|
श्रीमद् भागवत पुराण
वेणुनादं श्रुत्वा आगतानां गोपीनां श्रीकृष्णेनसह संवादः; रासलीलेचा प्रारंभ - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् ) भगवान् अपि ता रात्रीः शरदोत्फुल्लमल्लिकाः । वीक्ष्य रन्तुं मनश्चक्रे योगमायामुपाश्रितः ॥ १ ॥
( अनुष्टुप् ) श्रीशुकदेव सांगतात - कृष्णसंकेत ती रात्र शरदीं फुलली फुले । गोपिंना हर्ष तो झाला माया ती योजुनी हरी । प्रेमिकांच्याच इच्छार्थ रासक्रीडेस हो म्हणे ॥ १ ॥
शरदोत्फुल्लमल्लिकाः - शरदृतूमुळे ज्यात मोगरी उमलल्या आहेत - ताः रात्रीः वीक्ष्य - अशा त्या रात्री पाहून - योगमायां उपाश्रितः - योगमायेचा आश्रय केलेला - (सः) भगवान् अपि - तो श्रीकृष्ण सुद्धा - रन्तुं मनः चक्रे - क्रीडा करण्याचे मनात आणिता झाला.॥१॥
श्रीशुक म्हणतात - शरद ऋतूतील पौर्णिमेची रात्र होती. मोगरा वगैरे सुगंधी फुले उमलली होती. ते पाहून भगवंतांनी योगमायेचा आश्रय करून, रासक्रीडा करण्याचा संकल्प केला. (१)
विवरण :- आतापर्यंतच्या अध्यायात भगवंतांच्या अनेक लीलांचे वर्णन आले आहे. आता महत्त्वाची म्हणजे गोपींसह केलेली 'रासलीला' 'रासक्रीडा' ही क्रीडा म्हणजे कृष्णमय झालेल्या गोपींसह केलेले नृत्यगायन. (काही विद्वानांच्या मते 'हल्लीसक' नृत्य म्हणजेच 'रास' एका नटाने अनेक नटयांसह केलेले नृत्य. काहींच्या मते रसपूर्ण नृत्य म्हणजे रास.) मग अशा या रसपूर्ण प्रेमलीलेला निसर्गाचीही तितकीच अनुकूल आणि बहारदार पार्श्वभूमी हवी. शारदीय पौर्णिमेचा पूर्ण चंद्र आपल्या किरणांनी पृथ्वीला जणू न्हाऊ घालीत आहे, चंद्रविकासी कमळे आणि फुलांचे ताटवे फुलले आहेत, हे वातावरण कोणाला मोहात पाडणार नाही ? भगवंतानाहि याचा मोह पडला आणि त्यांनी गोपींसह रासक्रीडा करण्याचे ठरविले. इथे 'भगवानपि' हा शब्द महत्त्वाचा. कोणत्याहि चांगल्या, आकर्षक गोष्टीच्या मोहात पडणे हा सामान्यांचा 'वीक पाँइंट' पण मग भगवंतहि ? पण कृष्ण भगवान आता मानवी रूपात आहेत, त्यामुळे ते मानवी भाव-भावनांनी युक्तच असायला नकोत का ? म्हणून त्यांनाहि मोह पडला. शिवाय 'चीरहरण' (अध्याय २२) प्रसंगी त्यांनी गोपींना रासक्रीडा करण्याचे आश्वासनही दिले होते. भगवान हे भक्तवत्सल ! त्यांना आपल्या वचनाचे पालन तर करायला हवेच, शिवाय आपल्यावर निरतिशय प्रेम करणार्या गोपींसाठीही त्यांना एवढे करायला हवे. रासक्रीडेसाठी ते योगमाया-उपाधित होऊन म्हणजे अचिन्त्य शक्ती धारण करून स्वरूपसामर्थ्य धारण करून अवतीर्ण झाले. (१)
( मिश्र )
तदोडुराजः ककुभः करैर्मुखं प्राच्या विलिम्पन्नरुणेन शन्तमैः । स चर्षणीनामुदगाच्छुचो मृजन् प्रियः प्रियाया इव दीर्घदर्शनः ॥ २ ॥
( इंद्रवज्रा ) हर्षे प्रिया जै पतिसी निवांत तै केशराने शशिप्राचि न्हाली । उन्हात जे जीव तपोनि गेले ते सर्व आता मनि शांत झाले ॥ २ ॥
तदा - तेव्हा - दीर्घदर्शनः प्रियः - फार दिवसांनी भेटलेला पति - प्रियायाः (मुखं) अरुणेन इव - पत्नीचे मुख केशराप्रमाणे तांबूस वर्णाचे तसे - प्राच्याः ककुभः मुखं - पूर्वदिशेचे मुख - शंतमैः करैः विलिम्पन् - सुखकारक अशा हातांनी (किरणांनी) व्याप्त करीत - चर्षणीनाम् शुचः मृजन् - लोकांचे दुःख नाहीसे करीत - सः उडुराजः - तो नक्षत्रांचा राजा चंद्र - उदगात् - उदय पावला. ॥२॥
त्याचवेळी, फार दिवसांनी भेटलेल्या पतीने प्रियेच्या मुखाला केशर वगैरे लावून तिचा विरहताप दूर करावा, त्याप्रमाणे चंद्रमा पूर्वदिशेचे मुख आपल्या शीतल किरणरूप करांनी उदयकालीन रंगाने तांबूस करीत व चराचराचा ताप हरीत उदयाला आला. (२)
दृष्ट्वा कुमुद्वन्तं अखण्डमण्डलं
रमाननाभं नवकुङ्कुमारुणम् । वनं च तत्कोमलगोभी रञ्जितं जगौ कलं वामदृशां मनोहरम् ॥ ३ ॥
संकोचला तो मनिं चंद्र थोडा रमे परी तो दिसु लागला की । नी चांदणे ते पसरे वनासी क्लीं शब्दी कृष्णो हळु वंशि फुंकी ॥ ३ ॥
अखण्डमण्डलं - पूर्ण आहे मंडल ज्याचे अशा - रमाननाभम् - लक्ष्मीच्या मुखाप्रमाणे आहे शोभा ज्याची अशा - नवकुंकुमारुणम् - ताज्या केशराप्रमाणे तांबूस वर्णाच्या - कुमुद्वन्तम् - चंद्राला - दृष्ट्वा - पाहून - च - आणि - तत्कोमलगोभिः अञ्जितम् - त्याच्या कोवळ्या किरणांनी युक्त असे - (तत्) वनम् - ते वृंदावन - वामदृशां मनोहरम् - सुंदर स्त्रियांचे मन हरण होईल अशारीतीने - कलम् - मधुर - जगौ - गाता झाला. ॥३॥
श्रीकृष्ण त्याज्या केशरासारखे लालसर व लक्ष्मीच्या मुखकमलासारखे मनोहर पूर्ण चंद्रबिंब आणि त्याच्या कोमल किरणांनी व्यापलेले वृंदावन पाहिले आणि वेणूवर व्रजसुंदरींना प्रिय असणारे गीत वाजविण्यास सुरुवात केली. (४)
निशम्य गीतां तदनङ्गवर्धनं
व्रजस्त्रियः कृष्णगृहीतमानसाः । आजग्मुरन्योन्यमलक्षितोद्यमाः स यत्र कान्तो जवलोलकुण्डलाः ॥ ४ ॥
या वंशिनादे हरि प्रेमिकांच्या वृत्तीस जिंकोनि कधीच ठेला । सख्या त्यजोनी पळल्या प्रिया त्या नी कुंडले ती बहु हालली की ॥ ४ ॥
तत् अनङ्गवर्धनं गीतं निशम्य - ते कामवासना वाढविणारे असे गाणे ऐकून - कृष्णगृहीतमानसाः - श्रीकृष्णाने हरण केली आहेत मने ज्यांची अशा - अन्योन्यम् अलक्षितोद्यमाः - एकमेकींनी न पाहिलेला आहे उद्योग ज्यांचा अशा - जवलोलकुण्डलाः - चालण्याच्या वेगामुळे हालत आहेत कुंडले ज्यांची अशा - व्रजस्त्रियः - गोकुळवासी स्त्रिया - यत्र सः कान्तः (आसीत् तत्र) - जेथे तो प्रियकर कृष्ण होता तेथे - आजग्मुः - येत्या झाल्या ॥४॥
श्यामसुंदरांनी ज्यांचे मन आधीच आपल्या अधीन करून घेतले होते, त्या गोपी बासरीचे ते प्रेमवर्धक स्वर ऐकताच एकमेकींना न कळवताच प्रियतम जेथे होता, तिकडे जाण्यास निघाल्या. त्यावेळी भरभर चालण्याने त्यांच्या कानातील कुंडले झोके घेत होती. (४)
( अनुष्टुप् )
दुहन्त्योऽभिययुः काश्चिद् दोहं हित्वा समुत्सुकाः । पयोऽधिश्रित्य संयावं अनुद्वास्यापरा ययुः ॥ ५ ॥
( अनुष्टुप् ) काढिती धार ज्या कोणी टाकोनी पळल्या तशा । चुलीसी दूध स्वैपाक टाकिता कैक धावल्या ॥ ५ ॥
दुहन्त्याः काश्चित् - दूध काढणार्या कित्येक गोपी - समुत्सुकाः (सत्यः) - अत्यंत उत्सुक होत्सात्या - दोहं हित्वा - दूध काढण्याचे टाकून - अभिययुः - त्याजकडे गेल्या - अपराः (काश्चित्) - दुसर्या कित्येक स्त्रिया - पयः अधिश्रित्य - दूध, चुलीवर ठेवून - संयावं अनुद्वास्य (एवं) - सांजा न उतरताच - ययुः - निघून गेल्या ॥५॥
बासरीचे स्वर ऐकताच ज्या गोपी गाईंची धार काढीत होत्या, त्या अत्यंत उत्सुक होऊन धार काढणे अर्धवट टाकून निघून गेल्या. ज्या दूध तापवीत होत्या, त्या उतू जाणारे दूध तसेच सोडून, आणि ज्या लापशी करीत होत्या, त्या भांडे चुलीवरून खाली न उतरविताच निघाल्या. (५)
परिवेषयन्त्यस्तद्धित्वा पाययन्त्यः शिशून् पयः ।
शुश्रूषन्त्यः पतीन् काश्चिद् अश्नन्त्योऽपास्य भोजनम् ॥ ६ ॥
पाजिता स्तन बाळाला पतीला सेविता कुणी । जेविता त्यजिले कोणी प्रिय कृष्णास भेटण्या ॥ ६ ॥
परिवेषयन्त्यः (काश्चित्) - वाढणार्या कित्येक स्त्रिया - तत् (परिवेषणं) हित्वा (ययुः) - ते वाढणे टाकून गेल्या - शिशून् पयः पाययन्त्यः (काश्चित्) - मुलांना दूध पाजणार्या कित्येक स्त्रिया - पतीन् शुश्रूषन्त्यः (काश्चित्) - पतींची सेवा करीत असलेल्या कित्येक स्त्रिया - (तां) हित्वा - त्या पतिसेवेला टाकून - अश्रन्त्यः काश्चित् - जेवीत असलेल्या कित्येक स्त्रिया - भोजनं अपास्य - जेवण टाकून; ॥६॥
ज्या जेवावयास वाढत होत्या, त्या वाढण्याचे काम सोडून, ज्या मुलांना पाजवीत होत्या त्या पाजणे सोडून, ज्या पतींची सेवा करीत होत्या त्या सेवा सोडून आणि ज्या स्वतः जेवीत होत्या, त्या भोजन करणे सोडून निघाल्या. (६)
लिम्पन्त्यः प्रमृजन्त्योऽन्या अञ्जन्त्यः काश्च लोचने ।
व्यत्यस्तवस्त्राभरणाः काश्चित् कृष्णान्तिकं ययुः ॥ ७ ॥
अंजनो उटणे कोणी अंगिरा चंदना कुणी । लाविता सोडिले, वस्त्र लेवोनी धावल्या कुणी ॥ ७ ॥
लिम्पन्त्यः (काश्चित्) - सारवीत असलेल्या कित्येक स्त्रिया - तत् हित्वा - ते सारवणे टाकून - प्रमृजन्त्यः अन्याः - झाडीत असलेल्या दुसर्या स्त्रिया - लोचने अन्यन्त्यः काः (चित्) - डोळ्यांत काजळ घालणार्या कित्येक स्त्रिया - काश्चित् व्यत्यस्तवस्त्राभरणाः - कित्येकांचे वस्त्रे व अलंकार विस्कळित अशा - कृष्णान्तिकं ययुः - श्रीकृष्णाच्या जवळ गेल्या. ॥७॥
काही गोपी आपल्या शरीराला चंदन आणि उटणे लावीत होत्या, तर काही डोळ्यांमध्ये काजळ घालीत होत्या. त्या ते करावयाचे सोडून आणि उलटसुलट वस्त्रालंकार घालून श्रीकृष्णांकडे गेल्या. (७)
ता वार्यमाणाः पतिभिः पितृभिः भ्रातृबन्धुभिः ।
गोविन्दापहृतात्मानो न न्यवर्तन्त मोहिताः ॥ ८ ॥
ज्येष्ठांनी रोधिता कोणा न कोणी थांबल्या घरा । विश्वमोहन कृष्णाने आत्मा चोरोनि घेतला ॥ ८ ॥
गोविंदापहृतात्मानः - श्रीकृष्णाने हरण केले आहे मन ज्यांचे अशा - मोहिताः - मूढ झालेल्या अशा - ताः - त्या स्त्रिया - पतिभिः पितृभिः भ्रातृबन्धुभिः (च) - पतींकडून, बापांकडून व भाऊबंदांकडून - वार्यमाणाः (अपि) - निवारण केल्या गेल्या असताहि - न न्यवर्तन्त - परतल्या नाहीत.॥८॥
पतींनी, पित्यांनी, भाऊ आणि जातीबांधवांनी त्यांना अडविले, तरी गोविंदाने चित्त हरण केल्यामुळे त्या इतक्या मोहित झाल्या होत्या की, त्या थांबल्या नाहीत. (८)
अन्तर्गृहगताः काश्चिद् गोप्योऽलब्धविनिर्गमाः ।
कृष्णं तद्भावनायुक्ता दध्युर्मीलितलोचनाः ॥ ९ ॥
घरात कोंडले ज्यांना न मार्ग लाभला जयां । भावनायुक्त ध्यानाने गळाले नेत्र त्यांचिये ॥ ९ ॥
अन्तर्गृहगताः - घराच्या आतल्या भागात गेलेल्या - अलब्धविनिर्गमाः - मिळाले नाही बाहेर पडण्यास ज्यांना अशा - काश्चित् गोप्यः - कित्येक गोपी - तद्भावनायुक्ताः - त्याजविषयीच्या भावनेने युक्त अशा - मीलितलोचनाः (भूत्वा) - मिटलेले आहेत डोळे ज्यांनी अशा होऊन - कृष्णं दध्युः - कृष्णाचे ध्यान करित्या झाल्या.॥९॥
त्यावेळी काही गोपी घरामध्ये होत्या. त्यांना बाहेर पडणे अशक्य झाले. तेव्हा त्यांनी आपले डोळे बंद केले आणि त्या अतिशय तन्मयतेने श्रीकृष्णांचे ध्यान करू लागल्या. (९)
दुःसहप्रेष्ठविरह तीव्रतापधुताशुभाः ।
ध्यानप्राप्ताच्युताश्लेष निर्वृत्या क्षीणमङ्गलाः ॥ १० ॥
अशूभ जळले ध्याने कृष्ण ध्यानात भेटला । कृष्णा आलिंगिती चित्ती परंशांतीच लाभली ॥ १० ॥
दुःसहप्रेष्ठविरह - सहन करण्यास कठीण असा जो अत्यंत प्रियकराचा वियोग - तीव्रतापधुताशुभाः - त्याच्या भयंकर पीडेने दूर केले आहे पाप ज्यांचे अशा - ध्यानप्राप्ताच्युताश्लेष निवृत्त्या - ध्यानाने प्राप्त झालेल्या श्रीकृष्णाच्या आलिंगनाच्या सुखाने - क्षीणमङ्गलाः (जाता) - नष्ट झाले आहे पुण्य ज्याचे अशा झाल्या. ॥१०॥
आपल्या प्रियतम, श्रीकृष्णांच्या असह्य विरहाच्या तीव्र वेदनांनी त्यांच्या हृदयात इतकी व्यथा निर्माण झाली की, त्यामुले त्यांचे पाप भस्म होऊन गेले आणि ध्यानामध्ये श्रीकृष्णांनी दिलेल्या आलिंगनाच्या सुखाने त्यांचे पुण्यही संपले. (अशा रीतीने पापपुण्य संपल्यामुळे त्यांचे गुणमय देह नाहीसे झाले.) (१०)
तमेव परमात्मानं जारबुद्ध्यापि सङ्गताः ।
जहुर्गुणमयं देहं सद्यः प्रक्षीणबन्धनाः ॥ ११ ॥
जारभाव तयां चित्ती कृष्णाशी असला जरी । आलिंगिती जयाशी त्या कृष्णरूपास पावल्या ॥ ११ ॥
जारबुद्ध्या अपि - कृष्ण जार आहे अशा बुद्धीने सुद्धा - तम् एव परम् आत्मानम् सङ्गवाः - त्याच श्रेष्ठ अशा ईश्वराशी संगत झालेल्या अशा - प्रक्षीणबन्धनाः - नष्ट झाले आहे बंधन ज्यांचे अशा - ताः - त्या गोपी - सद्यः - लगेच - गुणमयम् देहम् - गुणकार्यमय देहाला - जहुः - टाकित्या झाल्या. ॥११॥
जारबुद्धीने का असेना, त्या परमपुरुषाशी त्यांचे मिलन झाल्यामुळे त्यांचे कर्मबंधन तत्काळ नाहीसे झाले. त्यामुळेच त्यांनी त्रिगुणात्मक देहाचा त्याग केला व त्या दिव्यदेही झाल्या. (११)
विवरण :- शारदीय चांदण्याने नटलेल्या रात्री कृष्णाचे मुरलीवादन ऐकून गोपींचे भान हरपले. आपल्या हातातील सर्व कामे टाकून त्यांनी भारल्याप्रमाणे वनाकडे धाव घेतली. आपल्या प्रापंचिक कर्तव्यांचा त्यांना विसर पडला. काहींना प्रत्यक्ष जाणे अशक्य झाल्याने डोळे मिटून त्यांनी कृष्णाचे ध्यान केले. या ध्यानाने त्यांना इतके पुण्य प्राप्त झाले की, त्यांचा मागील पुण्य-संचय कमीच पडला. काहींना हा विरह इतका असह्य झाला की, त्या विरहाग्नीमध्ये त्यांच्या सर्व पापांचा नाश झाला. आणि गोपींनी देहत्याग केला.
श्रीपरीक्षिदुवाच -
कृष्णं विदुः परं कान्तं न तु ब्रह्मतया मुने । गुणप्रवाहोपरमः तासां गुणधियां कथम् ॥ १२ ॥
राजा परीक्षिताने विचारले - मानिती त्या प्रियो कृष्णा नवखा ब्रह्मभाव तो । गुणासक्त असोनीया निवृत्त जाहल्या कशा ॥ १२ ॥
मुने - हे शुकाचार्य - कृष्णं - श्रीकृष्णाला - परंकान्तम् - श्रेष्ठ असा पति - विदुः - मानीत होत्या - नतु ब्रह्मतया (विदुः) - ईश्वर स्वरुपाने जाणत नव्हत्या - गुणधियां तासाम् - त्रिगुणात्मक आहे बुद्धि ज्यांची अशा त्यांच्या - गुणप्रवाहोपरमः कथं (संजातः) - त्रिगुणांच्या प्रवाहाचा शेवट कसा झाला. ॥१२॥
राजाने विचारले - मुनिवर्य ! श्रीकृष्णांना गोपी फक्त आपला परम प्रियतम मानीत होत्या. त्यांना ते काही ब्रह्म वाटत नव्हते. अशा प्रकारे गुणांमध्येच आसक्त असणार्या त्यांच्या बाबतीत गुणांचा प्रवाहरूप असलेल्या या संसाराची निवृत्ती होणे कसे शक्य आहे ? (१२)
श्रीशुक उवाच -
उक्तं पुरस्ताद् एतत्ते चैद्यः सिद्धिं यथा गतः । द्विषन्नपि हृषीकेशं किमुताधोक्षजप्रियाः ॥ १३ ॥
श्रीशुकदेव सांगतात । पूर्वीच वदलो मी तो चेदीने द्वेषिला हरी । यांनी तो प्रमिला कृष्ण याच्यात नवलाव ना ॥ १३ ॥
एतत् - हे - ते - तुला - पुरस्तात् - पूर्वी - उक्तं - सांगितले आहे - यथा - जेणेकरुन - हृषीकेशं द्विषन् अपि चैद्यः - श्रीकृष्णाचा द्वेष करणारा असाहि शिशुपाल - सिद्धिं गतः - मोक्षास गेला - उत अधोक्षजप्रियाः किम् - मग श्रीकृष्ण ज्यांचा प्रियकर अशा गोपी तर काय, ॥१३॥
श्रीशुक म्हणाले - मी तुला यापूर्वीच सांगितले होते की, चेदिराज शिशुपालाने भगवंतांबद्दल द्वेषभाव ठेवूनही त्याला भगवत्स्वरूपाची प्राप्ती झाली. तर मग ज्या गोपी श्रीकृष्णांवर अनन्य प्रेम करतात, त्या त्यांना प्राप्त होतील, यात काय आश्चर्य ! (१३)
नृणां निःश्रेयसार्थाय व्यक्तिर्भगवतो नृप ।
अव्ययस्याप्रमेयस्य निर्गुणस्य गुणात्मनः ॥ १४ ॥
अप्रमेय असा कृष्ण कल्याण गुण आश्रय । कल्याण दावितो रूप लीला या करितो अशा ॥ १४ ॥
नृप - हे राजा - अव्ययस्य - अविनाशी अशा - अप्रमेयस्य - ज्यांचे यथार्थ ज्ञान होणे कठीण अशा - निर्गुणस्य - गुणरहित अशा - गुणात्मनः - तीन गुण हाच आहे आत्मा ज्याचा अशा - भगवतः - ईश्वराचे - व्यक्तिः - प्रकट होणे - नृणां निःश्रेयसार्थाय (एव भवति) - मनुष्य़ांच्या मोक्षासाठीच असते. ॥१४॥
हे राजा, अविनाशी, अनंत, निर्गुण असून त्रिगुणात्मक प्रकृतीचे नियंते असणार्या भगवंतांचे प्रकट होणे, हे माणसांच्या परम कल्याणासाठीच आहे. (१४)
कामं क्रोधं भयं स्नेहं ऐक्यं सौहृदमेव च ।
नित्यं हरौ विदधतो यान्ति तन्मयतां हि ते ॥ १५ ॥
त्या मुळे हरिला ध्याता असो कोणीहि तो तसा । ज्या त्या भावे हरी पावे वृत्ती हो हरिरूप ती ॥ १५ ॥
कामं क्रोधं स्नेहं सौहृदं च - इच्छा, राग, प्रेम, ऐक्य आणि मैत्री - नित्यं हरौ एव विदधतः ते - नेहमी परमेश्वराच्याच ठिकाणी प्रेम ठेवणारे ते पुरुष - हि - खरोखर - तन्मयतां यान्ति - त्याच्या स्वरूपाला प्राप्त होतात ॥१५॥
म्हणून काम, क्रोध, भय, स्नेह, नातेसंबंध किंवा भक्ती यांपैकी कोणत्याही भावनेने भगवंतांशी नित्य जोडले गेलेले जीव त्या भगवंतांशी एकरूप होतात. (१५)
न चैवं विस्मयः कार्यो भवता भगवत्यजे ।
योगेश्वरेश्वरे कृष्णे यत एतद् विमुच्यते ॥ १६ ॥
तुमच्या परि जो भक्त तेणे शंका धरू नये । आश्चर्य हरिचे काय त्यां इच्छे विश्व भद्र हो ॥ १६ ॥
च - आणि - अजे - जन्मरहित अशा - योगेश्वरेश्वरे - योगेश्वरांमध्येहि श्रेष्ठ अशा - भगवति कृष्णे - भगवान श्रीकृष्णाविषयी - भवता एवं विस्मयः न कार्यः - तुझ्याकडून असे आश्चर्य दर्शविले जाऊ नये ॥१६॥
तुला योगेश्वरांचे सुद्धा ईश्वर, अजन्मा भगवंतांच्या बाबतील मुळीच आश्चर्य वाटायला नको. कारण त्यांच्या केवळ संकल्पाने स्थावरादिकही मुक्त होतात. (१६)
ता दृष्ट्वान्तिकमायाता भगवान् व्रजयोषितः ।
अवदद् वदतां श्रेष्ठो वाचः पेशैर्विमोहयन् ॥ १७ ॥
व्रजींच्या विभुती गोपी समीप हरि पाहता । विनोदे बोलला कृष्ण चातुर्ये मोहुनी तयां ॥ १७ ॥
ताः वज्रयोषितः - त्या गोकुळातील स्त्रिया - अन्तिकं आयाताः दृष्ट्वा - जवळ आलेल्या पाहून - वदतां श्रेष्ठः - वक्त्यांमध्ये श्रेष्ठ असा - वाचः पेशैः विमोहयन् - वाणीच्या सौंदर्याने मोहून टाकीत - अवदत् - म्हणाला ॥१७॥
त्या गोपी जवळ आलेल्या पाहून वक्त्यांत श्रेष्ठ असणार्या भगवंतांनी आपल्या वाक्चातुर्याने त्यांना मोहित करीत म्हटले. (१७)
श्रीभगवानुवाच -
स्वागतं वो महाभागाः प्रियं किं करवाणि वः । व्रजस्यानामयं कच्चिद् ब्रूतागमनकारणम् ॥ १८ ॥
श्रीभगवान् कृष्ण म्हणाले - स्वागतं हो महाभागा काय सेवा करूं तुम्हा । ठीक की त्या व्रजामध्ये तुम्ही आल्या कशास हो ॥ १८ ॥
महाभागाः - हे महाभाग्यशाली स्त्रियांनो - वः स्वागतम् (अस्तु) - तुमचे स्वागत असो - वः किम् प्रिय करवाणि - तुमची कोणती प्रिय गोष्ट मी करू - व्रजस्य अनामयं कश्चित् - गोकुळाचे कुशल आहे ना - आगमनकारणं ब्रूत - येण्याचे कारण सांगा ॥१८॥
श्रीभगवान म्हणाले - महाभाग्यवान गोपींनो ! तुमचे स्वागत असो. तुम्हांला आवडणारी कोणती गोष्ट मी करू ? व्रजामध्ये सर्व कुशल आहे ना ? यावेळी तुम्ही इकडे का आलात ? सांगा बरे ! (१८)
रजन्येषा घोररूपा घोरसत्त्वनिषेविता ।
प्रतियात व्रजं नेह स्थेयं स्त्रीभिः सुमध्यमाः ॥ १९ ॥
विंचू काटा इथे राही रात्रीच्या समयास या । व्रजी त्वरित जा तुम्ही स्त्रियांची वेळ ना अशी ॥ १९ ॥
सुमध्यमाः - हे सुंदर स्त्रियांनो - एषा रजनी - ही रात्र - घोररुपा - भयंकर आहे रूप जिचे अशी - महासत्त्वनिशेविता (अस्ति) - मोठमोठ्या प्राण्यांनी सेविलेली अशी आहे - व्रजं प्रतियात - तुम्ही गौळवाड्यांत परत जा - स्त्रीभिः इह न स्थेयम् - स्त्रियांनी येथे रहाणे योग्य नाही ॥१९॥
हे सुंदरींनो ! आधीच ही रात्र भीतिदायक. त्यात यावेळी हिंस्त्र प्राणी इकडे तिकडे फिरत असतात. तुम्ही घरी परत जा. स्त्रियांनी येथे थांबणे बरे नव्हे. (१९)
मातरः पितरः पुत्रा भ्रातरः पतयश्च वः ।
विचिन्वन्ति ह्यपश्यन्तो मा कृढ्वं बन्धुसाध्वसम् ॥ २० ॥
व्रजात नसता तुम्ही धुंडितील तुम्हा पती । माय बाप तसे बंधू न टाका संकटी तयां ॥ २० ॥
हि - कारण - (वः) अपश्यन्तः - तुम्हाला न पहाणारे - वः - तुमचे - मातरः पितरः भ्रातरः पतयः पुत्राः च - आई, बाप, भाऊ, पति आणि पुत्र - (वः) विचिन्वन्ति - तुम्हाला शोधतील - (एवं) बन्धुसाध्वसम् मा कृध्वं - असे बांधवांना कष्ट देऊ नका ॥२०॥
तुम्ही दिसत नाहीत, असे पाहून तुमचे आई-वडील, पति-पुत्र किंवा भाऊ तुम्हांला शोधतील. त्यांना घाबरवून सोडू नका. (२०)
दृष्टं वनं कुसुमितं राकेश कररञ्जितम् ।
यमुना अनिललीलैजत् तरुपल्लवशोभितम् ॥ २१ ॥
वनीची पाहता पुष्पे चंद्र तो रंगला कसा । रेखिले चित्र जै कोणी यमुना जल स्पर्शुनी । वाहतो मंद हा वारा हालती तरु वेलि त्या ॥ २१ ॥
कुमुदितम् - तांबडया कमळांनी युक्त - राकेशकररञ्जितम् - पूर्णिमेच्या पूर्ण चंद्राच्या किरणांनी रंगविलेले - यमुनानिललीलैजन् - यमुनेवरील वार्याच्या योगाने डौलाने हालणार्या - तरुपल्लवशोभितम् - झाडांच्या पालवीमुळे शोभणारे असे - (एतत्) वनम - हे वृंदावन - (युष्माभिः) दृष्टम् - तुम्ही पाहिले. ॥२१॥
चंद्राच्या किरणांनी धवल झालेले, यमुनेवरील वार्याच्या मंद गतीने हालणार्या झाडांच्या पानांनी शोभणारे, फुलांनी बहरलेले हे वन तुम्ही पाहिलेत ना ! (२१)
तद् यात मा चिरं गोष्ठं शुश्रूषध्वं पतीन् सतीः ।
क्रन्दन्ति वत्सा बालाश्च तान् पाययत दुह्यत ॥ २२ ॥
पाहिले तुम्हि हे सारे त्वरेने घरि जा पहा । कुलीन सति हो सार्या पती सेवेत जा अता । वासरे लेकरे सारी रडती दूध प्यावया ॥ २२ ॥
तत् - तर - सतीः - हे साध्वी स्त्रियांनो - गोष्ठं यात - तुम्ही गौळवाडयात जा - चिरं मा - वेळ लावू नका - पतीन् शुश्रूषध्वम् - पतींची सेवा करा - बालाः क्रन्दन्ति - मुले रडत असतील - वत्साः च (क्रन्दन्ति) - आणि वासरे हंबरत असतील - तान् पाययत - त्यांना पाजा - दुह्यत - दूध काढा. ॥२२॥
तर आता घरी परत जा. हे पतिव्रतांनो ! उशीर करू नका. आपल्या पतींची सेवा करा. तुमच्या घरांतील मुले रडत असतील, त्यांना दूध पाजा. आणि वासरे हंबरत असतील, त्यांना गायांजवळ सोडून गायांच्या धारा काढा. (२२)
अथवा मदभिस्नेहाद् भवत्यो यन्त्रिताशयाः ।
आगता ह्युपपन्नं वः प्रीयन्ते मयि जन्तवः ॥ २३ ॥
माझ्या प्रेमात गुंतोनी पातल्या योग्य ही असे । जगीचे जीव ते सारे तुष्टती मज पाहता ॥ २३ ॥
अथवा - पण बहुधा - मदभिस्नेहात् - माझ्यावरील निकट प्रेमामुळे - यन्त्रिताशयाः - जडले आहे मन ज्यांचे अशा - भवत्यः - तुम्ही - आगताः - आलेल्या आहा - वः - तुम्हाला - उपपन्नं (अस्ति) - योग्य आहे - हि - कारण - जन्तवः - सर्व प्राणी - मयि प्रीयन्ते - माझ्य़ाठिकाणी प्रेम करितात. ॥२३॥
किंवा माझ्यावरीत अत्यंत प्रेमाने पराधीन होऊन तुम्ही येथे आला असाल तर तेही योग्यच आहे. कारण जगातील सर्वच प्राणी माझ्यावर प्रेम करतात. (२३)
भर्तुः शुश्रूषणं स्त्रीणां परो धर्मो ह्यमायया ।
तद्बन्धूनां च कल्याणः प्रजानां चानुपोषणम् ॥ २४ ॥
संतानपालनी धर्म पतीसेवा तशीच ती । गृहिणींचा असे श्रेष्ठ ऐका गोपी प्रिया तुम्ही ॥ २४ ॥
भर्तुः - पतीची - अमायया - निष्कपटपणाने - शुश्रूषणम् - सेवा करणे - च - आणि - तद्बंधूनाम् कल्याणम् - त्याच्या भावांचे कल्याण करणे - च - आणि - अनुपोषम् - मुलाबाळांचे पोषण करणे - (अयं) हि स्त्रीणां परः धर्मः (अस्ति) - हाच स्त्रियांचा श्रेष्ठ असा धर्म होय.॥२४॥
कल्याणी गोपींनो ! पतीची आणि त्याच्या बांधवांची निष्कपटभावाने सेवा करणे आणि मुलाबाळांचे पालन-पोषण करणे हाच स्त्रियांचा श्रेष्ठ धर्म आहे. (२४)
दुःशीलो दुर्भगो वृद्धो जडो रोग्यधनोऽपि वा ।
पतिः स्त्रीभिर्न हातव्यो लोकेप्सुभिरपातकी ॥ २५ ॥
गती हवी जया चांग जर पापी पती नसे । न त्यजवा जरी मूर्ख दरिद्री रोगिही तरी ॥ २५ ॥
लोकेप्सुभिः स्त्रीभिः - स्वर्गादि लोकांची इच्छा करणार्या स्त्रियांनी - दुःशीलः - वाईट आहे वर्तन ज्याचे असा - दुर्भगः - दुर्दैवी - वृद्धः - म्हातारा - जडः - मूर्ख - रोगी - रोगयुक्त - वा - अथवा - अधनः अपि - ज्याच्याजवळ द्रव्य नाही असा सुद्धा - पतिः - पति - अपातकी (चेत्) - जर निष्पाप असेल तर - न हातव्यः - टाकण्यास योग्य नाही. ॥२५॥
ज्या स्त्रियांना उत्तम लोक प्राप्त करून घेण्याची इच्छा नसेल, त्यांनी पापी सोडून अन्य कोणत्याही प्रकारच्या पतीचा त्याग करू नये. मग तो वाईट स्वभावाचा, भाग्यहीन, वृद्ध, मूर्ख, रोगी किंवा निर्धन का असेना ! (२५)
अस्वर्ग्यमयशस्यं च फल्गु कृच्छ्रं भयावहम् ।
जुगुप्सितं च सर्वत्र ह्यौपपत्यं कुलस्त्रियः ॥ २६ ॥
कुलीन ललना यांना जार सेवाचि निंद्य ती । न मिळे स्वर्ग तो त्यांना कुकर्म तुच्छनी क्षणिक् ॥ २६ ॥
कुलस्त्रियाः - कुलीन स्त्रीचा - औपपत्यम् - जाराशी संबंध - अस्वर्ग्यम् - स्वर्गप्राप्तीस विघातक - अयशस्यम् - अपकीर्ति करणारा - फल्गु - क्षुद्र - कृच्छ्रम् - कष्टाचा - भयावहम् - धोक्याचा - च - आणि - सर्वत्र जुगुप्सितम् (अस्ति) - सर्वांनी निंदिलेला आहे. ॥२६॥
कुलीन स्त्रियांनी परपुरुषाकडे जाणे तर सर्वथैव निंद्य आहे. हे कुकर्म स्वर्गप्राप्तीला विघातक, अपकीर्तिकारक, हीन, कष्टप्रद आणि नरकभयाला कारण आहे. (२६)
श्रवणाद् दर्शनाद् ध्यानाद् मयि भावोऽनुकीर्तनात् ।
न तथा सन्निकर्षेण प्रतियात ततो गृहान् ॥ २७ ॥
श्रवणे दर्शने ध्याने कीर्तने बांधणे मला । सान्निध्यात न हो प्रेम तरी जा आपुल्या घरा ॥ २७ ॥
(मम) श्रवणात् - लीला ऐकण्यापासून - दर्शनात् - दर्शनापासून - ध्यानात् - ध्यानापासून - अनुकीर्तनात् - गुणवर्णनापासून - (यथा) मयि भावः (भवति) - जशी माझ्य़ाठायी भक्ति जडते - तथा संनिकर्षात् - तशी शरीरसंबंधापासून जडत नाही - ततः गृहान् प्रतियात - यास्तव तुम्ही घरी जा. ॥२७॥
गोपींनो ! माझ्या लीला आणि गुणांच्या श्रवणाने, रूपाच्या दर्शनाने, या सर्वांचे कीर्तन आणि ध्यान केल्याने, माझ्यावरील अनन्य प्रेमाची जशी प्राप्ती होते, तशी माझ्याजवळ राहून होत नाही. म्हणून तुम्ही घरी परत जा. (२७)
श्रीशुक उवाच -
इति विप्रियमाकर्ण्य गोप्यो गोविन्दभाषितम् । विषण्णा भग्नसङ्कल्पाः चिन्तामापुर्दुरत्ययाम् ॥ २८ ॥
श्रीशुकदेव सांगतात - ऐकता भगवत् वाक्य उदास गोपि जाहल्या । फुटल्या सर्व आकांक्षा चिंतेत बुडल्या पहा ॥ २८ ॥
इति - याप्रमाणे - विप्रियं गोविन्दभाषितम् आकर्ण्य - न आवडणारे असे कृष्णाचे भाषण ऐकून - विषण्णाः भग्नसंकल्पाः गोप्यः - दुःखित व भंगला आहे मनोरथ ज्यांचा अशा गोपी - दुरत्ययां - दूर होण्यास अत्यंत कठीण अशा - चिन्ताम् आपुः - काळजीप्रत प्राप्त झाल्या. ॥२८॥
श्रीशुक म्हणतात - भगवान श्रीकृष्णांचे हे स्वतःला न आवडणारे भाषण ऐकून गोपी खिन्न झाल्या. त्यांच्या आशा धुळीला मिळाल्या. त्यांना अपार चिंता लागून राहिली. (२८)
विवरण :- शरत्पूर्णिमेच्या रात्री मुरलीचा ध्वनी ऐकून वनात आलेल्या गोपींना कृष्णाने घरी परत जाण्यास सांगितले. वास्तविक स्वतः कृष्णानेच त्यांना कात्यायनी व्रताचे फलस्वरूप म्हणून रासक्रीडा करण्याचे आश्वासन दिले होते. मग आता त्यांना त्यांच्या कर्तव्याची आठवण करून देऊन परत पाठविण्याचे काय कारण ? त्यावेळी बिचार्या गोपींच्या मनाची काय अवस्था झाली असेल, याची त्याला कल्पना आली नसेल का ? शंका निश्चितच येईल. पण कृष्णाच्या व्यक्तिमत्वाचे जे अनेक मनोहारी पैलू, त्यापैकी 'नटखट बाँकेपन' हा एक. खोडकरपणा, अवखळपणा हा त्याचा अंगभूत स्वभाव विशेष. आपल्यापुढे या गोपींना घर-दार, मुले-बाळे, पती हे सर्व तुच्छ आहे हे तो जाणून होता. पण तरीही मिस्कीलपणे त्यांची खोडी काढायची आणि त्यांना सतावयाचे यामध्ये त्याला खूपच गंमत वाटत असे. म्हणून त्यांना 'परत जा' असे सांगून त्यांच्या केविलवाण्या प्रतिक्रियेची मजा अनुभवायची, हा एक हेतू. शिवाय आणखीही एक मनोवैज्ञानिक पैलू, जिथे रसास्वादनाबाबत स्त्री अनुकूलता दर्शविते, तिथे पुरुष प्रतिकूल होते आणि स्त्री प्रतिकूल असेल, तर पुरुष अनुकूल बनतो. या लटक्या रागा-लोभानेच प्रेमाचे रसास्वादन परिपूर्ण होते, प्रेमाचा डाव रंगत जातो. प्रेमिकांचे हे मानसशास्त्र त्या खेलियाला थोडेच अज्ञात असेल ? (२८)
( वसंततिलका )
कृत्वा मुखान्यव शुचः श्वसनेन शुष्यद् बिम्बाधराणि चरणेन भुवः लिखन्त्यः । अस्रैरुपात्तमषिभिः कुचकुङ्कुमानि तस्थुर्मृजन्त्य उरुदुःखभराः स्म तूष्णीम् ॥ ॥
( वसंततिलका ) ते लाल ओठ सुकले अन श्वास उष्ण पाहोनि खालि नखटोचविती भुईला । दुःखाश्रुने धुतलिसे उटि ती स्तनीची दुःखात तै बुडुनिया नच शब्द ओठीं ॥ २९ ॥
उरुदुःखभराः (ताः) - मोठा आहे दुःखाचा भार ज्यांचा अशा त्या गोपी - शुचः श्वसनेन - शोकाच्या श्वासोच्छ्वासांमुळे - शुष्यद्बिम्बाधराणि - ज्यांचे ओठ सुकले आहेत - मुखानि अवकृत्वा - अशी आपली तोंडे खाली करून - चरणेन भुवं लिखन्त्यः - पायाने जमीन खरवडीत - उपात्तमषिभिः अस्रैः - मिसळलेले आहे काजळ ज्यांमध्ये अशा अश्रूंनी - कुचकुंकुमानि मृजन्त्यः - स्तनांवरील केशराच्या उटया धुवून टाकीत - तूष्णीं तस्थुः स्म - स्तब्ध राहिल्या. ॥२९॥
शोकामुळे चाललेल्या उष्ण श्वासांमुळे त्यांचे तोंडल्यासारखे लाल ओठ पांढुरके झाले. त्यांनी माना खाली घातल्या आणि पायांच्या नखांनी त्या जमीन उकरू लागल्या. डोळ्यांतून काजळासह वाहणारे अश्रू वक्षःस्थळापर्यंत पोहोचले आणि तेथे लावलेले केशर त्यांनी धुऊन टाकले. त्यांचे हृदय दुःखाने इतके भरून आले की, त्यांच्या तोंडून शब्द फुटेना. (२९)
प्रेष्ठं प्रियेतरमिव प्रतिभाषमाणं
कृष्णं तदर्थविनिवर्तितसर्वकामाः । नेत्रे विमृज्य रुदितोपहते स्म किञ्चित् संरम्भगद्गदगिरोऽब्रुवतानुरक्ताः ॥ ३० ॥
ते भोग सर्व हरिला दिधले तयांनी तो बोलता त्यजुनि हे बहु दुःखि झाल्या । झालेहि नेत्र रडुनी बहु लाल त्यांचे धीरेचि त्या प्रणय कोपि वदोनि गेल्या ॥ ३० ॥
तदर्थविनिवर्तितसर्वकामाः - त्याच्यासाठी सोडलेल्या आहेत सर्व इच्छा ज्यांनी अशा - अनुरक्ताः (ताः) - प्रेमळ गोपी - रुदितोपहते नेत्रे विमृज्य - रडण्याने त्रासलेले डोळे पुसून - किंचित् संरम्भगद्गदगिरः - थोडयाशा व्यग्रतेमुळे अडखळत आहे वाणी ज्यांची अशा - प्रियेतरं इव - अप्रिय मनुष्याप्रमाणे - प्रतिभाषमाणं प्रेष्ठं कृष्णम् - उत्तर देणार्या अत्यंत आवडत्या श्रीकृष्णाला - अब्रुवत स्म - म्हणाल्या. ॥३०॥
कृष्णासाठी गोपींनी सर्व कामना सोडून दिल्या होत्या. श्रीकृष्णांवरच त्यांचे अनन्य प्रेम होते. त्यांचे हे निष्ठुर बोल ऐकून त्यांना रडू कोसळले. रडून रडून लाल झालेले डोळे पुसून प्रणयकोपामुळे सद्गदित झालेल्या वाणीने त्या प्रियतमाला म्हणू लागल्या, (३०)
श्रीगोप्य ऊचुः ।
मैवं विभोऽर्हति भवान् गदितुं नृशंसं सन्त्यज्य सर्वविषयांस्तव पादमूलम् । भक्ता भजस्व दुरवग्रह मा त्यजास्मान् देवो यथाऽऽदिपुरुषो भजते मुमुक्षून् ॥ ३१ ॥
गोपिका म्हणाल्या - तू सर्वव्यापि हरि रे मन जाणितोसी निष्ठूर हे नच वदो तव पादप्रेमी । आलोत सर्व त्यजुनी तव भक्त सार्या स्वीकार तू करि, नको त्यजु दूर आता ॥ ३१ ॥
विभो - हे श्रीकृष्णा - भवान् - तू - एवं नृशंसं गदितुं मा अर्हति - असे कठोर बोलण्यास योग्य नाहीस - दूरवग्रह - हे हट्टी श्रीकृष्णा - सर्वविषयान् संत्यज्य - सर्व प्रपंचसुखाला टाकून - (वयं) तव पादमूलं (आश्रिताः) - आम्ही तुझ्या चरणाचा आश्रय केला आहे - भक्ताः अस्मान् मा त्यज - भक्त अशा आम्हाला टाकू नको - देव - हे श्रीकृष्णा - यथा आदिपुरुषः - ज्याप्रमाणे श्रीविष्णु - मुमुक्षून् भजते (तथा) - मोक्षाची इच्छा करणार्यांना स्वीकारितो त्याप्रमाणे - (अस्मान्) भजस्व - तू आमचा स्वीकार कर. ॥३१॥
गोपी म्हणाल्या - हे प्रभो आपण असे निष्ठुर बोलू नये. आम्ही सर्व काही सोडून फक्त तुमच्या चरणांवरच प्रेम करीत आहोत. तुम्ही स्वतःचा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहात. तरीही जसे आदिपुरुष मुमुक्षू भक्तांना भजतात, तसेच तुम्ही आमच्यावर प्रेम करा. आमचा त्याग करू नका. (३१)
यत्पत्यपत्यसुहृदां अनुवृत्तिरङ्ग
स्त्रीणां स्वधर्म इति धर्मविदा त्वयोक्तम् । अस्त्वेवमेतदुपदेशपदे त्वयीशे प्रेष्ठो भवांस्तनुभृतां किल बन्धुरात्मा ॥ ३२ ॥
संतान नी पतिचि ती करणेच सेवा ते सर्व योग्य परि ही तव पादसेवा । आम्ही करोत तशि ही बहुसार हीच आत्मा जिवास असशी तुचि प्रीय कृष्णा ॥ ३२ ॥
अङग - हे श्रीकृष्णा - धर्मविदा त्वया - धर्म जाणणार्या तुझ्याकडून - पत्यपत्य सुहृदाम् अनुवृत्तिः - पति, मुले व मित्र यांची सेवा - स्त्रीणां स्वधर्मः (अस्ति) - स्त्रियांचा स्वधर्म होय - इति यत् उक्तम् - असे जे सांगितले गेले - एतत् - हे - ईशे त्वयि उपदेशपदे (सति) - सर्वसमर्थ असा तू उपदेश करणार्याच्या स्थानी असता - एवम् अस्तु - असेच असो - तनुभृतां बन्धुः आत्मा भवान् - प्राणिमात्रांचा हितकर्ता व अंतर्यामी असा तू - (तेषां) प्रेष्ठः (अस्ति) - त्यांना अत्यंत प्रिय आहेस. ॥३२॥
हे प्रियतमा ! धर्माचे मर्म तुम्ही जाणता. आपले पती, पुत्र आणि बांधवांची सेवा करणे हा स्त्रियांचा स्वधर्म आहे, असे तुम्ही म्हणालात. तर मग या उपदेशानुसार आम्हांला सर्वांचे परी असणार्या तुमचीच सेवा केली पाहिजे. कारण तुम्हीच या उपदेशाचे विषय आहात. तुम्हीच तर शरीर धारण करणार्यांचे प्रियतम आत्मा आणि बंधू आहात. (३२)
कुर्वन्ति हि त्वयि रतिं कुशलाः स्व आत्मन्
नित्यप्रिये पतिसुतादिभिरार्तिदैः किम् । तन्नः प्रसीद परमेश्वर मा स्म छिन्द्या आशां धृतां त्वयि चिरादरविन्दनेत्र ॥ ३३ ॥
ज्ञानी म्हणून करिती तुज प्रेम ऐसे तू नित्य लाभ मिळता नच इच्छु कांही । पावी कृपा करुनिया कमलाक्ष कृष्णा आशालतेसि नच तू मुळि छेदु ऐसा ॥ ३३ ॥
आत्मन् - हे परमेश्वरा - कुशलाः - सुशिक्षित लोक - त्वयि (एव) रतिं कुर्वन्ति - तुझ्या ठिकाणीच प्रेम करितात - हि - कारण - नित्यप्रिये स्वे (सति) - निरंतर प्रिय असा आत्मा अस्तित्वात असता - आर्तिदैः - दुःख देणार्या अशा - पतिसुतादिभिः किम् - पति, पुत्र इत्यादिकांशी काय कर्तव्य आहे - तत् - तर - परमेश्वर - हे परमेश्वरा - नः प्रसीद - आम्हावर प्रसन्न हो - अरविन्दनेत्र - हे कमलनेत्रा श्रीकृष्णा - व्ययि चिरात् भृतां आशां - तुझ्या ठिकाणी फार काळापासून धारण केलेल्या आशेला - मा स्म छिन्द्याः - नकोच तोडू. ॥३३॥
आत्मज्ञानी लोक तुमच्यावर प्रेम करतात. कारण तुम्ही नित्य प्रिय असा त्यांचा आत्मा आहात. असे असता अनित्य आणि दुःखद पति-पुत्रांशी आम्हांला काय करायचे आहे ? हे परमेश्वरा ! म्हणून आमच्यावर प्रसन्न व्हा. आणि हे कमलनयना ! पुष्कळ दिवसांपासून तुमच्याच ठिकाणी जोपासलेली आशा धुलीला मिळवू नका. (३३)
विवरण :- श्रीकृष्णाने गोपींना आपला पतीधर्म, मातृधर्म पाळा, आणि परत जा, असे सांगितले. पण गोपी त्याच्याहीपेक्षा वरचढ निघाल्या. अर्थात हे निरतिशय प्रेम आणि भक्ति याचे सामर्थ्य. त्यांनी युक्तिवाद केला, 'आमचा धर्म तूच, तूच पति, तूच अपत्य, तूच सर्वस्व. मग दुसरीकडे कुठे जायला सांगतोस ? या सर्वांपेक्षा वेद श्रेष्ठ आहेत. त्यांचे रहस्य श्रेष्ठ आहे. (आणि आम्ही 'गोपी' म्हणजे रहस्य जाणणार्या आहोत.) जो एकदा परमेश्वराच्या आश्रयास जातो, अशा भक्ताचा, मुमुक्षूचा त्याग प्रत्यक्ष भगवंतहि करू शकत नाही. (जो परमेश्वरापासून 'विभक्त' होत नाही, तो भक्त.) (न सः पुनरावर्तते ।) असे प्रत्यक्ष वेदच सांगतात. (३१-३३)
चित्तं सुखेन भवतापहृतं गृहेषु
यन्निर्विशत्युत करावपि गृह्यकृत्ये । पादौ पदं न चलतस्तव पादमूलाद् यामः कथं व्रजमथो करवाम किं वा ॥ ३४ ॥
आम्ही घरात रमलो घरकाम धंदी आलोत येथ त्यजुनी तुज काय त्याचे । सोडोनि पाय तुझिये नच जात आम्ही जावोनि काय करणे व्रजि काम धंदा ॥ ३४ ॥
यत् चित्तं गृहेषु सुखेन निर्विशति (स्म) - जे मन गृहकृत्यात सुखाने लागावयाचे - (तत्) उत भवता अपहृतम् - ते तर तुझ्याकडून हरण केले गेले - करौ अपि गृहकृत्ये (न चलतः) - हातहि गृहकृत्यात चालत नाहीत - पादौ - पाय - तव पादमूलात् - तुझ्या चरणापासून - पदं अपि न चलतः - एक पाऊलहि हालत नाहीत - अथ - मग - व्रजं कथं यामः - आम्ही गोकुळात कसे जावे - वा - अथवा - किं करवाम - काय करावे. ॥३४॥
हे मनमोहना ! आजपर्यंत आमचे चित्त घरात रमत असे. म्हणून आमचे हातही घरकामात लागत. परंतु आनंदस्वरूप तुम्ही आमचे ते चित्त सहज चोरून घेतले. त्यामुळे आमचे हे पाय तुमचे चरणकमल सोडून एक पाऊलभर सुद्धा दुसरीकडे जाण्यास तयार नाहीत. तर मग आम्ही व्रजामध्ये कसे जावे ? आणि तेथे जाऊन काय करावे ? (३४)
सिञ्चाङ्ग नस्त्वदधरामृतपूरकेण
हासावलोककलगीतजहृच्छयाग्निम् । नो चेद् वयं विरहजाग्नि उपयुक्तदेहा ध्यानेन याम पदयोः पदवीं सखे ते ॥ ३५ ॥
हे वल्लभा तवचि गीत प्रिया सख्यांच्या प्रेमाग्नि तो हृदयि चेतवुनीच राही । तूं तो मिटीव हरि रे मुखिच्या रसाने ना हे जळो हृदय हे पदप्राप्ति घेवू ॥ ३५ ॥
अङग - हे कृष्णा - नः - आमच्या - हासावलोक - हास्यपूर्वक पाहण्याने - कलगीतजहृच्छयाग्निम् - व मधुर गाण्याने उत्पन्न झालेल्या मदनाग्नीला - त्वदधरामृतपूरकेण - तुझ्या अधरामृताच्या वृष्टीने - सिञ्च - तू भिजवून टाक - नो चेत् - नाही तर - सखे - हे सख्या श्रीकृष्णा - विरहजाग्नि - वियोगामुळे उत्पन्न झालेल्या अग्नीने - उपयुक्तदेहाः वयम् - खाल्लेला आहे देह ज्यांचा अशा आम्ही - ध्यानेन - चिंतनाने - ते पदयोः पदवीं याम - तुझ्या चरणांच्या स्थानाप्रत जाऊ. ॥३५॥
हे प्रिय सख्या ! तुमचे मधुर हास्य, प्रेमपूर्ण कटाक्ष आणि मनोहर संगीताने आमच्या हृदयामध्ये तुमच्या विषयीच्या प्रेमाची जी आग धगधगत आहे, ती तुम्ही तुमच्या अधरामृताच्या प्रवाहाने विझवून टाका. नाहीतर, आम्ही तुमच्या विरहव्यथेच्या आगीने आमची भौतिक शरीरे जाळून ध्यानाने तुमच्या चरणकमलांची प्राप्ती करून घेऊ. (३५)
यर्ह्यम्बुजाक्ष तव पादतलं रमाया
दत्तक्षणं क्वचिदरण्यजनप्रियस्य । अस्प्राक्ष्म तत्प्रभृति नान्यसमक्षमङ्ग स्थातुं त्वयाभिरमिता बत पारयामः ॥ ३६ ॥
तू लाविशी बहुहि प्रेम अशा अम्हाला तेणेचि या चरणि आम्हि सदैव येतो । जे पाय श्रीसि कधि तो क्वचिदोचि लाभ ते ना कधीहि त्यजुकी, त्यजिले घराते ॥ ३६ ॥
अम्बुजाक्ष - हे कमलनेत्रा श्रीकृष्णा - यर्हि - जेव्हा - क्वचित् - एकदा - रमायाः अपि दत्तक्षणं - लक्ष्मीला सुद्धा दिला आहे क्षणभर अवकाश ज्याने अशा - अरण्यजनप्रियस्य तव - अरण्यातील लोक आहेत प्रिय ज्याला अशा तुझ्या - पादतलं - पायाच्या तळव्याला - अस्प्राक्ष्म - आम्ही स्पर्श केला - तत्प्रभृति - तेव्हापासून - अङ्ग - हे श्रीकृष्णा - त्वया अभिरमिताः (वयं) - तुझ्याशी रममाण झालेल्या आम्ही - अन्यसमक्षं स्थातुं - दुसर्याच्या समोर उभ्या राहण्यास - न बत पारयामः - खरोखर समर्थ नाही ॥३६॥
हे कमलनयना ! वनवासी लोक तुम्हाला प्रिय आहेत म्हणूनच ज्या चरणकमलांच्या सेवेची संधी लक्ष्मीलासुद्धा क्वचितच मिळते, त्या तुमच्या चरणांचा स्पर्श आम्हांला प्राप्त झाला. त्या दिवसापासून दुसर्या कोणासमोर एक क्षणभरसुद्धा थांबणास असमर्थ ठरलो आहोत. मग सेवा तर दूरच. (३६)
श्रीर्यत्पदाम्बुजरजश्चकमे तुलस्या
लब्ध्वापि वक्षसि पदं किल भृत्यजुष्टम् । यस्याः स्ववीक्षण कृतेऽन्यसुरप्रयासः तद्वद् वयं च तव पादरजः प्रपन्नाः ॥ ३७ ॥
लक्ष्मी कटाक्ष मिळण्या तप देव ध्याती वक्षस्थलासि तुलसी सवती सवे ती । रज्जूकणार्थ पदिच्या करितेय स्पर्धा भक्त समान अरि या पदि पातलो की ॥ ३७ ॥
यस्याः किल स्ववीक्षणकृते - खरोखर जिच्या आपल्याकडे होणार्या अवलोकनासाठी - अन्यसुरप्रयासः (अस्ति) - इतर देवांचा प्रयत्न असतो - (सा) लक्ष्मी - ती लक्ष्मी - वक्षसि पदं लब्ध्वा अपि - वक्षःस्थलावरील स्थान मिळवूनसुद्धा - यत् - जशी - तुलस्या - तुळशीसह - भृत्यजुष्टं - भक्तांनी सेविलेल्या अशा - पदाम्बुजरजः चकमे - चरणरुपी कमळांतील परागांची इच्छा करिती झाली - तद्वत् वयं च - तशाच आम्हीहि - तव पादरजः प्रपन्नाः (स्मः) - तुझ्या पायांच्या धुळीला शरण आलो आहोत ॥३७॥
स्वामी ! जिचा कृपाकटाक्ष प्राप्त करून घेण्यासाठी इतर देव प्रयत्न करीत असतात, ती लक्ष्मी तुमच्या वक्षःस्थळावर स्थान मिळालेले असतानाही तुमच्या चरणांवर वाहिलेल्या तुळशीबरोबर तुमच्या चरणांची धूळ प्राप्त करण्याची अभिलाषा बाळगते. कारण सर्व भक्तांनी तिचेच सेवन केले आहे. म्हणून आम्हीसुद्धा त्याच तुमच्या चरणधुळीला शरण आलो आहोत. (३७)
तन्नः प्रसीद वृजिनार्दन तेऽन्घ्रिमूलं
प्राप्ता विसृज्य वसतीस्त्वदुपासनाशाः । त्वत्सुन्दरस्मित निरीक्षणतीव्रकाम तप्तात्मनां पुरुषभूषण देहि दास्यम् ॥ ३८ ॥
येताचि पायि हरि रे मिटतेय चिंता आम्हास ही सुखवि तू तव पायि आलो । कृपार्थ पात्र करि नी विझवीहि आग दासी म्हणोनि ठिविणे तशि संधी द्यावी ॥ ३८ ॥
तत् - तर - त्वदुपासनाशाः (वयं) - तुझी उपासना हीच आहे इच्छा ज्यांची अशा आम्ही - वसतीः विसृज्य ते अङ्घ्रिमूलं प्राप्ताः - घरे सोडून तुझ्या पायांशी आलो आहो - नः प्रसीद - आम्हांवर प्रसन्न हो - पुरुषभूषण - हे पुरुषोत्तमा - त्वत्सुंदरस्मितनिरीक्षण - तुझ्या सुंदर अशा हसण्याने व निरखून पहाण्याने - तीव्रकामतप्तात्मनाम् (नः) - तीव्र कामवासनामुळे तापलेली अंतःकरणे अशा आम्हाला - (ते) दास्यं देहि - तुझी सेवा दे ॥३८॥
हे दुःखनाशना ! आता आमच्यावर कृपा करा. तुमच्या सेवेच्या अभिलाषेने आम्ही घर सोडून तुमच्या चरणांजवळ आलो आहोत. हे पुरुषोत्तमा ! तुमचे मधुर स्मित आणि प्रेमळ नेत्रकटाक्षाने आमच्या हृदयामध्ये मिलनाच्या आकांक्षेची आग भडकली आहे. आम्हांला केवळ आपल्या सेवेची संधी द्या. (३८)
वीक्ष्यालकावृतमुखं तव कुण्डलश्री
गण्डस्थलाधरसुधं हसितावलोकम् । दत्ताभयं च भुजदण्डयुगं विलोक्य वक्षः श्रियैकरमणं च भवाम दास्यः ॥ ३९ ॥
की कुंडले नि कुरुळे कच शोभती नी गालात हास्य विलसे नि सुधा मुखात । श्रीचिन्ह वक्षि रुळते अभयोचि हस्त पाहोनि सर्व भुललो पदि दासि झालो ॥ ३९ ॥
कुण्डलश्रीगण्डस्थलाधरसुधं - कुंडलांमुळे शोभणारे गाल व अधरामृत आहे ज्यामध्ये असे - हसितावलोकं - हास्यपूर्वक आहे पहाणे ज्यामध्ये असे - ते अलकावृतमुखम् वीक्ष्य - तुझे केसांनी आच्छादिलेले मुख पाहून - च - आणि - दत्ताभयं - दिले आहे अभय जिने अशा - भुजदण्डयुगं - बाहूंच्या जोडीला - च - आणि - श्रियकरमणं वक्षः - लक्ष्मीचे एकटीचेच क्रीडास्थान अशा छातीला - विलोक्य - पाहून - (ते) दास्यः भवाम - आम्ही तुझ्या दासी व्हावे ॥३९॥
प्रियतमा ! ज्याच्यावर कुरळे केस भुरभुरत आहेत, असे तुमचे सुंदर मुखकमल, कुंडलांनी शोभणारे गाल, अधरामृत, स्मितहास्ययुक्त कटाक्ष, शरणागतांना अभय देणारे बाहू आणि तुमचे केवळ लक्ष्मीलाच रमविणारे हे वक्षःस्थळ पाहून आम्ही तुमच्या दासी झालो आहोत. (३९)
का स्त्र्यङ्ग ते कलपदायतमूर्च्छितेन
सम्मोहितार्यचरितान्न चलेत्त्रिलोक्याम् । त्रैलोक्यसौभगमिदं च निरीक्ष्य रूपं यद् गोद्विजद्रुममृगाः पुलकान्यबिभ्रन् ॥ ४० ॥
मूर्ती तुझीहि अशि की तव रूप थेंबे सौंदर्य सृष्टि भरते तिन्हि लोक ध्याती । नी गायि पुष्प हरिणी पुलकीत होती विश्वीं असेल कुणि का तुज त्यागु इच्छी ॥ ४० ॥
अङ्ग - हे श्रीकृष्णा - ते कलपदायतमूर्च्छितेन (गीतेन) - तुझ्या मधुर आलापांनी उंच सुरावर गायिलेल्या गाण्याने - च - आणि - गोद्विजद्रुममृगाः - गाई, पक्षी, वृक्ष, व पशु - यत् (निरीक्ष्य) - जे पाहून - पुलकानि अबिभ्रन् - रोमांच धारण करिते झाले - (तत्) इदं त्रैलोक्यसौभगं - ते हे तिन्ही लोकांत सुंदर असे - रूपं निरीक्ष्य - रूप पाहून - संमोहिता - मोहित झालेली अशी - का स्त्री - कोणती स्त्री - आर्यचरितात् न चलेत् - श्रेष्ठ अशा चरित्र्यापासून भ्रष्ट होणार नाही ॥४०॥
प्रिय श्यामसुंदरा ! त्रैलोक्यात तरी अशी कोणती स्त्री असेल की, जी तुमच्या बासरीवरील मधुर पदे आणि दीर्घ तान ऐकून, तसेच गाई, पक्षी, वृक्ष आणि हरीण यांनासुद्धा रोमांचित करणारे त्रैलोक्यसुंदर रूप पाहून आर्य-मर्यादेपासून विचलित होणार नाही ! (४०)
व्यक्तं भवान् व्रजभयार्तिहरोऽभिजातो
देवो यथाऽऽदिपुरुषः सुरलोकगोप्ता । तन्नो निधेहि करपङ्कजमार्तबन्धो तप्तस्तनेषु च शिरःसु च किङ्करीणाम् ॥ ४१ ॥
नारायणो जयि करी प्रतिपाल देवां तैसा व्रजास हरि तू बहु रक्षितोसी । आतून आम्हि जळतो तुज भेटण्याला ठेवी करास शिरि नी जिवदान द्यावे ॥ ४१ ॥
भवान् - तू - व्रजभयार्तिहरः - गोकुळाचे भय व दुःख हरण करणारा - अभिजातः - असा अवतीर्ण झाला आहेस - यथा (त्वं) सुरलोकगोप्ता - जसा तू स्वर्गाचे पालन करणारा - देवः आदिपुरुषः (असि) - असा भगवान विष्णु आहेस - तत् - तर - आर्तबन्धो - हे अनाथांच्या जिवलगा श्रीकृष्णा - नः किंकरीणां - दासी अशा आमच्या - तप्तस्तनेषुच शिरस्सु च - तापलेल्या स्तनांवर आणि मस्तकांवर - (तव) करपङ्कजं निधेहि - तुझे हस्तकमल ठेव ॥४१॥
जसे नारायण देवांचे रक्षण करतात, तसेच तुम्ही खात्रीने व्रजमंडलाचे भय आणि दुःख नाहीसे करण्यासाठीच प्रगट झालेले देव आहात. म्हणून दुःखितांचे कनवाळू हे प्रियातमा ! आपल्या या दासींच्या दुःखतप्त वक्षःस्थळावर आणि मस्तकावर तुम्ही आपले कोमल करकमल ठेवा. (४१)
श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् ) इति विक्लवितं तासां श्रुत्वा योगेश्वरेश्वरः । प्रहस्य सदयं गोपीः आत्मारामोऽप्यरीरमत् ॥ ४२ ॥
श्रीशुकदेव सांगतात - योग्यांचा योगि तो कृष्ण व्याकुळ शब्द ऐकता । रमे जो आत्मरूपात हांसोनी क्रीडु लागला ॥ ४२ ॥
योगेश्वरः - योगेश्वरांमध्ये श्रेष्ठ असा श्रीकृष्ण - आत्मारामः (सन्) अपि - स्वत:च्या ठिकाणी आहे संतोष ज्याचा असा असूनहि - तासां इति विक्लवितं श्रुत्वा - त्यांचे असे दीन भाषण ऐकून - सदयं प्रहस्य - दयेने हसून - गोपीः अरीरमत् - गोपींना रमविता झाला ॥४२॥
श्रीशुक म्हणतात - योगेश्वरांचे ईश्वर असणार्या श्रीकृष्णांनी गोपींची व्यथा ऐकली, तेव्हा त्यांची त्यांना करुणा आली आणि जरी ते आत्माराम असले तरीसुद्धा हसून ते त्यांच्याबरोबर रममाण झाले. (४२)
( मिश्र )
ताभिः समेताभिरुदारचेष्टितः प्रियेक्षणोत्फुल्लमुखीभिरच्युतः । उदारहासद्विजकुन्ददीधतिः व्यरोचतैणाङ्क इवोडुभिर्वृतः ॥ ४३ ॥
(इंद्रवज्रा) गोपीनुच्छे हरि क्रीडला तै अच्यूतहास्यी खुलल्या कळ्या त्या । त्या भोवताली जमल्या हरीच्या जै तारकांच्या शशि आत राही ॥ ४३ ॥
उदारचेष्टितः - मधुर आहेत हावभाव ज्याचे असा - उदारहासद्विजकुन्ददीधितिः - हसताना दंतरूपी कुंदांच्या कळ्यांचे उत्कृष्ट तेज असा - अच्युतः - श्रीकृष्ण - प्रियेक्षणोत्फुल्लमुखीभिः - प्रियकराच्या पहाण्यामुळे प्रफुल्लित मुखे झालेल्या - समेताभिः ताभिः - एकत्र जमलेल्या त्या गोपींच्या योगाने - उडुभिः वृतः ऐणाङ्कः इव - नक्षत्रांनी वेष्टिलेल्या चंद्राप्रमाणे - व्यराजत - शोभला ॥४३॥
प्रियतमाच्या दर्शनाने ज्यांची मुखकमले प्रफुल्लीत झाली आहेत अशा, एकत्र जमलेल्या त्या गोपींबरोबर उत्कृष्ट हावभाव करणारे श्रीकृष्ण जेव्हा खुलून हसत, तेव्हा त्यांच्या कुंदकळ्यांसारखे दातांचे शुभ्र किरण बाहेर पडत. त्यामुळे ते तारकांनी वेढलेल्या चंद्राप्रमाणे शोभत होते. (४३)
( अनुष्टुप् )
उपगीयमान उद्गायन् वनिताशतयूथपः । मालां बिभ्रद् वैजयन्तीं व्यचरन् मण्डयन् वनम् ॥ ४४ ॥
(अनुष्टुप) वैजयंती गळा कृष्णी ते वृंदावन शोभले । गोपिंनी गायिल्या लीला सौंदर्यगीत साजिरे ॥ ४४ ॥
वैजयन्तीं मालां बिभ्रत् - वैजयंती माळ धारण करणारा असा - उपगीयमानः उद्गायन् - स्तविला गेला असता मोठ्याने गाणारा असा - वनिताशतयूथपः (सः) - शेकडो स्त्रियांच्या समुदायाचा पुढारी असा तो श्रीकृष्ण - वनं मण्डयन् - वनाला भूषवीत - व्यचरत् - हिंडता झाला ॥४४॥
शेकडो गोपींच्या समूहांचे स्वामी श्रीकृष्ण वैजयंती माळ धारण करून, वृंदावनाला शोभा आणीत विहार करू लागले. त्यावेळी गोपी आपल्या प्रियतमाचे गुणगान करीत; तर श्रीकृष्ण गोपींचे गुण गात. (४४)
नद्याः पुलिनमाविश्य गोपीभिर्हिमवालुकम् ।
रेमे तत्तरलानन्द कुमुदामोदवायुना ॥ ४५ ॥
यमुना तटीची वाळू झळके कापुरा परी । आनंदी गंधवाय़् तो क्रीडले गोपि कृष्ण तै ॥ ४५ ॥
नद्याः - नदीच्या - हिमवालुकम् - थंड आहे वाळू ज्यावरील अशा - पुलिनं आविश्य - वाळवंटावर जाऊन - तत्तरलानन्दकुमुदामोदवायुना - सुखकारक व तांबड्या कमळांनी सुगंधित वार्याच्या योगाने - (सः) गोपीभिः रेमे - तो गोपींसह क्रीडा करता झाला ॥४५॥
यानंतर श्रीकृष्णांनी गोपींसह, शुभ्र वाळू असणार्या यमुनेच्या वाळवंटात जाऊन क्रीडा केली. ते वाळवंट हालल्यामुळे आनंद देणार्या कुमुदिनींच्या सुगंधयुक्त वार्याने सुवासित झाले होते. (४५)
( वसंततिलका )
बाहुप्रसारपरिरम्भकरालकोरु नीवीस्तनालभननर्मनखाग्रपातैः । क्ष्वेल्यावलोकहसितैर्व्रजसुन्दरीणां उत्तम्भयन् रतिपतिं रमयाञ्चकार ॥ ४६ ॥
( वसंततिलका ) आलिंगने पसरि बाहु नि हात दावी । मांड्या स्तनो नि निवि वेणी धरी कुणाचे । नी टोचवी नख कुणा अन हासु लागे । चेतोनि गोपिशि हरी क्रिडला बहूही ॥ ४६ ॥
बाहुप्रसारपरिरम्भ - हात पसरणे, आलिंगन देणे, - करालकोरुनीवीस्तन - हात, केंस, मांड्या, वस्त्रांच्या निर्या, स्तन, - आलभननर्मनखाग्रपातैः - यांना स्पर्श करणे, थट्टा करणे, नखांनी टोचणे यांनी - क्ष्वेल्या अवलोकहसितैः - थट्टेने पहाण्यांनी व हसण्यांनी - व्रजसुंदरीणां रतिपतिं उत्तम्भयन् - गोकुळातील सुंदर स्त्रियांच्या मदनाला उत्तेजित करीत - (सः) - तो श्रीकृष्ण - (ताः) रमयांचकार - त्यांना रमविता झाला ॥४६॥
हात पसरून आलिंगन देणे, गोपींचे हात, वेणी, मांड्या, कमरपट्टा, स्तन वगैरे अंगांना स्पर्श करणे, विनोद करणे, नखे लावणे,कटाक्ष टाकणे, स्मितहास्य करणे इत्यादि क्रीडांनी गोपींचा दिव्य प्रेमभाव उत्तेजित करीत श्रीकृष्ण त्यांना रमवू लागले. (४६)
( अनुष्टुप् )
एवं भगवतः कृष्णात् लब्धमाना महात्मनः । आत्मानं मेनिरे स्त्रीणां मानिन्योऽभ्यधिकं भुवि ॥ ४७ ॥
( अनुष्टुप् ) गोपिंचा हरिने ऐसा केला सन्मान तो बहू । जगात आम्हिची धन्य गोपी त्या मानु लागल्या ॥ ४७ ॥
एवं - अशा रीतीने - महात्मनः भगवतः कृष्णात् - महात्मा अशा भगवान श्रीकृष्णापासून - लब्धमानाः - मिळाला आहे बहुमान ज्यांना अशा - (ताः) मानिन्यः - त्या मानी गोपस्त्रिया - आत्मानं - स्वतःला - भुवि (विद्यमानानां) - पृथ्वीवरील सर्व - स्त्रीणाम् अभ्यधिकं मेनिरे - स्त्रियांच्यापेक्षा श्रेष्ठ मानत्या झाल्या ॥४७॥
अनासक्त असूनही भगवान श्रीकृष्णांकडून जेव्हा गोपींना असा मान मिळाला, तेव्या त्या जगातील सर्व स्त्रियांमध्ये आपणच श्रेष्ठ आहोत, असे समजू लागल्या. (४७)
तासां तत् सौभगमदं वीक्ष्य मानं च केशवः ।
प्रशमाय प्रसादाय तत्रैवान्तरधीयत ॥ ४८ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे पूर्वार्धे एकोन्त्रिंशोऽध्यायः ॥ २९ ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
सौभाग्यगर्व गोपींचा कृष्णाने जाणिला असे । करण्या दूर तो कृष्ण सर्वांत गुप्त जाहला ॥ ४८ ॥ ॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर एकोणतिसावा अध्याय हा ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
तासां तत्सौभगमदं - त्यांचा तो सुदैवाविषयीचा अभिमान - (तं) मानं च वीक्ष्य - व तो मानीपणा पाहून - (तत्) प्रशमाय - त्यांच्या शांतीसाठी - (तासांच) अनुग्रहाय - आणि त्यांजवर कृपा करण्यासाठी - केशवः - श्रीकृष्ण - तत्र एव - तेथेच - अन्तरधीयत् - गुप्त झाला ॥४८॥
त्यांना आपल्या भाग्याचा गर्व झालेला असून अहंकारही उत्पन्न झाला आहे, असे जाणून त्यांचा गर्व नाहीसा करून त्यांच्यावर कृपा करण्यासाठी श्रीकृष्ण तेथेच अंतर्धान पावले. (४८)
अध्याय एकोणसावा समाप्त |