|
श्रीमद् भागवत पुराण
विकालेऽवगाहनाद् वरुणदूतेन वरुणालयं नंदांना वरुणलोकातून सोडवून आणणे - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् ) एकादश्यां निराहारः समभ्यर्च्य जनार्दनम् । स्नातुं नन्दस्तु कालिन्द्यां द्वादश्यां जलमाविशत् ॥ १ ॥
( अनुष्टुप् ) श्रीशुकदेव सांगतात - एकादशी निराहारे नंदांनीपूजिला हरी । द्वादशीच्या निशीला ते स्नाना कालिंदि पातले ॥ १ ॥
नन्दः - नंद - एकादश्याम् - एकादशीच्या दिवशी - निराहारः - उपोषण केलेला असा - जनार्दनं समभ्यर्च्य - श्रीविष्णूची उत्तमरीतीने पूजा करून - द्वादश्यां तु - द्वादशीच्या दिवशी तर - स्नातुम् - स्नान करण्यासाठी - कालिन्द्याः जलं अविशत् - यमुनेच्या पाण्यात शिरला. ॥१॥
श्रीशुकाचार्य म्हणतात - नंदांनी एकादशीला उपवास करून भगवंतांची पूजा केली आणि त्या दिवशी रात्री द्वादशी लागल्यावर पारण्याचे स्नान करण्यासाठी यमुनेच्या पाण्यात प्रवेश केला. (१)
तं गृहीत्वानयद् भृत्यो वरुणस्यासुरोऽन्तिकम् ।
अवज्ञायासुरीं वेलां प्रविष्टमुदकं निशि ॥ २ ॥
वरूणभृत्यू ती वेळ असुरी निशिची पहा । भृत्ये नंदा धरोनीया वरुणापाशि आणिले ॥ २ ॥
वरुणस्य भृत्यः असुरः - वरुणाचा सेवक असा एक दैत्य - आसुरीं वेला अविज्ञाय - राक्षसी वेळ न जाणून - निशि उदकं प्रविष्टं - रात्री पाण्यात शिरलेल्या - तं गृहीत्वा - त्या नंदाला पकडून - (स्वस्वामिनः) अन्तिकं अनयत् - आपल्या स्वामीजवळ नेता झाला. ॥२॥
ही असुरांची वेळ आहे, हे लक्षात न आल्यामुळे ते रात्रीच्या वेळीच यमुनेच्या पाण्यात उतरले. त्यावेळी वरुणाचा सेवक असलेल्या एका असुराने त्यांना पकडले आणि वरुणाकडे नेले. (२)
विवरण :- नंदाने एकादशीचा उपवास अगदी निराहार असा केला. पारण्याची वेळ साधण्यासाठी त्याने द्वादशीला आसुरी वेळ न जाणता पाण्यात प्रवेश केला. यावरून असे दिसते की, पाण्यात उतरण्याची त्याची वेळ शास्त्रोक्त नव्हती. (कदाचित ती द्वादशी मिश्रित एकादशी असावी. द्वादशी लगेच आल्याने ती वेळ साधण्यासाठी नंदाने पाण्यात प्रवेश केला असावा.) ते त्यास माहीत नव्हते. त्यामुळे वरुणाच्या असुर सेवकाने त्यास पकडले व वरुणाकडे नेले. मात्र यामध्ये नंदाची कोणतीच चूक नसून तो शास्त्रोक्त वेळेसच यमुनाजलात उतरला होता, असा टिकाकारांनी निर्णय दिला आहे. ज्या असुराने त्याला पकडले, तो कंसाच्या पक्षाचा होता; त्यामुळे नंदाला, गोपांना, पर्यायाने श्रीकृष्णाला त्रास देण्यासाठीच त्याने हे केले असे टिकाकारांनी सिद्ध केले आहे. अज्ञान असुराचे होते, नंदाचे नाही हे इथे दिसून येते. (२)
चुक्रुशुस्तमपश्यन्तः कृष्ण रामेति गोपकाः ।
भगवांस्तदुपश्रुत्य पितरं वरुणाहृतम् । तदन्तिकं गतो राजन् स्वानामभयदो विभुः ॥ ३ ॥
गोप ते वदले सारे कृष्णा रे बलरामजी । तुम्हीच वाचवू शक्य नंदाला, रडले तसे । कृष्णाने जाणिले नंदा भृत्याने धरिले असे ॥ ३ ॥
तम् अपश्यन्तः गोपकाः - त्याला न पहाणारे गोप - कृष्ण राम इति - हे कृष्णा हे बलरामा असे - चुक्रुशुः - ओरडते झाले - राजन् - हे राजा - तत् - तेव्हा - पितरं वरुणाह्रतं उपश्रुत्य - पित्याला वरुणाने नेलेला ऐकून - स्वानां अभयदः - स्वतःच्या बांधवांना अभय देणारा - विभुः भगवान् - समर्थ भगवान श्रीकृष्ण - तदन्तिकं गतः - वरुणाजवळ गेला. ॥३॥
नंदबाबा न आढळल्याने गोप "कृष्णा ! बलरामा !" अशा हाका मारून ’नंदमहाराज कुठे दिसत नाहीत,’ असे म्हणून रडू लागले. हे राजा ! श्रीकृष्णांनी जेव्हा त्यांचे रडणे ऐकले आणि आपल्या वडिलांना वरुणाकडे नेल्याचे त्यांना समजले, तेव्हा ते वरुणाकडे गेले. कारण प्रभू स्वकीयांना अभय देणारे आहेत ना ! (३)
प्राप्तं वीक्ष्य हृषीकेशं लोकपालः सपर्यया ।
महत्या पूजयित्वाऽऽह तद्दर्शनमहोत्सवः ॥ ४ ॥
गेला तो वरुणा पासी वरुण हर्षला तदा । पूजिले हरिला त्याने पुन्हा तो बोलला असा ॥ ४ ॥
ह्रषीकेशं - ज्ञानेंद्रियांचा अधिपति - प्राप्तं वीक्ष्य - अशा श्रीकृष्णाला आलेला पाहताच - तद्दर्शनमहोत्सवः - त्याच्या भेटीमुळे मोठा आनंद झालेला - लोकपालः - असा वरुण - महत्या सपर्यया - मोठ्या सन्मानाने - (तं) पूजयित्वा आह - त्याची पूजा करून म्हणाला. ॥४॥
श्रीकृष्ण आपल्याकडे आलेले पाहताच त्यांच्या दर्शनाने अत्यानंद झालेल्या पश्चिम दिक्पाल वरुणाने त्यांची भव्य पूजा केली आणि म्हटले - (४)
श्रीवरुण उवाच -
अद्य मे निभृतो देहो अद्यैवार्थोऽधिगतः प्रभो । त्वत्पादभाजो भगवन् अवापुः पारमध्वनः ॥ ५ ॥
वरुण म्हणाला - सार्थकी देह हा माझा झालासे पाद्य पूजनी । जयांना लाभते संधी न ते येती भवीं पुन्हा ॥ ५ ॥
प्रभो अद्य मे देहः - हे प्रभो, आज माझे शरीर - निभृतः (जातः) - स्वस्थ झाले - अद्य एव - आजच - अर्थः अधिगतः - इच्छिलेली वस्तु प्राप्त झाली - भगवन् - हे श्रीकृष्णा - त्वत्पादभाजः - तुझ्या चरणांची सेवा करणारे - अध्वनः पारं अवापुः - मार्गाचा शेवट गाठिते झाले. ॥५॥
वरुण म्हणाला - प्रभो ! आज माझे शरीर धारणेचे सार्थक झाले. आज मला सर्व पुरुषार्थ प्राप्त झाले; कारण भगवन् ! आपल्या चरणकमलांच्या सेवेची ज्यांना सुसंधी मिळते ते भवसागरातून तरून जातात. (५)
नमस्तुभ्यं भगवते ब्रह्मणे परमात्मने ।
न यत्र श्रूयते माया लोकसृष्टिविकल्पना ॥ ६ ॥
परमात्मा ब्रह्म देवा न माया शिवते तुला । वदते श्रुति ती ऐसे तुजला मी प्रणामितो ॥ ६ ॥
परमात्मने ब्रह्मणे - श्रेष्ठ आत्मरूप, ब्रह्मस्वरूपी - तुभ्यं भगवते नमः - अशा तुज भगवंताला नमस्कार असो - यत्र (त्वयि) - ज्या तुझ्या ठिकाणी - लोकसृष्टिविकल्पना - जग उत्पन्न करणारी माया - न श्रूयते - ऐकली जात नाही. ॥६॥
आपण परब्रह्म परमात्मा भगवान आहात. लोकसृष्टी निर्माण करणारी माया आपल्या ठिकाणी नाही, असे वेद प्रतिपादन करतात. मी आपणास नमस्कार करीत आहे. (६)
अजानता मामकेन मूढेनाकार्यवेदिना ।
आनीतोऽयं तव पिता तद् भवान् क्षन्तुमर्हति ॥ ७ ॥
अज्ञानी मूर्ख हा भृत्य कर्तव्याते न जाणितो । नंदांना आणिले येथे क्षमावे कृपया मला ॥ ७ ॥
अजानता मूढेन - अज्ञानी, मूर्ख, - अकार्यवेदिना - अधिकार न जाणणार्या - मामकेन (भृत्येन) - माझ्या सेवकाने - अयं तव पिता आनीतः - हा तुझा पिता आणिला - तत् - तर - भवान् (तं) - तू त्याला - क्षन्तुं अर्हति - क्षमा करण्यास समर्थ आहेस. ॥७॥
प्रभो ! माझा हा सेवक मूर्ख आहे. त्याला काय करावे, हे कळत नाही. तोच आपल्या वडिलांना नकळत घेऊन आला. आपण त्याबद्दल त्याला क्षमा करावी. (७)
विवरण :- यमुनाजलात उतरलेल्या नंदाला वरुणाच्या असुर सेवकाने सूडबुद्धीने पकडले आणि वरुणापुढे उभे केले. पाठोपाठ श्रीकृष्णहि पित्याला सोडविण्यास जलात उतरले, आणि परिणाम उलटाच झाला. वरुणाचे भाग्यच उदयास आले, ही जणू पर्वणीच ठरली; साक्षात् परमात्म्याचे दर्शन आणि तेही विनासायास ! त्याने कृष्णाची विधिवत् पूजा केली आणि तो कृष्णाची स्तुति करू लागला. तेव्हा तो म्हणतो, 'तू ऐश्वर्यसंपन्न जगन्नियंता आणि सृष्टिनिर्माता आहेस. निर्माता असूनहि मायेपासून मुक्त आहेस. (निर्मिती ही मायेने होते. पाठोपाठ मोह, बंधने इ. येतात. त्या सर्वांपासून तू मुक्त आहेस.) म्हणजेच तू निर्माता असूनहि नसल्यासारखा कोणत्याहि मायापाशांनी बांधलेला नाहीस. माझा हा सेवक विवेकशून्य, सारासार विवेकबुद्धी नसणारा (अकार्यवेदिन्) आहे. शास्त्रोक्त वेळेला पाण्यात उतरलेल्या नंदाला पकडण्याचे कारण नव्हते. (अर्थात त्यामुळे मला लाभच झाला ही गोष्ट वेगळी.) तू मला क्षमा कर. कारण तू आमचा पिता आहेस आणि पिता हा नेहमीच क्षमाशील असतो. (६-७)
ममाप्यनुग्रहं कृष्ण कर्तुं अर्हस्यशेषदृक् ।
गोविन्द नीयतामेष पिता ते पितृवत्सल ॥ ८ ॥
गोविंदा जाणितो मी की तुमचे प्रेम त्यां बहु । न्यावे यांना परी देवा कृपावे दास मी असे ॥ ८ ॥
अशेषदृक् कृष्ण - हे सर्व पाहणार्या श्रीकृष्णा - मम अपि - माझ्यावरहि - अनुग्रहं कर्तुम् अर्हसि - कृपा करण्यास समर्थ आहेस - पितृवत्सल गोविंद - पित्यावर प्रेम करणार्या हे गोविंदा - एषः ते पिता - हा तुझा पिता - (त्वया) नीयताम् - तू न्यावा. ॥८॥
हे पितृभक्त गोविंदा ! आपण आपल्या वडिलांना घेऊन जावे. हे सर्वसाक्षी श्रीकृष्णा ! आपण मज दासावरसुद्धा कृपा करावी. (८)
श्रीशुक उवाच -
एवं प्रसादितः कृष्णो भगवान् ईश्वरेश्वरः । आदायागात् स्वपितरं बन्धूनां चावहन् मुदम् ॥ ९ ॥
श्रीशुकदेव सांगतात - परीक्षित् ! भगवान् कृष्ण देवांचा देव तो असे । व्रजात आणिले नंदा सर्वां आनंद जाहला ॥ ९ ॥
एवं प्रसादितः - अशाप्रकारे प्रसन्न करून घेतलेला - ईश्वरेश्वरः - देवांचाही अधिदेव - भगवान् कृष्णः - असा भगवान श्रीकृष्ण - स्वपितरम् आदाय - आपल्या पित्याला घेऊन - च - आणि - स्वबन्धूनां मुदं आवहन् - आपल्या बांधवांना आनंद घेत - आगात् - परत आला. ॥९॥
श्रीशुक म्हणतात - परीक्षिता ! ईश्वरांचे सुद्धा ईश्वर असणार्या श्रीकृष्णांना वरुणाने अशा प्रकारे स्तुती करून प्रसन्न केले. यानंतर भगवान आपल्या वडिलांना घेऊन व्रजात परत आले आणि त्यांनी सर्वांना आनंदीत केले. (९)
नन्दस्त्वतीन्द्रियं दृष्ट्वा लोकपालमहोदयम् ।
कृष्णे च सन्नतिं तेषां ज्ञातिभ्यो विस्मितोऽब्रवीत् ॥ १० ॥
इंद्रियातीत वरुणी नंदे संपत्ति पाहिली । वरुणे नमिला कृष्ण पाहोनी हर्ष पावले ॥ १० ॥
नन्दः तु - नंद तर - अतीन्द्रियं - इंद्रियांना अगोचर - लोकपालमहोदयम् - असे लोकपालाचे ऐश्वर्य - च - आणि - तेषां कृष्णे - त्यांचा श्रीकृष्णाच्या - सन्नतिं दृष्ट्वा - ठिकाणी नम्रभाव पाहून - विस्मितः - आश्चर्यचकित झालेला - ज्ञातिभ्य अब्रवीत् - नातलगांना म्हणाला. ॥१०॥
नंदांनी लोकपाल वरुणाचे पूर्वी कधी न पाहिलेले ऐश्वर्य पाहिले. तसेच तेथील लोक श्रीकृष्णांच्या चरणांवर नतमस्तक होत आहेत, हेही पाहिले. त्यांना अत्यंत आश्चर्य वाटले. घरी आल्यावर त्यांनी आपल्या बांधवांना ही हकीकत सांगितली. (१०)
ते चौत्सुक्यधियो राजन् मत्वा गोपास्तमीश्वरम् ।
अपि नः स्वगतिं सूक्ष्मां उपाधास्यदधीश्वरः ॥ ११ ॥
नंदांनी कथिता लोका वदले लोक कृष्ण हा । स्वयंचि भगवान् सत्य स्वलोका नेइ आपणा ॥ ११ ॥
राजन् - हे राजा - औत्सुक्यधियः - उत्सुकतेने युक्त आहे मन ज्यांचे - ते गोपाः तु - असे ते गोप तर - तं (एव) ईश्वरं मत्वा - त्या श्रीकृष्णालाच ईश्वर मानून - (मनसि अब्रुवन्) - मनात म्हणाले - (सः) अधीश्वरः - तो श्रेष्ठ असा ईश्वर - सूक्ष्मां स्वगतिम् - सूक्ष्म अशी आपली गति - नः अपि - आम्हांला सुद्धा - उपाधास्यत् - देवो - इति - याप्रमाणे - स्वानाम् (संकल्पं) विज्ञाय - बांधवांचा उद्देश जाणून. ॥११॥
हे परीक्षिता ! हे ऐकून गोपांनी श्रीकृष्ण स्वतः भगवान आहेत हे जाणले. त्यांनी मनातल्या मनात अत्यंत उत्सुकतेने असा विचार केला की, हे देवाधिदेव आपल्या ब्रह्मरूप स्वधामाला आपल्यालासुद्धा नेतील काय ? (११)
इति स्वानां स भगवान् विज्ञायाखिलदृक् स्वयम् ।
सङ्कल्पसिद्धये तेषां कृपयैतदचिन्तयत् ॥ १२ ॥
सर्वदेशी असा कृष्ण लपेल रूप ते कसे । गोपांची जाणितो इच्छा संकल्प करितो तसा ॥ १२ ॥
अखिल दृक् सः भगवान् - सर्व पाहणारा तो भगवान श्रीकृष्ण - स्वयं - स्वतःच - कृपया - दयेने - तेषां संकल्पसिद्धये - त्यांच्या इच्छेच्या पूर्णतेसाठी - एतत् अचिन्तयत् - मनांत आणिता झाला. ॥१२॥
सर्वसाक्षी भगवान श्रीकृष्णांनी स्वतः आपल्या गोपांची ही इच्छा जाणली आणि त्यांचा संकल्प सिद्ध करण्यासाठी कृपायुक्त होऊन असा विचार केला. (१२)
जनो वै लोक एतस्मिन् अविद्याकामकर्मभिः ।
उच्चावचासु गतिषु न वेद स्वां गतिं भ्रमन् ॥ १३ ॥
संसारी अज्ञ ते जीव विवीध कामना मनीं । धरोनी करिती कर्म तेणे तो भटके तसा ॥ १३ ॥
वै - खरोखर - एतस्मिन् लोके - या जगात - जनः - जीव - अविद्याकामकर्मभिः - अज्ञान, उपभोगेच्छा व आपली कामे यामुळे - उच्चावचासु - उच्च व नीच अशा - गतिषु भ्रमन् - अवस्थांत फिरणारा असा - स्वां गतिं - - न वेद - आपले काय होणार हे जाणत नाही. ॥१३॥
या जगामध्ये जीव अज्ञानाने शरीरालाच आत्मा मानून अनेक गोष्टींची इच्छा धरतो आणि त्यांची पूर्तता करण्यासाठी अनेक प्रकारची कर्मे करतो. त्यामुळे फळ म्हणून तो श्रेष्ठ-कनिष्ठ योनींमध्ये भटकतो आणि आपल्या खर्या स्वरूपाला ओळखत नाही. (१३)
इति सञ्चिन्त्य भगवान् महाकारुणिको हरिः ।
दर्शयामास लोकं स्वं गोपानां तमसः परम् ॥ १४ ॥
दयाळू हरिने ऐसे मनात चिंतिले असे । तमहीन स्वलोको तो सर्वांना दाविला पहा ॥ १४ ॥
इति संचिन्त्य - असे मनात आणून - महाकारुणिकः - अत्यंत दयाळु - भगवान् हरिः - असा भगवान श्रीकृष्ण - तमसः परं - अज्ञानाच्या पलीकडे - (सन्तं) स्वं लोकं - असणारे आपले स्वरुप - गोपानां दर्शयामास - गोपांना दाखविता झाला. ॥१४॥
अशा प्रकारे विचार करून परमदयाळू भगवान श्रीकृष्णांनी त्या गोपांना मायेच्या पलीकडे असलेले आपले परमधाम दाखविले. (१४)
सत्यं ज्ञानमनन्तं यद् ब्रह्म ज्योतिः सनातनम् ।
यद्धि पश्यन्ति मुनयो गुणापाये समाहिताः ॥ १५ ॥
सत्य ज्ञान अनंतो नी ब्रह्म ज्योती सनातन । गुणातीत असे रूप तयांना आधि दाविले ॥ १५ ॥
यत् - जे - सत्यं ज्ञानं अनन्तं - सत्यरूप,ज्ञानरूप अंतरहित असे - सनातनं - त्रिकालाबाधित - ज्योतिः ब्रह्म (अस्ति) - तेजःस्वरुपी ब्रह्म आहे - यत् हि - जे खरोखर - गुणापाये - त्रिगुणांचा नाश झाल्यावर - समाहिताः - एकाग्र झालेले - मुनयः पश्यन्ति - मुनि पहातात. ॥१५॥
भगवंतांनी प्रथम त्यांना ज्याचे स्वरूप सत्य, ज्ञान, अनंत, सनातन आणि ज्योतिःस्वरूप आहे, तसेच समाधिनिष्ठ पुरुषच जे पाहू शकतात, त्या ब्रह्माचा साक्षात्कार करविला. (१५)
ते तु ब्रह्मह्रदं नीता मग्नाः कृष्णेन चोद्धृताः ।
ददृशुर्ब्रह्मणो लोकं यत्राक्रूरोऽध्यगात् पुरा ॥ १६ ॥
अक्रूरा जे तळ्या मध्ये दाविले तेच या जनां । डुलकी लागली सर्वां दिसले धाम तेधवा ॥ १६ ॥
तु - आणि - कृष्णेन् - श्रीकृष्णाने - ब्रह्मह्रदं नीताः - ज्ञानरूपी डोहावर नेलेले - च - आणि - (तत्र) मग्नाः - तेथे बुडाले असता - तेन एव उद्धृताः - त्यानेच वर काढिलेले - ते - ते गोप - ब्रह्मणः लोकं ददृशुः - ब्रह्मदेवाचे स्थान पहाते झाले - यत्र पुरा अक्रूरः अध्यगात् - जेथे पूर्वी अक्रूर गेला होता. ॥१६॥
भगवंतांनी अक्रूराला ज्या जलाशयात आपले स्वरूप दाखविले होते, त्याच ब्रह्मस्वरूप ब्रह्मह्रदामध्ये भगवान त्या गोपांना घेऊन गेले. तेथे त्यांनी त्यात बुडी मारली. तेव्हा भगवंतांनी त्यांना त्यातून काढून आपल्या परमधामाचे दर्शन करविले. (१६)
नन्दादयस्तु तं दृष्ट्वा परमानन्दनिवृताः ।
कृष्णं च तत्रच्छन्दोभिः स्तूयमानं सुविस्मिताः ॥ १७ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे पूर्वार्धे अष्टाविंशोऽध्यायः ॥ २८ ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
पाहोनी भगवद्रूपा नंदादी मग्न जाहले । कृष्णाला वेद ते गाती बघोनी हर्ष पावले ॥ १७ ॥ ॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर अठ्ठाविसावा अध्याय हा ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
च - आणि - तत्र - त्याठिकाणी - तं कृष्णं - त्या श्रीकृष्णाला - छन्दोभिः स्तूयमानं दृष्ट्वा - वेदांनी स्तविलेला पाहून - सुविस्मिताः नन्दादयः तु - अत्यंत आश्चर्यचकित झालेले नंदादिक तर - परमानन्दनिर्वृताः (बभूवुः) - अत्यंत आनंदामुळे संतुष्ट झाले. ॥१७॥
तो लोक पाहून नंद इत्यादि गोप परमानंदात निमग्न झाले. तेथे सर्व वेद श्रीकृष्णांची स्तुती करीत आहेत, हे पाहून ते सर्वजण अत्यंत आश्चर्यचकित झाले. (१७)
विवरण :- वरुणलोकातून परत आलेल्या नंदाने तेथील वैभवाचे वर्णन गोपांपुढे केले. आणि आपणांसहि ते वैभव आपला कृष्णसखा दाखवेल का ? असा विचार साहजिकच त्यांच्या (गोपांच्या) मनात आला. याबाबतीत गोपांकडे सामान्य मानव म्हणून पाहिले पाहिजे कारण 'उत्सुकता' ही मानवाची सहजप्रवृत्ति आहे. या वैभव दर्शनाचा लाभ नंदालाच का ? अशी मत्सरीबुद्धी त्यामागे नसून ते वैभव आपणांसहि दिसावे, ही साधी वृत्ति होती. शिवाय ते 'आत्मज्ञानी' थोडेच होते ? सामान्य, साधेभोळे आणि षड्रिपूंनी प्रभावित जीव होते. त्याच्या मुळाशी अविद्या होती. स्वतःला 'ब्रह्म' न मानता जीव मानणे ही अविद्या, त्यातून अभिलाषा, कर्म, विषयोपभोग अशी शृंखला निर्माण होते. असा जीव जन्म-मरणाच्या फेर्यात अडकतो आणि लहान मोठया योनीतून भटकत रहातो. जीव हा परमात्म्याचाच अंश, हे तो जाणत नाही. (नारायणरूपी बिंबाचे प्रतिबिंब) मात्र कृष्णाने आपल्या सवंगडयाचा उपहास न करता करुणाभावाने त्यांना समजून घेतले आणि त्यांना वैकुंठलोकाचे दर्शन घडविले. ('आदित्यवर्णं तमसः परस्तात्' जणू ते छोटे विश्वरूप दर्शनच) आपल्या सगुण-निर्गुण रूपाचे दर्शन घडविले. तो लोक, ते दर्शन कसे होते ? (सत्यं ज्ञानमनन्तं) 'सत्य' म्हणजे कधीही बाधित न होणारे, निर्विकार, जड नसलेले, अनंत (देश-काल इ.नी व्याप्त नसलेले) कोणत्याहि साधनाने निर्माण न झालेले, (अजः नित्यः शाश्वतः अयं पुराणः) स्वयंप्रकाशी, सनातन, गुणरहित (महात्मा लोक ज्याचे वर्णन 'नेति-नेति असे करतात.) आणि जे पूर्वी अक्रूराने यमुनाजलात पाहिले होते असे होते. कृष्णाने त्यांना ब्रह्मरूपी डोहात बुडी मारण्यास सांगितले, त्यांना दिसले, वेद ज्याची स्तुति करीत आहेत असा चतुर्भुज कृष्ण-परमात्मा जो स्वतःच ब्रह्मरूपी होता, जणू हसत हसत तो गोपांना सांगत होता, अगदी त्याच्याच भाषेत, माझा लोक पहायचा असेल तर दृष्टी शुद्ध हवी. मात्र या ब्रह्मरूपी डोहात काही काळच बुडी मारून कृष्णाने गोपांना पूर्वस्थितीला आणले. आपले नेहमीचेच रूप दाखविले. पण शेवटी असाही एक विचार येतो, श्रीकृष्णाच्या कृपेने गोपांना वैकुंठदर्शन झाले, जे 'योगिया दुर्लभ' किंवा तपःसाधनेने साध्य, ते गोपांना, अक्रूराला सहजसाध्य झाले. पण असेही कसे म्हणता येईल ? कारण कृष्णावर त्यांचे जे निर्व्याज, निरभिलाष प्रेम होते; जी निःस्सीम, निःसंग भक्ति होती; त्याचे ते फळ होते. ज्ञानापेक्षा भक्ती, निरभिलाष प्रेम हे अधिक श्रेष्ठ असते असे म्हटले तर ते चूक ठरेल का ? (नाहीतरी देव भावाचा भुकेला असे म्हटले जातेच.) (१३-१७) अध्याय अठ्ठाविसावा समाप्त |