|
श्रीमद् भागवत पुराण विगतमदस्य इंद्रस्य श्रीकृष्णसन्निधौ क्षमाप्रार्थनम् - श्रीकृष्णांना अभिषेक - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् ) गोवर्धने धृते शैले आसाराद् रक्षिते व्रजे । गोलोकादाव्रजज् कृष्णं सुरभिः शक्र एव च ॥ १ ॥
( अनुष्टुप् ) श्रीशुकदेव सांगतात - गिरि तो धारिता कृष्णे रक्षिले जीव सर्व ते । गोलोककामधेनू नी स्वर्गीचा इंद्र पातला ॥ १ ॥
गोवर्धने शैले धृते (सति) - गोवर्धनपर्वत धारण केला असता - आसारात् व्रजे रक्षिते (सति) - वृष्टीपासून गोकुळाचे संरक्षण केले असता - गोलोकात् - स्वर्गाहून - सुरभिः कृष्णं आव्रजत् - कामधेनु श्रीकृष्णाजवळ आली - शक्रः च एव (कृष्णं आव्रजत्) - आणि इंद्रही श्रीकृष्णाजवळ आला. ॥१॥
श्रीशुकाचार्य म्हणतात - श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचलून धरून मुसळधार पावसापासून गोकुळाचे रक्षण केले, तेव्हा त्यांच्याकडे गोलोकातून कामधेनू आणि स्वर्गातून इंद्र आला. (१)
विविक्त उपसङ्गम्य व्रीडीतः कृतहेलनः ।
पस्पर्श पादयोरेनं किरीटेनार्कवर्चसा ॥ २ ॥
लज्जीत जाहला इंद्र कृष्णाला द्वेषिल्या मुळे । एकांती गाठिला कृष्ण चरणी शीर टेकिले ॥ २ ॥
कृतहेलनः (अतः एव) - केला आहे अपमान ज्याने असा - व्रीडितः (सः) - म्हणून लाजलेला इंद्र - विविक्ते उपसङगम्य - एकांतात भेटून - अर्कवर्चसा किरीटेन - सूर्यासारख्या तेजस्वी अशा मुकुटाने - एनम् - ह्या कृष्णाला - पादयोः पस्पर्श - दोन्ही पायांना स्पर्श करिता झाला. ॥२॥
भगवंतांची अवहेलना केल्यामुळे इंद्र अतिशय लज्जित झाला होता. म्हणून त्याने एकांत स्थानी भगवंतांकडे जाऊन आपल्या सूर्याप्रमाणे तेजस्वी असलेल्या मुकुटाने त्यांच्या चरणांना स्पर्श केला. (२)
दृष्टश्रुतानुभावोऽस्य कृष्णस्यामिततेजसः ।
नष्टत्रिलोकेशमद इदमाह कृताञ्जलिः ॥ ३ ॥
कृष्णप्रभाव पाहोनी इंद्राचा गर्व नष्टला । न गर्व तिन्हि लोकांचा हात जोडोनि बोलला ॥ ३ ॥
अमिततेजसः - अपरिमित आहे सामर्थ्य ज्याचे - अस्य कृष्णस्य - अशा या श्रीकृष्णाचा - दृष्टश्रुतानुभावः - पाहिला व ऐकला आहे पराक्रम ज्याने असा - नष्टत्रिलोकेशमदः - नाहीसा झाला आहे तिन्ही लोकांच्या राजेपणाचा गर्व ज्याचा असा - इंद्रः - इंद्र - कृताञ्जलिः (सन्) आह - हात जोडून म्हणाला. ॥३॥
परम तेजस्वी भगवान श्रीकृष्णांचा प्रभाव पाहून - ऐकून आपणच तिन्ही लोकांचा स्वामी असल्याचा इंद्राचा गर्व नाहीसा झाला. आता तो हात जोडून त्यांची स्तुती करू लागला. (३)
विवरण :- काम, क्रोध, लोभ इ. षड्रिपू, अर्थातच ते मानवाचे शत्रू. मग ते मानवाचे दृष्टीने हानिकारकच. या षड्रिपूंपैकी एक म्हणजे मद-अहंकार. आणि तो कोणासही होऊ शकतो. यास देवही अपवाद नाहीत. तसा हा अहंकार देवाधिदेव इंद्राला झाला. या मदाचे पोटी मत्सर येतो. 'मी त्रैलोक्याधिपति, मग माझीच पूजा झाली पाहिजे. न करणार्याचा नाश हा निश्चित.' इंद्राला असा अहंकार झाला आणि हे सर्व जाणणार्या कृष्णाने गोवर्धनोद्धरण करून गोपांचे, गोकुळाचे रक्षण केले आणि त्याचा अह्ंकार नष्ट केला. इंद्र कृष्णाला मर्त्य मानीत असे. पण या तथाकथित मर्त्याचे अलौकिक कृत्य पाहून त्याचे डोळे उघडले. कृष्णाची महती त्याला कळली. त्याचा गर्वपरिहार झाला आणि नम्र होऊन तो त्याचेकडे आला आणि त्याची स्तुति करू लागला. (३)
इन्द्र उवाच -
( मिश्र ) विशुद्धसत्त्वं तव धाम शान्तं तपोमयं ध्वस्तरजस्तमस्कम् । मायामयोऽयं गुणसम्प्रवाहो न विद्यते ते ग्रहणानुबन्धः ॥ ४ ॥
( इंद्रवज्रा ) इंद्र म्हणाला - तुझे असे रूप विशुद्ध सत्व नी शांत ज्ञानोमय मुक्त ऐसे । माया तुझी ही दिसते जगी की अजाण त्यांना गमते खरीच ॥ ४ ॥
तव धाम - तुझे स्थान - विशुद्ध सत्त्वं - शुद्धसत्त्वगुणाचे - शान्तं तपोमयं - विकाररहित व तप हेच आहे रूप ज्याचे असे - ध्वस्तरजस्तमस्कम् - नाहीसा झाला आहे रजोगुण व तमोगुण ज्यातील असे - अग्रहणानुबंधः - अज्ञानाला चिकटून असणारा - मायामय - माया हेच आहे रूप ज्याचे असा - अयं गुणसंप्रवाहः - हा गुणप्रवाहरूप संसार - ते न विद्यते - तुझ्या ठिकाणी नाही. ॥४॥
इंद्र म्हणाला - "भगवन ! आपले स्वरूप परम शांत, ज्ञानमय, रजोगुण-तमोगुणरहित तसेच विशुद्ध सत्त्वमय आहे. गुणांमुळे प्रवाहरूपाने भासणारा हा मायामय प्रपंच सर्वज्ञ अशा आपल्या ठिकाणी नाही. कारण तो अज्ञानामुळे उत्पन्न होणारा आहे." (४)
कुतो नु तद्धेतव ईश तत्कृता
लोभादयो येऽबुधलिन्गभावाः । तथापि दण्डं भगवान्बिभर्ति धर्मस्य गुप्त्यै खलनिग्रहाय ॥ ५ ॥
देहादिकाचा नच स्पर्श तूंते तुला न क्रोधो अन दोष तैसे । अज्ञानसृष्टी नच स्पर्शि तूते रक्षावया धर्मचि तू जहाला ॥ ५ ॥
ईश - हे ईश्वरा - तत्कृताः तद्धेतवः - तिने उत्पन्न केलेले व त्याला कारण असे - ये अबुधलिङगभावाः - जे अज्ञानी मनुष्याची खूण - लोभादयः - असे लोभादिक विकार - ते त्वयि कुतः नु (विद्यन्ते) - ते तुझ्या ठिकाणी कोठून असणार - तथा अपि - तरीसुद्धा - धर्मस्य गुप्त्यै - धर्माच्या संरक्षणासाठी - खलनिग्रहाय - दुष्टांच्या नाशासाठी - भगवान् दण्डं बिभर्ति - भगवान दण्ड धारण करतो. ॥५॥
देहसंबंधामुळे उत्पन्न होणारे व दुसर्या देहाच्या उत्पत्तीला कारण असणारे लोभादी दोष अज्ञानी लोकांच्या ठिकाणीच असतात. सर्वज्ञ अशा आपल्यामध्ये ते कोठून असणार ? तरीसुद्धा धर्माचे रक्षण आणि दुष्टांचा नाश करण्यासाठीच आपण शासन करीत असता. (५)
विवरण :- मनुष्य सत्त्व, रज आणि तम या तीनही गुणांनी युक्त असतो. त्याच्यामध्ये असणारे गुणांचे प्रमाण कमी-अधिक प्रमाणात असते. गुणांच्या आधिक्याप्रमाणे त्याचा स्वभाव असतो. मात्र हे गुण 'विकारी' म्हणजे बदलू शकणारे असतात. ते अशुद्धहि होऊ शकतात. मात्र कृष्णाचे ठिकाणी असणारा सत्त्वगुण विकारी नाही, कारण गुणांचा निर्माता तो स्वतःच आहे. तो केवळ सत्त्वगुणसंपन्न आणि ज्ञानी. षड्रिपूतील लोभ, मोह, मद, माया हे सर्व अज्ञानातून निर्माण होतात. या अज्ञानातून बंधने निर्माण होतात. त्यात सामान्य मनुष्य अडकलेला असतो. मात्र भगवंत या सर्वांहून अलिप्त आहे, तो नित्य शुद्ध, बुद्ध, मुक्तस्वभाव आहे. इंद्र म्हणतो, 'भगवंता, तुझे धाम म्हणजे स्वरूप, शांत, ज्ञानयुक्त आणि सात्त्विक. त्यामुळे अज्ञानी मानवाप्रमाणे तू षड्रिपूंनी युक्त नाहीस. धर्माचे रक्षण आणि दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी तू हाती दंड धारण करतोस. तू पिता, गुरु त्यामुळे अज्ञानाने कोणी स्वतःस श्रेष्ठ मानू लागला तर त्याचा गर्व तू दूर करतोस.' (कृष्णाने इंद्राचा गर्व दूर केला हे योग्यच, हे त्यास पटले आणि तो पश्चात्तापदग्ध झाला.) (४-५)
पिता गुरुस्त्वं जगतामधीशो
दुरत्ययः काल उपात्तदण्डः । हिताय स्वेच्छातनुभिः समीहसे मानं विधुन्वन् जगदीशमानिनाम् ॥ ६ ॥
जगत्पिता नी गुरु स्वामि तूची तू कालरूपी जगिचा नियंता । त्या भक्तकार्यार्थ तुझाऽवतार दंडोनि गर्व्या करिशी लिला या ॥ ६ ॥
जगतां पिता - अखिल जगाचा परम पिता, - गुरुः अधीशः - गुरु, राजांचा अधिराज - दुरत्ययः कालः - व उल्लंघून जाण्यास कठीण असा काळस्वरूपी - उपात्तदण्डः - घेतलेला आहे दंड ज्याने असा - जगदीशमानिनां मानं - स्वतःला जगाचे राजे असे मानणार्यांचा - विधुन्वन् त्वम् - गर्व नाहीसा करणारा तू - स्वेच्छातनुभिः - आपल्याला इष्ट अशा शरीरांनी - (जगतः) हिताय समीहसे - जगाच्या हितासाठी झटत असतोस. ॥६॥
आपण जगाचे पिता, गुरू, स्वामी आणि शासन करणारे दुस्तर असे काल आहात. आपण लोककल्याणासाठी स्वेच्छेने लीलाशरीर प्रगट करून स्वतःलाच ईश्वर समजणार्यांचा मान नष्ट करीत अनेक प्रकारच्या लीला करीत असता. (६)
( इंद्रवंशा )
ये मद्विधाज्ञा जगदीशमानिनः त्वां वीक्ष्य कालेऽभयमाशु तन्मदम् । हित्वाऽऽर्यमार्गं प्रभजन्त्यपस्मया ईहा खलानामपि तेऽनुशासनम् ॥ ७ ॥
ईशत्व गर्वो ममची परी ज्या त्यजोनि त्याला तुज जे पहाती । नी भक्तिमार्गे भजती तुला ते दुष्टार्थ तू दंडहि घेसि हाती ॥ ७ ॥
ये मद्विधाः अज्ञाः - जे माझ्यासारखे मूर्ख - जगदीशमानिनः (सन्ति) - स्वतःला जगाचे राजे मानणारे असतात - काले (अपि) - भयंकर प्रसंगीही - त्वां अभयं वीक्ष्य - तू निर्भय आहेस असे पाहून - आशु तन्मदं हित्वा - त्वरित तो गर्व टाकून - अपस्मयाः (सन्तः) - गर्वरहित होत्साते - आर्यंमार्गं प्रभजन्ति - श्रेष्ठ मार्गाचे अवलंबन करितात - ते ईहा अपि - तुझी लीलासुद्धा - खलानां अनुशासनं (भवति) - दुष्टांना सन्मार्गाला लावणारी होते. ॥७॥
माझ्यासारखे जे अज्ञानी आणि स्वतःला जगाचा ईश्वर मानणारे आहेत, त्यांना जेव्हा कळते की, भितीच्या प्रसंगी सुद्धा आपण निर्भय असता, तेव्हा ते आपली घमेंड सोडून देतात आणि गर्वरहित होऊन आपल्या भक्तीच्या मार्गाचा आश्रय घेतात. हे प्रभो ! आपली लीला ही दुष्टांनाही उपदेश देण्यासाठी असते. (७)
( मिश्र )
स त्वं ममैश्वर्यमदप्लुतस्य कृतागसस्तेऽविदुषः प्रभावम् । क्षन्तुं प्रभोऽथार्हसि मूढचेतसो मैवं पुनर्भून्मतिरीश मेऽसती ॥ ८ ॥
ऐश्वर्य धुंदे अवमानिले मी शक्ती तुझी ही नव्हती कळाली । क्षमा करावी अपराधियासी अज्ञानि दुष्टो न शिकार व्हावा ॥ ८ ॥
सः त्वं - तो तू - ऐश्वर्यमदप्लुतस्य - सामर्थ्याच्या गर्वाने व्यापलेल्या - ते प्रभावं अविदुषः - तुझा पराक्रम न जाणणार्या - कृतागसः मे - केलेला आहे अपराध ज्याने अशा मला - क्षन्तुम् अर्हसि - क्षमा करण्यास योग्य आहेस - प्रभो ईश - हे प्रभो ईश्वरा - मूढचेतसः मे - मूढ झाले आहे मन ज्याचे अशा मला - पुनः - फिरून - एवं असती मतिः - अशी वाईट बुद्धि - मा अभूत् - न होवो. ॥८॥
प्रभो ! ऐश्वर्याच्या मदामध्ये दंग होऊन मी आपला अपराध केला आहे, कारण आपला प्रभाव मला माहीत नव्हता. हे परमेश्वरा ! आपण मूर्ख असणार्या माझ्या अपराधाची मला क्षमा करावी आणि पुन्हा मला अशी दुर्बुद्धी होऊ नये. (८)
तवावतारोऽयमधोक्षजेह
भुवो भराणां उरुभारजन्मनाम् । चमूपतीनामभवाय देव भवाय युष्मत् चरणानुवर्तिनाम् ॥ ९ ॥
असूरसेनापति माजले ते त्यांच्याचि दंडा तव कृष्णरूप । वधोनि त्यांना मग मोक्ष देसी जे भक्त त्यांना हरि रक्षिसी तूं ॥ ९ ॥
देव अधोक्षज - हे देवा श्रीविष्णो - उरुभारजन्मनाम् - अत्यंत भारासारखा झाला आहे जन्म ज्यांचा अशा - स्वयंभराणां - स्वभावतःच बळकट अशा - चमूपतीनाम् - सेनापतीच्या - अभवाय - नाशासाठी - युष्मच्चरणानुवर्तिनां भवाय - तुझ्या चरणांना अनुसरणार्यांना उत्कर्षासाठी - इह तव अयम् अवतारः (अस्ति) - या जगात तुझा हा अवतार आहे. ॥९॥
हे इंद्रियातीत परमात्मन ! जे असुर सेनापती केवळ आपलेच पोट भरणारे आणि पृथ्वीला भारभूत झाले आहेत, त्यांच्या वधासाठी आणि आपल्या चरणांचे दास असणार्यांच्या उत्कर्षासाठी आपला येथे अवतार झाला आहे. (९)
( अनुष्टुप् )
नमस्तुभ्यं भगवते पुरुषाय महात्मने । वासुदेवाय कृष्णाय सात्वतां पतये नमः ॥ १० ॥
( अनुष्टुप् ) नमी मी भगवंताला सर्वात्मा वासुदेवला । यदुंचा स्वामि तू एक नमो रे भक्त वत्सला ॥ १० ॥
महात्मने पुरुषाय - श्रेष्ठ पुरुष अशा - तुभ्यं भगवते नमः - तुला भगवंताला नमस्कार असो - वासुदेवाय कृष्णाय - वसुदेवाचा पुत्र श्रीकृष्ण अशा - सात्वतां पतये - भक्तांचा संरक्षक अशा - (तुभ्यं) नमः - तुज विष्णूला नमस्कार असो. ॥१०॥
भगवन ! आपण पुरुषोत्तम असून सर्वात्मा वासुदेव आहात. आपण यदुवंशीयांचे स्वामी आणि सर्वांचे चित्त आकर्षित करणारे आहात. मी आपणास वारंवार नमस्कार करीत आहे. (१०)
स्वच्छन्दोपात्तदेहाय विशुद्धज्ञानमूर्तये ।
सर्वस्मै सर्वबीजाय सर्वभूतात्मने नमः ॥ ११ ॥
स्वतंत्र असशी तू तो स्वेच्छेने देह धारिशी । विशुद्ध ज्ञानरूपी तू आत्माराम नमो नमः ॥ ११ ॥
स्वच्छन्दोपात्तदेहाय - स्वतःच्या इच्छेने घेतला आहे देह ज्याने अशा - विशुद्धज्ञानमूर्तये - शुद्ध ज्ञान हे आहे स्वरूप ज्याचे अशा - सर्वबीजाय - सर्वांचे आदिकारण अशा - सर्वभूतात्मने - सर्व प्राण्यांचा आत्मा अशा - सर्वस्मै (तुभ्यं) नमः - सर्वव्यापी अशा तुला नमस्कार असो. ॥११॥
आपण आपल्या इच्छेनुसार शरीराचा स्वीकार केला आहे. आपले हे शरीरसुद्धा विशुद्ध ज्ञानस्वरूप आहे. आपण सर्व काही आहात, सर्वांचे कारण आहात आणि सर्वांचे आत्मा आहात. मी आपणस वारंवार नमस्कार करीत आहे. (११)
मयेदं भगवन् गोष्ठ नाशायासारवायुभिः ।
चेष्टितं विहते यज्ञे मानिना तीव्रमन्युना ॥ १२ ॥
गर्व क्रोध मला भारी माझ्या यज्ञास त्यागिता । व्रज ते मारण्या इच्छे वृष्टी मी बहु वर्षिली ॥ १२ ॥
भगवन् - हे परमेश्वरा - यज्ञे विहते (सति) - यज्ञ बंद पाडिला असता - मानिना मया - गर्विष्ठ अशा मी - तीव्रमन्युना - अत्यंत रागाने - आसारवायुभिः - जोराची वृष्टि व वारा यांनी - गोष्ठनाशाय - गोकुळाच्या नाशासाठी - इदं चेष्टितम् - ही धडपड केली. ॥१२॥
भगवन ! मी अभिमानी आणि अतिशय क्रोधीसुद्धा आहे. म्हणूनच माझा यज्ञ केला नाही, असे पाहून मी मुसळधार पाऊस आणि तुफान यांच्याद्वारे सर्व व्रजमंडल नष्ट करण्याचे योजिले. (१२)
त्वयेशानुगृहीतोऽस्मि ध्वस्तस्तम्भो वृथोद्यमः ।
ईश्वरं गुरुमात्मानं त्वामहं शरणं गतः ॥ १३ ॥
परी अनुग्रहो पूर्ण केला तू मजला असा । स्वामी तू गुरुनी आत्मा नमितो तुज मी पुन्हा ॥ १३ ॥
ईश - हे ईश्वरा - त्वया अनुगृहीतः अस्मि - तुझ्या कृपेस पात्र झालो आहे - ध्वस्तस्तम्भः - नाहीसा झाला आहे ताठा ज्याचा असा - वृथोद्यमः अहम् - व्यर्थ आहे प्रयत्न ज्याचा असा मी - ईश्वरं गुरुम् आत्मानं त्वाम् - समर्थ, श्रेष्ठ व आत्मस्वरूपी अशा तुला - शरणं गतः - शरण आलो. ॥१३॥
परंतु प्रभो ! आपण माझ्यावर अतिशय कृपा केलीत. माझे प्रयत्न व्यर्थ झाल्याकारणाने माझी घमेंड मुळापासून उखडली गेली. आपण माझे स्वामी आहात. गुरू आहात आणि आत्मा आहात. मी आपल्याला शरण आलो आहे (१३)
श्रीशुक उवाच -
एवं सङ्कीर्तितः कृष्णो मघोना भगवानमुम् । मेघगम्भीरया वाचा प्रहसन् इदमब्रवीत् ॥ १४ ॥
श्रीशुकदेव शांगतात - कृष्णाची स्तुति ही ऐशी देवेंद्रे गायिली तदा । हासुनी मेघनादाने इंद्रासी कृष्ण बोलला ॥ १४ ॥
मघोना एवं संकीर्तितः - इंद्राने याप्रमाणे स्तविलेला - भगवान् कृष्णः - भगवान श्रीकृष्ण - प्रहसन् - हसत - मेघगंभीरया वाचा - मेघासारख्या गंभीर वाणीने - अमुं इदम् अब्रवीत् - त्याला असे म्हणाले. ॥१४॥
श्रीशुकदेव म्हणतात - जेव्हा देवराज इंद्राने भगवान श्रीकृष्णांची अशी स्तुती केली, तेव्हा हसत हसत मेघाप्रमाणे गंभीर वाणीने ते त्याला म्हणाले - (१४)
विवरण :- इंद्राने आपल्या कृत्याबद्दल पश्चात्ताप व्यक्त केल्यानंतर भगवंत त्याला जे सांगतात, (अनुग्रह करण्यास मानभंग) ते वरवर पाहता परस्परविरूद्ध वाटते. अपमान करण्याने अनुग्रह कसा होतो ? पण पुढे ते स्पष्ट होते, ऐश्वर्यसंपन्न, सत्ताधारी मनुष्य उन्मत्त, मदांध होतो. स्वतः सर्वश्रेष्ठ आणि इतर कःपदार्थ असे त्यास वाटते. तो संयमशून्य व विवेकभ्रष्ट होतो. आणि 'विवेकभ्रष्टानां भवति विनिपातः शतमुखः' अशी अवस्था ठरलेली असते. परमेश्वराला एकवेळ अज्ञान मान्य आहे, पण अहंकार नाही. त्या उन्मत्ताला ताळ्यावर आणण्यास त्याला चांगलेच चौदावे रत्न दाखवावे लागते. त्याच्या दुखण्याचे मूळ नष्ट करावे लागते. आपली लीला म्हणून परमेश्वर जेव्हा त्याचे ऐश्वर्य, संपत्ती, सत्ता, त्याच्या गर्वाचे मूळच नाहीसे करतो, तेव्हा त्याचे डोळे उघडतात. तो ठिकाणावर येतो. (व्यवहारातहि हेच तत्त्व थोडयाफार फरकाने दिसते. झाडाची वाढ होण्यास, पीक चांगले येण्यास त्याची छाटणी करावी लागते. काही काळ त्याचे पाणी तोडावे लागते.) तो पश्चात्तापदग्ध होतो आणि मग आता त्याला परमेश्वराची आठवण येते. तो क्षमायाचना करतो. (कुंतीने याचसाठी 'विपदः सन्तु नः शश्वत् ।' 'आम्हावर नेहमीच संकटे येवोत' असे मागणे मागितले होते.) इंद्र स्वतःला देवाधिदेव आणि कृष्णाला सामान्य मर्त्य मानीत होता. त्याच्या या चुकीचे प्रायश्चित्त त्याला मिळाले. पण शिक्षा चुकीला, चूक करणार्याला नाही, आणि कायमस्वरूपी तर नाहीच. अपराध्याला पश्चात्ताप झाला की, त्याच्यावर अनुग्रह. कारण परमेश्वर हा पिता असल्याने तो क्षमाशील आहे. म्हणून त्याने इंद्रावर पुन्हा अनुग्रह केला. (१४)
श्रीभगवानुवाच -
मया तेऽकारि मघवन् मखभङ्गोऽनुगृह्णता । मदनुस्मृतये नित्यं मत्तस्येन्द्रश्रिया भृशम् ॥ १५ ॥
श्री भगवान् म्हणाले - इंद्रा तू माजता तैसा यज्ञ मी मोडिला असे । आता तू नित्य ते ध्यान लावोनी मजला स्मरी ॥ १५ ॥
मघवन् - हे इंद्रा - इंद्रश्रिया भृशं - स्वर्गीय इंद्रपदाच्या ऐश्वर्याने - मत्तस्य ते - अत्यंत माजलेल्या तुला - नित्यं मदनुस्मृतये - नित्य माझे स्मरण व्हावे म्हणून - अनुगृहणता मया - कृपा करणार्या मजकडून - मखभङगः अकारि - यज्ञाला अडथळा केला गेला. ॥१५॥
श्रीभगवान म्हणाले - इंद्रा ! तू ऐश्वर्याने फार माजला होतास. म्हणूनच तुझ्यावर कृपा करून तुला माझे नित्य स्मरण राहण्यासाठी मी तुझा यज्ञ भंग केला. (१५)
मामैश्वर्यश्रीमदान्धो दण्डपाणिं न पश्यति ।
तं भ्रंशयामि सम्पद्भ्यो यस्य चेच्छाम्यनुग्रहम् ॥ १६ ॥
ऐश्वर्ये माजतो त्याला न कळे काळ रूप मी । शिरी मी असतो नित्य तैं कृपे धन नाशितो ॥ १६ ॥
(यः) ऐश्वर्यश्रीमदान्धः - जो सत्ता व संपत्ति यांच्या धुंदीने आंधळा झालेला असा - दण्डपाणिं - दंड आहे हातात ज्याच्या - मां न पश्यति - अशा मला पाहत नाही - च - आणि - यस्य अनुग्रहं (कर्तुं) इच्छामि - ज्याच्यावर मी अनुग्रह करू इच्छितो - तं संपद्भ्यः भ्रंशयामि - त्याला मी संपत्तीपासून खाली पाडतो. ॥१६॥
जो ऐश्वर्य आणि संपत्तीच्या मदाने आंधळा होतो, त्याला हे दिसत नाही की, मी परमेश्वर हातात दंड घेऊन त्याच्या शासनासाठी उभा आहे. मी ज्याच्यावर कृपा करू इच्छितो त्याचे ऐश्वर्य नाहीसे करतो. (१६)
गम्यतां शक्र भद्रं वः क्रियतां मेऽनुशासनम् ।
स्थीयतां स्वाधिकारेषु युक्तैर्वः स्तम्भवर्जितैः ॥ १७ ॥
इंद्रा कल्याण हो सारे जा आता पाळि बोध हा । गर्व ना करि तू तेंव्हा न ओलांडी सिमा कधी ॥ १७ ॥
शक्र - हे इंद्रा - (त्वया) गम्यताम् - तू जावे - वः भद्रं (अस्तु) - तुमचे कल्याण असो - मे अनुशासनं क्रियताम् - माझ्या उपदेशाप्रमाणे कृति करावी - वः - तुम्हांकडून - स्तम्भवर्जितैः - गर्वरहित असे - स्वाधिकारेषु - आपापल्या अधिकाराच्या ठिकाणी - युक्तैः स्थीयताम् - दक्ष राहिले जावे. ॥१७॥
हे इंद्रा ! तुझे कल्याण असो. आता जा आणि माझ्या आज्ञेप्रमाणे वाग. तसेच कधीही गर्व न करता सावधपणे आपल्या अधिकाराचे पालन कर. (१७)
अथाह सुरभिः कृष्णं अभिवन्द्य मनस्विनी ।
स्वसन्तानैरुपामन्त्र्य गोपरूपिणमीश्वरम् ॥ १८ ॥
आज्ञापिता असे कृष्णे सवत्स कामधेनु ती । पातली वंदिता कृष्णा वदली बोल हे असे ॥ १८ ॥
अथ - नंतर - मनस्विनी सुरभिः - चतुर अशी कामधेनु - स्वसन्तानैः (सह) - आपल्या संततीसह - गोपरूपिणं - गवळ्याचे रूप धारण केलेल्या - ईश्वरं कृष्णं अभिवंद्य - भगवान श्रीकृष्णाला नमस्कार करून - च - आणि - उपामन्त्र्य - प्रार्थनापूर्वक - आह - म्हणाली. ॥१८॥
नंतर मनस्विनी कामधेनूने आपल्या वासरांसह गोपवेषधारी परमेश्वर श्रीकृष्णांना वंदन केले आणि म्हणाली - (१८)
सुरभिरुवाच -
कृष्ण कृष्ण महायोगिन् विश्वात्मन् विश्वसम्भव । भवता लोकनाथेन सनाथा वयमच्युत ॥ १९ ॥
कामधेनु म्हणाली - कृष्ण कृष्ण महायोगी विश्वात्मा विश्वसंभवा । विश्वाचा रक्षिता तूची सनाथ अजि मी असे ॥ १९ ॥
महायोगिन् कृष्ण - हे महायोगी श्रीकृष्णा - विश्वात्मन् कृष्ण - हे जगद्व्यापी श्रीकृष्णा - विश्वसंभव अच्युत - हे जग उत्पन्न करणार्या श्रीकृष्णा - लोकनाथेन भवता - सर्व लोकांचे रक्षण करणार्या तुझ्यामुळे - वयं सनाथाः (जाताः) - आम्ही सनाथ झालो. ॥१९॥
हे श्रीकृष्णा ! आपण महायोगी आहात. आपण स्वतः विश्वरूप असून विश्वाचे स्वामी असलेल्या आपल्यामुळेच आम्ही सनाथ झालो आहोत. (१९)
त्वं नः परमकं दैवं त्वं न इन्द्रो जगत्पते ।
भवाय भव गोविप्र देवानां ये च साधवः ॥ २० ॥
पूज्यदेवा जगन्नाथा आमुचा इंद्र तूचि रे । द्विज गो देवता साधू यांचा तू इंद्र हो अता ॥ २० ॥
जगत्पते - हे जगाच्या पालका - त्वं (एव) नः - तूच आमचे - परमकं दैवं (असि) - श्रेष्ठ असे दैवत आहेस - अतः - यास्तव - गोविप्रदेवानाम् - गाई, ब्राह्मण व देव यांच्या - च - आणि - ये साधवः (सन्ति तेषाम्) - जे सज्जन असतील त्यांच्या - भवाय - उत्कर्षासाठी - त्वं (एव) नः इन्द्रः भव - तूच आमचा स्वामी हो. ॥२०॥
हे जगाचे स्वामी ! आपण आमचे परम दैवत आहात. आमचे आपणच इंद्र आहात. म्हणून आपणच गाय, ब्राह्मण, देव आणि साधुजनांच्या रक्षणासाठी आपचे इंद्र व्हा ! (२०)
इन्द्रं नस्त्वाभिषेक्ष्यामो ब्रह्मणा चोदिता वयम् ।
अवतीर्णोऽसि विश्वात्मम् भूमेर्भारापनुत्तये ॥ २१ ॥
ब्रह्माजीप्रेरणे आम्ही गाई इंद्राचि मानुनी । तुजला अभिषेकीतो हरिशी पृथ्वीभार तो ॥ २१ ॥
ब्रह्मणा नोदिताः वयम् - ब्रह्मदेवाने प्रेरिलेले आम्ही - त्वाम् - तुला - नः इन्द्रम् - आमचा स्वामी म्हणून - अभिषेक्ष्यामः - अभिषेक करणार आहो - विश्वात्मन् - हे विश्वस्वरुपा - भूमेः भारानुपत्तये - पृथ्वीचा भार नाहीसा करण्यासाठी - अवतीर्णः असि - तू अवतरला आहेस. ॥२१॥
ब्रह्मदेवांच्या प्रेरणेने आम्ही गाई आपल्याला आमचा इंद्र मानून अभिषेक करू. हे विश्वात्मन ! आपण पृथ्वीचा भार उतरविण्यासाठीच अवतात धारण केला आहे. (२१)
विवरण :- इंद्र गेल्यानंतर सुरभी (स्वर्धेनू) येऊन कृष्णाची स्तुति करताना म्हणते, 'तूच आमचा इंद्र, म्हणजेच देवाधिदेव !' इथे सुरभीसुद्धा कृष्णाला देवाधिदेव सर्वश्रेष्ठ मानते, हे दिसते. म्हणूनच ती पुढे म्हणते, 'तुला मर्त्य मानणार्या इंद्राचे इंद्रपण आता पुरे. तूच सर्वश्रेष्ठ असे ब्रह्मदेवालाहि वाटते. म्हणून आता आम्ही तुलाच अभिषेक करणार ! (२०-२१)
श्रीशुक उवाच -
एवं कृष्णमुपामन्त्र्य सुरभिः पयसात्मनः । जलैराकाशगङ्गाया ऐरावतकरोद्धृतैः ॥ २२ ॥
श्रीशुकदेव म्हणतात - श्रीकृष्णां बोलता ऐसे सुरभी आपुल्या दुधे । आणि ऐरावते शुंडे खगंगाजल आणुनी ॥ २२ ॥
एवं उपामन्त्र्य - अशा रीतीने प्रार्थना करून - सुरभिः - कामधेनु - आत्मनः पयसा - आपल्या दुधाने - (तथा) ऐरावतकरोद्धृतैः - ऐरावताने सोंडेने वर उचललेल्या - आकाशगङगायाः जलैः - स्वर्गातील गंगेच्या उदकांनी - कृष्णं (अभ्यषिञ्चत) - श्रीकृष्णाला अभिषेक करिती झाली ॥२२॥
श्रीशुक म्हणतात - कामधेनूने भगवान श्रीकृष्णांना असे म्हणून आपल्या दुधाने आणि देवराज इंद्राने ऐरावताच्या सोंडेतून आणलेल्या आकाशगंगेच्या पाण्याने; (२२)
इन्द्रः सुरर्षिभिः साकं चोदितो देवमातृभिः ।
अभ्यसिञ्चत दाशार्हं गोविन्द इति चाभ्यधात् ॥ २३ ॥
देवर्षीसह यांनी श्रीकृष्णाला अभिषेकिले । गोविंद नाम हे त्यांनी कृष्णाला ठेविले असे ॥ २३ ॥
देववमातृभि नोदितः इन्द्रः - देवांच्या मातांनी प्रेरिलेला इंद्र - सुरर्षिभिः साकं - देव व ऋषी यांसह - ऐरावतकरोद्धृतैः - ऐरावताने सोंडेने वर उचललेल्या - आकाशगङगायाः जलैः - स्वर्गातील गंगेच्या उदकांनी - दाशार्हम् अभ्यषिञ्चत - श्रीकृष्णाला अभिषेक करिता झाला - च - आणि - गोविन्दः - गोविंद - इति अभ्यधात् - असे नाव ठेविता झाला. ॥२३॥
देवमातांच्या प्रेरणेने देवर्षींसह यदुनाथ श्रीकृष्णांना अभिषेक केला आणि त्यांना ’गोविंद’ नाव ठेवले. (२३)
( मिश्र )
तत्रागतास्तुम्बुरुनारदादयो गन्धर्वविद्याधरसिद्धचारणाः । जगुर्यशो लोकमलापहं हरेः सुराङ्गनाः संननृतुर्मुदान्विताः ॥ २४ ॥
( इंद्रवज्रा ) तैं नारदो तुंबर सिद्ध आणि गंधर्व विद्याधर हेहि होते । नी लोकपाले स्तुति गायिली तै नी अप्सरांनी बहु मृत्य केले ॥ २४ ॥
तत्र आगताः - तेथे आलेले - तुम्बुरुनारदादयः - तंबुरु व नारद आहेत प्रमुख ज्यांमध्ये असे - गन्धर्वविद्याधरसिद्धचारणाः - गंधर्व, विद्याधर, सिद्ध व देवांचे स्तुतिपाठक - लोकमलापहं - सर्व लोकांचे पाप नाहीसे करणारी - हरेः यशः जगुः - श्रीकृष्णाची कीर्ती गाते झाले - मुदा अन्विता - आनंदाने युक्त अशा - सुराङ्गनाः संननृतुः - देवांच्या स्त्रिया उत्तमप्रकारे नाचत्या झाल्या ॥२४॥
त्यावेळी तेथे नारद, तुंबरू इत्यादि गंधर्व, विद्याधर, सिद्ध आणि चारण आले होते, ते जगाचे पाप-ताप नाहीसे करणार्या भगवंतांच्या यशाचे गायन करू लागले आणि अप्सरा आनंदाने नृत्य करू लागल्या. (२४)
तं तुष्टुवुर्देवनिकायकेतवो
व्यवाकिरन् चाद्भुतपुष्पवृष्टिभिः । लोकाः परां निर्वृतिमाप्नुवंस्त्रयो गावस्तदा गामनयन् पयोद्रुताम् ॥ २५ ॥
त्या श्रेष्ठ देव सुमवृष्टि केली नी कृष्णदेवा स्तुति गायिली ती । त्रिलोक हर्षी बुडले पहा ते गो स्तन्यदुग्धे भिजली धरा ही ॥ २५ ॥
(ते) देवनिकायकेतवः - ते स्वर्गातील पुढारी - तं तुष्टुवुः - त्याला स्तविते झाले - च - आणि - अद्भुतपुष्पवृष्टिभिः (तं) - त्याजवर अपूर्व अशा फुलांचे वर्षाव - व्यवाकिरन् - करिते झाले - तदा - त्या वेळी - त्रयः लोकाः - तिन्ही लोक - परां निर्वृत्तिम आप्रुवन् - श्रेष्ठ अशा सुखाला मिळविते झाले - गावः - गाई - गां पयोद्रुताम् अनयन् - पृथ्वीला दुधाने भिजलेली अशी करत्या झाल्या ॥२५॥
प्रमुख देवता भगवंतांची स्तुती करून त्यांच्यावर नंदनवनातील दिव्य फुलांचा वर्षाव करू लागल्या. तिन्ही लोकांमध्ये परमानंद ओसंडून वाहू लागला आणि गाईंच्या सडातून इतके दूध गळू लागले की, पृथ्वी ओलीचिंब झाली. (२५)
( अनुष्टुप् )
नानारसौघाः सरितो वृक्षा आसन् मधुस्रवाः । अकृष्टपच्यौषधयो गिरयोऽबिभ्रदुन्मणीन् ॥ २६ ॥
( अनुष्टुप् ) नद्यांना रस ते आले मधुधारा तरूतुनी । औषधी अन्न पृथ्वीशी पर्वतीं रत्न पातले ॥२६ ॥
सरितः - नद्या - नानारसौघाः - अनेकप्रकारच्या रसांचे आहेत प्रवाह ज्यात - (आसन्) - अशा झाल्या - वृक्षाः मधुस्त्रवाः आसन् - वृक्ष मधाच्या पाझरांनी युक्त असे झाले - ओषधयः - धान्यादि वनस्पति - अकृष्टपच्याः (जाताः) - न नांगरलेल्या भूमीत उत्पन्न होणार्या झाल्या - गिरयः - पर्वत - मणीन् उत् अबिभ्रत् - रत्नांना प्रगटरीतीने धारण करते झाले ॥२६॥
नद्यांना वेगवेगळ्या रसांचा पूर आला. वृक्षांमधून मधाच्या धारा वाहू लागल्या. नांगरणी-पेरणी न करताही जमिनीतून अनेक प्रकारच्या औषधी, अन्न उत्पन्न झाले. पर्वतात दडून असलेली रत्ने बाहेर दिसू लागली. (२६)
कृष्णेऽभिषिक्त एतानि सत्त्वानि कुरुनन्दन ।
निर्वैराण्यभवंस्तात क्रूराण्यपि निसर्गतः ॥ ॥
परीक्षिता ! अभिषेक कृष्णाला जाहला तदा । क्रूरही प्राणि ते वैर सांडोनी राहु लागले ॥ २७ ॥
तात कुरुनन्दन - हे कुरुकुलाला आनंद देणार्या राजा - कृष्णे अभिषिक्ते (सति) - श्रीकृष्णाला अभिषेक झाला असता - निसर्गतः क्रूराणि - स्वभावतः दुष्ट - एतानि सत्वानि अपि - असे हे प्राणीसुद्धा - निर्वैराणि अभवन् - नाहीसा झाला आहे द्वेष ज्यांचा असे झाले ॥२७॥
परीक्षिता ! भगवान श्रीकृष्णांना अभिषेक झाल्यानंतर जे जीव स्वभावतःच क्रूर होते, ते सुद्धा क्रूरपणा विसरले. (२७)
विवरण :- पवित्र वातावरणाचा परिणाम प्राणीमात्रांवरहि कसा होतो, याचे या श्लोकात उदाहरण मिळते. अभिषेकाचे वेळी त्या मांगल्याने भरलेल्या वातावरणात वाघ, सिंह, सर्प इ. क्रूर प्राणीही आपला जन्मजात क्रूरपणा, हाडवैर विसरून प्रेमाने एकत्र आले. ऋषी-मुनींच्या आश्रमातहि अशाच प्रकारे हे प्राणी आपसातील हाडवैर विसरून प्रेमाने रहात असे उल्लेख इतरत्रही आढळून येतात. (एकाच घरात पाळलेले दोन पोपट नंतर वेगवेगळ्या ठिकाणी गेले. चोराच्या घरातील पोपट 'हाणा, मारा' याखेरीज बोलत नसे. दुसरा सज्जन व्यक्तीच्या घरातील पोपट 'या, बसा, नमस्कार.' असे स्वागत करीत असे.) थोडेसे दूरान्वयाने पाहिले तर 'सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो.' हे किती अन्वर्थक आहे हे लक्षात येते. (२७)
इति गोगोकुलपतिं गोविन्दमभिषिच्य सः ।
अनुज्ञातो ययौ शक्रो वृतो देवादिभिर्दिवम् ॥ २८ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे पूर्वार्धे सप्तविंशोऽध्यायः ॥ २७ ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
इंद्र नी धेनुने ऐसे गोविंदा अभिषेकिले । संमती घेउनी गेला गंधर्वा सह इंद्र तो ॥ २८ ॥ ॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सत्ताविसावा अध्याय हा ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
इति - अशारीतीने - गोगोकुलपतिं - गाई व गोकुळ यांचा संरक्षक - गोविन्दं अभिषिच्य - अशा गोविंदाला अभिषेक करून - (तेन) अनुज्ञातः - त्याने निरोप दिलेला - देवादिभिः वृतः - देवादिकांनी वेष्टिलेला - सः शक्रः - तो इंद्र - दिवं ययौ - स्वर्गास गेला ॥२८॥
अशा प्रकारे इंद्राने गायी आणि गोकुळाचे स्वामी श्रीगोविंदांना अभिषेक केला आणि त्यांची संमती घेऊन देव, गंधर्व इत्यादींसह तो स्वर्गाकडे निघून गेला (२८)
अध्याय सत्ताविसावा समाप्त |