श्रीमद् भागवत पुराण
दशमः स्कन्धः
षड्‌विंशोऽध्यायः

श्रीकृष्णस्य अलौकिकं प्रभावं दृष्ट्वा
चकितान् गोपान प्रति नन्दस्य गर्गोक्तिकथनम् -

श्रीकृष्णांच्या प्रभावाविषयी गोपांचा नंदांशी वार्तालाप -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् )
एवंविधानि कर्माणि गोपाः कृष्णस्य वीक्ष्य ते ।
अतद्वीर्यविदः प्रोचुः समभ्येत्य सुविस्मिताः ॥ १ ॥
( अनुष्टुप् )
श्रीशुकदेव सांगतात -
पाहोनी कृष्णकार्याते गोप आश्चर्य पावले ।
तयांना थांग ना लागे एकमेकास बोलती ॥ १ ॥

कृष्णस्य एवंविधानि - श्रीकृष्णाची अशाप्रकारची - कर्माणि वीक्ष्य - कृत्ये पाहून - अतद्वीर्यविदः - त्याचा पराक्रम न जाणणारे - (अतः एव) - व म्हणूनच - सुविस्मिता ते गोपाः - अत्यंत आश्चर्यचकित झालेले ते गोप - (नंदं) समभ्येत्य प्रोचुः - नंदाजवळ जाऊन म्हणाले. ॥१॥

श्रीशुक म्हणतात - श्रीकृष्णांची अशी अलौकिक कृत्ये पाहून गोपांना अतिशय आश्चर्य वाटले. त्यांच्या शक्तीची त्यांना कल्पना नसल्यामुळे ते एकत्र येऊन म्हणू लागले, (१)


बालकस्य यदेतानि कर्माणि अति अद्‍भुतानि वै ।
कथमर्हत्यसौ जन्म ग्राम्येष्वात्मजुगुप्सितम् ॥ २ ॥
अद्‌भुत कर्म कृष्णाचे खेडुतीं जन्मला असा ।
निंदीत ते तया साठी खरे हे जाहले कसे ? ॥ २ ॥

यत् - ज्याअर्थी - (अस्य) बालकस्य - ह्या मुलाची - एतानि वै कर्माणि - ही सर्व कर्मे खरोखर - अत्यद्‌भुतानि (सन्ति) - अत्यंत आश्चर्यकारक आहेत - ग्राम्येषु (अस्मासु) - खेडवळ अशा आम्हांमध्ये - आत्मजुगुप्सितं जन्म - स्वतःला अयोग्य अशा जन्माला - असौ कथं अर्हति - हा कसा योग्य आहे. ॥२॥

या मुळाची ही कृत्ये अतिशय आश्चर्यजनक आहेत. आमच्यासारख्या खेडवळ लोकांमध्ये याने जन्म घेणे ही त्याला कमीपणा आणणारी गोष्ट आहे. त्याला हे कसे योग्य आहे ? (२)


यः सप्तहायनो बालः करेणैकेन लीलया ।
कथं बिभ्रद् गिरिवरं पुष्करं गजराडिव ॥ ३ ॥
गजाने सहजी पद्म ध्यावे तैं धारि हा गिरी ।
वय तो सात वर्षाचे खेळणी परि हा धरी ॥ ३ ॥

यः (केवलं) - जो केवळ - सप्तहायनः बालः (अस्ति) - सात वर्षांचा बालक आहे - गजराट् पुष्करं इव - ऐरावत जसा नीलकमळाला तसा - लीलया - सहज - एकेन करेण - एका हाताने - गिरिवरं - गोवर्धनपर्वताला - कथं बिभ्रत् - कसा धारण करितो. ॥३॥

जसे हत्तीने सोंडेने कमळ उपटून वर धरावे, तसा या सात वर्षांच्या बालकाने एकाच हाताने गिरिराज उखळून सहजपणे कसा काय हातावर तोलला ? (३)


तोकेनामीलिताक्षेण पूतनाया महौजसः ।
पीतः स्तनः सह प्राणैः कालेनेव वयस्तनोः ॥ ४ ॥
माणसा हे कसे शक्य कृष्ण हा शिशु आसता ।
पिला तो पुतना प्राण जसा काळचि हा तिचा ॥ ४ ॥

आमीलिताक्षेण - अर्धवट मिटलेले आहेत डोळे ज्याचे - तोकेन (सता अनेन) - असा अर्भक असता याच्याकडून - कालेन तनोः वयः इव - काळाने जसे शरीराचे आयुष्य तसे - महौजसः पूतनायाः स्तनः - अत्यंत बलिष्ठ अशा पूतनेचा स्तन - प्राणैः सह पीतः - तिच्या प्राणांसह प्याला गेला. ॥४॥

जेव्या हा पाळण्यात होता, त्यावेळी भयंकर राक्षसी पूतना आली असता याने डोळे मिटूनच, काळाने शरीराचे आयुष्य प्यावे, तसे तिच्या स्तनातील दूध प्राणांसह प्राशन केले. (४)


हिन्वतोऽधः शयानस्य मास्यस्य चरणावुदक् ।
अनोऽपतद् विपर्यस्तं रुदतः प्रपदाहतम् ॥ ५ ॥
असता तीन मासाचा रडता पाय झाडिता ।
गाडा मोठाहि त्याने तो फेकिला उलटोनिया ॥ ५ ॥

(अनसः) अधः शयानस्य - गाडयाच्या खाली निजलेल्या - रुदतः - रडत असलेल्या - चरणौ उदक् हिन्वतः - पाय वर हालविणार्‍या - मास्यस्य (अस्य) - एक महिन्याच्या वयाच्या ह्या मुलाच्या - प्रपदा हतम् अनः - पायाने लाथाडलेला गाडा - विपर्यस्तं (सत्) अपतत् - उलथून पडला. ॥५॥

जेव्हा हा फक्त तीन महिन्यांचा होता आणि छ्कड्याखाली झोपा होता, तेव्हा रडत-रडतच हा वर पाय हालवत असता त्याच्या ठोकरण्याने तो छकडा उलटून पडला. (५)


एकहायन आसीनो ह्रियमाणो विहायसा ।
दैत्येन यस्तृणावर्त महन् कण्ठग्रहातुरम् ॥ ६ ॥
असता एक वर्षाचा वार्‍याने उडला तदा ।
तृण‍आवर्त दैत्याच्या नर्डीचा घोट घेतला ॥ ६ ॥

आसीनः (सत्) - बसलेला असता - दैत्येन विहायसा ह्रियमाणः - राक्षसाने आकाशमार्गाने नेलेला - एकहायन यः - एक वर्षाचा मुलगा असा जो - तृणावर्तम् - तृणावर्त राक्षसाला - कण्ठग्रहातुरं (कृत्वा) अहन् - गळा दाबून व्याकुळ करून मारिता झाला.॥६॥

जेव्हा तृणावर्त दैत्याने वावटळीच्या रूपाने, हा बसला असतानाच याला उचलून आकाशात नेले होते, तेव्हा हा फक्त एक वर्षाचा होता. त्यावेळी याने त्या तृणावर्त दैत्याचा गळा घोटून त्याला ठार मारले. (६)


क्वचिद् हैयङ्‌गवस्तैन्ये मात्रा बद्ध उलूखले ।
गच्छन् अर्जुनयोर्मध्ये बाहुभ्यां तावपातयत् ॥ ७ ॥
त्या दिनीं पाहिले सर्वे लोण्याची चोरि हा करी ।
उखळा बांधिता माता ओढोनी वृक्ष तोडि हा ॥ ७ ॥

क्वचित् - एकदा - हैय्यंगवस्तैन्ये (कृते) - लोण्याची चोरी केली असता - मात्रा उलूखले बद्धः - आईने उखळाशी बांधलेला - बाहुभ्यां - दोन्ही हातांनी - अर्जुनयोः मध्ये गच्छन् - अर्जुन वृक्षांमध्ये जाणारा - तौ अपातयत् - ते पाडता झाला. ॥७॥

एकदा लोणी चोरल्यामुळे आईने त्याला उखळाला बांधले होते, तेव्हा याने दोन्ही अर्जुन वृक्षांच्यामधून रांगत जाता जाता ते वृक्ष उखडून टाकले. (७)


वने सञ्चारयन् वत्सान् सरामो बालकैर्वृतः ।
हन्तुकामं बकं दोर्भ्यां मुखतोऽरिमपाटयत् ॥ ८ ॥
सवे गोपाळ रामाच्या जाता हा गायि चारण्या ।
बगळारूप दैत्याने गिळिता चिरि हा तया ॥ ८ ॥

बालकैः वृतः - मुलांनी वेढिलेला - सरामः (असौ) - बलरामासह असलेला हा - वने वत्सान् संचारयन् - वनांत वासरे चरवीत असता - हन्तु कामं - मारण्याची इच्छा करणार्‍या - अरिं बकम् - शत्रु अशा बकासुराला - दोर्भ्यां - दोन्ही हातांनी - मुख्यतः अपाटयत् - चोचीच्या ठिकाणी फाडता झाला. ॥८॥

गोपाल आणि बलराम यांच्यासह हा जेव्हा वासरे चारण्यासाठी वनामध्ये गेला होता, तेव्हा याला मारण्यासाठी एक दैत्य बगळ्याच्या रूपाने आला आणि याने दोन्ही हातांनी त्याचे दोन्ही जबडे पकडून त्याला गवताच्या काडीप्रमाणे चिरून टाकले. (८)


वत्सेषु वत्सरूपेण प्रविशन्तं जिघांसया ।
हत्वा न्यपातयत्तेन कपित्थानि च लीलया ॥ ९ ॥
वासरू हो‍उनी दैत्य घुसता कळपात तो ।
कृष्णाने मारिला त्याला खर वृक्षासि फेकिला ॥ ९ ॥

जिघांसया - मारण्याच्या इच्छेने - वत्सरूपेण - वासराच्या रूपाने - वत्सेषु प्रविशन्तं - वासरांत शिरणार्‍या राक्षसाला - हत्वा - मारून - तेन च - आणि त्याच्याच योगाने - लीलया - मौजेने - कपित्थानि न्यपातयत् - कवठे पाडिता झाला. ॥९॥

जेव्हा याला मारण्याच्या हेतूने एक दैत्य वासराच्या रूपामध्ये वासरांच्या कळपात घुसला होता, त्यावेळी याने त्या दैत्याला मारून कवठांच्या झाडावर आपटून ती झाडेही उखडून टाकली. (९)


हत्वा रासभदैतेयं तद्‍बन्धूंश्च बलान्वितः ।
चक्रे तालवनं क्षेमं परिपक्व फलान्वितम् ॥ १० ॥
बळीच्या सह राहोनी धेनुकासुर मारिला ।
गाढवारूपिचे सारे मारिले दैत्य नी तिथे ।
ताडाचे वन ते सर्वां फळास मुख जाहले ॥ १० ॥

बलान्वितः (असौ) - पराक्रमाने युक्त असा हा - रासभदैतेयं - गर्दभराक्षसाला - तद्‌बंधून् च हत्वा - व त्याच्या भाऊबंदांना मारून - परिपक्वफलान्वितं - पिकलेल्या फळांनी युक्त असे - तालवनं - झाडांचे वन - क्षेमं चके - निर्भय करिता झाला. ॥१०॥

याने बलरामासह गाढव्या रूपात राहणार्‍या धेनुकासुराला व त्याच्या बांधवांना मारून टाकले आणि पिकलेल्या फळांनी परिपूर्ण असे ताडवन सर्वांसाठी उपयोगी बनविले. (१०)


प्रलम्बं घातयित्वोग्रं बलेन बलशालिना ।
अमोचयद् व्रजपशून् गोपांश्चारण्यवह्नितः ॥ ११ ॥
बलरामा करें याने प्रलंबासुर मारिला ।
पेटता वनिचा अग्नी गाई गोपाळ रक्षि हा ॥ ११ ॥

बलशालिना बलेन - सामर्थ्याने शोभणार्‍या बळरामाकडून - उग्रं - भयंकर अशा - प्रलम्बं घातयित्वा - प्रलंबासुराला ठार करून - व्रजपशून् गोपान् च - गोकुळातील जनावरांना व गोपांना - अरण्यवह्नितः - वणव्यापासून - अमोचयत् - सोडविता झाला. ॥११॥

यानेच बलशाली बलरामाकडून क्रूर प्रंबासुराला मारले. तसेच दावानलातून गुरांची आणि गोपालांची सुटका केली. (११)


आशीविषतमाहीन्द्रं दमित्वा विमदं ह्रदात् ।
प्रसह्योद्वास्य यमुनां चक्रेऽसौ निर्विषोदकाम् ॥ १२ ॥
केवढा कालिया सर्प याने तो काढिला वरी ।
विषारीजल कालिंदी केले अमृत गोड जै ॥ १२ ॥

आशीविषतमादीन्द्रं - अत्यंत विषारी अशा कालिय सर्पाला - दमित्वा - वठणीवर आणून - विमदं (तम्) - गर्वरहित झालेल्या त्याला - प्रसह्य - बलात्काराने - ह्रदात् उद्वास्य - डोहातून घालवून देऊन - असौ - हा - यमुनां - यमुनेला - निर्विषोदकां चक्रे - विषरहित करिता झाला. ॥१२॥

यमुनेच्या डोहात वास्तव्य करणार्‍या विषारी कालियाचे गर्वाहरण करून बळजबरीने त्याला डोहातून हाकलून लावले आणि यमुनेचे पाणी विषरहित केले. (१२)


दुस्त्यजश्चानुरागोऽस्मिन् सर्वेषां नो व्रजौकसाम् ।
नन्द ते तनयेऽस्मासु तस्याप्यौत्पत्तिकः कथम् ॥ १३ ॥
नंदजी ! सावळ्या कृष्णी स्वभावे प्रेम ते असे ।
आहे हे मानितो आम्ही याचे कारण काय ते ॥ १३ ॥

नन्द - हे नंदा - अस्मिन् ते तनये - ह्या तुझ्या मुलावर - नः सर्वेषां - आम्हा सर्व - व्रजौकसाम् - गोकुळातील लोकांचे - दुस्त्यजः - टाकण्याला अत्यंत कठीण - अनुरागः (अस्ति) - असे प्रेम आहे - च - आणि - तस्य अपि - त्याचेहि - अस्मासु (सर्वेषु) - आम्हां सर्वांवर - कथं औत्पत्तिकः - कसे अगदी स्वाभाविक - (अनुरागः अस्ति) - असे प्रेम आहे. ॥१३॥

नंदबाबा ! तुमच्या मुलावर आम्हा सर्व व्रजवासियांचे अत्यंत प्रेम आहे आणि याचेसुद्धा आमच्यावर स्वाभाविक प्रेम आहे. याचे कारण काय ? (१३)


क्व सप्तहायनो बालः क्व महाद्रिविधारणम् ।
ततो नो जायते शङ्‌का व्रजनाथ तवात्मजे ॥ १४ ॥
बरे हा सात वर्षाचा उचली थोर तो गिरी ।
तेही त्या सातरात्रीसी शंका मोठीच वाटते ॥ १४ ॥

व्रजनाथ - हे गोकुलाचे संरक्षण करणार्‍या नंदा - सप्यहायनः बालः क्व - सात वर्षांचा बालक कोठे - महाद्रिविधारणं क्व - मोठा पर्वत उचलून धरणे कोठे - ततः - त्यामुळे - तव आत्मजे नः - तुझ्या मुलांविषयी आम्हांस - शङका जायते - संशय उत्पन्न होतो. ॥१४॥

कुठे हा सात वर्षांचा बालक आणि कुठे ते एवढा मोठा पर्वत उचलून धरणे ! व्रजराज ! म्हणूनच तुमच्या या पुत्रासंबंधी आम्हांला काही कळेनासे झाले आहे. (१४)


श्रीनन्द उवाच -
श्रूयतां मे वचो गोपा व्येतु शङ्‌का च वोऽर्भके ।
एनं कुमारमुद्दिश्य गर्गो मे यदुवाच ह ॥ १५ ॥
नंदबाबा म्हणाले -
गोपांनो ! ऐकणे सारे तेंव्हा शंका न ती उरे ।
महर्षि गर्ग ते याला पाहता बोलले असे ॥ १५ ॥

गोपाः - गोप हो - एवं कुमारं उद्दिश्य - या मुलाला उद्देशून - गर्गः मे यत् उवाच - गर्गमुनी मला जे म्हणाले - (तत्) मे वचः श्रूयताम् - मे माझे भाषण तुम्ही ऐका - च - म्हणजे - वः शङका व्येतु - तुमचा संशय नाहीसा होईल. ॥१५॥

नंद म्हणाले - गोपांनो ! महर्षी गर्गांनी या बालकाला पाहून याच्याविषयी जे म्हटले होते, ते ऐका, म्हणजे मुलाविषयीची तुमची शंका दूर होईल. (१५)


वर्णास्त्रयः किलास्यासन् गृह्णतोऽनुयुगं तनूः ।
शुक्लो रक्तस्तथा पीत इदानीं कृष्णतां गतः ॥ १६ ॥
प्रत्येक युगि हा बाळ वेगळ्या रंगि जन्मतो ।
श्वेत पीत नि तै रक्त या गेळी कृष्ण वर्ण तो ॥ १६ ॥

अनुयुगं - प्रत्येक युगांत - तनूः गृह्‌णतः अस्य - अवतार घेणार्‍या याचे - किल - खरोखर - शुक्लः रक्तं - पांढरा, तांबडा - तथा पीतः इति - व पिवळा असे - त्रयः वर्णाः आसन् - तीन वर्ण होऊन गेले - इदानीं (असौ) - हल्ली हा - कृष्णतां गतः - काळा या वर्णावर गेला आहे.॥१६॥

तुझा हा मुलगा प्रत्येक युगामध्ये शरीर धारण करतो. वेगवेगळ्या युगांमध्ये याचे शुभ्र, लाल आणि पिवळा हे रंग होते. यावेळी हा काळा झाला आहे. (१६)


प्रागयं वसुदेवस्य क्वचित् जातः तवात्मजः ।
वासुदेव इति श्रीमान् अभिज्ञाः सम्प्रचक्षते ॥ १७ ॥
नंदजी ! तुमचा पुत्र पहा त्या वसुदेवच्या ।
घरी हा जन्मला तेणे वासुदेवहि नाम त्यां ॥ १७ ॥

अयं तव आत्मजः - हा तुझा मुलगा - प्राक् क्वचित् - पूर्वी कुठे तरी - वसुदेवस्य जातः - वसुदेवाचा मुलगा म्हणून झाला - अभिज्ञाः - ज्ञाते लोक - श्रीमान् वासुदेवः - सर्वैश्वर्यसंपन्न वासुदेव - इति संप्रचक्षते - असे म्हणतील.॥१७॥

हा तुझा पुत्र आधी कधीतरी वसुदेवाच्या घरीसुद्धा जन्माला आला होता. म्हणून हे रहस्य माहीत असणारे लोक याला श्रीमान वासुदेव असेही म्हणतात. (१७)


बहूनि सन्ति नामानि रूपाणि च सुतस्य ते ।
गुण कर्मानुरूपाणि तान्यहं वेद नो जनाः ॥ १८ ॥
कर्मानुसार ते याचे कितेक नाम रूप ते ।
जाणतो सगळे मी ते न साधा जाणितो कुणी ॥ १८ ॥

ते सुतस्य - तुझ्या मुलाची - गुणकर्मानुरूपाणि - गुण व कृत्ये यांना साजेशी - नामानि रूपाणि च - नावे व रूपे - बहूनि सन्ति - पुष्कळ आहेत - तानि अहं नो वेद - ती मी जाणत नाही - जनाः (अपि न विदुः) - लोकही जाणत नाहीत. ॥१८॥

तुझ्या मुलागी गुण आणि कर्मांना अनुरूप अशी आणखी पुष्कळशी नावे आणि रूपे आहेत. ती मी जाणतो, परंतु इतरांना माहीत नाहीत. (१८)


एष वः श्रेय आधास्यद् गोपगोकुलनन्दनः ।
अनेन सर्वदुर्गाणि यूयमञ्जस्तरिष्यथ ॥ १९ ॥
कल्याण करि हा सर्वां गो गोपा मोदवील हा ।
याच्याच सहवासाने विपत्ती पार होत त्या ॥ १९ ॥

गोपगोकुलनन्दनः एषः - गोपांना व गोकुलाला आनंद देणारा हा - वः श्रेयः आधास्यत् - तुमचे कल्याण करील - अनेन (एव) यूयं - याच्याच योगाने तुम्ही - सर्वदुर्गाणि - सर्व संकटातून - अञ्जः तरिष्यथ - अनायसे तरून जाल ॥१९॥

सर्व गोप आणि गोपी गोकुळाला आनंद देणारा हा तुमचे कल्याण करील. याच्या साहाय्याने तुम्ही सर्व संकटांमधून सहजपणे निभावून जाल. (१९)


पुरानेन व्रजपते साधवो दस्युपीडिताः ।
अराजके रक्ष्यमाणा जिग्युर्दस्यून्समेधिताः ॥ २० ॥
व्रजराज गतकाळी पृथ्वीशी नृपना उरे ।
चोरांनी लुटिता सारे येणे संतांसि रक्षिले ॥ २० ॥

- व्रजपते - हे गोकुलाधिपते नंदा - पुरा अराजके (सति) - पूर्वी राजाच्या अभावी - दस्युपीडिताः - चोरांनी छळलेले - अनेन रक्ष्यमाणाः - ह्याने रक्षण केलेले - अतः एव च - आणि म्हणूनच - समेधिताः - उत्कर्ष पावलेले असे
हे व्रजराज ! पूर्वी एकदा पृथ्वीवर कोणी राजा राहिला नव्हता. डाकूंनी चारी बाजूंनी लुटालूट चालविली होती. तेव्हा तुझ्या या पुत्राने सज्जनांचे रक्षण केले आणि याच्यापासून शक्ती प्राप्त करून घेऊन त्या लोकांनी लुटारूंवर विजय मिळविला. (२०)


य एतस्मिन् महाभागाः प्रीतिं कुर्वन्ति मानवाः ।
नारयोऽभिभवन्त्येतान् विष्णुपक्षानिवासुराः ॥ २१ ॥
तुमच्या सावळ्या पुत्रा प्रेमी ते भाग्यवंतची ।
देव ते विष्णु छायेत तसे रक्षील प्रेमिका ॥ २१ ॥

वे महाभागाः - जे अत्यंत भाग्यशाली - मानवाः - असे मानव - एतस्मिन् - ह्याच्या ठिकाणी - प्रीतिं कुर्वन्ति - प्रेम करतील - एतान् - त्यांना - विष्णुपक्षान् - विष्णूच्या बाजूस - असुराः इव - असणार्‍यांना जसे दैत्य तसे - अरयः - शत्रु - न अभिभवन्ति - पराजित करणार नाहीत. ॥२१॥

जे मानव तुझ्या या मुलावर प्रेम करतील, ते भाग्यवान होत ! ज्याप्रमाणे विष्णुभक्तांना असुर जिंकू शकत नाहीत, त्याचप्रमाणे याच्यावर प्रेम करणार्‍यांना शत्रू जिंकू शकत नाहीत. (२१)


तस्मान् नन्द कुमारोऽयं नारायणसमो गुणैः ।
श्रिया कीर्त्यानुभावेन तत्कर्मसु न विस्मयः ॥ २२ ॥
गुणैश्वर्य स्वरूपाने नारायण असाचि हा ।
अलौकिक अशी कीर्ती न करा नवलाव तो ॥ २२ ॥

तस्मात् - म्हणून - नन्द - हे नंदा - अयं कुमारः - हा मुलगा - गुणैः श्रिया - गुणांनी, ऐश्वर्याने, - कीर्त्या अनुभावेन (च) - कीर्तीने व पराक्रमाने - नारायणसमः (अस्ति) - नारायणासारखा आहे - तत्कर्मसु - त्याच्या कृत्यांविषयी - विस्मयः न (अस्ति) - आश्चर्य नाही. ॥२२॥

नंदबाबा ! गुण, ऐश्वर्य, सौंदर्य, कीर्ति आणि प्रभाव या सर्व बाबतीत तुझा हा बालक भगवान् नारायणांच्या समानच आहे. म्हणून तुम्हांला याच्या कृत्यांचे आश्चर्य वाटायला नको. (२२)


इत्यद्धा मां समादिश्य गर्गे च स्वगृहं गते ।
मन्ये नारायणस्यांशं कृष्णं अक्लिष्टकारिणम् ॥ २३ ॥
आदेश देउनी ऐसा गेले गर्ग पुन्हा घरां ।
त्या वेळा पासुनी मी हा भगवत् अंश मानितो ॥ २३ ॥

च - आणि - इति मां अद्धा समादिश्य - असे मला उघड सांगून - गर्गे - गर्ग ऋषी - स्वगृहं गते (सति) - आपल्या घरी गेल्यावर - अक्लिष्टकारिणं - सर्वांना क्लेशरहित करणार्‍या - कृष्णं - श्रीकृष्णाला - नारायणस्य - मी श्रीविष्णूचा - अंशं मन्ये - अंश असे मानू लागलो. ॥२३॥

असे मला सांगून गर्गाचार्य आपल्या घरी निघून गेले. तेव्हापासून मी सुखद कृत्ये करणार्‍या या मुलाला भगवान नारायणांचाच अंश मानतो. (२३)


इति नन्दवचः श्रुत्वा गर्गगीतं व्रजौकसः ।
दृष्टश्रुतानुभावास्ते कृष्णस्यामिततेजसः ।
मुदिता नन्दमानर्चुः कृष्णं च गतविस्मयाः ॥ २४ ॥
नंदमुखातुनी ऐशा गर्गवाणीस ऐकता ।
हर्षले सर्व ते गोप कृष्णाचे कार्य जाणिले ।
नंदबाबास हर्षोनी कृष्णासी ते प्रशंसिती ॥ २४ ॥

इति गर्गगीतं - ह्याप्रमाणे गर्गाने केलेले वर्णन - नन्दवचः श्रुत्वा - नंदाच्या भाषणाच्या रूपाने ऐकून - मुदिताः व्रजौकसः - आनंदित झालेले गोकुलवासी लोक - नन्दं आनर्चुः - नंदाला पूजिते झाले - च - आणि - कृष्णं (प्रति) - कृष्णाविषयी - गतविस्मयाः (अभवन्) - आश्चर्यरहित असे झाले. ॥२४॥

व्रजवासियांनी जेव्हा नंदांच्या तोंडून गर्गाचार्याचे हे कथन ऐकले, तेव्हा त्यांचा विस्मय नाहीसा झाला. कारण आता त्यांनी अपरिमित तेजस्वी अशा श्रीकृष्णांचा प्रभाव पूर्णपणे पाहिला आणि ऐकला होता. त्यामुळे मोठ्या आनंदाने त्यांनी नंद आणि श्रीकृष्णांची मनोमन पूजा केली. (२४)


( शार्दूलविक्रीडित )
देवे वर्षति यज्ञविप्लवरुषा
     वज्रास्मवर्षानिलैः ।
सीदत्पालपशुस्त्रि आत्मशरणं
     दृष्ट्वानुकम्प्युत्स्मयन् ।
उत्पाट्यैककरेण शैलमबलो
     लीलोच्छिलीन्ध्रं यथा ।
बिभ्रद् गोष्ठमपान्महेन्द्रमदभित्
     प्रीयान्न इन्द्रो गवाम् ॥ २५ ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां दशमस्कन्धे पूर्वार्धे षड्‌विंशोऽध्यायः ॥ २६ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
( शार्दूल विक्रीडित )
यज्ञो भंगचि इंद्र तो बघुनिया क्रोधोनि वृष्टी करी ।
तेणे गोकुळिचे अतीव पिडले वत्से नि धेनू जिवो ।
पाहोनी हरि तो हसोनि गिरि घे रक्षीतसे सर्वची ।
इंद्राचा मद कृष्ण हा हरितसे तो विष्णु पावो अम्हा ॥ २५ ॥
॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सव्विसावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

यज्ञविप्लवरुषा - यज्ञाच्या विध्वंसाच्या रागाने - देवे वर्षति (सति) - इंद्र देव वर्षाव करीत असता - वज्राश्मपर्षानिलैः - वज्र, गारा आणि सोसाटयाचा वारा यांनी - सीदत्पालपशुस्त्रि गोष्ठं - पीडिले आहेत गोप, पशु व स्त्रिया ज्यांतील असे गोकुळ - आत्मशरणं दृष्टवा - आपल्याला शरण आलेले पाहून - (यः) अनुकम्पी (भूत्वा) - जो दयाळू होऊन - उत्स्मयन् - प्रौढीने हसणारा - अबलः यथा - परिश्रमावाचून सहज - लीलोच्छिलीन्ध्रं (तथा) - लीलेने उचललेल्या अळंब्याला तसे - शैलं उत्पाटय - पर्वताला उपटून - एककरेण बिभ्रत् - एका हाताने धारण करून - (गोष्ठं) अपात् - गोकुळाचे रक्षण करता झाला - (सः) महेन्द्रमदभिद् - श्रेष्ठ अशा इंद्राचा गर्व नाहीसा करणारा असा तो - गवां इन्द्रः - गाईंचा स्वामी - नः प्रीयात् - आम्हांवर प्रसन्न होवो. ॥२५॥

आपला यज्ञ न केल्याकारणाने जेव्हा इंद्र क्रोधाने विजा, गारा आणि तुफानी वारा यांच्यासह मुसळधार पाऊस पाडू लागला, तेव्हा स्त्रिया, जनावरे व गवळी अत्यंत दुःखी झाले होते. आपलाच आधार असणार्‍या व्रजवासियांची ही अवस्था पाहून भगवंतांचे हृदय करुणेने भरून आले. परंतु लगेच मंद हास्य करीत, एखाद्या मुलाने पावसाळी छत्रीचे फूल धरावे, त्याप्रमाणे त्यांनी एकाच हाताने पर्वत उपटून उचलून धरला आणि गोकुळाचे रक्षण केले. इंद्राची घमेंड धुळीला मिळविणारे तेच भवगान गोविंद आमच्यावर प्रसन्न होवोत. (२५)


अध्याय सव्विसावा समाप्त

GO TOP