|
श्रीमद् भागवत पुराण युग्मगीतं; गोचारणाय वनं गतस्य भगवतो गोपीजनकृतं गुणगानम् - युगलगीत - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् ) गोप्यः कृष्णे वनं याते तमनुद्रुतचेतसः । कृष्णलीलाः प्रगायन्त्यो निन्युर्दुःखेन वासरान् ॥ १ ॥
( अनुष्टुप् ) श्रीशुकदेव सांगतात - गाईंना चारण्या रोज वनात कृष्ण जाय तैं । गोपिंचे मनही जायी गात त्या हरिच्या लिला ॥ १ ॥
कृष्णे वनं याते - श्रीकृष्ण वनात गेला असता - तं अनुद्रुचेतसः गोप्यः - त्याच्या मागून गेली आहेत मने ज्यांची अशा गोपी - कृष्णलीलाः प्रगायन्त्यः - श्रीकृष्णाच्या लीला मोठ्याने गात - दुःखेन वासरान् निन्युः - दुःखाने दिवस घालवित्या झाल्या ॥१॥
श्रीशुक म्हणतात - श्रीकृष्ण वनात जात, तेव्हा गोपींचे चित्तसुद्धा त्यांच्याबरोबरच जात असे. श्रीकृष्णांच्या लीलांचे गायन करीत त्या आपले दिवस कष्टाने घालवीत. (१)
विवरण :- कृष्ण गोपींचा सखा, आराध्य दैवत, जणू बहिश्वर प्राणच. त्याच्या दर्शनाशिवाय दिवस, ही कल्पनाहि त्यांना असह्य होती. पण हे कसे शक्य ? आपला संसार, पती, मुले-बाळे यांच्याशी त्या बांधील होत्या. कृष्णही सकाळी गाई घेऊन वनात जाई. जणू गाईंसह तो गोपींचे प्राणच आपल्याबरोबर नेत असे. मग तो परत येईपर्यंत गोपींना दर्शनसुख तरी कोठून ? मात्र गोपी कृष्णाच्या निःस्सीम भक्त होत्या. चर्मचक्षूंना कृष्ण दिसला नाही, तरी अंतश्चक्षू थोडेच बंद होते ? त्यांच्या मनमंदिरात त्याचे अखंड वास्तव्य होते. प्रत्यक्ष संयोग आणि वियोग या दोनच गोष्टी प्रेमात असू शकतात; आराध्य दैवताच्या आठवणीने, मानसपूजेने, रूपगुणवर्णनाने वियोग सुसह्य होतो हे गोपी जाणत होत्या. त्याच मार्गाचा अवलंब करून संयोग आणि वियोगाचा हात धरून गोपी प्रेममार्गावर चालत राहिल्या. त्याचे गुणसंकीर्तन करीत ते एकमेकींना ऐकवीत राहिल्या. हाही एक भक्तीचाच प्रकार आणि म्हणूनच ही वेणुगीता - कृष्णाबरोबर गोपींचे मन (भावनेने द्रवून) त्याच्या पाठोपाठ धावत धावत जाई. जणू अनिर्बंध जलप्रवाह. म्हणूनच 'अनुद्रुतचेतसः' ज्यांचे मन द्रवून कृष्णाचे मागे धावत गेले आहे, अशा गोपी हे त्यांचे वर्णन अगदी यथार्थच. (१)
श्रीगोप्य ऊचुः -
( स्वागता ) वामबाहुकृतवामकपोलो वल्गितभ्रुरधरार्पितवेणुम् । कोमलाङ्गुलिभिराश्रितमार्गं गोप्य ईरयति यत्र मुकुन्दः ॥ २ ॥ व्योमयानवनिताः सह सिद्धैः विस्मितास्तदुपधार्य सलज्जाः । काममार्गणसमर्पितचित्ताः कश्मलं ययुरपस्मृतनीव्यः ॥ ३ ॥
( स्वागता ) गोपिका आपसात म्हणतात - वामस्कंधि हरि टेकवि गाल भुवई उडवी वंशिस छिद्रा । बोट चाळवितसे मऊ ऐसे सिद्धपत्नि गगनी जमती त्या ॥ २ ॥ पाहता पतिसि लाजुनि जाती काम विंधि विवशोनिहि जाती । गाठ ती सुटत वस्त्रहि जाई ना मनास कळते रत होता ॥ ३ ॥
गोप्यः - गोपींनो - वामबाहुकृतवामकपोलः - डाव्या हातावर ठेविला आहे डावा गाल ज्याने असा - वल्गितभ्रुः - चंचल आहेत भुवया ज्याच्या असा - मुकुन्दः - श्रीकृष्ण - कोमलाङ्गुलिभिः - कोमल अशा अंगुलींनी - आश्रितमार्गं - आश्रय केलेला आहे छिद्रांचा जिच्या अशी - अधरार्पितवेणुं - खालच्या ओठाशी लाविलेली मुरली - यत्र ईरयति - जेव्हा वाजवितो - सिद्धैः सह - सिद्धांसह - व्योमयानवनिताः - आकाशात विमानांतून फिरणार्या देवस्त्रियाही - तत् उपधार्य - ते ऐकून - विस्मिताः - आश्चर्यचकित झालेल्या - काममार्गणसमर्पितचित्ताः - मदनाच्या बाणांना अर्पण केले आहे चित्त ज्यांनी अशा - अपस्मृतनीव्यः - विसरली गेली आहेत कमरेची वस्त्रे ज्यांच्याकडून अशा - सलज्जाः (भूत्वा) - लज्जेने युक्त होऊन - कश्मलं ययुः - मोहाला प्राप्त झाल्या ॥२-३॥
गोपी म्हणत- सख्यांनो ! श्रीकृष्ण जेव्हा आपला डावा गाल डाव्या हाताच्या बाजूकडे वळवून भुवया नाचवीत, बासरी तोंडाला लावून आपली सुकुमार बोटे त्यांच्या छिद्रांवर फिरवून मधुर तान छेडतात, तेव्हा आकाशात पतींसह विमानात बसून आलेल्या सिद्धपत्न्या ती तान ऐकून प्रथम आश्चर्यचकित होतात. नंतर त्यांचे चित्त कामबाणांनी विद्ध होते. त्यामुळे लज्जित झालेल्या त्या पाहाता पाहाता बेभान होतात. इतक्या की त्यांना वस्त्रांचीही शुद्ध राहात नाही. (अशा कॄष्णांचा विरह आम्ही कसा बरे सहन करावा ? ) (२-३)
विवरण :- कोमलांगुलीभिः - कृष्णाचे गुणवर्णन करताना एक गोपी दुसरीला म्हणते, कृष्ण बासरी कशी वाजवितो ? कोमल बोटांनी. असुरांना मारताना जे हात वज्राप्रमाणे कठोर होतात, ते बासरी वाजविताना फुलाप्रमाणे कोमल होतात. कृष्णाचे संगीतज्ञान इथे दिसते. ते बासरी वाजविताना श्वासाची फुंकर, बोटांची हालचाल कशा गतीने हवी, याचे त्याला ज्ञान होते. नाहीतर वाद्यावर जर हात आपटले, तर त्यातून सुरांच्या नादाऐवजी वाद्यांचाच खडखडाट ऐकू येईल. कृष्णाला हे भान नक्कीच होते. (२)
हन्त चित्रमबलाः श्रृणुतेदं
हारहास उरसि स्थिरविद्युत् । नन्दसूनुरयमार्तजनानां नर्मदो यर्हि कूजितवेणुः ॥ ४ ॥ वृन्दशो व्रजवृषा मृगगावो वेणुवाद्यहृतचेतस आरात् । दन्तदष्टकवला धृतकर्णा निद्रिता लिखितचित्रमिवासन् ॥ ५ ॥
पाहि हा अतिव सुंदर आहे हासता चमकती मणि सारे । श्याम मेघि बिजली जणु थांबे चेतिण्या सजिव वंशिस फुंकी ॥ ४ ॥ नाद ऐकुनि पशू जमती तै घास राहि मुखि चावुनि घ्याया । राहति स्थिरचि जै पुतळे ते बासुरी तशिच मोहवि जीवा ॥ ५ ॥
हन्त अबलाः - अहो स्त्रियांनो - इदं चित्रं शृणुत - हा चमत्कार ऐका - हारहासः - माळेप्रमाणे शुभ्र आहे हास्य ज्याचे असा - उरसि स्थिरविद्युत् - वक्ष स्थलाच्या ठिकाणी स्थिर आहे लक्ष्मी ज्याच्या असा - आर्तजनानां नर्मदः - दुःखी जनांना सुख देणारा - अयं नन्दसूनुः - हा नंदाचा पुत्र - यर्हि - जेव्हा - कूजितवेणुः (भवति) - वाजविली आहे मुरली ज्याने असा होतो ॥४॥वेणुवाद्यहृतचेतसः - वेणुवाद्याने हरण केली आहेत मने ज्यांची अशा - वृन्दशः (स्थिताः) - कळपाकळपाने असलेल्या - दन्तदष्टकवलाः - दातांनी चावला आहे घास ज्यांनी अशा - धृतकर्णाः - उभारले आहेत कान ज्यांनी अशा - व्रजवृषाः मृगगावः (च) - गोकुळातील बैल, हरिण व गाई - आरात् - दुरून - लिखितचित्रं इव - काढलेल्या चित्राप्रमाणे - निद्रिताः (इव) आसन् - जणू निजलेल्या अशा राहिल्या ॥५॥
अग सख्यांनो ! हे आश्चर्य तर ऐका ! हे नंदनंदन जेव्हा दुःखितांनाही आनंद देणारा वेणू वाजवू लागतात, तेव्हा त्यांचे हास्य हाच त्यांच्या छातीवर रुळणारा हार बनतो आणि चंचल लक्ष्मी तेथे स्तब्ध होऊन राहते. त्या वेणूनादाने चित्त आकर्षित झालेले व्रजातील बैल, गाई आणि हरीण यांचे कळप मुग्ध होऊन जातात. दातांनी चावत असलेला गवताचा घास त्यांच्या तोंडातच असतो, दोन्ही कान टवकारून ते असे उभे राहातात की, जणू काही ते झोपी तरी गेले आहेत किंवा भिंतीवर काढलेली ती चित्रे तरी आहेत. (४-५)
विवरण :- विष्णूच्या (कृष्णाच्या) वक्षस्थळावर लक्ष्मी स्थिर आहे. येथे 'स्थिर' हा शब्द महत्त्वाचा. आपल्या चंचलतेबद्दल लक्ष्मी प्रसिद्ध आहे. तसेच ती विजेप्रमाणे दैदीप्यमान आहे, अस्थिरही आहे, पण अशा या लक्ष्मीला भगवंताच्या वक्षाचा इतका मोह आहे, की ती आपला जन्मजात चंचलपणा सोडून कायम तिथेच वास्तव्य करते. (४)
बर्हिणस्तबकधातुपलाशैः
बद्धमल्लपरिबर्हविडम्बः । कर्हिचित्सबल आलि स गोपैः गाः समाह्वयति यत्र मुकुन्दः ॥ ६ ॥ तर्हि भग्नगतयः सरितो वै तत्पदाम्बुजरजोऽनिलनीतम् । स्पृहयतीर्वयमिवाबहुपुण्याः प्रेमवेपितभुजाः स्तिमितापः ॥ ७ ॥
बांधितो शिरि पिसे मयुराची अंगि पुष्प अन पर्णहि खोची । गायि हाकरित तैं रुकती त्या थांबतेहि जळ तैं यमुनेचे ॥ ६ ॥ श्री हरीच वळिता भुज कांपे प्रेम हो बहुत ते मन कांपे । हातही विवश होवुनि थांबे प्रेमवेग बहु होवुनि राही ॥ ७ ॥
आलि - हे सखे - कर्हिचित् - एखादे वेळी - बर्हिणस्तबकधातुपलाशैः - मोराच्या पिसांचा गुच्छ, काव व पळसाची फुले यांनी - बद्धमल्लपरिबर्हविडम्बः - केले आहे मल्लाच्या सामग्रीचे अनुकरण ज्याने असा - सबलः - बळरामासह - गोपैः (सह) - गोपांसह - सः मुकुन्दः - तो श्रीकृष्ण - यत्र - जेव्हा - गाः समाह्वयति - गाईंना बोलवितो ॥६॥तर्हि - त्या वेळी - वयं इव - आम्हाप्रमाणेच - अबहुपुण्याः सरितः - नाही आहे फारसे पुण्य ज्याचे अशा नद्या - अनिलनीतं - वार्याने नेलेल्या - तत्पदरजः स्पृहयतीः - त्याच्या पायधुळीची इच्छा करणार्या अशा - भग्नगतयः - थांबला आहे वेग ज्यांचा अशा - प्रेमवेपितभुजः - प्रेमाने कापत आहेत हात ज्यांचे अशा - स्तिमितापः - स्तब्ध आहे उदक ज्यांचे अशा ॥७॥
गडे ! ते नंदलाल जेव्हा मस्तकावर मोरपंखांचा मुकुट घालून रंगीत धातूंनी आपले शरीर रंगवितात आणि पानांनी असे सजवून घेतात की, जसा एखादा पहिलवान असावा आणि नंतर जेव्हा बलराम आणि गोपालांसह बासरी वाजवून गाईंना साद घालतात, त्यावेळी त्या नादाने नद्यांचे वाहाणे थांबते. त्यांना असे वाटते की, श्रीकृष्णांच्या चरणांची धूळ वार्याने उडवून आपल्याकडे आणावी. परंतु त्यासुद्धा आमच्यासारख्याच अभागिनी आहेत. जसे श्रीकृष्णांना आलिंगन देतेवेळी आमचे हात थरथरतात आणि नंतर जड होतात, त्याचप्रमाणे त्यासुद्धा तरंगरूप हात प्रेमाने वर उचलू पाहातात, परंतु पुन्हा असहाय होऊन स्थिर राहातात. (६-७)
विवरण :- या कृष्णाप्रमाणेच त्याच्या बासरीनेहि सर्व चराचराला मोहित केले आहे. प्रत्येकालाच त्याच्या स्पर्शाची, चरणधुळीची आस. नद्याहि आपली गति थांबवून त्याला आलिंगन देण्यासाठी आपले तरंगरूप बाहू उभारतात. पण बिचार्यांचे एवढे कोठे भाग्य ? त्याही आमच्यासारख्याच हतभागिनी. त्याच्या चरणधुळीचा लाभ जसा आम्हाला होत नाही, तसाच त्यांनाहि, कारण तो तर गायींच्या मागून अरण्यातच भ्रमण करतो. (मग तीच भूमी भाग्यवती म्हणावी का ?) (७)
( मिश्र )
अनुचरैः समनुवर्णितवीर्य आदिपूरुष इवाचलभूतिः । वनचरो गिरितटेषु चरन्तीः वेणुनाह्वयति गाः स यदा हि ॥ ८ ॥ वनलतास्तरव आत्मनि विष्णुं व्यञ्जयन्त्य इव पुष्पफलाढ्याः । प्रणतभारविटपा मधुधाराः प्रेमहृष्टतनवः ससृजुः स्म ॥ ९ ॥
देवता हरिचि कीर्तिच गाती गान गाति हरिचे तयि गोप । नाम घेउनि जिवा हरि बाहे वृक्ष ते लवुनि त्या नमिती की ॥ ८ ॥ वेलि सूचविति स्वै अभिविष्णु फूल फूल हसते मन दावी । घोसते फळ फुले वदती ते सर्व ते मधुरची गमते की ॥ ९ ॥
अनुचरैः - अनुचरांनी - समनुवर्णितवीर्यः - उत्तमप्रकारे वर्णन केले आहेत पराक्रम ज्याचे असा - आदिपूरूषः इव अचलभूतिः - आदिपुरुषाप्रमाणे अचल आहे ऐश्वर्य ज्याचे असा - वनचरः सः - वनात फिरणारा असा तो - यदा हि - जेव्हा खरोखर - गिरितटेषु चरन्तीः गाः - डोंगराच्या उतरणीवर चरणार्या गाईंना - आह्वयति - बोलवितो ॥८॥प्रणतभारविटपाः - वाकलेल्या व भारावलेल्या आहेत शाखा ज्यांच्या अशा - प्रेमहृष्टतनवः - प्रेमाने आनंदित झाली आहेत शरीरे ज्यांची अशा - वनलताः - वनातील वेली - आत्मनि विष्णुं - आपल्या ठिकाणी श्रीविष्णुला - व्यञ्जयन्त्यः इव - जणु काय व्यक्त करीत - पुष्पफलाढ्याः - फुलांनी व फळांनी भरलेल्या - मधुधाराः ससृजुः स्म - मधाच्या धारा सोडित्या झाल्या - (तथा एव) तरवः (अपि) - त्याप्रमाणे वृक्षहि ॥९॥
गोपाल ज्यांच्या लीलांचे गायन करीत असतात, ते आदिपुरुषासारखे स्थिर ऐश्वर्यसंपन्न श्रीकृष्ण जेव्हा वृंदावनामध्ये विहार करीत असताना बासरी वाजवून पर्वतावर चरणार्या गाईंना त्यांच्या नावांनी साद घालतात, त्यावेळी वनातील वृक्ष आणि वेली आपल्या अंतरंगात भगवान विष्णूंचे अस्तित्व सूचित करीत फुलांनी आणि फळांनी बहरून येतात, त्यांच्या भाराने फांद्या वाकून जमिनीवर टेकतात. प्रेमाने त्यांचा रोम-अन-रोम प्रफुल्लित होतो आणि ते मधाच्या धारांचा वर्षाव करू लागतात. (८-९)
विवरण :- ज्याचे ठिकाणी लक्ष्मी स्थिर आहे, असा कृष्ण किंवा भूति म्हणजे ऐश्वर्य ज्याचे ठिकाणी अढळ आहे, असा. वास्तविक लक्ष्मी चंचल; पण कृष्णाचे ठिकाणी ती स्थिर आहे. असा भाव. (८)
दर्शनीयतिलको वनमाला
दिव्यगन्धतुलसीमधुमत्तैः । अलिकुलैरलघु गीतामभीष्टं आद्रियन् यर्हि सन्धितवेणुः ॥ १० ॥ सरसि सारसहंसविहङ्गाः चारुगीतहृतचेतस एत्य । हरिमुपासत ते यतचित्ता हन्त मीलितदृशो धृतमौनाः ॥ ११ ॥
सौंदर्य जगिचिये हरिश्रेष्ठ सावळ्यास उटि ती विलसे की । कंठि लांब रुळते वनमाळा तुलसीदल तयी बहु गंधी ॥ १० ॥ वाजवी मुरलि तै खग हर्षे राहिना मनहि ते मग त्यांचे । नेत्रचि मिटविती रमती ते कृष्ण हा परम हंसचि वाटे ॥ ११ ॥
दर्शनीयतिलकः - पहाण्यासारखा आहे टिळा ज्याचा असा - वनमालादिव्यगन्धतुलसीमधुमत्तैः - वनमाळेतील स्वर्गीय सुवासाच्या तुळशीच्या मधाने माजलेल्या - अलिकुलैः - भुंग्यांच्या समुदायांनी - अभीष्टं - अत्यंत प्रिय असे - अलघु - लहान नव्हे असे - गीतं आद्रियन् - गाणे आदराने ऐकत - श्रीकृष्णः - श्रीकॄष्ण - यर्हि - जेव्हा - (अधरे) संधितवेणुः (भवति) - ओठाला लाविली आहे मुरली ज्याने असा होतो - हन्त - अहो - चारुगीतहृतचेतसः - सुंदर गाण्याने हरण केली आहेत मने ज्यांची असे - सरसि - सरोवरातील - सारसहंसविहगाः - सारस, हंस व इतर पक्षी - (ततः) एत्य - तेथे येऊन - यतचित्ताः - स्वाधीन केले आहे मन ज्यांनी असे - मीलितदृशः - मिटले आहेत डोळे ज्यांनी असे - धृतमौनाः - धरिले आहे मौन ज्यांनी असे - हरिम् उपासते - श्रीकृष्णाची उपासना करतात ॥१०-११॥
विश्वातील सुंदरांहून सुंदर असणर्या मनमोहनांनी कपाळावर केशरी गंधाचा सुंदर तिलक लावलेला असून गळ्यामध्ये वनमाला धारण केली आहे. तीतून येणारा तुळशीचा दिव्य गंध आणि मधुर मध यांनी धुंद होऊन भुंग्यांच्या झुंडी उच्च स्वराने मधुर गुंजारव करीत असतात. त्या गुणगुणण्याचा आदर करीत त्यांच्या स्वरात स्वर मिळवून जेव्हा ते आपली बासरी वाजवू लागतात, त्यावेळी ते मधुर संगीत ऐकून सरोवरात राहाणार्या सारस, हंस वगैरे पक्ष्यांचे चित्तसुद्धा मोहून जाते. ते श्यामसुंदरांजवळ येऊन बसतात आणि डोळे बंद करून, गुपचुप चित्त एकाग्र करून, ते संगीत ऐकू लागतात. (१०-११)
सहबलः स्रगवतंसविलासः
सानुषु क्षितिभृतो व्रजदेव्यः । हर्षयन् यर्हि वेणुरवेण जातहर्ष उपरम्भति विश्वम् ॥ १२ ॥ महदतिक्रमणशङ्कितचेता मन्दमन्दमनुगर्जति मेघः । सुहृदमभ्यवर्षत् सुमनोभिः छायया च विदधत्प्रतपत्रम् ॥ १३ ॥
कुंडला परि धरी हरि पुष्पे मोहवी जगत वंशिस फुंकी । विश्वची कवळितो रव तैसा मेघनाद नच हो अपराधी ॥ १२ ॥ मेघ छत्र धरिती हरिसी की जीवना हरिस भेटचि देती । वर्षती हळु तेहि तुषारे देवता लपुनि पुष्प वहाती ॥ १३ ॥
व्रजदेव्यः - हे गोकुळवासी स्त्रियांनो - क्षितिभृतः सानुषु - पर्वताच्या शिखरावर - सहबलः - बळरामासह - स्रगवतंसविलासः - माळांचे तुरे हेच आहेत योग्य भूषण ज्याचे असा - जातहर्षः - झाला आहे आनंद ज्याला असा - हर्षयन् - आनंद देत - यर्हि - जेव्हा - वेणुरवेण विश्वं उपरम्भति - मुरलीच्या शब्दाने जग दुमदूमून टाकतो. ॥१२॥महदतिक्रमणशङ्कितचेताः मेघः - थोर अशा कृष्णाच्या उल्लंघनाने भीतियुक्त झाले आहे मन ज्याचे असा मेघ - मन्दंमन्दं अनुगर्जति - हळूहळू प्रतिध्वनि करतो - च - आणि - छायया प्रतपत्रं विदधत् (सन्) - छायेच्या योगाने छत्र करीत - सुमनोभिः सुहृदं अभ्यवर्षत् - मित्र जो कृष्ण त्यावर फुलांचा वर्षाव करता झाला.॥१३॥
हे व्रजदेवींनो ! श्यामसुंदर जेव्हा फुलांची कुंडले कानांत घालून बलरामांसह आनंदाने पर्वतशिखरावर उभे राहून, सगळ्या जगाला आनंदित करीत बासरीच्या मधुर आवाजाने सगळे विश्व भरून टाकतात, त्यावेळी मेघ बासरीच्या तानांबरोबर त्यांच्या वेणूवादनात व्यत्यय न येईल, अशा बेताने हळू हळू गर्जना करून त्यांना साथ देतात. शिवाय स्वतः सारखाच वर्ण असलेल्या घनश्यामांना ऊन लागू नये म्हणून ते त्यांच्या मस्तकावर सावली धरतात, त्यांचे छत्र होतात. तसेच बारीक तुषारांच्या रूपाने जणू दिव्य पुष्पांचा वर्षाव करतात. (१२-१३)
विवरण :- पर्वतशिखरावर वेणुवादन करीत कृष्ण बलरामासह विहार करतो. ते वेणुवादन ऐकून सर्व प्राणिमात्र वर तोंड करून त्याच्याकडे पाहतात. हे प्राणिमात्र जमिनीवरील, अरण्यात फिरणारे आणि स्वररूपी अमृताचा वर्षाव करणारे मुरलीचे स्वर पर्वतशिखरावरून येतात म्हणून ते त्या दिशेने भारल्यासारखे पाहतात. (१२)
विविधगोपचरणेषु विदग्धो
वेणुवाद्य उरुधा निजशिक्षाः । तव सुतः सति यदाधरबिम्बे दत्तवेणुरनयत् स्वरजातीः ॥ १४ ॥ सवनशस्तदुपधार्य सुरेशाः शक्रशर्वपरमेष्ठिपुरोगाः । कवय आनतकन्धरचित्ताः कश्मलं ययुरनिश्चिततत्त्वाः ॥ १५ ॥
येश्वदे चतुर खेळचि खेळे प्रीय लाल सकला तव कान्हा । बासुरी न शिकला तरि गातो गातसे ऋषभ आदि हि नादा ॥ १४ ॥ नच हरादिसी जो कळतो तो मन न राहि करि गे अपुलीया । शिर झुके हरिचिया पुढती हे हरिच हो मनहि राहि न शुद्धी ॥ १५ ॥
सति - हे साध्वी - विविधगोपचरणेषु विदग्धः - निरनिराळ्या गोपांच्या खेळांमध्ये चतुर असा - तव सुतः - तुझा मुलगा - यदा - जेव्हा - अधरबिम्बे दत्तवेणुः - अधरोष्ठावर ठेविली आहे मुरली ज्याने असा - वेणुवाद्ये उरुधा - वेणुवाद्यावर निरनिराळ्या प्रकारांनी - निजशिक्षाः स्वरजातीः अनयत् - स्वतःच अभ्यासिलेले असे स्वरांचे आलाप काढतो. ॥१४॥शक्रशर्वपरमेष्ठिपुरोगाः - इंद्र, शंकर, ब्रह्मदेव हे आहेत प्रमुख ज्यांमध्ये असे - सवनशः (स्थिताः) - समूहासमूहाने असलेले - सुरेशाः - श्रेष्ठ देव - तत् उपाकर्ण्य - ते ऐकून - कवयः (अपि) - सर्वज्ञ असे असताहि - अनिश्चिततत्त्वाः (सन्तः) - निश्चित नाही तत्त्व ज्यांचे असे होत्साते - कश्मलं ययुः - मोहाला प्राप्त होतात. ॥१५॥
हे यशोदामाते ! तुझा पुत्र गोपाळांबरोबर खेळ खेळण्यात निपुण आहे. तसेच अनेक प्रकारे बासरी वाजविणे ते स्वतःच शिकले आहेत. जेव्हा तोंडल्यांसारख्या लाल ओठांवर बासरी ठेवून ते अनेक रागरागिणी वाजवू लागतात, त्यावेळी ते ऐकून ब्रह्मदेव, शंकर, इंद्र इत्यादी सर्वज्ञ असणारे मोठमोठे देवसुद्धा त्या रागरागिणी ओळखू शकत नाहीत. ते इतके मोहित होऊन जातात की, त्यांचे चित्त वेणुवादनात तल्लीन होऊन जाते, मस्तक नम्र होते आणि ते आपली शुद्ध हरवून बसतात. (१४-१५)
विवरण :- कृष्णाचे अष्टपैलू व्यक्तिमत्व इथे दिसून येते. आपल्या सवंगडयांसह सामान्य खेळ खेळताना त्याचे क्रीडाप्रेम, क्रीडापटुत्व दिसतेच, पण तो एक अभिजात संगीताचा जाणकार आहे. फक्त जाणकारच नाही, तर अनेक राग-रागिण्यांचा निर्माताहि आहे. अशा राग-रागिण्या ज्या ब्रह्मादि देवदेवताहि जाणत नाहीत. अशा स्वनिर्मित अनेक रागिण्यांचे स्वर तो आपल्या बासरीवर जेव्हा आळवितो, तेव्हा प्रत्यक्ष देवाधिदेवही आश्चर्यचकित होतात. (१४)
निजपदाब्जदलैर्ध्वजवज्र
नीरजाङ्कुशविचित्रललामैः । व्रजभुवः शमयन् खुरतोदं वर्ष्मधुर्यगतिरीडितवेणुः ॥ १६ ॥ व्रजति तेन वयं सविलास वीक्षणार्पितमनोभववेगाः । कुजगतिं गमिता न विदामः कश्मलेन कवरं वसनं वा ॥ १७ ॥
व्रजभूमि क्षत गोक्षुरि पीडे गजगती धरुनिया हरि चाले । करि तदा धरुनि वंशिस फुंकी रव अम्हा बहुहि गुंजवि नित्य ॥ १६ ॥ हलुहि ना शकतो जड जैसे ना कळे सुटत हे कच केंव्हा । ना ठरे मनहि यातनु ठायी वसन हे गळति या पृथिवीसी ॥ १७ ॥
ध्वजवज्रनीरजांकुशविचित्रललामैः - ध्वज, वज्र, कमल व अंकुश यांच्या योगाने विचित्र आहे सौंदर्य ज्यांचे अशा - निजपदाब्जदलैः - आपल्या चरणरूपी कमळांच्या पाकळ्यांनी - व्रजभुवः खुरतोदं शमयन् - गोकुळातील भूमीचे खुरांपासून झालेले दुःख शांत करीत - वर्ष्मधुर्यगतिः - शरीराची हत्तीसारखी आहे चाल ज्याची असा - ईडितवेणुः - वाजविली आहे मुरली ज्याने असा - (यदा) व्रजति - जेव्हा जाऊ लागतो - तेन - त्यामुळे - सविलासवीक्षणार्पितमनोभववेगाः - विलासांनी युक्त अशा पाहण्याने उत्पन्न केला आहे मदनाचा वेग ज्यांच्या ठिकाणी अशा - वयं - आम्ही - कुजगतिं गमिताः - वृक्षाच्या अवस्थेला नेलेल्या अशा - कबरं वसनं वा - केशपाशाला किंवा वस्त्राला - न विदाम - जाणत नाही. ॥१६-१७॥
ज्यांच्या तळव्यांवर ध्वज, वज्र, कमळ, अंकुश इत्यादी वैशिष्ट्यपूर्ण सुंदर चिन्हे आहेत, अशा आपल्या चरणकमलांनी ते गाईच्या खुरांनी खोदल्या गेलेल्या व्रजभूमीचे दुःख नाहीसे करतात. तसेच गजराजाप्रमाणे चालत जेव्हा ते बासरी वाजवतात तेव्हा त्यांचा तो बासरीचा आवाज ऐकून, ते मोहक चालणे आणि त्यांचे ते विलासपूर्ण पाहाणे आमच्या हृदयात प्रेमभाव वाढवितात. आम्ही त्यावेळी इतक्या मोहित होऊन जातो की, झाडांसारखी आमची स्थिती होते. त्यावेळी आम्हांला केसांची किंवा वस्त्रांची शुद्धही राहात नाही. (१६-१७)
विवरण :- अनेक शुभचिन्हांनी युक्त असे कृष्णाचे चरण भूमीवर पडल्यानंतर गायींच्या सुरांच्या दाबांनी (आघातांनी) तिला झालेली व्यथा नाहीशी होते, ती उल्हसित होते. मात्र कृष्णाचे ते मोहक रूप पाहून गोपी आपले देहभान हरपतात, आणि (वृक्षाप्रमाणे) निश्चल, तटस्थ उभ्या रहातात. (कामभावनेने पीडित झाल्याने त्यांना आपल्या वस्त्रांचे भानही रहात नाही.) (१७)
मणिधरः क्वचिदागणयन् गा
मालया दयितगन्धतुलस्याः । प्रणयिनोऽनुचरस्य कदांसे प्रक्षिपन् भुजमगायत यत्र ॥ १८ ॥ क्वणितवेणुरववञ्चितचित्ताः कृष्णमन्वसत कृष्णगृहिण्यः । गुणगणार्णमनुगत्य हरिण्यो गोपिका इव विमुक्तगृहाशाः ॥ १९ ॥
तुलसि माल प्रियो हरिसी ती तैचि त्या असति त्यागळिं कैक । हरि गिणी मणि मोजुनि गायी कर ठिवी जवळिच्या सखयासी ॥ १८ ॥ हरि जधी रवफुकी तै वंशी हरिणीही मनच त्या पदि देती । घरि असोनि मन तो हरि कृष्ण पळतसो वनिच आम्हि न येतो ॥ १९ ॥
क्वचित् - एखादे वेळी - मणिधरः - रत्ने धारण करणारा असा - गाः आगणयन् - गाई मोजणारा असा - दयितगन्धतुलस्याः मालया (युक्तः) - आवडत्या सुवासिक तुळशीच्या माळेने युक्त असा - प्रणयिनः अनुचरस्य अंसे भुजंप्रक्षिपन् - प्रिय सोबत्याच्या खांद्यावर हात ठेवीत - यत्र कदा - जेव्हा केव्हा - अगायत - गातो - क्वणितवेणुरववञ्चितचित्ताः - वाजविलेल्या मुरलीच्या शब्दाने मोहून गेली आहेत मने ज्यांची अशा - कृष्णगृहिण्यः हरिण्यः - काळविटांच्या स्त्रिया हरिणी - गुणगणार्णं कृष्णं अनुगत्य - गुणसमुदायांचा समुद्र अशा श्रीकृष्णाच्या मागे जाऊन - (वयं) गोपिकाः इव - आम्हा गोपींप्रमाणेच - विमुक्तगृहाशाः - सोडिली आहे घराची आशा ज्यांनी अशा - (तम्) अन्वसत - त्याच्या जवळ राहत्या झाल्या. ॥१८-१९॥
जिचा वास त्यांना अतिशय प्रिय आहे, अशी तुळशीची माळ गळ्यात घालून जेव्हा ते मण्यांच्या माळेने गाई मोजता मोजता एखाद्या प्रिय मित्राच्या गळ्यात हात टाकून बासरीही वाजवितात, त्यावेळी बासरीच्या त्या मधुर स्वरांनी चित्त हरवलेल्या काळविटांच्या माद्या आम्हा गोपींप्रमाणे घराची अभिलाषा सोडून गुणसागर, नंदनंदनालाच वेढून राहातात. (१८-१९)
विवरण :- 'मणिधर' असा कृष्ण वना - वनातून विहार करतो. इथे 'मणिधर' याचा संबंध कृष्णाच्या गळ्यातील कौस्तुभ रत्नहाराशी असावा. काही विद्वानांच्या मते गायींची मोजदाद करण्यासाठी पूर्वी माळेतील मण्य़ांचा उपयोग केला जाई, त्यावरूनहि 'मणिधर' असा शब्द वापरला असावा. (यावरून गायींची संख्या मोठया प्रमाणात असावी, गोधन असेही वाटते.) (१८)
( स्वागता )
कुन्ददामकृतकौतुकवेषो गोपगोधनवृतो यमुनायाम् । नन्दसूनुरनघे तव वत्सो नर्मदः प्रणयिणां विजहार ॥ २० ॥ मन्दवायुरुपवात्यनकूलं मानयन् मलयजस्पर्शेन । वन्दिनस्तमुपदेवगणा ये वाद्यगीतबलिभिः परिवव्रुः ॥ २१ ॥
येश्वदा करिच कौतुक भाग्ये लाडका हरि असे सुकुमार । प्रेमिका हरतर्हे सुखवी तो गोपाबाळिं यमुनी तटि खेळे ॥ २० ॥ वायु तो मलयगंधित वाहे सेवितो हरिसि या बहु लाला । देव गाति जणु भाटचि याचे भेटि अर्पुनिहि तोषिति कृष्णा ॥ २१ ॥
अनघे - हे निष्पाप यशोदे - कुन्ददामकृतकौतुकवेषः - कुंदपुष्पांच्या माळांनी केला आहे आश्चर्यकारक वेष ज्याने असा - गोपगोधनवृतः - गोपांनी व गोधनांनी वेष्टिलेला - तव वत्सः - तुझा मुलगा - नन्दसूनुः - नंदपुत्र - प्रणयिनां नर्मदः (सन्) - स्नेह्यांची थट्टा करीत - यमुनायां विजहार - यमुनेवर क्रीडा करतो. ॥२०॥मन्दवायुः - सौम्य असा वायु - मलयजस्पर्शे न (तं) मानयन् - मलय पर्वतावर उत्पन्न होणार्या चंदनाच्या स्पर्शाने त्याचा सन्मान करीत - अनुकूलं उपवाति - हितकारक अशा रीतीने वाहतो - ये उपदेवगणाः (आसन् ते) - जे गंधर्वादि गौण असे देव होते ते - बन्दिनः इव - स्तुतिपाठकांप्रमाणे - वाद्यगीतबलिभिः - वाद्यांनी, गाण्यांनी व पूजासाहित्यांनी - (तं) परिवव्रुः - त्याला चोहोकडून भजते झाले. ॥२१॥
हे पुण्यशील यशोदामाते ! तुझा बाळ कुंदांचा हार गळ्यात घालून व कौतुकास्पद वेष धारण करून गोपालांसह गाईंच्याबरोबर यमुनेच्या काठी आपल्या मित्रांना आनंद देत खेळू लागतो, त्यावेळी तेथे मलय पर्वतावरील चंदनाने सुगंधित झालेला मंद मंद वारा पाहून तो तुझ्या लाडक्याची सेवा करतो आणि गंधर्व इत्यादी उपदेवता, भाटांप्रमाणे गाऊन-वाजवून त्याला संतुष्ट करतात. तसेच अनेक प्रकारचे नजराणे देऊन त्याला सगळीकडून वेढून त्याची सेवा करतात. (२०-२१)
वत्सलो व्रजगवां यदगध्रो
वन्द्यमानचरणः पथि वृद्धैः । कृत्स्नगोधनमुपोह्य दिनान्ते गीतवेणुरनुगेडितकीर्तिः ॥ २२ ॥ उत्सवं श्रमरुचापि दृशीनां उन्नय खुररजश्छुरितस्रक् । दित्सयैति सुहृदासिष एष देवकीजठरभूरुडुराजः ॥ २३ ॥
गायिसी करितसे बहु प्रेम तैचि हा गिरिधरी उचलोनी । येतसे बघ प्रिये हरि आता शंकरादि करिती नमने त्यां ॥ २२ ॥ पातलाचि हरि हा बघ माळां धूळती उडतसे बघ कैसी । चंद्रची हरि जसा थकता ही कामना करिल तो बघ पूर्ण ॥ २३ ॥
यत् (सः) अगध्रः (जातः तत्) - ज्याअर्थी श्रीकृष्ण पर्वत धारण करणारा झाला त्याअर्थी - व्रजगवां वत्सलः - गोकुळातील गाईविषयी दयाळू असा - पथि वृद्धैः वंद्यमानचरणः - मार्गात वृद्धांनी वंदिले आहेत चरण ज्याचे असा - गीतवेणुः - वाजविली आहे मुरली ज्याने असा - अनुगेडितकीर्तिः - सोबत्यानी स्तविली आहे कीर्ति ज्याची असा - दिनान्ते - सायंकाळी - कृत्स्नगोधनम् उपोह्य - सगळ्या गाईंना गोळा करून. ॥२२॥श्रमरुचा अपि दृशींना उत्सवं उन्नयन् - श्रमांनी युक्त अशा कांतीनेहि नेत्रांचा आनंद वाढविणारा - खुररजश्छुरितस्रक् - खुरांच्या धुळीने मलिन झाली आहे माळ ज्याची असा - सुहृदाशिषः - मित्रांच्या इच्छेला - दित्सया - पुरविण्याच्या इच्छेमुळे - देवकी जठरभूः - देवकीच्या उदरी उत्पन्न झालेला - एषः उडुराजः एति - हा चंद्र येत आहे. ॥२३॥
व्रजातील गाईंवर गोवर्धनधरांचे अतिशय प्रेम आहे; म्हणून तर त्यांनी गोवर्धन पर्वत उचलून धरला होता. संध्याकाळ झाली आहे. आता ते सगळ्या गोधनाला वळवून घेऊन येतच असतील. वाटेत ब्रह्मदेवादी वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध त्यांच्या चरणांना प्रणाम करत असतील. आता बासरी वाजवीत ते येऊ लागले आहेत. आणि गोपाल त्यांच्या कीर्तीचे गायन करीत आहेत. पहा ना ! गाईंच्या खुरांनी उडालेली धूळ वनमालेवर बसली आहे. ते दिवसभर फिरून फिरून दमले असले तरीसुद्धा त्या श्रमांच्या सौंदर्यानेही आमच्या डोळ्यांना किती आनंद देत आहेत बरे ! हे देवकीपुत्र कृष्णचंद्र आम्हां प्रियजनांचे मनोरथ पूर्ण करण्यासाठीच आमच्याकडे येत आहेत. (२२-२३)
( मिश्र )
मदविघूर्णितलोचन ईषन् मानदः स्वसुहृदां वनमाली । बदरपाण्डुवदनो मृदुगण्डं मण्डयन् कनककुण्डललक्ष्म्या ॥ २४ ॥ यदुपतिर्द्विरदराजविहारो यामिनीपतिरिवैष दिनान्ते । मुदितवक्त्र उपयाति दुरन्तं मोचयन् व्रजगवां दिनतापम् ॥ २५ ॥
नयन ते बघ की मद तेथे सुचवितोचि जणू आपणा तो । बघ कपोल हरिचे किति छान फळ गाबुळि ते की जणु ओठ ॥ २४ ॥ यदुपती मदन तो हरि येतो गज जसा चलतसे निशि वेळी । मुदित हास्य करी हरि येता जणु शशी उगवला बघ आम्हा ॥ २५ ॥
ईषत् मदविधूर्णितलोचनः - थोडेसे मदाने फिरत आहेत डोळे ज्याचे असा - स्वसुहृदांमानदः - आपल्या मित्रांना मान देणारा - वनमाली - वनमाला धारण करणारा - कनककुण्डललक्ष्म्या गण्डं मण्डयन् - सोन्याच्या कुंडलांच्या शोभेने गालाला भूषविणारा - चंदरपाण्डुवदनः - बोरासारखे पांढर्या वर्णाचे आहे मुख ज्याचे असा. ॥२४॥द्विरदराजविहारः - हत्तींच्या राजाप्रमाणे आहे क्रीडा ज्याची असा - यामिनीपतिः इव मुदितवक्त्रः - चंद्राप्रमाणे आहे आनंदी मुख ज्याचे असा - एषः - हा - यदुपतिः - यादव श्रेष्ठ कृष्ण - व्रजगवांदुरन्तं - गोकुळातील गाईंना दिवसा झालेला - दिनतापं मोचयन् - जो अत्यंत ताप तो नाहीसा करीत - दिनान्ते उपयाति - सायंकाळी जवळ येत आहे. ॥२५॥
सखे ! ते पहा ! त्यांचे सुंदर डोळे काहीसे इकडेतिकडे पाहात आहेत. गळ्यात वनमाला डोलत आहे. सोन्याच्या कुंडलांच्या कांतीने त्यांचे कोमल गाल शोभिवंत दिसत आहेत. त्यामुळेच पिकलेल्या बोराप्रमाणे मुखकमल पिवळसर दिसत आहे. आपल्या बांधवांना व इष्टमित्रांना मान देणारे श्रीकृष्ण आपल्या गजराजासारख्या डौलदार चालीने या संध्याकाळच्या वेळी व्रजातच असलेल्या गाईंचा आणि आमचा, दिवसभरातील असह्य विरहताप नाहीसा करण्यासाठी, दिवसाची उष्णता दूर करणार्या चंद्राप्रमाणे जवळ येऊ लागले आहेत. (२४-२५)
विवरण :- 'मदविधूर्णित लोचन' सुरापानाने जशी डोळ्या खुमारी येते, तशी खुमारी कृष्णाच्या डोळ्यात (नशीली आँखें असेही वर्णन केले जाते त्याप्रमाणे) 'बदरपांडुवदन' काही विद्वान असे मानतात की बोर पिकताना त्याला काहीसा पिवळा आणि लालसर रंग येतो, त्याप्रमाणे कृष्णाच्या मुखाचा रंग होता. पण काहींच्या मते बदर म्हणजे 'चंद्र' आणि त्याचे (कृष्णाचे) मुख चंद्राप्रमाणे सुंदर असाही अर्थ आहे. (२४)
श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् ) एवं व्रजस्त्रियो राजन् कृष्णलीलानुगायतीः । रेमिरेऽहःसु तच्चित्ताः तन्मनस्का महोदयाः ॥ २६ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे पूर्वार्धे गोपिकायुगलगीतं नाम पञ्चत्रिंशोऽध्यायः ॥ ३५ ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
श्रीशुकदेव सांगतात - अशा व्रजस्त्रिया राजा ! कृष्णलीलाच गात त्या । कृष्णरूप अशा झाल्या वनात हरि जाय तै । हरिचे गुण गाण्यात तयांचा दिन जातसे ॥ २६ ॥ ॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर पस्तिसावा अध्याय हा ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
राजन् - हे राजा - एवं - याप्रमाणे - तच्चित्ताः - त्याच्याकडे लागले आहे चित्त ज्यांचे अशा - तन्मनस्काः - त्याच्याकडेच आहे मन ज्यांचे अशा - (ताः) महोदयाः व्रजस्त्रियः - त्या भाग्यशाली गोकुळवासी स्त्रिया - कृष्णलीलानुयतीः - श्रीकृष्णाच्या लीला सतत गात - अहःसु (अपि) रेमिरे - दिवसाही आनंद पावल्या. ॥२६॥
श्रीशुकाचार्य म्हणतात- राजा ! कृष्णमय झालेल्या भाग्यवान गोपी जेव्हा श्रीकृष्ण दिवसा वनात जात, तेव्हा त्या त्यांचेच चिंतन करीत आणि त्यांच्याच लीलांचे गायन करीत त्यातच रममाण होऊन जात. (२६)
विवरण :- या अध्यायाच्या प्रारंभीच 'गोप्यः वासरान् दुःखेन निन्युः ।' असे वर्णन आहे. आणि ते योग्यही आहे. कृष्ण नजरेआड असताना त्या सुखी होणे कसे शक्य ? त्यांनी दिवस कसा घालवावा ? पण हा विरह काही काळापुरताच म्हणजे सायंकाळपुरताच हेही त्या जाणत होत्या. मग पुन्हा त्यांना कृष्णाचे दर्शन होणारच असते. म्हणून या विरहाच्या काळात त्या कृष्णाचे गुणवर्णन एकमेकींना सांगून आपला विरह सुसह्य बनवीत. आपले मन श्रीकृष्णाचे ठायी रममाण करून त्याच्या भेटीची वाट पहात असत. (२६) अध्याय पस्तिसावा समाप्त |