|
श्रीमद् भागवत पुराण महारासवर्णनं; परीक्षित्कृत शंकायाः शुकद्वारा समाधानं च - महारास - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् ) इत्थं भगवतो गोप्यः श्रुत्वा वाचः सुपेशलाः । जहुर्विरहजं तापं तदङ्गोपचिताशिषः ॥ १ ॥
( अनुष्टुप् ) श्रीशुकदेव सांगतात - ऐकता भगवत्शब्द गोपिंचा शेष तापही । मिटता अंगसंगाने साफल्य जाहले असे ॥ १ ॥
अंग - हे राजा - तत् (तदा) - त्यावेळी - भगवतः - भगवंताची - इत्थं सुपेशलाः - अशाप्रकारची अत्यंत मोहक - वाचः श्रुत्वा - अशी भाषणे ऐकून - उपचिताशिषः गोप्यः - वाढल्या आहेत इच्छा ज्यांच्या अशा गोपी - विरहजं तापं जहुः - वियोगामुळे झालेला ताप टाकित्या झाल्या. ॥१॥
श्रीशुकाचार्य म्हणतात - भगवंतांची ही मधुर वाणी ऐकून गोपींचा विरहजन्य ताप संपला आणि त्यांचे प्रेम मिळाल्याने गोपींचे मनोरथ पूर्ण झाले. (१)
तत्रारभत गोविन्दो रासक्रीडामनुव्रतैः ।
स्त्रीरत्नैरन्वितः प्रीतैः अन्योन्याबद्धबाहुभिः ॥ २ ॥
फेरतो धरिला त्यांनी हातात हात घालुनी । स्त्रीरत्नांसह तो कृष्ण रमला क्रीडता तिथे ॥ २ ॥
प्रीतैः - आनंदित झालेल्या अशा - अन्योन्याबद्धबाहुभिः - एकमेकींचे धरले आहेत हात ज्यांनी अशा - अनुव्रतैः - एकनिष्ठ अशा - स्त्रीरत्नैः - सुंदर स्त्रियांनी - अन्वितः गोविन्दः - युक्त झालेला श्रीकृष्ण - तत्र - त्याठिकाणी - रासक्रीडां आरभत - रास नामक क्रीडेला आरंभ करता झाला. ॥२॥
भगवान श्रीकृष्णांच्या प्रेयसी आणि सेविका गोपी एकमेकींच्या हातात हात घालून उभ्या होत्या. त्या स्त्री-रत्नांच्याबरोबर भगवंतांनी रासक्रीडा सुरू केली. (२)
रासोत्सवः सम्प्रवृत्तो गोपीमण्डलमण्डितः ।
योगेश्वरेण कृष्णेन तासां मध्ये द्वयोर्द्वयोः ॥ ३ ॥
प्रत्येक गोपिच्या मध्ये श्रीयोगेश्वर राहिला । दिधले हात हातात सर्वांना आपुला गमे ॥ ३ ॥
द्वयोः द्वयोः प्रविष्टेन - प्रत्येक जोडीमध्ये प्रविष्ट झालेल्या - योगेश्वरेण कृष्णेन - योगिश्रेष्ठ श्रीकृष्णाकडून - कण्ठे गृहीतानां - गळ्यात आलिंगिलेल्या - तासां - त्या गोपींचा - गोपीमंडलमंडितः - गोपींच्या फेर धरण्यामुळे सुंदर दिसणारा असा - रासोत्सवः संप्रवृत्तः - रास नावाचा आनंदाचा खेळ चालू झाला ॥३॥
योगेश्वर भगवान दोन दोन गोपींच्या मध्ये प्रगट झाले आणि त्यांच्या गळ्यांत त्यांनी आपला हात टाकला. प्रत्येक गोपीला असा अनुभव येत होता की, श्रीकृष्ण केवळ आपल्याच जवळ आहेत. अशा प्रकारे अनेक गोपींच्या समूहात श्रीकृष्णांचा रासोत्सव सुरू झाला. (३)
प्रविष्टेन गृहीतानां कण्ठे स्वनिकटं स्त्रियः ।
यं मन्येरन् नभस्तावद् विमानशतसङ्कुलम् ॥ ४ ॥
रासोत्सव सुरू झाला मध्ये कृष्ण विराजला । विमाने घेउनी देव सपत्न पातले तिथे । पहाया रासक्रीडेते न शुद्ध राहिली तया ॥ ४ ॥
यं - ज्या श्रीकृष्णाला - स्त्रियः - सर्व स्त्रिया - स्वनिकटं मन्येरन् - आपल्या जवळ असलेला असा मानीत आहेत - तावत् - तितक्यात - नभः - आकाश - औत्सुक्यापहृतात्मनां - उत्सुकतेने हरण केली आहेत अंतःकरणे ज्यांची अशा - सदाराणाम् - स्त्रियांसह असलेल्या - दिवौकसाम् - देवांच्या - विमानशतसंकुलम् (अभवत्) - विमानांच्या शेकड्यांनी गजबजून गेले. ॥४॥
त्यावेळी आकाशामध्ये शेकडो विमानांची गर्दी झाली होती. रासोत्सवाच्या दर्शानाच्या उत्सुकतेमुळे स्वतःला विसरलेले सर्व देव आपापल्या पत्नींसह तेथे येऊन पोहोचले. (४)
विवरण :- 'स्त्रीरत्न' असा गोपींचा उल्लेख केला आहे. तो का ? गोपी सामान्य संसारी स्त्रिया होत्या. पण कृष्णावरची त्यांची भक्ती अनन्यसाधारण होती. रासक्रीडेसाठी त्या यमुनातीरी आल्या, ते जादूने मोहित झाल्याप्रमाणे, मुरलीचा सुस्वर ध्वनी ऐकून, खेचल्याप्रमाणे, भारल्याप्रमाणे. श्रीकृष्णाच्या विरहाने दुःखी होऊन त्या वेडयापिशा, सैरभैर झाल्या आणि पुन्हा त्याचे दर्शन झाल्यावर त्यांनी त्याचेभोवती क्रीडेसाठी फेर धरला. आपला संसार, पति, मुलेबाळे यांना सोडून कृष्णाच्या भक्तीत त्या रममाण झाल्या म्हणून त्या 'स्त्रीरत्ने' फेर धरताना त्यांनी आपले हात एकमेकीत गुंफून ठेवले, का ? कदाचित तो पुन्हा आपल्याला सोडून जाऊ लागला, तर त्यास अडविता यावे म्हणूनहि असेल. कृष्णाने यावेळी अनेक रूपे धारण केली. कारण तो केवळ 'योगीश्वर' (योग्यांचा ईश्वर) नव्हता; तर 'योगेश्वर' (योगाचा ईश्वर) होता. योगमायेने तो बहुशरीरी बनू शकत होता. त्यामुळे अशी शरीरे धारण करणे त्यास अशक्य नव्हते. तो दोघींच्या मध्ये एक अशा रूपात उभा राहिला; त्यामुळे प्रत्येकीला कृष्णाने आपल्यालाच आलिंगन दिले आहे असे वाटले. (हे कृष्णाचे चातुर्य.) (२-४)
दिवौकसां सदाराणां औत्सुक्यापहृतात्मनाम् ।
ततो दुन्दुभयो नेदुः निपेतुः पुष्पवृष्टयः । जगुर्गन्धर्वपतयः सस्त्रीकास्तद् यशोऽमलम् ॥ ५ ॥
फुलांची वृष्टी ही झाली दुंदुभी झडल्या वरी । गंधर्वे गायिली गाणी सपत्न हरिकीर्तने ॥ ५ ॥
ततः - नंतर - दुन्दुभयः नेदुः - दुंदुभि वाजत्या झाल्या - पुष्पवृष्ट्यः निपेतुः - फुलांचे वर्षाव होऊ लागले - सस्त्रीकाः गन्धर्वपतयः - स्त्रियांसह असलेले गंधर्वाचे नायक - अमलं तद्यशः जगुः - निर्मल असे त्या कृष्णाचे यश गाते झाले. ॥५॥
स्वर्गातील दुंदुभी वाजू लागल्या. स्वर्गीय पुष्पांचा वर्षाव होऊ लागला. गंधर्वगण आपापल्या पत्नींसह भगवंतांच्या निर्मल यशाचे गायन करू लागले. (५)
वलयानां नूपुराणां किङ्किणीनां च योषिताम् ।
सप्रियाणामभूत् शब्दः तुमुलो रासमण्डले ॥ ६ ॥
कृष्णाच्या सह त्या गोपी नाचल्या रासमंडली । वाजली कंकणे चाळ मधूर शब्द जाहले ॥ ६ ॥
रासमण्डले - रासक्रीडेच्या फेरामध्ये - सप्रियाणां योषिताम् - प्रियकरासह असलेल्या स्त्रियांच्या - वलयानां नूपुराणां किंकिणीनां च - कंकणांचा व पैजणांच्या घागर्यांचा - तुमुलः शब्दः अभूत् - मोठा ध्वनि उत्पन्न झाला॥६॥
सर्व गोपी रासमंडलामध्ये आपल्या प्रियतमासह नृत्य करू लागल्या. त्यांच्या बांगड्या, पैंजण आणि कमरपट्ट्याचे घुंगरू या सर्वांचा प्रचंड आवाज होऊ लागला. (६)
तत्रातिशुशुभे ताभिः भगवान् देवकीसुतः ।
मध्ये मणीनां हैमानां महामरकतो यथा ॥ ७ ॥
यमुनावाळवंटात अनोखा हर्ष जाहला । जणू सोन्यांचिये माळी नीलरत्न सुशोभले ॥ ७ ॥
हैमानां मणीनां मध्ये - सोन्याच्या मण्यांमध्ये - यथा महामरकतः (तथा) - जसे मोठे पाचूचे रत्न त्याप्रमाणे - तत्र - त्याठिकाणी - ताभिः - त्या स्त्रियांच्या योगाने - भगवान् देवकीसुतः - भगवान, श्रीकृष्ण - अतिशुशुभे - अतिशय शोभला. ॥७॥
तेथे व्रजसुंदरींच्या मध्ये भगवान श्रीकृष्ण अगणित पिवळ्याधमक सुवर्णमण्यांमधे तेजस्वी मोठा नीलमणी चमकावा तसे दिसत होते. (७)
( शार्दूलविक्रीडित )
पादन्यासैर्भुजविधुतिभिः सस्मितैर्भ्रूविलासैः । भज्यन्मध्यैश्चलकुचपटैः कुण्डलैर्गण्डलोलैः । स्विद्यन्मुख्यः कवररसना ग्रन्थयः कृष्णवध्वो । गायन्त्यस्तं तडित इव ता मेघचक्रे विरेजुः ॥ ८ ॥
( मंदाक्रांता ) पादान्यासे ठुमकत बहू गोपिका नाचताना । वेगाने नी हळुच कधि त्या टाकिती पावलांना ॥ हाताने त्या उभवुनि कधि दाविती भाव सारा । हासोनीया बघति भुवया उंचिती ढंग प्रेमे ॥ नृत्यामध्ये कमर तुटते वाटल्या कृश ऐशा । स्फूर्तीमध्ये हलति स्तन ते बैसता ऊठताना ॥ वस्त्रे ही ते उडति हलती कर्णि ती कुंडले की । नाचे नाचो थकुनि मग त्यां घाम येई कपाळा ॥ वेण्या नाड्या सुटुही बघती नाचता गोपि गीते । गाती ऐशा प्रियसखि हरी नंदलाल प्रियाला ॥ श्यामो कृष्णो ढगचि जणु तो गोपिका त्या विजा की । शोभा ऐशी असिम गमली वाळवंटी तटासी ॥ ८ ॥
पादन्यासैः - पायांच्या हालचालींनी - भुजविधुतिभिः - हाताच्या हालविण्यांनी - सस्मितैः भ्रूविलासैः - हास्यपूर्वक चाललेल्या भुवयांच्या विलासांनी - भज्यन्मध्यैः - वाकणार्या मध्यभागांनी - चलकुचपटैः - हालणार्या स्तनांवरील वस्त्रांनी - गण्डलोलैः - आणि गालांवर लोंबणार्या - कुण्डलैः (च उपलक्षिताः) - कुंडलांनी युक्त अशा - स्विद्यन्मुख्यः - घामाने डवरली आहेत मुखे ज्यांची अशा - कबररशनाग्रन्थयः - वेण्यांना व कमरपट्यांना आहेत गांठी ज्याच्या अशा - तं गायन्त्यः - त्यांचे गायन करणार्या - कृष्णवध्वः - श्रीकृष्णाशी खेळणार्या स्त्रिया - मेघचक्रे तडितः इव विरेजुः - मेघमंडळात जशा विजा तशा शोभल्या. ॥८॥
नृत्याच्या वेळी गोपी निरनिराळ्या तर्हेच्या पायांच्या हालचाली व हातांचे हावभाव करीत. मधून मधून स्मितपूर्वक भुवयांचे विलास करीत. कंबर लचकावीत. कधी त्यांच्या छातीवरील दुपट्टे हेलकावे घेत तर कधी कुंडले गालांवर आपटत. चेहर्यावर घामाचे थेंब तरारले होते आणि वेण्या सैल झाल्या होत्या. तशाच कमरेच्या दुपट्ट्याच्या गाठीही सैलसर झाल्या होत्या. याचवेळी त्या गातही होत्या. मेघमंडलांत विजा शोभाव्या, तशा श्रीकृष्णांच्या सान्निध्यात त्या शोभत होत्या. (८)
विवरण :- 'गायन्त्यः कृष्णवध्वः' - (क्रीडा करताना गाणार्या कृष्णवधू) असा उल्लेख मुद्दाम केला असावा. 'भावैः पुरुषान् (पतिं) बध्नाति इति वधूः ।' पतीला आपल्या पाशात बांधणारी ती वधू. कृष्णाला पति समजून आपल्या प्रेमपाशात गोपींनी बांधून ठेवले होते. आपला प्रपंच विसरून त्या त्याच्याशी समरस, एकरूप झाल्या होत्या. म्हणून त्यांना 'गोपवधू' न म्हणता 'कृष्णवधू' असे संबोधिले. रासक्रीडा करताना मेघमंडळामध्ये जशा विजा चमकाव्या, तशा गोपी शोभू लागल्या, असे वर्णन ही पूर्णोपमा आहे, असे म्हणता येईल. कृष्ण सावळा, तोही अनेक रूपात; म्हणून काळ्या मेघमंडळाप्रमाणे. गोपी गोर्या व तेजस्वी, चपळपणे नृत्य करणार्या; म्हणून त्या विजांप्रमाणे. नृत्यामुळे आलेले सर्वांच्या शरीरावरील स्वेदबिंदु मेघांच्या तुषाराप्रमाणे आणि त्यांनी गाइलेली गीते म्हणजे मेघांचे गर्जन (अर्थात मधुर, सुस्वर.) या सर्व वर्णनांमुळे समर्पक शब्दयोजनेमुळे संपूर्ण दृश्य नजरेसमोर उभे रहाते. (८)
( अनुष्टुप् )
उच्चैर्जगुर्नृत्यमाना रक्तकण्ठ्यो रतिप्रियाः । कृष्णाभिमर्शमुदिता यद्गीतेनेदमावृतम् ॥ ९ ॥
( अनुष्टुप ) नाचता रत त्या गोपी गाती कृष्णास खेटुनी । आनंदे गायिल्या राग आजही नाद येतसे ॥ ९ ॥
कृष्णाभिमर्शमुदिताः - श्रीकृष्णाच्या स्पर्शाने आनंदित झालेल्या - रतिप्रियाः - खेळाची आवड असणार्या - रक्तकण्ठयः - प्रेमळ आहे कंठ ज्यांचा अशा - नृत्यमानाः (ताः) - नाचणार्या अशा त्या स्त्रिया - उच्चैः जगुः - मोठयाने गात्या झाल्या - येन गीतेन इदं (जगत्) आवृतम् - ज्या गायनाने हे जग व्यापून गेले. ॥९॥
त्या प्रेममग्न गोपिका नाचत-नाचत उंच स्वरात रागदारीत मधुर गायन करीत होत्या. श्रीकृष्णांच्या स्पर्शामुळे त्या अधिकच आनंदमग्न झाल्या होत्या. त्यांच्या गायनाने हे सर्व जग अजूनही गुंजन करीत आहे. (९)
विवरण :- श्लोक - -'रक्तकण्ठयः' - या शब्दातून गोपी नाना रागरागिण्या गायनात निपुण होत्या, हे सूचित होते. त्यावेळी कृष्ण व गोपी जो राग ज्या तालामध्ये गात होत्या, तो राग-ताल बदलून गाण्यास एका गोपीने प्रारंभ केला. ( मूर्च्छना असे संगीतातील नाव) स्वतः कृष्ण तर संगीताचा जाणकार होताच; पण गोपीही (जाणकार) होत्या, हे दिसून येते. कृष्णाने लगेच गोपीचे कौतुक करून तिला दाद दिली. (९)
काचित् समं मुकुन्देन स्वरजातीरमिश्रिताः ।
उन्निन्ये पूजिता तेन प्रीयता साधु साध्विति । तदेव ध्रुवमुन्निन्ये तस्यै मानं च बह्वदात् ॥ १० ॥
कृष्णशब्दात शब्दांना मेळोनी गायल्या कुणी । वाहवा बोलतो शब्द् कोणी धृवपदा धरी ॥ १० ॥
काचित् - कोणीएक स्त्री - मुकुन्देन समं - श्रीकृष्णाच्या बरोबर - अमिश्रिताः - कृष्णाच्या स्वरांशी न मिळणारे - स्वरजातीः उन्निन्ये - असे आलाप उंच स्वराने काढती झाली - प्रीयता तेन - संतुष्ट झालेल्या त्या कृष्णाने - साधु साधु इति पूजिता (सा) - ठीक, चांगले अशा प्रकारे गौरविलेली - तत् एव ध्रुवं उन्निन्ये - तोच आलाप ध्रुव तालावर उंच सुराने काढिती झाली - च - आणि - (सः) तस्यै बहुमानं अदात् - तो तिला फार मान देता झाला. ॥१०॥
एक गोपी भगवंतांच्या बरोबर त्यांच्या स्वरात स्वर मिळवून गात होती. ती त्यांच्यापेक्षाही वरच्या स्वरात गाऊ लागली. तेव्हा प्रसन्न होऊन त्यांनी तिला " वाहवा ! वाहवा ! " म्हणून शाबासकी दिली. दुसरीने तोच राग ध्रुपद तालात गाइला. त्याचेसुद्धा भगवंतांनी अतिशय कौतुक केले. (१०)
काचिद् रासपरिश्रान्ता पार्श्वस्थस्य गदाभृतः ।
जग्राह बाहुना स्कन्धं श्लथद्वलयमल्लिका ॥ ११ ॥
नाचता थकली एक वेणीची गळली फुले बाहूत धरि तैं कृष्ण खांदे दोन्ही धरूनिया ॥ ११ ॥
रासपरिश्रान्ता - रासक्रीडेने थकलेली अशी - श्लधद्वलयमल्लिका - सैल झाली आहेत कंकणे मोगरीचे गजरे जिचे अशी - काचित् - कोणीएक स्त्री - बाहुना - हाताने - पार्श्वस्थस्य गदाभृतः - बाजूला उभा असलेल्या श्रीकृष्णाचा - स्कन्धं जग्राह - खांदा धरती झाली. ॥११॥
एक गोपी नृत्य करता करता थकून गेली. तिच्या मनगटातून बांगड्या आणि वेणीतून मोगर्याची फुले गळू लागली. तेव्हा तिने शेजारीच उभे असलेल्या मुरलीमनोहरांचा खांदा आपल्या हाताने धरून ठेवला. (११)
तत्रैकांसगतं बाहुं कृष्णस्योत्पलसौरभम् ।
चन्दनालिप्तमाघ्राय हृष्टरोमा चुचुम्ब ह ॥ १२ ॥
कृष्णाने दुसरा हात दुजीच्या स्कंधि ठेविला । चंदनीगंध तो हात गोपीने चुंबिला असे ॥ १२ ॥
तत्र - त्यापैकी एक स्त्री - उत्पलसौरभं - कमळाप्रमाणे आहे सुवास ज्याचा अशा - चन्दनालिप्तं - चंदनाने माखलेल्या - अंसगतं - खांद्यावर ठेवलेल्या - कृष्णस्य बाहुं - श्रीकृष्णाच्या हाताला - आघ्राय - हुंगून - हृष्टरोमा (सती) - उभे राहिले आहे रोमांच जीचे अशी होत्साती - चुचुम्ब ह - चुंबिती झाली. ॥१२॥
एकीने श्रीकृष्णांनी खांद्यावर ठेवलेल्या, मुळातच कमलाप्रमाणे सुगंधी असलेल्या व त्यावर चंदनाची उटी लावलेल्या हाताचा वास घेतला. त्यामुळे रोमांचित होऊन तिने त्या हाताचे चुंबन घेतले. (१२)
कस्याश्चित् नाट्यविक्षिप्त कुण्डलत्विषमण्डितम् ।
गण्डं गण्डे सन्दधत्याः अदात्ताम्बूलचर्वितम् ॥ १३ ॥
थकता एक ती गोपी कृष्णगालास गाल तो । लाविता चाविल्या पाना मुखात देतसे तिच्या ॥ १३ ॥
(स्वस्य) गण्डे - आपल्या गालाजवळ - नाटयविक्षिप्तकुण्डलत्विषमण्डितं - नाचताना हालणार्या कुंडलांच्या कांतीने - गण्डं - शोभणारा गाल - संदधत्याः कस्याश्चित् - भिडविणार्या कोण्या एका स्त्रीला - ताम्बूलचर्वितम् अदात् - विडा चावून देता झाला. ॥१३॥
नाचताना एका गोपीचे कुंडल हालत होते, त्याच्या कांतीने तिचा गाल चमकत होता. तिने आपला गाल श्रीकृष्णांच्या गालाला लावला. तेव्हा भगवंतांनी आपल्या तोंडातील चावलेला विडा तिच्या तोंडात दिला. (१३)
नृत्यती गायती काचित् कूजन् नूपुरमेखला ।
पार्श्वस्थाच्युतहस्ताब्जं श्रान्ताधात् स्तनयोः शिवम् ॥ १४ ॥
कर्धनी नुपुरींनादे गोपी त्या नाच नाचता । थकता हरि तो हात ठेवितो दोन्हि त्या स्तनी ॥ १४ ॥
कूजन्नूपूरमेखला - अस्पष्ट शब्द करीत आहेत पैंजण व कमरपट्टा जिचा अशी - नृत्यन्ती गायती श्रान्ता - नाचून व गाऊन दमलेली - पार्श्वस्था काचित् - बाजूला उभी असलेली कोणी एक स्त्री - शिवं - शुभ असा - अच्युतहस्ताब्जम् - श्रीकृष्णाचा कमळासारखा हात - स्तनयोः अधात् - स्तनांवर ठेविती झाली. ॥१४॥
एक गोपी पैंजणांचा आणि कमरपट्ट्याच्या घुंगरांचा नाद करीत नाचत आणि गात होती. ती जेव्हा थकून गेली, तेव्हा तिने आपल्या शेजारीच उभे असलेल्या श्यामसुंदरांचा मंगल हात आपल्या दोन्ही स्तनांवर ठेवून घेतला. (१४)
गोप्यो लब्ध्वाच्युतं कान्तं श्रिय एकान्तवल्लभम् ।
गृहीतकण्ठ्यस्तद्दोर्भ्यां गायन्त्यस्तं विजह्रिरे ॥ १५ ॥
श्रीहुनी भाग्य गोपींचे एकांती कृष्ण गातसे । गळ्यात घातला हात सर्व त्या धन्य जाहल्या ॥ १५ ॥
श्रियः एकान्तवल्लभं अच्युतं - लक्ष्मीच्या अत्यंत आवडत्या अशा श्रीकृष्णाला - कान्तं लब्ध्वा - पति म्हणून मिळवून - तद्दोर्भ्यां गृहीतकण्ठयः - त्याच्या दोन्ही हातांनी आलिंगलेल्या अशा - गोप्यः - गोपी - तं गायन्त्यः विजह्लिरे - त्याचे गुण गात खेळत्या झाल्या. ॥१५॥
लक्ष्मीचाच केवळ पती असणार्या श्रीकृष्णांना आपला प्रियतम करून घेऊन, गोपी गायन करीत त्यांच्याबरोबर विहार करू लागल्या. यावेळी श्रीकृष्णांनी त्यांच्या गळ्यांत आपले हात घातले होते. (१५)
( वसंततिलका )
कर्णोत्पलालकविटङ्ककपोलघर्म वक्त्रश्रियो वलयनूपुरघोषवाद्यैः । गोप्यः समं भगवता ननृतुः स्वकेश स्रस्तस्रजो भ्रमरगायकरासगोष्ठ्याम् ॥ १६ ॥
( वसंततिलका ) लक्ष्मीहुनीहि बहु भाग्यचि गोपिकांचे कृष्णास प्रीय बघुनी रमती नि गाती । भाळास केश कुरुळे अन घर्मथेंब गातात भृंग गळती फुलं वेणिची ती ॥ १६ ॥
कर्णोत्पलालकविटङकपोल - कानांवरील कमळे, कुरळे केस, सुंदर असे गाल - घर्मवत्क्रश्रियः - व घर्मबिंदु यांच्या योगाने मुखावर शोभा आली आहे ज्याच्या अशा - स्वकेशस्रस्तस्रजः - स्वतःच्या केसातून गळून पडत आहेत फुलांचे गजरे ज्यांच्या अशा - गोप्यः - गोपी - भ्रमरगायकरासगोष्ठ्यां - ज्याठिकाणी भुंगे गवई आहेत अशा रासक्रीडेच्या स्थानी - वलयनूपुरघोषवाद्यैः - कंकणे व पैंजणांच्या घागर्या ह्याच वाद्यांच्या योगाने - भगवता समं ननृतुः - श्रीकृष्णाबरोबर नाचल्या. ॥१६॥
कानावरील कमळे, गालावर रुळणारे कुरळे केस आणि घामाचे बिंदू यांनी ज्यांची मुखकमले शोभत आहेत, अशा गोपी भ्रमर गायक असणार्या रासमंडलामध्ये श्रीकृष्णांच्याबरोबर नृत्य करीत होत्या. त्यावेळी त्यांच्या बांगड्या, पैंजण आणि अन्य वाद्ये वाजत होती. तसेच त्यांच्या वेण्यांमध्ये गुंफलेली फुले इतस्ततः विखरून पडत होती. (१६)
( मिश्र )
एवं परिष्वङ्गकराभिमर्श स्निग्धेक्षणोद्दामविलासहासैः । रेमे रमेशो व्रजसुन्दरीभिः यथार्भकः स्वप्रतिबिम्बविभ्रमः ॥ १७ ॥
( इंद्रवज्रा ) त्या सावलीसी जयि बाळ खेळे गोपी तशा आवळिती तयाला । हासोनि पाही तिरक्याच नेत्रे गोपिंसवे तो क्रिडला हरी की ॥ १७ ॥
रमेशः - लक्ष्मीपति श्रीकृष्ण - एवं - याप्रमाणे - परिष्वङगकराभिमर्शस्निग्धेक्षण - आलिंगन, करस्पर्श, प्रेमळ दृष्टीने पाहणे, - उद्दामविलासहासैः - उत्कट अशा शृंगार चेष्टा, हसणे यांच्या योगाने - व्रजसुन्दरीभिः (सह) - गोकुळातील सुंदर स्त्रियांसह - यथा स्वप्रतिबिम्बविभ्रमः - ज्याप्रमाणे स्वतःच्या प्रतिबिंबाशी खेळणारे - अर्भकः (तथा) - लहान मूल त्याप्रमाणे - रेमे - खेळला. ॥१७॥
लहान मुलाने आपल्याच प्रतिबिंबाशी खेळावे त्याचप्रमाणे रममाण आपलीच प्रतिबिंबे असणार्या त्यांना कधी छातीशी धरीत, कधी हाताने कुरवाळीत, कधी प्रेमपूर्ण नजरेने त्यांच्याकडे पाहात तर कधी लीलेने मोठ्याने हसत. अशा प्रकारे त्यांनी व्रजसुंदरींबरोबर क्रीडा केली. (१७)
विवरण :- कृष्ण व गोपींनी एकमेकांशी क्रीडा केली; ती कशी वाटत होती ? बालक आपले प्रतिबिंब आरशात पाहून त्याच्याशी खेळते, त्याप्रमाणे; (बिंब-प्रतिबिंब भाव) ज्याप्रमाणे बालक आणि त्याचे आरशातील प्रतिबिंब हे एकमेकांपासून वेगळे नसतात, त्याप्रमाणे कृष्ण आणि गोपी. गोपींच्या हृदयात जो कृष्ण परमात्मा होता, त्याच्याशी तो क्रीडा करीत होता. म्हणजे ती क्रीडा त्याच्या स्वतःशीच होती. मग यामध्ये कामभाव कसा असू शकेल ? कारण त्यासाठी दुसर्या व्यक्तीची अपेक्षा, जिथे ती नव्हतीच. म्हणून कामभावनाहि नाही. (१७)
तदङ्गसङ्गप्रमुदाकुलेन्द्रियाः
केशान् दूकूलं कुचपट्टिकां वा । नाञ्जः प्रतिव्योढुमलं व्रजस्त्रियो विस्रस्तमालाभरणाः कुरूद्वह ॥ १८ ॥
त्या अंगस्पर्शे विव्हळोनि गेल्या वेण्या सुटोनी गळली फुले की । केसां नि वस्त्रा अन कंचुकीला सांभाळण्याला नच भान राही ॥ १८ ॥
कुरूद्वह - हे परिक्षित राजा - तदङ्गसङ्ग - याच्या शरीराच्या स्पर्शाने - प्रमुदाकुलेन्द्रियाः - झालेल्या अत्यानंदाने व्याप्त झाली आहेत इंद्रिये ज्यांची अशा - विस्रस्तमालाभरणाः - विगलित झाली आहेत माला व अलंकार ज्यांचे अशा - व्रजस्त्रियः - गोकुळवासी स्त्रिया - केशान् दुकूलं कुचपट्टिकां वा - केसांना, रेशमी वस्त्रांना किंवा स्तनांवरील वस्त्राला - अञ्जः प्रतिव्योढुः - सहज रीतीने परत ओढण्यास - अलं न (बभूवुः) - समर्थ झाल्या नाहीत. ॥१८॥
परीक्षिता ! भगवंतांच्या अंगाच्या स्पर्शाने झालेल्या आनंदाने गोपी भान विसरल्या. फुलांचे हार तुटले. दागिने अस्ताव्यस्त झाले. त्या आपले विस्कटलेले केस, वस्त्रे आणि चोळ्यासुद्धा सांभाळण्यास असमर्थ झाल्या. (१८)
( अनुष्टुप् )
कृष्णविक्रीडितं वीक्ष्य मुमुहुः खेचरस्त्रियः । कामार्दिताः शशाङ्कश्च सगणो विस्मितोऽभवत् ॥ १९ ॥
( अनुष्टुप् ) पाहता इच्छिती भोग स्वर्गीच्या देवअंगना । पाहता चंद्रमा तारे विस्मीत जाहले तदा ॥ १९ ॥
कृष्णविक्रीडितं वीक्ष्य - कृष्णाचा खेळ पाहून - खेचरस्त्रियः - देवांच्या स्त्रिया - कामार्दिताः (सत्यः) - कामवासनेने पीडित होत्सात्या - मुमुहुः - मूर्च्छित झाल्या - च - आणि - सगणः शशाङकः - तारांगणासह चंद्र - विस्मितः अभवत् - आश्चर्यचकित झाला. ॥१९॥
श्रीकृष्णांची ही रासक्रीडा पाहून स्वर्गातील देवांगनासुद्धा काम-मोहित झाल्या आणि नक्षत्रांसह चंद्रसुद्धा चकित झाला. (१९)
विवरण :- गोपी-कृष्णाची क्रीडा आकाशामधील सर्व देव, देवस्त्रिया, चंद्र, इतर ग्रह पहात होते. ती पाहताना ते इतके रममाण झाले, त्याच्याशी तादात्म्य पावले, की ग्रह-चंद्र आपली गति विसरून तिथेच थांबले. म्हणजेच रात्र ही दीर्घ झाली. तिचा कालावधी वाढला. (१९)
कृत्वा तावन्तमात्मानं यावतीर्गोपयोषितः ।
रेमे स भगवान् ताभिः आत्मारामोऽपि लीलया ॥ २० ॥
आत्माराम असा कृष्ण आसक्ती त्याजला नसे । जेवढ्या गोपि त्या होत्या तेवढी घेतली रुपे ॥ २० ॥
सः भगवान् - तो श्रीकृष्ण - आत्मारामः (सन्) अपि - स्वसंतुष्ट असा असताहि - यावत्यः गोपयोषितः (आसन्) - जितक्या गोपी होत्या - तावन्तं आत्मानं कृत्वा - तितकी आपली स्वरूपे करून - ताभिः (सह) लीलया रेमे - त्यांच्या बरोबर मौजेने खेळला. ॥२०॥
जरी भगवान स्वतःतच रमणारे असले, तरीसुद्धा त्यांनी जेवढ्या गोपी होत्या, तेवढीच रूपे सहज धारण केली आणि त्यांच्याबरोबर विहार केला. (२०)
तासां अतिविहारेण श्रान्तानां वदनानि सः ।
प्रामृजत् करुणः प्रेम्णा शन्तमेनाङ्ग पाणिना ॥ २१ ॥
थकता गोपि त्या सर्व करुणामय कृष्णने । हाताने मुख ते त्यांचे प्रेमाने पुसले पहा ॥ २१ ॥
अङग - हे राजा - करुणः सः - दयाळू असा तो - प्रेम्णा - प्रेमाने - अतिविहारेण श्रान्तानां तासां वदनानि - अति क्रीडेने थकलेल्या त्या स्त्रियांची मुखे - शन्तमेन - अत्यंत कल्याणकारक - पाणिना प्रासृजत् - अशा हाताने पुसता झाला. ॥२१॥
हे राजा ! जेव्हा पुष्कळ वेळपर्यंत विहार केल्यामुळे गोपी थकून गेल्या, तेव्हा करुणामय श्रीकृष्णांनी प्रेमाने आपल्या सुखद करकमलांनी त्यांच्या चेहर्यावरून हात फिरवून त्यांचा शीण दूर केला. (२१)
( वसंततिलका )
गोप्यः स्फुरत्पुरटकुण्डलकुन्तलत्विड् गण्डश्रिया सुधितहासनिरीक्षणेन । मानं दधत्य ऋषभस्य जगुः कृतानि पुण्यानि तत्कररुहस्पर्शप्रमोदाः ॥ २२ ॥
( वसंततिलका ) आनंदल्या बहूहि तो नखस्पर्श होता ती कुंडले चमकली बहु केशभागी । त्या प्रेमहास्यि विरल्या बहुमान होता नी गायिल्या बहुतही हरिकीर्ति तेंव्हा ॥ २२ ॥
तत्कररुहस्पर्शप्रमोदाः - त्याच्या हाताच्या नखांच्या स्पर्शाने झाला आहे आनंद ज्यांना अशा - स्फुरत्पुटकुण्डल - चकचकणार्या सोन्याच्या कुंडलांच्या, - कुन्तलत्विङगण्डश्रिया - कुरळ्या केसांच्या प्रभेने युक्त असलेल्या गालांच्या शोभेने अमृताप्रमाणे झालेल्या - सुधिनहासनिरीक्षणेन - हास्याने युक्त अशा निरखून पाहण्याने - (तस्य) ऋषभस्य मानं दधत्यः - त्या श्रेष्ठ पुरुषाचा सन्मान करणार्या - (ताः) गोप्यः - त्या गोपी - (तेन) कृतानि पुण्यानि (कर्माणि) जगुः - त्याने केलेली पुण्यकारक कृत्ये गात्या झाल्या. ॥२२॥
भगवंतांच्या नखस्पर्शाने गोपींना अतिशय आनंद झाला. त्यांनी ज्यांच्यावर सोन्याची कुंडले झगमगत होती आणि कुरळे केस भिरभिरत होते, अशा आपल्या गालांच्या सौंदर्याने आणि अमृतासारख्या मधुर हास्ययुक्त नजरेने श्रीकृष्णांचा सन्मान केला आणि त्या प्रभूंच्या पवित्र लीलांचे गायन करू लागल्या. (२२)
ताभिर्युतः श्रममपोहितुमङ्गसङ्ग
घृष्टस्रजः स कुचकुङ्कुमरञ्जितायाः । गन्धर्वपालिभिरनुद्रुत आविशद् वा श्रान्तो गजीभिरिभराडिव भिन्नसेतुः ॥ २३ ॥
हत्ती जसा घुसतसे जळि त्या तळ्यात क्रीडावयास हरि तै यमुनी जळात । गेला घुसोनि भिजली वनमाळ त्याची जी थोडिशी सुकलिसे रगड्यात त्यांच्या ॥ २३ ॥
ताभिः युतः - त्या स्त्रियांनी युक्त असा - कुचकुङ्कुमरञ्जितायाः - स्तनांवरील केशराने रंगलेल्या अशा - अङगसङगघृष्टस्रजः - शरीराच्या स्पर्शाने चुरगळलेल्या माळेच्या - (सम्बन्धिभिः) गन्धर्वपालिभिः - बरोबरच्या गन्धर्वांच्या नायकांप्रमाणे गाणार्या भुंग्याकडून - अनुद्रुतः - पाठलाग केला गेलेला - श्रान्तः सः - दमलेला तो श्रीकृष्ण - श्रमं अपोहितुम - थकवा घालविण्यासाठी - भिन्नसेतु - फोडला आहे बांध ज्याने असा - गजीभिः (युतः) - हत्तिणींनी युक्त असलेला - इभराट् इव - हत्ती जसा तसा - वाः अविशत् - पाण्यात शिरला. ॥२३॥
यानंतर जसा थकलेला हत्ती किनारे पाडत हत्तिणींबरोबर पाण्यात शिरून क्रीडा करतो, त्याचप्रमाणे (गुणातीत असल्यामुळे) लोकमर्यादा आणि वेदमर्यादा यांची पर्वा न करणार्या भगवंतांनी थकवा दूर करण्यासाठी गोपींसह यमुनेच्या पाण्यात प्रवेश केला. त्यावेळी भगवंतांच्या गळ्यातील वनमाला गोपींचे अंग घासल्याने थोडीशी चुरगाळली होती आणि त्यांच्या वक्षःस्थळाच्या केशराचा रंगही लागला होता. तिच्या चारी बाजूंनी गुणगुणणारे भुंगे त्यांच्या पाठोपाठ चालले होते. जणू गंधर्वराज त्यांच्या कीर्तीचे गायन करीत पाठोपाठ चालले आहेत. (२३)
सोऽम्भस्यलं युवतिभिः परिषिच्यमानः
प्रेम्णेक्षितः प्रहसतीभिरितस्ततोऽङ्ग । वैमानिकैः कुसुमवर्षिभिरीड्यमानो रेमे स्वयं स्वरतिरत्र गजेन्द्रलीलः ॥ २४ ॥
फेकोनि खूप जल ते हरि न्हाविला त्या गोपीस वृष्टि कुसुमी करितात देव । गाती विमानी हरिचे गुणगान तैसे कृष्णो गजापरिच तै जलि क्रीडला की ॥ २४ ॥
अङग - हे राजा - स्वयं स्वरतिः (अपि) - स्वतः संतुष्ट असताहि - गजेन्द्रलीलः सः - मोठया हत्तीप्रमाणे आहेत लीला ज्याच्या असा श्रीकृष्ण - अत्र - ह्याठिकाणी - प्रहसतीभिः युवतिभिः - थट्टा करणार्या तरुण स्त्रियांकडून - इतः ततः - इकडून तिकडून - अलं परिषिच्यमानः - अतिवेगाने सभोवार शिंपडला गेलेला - प्रेम्णा ईक्षितः - प्रेमाने पाहिला गेलेला - कुसुमवर्षिभिः - फुलांचा वर्षाव करणार्या - वैमानिकैः ईडयमानः - देवांकडून स्तविला गेलेला असा - अम्भसि रेमे - पाण्यात खेळला. ॥२४॥
परीक्षिता ! यमुनेच्या पाण्यात गोपींनी प्रेमयुक्त कटाक्षांनी भगवंतांच्याकडे पाहात हसत हसत त्यांच्यावर इकडून-तिकडून खूप पाणी उडविले. विमानात बसलेल्या देवता फुलांचा वर्षाव करून त्यांची स्तुती करू लागल्या. अशाप्रकारे यमुनेच्या पाण्यात आत्माराम श्रीकृष्णांनी गजराजाप्रमाणे विहार केला. (२४)
( मिश्र )
ततश्च कृष्णोपवने जलस्थल प्रसूनगन्धानिलजुष्टदिक्तटे । चचार भृङ्गप्रमदागणावृतो यथा मदच्युद् द्विरदः करेणुभिः ॥ २५ ॥
( इंद्रवज्रा ) गर्दीत गोपी अन भृंग यांच्या आला तटासी मग कृष्णदेव । गलीं स्थलीं गंधित पुष्प होती क्रीडे हरी जै गज हत्तिणीसी ॥ २५ ॥
ततः - नंतर - यथा - ज्याप्रमाणे - करेणुभिः (युतः) मदच्युत् द्विरदः - हत्तीणींनी युक्त असा, मद गाळणारा हत्ती - भृङगप्रमदागणावृतः (सः) - भुंग्यांच्या व स्त्रियांच्या समुदायांनी व्यापलेला असा तो - जलस्थल - पाण्यातील व जमीनीवरील - प्रसूनगन्धनिल - फुलांनी सुवासिक झालेल्या वार्याने व्यापिली आहेत - जुष्टदिक्तटे - दिशांची टोके ज्यांची अशा - कृष्णोपवने - यमुनेच्या तीरावरील उपवनात - चचार - फिरला. ॥२५॥
यानंतर गोपी आणि भुंग्यांच्या थव्यांनी वेढलेले भगवान यमुनातीरावरील उपवनात गेले. ते अत्यंत रमणीय होते. त्याच्या चारी बाजूंनी पाण्यात आणि जमिनीवर उमललेल्या फुलांचा सुगंध घेऊन मंद मंद वारा वाहात होता. तेथे जसा मदोन्मत्त हत्ती हत्तिणींच्या कळपासह फिरतो, त्याप्रमाणे श्रीकृष्ण त्या वनात विहार करू लागले. (२५)
एवं शशाङ्कांशुविराजिता निशाः
स सत्यकामोऽनुरताबलागणः । सिषेव आत्मन्यवरुद्धसौरतः सर्वाः शरत्काव्यकथारसाश्रयाः ॥ २६ ॥
ही शोभली रात्र शरद्ऋतूची काव्यात येती जशि वर्णने ती । तै चांदणे तेथ क्रिडे हरी तो स्वकामरूपीं हरि बंदि होय ॥ २६ ॥
एवं - याप्रमाणे - सत्यकामः - खरा आहे संकल्प ज्याचा असा - अनुरताबलागणः - प्रेमयुक्त झाला आहे स्त्रियांचा समूह ज्याच्याठिकाणी असा - आत्मनि अवरुद्धसौरतः - आपल्या ठिकाणी आवरून धरले आहे वीर्य ज्याने असा - सः - तो कृष्ण - एवम् - याप्रमाणे - शशाङ्कांशुविराजताः - चंद्राच्या किरणांनी सुशोभित झालेल्या - शरत्काव्यकथारसाश्रयाः - शरत् कालासंबंधी काव्यांच्या रसांना आश्रयभूत अशा - (ताः) सर्वाः निशाः - त्या सर्व रात्री - सिषेवे - उपभोगिता झाला. ॥२६॥
जिच्यामध्ये अनेक रात्री एकत्रित झाल्या होत्या, अशी ती शरद ऋतूतील रात्र चंद्राच्या चांदण्याने सुंदर झाली होती. शरद ऋतूसंबंधी ज्या रसांचे वर्णन काव्यात वाचायला मिळते, त्यानुसारच ती रात्र होती. त्या रात्री सत्यसंकल्प श्रीकृष्णांनी आपल्या प्रेयसी गोपींसह शुद्ध सत्त्वमय रासक्रीडा करीत अनेक प्रकारे विहार केला. (२६)
श्रीपरीक्षिदुवाच -
( अनुष्टुप् ) संस्थापनाय धर्मस्य प्रशमायेतरस्य च । अवतीर्णो हि भगवानंन् अंशेन जगदीश्वरः ॥ २७ ॥
( अनुष्टुप् ) राजा परीक्षिताने विचारले - एक स्वामी जगा कृष्ण अंशे तो बलरामही । उद्देध धर्म स्थापावा नसावा तो अधर्म की ॥ २७ ॥
भगवान् जगदीश्वरः - भगवान श्रीविष्णु - धर्मस्य संस्थापनाय - धर्माच्या उत्तम प्रकारच्या स्थापनेसाठी - च - आणि - इतरस्य प्रशमाय - इतर जो अधर्म त्याच्या नाशासाठी - अंशेन अवतीर्णः (आसीत्) - अंशरूपाने अवतरला होता. ॥२७॥
राजाने विचारले - जगाचे स्वामी भगवान यांनी आपला अंश श्रीबलरामांसह धर्माची स्थापना आणि अधर्माचा नाश करण्यासाठी अवतार धारण केला होता. (२७)
विवरण :- (पुढील काही श्लोक) रासक्रीडेच्या वर्णनावरून परीक्षिताला आलेली शंका सर्वसामान्यांनाहि निश्चितच येण्याची शक्यता. गोपस्त्रियांशी कृष्णाचे वर्तन धर्मबाह्य. त्याचे समर्थन कसे करता येईल ? शिवाय 'यद्यदाचरति श्रेष्ठः तत्तदेवेतरोजनः ।' (सामान्य माणसे श्रेष्ठ माणसांचेच अनुकरण करतात.) या न्यायाने मग इतरही तसे वागले तर त्यांना दोष कसा देता येईल ? प्रश्न निश्चितच तर्कसंगत. पण शुकदेवही त्याला तितकेच बिनतोड उत्तर देताना सांगतात, या बाबतीत इतरांनी श्रेष्ठांचे अनुकरण करू नये; कारण देव आणि सामान्य यांचे पापपुण्याचे नियम वेगळे असतात. सामान्य हा इंद्रियाधीन, परतंत्र असतो; म्हणून त्याने आपल्या मर्यादांचे पालन करावे. (हत्तीचे खाणे त्यालाच शोभते, असे मराठीतही म्हणतात, सामान्य माणूस तसे आणि तितके खाऊ लागला तर ?) शंकराने विष प्राशन केले, कारण तो 'शंकर' होता, ते पचवू शकला, ते विशिष्ट हेतूने केले, इतरांनी केले तर ? अशा अवघड बाबी श्रेष्ठच उचलू शकतात, सामान्य नाही, हे नीट ध्यानी ठेवावे. कृष्णाच्या हातून हा धर्मभंग झाला, (अर्थात या गोष्टी कृष्णाने 'केल्या' असे म्हणणे अधिक सयुक्तिक) तो काही विशिष्ट हेतूने म्हणून तो धर्मभंग नाहीच. ('समरथको नहि पाप गुसाईं -रवि- पावक सुरसरिकी नाई' ।) स्वेच्छेने शरीर धारण करणारा स्वच्छंद विहार करू शकतो. तो इंद्रियाधीन नसतो. अशा तेजस्वी लोकांना साध्य-साधन, कार्य-कारण यांचे बंधन नसते. त्यांना फळाची अपेक्षाही नसते. सामान्य माणूस वासनांनी युक्त, भोक्ता त्याला पाप-पुण्याचे बंधन. म्हणजेच श्रीकृष्ण हा फक्त मानवदेहधारी, त्यास सामान्यांचे नियम नाहीत. गंगाजल, अग्नी हे नेहमी पवित्रच. इतरांना शुद्ध करणारे. त्यांच्या अशुद्धीनेही स्वतः शुद्धच राहणारे (तीर्थोदकंच वन्हिश्च नान्यतः शुद्धिमर्हतः ।) सीतादेवी ही जन्मजात शुद्धच. इतर कोणत्याही गोष्टींनी अपवित्र न होणारी. तिला 'अग्निदिव्य' करण्याचीही गरज नाही. त्याचप्रमाणे श्रीकृष्णही पाप-पुण्य या सर्वच गोष्टींपासून अलिप्त आहे. (२७)
स कथं धर्मसेतूनां वक्ता कर्ताभिरक्षिता ।
प्रतीपमाचरद् ब्रह्मन् परदाराभिमर्शनम् ॥ २८ ॥
द्विज हो ! धर्ममर्यादा करणारा स्वयं हरि । मग त्या परस्त्रीयांना तयाने स्पर्शिले कसे ॥ २८ ॥
ब्रह्मन् - हे शुकाचार्या - धर्मसेतूनां - धर्माच्या मर्यादांचा - वक्ता कर्ता भिरिक्षिता च सः - उपदेशक, उत्पादक व संरक्षक असा तो - प्रतीपं परदाराभिमर्शनम् - विपरीत असे दुसर्याच्या स्त्रियांचे सेवन - कथं आचरत् - कसे आचरता झाला. ॥२८॥
ब्रह्मन ! ते धर्ममर्यादेचा उपदेश करणारे, स्वतः आचरण करणारे आणि त्या सर्वांचे रक्षण करणारे होते. असे असता त्यांनी स्वतः परस्त्रियांना स्पर्श करण्याचे धर्मविरोधी वर्तन कसे केले ? (२८)
आप्तकामो यदुपतिः कृतवान् वै जुगुप्सितम् ।
किमभिप्राय एतन्नः संशयं छिन्धि सुव्रत ॥ २९ ॥
मानितो पूर्ण कामी तो निष्काम तरिही कसे । निंदनीय असे कर्म का केले कृपया वदा ॥ २९ ॥
आप्तकामः - पूर्ण झालेल्या आहेत सर्व इच्छा ज्याच्या असा - यदुपतिः - श्रीकृष्ण - किमभिप्रायः - कोणत्या उद्देशाने - जुगुप्सितं कृतवान् - निंद्य कर्म करता झाला - सुव्रत - हे सदाचरणी शुकाचार्या - एतं नः संशयं छिन्धि - या आमच्या संशयाला तू छेदून टाक. ॥२९॥
भगवान श्रीकृष्णांना कोणतीही इच्छा नव्हती, असे असतानाही त्यांनी कोणत्या उद्देशाने हे अयोग्य कर्म केले ? हे ब्रह्मचारी मुनीश्वर ! कृपा करून आपण माझा हा संशय दूर करा. (२९)
श्रीशुक उवाच -
धर्मव्यतिक्रमो दृष्ट ईश्वराणां च साहसम् । तेजीयसां न दोषाय वह्नेः सर्वभुजो यथा ॥ ३० ॥
श्रीशुकदेव सांगतात - ईश नी सूर्य अग्नी हे धर्म आज्ञाहि लंघिती । तेजाने दोष ना त्यांना जै अग्नी दोष मुक्तची ॥ ३० ॥
ईश्वराणां धर्मव्यतिक्रमः दृष्टः - समर्थांनी केलेले धर्माचे उल्लंघन पाहण्यात आहे - च - आणि - साहसं (अपि) - धाडसहि पाहण्यात आहे - यथा सर्वभुजः वह्नेः (तथा) - ज्याप्रमाणे सर्वभक्षक अग्नीचे त्याप्रमाणे - तेजीयसां (तत्) दोषाय न (भवति) - तेजस्वी लोकांचे ते कृत्य दोषास पात्र होत नाही. ॥३०॥
श्रीशुक म्हणतात - अलौकिक पुरुषांची कधी कधी धर्माचे उल्लंघन आणि लौकिक दृष्ट्या अविचारी कृत्ये दिसतात. परंतु ही त्या तेजस्वी पुरुषांना दोषास्पद ठरत नाहीत. जसे, अग्नी सगळे खातो, परंतु त्यामुळे तो अपवित्र होत नाही. (३)
नैतत्समाचरेज्जातु मनसापि ह्यनीश्वरः ।
विनश्यत्याचरन्मौढ्याद् यथारुद्रोऽब्धिजं विषम् ॥ ३१ ॥
सामर्थ्य नसता तैसे चित्ती ते स्मरुही नये । मूर्खत्वे नाश तो होय हलाहल पियी शिव ॥ ३१ ॥
अनीश्वरः - असमर्थ अशा मनुष्याने - जातु - केव्हाही - मनसा अपि - मनानेसुद्धा - न समाचरेत् - आचरण करू नये - मौढयात् (एतत्) आचरन् (पुरुषः) - मूर्खापणाने याचे आचरण करणारा मनुष्य - (यथा अब्धिजं विषं पिबन्) - ज्याप्रमाणे समुद्रमंथनापासून झालेले विष पिणारा शंकरावाचून - अरुद्रः (तथा) - अन्य मनुष्य त्याप्रमाणे - विनश्यति - नाश पावतो. ॥३१॥
ज्या लोकांच्या अंगी असे सामर्थ्य नसते, त्यांनी मनानेसुद्धा अशा गोष्टी करता कामा नयेत. एखाद्याने मूर्खपणामुळे असे कृत्य केलेच, तर त्याचा नाश होतो. जसे भगवान शंकर हालाहल विष प्याले, म्हणून दुसरा कोणी पिईल, तर तो जळून जाईल. (३१)
ईश्वराणां वचः सत्यं तथैवाचरितं क्वचित् ।
तेषां यत् स्ववचोयुक्तं बुद्धिमांस्तत् समाचरेत् ॥ ३२ ॥
शिवादी ईश्वरो त्यांचा बोध जै वागणे तसे । आचार करणे त्यांचा सर्वथैव अशक्यची ॥ ३२ ॥
ईश्वराणां वचः सत्यं (अस्ति) - समर्थांचे भाषण खरे असते - तथा आचरितं क्वचित् एव (अस्ति) - त्याप्रमाणे आचरण क्वचितच असते - बुद्धिमान् - शहाण्या मनुष्याने - यत् - जे - तेषां स्ववचोयुक्तं (अस्ति) - त्याच्या भाषणाशी जुळणारे असेल - तत् - ते - समाचरेत् - आचरण करावे. ॥३२॥
म्हणून जे थोर आहेत, त्यांचा उपदेश नेहमी सत्य असतो. आणि आचरण काही वेळा सत्य असते; म्हणून बुद्धिमान माणसाने त्यांचे जे आचरण त्यांच्या उपदेशानुसार असेल, तेवढेच आपल्या जीवनात उतरविले पाहिजे. (३२)
कुशलाचरितेनैषां इह स्वार्थो न विद्यते ।
विपर्ययेण वानर्थो निरहङ्कारिणां प्रभो ॥ ३३ ॥
अहंकार नसे त्यांना न स्वार्थ मुळि त्याजला । अनर्थ न घडे त्यांच्या वर्तने कधिही तसा ॥ ३३ ॥
प्रभो - हे राजा - निरहंकारिणां एषां - अहंकाररहित अशा समर्थांना - इह - या जगात - कुशलाचरितेन - उत्तम आचरणाने - (कश्चित्) स्वार्थः - काही स्वतःचे हित - वा - किंवा - विपर्ययेण (कश्चित्) अनर्थः - विपरीत वर्तनाने काही अनहित - न विद्यते - नसते. ॥३३॥
परीक्षिता ! अशा सामर्थ्यवान पुरुषांच्या अंगी ’कर्ताभाव’ नसतो. शुभकर्म करण्यामध्ये त्यांचा काहीही स्वार्थ नसतो आणि अशुभ कर्म करण्याने त्यांचे काही नुकसान होत नाही. (३३)
किमुताखिलसत्त्वानां तिर्यङ् मर्त्यदिवौकसाम् ।
ईशितुश्चेशितव्यानां कुशलाकुशलान्वयः ॥ ३४ ॥
पशूपक्षी मनुष्यांचा प्रभू एकचि तो हरी । मानवी मापदंडाने मोजणे शक्य हे कसे ॥ ३४ ॥
ईशितव्यानां - संरक्षण करण्यास योग्य अशा - तिर्यङमर्त्यदिवौकसां - पशु, पक्षी इत्यादि प्राणी मनुष्ये व देव या - अखिलसत्त्वानां - सर्व प्राणिमात्रांच्या - ईशितुः - नियामकाला - कुशलाकुशलान्वयः - चांगल्यावाईटांचा संबंध - नास्ति इति किमुत (वक्तव्यम्) - नसतो काय हे आणखी सांगावयास पाहिजे. ॥३४॥
असे जर आहे, तर मग जे पशू, पक्षी, मनुष्य, देव इत्यादी सर्व चराचर जीवांचे स्वामी आहेत, त्यांच्याशी मानवाच्या बाबतीतील शुभ आणि अशुभ यांचा संबंध कसा जोडता येईल ? (३४)
( वसंततिलका )
यत्पादपङ्कजपरागनिषेवतृप्ता योगप्रभावविधुताखिलकर्मबन्धाः । स्वैरं चरन्ति मुनयोऽपि न नह्यमानाः तस्येच्छयाऽऽत्तवपुषः कुत एव बन्धः ॥ ३५ ॥
( वसंततिलका ) ती पायधूळ हरिची भजकास तृप्ती योग्यासि धान्य् मिळते पद सिद्ध मुक्ती । भक्तार्थ तो हरिही ये प्रगटोनि रूपी त्यां कर्मबंध कसले नच कल्पना हो ॥ ३५ ॥
यत्पादपङकजपरानिषेवतृप्ताः - ज्यांच्या चरणकमळांच्या परागांच्या सेवनाने तृप्त झालेले - योगप्रभाव - योगाच्या सामर्थ्याने - विधुताखिलकर्मबन्धाः - नष्ट झाली आहेत कर्मांची बंधने ज्यांची असे - मुनयः अपि - ऋषीसुद्धा - न नह्यमानाः (सन्तः) - न बांधले जाणारे होत्साते - स्वैरं चरन्ति - यथेच्छ संचार करितात - इच्छया - स्वेच्छेने धारण केले आहे - आत्तवपुषः तस्य - शरीर ज्याने अशा श्रीकृष्णाला - बन्धः कुतः एव (अस्ति) - बंध कोठून असणार. ॥३५॥
ज्यांच्या चरणकमलांच्या परागांचे सेवन करून भक्तजन तृप्त होतात, ज्यांच्याशी जोडले गेलेले योगी त्याच्या प्रभावाने आपली सर्व कर्मबंधने तोडून टाकतात आणि ज्यांचे तत्त्व जाणणारे ज्ञानी पुरुष स्वच्छंदपणे वागूनही कर्मबंधनात अडकत नाहीत, तेच भगवान स्वतःच्या इच्छेने आपले स्वरूप प्रगट करतात, त्यांना कर्मबंधन कोठून असणार ? (३५)
( अनुष्टुप् )
गोपीनां तत्पतीनां च सर्वेषामेव देहिनाम् । योऽन्तश्चरति सोऽध्यक्षः क्रीडनेनेह देहभाक् ॥ ३६ ॥
( अनुष्टुप् ) गोप गोपी नि जीवांचा आंतरात्मा महापती । तो दिव्य चिन्मयी रूपे लीला या करितो अशा ॥ ३६ ॥
यः - जो - गोपीनां तत्पतीनां च - गोपींच्या, त्यांच्या पतींच्या, - सर्वेषां एव देहिनां - किंबहुना सर्वच प्राणिमात्रांच्या - अन्तः चरति - अंतःकरणात राहतो - सः अध्यक्षः - तो परमेश्वर - इह - ह्या लोकी - क्रीडनेन - लीलेने - देहभाक् (जातः) - देहधारी झाला. ॥३६॥
गोपी, त्यांचे पती आणि सर्व जीव यांच्या अंतःकरणामध्ये जे आत्मरुपाने विराजमान आहेत, जे सर्वांचे साक्षी आहेत, त्यांची देह धारण करणे ही केवळ लीला आहे. (३६)
अनुग्रहाय भूतानां मानुषं देहमास्थितः ।
भजते तादृशीः क्रीड याः श्रुत्वा तत्परो भवेत् ॥ ३७ ॥
मनुष्यरूप तो घेतो कृपा ती करण्या जिवां । ज्या लीला ऐकता जीव भगवत् भक्त होतसे ॥ ३७ ॥
भूतानां अनुग्रहाय - प्राणिमात्रांच्या अनुग्रहासाठी - मानुषं देहं आस्थितः - मनुष्यदेहाचा आश्रय केलेला - तादृशीः क्रीडाः भजते - तसे खेळ करतो - याः - जे ऐकून - (मनुष्यः) तत्परः भवेत् - मनुष्य त्याच्या ठिकाणी गढून गेलेला होईल. ॥३७॥
भगवान (प्रपंचसुखांत रमलेल्या) जीवांवर कृपा करण्यासाठीच स्वतःला मनुष्यरूपाने प्रगट करतात आणि तशाच क्रीडा करतात की, ज्या ऐकून जीवांनी भगवत्परायण व्हावे. (३७)
नासूयन् खलु कृष्णाय मोहितास्तस्य मायया ।
मन्यमानाः स्वपार्श्वस्थान् स्वान् स्वान् दारान् व्रजौकसः ॥ ३८ ॥
मुळीच नव्हती गोपा हरिसी दोषबुद्धि ती । योगमाये तयां वाटे आपणा पाशि पत्नि ही ॥ ३८ ॥
तस्य मायया मोहिताः - त्याच्या मायेने मूढ झालेले - स्वान् स्वान् दारान् - आपापल्या स्त्रियांना - स्वपार्श्वस्थान् मन्यमानाः - आपल्या बाजूला असलेल्या असे मानणारे - व्रजौकसः - गोकुळवासी लोक - खलु - खरोखर - कृष्णाय न असूयन् - श्रीकृष्णाचा मत्सर करते झाले नाहीत. ॥३८॥
व्रजवासी गोपांना श्रीकृष्णांबद्दल मुळीच मत्सर वाटला नाही. कारण ते त्यांच्या योगमायेने मोहित होऊन असे समजत होते की, आपल्या पत्न्या आपल्याजवळच आहेत. (३८)
ब्रह्मरात्र उपावृत्ते वासुदेवानुमोदिताः ।
अनिच्छन्त्यो ययुर्गोप्यः स्वगृहान् भगवत्प्रियाः ॥ ३९ ॥
ब्रह्मरात्र अशी गेली मुहूर्त ब्राह्म पातले । कृष्णाज्ञे पातल्या गेही संकल्पे इच्छिती हरी ॥ ३९ ॥
ब्रह्मरात्रे उपावृत्ते (सति) - ब्राह्ममुहुर्त प्राप्त झाला असता - वासुदेवानुमोदिताः - श्रीकृष्णाने अनुमोदन दिलेल्या - भगवत्प्रियाः - भगवंताच्या प्रिय असलेल्या अशा - गोप्यः - गोपी - अनिच्छन्त्यः (अपि) - इच्छा नसताहि - स्वगृहान् ययुः - आपल्या घरी गेल्या. ॥३९॥
ब्राह्ममुहूर्त आला. (पहाट झाली.) आपल्या घरी परत जाण्याची गोपींची जरी इच्छा नव्हती, तरी भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञेने भगवंतांना प्रिय असणार्या गोपी आपापल्या घरी निघून गेल्या. (३९)
( वसंततिलका )
विक्रीडितं व्रजवधूभिरिदं च विष्णोः श्रद्धान्वितोऽनुश्रृणुयादथ वर्णयेद्यः । भक्तिं परां भगवति प्रतिलभ्य कामं हृद्रोगमाश्वपहिनोत्यचिरेण धीरः ॥ ४० ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे पूर्वार्धे रासक्रीडावर्णनं नाम त्रयोत्रिंशोऽध्यायः ॥ ३३ ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
( वसंततिलका ) विक्रीडती व्रजवधू हरिच्याच ध्यानी ऐके तयास मिळते हरिभक्ति शुद्ध । नी शुद्धची हृदय हो अन मुक्ति कामीं कामस्वभाव जळतो अशि ही लिला की ॥ ४० ॥ ॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर तेहेतिसावा अध्याय हा ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
यः श्रद्धान्वितः (सन्) - जो श्रद्धेने युक्त असा होत्साता - विष्णोः व्रजवधूभिः (सह) - श्रीकृष्णाची गोकुळांतील स्त्रियांसह - इदं विक्रीडतं - झालेली ही क्रीडा - अनुश्रृणुयात् - ऐकेल - अथ वर्णयेत् - व वर्णन करील - (सः) भगवति - तो भगवंताच्या ठिकाणी - परांभक्तिं उपलभ्य - श्रेष्ठ प्रकारची भक्ति मिळवून - अचिरेण धीरः (सन्) - लवकरच जितेंद्रिय होत्साता - हृद्रोगं कामं - हृदयाचा रोग असा जो काम त्याला - आशु अपहिनोति - त्वरित नष्ट करितो. ॥४०॥
परीक्षिता ! जो ज्ञानी मनुष्य श्रीकृष्णांची गोपींबरोबरची ही रास-लीला श्रद्धेने वारंवार श्रवण करतो आणि तिचे वर्णन करतो, त्याला भगवंतांच्या चरणांविषयी परम भक्तीची प्राप्ती होते आणि तो तत्काळ कामभावनेपासून स्वतःची सुटका करून घेतो. (४०)
विवरण :- रासक्रीडेचे वर्णन समाप्त करणारा अध्यायातील शेवटचा श्लोक, त्यातील शब्दयोजना समर्पक आहे. ही कथा सर्वांनी श्रद्धेने श्रवण करावी. इतरांनाहि कथन करावी. कारण त्यामुळे हृद्रोग आणि काम यांचा ताबडतोब नाश होतो. काम 'अवाजवी काम' नाश करणारी कथा (आणि तेही लगेच) यावरूनच परीक्षिताला (त्याच्या रूपाने सर्वसामान्य इतरेजनांना) आलेली शंका किती फोल होती हे ध्यानी येते; मन शांत व शुद्ध करण्याला या कथेसारखे दुसरे औषध नाही. (४०) अध्याय तेहतिसावा समाप्त |