|
श्रीमद् भागवत पुराण
अजगरमुखात् अनन्दस्य मोचनम्, सुदर्शन आणि शंखचूड यांचा उद्धार - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् ) एकदा देवयात्रायां गोपाला जातकौतुकाः । अनोभिरनडुद्युक्तैः प्रययुस्तेऽम्बिकावनम् ॥ १ ॥
( अनुष्टुप् ) श्रीशुकदेव सांगतात - एकदा शिवरात्रीस नंदगोपादि उत्सुके । अंबिकावन यात्रेसी बैलगाड्यात पातले ॥ १ ॥
एकदा - एके दिवशी - देवयात्रायां जातकौतुकाः - देवाच्या यात्रेविषयी झाली आहे इच्छा ज्यांना असे - ते गोपालाः - ते गोप - अनडुद्युक्तैः अनोभिः - बैल जुंपिलेल्या गाडयांनी - अम्बिकावनं प्रययुः - अंबिकेच्या वनात गेले. ॥१॥
श्रीशुकाचार्य म्हणतात - एकदा गोपाल शिवरात्रीच्या उत्सवाच्या वेळी जत्रा पाहण्याच्या कुतूहलाने बैलगाड्यांत बसून अंबिकावनात गेले. (१)
तत्र स्नात्वा सरस्वत्यां देवं पशुपतिं विभुम् ।
आनर्चुरर्हणैर्भक्त्या देवीं च नृपतेऽम्बिकाम् ॥ २ ॥
सरस्वती नदी मध्ये केले सर्वेचि स्नान तैः । पूजिली भक्तिने अंबा शिवहि विधिपूर्वक ॥ २ ॥
नृप - हे राजा - ते - ते - तत्र - त्याठिकाणी - सरस्वत्यां स्नात्वा - सरस्वती नदीत स्नान करून - देवं विभुं पशुपतिम् - तेजस्वी व सर्वशक्तिमान अशा शंकराला - च - आणि - देवीं आम्बिकां - देवी अंबिकेला - अर्हणैः - पूजासाहित्यांनी - भक्त्या आनर्चुः - भक्तीने पूजिते झाले. ॥२॥
राजन ! तेथे सर्वांनी सरस्वती नदीमध्ये स्नान केले आणि भगवान शंकरांचे व भगवती अंबिकादेवीचे भक्तीभावाने अनेक प्रकारच्या पूजासाहित्याने पूजन केले. (२)
विवरण :- गोपांनी अंबिकावनात जाऊन शिव व पार्वती यांची पूजा केली. शिवाचे भक्त ते शैव व विष्णूचे वैष्णव. या दोनहि भक्तांमध्ये आपापल्या दैवतांवरून सतत वादविवाद होत असतात. शैवांना शिव हा विष्णूपेक्षा श्रेष्ठ वाटतो आणि वैष्णवांना विष्णू. मात्र हे सर्व सध्याच्या काळातील आणि मानवनिर्मित वाद आहेत. वास्तविक विष्णू-कृष्ण एकच. म्हणजेच गोप हेही वैष्णवच. परंतु त्यांनी शिव-पार्वतीची पूजा केली. खरा परमेश्वर एकच असून बाकी फक्त त्याची वेगवेगळी रूपे आहेत हे त्या तथाकथित निरक्षर गोपांनाहि माहीत होते, मात्र हेच भान कटटर पंथीयांना आजच्या काळातही नसते, हे विशेष. (२)
गावो हिरण्यं वासांसि मधु मध्वन्नमादृताः ।
ब्राह्मणेभ्यो ददुः सर्वे देवो नः प्रीयतामिति ॥ ३ ॥
आदरे गायि सोने नी वस्त्र अन्नादि दान ते । द्विजांना दिधले श्रद्ध्ये शंकरो पावण्या तदा ॥ ३ ॥
आदृताः (ते) सर्वे - आदरयुक्त झालेले ते सर्व लोक - देवः नः प्रीयतां - देव आपल्यावर संतुष्ट व्हावा - इति - म्हणून - ब्राह्मणेभ्यः - ब्राह्मणांना - गावः हिरण्यवासांसि - गाई, सुवर्ण, वस्त्रे - मधु मध्वन्नं च - आणि गोड असे मधमिश्रित अन्न - ददुः - देते झाले. ॥३॥
तेथे त्यांनी आदरपूर्वक गाई, सोने, वस्त्रे, मध आणि मधुर अन्न भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न व्हावेत, म्हणून ब्राह्मणांना दान दिले. (३)
ऊषुः सरस्वतीतीरे जलं प्राश्य यतव्रताः ।
रजनीं तां महाभागा नन्दसुनन्दकादयः ॥ ४ ॥
त्या दिनी नंदबाबानी नी गोपांनी उपवासिले । सर्व ते जल पीवोनी झोपले नदिच्या तटी ॥ ४ ॥
धृतव्रताः - धरिले आहे व्रत ज्यांनी - महाभागाः - असे महाभाग्यवान - नन्दसुनन्दकादयः (गोपालाः) - नंद, सुनंद इत्यादि गोप - जलं प्राश्य - पाणी पिऊन - तां रजनीं - त्या रात्री - सरस्वतीतीरे - सरस्वती नदीच्या तीरावर - ऊषुः - राहिले. ॥४॥
नंदसुनंद इत्यादी गोपांनी त्यादिवशी शिवरात्रीचा उपवास होता, म्हणून फक्त पाणी पिऊन ते रात्रीच्या वेळी सरस्वती नदीच्या तीरावर झोपी गेले. (४)
कश्चिन्महानहिस्तस्मिन् विपिनेऽतिबुभुक्षितः ।
यदृच्छयाऽऽगतो नन्दं शयानमुरगोऽग्रसीत् ॥ ५ ॥
अजगरो वनि त्या थोर भुकेला एक त्या तिथे । दैवाने पातला तेणे धरिले नंदाजीस की ॥ ५ ॥
तस्मिन् विपिने - त्या अरण्यात - अतिबुभुक्षितः - अत्यंत भुकेलेला - यदृच्छया आगतः उरगः - सहजी आलेला उराने सरपटत जाणारा - कश्चित् महान् अहिः - कोणी एक मोठा सर्प - शयानं नन्दं अग्रसीत् - निजलेल्या नंदाला गिळता झाला. ॥५॥
त्या वनामध्ये एक अत्यंत भयानक असा अतिशय भुकेलेला अजगर दैवयोगाने तेथे आला आणि झोपी गेलेल्या नंदांना गिळू लागला. (५)
स चुक्रोशाहिना ग्रस्तः कृष्ण कृष्ण महानयम् ।
सर्पो मां ग्रसते तात प्रपन्नं परिमोचय ॥ ६ ॥
तदा ओरडुनी नंद वदले कृष्ण कृष्ण रे । वाचवी संकटातून धाव हा गिळितो पहा ॥ ६ ॥
अहिना ग्रस्तः सः - सर्पाने गिळलेला तो - कृष्णकृष्ण - हे कृष्णा हे कृष्णा - अयं महान् अहिः मां ग्रसते - हा मोठा सर्प मला गिळीत आहे - तात - हे बाळा - (त्वां) प्रपन्नं (मां) परिमोचय - तुला शरण आलेल्या मला सोडव - (इति) चुक्रोश - असे ओरडला. ॥६॥
अजगराने गिळायला लागताच नंद ओरडू लागले- " बाळा कृष्णा ! कृष्णा ! धाव, धाव ! पहा पुत्रा ! हा अजगर मला गिळून टाकू लागला आहे. मला तुझाच आधार आहे. मला या संकटातून वाचव." (६)
तस्य चाक्रन्दितं श्रुत्वा गोपालाः सहसोत्थिताः ।
ग्रस्तं च दृष्ट्वा विभ्रान्ताः सर्पं विव्यधुरुल्मुकैः ॥ ७ ॥
गेले घाबरुनी सारे नंदांना तो न सोडिता । जळत्या लाकडे त्याला गोप ते मारु लागले ॥ ७ ॥
तस्य आक्रन्दितं श्रुत्वा सहसा उत्थिताः - त्याचे ओरडणे ऐकून एकाएकी उठलेले - च - आणि - (तं) ग्रस्तं दृष्ट्वा बिभ्रान्ताः - त्याला गिळलेला पाहून घाबरलेले असे - (ते) गोपालाः - ते गोप - उल्मुकैः (तं) सर्पं विव्यधुः - कोलितांनी त्या सर्पाला टोचिते झाले. ॥७॥
नंदांचे ओरडणे ऐकून गोप एकदम उठून उभे राहिले आणि अजगराच्या तोंडात त्यांना पाहून घाबरले. त्याचवेळी पेटलेल्या कोलितांनी ते त्या अजगराला मारू लागले. (७)
अलातैर्दह्यमानोऽपि नामुञ्चत् तं उरङ्गमः ।
तमस्पृशत् पदाभ्येत्य भगवान् सात्वतां पतिः ॥ ८ ॥
ऐसेही मारिता त्याला तरीहि नच सोडि की । भक्तवत्सल तो कृष्ण येऊन पाय लाविता ॥ ८ ॥
उरङगमः - सर्प - अलातैः दह्यमानः अपि - कोलितांनी पोळला जात असतांहि - तं न अमुञ्चत् - त्याला सोडता झाला नाही - भगवान सात्वतां पतिः - भगवान श्रीकृष्ण - अभ्येत्य - जवळ जाऊन - तं पदा अस्पृशत् - त्याला पायाने स्पर्श करिता झाला. ॥८॥
परंतु कोलितांनी भाजूनसुद्धा अजगराने त्यांना सोडले नाही. इतक्यात भक्तवत्सल भगवान श्रीकृष्ण तेथे पोहोचले आणि त्यांनी आपल्या चरणाने अजगराला स्पर्श केला. (८)
स वै भगवतः श्रीमत् पादस्पर्शहताशुभः ।
भेजे सर्पवपुर्हित्वा रूपं विद्याधरार्चितम् ॥ ९ ॥
भगवत्पद स्पर्शाने सर्पाचे पाप संपले । विद्याधरार्चितो रूप सुंदरो सर्प जाहला ॥ ९ ॥
भगवतः - श्रीकृष्णाच्या सुंदर अशा - श्रीमत्पादस्पर्शाहताशुभः - पायाच्या स्पर्शाने नष्ट झाली आहेत पातके ज्याची असा - सः - तो - सर्पवपुः हित्वा - सर्प शरीर टाकून - विद्याधरार्चितं रूपं भेजे - विद्याधरांनी पूजिलेले असे रूप धरिता झाला. ॥९॥
भगवंतांच्या पवित्र चरणाचा स्पर्श होताच अजगराचे सर्व पाप नष्ट झाले आणि त्याच क्षणी अजगराचे शरीर सोडून त्याने विद्याधरांनी पूजावे, असे सुंदर रूप घेतले. (९)
तमपृच्छद् हृषीकेशः प्रणतं समवस्थितम् ।
दीप्यमानेन वपुषा पुरुषं हेममालिनम् ॥ १० ॥
दिव्यज्योती तया अंगी सोन्याचे हार ते गळा । कृष्णाला नमिले त्याने कृष्णाने पुसले तया ॥ १० ॥
हृषीकेशः - श्रीकृष्ण - दीप्यमानेन वपुषा समुपस्थितम् - तेजस्वी अशा शरीराने पुढे उभा राहिलेल्या - प्रणतम् - अत्यंत नम्र झालेल्या - हेममालिनं - सोन्याच्या माळा धारण करणार्या - तं पुरुषं - त्या पुरुषाला - अपृच्छत् - विचारिता झाला. ॥१०॥
त्या देदीप्यमान पुरुषाने सोन्याचा हार घातला होता. भगवंतांना प्रणाम करून तो जेव्हा हात जोडून त्यांच्यासमोर उभा राहिला, तेव्हा त्यांनी त्याला विचारले. (१०)
को भवान् परया लक्ष्म्या रोचतेऽद्भुतदर्शनः ।
कथं जुगुप्सितामेतां गतिं वा प्रापितोऽवशः ॥ ११ ॥
कोण तू हे तुझ्या अंगी सौंदर्य पसरे कसे । निंदनीय अशी योनी मिळाली तुजला कशी ॥ ११ ॥
(यः) परया लक्ष्म्या रोचते - जो श्रेष्ठ अशा सौंदर्याने शोभत आहे - अद्भुतदर्शनः - आश्चर्यकारक आहे स्वरूप ज्याचे असा - भवान् कः (अस्ति) - तू कोण आहेस - वा - आणि - अवशः (सन्) - पराधीन होऊन - जुगुप्सितां एतां गतिम् - निंद्य अशा या स्थितीला - कथं प्रापितः - कसा नेला गेलास. ॥११॥
तू कोण आहेस ? अतिशय सौंदर्याने झळकणारा तू दिसण्यात अद्भुत आहेस. ही किळसवाणी अजगरयोनी तुला कशी काय प्राप्त झाली ? इच्छेविरुद्धच तुला या योनीत यावे लागले असेल. (११)
विवरण :- भगवंताच्या पदस्पर्शाने अजगराचे रूपांतर रूपसुंदर विद्याधरात झाले. तेव्हा 'हे शुभदर्शना, तू कोण ?' असा प्रश्न कृष्णाने त्यास विचारला. वास्तविक कृष्ण सर्वज्ञ. त्याला ते कळले नसावे का ? पण आपल्या सर्वज्ञतेबद्दल विद्याधराला समजले, तर तो मोकळेपणाने बोलणार नाही असे कृष्णास वाटले असावे. शिवाय त्याने विद्याधराला 'सुदर्शन' ऐवजी 'शुभदर्शन' असे संबोधले. कृष्णाला सौंदर्यापेक्षा मांगल्याबद्दलचीच अधिक ओढ होती, त्याच्या दृष्टीने सौंदर्यापेक्षा, बाह्य गोष्टीपेक्षा आंतरिक सौंदर्य महत्त्वाचे होते हे दिसून येते. (११)
सर्प उवाच -
अहं विद्याधरः कश्चित् सुदर्शन इति श्रुतः । श्रिया स्वरूपसम्पत्त्या विमानेनाचरं दिशः ॥ १२ ॥
मी तो विद्याधरो नामे सुदर्शन नि लक्ष्मिवान् । सौंदर्य बहु ते माझे विमानी तैं फिरे सदा ॥ १२ ॥
अहं - मी - सुदर्शनः इति विश्रुतः - सुदर्शन या नावाने प्रसिद्ध असलेला - कश्चित् विद्याधरः (अस्मि) - कोणी एक विद्याधर आहे - श्रिया स्वरूपसम्पत्या (उपलक्षितः) - धनाने व स्वरूपाच्या सौंदर्याने युक्त असा - विमानेन दिशः आचरन् - विमानाने सर्व दिशांनी फिरणारा ॥१२॥
अजगराच्या शरीरातून निघालेला पुरुष म्हणाला - भगवन ! मी पूर्वी सुदर्शन नावाचा एक विद्याधर होतो. मी अत्यंत सुंदर तर होतोच, शिवाय माझ्याजवळ संपत्तीही पुष्कळ होती. त्यामुळे मी विमानात बसून दिशा-दिशांना फिरत असे. (१२)
ऋषीन् विरूपाङ्गिरसः प्राहसं रूपदर्पितः ।
तैरिमां प्रापितो योनिं प्रलब्धैः स्वेन पाप्मना ॥ १३ ॥
कुरूप अंगिरा गोत्री तयां गर्वेचि हासलो । तयांनी शापिता सर्प योनी ही मज लाभली ॥ १३ ॥
रूपदर्पितः (सन्) - रूपाने गर्वयुक्त होत्साता - विरूपान् अङगिरसः ऋषीन् - रूपहीन अशा अंगिरस ऋषींना - प्राहसम् - हसलो - प्रलब्धैः तैः - निंदिलेल्या त्याजकडून - स्वेन पाप्मना - स्वतःच्या पापामुळे - इमां योनिं प्रापितः (अस्मि) - ह्या योनीला आणिला गेलो. ॥१३॥
एके दिवशी मी अंगिरा गोत्राच्या कुरूप ऋषींना पाहिले. मला माझ्या सौंदर्याचा गर्व असल्याने मी त्यांना हसलो. माझ्या या कुचेष्टेमुळे रागावून त्यांनी मला अजगर योनीत जाण्याचा शाप दिला. हे माझ्याच पापाचे फळ होते. (१३)
शापो मेऽनुग्रहायैव कृतस्तैः करुणात्मभिः ।
यदहं लोकगुरुणा पदा स्पृष्टो हताशुभः ॥ १४ ॥
अनुग्रहा मला त्यांनी कृपेने शापिले असे । जगद्गुरो तुझे पाय तेणेचि लाभले मला ॥ १४ ॥
करुणात्मभिः तैः - दयाळू आहे अंतःकरण ज्यांचे अशा त्यांनी - (मम) अनुग्रहाय एव - माझ्यावर कृपा करण्यासाठीच - मे शापः कृतः - मला शाप दिला - यत् - कारण - लोकगुरुणा (त्वया) - सर्व लोकांचा गुरु अशा तुझ्याकडून - पदा स्पृष्टः अहं - पायाने स्पर्शिला गेलेला मी - हताशुभः (अभवम्) - नाहीशी झाली आहेत पातके ज्याची असा झालो. ॥१४॥
माझ्यावर कृपा करण्यासाठीच त्या कृपाळू ऋषींनी मला शाप दिला होता; कारण त्या शापामुळेच आज चराचराचे गुरु असलेल्या आपण स्वतः आपल्या चरणाने मला स्पर्श केला. त्यामुळे माझे सर्व पाप नाहीसे झाले. (१४)
तं त्वाहं भवभीतानां प्रपन्नानां भयापहम् ।
आपृच्छे शापनिर्मुक्तः पादस्पर्शादमीवहन् ॥ १५ ॥
नासले पाप ते सर्व करिशी भयमुक्त तू । मुक्त मी जाहलो स्पर्शे स्वलोका संमती मिळे ॥ १५ ॥
अमीवहन् - हे पापनाशका श्रीकृष्णा - (तव) पादस्पर्शात् - तुझ्या पायाच्या स्पर्शामुळे - शापानिर्मुक्तः अहम् - शापातून मुक्त झालेला मी - भवभीतानां प्रपन्नानाम् (भूतानां) - संसाराला भिऊन शरण आलेल्या प्राण्यांचे - भयापहं त्वा - भय नाहीसे करणार्या तुला - आपृच्छ - अनुज्ञा विचारितो. ॥१५॥
सर्व पापांचा नाश करणार्या हे प्रभो ! जे लोक जन्म-मृत्यूरूप संसाराला भिऊन आपल्या चरणांना शरण जातात, त्यांना आपण सर्व भयांपासून मुक्त करता. आपल्या श्रीचरणस्पर्शाने मी शापातून मुक्त झालो आहे. आता आपल्या लोकी जाण्यासाठी मी आपला निरोप घेतो. (१५)
प्रपन्नोऽस्मि महायोगिन् महापुरुष सत्पते ।
अनुजानीहि मां देव सर्वलोकेश्वरेश्वर ॥ १६ ॥
भक्तवत्सल तू योगी पातलो शरणार्थ मी । लोकलोकेश्वरो ईशा द्यावी आज्ञा मला तशी ॥ १६ ॥
महायोगिन् - हे महायोग्या - महापुरुष - महापुरुषा - सत्पते - हे सज्जनांच्या पालका - अहं प्रपन्नः अस्मि - मी शरण आलो आहे - देवः - हे देवा - सर्वलोकेश्वरेश्वर - हे सर्व लोकांतील ईश्वरांच्याहि ईश्वरा - मां अनुजानीहि - मला अनुज्ञा दे. ॥१६॥
हे भक्तवत्सला ! महायोगेश्वर पुरुषोत्तमा ! मी आपल्याला शरण आलो आहे. इंद्रादी समस्त लोकेश्वरांच्या परमेश्वरा ! स्वयंप्रकाशा ! मला अनुमती द्यावी. (१६)
ब्रह्मदण्डाद् विमुक्तोऽहं सद्यस्तेऽच्युत दर्शनात् ।
यन्नाम गृह्णन्नखिलान् श्रोतॄनात्मानमेव च । सद्यः पुनाति किं भूयः तस्य स्पृष्टः पदा हि ते ॥ १७ ॥
ब्रह्मशापा मधोनीया स्पर्शाने मुक्त जाहलो । नाम ते ऐकता गाता पावित्र्य मिळते त्वरे ॥ १७ ॥
अच्युत - हे श्रीकृष्णा - अहं - मी - ते दर्शनात् - तुझ्या दर्शनामुळे - सद्यः - तत्काळ - ब्रह्मदण्डात् विमुक्तः (अस्मि) - ब्राह्मणाच्या शापापासून मुक्त झालो आहे - यन्नाम गृण्हन् (मनुष्यः) - ज्याचे नाव घेणारा मनुष्य - आत्मानं - स्वतःला - च - आणि - अखिलान् श्रोतृन् एव - सर्व श्रोत्यांनाही - सद्यः पुनाति - तत्काळ पवित्र करतो - तस्य ते पदा स्पृष्टः हि (अहं) - त्या तुझ्या पायाने खरोखर स्पर्शिलेला मी - किं भूयः (वक्तव्यम्) - काय पुनः सांगावयास पाहिजे. ॥१७॥
हे अच्युता ! आपल्या केवळ दर्शनानेच मी ब्राह्मणांच्या शापातून तत्काळ मुक्त झालो. जो मनुष्य आपल्या नामांचे उच्चारण करतो, तो स्वतःला आणि सर्व श्रोत्यांनासुद्धा ताबडतोब पवित्र करतो. तर मग आपल्या श्रीचरणांचा साक्षात स्पर्श झालेल्या माझ्याबद्दल काय सांगावे ? (१७)
इत्यनुज्ञाप्य दाशार्हं परिक्रम्याभिवन्द्य च ।
सुदर्शनो दिवं यातः कृच्छ्रात् नन्दश्च मोचितः ॥ १८ ॥
सुदर्शने असे कृष्णा स्तवोनी नमिलो पुन्हा । परीक्रमा करोनीया स्वलोकी पातला असे । संकटी या परी कृष्णे पित्याला सोडवीयले ॥ १८ ॥
इति - याप्रमाणे - दाशार्हं अनुज्ञाप्य - श्रीकृष्णाचा निरोप घेऊन - (तं) परिक्रम्य - त्याला प्रदक्षिणा घालून - च - आणि - अभिवंद्य - नमस्कार करून - सुदर्शनः दिवं यातः - सुदर्शन स्वर्गास गेला - च - आणि - नन्दः कृच्छ्रात् मोचितः - नंद संकटापासून सोडविला गेला. ॥१८॥
सुदर्शनाने श्रीकृष्णांना प्रदक्षिणा घालून नमस्कार केला. नंतर त्यांची आज्ञा घेऊन तो स्वर्गात गेला आणि नंदानाही या संकटातून सोडवले. (१८)
( वंशस्था )
निशाम्य कृष्णस्य तदात्मवैभवं व्रजौकसो विस्मितचेतसस्ततः । समाप्य तस्मिन् नियमं पुनर्व्रजं नृपाययुस्तत् कथयन्त आदृताः ॥ १९ ॥
( इंद्रवज्रा ) कृष्णप्रभावा बघताच नंद स्तिमीत झाले मग गोप सारे । व्रतास तेथे करुनीहि पूर्ण ते गाता लीला व्रजि पातले की ॥ १९ ॥
नृप - हे राजा - ततः - मग - कृष्णस्य तत् आत्मवैभवं निशाम्य - श्रीकृष्णाचे ते स्वतःचे सामर्थ्य पाहून - विस्मितचेतसः - आश्चर्याने युक्त आहेत मने ज्यांची - व्रजौकसः - असे झालेले गोकुळवासी लोक - नियमं समाप्य - व्रत संपवून - तस्मिन् आदृताः - त्याच्या ठिकाणी आदरयुक्त झालेले - तत् कथयन्तः - ते वर्णन करीत - पुनः व्रजं आययुः - पुनः गोकुळास आले. ॥१९॥
राजन ! व्रजवासियांनी जेव्हा श्रीकृष्णांचा हा अद्भुत प्रभाव पाहिला तेव्हा ते विस्मयचकित झाले. त्या क्षेत्रातील धार्मिक विधि पूर्ण करून अतिशय आदरपूर्वक श्रीकृष्णांच्या या लीलेविषयीच बोलत ते पुन्हा व्रजामध्ये परतले. (१९)
( अनुष्टुप् )
कदाचिदथ गोविन्दो रामश्चाद्भुतविक्रमः । विजह्रतुर्वने रात्र्यां मध्यगौ व्रजयोषिताम् ॥ २० ॥
( अनुष्टुप् ) एकदा रात्रिच्या वेळी गोविंद बलराम तो । गोपिकां सह ते गेले वना माजी विहारण्या ॥ २० ॥
अथ - नंतर - कदाचित् - एकदा - अद्भुतविक्रमः - आश्चर्यकारक आहे पराक्रम ज्यांचा - रामः गोविन्दः च - असे बळराम व श्रीकृष्ण - व्रजयोषितां मध्यगौ (भूत्वा) - गोकुळवासी स्त्रियांमध्ये जाऊन - रात्र्यां - रात्रीच्या वेळी - वने विजह्रतुः - वनात विहार करते झाले. ॥२०॥
एके दिवशी अलौकिक कर्म करणारे श्रीकृष्ण आणि बलराम रात्रीच्या वेळी गोपींसह वनामध्ये विहार करीत होते. (२०)
उपगीयमानौ ललितं स्त्रीजनैर्बद्धसौहृदैः ।
स्वलङ्कृतानुलिप्ताङ्गौ स्रग्विनौ विरजोऽम्बरौ ॥ २१ ॥
भगवद्वस्त्र ते पीत बल ते नील नेसला । गंधीत उटि अंगाला गळीं माळा नि दागिने । राग दारीत गोपी त्या लीलाही गाउ लागल्या ॥ २१ ॥
बद्धसौहृदैः स्त्रीजनैः - बांधिले आहे प्रेम ज्यांनी अशा स्त्रियांकडून - ललितं उपगीयमानौ - मनोहर रीतीने गायिले जाणारे - स्वलङ्कृतानुलिप्ताङगौ - अलंकार धारण केलेली व उटयांनी माखलेली आहेत शरीरे ज्यांची असे - स्रग्विणौ - माळा धारण केलेले - विरजाऽम्बरौ - निर्मळ आहेत वस्त्रे ज्यांची असे. ॥२१॥
निर्मळ वस्त्रे परिधान करून, गळ्यांमध्ये फुलांचे हार घातलेले, शरीराला सुगंधी चंदन लावलेले व सुंदर अलंकार धारण केलेले असे जे राम-कृष्ण त्यांच्या गुणांचे गोपी प्रेमाने आणि आनंदाने गोड स्वरात गायन करीत होत्या. (२१)
निशामुखं मानयन्तौ उदितोडुपतारकम् ।
मल्लिकागन्धमत्तालि जुष्टं कुमुदवायुना ॥ २२ ॥
सायंकाळ जशी झाली पडले चांदणे तसे । वेलीत गुंजती भृंग कौमुदी गंध दर्वळे ॥ २२ ॥
उदितोडुपतारकं - उदय पावला आहे नक्षत्र नायक चंद्र आणि तारे ज्यामध्ये अशा - मल्लिकागन्धमतालिजुष्टं - मोगर्यांच्या सुवासाने माजलेल्या भुंग्यांनी सेविलेल्या - कुमुदवायुना (युक्तं) - कमळांवरील वार्याने युक्त असलेल्या - निशामुखं मानयन्तौ - संध्याकालचे गौरवयुक्त वर्णन करीत. ॥२२॥
तिन्हीसांज झाली होती. आकाशात चंद्र-तारे उगवू लागले होते. मोगर्याच्या सुगंधाने धुंद होऊन भुंगे इकडे तिकडे फिरत होते. आणि कमलपुष्पांचा सुगंध घेऊन वारा वाहात होता. (२२)
जगतुः सर्वभूतानां मनःश्रवणमङ्गलम् ।
तौ कल्पयन्तौ युगपत् स्वरमण्डलमूर्च्छितम् ॥ २३ ॥
कृष्ण रामे मिळोनीया आलापिलाहि राग तो । तान ती ऐकुनी जीव आनंदे भरले पहा ॥ २३ ॥
युगपत्स्वरमण्डलमूर्छितम् कल्पयन्तौ - एकाच वेळी स्वरसमूहांचा आरोहावरोह योजणारे - तौः - ते दोघे - सर्व भूतानां मनःश्रवणमङगलं - सर्व प्राण्यांच्या मनाला व कानांना मंगलकारक असे - जगतुः - गाते झाले. ॥२३॥
त्यावेळी त्या सर्वांचा आनंद लुटत राम-कृष्णांनी मिळून स्वरांच्या चढ-उतारांसह अतिशय सुंदर राग आळविला. जगातील सर्व प्राण्यांच्या मनाला आणि कानांना तो भरभरून आनंद देत होता. (२३)
गोप्यस्तद्गीतमाकर्ण्य मूर्च्छिता नाविदन् नृप ।
स्रंसद् दुकूलमात्मानं स्रस्तकेशस्रजं ततः ॥ २४ ॥
गायने मोहिल्या गोपी न शुद्ध राहिली तयां । विस्कटे केश नी वस्त्र अवस्था जाहली अशी ॥ २४ ॥
नृप - हे राजा - गोप्यः - गोपी - तत् गीतं आकर्ण्य - ते गाणे ऐकून - मूर्छिताः - मोहित झाल्या - ततः - त्यामुळे - स्रंसद्दुकूलं - गळत आहे रेशमी वस्त्र ज्यांचे अशा - स्रस्तकेशस्रजं - गळून पडला आहे केसावरील गजरा ज्यांच्या अशा - आत्मानं - स्वतःला - न अविन्दन् - जाणत्या झाल्या नाहीत. ॥२४॥
त्यांचे हे गायन ऐकून गोपी बेभान झाल्या. परीक्षिता ! त्यांना आपल्या शरीराचीसुद्धा शुद्ध राहिली नाही आणि त्यावरून निसटणारी वस्त्रे आणि वेण्यातून गळणारी फुले याचेही त्यांना भान नव्हते. (२४)
एवं विक्रीडतोः स्वैरं गायतोः सम्प्रमत्तवत् ।
शङ्खचूड इति ख्यातो धनदानुचरोऽभ्यगात् ॥ २५ ॥
तल्लीन गात ते तेंव्हा वना माजी विहारता । पातला शंखचूडॊ जो कुबेरीभृत्य यक्ष तो ॥ २५ ॥
एवं तयोः विक्रीडतोः - याप्रमाणे ते दोघे क्रीडा करीत असता - संप्रमत्तवत् स्वैरं गायतोः - उन्मत्तासारखे स्वैरपणे गात असता - शंखचूडः इति ख्यातः - शंखचूड नावाने प्रसिद्ध असलेला - धनदानुचरः - कु्बेराचा सेवक - अभ्यगात् - जवळ आला. ॥२५॥
हे दोघे भाऊ ज्यावेळी अशा प्रकारे स्वैरपणे विहार करीत होते आणि धुंद होऊन गात होते, त्याचवेळी तेथे शंखचूड नावाचा एक यक्ष आला. तो कुबेराचा सेवक होता. (२५)
तयोर्निरीक्षतो राजन् तन्नाथं प्रमदाजनम् ।
क्रोशन्तं कालयामास दिश्युदीच्यामशङ्कितः ॥ २६ ॥
दोघे बंधूच पाहोनी निःशंके गोपि घेउनी । पळाला, रडती ध्याती हरिशी गोपि तेधवा ॥ २६ ॥
राजन् - हे राजा - अशङ्कितः (सः) - भीतिरहित असा तो - तयोः निरीक्षतोः - ते दोघे रामकृष्ण निरखून पाहत असता - तन्नाथं - तेच आहेत रक्षणकर्ते ज्याचे - क्रोशन्तं प्रमदाजनं - अशा आक्रोश करणार्या स्त्रीसमूहाला - उत्तरांदिशि - उत्तर दिशेकडे - कालयामास - पळविता झाला. ॥२६॥
परीक्षिता ! दोन्ही भावांच्या देखत निःसंकोचपणे त्या गोपींना घेऊन तो उत्तरेकडे निघून गेला. ज्यांचे स्वामी श्रीकृष्ण आहेत, त्या गोपी त्यावेळी मोठ्याने ओरडू लागल्या. (२६)
क्रोशन्तं कृष्ण रामेति विलोक्य स्वपरिग्रहम् ।
यथा गा दस्युना ग्रस्ता भ्रातरावन्वधावताम् ॥ २७ ॥
चोर गायी जसा नेई तसा प्रीयेस नेइ हा । पाहता धावले दोघे ऐकता हाक ती तशी ॥ २७ ॥
कृष्णराम - हे कृष्णा, हे बळरामा - इतिक्रोशन्तं स्वपरिग्रहं - असा आक्रोश करणार्या आपल्या स्त्रियांना - यथा दस्युना ग्रस्ताः गाः (तथा) - जशा वाघाने पीडिलेल्या गाई तशा - विलोक्य - पाहून - भ्रातरौ अन्वधावताम् - दोघे भाऊ धावले. ॥२७॥
एखाद्या चोराने गाईंना पळवावे, त्याप्रमाणे हा यक्ष आपल्या प्रिय गोपींना घेऊन चालला आहे आणि त्या ’हे कृष्ण ! हे राम !’ म्हणून मोठ्याने हाका मारीत आहेत, असे पाहून ते दोघेजण त्याचवेळी त्याच्यापाठोपाठ धावले. (२७)
मा भैष्टेत्यभयारावौ शालहस्तौ तरस्विनौ ।
आसेदतुस्तं तरसा त्वरितं गुह्यकाधमम् ॥ २८ ॥
शालवृक्ष करीं घेता न भ्यावे शब्द बोलले । वेगाने धावता गेले यक्षाला गाठिले असे ॥ २८ ॥
मा भैष्टइति - भिऊ नका असा - अभयारावौ - अभयाचा आहे शब्द ज्यांचा असे - शालहस्तौ - शालवृक्ष आहेत हातात ज्यांच्या असे - तरस्विनौ (तौ) - वेगाने जाणारे ते दोघे - तं त्वरितं गुह्यकाधमं - त्या पळणार्या दुष्ट यक्षाला - तरसा आसेदतुः - त्वरेने गाठते झाले. ॥२८॥
’भिऊ नका !’ असे म्हणून धीर देत, हातामध्ये सागवानाची झाडे घेऊन, अतिशय वेगाने, एका क्षणात ते त्या नीच यक्षाजवळ जाऊन पोहोचले. (२८)
स वीक्ष्य तावनुप्राप्तौ कालमृत्यू इवोद्विजन् ।
विषृज्य स्त्रीजनं मूढः प्राद्रवज्जीवितेच्छया ॥ २९ ॥
यक्षाने पाहिले दोघे कालमृत्यु असेचि ते । भिला नी सोडिल्या गोपी पळाला प्राणरक्षिण्या ॥ २९ ॥
कालमृत्यू इव - काळ व मृत्यू यांप्रमाणे - अनुप्राप्तौ तौ वीक्ष्य - मागून आलेल्या त्या दोघांना पाहून - (सः) मूढः - तो मूर्ख - उद्विजन् - भीतीने - स्त्रीजनं विसृज्य - स्त्रीसमूहाला सोडून - जीवितेच्छया प्राद्रवत् - प्राण वचविण्याच्या इच्छेने पळून गेला ॥२९॥
काळ आणि मृत्यू यांच्या समान असणारे हे दोघे आल्याचे पाहताच घाबरलेला तो मूर्ख, गोपींना तेथेच सोडून प्राण वाचविण्यासाठी पळू लागला. (२९)
तमन्वधावद्गोविन्दो यत्र यत्र स धावति ।
जिहीर्षुस्तच्छिरोरत्नं तस्थौ रक्षन्स्त्रियो बलः ॥ ३० ॥
बळीने रक्षिल्या स्त्रीया कृष्ण तो पाठिं धावला । चुडामणी शिरींचा तो काढण्या कृष्ण इच्छितो ॥ ३० ॥
तच्छिरोरत्नं - त्याच्या मस्तकावरील रत्न - जिहीर्षुः गोविन्दः - घेऊ इच्छिणारा श्रीकृष्ण - सः यत्र यत्र धावति - तो यक्ष ज्या ज्या ठिकाणी धावे - तं अन्वधावत् - त्याचा पाठलाग करीत धावला - बलः स्त्रियः रक्षन् तस्थौ - बळराम स्त्रियांचे रक्षण करण्यासाठी राहिला ॥३०॥
तेव्हा गोपींचे रक्षण करण्यासाठी बलराम तेथेच थांबले; परंतु श्रीकृष्ण मात्र जेथे जेथे तो जाई, तेथे तेथे त्याचा पाठलाग करीत पळत गेले. त्याच्या मस्तकावरील चूडामणी त्यांना काढून घ्यायचा होता. (३०)
अविदूर इवाभ्येत्य शिरस्तस्य दुरात्मनः ।
जहार मुष्टिनैवाङ्ग सहचूडमणिं विभुः ॥ ३१ ॥
थोडेसे पळता त्याचे चुडामणि सहीत ते । दुष्टचे तोडिले डोके हाताने पिरगाळुनी ॥ ३१ ॥
अङ्ग - हे राजा - विभुः - श्रीकृष्ण - अविदूरे इव अभ्येत्य - त्याला जवळच गाठून - मुष्टिना एव - एका मुटक्यानेच - तस्य दुरात्मनः - त्या दुष्टाचे - शिरः - मस्तक - जहार - हरण करिता झाला - (तेन) सह चूडामणिं च - आणि मस्तकासह त्यावरील रत्नहि ॥३१॥
जवळ जाताच भगवंतांनी त्याला पकडले आणि त्या दुष्टाच्या मस्तकावर जोराने एक ठोसा लगावून चूडामणीसह त्याचे मस्तक धडापासून वेगळे केले. (३१)
विवरण :- शंखचूडाच्या मस्तकावरील रत्न कृष्णाने खेचून काढले आणि ते बलरामास दिले. वास्तविक मणि-रत्नांचा मोह स्त्रियांना, मग ते एखाद्या गोपीस न देता बलरामास का दिले असावे ? कृष्णाचे हे कृत्य तर्कसंगतच. कारण त्याच्याभोवती अनेक गोपी होत्या, त्या सर्वच त्याला प्रिय. मग त्यांच्यापैकी कोणाला रत्न द्यावयाचे ? शिवाय, एकीला दिले की दुसरी रागावणार, म्हणून हे टाळण्यासाठी त्याने बलरामास दिले. (कृष्णाचे चातुर्य आणि मानसशास्त्राची असलेली जाण इथे दिसते.) (३१)
शङ्खचूडं निहत्यैवं मणिमादाय भास्वरम् ।
अग्रजायाददात् प्रीत्या पश्यन्तीनां च योषिताम् ॥ ३२ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे पूर्वार्धे शंखचूडवधोनाम चतुर्त्रिंशोऽध्यायः ॥ ३४ ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
कृष्णाने मारिला ऐसा शंखचूड तसा मणी । सतेज घेउनी आला बळीला अर्पिला तदा ॥ ३२ ॥ ॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर चौतिसावा अध्याय हा ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
कृष्णः - श्रीकृष्ण - योषितां पश्यन्तीनां - स्त्रिया पहात असता - शङ्खचूडं एवं निहत्य - शंखचूडाला अशा रीतीने ठार मारून - भास्वरं मणिं आदाय - तेजस्वी मणि घेऊन - प्रीत्या (तं) अग्रजाय अददत् - प्रेमाने तो वडील भावाला देता झाला ॥३२॥
अशा प्रकारे श्रीकृष्ण शंखचूडाला मारून तो चमकदार मणी घेऊन परत आले आणि तो, सर्व गोपींच्या देखतच मोठ्या प्रेमाने त्यांनी बलराम दादांना दिला. (३२)
अध्याय चौतिसावा समाप्त |