श्रीमद् भागवत पुराण
दशमः स्कन्धः
त्रिंशोऽध्यायः

गोपीद्वारा भगवतो अनुसन्धानं तदाचरितानुकरणं
यमुनापुलिने तदागम प्रतीक्षणं च -

श्रीकृष्णांच्या विरहात गोपींची अवस्था -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् )
अन्तर्हिते भगवति सहसैव व्रजाङ्‌गनाः ।
अतप्यन् तं अचक्षाणाः करिण्य इव यूथपम् ॥ १ ॥
( अनुष्टुप् )
श्रीशुकदेव सांगतात -
अचानक हरु गुप्त होता तै व्रजयूवती ।
हत्तिणी गजराजाच्या विना जै दुःखि जाहल्या ॥ २ ॥

भगवति सहसा एव अन्तर्हिते (सति) - श्रीकृष्ण एकाएकीच गुप्त झाला असता - तं अचक्षाणाः व्रजाङ्‌गनाः - त्याला न पाहणार्‍या गोपी - यूथपं (अचक्षाणाः) करिण्यः इव - कळपाचा नायक अशा हत्तीला न पाहणार्‍या हत्तीणींप्रमाणे - अतप्यम् - दुःख पावल्या. ॥१॥

श्रीशुक म्हणतात - भगवान अचानकपणे अंतर्धान पावले, तेव्हा गजराजाविना हत्तिणी जशा दुःखी होतात, तशा व्रजयुवती ते दिसत नाहीत, असे पाहून दुःखाने व्याकूळ झाल्या. (१)


( मिश्र )
गत्यानुरागस्मितविभ्रमेक्षितै-
     र्मनोरमालापविहारविभ्रमैः ।
आक्षिप्तचित्ताः प्रमदा रमापते-
     स्तास्ता विचेष्टा जगृहुस्तदात्मिकाः ॥ २ ॥
( इंद्रवज्रा )
हत्तीपरी कृष्णहि चालतो नी
     नेत्रेनि हास्ये मन चोरितो की ।
शृंगारभावे हरि चोरि चित्त
     त्या मत्त गोपी हरिरूप झाल्या ॥ ३ ॥

रमापतेः - लक्ष्मीपतीच्या - गत्या - चालण्याने - अनुरागस्मितविभ्रमेक्षितैः - प्रेमाने गालातल्या गालात हसणे व सभोवार पाहणे यांनी - मनोरमालापविहारविभ्रमैः - मनाला आनंद देणारी भाषणे, हावभाव व शृंगारचेष्टा यामुळे - आक्षिप्तचित्ताः - आकर्षिली आहेत अन्तःकरणे ज्यांची अशा - तदात्मिकाः (ताः) - तन्मय झालेल्या त्या गोपी - ताः ताः विचेष्टाः जगृहुः - त्या त्या चेष्टा करित्या झाल्या. ॥२॥

श्रीकृष्णांची चाल, प्रेमपूर्ण स्मितहास्य, विलासयुक्त नेत्रकटाक्ष, मनोरम प्रेमालाप, वेगवेगळ्या प्रकारच्या लीला आणि हावभाव यांनी त्यांचे चित्त वेधून घेतले होते. त्यामुळे श्रीकृष्णमय झालेल्या गोपी त्यांच्या वेगवेगळ्या कृतींचे अनुकरण करू लागल्या. (२)


गतिस्मितप्रेक्षणभाषणादिषु
     प्रियाः प्रियस्य प्रतिरूढमूर्तयः ।
असावहं त्वित्यबलास्तदात्मिका
     न्यवेदिषुः कृष्णविहारविभ्रमाः ॥ ३ ॥
कृष्णापरी बोलल्या चालल्या त्या
     गती मतीने हरिरूप आले
देहाभिमाना विसरूनि सार्‍या
     मी कृष्ण शब्दे वदती पहा की ॥ ३ ॥

कृष्णविहारविभ्रमाः - श्रीकृष्णासारखे आहेत हावभाव व शृंगारचेष्टा ज्यांच्या अशा - तदात्मिकाः - तन्मय झालेल्या - प्रियस्य प्रियाः - प्रियकर अशा कृष्णाच्या आवडत्या अशा - (तस्य) गतिस्मितप्रेक्षणभाषणादिषु - त्यांचे चालणे, गालातल्या गालात हसणे, पाहणे, बोलणे - प्रतिरूढमूर्तयः - इत्यादिकांत मुरले आहेत देह ज्यांचे अशा - (ताः) अबलाः - त्या स्त्रिया - असौ अहं (एव अस्मि) - तो श्रीकृष्ण मीच आहे - इति न्यवेदिषुः - असे सांगत्या झाल्या. ॥३॥

आपल्या प्रियतमाच्या चालण्याची लकब, हास्य, पाहणे, बोलणे इत्यादि बाबतीत त्या गोपी त्यांच्या सारख्याच होऊन गेल्या, त्यांच्या शरीरांमध्ये तीच हालचाल, त्याच भाव-भावना उतरल्या. त्या स्वतःला संपूर्णपणे विसरून श्रीकृष्णस्वरूप झाल्या आणि त्यांच्याच लीलाविलासाचे अनुकरण करीत "मीच श्रीकृष्ण आहे" असे म्हणू लागल्या. (३)


गायन्त्य उच्चैरमुमेव संहता
     विचिक्युरुन्मत्तकवद् वनाद् वनम् ।
पप्रच्छुराकाशवदन्तरं बहिः
     भूतेषु सन्तं पुरुषं वनस्पतीन् ॥ ४ ॥
गावोनी लीला हरिच्याच त्यांनी
     वना वना माजिहि धुंडिला तो ।
तो सर्वव्यापी नच दूर जायी
     तरीहि वृक्षां पुसतात गोपी ॥ ४ ॥

संहताः - एकत्र जमलेल्या - अमुं एव उच्चैः गायन्त्यः - त्या श्रीकृष्णालाच मोठ्याने गाणार्‍या अशा - उन्मत्तकवत् - वेडयाप्रमाणे - वनात् वनं विचिक्युः - वनामागून वन शोधत्या झाल्या - आकाशवत् भूतेषु - आकाशाप्रमाणे प्राणिमात्राच्या ठिकाणी - अन्तरं बहिः सन्तं पुरुषम् - आत व बाहेर असणार्‍या अशा पुरुषाविषयी - वनस्पतीन् प्रपच्छ - वृक्षांना विचारत्या झाल्या. ॥४॥

त्या सर्वजणी एकत्र येऊन उच्च स्वरात त्यांच्याच गुणांचे गायन करीत वेड्यासारख्या एका वनातून दुसर्‍या वनात त्यांना शोधू लागल्या. श्रीकृष्ण सर्व जड चेतन पदार्थांमध्ये आकाशाप्रमाणे आत-बाहेर व्यापलेले असूनही गोपी मात्र वनस्पतींना त्यांचा ठावठिकाणा विचारू लागल्या. (४)


( अनुष्टुप् )
दृष्टो वः कच्चिदश्वत्थ प्लक्ष न्यग्रोध नो मनः ।
नन्दसूनुर्गतो हृत्वा प्रेमहासावलोकनैः ॥ ५ ॥
( अनुष्टुप् )
पिंपळा पांगर्‍या गेला नंदाचा नंदनू पहा ।
चोरोनी आमुचे चित्त तुम्ही तो पाहिलात का ? ॥ ५ ॥

अश्वत्थ प्लक्ष न्यग्रोघ - हे पिंपळा, हे पिंपरी, हे वडा - प्रेमहासावलोकनैः नः - प्रेम, हसणे व पाहणे यांच्या योगे आमचे - मनः हत्वा गतः नन्दसूनुः - मन हरण करून गेलेला नंदाचा पुत्र - वः कच्चित् दृष्टः - तुम्हाला कोठे दिसला काय? ॥५॥

हे पिंपळा ! हे पिंपरे ! हे वटवृक्षा ! नंदनंदन आपल्या प्रेमपूर्ण स्मितहास्याने आणि नेत्रकटाक्षांनी आमचे मन चोरून घेऊन गेले आहेत. तुम्ही त्यांना पाहिलेत काय ? (५)


कच्चित् कुरबकाशोक नागपुन्नागचम्पकाः ।
रामानुजो मानिनीनां अमितो दर्पहरस्मितः ॥ ६ ॥
चाफ्या पुन्नाग वृक्ष्यांनो बंधू जो बलरामचा ।
हासता अप्सरा मोही आला का तो इथे वदा ॥ ५ ॥

कुरबकाशोक - हे तांबडे कोर्‍हाटे, हे अशोका, - नागपुन्नागचम्पकाः - हे नागचाफ्या, हे उंडीणी, हे सोनचाफ्या - मानिनीनाम् दर्पहर - मानी स्त्रियांचा गर्व हरण करणारे आहे - स्मितः - गालातल्या गालात हसणे ज्याचे - रामानुजः - असा बलरामाचा धाकटा भाऊ - इतः गतः कच्चित् - येथून गेला का ? ॥६॥

हे कोरांटे ! अशोका ! नागकेशरा ! पुन्नागा ! चाफ्या ! ज्यांच्या केवळ स्मितहास्याने मानिनींचा मान धुळीला मिळतो, ते बलरामांचे धाकटे भाऊ येथे आले होते काय ? (६)


कच्चित्तुलसि कल्याणि गोविन्दचरणप्रिये ।
सह त्वालिकुलैर्बिभ्रद् दृष्टस्तेऽतिप्रियोऽच्युतः ॥ ७ ॥
बहिणी तुळशी सांग तू तो कोमल सांग की ।
तुझे तो हरिशी प्रेम श्याम तो पाहिलास कां ॥ ७ ॥

गोविन्दचरणप्रियै - गोविंदाचे चरण आहेत प्रिय जिला - तुलसि - अशा हे सुदैवी तुळशी - अलिकुलैः सह त्वा बिभ्रत् - भुंग्याच्या समुदायासह तुला धारण करणारा - ते अतिप्रियः अच्युतः - तुझा अत्यंत आवडता असा श्रीकृष्ण - दृष्टः कच्चित् - तू पाहिलास काय ? ॥७॥

हे कल्याण करणार्‍या तुळशी ! भगवंतांच्या चरणांना तू आवडतेस. म्हणूनच भ्रमर पिंगा घालीत असूनही ते तुझी माळ घालतात. तू आपल्या प्रियतम अच्युताला पाहिलेस काय ? (७)


मालत्यदर्शि वः कच्चित् मल्लिके जाति यूथिके ।
प्रीतिं वो जनयन् यातः करस्पर्शेन माधवः ॥ ८ ॥
मालती मल्लिके जाई माधवा पाहिलेत का ।
कोवळा स्पर्श देवोनी गेला का इकडे कुठे ॥ ८ ॥

मालति मल्लिके जाति यूथिके - हे मालती, हे मोगरी, हे जाई, हे जुई - करस्पर्शेण वः - हाताच्या स्पर्शाने तुम्हाला - प्रीतिं जनयन् यातः माधवः - आनंद उत्पन्न करीत गेलेला श्रीकृष्ण - वः अदर्शि कच्चित् - तुम्ही पाहिला असावा. ॥८॥

हे मालती ! मल्लिके ! जाई आणि जुई ! प्रिय माधवाला तुम्ही पाहिलेत काय ? आपल्या हातांनी स्पर्श करून तुम्हांला आनंदित करीत ते येथून गेले असणार ! (८)


( वसंततिलका )
चूतप्रियालपनस आसन कोविदार
     जम्ब्वर्कबिल्वबकुल आम्रकदम्बनीपाः ।
येऽन्ये परार्थभवका यमुनोपकूलाः
     शंसन्तु कृष्णपदवीं रहितात्मनां नः ॥ ९ ॥
( वसंततिलका )
जांभूळ बेल कचनार नि आम्रवृक्षा
     नी लिंब नी तरुवरो यमुना तटीचे ।
तुम्ही परार्थ जगता हरिवीण आम्ही
     बेशुद्ध हो‍उ बघतो हरिमार्ग सांगा ॥ ९ ॥

चूतप्रियालपनसासम - रायवळ आंबा, खिरणी, फणस, असाणा, - कोविदारजम्ब्बर्क - कांचन, जांभूळ, रुई, - बिल्वबकुलाम्र - बेल, बकुळ, आंबा, - कदम्बनीपाः - कळंब, व नील अशोक अशा वृक्षांनो - च - तसेच - परार्थभवकाः - दुसर्‍याच्या हितासाठी आहे जन्म असे - ये अन्ये यमुनोपकूलाः (ते) - जे दुसरे यमुनेच्या तीरावर असणारे वृक्ष ते - रहितात्मनां नः - शून्य अंतःकरणाच्या आम्हाला - कृष्णपदवींशंसन्तु - कृष्णाचा मार्ग सांगोत. ॥९॥

आम्रवृक्षा ! चारा ! फणसा ! आसण्या ! कांचना ! जांभळा ! रुई ! बेला ! बकुळा ! आम्रा ! कदंबा ! दुपारी ! तसेच इतर यमुनेच्या तीरावर असलेल्या परोपकारी वृक्षांनो ! श्रीकृष्णांशिवाय सुन्या झालेल्या आम्हांला त्यांचा मार्ग सांगा. (९)

विवरण :- रासक्रीडेच्या वेळी गोपींना झालेला गर्व चतुर कृष्णाने ओळखला आणि त्यांना धडा शिकविण्यासाठी लगेच तो अंतर्धान पावला. बेभान झालेल्या गोपी शुद्धीवर आल्या अन् आता 'विषादयोग' सुरू झाला. विषादाशिवाय भगवंताची प्राप्ती नाही, हे ही वास्तव. कृष्ण कुठेही न दिसल्याने त्या वेडयापिशा, सैरभैर झाल्या, त्याला सगळीकडे शोधू लागल्या. त्यांच्या मनाचा तोल इतका ढळला की त्यावेळी झाडे, पाने, फुले, फळे यांनाहि त्या कृष्णाचा ठाव-ठिकाणा विचारू लागल्या. (कदाचित वृक्ष दयाळू असल्याने आपणांस कृष्णाचा ठाव-ठिकाणा सांगतील, अशीही आशा असावी.) अशीच अवस्था सीताहरणानंतर प्रभु रामचंद्रांचीही झाली होती. पराकोटीचे संयमी असूनहि ते वृक्ष वेली, पशु-पक्षांना सीतेचा माग विचारत होते. मग या तर बिचार्‍या भाबडया गोपी ! त्यांना कुठला इतका विवेक ? वास्तविक या सर्व अचेतन गोष्टी, बोलू शकतील का ? पण कामार्ताना इतके भान कुठले ? (कामार्ताहिप्रकृतिकृपणाश्चेतनाचेतनेषु ।) तसे जर असते तर कालिदासाच्या विरही यक्षाने आपला प्रेम संदेश मेघामार्फत आपल्या प्रियेकडे कसा पाठविला असता ? कामार्ताना सगळीकडे फक्त आणि फक्त आपली प्रिय व्यक्तीच दिसते, तिच्याखेरीज सर्व जग तुच्छ, आणि तिचा विरह झाला की ते इतके वेडे-पिसे होतात, की त्यांचा सारासार विवेक, विचारशक्ती नाहीशी होते, आणि दिसेल त्या वस्तूला मग ती चेतन-अचेतन कशीही असो, ते आपल्या प्रियाचा ठावा-ठिकाणा विचारत राहतात. (२-९)



किं ते कृतं क्षिति तपो बत केशवाङ्‌घ्रि ।
     स्पर्शोत्सवोत्पुलकिताङ्‌गरुहैर्विभासि ।
अप्यङ्‌घ्रिसम्भव उरुक्रमविक्रमाद् वा
     आहो वराहवपुषः परिरम्भणेन ॥ १० ॥
हे प्रेयसी पृथिविगे तप काय केले
     रोमांच तूज उठती हरिपाद स्पर्शे ।
तो वामनोचि तुज व्यापितसे पदाने
     कां त्या वराह हरिने तुज धन्य केले ॥ १० ॥

क्षिति - हे पृथ्वी - बत - खरोखर - ते किं तपः कृतम् - तू कोणते तप केलेस - केशवाङ्‌घ्रि - श्रीकृष्णाच्या पायाच्या - स्पर्शोत्सवोत्पुलकिताङगरुहैः - स्पर्शामुळे झालेल्या आनंदामुळे उभ्या राहिलेल्या रोमांचांनी - विभासि - तू शोभत आहेस - अपि (अयं ते उत्सवः केशवस्य) - मग काय हा तुझा आनंद श्रीकृष्णाच्या - अङ्‌घ्रिसंभवः (अस्ति) - पादस्पर्शामुळे उत्पन्न झालेला आहे - वा - किंवा - उरुविक्रमात् (अस्ति) - वामनावतारी विष्णूपासून आहे - आहो (स्वित्) - अथवा - वराहवपुषः - वराहरूपी श्रीविष्णूच्या - परिरम्भणे (जातः) - आलिंगनामुळे झालेला आहे. ॥१०॥

हे पृथ्वीदेवी ! तू अशी कोणती तपश्चर्या केली आहेस की, ज्यामुळे श्रीकृष्णांच्या चरणस्पर्शाच्या आनंदाने गवत-वेली इत्यादीच्या रूपाने अंगावर आलेले रोमांच प्रकट करीत आहेस ! तुझा हा आनंद श्रीकृष्णांच्या चरणस्पर्शामुळे आहे की, वामनावतारामध्ये त्यांनी तुला चरणाने मोजले होते, त्यामुळे आहे ? की त्याही अगोदर वराहांच्या अंगस्पर्शाने तुझी ही स्थिती झाली नाही ना ? (१०)

विवरण :- विरहार्त गोपींना लता-वेली-वृक्ष यांचेकडून कृष्णाबद्दल काहीच न कळल्याने त्यांनी आपला मोर्चा भूमीकडे वळविला. तिला कृष्णाचा चरणस्पर्श नक्कीच झाला असला पाहिजे, म्हणूनच तिच्या शरीरावर तृणपात्यांच्या रूपाने हे रोमांच उभे राहिले. (विष्णूने वामनावतारात भूमीवर बळीच्या मस्तकावर पाय ठेऊन त्याला पाताळात ढकलून दिले, तसेच त्याचे जे दहा अवतार आहेत, त्यापैकी वराह अवतारात त्याने पृथ्वीला तोलून धरले होते, त्यावेळी त्रिविक्रमाचा स्पर्श झाला होताच. केवढे हे भाग्य !) जर आता तुला स्पर्श झाला आहे तर आम्हांला त्याचा माग सांग. (त्याच्याबद्दल सांग हे महत्त्वाचे) (१०)



अप्येणपत्‍न्युपगतः प्रिययेह गात्रैः
     तन्वन् दृशां सखि सुनिर्वृतिमच्युतो वः ।
कान्ताङ्‌ग सङ्‌गकुचकुङ्‌कुम रञ्जितायाः
     कुन्दस्रजः कुलपतेरिह वाति गन्धः ॥ ११ ॥
गे मैत्रिणी हरिणिनो हरि श्यामरूपी
     गेला इथूनि नजरा चुकवीत कान्हा ?
तो गंध येइ इकडे हरि कुंदमालीं
     जो कुंकुमे नि हरिसंगि असाचि भासे ॥ ११ ॥

सखि एणपत्नि - हे सखि हरिणांगने - गात्रैः वः - अवयवांच्या योगाने तुमच्या - दृशां सुनिर्वृतिं तन्वन् - दृष्टीला अत्यंत संतोष देणारा - अच्युतः - श्रीकृष्ण - प्रियया सह अपि उपगतः - आवडत्या स्त्रीबरोबर येथून गेला काय - कुलपतेः - श्रीकृष्णाच्या - कान्ताङ्गसङग - कांतेच्या अंगसंगामुळे - कुचकुंकुमरञ्जितायाः - तिच्या स्तनांवरील केशराने रंगलेल्या - कुन्दस्रजः - कुंदपुष्पांच्या माळेचा - गन्धः - सुवास - इह वाति - येथे वाहत आहे. ॥११॥

अग गडे हरिणी ! आपल्या शरीरदर्शनाने तुमच्या डोळ्यांना परमानंदाचे दान करीत श्रीकृष्ण आपल्या प्रियेसह येथून तर गेले नाहीत ना ? कारण त्यांच्या कुंदकळ्यांच्या माळेचा सुगंध येथे येऊ लागला आहे. जी माळ त्यांच्या प्रियेच्या अंगस्पर्शाच्यावेळी लागलेल्या स्तनावरील केशराने केशरी झालेली आहे. (११)

विवरण :- गोपी पुढे म्हणतात, 'कृष्ण आपल्या प्रियेसह येथून गेला असणार, हे एकूण खाणांखुणांवरून उघड होते. येथे 'प्रियया सह' हा मुद्दा महत्त्वाचा. त्याही अवस्थेत हे सुचले हे विशेष. (११)



बाहुं प्रियांस उपधाय गृहीतपद्मो
     रामानुजस्तुलसि कालिकुलैर्मदान्धैः ।
अन्वीयमान इह वस्तरवः प्रणामं
     किं वाभिनन्दति चरन् प्रणयावलोकैः ॥ १२ ॥
एका करात कमळो दुसरा प्रियेसी
     माळा गळ्यात तुळशी नित भृंगनाद ।
ऐशा हरीस नमिण्या तुम्हि वाकला का
     प्रेमे तुम्हा बघितले नच काय थोडे ॥ १२ ॥

किं वा - किंवा - तरवः - हे वृक्षांनो - गृहीतपद्मः - घेतलेले आहे कमळ ज्याने असा - मदान्धैः - मदाने अंध झालेल्या अशा - तुलसिकालिकुलैः - तुळशीवरील भुंग्यांच्या समुदायांनी - अन्वीयमानः - अनुसरलेला असा - रामानुजः - बळरामाचा धाकटा भाऊ - प्रियांसे बाहुं उपधाय - प्रियेच्या खांद्यावर हात ठेवून - इह चरन् - येथे फिरत असता - प्रणयावलोकैः - प्रेमळ अशा दृष्टीने - वः प्रणामं - तुमच्या नमस्काराचे - अभिनन्दति किम् - अभिनंदन करतो काय ? ॥१२॥

हे वृक्षांनो ! तुळशीच्या सुगंधाने धुंद झालेले भ्रमर ज्यांचा पाठलाग करीत आहेत, ज्यांच्या एका हातात कमळ असून दुसरा हात प्रियेच्या खांद्यावर ज्यांनी ठेवलेला असेल, ते बलरामाचे धाकटे बंधू विहार करीत येथून गेले असतील. तुम्ही त्यांना वंदन करण्यासाठी झुकलेले असताना त्यांनी आपल्या प्रेमपूर्ण नजरेने तुमच्या वंदनाचा स्वीकार केला असेल ना ? (१२)


( अनुष्टुप् )
पृच्छतेमा लता बाहून् अप्याश्लिष्टा वनस्पतेः ।
नूनं तत्करजस्पृष्टा बिभ्रत्युत्पुलकान्यहो ॥ १३ ॥
( अनुष्टुप् )
वेलिंना पुसुया बाई वृक्षां आलिंगिती पहा ।
रोमांच अंगि यांच्या तो भाग्यची हरि स्पर्शियां ॥ १३ ॥

इमाः लताः पृच्छत - या लतांना तुम्ही विचारा - अहो - अहो - वनस्पतेः बाहून् आश्लिष्टाः अपि - झाडांच्या खांद्यांना बिलगलेल्या असताहि - नूनम् - बहुधा - तत्करजस्पृष्टाः - त्या श्रीकृष्णाच्या नखांनी स्पर्शिलेल्या अशा - उत्पुलकानि बिभ्रति - रोमांच धारण करीत आहेत. ॥१३॥

अग सख्यांनो ! या वेलींना विचारा बरे ! वृक्षरूप पतीच्या भुजांनी यांना आलिंगन दिले असले, तरी यांच्या शरीरावर जे कळ्यारूपी रोमांच उभे राहिले आहेत, ते भगवंतांच्या नखांच्या स्पर्शामुळेच आहेत ना ! (१३)


इत्युन्मत्तवचो गोप्यः कृष्णान्वेषणकातराः ।
लीला भगवतस्तास्ता ह्यनुचक्रुस्तदात्मिकाः ॥ १४ ॥
कंपल्या मत्त गोपी त्या कृष्णाला शोधिता तदा ।
आवेशे भगवत्‌लीला आचरूं लागल्या पहा ॥ १४ ॥

इति - याप्रमाणे - कृष्णान्वेषणकातराः - श्रीकृष्णाला शोधण्याच्या कामात व्याकुळ झालेल्या - तदात्मिकाः - तन्मय अशा - उन्मत्तवचः - वेडयाप्रमाणे भाषण करणार्‍या - गोप्यः - गोपी - भगवतः ताः ताः - श्रीकृष्णाच्या त्या त्या - लीलाः हि अनुचक्रुः - लीलांचे अनुकरण करत्या झाल्या. ॥१४॥

याप्रमाणे वेड्यासारखे बडबडणार्‍या गोपी श्रीकृष्णांना धुंडीत असताना व्याकूळ होत होत्या. आता तर त्या भगवन्मय होऊन भगवंतांच्या निरनिराळ्या लीलांचे स्वतः अनुकरण करू लागल्या. (१४)


कस्याचित् पूतनायन्त्याः कृष्णायन्त्यपिबत् स्तनम् ।
तोकयित्वा रुदत्यन्या पदाहन् शकटायतीम् ॥ १५ ॥
एक ती पूतना झाली दूजी कृष्ण पियी तिला ।
कुणी गाडा तशी झाली ठोकरी कृष्णरूपिणी ॥ १५ ॥

कृष्णायन्ती (गोपी) - कृष्णाप्रमाणे आचरण करणारी एक गोपी - पूतनायन्त्याः कस्याश्चित् - पूतनेप्रमाणे आचरण करणार्‍या कोण्या एका गोपीचा - स्तनं अपिबत् - स्तन पिती झाली - तोकायित्वा रुदती अन्या - लहान मुलाप्रमाणे होऊन रडणारी दुसरी गोपी - शकटायतीम् (गोपीम्) - शकटाप्रमाणे आचरण करणार्‍या गोपीला - पदा अहन् - पायाने मारिती झाली. ॥१५॥

एक पूतना झाली तर दुसरी श्रीकृष्ण होऊन तिचे स्तन पिऊ लागली. कुणी छकडा झाली, तर कुणी बाळकृष्ण होऊन रडत त्याला पायाची ठोकर मारून उलटून टाकले. (१५)


दैत्यायित्वा जहारान्यां एका कृष्णार्भभावनाम् ।
रिङ्‌गयामास काप्यङ्‌घ्री कर्षन्ती घोषनिःस्वनैः ॥ १६ ॥
बाळकृष्ण कुणी झाली तृणवर्त तशी कुणी ।
चालती रखडोनिया पैंजणे वाजती पदीं ॥ १६ ॥

एका दैत्यायित्वा - एक गोपी दैत्याप्रमाणे आचरण करून - कृष्णार्भभावनाम् - श्रीकृष्णाच्या बालपणाची भावना धारण करणार्‍या - अन्याम् - दुसर्‍या गोपीला - जहार - हरण करिती झाली - वा - आणि - घोषनिःस्वनैः - घागर्‍यांचा शब्द करून - अङघ्री कर्षन्ती - पाय ओढीत चालणारी - (अन्या) अपि - दुसरीहि एक गोपी - रिङगयामास - रांगती झाली. ॥१६॥

कोणी गोपी बाळकृष्ण झाली तर कुणी तृणावर्त दैत्याचे रूप धारण करून त्याला घेऊन गेली. एखादी गोपी पाय ओढीत पैंजण वाजवीत रांगू लागली. (१६)


कृष्णरामायिते द्वे तु गोपायन्त्यश्च काश्चन ।
वत्सायतीं हन्ति चान्या तत्रैका तु बकायतीम् ॥ १७ ॥
एक कृष्ण कुणी राम अन्य त्या गोप जाहल्या ।
वत्सासुर बकासूर वधाच्या करिती लिला ॥ १७ ॥

द्वे - दोन गोपी - कृष्णरामायिते (आस्ताम्) - कृष्ण-बलराम यांसारखे आचरण करणार्‍या झाल्या - तु - आणि - काश्चन - कित्येक गोपी - गोपायन्त्यः (आसन्) - गोपांप्रमाणे आचरण करणार्‍या झाल्या - तत्र च एका - आणि त्यांपैकी एक गोपी - वत्सायतीं हन्ति - वत्सासुराप्रमाणे आचरण करणार्‍या गोपीला मारले - अन्या तु - आणि दुसरी एक गोपी - बकायन्तीम् (हन्ति) - बकासुरासारखे आचरण करणार्‍या गोपीला मारले. ॥१७॥

एक कृष्ण झाली तर दुसरी बलराम आणि पुष्कळशा गोपी गोपाळ झाल्या. एक गोपी झाली वत्सासुर, तर दुसरी झाली बकासुर. मग दुसर्‍या गोपींनी श्रीकृष्ण होऊन वत्सासुर आणि बकासुर झालेल्या गोपींना मारले. (१७)


आहूय दूरगा यद्वत् कृष्णस्तं अनुवर्ततीम् ।
वेणुं क्वणन्तीं क्रीडन्तीं अन्याः शंसन्ति साध्विति ॥ १८ ॥
वनात बासुरीनादे पशुंना बोलवी कुणी ।
वाहवा वाहवा कोणे गोपरूपात बोलल्या ॥ १८ ॥

यद्वत् कृष्णः - ज्याप्रमाणे कृष्ण - दूरगाः (गाः) आहूय - दूर गेलेल्या गाईंना हाका मारी - तद्वत् - त्याप्रमाणे हाका मारून - तम् अनुकुर्वतीम् - त्याचे अनुकरण करणार्‍या - वेणुं क्वणन्तीम् - मुरली वाजविणार्‍या - क्रीडन्तीम् (गोपीम्) - खेळणार्‍या अशा गोपीला - अन्याः - दुसर्‍या गोपी - साधु इति शंसन्ति - उत्तम असे म्हणून वाखाणत्या झाल्या. ॥१८॥

जसे श्रीकृष्ण बासरी वाजवून लांब गेलेल्या गाईंना बोलावीत, तशी त्यांच्याप्रमाणे एक गोपी वेणू वाजवून खेळू लागली. तेव्हा बाकीच्या ’वाहवा ! वाहवा !!’ म्हणून तिची प्रशंसा करू लागल्या. (१८)


कस्याञ्चित् स्वभुजं न्यस्य चलन्त्याहापरा ननु ।
कृष्णोऽहं पश्यत गतिं ललितामिति तन्मनाः ॥ १९ ॥
कृष्ण ती जाहली कोणी सखीच्या गळि हात तो ।
टाकुनी वदते कैशी कृष्ण मी बघ चाल गे ॥ १९ ॥

तन्मनाः (काचित्) - कृष्णमय झालेली कोणी एक गोपी - कस्यांचित् - कोण्या एका गोपीच्या ठिकाणी - स्वभुजं न्यस्य - आपला हात ठेवून - अनु चलन्ती (सती) - मागून चालत असता - अपरान् इति आह - दुसर्‍या गोपींना असे म्हणाली - अहं कृष्णः (अस्मि) - मी कृष्ण आहे - (मे) ललितां गतिं पश्यत - माझे सुंदर चालणे पहा. ॥१९॥

एक गोपी स्वतःला श्रीकृष्ण समजून दुसर्‍या सखीच्या गळ्यात हात टाकून चालू लागे आणि दुसर्‍या गोपींना म्हणे - "अग ! मी श्रीकृष्ण आहे. तुम्ही माझे हे मनोहर चालणे पहा तर खरे !" (१९)


मा भैष्ट वातवर्षाभ्यां तत्त्राणं विहितं मय ।
इत्युक्त्वैकेन हस्तेन यतन्त्युन्निदधेऽम्बरम् ॥ २० ॥
गोपी - कृष्ण कुणी होता वदती वज्रवासिनो ।
न भ्यावे पावसा वार्‍या पहा गोवर्धनो असा ।
धरिला करि मी यावे ओढणी धरुनी तशी ॥ २० ॥

वातवर्षाभ्याम् - वारा व पाऊस या दोहोंना - मा भैष्ट - तुम्ही भिऊ नका - मया - मी त्यापासून - तत्राणं विहितं (अस्ति) - तुमचे संरक्षण केले आहे - इति उक्त्वा - असे म्हणून - यतन्ती - प्रयत्न करणारी एक गोपी - एकेन हस्तेन - एका हाताने - अम्बरं उन्निदधे - वस्त्र वर उचलून धरती झाली. ॥२०॥

एखादी गोपी श्रीकृष्ण होऊन म्हणे - "अरे व्रजवासियांनो ! तुम्ही वादळ-पावसाला भिऊ नका. त्यापासून वाचण्याचा उपाय मी शोधला आहे." असे म्हणून गोवर्धन उचलून डोक्यावर धरीत होती. (२०)


आरुह्यैका पदाऽऽक्रम्य शिरस्याहापरां नृप ।
दुष्टाहे गच्छ जातोऽहं खलानां ननु दण्डकृत् ॥ २१ ॥
एक ती कालिया झाली कृष्णेली शिरि पाय तो ।
ठेउनी वदते जा तू मी तो दुष्टासि मारितो ॥ २१ ॥

नृप - हे राजा - एका - एक गोपी - अपरां पदा आक्रम्य - दुसर्‍या एका गोपीला पायाने दाबून - (तस्याः च) आरुह्य - आणि तिच्या मस्तकावर चढून - आह - म्हणाली - दुष्ट अहे - हे दुष्ट सर्पा - गच्छ - चालता हो - ननु - अरे - खलानां दण्डधृक् - दुष्टांच्या करिता दंड धारण करणारा असा - अहं जातः (अस्मि) - मी अवतरलेलो आहे. ॥२१॥

परीक्षिता ! एक गोपी दुसरीच्या डोक्यावर पाय ठेवून वर चढून म्हणाली - "अरे दुष्ट सर्पा ! तू येथून निघून जा. दुष्टांचे दमन करण्यासाठीच मी जन्माला आलो आहे." (२१)


तत्रैकोवाच हे गोपा दावाग्निं पश्यतोल्बणम् ।
चक्षूंष्याश्वपिदध्वं वो विधास्ये क्षेममञ्जसा ॥ २२ ॥
एवढ्यात कुणी बाला वदते वन पेटले ।
नेत्रबंद करा तुम्ही तुम्हा मी वाचवीतसे ॥ २२ ॥

तत्र एका उवाच - त्यापैकी एक गोपी म्हणाली - हे गोपाः - गोप हो, - (एनं) उल्बणं दावाग्निं पश्यत - हा भयंकर वणवा पहा - आशु चक्षूंषि अपिदध्वम् - तुम्ही लवकर डोळे मिटा - अञ्जसा - अनायासाने - वः क्षेमं विधास्ये - मी तुमचे कल्याण करीन. ॥२२॥

इतक्यात एक गोपी म्हणाली - "अरे गोपाळांनो ! केवढा भयंकर वणवा पेटला आहे, पाहा ! तुम्ही ताबडतोब डोळे बंद करा. मी सहजपणे तुमचे त्यापासून रक्षण करीन." (२२)


बद्धान्यया स्रजा काचित् तन्वी तत्र उलूखले ।
भीता सुदृक् पिधायास्यं भेजे भीतिविडम्बनम् ॥ २३ ॥
यशोदा एक झाली नी दुसरी कृष्ण जाहली ।
यशोदा पुष्पमाळेने बांधिते उखळास की ॥ २३ ॥

तत्र अन्यथा - त्यापैकी दुसर्‍या एका गोपीने - स्रजा उलूखले बद्धा - माळेने उखळाच्या ठिकाणी बांधलेली - भीता - भ्यालेली - काचित् तन्वी - कोणी एक सुंदर स्त्री - सुदृक् आस्यं - सुंदर नेत्र आहेत ज्याच्या ठिकाणी - पिधाय - असे मुख झाकून - भीतिविडम्बनं भेजे - भयाचे अनुकरण करती झाली. ॥२३॥

एका गोपीने दुसरीला फुलांच्या माळेने उखळाला बांधले. आता ती बांधलेली सुंदर गोपी हातांनी तोंड झाकून भ्याल्याची नक्कल करू लागली. (२३)


एवं कृष्णं पृच्छमाना वृन्दावनलतास्तरून् ।
व्यचक्षत वनोद्देशे पदानि परमात्मनः ॥ २४ ॥
परीक्षित् ! करुनी लीला वृक्षांना पुसती पुन्हा ।
कृश्णाचे एक जागेशी दिसले पदचिन्ह ते ॥ २४ ॥

एवम् - अशा प्रकारे - वृन्दावनलताः तरून् (च) - वृंदावनातील वेलींना व वृक्षांना - कृष्णं पृच्छमानाः (ताः) - कृष्णाविषयी प्रश्न करणार्‍या त्या गोपी - वनोद्देशे - वनातील एका जागी - परमात्मनः पदानि व्यचक्षत - श्रीकृष्णाची पाऊले पाहत्या झाल्या. ॥२४॥

अशा प्रकारे खेळत गोपी वृंदावनातील झाडे, वेली इत्यादींना श्रीकृष्णांचा ठाव-ठिकाणा विचारीत जाऊ लागल्या. त्याचवेळी त्यांनी एके ठिकाणी भगवंतांच्या चरणांचे ठसे पाहिले. (२४)


पदानि व्यक्तमेतानि नन्दसूनोर्महात्मनः ।
लक्ष्यन्ते हि ध्वजाम्भोज वज्राङ्‌कुशयवादिभिः ॥ २५ ॥
पाहता वदली कोणी ध्वज पद्मांकुशो असे ।
दिसती या ठशां माजी कृष्णाचे पदचिन्ह हे ॥ २५ ॥

व्यक्तम् - खरोखर - एतानि पदानि - ही पाउले - महात्मनः नन्दसूनोः (एव सन्ति) - महात्म्या नन्दपुत्राचीच आहेत - हि - कारण - ध्वजाम्भोज - ध्वज, कमळ, - वज्राङ्‌कुशयवादिभिः - वज्र, अंकुश, यव इत्यादिकांनी - लक्ष्यन्ते - चिन्हित दिसत आहेत. ॥२५॥

त्या आपापसात म्हणू लागल्या, "हे चरणांचे ठसे निश्चितच महात्म्या नंदनंदनांचे आहेत. कारण यामध्ये ध्वज, कमळ, व्रज, अंकुश, जव इत्यादि चिन्हे स्पष्ट दिसत आहेत." (२५)


तैस्तैः पदैस्तत्पदवीं अन्विच्छन्त्योऽग्रतोऽबलाः ।
वध्वाः पदैः सुपृक्तानि विलोक्यार्ताः समब्रुवन् ॥ २६ ॥
व्रजवल्लभ कृष्णाला धुंडीत चालता पुढे ।
गोपीची पदचिन्हेहि दिसली त्याच जोडिला ॥ २६ ॥

तैः तैः पदैः - त्या त्या पावलांच्या योगाने - तत्पदवीं - त्या श्रीकृष्णाचा - अन्विच्छन्त्यः (ताः) अबलाः - मार्ग शोधणार्‍या त्या स्त्रिया - अग्रतः - पुढे - तानि - ती पावले - वध्वाः पदैः - एका स्त्रीच्या पावलांनी - सुपृक्तानि विलोक्य - मिश्रित झालेली पाहून - आर्ताः (भूत्वा) - पीडित होऊन - समब्रुवन् - म्हणाल्या ॥२६॥

त्या पावलांच्या ठशांचा मागोवा घेत, भगवंतांना शोधीत, गोपी पुढे गेल्या. तेव्हा त्यांना श्रीकृष्णांच्या बरोबर दुसर्‍या युवतीचीसुद्धा चरणचिन्हे दिसली. ती पाहून त्या व्याकूळ झाल्या आणि म्हणू लागल्या - (२६)


कस्याः पदानि चैतानि याताया नन्दसूनुना ।
अंसन्यस्तप्रकोष्ठायाः करेणोः करिणा यथा ॥ २७ ॥
दुःखाने वदल्या हत्ती सोबती जाय हत्तिण ।
तशी कृष्णासवे कोणी गेली भाग्यवती पहा ॥ २७ ॥

करिणा (सह) करेणोः यथा - हत्तीसह असणार्‍या हत्तिणींप्रमाणे - नन्दसूनुना (सह) यातायाः - नंदपुत्राच्याबरोबर गेलेल्या - च - आणि - (तेन) अंसन्यस्तप्रकोष्ठायाः - जिच्या खांद्यावर हात ठेवला आहे अशा - कस्याः एतानि - कोणत्या स्त्रीची - पदानि (सन्ति) - ही पाउले आहेत ॥२७॥

जशी हत्तीण हत्तीबरोबर जावी, त्याचप्रमाणे नंदकुमारांबरोबर त्यांच्या खांद्यावर हात ठेवून चालणार्‍या कोणत्या स्त्रीची ही चरणचिन्हे असावीत ! (२७)


अनयाऽऽराधितो नूनं भगवान् हरिरीश्वरः ।
यन्नो विहाय गोविन्दः प्रीतो यां अनयद् रहः ॥ २८ ॥
अवश्य‌ऽऽराधिका त्याची तिला तो हरि पावला ।
श्यामाने त्यजिले आम्हा दोघे एकांति पातले ॥ २८ ॥

नूनम् - हिने - भगवान् हरिः ईश्वरः - भगवान श्रीकृष्ण परमात्मा - आराधितः - पूजिला आहे - यत् - कारण - प्रीतः गोविन्दः - प्रसन्न झालेला श्रीकृष्ण - नः विहाय - आम्हाला सोडून - याम् रहः अनयत् - जिला एकान्तस्थली घेऊन गेला ॥२८॥

सर्वशक्तिमान, भगवान श्रीकृष्णांची ही खात्रीने ’(आ)राधिका’ असली पाहिजे. म्हणूनच हिच्यावर प्रसन्न होऊन आमच्या गोविंदांनी आम्हांला सोडून हिला एकांतात आणले. (२८)


धन्या अहो अमी आल्यो गोविन्दाङ्‌घ्र्यब्जरेणवः ।
यान् ब्रह्मेशौ रमा देवी दधुर्मूर्ध्न्यघनुत्तये ॥ २९ ॥
प्रिये कृष्णपदरजा स्पर्शिता भाग्य केवढे ।
ब्रह्मादी सर्व ते घेती कल्याणा शिरि त्या रजा ॥ २९ ॥

अहो आल्यः - हे सख्यांनो - अमी गोविन्दाङ्घ्र्‌यब्ज रेणवः - हे श्रीकृष्णाच्या चरणरूपी कमलांतील रेणु - धन्याः - धन्य होत - अघनुत्तये - पापांच्या नाशासाठी - ब्रह्मा ईशः देवी रमा - ब्रह्मदेव, शंकर, व देवी लक्ष्मी ही - यान् - ज्यांना - मूर्ध्रि दधुः - मस्तकावर धारण करती झाली ॥२९॥

सख्यांनो ! श्रीकृष्णांनी आपल्या चरणकमलांनी ज्या ज्या धुळीला स्पर्श केला ती धन्य होय. कारण ब्रह्मदेव, शंकर आणि लक्ष्मीसुद्धा आपले पाप नष्ट करण्यासाठी ती धूळ आपल्या मस्तकावर धारण करतात. (२९)


तस्या अमूनि नः क्षोभं कुर्वन्त्युच्चैः पदानि यत् ।
यैकापहृत्य गोपीनां रहो भुन्क्तेऽच्युताधरम् ॥ ३० ॥
सखे कांहिहि हो तैसे कृष्णाला सखि ती कुणी ।
एकटी नेउनी घेऊ अधरामृतपान ते ॥ ३० ॥

यत् - ज्याअर्थी - या एका - जी एकटी - गोपीनां (सर्वस्वं श्रीकृष्णं) - गोपींचे सर्वस्व अशा श्रीकृष्णाला - अपहृत्य - दूर नेऊन - रहः - एकांतित - अच्युताधरं भुङ्क्ते - श्रीकृष्णाच्या अधराचे सेवन करिते - तस्याः अमूनि पदानि - तिचीही पा-ले - नः - आम्हाला - उच्चैः क्षोभं कुर्वन्ति - अत्यंत क्रोध उत्पन्न करीत आहेत ॥३०॥

जी ही एकटीच एकांतात जाऊन श्रीकृष्णांचे अधरामृतपान करीत आहे, त्या गोपीची ही पावले तर आमच्या मनाला फारच पीडा देत आहेत. (३०)


न लक्ष्यन्ते पदान्यत्र तस्या नूनं तृणाङ्‌कुरैः ।
खिद्यय् सुजाताङ्‌घ्रितलां उन्निन्ये प्रेयसीं प्रियः ॥ ३१ ॥
इथे कोठे सखीचे तो पदचिन्ह न भूमिसी ।
कृष्णे कां घेतले स्कंधी पायांना तृण टोचता ॥ ३१ ॥

अत्र तस्याः पदानि न लक्ष्यन्ते - येथे तिची पाउले दिसत नाहीत - नूनम् - बहुधा - तृणाङकुरैः - गवतांच्या टोकांच्या योगाने - खिद्यत्सुजाताङ्‌घ्रियतलाम् - दुखावलेल्या व जिच्या पायाचे तळवे अत्यंत कोमल - (तां) प्रेयसीम् - अशा त्या आवडत्या स्त्रीला - प्रियः - प्रियकर कृष्ण - उन्निन्ये - उचलून घेता झाला. ॥३१॥

इथे मात्र तिच्या पाऊलखुणा दिसत नाहीत. कदाचित् प्रियाने प्रियेच्या सुकुमार तळव्यांना गवताची टोके टोचू नयेत म्हणून तिला आपल्या खांद्यावर घेतले असावे. (३१)


इमान्यधिकमग्नानि पदानि वहतो वधूम् ।
गोप्यः पश्यत कृष्णस्य भाराक्रान्तस्य कामिनः ॥ ३२ ॥
सखे पाही इथे चिन्ह वाळूत रुतले पहा ।
कळते घेइ तो ओझे प्रियेचे स्कंधि आपुल्या ॥ ३२ ॥

अर्थ नाही ॥३२॥

सख्यांनो ! पाहा, येथे कामी श्रीकृष्णांची ही पावले प्रियेला उचलून नेताना झालेल्या ओझ्यामुळे अधिक खोल रुतलेली दिसतात. (३२)


अत्रावरोपिता कान्ता पुष्पहेतोर्महात्मना ।
अत्र प्रसूनावचयः प्रियार्थे प्रेयसा कृतः ।
प्रपदाक्रमणे एते पश्यतासकले पदे ॥ ३३ ॥
पहा ! पहा ! इथे फूल तोडण्या सखि टेकिली ।
प्रियेसाठी फुले तोडी पंजाच खोल हा रुते ॥ ३३ ॥

महात्मना (कृष्णेन) - उदार अन्तःकरणाच्या श्रीकृष्णाकडून - पुष्पहेतोः - फुलांच्या निमित्ताने - अत्र (सा) कान्ता - येथे ती स्त्री - अवरोपिता - खाली उतरिली गेली - (तेन) प्रेयसा - त्या प्रियकराने - प्रियार्थे - आवडत्या स्त्रीसाठी - अत्र - ह्या ठिकाणी - प्रसूनावचयः कृतः - फुलांचा ढीग केला - प्रपदाक्रमणे - ज्यातील चवडे उचललेले आहेत अशी - एते असकले पदे - ही अर्धी उमटलेली दोन पाउले - पश्यत - तुम्ही पहा. ॥३३॥

पाहा ! पाहा ! येथे वल्लभाने फुले तोडता यावीत, म्हणून प्रियेला खाली उतरविले आहे आणि येथे त्या प्रियाने प्रियेसाठी फुले तोडली आहेत. टाचा वर करून फुले तोडल्यामुळे इथे त्यांचे पाय पूर्णपणे उमटलेले नाहीत. (३३)


केशप्रसाधनं त्वत्र कामिन्याः कामिना कृतम् ।
तानि चूडयता कान्तां उपविष्टमिह ध्रुवम् ॥ ३४ ॥
कृष्णाने प्रेमिका ऐशी प्रियेला विंचरोनिया ।
वेणीशी माळिली पुष्पे बसले असतील ते ॥ ३४ ॥

अत्र तु - येथे तर - (तेन) कामिना - त्या स्त्रीलंपटाने - (तस्याः) कामिन्याः - त्या सुंदर स्त्रीच्या - केशप्रसाधनं कृतम् - केसांची वेणी घातली - तानि (पुष्पाणि) - ती फुले - कान्तां चूडयता (तेन) - स्त्रीच्या वेणीत घालणार्‍या श्रीकृष्णाने - ध्रुवम् - खरोखर - अत्र उपविष्टम् - येथे बसण्याचे केले असावे. ॥३४॥

येथे त्या कामीने आपल्या कामिनीची वेणी घातली असावी ! आणि ती फुले तिच्या वेणीत गुंफण्यासाठी ते येथे नक्कीच खाली बसले असतील." (३४)


रेमे तया चात्मरत आत्मारामोऽप्यखण्डितः ।
कामिनां दर्शयन् दैन्यं स्त्रीणां चैव दुरात्मताम् ॥ ३५ ॥
परीक्षिता ! असा कृष्ण संतुष्ट पूर्णकामि तो ।
न कोणी दुसरा तैसा क्रीडेची रचि ही लिला ॥ ३५ ॥

अखण्डितः - परिपूर्ण, - आत्मरतः - स्वतःच्या ठिकाणी रममाण होणारा - आत्मारामः च (सन्) अपि - व स्वसंतुष्ट असा असताहि - कामिनां दैन्यम् - कामी पुरुषांचे दुःख - च - आणि - स्त्रीणां दुरात्मताम् एव - स्त्रियांचा दुष्टपणा - दर्शयन् - प्रकट करीत - तया (सह) रेमे - त्या स्त्रीसह क्रीडा करिता झाला. ॥३५॥

भगवान श्रीकृष्ण आत्माराम असून अखंड स्वतःमध्येच रमलेले असतात. तरीसुद्धा त्यांनी कामीजनांची दीनता व स्त्रियांची पुरुषांना वश करण्याची वृत्ती दाखविण्यासाठी त्या गोपीबरोबर एकांतामध्ये क्रीडा करण्याची लीला केली असावी. (३५)

विवरण :- श्रीकृष्ण जरी आपल्याला सोडून गेला, तरी त्याच्याबरोबर दुसरी स्त्री असली पाहिजे, याबद्दलचा अंदाज व्यक्त करताना गोपींनी जे जे वर्णन केले (उदा. छोटया पावलांच्या खुणा दिसत नाहीत, अन् कृष्णाची पावले जमिनीत रुतलेली दिसतात, त्या अर्थी त्याने तिला खांद्यावर उचलून घेतले असले पाहिजे. इथे फुलांचा ढीग दिसतो, म्हणजे त्याने तिला ती माळली असली पाहिजेत, इ.) त्यावरून गोपींची सूक्ष्म निरीक्षणबुद्धी दिसते. (जरी मूळ श्लोकात त्याला 'प्रलाप' म्हटले तरी) तसे वाटल्याशिवाय रहात नाही. अर्थात याच्या मुळाशी संपूर्ण असूयेचा भाग आहे. हे जरी निश्चित असले, तरी ते कृष्णावरील उत्कट प्रेमाचे द्योतकही आहे. (३५)



इत्येवं दर्शयन्त्यस्ताः चेरुर्गोप्यो विचेतसः ।
यां गोपीमनयत् कृष्णो विहायान्याः स्त्रियो वने ॥ ३६ ॥
मत्त होवोनि त्या गोपी दाविती पदचिन्ह ते ।
तिकडे सोबती जी ती तिलाही गर्व जाहला ॥ ३६ ॥

इति - याप्रमाणे - एवं - अशाप्रकारचा - (भावं) दर्शयन्त्यः - मनोविकार प्रकट करणार्‍या अशा - ताः विचेतसः गोप्यः - त्या खिन्न अशा गोपी - चेरुः - हिंडत्या झाल्या - अन्याः स्त्रियः विहाय - दुसर्‍या सर्व स्त्रियांना सोडून - यां गोपीम् - ज्या गोपीला - कृष्णः वने अनयत् - श्रीकृष्ण वनात घेऊन गेला; ॥३६॥

अशाप्रकारे बेभान होऊन एकमेकींना पाउलखुणा दाखवीत त्या वना-वनात भटकू लागल्या. इकदे श्रीकृष्ण दुसर्‍या गोपींना वनात सोडून ज्या गोपीला एकांतात घेऊन गेले होते; (३६)


सा च मेने तदाऽऽत्मानं वरिष्ठं सर्वयोषिताम् ।
हित्वा गोपीः कामयाना मामसौ भजते प्रियः ॥ ३७ ॥
इतरां सोडिता कृष्ण मलाचि वश जाहला ।
जगात श्रेष्ठ मी धन्य माझा हा मान केवढा ॥ ३७ ॥

सा च - ती गोपीहि - तदा - त्यावेळी - कामयानाः - प्रेम करणार्‍या - (इतराः) गोपीः हित्वा - इतर गोपींना सोडून - असौ प्रियः मां भजते - हा प्रियकर मला भजतो - इति - असे म्हणून - आत्मानं - स्वतःला - सर्वयोषितां - सर्व स्त्रियांत - वरिष्ठं मेने - श्रेष्ठ असे मानिती झाली. ॥३७॥

तिला वाटले की, "आपणच सर्व गोपींमध्ये श्रेष्ठ आहोत. म्हणून तर ज्या गोपी त्यांची इच्छा करतात, त्यांना सोडून ते माझे प्रिय श्रीकृष्ण माझ्याबरोबर राहिले." (३७)


ततो गत्वा वनोद्देशं दृप्ता केशवमब्रवीत् ।
न पारयेऽहं चलितुं नय मां यत्र ते मनः ॥ ३८ ॥
देवाधिदेव कृष्णाला वदते थकले पद ।
इच्छिसी जेथ जाणे तू तेथ ने उचलोनिया ॥ ३८ ॥

ततः - म्हणून - दृप्ता (सा) - गर्विष्ठ अशी ती - वनोद्देशं गत्वा - वनातील एका भागात गेल्यावर - केशवम् अब्रवीत् - श्रीकृष्णाला म्हणाली - अहं चलितुं न पारये - मी चालण्यास समर्थ नाही - यत्र ते मनः - जेथे तुझे मन असेल - (तत्र) मा नय - तेथे मला उचलून घेऊन जा. ॥३८॥

वनात गेल्यावर ती गोपी गर्विष्ठपणे श्रीकृष्णांना म्हणाली, "प्रियतमा ! माझ्याच्याने आता आणखी चालवत नाही. म्हणून तुम्हांला जेथे जायचे असेल, तेथे मला उचलून न्या." (३८)


एवमुक्तः प्रियामाह स्कन्ध आरुह्यतामिति ।
ततश्चान्तर्दधे कृष्णः सा वधूरन्वतप्यत ॥ ३९ ॥
वदला ठीक तो कृष्ण खांद्याशी बैसण्या प्रिया ।
प्रयत्‍न करिता तैसा हरि तो गुप्त जाहला ।
पुन्हा ती रडली आणि पश्चात्ताप हि पावली ॥ ३९ ॥

एवं उक्तः - अशारीतीने बोलला गेलेला - कृष्णः - श्रीकृष्ण - स्कन्धे आरुह्यताम् - खांद्यावर बसावे - इति - असे - प्रियां आह - प्रियेला म्हणाला - च - आणि - ततः - नंतर - अन्तर्दधे - गुप्त झाला - सा वधूः - ती स्त्री - अन्वतप्यत - पश्चात्ताप पावली. ॥३९॥

तिने असे सांगितल्यावर ते म्हणाले, "प्रिये, ठीक आहे, तू माझ्या खांद्यावर बस." आणि एकदम अंतर्धान पावले. तेव्हा मात्र ती गोपी पश्चात्ताप करू लागली. (३९)

विवरण :- सर्व कामातुर गोपींना डावलून कृष्णाने फक्त आपल्यालाच स्वीकारले, हा आपल्या सौंदर्याचाच परिणाम, कृष्ण दीन होऊन आपला दास झाला, असा गोपीला गर्व झाला आणि कृष्णाने अंतर्धान पावून तो लगेच दूरही केला. गर्व, मग तो कोणासही, अगदी प्रिय व्यक्तीला झाला, तरी तो दूर करायचा, हे कृष्णाचे तत्त्व. अपरिपक्वता हे गर्वाचे मूळ असले तरी त्याला शिक्षा ही हवीच; पण ती दीर्घकाळ नाही. चूक ध्यानी येऊन पश्चात्ताप झाला, की क्षमा हे उदारधींचे लक्षण. कृष्णानेही तेच केले. (३९)



हा नाथ रमण प्रेष्ठ क्वासि क्वासि महाभुज ।
दास्यास्ते कृपणाया मे सखे दर्शय सन्निधिम् ॥ ४० ॥
नाथा सख्या कुठे रे तू दासी मी दीन हो बहू ।
त्वरीत जवळी यावे मला दर्शन दे हरि ॥ ४० ॥

हा - हाय हाय - नाथा - हे नाथा - रमण - हे रमणा - श्रेष्ठ - हे अत्यंत प्रियकरा - क्व असि - तू कोठे आहेस - महाभुज - हे महाबाहो - क्व असि - तू कोठे आहेस - सखे - हे सख्या - कृपणायाः ते दास्याः मे - तुझी अनाथ दासी अशा मला - (ते) संनिधिम् दर्शय - तुझे सान्निध्य दाखव. ॥४०॥

हे नाथा ! हे रमणा ! हे श्रेष्ठा ! हे महाभुजा ! आपण कोठे आहात ? कोठे आहात ? माझ्या सख्या ! मी तुमची दीन दासी आहे. माझ्या जवळ या. (४०)


अन्विच्छन्त्यो भगवतो मार्गं गोप्योऽविदूरितः ।
ददृशुः प्रियविश्लेष मोहितां दुःखितां सखीम् ॥ ४१ ॥
शोधीत पदचिन्हाते अन्य गोपीहि पातल्या ।
तयांनी पाहिली प्रीया वियोगे जी अचेत ती ॥ ४१ ॥

भगवतः मार्गं - श्रीकृष्णाचा मार्ग - अन्विच्छन्त्यः गोप्यः - शोधणार्‍या गोपी - अविदूरतः - जवळच - प्रियविश्लेषमोहिताम् - प्रियकराच्या वियोगाने मूढ झालेल्या - दुःखिताम् - कष्टी अशा - (स्वां) सखीम् - आपल्या मैत्रिणीला - ददृशुः - पाहत्या झाल्या. ॥४१॥

भगवंतांच्या जाण्याचा मार्ग शोधीत गोपी तेथे जाऊन पोहोचल्या. तेथे जवळच त्यांना दिसले की, प्रियतमाच्या वियोगाने त्यांची सखी दुःखाने बेशुद्ध होऊन पडली आहे. (४१)


तया कथितमाकर्ण्य मानप्राप्तिं च माधवात् ।
अवमानं च दौरात्म्याद् विस्मयं परमं ययुः ॥ ४२ ॥
तिजला उठवीती नी सर्व सन्मान बोलली ।
कुटील बोलता मीच कृष्ण तो गुप्त जाहला ।
ऐकता बोल ते ऐसे आश्चर्य सर्व पावल्या ॥ ४२ ॥

तया कथितं - तिने सांगितलेला वृत्तांत - माधवात् मानप्राप्तिम् - माधवापासून झालेला बहुमानाचा लाभ - च - आणि - (आत्मनः) दौरात्म्यात् - स्वतःच्या हट्टीपणामुळे - अवमानम् - झालेला अपमान - आकर्ण्य - ऐकून - परमं विस्मयं ययुः - अत्यंत आश्चर्याला प्राप्त झाल्या. ॥४२॥

श्रीकृष्णांच्याकडून जो मान प्राप्त झाला होता, तो तिने त्यांना सांगितला. आणि आपल्याच गर्वामुळे आपला अवमान झाल्याचेही सांगितले. ते ऐकून गोपींच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. (४२)


ततोऽविशन् वनं चन्द्र ज्योत्स्ना यावद् विभाव्यते ।
तमः प्रविष्टमालक्ष्य ततो निववृतुः स्त्रियः ॥ ४३ ॥
शोधिले चांदणे सर्व पुढे अंधार दाट तो ।
जाता कृष्ण पुढे जाई म्हणोनी लोटल्या पहा ॥ ४३ ॥

ततः - नंतर - (ताः) स्त्रियः - त्या स्त्रिया - वनं आविशन् - वृंदावनात शिरल्या - यावत् चन्द्रज्योत्स्ना - जोपर्यंत चंद्राचा प्रकाश - विभाव्यते (तावत्) - होता तोपर्यंत - तमः प्रविष्टं आलक्ष्य - अंधकार शिरलेला पाहून - ततः - तेथून - निववृतुः - परतल्या. ॥४३॥

यानंतर, वनामध्ये जेथपर्यंत चंद्राचे चांदणे पडले होते, तेथपर्यंत त्या त्यांना शोधीत गेल्या. परंतु पुढे अंधार आहे, असे पाहून परत फिरल्या. (४३)


तन्मनस्कास्तदलापाः तद्विचेष्टास्तदात्मिकाः ।
तद्‍गुणानेव गायन्त्यो नात्मगाराणि सस्मरुः ॥ ४४ ॥
गोपिंचे मन नी वाणी कृष्णरूपचि जाहली ।
कृष्णाचे गीत त्या गाती घराची शुद्धही नसे ॥ ४४ ॥

तन्मनस्काः - श्रीकृष्णाकडे लागले आहे मन ज्यांचे अशा - तदात्मिकाः - तन्मय अशा - तदालापाः - त्याच्याविषयी बोलणार्‍या - तद्विचेष्टाः - त्याच्याप्रमाणे आहेत हावभाव ज्यांचे अशा - तद्‌गुणान् एव गायन्त्यः - त्याचेच गुण गाणार्‍या - आत्मागाराणि न सस्मरुः - आपली घरे विसरल्या. ॥४४॥

गोपींचे मन श्रीकृष्णमय होऊन गेले होते. त्या त्यांच्याविषयीच बोलत होत्या. त्यांच्या हालचाली केवळ श्रीकृष्णांसाठीच होत्या. किंबहुना त्या कृष्णमय झाल्या होत्या. त्यांच्या गुणांचेच गायन करणार्‍या त्यांना आपल्या घरांची, इतकेच नव्हे तर शरीराचीही आठवण राहिली नाही. (४४)


पुनः पुलिनमागत्य कालिन्द्याः कृष्णभावनाः ।
समवेता जगुः कृष्णं तदागमनकाङ्‌क्षिताः ॥ ४५ ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां दशमस्कन्धे पूर्वार्धे त्रिंशोऽध्यायः ॥ ३० ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
गोपिंचा रोम नी रोम हरिची वाटपाहतो ।
पातल्या वाळवंटात लीलाही गाउ लागल्या ॥ ४५ ॥
॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर तिसावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

तदागमनकांक्षिताः - त्याच्या आगमनाची वाट पाहणार्‍या - कृष्णभावनाः - श्रीकृष्णाच्या ठिकाणी आहे भाव ज्यांचा अशा - समवेताः (ताः) - एकत्र जमलेल्या त्या गोपी - पुनः कालिन्द्याः पुलिनं आगत्य - यमुनेच्या वाळवंटावर येऊन - कृष्णं जगुः - श्रीकृष्णाला गात्या झाल्या. ॥४५॥

श्रीकृष्णांच्याच चिंतनात बुडून गेलेल्या गोपी यमुनेच्या वाळवंटात परत आल्या आणि त्यांच्या येण्याची वाट पाहात सर्व मिळून श्रीकृष्णांच्याच गुणांचे गायन करू लागल्या. (४५)

विवरण :- सर्व वने धुंडाळून गोपी परत यमुनातीरी आल्या; ते का ? त्या गाऊ लागल्या, ते ही का ? गोपींना वाटले होते की, कृष्ण आपल्यावर रुष्ट झाला आहे आणि आपणांस चुकवीत तो या वनातून त्या वनात असा हिंडत आहे. पण आता अंधार किती आहे, त्याच्या पायाला काटे बोचतील, खडे टोचतील, किती त्रास होईल त्याला, मग ही पाठशिवणी आपणच संपवावी. शिवाय जी वस्तू ज्या ठिकाणी हरवते, ती पुन्हा त्याच ठिकाणी परत मिळते, असे म्हणतात. म्हणून आपण यमुनेच्याच वाळवंटात जाऊन त्याचे गुणगान करत त्याला साद घालावी. मग मात्र तो निश्चितच येईल. कारण तो गानप्रिय, नादलुब्ध आहे. (मद्‌भक्ता यत्र गायन्ति, तत्र तिष्ठामि नारद !) (४५)



अध्याय तिसावा समाप्त

GO TOP