श्रीमद् भागवत पुराण
दशमः स्कन्धः
एकविंशोऽध्यायः

वेणुगीतम् -

वेणुगीत -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् )
इत्थं शरत् स्वच्छजलं पद्माकरसुगन्धिना ।
न्यविशद् वायुना वातं स गोगोपालकोऽच्युतः ॥ १ ॥
( अनुष्टुप् )
श्रीशुकदेव सांगतात -
शोभले वन ते ऐसे जलीं पद्म सुगंधित ।
बाळगोपाळ नी कृष्ण गाई तेथ प्रवेशल्या ॥ १ ॥

सगोगोपालकः अच्युतः - गाई व गोप यांसह श्रीकृष्ण - इत्थं - याप्रमाणे - शरत्स्वच्छजलं - शरदृतूमुळे स्वच्छ आहे जल ज्यांचे अशा - पद्माकरसुगंधिना - कमलसमूहांच्या सुगंधाने युक्त झालेल्या - वायुना वातं (वनं) - वायूने व्याप्त अशा वनात - न्यविशन् - प्रवेश करिता झाला ॥१॥

श्रीशुकदेव म्हणतात - शरद ऋतूमुळे जेथील पाणी निर्मळ झाले होते आणि जलाशयात उमललेल्या कमळांचा सुगंध असलेला वारा वाहात होता, अशा वृंदावनात श्रीकृष्णांनी गाई व गोपाळांसह प्रवेश केला. (१)


( पुष्पिताग्रा )
कुसुमितवनराजिशुष्मिभृङ्‌ग
     द्विजकुलघुष्टसरःसरिन्महीध्रम् ।
मधुपतिरवगाह्य चारयन् गाः
     सहपशुपालबलश्चुकूज वेणुम् ॥ २ ॥
( पुष्पिताग्रा )
कुसुमित वनराजि पक्षि गाती
     गिरितळि नि सरितात गुंजले हो ।
मधुपति हरिराम बाळगोपीं
     घुसुनि करी मग नाद वंशिचा तो ॥ २ ॥

सहपशुपालबलः मधुपतिः - गोप व बळराम यांसह तो कृष्ण - कुसुमितवनराजि - फुललेल्या वृक्षांच्या राईतील - शुष्मिभृंग - भुंगे व पक्षी यांच्या समुदायांनी गजबजून गेली आहेत. - द्विजकुलघुष्टसरः सरिन्महीध्रं - सरोवरे, नद्या व पर्वत ज्यातील अशा वनात - अवगाह्य - प्रवेश करुन - गाः चरयन् - गाई चरवीत - वेणुं चुकूज - वेणू वाजविता झाला ॥२॥

तेथील फुलांनी बहरलेल्या वनराईत धुंद भ्रमर गुणगुणत होते आणि पक्ष्यांचे थवे किलबिलाट करीत होते. त्यामुळे तेथील सरोवरे, नद्या आणि पर्वत नादमय झाले होते, श्रीकृष्णांनी बलराम आणि गोपालांबरोबर तेथे गाई चारीत असताना वेणू वाजविण्यास सुरुवात केली. (२)


( अनुष्टुप् )
तद् व्रजस्त्रिय आश्रुत्य वेणुगीतं स्मरोदयम् ।
काश्चित् परोक्षं कृष्णस्य स्वसखीभ्योऽन्ववर्णयन् ॥ ३ ॥
( अनुष्टुप् )
वंशीचा ध्वनि कृष्णाच्या भगवत्‌प्रेम जागवी ।
वंशीची थोरवी बाला एकांती सखिला वदे ॥ ३ ॥

व्रजस्त्रियः - गोकुळातील गोपी - तत् स्मरोदयं कृष्णस्य - ते कामोद्दीपक असे श्रीकृष्णाचे - वेणुगीतं आश्रुत्य - वेणुगीत श्रवण करून - तासु काश्चित् - त्यातील काही गोपी - स्वसखीभ्यः - आपल्या मैत्रिणींजवळ - परोक्षं न्यवर्णयन् - त्याच्या पाठीमागे त्याचे गुणवर्णन करू लागल्या ॥३॥

ते वेणुगीत भगवंतांच्या विषयी प्रेमभाव जागृत करणारे होते. ते ऐकून काही गोपी सख्यांना श्रीकृष्णांच्या मागे त्यांच्याविषयी सांगू लागल्या. (३)


तद् वर्णयितुमारब्धाः स्मरन्त्यः कृष्णचेष्टितम् ।
नाशकन् स्मरवेगेन विक्षिप्तमनसो नृप ॥ ४ ॥
वंशीचे नादमाधूर्य वर्णिता कृष्ण ये मनीं ।
निसटे मनिचा ताबा आता ती वदुना शके ॥ ४ ॥

नृप - हे परीक्षित राजा - तत् वर्णयितुं आरब्धाः - ते वेणुगीत करण्यास आरंभ केलेल्या त्या गोपी - कृष्णचेष्टितं स्मरंत्यः - कृष्णाच्या क्रीडांचे स्मरण करीत - स्मरवेगेन - मदनाच्या तीव्रतेमुळे - विक्षिप्तमनसः - चंचल झाले आहे चित्त ज्यांचे अशा - (तत् वर्णयितुं) नाशकन् - ते वर्णन करण्यास समर्थ झाल्या नाहीत ॥४॥

हे राजा ! श्रीकृष्णांच्या लीला आठवून त्यांचे त्यांनी वर्णन करण्यास सुरुवात केली खरी; पण उत्कट प्रेमाने मन व्याकूळ झाल्यामुळे त्यांचे बोलणेच खुंटले. (४)


( मंदाक्रांता )
बर्हापीडं नटवरवपुः कर्णयोः कर्णिकारं ।
बिभ्रद् वासः कनककपिशं वैजयन्तीं च मालाम् ।
रन्ध्रान् वेणोरधरसुधयापूरयन् गोपवृन्दैः ।
वृन्दारण्यं स्वपदरमणं प्राविशद् गीतकीर्तिः ॥ ५ ॥
( मंदाक्रांता )
ती विचार करते
गेला कान्हा बळिसह वनीं घेउनी गायि गोपा ।
डोई खोवी मयुरपिस नी कर्णि पुष्पे सुवर्ण ॥
नेसे पीतांबर गळि असे वैजयंतिय माला ।
बासूरीला अधरि धरुनी पाजितो की सुधा ती ॥
पाठी मागे चलत हरिच्या गोप ते कीर्ती गाती ।
वैकुंठीच्याहुनिहि व्रजि ही वाढली दिव्य शोभा ॥ ५ ॥

बर्हापीडं - मोरांच्या पिसांचे शिरोभूषण - कर्णयोः कर्णिकारं - व कानांत पांगार्‍याची फुले - कनककपिशं वासः - सोनेरी रंगाचे वस्त्र - वैजयंतीं मालां च - आणि वैजयंती माळा - बिभ्रत् - धारण करणारा - नटवरवपुः - नटाप्रमाणे आहे शरीर ज्याचे असा - गोपवृंदैः - गोपसमुदायांनी - गीतकीर्तिः - गायिली आहे कीर्ति ज्याची असा - वेणोः रंध्रान् - वेणूच्या छिद्रांना - अधरसुधया पूरयन् - अधरामृताने भरणारा श्रीकृष्ण - स्वपदरमणं - आपल्या पायांच्या चिन्हांनी रमणीय झालेल्या - वृंदावनं प्राविशत् - अशा वृंदावनात प्रवेश करिता झाला ॥५॥

(त्या सांगू लागल्या,) गोपाळांसह श्रीकृष्ण वृंदावनात आले पहा ! त्यांच्या मस्तकारव मोरपंख आहे आणि कानांवर कण्हेरीचे गुच्छ आहेत. त्यांनी सोन्यासारखा पीतांबर परिधान केला असून गळ्यामध्ये वैजयंती माळा घातली आहे. त्यांचे रूप श्रेष्ठ नटासारखे किती सुंदर आहे बरे ! बासरीची छिद्रे ते आपल्या अधरामृताने भरत आहेत. गोपाळ त्यांच्या कीर्तीचे गायन करीत आहेत. हे वृंदावन त्यांच्या चरणांमुळे अधिकच रमणीय झाले आहे. (५)


( अनुष्टुप् )
इति वेणुरवं राजन् सर्वभूतमनोहरम् ।
श्रुत्वा व्रजस्त्रियः सर्वा वर्णयन्त्योऽभिरेभिरे ॥ ६ ॥
( अनुष्टुप् )
परीक्षित् ! जड जीवांचे चित्त तो नाद वंशिचा ।
चोरितो ऐकती गोपी कृष्णा आलिंगिती मनीं ॥ ६ ॥

नृप - हे राजा - इति सर्वभूतमनोहरं - याप्रमाणे सर्व प्राण्यांचे मन हरण करणार्‍या - वेणुरवं श्रुत्वा - वेणूचा नाद ऐकून - सर्वाः व्रजस्त्रियः - सर्व गोकुळांतील स्त्रिया - (कृष्णं) वर्णयंत्यः - श्रीकृष्णाचे वर्णन करीत - (मनसा) अभिरेभिरे - त्याला मनाने आलिंगन देत्या झाल्या ॥६॥

परीक्षिता ! चराचराचे मन आकर्षून घेणारा वेणुनाद ऐकून सर्व गोपी त्याचे वर्णन करू लागल्या. आणि ते करीत असतानाच तन्मय होऊन त्या श्रीकृष्णांना मनाने आलिंगन देऊ लागल्या. (६)


श्रीगोप्य ऊचुः ।
( वसंततिलका )
अक्षण्वतां फलमिदं न परं विदामः
     सख्यः पशूननु विवेशयतोर्वयस्यैः ।
वक्त्रं व्रजेशसुतयोरनवेणुजुष्टं
     यैर्वा निपीतमनुरक्त-कटाक्षमोक्षम् ॥ ७ ॥
( वसंततिलका )
गोपि परस्परात बोलतात -
ओ हो सखे नयनि मी हरि पालवीला
     सांगू कशी तुजसि ती मनि मौज आली ।
हा कोण लाभ मजला वनि कृष्ण जाता
     येताचि मी बघतसे मुखपान घेते ॥ ७ ॥

सख्यः - हे मैत्रिणींनो - अक्षण्वतां - डोळस प्राण्यांचे - इदं (एकं) फलम् (अस्ति) - हेच एक नेत्रसार्थक्य होय - परं (फलं) - दुसरे काही सार्थक्य - न विदामः - आम्ही जाणत नाही - वयस्यैः (सह पशून्) - संवगड्यांसह गाईंना - (वनं) अनु विवेशयतोः व्रजेशसुतयोः - वनात नेणार्‍या नंदाच्या दोन पुत्रांचे - अनुवेणु - वेणू वाजविणारे - अनुरक्तकटाक्षमोक्षम् वक्त्रं - व प्रेमळ कटाक्ष फेकणारे मुख - यैः वा निपीतम् - ज्यांनी खरोखर सेवन केले - (तैः एव तत् फलं) जुष्टम् - त्यांनीच ते सार्थक्य उपभोगिले ॥७॥

गोपी म्हणाल्या - अग सख्यांनो ! आम्ही डोळे असणार्‍यांच्याही डोळ्यांची एवढीच सार्थकता मानतो, दुसरी नाही. ती हीच की, जेव्हा श्रीकृष्ण आणि बलराम मित्रांसह गुरे हाकीत वनात जातात किंवा परत येतात, तेव्हा वेणू वाजविणारे किंवा प्रेमळ कटाक्षांनी आमच्याकडे पाहणारे त्यांचे मुखकमल मनसोक्त पाहावे. (७)


चूतप्रवालबर्हस्तबक् उत्पलाब्ज
     मालानुपृक्तपरिधान विचित्रवेशौ ।
मध्ये विरेजतुरलं पशुपालगोष्ठ्यां
     रङ्‌गे यथा नटवरौ क्व च गायमानौ ॥ ८ ॥
धारी शिरी नवति आम्र कुमूदमाला
     कृष्णास पीतवसने बळिला निळे ते ।
गोठ्यात वंशिरव तो करितो मधेच
     वाटे नटो हरि तसा वदु मी कसा तो ॥ ८ ॥

चूतप्रवालबर्हस्तबकोत्पलाब्जमाला - आंब्याची कोवळी पाने, मोरांची पिसे, यांचे तुरे व कमळांच्या माळा - अनुपृक्तपरिधान - यांनी सजविलेली वस्त्रे धारण केल्यामुळे - विचित्रवेषौ - चित्रविचित्र वेष आहे ज्यांचा असे - गायमानौ - गायन करणारे दोघे रामकृष्ण - यथा रंगे नटवरौ (तथा) - जसे रंगभूमीवर उत्तम नट तसे - क्व च पशुपालगोष्ठ्यां मध्ये - कधी कधी गोपाळांच्या सभेमध्ये - अलं विरेजतुः - अतिशय शोभले ॥८॥

(दुसर्‍या काही जणी म्हणाल्या,) पीतांबरधारी सावळे श्रीकृष्ण आणि नीलांबर नेसलेले बलराम जेव्हा आंब्याची पालवी, मोरपंख, फुलांचे गुच्छ आणि रंगी-बेरंगी कमलांच्या माळा धारण करतात, तेव्हा त्यांचा वेष अतिशय देखणा वाटतो. गोपाळांच्यामध्ये बसून काहीवेळा जेव्हा ते गाऊ लागतात, तेव्हा रंगमंचावर अभिनय करणार्‍या दोन चतुर नटांसारखे ते किती शोभून दिसतात म्हणून काय सांगू ? (८)

विवरण :- समस्त गोपीवृंद कृष्णाचे गुणगान करीत आहेत, जणू कृष्णाचे वर्णन करण्याची त्यांच्यामध्ये अहमहमिकाच लागली आहे. त्यापैकी एक गोपी म्हणते, आमच्या शरीराचा प्रत्येक अवयव जणू कृष्णासाठीच आहे. कृष्णाच्या दर्शनाने आमच्या डोळ्यांचे पारणे फिटते, ते धन्य होतात, नव्हे ! तर ते केवळ कृष्णदर्शनासाठीच आहेत. जोवर कृष्णदर्शन होत नाही, तोवर वाटते की हे डोळे बाह्य जगाच्या दर्शनासाठी आहेत. पण हे केवळ अज्ञानानेच. एकदा परमात्म्याचे दर्शन झाले की, अज्ञानाचा लोप होतो आणि शरीराचा प्रत्येक अवयव केवळ भगवंतासाठीच आहे असे खरे ज्ञान होते. (८)



गोप्यः किमाचरदयं कुशलं स्म वेणुः
     दामोदराधरसुधामपि गोपिकानाम् ।
भुङ्‌क्ते स्वयं यदवशिष्टरसं ह्रदिन्यो
     हृष्यत्त्वचोऽश्रु मुमुचुस्तरवो यथाऽऽर्याः ॥ ९ ॥
वेणू पुरूष असुनी रसपीयि सारा
     ठेवील का मजसि अमृत थोडके ते ।
वेणू रसास पसरी फुलतीहि पद्‍मे
     आनंद अश्रु पडती तरुच्याहि नेत्री ॥ ९ ॥

गोप्यः - अहो गोपींनो - अयं वेणुः - हा वेणु - किं स्म कुशलं आचरत् - कोणते पुण्य आचरिता झाला - यत् - ज्यामुळे - गोपिकानां - गोपींनी भोगण्याला योग्य असे - दामोदराधरसुधां अपि - कृष्णाचे अधरामृतहि - स्वयं - स्वैरपणे - अवशिष्टरसं - उरला आहे थोडाच रस ज्यात - भुंक्ते - अशा रीतीने सेवीत आहे - ह्रदिन्यः - नद्या रोमांचयुक्त आहेत - हृष्यत्त्वचः (संभूताः) - त्वचा ज्यांच्या अशा झाल्या आहेत - यथा आर्याः (तथा) - ज्याप्रमाणे कुळांतील वृद्ध लोक त्याप्रमाणे - तरवः अश्रु मुमुचुः - वृक्षही आनंदाश्रु सोडिते झाले ॥९॥

अग गोपींनो ! या वेणूने असे कोणते पुण्य केले आहे की, जो आम्हा गोपींचे हक्काचे दामोदरांचे अधरामृत स्वतःच अशाप्रकारे पीत आहे की, त्याचा फक्त रस शिल्लक उरला आहे. या वेणूला आपल्या पाण्याने वाढविणारे जलाशय कमळांच्या मिषाने रोमांचित होऊ लागले आहेत आणि आपल्या वंशामध्ये जन्मलेल्या भगवत्प्रेमी वेणूला पाहून वृक्षसुद्धा श्रेष्ठ पुरुषांप्रमाणे ’भगवद्‍भक्त आपला वंशज आहे’ हा विचार मनात येऊन मधुबिंदूंच्या मिषाने आनंदाश्रू ढाळीत आहेत. (९)


वृन्दावनं सखि भुवो वितनोति कीर्तिं
     यद् देवकीसुतपदाम्बु जलब्धलक्ष्मि ।
गोविन्दवेणुमनु मत्तमयूरनृत्यं
     प्रेक्ष्याद्रिसान्ववरतान्यसमस्तसत्त्वम् ॥ १० ॥
हा कीर्ति ती पसरवी भुवनात सार्‍या
     याच्या पदात असती कमळीय चिन्हे ।
हा वाजवी मुरलि तै भुलती तपी ही
     नाचोनि मोर उठती खग शांत होती ॥ १० ॥

सखि - हे मैत्रिणी - वृंदावनं भुवः - वृंदावन पृथ्वीची - कीर्तिं वितनोति - कीर्ति फारच पसरीत आहे - यत् - ज्याअर्थी - देवकीसुतपदांबुज - श्रीकृष्णाच्या चरणकमलांच्या योगाने - लब्धलक्ष्मि (हृदयं) - प्राप्त झाली आहे शोभा ज्याला असे हे हृदय - गोविंदवेणु अनु - श्रीकृष्णाच्या वेणूचा नाद ऐकिल्यावर - मत्तमयूरनृत्यं प्रेक्ष्य - मत्त झालेल्या मोरांचे नृत्य पाहून - अद्रि - पर्वत शिखरावर - सान्वपरतान्यसमस्तसत्त्वं (संजातम्) - स्तब्ध झाले आहेत इतर सर्व प्राणी ज्यात असे झाले ॥१०॥

गडे ! देवकीनंदनाच्या चरणकमलांनी सुशोभित झालेले हे वृंदावन, पृथ्वीची कीर्ति चहूकडे पसरवीत आहे. जेव्हा श्रीकृष्ण मुरली वाजवितात, तेव्हा मोर धुंद होऊन नाचू लागतात आणि पर्वतशिखरांवरील पशु-पक्षी स्तब्धपणे हे पाहात राहतात. (१०)

विवरण :- (वर्षा ऋतूतील पावसाळी वातावरण संपले. आल्हाददायक शरद् ऋतूमध्ये कृष्णाचे वेणुवादन ऐकून गोपींची अवस्था कशी झाली, याचे वर्णन) वेणूचा नाद ऐकून एक गोपी आपल्या सखीस म्हणते, ही मुरली फारच भाग्यवान ! तिला श्रीकृष्णाच्या अधरातील अमृत प्राशनाचे भाग्य लाभते. (अधरसुधा प्राशून हरीची पावन झाली तनु मुरलीची ! भाग्यवती मी मुरली बोले ॥ असे एका मराठी कवीनेहि म्हटले आहेच !) वास्तविक या अधरसुधेवर आम्हां गोपींचाच अधिक अधिकार आहे. कारण आम्ही त्याला आमच्या आत्यंतिक प्रेमाने जणू आमचा कैदी बनवून टाकले आहे. शिवाय ती इतकी स्वार्थी की आमच्यासाठी काही शिल्लक ठेवतच नाही. आत्यंतिक प्रेमाने निर्माण झालेला गोपींचा हा मत्सरभाव अतिशय हृद्य ! याच मुरलीला 'वंशी' असेही म्हटले जाते. कारण ती वेळूपासून तयार केली जाते. (वंश = वेळू) अशा वेळुच्या वनातून कृष्ण जात असता आपल्यातीलच एका फांदीला कृष्णाची मुरली बनण्याचे भाग्य लाभले, हे आपणा सर्वांचेच भाग्य !' अशा भावनेने वनातील सर्वच वृक्ष भावनातिरेकाने आनंदाश्रू ढाळू लागले, रसधारांचा वर्षाव करू लागले. श्रीकृष्ण आपल्या सान्निध्यात आहे, या भावनेने ते रोमांचित झाले. (तिथे उगवलेले दर्भ - टोकदार गवत - म्हणजेच जणू त्यांचे रोमांच.) (इथे कृष्णाच्या अधरावर रहाण्याचे भाग्य जरी एकाच मुरलीला लाभले, तरी इतर वंशवृक्षांना तिचा मत्सर न वाटता उलट ती आपल्यापैकीच आहे या भावनेने आनंदच झाला, हे विशेष ! मानवाची ही भावना वृक्षात नव्हती हे विशेष !) (१०)



धन्याः स्म मूढमतयोऽपि हरिण्य एता
     या नन्दनन्दनमुपात्त विचित्रवेशम् ।
आकर्ण्य वेणुरणितं सहकृष्णसाराः
     पूजां दधुर्विरचितां प्रणयावलोकैः ॥ ११ ॥
हा धारितो रमणि गे बहु वेष तैसा
     नी वंशीनाद करिता मृगी धाव घेती ।
नी पाहती हरिपदा मग धन्य होती
     नाही पहात कधि तो मज दृष्टि ऐसे ॥ ११ ॥

एताः मूढतयः - त्या ह्या अज्ञानी - हरिण्यः अपि - हरिणी सुद्धा - धन्याः स्म - धन्य आहेत - याः - ज्या - वेणुरणितं आकर्ण्य - वेणुनाद श्रवण करून - उपात्तविचित्रवेषं - ज्याने विचित्र वेष धारण केला आहे - नंदनंदनं (प्रति) - अशा श्रीकृष्णाप्रत - सहकृष्णासाराः - आपले पती जे काळवीट त्यांसह - प्रणयावलौकैः विरचितां - प्रेमपूर्ण अवलोकनांनी केलेली - पूजां दधुः - पूजा अर्पित्या झाल्या ॥११॥

तसेच, जेव्हा सुंदर वेष धारण केलेले श्रीकृष्ण बासरी वाजवितात, तेव्हा मंदबुद्धीच्या हरिणीसुद्धा ती ऐकत काळविटांसमवेत त्यांच्याजवळ येऊन प्रेमपूर्ण नेत्रकमळांनी त्यांची जणू पूजा करतात. (११)

विवरण :- आणखी एक गोपी म्हणते, या वृंदावनामुळे सर्व सृष्टीची कीर्ती वाढते आहे. (सर्वात वृंदावनच श्रेष्ठ आहे - 'श्री'मंत आहे) प्रत्यक्ष वैकुंठापेक्षाहि याला अधिक महत्त्व आहे. कारण येथील कृष्णाच्या वास्तव्याने सर्व प्राणीमात्र आपला मूळ स्वभाव सोडून योग्याप्रमाणे सत्त्वगुणी, धीरगंभीर झाले आहेतच. शिवाय वैकुंठामध्ये एकच लक्ष्मी आहे, पण इथे ठायी-ठायी तिचा निवास. कारण ती विष्णूच्या (कृष्णाच्या) चरणतळी आहे. या कृष्णाचे चरण जिथे जिथे पडतात, त्याच्या तळी ती आहेच. (जणू कृष्णाचा चरणस्पर्श पृथ्वीला व्हावा असे तिला वाटतच नाही.) अशा लक्ष्मीसह कृष्णाचे दर्शन वृंदावनवासीयांना होते, केवढे हे त्यांचे भाग्य ! (११)



कृष्णं निरीक्ष्य वनितोत्सवरूपशीलं
     श्रुत्वा च तत्क्वणितवेणु विविक्तगीतम् ।
देव्यो विमानगतयः स्मरनुन्नसारा
     भ्रश्यत् प्रसूनकबरा मुमुहुर्विनीव्यः ॥ १२ ॥
सौंदर्यखान हरिला बघताच देवी
     मूच्छित त्या पडति गे रव ऐकुनीया ।
पाहा फुलेहि गळती मग देवियांचे
     साड्या गळोनि पडती धरणीस त्यांच्या ॥ १२ ॥

वनितोत्सवरूपवेषं - स्त्रियांना आनंद देणारी रूपे व वेष आहेत ज्याचे - कृष्णं निरीक्ष्य - अशा श्रीकृष्णाला पाहून - तत्क्वणितवेणु - आणि त्याने वाजविलेल्या वेणूचे - विचित्रगीतं च श्रुत्वा - चित्तकर्षक गीत ऐकून - स्मरनुन्नसाराः - कामव्यथेने ज्यांचे धैर्य गळून गेले आहे - विमानगतयः देव्यः - अशा विमानातून गमन करणार्‍या देवस्त्रिया - भ्रश्यत्प्रसूनकवराः - गळत आहेत फुले ज्यातील अशा आहेत वेण्या ज्यांच्या अशा - विनीव्यः - सुटले आहे कमरेचे वस्त्र ज्यांच्या अशा - मुमुहुः - मोहित झाल्या ॥१२॥

स्वर्गातील देवी जेव्हा युवतींना आनंदित करणारे सौंदर्य आणि शील यांचा खजिना असलेल्या श्रीकृष्णांना पाहातात आणि त्यांनी बासरीवर गायिलेले मधुर संगीत ऐकतात तेव्हा मदनबाधेने विह्वल होऊन त्या विमानातच आपली शुद्ध हरपून बसतात, त्यामुळे वेणीतील फुले गळून जमिनीवर पडत आहेत याची त्यांना जाणीव नसते की शालू कमरेवरून निसटताहेत, याचेही त्यांना भान नसते. (१२)

विवरण :- (कृष्ण गुणगान करण्याची या गोपीत जणू चढाओढच लागली असावी.) कृष्णाचे मुरलीवादन सर्व पशुपक्षी इतक्या एकतानतेने ऐकत आहेत की ते जणू आपला निसर्गदत्त स्वभाव विसरून गेले आहेत. यांमध्ये हरिणीही आहेत. वास्तविक हरिणी या लाजाळू, भीरू आणि याच कारणाने मनुष्यास पाहून दूर-दूर पळून जाणार्‍या. पण मुरलीरवाने त्यांना इतके वेडे केले आहे की, त्या श्रीकृष्णाकडे चक्क प्रणयकटाक्ष टाकताहेत ! अन तेही आपल्या प्रियकरासमोर !! (गोपीला जणू सुचवायचे आहे की, या हरिणी प्रियकरासमोर असे करू शकतात, किती भाग्यवान् ! नाहीतर आमचे पतिराज ! त्यांना नाही असले काही सहन होणार !) (१२)



गावश्च कृष्णमुखनिर्गतवेणुगीत
     पीयूषमुत्तभितकर्णपुटैः पिबन्त्यः ।
शावाः स्नुतस्तनपयःकवलाः स्म तस्थुः
     गोविन्दमात्मनि दृशाश्रुकलाः स्पृशन्त्यः ॥ १३ ॥
गाई पहा सख‍इ त्या टवकारुनीया
     त्या प्राशिती रस पहा हरिवेणुनाद ।
त्या पाहती नि धरिती हृदयी हरीसी
     ती वासुरे दुध पिता गळते मुखीचे ॥ १३ ॥

गोविंदं - कृष्णाला - दृशा - डोळ्यांनी - आत्मनि स्पृशंत्यः - मनात आलिंगन देणार्‍या - (अतः एव) अश्रुकलाः - म्हणून ज्यांच्या नेत्रांतून आनंदाश्रू येत आहेत अशा - कृष्णमुख - श्रीकृष्णमुखापासून - निर्गतवेणुगीतपीयूषं - निघालेले वेणुगीतरूपी अमृत - उत्तभितकर्णपुटैः पिबंत्यः गावः - वर कान करून पिणार्‍या गाई - स्त्रुतस्तनपयः - आणि गळत आहेत स्तनांतून - कवलाः च शावाः - घेतलेल्या दूधाचे घोट ज्यांच्या मुखांतून अशी वासरे - तस्थुः स्म - स्तब्ध झाली ॥१३॥

श्रीकृष्णांच्या मुखातून निघालेले वेणुगीतरूप अमृत गाई कान टवकारून पितात. आपल्या डोळ्यांतून श्यामसुंदरांना हृदयात घेऊन त्यांना आलिंगन देतात. त्यामुळे त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागतात. तसेच त्यांची वासरे गाईंच्या सडांतून कृष्णप्रेमाने आपोआप स्रवणारे दूध तोंडात घेऊन तशीच उभी राहतात. त्यांच्याही डोळ्यांतून आनंदाश्रू वाहात असतात. (१३)

विवरण :- आणखी एक गोपी म्हणते, कृष्णाचे मुरलीवादन केवळ पशुपक्षांनाच मोहित करीत नाही, तर देवस्त्रियांनाहि. ते ऐकून त्या कामविव्हल होतात. त्यांची जर ही कथा, तर आमचे काय ? (१३)



प्रायो बताम्ब विहगा मुनयो वनेऽस्मिन्
     कृष्णेक्षितं तदुदितं कलवेणुगीतम् ।
आरुह्य ये द्रुमभुजान् रुचिरप्रवालान्
     श्रृण्वत्यमीलितदृशो विगतान्यवाचः ॥ १४ ॥
पाही खगास नच ते खग ते ऋषी हो
     झाकोनि नेत्र बसती मग वृक्षि शांत ।
मोहीत गान हरिची बहु वंशि गाते
     प्रीये सखे खराच की बघ जीव धन्य ॥ १४ ॥

बत अंब - हे आई - अस्मिन् बने - ह्या वनात - ये अमीलितदृशः - जे नेत्र न मिटता - विगतान्यवाचः - वाचा बंद करून मौनव्रत धरून - रुचिरप्रवालान् - कोवळी सुंदर पाने ज्यांना आहेत - द्रुमभुजान् आरुह्य - अशा वृक्षांच्या खांद्यांवर बसून - कृष्णेक्षितं - कृष्णाचे दर्शन - तदुदितं कलवेणुगीतं - त्या कृष्णाने गाईलेले मधुर वेणुगीत - शृण्वंति - श्रवण करितात - (ते) विहगाः - ते पक्षी - प्रायः मुनयः (सन्ति) - बहुतकरून ऋषीच आहेत ॥१४॥

अग आई ! या वनातील पक्षी हे बहुधा मुनीच आहेत. ते सुंदर पालवी फुटलेल्या झाडांच्या डहाळ्यांवर श्रीकृष्ण दिसतील अशा जागी किलबिल न करता गुपचुप बसतात आणि पापण्या न हालविता डोळ्यांनी त्यांचे रूपमाधुर्य पाहात राहतात. आणि त्यांनी वाजवलेली मोहक बासरी ऐकतात. (१४)


नद्यस्तदा तदुपधार्य मुकुन्दगीतम्
     आवर्तलक्षित मनोभवभग्नवेगाः ।
आलिङ्‌गनस्थगितमूर्मिभुजैर्मुरारेः
     गृह्णन्ति पादयुगलं कमलोपहाराः ॥ १५ ॥
हे जीव सोड सगळे जड ती सरीता
     नाही तिच्यात भवरा बघ शांत कैशी ।
थांबोन राहि जळ ते बघण्यास कृष्णा
     हाती कुमूद धरुनी हरि पूजिते ती ॥ १५ ॥

तदा - त्या वेळी - नद्यः - नद्या - तत् मुकुंदगीतं उपधार्य - ते श्रीकृष्णाचे गीत ऐकून - आवर्तलक्षितमनोभव - भोवर्‍यांच्या योगाने दिसून आलेल्या विकारामुळे - भग्नवेगाः - थांबला आहे वेग ज्यांचा अशा - आलिंगनस्थगितं - आलिंगनाने आच्छादित अशाप्रकारे - ऊर्मिभुजैः - लाट हेच कोणी हात त्यांनी - कमलोपहाराः - कमळे देणार्‍या होत्सात्या - मुरारेः - श्रीकृष्णाचे - पादयुगलं गृह्‌णंति - दोन्ही चरण धरित्या झाल्या ॥१५॥

या नद्यांनीही श्रीकृष्णांच्या बासरीचा आवाज ऐकला आणि त्यांच्या मनात प्रेमभाव जागृत झाला. तेच हे भोवरे. त्यामुळे त्यांचा वाहण्याचा वेगही मंदावला. त्या तरंगरूपी हातांनी त्यांचे चरण पकडून त्यांवर कमळे अर्पण करून त्यांना आलिंगन देत आहेत. (१५)

विवरण :- 'या मुरलीने कौतुक केले, गोकुळाला वेड लाविले' असे एक मराठी कवी म्हणतो. पण इथे तर सारे चराचरच वेडे झाले आहे. पशु-पक्षी त्याला अपवाद कसे असतील ? एरवी पक्षी सतत चिवचिवाट, किलबिलाट करतात, आकाशात उड्डाण करतात, पण या मुरलीने त्यांना इतके भारून टाकले आहे की, खाणे-पिणे विसरून ते वृक्षशाखेवर बसतात आणि डोळे मिटून एकतानतेने मुरलीरव ऐकतात. जणू काही ध्यानस्थ मुनीच. या मुरलीने पक्षीगणांनाहि जणू मुनी बनवले आहे. केवढी ही किमया ! (१५)



दृष्ट्वाऽऽतपे व्रजपशून् सह रामगोपैः
     सञ्चारयन्तमनु वेणुमुदीरयन्तम् ।
प्रेमप्रवृद्ध उदितः कुसुमावलीभिः
     सख्युर्व्यधात् स्ववपुषाम्बुद आतपत्रम् ॥ १६ ॥
प्रीये पहा नभि कसे स्थिरतात मेघ
     कृष्णो नि बाळ वनि चारिति धेनु तेंव्हा ।
छाया धरीति वरूनी अन सिंचितीही
     ओवाळिती जिव तसे ढग त्या हरीला ॥ १६ ॥

आतपे - उन्हात - सहरामगोपैः - बळराम व गोप यासह - व्रजपशून् संचारयंतं - गोकुळातील गाई चरविणार्‍या - अनुवेणुं उदीरयंतं दृष्ट्वा - वेणू वाजविणार्‍या कृष्णाला पाहून - उदितः अंबुदः - उगवलेला मेघ - प्रेमप्रवृद्धः - प्रेमाने वृद्धिंगत झालेला असा - कुसुमावलीभिः - पुष्पसमूहतुल्य तुषारांनी - स्ववपुषा च - व आपल्या देहाने - सख्युः - मित्र जो कृष्ण - आतपत्रं व्यधात् - त्याजवर छत्र धरिता झाला ॥१६॥

श्रीकृष्ण आणि बलराम गालगोपालांसह भर उन्हात गाई चारीत आहेत आणि त्याचबरोबर बासरीही वाजवीत आहेत, असे पाहून कृष्णघनांच्या हृदयात प्रेम उचंबळून येते. ते आपल्याव वर्णाच्या घनश्यामावर आपल्या शरीराचेच छत्र धरून त्यांच्यावर तुषाररूप पुष्पवर्षाव करतात. (१६)

विवरण :- ही झाली चेतनांची अवस्था. अचेतन नद्याहि कामविव्हल होतात. ही कामविव्हलता त्या आपल्या जलातील भोवर्‍यातून प्रकट करतात. त्यामुळे त्यांच्या प्रवाहाचा वेगहि मंद होतो. (त्यांच्या मनातील प्रणयाची आर्तता, अधीरता, उत्कटता लाटांच्या रूपाने प्रकट होते आणि) आपल्या लाटांरूपी बाहूंनी जणू त्या श्रीकृष्णास आलिंगन देतात आणि त्याच्या चरणांवर कमळांचा उपहार अर्पण करतात. (त्या मिषाने त्याच्या चरणांस स्पर्श करतात.) (१६)



पूर्णाः पुलिन्द्य उरुगायपदाब्जराग
     श्रीकुङ्‌कुमेन दयितास्तनमण्डितेन ।
तद्दर्शनस्मररुजस्तृणरूषितेन
     लिम्पन्त्य आननकुचेषु जहुस्तदाधिम् ॥ १७ ॥
वृंदावनात भिलिनी मनि धन्य होती
     त्यांना तयात कसले मनि प्रेम दाटे ।
त्या पाहती जधि तया मनि होय इच्छा
     तो प्रेमरोग जडला जणु त्यांजला की ।
वक्षा करीति उटि गोपिहि केशराची
     ती लाविती हरिपदा मग ती तृणाला ।
ती लागता भिलिणि त्या मुख नी स्तनाला
     लावोनि शांत करिती अपुल्या मनाला ॥ १७ ॥

पूर्णाः पुलिंद्यः - कृतार्थ झालेल्या शबरस्त्रिया - दयितास्तनमंडितेन - स्त्रियांच्या स्तनांवर लाविलेल्या - तृणरूषितेन - गवतांना लागून राहिलेल्या - उरुगायपदाब्जराग - श्रीकृष्णाच्या पदकमलांचा जो तांबडा रंग - श्रीकुंकुमेन - तेच जे केशर त्याने - तद्दर्शन - त्याच्या दर्शनाने - स्मररुजः - उत्पन्न झाली आहे कामपीडा ज्यांना अशा - आननकुचेषु (तत्) लिंपंत्यः - स्तनमुखावर त्याचा लेप करीत - तदाधिं जहुः - कामव्यथा टाकित्या झाल्या ॥१७॥

जेव्हा या भिल्लिणी कृष्णांना पाहतात, तेव्हा त्यांच्या हृदयामध्ये प्रेमाची व्याधी निर्माण होते. त्यावेळी त्या गोपींच्या वक्षःस्थळावरील जे केशर श्यामसुंदरांच्या चरणांना लागलेले असते, ते श्रीकृष्ण जेव्हा गवतावरून चालतात, तेव्हा त्याला चिकटते. या भाग्यशाली भिल्लिणी ते त्या गवतांच्या काड्यांवरून काढून आपले स्तन आणि तोंडाला लावतात आणि अशाप्रकारे आपल्या हृदयातील प्रेमदाह शांत करतात. (१७)


हन्तायमद्रिरबला हरिदासवर्यो
     यद् रामकृष्णचरणस्परशप्रमोदः ।
मानं तनोति सहगोगणयोस्तयोर्यत्
     पानीयसूयवस कन्दरकन्दमूलैः ॥ १८ ॥
प्रीये पहा गिरिवरा बहु धन्य कैसा
     गोवर्धनोहि हरिचा बहु भक्त श्रेष्ठ ।
तो हर्षतो नित पदे पडताच तेथे
     स्नानास देइ अपुले जल श्रीहरीस ।
हर्षीत हो‍उनि पहा तृण दे चराया
     विश्राम कंद मुळ अर्पुनि धन्य होतो ॥ १८ ॥

हंत अबलाः - हे सख्यांनो - यत् - ज्याअर्थी - रामकृष्ण - बळराम व कृष्ण यांच्या - चरणस्पर्श - चरणस्पर्शाने - प्रमोदः (अस्ति) - झाला आहे आनंद ज्याला असा आहे - यत् (च) - आणि ज्याअर्थी - सहगोगणयोः तयोः - गोसमूहासह त्या रामकृष्णांना - पानीयसूयवस - पिण्याचे पाणी, उत्तम तृणे, निवांत स्थाने - कंदरकंदमूलैः - व कंदमुले इत्यादिकांच्या योगाने - मानं तनोति - बहुमान देत आहे - अयं अद्रिः - हा गोवर्धन पर्वत - हरिदासवर्यः - हरिभक्तांत श्रेष्ठ होय. ॥१८॥

अग गोपींनो ! हा गोवर्धन भगवंतांच्या भक्तांमध्ये श्रेष्ठ आहे. धन्य आहे याचे भाग्य ! श्रीकृष्ण-बलरामांच्या चरणकमलांचा स्पर्श झाल्याने हा किती आनंदित होतो पहा ! हा गोपाल आणि गाई यांच्यासह या दोघांचाही मोठाच सत्कार करतो. तो त्यांना पाणी देतो, गाईंसाठी गवत देतो. विश्रांतीसाठी गुहा आणि खाण्यासाठी कंदमुळे देतो. (१८)

विवरण :- गोपी आपल्या नशीबास सतत बोल लावतात. श्रीकृष्णाच्या सहवासास त्या आतुर झाल्या आहेत, पण तो त्यांना न मिळता मिळतो कुणास ? तर सामान्य भिल्लीणींस - त्या भिल्लीणी अरण्यात जातात, त्याच वाटेने श्रीकृष्ण आणि बलरामहि आधी गेलेले असतात. कृष्णाच्या चरणास लागलेला कुंकुमाचा लेप त्या स्त्रिया आपल्या स्तनाग्रास लाऊन आपली कामविव्हलता कमी करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना हे सुख मिळते, पण आपणांस नाही याचे वैषम्य गोपींना वाटते. (१८)



गा गोपकैरनुवनं नयतोरुदार
     वेणुस्वनैः कलपदैस्तनुभृत्सु सख्यः ।
अस्पन्दनं गतिमतां पुलकस्तरुणां
     निर्योगपाशकृत लक्षणयोर्विचित्रम् ॥ १९ ॥
हा सावळा हरि तसा बळि गौर‍अंग
     यांची गतीच सगळी अति वेगळी की ।
दावे धरोनि करि श्रीहरि हाकरीता
     गातात बाळ तदि वंशिहि वाजवीता ।
ती माणसे स्थिरति ती पशुपक्षि सारे
     रोमांचितेचि तनुशी अशि वंशि त्याची ।
वृक्षींहि रोम उठती बघ की सखे गे
     जादूच ती ममचि गे गमते मनासी ॥ १९ ॥

सख्यः - हे मैत्रिणींनो - गोपकैः (सह) गाः - गोपाळांसह गाईंना - अनुवनं नयतः - एका वनातून दुसर्‍या वनात नेणार्‍या - निर्योगपाशकृत - गाईंच्या पायाला बांधण्याच्या दोर्‍यांनी - लक्षणयोः - चिन्हित अशा रामकृष्णांच्या - कलपदैः उदारवेणुस्वनैः - मधुर स्वराच्या अशा मोठ्या वेणुनादाने - तनुभृत्सु - शरीरधार्‍यांमध्ये चालणार्‍या - गतिमतां आस्पंदनं - प्राण्यांचे थांबत थांबत चालणे - तरूणां पुलकः - व वृक्षांना रोमांच उभे रहाणे हे - विचित्रं - अति आश्चर्यकारक होय. ॥१९॥

अग सख्यांनो ! जेव्हा हे डोक्याला (गाईची धार काढतेवेळी पायाला बांधण्याची) दोरी गुंडाळून आणि खांद्यावर फासा टाकून गोपाळांबरोबर गाईंना एका वनातून दुसर्‍या वनात हाकत जातात, आणि त्याचवेळी मधुर बासरीही वाजवतात, तेव्हा चालणारे देहधारी स्तब्ध होतात आणि अचल वृक्षसुद्धा रोमांचित होतात. (१९)


( अनुष्टुप् )
एवंविधा भगवतो या वृन्दावनचारिणः ।
वर्णयन्त्यो मिथो गोप्यः क्रीडास्तन्मयतां ययुः ॥ २० ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां दशमस्कन्धे पूर्वार्धे एकविंशोऽध्यायः ॥ २१ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
( अनुष्टुप् )
खेळ वृंदावनी ऐसे कृष्णाच्या कैक त्या लिला ।
वर्णिता तन्मयी होता गोपिका आपसी अशा ।
वर्णिता भगवत्‌कीर्ती हृदया स्फूर्ति ये तयां ॥ २० ॥
॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर एकविसावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

एवंविधाः याः - याप्रकारच्या ज्या - वृंदावनचारिणः - वृंदावनात संचार करणार्‍या - भगवतः क्रीडाः - श्रीकृष्णाच्या लीला - (ताः) मिथः - त्या आपआपसांत - वर्णयंत्यः गोप्यः - वर्णन करणार्‍या गोपी - तन्मयतां ययुः - श्रीकृष्णमय झाल्या. ॥२०॥

वृंदावनविहारी श्रीकृष्णांच्या अशा एक नव्हे तर, अनेक लीलांचे आपापसात वर्णन करता करता गोपी तन्मय होऊन जात. (२०)

विवरण :- गोपींच्या मते कृष्णाला योगसिद्धी प्राप्त आहे. केवळ त्यालाच नाही, तर त्याच्या मुरलीलाहि, कारण तिचे स्वर ऐकून हिंडणार्‍या गायी तटस्थ उभ्या रहातात आणि अचल वृक्षांना (शाखारूपी) रोमांच येतात. थोडक्यात स्थावराला जंगम आणि जंगमाला स्थावर बनविणारा हा श्रीकृष्ण म्हणजे सिद्धीप्राप्त योगीच. (२०)



अध्याय एकविसावा समाप्त

GO TOP