|
श्रीमद् भागवत पुराण कोपान् मुसलधारावर्षं वर्षतीन्द्रे व्रजौकसां रक्षणार्थं गोवर्धनधारणम् - गोवर्धन धारण - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् ) इन्द्रस्तदाऽऽत्मनः पूजां विज्ञाय विहतां नृप । गोपेभ्यः कृष्णनाथेभ्यो नन्दादिभ्यश्चुकोप ह ॥ १ ॥
( अनुष्टुप् ) श्रीशुकदेव सांगतात - इंद्राला कळता कोपे नंदबाबा नि गोप यां । क्रोधे त्या नच हो कांही गोपा रक्षक कृष्ण तो ॥ १ ॥
नृप - हे परीक्षित राजा - सः इंद्रः - तो इंद्र - आत्मनः पूजां - आपली पूजा - विहतां विज्ञाय - भंगलेली जाणून - कृष्णनाथेभ्यः - कृष्ण आहे स्वामी ज्यांचा - नंदादिभ्यः गोपेभ्यः - अशा नंदादिक गोपांवर - चुकोप - क्रुद्ध झाला. ॥१॥
श्रीशुकदेव म्हणतात - परीक्षिता ! आपली पूजा करणे बंद केले आहे, असे इंद्राला समजताच तो श्रीकृष्ण ज्यांचे रक्षणकर्ते आहेत, त्या नंद इत्यादि गोपांवर रागावला. (१)
गणं सांवर्तकं नाम मेघानां चान्तकारिणाम् ।
इन्द्रः प्रचोदयत् क्रुद्धो वाक्यं चाहेशमान्युत ॥ २ ॥
पदाचा गर्वि तो इंद्र क्रोधाने लाल जाहला । सांवर्तक अशा मेघा वदला व्रजि वर्षण्या ॥ २ ॥
च - आणि - ईशमानी - आपल्याला श्रेष्ठ मानणारा - क्रुद्धः इंद्रः - रागावलेला इंद्र - अंतकारिणां मेघानां - प्रलय करणार्या मेघांच्या - सांवर्तकं नाम गणं - सांवर्तक नावाच्या समूहाला - प्राचोदयत् - पाठविता झाला - वाक्यं च आह - आणि म्हणाला. ॥२॥
इंद्र स्वतःलाच त्रैलोक्याचा ईश्वर समजत असे. त्याने संतापून प्रलय करणार्या मेघांच्या सांवर्तक नावाच्या गणाला, गोकुळात पाऊस पाडण्याची आज्ञा दिली आणि म्हटले, (२)
अहो श्रीमदमाहात्म्यं गोपानां काननौकसाम् ।
कृष्णं मर्त्यमुपाश्रित्य ये चक्रुर्देवहेलनम् ॥ ३ ॥
वदला जंगली लोका धनाचा गर्व जाहला । मनुष्य कृष्ण तो साधा बळे त्याच्या न मानिती ॥ ३ ॥
अहो - अहो - काननौकसां गोपानां - अरण्यात राहणार्या गोपांचा - श्रीमदमाहात्म्यं (पश्यत) - संपत्तीच्या गर्वाचा मोठेपणा पहा - ये - जे - मर्त्यं - साधारण मनुष्य - कृष्णं उपाश्रित्य - अशा कृष्णाचा आश्रय धरून - देवहेलनं चक्रुः - मी जो देव त्या माझी अवज्ञा करते झाले. ॥३॥
या जंगली गवळ्यांना केवढी ही संपत्तीची नशा चढली आहे. पहा ना ! यांनी सामान्य मनुष्य असणार्या श्रीकृष्णाच्या बळावर देवराजाचा अपमान केला. (३)
विवरण :- आपली पूजा करणार्या नंदादि गोपांना अडवून कृष्णाने त्यांना गाई, पर्वत इत्यादींची पूजा करावयास लावले. याचा इंद्राला फार राग आला. त्याने 'सांवर्तक' नावाच्या मेघांना वृष्टी करण्याची आज्ञा केली. 'संवर्त' (प्रलयकालीन मेघ) या नावावरूनच त्यांच्या भयंकरपणाची कल्पना येते. सर्व सृष्टी वाहून जाण्याइतकी भयानक वृष्टी करणारे हे मेघ होते. इंद्र कृष्णाला 'मर्त्य' म्हणतो, कारण तो मानवी शरीरधारी होता, म्हणजेच देवाहून कमी. इंद्र अमर म्हणजे देव होता. तरीही गोपांनी कृष्णासारख्या मर्त्याच्या नादी लागून माझ्यासारख्या देवाचा अपराध केला; मग त्यांना शासन हे हवेच, असा आशय. आपल्या ईश्वरत्वाचा इंद्राला झालेला अहंकार इथे दिसतो. मग त्याने सद्भावयुक्त असावयास हवे होते. पण अहंकाराने सद्सद्विवेक बुद्धीवर मात केली. (२-३)
यथादृढैः कर्ममयैः क्रतुभिर्नामनौनिभैः ।
विद्यां आन्वीक्षिकीं हित्वा तितीर्षन्ति भवार्णवम् ॥ ४ ॥
त्यजिता ब्रह्मविद्येला मूर्ख ते भवसागरी । सुकाणू तुटल्या नावीं तरेल कोण सागरी ॥ ४ ॥
यथा - ज्याप्रमाणे - आन्वीक्षिकीं विद्यां हित्वा - अध्यात्मविद्येला सोडून - अदृढैः - असमर्थ अशा - कर्ममयैः - कर्मस्वरूपी अशा - नामनौनिभैः क्रतुभिः - केवळ नावाच्या नौकांसारख्या यज्ञांनी - भवार्णवं - भवसमुद्राला - तितीर्षन्ति - तरण्याची इच्छा करितात. ॥४॥
जसे या जगात काही लोक भवसागर पार करण्यासाठी असलेले ब्रह्मविद्या हे खरे साधन सोडून फुटक्या नावेसारख्या असणार्या असमर्थ कर्ममय यज्ञांनी या घोर संसारसागराला पार करू इच्छितात. (४)
विवरण :- जो वेदांत विद्या, आत्मज्ञान जाणतो, तोच हा संसारसागर तरून जातो, पण जो साररहित (अर्थहीन) कर्ममार्गरुपी नौकेने हा भयंकर सागर तरून जाण्याची इच्छा करतो, तो मूर्ख असतो. आणि म्हणून त्याचा विनाश ठरलेला. (माझ्यासारख्या देवाची भक्ती करूनच कल्याण होईल. कृष्णासारख्या मर्त्याची भक्ती करून काय फायदा ? गोप मूर्ख आहेत, त्यांच्या ते लक्षात येत नाही, मला डावलून ते कृष्णासारख्याच्या मागे लागतात.) (४)
वाचालं बालिशं स्तब्धं अज्ञं पण्डितमानिनम् ।
कृष्णं मर्त्यमुपाश्रित्य गोपा मे चक्रुरप्रियम् ॥ ५ ॥
नादान मूर्ख हा कृष्ण विद्वान मानितो स्वयें । स्वताच घास मृत्यूचा त्यावरी हे विसंबती ॥ ५ ॥
वाचालं - बडबड करणार्या - बालिशं स्तब्धं - पोरकट व उद्धट - अज्ञं पंडितमानिनं - अज्ञानी व आपल्याला ज्ञानी मानणार्या - मर्त्यं कृष्णमं उपाश्रित्य - मनुष्य जो कृष्ण त्याचा आश्रय करुन - मे अप्रियं चक्रुः - माझे अप्रिय करते झाले. ॥५॥
कृष्ण हा एक बडबड करणारा पोरकट, अभिमानी आणि मूर्ख असूनसुद्धा स्वतःला मोठा ज्ञानी समजतो. अशा मनुष्य असणार्या कृष्णाचा आश्रय घेऊन या गवळ्यांनी माझी अवहेलना केली आहे. (५)
एषां श्रियावलिप्तानां कृष्णेनाध्मापितात्मनाम् ।
धुनुत श्रीमदस्तम्भं पशून् नयत सङ्क्षयम् ॥ ६ ॥
धनाचा गर्व तो त्यांना कृष्ण तो त्याच चेतवी । धुळीत मेळवा गर्व पशूसंहार तो करा ॥ ६ ॥
श्रिया अवलिप्तानां - संपत्तीने मत्त झालेल्या - कृष्णेन आध्मायितात्मनां - कृष्णाने भारून टाकिले आहे मन ज्यांचे अशा - एषां - या गोपांचा - श्रीमदस्तभं धुनुत - संपत्तीच्या मदाने आलेला गर्व नाहीसा करा - पशून् संक्षयं नयत - पशूंना नाशाप्रत न्या. ॥६॥
धनाची नशा चढलेल्या व कृष्णाने भडकावलेल्या यांची ही धनाची घमेंड जिरवा. तसेच यांच्या जनावरांचा संहार करा. (६)
अहं चैरावतं नागं आरुह्यानुव्रजे व्रजम् ।
मरुद्गणैर्महावेगैः नन्दगोष्ठजिघांसया ॥ ७ ॥
तुमच्या पाठिशी येतो ऐरावतहि घेउनी । मरुद्गणासवे घेतो नंदाचे व्रज नष्टितो ॥ ७ ॥
अहं च - आणि मी - नंदगोष्ठजिघांसया - नंदाच्या गौळवाड्याचा नाश करण्याच्या इच्छेने - ऐरावतं नागं आरुह्य - ऐरावत नावाच्या हत्तीवर बसून - महावीर्यैः मरुद्गणैः - महापराक्रमी अशा देवगणांसह - व्रजं अनुव्रजे - लगेच गोकुळात येतो. ॥७॥
तुमच्या पाठोपाठ मीसुद्धा ऐरावत हत्तीवर बसून नंदाच्या व्रजाचा नाश करण्यासाठी महापराक्रमी मरुद्गणांसह येत आहे. (७)
श्रीशुक उवाच -
इत्थं मघवताऽऽज्ञप्ता मेघा निर्मुक्तबन्धनाः । नन्दगोकुलमासारैः पीडयामासुरोजसा ॥ ८ ॥
इंद्रे आज्ञापिले मेघ सोडोनी बंधने तसे । व्रजी ते पातले सर्व मुसळधार वर्षले ॥ ८ ॥
इत्थं - याप्रमाणे - मघवता आज्ञप्ताः - इंद्राने आज्ञा दिलेले - निर्मुक्तबंधनाः मेघाः - व बंधनापासून मुक्त केलेले मेघ - ओजसा - जोराने - आसारैः - सरींनी - नंदगोकुलं पीडयामासुः - नंदाच्या गोकुळाला त्रस्त करिते झाले. ॥८॥
श्रीशुकदेव म्हणतात - इंद्राने अशी आज्ञा दिली आणि मेघांचे बंधन काढून घेतले. तेव्हा ते जोराने मुसळधार पाऊन पाडून नंदांच्या गोकुळाला पीडा देऊ लागले. (८)
विद्योतमाना विद्युद्भिः स्तनन्तः स्तनयित्नुभिः ।
तीव्रैर्मरुद्गणैर्नुन्ना ववृषुर्जलशर्कराः ॥ ९ ॥
चौदिशां चमके वीज टकरीं मेघ गर्जती । प्रचंड वादळा योगे गाराही पडु लागला ॥ ९ ॥
विद्युद्भिः विद्योतमानाः - विजांनी प्रकाशणारे - स्तनयित्नुभिः स्तनंतः - वज्राघातांनी गर्जणारे - तीव्रैः मरुद्गणैः नुन्नाः (ते) - भयंकर वार्यांनी प्रेरित असे ते मेघ - जलशर्कराः ववृषुः - गारांचा वर्षाव करिते झाले. ॥९॥
विजा चमकू लागल्या, ढग एकमेकांवर आपटून गडगडाट करू लागले आणि प्रचंड वार्याने ढकलले जाऊन मोठमोठ्या गारा पाडू लागले. (९)
स्थूणास्थूला वर्षधारा मुञ्चत्स्वभ्रेष्व-भीक्ष्णशः ।
जलौघैः प्लाव्यमाना भूः नादृश्यत नतोन्नतम् ॥ १० ॥
वरचेवर ती येती ढगांची दळ ती बहू । खांबाच्या परि त्या धारा भूमी ना कळते कशी ॥ १० ॥
अभीक्ष्णशः - एकसारख्या - अभ्रेषु स्थूणास्थूलाः - मेघ मुसळासारख्या जाड - वर्षधाराः मुञ्चत्सु - पर्जन्यधारा सोडीत असता - जलौघैः प्लाव्यमाना भूः - पाण्याच्या लोटांनी बुडू लागलेली पृथ्वी - नतोन्नतं न अदृश्यत - उंचसखल अशी दिसेना. ॥१०॥
अशा प्रकारे ढगांचे थव्यामागून थवे वारंवार येऊन खांबाएवढ्या पावसाच्या धारा पाडू लागले, तेव्हा व्रजभूमी पाण्याने भरून गेली आणि उंचसखल भाग दिसेनासे झाले. (१०)
अत्यासारातिवातेन पशवो जातवेपनाः ।
गोपा गोप्यश्च शीतार्ता गोविन्दं शरणं ययुः ॥ ११ ॥
मुसळधार वर्षा नी वार्याने पशु कंपले । त्रासले गोप गोपीही कृष्णाच्या पायि लागले ॥ ११ ॥
अत्यासारातिवातेन - अतिशय जोराच्या पर्जन्याने व सोसाटयाच्या वार्याने - जातवेपनाः पशवः - उत्पन्न झाले आहे कापरे ज्यांना असे पशू - शीतार्ताः - आणि थंडीने कुडकुडलेले - गोपाः गोप्यः च - गोप व गोपी ही - गोविंदं शरणं ययुः - कृष्णाला शरण गेली. ॥११॥
अतिवृष्टी आणि झंझावातामुळे जनावरे थरथर कापू लागली. तसेच गोपी-गोप थंडीने काकडून जाऊन श्रीकृष्णांना शरण गेले. (११)
शिरः सुतांश्च कायेन प्रच्छाद्या सारपीडिताः ।
वेपमाना भगवतः पादमूलमुपाययुः ॥ १२ ॥
मुसळधार वृष्टीने थंडीने त्रासता असे । डोके नी पुत्र झाकोनी कृष्णपायास लागले ॥ १२ ॥
आसारपीडिताः गावः - पावसाच्या सरीने पीडिलेल्या गाई - शिरः सुतान् च - डोके व वासरे यांना - कायेन प्रच्छाद्य - शरीराने आच्छादून - वेपमानाः - कापत - भगवतः पादमूलं उपाययुः - कृष्णाच्या चरणाजवळ आल्या. ॥१२॥
मुसळधार पावसाने जेरीस आल्यामुळे सर्वांनी आपापली मस्तके झुकवून आणि मुलांना पोटाशी घरून थरथर कापत ते भगवंतांच्या चरणांजवळ आले. (१२)
कृष्ण कृष्ण महाभाग त्वन्नाथं गोकुलं प्रभो ।
त्रातुमर्हसि देवान्नः कुपिताद् भक्तवत्सल ॥ १३ ॥
कृष्ण कृष्ण महाभागा तू नाथ गोकुलप्रभू । रक्षी तू इंद्रकोपात तुझ्या भाग्यी अम्ही सुखी ॥ १३ ॥
कृष्ण कृष्ण महाभाग - हे कृष्णा, हे उदार कृष्णा - प्रभो भक्तवत्सल - हे समर्था, हे भक्तांवर दया करणार्या - गोकुलं - गोकुळ हे - त्वन्नाथं (अस्ति) - तू आहे स्वामी ज्याचा असे आहे - कुपितात् देवात् - रागावलेल्या इंद्रापासून - नः त्रातुं अर्हसि - आमचे रक्षण करण्यास तू समर्थ आहेस. ॥१३॥
आणि म्हणाले, "कृष्णा ! कृष्णा ! प्रभो ! या गोकुळाचा स्वामी तूच आहेस. हे भक्तवत्सला ! इंद्राच्या क्रोधापासून आमचे रक्षण कर." (१३)
शिलावर्षानिपातेन हन्यमानमचेतनम् ।
निरीक्ष्य भगवान् मेने कुपितेन्द्रकृतं हरिः ॥ १४ ॥
गारा पाऊस मार्याने लोक मूच्छित होत हे । कृष्णाने पाहता सारे इंद्राचा कोप जाणिला ॥ १४ ॥
भगवान् हरिः - षड्गुणैश्वर्यसंपन्न कृष्ण - शिलावर्षनिपातेन - गारांच्या वर्षावाने - हन्यमानं (गोकुलं) - मरणोन्मुख झालेले गोकुळ - अचेतनं निरीक्ष्य - निश्चेष्ट झालेले पाहून ॥१४॥
भगवंतांनी पाहिले की, मुसळधार पाऊन आणि गारांच्या मार्याने व्याकूळ होऊन सर्वजण बेहोश होत आहेत. ही सर्व रागावलेल्या इंद्राचीच करामत आहे, हे त्यांना कळले. (१४)
अपर्त्त्वत्युल्बणं वर्षं अतिवातं शिलामयम् ।
स्वयागे विहतेऽस्माभिः इन्द्रो नाशाय वर्षति ॥ १५ ॥
मनात वदला कृष्ण इंद्राचा यज्ञ मोडिता । क्रोधला वर्षता ऐसा गारांचा मारही तसा ॥ १५ ॥
अपर्तुअत्युल्बणं - अकाली होणार्या अत्यंत भयाण अशा - अतिवातं - व ज्यामध्ये सोसाटयाचा वारा आहे - शिलामयं वर्षं - व अतिशय गारा पडत आहेत अशा पर्जन्याला - कुपितेन्द्रकृतं मेने - कोपलेल्या इंद्राची करणी मानिता झाला - अस्माभिः - आम्हांकडून - स्वयागे निहते - आपला यज्ञभंग झाला असल्यामुळे - इंद्रः (अस्माकम्) - इंद्र आमचा - नाशाय वर्षति - नाश करण्याकरिता पर्जन्य पाडीत आहे. ॥१५॥
आम्ही इंद्राचा यज्ञ बंद पाडला, म्हणूनच तो व्रजाचा नाश करण्यासाठी पावसाळा नसतानाही सोसाट्याचा वारा आणि प्रचंड गारांचा वर्षाव करीत आहे. (१५)
तत्र प्रतिविधिं सम्यग् आत्मयोगेन साधये ।
लोकेशमानिनां मौढ्याद् हनिष्ये श्रीमदं तमः ॥ १६ ॥
तयाचे योगमायेने ऐश्वर्यगर्व नष्टितो । मूर्खत्वे मानितो श्रेष्ठ देतो उत्तर त्या असे ॥ १६ ॥
तत्र आत्मयोगेन - तेव्हा आता स्वतःच्या योगबलाने - सम्यक् प्रतिविधिं साधये - चांगल्या रीतीचा प्रतिकार योजीन - मौढयात् - अज्ञानाने - लोकेशमानिनां (देवानाम्) - आपणच जगाचे स्वामी आहो असे मानणार्या देवांचा - श्रीमदं - संपत्तीच्या गर्वाने आलेला - तमः हरिष्ये - तमोगुण हरण करीन. ॥१६॥
ठीक आहे ! मी आपल्या योगमायेने याचा प्रतिकार करेन. स्वतःच्या मूर्खपणामुळे हे स्वतःला लोकपाल समजतात. यांचा हा ऐश्वर्याचा गर्व व अज्ञान मी आता नाहीसे करतो. (१६)
न हि सद्भावयुक्तानां सुराणामीशविस्मयः ।
मत्तोऽसतां मानभङ्गः प्रशमायोपकल्पते ॥ १७ ॥
सत्वप्रधान ते देव गर्व हा त्यांजला नको । सत्व जे त्यजिती त्यांच्या हितार्थ गर्व नष्टि मी ॥ १७ ॥
सद्भावयुक्तानां सुराणां - सद्भावाने युक्त अशा देवांना - ईशविस्मयः नहि - आपण ईश्वर आहो असा गर्व नसता - असतां मत्तः मानभंगः - दुर्जनांची माझ्याकडून होणारी मानहानी - प्रशमाय उपकल्पते - शांतीकरिताच असते. ॥१७॥
सत्त्वगुणी देवांना ऐश्वर्याचा अभिमान वाटता कामा नये. सत्त्वगुणांपासून च्युत झालेल्या देवांचा मी मानभंग करीन. यामुळे त्यांना शेवटी शांतीच मिळेल. (१७)
तस्मात् मच्छरणं गोष्ठं मन्नाथं मत्परिग्रहम् ।
गोपाये स्वात्मयोगेन सोऽयं मे व्रत आहितः ॥ १८ ॥
व्रजी आश्रित ते माझे रक्षिता मीच त्यांजला । संतांची करणे रक्षा माझे कार्य असे सदा ॥ १८ ॥
तस्मात् - याकरिता - मच्छरणं - मी ज्यांचा आधार आहे, - मन्नाथं - मी ज्यांचा स्वामी आहे - मत्परिग्रहं - व माझा ज्यांच्यावर अनुग्रह झाला आहे अशा - गोष्ठं - गोकुळाचे - स्वात्मयोगेन गोपाये - आपल्या योगसामर्थ्याने रक्षण करितो - सः अयं - तो हा - मे व्रतः आहितः - माझा संकल्पच केलेला आहे. ॥१८॥
हे गोकुळ माझे आश्रित आहे. मी याचा आपलेपणाने स्वीकार केला आहे आणि मीच याचा रक्षणकर्ता आहे. म्हणून मी आपल्या योगमायेने याचे रक्षण करीन. हे तर माझे व्रत आहे. (१८)
विवरण :- मागील अध्यायातील चौदाव्या श्लोकात (अस्तिचेदीश्वरः) श्रीकृष्णाला इंद्राचे अनीश्वरत्व सुचवावयाचे आहेच. कृष्ण पुढे म्हणतात, इंद्र फक्त मनुष्याने केलेल्या कर्माची फळे देतो, तो ईश्वर नाही. पण मूर्खपणामुळे निर्माण होणारा जो अहंकार, उन्मत्तपणा आहे, त्यामुळेच केवळ तो स्वतःला ईश्वर मानतो. (लोकेशमानिन्) त्याला आपण हविर्भाग न दिल्याने तो संतप्त झाला आहे. वास्तविक देव हे सत्त्वगुणांनी युक्त असल्याने ते शांत, क्षमाशील असतात; मात्र तमोगुणातून अज्ञान आणि अज्ञानातून अहंकार, क्रोध निर्माण होतो. इंद्र तमोगुणी असल्याने स्वतःला सर्वश्रेष्ठ देव मानण्याच्या अज्ञानातून त्याला अहंकार झाला. गोपांकडून हविर्भाग न मिळाल्याने तो त्यांचा नाश करावयास उद्युक्त झाला आहे; पण मी त्याचा अहंकार दूर करून गोपांचे रक्षण करतो. (१६-१८)
इत्युक्त्वैकेन हस्तेन कृत्वा गोवर्धनाचलम् ।
दधार लीलया कृष्णः छत्राकमिव बालकः ॥ १९ ॥
या परी वदुनी कृष्णे खेळणी परी तो गिरी । उचलोनी करीअं घेतो भूछत्र घेइ मूल जैं ॥ १९ ॥
इति उक्त्वा - असे बोलून - एकेन हस्तेन - एका हाताने - गोवर्धनाचलं कृत्वा - गोवर्धनपर्वत उचलून - बालकः कृष्णः - अल्पवयी कृष्ण - छन्नाकं इव - छत्रीच्या झाडाप्रमाणे - पर्वतम् लीलया दधार - पर्वताला लीलेने धरिता झाला. ॥१९॥
असे म्हणून श्रीकृष्णांनी सहजपणे एकाच हाताने गोवर्धन पर्वत उखडून लहान मुलाने पावसाळी छत्री हातात घ्यावी, तसा तो पर्वत वर धरला. (१९)
विवरण :- कृष्णाने केवळ एका हाताच्या आधारावर गोवर्धन पर्वत सात दिवस तोलून धरला. या काळात तो पूर्णपणे अविचल होता. बरोबरच आहे, कारण उपद्रव नष्ट करण्यास निश्चलताच हवी असते. (१९)
अथाह भगवान् गोपान् हेऽम्ब तात व्रजौकसः ।
यथोपजोषं विशत गिरिगर्तं सगोधनाः ॥ २० ॥
पुन्हा तो वदला बाबा ! माता जी ! व्रजवासिनो ! तुम्ही गोवर्धना खाली गो वत्सासह जा बसा ॥ २० ॥
अथ - नंतर - भगवान् - भगवान - गोपान् (गोपीःच) आह - गोपांना व गोपींना म्हणाला - हे अंब - हे माते - तात - हे ताता - व्रजौकसः - हे गोकुलवासी हो - सगोधनाः - गाईंसह - यथोपजोषं - सोईप्रमाणे - गिरिगर्तं विशत - पर्वताखाली शिरा. ॥२०॥
नंतर भगवान गोपांना म्हणाले, "आई, बाबा आणि व्रजवासियांनो ! तुम्ही आपल्या गुरांसह या पर्वताच्या खाली आरामात बसा." (२०)
न त्रास इह वः कार्यो मद्धस्ताद्रिनिपातने ।
वातवर्षभयेनालं तत्त्राणं विहितं हि वः ॥ २१ ॥
न शंका मुळे ती माना न पडे गिरि हातिचा । वारा नी पावसा मध्ये रक्षार्थ योजि मी असे ॥ २१ ॥
इह - याठिकाणी - यद्धस्ताद्रिनिपातने - माझ्या हातांतून पर्वत पडेल अशाविषयी - वः त्रासः न कार्यः - तुम्ही भीति बाळगू नका - वातवर्षभयेन अलं - वारा व पाऊस ह्यापासून भीति दूर करा - तत् वः त्राणं - ते आमचे त्यापासून रक्षण - विहितं - झाले आहे. ॥२१॥
माझ्या हातावरून हा पर्वत खाली पडेल अशी भीती बाळगू नका. आता वार्याची आणि पावसाची भिती नको. तुमच्या रक्षणासाठी मी ही युक्ती योजिली आहे. (२१)
तथा निर्विविशुर्गर्तं कृष्णाश्वासितमानसः ।
यथावकाशं सधनाः सव्रजाः सोपजीविनः ॥ २२ ॥
कृष्णे आश्वासिता ऐसे धाडसें गोप सर्व ते । गाड्या आश्रित नी भृत्य गोधना घेउनी सवे । पुरोहितां सवे आले खाली गोवर्धना तदा ॥ २२ ॥
तथा - त्याप्रमाणे - कृष्णाश्वासितमानसाः - कृष्णाने ज्यांच्या मनाला धीर दिला आहे असे - सधनाः सोपजीविनः - धनासह, परिवारासह आणि गाडे आदिकरून - सव्रजाः (गोपाः) - गोकुळांतील वस्तूंसह ते गोप - यथावकाशं गर्तं विविशुः - जागा मिळाली त्याप्रमाणे पर्वताखाली शिरले.॥२२॥
श्रीकृष्णांनी जेव्हा असा धीर दिला, तेव्हा सर्व गवळी आपापली गुरे, छकडे आणि परिवाराला आपल्याबरोबर घेऊन सोयीनुसार गोवर्धन पर्वताच्या खाली गेले. (२२)
क्षुत्तृड्व्यथां सुखापेक्षां हित्वा तैर्व्रजवासिभिः ।
वीक्ष्यमाणो दधावद्रिं सप्ताहं नाचलत् पदात् ॥ २३ ॥
कृष्णाने भूक तृष्णा नी विश्रांती त्यजुनी स्वयें । गिरी तो धरिला सात दिनी थोडा न हालता ॥ २३ ॥
तैः व्रजवासिभिः - त्या व्रजवासी जनांनी - क्षुत्तृड्व्यथां - भूक व तहान याची पीडा - सुखापेक्षां (च) हित्वा - व सुखाची इच्छा सोडून - वीक्ष्यमाणः (कृष्णः) - पाहिला जाणारा कृष्ण - सप्ताहं अद्रिं दधौ - सात दिवस पर्वत धरिता झाला - पदात् न अचलत् - एक पाऊलहि हालला नाही. ॥२३॥
सगळे व्रजवासी तहान-भुकेची व्यथा किंवा विश्रांतीची आवश्यकता विसरून श्रीकृष्णांकडेच पाहात राहिले. त्यांनी सलग सात दिवस तो पर्वत उचलून धरला. या दिवसांत एक पाऊलभरसुद्धा ते इकडे तिकडे हालले नाहीत. (२३)
विवरण :- श्रीकृष्णावर गोपांचे असलेले निरतिशय प्रेम व निस्संग भक्तिभाव इथे दिसतो. सात दिवस जागचे न हलता एका जागी स्थिर उभे रहाणे कृष्ण परमात्म्यास अगदी सहजशक्य . त्याने फायदा मात्र गोपांचा झाला. त्याच्या सतत मिळणार्या सहवासाने, सान्निध्याने जो निरतिशय आनंद सामान्य गोपांना मिळाला त्यामुळे ते आपली तहानभूक विसरून गेले. त्याचे दर्शनरूपी अमृतपान करण्याचे भाग्य त्यांना लाभले. श्रेष्ठ भक्तीचाच हा एक प्रकार म्हणायचा ! (२३)
कृष्णयोगानुभावं तं निशम्येन्द्रोऽतिविस्मितः ।
निःस्तम्भो भ्रष्टसङ्कल्पः स्वान् मेघान् संन्यवारयत् ॥ २४ ॥
कृष्णाच्या योगमायेने चकीत इंद्र जाहला । तर्कटी संपली सारी वर्षा थांबविली तये ॥ २४ ॥
अतिविस्मितः इंद्र - अत्यंत आश्चर्यचकित झालेला इंद्र - तं कृष्णयोगानुभावं निशम्य - ते कृष्णाचे योगसामर्थ्य पाहून - भ्रष्टसंकल्पः - ज्याची प्रतिज्ञा भग्न झाली आहे - निस्तंभः (भूत्वा) - व गेला आहे अभिमान ज्याचा असा होऊन - स्वान मेघान् संन्यवारयत् - आपल्या मेघांना निवारिता झाला. ॥२४॥
श्रीकृष्णांच्या योगमायेचा हा प्रभाव पाहून इंद्राच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. त्याचा संकल्प धुळीला मिळाला. त्यामुळे त्याचा गर्व जिरला. त्याने आपल्या मेघांना आवरले. (२४)
खं व्यभ्रमुदितादित्यं वातवर्षं च दारुणम् ।
निशम्योपरतं गोपान् गोवर्धनधरोऽब्रवीत् ॥ ॥
स्वच्छ आकाश ते झाले वारा ही थांबला तदा । दिसता सूर्य श्रीकृष्ण गोपांना वदला असे ॥ २५ ॥
गोवर्धनधरः (कृष्णः) - गोवर्धन पर्वत धारण करणारा कृष्ण - खं व्यभ्रं - आकाश निरभ्र - उदितादित्यं (दृष्टवा) - व उगवला आहे सूर्य ज्यात असे पाहून - दारुणं वातवर्षं च - आणि भयंकर वारा व पर्जन्य - उपरतं निशाम्य - नाहीसा झाला असे पाहून - गोपान् अब्रवीत् - गोपांना म्हणाला. ॥२५॥
ते भयंकर तुफान आणि घनघोर पाऊस पडणे बंद झाले असून सूर्यही दिसू लागला आहे, असे पाहून गोवर्धनधारी श्रीकृष्ण गोपांना म्हणाले. (२५)
निर्यात त्यजत त्रासं गोपाः सस्त्रीधनार्भकाः ।
उपारतं वातवर्षं व्युदप्रायाश्च निम्नगाः ॥ २६ ॥
गोपांनो निर्भये आता स्त्रिया गोधन बालके । सर्वांना घेउनी जावे ओसरे जल सर्व ते ॥ २६ ॥
सस्त्रीधनार्भकाः गोपाः - स्त्रिया, धन व बालके यांसह हे गोपहो - निर्यातत्रासं त्यजत - बाहेर पडा आणि दुःख टाकून द्या - वातवर्षं उपारतं - वारा व पर्जन्य नाहीसा झाला - निमग्नाः च - व नद्या गेले आहे पाणी ज्यातून - व्युदप्रायाः - अशा बहुतेक झाल्या. ॥२६॥
प्रिय गोपांनो ! आता तुम्ही निर्भयपणे आपल्या स्त्रिया, गोधन, मुले वगैरेंना घेऊन बाहेर या. पहा ! तुफान व पाऊस बंद झाला असून नद्यांचे पाणीसुद्धा ओसरले आहे. (२६)
ततस्ते निर्ययुर्गोपाः स्वं स्वमादाय गोधनम् ।
शकटोढोपकरणं स्त्रीबालस्थविराः शनैः ॥ २७ ॥
कृष्णाची ऐकुनी आज्ञा धेनू वत्स स्त्रिया मुले । वृद्धांना सह घेवोनी गाड्यांत सर्व वस्तुही । घेवोनी निघले सारे निवांत व्रजि पातले ॥ २७ ॥
ततः शनैः ते गोपाः - नंतर हळुहळु ते गोप - स्त्रीबालस्थविराः च - स्त्रिया, मुले व वृद्ध मनुष्ये - स्वं स्वं गोधनं - आपआपल्या गाई - शकटोढोपकरणं (च) - व गाडयांनी वाहण्याजोगे - आदाय - सर्व साहित्य घेऊन - निर्ययुः - बाहेर पडले ॥२७॥
तेव्हा ते गोप आपापले गोधन, स्त्रिया, मुले आणि वृद्ध यांना बरोबर घेऊन तसेच आपले सामान छकड्यांत ठेवून हळू हळू बाहेर आले. (२७)
भगवानपि तं शैलं स्वस्थाने पूर्ववत्प्रभुः ।
पश्यतां सर्वभूतानां स्थापयामास लीलया ॥ २८ ॥
शतिमान् भगवान् कृष्णे पाहता पाहता गिरी । पूर्ववत् ठेविला सर्वां समक्ष स्थानि लीलया ॥ २८ ॥
- प्रभुः भगवान् अपि - कृष्ण भगवान सुद्धा - सर्वभूतानां पश्यतां - सर्व लोक पाहत असता - लीलया - सहज रीतीने - तं शैलं - त्या पर्वताला - स्वस्थाने - त्याच्या मूळस्थानावर - स्थापयामास - ठेविता झाला. ॥२८॥
सर्वशक्तिमान भगवान श्रीकृष्णांनीसुद्धा सर्वांच्या देखत सहजपणे तो पर्वत त्याच्या जागेवर पूर्ववत ठेवला. (२८)
( मिश्र )
तं प्रेमवेगान् निभृता व्रजौकसो यथा समीयुः परिरम्भणादिभिः । गोप्यश्च सस्नेहमपूजयन् मुदा दध्यक्षताद्भिर्युयुजुः सदाशिषः ॥ २९ ॥
( इंद्रवज्रा ) ते गोप प्रेमें हृदयीं भरोनी धावोनी आले हरिच्या पदासी । धरी उराशी कुणि चुंबि कृष्णा आक्षौन केले मग गोपिकांनी ॥ २९ ॥
प्रेमवेगान् - प्रेमाच्या प्रवाहाने - निभृताः व्रजौकसः - पूर्ण भरलेले गोकुळवासी लोक - परिरंभणादिभिः - आलिंगनादिकांनी - तम् यथा (वत्) समीयुः - त्या कृष्णाला यथोचित भेटले - गोप्यः च - आणि गोपी - (तं) मुदा - त्याला हर्षाने - सस्नेहं अपूजयन् - व प्रेमाने पूजित्या झाल्या - दध्यक्षताद्भिः (च) - व दही, तांदूळ व जल यांनी - सदाशिषः युयुजुः - चांगले आशीर्वाद देत्या झाल्या. ॥२९॥
व्रजवासींची मने प्रेमावेगाने भरून आली होती. श्रीकृष्णांकडे धावतच येऊन कोणी त्यांना कडकडून मिठी मारली, तर कोणी त्यांचे चुंबन घेतले. वयस्कर गोपींनी अतिशय आनंदाने प्रेमपूर्वक दही, तांदूळ, पाणी इत्यादि घेऊन त्यांचा मंगलविधी केला आणि त्यांना शुभाशिर्वाद दिले. (२९)
( अनुष्टुप् )
यशोदा रोहिणी नन्दो रामश्च बलिनां वरः । कृष्णमालिङ्ग्य युयुजुः आशिषः स्नेहकातराः ॥ ३० ॥
( अनुष्टुप् ) यशोदा रोहिणी नंद बळाच्या बळिरामने । कृष्णाला हृदयी घेता आशिर्वाद दिले बहू ॥ ३० ॥
यशोदा रोहिणी नंदः - यशोदा, रोहिणी व नंद - बलिनां वरः रामः च - तसाच बलवानात श्रेष्ठ असा राम - स्नेहकातराः - प्रेमाने उत्सुक असे - कृष्णम् आलिंग्य - कृष्णाला आलिंगन देऊन - आशिषः युयुजुः - आशीर्वाद देते झाले. ॥३०॥
यशोदा, रोहिणी, नंद आणि बलवानांमध्ये श्रेष्ठ असे बलराम यांनी प्रेमविह्वल होऊन श्रीकृष्णांना हृदयाशी कवटाळून आशीर्वाद दिले. (३०)
दिवि देवगणाः सिद्धाः साध्या गन्धर्वचारणाः ।
तुष्टुवुर्मुमुचुस्तुष्टाः पुष्पवर्षाणि पार्थिव ॥ ३१ ॥
आकाशी स्थित ते देव गंधर्व सिद्ध चारण । कृष्णाची कीर्ति गावोनी फुलेही वर्षिले तदा ॥ ३१ ॥
पार्थिव - हे परीक्षित राजा - दिवि - स्वर्गात - देवगणाः - देवसमूह - साध्याः - तसेच साध्य - सिद्धगंधर्वचारणाः (च) - आणि सिद्ध, गंधर्व, चारण हे - तुष्टुवुः - स्तुती करते झाले - तुष्टाः च - व संतोषित होत्साते - वर्षाणि मुमुचुः - पुष्पवृष्टि करते झाले.॥३१॥
परीक्षिता ! त्यावेळी आकाशात आलेले देव, साध्य, सिद्ध, गंधर्व, चारण इत्यादिंनी प्रसन्न होऊन भगवंतांची स्तुती करीत त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. (३१)
शङ्खदुन्दुभयो नेदुर्दिवि देवप्रचोदिताः ।
जगुर्गन्धर्वपतयः तुंबुरुप्रमुखा नृप ॥ ३२ ॥
स्वर्गात देवतांनी त्या वाद्य ते वाजवीयले । गंधर्व तुंबरे गोड हरिच्या गायिल्या लिला ॥ ३२ ॥
नृप - हे परीक्षित राजा - दिवि - स्वर्गात - देवप्राणोदिताः शंखदुंदुभयः - देवांनी प्रेरिलेले शंख व दुंदुभी - नेदुः - वाजू लागले - तुंबरुप्रमुखाः - तुंबरु मुख्य आहे ज्यात - गंधर्वपतयः जगुः - असे मोठे गंधर्व गाउ लागले. ॥३२॥
राजन, स्वर्गामध्ये देव शंख आणि नौबती वाजवू लागले आणि तुंबरु इत्यादि गंधर्वराज गायन करू लागले. (३२)
( मिश्र )
ततोऽनुरक्तैः पशुपैः परिश्रितो राजन् स्वगोष्ठं सबलोऽव्रजद्धरिः । तथाविधान्यस्य कृतानि गोपिका गायन्त्य ईयुर्मुदिता हृदिस्पृशः ॥ ३३ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे पूर्वार्धे पञ्चविंशोऽध्यायः ॥ २५ ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
( इंद्रवज्रा ) व्रजी निघाले मग कृष्णदेव बाजूस होते बलराम गोप । त्या प्रेमिकांनी हरिगीत केले व्रजात आले बहु मोदि सारे ॥ ३३ ॥ ॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर पंचविसावा अध्याय हा ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
राजन् - हे राजा - ततः - नंतर - अनुरक्तैः - कृष्णावर प्रेम करणार्या - पशुपैः परिश्रितः - गोपांनी वेष्टिलेला - सबलः सः हरिः - बलरामासह तो श्रीकृष्ण - गोष्ठं अव्रजत् - गोकुळात गेला - मुदिताः गोपिकाः (च) - आणि आनंदित झालेल्या गोपिकाहि - अस्य (कृष्णस्य) - त्या कृष्णाची - हृदिस्पृशः - हृदयाला चटका लावणारी - तथाविधानि कृतानि - तशाप्रकारची कृत्ये - गायन्त्यः - गायन करीत - ईयुः - गोकुळात गेल्या. ॥३३॥
हे राजा ! नंतर श्रीकृष्ण, बलराम व प्रेमळ गोप यांच्यासह व्रजाकडे जावयास निघाले. त्यांच्याबरोबरच प्रेमळ गोपी आपले हृदय आकर्षित करणार्या भगवंतांच्या गोवर्धनधारण इत्यादि लीलांचे गायन करीत मोठ्या आनंदाने व्रजामध्ये परत आल्या. (३३)
अध्याय पंचविसावा समाप्त |