|
श्रीमद् भागवत पुराण अरिष्टासुरवधः, कंसस्य अक्रूरं प्रति नन्दगोकुल गमनायादेशश्च - अरिष्टासुराचा उद्धार आणि कंसाने अक्रूराला व्रजात पाठविणे - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् ) अथ तर्ह्यागतो गोष्ठं अरिष्टो वृषभासुरः । महीं महाककुत्कायः कम्पयन् खुरविक्षताम् ॥ १ ॥
( अनुष्टुप् ) श्रीशुकदेव सांगतात - व्रजात कृष्ण जै जायी तेंव्हा उत्सवची असे । कंपती धरणी केली अरिष्टे बैल होउनी ॥ १ ॥
अथ तर्हि - या नंतर- अङग - हे राजा- महाककुत्कायः - मोठया वशिंडाने युक्त आहे शरीर ज्याचे असा- वृषभासुरः अरिष्टः - बैलाचे रूप घेतलेला दैत्य अरिष्ट- खुरविक्षतां महीं कम्पयन् - खुरांनी ताडन केलेल्या पृथ्वीला कापवीत - गोष्ठम् आगतः - गोकुळात आला. ॥१॥
श्रीशुकाचार्य म्हणतात- ज्यावेळी श्रीकृष्ण व्रजामध्ये प्रवेश करीत होते, त्याचवेळी अरिष्टसुर नावाचा एक दैत्य बैलाचे रूप घेऊन तेथे आला. त्याचे वशिंड आणि शरीर प्रचंड होते. तो खुरांनी जमीन उकरीत व तिला थरथर कापवीत गोठ्यात आला. (१)
रम्भमाणः खरतरं पदा च विलिखन् महीम् ।
उद्यम्य पुच्छं वप्राणि विषाणाग्रेण चोद्धरन् ॥ २ ॥
डर्काळे उकरी माती प्रचंड पुष्ट तो असा । उचली शेपटी शिंगे शेत वाड्याहि नष्टिल्या ॥ २ ॥
खरतरं रम्भमाणः - कर्कश रीतीने डुरकत - च - आणि - पदा महीं विलिखन् - पायाने पृथ्वीला ओरखडीत - पुच्छं उद्यम्य - शेपटी उभारून - विषाणाग्रेण वप्राणि उद्धरन् - शिंगाच्या टोकाने टेकाडे उकरीत. ॥२॥
तो मोठ्याने हंबरत होता आणि खुरांनी जमीन उकरीत होता. तो शेपूट उंचावून शिंगांनी तट इत्यादी ढासळवीत चालला होता. (२)
किञ्चित्किञ्चित् शकृन् मुञ्चन् मूत्रयन् स्तब्धलोचनः ।
यस्य निर्ह्रादितेनाङ्ग निष्ठुरेण गवां नृणाम् ॥ ३ ॥
मुते नी शेणही टाकी डोळे फाडोनि पाहतो । गर्जता पडले गर्भ स्त्रियांच्या पोटिचे तदा ॥ ३ ॥
स्तब्धलोचनः (सन्) - स्तब्ध आहेत डोळे ज्याचे असे होत्साता - किञ्चित् किञ्चित् शकृत् मुञ्चन् - थोडेथोडे शेण गाळीत - मूत्रयन् - मुतत - सः आगतः - तो आला - यस्य - ज्याच्या - निष्ठुरेण निह्लादितेन - कर्कश अशा डुरकण्याने ॥३॥
मधून मधून तो मुतत आणि शेण टाकत होता. तो डोळे रोखून पाहात होता. हे राजा ! त्याच्या प्रचंड हंबरण्याने (३)
पतन्त्यकालतो गर्भाः स्रवन्ति स्म भयेन वै ।
निर्विशन्ति घना यस्य ककुद्यचलशङ्कया ॥ ४ ॥
प्रचंड देह त्याचा तो काय तो सांगणे असे । पर्वतो वाटला मेघा खेटले त्यास येउनी ॥ ४ ॥
गवां नृणां (च) गर्भाः - गाईंचे व मनुष्य स्त्रियांचे गर्भ - भयेन - भीतीने - अकालतः - अवेळी - पतन्ति स्रवन्ति स्म वै - पतन पावले व गळून पडले - यस्य ककुदि - ज्याच्या वशिंडावर - घनाः (अपि) - ढगहि - अचलशङ्कया - पर्वत आहे असे वाटून - निर्विशन्ति - शिरतात. ॥४॥
भयभीत झालेल्या स्त्रिया आणि गाई यांचे गर्भपात होत. त्याच्या वशिंडाला पर्वत समजून ढग त्यावर येऊन थांबत. (४)
तं तीक्ष्णशृङ्गमुद्वीक्ष्य गोप्यो गोपाश्च तत्रसुः ।
पशवो दुद्रुवुर्भीता राजन् संत्यज्य गोकुलम् ॥ ५ ॥
तीक्ष्ण ते शिंग पाहोनी गोप गोपी भिल्या तदा । पशू तो स्थान सोडोनी पळाले दाहिही दिशा ॥ ५ ॥
राजन् - हे राजा - गोपाः गोप्यः च - गोप व गोपी - तीक्ष्णशृङगं तं उद्वीक्ष्य - अणकुची असलेली आहेत शिंगे ज्याची अशा त्याला पाहून - तत्रसुः - भ्याल्या - भीताः पशवः - भ्यालेली जनावरे - गोकुलं संत्यज्य - गौळवाडा सोडून - दुद्रुवुः - पळाली. ॥५॥
राजा ! त्या तीक्ष्ण शिंगांच्या बैलाला पाहून गोपी आणि गोप सर्वजण भयभीत झाले. गुरे तर इतकी घबरली की, गोठे सोडून ती पळू लागली. (५)
कृष्ण कृष्णेति ते सर्वे गोविन्दं शरणं ययुः ।
भगवानपि तद्वीक्ष्य गोकुलं भयविद्रुतम् ॥ ६ ॥
वाचवी कृष्ण कृष्णा रे वदती व्रजवासि ते । भयातुर असे गोप गोविंदे पाहिले तदा ॥ ६ ॥
ते सर्वे - ते सर्व लोक - कृष्ण कृष्ण इति (उक्त्वा) - हे कृष्णा हे कृष्णा असे म्हणून - गोविंद शरणं ययुः - श्रीकृष्णाला शरण गेले - भगवान् अपि - ही - श्रीकृष्ण तत् गोकुलं भयविद्रुतं वीक्ष्य - तो गौळवाडा भीतीने पळून गेलेला पाहून ॥६॥
सर्व व्रजवासी त्यावेळी "कृष्णा ! कृष्णा ! आम्हांला वाचव." असा आक्रोश करीत श्रीकृष्णांना शरण आले. गोकुळ भयाने व्याकुळ झाले आहे, हे भगवंतांनीही पाहिले. (६)
मा भैष्टेति गिराश्वास्य वृषासुरमुपाह्वयत् ।
गोपालैः पशुभिर्मन्द त्रासितैः किमसत्तम ॥ ७ ॥
न भ्यावे वदला कृष्ण असुरां वदला पुन्हा । मूर्खा दुष्टा असा त्यांना दाविशी भय काय ते ॥ ७ ॥
मा भैष्ट इति गिरा आश्वास्य - भिऊ नका अशा शब्दाने आश्वासन देऊन - (तं) वृषासुरं उपाह्वयत् - त्या बैलाचे रूप घेतलेल्या राक्षसाला जवळ बोलाविता झाला - मन्द - हे मूर्खा - असत्तम - हे अत्यंत दुष्टा - गोपालैः पशुभिः च त्रासितैः किं (भवति) - गोपाळ व जनावरे यांना भिवविल्याने काय होणार. ॥७॥
भिऊ नका असे म्हणून श्रीकृष्णांनी सर्वांना धीर दिला आणि वृषासुराला युद्धाचे आव्हान दिले, "अरे मूर्खा ! महादुष्टा ! या गाई आणि गवळ्यांना भिववून काय होणार ?" (७)
विवरण :- कृष्ण आणि बलराम यांचा नाश, हेच कंसाच्या जीविताचे उद्दिष्ट होते. ते पूर्ण झाल्याशिवाय त्याला शांती लाभणार नव्हती. एकामागून एक अशा नानारूपातील असुरांना तो कृष्णाचा वध करण्यास पाठवीत होता आणि कृष्ण त्यांना ठार करीत होता. शंखचूडानंतर आता 'अरिष्ट' नावाचा असुर महाभयंकर बैलाचे रूप घेऊन आला. (अरिष्ट म्हणजे संकट हे नावच सूचक) तो आला तो भयंकर डरकाळ्या फोडीतच. वास्तविक वृषभ, बैल हे धर्माचे स्वरूप. परंतु तो हिंसाप्रधान बनल्याने असुर झाला आणि असुरांचा नाश हे तर कृष्णाचे ब्रीद. कृष्णाने त्याला आवाहन केले, 'अरे तू वृषभ, मग बिचार्या गायीवासरांना का घाबरतोस ? त्यांच्यापुढे कसले शौर्य ? मी 'गोविंद' आहे. (गायींचा रक्षक) तुझ्यासारख्या असुराचा नाश करण्यास मी समर्थ आहे. तेव्हा माझ्या समोर ये.' (७)
बलदर्पहाहं दुष्टानां त्वद्विधानां दुरात्मनाम् ।
इत्यास्फोट्याच्युतोऽरिष्टं तलशब्देन कोपयन् ॥ ८ ॥
दुष्टांचे बळ नी गर्व हरोनी मीच मारितो । वदता शड्डु ठोकोनी क्रोधिण्या आपुला कर ॥ ८ ॥
अहं - मी - त्वद्विधानां दुरात्मनां दुष्टानां - तुझ्या सारख्या दुष्ट आहे अंतःकरण ज्यांचे अशा दुष्टांच्या - बलदर्पहा (अस्मि) - बळाचा गर्व नष्ट करणारा आहे - इति (उक्त्वा) - असे बोलून - तलशब्देन अरिष्टं कोपयन् - टाळीच्या ध्वनीने अरिष्टासुराला क्रोध उत्पन्न करीत - आस्फोटय - दंड थोपटून - अच्युतः हरिः - भगवान श्रीकृष्ण - सख्युः अंसे - मित्राच्या खांद्यावर - भुजाभोगं प्रसार्य - हात सरळ पसरून - अवस्थितः - स्वस्थ राहिला. ॥८॥
तुझ्यासारख्या नीच दुष्टांच्या ताकदीचा गर्व नाहीसा करणारा हा मी इथे आहे असे म्हणून भगवंतांनी दंड थोपटले आणि त्याला चिडवण्यासाठी म्हणून आपल्या एका मित्राच्या खांद्यावर हात टाकून ते उभे राहिले. (८)
सख्युरंसे भुजाभोगं प्रसार्यावस्थितो हरिः ।
सोऽप्येवं कोपितोऽरिष्टः खुरेणावनिमुल्लिखन् । उद्यत्पुच्छभ्रमन्मेघः क्रुद्धः कृष्णमुपाद्रवत् ॥ ९ ॥
मित्राच्या ठेविला स्कंधि आव्हाने दैत्य क्रोधला । झपाटी हरिसी येता पुच्छे विस्कटिले ढग ॥ ९ ॥
एवं कोपितः सः अरिष्टः अपि - याप्रमाणे डिवचलेला अरिष्टहि - क्रुद्धः - रागावलेला असा - खुरेण अवनिं उल्लिखन् - खुराने भूमी ओरखडीत - उद्यपुच्छभ्रमन्मेघः - उभारलेल्या पुच्छामुळे फिरत आहेत मेघ ज्याच्या असा - कृष्णं उपाद्रवत् - श्रीकृष्णावर धावला. ॥९॥
या आव्हानामुळे संतापून तो खुरांनी जोराने जमीन उकरीत श्रीकृष्णांच्या अंगावर धावला. त्यावेळी त्याने उंचावलेल्या त्याच्या शेपटाच्या धक्क्याने आकाशातील ढग गरगर फिरू लागले. (९)
अग्रन्यस्तविषाणाग्रः स्तब्धासृग् लोचनोऽच्युतम् ।
कटाक्षिप्याद्रवत् तूर्ण् इन्द्रमुक्तोऽशनिर्यथा ॥ १० ॥
रोखिले तीक्ष्ण ती शिंगे वटारी लाल नेत्र ते । तुटोनी पडला अंगी इंद्राचे व्रज जैं सुटे ॥ १० ॥
अग्रन्यस्तविषाणाग्रः - पुढे केली आहेत शिंगांची टोके ज्याने असा - स्तब्धासृग्लोचनः - स्तब्ध आहेत रक्तासारखे डोळे ज्याचे असा - अरिष्टः - अरिष्टासुर - अच्युतं कटाक्षिप्य - श्रीकृष्णाकडे वाकडी दृष्टी फेकून - यथा इंद्रमुक्तः अशनिः (तथा) - जसे इंद्राने सोडलेले वज्र त्याप्रमाणे - तूर्णं आद्रवत् - त्वरेने धावला. ॥१०॥
त्याने आपली तीक्ष्ण शिंगे समोर धरली. लाल-लाल डोळ्यांनी श्रीकृष्णांकडे तिरप्या नजरेने रोखून पाहात तो त्यांच्यावर इतक्या वेगाने तुटून पडला की, जणू इंद्राने सोडेलेले वज्रच ! (१०)
गृहीत्वा शृङ्गयोस्तं वा अष्टादश पदानि सः ।
प्रत्यपोवाह भगवान् गजः प्रतिगजं यथा ॥ ११ ॥
कृष्णाने धरिली शिंगे हत्ती हत्तीस ठोशि जैं । तसाचि फेकिला मागे आठरा पाय अंतरी ॥ ११ ॥
यथा गजः प्रतिगजं (तथा) - ज्याप्रमाणे एक हत्ती प्रतिस्पर्धी हत्तीला त्याप्रमाणे - सः भगवान् - तो श्रीकृष्ण - तं शृङगयोः गृहीत्वा - त्याला दोन्ही शिंगांच्या ठिकाणी धरून - अष्टादशपदानि - अठरा पावले - प्रत्यपोवाह - मागे हटविता झाला. ॥११॥
भगवान श्रीकृष्णांनी आपल्या दोन्ही हातांनी त्याची दोन्ही शिंगे पकडली आणि जसा एक हत्ती दुसर्या हत्तीला मागे रेटतो, त्याप्रमाणे त्यांनी त्याला अठरा हात मागे रेटून जमिनीवर पाडले. (११)
विवरण :- कृष्णाने आवाहन केल्यावर वृषभासुर कृष्णावर धावून गेला. श्रीकृष्णाने त्याची शिंगे पकडली, कारण शिंगे हेच बैलाचे महत्त्वाचे शस्त्र; आणि शत्रूला नामोहरम करताना आधी त्याचे शस्त्रच शक्तिहीन करावे लागते. मात्र इथे एक हत्ती दुसर्या हत्तीवर तुटून पडावा, त्याप्रमाणे असे वर्णन आहे. (गजः प्रतिगजं यथा ।) त्यावरून तो असुर बलवान आणि तुल्यबळ असावा असे वाटते. नंतर कृष्णाने त्यास अठरा पावले मागे रेटले, असा उल्लेख आहे. तो अठराच पावले असा का असावा ? कदाचित हा असुर अठरा पुराणे, विद्या, यांच्याशी संबंधित नसल्याने त्यांचे पलीकडे जा असेही कृष्णाला सुचवावयाचे असावे. (११)
सोऽपविद्धो भगवता पुनरुत्थाय सत्वरम् ।
आपतत् स्विन्नसर्वाङ्गो निःश्वसन् क्रोधमूर्च्छितः ॥ १२ ॥
हरिने फेकिता त्याला उठला क्रोधुनी बहू । झपाटे श्वास फेकोनी लत्पटे सर्व अंग ते ॥ १२ ॥
भगवताअपविद्धः - श्रीकृष्णाने मागे हटविलेला असा - स्विन्नसर्वाङगः - घामाने भिजले आहे सर्व शरीर ज्याचे असा - क्रोधमूर्च्छितः - रागाने भरून गेलेला - निश्वसन् - सुस्कारे टाकीत - सः - तो अरिष्टासुर - पुनः उत्थाय - पुनः उठून - सत्वरः आपतत् - त्वरेने धावून आला. ॥१२॥
भगवंतांनी त्याला याप्रमाणे ढकलल्यानंतर लगेच उठून संतापाने दीर्घ श्वास सोडीत पुन्हा त्याने त्यांच्यावर चढाई केली. त्यावेळी त्याचे सर्व शरीर घामाने डबडबले होते. (१२)
( मिश्र )
तं आपतन्तं स निगृह्य शृङ्गयोः पदा समाक्रम्य निपात्य भूतले । निष्पीडयामास यथाऽऽर्द्रमम्बरं कृत्वा विषाणेन जघान सोऽपतत् ॥ १३ ॥
( इंद्रवज्रा ) हा मारु इच्छी हरि पाहि तेंव्हा मारोनि ठोसा चकचूर केला । जै पोतिरा तो पडला धरेशी नी तिंबिला तो उपटोनि शिंगे ॥ १३ ॥
सः - तो - आपतन्तं तं - धावून येणार्या त्याला - शृङगयोः निगृह्य - दोन्ही शिंगांच्या ठिकाणी पकडून - पदा समाक्रम्य - पायाने दाबून - भूतले निपात्य - जमिनीवर पाडून - यथा आर्द्रं अम्बरं (तथा) - ज्याप्रमाणे ओले वस्त्र त्याप्रमाणे - निष्पीडयामास - पिळून काढिता झाला - (विषाणं) कृत्वा - शिंग उपटून - (तेन) विषाणेन - त्या शिंगाने - (अरिष्टं) जघान - अरिष्टासुराला मारिता झाला - सः अपतत् - तो अरिष्ट पडला. ॥१३॥
तो अंगावर येत असलेला पाहून भगवंतांनी त्याची शिंगे पकडली आणि त्याला जमिनीवर पाडले. नंतर त्याला पायांनी दाबून ओला कपडा पिळावा, तसा त्याला पिळला. यानंतर त्याचे शिंग उखडून त्यानेच टोचून टोचून त्याला मारले. त्यामुळे तो तेथेच निपचित पडून राहिला. (१३)
असृग् वमन् मूत्रशकृत् समुत्सृजन्
क्षिपंश्च पादाननवस्थितेक्षणः । जगाम कृच्छ्रं निर्ऋतेरथ क्षयं पुष्पैः किरन्तो हरिमीडिरे सुराः ॥ १४ ॥
रक्तास ओकी मुतला नि हागे बाहेर त्याचे द्वय नेत्र आले । झाडोनि पाया मग प्राण सोडी देवो फुले वाहुनि स्तोत्र गाती ॥ १४ ॥
असृक् वमन् - रक्त ओकत - मूत्रशकृत् समुत्सृजन् - मूत व विष्ठा गाळीत - अनवस्थितेक्षणः - स्थिर नाहीत डोळे ज्याचे असा - पादान् क्षिपन् - पाय आपटीत - कृच्छ्रं जगाम - कष्ट पावला - अथ - आणि मग - निऋतेः क्षयं (जगाम) - मृत्यूच्या घरी गेला - पुष्पैः किरन्तः सुराः - फुलांनी वर्षाव करणारे देव - हरिं ईडिरे - श्रीकृष्णाला स्तविते झाले. ॥१४॥
नंतर तोंडातून रक्त ओकीत आणि विष्ठ-मूत्र सोडीत तो दैत्य पाय झटकू लागला. त्याची बुबुळे उलटी झाली आणि अतिशय कष्टाने त्याने आपले प्राण सोडले. तेव्हा देव भगवंतांच्यावर पुष्पवर्षाव करीत त्यांची स्तुती करू लागले. (१४)
( अनुष्टुप् )
एवं कुकुद्मिनं हत्वा स्तूयमानः द्विजातिभिः । विवेश गोष्ठं सबलो गोपीनां नयनोत्सवः ॥ १५ ॥
( अनुष्टुप् ) गोपांनी वाहवा केली अरिष्टासुर मारिता । गोठ्यात कृष्ण ये तेंव्हा गोपिंचे नेत्र पाणले ॥ १५ ॥
एवं - याप्रमाणे - ककुद्मिनं हत्वा - बैलाला मारून - स्वजातिभिः स्तूयमानः - स्वतःच्या बांधवांकडून स्तविला गेलेला - गोपीनां नयनोत्सवः - गोपींच्या नेत्रांना आनंद देणारा असा - सबलः (सः) - बळरामासह तो कृष्ण - गोष्ठं विवेश - गोकुळात शिरला. ॥१५॥
श्रीकृष्णांनी जेव्हा बैलाच्या रूपाने आलेल्या अरिष्टसुराला मारले, तेव्हा सर्व गोप त्यांची प्रशंसा करू लागले. नंतर बलरामांसह त्यांनी वाड्यात प्रवेश केला आणि त्यांना पाहून गोपींचे नेत्र आनंदाने भरून गेले. (१५)
अरिष्टे निहते दैत्ये कृष्णेनाद्भुतकर्मणा ।
कंसायाथाह भगवान् नारदो देवदर्शनः ॥ १६ ॥
अद्भूत कृष्ण लीला या अरिष्टासुर मारिता । भगवान् नारदे सारे कंसाला कथिले असे ॥ १६ ॥
अद्भतकर्मणा कृष्णेन - आश्चर्यकारक आहेत कृत्ये ज्याची अशा श्रीकृष्णाने - अरिष्टे दैत्ये निहते - अरिष्ट राक्षस मारिला असता - अथ - नंतर - देवदर्शनः भगवान् - असे देवाप्रमाणे दर्शन असणारा भगवान - नारदः कंसाय आह - नारद कंसाला म्हणाला ॥१६॥
अद्भूत कृत्ये करणार्या भगवंतांनी जेव्हा अरिष्टसुराला मारले, तेव्हा देवर्षी नारद कंसाला म्हणाले. (१६)
यशोदायाः सुतां कन्यां देवक्याः कृष्णमेव च ।
रामं च रोहिणीपुत्रं वसुदेवेन बिभ्यता ॥ १७ ॥
कंसा जी सुटली पुत्री यशोदेचीच ती असे । व्रजात देवकीकृष्ण रोहिणीचाहि तो बळी ॥ १७ ॥
कन्यां - योगमायारूपी कन्या - यशोदायाः सुतां - ही यशोदेची मुलगी - च कृष्णं एव - आणि कृष्णच - देवक्याः (पुत्रं) - देवकीचा पुत्र - च रामं रोहिणीपुत्रं - आणि बळराम हा रोहिणीचा मुलगा - बिभ्यता वसुदेवेन (तौ) - भ्यालेल्या वसुदेवाने बळराम व श्रीकृष्ण ह्या दोघांना ॥१७॥
अरे कंसा ! तुझ्या हातातून निसटून आकाशात गेलेली कन्या यशोदेची होती; आणि व्रजामध्ये जे श्रीकृष्ण आहेत, ते देवकीचे पुत्र आहेत. तेथे जे बलराम आहेत, ते रोहिणीचे पुत्र आहेत. तुझ्या भीतीने वसुदेवांनी त्या दोघांना (१७)
न्यस्तौ स्वमित्रे नन्दे वै याभ्यां ते पुरुषा हताः ।
निशम्य तद्भोजपतिः कोपात् प्रचलितेन्द्रियः ॥ १८ ॥
वसुदेवे भिवोनीया नंदाच्या घरि ठेविले । वधिती दैत्य भृत्याते ऐकता कंस क्रोधला ॥ १८ ॥
स्वमित्रे नन्देन्यस्तौ - आपला मित्र जो नंद त्याजवळ ठेव म्हणून ठेविले - याभ्यां वै ते पुरुषाः हताः - ज्या दोघांनीच तुझे पुरुष मारून टाकिले - भोजपतिः - कंस - तत् निशम्य - ते ऐकून - क्रोधात् प्रचलितेन्द्रियः (अभवत्) - क्रोधाने कावराबावरा झाला. ॥१८॥
आपला मित्र नंद यांच्याकडे ठेवले आहे. तुझ्या सेवकांचा त्यांनीच वध केला. हे ऐकताच कंसाचे अंग क्रोधाने कापू लागले. (१८)
निशातमसिमादत्त वसुदेवजिघांसया
निवारितो नारदेन तत्सुतौ मृत्युमात्मनः ॥ १९ ॥
मारण्या वसुदेवाते तयाने खड्ग घेतले । नारदे रोधिले त्याला ओळखी कंस मृत्यु तो ॥ १९ ॥
वसुदेवजिघांसया - वसुदेवाला मारण्याच्या इच्छेने - निशातं असिं आदत्त - तीक्ष्ण तरवार घेता झाला - नारदेन निवारितः - नारदाकडून निवारिला गेला - तत्सुतौ - त्या वसुदेवाचे दोघे मुलगे - आत्मनः मृत्युं - आपला मृत्यु - ज्ञात्वा - जाणून ॥१९॥
वसुदेवांना मारण्यासाठी त्याने लगेच तीक्ष्ण तलवार उचलली, परंतु नारदांनी त्याला अडविले. वसुदेवांची मुलेच आपल्या मृत्यूला कारण होणार आहेत, हे जेव्हा कंसाला समजले, (१९)
ज्ञात्वा लोहमयैः पाशैः बबन्ध सह भार्यया ।
प्रतियाते तु देवर्षौ कंस आभाष्य केशिनम् ॥ २० ॥
बांधिले वसुदेवाला कैदेत टाकिले पुन्हा । जाता नारद ते तेंव्हा केशीला वदला असे ॥ २० ॥
लोहमयैः पाशैः - लोखंडांच्या पाशांनी - भार्यया सह - स्त्री सह - (तं) बबन्ध - त्या वसुदेवाला बांधिता झाला - देवर्षौ प्रतियाते - देवर्षि परत गेल्यावर - कंसः केशिनं आभाष्य - कंस केशीला जवळ बोलावून. ॥२०॥
तेव्हा त्याने देवकी आणि वसुदेव या दोघांनाही लोखंडी बेड्यांनी जखडून टाकून पुन्हा तुरुंगात डांबले. नारद निघून गेल्यावर कंसाने केशीला बोलावून म्हटले, (२०)
प्रेषयामास हन्येतां भवता रामकेशवौ ।
ततो मुष्टिकचाणूर शलतोशलकादिकान् ॥ २१ ॥
व्रजी त्वरित तू जावे मारावे कृष्ण नी बळी । पुन्हा मुष्टीक चाणूरा तोशला शल आदिला ॥ २१ ॥
भवता रामकेशवौ हन्येताम् - तू राम-कृष्णांना ठार मारावे - इति (उक्त्वा) - असे सांगून - (तं) प्रेषयामास - त्याला पाठविता झाला - ततः - नंतर - मुष्टिकचाणूरशलतोशलकादिकान् - मुष्टिक, चाणूर, शल, तोशलक इत्यादिकांना. ॥२१॥
तू व्रजात जाऊन बलराम आणि कृष्णाला मारून टाक. तो निघून गेला. यानंतर कंसाने मुष्टिक, चाणूर, शल, तोशल इत्यादी (२१)
अमात्यान् हस्तिपांश्चैव समाहूयाह भोजराट् ।
भो भो निशम्यतामेतद् वीरचाणूरमुष्टिकौ ॥ २२ ॥
पैलवान तसे मंत्री यांजला बोलला असे । वीरांनो गोष्टि या सार्या ऐकाव्या ध्यान देउनी ॥ २२ ॥
अमात्यान् - प्रधानांना - हस्तिपान् - माहुतांना - समाहूय - एकत्र बोलावून - भोजराट् आह - भोजराज कंस म्हणाला - भो भो वीर चाणूरमुष्टिकौ - हे पराक्रमी चाणूरा व मुष्टिका - एतत् निशम्यताम् - हे ऐका. ॥२२॥
मंत्री आणि माहुतांना बोलावून म्हटले, "हे वीरवर चाणूरा आणि मुष्टिका ! तुम्ही मी सांगतो ते ऐका." (२२)
नन्दव्रजे किलासाते सुतावानकदुन्दुभेः ।
रामकृष्णौ ततो मह्यं मृत्युः किल निदर्शितः ॥ २३ ॥
बलराम नि तो कृष्ण पुत्र ते वसुदेवचे । व्रजात राहती त्यांच्या हाताने मम मृत्यु हो ॥ २३ ॥
किल - खरोखर - नन्दव्रजे - नंदाच्या गौळवाडयात - आनकदुन्दुभेः सुतौ - वसुदेवाचे दोन्ही मुलगे - रामकृष्णौ आसाते - बळराम व कृष्ण हे राहात आहेत - ततः - त्यापासून - मह्यं मृत्यूः निदर्शितः - मला मृत्यू सांगितलेला आहे. ॥२३॥
वसुदेवाचे दोन पुत्र बलराम आणि कृष्ण नंदाच्या व्रजामध्ये राहात आहेत. त्यांच्याच हातून माझा मृत्यू होणार आहे, असे सांगितले जाते. (२३)
भवद्भ्यामिह सम्प्राप्तौ हन्येतां मल्ललीलया ।
मञ्चाः क्रियन्तां विविधा मल्लरङ्गपरिश्रिताः । पौरा जानपदाः सर्वे पश्यन्तु स्वैरसंयुगम् ॥ २४ ॥
तेंव्हा ते पातता येथे कुस्तीच्या माध्यमे तयां । मारावे, सजवा मंच बोलवा लोक सर्वही ॥ २४ ॥
भवद्भयां - तुम्हां दोघांकडून - इह सम्प्राप्तौ (तौ) - येथे आलेले ते दोघे - मल्ललीलया - मल्लांच्या युक्तीने - हन्येताम् - ठार मारले जावे - विविधाः मञ्चाः क्रियन्ताम् - निरनिराळ्या प्रकारची उच्चासने सिद्ध करावी - मल्लरङगपरिश्रिताः - मल्लांच्या आखाडयाच्या सभोवार बसलेले - सर्वे पौराः - सर्व नागरिक लोक - जानपदाः - खेडयापाडयातील लोक - स्वैरसंयुगं पश्यन्तु - मोकळेपणाने होणारे युद्ध पाहू द्या. ॥२४॥
जेव्हा ते येथे येतील, तेव्हा तुम्ही त्यांना कुस्ती खेळण्याचे निमित्त करून मारून टाका. आता तुम्ही आखाड्यात चारी बाजूंनी निरनिराळ्या प्रकारचे रंगमंच तयार करा. नगरवासी आणि ग्रामवासी त्यांवर बसून स्वच्छंदपणे ही कुस्ती पाहू देत. (२४)
महामात्र त्वया भद्र रङ्गद्वार्युपनीयताम् ।
द्विपः कुवलयापीडो जहि तेन ममाहितौ ॥ २५ ॥
चतूर माहुता तूं तो कृष्ण द्वारासि पातता । माजरा हत्ति सोडोनी कृष्णा तेथेचि मारणे ॥ २५ ॥
भद्र महामात्र - हे सज्जना महामात्रा - त्वया - तू - कुवलयापीडः द्विपः - कुवलयापीड हत्ती - रङगद्वारि उपनीयताम् - आखाडयाच्या दारात न्यावा - तेन - त्याच्याकडून - मम अहितो जहि - माझे दोघे शत्रू ठार मार. ॥२५॥
हे चतुर माहुता ! तू आखाड्याच्या फाटकावरच कुवलयापीड हत्तीला उभा कर आणि त्याच्याकडून माझ्या शत्रूंना मारून टाक. (२५)
आरभ्यतां धनुर्यागः चतुर्दश्यां यथाविधि ।
विशसन्तु पशून् मेध्यान् भूतराजाय मीढुषे ॥ २६ ॥
मित्ति चतुर्दशीला तो धनुष्ययज्ञ मांडणे । भैरवा पशुहत्त्येने प्रसन्न करणे पहा ॥ २६ ॥
चतुर्दश्यां - चतुर्दशीच्या दिवशी - यथविधि - यथाशास्त्र - धनुर्यागः - धनुर्याग - आरभ्यताम् - आरंभावा - भूतराजाय मीढुषे - प्राणिमात्रांचा राजा जो वर देणारा शंकर त्याच्यासाठी - मेध्यान् पशून् - यज्ञाला योग्य अशा पशूंना - विशसन्तु - बळी देवोत. ॥२६॥
येत्या चतुर्दशीला विधिपूर्वक धनुष्ययज्ञाला आरंभ करा आणि त्यावेळी वर देणार्या भूतनाथाला पवित्र पशूंचा बळी द्या." (२६)
इत्याज्ञाप्यार्थतन्त्रज्ञ आहूय यदुपुङ्गवम् ।
गृहीत्वा पाणिना पाणिं ततोऽक्रूरमुवाच ह ॥ २७ ॥
स्वार्थसिद्धांत तो कंस जाणी की रे परीक्षिता । अक्रूरा बोलवोनीया धरोनी हात बोलला ॥ २७ ॥
अर्थतन्त्रज्ञः (कंसः) - राजकारण जाणणारा असा कंस - इति आज्ञाप्य - अशी आज्ञा करून - ततः - नंतर - यदुङगवं अक्रूरं आहूय - यादवांमध्ये श्रेष्ठ अशा अक्रूराला बोलावून - (निजेन) पाणिना तस्य पाणिं गृहीत्वा - आपल्या हाताने त्याचा हात धरून - उवाच ह - म्हणाला. ॥२७॥
स्वार्थ साधण्यात कुशल असणार्या कंसाने अशी आज्ञा देऊन यदुवंशी अक्रूराला बोलाविले आणि त्याचा हात आपल्या हातात घेऊन म्हटले. (२७)
भो भो दानपते मह्यं क्रियतां मैत्रमादृतः ।
नान्यस्त्वत्तो हिततमो विद्यते भोजवृष्णिषु ॥ २८ ॥
उदार अक्रूरा तुम्हा नित्य मी आदरीतसे । मित्रोचित करा कार्य तुम्ही माझे भले करा ॥ २८ ॥
भो भो दानपते - हे अक्रूरा - मह्यं मैत्रं क्रियतां - माझ्याशी मैत्री कर - हि - कारण - भोजवृष्णिषु - भोज व वृष्णि यांमध्ये - त्वत्तः अन्यः - तुझ्याहून दुसरा - आदृतः - आदराने युक्त असा - हिततमः - अत्यंत हितकारक असा - (कः अपि) न विद्यते - कोणीही नाही. ॥२८॥
हे दानशूर अक्रूरा ! तू मला आदरणीय आहेस. आज माझे मित्राने करण्याजोगे एक काम कर. कारण भोजवंशी आणि वृष्णिवंशी यादवांमध्ये माझा सर्वांत हितचिंतक तुझ्याखेरीज दुसरा कोणी नाही. (२८)
अतस्त्वामाश्रितः सौम्य कार्यगौरवसाधनम् ।
यथेन्द्रो विष्णुमाश्रित्य स्वार्थमध्यगमद् विभुः ॥ २९ ॥
श्रेष्ठ हे काम की तैसे आश्रयी पातलो तुम्हा । आश्रये विष्णुच्या इंद्र स्वार्थची साधितो तसा ॥ २९ ॥
अतः - यास्तव - सौम्य - हे मित्रा - यथा विभुः इन्द्रः - जसा पराक्रमी इंद्र - विष्णुं आश्रित्य - श्रीविष्णूचा आश्रय करून - स्वार्थं अध्यगमत् - स्वतःचे हित मिळविता झाला - कार्यगौरवसाधनं - मोठेपणाने कार्य सिद्धीस नेणार्या - त्वा आश्रितः (अस्मि) - तुझा आश्रय केला आहे. ॥२९॥
हे मित्रा ! जसा इंद्र स्वतः समर्थ असूनसुद्धा विष्णूंचा आश्रय घेऊन आपला स्वार्थ साधत असतो, त्याप्रमाणे हे मोठे काम तुझ्याकडूनच होणार असल्याने मी तुझा आश्रय घेत आहे. (२९)
गच्छ नन्दव्रजं तत्र सुतौ आवानकदुन्दुभेः ।
आसाते तौ इहानेन रथेनानय मा चिरम् ॥ ३० ॥
नंदव्रजी तुम्ही जावे पुत्र ते वसुदेवचे । तथोनी रथि आणावे न वेळ सत्वरी निघा ॥ ३० ॥
नन्दव्रजं गच्छ - नंदाच्या गौळवाडयात जा - तत्र आनकदुन्दुभेः सुतौआसाते - तेथे वसुदेवाचे दोन मुलगे रहात आहेत - तौ - त्यांना - अनेन रथेन - ह्या रथाने - इह आनय - येथे आण - मा चिरं - उशीर लावू नको. ॥३०॥
तू नंदराजाच्या व्रजामध्ये जा. तेथे वसुदेवाचे दोन पुत्र आहेत. त्यांना याच रथात बसवून आण. उशीर करू नकोस. (३०)
निसृष्टः किल मे मृत्युः देवैर्वैकुण्ठसंश्रयैः ।
तावानय समं गोपैः नन्दाद्यैः साभ्युपायनैः ॥ ३१ ॥
ऐकतो विष्णुच्या हाती देवता मम मृत्यु तो । योजिती, नंदजी गोपा गौरवे आणणे इथे ॥ ३१ ॥
वैकुण्ठसंश्रयैः देवैः - श्रीविष्णूचा आश्रय करणार्या देवांनी - मे मृत्यूः निसृष्टः किल - माझा मृत्यू निश्चयाने उत्पन्न केला आहे - साभ्युपायनैः नन्दाद्यैः गोपैः समं - देणग्यांनी युक्त अशा नंदादिक गोपांसह - तौ - त्या दोघांना - आनय - घेऊन ये. ॥३१॥
मी असे ऐकले आहे की, विष्णूंच्या भरवशावर असणार्या देवांनी त्यांच्याकडून माझा मृत्यू व्हावा असे निश्चित केले आहे. म्हणून तू त्या दोघांना घेऊन ये. त्याचबरोबर नजराणे बरोबर घेतलेल्या नंद आणि इतर गोपांनाही घेऊन ये. (३१)
घातयिष्य इहानीतौ कालकल्पेन हस्तिना ।
यदि मुक्तौ ततो मल्लैः घातये वैद्युतोपमैः ॥ ३२ ॥
येथे येताचि त्यांना मी हत्तीच्या पायि मारितो । वाचले तर हे शाक्त कुस्तीत मारतील की ॥ ३२ ॥
इहआनीतौ (तौ) - येथे आणिलेल्या त्या दोघांना - कालकल्पेन हस्तिना - काळासारख्या हत्तीकडून - घातयिष्ये - मी मारवीन - यदि ततः (तौ) मुक्तौ - जर त्यातून ते सुटले - वैद्युतोपमैः मल्लैः - वज्रदेही मल्लांकडून - घातये - मी मारवीन. ॥३२॥
येथे आणल्यानंतर मी त्यांना माझ्या काळासमान असलेल्या कुवलयापीड हत्तीकडून मारून टाकीन आणि जर कदाचित ते त्या हत्तीच्या तडाख्यातून वाचलेच तर मी आपल्या वज्राप्रमाणे मजबूत आणि चपळ, मुष्टिक व चाणूर या पहिलवानांकडून त्यांना मारीन. (३२)
तयोर्निहतयोस्तप्तान् वसुदेवपुरोगमान् ।
तद्बन्धून् निहनिष्यामि वृष्णिभोजदशार्हकान् ॥ ३३ ॥
मारिता वसुदेवो नी कृष्ण भोजादि वंशिचे । शोकात बुडती तेंव्हा स्वहस्ते वधितो तया ॥ ३३ ॥
तयोः निहतयोः - ते दोघे मारिले असता - तप्तान् - दुःखी झालेल्या - वसुदेवपुरोगमान् - वसुदेव आहे प्रमुख ज्यांमध्ये अशा - वृष्णिभोजदशार्हकान् - वृष्णि, भोज व दाशार्ह यांना - तद्बन्धून् - त्यांच्या भाऊबंदांना - निहनिष्यामि - मी ठार मारीन. ॥३३॥
ते मारले गेल्यानंतर वसुदेव इत्यादी वृष्णी, भोज आणि दशार्हवंशी त्यांचे बांधव शोकाकुल होतील. मग मी त्यांना स्वतः मारीन. (३३)
उग्रसेनं च पितरं स्थविरं राज्यकामुकम् ।
तद्भ्रातरं देवकं च ये चान्ये विद्विषो मम ॥ ३४ ॥
म्हातारा तो पिता माझा तरीही राज्य इच्छितो । उग्रसेन पिता आदी द्वेषींना मीच मारितो ॥ ३४ ॥
राज्यकामुकं स्थविरं पितरं उग्रसेनं - राज्यलोभी असा म्हातारा पिता जो उग्रसेन त्याला - तदभ्रातरं देवकं - त्याचा भाऊ जो देवक त्याला - च - आणि - ये अन्ये मम विद्विषः (सन्ति) - जे दुसरे माझे शत्रू आहेत - (तान्) निहनिष्यामि - त्यांना मी ठार मारीन. ॥३४॥
तसेच पिता उग्रसेन हे वृद्ध असूनही राज्याचे लोभी आहेत. मी त्यांना, त्यांचे भाऊ देवक आणि अन्य जे जे कोणी माझे शत्रू आहेत, त्या सर्वांना, यमसदनाला पाठवीन. (३४)
ततश्चैषा मही मित्र भवित्री नष्टकण्टका ।
जरासन्धो मम गुरुः द्विविदो दयितः सखा ॥ ३५ ॥
मित्र अक्रूरजी तेंव्हा होई मी पृथिवी पती । सासरे ते जरासंध नी प्रीय द्विविदो सखा ॥ ३५ ॥
मित्र - हे मित्रा अक्रूरा - ततः एषा मही - तेणे करूनही पृथ्वीवर - नष्टकण्टका भवित्री - जिच्यातून शत्रू नाहीसे झाले आहेत अशी होईल - मम गुरूः जरासन्धः - माझा गुरु जरासंध - दयितः सखा द्विविदः - प्रेमळ असा मित्र द्विविद. ॥३५॥
नंतर हे मित्रा ! ही पृथ्वी निष्कंटक होईल. कारण जरासंध आमचे श्वशुर आहेत आणि द्विविद हा प्रिय मित्र आहे. (३५)
शम्बरो नरको बाणो मय्येव कृतसौहृदाः ।
तैरहं सुरपक्षीयान् हत्वा भोक्ष्ये महीं नृपान् ॥ ३६ ॥
शंबरा नरको बाण हे तो मित्रचि सर्व ही । सहाय्ये त्या तयांच्या मी मारीन अन्य भूपती ॥ ३६ ॥
शम्बरः - शंबर - नरकः - नरक - बाणः - बाण - मयि एवकृतसौहृदाः (सति) - माझ्या ठिकाणीच केली आहे मैत्री ज्यांनी असे आहेत - अहं - मी - तैः - त्यांच्या योगाने - सुरपक्षीयान्नृपान् हत्वा - देवांच्या पक्षाला असलेल्या राजांना मारून - महीं भोक्ष्ये - पृथ्वी उपभोगीन. ॥३६॥
शंबरासुर, नरकासुर आणि बाणासुर यांची तर माझ्याशीच मैत्री आहे. या सर्वांच्या साहाय्याने मी देवांचे पक्षपाती असणार्या राजांना मारून पृथ्वीचे राज्य भोगीन. (३६)
एतज्ज्ञात्वाऽनय क्षिप्रं रामकृष्णाविहार्भकौ ।
धनुर्मखनिरीक्षार्थं द्रष्टुं यदुपुरश्रियम् ॥ ३७ ॥
गुप्त मी वदलो सारे पोरांना आणणे त्वरे । बघाया धनुयज्ञाते चला हे एवढे वदा ॥ ३७ ॥
एतत् ज्ञात्वा - हे जाणून - अर्भकौ रामकृष्णौ - बालवयाच्या अशा त्या राम व कृष्णांना - धनुर्मखनिरीक्षार्थं - धनुर्याग पाहण्यासाठी - यदुपुरश्रियं द्रष्टु - यादवांच्या नगरीची शोभा पाहण्यासाठी - क्षिप्रं इह आनय - लवकर येथे आण. ॥३७॥
हे लक्षात घेऊन बालक बलराम-कृष्णांना येथे लवकर घेऊन ये. त्यांना फक्त एवढेच सांग की, "त्यांनी धनुष्य यज्ञ आणि मथुरेचे वैभव पाहाण्यासाठी येथे यावे." (३७)
श्रीअक्रूर उवाच -
राजन् मनीषितं सध्र्यक् तव स्वावद्यमार्जनम् । सिद्ध्यसिद्ध्योः समं कुर्याद् दैवं हि फलसाधनम् ॥ ३८ ॥
अक्रूरजी म्हणाले - राजे हो इच्छिता मृत्यू टाळणे योग्य ते असे । समभावेचि बागावे दैवाने फळ लाभते ॥ ३८ ॥
राजन् - हे राजा - स्वावद्यमार्जनं - स्वतःच्या मृत्यूचा निरास करणारा - तव (एतत्) मनीषितं सध्य्रक् (अस्ति) - असा तुझा हा विचार चांगला आहे - सिद्ध्यसिद्ध्योः - जय किंवा पराजय यांविषयी - समं (भावं) कुर्यात् - सारखीच बुद्धि ठेवावी - हि - कारण - दैवं (एव) फलसाधनं (अस्ति) - दैव हेच फल देणारे आहे. ॥३८॥
अक्रूर म्हणाला- महाराज ! आपण आपल्यावरील अरिष्ट दूर करू इच्छिता म्हणून आपला हा विचार योग्यच आहे. पण यशापयशाबद्दल समभाव ठेवून माणसाने आपले कर्तव्य करावे. फळ मिळणे हे दैवाच्या अधीन आहे. (३८)
मनोरथान् करोत्युच्चैः जनो दैवहतानपि ।
युज्यते हर्षशोकाभ्यां तथाप्याज्ञां करोमि ते ॥ ३९ ॥
मनाचे बांधिता पूल नष्टिते दैव त्यास की । सुखलाभीं न हो दुःख मी तो आज्ञाचि पाळितो ॥ ३९ ॥
जनः - मनुष्य - उच्चैःमनोरथान् करोति - मोठमोठे मनातील बेत करीत असतो - (तान्) दैवहतान् (अपि पश्यति) - ते दैवाने हाणून पाडिलेलेहि पाहतो - (सः) हर्षशोकाभ्यां युज्यते - तो हर्ष आणि शोक यांनी युक्त होत असतो - तथा अपि - तरी सुद्धा - तेआज्ञां करोमि - मी तुझी आज्ञा पाळितो. ॥३९॥
मनुष्य मोठमोठे मनोरथ करतो, परंतु दैवामुळे ते सफल होत नाहीत. याचमुळे माणसाला कधी आनंद तर कधी दुःख होते. असे असून सुद्धा मी आपल्या आज्ञेचे पालन करीन. (३९)
श्रीशुक उवाच -
एवमादिश्य चाक्रूरं मन्त्रिणश्च विषृज्य सः । प्रविवेश गृहं कंसः तथाक्रूरः स्वमालयम् ॥ ४० ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे पूर्वार्धे अक्रूरसंप्रेषणं नाम षट्त्रिंशोऽध्यायः ॥ ३६ ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
श्रीशुकदेव सांगतात - अक्रूरां आणि मंत्र्यांना कंसे आज्ञा दिली अशी । महाली कंस तो गेला अक्रूर आपुल्या घरा ॥ ४० ॥ ॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर छत्तिसावा अध्याय हा ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
एवं अक्रूरं आदिश्य - याप्रमाणे अक्रूराला आज्ञा करून - च - आणि - मन्त्रिणः विसृज्य - मंत्र्यांना निरोप देऊन - सः कंसः (स्वं) गृहं प्रविवेश - तो कंस आपल्या घरात शिरला - तथा - तसाच - अक्रूरः (अपि) स्वं आलयं (प्रविवेश) - अक्रूरहि आपल्या घरी गेला. ॥४०॥
श्रीशुक म्हणतात - कंसाने मंत्री आणि अक्रूरांना अशी आज्ञा करून सर्वांना निरोप दिला. त्यानंतर तो आपल्या महालात आला आणि अक्रूर आपल्या घरी परतला. (४०)
अध्याय छत्तिसावा समाप्त |