|
श्रीमद् भागवत पुराण गोपीगीतं - विरहार्त गोपीनां भगवदुपस्थानाय प्रार्थनम् - गोपी-गीत - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
गोप्य ऊचुः -
( शुद्धकामदा ) जयति तेऽधिकं जन्मना व्रजः श्रयत इन्दिरा शश्वदत्र हि । दयित दृश्यतां दिक्षु तावका स्त्वयि धृतासवस्त्वां विचिन्वते ॥ १ ॥
( शुद्धकामदा ) विरहात गोपिका गातात - महति वाढली की व्रजी अशी त्यजुनि धाम लक्ष्मी इथे वसे । चरणि प्राण अर्पोनि गोपिका वनि वनीहि धुंडीति हो पहा ॥ १ ॥
ते जन्मना - तुझ्या जन्माच्या योगाने - अत्र - या ठिकाणी - इन्दिरा - लक्ष्मी - शश्वत् - निरंतर - श्रयते - राहत आहे - हि - म्हणून - व्रजः - गोकुळ - अधिकं जयति - अधिक उत्कर्ष पावत आहे - दयित - हे प्रियकरा - त्वयि धृतासवः - तुझ्या ठिकाणी धारण केले आहेत प्राण ज्यांनी - तावकाः (एताः) - अशा या सर्वस्वी तुझ्या गोपी - दिक्षु - दाही दिशांच्या ठिकाणी - त्वां विचिन्वते - तुला शोधीत आहेत - दृश्यताम् - पहावे. ॥१॥
गोपी गाऊ लागल्या - प्रियतम ! तुमच्या जन्मामुळे व्रजाचा महिमा अधिक वाढला आहे. म्हणूनच तर लक्ष्मी कायमची येथे येऊन राहिली आहे; प्रियतमा ! पहा ! ज्यांनी तुमच्यासाठीच आपले प्राण धारण केले आहेत, त्या गोपी दिशादिशांमध्ये तुम्हांला शोधीत आहेत. (१)
विवरण :- कृष्ण रासक्रीडा करता करता नाहीसा झाला अन् सैरभैर झालेल्या गोपी आर्त होऊन त्याला साद घालू लागल्या. त्याचे गुणसंकीर्तन करू लागल्या. मात्र हे संकीर्तन करताना त्या युक्तिवादही करतात. अर्थात या सर्वांचा हेतू म्हणजे कृष्णाचे दर्शन व्हावे. कृष्णाचे स्तवन करताना त्या आधी व्रजभूमीचे श्रेष्ठत्व सांगतात. श्रीकृष्णाची जन्मभूमी म्हणून ती श्रेष्ठ आहेच, पण हे कृष्णा ! तुझ्यामुळे लक्ष्मीचेहि इथे कायम वास्तव्य असते. ही भूमी ऐश्वर्यसंपन्न झाली आहे. लक्ष्मीच्या वास्तव्याने सर्व प्रजा सुखी, संपन्न झाली आहे. मात्रा आम्ही तुझ्या विरहाने दुःखी आहोत, तू आमचा बहिश्वर प्राण आहेस. सर्व प्रजा सुखी आणि आम्हीच दुःखी का ? हा विरोधाभास का ? (तू लवकर दर्शन देऊन आम्हांस सुखी कर म्हणजे हा विरोध संपेल.) (१)
शरदुदाशये साधुजातसत्
सरसिजोदरश्रीमुषा दृशा । सुरतनाथ तेऽशुल्कदासिका वरद निघ्नतो नेह किं वधः ॥ २ ॥
हृदयस्वामि तू दासि आम्हि की कमल कर्णिका गंध चोरिसी । बघुनि तू अम्हा विंधिसी हरी वधचि नेत्रमारुनि साधिसी ॥ २ ॥
सुरतनाथ - हे संभोगपते - शरदुदासये - शरदऋतूतील सरोवरात - साधुजातसत्सरसिजोदरश्रीमुषा दृशा - उत्तम फुललेल्या सुंदर कमळाच्या मध्यभागाची शोभा हरण करणार्या नेत्राने - अशुल्कदासिकाः - मूल्याशिवाय दास्य करणार्या - (अस्मान्) निघ्नतः ते - आम्हाला मारणार्या तुझ्याकडून - इह - येथे - वरद - हे वर देणार्या श्रीकृष्णा - वधः न (भवति) किम् - वधच होत नाही काय ? ॥२॥
हे प्रेमपूर्ण हृदयाचे स्वामी ! आम्ही वेतन न घेणार्या तुमच्या दासी आहोत. शरत्कालीन जलाशयामध्ये सुंदर अशा कमळांच्या गाभ्यातील सौंदर्याला तुच्छ ठरवणार्या नेत्रांनी तुम्ही आम्हांला घायाळ केले आहे. आमचे मनोरथ पूर्ण करणारे हे प्राणेश्वर ! नेत्रांनी मारणे हा वध नाही काय ? (२)
विवरण :- 'निःशुल्क दासी' असा गोपी स्वतःचा उल्लेख करतात. दासी काम करते, ते पैसे घेऊन. (किंवा पैसे देऊन तिला विकत घेतले जाते. अर्थात अशी रीत तेव्हा असेलच, असे नाही.) पण गोपी म्हणतात, आम्ही तुझ्या दासी असलो तरी कोणत्याहि धन-द्रव्याची अपेक्षा नाही. फक्त तुझी दर्शनेच्छा. (संतांनी म्हटलेच आहे 'ऐशी कळवळ्याची जाती, करी लाभावीण प्रीती' ।) पण जर आता तू दर्शन दिले नाहीस, तर आमचा मृत्यू निश्चित. तुझा विरह आमचा मृत्यूच, मृत्यू केवळ शस्त्रानेच होतो, असे नाही. आमच्या दृष्टीने विरह हे शस्त्रच आहे. (मग आमच्या मृत्यूस तू कारण होण्याचे पाप तुला लागेल, याचा विचार कर.) (२)
विषजलाप्ययाद् व्यालराक्षसाद्
वर्षमारुताद् वैद्युतानलात् । वृषमयात्मजाद् विश्वतो भयाद् ऋषभ ते वयं रक्षिता मुहुः ॥ ३ ॥
जलविषा पिऊनीहि मृत्यु वा असुर राक्षसो मारण्यास ये । शतमखे जरी मेघ वर्षिले समयि सर्व तू रक्षिसी अम्हा ॥ ३ ॥
ऋषभ - हे श्रेष्ठा - विषजलाप्ययात् - विषमय झालेल्या जलाच्या सेवनांनी आलेल्या मृत्यूपासून - व्यालराक्षसात् - अजगररूपी राक्षसापासून - वर्षमारुतात् - पाऊस व वारा यांपासून - वैद्युतानलात् - विजेच्या अग्नीपासून - वृषमयात्मजात् - बैलाचे रूप घेतलेला व मयासुराचा पुत्र जो व्योमासुर यांपासून - विश्वतः भयात् - सर्व ठिकाणच्या भीतीपासून - ते - तुझ्याकडून - वयम् - आम्ही - मुहुः - वारंवार - रक्षिताः (स्मः) - रक्षिल्या गेल्या आहो. ॥३॥
हे पुरुषोत्तमा ! यमुनेच्या विषारी पाण्यामुळे होणारा मृत्यू, अजगराच्या रूपाने खाणारा अघासुर, इंद्राने केलेला वर्षाव, तुफान, विजा, दावानल, वत्सासुर आणि व्योमासुर इत्यादींनी उत्पन्न केलेल्या सर्व प्रकारच्या भयांपासून तुम्ही वारंवार आमचे रक्षण केले आहे. (३)
न खलु गोपीकानन्दनो भवान्
अखिलदेहिनां अन्तरात्मदृक् । विखनसार्थितो विश्वगुप्तये सख उदेयिवान् सात्वतां कुले ॥ ४ ॥
नचहि केवलो पुत्र गोपिचा अखिल जीविचा जीव तू हरी । हृदयि राहसी साक्षि तू जिवा तनय प्रार्थिता जन्मला व्रजी ॥ ४ ॥
सखे - हे मित्रा - खलु - खरोखर - भवान् - तू - गोपिकानन्दनः न (अस्ति) - यशोदा गोपीचा पुत्र नाहीस - विखनसा विश्वगुप्तये अर्थितः - ब्रह्मदेवाने जगताच्या संरक्षणासाठी प्रार्थिलेला - सात्वतां कुले उदेयिवान् - यादवाच्या कुळात जन्मास आलेला - अखिलदेहिनां अन्तरात्मदृक् (अस्ति) - सर्व प्राण्यांचे अंतःकरण पाहणारा ईश्वर आहेस. ॥४॥
तुम्ही केवळ यशोदनंदनच नाही, तर सर्व प्राण्यांच्या अंतरांत राहाणारे त्यांचे साक्षी आहात, हे सखया ! ब्रह्मदेवांनी प्रार्थना केल्यामुळे विश्वाचे रक्षण करण्यासाठी तुम्ही यदुवंशात अवतीर्ण झाला आहात. (४)
विरचिताभयं वृष्णिधूर्य ते
चरणमीयुषां संसृतेर्भयात् । करसरोरुहं कान्त कामदं शिरसि धेहि नः श्रीकरग्रहम् ॥ ५ ॥
करिसि कामना पूर्ण तू हरी । अभय देसि तू प्रार्थिती तया । कर करी हरी लक्ष्मिसी दिला शिरिहि आमुच्या तोच ठेव तू ॥ ५ ॥
वृष्णिधुर्य - हे यादवश्रेष्ठा - संसृतेः भयात् - संसाराच्या भीतीमुळे - ते चरणं ईयुषाम् - तुझ्या पायांजवळ आलेल्यांना - अभयं विरचिता (असि) - तू अभय देणारा आहेस - कान्त - हे प्रियकरा - कामदं श्रीकरग्रहम् करसरोरुहम् - इष्ट फल देणारा व लक्ष्मीचे पाणिग्रहण करणारा तुझा कमळासारखा हात - नः शिरसि धेहि - आमच्या मस्तकावर ठेव. ॥५॥
हे यदुवंशशिरोमणे ! जे लोक जन्म-मृत्युरूप संसाराच्या चक्राला भिऊन तुमच्या चरणांना शरण येतात, त्यांना निर्भय करणारे, सर्वांच्या अभिलाषा पूर्ण करणारे आणि लक्ष्मीचे पाणिग्रहण करणारे आपले करकमल, हे नाथ ! आमच्या मस्तकावर ठेवा. (५)
व्रजजनार्तिहन् वीर योषितां
निजजनस्मयध्वंसनस्मित । भज सखे भवत् किङ्करीः स्म नो जलरुहाननं चारु दर्शय ॥ ६ ॥
हरिसि दुःख तू या व्रजींचिये मधुर हास्य ते गर्व हारि ते । रुसु नको प्रिया दासि आम्हि की मुख अम्हा तुझे दावि सावळे ॥ ६ ॥
निजजनस्मयध्वंसनस्मित - आपल्या लोकांच्या आश्चर्याचा निरास करणारे आहे हसणे ज्याचे अशा - व्रजजनार्तिहन् वीर - गोकुळातील लोकांचे दुःख नष्ट करणार्या वीरा - योषितां भज - स्त्रियांचा तू स्वीकार कर - सखे - हे सख्या - (वयं) भवत्किङ्करीः रमः - आम्ही तुझ्या दासी आहोत - नः - आम्हाला - चारु जलरुहाननं दर्शय - सुंदर असे व कमलासारखे मुख दाखव. ॥६॥
व्रजवासियांचे दुःख दूर करणारे हे वीरश्रेष्ठ ! ज्यांच्या स्मिताने भक्तांचा गर्व मावळतो, अशा आमच्या प्रिय सख्या ! या तुमच्या दासींचा स्वीकार करा. आपले सुंदर मुखकमळ आम्हा अबलांना दाखवा. (६)
प्रणतदेहिनां पापकर्षणं
तृणचरानुगं श्रीनिकेतनम् । फणिफणार्पितं ते पदाम्बुजं कृणु कुचेषु नः कृन्धि हृच्छयम् ॥ ७ ॥
चरणपद्म ते पाप नाशिती स्वकरि लक्ष्मिजी सेविते तया । फणिवरा वरी ठेविसी पदा हृदयि ठेवि ते तोषवी अम्हा ॥ ७ ॥
प्रणतदेहिनां पापकर्शनम् - अत्यंत नम्र झालेल्या प्राण्यांचे पाप नष्ट करणारे - तृणचरानुगम् - गवतावरून फिरणार्या गाईवासरांच्या मागून जाणारे - फणिफणार्पितम् - सर्पाच्या फणांवर ठेविलेले - श्रीनिकेतनम् - सौंदर्याचे वसतिस्थान असे - ते पदाम्बुजम् - तुझे चरणकमळ - नः कुचेषु कृणु - आमच्या स्तनांवर ठेव - (नः) हृच्छयम् कृन्धि - आमच्या कामाला छेदून टाक. ॥७॥
शरणागतांची पापे नाहीशी करणारे, गुरांच्या मागून जाणारे, लक्ष्मीचे निवासस्थान, कालियाच्या फणांवर ठेवलेले असे तुमचे चरणकमल तुम्ही आमच्या वक्षःस्थळावर ठेवून आमच्या हृदयातील आग शांत करा. (७)
मधुरया गिरा वल्गुवाक्यया
बुधमनोज्ञया पुष्करेक्षण । विधिकरीरिमा वीर मुह्यती रधरसीधुनाप्याययस्व नः ॥ ८ ॥
मधुर बोलसी ज्ञानिही रमे मधुर शब्द ते एक एक की । वदसि शब्द त्यां गोपि रम्यती अधरपान दे तृप्तवी अम्हा ॥ ८ ॥
पुष्करेक्षण - हे कमलनेत्रा - बुधमनोज्ञया - ज्ञानी लोकांना आवडणार्या - वल्गुवाक्यया - सुंदर आहेत वाक्ये जिच्यामध्ये अशा - मधुरया गिरा - मधुर वाणीने - मुह्यतीः इमाः नः विधिकरीः - मोहित झालेल्या ह्या आम्हा दासींना - अधरसीधुना आप्याययस्व - अधरामृताने तू सजीव कर. ॥८॥
हे कमलनयना ! सुंदर सुंदर वाक्यांनी युक्त, विद्वानांनाही मोहविणार्या तुमच्या गोड वाणीने या तुमच्या दासीही मोहित होत असतात. हे वीरा ! आपल्या अधरामृताने आम्हांला तृप्त करा. (८)
तव कथामृतं तप्तजीवनं
कविभिरीडितं कल्मषापहम् । श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृणन्ति ये भूरिदा जनाः ॥ ९ ॥
तव कथामृतो तप्त जीवना मिटवि पाप नी ताप ही असा । कवि नि भक्त ते गाति कीर्तनी । बहुहि भूसि दाता जिवास तू ॥ ९ ॥
तप्तजीवनम् - दुःखित जीवांना शांत करणारे - कविभिः ईडितम् - ज्ञान्यांनी स्तविलेले - कल्मषाषहम् - पाप नाहीसे करणारे - श्रवणमङगलम - ऐकावयास मंगलकारक असे - श्रीमत् - सौंदर्याने युक्त असे - ते आततम् कथामृतं - तुझे विस्तृत असे कथारूपी अमृत - भुवि (ये) गृणन्ति - पृथ्वीवर जे गातात - ते जनाः भूरिदाः (सन्ति) - ते लोक मोठे धन्य होत. ॥९॥
प्रभो ! तुमच्या कथासुद्धा अमृतस्वरूपच आहेत. विरहाने व्याकूळ झालेल्यांचे ते जीवनसर्वस्व आहे. त्या सगळे पाप-ताप मिटवून श्रवणानेसुद्धा कल्याण करतात. तुमच्या त्या सुंदर कथांचे जे विस्ताराने वर्णन करतात, तेच वास्तविक सर्वांत मोठे दानशूर होत ! (९)
विवरण :- गोपींनी केलेले हरिकीर्तन म्हणजे हा अध्याय, 'गोपी गीत.' मग ही कृष्णकथा कशी ? पाप नाहीसे करणारी, अमृताप्रमाणे संजीवन देणारी, ब्रह्माने गाइलेली. (अमृतहि त्याला या कथेपुढे तुच्छ वाटेल अशी) मग केवळ या कथेचे गुणगान करणारे जर धन्य, तर तुला पाहणार्यांचा किती उद्धार होईल ? (आमचा उद्धार करण्यासाठी तरी आम्हाला दर्शन दे.) (९)
प्रहसितं प्रिय प्रेमवीक्षणं
विहरणं च ते ध्यानमङ्गलम् । रहसि संविदो या हृदि स्पृशः कुहक नो मनः क्षोभयन्ति हि ॥ १० ॥
दिन असे असा हास्यि मग्नता मनिहि ध्यान ते क्रीडसी असा । हृदयिच्या अशा करिसी गोष्टि तू कपटि आज कां क्षुब्धला मनीं ॥ १० ॥
प्रिय - हे प्रियकर - ते प्रहसितं प्रेमवीक्षणं - तुझे हसणे, प्रेमाने पाहणे, - विहरणं च ध्यानमङगलं (अस्ति) - व विहार करणे ध्यानाला मंगलकारक आहे - कुहक - हे धूर्ता - हृदिस्पृशा याः रहसि संविदः (ताः) - अंतःकरणाला भेदणारी अशी जी एकांतातील संभाषणे ती - नः मनः क्षोभयन्ति हि - आमच्या मनाला खरोखरच क्षुब्ध करीत आहेत. ॥१०॥
हे प्रियतमा ! तुमचे प्रेमपूर्ण हास्य आणि कटाक्ष तसेच तुमच्या लीलांचे ध्यान हे सुद्धा अत्यंत मंगलदायक आहे. पण तुम्ही एकांतात ज्या हृदयस्पर्शी प्रेमाच्या गोष्टी केल्या, त्या आठवून हे कपटनाटकसूत्रधारा ! आमच्या मनाची कालवाकालव होत आहे. (१०)
विवरण :- गोपी पुढे म्हणतात, अमृतालाहि मागे टाकणारी हरिकथा ऐकून संतुष्ट व्हा; असे तू सांगशील. पण आपण रासक्रीडा केल्या, त्यामुळे आमचे मन अधिकाधिक अधीर, उत्सुक झाले आहे, तृषार्त झाले आहे. (श्रीकृष्णाला साँवला-'सलोना'=सलवण म्हणतात. मिठाने जशी तहान वाढते तशी तुझ्या सहवासाने असा आशय.) मग आम्हाला संतुष्ट करावयास तुझी कथा नको, तर प्रत्यक्ष तूच हवास. (१०)
चलसि यद् व्रजाच्चारयन् पशून्
नलिनसुन्दरं नाथ ते पदम् । शिलतृणाङ्कुरैः सीदतीति नः कलिलतां मनः कान्त गच्छति ॥ ११ ॥
चरण ते तुझे कोवळे तसे कुरण चारण्या गायि नेसि तै । बहुत कष्ट ते सोसिशी पदा । हृदयि भेटण्या प्रेम येतसे ॥ ११ ॥
नाथ - हे नाथा - कान्त - हे प्रियकरा - यत् - ज्यावेळी - पशून् चारयन् - गुरांना चरवीत - व्रजात् चलसि - तू गौळवाडयातून जातोस - ते नलिनसुन्दरं पदम् - तुझ्या कमळासारख्या सुंदर अशा पायांना - शिलतृणाङ्कुरैः सीदति - कापणी झाल्यानंतर राहिलेल्या गवताच्या बुडख्यांनी दुःख होईल - इति - असे वाटून - नः मनः - आमचे मन - कलिलतां गच्छति - व्याकुळतेला प्राप्त होते. ॥११॥
हे नाथ ! गुरे चारण्यासाठी तुम्ही जेव्हा वाड्यातून बाहेर जाता, तेव्हा तुमच्या कमलापेक्षाही कोमल पायांना काटे-सराटे लागून ते दुखत असतील, असा विचार मनात येताच हे मनमोहना ! आम्हांला अतिशय दुःख होते. (११)
दिनपरिक्षये नीलकुन्तलैः
वनरुहाननं बिभ्रदावृतम् । घनरजस्वलं दर्शयन् मुहु र्मनसि नः स्मरं वीर यच्छसि ॥ १२ ॥
दिनहि जै सरे येसि तू घरा धुळहि गोक्षुरी केशिं येतसे । रुप तुझे असे दविलेस तू हृदयि भेटण्या प्रेम दाटले ॥ १२ ॥
वीर - हे वीरा - दिनपरिक्षये - दिवस संपण्याच्या वेळी - नीलकुन्तलैः आवृतम् - निळ्या कुरळ्या केसांनी झाकलेले - घनरजस्वलम् - दाट धुळीने माखलेले - वनरुहाननं बिभ्रत् - कमळासारखे मुख धारण करणारा - मुहुः दर्शयन् त्वं - वारंवार दाखविणारा तू - नः मनसि - आमच्या अंतःकरणात - स्मरं यच्छसि - मदनाला स्थापितोस. ॥१२॥
दिवस मावळल्यानंतर जेव्हा तुम्ही वनातून घरी येता, तेव्हा तुमच्या मुखावर काळे कुरळे केस रुळत असतात. जणू भ्रमरयुक्त कमळच. शिवाय गाईंच्या खुरांनी उडालेली दाट धूळही त्यावर पडलेली असते. हे वीरा ! तुम्ही आपले ते सौंदर्य आम्हांला दाखवून आमच्या मनात वारंवार प्रेम उत्पन्न करीत असता. (१२)
प्रणतकामदं पद्मजार्चितं
धरणिमण्डनं ध्येयमापदि । चरणपङ्कजं शन्तमं च ते रमण नः स्तनेष्वर्पयाधिहन् ॥ १३ ॥
मिटवि दुःख तू एकमात्रची चरणि येइ त्या तोषिसी बहू । चरण दुःख ते नाशिती असे स्तनिहि ठेव ते तोषवी मना ॥ १३ ॥
आधिहन् रमण - हे मनोव्यथा नष्ट करणार्या प्रियकरा - प्रणतकामदं - नम्र झालेल्यांना इष्ट फल देणारे - पद्मजार्चितम् - लक्ष्मीने पूजिलेले - धरणिमण्डनं - पृथ्वीला भूषण असलेले - आपदि ध्येयम् - संकटकाली ध्यान करण्यास योग्य असे - शंतमम् - अत्यंत कल्याणकारक असे - ते चरणपङ्कजं - तुझे चरणकमळ - नः स्तनेषु अर्पय - आमच्या स्तनांवर ठेव. ॥१३॥
हे प्रियतमा ! तुमचे चरणकमल शरणागत भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे आहे. स्वतः लक्ष्मी त्यांची सेवा करते आणि पृथ्वीचे तर ते भूषणच आहे. संकटकाळी फक्त त्याचेच चिंतन करणे योग्य आहे. आपले ते परम कल्याणस्वरूप चरणकमल आमच्या वक्षःस्थळावर ठेवून आमच्या हृदयाची व्यथा शांत करा. (१३)
सुरतवर्धनं शोकनाशनं
स्वरितवेणुना सुष्ठु चुम्बितम् । इतररागविस्मारणं नृणां वितर वीर नस्तेऽधरामृतम् ॥ १४ ॥
अधर अमृते विरह संपतो अधर वंशि ती नित्य चुंबिते । पिउनि एकदा मोह तो नुरे रस असा अम्हा वाटि श्रीहरी ॥ १४ ॥
वीर - हे वीरा - सुरतवर्धनम् - कामेच्छा वाढविणारे - शोकनाशनम् - शोक नष्ट करणारे - स्वरितवेणुना सुष्ठु चुम्बितम् - वाजणार्या मुरलीने उत्तमप्रकारे चुंबिलेले - नृणां इतररागविस्मारणम् - मनुष्यांना इतर विषयांच्या प्रेमाचा विसर पाडणारे - ते अधरामृतम् - तुझे अधरामृत - नः वितर - तू आम्हांला दे. ॥१४॥
तुमचे अधरामृत प्रेम वाढविणारे असून सगळा शोक नाहीसा करणारे आहे. गाणारी ही बासरी चांगल्या तर्हेने त्याचा आस्वाद घेते. ज्यांनी एकवेळ त्याचे पान केले, त्यांना पुन्हा प्रापंचिक विषयांची आठवणही होत नाही. हे वीरा ! आपले तेच अधरामृत आम्हांला द्या. (१४)
अटति यद् भवानह्नि काननं
त्रुटिर्युगायते त्वामपश्यताम् । कुटिलकुन्तलं श्रीमुखं च ते जड उदीक्षतां पक्ष्मकृद् दृशाम् ॥ १५ ॥
वनि विहारण्या जाशि तू जधी पळहि वाटते यूगची जसा । परतसी जधी पाहता रुपा नयन फाकती पापणी न हो ॥ १५ ॥
अह्नि यत् भवान् काननं अटति - दिवसा जेव्हा तू अरण्यात हिंडत असतोस - (तत्) त्वां अपश्यताम् (अस्माकम्) - तेव्हा तुला न पाहणार्या आम्हाला - त्रुटिः (अपि) - चुटकी एवढा कालहि - युगायते - युगाप्रमाणे होतो - च - आणि - ते कुटिलकुन्तलं श्रीमुखम् - तुझे कुरळ्या केसांनी युक्त असे सुंदर मुख - उदक्षितां (नः) - टक लावून पाहणार्या आम्हाला - दृशां पक्ष्मकृत् (ब्रह्मा अपि) जडः (भाति) - डोळ्यांना पापण्या करणारा ब्रह्मदेवहि मूर्ख वाटतो. ॥१५॥
हे प्रियतमा ! दिवसा जेव्हा तुम्ही वनामध्ये विहार करण्यासाठी जाता, तेव्हा तुम्ही न दिसल्यामुळे आम्हांला एक एक क्षण युगासारखा वाटतो आणि जेव्हा तुम्ही संध्याकाळी माघारी येता, तेव्हा कुरळ्या केसांनी शोभणारे तुमचे सुंदर मुख आम्ही पाहू लागतो, त्यावेळी डोळ्यांच्या पापण्या बनवून दर्शनात व्यत्यय आणणारा हा विधाता मूर्ख आहे, असे आम्हांला वाटते. (१५)
पतिसुतान्वयभ्रातृबान्धवान्
अतिविलङ्घ्य तेऽन्त्यच्युतागताः । गतिविदस्तवोद्गीतमोहिताः कितव योषितः कस्त्यजेन्निशि ॥ १६ ॥
पति सुतो तसे बंधु सोयरे कुळहि त्यागुनी पायि पातलो । मनि तुझी बहू आस घेतली कपटि तू असा सोडिसी अम्हा ॥ १६ ॥
कितव अच्युत - हे धूर्ता श्रीकृष्णा - गतिविदः तव - गायनाचे तत्त्व जाणणार्या तुझ्या - उदगीतमोहिताः - उंच सुरांतील गायनाने मोहित झालेल्या अशा - पतिसुनान्वयभ्रातृबान्धवान् अतिविलङ्घ्य - पति, पुत्र, कुल, भाऊ व भाऊबंद यांना सोडून - ते अन्ति निशि आगताः - तुझ्या जवळ रात्रीच्या वेळी आलेल्या अशा - (नः) योषितः - आम्हां स्त्रियांस - कः त्यजेत् - कोण टाकील ? ॥१६॥
हे अच्युता ! आम्ही आपले पति-पुत्र, बंधु-बांधव आणि कुळाचा त्याग करून तुमच्याकडे आलो आहोत. आम्ही तुमची एक-एक क्रिया जाणतो, संकेत समजतो. तुमच्या मधुर गीताच्या मोहिनीने आम्ही येथे आलो आहोत, हे तुम्हांला माहीत आहे. असे असताना हे कपटी ! अशा रात्रीच्या वेळी आलेल्या अबलांना तुमच्याखेरीज आणखी कोण वार्यावर सोडील ! (१६)
रहसि संविदं हृच्छयोदयं
प्रहसिताननं प्रेमवीक्षणम् । बृहदुरः श्रियो वीक्ष्य धाम ते मुहुरतिस्पृहा मुह्यते मनः ॥ १७ ॥
मिलन व्हावया गोष्टि बोलसी बघसि तू जधी वक्ष रुंदते । दिसत नेत्रि श्रीवत्सचिन्ह ते मुहुरली मने मुग्ध जाहलो ॥ १७ ॥
ते - तुझे - हृच्छयोदयं रहसि संविदम् - मदनाला उत्पन्न करणारे एकांतातील भाषण - प्रहसिताननम् - हसरे मुख - प्रेमवीक्षणम् - प्रेमाने पाहणे - श्रियः धाम बृहत् उरः - लक्ष्मीचे स्थान असे विशाल वक्षस्थल - वीक्ष्य - पाहून - (नः) ते अतिस्पृहा (भवति) - आम्हास तुझ्याविषयी अतिशय इच्छा उत्पन्न होते - (नः) मनः मुहुः मुह्यते - आमचे मन वारंवार मोह पावते. ॥१७॥
एकांतात तुम्ही मिलनाची आकांक्षा, प्रेमभाव, जागृत करणार्या गोष्टी करीत होतात. थट्टा-मस्करी करीत प्रेमपूर्ण दृष्टीने आमच्याकडे पाहात होतात आणि आम्ही लक्ष्मीचे निवासस्थान असणारे तुमचे विशाल वक्षःस्थळ पाहात असू. तेव्हापासून आपल्या भेटीची आमची लालसा वाढत चालली असून आमचे मन त्याच विचारांनी मोहित होत आहे. (१७)
व्रजवनौकसां व्यक्तिरङ्ग ते
वृजिनहन्त्र्यलं विश्वमङ्गलम् । त्यज मनाक् च नस्त्वत्स्पृहात्मनां स्वजनहृद्रुजां यन्निषूदनम् ॥ १८ ॥
व्रजिचिया जना सुखचि द्यावया धरिसि देह हा भद्र साधण्या । हृदय हे जळे औषधीचि दे हृदयरोग हा संपवी अता ॥ १८ ॥
च - आणि - अङग - हे श्रीकृष्णा - ते व्यक्तिः - तुझा अवतार - व्रजवनौकसां वृजिनहन्त्री - गोकुळातील व वृंदावनात राहणार्या प्राण्यांचे पाप नाहीसे करणारा असा - अलं विश्वमङगलं (अस्ति) - विश्वाला अत्यंत मंगलकारक असा आहे - त्वत्स्पृहात्मनां नः - तुझ्याविषयीची इच्छा आहे मनांत ज्यांच्या अशा आम्हांला - स्वजनहृद्रुजां निषूदनं यत् (अस्ति) - स्वजनांच्या अंतःकरणातील रोग नष्ट करणारे जे असेल - (तत्) मनाक् त्यज - ते थोडेसे दे. ॥१८॥
हे प्रियतमा ! तुमचे हे स्वरूप व्रजवनवासियांची सर्व दुःखे नाहीसे करणारे आणि विश्वाचे पूर्ण कल्याण करणारे आहे. आमच्या मनात फक्त तुमच्या विषयीच्याच लालसेने जी व्याधी उत्पन्न झाली आहे, तीवर असे काही थोडेसे औषध द्या की, जे तुमच्याच असलेल्या आमचा हृदयरोग समूळ नाहीसा करील. (१८)
विवरण :- कृष्णाचे गुणगान करताना गोपी पुढे म्हणतात, तुझ्या या विरहाने आम्हाला हृद्रोग झाला आहे, मग रोग जर तुझ्यामुळे असेल, तर औषधही तूच सुचवायला हवे. पण हे औषध इतर औषधापेक्षा वेगळे आहे. ते सांगायचे आणि घ्यायचेहि गुप्तपणेच आहे. कारण हे औषध म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून प्रत्यक्ष तू, तुझा सहवास हेच आहे. आणि या औषधाची मात्रा किती ? अगदी भरपूर, मनसोक्त. तिथे कंजूषपणा नको. (तुझ्या भरपूर सहवासाची आमची मागणी आहे. ती पूर्ण कर.) (नल-दमयंतीच्या प्रसिद्ध प्रेमकथेतही 'औषध 'नल'गे मजला' असे दमयंती आपल्या आईला सांगते.) (१८)
( वसंततिलका )
यत्ते सुजातचरणाम्बुरुहं स्तनेषु भीताः शनैः प्रिय दधीमहि कर्कशेषु । तेनाटवीमटसि तद् व्यथते न किं स्वित् कूर्पादिभिर्भ्रमति धीर्भवदायुषां नः ॥ १९ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे पूर्वार्धे रासक्रीडायां गोपीगीतं नामैकत्रिंशोऽध्यायः ॥ ३१ ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
( वसंततिलका ) ते कोवळे पद बहू स्तन हे कठीण टेकी हळूच कुठे क्षति पोचिवीता । नी त्या पदे भटकसी वनि आनवाणी होतो अचेत जिव हा तुजसाठि वाचे ॥ १९ ॥ ॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर ॥ एकतिसावा अध्याय हा ॥ १० ॥ ३१ ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
सुजात प्रिय - हे सुकुमारा, हे प्रियकरा - यत् ते चरणाम्बुरुहम् - जे तुझे चरणरूपी कमळ - (नः) कर्कशेषु स्तनेषु - आमच्या कठीण अशा स्तनांवर - भीताः - भीतभीत - शनैः - हळुहळु - दधीमहि - आम्ही ठेवावे - तेन अटवीं अटसि - त्याने तू अरण्यात हिंडतोस - तत् कूर्पादिभिः - ते दगडाच्या कपर्या इत्यादिकांनी - किंस्वित् न व्यथते (किम्) - क्लेश पावत नसेल काय - भवदायुषानः - तूच आहेस आयुष्य ज्यांचे अशा आमची - धीः भ्रमति - बुद्धि गोंधळते. ॥१९॥
हे प्रियतमा ! तुमचे कमळापेक्षाही कोमल सुंदर चरण आम्ही आमच्या कठोर स्तनांवर भीत-भीतच अतिशय हळुवारपणे ठेवीत असतो. पण रात्रीच्या वेळी त्याच चरणांनी तुम्ही घनदाट जंगलामध्ये भटकत आहात. काटे, दगड वगैरे लागून त्यांना पीडा होत नाही काय ? आम्हांला तर नुसत्या त्या कल्पनेनेच चक्कर येऊ लागली आहे ! कारण आमचे जीवनच तुम्ही आहात. (१९)
अध्याय एकतिसावा समाप्त |