया - आपल्या तेजाने - दिशः - दिशांना - वितिमिराः - अंधकाररहित - कुर्वाणौ - करणार्या - यथा कनकाचितौ - ज्याप्रमाणे सोन्याने वेष्टिलेले - मारकतः रौप्यः शैलः - पाचेचा व रुप्याचा असे दोन पर्वत - तथा वर्तमानौ - त्याप्रमाणे असणार्या अशा - कृष्णं रामं च ददर्श - श्रीकृष्ण व बळराम यांना तो पाहता झाला. ॥३३॥
यांच्या रूपामध्ये अवतीर्ण होऊन आपल्या अंगकांतीने दिशांचा अंधकार दूर करीत आहेत. ते असे दिसत होते की, जणू काही सोन्याने मढलेला पाचूचा आणि चांदीचा पर्वतच. (३३)
रथात् तूर्णं अवप्लुत्य सोऽक्रूरः स्नेहविह्वलः ।
पपात चरणोपान्ते दण्डवत् रामकृष्णयोः ॥ ३४ ॥
पाहता प्रेमभावाने अक्रूर भरले पहा । रथीचे धावले खाली साष्टांग नमिती द्वया ॥ ३४ ॥
स्नेहविव्हलः सः अक्रूरः - प्रेमाने गोंधळलेला असा तो अक्रूर - रथात् तूर्णं अवप्लुत्य - रथातून त्वरेने खाली उतरून - रामकृष्णयोः चरणोपान्ते - बलराम व श्रीकृष्ण यांच्या पायांजवळ - दण्डवत् पपात - काठीप्रमाणे पडला. ॥३४॥
त्यांना पाहाताच अक्रूराने प्रेमावेगाने अधीर होऊन रथातून खाली उडी मारली आणि राम-कृष्णांच्या चरणांना साष्टांग दंडवत घातले. (३४)
भगवद्दर्शनाह्लाद बाष्पपर्याकुलेक्षणः ।
पुलकचिताङ्ग औत्कण्ठ्यात् स्वाख्याने नाशकन् नृप ॥ ३५ ॥
आल्हाद दर्शने झाला भरले नेत्र अश्रुने । गळा दाटोनि आला नी स्वनाम वदु ना शके ॥ ३५ ॥
नृप - हे राजा - भगवद्दर्शन - भगवंताच्या भेटीमुळे - आह्लादबाष्पपर्याकुलेक्षणः - आनंदाश्रूंनी भरले आहेत डोळे ज्याचे असा - पुलकाचिताङगः - रोमांचांनी युक्त आहे शरीर ज्याचे असा - औत्कण्ठयात् - उत्कंठेमुळे - स्वाख्याने - आपले नाव सांगण्याविषयी - न अशकत् - समर्थ झाला नाही. ॥३५॥
हे राजा ! भगवंतांच्या दर्शनाने त्याला इतका आनंद झाला की, त्याचे डोळे पाण्याने भरून आले. सर्व शरीर पुलकित झाले. त्याचा गळा दाटून आल्याने तो आपले नावसुद्धा सांगू शकला नाही. (३५)
भगवान् तमभिप्रेत्य रथाङ्गाङ्कितपाणिना ।
परिरेभेऽभ्युपाकृष्य प्रीतः प्रणतवत्सलः ॥ ३६ ॥
कृष्णाने जाणिले चित्ती ते चक्रांकित हात जे । लावोनी ओढिले आणि हृदयी धरिले पहा ॥ ३६ ॥
प्रणतवत्सलः भगवान् - नम्र अशा प्राण्यांवर प्रेम करणारा श्रीकृष्ण - तं अभिप्रेत्य प्रीतः - त्याला पाहून संतुष्ट झालेला - रथाङगाङ्कितपाणिना - चक्राच्या चिन्हाने युक्त अशा हाताने - अभ्युपाकृष्य - जवळ ओढून - परिरेभे - आलिंगन देता झाला. ॥३६॥
शरणागतवत्सल श्रीकृष्णांनी त्याच्या मनातील भाव जाणून प्रेमाने आपल्या चक्रांकित हाताने त्याला जवळ ओढून हॄदयाशी धरले. (३६)
सङ्कर्षणश्च प्रणतं उपगुह्य महामनाः ।
गृहीत्वा पाणिना पाणी अनयत् सानुजो गृहम् ॥ ३७ ॥
विनये बळिशी येता गळ्यात लाविला गळा । दोघांनी धरिले हात घरात आणिले तयां ॥ ३७ ॥
च - आणि - महात्मना - उदार आहे मन ज्याचे असा - सानुजः - धाकटया भावासह - संकर्षणः - बलराम - प्रणतं (तं) उपगुह्य - नम्र अशा त्याला आलिंगून - पाणिना (तस्य) पाणी गृहीत्वा - आपल्या हाताने त्याचे दोन्ही हात धरून - गृहं अनयत् - घरात नेता झाला. ॥३७॥
यानंतर उदार मनाच्या श्रीबलरामांनी नमस्कार करणार्या त्याला आलिंगन दिले आणि त्याचा एक हात श्रीकृष्णांनी तर दुसरा बलरामांनी पकडून दोन्ही भाऊ त्याला घरी घेऊन गेले. (३७)
पृष्ट्वाथ स्वागतं तस्मै निवेद्य च वरासनम् ।
प्रक्षाल्य विधिवत् पादौ मधुपर्कार्हणमाहरत् ॥ ३८ ॥
बहू सत्कारिले गेही क्षेम ते पुसले असे । आसनी मधुपर्काने विधिने पाय धूतले ॥ ३८ ॥
अथ - नंतर - तस्मै स्वागतं पृष्टवा - त्याला कुशल विचारून - वरासनं निवेद्य - उत्तम आसन देऊन - विधिवत् पादौ प्रक्षाल्य - शास्त्रात सांगितल्याप्रमाणे पाय धुवून - मधुपर्कार्हणं आहरत् - मधुपर्काच्या पूजेचे साहित्य आणता झाला. ॥३८॥
श्रीकृष्णांनी त्याचे चांगले स्वागत करून व खुशाली विचारून उच्च आसनावर बसविले आणि विधिपूर्वक पाय धुऊन मधुपर्कपूजा केली. (३८)
विवरण :- अक्रूराचे स्वागत बलराम आणि कृष्णाने ज्याप्रकारे केले, त्यावरून त्यांचे मन किती मोठे होते हे दिसून येते. वास्तविक तो एक सामान्य दूत, त्यातून कंसाकडून आलेला, पण 'अतिथीदेवो भवः' या आपल्या संसकृतीस अनुसरून त्या दोघांनी त्याचे स्वागत यथाविधि, मनापासून आणि भव्य स्वरूपात केले. (अर्थात अंतर्ज्ञानी कृष्णाने त्याचा आगमनाचे कारण आणि त्याची भक्ती हे सर्व ओळखले असणारच.) त्याचवेळी 'मधुपर्कमुपाहरत्' असा उल्लेख आहे, म्हणजेच त्यांनी मध, दही इ. वस्तू त्यास समर्पित केल्या, ज्या वस्तू आदरणीय व्यक्तींच्या आगमनप्रसंगी त्यांना अर्पण केल्या जातात. (३८)
निवेद्य गां चातिथये संवाह्य श्रान्तमादृतः ।
अन्नं बहुगुणं मेध्यं श्रद्धयोपाहरद् विभुः ॥ ३९ ॥
शय्या देवोनि पायांना चेपोनी सेविले असे । थकवा जाय तो तेंव्हा मिष्टान्न भोजनो दिले ॥ ३९ ॥
आदृतः विभुः - आदरयुक्त असा बलराम - अतिथये (तस्मै) - पाहुणा आलेल्या त्या अक्रूराला - गां निवेद्य - गाय देऊन - श्रान्तं (तं) संवाह्य - दमलेल्या अशा त्याचे पाय रगडून - च - आणि - श्रद्धया - भक्तीने - बहुगुणं मेध्यं अन्नं - पुष्कळ आहेत गुण ज्यांमध्ये असे पवित्र अन्न - उपाहरत् - अर्पण करिता झाला. ॥३९॥
यानंतर भगवंतांनी अतिथी म्हणून आलेल्या अक्रूराला एक गाय भेट दिली आणि त्याचे पाय चेपून त्याचा थकवा दूर केला. नंतर अतिशय आदराने पवित्र अशा मिष्टान्नाचे भोजन दिले. (३९)
तस्मै भुक्तवते प्रीत्या रामः परमधर्मवित् ।
मखवासैर्गन्धमाल्यैः परां प्रीतिं व्यधात् पुनः ॥ ४० ॥
भगवान् बळिने तेंव्हा माला तांबूल अर्पिले । सुगंधी द्रव्य अर्पोनी केले आनंदी तो तयां ॥ ४० ॥
परमधर्मवित् रामः - श्रेष्ठ धर्म जाणणारा बलराम - भुक्तवते तस्मै - भोजन केलेल्या त्याला - प्रीत्या - प्रेमाने - मुखवासैः - मुखाला सुवास देणार्या तांबूलादि पदार्थांनी - गन्धमाल्यैः - सुगंधी पदार्थांनी व फुलांनी - पुनः - पुनः - परां प्रीतिं व्यधात् - मोठा संतोष देता झाला. ॥४०॥
भोजन झाल्यानंतर धर्माचे मर्म जाणणार्या बलरामांनी प्रेमाने मुखशुद्धीसाठी विडा देऊन सुगंधी माळ घालून त्याला अतिशय आनंदित केले. (४०)
पप्रच्छ सत्कृतं नन्दः कथं स्थ निरनुग्रहे ।
कंसे जीवति दाशार्ह सौनपाला इवावयः ॥ ४१ ॥
सत्कारे पुसती नंद कंसाने त्रासिता तुम्ही । जिवंत राहिले कैसे बकरी खाटका पुढे ॥ ४१ ॥
सतकृत्ं (तं) नन्दः पप्रच्छ - सत्कारलेल्या अशा त्या अक्रूराला नंद विचारिता झाला - दाशार्ह - हे दाशार्हा - निरनुग्रहे कंसे जीवति - निर्दय कंस जिवंत असता - सौनपालाः अवयः इव - खाटिकाने पाळलेल्या मेंढयासारखे - कथं स्थ - तुम्ही कसे राहता. ॥४१॥
अशा प्रकारे सत्कार झाल्यानंतर त्याच्याजवळ जाऊन नंद राजांनी विचारले, "अक्रूर महोदय ! निर्दयी कंस जिवंत असताना आपण तेथे दिवस कसे घालविता ? कसायाने पाळलेल्या बोकडांसारखीच आपली अवस्था असणार !" (४१)
विवरण :- आपल्या भारतीय संस्कृतीने अतिथीला देव मानले. त्यामुळे त्याचे स्वागत, यथाविधि पूजा, हे हवेच. त्यातही विशिष्ट क्रम ठरलेला; पूजा, दान, सुग्रास भोजन, मग त्याची त्याच्या कुटुंबासह सर्वांची खुशाली विचारणे, त्यानुसार कृष्ण-बलरामांनी अक्रूराचे यथायोग्य स्वागत केले; मग घरातील वडील व्यक्ती, नंदाने त्याचे 'कुशल' विचारले. पण त्याला 'कुशल' कसे म्हणावे ? कारण अक्रूर कंसाच्या राज्यात होता, एका दुष्ट असुर राजाचा सेवक होता. मग अशा राजाची प्रजा सुखी नसणार, हे उघडच आहे. कारण राजा म्हणजे 'सर्वेसर्वा' काहीही करू शकतो. त्याची तक्रार कोणाकडे करावयाची ? (राजाने मारले अन पावसाने झोडले तक्रार कोणाकडे ? ही म्हण प्रसिध्दच.) खाटकाच्या ताब्यातील मेंढया आनंदाने जिवंत राहतील का ? तीच गत प्रजेची. शिवाय आपल्या प्राणरक्षणासाठी आपल्या निरपराध बहिणीची लहान-लहान बालके ठार करण्यास ज्याने मागे पुढे पाहिले नाही, त्या कंसाला प्रजेच्या सुखाची काय फिकीर ? आपल्या सुखासाठी तो प्रजेला केव्हाही वेठीस धरू शकतो. या सर्व कारणांनी अक्रूरास त्याचे 'कुशल' विचारण्यात फारसा अर्थ नाही, असा नंदाच्या बोलण्याचा भावार्थ. (अक्रूराच्या आगमनाचे कारण त्याची भक्ती हे सर्व अंतर्ज्ञानी कृष्णाने जाणले होते. पण नंद-बलरामास याची कल्पना नव्हती, विशेषतः नंदाला. काही काही गोष्टी भगवंत केवळ आपल्याच मनात ठेवतात. अगदी आपल्याच व्यक्तींपुढेही त्या उघड करत नाहीत; कारण परिणामी अगदी तसेच करणे हितावह असते. रामाच्या बाबतीतही असेच घडले. सीतेसंबंधीच्या काही गोष्टी, ज्या रामास माहीत होत्या, त्या त्याने लक्ष्मणापासून गुप्त ठेवल्या होत्या, होणारे परिणाम लक्षात घेऊन या गोष्टीची इथे आठवण होते.) (४१)
योऽवधीत् स्वस्वसुस्तोकान् क्रोशन्त्या असुतृप् खलः ।
किं नु स्वित्तत्प्रजानां वः कुशलं विमृशामहे ॥ ४२ ॥
बिलग्त्या बहिणीचे जो छोटेसे बाळ मारितो । तया राज्यीं सुखी तुम्ही कल्पना करणे कशी ॥ ४२ ॥
असुतृप् खलः यः - इंद्रियांची तृप्ति करणारा दुष्ट असा जो - क्रोशन्त्या स्वस्वसुः - आक्रोश करणार्या आपल्या बहिणीच्या - तोकान् अवधीत् - मुलांना ठार मारिता झाला - तत्प्रजानां वः - त्याच्या प्रजा अशा तुमची - कुशलं - खुशाली - किं नु स्वित् - कशी बरे - विमृशामहे - आम्ही मनात आणावी. ॥४२॥
ज्या इंद्रियलोलुप पापी माणसाने आपल्या विलाप करणार्या बहिणीच्या कोवळ्या मुलांना ठार मारले, त्याचीच प्रजा असलेल्या आपले कुशल असेल, हा विचार तरी आम्ही कसे करू शकतो ? (४२)
इत्थं सूनृतया वाचा नन्देन सुसभाजितः ।
अक्रूरः परिपृष्टेन जहावध्वपरिश्रमम् ॥ ४३ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे पूर्वार्धे अक्रूरागमनं नाम अष्टत्रिंशोऽध्यायः ॥ ३८ ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
दोघांनी पुसले क्षेम सन्मान दिधला तयां । प्रवासथकवा सारा गेला अंगातुनी तदा ॥ ४३ ॥ ॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर अडोतिसावा अध्याय हा ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
नन्देन - नंदाने - इत्थं - अशाप्रकारे - सूनृतया वाचा - सत्य व प्रिय अशा भाषणाने - सुसभाजितः अक्रूरः - उत्तमप्रकारे सत्कारिलेला अक्रूर - परिपृष्टेन - प्रश्नाच्या योगाने - अध्वपरिश्रमं जहौ - मार्गातील थकवा टाकिता झाला. ॥४३॥
अक्रूराने नंदांना त्यांची खुशाली अगोदरच विचारली होती. त्यांनीही जेव्हा अशा प्रकारे मधुर वाणीने अक्रूराची चौकशी केली आणि त्याचा सन्मान केला, तेव्हा प्रवासामुळे अक्रूराच्या शरीराला आलेला शीण दूर झाला. (४३)
अध्याय अडतिसावा समाप्त |