|
श्रीमद् भागवत पुराण प्रावृड्वर्णनं शरद्वर्णनं च - वर्षा आणि शरद ऋतूंचे वर्णन - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् ) तयोस्तदद्भुतं कर्म दावाग्नेर्मोक्षमात्मनः । गोपाः स्त्रीभ्यः समाचख्युः प्रलम्बवधमेव च ॥ १ ॥
( अनुष्टुप् ) श्रीशुकदेव सांगतात - बाळगोपाळ गेहासी जाता माता भगीनिसी । दावानल प्रलंबादी अद्भूत कर्म बोलले ॥ १ ॥
गोपाः - गोप - आत्मनः दावाग्नेः मोक्षं - आपली वणव्यातून मुक्तता - प्रलंबवधं एव च - आणि तसेच प्रलंबासुराचा वध - इति - अशा प्रकारचे - तयोः तत् अद्भुतं कर्म - त्या बलराम व श्रीकृष्ण ह्या दोघांचे ते विलक्षण कर्म - स्त्रीभ्यः समाचख्युः - स्त्रियांना सांगते झाले. ॥१॥
श्रीशुकदेव म्हणतात - गोपाळांनी घरी आल्यावर घरातील स्त्रियांना श्रीकृष्ण आणि बलरामांची प्रलंबाला मारणे, आपल्याला वणव्यातून सोडवणे इत्यादि अलौकिक कृत्ये सांगितली. (१)
गोपवृद्धाश्च गोप्यश्च तदुपाकर्ण्य विस्मिताः ।
मेनिरे देवप्रवरौ कृष्णरामौ व्रजं गतौ ॥ २ ॥
मोठ मोठेहि गोपाळ लीला या रामकृष्णच्या । स्तिमीत ऐकता झाले मानिता देव ते द्वय ॥ २ ॥
गोपवृद्धाः गोप्यः च - म्हातारे गोप व गोपी - तत् उपाकर्ण्य - ते श्रवण करून - विस्मिताः - आश्चर्यचकित झाल्या - च - आणि - कृष्णरामौ - कृष्ण व बलराम - व्रजं गतौ - यांना गोकुळात अवतरलेले - देवप्रवरौ मेनिरे - देवश्रेष्ठ मानिते झाले. ॥२॥
वृद्ध गोप आणि गोपी ते ऐकून आश्चर्यचकित झाल्या. ते सर्वजण मानू लागले की, "श्रीकृष्ण आणि बलरामाच्या वेषात आपल्याकडे आलेले हे कोणी मोठे देव आहेत." (२)
ततः प्रावर्तत प्रावृट् सर्वसत्त्वसमुद्भवा ।
विद्योतमानपरिधिः विस्फूर्जित नभस्तला ॥ ३ ॥
पुन्हा वर्षा ऋतू येता या काळी जीव वाढती । चंद्र सूर्या खळे लागे क्षुब्धती वायु मेघ ते ॥ ३ ॥
ततः - नंतर - सर्वसत्त्वसमुद्भवा - सर्व प्राण्यांच्या जीवनांचे उगमस्थान असा - विद्योतमानपरिधिः - प्रकाशमान खळी पडत आहेत ज्यात - विस्फुर्जितनभस्तला प्रावृट् - व मेघांच्या गडगडाटाने युक्त आहे आकाश ज्यात असा वर्षाकाल - प्रावर्तत - प्राप्त झाला. ॥३॥
यानंतर वर्षा ऋतू सुरू झाला. या ऋतूमध्ये सर्व प्रकारच्या प्राण्यांची अधिक वाढ होते. त्यावेळी सूर्य आणि चंद्र यांच्याभोवती वारंवार खळी दिसू लागली. ढग इत्यादिंमुळे आकाश क्षुब्ध दिसू लागले. (३)
विवरण :- प्रस्तुत अध्यायात महर्षींनी वर्षा आणि शरद ऋतूंचे वर्णन केले आहे. वर्षा ऋतू म्हणजे मेघांनी पृथ्वीला भरपूर प्रमाणात बहाल केलेली जलसंपत्ती. नद्या, सरोवरे तुडुंब भरलेली. पण पाणी मात्र गढूळ. तेच पाणी शरद ऋतूत मात्र शांत, स्वच्छ आणि स्थिर. या दोनहि ऋतूंचे यथातथ्य वर्णन करताना महर्षी त्यावर आध्यात्मिक वर्णनाचा साज चढवितात. (३ )
सान्द्रनीलाम्बुदैर्व्योम सविद्युत् स्तनयित्नुभिः ।
अस्पष्टज्योतिः आच्छन्नं ब्रह्मेव सगुणं बभौ ॥ ४ ॥
आकाशी दाटती मेघ चाले विद्यूत तांडवा । गड्गडाट सदा होतो झाकती चंद्र सूर्य ते । ब्रह्मस्वरूप आत्म्याला झाकी माया गुणे जशी ॥ ४ ॥
सविद्युत्स्तनयित्नुभिः - विजांच्या गडगडाटांनी युक्त - सान्द्रनीलांबुदैः आच्छन्नं - अशा निळ्या मेघांनी व्याप्त असे - अस्पष्टज्योतिः व्योमः - स्पष्ट नाहीत तेजोगोल ज्यातील असे आकाश - सगुणं ब्रह्म इव - गुणयुक्त ब्रह्माप्रमाणे - बभौ - शोभले. ॥४॥
काळ्या दाट धगांमुळे व गडगडाट करणार्या विजांनी व्यापलेल्या आकाशातील सूर्य, चंद्र आणि तारे झाकोळून जातात. त्यामुळे आकाश, गुणांनी झाल्या गेलेल्या जीव नामक ब्रह्माप्रमाणे दिसू लागते. (सत्त्वगुणी वीज, रजोगुणी गडगडाट व तमोगुणी ढग आणि ब्रह्मस्वरूप आकाश अशी ही उपमा आहे.) (४)
विवरण :- आकाश काळ्याभोर मेघांनी व्यापले आणि त्यामुळे सूर्य-चंद्राचे तेज क्षीण झाले. वास्तविक आकाशाचा मूळ रंग निळा. पण काही काळ त्यावर काळ्या मेघाचे आवरण आल्याने तो काळा भासतो. तसेच तेजस्वी चंद्र-सूर्यावर काळे मेघ आच्छादल्याने त्यांचा प्रकाश क्षीण होतो. पण ही स्थिती काही काळच टिकते. मेघ दूर झाल्यावर ते पुन्हा पूर्ववत् होतात. अज्ञान-माया यांच्यामुळे खरे ज्ञान, मुक्ति यांच्या प्राप्तीमध्ये अडथळा येतो. निर्गुणावर सगुणाचे सावट येते. पण काही कालच. खर्या ज्ञानप्राप्तीने हे काही काळ आलेले सावट दूर होते. त्याचप्रमाणे मूळ निर्गुण असणारा ब्रह्मा अज्ञानाने काही काळ सगुण वाटतो. पण नंतर तो आपल्या मूळ रूपास प्राप्त होतो. (४)
अष्टौ मासान् निपीतं यद् भूम्याश्चोदमयं वसु ।
स्वगोभिर्मोक्तुमारेभे पर्जन्यः काल आगते ॥ ५ ॥
पृथिवीरूप लोकांना सूर्य राजापरी पहा । शोषितो आठ ते मास वाटी पाणी आता पुन्हा ॥ ५ ॥
यत् - जे - भूम्याः - भूमीचे - उदमयं वस्तु - उदकरूपी द्रव्य - अष्टौ मासान् - आठ महिने - स्वगोभिः - आपल्या किरणांनी - पीतम् - प्याले गेले - तत् - ते - पर्जन्यः - पावसाची देवता - काले आगते - योग्यकाळ आला असता - मोक्तुं आरेभे - सोडण्याचा आरंभ करिती झाली. ॥५॥
राजाप्रमाणे सूर्याने पृथ्वीरूप प्रजेकडून आठ महिनेपर्यंत पाण्याच्या रूपाने जो कर वसूल केला होता, तो वेळ आल्यावर सूर्य आपल्या किरणरूपी हातांनी पुन्हा वाटू लागला. (५)
तडिद्वन्तो महामेघाः चण्ड श्वसन वेपिताः ।
प्रीणनं जीवनं ह्यस्य मुमुचुः करुणा इव ॥ ६ ॥
जनांचे दुःख पाहोनी दयाळू त्रासता तयां । अर्पिती सर्वच्या सर्व तसे ते जल वर्षिती ॥ ६ ॥
तडिद्वंतः - विजांनी युक्त - चंडश्वसनवेपिताः - व वार्याच्या सोसाटयाने कंपित होणारे - महामेघाः हि - प्रचंड मेघसुद्धा - अस्य प्रीणनं जीवनं - ह्या जगाचे प्राणरूपी जल - करुणाः इव मुमुचुः - कृपाळु होऊनच की काय वर्षते झाले. ॥६॥
जसे दयाळू लोक दुःखी लोकांसाठी आपले प्राणसुद्धा समर्पित करतात. त्याप्रमाणे विजा असलेले ढग वेगवान वार्याच्या प्रेरणेने प्राण्यांना तृप्त करणारे आपले जीवन (पाणी) देऊ लागतात. (६)
तपःकृशा देवमीढा आसीद् वर्षीयसी मही ।
यथैव काम्यतपसः तनुः सम्प्राप्य तत्फलम् ॥ ७ ॥
ग्रीष्मामध्ये सुके भूमी आता ती हिरवी दिसे । तप ते संपता सर्व पुष्टतो देह तो जसा ॥ ७ ॥
यथा एव - ज्याप्रमाणे - काम्यतपसः तनुः - काही हेतूने तपश्चर्या करणार्याचे शरीर - तत्फलं - त्या तपश्चर्येचे फळ - संप्राप्य - प्राप्त झाल्यावर पुष्ट होते त्याप्रमाणे - तपःकृशा मही - ग्रीष्म काळाने कृश झालेली पृथ्वी - देवमीढा वर्षीयसी आसीत् - पर्जन्य पडल्यामुळे पुष्ट झाली. ॥७॥
जसे सकाम भावाने तपश्चर्या करणार्यांचे शरीर आधी दुर्बळ होते, परंतु तेच फळ मिळताच पुष्ट होते, त्याप्रमाणे उन्हात वाळलेली जमीन पावसाच्या पाण्याने ओलीचिंब होऊन पुन्हा फुगली. (७)
निशामुखेषु खद्योताः तमसा भान्ति न ग्रहाः ।
यथा पापेन पाखण्डा न हि वेदाः कलौ युगे ॥ ८ ॥
घन नी घनअंधारी काजवे ते प्रकाशती । जसे ते माजता पाप पाखंडी मत तेज हो ॥ ८ ॥
यथा कलौ युगे - ज्याप्रमाणे कलियुगात - पापेन पाखंडाः (दृश्यन्ते) - पापामुळे पाखंडवाद दृष्टीस पडतात - वेदाः नहि - वेद दृग्गोचर होत नाहीत - तथा - त्याप्रमाणे - तमसा निशामुखेषु - मेघाच्या दाट छायेने संध्याकाळी - खद्योताः भांति - काजवे प्रकाशत होते - ग्रहाः न (भान्ति) - ग्रह दिसत नव्हते. ॥८॥
कलियुगात पापाचे सामर्थ्य वाढल्याने पाखंड मत वाढून वैदिक संप्रदाय लोप पावतो, त्याप्रमाणे पावसाळ्यातील संध्याकाळच्या वेळी ढगांमुळे अंधार पसरल्यामुळे काजवे चमकतात. तारे चमकत नाहीत. (८)
श्रुत्वा पर्जन्यनिनदं मण्डुकाः व्यसृजन् गिरः ।
तूष्णीं शयानाः प्राग् यद्वद् ब्राह्मणा नियमात्यये ॥ ९ ॥
बेडूक करिती ड्राँव घनांचा ऐकता ध्वनी । निवृत्तहि जसे शिष्य गुर्वाज्ञे वेद वाचिती ॥ ९ ॥
यद्वत् नियमावसाने - ज्याप्रमाणे नित्यकर्माच्या शेवटी - ब्राह्मणाः (अधीयते तथा) - ब्राह्मण वेदाध्ययन करितात त्याप्रमाणे - प्राक् तूष्णीं शयानाः - पूर्वी स्वस्थ निजून राहिलेले - मंडूकाः - बेडूक - पर्जन्यनिनदं श्रुत्वा - मेघनाद श्रवण करून - गिरः व्यसृजन् - शब्द करते झाले. ॥९॥
जसे नित्य नैमित्तिक कर्मे आटोपल्यानंतर गुरूंच्या आज्ञेनुसार ब्रह्मचारी शिष्य वेदपठण करू लागतात, तसे जे बेडूक आधी गुपचूप झोपून पडले होते, ते आता ढगांची गर्जना ऐकून डराव डराव करू लागले. (९)
विवरण :- ज्याप्रमाणे नित्यकर्म झाल्यानंतर आचार्यांचा आवाज ऐकून शिष्य अध्ययनास प्रारंभ करतात, (आचार्यांच्या सान्निध्यात अध्ययन करण्याची वाट पहातात.) त्याप्रमाणे पावसाचा आवाज ऐकून बेडूक ओरडण्यास सुरवात करतात. (अवर्षण पडल्याने वसिष्ठांनी 'वारीकर इष्टि' करवून पाऊस पाडला. त्यावेळी बेडूक ओरडू लागले. बेडकांचे ओरडणे पावसाचे सूचक मानले जाते. वेदात 'मंडूक' सूक्त आहे. 'मांडूक्य' उपनिषदाचा वक्ता एक मंडूक आहे, असे मानले जाते. बेडूक वेद म्हणतात, असेही म्हणतात. म्हणजेच बेडकांच्या ओरडण्याच्या आवाजाशी वेदांच्या मंत्रोच्चारणाच्या आवाजाचे साम्य असावे.) (९)
आसन् उत्पथवाहिन्यः क्षुद्रनद्योऽनुशुष्यतीः ।
पुंसो यथास्वतंत्रस्य देहद्रविण सम्पदः ॥ १० ॥
ग्रिष्मीं जे आटले नाले वाहती ते भरोनिया । पाप्यांचे धन ते जैसे कुमार्गी वाहते तसे ॥ १० ॥
यथा अस्वतन्त्रस्य पुंसः - ज्याप्रमाणे स्वतःच्या आधीन नसलेल्या पुरुषाला - देहद्रविणसंपदः - शरीर, संपत्ति व धन - उत्पथगामिनः कुर्वन्ति तथा - वाईट मार्गाकडे नेतात त्याप्रमाणे - अनुशुष्यतीः क्षुद्रनद्यः - सुकून गेलेल्या बारीकसारीक नद्या - उत्पथवाहिन्यः आसन् - आपल्या मर्यादेच्या बाहेर वाहणार्या झाल्या. ॥१०॥
जसे इंद्रियांवर ताबा नसलेल्या माणसाची शरीर, धन इत्यादि संपत्ती कुमार्गाकडे जाते, तशा सुकून गेलेल्या लहान लहान नद्या आता पात्र सोडून वाहू लागल्या. (१०)
विवरण :- इंद्रियांच्या आहारी गेलेला रजोगुणी मनुष्य (अस्वतंत्र) उपभोगाने फुगत जातो. (त्याची सर्व संपत्ती त्याच्या स्वतःच्या उपभोगासाठीच उपयोगी पडते. इतरांना दान करून ती कमी होत नाही. जितेंद्रिय मात्र संपत्तीचा विनियोग इतरांसाठी करतो. त्यामुळे ती कमी होत जाते.) संयम नसल्याने अशा व्यक्तीची भोगेच्छाहि प्रबळ होत जाते. त्याचप्रमाणे ग्रीष्मात कोरडया पडलेल्या नद्या वर्षा ऋतूमध्ये तीर ओलांडून, दुथडी भरून वाहू लागतात. (तीर ओलांडणे, हे एक प्रकारे मर्यादेचे उल्लंघनच करणे.) (१०)
हरिता हरिभिः शष्पैः इन्द्रगोपैश्च लोहिता ।
उच्छिलीन्ध्रकृतच्छाया नृणां श्रीरिव भूरभूत् ॥ ११ ॥
दाटते हरळी कोठे कुत्र्यांचे छत्र ते कुठे । रोहिणी कीट ते लाल जशी सेनाच चालती ॥ ११ ॥
हरिभिः शष्पैः हरिता - हिरव्या कोवळ्या गवतांनी हिरवीगार झालेली - च इंद्रगोपैः - आणि इंद्रगोप नामक - च लोहिताः - किडयांनी तांबडी झालेली - उच्छिलीन्ध्रकृत - अलभी नावाच्या छत्राकार वनस्पतींनी केली आहे - छाया भूः - छाया जीवर अशी पृथ्वी - नृणां श्रीः इव अभूत् - राजांच्या वैभवाप्रमाणे झाली. ॥११॥
हिरवळीने हिरवीगार झालेली, काही ठिकाणी पावसाळी किड्यांनी लाल दिसणारी आणि काही ठिकाणी पांढर्या छत्र्या उगवलेली जमीन अशी दिसत होती की, जणू एखाद्या राजाची रंगीबेरंगी सेनाच ! (११)
विवरण :- राजाचे सैन्य रंगीबेरंगी वस्त्रे धारण करते. त्याप्रमाणे पावसाने तृप्त झालेली धरणी निरनिराळ्या रंगांच्या फुलांनी आच्छादित होते. पावसाळ्यात छत्र्या उगवल्याने ती 'छत्रधारिणी' ही होते. एकाच भूमीतून अनेक प्रकारची निरनिराळ्या रंगांची फुले निर्माण होतात. एकाच चेतनातून नाना विकारहि निर्माण होतात. (११)
क्षेत्राणि शष्यसम्पद्भिः कर्षकाणां मुदं ददुः ।
मानिनां उनुतापं वै दैवाधीनं अजानताम् ॥ १२ ॥
शेतात डोलते धान किसाना हर्ष जाहला । सावकार जसा चित्ती वेठीस धरणे स्मरे ॥ १२ ॥
क्षेत्राणि - शेते - सस्यसंपद्भिः - धान्याच्या विपुलतेमुळे - कर्षकाणां मुदं ददुः - शेतकर्यांना आनंद देती झाली - सर्वं च दैवाधीनं - आणि सर्व दैवाधीन आहे - अजानतां धनिनां - हे न जाणणार्या धनिक लोकांना - उपतापं (ददुः) - संताप देती झाली. ॥१२॥
शेते धान्यसंपत्तीने शेतकर्यांना आनंद देत होती, पण तीच सर्व काही प्रारब्धाच्या अधीन आहे हे न जाणणार्या धनिकांच्या मनात मात्र मत्सर उत्पन्न करीत होती. (कारण आता ते त्यांना कर्जाच्या जोरावर मुठीत ठेवू शकत नव्हते.) (१२)
विवरण :- कर्तव्यभावनेने आणि परमेश्वरी कृपेवर दृढ श्रद्धा ठेवून जमिनीची मशागत करणार्या शेतकर्याला (पिकाच्या रूपाने) योग्य ते फळ मिळते. पण शंकित भावनेने, (योग्य तेवढी आणि योग्य त्या वेळी वृष्टि होईल की नाही ?) अहंकाराने (परमेश्वरी कृपेवर श्रद्धा न ठेवणारे) जे आधी मशागत करत नाहीत, ते नंतर पश्चात्ताप पावतात. म्हणजेच अभिमान (गर्व) आणि अज्ञान या दोन गोष्टी सोडून परमेश्वरावर दृढ श्रद्धा ठेवणार्यालाच त्याची प्राप्ती होते. (१२)
जलस्थलौकसः सर्वे नववारिनिषेवया ।
अबिभ्रन् रुचिरं रूपं यथा हरिनिषेवया ॥ १३ ॥
नवे ते जल प्राशोनी प्राण्यां सौंदर्य वाढले । आत बाहेर कृष्णाचे जसे रूप प्रकाशते ॥ १३ ॥
यथा हरिनिषेवया - जसे परमेश्वराच्या सेवेने - सर्वे जलस्थलौकसः - पाण्यात व जमिनीवर राहणारे सर्व प्राणी - नववारिनिषेवया - नूतन उदकाच्या सेवनाने - रुचिरं रूपं अबिभ्रत् - सुंदर रूप धारण करते झाले. ॥१३॥
पावसाचे नवीन पाणी सेवन करून जलचर आणि स्थलचर प्राणी यांचे सौंदर्य वाढले होते. जसे भगवंतांची सेवा केल्याने अंतर्बाह्य सौंदर्य वाढते. (१३)
विवरण :- ग्रीष्मातील कडक तापाने सर्व चराचर सृष्टि होरपळून जाते; पण वर्षा ऋतूतील जलवृष्टिने सर्व प्राणीमात्रास नव संजीवन मिळते. शरीरातील सर्व अस्वच्छता, दोष, मल, पाण्याने नाहीसे होऊन ते अंतर्बाह्य शुद्ध होते; त्याप्रमाणे परमेश्वर सेवेने अज्ञान दूर होऊन मन-हृदय निर्दोष होते. भक्ताच्या मनातील वाईट विचार, पापभावना नाहीशी होते. (१३)
सरिद्भी सङ्गतः सिन्धुः चुक्षोभ श्वसनोर्मिमान् ।
अपक्वयोगिनश्चित्तं कामाक्तं गुणयुग् यथा ॥ १४ ॥
वार्याने उदधी माजे नद्यांचा ओघ त्यात हा । विषयी याजला भोग लाभता माजतो जसा ॥ १४ ॥
यथा अपक्वयोगिनः चित्तं - ज्याप्रमाणे अपूर्ण आहे योग ज्याचा अशाचे चित्त - कामाक्तं - भोगाच्या इच्छेने थबथबलेले - गुणयुक् (च भवति) - व विषयांच्या विचाराने युक्त असते - सरिद्भिः संगतः सिंधुः - नद्यांनी युक्त असा समुद्र - श्वसनोर्मिमान् (भूत्वा) - वार्यामुळे भयंकर लाटांनी युक्त होऊन चुक्षुभे - क्षुब्ध झाला. ॥१४॥
ज्याप्रमाणे वासनायुक्त योग्याचे चित्त विषयांशी संपर्क होताच कामनांनी उद्दीप्त होते, त्याप्रमाणे तुफानी वार्याने उसळणार्या लाटांनी खवळलेला समुद्र नद्यांचे पाणी मिळाल्याने आणखीनच खवळला. (१४)
विवरण :- वार्याच्या वेगाने, वादळाने समुद्रात मोठमोठया लाटा निर्माण होतात. अपरिपक्व मन चंचल असते. मोहाच्या अधीन होते. वास्तविक योगी सत्त्वगुणाने युक्त हवा. त्याने स्थिरचित्ताने साधना केल्यावरच त्याला परमेश्वरप्राप्तीची शक्यता. पण त्याचे मन जर अपरिपक्व, चंचल असेल तर ते रजोगुणाच्या अधीन होईल, वासनेच्या वादळाने विषयांध होईल. म्हणूनच त्याचे मन स्थिर, शांत व परमेश्वर चरणी लीन हवे. (१४)
गिरयो वर्षधाराभिः हन्यमाना न विव्यथुः ।
अभिभूयमाना व्यसनैः यथा अधोक्षजचेतसः ॥ १५ ॥
पर्जन्य वर्षता भारी पर्वतां नच त्रास तो । जैं चित्त हरिच्या पायी लाविता दुःख ना मिळे ॥ १५ ॥
यथा अधोक्षजचेतसः - ज्याप्रमाणे परमेश्वराकडे आहे मन ज्यांचे असे - व्यसनैः - व्यसनांनी - अभिभूयमानाः - पराजित केलेले असताहि - (न व्यथन्ते) - व्यथित होत नाहीत - वर्षधाराभिः हन्यमानाः गिरयः - पर्जन्यांच्या धारांनी ताडिलेले पर्वत - न विव्यथुः - पीडित झाले नाहीत. ॥१५॥
ज्यांनी आपले चित्त भगवंतांना समर्पित केले आहे, त्यांना ज्याप्रमाणे दुःखाचे डोंगर कोसळले तरी कोणत्याही प्रकारची व्यथा होत नाही, त्याचप्रमाणे मुसळधार पावसाचे आघात होत असतानाही पर्वतांना काहीच व्यथा होत नव्हती. (१५)
विवरण :- आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक असे तीन प्रकारचे ताप (तापत्रय) असतात. यांच्यायोगे मनुष्य जीवनात त्रासून जातो. पण परमेश्वरभक्ती या त्रासातून त्याला तारून नेते; निदान सर्व ताप सहन करण्याची शक्ती तरी त्याला मिळते. पावसाच्या मार्यातही पर्वत स्थिर रहातो. त्याप्रमाणे तो स्थिर, संयमी व शांत बनतो. (१५)
मार्गा बभूवुः सन्दिग्धाः तृणैश्छन्ना ह्यसंस्कृताः ।
नाभ्यस्यमानाः श्रुतयो द्विजैः कालहता इव ॥ १६ ॥
पायवाटा तृणे सार्या झाकती नच चालता । द्विजाती वेद अभ्यास विसरे वाचता न जैं ॥ १६ ॥
द्विजैः न अभ्यस्यमानाः - ब्राह्मणांकडून अध्ययन न झाल्यामुळे - (अतः एव) कालहताः श्रुतयः इव - कालाने नष्टप्राय झालेल्या वेदांप्रमाणे - असंस्कृताः (अतः एव) - न वहिवाटल्यामुळे म्हणून - तृणैः छन्नाः मार्गाः - गवताने झाकून गेलेले रस्ते - संदिग्धाः वै बभूवुः - खरोखर अस्पष्ट झाले. ॥१६॥
जरे द्विजांनी वेदांचा अभ्यास केला नाही तर कालांतराने ते विसरतात, त्याप्रमाणे ज्या वाटा साफ केलेल्या नव्हत्या, त्या गवताने झाकून गेल्यामुळे ओळखणे अवघड झाले. (१६)
विवरण :- 'अभ्यास' याचा अर्थ एखाद्या गोष्टीची सतत सवय ठेवणे, थोडक्यात उजळणी करणे, वाचलेले, पाठ केलेले वेद इ.चे ज्ञान पुन्हा पुन्हा न वाचल्याने विस्मृतीत जाते; त्याप्रमाणे नेहमीचा येण्या-जाण्याचा मार्ग गवताने आच्छादला, तर ओळखू येत नाही. हा तोच मार्ग का ? असा संभ्रम निर्माण होतो. मग वाढलेले गवत काढून तो मार्ग नेहमी साफ ठेवल्याने येण्या-जाण्यास योग्य बनतो. (१६)
लोकबन्धुषु मेघेषु विद्युतश्चलसौहृदाः ।
स्थैर्यं न चक्रुः कामिन्यः पुरुषेषु गुणिष्विव ॥ १७ ॥
परोपकारि ते मेघ विजा त्या स्थीर ना तिथे । प्रेमिका कामिनी जैशी गुणवंती न स्थीरते ॥ १७ ॥
लोकबंधुषु मेघेषु - जनांचे मित्र अशा मेघांच्या ठिकाणी - चलसौहृदः विद्युतः - चंचल आहे मित्रत्व ज्याचे अशा विजा - कामिन्यः - जशा वेश्या - गुणिषु पुरुषेषु इव - गुणी पुरुषांच्या ठिकाणी त्याप्रमाणे - स्थैर्यं न चक्रुः - स्थिरपणा ठेवित्या झाल्या नाहीत. ॥१७॥
मेघ जरी लोकोपचारी असले तरी चंचल विजा त्यांच्यामध्ये स्थिर राहात नाहीत. जसे चंचल स्वभाव्याच्या स्त्रिया, पुरुष गुणी असले तरी त्यांच्याजवळ स्थिर चित्ताने राहात नाहीत. (१७)
विवरण :- वीज मेघाची प्रिया - ती चंचलतेचेहि प्रतीक. ती कायमस्वरूपी मेघाजवळ रहात नाही. क्षणभरच लखलखते आणि दिसेनाशी होते. मेघ औदार्याचे प्रतीक. आपल्याजवळील जलरूपी धनाचे दान करून तो रिक्त होतो. (रिक्ताः भवन्ति भरिताः भरिताश्च रिक्ताः) त्याच्याजवळील सर्व जलरूपी धनाचा साठा दुसर्यासाठीच असतो. कदाचित अशाप्रकारचे हे उदार निर्धनत्व चंचल दामिनीस पसंत नसावे. म्हणून ती फार काळ त्याच्याजवळ रहात नाही. तसेच चंचल स्वभावाच्या स्त्रिया गुणवान परंतु (दान करून) निर्धन बनलेल्या पुरुषाजवळ कायम रहात नाहीत. त्यांना गुणांपेक्षा संपत्ती अधिक प्रिय असते. असे इथे सुचवायचे असावे. अस्थिरचित्त, संपत्तीप्रिय स्त्रिया आणि चंचल दामिनी यांच्यातील साम्य दाखवून अशा स्त्रियांचा संग प्रयत्नपूर्वक टाळणेच योग्य असा व्यावहारिक सल्ला देण्याचाहि महर्षींचा हेतू असावा. (१७)
धनुर्वियति माहेन्द्रं निर्गुणं च गुणिन्यभात् ।
व्यक्ते गुणव्यतिकरे अगुणवान् पुरुषो यथा ॥ १८ ॥
आकाश दाटते मेघे दिसे इंद्र धनू तयी । रज सत्वादी क्षोभाने निर्गूण ब्रह्म जैं खुले ॥ १८ ॥
च - आणि - यथा - ज्याप्रमाणे - गुणव्यतिकरे व्यक्ते - गुणांच्या मिश्रणाने युक्त अशा प्रपंचाच्या ठिकाणी - अगुणवान् पुरुषः (भाति) - निर्गुण पुरुष प्रकाशतो - गुणिनि वियति - मेघगर्जनारूप गुणांनी युक्त आकाशात - निर्गुणं माहेंद्रं - ज्याला दोरी नाही असे - धनुः अभात् - इंद्रधनुष्य प्रकाशित झाले. ॥१८॥
शब्दगुणयुक्त आकाशात निर्गुण (दोरी नसलेले) इंद्रधनुष्य शोभत होते, जसे त्रिगुणांच्या क्षोभामुळे व्यक्त होणार्या जगाच्या पसार्यात अव्यक्त निर्गुण ब्रह्म शोभत असावे. (१८)
विवरण :- 'गुण' शब्दावर इथे श्लेष आहे. गुण = धनुष्याची दोरी (प्रत्यंचा), गुण - त्रिगुण (सत्त्व, रज, तम) निळ्या आकाशात दोरी नसणारे इंद्रधनुष्य शोभू लागले. (इंद्रधनु सप्तरंगी आकार धनुष्यासारखा असला तरी त्यास मूळ धनुष्यासारखी दोरी प्रत्यंचा - नसते.) हे धनुष्य कसे शोभून दिसते ? याचे वर्णन केले आहे. सृष्टिकर्ता नारायण. तो सृष्टिच्या निर्मितीपूर्वी निर्गुण. परंतु सृष्टिनिर्मितीनंतर सगुण. (सत्त्व, रज, तम या तीन गुणांपैकी सत्त्वगुणाने युक्त) वाटतो. 'शब्द' हा आकाशाचा गुण. ते या गुणाने निळ्या रंगाने व मेघगर्जनेने युक्त अशा आकाशात 'निर्गुण' म्हणजेच दोरी नसलेले इंद्रधनुष्य शोभून दिसते. (१८ )
न रराजोडुपश्छन्नः स्वज्योत्स्नाराजितैर्घनैः ।
अहंमत्या भासितया स्वभासा पुरुषो यथा ॥ १९ ॥
चांदण्यात दिसे मेघ मेघ तो चंद्र झाकितो । अहंकार जसा झाकी पुरुषीगुण सर्व ते ॥ १९ ॥
यथा पुरुषः - ज्याप्रमाणे जीव - स्वभासा - आपल्या चैतन्यानेच - भासितया अहंमत्या - प्रकाशित होणार्या अहंकाराने - तथा - त्याप्रमाणे - स्वज्योत्स्नाराजितैः घनैः - आपल्या चांदण्याने प्रकाशमान अशा मेघांनी - छन्नः उडुपः - आच्छादलेला नक्षत्रांचा स्वामी चंद्र - न रराज - शोभला नाही. ॥१९॥
ज्याप्रमाणे स्वतःच्या चैतन्याने प्रकाशित होणारा अहंकारच जीवाला झाकून ठेवतो, त्याचप्रमाणे चंद्राच्या किरणांनी ढगांचे अस्तित्व दिसत असूनही तेच ढग चंद्राला झाकून निस्तेज करू लागले. (१९)
विवरण :- ज्ञानी मनुष्य अहंकारी झाला की आत्मस्वरूप न जाणता स्वतःला व्यक्त करीत नाही. चंद्र मूळचा तेजस्वी. परंतु त्याच्यावर मेघांचे पटल आले की तो काही काळ निस्तेज होतो. पण काही काळच. मेघांचे आवरण दूर झाले की तो पुन्हा प्रकाशमान होतो. इथे चंद्र आणि ज्ञानी मनुष्य यांच्यात साम्य दाखविले आहे. ज्ञानी मनुष्य अहंकाराने इतरांपासून दूर-दूर राहतो. पण अहंकाराचे पटल दूर झाले की त्याचे ज्ञान प्रकट होते, सर्वोपयोगी होते. म्हणून ज्ञानासहि निस्तेज करणारा अहंकार सर्वस्वी त्याज्यच; असे इथे सुचवायचे आहे. (१९)
मेघागमोत्सवा हृष्टाः प्रत्यनन्दन् शिखण्डिनः ।
गृहेषु तप्ता निर्विण्णा यथाच्युतजनागमे ॥ २० ॥
रोम रोमी फुले मोर आकाशी ढग पाहता । नाचतो उत्सवी मानी नामे त्रीतापि मोदि जैं ॥ २० ॥
यथा - ज्याप्रमाणे - गृहेषु तप्ताः निर्विण्णाः - संसारतापाने तप्त झालेले दुःखी पुरुष - अच्युतजनागमे - परमेश्वराच्या भक्तांचा समागम झाला असता - तथा - त्याप्रमाणे - शिखंडिनः - मोर - मेघागमोत्सवाः - मेघांचे आगमन हाच आहे आनंदाचा प्रसंग ज्यांचा - हृष्टाः प्रत्यनंदन् - असे हर्षित झालेले आनंद करिते झाले. ॥२०॥
जसे गृहस्थीच्या जंजाळात अडकून दुःखी झालेले लोक भगवंतांच्या भक्तांच्या शुभागमनाने आनंदमग्न होऊन जातात, त्याप्रमाणे ढगांच्या शुभागमनाने आनंदित झालेले मोर केकारवांनी आणि नृत्याने आनंद प्रगट करीत होते. (२०)
विवरण :- आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक असे तीन प्रकारचे ताप (त्रिविध ताप) या तीनही तापांनी, विशेषतः संसारातील तापांनी सामान्य मनुष्य त्रस्त झालेला असतो.(प्रपंचदुःखे बहु शीणलो मी ।) त्यांच्या दुःखावर साधु-संतांचा सहवास हाच एकमेव उतारा असतो. या तापत्रयांमुळे विशेषतः सांसारिक तापांची कल्पना असल्यानेच संतमहात्मे संसाराकडे पाठ फिरवून विरक्तीचा मार्ग स्वीकारतात. पण हा मार्ग सामान्यांना थोडाच परवडणारा असतो ? दुःखाने त्रासल्यावर काही काळ त्यांना स्मशानवैराग्य येते, इतकेच. पुन्हा ते प्रपंचाकडे वळत्तातच. मात्र संत-सज्जनांचा सहवास त्यांचा त्रास निश्चितच सुसह्य बनवितो. (२०)
पीत्वापः पादपाः पद्भिः आसन्नानात्ममूर्तयः ।
प्राक् क्षामास्तपसा श्रान्ता यथा कामानुसेवया ॥ २१ ॥
ग्रिष्मात सुकले वृक्ष डोलती जल पीउनी । तप ते सरता जैसे पुष्टतो तपि तो जसा ॥ २१ ॥
यथा प्राक् क्षामाः - ज्याप्रमाणे पूर्वी क्षीण असलेले - तपसा श्रांताः - तपश्चर्येने थकलेले पुरुष - कामानुसेवया - विषयसेवनाने - तथा - तसे - पादपाः - वृक्ष - पद्भिः अपः पीत्वा - मुळांनी पाणी पिऊन - नानात्ममूर्तयः आसन् - नानाप्रकारची स्वरूपे धारण करणारे झाले.॥२१॥
जसे सकाम भावनेने तपश्चर्या करणारे सुरुवातीला कृश होतात परंतु कामना पूर्ण झाल्यावर पुष्ट होतात, तसे जे वृक्ष सुकून निष्पर्ण झाले होते, ते आता मुळांनी पाणी शोषून घेऊन पाना-फुलांनी डवरले होते. (२१)
विवरण :- ग्रीष्म ऋतूतील उन्हाने शुष्क झालेले वृक्ष वर्षा ऋतूत पाणी पिऊन तृप्त होतात, फळा-फुलांनी बहरतात, म्हणजेच नानात्मरुप होतात. काही काळ तपश्चर्या करून पुन्हा कामसेवन केल्याने पुरुष नानात्मरूप होतात म्हणजेच पुत्र-पौत्रादिंनी युक्त होतात. त्यांची भौतिक प्रगती होते. पण फलाशा ठेऊन केलेल्या तपाने आत्मिक उन्नती होत नाही. (२१ )
सरःस्वशान्तरोधःसु न्यूषुरङ्गापि सारसाः ।
गृहेष्वशान्तकृत्येषु ग्राम्या इव दुराशयाः ॥ २२ ॥
तळ्यात तट ते कांटे चिखले भरले तरी । न सारस त्यजी त्याला अशांत जल ते जरी । जसे संसारि गुंतोनी घरात राहती सदा ॥ २२ ॥
अङग - हे परीक्षित राजा - सारसाःअपि - चक्रवाक पक्षीही - अशांतरोधस्सु - चिखल व काटयांनी भरलेली आहेत तीरे ज्यांची - सरस्सु - अशा सरोवरांच्या ठिकाणी - दुराशयाः ग्राम्याः - दुष्ट अंतःकरणाचे क्षुद्र लोक - अशांत कृत्येषु - घोर आहेत कृत्ये जेथे - गृहेषु इव - अशा घरात ज्याप्रमाणे राहतात त्याप्रमाणे - न्यूषुः - आसक्त होऊन राहिले. ॥२२॥
परीक्षिता ! जसे विषयी पुरुष काम-धंद्याच्या व्यापामुळे घरात नेहमी बेचैन असतात, तरीसुद्धा घरातच पडून राहतात, त्याप्रमाणे तळ्यांचे काठ काटे-कुटे आणि पाण्याच्या प्रवाहामुळे साधारणतः त्रासदायकच असतात, तरीसुद्धा सारस पक्षी ते सोडीत नाहीत. (२२)
विवरण :- सामान्य संसारी जीव प्रपंच यातनामय असूनहि त्यातच लिप्त होऊन रहातो. यासाठी एक व्यावहारिक दाखला दिला आहे. सरोवराचा तीर काटयांनी आणि चिखलाने भरला आहे हे माहीत असूनहि सारस त्यातच रहातात, कारण त्यात जलचर, मासे इ. मिळण्याची त्यांना आशा असते. त्यातील पाणी त्यांना प्यायचे असते. त्याप्रमाणे संसारात कष्ट, त्रास, अशांती आहे; हे माहीत असूनहि सामान्य जीव वैषयिक सुखाच्या अभिलाषेने त्यातच अडकून राहतो. (२२ )
जलौघैर्निरभिद्यन्त सेतवो वर्षतीश्वरे ।
पाषण्डिनामसद्वादैः वेदमार्गाः कलौ यथा ॥ २३ ॥
वर्षा ऋतूत तो चंद्र अफाट वर्षितो जल । फुटती बांध शेतीचे नद्यांचेही तसेच ते । पाखंडी वेदमार्गा जै कलीमध्ये उलंघिती ॥ २३ ॥
यथा कलौ - ज्याप्रमाणे कलियुगात - पाखंडिनां असद्वादैः - पाखंडयांच्या मिथ्यावादांनी - वेदमार्गाः - श्रृतिदर्शित मार्ग - ईश्वरे वर्षति - इंद्र पर्जन्य पाडीत असता - जलौघैः - पाण्याच्या लोटांनी - सेतवः निरभिद्यन्त - पूल मोडून गेले.॥२३॥
जसे कलियुगामध्ये पाखंडी लोकांच्या निरनिराळ्या मिथ्या मतांमुळे वैदिक मार्ग शिथिल होतात, त्याप्रमाणे पावसाळ्यात इंद्राने पाऊस पाडल्यामुळे नद्यांचे आणि शेतांचे बांध फुटून गेले. (२३)
विवरण :- पाणी अडविण्यासाठी घातलेले मातीचे बांध हे काही काळच ते पाणी अडवू शकतात. इंद्र हा पर्जन्याचा स्वामी. त्याच्या कृपेने मुसळधार वृष्टी होऊ लागली की मातीचे बांध आपोआप वाहून जातात. त्याप्रमाणे वेदोक्त ज्ञान हे ईश्वरी आहे; श्रेष्ठ आहे. इतर पाखंडी मतांचे अनुकरण करू नये असे इथे सुचविले आहे. (२३ )
व्यमुञ्चन् वान्वायुभिर्नुन्ना भूतेभ्योऽथामृतं घनाः ।
यथाऽऽशिषो विश्पतयः काले काले द्विजेरिताः ॥ २४ ॥
प्रेरिता वायुने मेघ जलअमृत वर्षिती । प्रेरिता ब्राह्मणे जैसे धनीक दान अर्पिती ॥ २४ ॥
अथ यथा विश्पतयः - शिवाय ज्याप्रमाणे राजे लोक - काले काले - वेळोवेळी - द्विजेरिताः आशिषः - ब्राह्मणांनी उच्चारिलेल्या इच्छा - वायुभिः नुन्नाः मेघाः - वार्यांनी प्रेरिलेले मेघ - भूतेभ्यः अमृतं व्यमुञ्चन् - प्राण्यांना जल देते झाले. ॥२४॥
जसे ब्राह्मणांनी प्रेरणा दिल्यानंतर धनिक लोक वेळोवेळी दान करून प्रजेच्या इच्छा पूर्ण करतात, त्याप्रमाणे वार्याच्या प्रेरणेने ढग प्राण्यांसाठी अमृतमय पाण्याचा वर्षाव करू लागले. (२४)
विवरण :- पुरोहितांच्या प्रेरणेने राजेलोक प्रजेला दान करतात. वायुच्या प्रेरणेने (वायूने गति दिल्याने) मेघ वृष्टि करतात; उत्तम कार्य होण्यास योग्य व्यक्तीची प्रेरणा हवी, असे महर्षी सुचवितात. शिवाय राजानेहि प्रजेला दान इ. देऊन संतुष्ट ठेवावे. (२४)
एवं वनं तद् वर्षिष्ठं पक्वखर्जुर जम्बुमत् ।
गोगोपालैर्वृतो रन्तुं सबलः प्राविशद् हरिः ॥ २५ ॥
खजूर जांभळे तेंव्हा त्या वृंदावनि शोभती । क्रीडण्या राम श्यामो तैं सगोपाल प्रवेशले ॥ २५ ॥
गोगोपालैः वृतः - गाई व गोपाळ यांनी वेष्टित असा - सबलः हरिः - बळरामासहित श्रीकृष्ण - एवं वरिष्ठं - याप्रमाणे समृद्ध अशा - पक्वखर्जूरजम्बुमत् - पिकलेला खजूर व जांभळे यांनी युक्त - तत् वनं - अशा त्या वनात - रंतुं प्राविशत् - खेळण्याकरिता शिरला. ॥२५॥
वृंदावन अशा प्रकारे शोभिवंत आणि पिकलेले खजूर तसेच जांभळांनी बहरलेले होते. वनात विहार करण्यासाठी बलरामाबरोबर श्रीकृष्णांनी गोपाळ आणि गुरांना घेऊन प्रवेश केला. (२५)
धेनवो मन्दगामिन्य ऊधोभारेण भूयसा ।
ययुर्भगवताऽऽहूता द्रुतं प्रीत्या स्नुतस्तनीः ॥ २६ ॥
स्तनभारे तदा गाई मंद चालेचि चालती । हाकारी जधि श्रीकृष्ण धावती दूध तैं गळे ॥ २६ ॥
भगवता आहूताः - श्रीकृष्णाने हाक मारिलेल्या - भूयसा ऊधोभारेण - पुष्ट असलेल्या कांसेच्या भाराने - मंदगामिन्यः धेनवः - हळूहळू चालणार्या गाई - प्रीत्या स्त्रुतस्तनीः - आनंदाने ज्यांच्या स्तनांतून दूध पडत आहे अशा, - द्रुतं ययुः - त्वरेने गेल्या ॥२६॥
दुधाने भरलेल्या सडांमुळे गाई हळूहळू चालत होत्या. पण जेव्हा श्रीकृष्ण हाका मारीत, तेव्हा त्या प्रेमामुळे भराभर चालू लागत. त्यावेळी त्यांच्या सडांतून दुधाच्या धारा जमिनीवर पडत असत. (२६)
वनौकसः प्रमुदिता वनराजीर्मधुच्युतः ।
जलधारा गिरेर्नादाद् आसन्ना ददृशे गुहाः ॥ २७ ॥
वनात पाहिले कृष्णे आनंदी भिल्ल भिल्लिनी । मध तो वृक्ष राईंचा डोंगरी जळ ते झरे । सुरेल ध्वनि तो येई निवारा त्यां गुहेतही ॥ २७ ॥
प्रमुदिताः वनौकसः - आनंदित झालेले अरण्यवासी लोक - मधुच्युतः वनराजीः - ज्यातून मध गळत आहे अशा वृक्षांच्या राई - गिरेः जलधाराः - पर्वतावरून पाडणारे पाण्याचे धबधबे - (तासां) नादान् - त्यांचा शब्द - आसन्नाः गुहाः (च) - आणि जवळ असणार्या गुहा - ददृशे - पहाता झाला ॥२७॥
भगवंतांनी पाहिले की, वनवासी लोक आनंदात मग्न आहेत. वनराईतून मध गळत आहे. पर्वतातून झुळझुळ आवाज करीत झरे वाहात आहेत. आणि त्याचबरोबर पाऊन पडताना आसर्यासाठी गुहाही आहेत. (२७)
क्वचिद् वनस्पतिक्रोडे गुहायां चाभिवर्षति ।
निर्विश्य भगवान् रेमे कन्दमूलफलाशनः ॥ २८ ॥
वर्षा ती पडता कृष्ण लपे कोपात वृक्षिच्या । कधी गुंफेत गोपाळांसवे कंदहि भक्षि तो ॥ २८ ॥
कंदमूलफलाशनः भगवान् - कंद, मुळे, व फळे भक्षण करणारा श्रीकृष्ण - क्वचित् वनस्पतिक्रोडे - केव्हा वृक्षांच्या झुडुपात - देवे अभिवर्षति च - आणि पाऊस पडत असता - गुहायां - गुहेत - निर्विश्य - शिरून - रेमे - क्रीडा करिता झाला ॥२८॥
जेव्हा पाऊस पडत असे, तेव्हा श्रीकृष्ण कधी एखाद्या वृक्षाच्या छायेत जाऊन बसत. कधी कधी एखाद्या गुहेमध्ये जाऊन बसत तर कधी कंदमुळे व फळे खाऊन बोपाळांबरोबर रमत. (२८)
दध्योदनं समानीतं शिलायां सलिलान्तिके ।
सम्भोजनीयैर्बुभुजे गोपैः सङ्कर्षणान्वितः ॥ २९ ॥
खडकाशी नदीकाठी सर्व गोप तसे बळी । दहीभात तशा शाका घरची डाळ जेवि तो ॥ २९ ॥
संकर्षणान्वितः - बळरामासह कृष्ण - समानीतं दध्योदनं - आणलेला दहीभात - सलिलांतिके शिलायां - पाण्याच्या जवळ दगडावर - संभोजनीयैः - बरोबर जेवण्यास योग्य अशा - गोपैः बुभुजे - गोपांसह जेवता झाला ॥२९॥
कधी पाण्याजवळच एखाद्या शिळेवर बसत आणि बलराम व गोपाळाच्यासह घरून आणलेला दहीभात, भाजी, चटणी इत्यादिबरोबर खात. (२९)
शाद्वलोपरि संविश्य चर्वतो मीलितेक्षणान् ।
तृप्तान् वृषा वत्सतरान् गाश्च स्वोधोभरश्रमाः ॥ ३० ॥
वर्षा ऋतूत ते बैल दुभत्या गायि वासरे । उशीर चरती तैसे रवंथ करिती पुन्हा ॥ ३० ॥
शाद्वलोपरिसंविश्य - गवतावर बसून - मीलितेक्षणं चर्वतः - डोळे मिटून रवंथ करणार्या - वृषान् वत्सतरान् - बैलांना व वासरांना - तृप्तान् (दृष्ट्वा) - संतुष्ट पाहून - स्वोधोभरश्रमाः गाः च - व आपल्या पुष्ट स्तनांच्या भाराने श्रमित होणार्या गाईंना - तृप्ताः (वीक्ष्य) - तृप्त झालेल्या पाहून ॥३०॥
वर्षा ऋतूमध्ये बैल, वासरे तसेच दुधाने भरलेल्या सडांच्या भारांनी थकलेल्या गाई पोट भरल्यावर हिरव्यागार गवतावर बसून डोळे मिटून रवंथ करीत असत. (३० )
प्रावृट्श्रियं च तां वीक्ष्य सर्वभूतमुदावहाम् ।
भगवान् पूजयांचक्रे आत्मशक्त्युपबृंहिताम् ॥ ३१ ॥
वर्षा ऋतू असे सर्वां तोषवी मनि तो बहू । हरीची असुनी लीला हरीच वाहवा करी ॥ ३१ ॥
च - आणि - सर्वभूतमुदावहां - सर्व प्राण्यांना आनंद देणार्या - आत्मशक्त्युपबृंहितां - आणि स्वतःच्या शक्तीने वर्धित अशा - तां प्रावृटश्रियं वीक्ष्य - त्या वर्षाकालच्या शोभेला पाहून - (तां) पूजयांचक्रे - तिचा गौरव करिता झाला ॥३१॥
सर्व प्राण्यांना सुख देणार्या त्यांच्याकडे व आपल्याच शक्तीचा विलास असलेल्या वर्षा ऋतूच्या सौंदर्याकडे पाहून भगवंत त्यांची प्रशंसा करतात. (३१)
एवं निवसतोस्तस्मिन् रामकेशवयोर्व्रजे ।
शरत् समभवद् व्यभ्रा स्वच्छाम्ब्वपरुषानिला ॥ ३२ ॥
या परी राम नी श्याम आनंदे व्रजि राहती । संपला ऋतु हा तेंव्हा जल वायू हि शुद्ध हो ॥ ३२ ॥
एवं - याप्रमाणे - तस्मिन् व्रजे - त्या गोकुळात - रामकेशवयोः निवसतोः - बळराम व श्रीकृष्ण रहात असता - व्यभ्रा - नाहीसे झाले असे मेघ ज्यातून असा - रवच्छाम्ब्वपरुषानिला - स्वच्छ आहेत उदके ज्यातील असा व शांत आहे वायु ज्यातील असा - शरत् समभवत् - शरत्काल प्राप्त झाला ॥३२॥
अशा प्रकारे श्याम आणि बलराम व्रजामध्ये राहात असता वर्षा ऋतू संपून शरद ऋतू आला. आता आकाशत ढग नव्हते. पाणी निर्मळ झाले आणि वारा संथ गतीने वाहू लागला. (३२)
शरदा नीरजोत्पत्त्या नीराणि प्रकृतिं ययुः ।
भ्रष्टानामिव चेतांसि पुनर्योगनिषेवया ॥ ३३ ॥
जलीं शरद्ऋतु मध्ये कमळे फुलली तशी । योगभ्रष्ट पुरूषाचे योगे चित्त स्थिरे तसे ॥ ३३ ॥
नीरजोत्पत्त्या शरदा - कमळांची आहे उत्पत्ति ज्यात अशा शरद् ऋतूमुळे - पुनः योगनिषेवया - पुनरपि योगाचे सेवन केल्याने - भ्रष्टानां चेतांसि इव - योगभ्रष्ट झालेल्यांची मने जशी तशी - नीराणि प्रकृतिं ययुः - उदके आपल्या मूळच्या स्वच्छ स्वरुपाला प्राप्त झाली ॥३३॥
ज्याप्रमाणे योगभ्रष्ट पुरुषांची चित्ते पुन्हा योगसाधना केल्याने निर्मळ होतात, त्याप्रमाणे शरद ऋतूमुळे आणि कमळे तयार झाल्याने पाणी स्वच्छ झाले. (३३)
विवरण :- वर्षा ऋतूमध्ये सतत झालेल्या वृष्टीने पाणी गढूळ बनले; पण तेच पाणी शरद ऋतूत स्वच्छ झाले. पाण्याचा मूळ स्वभाव, स्वरूप स्वच्छ असण्याचाच; पण काही बाह्य कारणांनी ते गढूळ, अशुद्ध बनते. यास योग्याची उपमा दिली आहे. योगी स्वभावतः शुद्ध मनाचा; पण मनुष्यधर्मानुसार काही काळ त्याचे मन मलिन बनले, तरी योगाच्या आचरणाने ते शुद्धच होते. त्याचप्रमाणे वर्षाकालीन गढूळ पाणी शरद् ऋतूमध्ये पुन्हा शुद्ध झाले. (३३)
व्योम्नोऽब्भ्रं भूतशाबल्यं भुवः पङ्कमपां मलम् ।
शरत् जहाराश्रमिणां कृष्णे भक्तिर्यथाशुभम् ॥ ३४ ॥
शरदे सारिले मेघ कीट ही मिटले पहा । अशुभा नाशि जै विष्णु आश्रमा पाळितो तया ॥ ३४ ॥
व्योम्नः अब्दं - आकाशातील मेघ - भूतशाबल्यं - वस्तूंवरील मळ - भुवः पङ्कं - पृथ्वीवरील चिखल - अपां मलं - पाण्याचा मल - शरत् जहार - शरद् ऋतु नाहीसे करता झाला - यथा - ज्याप्रमाणे - कृष्णे भक्तिः - कृष्णाविषयीची भक्ति - आश्रमिणां - ब्रह्मचर्यादि आश्रमांत वागणार्यांचे - अशुभं (हरति) - पाप नाहीसे करते ॥३४॥
जसे भगवंतांची भक्ति आश्रमानुसार वागणार्यांचे पाप नष्ट करते, त्याचप्रमाणे शरद ऋतूने आकाशातील ढग, पावसाळ्यातील जीव, जमिनीवरचा चिखल आणि पाण्याचा गढूळपणा नाहीसा केला. (३४)
विवरण :- ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास हे चार आश्रम. त्या चारहि आश्रमातील दुःखांचा (ब्रह्मचर्य - गुरुकडून ज्ञानप्राप्ती होताना येणार्या अडचणी, गृहस्थ - विषयसंगदोष, वानप्रस्थ - योग्य ते धर्मानुष्ठान करणे शक्य न होणे, संन्यास - कृष्णप्राप्तीसाठी अडथळा असणार्या पापपुण्यादि गोष्टी.) केवळ हरिभक्तीच नाश करते. त्याप्रमाणे वर्षाऋतूत आलेले पृथ्वीवरील मालिन्य शरद् ऋतू दूर करतो. यावरून, चारहि आश्रमवासियांनी कृष्णभक्ती करावी (संसारदुःखांचा नाश करण्यास) हे सूचित केले आहे. (३४ )
सर्वस्वं जलदा हित्वा विरेजुः शुभ्रवर्चसः ।
यथा त्यक्तैषणाः शान्ता मुनयो मुक्तकिल्बिषाः ॥ ३५ ॥
सर्वस्व दान अर्पोनी कांतिमान् मेघ जाहले । संन्यासी शोभती जैसे कामना त्यागिलावरी ॥ ३५ ॥
यथा त्यक्त्यैषणाः - ज्याप्रमाणे सर्व इच्छा टाकून दिलेले - शांताः - शांत चित्ताचे - मुक्तकिल्बिषाः - व ज्यांची पापे नाहीशी झाली आहेत - मुनयः - असे मुनि - (तथा) - त्याप्रमाणे - जलदाः सर्वस्वं हित्वा - मेघ आपले सर्वस्व टाकून - शुभ्रवर्चसः विरेजुः - स्वच्छ कांतीने युक्त असे शोभले ॥३५॥
जसे सर्व कामनांचा त्याग करून शांत झालेले मुनी पापमुक्त होऊन शोभतात, त्याप्रमाणे आपले सर्वस्व असलेल्या पाण्याचे दान करून ढग शुभ्र कांतीने शोभू लागले. (३५)
विवरण :- खरे तर पाण्याने भरलेला काळाभोर मेघच शोभून दिसतो. पण इथे मात्र शुभ्रवर्णी ढगाच्या शोभेचे वर्णन केले आहे. कारण या ढगाने आपल्याजवळील जलरूपी धनाचे दान देऊन तो रिता झाला आहे. धनाचा संचय करणार्यापेक्षा त्याचे सत्पात्री दान करणारा उदार दाताच अधिक श्रेष्ठ, असा इथे आशय. पुत्र, वित्त, दारा यांचा मोह संसारी माणसास मोठया प्रमाणात असतो. त्यांचा त्याग करणार्या मुनींनाच ईश्वरप्राप्ती होते. (३५ )
गिरयो मुमुचुस्तोयं क्वचिन्न मुमुचुः शिवम् ।
यथा ज्ञानामृतं काले ज्ञानिनो ददते न वा ॥ ३६ ॥
पर्वती वाहती ओढे कल्याणप्रद त्या जळें । पात्रता जाणता ज्ञानी जसे ते ज्ञान दाविती ॥ ३६ ॥
यथा ज्ञानिनः - ज्याप्रमाणे ज्ञानी लोक - काले ज्ञानामृतं ददते - योग्य काळी ज्ञानामृत देतात - न वा (सर्वदा) - नेहमी देत नाहीत - गिरयः - पर्वत - क्वचित् शिवं - कोठे कोठे स्वच्छ - तोयं मुमुचुः - पाणी सोडिते झाले. ॥३६॥
जसे ज्ञानी पुरुष योग्य वेळी आपल्या अमृतमय ज्ञानाचे कोणा अधिकार्याला दान करतात आणि कोणाकोणाला करीतही नाहीत, त्याप्रमाणे आता पर्वतांमधून कुठे कुठे झरे वाहात होते, तर कुठे कुठे वाहात नव्हते. (३६)
विवरण :- ज्याप्रमाणे ज्ञानी पुरुष सर्वानाच ज्ञान न देता थोडयांनाच देतात, त्याप्रमाणे मेघहि काही ठिकाणी वर्षा करतो, काही ठिकाणी नाही. जो खरोखरच ज्ञानपिपासू आहे, ज्ञानप्राप्तीसाठी कितीही कष्ट करण्याची त्याची तयारी आहे, अशा शिष्याची पारख करून त्यालाच गुरू ज्ञान देतो. अन्यथा अपात्र ज्ञानदान चुकीचे. गीतेत 'तद्गिद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया । उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः ।' असे ज्ञानदानाबद्दल सांगितले आहे. आद्य शंकराचार्यानीही आपल्या शांकरभाष्यात पर्जन्याप्रमाणे परमेश्वर सर्वांवर कमी अधिक कृपादृष्टी ठेवतो. असे सांगताना 'ईश्वरस्तु पर्जन्यवत् द्र्ष्टव्यः ।' असेच सांगितले आहे. शिवाय निसर्गनियमाप्रमाणे पाहिले तर वर्षा आणि शरद् ऋतूतील वृष्टी यांमध्येहि फरक आहे. वर्षा ऋतूत बहुतेक सगळीकडे वृष्टी होते तशी शरद् ऋतूत नाही. (३६ )
नैवाविदन् क्षीयमाणं जलं गाधजलेचराः ।
यथाऽऽयुरन्वहं क्षय्यं नरा मूढाः कुटुम्बिनः ॥ ३७ ॥
लहान खाच खड्ड्यांचे आटले जल ते जसे । कुटुंबा पोषिता मूढ न स्मरे आयुही सरे ॥ ३७ ॥
यथा - ज्याप्रमाणे - कुटुंबिनः मूढाः नराः - गृहस्थाश्रमी अज्ञानी लोक - अन्वहं क्षय्यं आयुः - दररोज क्षीण होणारे आयुष्य - तथा - त्याप्रमाणे - गाधजलेचराः - थोड्या पाण्यात संचार करणारे जीव - क्षीयमाणं जलं - आटत चाललेले पाणी - न एव अविंदन् - जाणू शकले नाहीत. ॥३७॥
जसे कुटुंबाचे पोषण करण्यात व्यग्र झालेले मूर्ख लोक स्वतःचे आयुष्य क्षणोक्षणी कमी होत चालले आहे, हे जाणत नाहीत, त्याप्रमाणे पाणी भरलेल्या लहान लहान खड्ड्यांतील जलचरांना खड्ड्यांतील पाणी दिवसेंदिवस कमी होत चाललेले कळत नव्हते. जसे (३७)
विवरण :- संसाराच्या पाशात गुरफटलेल्या सामान्य मनुष्याच्या आयुष्याचा कुटुंबाच्या चिंतेने र्हास होतो. पण अज्ञानाने ते त्याच्या ध्यानीही येत नाही. तो त्यातच अधिकाधिक लिप्त होऊन क्षीण होत जातो. असार संसारातून तारणारा एकच परमेश्वर आहे हे त्याचे ध्यानीही येत नाही. थोडयाशा पाण्याच्या साठयात राहणार्या अल्पसंतुष्ट अज्ञ अशा माशात आणि त्याच्यात फरक तो कोणता ? संसाराचे अनित्यत्व आणि असारत्व तर इथे सूचित केले आहेच, पण वर्षाऋतूनंतर शरदापर्यंत पाण्याच्या पातळीचे, साठयाचे प्रमाण हळूहळू कमी होत जाते. हा निसर्गनियमही या उदाहरणावरून सिद्ध होतो. (३७)
गाधवारिचरास्तापं अविन्दन् शरदर्कजम् ।
यथा दरिद्रः कृपणः कुटुम्ब्यविजितेन्द्रियः ॥ ३८ ॥
थोड्याशा जळिचे जीव उन्हाने पीडले तदा । त्रासतो ऐतपोसा जैं कुटुंबा पोषितो पहा ॥ ३८ ॥
यथा अविजितेंद्रियः - ज्याप्रमाणे इंद्रियनिग्रह न केलेला - कुटुंबी कृपणः दरिद्रः - प्रपंच करणारा दुःखी व दरिद्री मनुष्य - गाधवारिचराः - थोड्या पाण्यात संचार करणारे जीव - शरदर्कजं तापं अविन्दन् - शरत्कालीन सूर्याच्या तापाला प्राप्त झाले. ॥३८॥
इंद्रियांच्या ताब्यात राहाणार्या दीनवाण्या आणि दरिद्री गृहस्थाला निरनिराळे ताप सोसावे लागतात, त्याप्रमाणे थोड्या पाण्यात राहणार्या प्राण्यांना शरद ऋतूतील सूर्याच्या प्रखर किरणांचा अतिशय त्रास होऊ लागला. (३८)
विवरण :- इंद्रियाधीन व्यक्तीना संसारातील अनेक ताप सहन करावे लागतात. पण जितेंद्रिय या तापापासून मुक्त असतात, कारण इच्छा, वासना, इ.ना त्यांनी जिंकलेले असते. (३८)
शनैः शनैर्जहुः पङ्कं स्थलान्यामं च वीरुधः ।
यथाहंममतां धीराः शरीराद् विष्वनात्मसु ॥ ३९ ॥
ओलावा सरता वाळे तृण ते हिरवे नुरे । अहंता त्यजिता जैसा विवेकी साधको तसे ॥ ३९ ॥
यथा धीराः - ज्याप्रमाणे धैर्यशाली पुरुष - अनात्मसु शरीरादिषु - ज्यामध्ये सत्त्व नाही अशा शरीरादिकांवरील - अहंममतां (जहति) - अहंकार व माझेपणा हे सोडतात - तथा - त्याप्रमाणे - शनैः शनैः - हळू हळू - स्थलानि पङ्कं - भूमि चिखलाला - विरुधः च - आणि वनस्पति - आमं जहुः - अपक्वपणाला टाकून देत्या झाल्या. ॥३९॥
जसे विवेकसंपन्न साधक हळू हळू शरीर इत्यादि अनात्म पदार्थांबद्दल मी-माझेपण सोडून देतो, त्याप्रमाणे जमिनी हळू हळू चिखल सोडू लागल्या आणि वेली कोवळेपणा सोडू लागल्या. (३९)
विवरण :- ज्याप्रमाणे ज्ञानी व्यक्ती संसाराचे असारत्व जाणत असल्याने ममत्व, अहंकार यांचा त्याग करतो, त्याप्रमाणे जमीन चिखलाचा त्याग करते. (उन्हाचे प्रमाण वाढल्याने चिखल वाळतो.) वेली अंकुरित होतात. वर्षाऋतूमध्ये सगळीकडे ओलावा दिसून येतो. हळूहळु वृष्टी कमी झाली की, निसर्गामध्ये शुष्कता, कोरडेपणा निर्माण होतो. निसर्गातील या उदाहरणावरून मनुष्यानेहि देहावरील ममत्व सोडून अलिप्तता धारण करून मन ईश्वराकडे, भक्तीकडे एकाग्र करावे असे सूचित केले आहे. ( ३९ )
निश्चलाम्बुरभूत् तूष्णीं समुद्रः शरदागमे ।
आत्मनि उपरते सम्यङ् मुनिर्व्युपरतागमः ॥ ४० ॥
शरदीं सागरो स्थीर जाहले जल शांत ते । निःसंकल्प जसा जीव मिटवी कर्मकांड तैं ॥ ४० ॥
आत्मनि - आत्म्याच्या ठिकाणी - सम्यक् उपरते - उत्तम प्रकारे विरक्तता उत्पन्न झाली असता - व्युपरतागमः मुनिः - संपूर्ण वैदिक क्रिया टाकून दिलेला मुनि - निश्चलः भवति - स्तब्ध होतो - शरदागमे - शरत्काल प्राप्त झाला असता - निश्चलांबुः समुद्रः - स्थिर आहे पाणी ज्यातील असा समुद्र - तूष्णीं अभूत् - शांत झाला. ॥४०॥
जसे मन संकल्परहित झाल्यानंतर आत्माराम पुरुष कर्मकांडाचा आग्रह सोडून देऊन शांत होतो, त्याप्रमाणे शरद ऋतूमध्ये समुद्राचे पाणी स्थिर, गंभीर आणि शांत झाले. (४०)
विवरण :- शास्त्र, विज्ञान, वेद, तत्त्वज्ञान इ.चे अध्ययन कुठपर्यंत ? श्रीहरिचरणी मन एकाग्र होत नाही तोपर्यंत. सर्वात श्रेष्ठ भक्ती. हरिनामापुढे ज्ञानाची इतर साधने गौण आहेत. असा एकाग्रचित्त मुनी अंतर्बाह्य शांत होतो, गंभीर सागराप्रमाणे. ( ४० )
केदारेभ्यस्त्वपोऽगृह्णन् कर्षका दृढसेतुभिः ।
यथा प्राणैः स्रवज्ज्ञानं तन्निरोधेन योगिनः ॥ ४१ ॥
किसान बांध टाकोनी शेतीचे जळ रक्षिती । जैं योगी इंद्रिया रोधी रक्षिण्या ज्ञान आपुले ॥ ४१ ॥
यथा योगिनः - ज्याप्रमाणे योगी लोक - तन्निरोधेन - इंद्रिय निग्रहाच्या योगाने - प्राणैः स्त्रवत् ज्ञानं - इंद्रियांच्या द्वारा गळून जाणारे ज्ञान - कर्षकाः तु - शेतकरी लोकही - दृढसेतुभिः - बळकट अशा धरणांनी - केदारेभ्यः अपः अगृहणन् - शेतांना पाणी घेते झाले. ॥४१॥
ज्याप्रमाणे योगीजन आपल्या इंद्रियांना विषयांकडे जाण्यापासून रोखून धरून क्षीण होत जाणार्या ज्ञानाचे रक्षण करतात, त्याप्रमाणे शेतकरी शेतातील पाण्याचे बांध बंदिस्त करून वाहणारे पाणी अडवू लागले. (४१)
विवरण :- अनिर्बंध वाहणार्या पाण्याच्या प्रवाहाला अडवून बांध घालून ते पाणी साठवावे लागते. म्हणजेच त्याचा उपयोग शेतीसाठी होऊ शकतो. त्याप्रमाणे विषयोपभोगांकडे धावणार्या इंद्रियांना नियंत्रणाखाली आणल्याशिवाय ती परमेश्वराच्या ठिकाणी एकरूप होत नाहीत. विशेषतः योग्याच्या दृष्टीने हे आवश्यक आहे. (शरदामध्ये वृष्टी नसल्याने वर्षा ऋतूमध्ये साठलेल्या अतिरिक्त पाण्याला बांध घालून ते पाणी शेतीसाठी वापरले जाते.) ( ४१ )
शरदर्कांशुजांस्तापान् भूतानां उडुपोऽहरत् ।
देहाभिमानजं बोधो मुकुन्दो व्रजयोषिताम् ॥ ४२ ॥
उन्हाने तापती जीव चंद्र तो शांत ही करी । जसे देहाभिमान्याचे मिटवी दुःख कृष्ण तो ॥ ४२ ॥
उडुपः - चंद्र - भूतानां शरदर्कांशुजान् तापान् - शरत्कालीन सूर्यापासून होणार्या तापांना - अहरत् - हरता झाला - बोधः मुकुंदः - ज्ञानस्वरुप श्रीकृष्ण - व्रजयोषितां - गोकुळवासी स्त्रीजनांचा - देहाभिमानजं - देहाच्या अभिमानापासून उत्पन्न होणारा - (तापं अहरत्) - ताप हरण करिता झाला. ॥४२॥
जसे देहाभिमानामुळे होणारे दुःख ज्ञान नाहीसे करते आणि विरहाने गोपींना होणारे दुःख श्रीकृष्ण नाहीसे करतात, त्याप्रमाणे शरद ऋतूतील उन्हामुळे लोकांना होणारा त्रास चंद्र नाहीसा करू लागला. (४२)
खमशोभत निर्मेघं शरद् विमलतारकम् ।
सत्त्वयुक्तं यथा चित्तं शब्दब्रह्मार्थदर्शनम् ॥ ४३ ॥
वेदाचा जाणता अर्थ शोभे सत्ययुगी जसा । तशा आकाशज्योती तै तेजस्वी स्वच्छ त्या नभीं ॥ ४३ ॥
यथा शब्दब्रह्मार्थदर्शनं - ज्याप्रमाणे वेदाच्या योग्य अर्थाचे ज्ञान ज्याला झाले आहे असे - सत्त्वयुक्तं चित्तं - सत्त्वगुणाने युक्त असे चित्त - तथा - त्याप्रमाणे - निर्मेघं खं - मेघरहित आकाश - शरद्विमलतारकं - शरत्कालातील स्वच्छ नक्षत्रांनी युक्त - अशोभत - असे शोभले. ॥४३॥
जसे वेदांचा अर्थ जाणणारे सत्त्वगुणी चित्त शोभते, याप्रमाणे शरद ऋतूमध्ये मेघविरहित निर्मळ आकाश तार्यांच्या प्रकाशाने झगमगू लागले. (४३)
अखण्डमण्डलो व्योम्नि रराजोडुगणैः शशी ।
यथा यदुपतिः कृष्णो वृष्णिचक्रावृतो भुवि ॥ ४४ ॥
यदुवंशी जसा कृष्ण वाढला पृथिवीवरी । तसा आकाशि तो चंद्र पूर्ण आकार घेतसे ॥ ४४ ॥
यथा वृष्णिचक्रावृतः - ज्याप्रमाणे यादवांच्या समुदायाने वेष्टिलेला - यदुपति कृष्णः - यादवांचा स्वामी श्रीकृष्ण - भुवि - पृथ्वीवर - तथा - त्याप्रमाणे - अखण्डमण्डलः शशी - पूर्ण आहे बिंब ज्याचे असा चंद्र - उडुगणैः व्योम्नि रराज - नक्षत्रगणांसह आकाशात शोभला. ॥४४॥
जसे पृथ्वीतलावर यदुवंशीयांसमवेत यदुपती श्रीकृष्ण शोभतात, त्याचप्रमाणे आकाशात तार्यांसमवेत पूर्णचंद्र शोभू लागला. (४४)
आश्लिष्य समशीतोष्णं प्रसून वनमारुतम् ।
जनास्तापं जहुर्गोप्यो न कृष्णहृतचेतसः ॥ ४५ ॥
फळांनी भरले वृक्ष लतांचा गंध दर्वळे । न होय थंड नी उष्ण लोकांची आग ती मिटे ॥ ४५ ॥
समशीतोष्णं - समान आहे शीत व उष्ण ज्यात - प्रसूनवनमारुतं - असा फुलझाडांच्या समुदायावरून येणारा वायू - आश्लिष्य - सेवन करून - जनाः तापं जहुः - लोक आपला संताप दूर करिते झाले - कृष्णह्रतचेतसः - पण कृष्णाने हरण केले आहे मन ज्यांचे अशा - गोप्यः (तु) न - गोपी ताप दूर करित्या झाल्या नाहीत ॥४५॥
वनातील फुलांतून वाहणार्या समशीतोष्ण वार्याच्या स्पर्शाने लोकांचा ताप नाहीसा होत होता, तसा गोपींचा ताप मनाने श्रीकृष्णांना आलिंगन देऊन नाहीसा होत होता. (४५)
गावो मृगाः खगा नार्यः पुष्पिण्यः शरदाभवन् ।
अन्वीयमानाः स्ववृषैः फलैरीशक्रिया इव ॥ ४६ ॥
गाई नी हरिणी स्त्रीया चिमण्या इच्छिती नरा । समर्था फळ जै लाभे क्रियेच्या अनुसारची ॥ ४६ ॥
शरदा - शरत्कालामुळे - पुष्पिण्यः - गर्भ धारणाला पात्र अशा - गावः - गाई - मृगाः - हरिणी - खगाः - पक्ष्यांच्या माद्या - नार्यः - मनुष्यांच्या स्त्रिया - ईशक्रियः - ईश्वराराधनरूप क्रिया जशा - फलैः इव - आपल्या फलांनी तशा - स्ववृषैः - आपल्या पतीकडून - अन्वीयमानाः अभवन् - अनुसरल्या गेलेल्या अशा झाल्या ॥४६॥
जसे ईश्वराच्या आराधनेसाठी केलेल्या क्रियांचा पाठलाग त्यांची फळे करतात, तसेच शरद ऋतूमध्ये ऋतू प्राप्त झालेल्या गाई, हरिणी, चिमण्या आणि स्त्रिया यांचा वळू, हरीण, पक्षी आणि पुरुष पाठलाग करू लागले. (४६)
उदहृष्यन् वारिजानि सूर्योत्थाने कुमुद् विना ।
राज्ञा तु निर्भया लोका यथा दस्यून् विना नृप ॥ ४७ ॥
चोरा शिवाय ते लोक राजा येताचि निर्भय । तसे कौमूद सोडोनी पद्म तो सूर्य पाहता ॥ ४७ ॥
नृप - हे परीक्षित राजा - यथा तु राज्ञा - ज्याप्रमाणे राजाच्या योगाने - दस्यून्विना लोकाः - चोरांशिवाय इतर लोक - निर्भयाः (भवन्ति) - निर्भय होतात - (तथा) सूर्योत्थाने - त्याप्रमाणे सूर्योदय झाला असता - कुमुद्विना वारिजानि - कुमुद नावाच्या कमलाशिवाय इतर कमळे - उदह्रष्यन् - प्रफुल्लित झाली ॥४७॥
हे राजा ! जसे राजामुळे चोरांशिवाय इतर सर्व लोक निर्भय होतात, त्याचप्रमाणे सूर्योदय झाल्यामूले चंद्रविकासी कमळांशिवाय इतर सर्व प्रकारची कमळे उमलली. (४७)
विवरण :- चोर, लुटारू इ.पासून राजा प्रजेचे रक्षण करतो. प्रजेला त्याचा आधार वाटतो. पण चोरांना त्याची भीती वाटते. अर्थात असे होणेच योग्य. त्यामुळे प्रजा निर्भय रहाते. ( ४७ )
पुरग्रामेष्वाग्रयणैः इन्द्रियैश्च महोत्सवैः ।
बभौ भूः पक्वसस्याढ्या कलाभ्यां नितरां हरेः ॥ ४८ ॥
नवान्न सेविण्या लोक इंद्रोत्सविहि पातले । शेतात पिकले धान्य कृष्ण राम सुशोभले ॥ ४८ ॥
पुरग्रामेषु आग्रयणैः - नगरे व खेडी यांत - ऐन्द्रियैः च महोत्सवैः - नवान्नप्राशन व इतर लौकिक महोत्सवामुळे - हरेः च कलाभ्यां - व परमेश्वराचे अंश अशा रामकृष्णांच्या योगाने - पक्कसस्याढ्या भूः - पिकलेल्या धान्याने भरलेली अशी भूमी - नितरांबभौ - फारच शोभली ॥४८॥
त्यावेळी शहरात आणि खेड्यांमध्ये नवान्नेष्टी व लौकिक मोठ्या उत्सवांमुळे आणि विशेषतः श्रीकृष्ण व बलरामांच्या उपस्थितीमुळे परिपक्व धान्याने संपन्न पृथ्वी अत्यंत शोभिवंत दिसू लागली. (४८)
विवरण :- धान्य पक्व होऊन सुगीचे दिवस सुरू झाल्याने सगळीकडे आनंदी वातावरण निर्माण झाले. परंतु हे तयार धान्य प्रथम हरीला, देवाला अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करावयाची. त्यासाठी 'आग्रहायण यज्ञ' आयोजित करतात. (कदाचित सध्या मार्गशीर्ष महिन्यात पौर्णिमेला केली जाणारी 'नवान्न पौर्णिमा' हे आग्रहायण इष्टीचे सध्याचे रूप असावे. नवीन साळी इ. धान्य प्रथम देवाला वाहून त्यानंतर त्याचा वापर केला जातो.) ( ४८ )
वणिङ्मुनि नृपस्नाता निर्गम्यार्थान् प्रपेदिरे ।
वर्षरुद्धा यथा सिद्धाः स्वपिण्डान् काल आगते ॥ ४९ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे पूर्वार्धे विंशोऽध्यायः ॥ २० ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
साधना संपता सिद्ध दिव्यदेहास धारिती । नृपो तपी तसे छात्र कामाला लागले पुन्हा ॥ ४९ ॥ ॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर विसावा अध्याय हा ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
यथा - ज्याप्रमाणे - वर्षरुद्धाः सिद्धाः - आयुष्यामुळे अडकून पडलेले सिद्ध लोक - काले आगते - योग्य वेळ आली असता - स्वपिण्डान् - आपल्याला योग्य अशा देवादिकाच्या देहांना - प्रपद्यन्ते तथा - प्राप्त होतात त्याप्रमाणे - वणिङ्मुनि - वाणी, संन्यासी, - नॄपस्त्राताः - राजे व ब्रह्मचारी इत्यादि लोक - निर्गम्य - बाहेर पडून - अर्थान् - व्यवहारांना - प्रपेदिरे - आपापल्या प्राप्त झाले ॥४९॥
साधना करून सिद्ध झालेले पुरुष जसे योग्य वेळ येताच आपल्या देव इत्यादि शरीरांना प्राप्त होतात, त्याचप्रमाणे व्यापारी, संन्यासी, राजे आणि गुरुकुलातील विद्यार्थी, जे पावसाळा असल्यामुळे एकाच ठिकाणी राहिले होते, ते तेथून निघून आपापल्या कामाला लागले. (४९)
विवरण :- व्यापार इ. उद्योगांसाठी परदेशी (हल्लीचे काळात परप्रांती परगावी) गेलेले व्यावसायिक पावसाळा जवळ आला की, आपल्या घरी परत येतात. आणि पावसाळा संपल्यानंतर शरद ऋतूत पुन्हा उद्योगासाठी परत जातात. आपल्या घरात असणारे त्यांचे वास्तव्य हे काही काळच असते. त्याप्रमाणे योगीही पृथ्वीवर थोडाच काळ वास्तव्य करून कर्मफलानुसार दुसरा देह धारण करतात. ( ४९ ) अध्याय विसावा समाप्त |