|
श्रीमद् भागवत पुराण चीरहरणलीला - वस्त्रहरण - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् ) हेमन्ते प्रथमे मासि नन्दव्रजकुमारिकाः । चेरुर्हविष्यं भुञ्जानाः कात्यायन्यर्चनव्रतम् ॥ १ ॥
( अनुष्टुप् ) श्रीशुकदेव सांगतात - हेमंती प्रथमो मासी नंदव्रजकुमारिका । हविष्यांन्नचि खावोनी कात्यायनिस पूजिती ॥ १ ॥
हेमंते - हेमंत ऋतूतील - प्रथमे मासि - पहिल्या महिन्यात म्हणजे मार्गशीर्षात - नंदव्रजकुमारिकाः - नंदाच्या गोकुळातील मुली - हविष्यं भुंजानाः - हविष्यान्न भक्षण करीत - कात्यायन्यर्चनव्रतं चेरुः - कात्यायनीचे पूजनरूप व्रत करित्या झाल्या. ॥१॥
श्रीशुकदेव म्हणतात - हेमंत ऋतूतील मार्गशीर्ष महिन्यात नंदांच्या व्रजातील कुमारी हविष्यान्न खाऊन कात्यायनी व्रत करू लागल्या. (१)
आप्लुत्याम्भसि कालिन्द्या जलान्ते चोदितेऽरुणे ।
कृत्वा प्रतिकृतिं देवीं आनर्चुः नृप सैकतीम् ॥ २ ॥
यमुनीं करिती स्नान पहाटे वाळुमूर्ति त्या । करोनी पूजिती गंधे धूप दीपादि पल्लवे ॥ २ ॥
नृप - हे परीक्षित राजा - च - आणि - उदिते अरुणे - अरुणोदय झाला असता - कालिंद्याः अंभसि आप्लुत्य - कालिंदीच्या जलांत स्नान करून - जलांते - पाण्याजवळ - सैकतीं प्रतिकृतिं कृत्वा - वाळूची मूर्ती करून - देवीं - देवीला - आनर्चुः - पूजित्या झाल्या. ॥२॥
राजा ! त्या अरुणोदय होत असतानाच यमुनेच्या पाण्यात स्नान करीत आणि तीरावर देवीची वाळूची मूर्ती तयार करून, (२)
गन्धैर्माल्यैः सुरभिभिः बलिभिर्धूपदीपकैः ।
उच्चावचैश्चोपहारैः प्रवालफल तण्डुलैः ॥ ३ ॥
तांदूळ फळ पुष्पांनी हार इत्यादि वस्तुने । यथासांग तिची ऐसी करिती अर्चना पुजा ॥ ३ ॥
गंधैः सुरभिभिः माल्यैः - गंध व सुवासिक फुले - धूपदीपकैः बलिभिः (च) - धूप, दीप व नैवेद्य यांनी - उच्चावचैः उपहारैः च - व लहानमोठया अर्पण करण्यायोग्य वस्तूंनी - प्रवालफलतण्डुलैः - कोवळी पाने, फळे व तांदुळ यांनी ॥३॥
सुगंधी चंदन, फुलांचे हार, निरनिराळ्या अन्नांचे नैवेद्य, धूप-दीप, लहान मोठ्या भेटवस्तू, पाने, फळे, तांदूळ इत्यादिंनी तिची पूजा करीत. (३)
कात्यायनि महामाये महायोगिन्यधीश्वरि ।
नन्दगोपसुतं देवि पतिं मे कुरु ते नमः । इति मन्त्रं जपन्त्यस्ताः पूजां चक्रुः कुमारिकाः ॥ ४ ॥
कात्यायनी महामाये महायोगिनि ईश्वरी । नंदगोपसुतो द्यावा पती तो देवि गे मला । मंत्र हा जापिता सार्या वंदिती देविला पहा ॥ ४ ॥
महामाये कात्यायनि - हे महामाये कात्यायनि - महायोगिनि अधीश्वरि - हे महासामर्थ्यवती श्रेष्ठ ईश्वरी - देवि - हे देवी - नंदगोपसुतं - नंदाचा मुलगा जो कृष्ण - मे पतिं कुरु - त्याला माझा पति कर - ते नमः - तुला नमस्कार असो - इति मंत्रं जपंत्यः - याप्रमाणे मंत्र जपणार्या - ताः कुमारिकाः - त्या कुमारिका. ॥४॥
त्याचबरोबर, "हे कात्यायनी ! हे महामाये ! हे महायोगिनी ! हे सर्वांच्या एकमात्र स्वामिनी ! नंदनंदनांना आमचा पती कर. देवी ! आम्ही तुला नमस्कार करतो." या मंत्राचा जप करीत त्या कुमारिका, देवीची आराधना करीत. (४)
एवं मासं व्रतं चेरुः कुमार्यः कृष्णचेतसः ।
भद्रकालीं समानर्चुः भूयान्नन्दसुतः पतिः ॥ ५ ॥
ओवाळिता जये जीव तयांनी एक हा पती । पूजिली देवि इच्छोनी श्यामसुंदर हा पती ॥ ५ ॥
एवं - याप्रमाणे - कृष्णचेतसः कुमार्यः - कृष्णाकडे चित्त आहे ज्यांचे अशा त्या मुली - मासं व्रतं चेरुः - महिनाभर व्रत करित्या झाल्या - नंदसुतः - नंदाचा मुलगा कृष्ण - पतिः भूयात् (इति उक्त्वा) - आमचा पति होवो असे म्हणून - भद्रकालीं समानर्चुः - भद्रकाली देवीची उत्तम पूजा करित्या झाल्या. ॥५॥
ज्यांचे मन श्रीकृष्णांना समर्पित झाले होते, अशा त्या कुमारींनी नंदनंदन पती व्हावेत म्हणून एक महिनाभर भद्रकालीदेवीची अतिशय चांगल्या रीतीने पूजा केली. (५)
ऊषस्युत्थाय गोत्रैः स्वैरन्योन्या बद्धबाहवः ।
कृष्णं उच्चैर्जगुर्यान्त्यः कालिन्द्यां स्नातुमन्वहम् ॥ ६ ॥
प्रतिदिनी अशा सर्व हातात हात घालुनी । मोठ्याने कृष्ण गावोनी येत स्नाना यमूनिशी ॥ ६ ॥
अन्वहं - प्रतिदिवशी - उषसि उत्थाय - पहाटे उठून - अन्योन्याबद्धबाहवः - एकमेकींचे धरिले आहेत हात ज्यांनी अशा त्या गोपकन्या - कालिन्द्यां स्नातुं यान्त्यः - यमुनेवर स्नानासाठी जात असता - स्वैः नामभिः - स्वतःच्या नावानी - कृष्णं उच्चैः जगुः - कृष्णाची उच्च स्वराने स्तुति करू लागल्या. ॥६॥
दररोज उषःकालीच त्या एकमेकींना हाका मारीत आणि एकेमेकींच्या हातात हात घालून उच्च स्वरात भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचे गायन करीत यमुनाजलात स्नान करण्यासाठी जात. (६)
नद्याः कदाचिदागत्य तीरे निक्षिप्य पूर्ववत् ।
वासांसि कृष्णं गायन्त्यो विजह्रुः सलिले मुदा ॥ ७ ॥
एकदा वस्त्र सोडोनी रोजच्या परि सर्व त्या । कृष्णाचे गीत गावोनी यमुनीं क्रीडु लागल्या ॥ ७ ॥
कदाचित् नद्यां आगत्य - एके दिवशी नदीवर आल्यावर - पूर्ववत् - पूर्वीप्रमाणे - तीरे वासांसि निक्षिप्य - नदीच्या तीरी नेसलेली वस्त्रे सोडून ठेऊन - कृष्णं गायंत्यः - कृष्णाची स्तुति गात - मुदा सलिले विजह्लुः - आनंदाने पाण्यात क्रीडा करू लागल्या. ॥७॥
दररोजप्रमाणे एके दिवशी सर्व मुली यमुनेच्या तटावर आपापली वस्त्रे ठेवून श्रीकृष्णांचे गुणगान करीत आनंदाने जलक्रीडा करू लागल्या. (७)
भगवान् तदभिप्रेत्य कृष्णो योगेश्वरेश्वरः ।
वयस्यैरावृतस्तत्र गतस्तत्कर्मसिद्धये ॥ ८ ॥
सनकादिक योग्यांचा कृष्ण योगेश्वरेश्वरो । सगोपाळबाळ तो गेला त्या वेळी यमुना तटी ॥ ८ ॥
योगेश्वरः - योगांचा अधिपति असा - भगवान् कृष्णः - भगवान श्रीकृष्ण - तत् अभिप्रेत्य - ते जाणून - वयस्यै वृतः - आपल्या सवंगडयासह - तत्कर्मसिद्धये - त्या मुलींच्या व्रताची सिद्धि करण्याकरिता - तत्र आगतः - त्याठिकाणी आला. ॥८॥
योगेश्वरांचे ईश्वर भगवान श्रीकृष्ण गोपींचे मनोगत जाणून ते सफल करण्यासाठी आपल्या मित्रांसह यमुनाकाठी गेले. (८)
तासां वासांस्युपादाय नीपमारुह्य सत्वरः ।
हसद्भिः प्रहसन् बालैः परिहासमुवाच ह ॥ ९ ॥
कृष्णाने गोपिकांचे ते वस्त्र सारेचि घेउनी । कदंबवृक्षि बैसोनी हासता बोलु लागला ॥ ९ ॥
तासां वासांसि उपादाय - त्यांची वस्त्रे घेऊन - सत्वरः नीपं आरुह्य - त्वरेने कदंबाच्या झाडावर चढून - बालैः सह प्रहसन् - बालकांसह हसत - परिहासं उवाच ह - थट्टेने बोलता झाला. ॥९॥
ते त्या मुलींची वस्त्रे उचलून लगबगीने एका कदंबाच्या झाडावर चढले. त्यांच्या बरोबरीचे गोपाळ खदखदा हसू लागले आणि स्वतः श्रीकृष्णसुद्धा त्यांची थट्टा करीत म्हणाले, (९)
अत्रागत्याबलाः कामं स्वं स्वं वासः प्रगृह्यताम् ।
सत्यं ब्रवाणि नो नर्म यद्यूयं व्रतकर्शिताः ॥ १० ॥
वदला गे कुमारिंनो येवोनी वस्त्र घेइजे । खरेच वदतो मी तो चेष्टा ना व्रत कायसे ॥ १० ॥
अबलाः - मुलींनो - कामं अत्र आगत्य - खरोखर येथे येऊन - स्वं स्वं वासः प्रगृह्यतां - आपापले वस्त्र घ्यावे - सत्यं ब्रवाणि - मी खरे सांगतो - नो नर्म - थट्टा नाही - यत् यूयं व्रतकर्शिताः - कारण तुम्ही व्रताने कृश झाल्या आहात. ॥१०॥
कुमारींनो ! येथे येऊन तुम्ही आपापली वस्त्रे खुशाल घेऊन जा. मी खरेच सांगतो, कारण व्रत करून तुम्ही खंगलात, म्हणून मी तुमची थट्टा नाही करीत. (१०)
न मयोदितपूर्वं वा अनृतं तदिमे विदुः ।
एकैकशः प्रतीच्छध्वं सहैवेति सुमध्यमाः ॥ ११ ॥
न कदा बोलतो खोटे हे माझे मित्र जाणती । एकेक वा समुहाने यावे चालेल ते मला ॥ ११ ॥
वा - खरोखर - मया - माझ्याकडून - अनृतं उदितपूर्वं न - खोटे पूर्वी बोलले गेले नाही - तत् इमे विदुः - ते हे गोपबालक जाणत आहेत - सुमध्यमाः - हे सुंदर मुलींनो - एकैकशः (आगत्य) प्रतीच्छध्वं - तुम्ही एकएकटया येऊन वस्त्रे घ्या - उत सह एव - किंवा समागमे येऊन घ्या. ॥११॥
मी यापूर्वी कधीच खोटे बोललो नाही. हे माझे मित्र जाणतातच. सुंदरींनो ! तुम्ही एकेकट्या येऊन आपापले वस्त्र घेऊन जा किंवा सगळ्या जणी एकदम या. (११)
तस्य तत् क्ष्वेलितं दृष्ट्वा गोप्यः प्रेमपरिप्लुताः ।
व्रीडिताः प्रेक्ष्य चान्योन्यं जातहासा न निर्ययुः ॥ १२ ॥
हृदये चिंबली प्रेमे रेशमी हास्य पाहता । संकोचे हासल्या आणि पाहती एकमेकिते ॥ १२ ॥
प्रेमपरिप्लुताः गोप्यः - प्रेमरसात निमग्न झालेल्या गोपी - तस्य तत् - त्याची ती - क्ष्वेलितं दृष्टवा - थट्टा पाहून - व्रीडिताः जातहासाः च - आणि लज्जित होऊन हसणार्या त्या - अन्योन्यं प्रेक्ष्य - एकमेकींकडे पाहून - न निर्ययुः - बाहेर पडल्या नाहीत. ॥१२॥
भगवंतांची ही थट्टा पाहून गोपींची मने प्रेमाने ओथंबून गेली. त्या लाजला आणि एकमेकींकडे पाहून हसू लागल्या. पण पाण्याबाहेर आल्या नाहीत. (१२)
एवं ब्रुवति गोविन्दे नर्मणाऽऽक्षिप्तचेतसः ।
आकण्ठमग्नाः शीतोदे वेपमानास्तमब्रुवन् ॥ १३ ॥
हासुनी बोलता कृष्णे विनोदे चित्त वेधिले । कुमारिका जलामध्ये आकंठ थर्रर् कांपती ॥ १३ ॥
एवं ब्रुवति गोविंदे - याप्रमाणे श्रीकृष्ण म्हणाला असता - नर्मणा आक्षिप्तचेतसः - उपहासाने ज्यांचे अंतःकरण विरघळले आहे अशा - शीतोदे आकंठमग्नाः - थंड पाण्यात गळ्यापर्यंत बुडालेल्या - वेपमानाः तं अब्रुवन् - कापत कापत कृष्णाला म्हणाल्या. ॥१३॥
श्रीकृष्ण जेव्हा असे म्हणाले, तेव्हा त्यांनी केलेल्या विनोदाने कुमारींचे चित्त आणखीनच त्यांच्यकडे आकर्षित झाले. थंड पाण्यात गळ्यापर्यंत बुडालेल्या त्यांची शरीर थंडीने थर थर कापत होती. त्या श्रीकृष्णांना म्हणाल्या, (१३)
मानयं भोः कृथास्त्वां तु नन्दगोपसुतं प्रियम् ।
जानीमोऽङ्ग व्रजश्लाघ्यं देहि वासांसि वेपिताः ॥ १४ ॥
वदल्या कृष्ण कान्हा रे नंदलाला न हे करी । प्रिया रे सर्व ते गोप तुजलागी प्रशंसिती । थंडीत काकडो आम्ही आमुचे वस्त्र दे हरि ॥ १४ ॥
भो - हे कृष्णा - अनयं मा कृथाः - अन्याय करू नकोस - अंग - अरे - त्वां तु - तुला तर - व्रजश्लाघ्यं - गोकुळाला स्तुत्य असा - गोपसुतं - नंदाचा आवडता मुलगा - जानीमः - आम्ही जाणतो - वासांसि देहि - वस्त्रे दे - वयं वेपिताः (स्मः) - आम्ही कांपत आहो. ॥१४॥
हे प्रिय श्रीकृष्णा ! तू असा अन्यायाने वागून नकोस. तू नंदबाबांचा लाडका आहेस, हे आम्हांला माहीत आहे. व्रजवासीयांचाही तू आवडता आहेस. आम्ही थंडीने कुडकुडत आहोत. आमची वस्त्रे दे ना ! (१४)
श्यामसुन्दर ते दास्यः करवाम तवोदितम् ।
देहि वासांसि धर्मज्ञ नो चेद् राज्ञे ब्रुवाम हे ॥ १५ ॥
जे कांही वदसी तूं ते करण्या मानितो अम्ही । दासी आम्ही तुझ्या सार्या धर्मज्ञ श्यामसुंदरा । न त्रासी वस्त्र दे अम्हा न तो नंदास सांगु हे ॥ १५ ॥
श्यामसुंदर - हे श्यामवर्णाच्या रमणीयमूर्ते - (वयं) ते दास्यः - आम्ही तुझ्या दासी आहो - तव उदितं करवाम - तू सांगितलेले आम्ही करू - धर्मज्ञ वासांसि देहि - हे धर्म जाणणार्या कृष्णा, वस्त्रे दे - नो चेत् (ददासि तर्हि) - जर न देशील तर - राज्ञे ब्रुवामहे - आम्ही राजाला सांगू. ॥१५॥
हे श्यामसुंदरा ! आम्ही तुझ्या दासी आहोत. तू म्हणशील, ते आम्ही करू. तुला धर्म चांगला माहीत आहे. आमची वस्त्रे आम्हांला दे. नाहीतर आम्ही नंदबाबांना सांगू. (१५)
श्रीभगवानुवाच -
भवत्यो यदि मे दास्यो मयोक्तं वा करिष्यथ । अत्रागत्य स्ववासांसि प्रतीच्छन्तु शुचिस्मिताः ॥ १६ ॥
श्रीभगवान म्हणाले - पवित्र हास्य प्रेमाचे मुलिंनो तुमचे असे । दासिंनी पाळणे आज्ञा न्यावे वस्त्र इथोनिया ॥ १६ ॥
शुचिस्मिताः - हे पवित्र हास्य करणार्या कुमारिकांनो - यदि भवत्यः मे दास्यः - जर तुम्ही माझ्या दासी आहात - वा मया उक्तं करिष्यथ - आणि मी जे सांगेन ते करणार्या आहात - अत्र आगत्य - ह्या ठिकाणी येऊन - स्ववासांसि प्रतीच्छध्वं - आपापली वस्त्रे घेऊन जा. ॥१६॥
श्रीभगवान म्हणाले - "निरागस हसणार्या मुलींनो ! तुम्ही स्वतःला माझ्या दासी म्हणवता आणि मी सांगेन ते करू इच्छिता. तर मग येथे येऊन आपापली वस्त्रे घेऊन जा, म्हणजे झाले !" (१६)
विवरण :- यमुनेच्या तीरावर वस्त्रे उतरवून ठेऊन तिच्या जलात स्नान करणार्या गोपींची वस्त्रे उचलून कृष्णाने कदंब वृक्षावर ठेवली. गोपींनी देण्याची विनंती केली, तरी त्याने वस्त्रे दिली नाहीत. मग गोपींनी साम-दाम-दंड-भेद या नीतीचा अवलंब केला. आधी गोडीगुलाबी, नंतर स्तुति करून त्याला चुचकारले, 'आम्ही तुझ्या दासी आहोत.' असे सांगितले; शेवटी धमकीही दिली, 'बघ हं ! नाहीतर आता आम्ही राजाला सांगू.' इथे प्रश्न असा की, राजा म्हणजे कोण ? नंद ? की कंस ? राजा म्हणजे कंसही होऊ शकतो; कारण राजा तोच होता. पण गोपींच्या दृष्टीने नंदही राजा होऊ शकतो; कारण तो गोकुळातला प्रतिष्ठित होता, श्रेष्ठ होता. शिवाय कृष्ण त्याचा मुलगा होता. ('बाबांना सांगीन हं तुझं नाव !' असे आजही आपण ऐकतोच.) गोपी कंसाची भीती कृष्णाला घालतील असे वटत नाही, कारण दोघांचे संबंध त्या जाणून होत्या. 'राजाला सांगीन.' ही एक म्हणायची पद्धत (शाकुंतलाच्या पहिल्या अंकातही शकुंतलेला तिच्या सख्या अशाच प्रकारची तक्रार ऐकून राजाला सांग.' असे म्हणतात.) गोपींचे कृष्णावर निरतिशय प्रेम होते. पति म्हणून तोच त्यांना हवा होता. हे भांडण प्रेमाचे होते. वरवरचे होते. (शिवाय अशा (विवस्त्र) अवस्थेत त्या पाण्याबाहेर येऊन इतर कोणाला बोलावूहि शकत नव्हत्या.) त्यामुळे राजाला सांगण्याची धमकी लटकी होती, असेच दिसून येते. पण कृष्णाने मात्र तसा अर्थ घेतला असावा. तो त्यांना शब्दात पकडतो, 'दासी आहात ना ? मग माझी आज्ञा ऐका. इकडे या व वस्त्रे घ्या. नाहीतर मिळणार नाहीत. राजा माझे काय करणार आहे ?' यावरून कृष्णाला कंस हाच राजा असा अर्थ अभिप्रेत असावा. शिवाय 'त्याला तर मीच मारणार आहे. तो काय मला करतो ?' असाही सुप्त आशय असावा. (१४-१६)
ततो जलाशयात् सर्वा दारिकाः शीतवेपिताः ।
पाणिभ्यां योनिमाच्छाद्य प्रोत्तेरुः शीतकर्शिताः ॥ १७ ॥
परीक्षित् मुलि त्या सार्या थंडीने कांपती पहा । दो हाते गुप्त अंगाला झाकता त्या जळातुनी । बाहेर पातल्या तेंव्हा थंडीने त्रासल्या वहू ॥ १७ ॥
ततः सर्वाः दारिकाः - तदनंतर सर्व कुमारिका - शीतवेपिताः शीतकार्षिकाः - थंडीने कापरे सुटलेल्या व थंडीने कृश झालेल्या - पाणिभ्यां योनिं आच्छाद्य - दोन्ही हातांनी गुह्यांगे झाकून - जलाशयात् प्रोत्तेरुः - डोहातून बाहेर उतरल्या. ॥१७॥
तेव्हा सर्व कुमारी थंडीने कुडकुडत दोन्ही हातांनी गुप्तांग झाकून, यमुनेच्या बाहेर आल्या. त्यावेळी थंडी त्यांना अतिशय सतावीत होती. (१७)
भगवानाहता वीक्ष्य शुद्ध भावप्रसादितः ।
स्कन्धे निधाय वासांसि प्रीतः प्रोवाच सस्मितम् ॥ १८ ॥
भाव तो शुद्ध पाहोनी प्रसन्न जाहला हरि । गोपिंचे वस्त्र तें खांदी ठेवोनी कृष्ण बोलला ॥ १८ ॥
शुद्धभावप्रसादितः भगवान् - निर्मल भक्तीने प्रसन्न झालेला श्रीकृष्ण - आहताः वीक्ष्य - अक्षतयोनि अशा त्यांना पाहून - प्रीतः - संतुष्ट झालेला - स्कंधे वासांसि निधाय - खांद्यावर वस्त्रे ठेऊन - सस्मितं प्रोवाच - हसत म्हणाला. ॥१८॥
त्यांच्या या शुद्ध भावाने भगवान अतिशय प्रसन्न झाले. त्या आपल्याजवळ आल्याचे पाहून त्यांची वस्त्रे त्यांनी आपल्या खांद्यावर ठेवली आणि प्रसन्नतेने हसत हसत म्हणाले, (१८)
( मिश्र )
यूयं विवस्त्रा यदपो धृतव्रता व्यगाहतैतत् तदु देवहेलनम् । बद्ध्वाञ्जलिं मूर्ध्न्यपनुत्तयेंऽहसः कृत्वा नमोऽधो वसनं प्रगृह्यताम् ॥ १९ ॥
( इंद्रवज्रा ) विवस्त्र होता तुम्हि स्नान केले कालिंदि तैसे वरुणास तुम्ही । न मानिले हा अपराध झाला जोडा तयांना कर, वस्त्र देतो ॥ १९ ॥
यत् यूयं धृतव्रताः (सत्यः) - ज्यापेक्षा तुम्ही व्रत आचरण करणार्या असून - विवस्त्राः अपः व्यगाहतः - नग्न होऊन पाण्यात स्नान केले - तत् उ एतत् - त्यापेक्षा खरोखर हे - देवहेलनं (जातम्) - खरोखर देवांचे विडंबन झाले आहे - अंहसः अपनुत्तये - या पापाच्या क्षालनाकरिता - मूर्ध्नि अंजलिं बद्ध्वाः - मस्तकावर हात जोडून - अधः नमः कृत्वा - खाली वाकून नमस्कार करून - वसनं प्रगृह्यतां - वस्त्रे घ्यावी. ॥१९॥
अग मुलींनो ! तुम्ही व्रतस्थ अवस्थेत विवस्त्र होऊन या पाण्यामध्ये स्नान केलेत, त्यामुळे जलदेवता वरूण आणि यमुना नदी यांची अवहेलना झाली आहे. म्हणून या दोघांचे निवारण करण्यासाठी तुम्ही आपले हात मस्तकावर जोडून लवून त्यांना नमस्कार करा आणि नंतर आपापली वस्त्रे घ्या. (१९)
( इंद्रवंशा )
इत्यच्युतेनाभिहितं व्रजाबला मत्वा विवस्त्राप्लवनं व्रतच्युतिम् । तत्पूर्तिकामास्तदशेषकर्मणां साक्षात्कृतं नेमुरवद्यमृग् यतः ॥ २० ॥
खरेचि वाटे मनि त्या मुलिंच्या विवस्त्र न्हाता व्रतभंग झाला । कृष्णासि त्यानी नमिले करांनी त्रुटी व्रताच्या हरि हा निवारी ॥ २० ॥
इति अच्युतेन अभिहितं - याप्रमाणे कृष्णाने सांगितलेले - विवस्त्राप्लवनं - नग्न होऊन स्नान करणे हे - व्रतच्युतिं मत्वा - व्रतापासून भ्रष्ट होणे आहे असे मानून - तत्पूर्तिकामाः - ते व्रत पूर्ण करण्याची इच्छा करणार्या त्या मुली - तदशेषकर्मणां - त्या व इतर सर्व कर्मांचा - साक्षात्कृतं - प्रत्यक्ष दिसणार्या श्रीकृष्णाला - नेमुः - नमस्कार करित्या झाल्या - यतः (सः) अवद्यमृक् (अस्ति) - कारण तो कृष्ण पापांचे क्षालन करणारा होय. ॥२०॥
हे श्रीकृष्णांचे म्हणणे ऐकून त्या व्रजकुमारींना विवस्त्र होऊन स्नान केल्याने आपल्या व्रतात उणीव राहिली, असे वाटले. म्हणून त्याच्या पूर्ततेसाठी त्यांनी सर्व कर्मांचे साक्षी असणार्या श्रीकृष्णांना नमस्कार केला; कारण पापांचे परिमार्जन करणारे तेच आहेत. (२०)
( अनुष्टुप् )
तास्तथावनता दृष्ट्वा भगवान् देवकीसुतः । वासांसि ताभ्यः प्रायच्छत् कत्करुणस्तेन तोषितः ॥ २१ ॥
( अनुष्टुप् ) नमिती हात जोडोनी आज्ञेनुसार सर्व त्या । हृदयी करुणा दाटे कृष्णे वस्त्रे दिली तयां ॥ २१ ॥
ताः - त्यांना - तथा अवनताः दृष्टवा - ह्याप्रमाणे खाली वाकून नम्र झालेल्या असे पाहून - भगवान् देवकीसुतः - देवकीचा पुत्र भगवान श्रीकृष्ण - तेन तोषितः करुणः - त्या कृत्याने संतोषित झालेला व कृपायुक्त असा - ताभ्यः वासांसि प्रायच्छत् - त्यांना वस्त्रे देता झाला. ॥२१॥
भगवान श्रीकृष्ण त्यांनी नमस्कार केलेला पाहून प्रसन्न झाले. त्यांची करुणा येऊन त्यांनी त्यांना वस्त्रे देऊन टाकली. (२१)
( मिश्र )
दृढं प्रलब्धास्त्रपया च हापिताः प्रस्तोभिताः क्रीडनवच्च कारिताः । वस्त्राणि चैवापहृतान्यथाप्यमुं ता नाभ्यसूयन् प्रियसङ्गनिर्वृताः ॥ २२ ॥
( इंद्रवज्रा ) छेडून त्यांना बहू कृष्ण बोले संकोच सोडोनिहि नाचविल्या । वस्त्रे तयांची हरिली तयाने तयात त्यांना बहु मोद झाला ॥ २२ ॥
दृढं प्रलब्धाः - अत्यंत फसवलेल्या - त्रपया च हापिताः - आणि लज्जेने निर्भर्त्सलेल्या - क्रीडनवत् च कारिताः - आणि खेळातील बाहुल्याप्रमाणे वागविलेल्या - च एव - शिवाय आणखी - वस्त्राणि अपहृतानि - वस्त्रे हरण केलेल्या - प्रियसंगनिर्वृताः - आणि प्रियकराच्या भेटीने आनंदित झालेल्या - अथ अपि ताः - अशाही त्या - अमुं न अभ्यसूयन् - ह्या श्रीकृष्णाचा मत्सर करित्या झाल्या नाहीत. ॥२२॥
श्रीकृष्ण कुमरींना टोचून बोलले, त्यांनी त्यांना लाज सोडायला लावली, त्यांची थट्टा केली आणि कठपुतळ्यांप्रमाणे त्यांना नाचविले, इतकेच काय त्यांची वस्त्रेसुद्धा हरण केली. तरीसुद्धा त्या त्यांच्यावर रागावल्या नाहीत. उलट प्रियतमाच्या भेटीने प्रसन्नच झाल्या. (२२)
( अनुष्टुप् )
परिधाय स्ववासांसि प्रेष्ठसङ्गमसज्जिताः । गृहीतचित्ता नो चेलुः तस्मिन् लज्जायितेक्षणाः ॥ २३ ॥
( अनुष्टुप् ) सार्यांनी नेसली वस्त्रे परी त्या वशल्या अशा । लाजोनी पाहती कृष्णा सजल्या त्या समागमा ॥ २३ ॥
प्रेष्ठसंगमसज्जिताः - अत्यंत प्रिय अशा श्रीकृष्णाच्या संगमासाठी सिद्ध असलेल्या - गृहीतचित्ताः - व त्याने आकर्षिले आहे चित्त ज्यांचे अशा त्या - तस्मिन् लज्जावितेक्षणाः - त्याच्याकडे लज्जायुक्त नेत्रांनी पाहणार्या अशा - वासांसि परिधाय - वस्त्रे नेसून - (तत्) नो चेलुः - तेथून हलल्या नाहीत. ॥२३॥
गोपींनी आपापली वस्त्रे परिधान केली; परंतु श्रीकृष्णांनी त्यांचे चित्त असे हिरावून घेतले होते की, त्या तेथून एक पाऊलही पुढे जाऊ शकल्या नाहीत. आपल्या प्रियतमाच्या सहवासासाठी तयार होऊन त्या त्यांच्याकडे लाजलेल्या नजरांनी पाहात राहिल्या. (२३)
तासां विज्ञाय भगवान् स्वपादस्पर्शकाम्यया ।
धृतव्रतानां सङ्कल्पं आह दामोदरोऽबलाः ॥ २४ ॥
कळले हरिला चित्ती इच्छिती पदस्पर्श या । उखळा बद्ध जो होता तो हरी वदला तयां ॥ २४ ॥
स्वपादस्पर्शकाम्यया - आपल्या चरणसेवेच्या इच्छेने - धृतव्रतानां तासां - धारण केले आहे ज्यांनी अशा त्या गोपींचा - संकल्पं विज्ञाय - मनातील विचार जाणून - भगवान् दामोदरः - भगवान श्रीकृष्ण - अबलाः आह - त्या स्त्रियांना म्हणाला. ॥२४॥
आपल्या चरणकमलांच्या स्पर्शाची अभिलाषा धरूनच त्या कुमारींनी हे व्रत केले आहे, हे जाणून भगवान त्यांना म्हणाले, (२४)
सङ्कल्पो विदितः साध्व्यो भवतीनां मदर्चनम् ।
मयानुमोदितः सोऽसौ सत्यो भवितुमर्हति ॥ २५ ॥
प्रेयसिंनो ! पुजा झाली इच्छिता तेहि जाणि मी । संकल्प करितो पूर्ण पूजा ती शकता करू ॥ २५ ॥
साध्व्यः - अहो चांगल्या मुलींनो - भवतीनां मदर्चनं संकल्पः - तुमचा माझी सेवा करण्याविषयीचा संकल्प - मया विदितः - मला समजला - अनुमोदितः (च) - आणि मला संमतही झाला - सः असौ - तो हा संकल्प - सत्यः भवितुं अर्हति - खरा होण्यास योग्य आहे. ॥२५॥
कुमारींनो ! तुम्ही माझी पूजा करू इच्छिता, हा तुमचा संकल्प मी जाणला. तुमच्या या इच्छेला माझी संमती आहे. तुमचा हा संकल्प पूर्ण होईल. (२५)
विवरण :- वास्तविक ज्या पद्धतीने श्रीकृष्णाने गोपींची वस्त्रे हरण केली, त्यांना व्रतभंगाची भीती दाखवली, हात जोडून नमस्कार करावयास लावला, अगदी एखाद्या खेळण्याप्रमाणे खेळविले, त्यामुळे गोपींना राग यायला हवा होता. पण तो तसा आला नाही. त्याला एकच कारण, कृष्णावरचे आत्यंतिक प्रेम, निस्संग भक्ती. त्यामुळे अगदी त्याने त्यांना शाप दिला असता तरी त्यांना त्यात काहीच वावगे दिसले नसते. आपणांसमोर तो उभा आहे, आपल्याशी बोलतो आहे, या एकाच गोष्टीचे त्यांना विलक्षण अप्रूप होते. तो पति म्हणून मिळावा हे तर त्यांच्या जीवनाचे साध्य, उद्दिष्ट होते. त्यासाठी तर त्यांनी व्रत केले होते. वस्त्रे परत मिळाल्यावरहि तिथून लगेच परत न जाता त्याच्याकडे पहात त्या बराच काळ रेंगाळत राहिल्या. शिवाय जेव्हा मनातील भावना, वासना, संकल्प व संस्कार यांचे आवरण दूर होते, तेव्हाच आत्मानंद प्राप्त होतो. आवरण-भंगाशिवाय रसास्वाद, रसोपलब्धी नाही. म्हणूनच तर ते चीरहरण. कृष्णाने गोपींच्या मनातील लज्जा, शंका, संकोच इ.चे आवरण दूर केले. त्याचाच उपहार म्हणून त्यांना त्याचेसह 'रासलीला' करण्याचे भाग्य लाभले. कदाचित भगवंताना गोपींना 'अद्वैताचाहि' प्रत्यय द्यावयाचा असेल. 'द्वैत' दुःखाचे कारण. त्याची पूर्ण निवृत्ती झाली तरच श्रीहरिची प्राप्ती होते. गोपी कृष्णमय आणि कृष्ण गोपीमय झाल्याशिवाय हे शक्य झाले नसते. (२५)
न मय्यावेशितधियां कामः कामाय कल्पते ।
भर्जिता क्वथिता धाना प्रायो बीजाय नेशते ॥ २६ ॥
मला जे अर्पिती चित्त तयांची वासना जळे । भाजिल्या त्या बिजां ना जैं अंकूर फुटती कधी ॥ २६ ॥
मयि - माझ्या ठिकाणी - आवेशितधियां कामः - लाविले आहे चित्त ज्यांनी अशा त्यांची इच्छा - कामाय न कल्पते - विषयभोगासाठी नसते - भर्जिता क्वथिता धाना - भाजलेले किंवा शिजवलेले धान्य - प्रायः बीजाय न इष्यते - बहुधा बियांसाठी उपयोगाला येत नाही. ॥२६॥
ज्यांनी आपली बुद्धी मला समर्पित केली, त्यांची कामना त्यांना सांसारिक भोगांकडे नेण्यास असमर्थ असते. जसे भाजलेले किंवा उकळलेले बी पुन्हा उगवू शकत नाही. (२६)
याताबला व्रजं सिद्धा मयेमा रंस्यथा क्षपाः ।
यदुद्दिश्य व्रतमिदं चेरुरार्यार्चनं सतीः ॥ २७ ॥
जावे आता घरा तुम्ही साधना पूर्ण जाहली । येणार्या शरदामध्ये रात्री माझ्या सवे पहा । क्रीडताल सतींनो गे व्रतसाफल्य जाहले ॥ २७ ॥
यत् उद्दिश्य - जे उद्देशून - सतीः - हे चांगल्या मुलींनो - इदं आर्यार्चनं व्रतम् - हे देवी कात्यायनीचे पूजन ज्यात आहे असे व्रत - भवत्यः चेरुः - तुम्ही आचरिले - अबलाः - मुलींनो - सिद्धाः (यूयम्) - सिद्ध मनोरथ झालेल्या अशा तुम्ही - व्रजं यात - गोकुळात जा - इमाः क्षपाः - ह्या पुढे येणार्या रात्रीच्या वेळी - मया रंस्यथ - माझ्या समागमे रममाण व्हाल. ॥२७॥
म्हणून मुलींनो ! आता तुम्हा आपापल्या घरी जा. तुमची साधना सिद्धझाली आहे. पुढे येणार्या शरद ऋतूच्या रात्री तुम्ही माझ्याबरोबर विहार कराल. सतींनो ! याच उद्देशाने तुम्ही हे व्रत आणि कात्यायनी देवीची पूजा केली होती ना ? (२७)
श्रीशुक उवाच -
इत्यादिष्टा भगवता लब्धकामाः कुमारिकाः । ध्यायन्त्यस्तत् पदाम्भोजं कृच्छ्रात् निर्विविशुर्व्रजम् ॥ २८ ॥
श्रीशुकदेव सांगतात - परीक्षित् भगवंताची आज्ञा ही मिळता सती । पादपद्म हरीचे ते स्मरता व्रजि पातल्या ॥ २८ ॥
इति भगवता आदिष्टाः - याप्रमाणे श्रीकृष्णाने आज्ञा दिलेल्या - लब्ध कामाः कुमारिकाः - मनोरथ पूर्ण झालेल्या कुमारिका - तत्पदांभोजं ध्यायंत्यः - त्या श्रीकृष्णाच्या चरणकमलांचे ध्यान करीत - कृच्छ्रात् व्रजं निर्विविशुः - मोठया कष्टाने गोकुळात गेल्या. ॥२८॥
श्रीशुकदेव म्हणतात - इच्छा पूर्ण झालेल्या त्या कुमारिका भगवंतांच्या आज्ञेने त्यांच्या चरणकमलांचे ध्यान करीत, जाण्याची इच्छा नसतानाही, कशाबशा व्रजामध्ये गेल्या. (२८)
अथ गोपैः परिवृतो भगवान् देवकीसुतः ।
वृन्दावनाद् गतो दूरं चारयन् गाः सहाग्रजः ॥ २९ ॥
एकदा भगवान् कृष्ण बळीराम नि बाळ ते । दूर वृंदावनी गेले चाराया गाइ आपुल्या ॥ २९ ॥
अथ - नंतर - गोपैः परिवृतः - गोपांनी वेष्टिलेला असा - सहाग्रजः देवकीसुतः भगवान् - वडील भावांसह देवकीचा मुलगा श्रीकृष्ण - गाः चारयन् - गाई चारीत - वृंदावनात् दूरं गतः - वृंदावनापासून दूर गेला. ॥२९॥
एके दिवशी भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि गोपालांसह गाई चारीत, वृंदावनापासून खूप दूर गेले. (२९)
विवरण :- कात्यायनी व्रत करण्यामागे कृष्णच आपला पति म्हणून असावा, अशी गोपींची इच्छा कृष्णाने जाणली होती. मग हे अयोग्य का ? आपल्याविषयीची त्यांची ही इच्छा, विषयभोगसंकल्प पुन्हा संसारात लिप्त करण्यास कारणीभूत होणार नाही, उलट मुक्ती देणारीच असेल, अशी कृष्णाची खात्री होती. तसे त्याने गोपींना सुचविलेही. (कामनेने जगाची उत्पत्ति होते; पण निष्काम भावनेने केलेली विषयोपभोगांची कामना स्वतःच निष्काम होऊन जाते.) (२९)
निदघार्कातपे तिग्मे छायाभिः स्वाभिरात्मनः ।
आतपत्रायितान् वीक्ष्य द्रुमानाह व्रजौकसः ॥ ३० ॥
ग्रिष्माचा तापला सूर्य परी दाटचि मेघ ते । श्रीकृष्णावरि ते नित्य छत्र होवोनि राहती ॥ ३० ॥
तिग्मे निदाघार्कातपे - प्रखर अशा उन्हाळ्यातील सूर्याच्या उन्हामध्ये - स्वाभिः छायाभिः - आपल्या छायांनी - आत्मनः आतपत्रायितान् - आपल्याला छत्रीप्रमाणे झालेल्या - द्रुमान् वीक्ष्य - वृक्षांना पाहून - व्रजौकसः आह - गोकुळवासी गोपबालकांना म्हणाला. ॥३०॥
कडक उन्हाळ्यात वृक्ष आपल्याला सावली देऊन आपल्यावर छत्र धरण्याचे काम करीत आहेत, हे पाहून श्रीकृष्णांनी (३०)
हे स्तोककृष्ण हे अंशो श्रीदामन् सुबलार्जुन ।
विशालर्षभ तेजस्विन् देवप्रस्थ वरूथप ॥ ३१ ॥
श्रीदामा स्तोककृष्णो नी अंशू सुबल अर्जुन । विशाल वृषभो तैसे तेजस्वी देवप्रस्थ नी । वरुथपादि ते सर्व वृक्षाच्या तळि बाहता । एकत्र करुनी त्यांना श्रीकृष्ण वदला हरी ॥ ३१ ॥
हे स्तोककृष्ण - हे स्तोककृष्णा - हे अंशो - हे अंशा - श्रीदामन् सुबल अर्जुन - हे श्रीदाम्या, सुबला अर्जुना - विशाल ऋषभ तेजस्विन् - हे विशाला, ऋषभा, व तेजस्वी - देवप्रस्थ वरूथप - हे देवप्रस्था, हे वरूथपा. ॥३१॥
स्तोककृष्ण, अंशू, श्रीदामा, सुबल, अर्जुन, विशाल, ऋषभ, तेजस्वी, देवप्रस्थ, वरूथप इत्यादि गोपालांना संबोधून म्हटले. (३१)
पश्यतैतान् महाभागान् परार्थैकान्तजीवितान् ।
वातवर्षातपहिमान् सहन्तो वारयन्ति नः ॥ ३२ ॥
मित्रांनो भाग्यवान् वृक्ष दुजांचे हित चिंतिती । साहिती ऊन्ह वारा नी आपणा रक्षिती पहा ॥ ३२ ॥
एतान् परार्थैकान्तजीविनः - ह्या केवळ दुसर्याकरिताच आहे जीवित ज्यांचे अशा - महाभागान् पश्यत - मोठया उदार वृक्षांना पहा - वातवर्षातपहिमान् सहन्तः - वारा, पाऊस, ऊन व थंडी ही सहन करीत - नः (तानि) वारयंति - आमच्यासाठी त्याचे निवारण करितात. ॥३२॥
मित्रांनो ! ज्यांचे सर्व जीवन फक्त दुसर्यांचे भले करण्यासाठीच आहे, अशा या भाग्यवान झाडांना पाहा. ही स्वतः वार्याचे झोत, पाऊस, ऊन, थंडी असे सर्व काही सहन करीत आमचे त्यांच्यापासून रक्षण करतात. (३२)
अहो एषां वरं जन्म सर्व प्राण्युपजीवनम् ।
सुजनस्येव येषां वै विमुखा यान्ति नार्थिनः ॥ ३३ ॥
वाटते श्रेष्ठ हे जीणे सर्वां आश्रय लाभतो । सज्जनाघरुनी भिक्षू रिकामा नच जाय जैं ॥ ३३ ॥
अहो - हे गोपालांनो - एषां सर्वप्राण्युपजीवनं जन्म - यांचे सर्व प्राणिमात्रांची उपजीविका चालविणारे असे जीवित - वरं (अस्ति) - श्रेष्ठ होय - येषां अर्थिनः सुजनस्य (याचकाः) इव - ज्यांचे याचक साधूंच्या याचकांप्रमाणेच - विमुखाः न वै यांति - निराश होऊन केव्हाही जात नाहीत. ॥३३॥
यांचे जीवन किती श्रेष्ठ आहे ! कारण यांच्यामुळेच प्राण्यांचा जीवननिर्वाह चालतो. ज्याप्रमाणे एखाद्या सज्जन पुरुषाच्या घरून कोणी याचक रिकाम्या हाताने परत जात नाही, त्याचप्रमाणे या वृक्षांकडूनसुद्धा काही न मिळता परत जात नाहीत. (३३)
पत्रपुष्पफलच्छाया मूलवल्कलदारुभिः ।
गन्धनिर्यासभस्मास्थि तोक्मैः कामान् वितन्वते ॥ ३४ ॥
फुले पत्र तसे छाया मूळ साल नि लाकडे । गंध डिंक तशी राख कोळसा सर्व देति ते ॥ ३४ ॥
पत्रपुष्पफलच्छायामूलवल्कलदारुभिः - पाने, फुले, फळे, सावली, मुळे, साली, काष्ठे यांनी - गंधनिर्यासभस्मास्थितोक्मैःच - तसेच सुगंध, डिंक, चूर्ण, बिया व कोवळे अंकुर यांनी - कामान् वितन्वते - सर्वांच्या इच्छा पूर्ण करितात. ॥३४॥
हे आपली पाने, फुले, सावली, मुळे, साली, लाकडे, सुगंध, डिंक, राख, कोळसा, अंकूर आणि पालवी देऊन प्राणिमात्राच्या इच्छा पूर्ण करतात. (३४)
एतावत् जन्मसाफल्यं देहिनामिह देहिषु ।
प्राणैरर्थैर्धिया वाचा श्रेय एवाचरेत् सदा ॥ ३५ ॥
कितेक जगि या प्राणि परी साफल्य जीवनी । आपुल्या धन वाणीने कर्माने सुखवी जना ॥ ३५ ॥
देहिषु - प्राणिमात्रांवर - प्राणैः अर्थैः - प्राणांनी व धनांनी - धिया वाचा (च) - बुद्धीने आणि वाणीने - सदा - निरंतर - श्रेयः एव आचरेत् - कल्याणच करावे - एतावत् - एवढे - देहिनां जन्मसाफल्ये - प्राण्यांच्या जन्माचे सार्थक होय. ॥३५॥
या जगात प्राण्यांच्या जन्माची सार्थकता यातच आहे की, त्यांनी धनाने, बुद्धीने, वाणीने आणि प्राणांनीसुद्धा इतरांचे नेहमी कल्याणच करावे. (३५)
इति प्रवालस्तबक फलपुष्पदलोत्करैः ।
तरूणां नम्रशाखानां मध्यतो यमुनां गतः ॥ ३६ ॥
कोंब गुच्छ फुले पाने डौरुनी लवती सदा । बोलता कृष्ण हे आले सर्वे ते यमुना पुढे ॥ ३६ ॥
इति - असे म्हणून - प्रवालस्तबक - अंकुर, फुलांचे गुच्छ, - फलपुष्पदलोत्करैः - फळे, फुले, पाने यांच्या समूहाने युक्त अशा - नम्रशाखानां - वाकलेल्या आहेत फांद्या ज्यांच्या - तरूणां मध्येन - अशा वृक्षांच्या मधून - (कृष्णः) यमुनां गतः - श्रीकृष्ण यमुनेवर गेला. ॥३६॥
दोन्ही बाजूंची वृक्ष पालवी, गुच्छ, फळे, फुले आणि पानांनी लहडलेले होते. त्यांच्या फांद्या जमिनीपर्यंत वाकल्या होत्या. अशाप्रकारे भाषण करीत श्रीकृष्ण त्यांच्यामधून यमुनेच्या काठी आले. (३६)
तत्र गाः पाययित्वापः सुमृष्टाः शीतलाः शिवाः ।
ततो नृप स्वयं गोपाः कामं स्वादु पपुर्जलम् ॥ ३७ ॥
राजा ! ते यमुनापाणी मधूर शीत स्वच्छ ही । गाईंना पाजता सारे पिले सर्वचि ते जल ॥ ३७ ॥
नृप - हे परीक्षित राजा - तत्र - त्याठिकाणी - गाः - गाईंना - सुमृष्टाः शिवाः शीतलाः - अत्यंत स्वच्छ, पथ्यकर व थंड असे - अपः पाययित्वा - पाणी पाजून - ततः - नंतर - स्वयं गोपाः चः - स्वतः आपण व गोप - स्वादु जलं - मधुर जल - कामं पपुः - यथेच्छ प्याले. ॥३७॥
राजन् ! यमुनेचे पाणी अतिशय मधुर, शीतल आणि स्वच्छ होते. त्यांनी गाईंना पाणी पाजले आणि नंतर ते स्वतः स्वादिष्ट पाणी पोटभर प्यायले. (३७)
तस्या उपवने कामं चारयन्तः पशून् नृप ।
कृष्णरामौ उवुपागम्य क्षुधार्ता इदमब्रवन् ॥ ३८ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे पूर्वार्धे द्वाविंशोऽध्यायः ॥ २२ ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
यमुना तटि ते सर्व हरीत तृण गायिना । चारता बाळ गोपाळ वदले भूक लागली ॥ ३८ ॥ ॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर बाविसावा अध्याय हा ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
नृपः - हे परीक्षित राजा - तस्याः उपवने - त्या यमुनेजवळच्या कुरणांत - पशून् कामं चारयंतः - गाईंना यथेच्छ चरविणारे गोप - क्षुघार्ताः (सन्तः) - भुकेने पीडित होत्साते - कृष्णरामौ उपागम्य - कृष्ण व बलराम यांच्या जवळ येऊन - इदं अब्रुवन् - असे बोलते झाले. ॥३८॥
परीक्षिता ! ज्यावेळी ते यमुनेच्या काठावरील वनामध्ये मनसोक्तपणे गुरे चारीत होते, त्यावेळी भुकेलेले गोपाळ श्रीकृष्ण-बलरामांजवळ येऊन म्हणाले - (३८)
अध्याय बाविसावा समाप्त |